शनिवार, ऑगस्ट 2, 2025
Home Blog Page 1695

शाळा, महाविद्यालयातील लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी राज्यात प्रभावी उपाययोजना – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 21 : शाळा, महाविद्यालयातील किशोरवयीन मुलांमध्ये अश्लील व्हिडिओ वा तत्सम चित्रीकरण यांच्या प्रभावामुळे विकृत दृष्टिकोन निर्माण होणे व त्यातून लैंगिक अत्याचार अथवा हिंसेच्या घटना घडू नयेत यासाठी राज्यात प्रभावी उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.

मुंबईतील माटुंगा येथील महानगरपालिकेच्या शाळेतील तेरा वर्षीय विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेबाबत सदस्य उमा खापरे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले होते. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, “माटुंगा येथील घटना चिंताजनक आहे. या घटनेचा तपास सुरू आहे. अशा विकृतींना आळा घालणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. सायबर गुन्ह्यांबाबत  संबंधित प्राप्त तक्रारीची तांत्रिक तपासणी करण्यासाठी राज्यामध्ये प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलांमध्ये अश्लील चित्रीकरणाच्या प्रभावामुळे विकृती वाढतेय. ही चिंताजनक बाब आहे. लैंगिक अत्याचारासंबंधी व्हिडिओ व अन्य मजकूर याबाबतची माहिती मिळाल्यावर समाजमाध्यम व वेबसाईटवरून हटवण्यासंबंधी त्वरित कारवाई करण्यात येत आहे. तसेच राज्यामध्ये इंटरनेटवरील अशा प्रकारच्या मजकुरावर आणि वेबसाईटवर प्रतिबंध घालण्याचे काम सुरु आहे. राज्यातील सायबर गुन्ह्यांबाबत सायबर इंटेलिजन्स युनिट प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहे. यामाध्यमातून सायबर गुन्हेगारीवर वचक ठेवता येईल’’, असे श्री.फडणवीस यांनी उत्तरात सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, “राज्यातील काही मोठ्या शाळा, महाविद्यालयामध्ये सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. मात्र, काही साधारण शाळा, महाविद्यालयांमध्ये सीसीटीव्ही  बसविण्याची आवश्यकता आहे. याठिकाणी टप्प्याटप्प्याने सीसीटीव्ही बसविण्यासंदर्भात सूचना देण्यात येतील. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणासंदर्भात चांगला, वाईट स्पर्श (good touch-bad touch) बाबत मार्गदर्शनपर प्रशिक्षण देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. शाळा, महाविद्यालय परिसरातील  कॅफेटेरिया व अन्य सुविधा यांचा अभ्यास करण्यासाठी शिक्षण आणि गृह विभागाच्या सचिवांची समिती नेमून एक स्वतंत्र धोरण ठरविण्यात येईल”, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपप्रश्नाला उत्तर देतांना सांगितले.

“राज्यात किशोरवयीन मुलांचे प्रबोधन करण्यासाठी ‘पोलीस दिदी’ यासारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत. पोलीस दिदींची संख्या वाढविण्यात येत आहे. यात खासगी स्वयंसंस्थांचाही सहभाग घेत आहोत.  शाळा, महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली असून शाळा प्रशासनास यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत. शालेय शिक्षण विभाग आणि गृह विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृतीसाठी बृहत कार्यक्रम हाती घेण्यात येईल”, असे श्री. फडणवीस म्हणाले.

शाळेच्या वाहनांवरील वाहनचालकांच्या नियुक्ती/ कामाबाबत लेखापरीक्षण (ऑडिट) करणे गरजेचे आहे. यासंदर्भात कायदे, नियम आणि संहिता आहेत. त्याचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात येतील, अशी माहितीदेखील उपमुख्यमंत्री यांनी दिली.

या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री प्रविण दरेकर, शशिकांत शिंदे यांनी उपप्रश्न उपस्थित केले होते.

००००

मनीषा पिंगळे/विसंअ

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा सुयोग येथे पत्रकारांशी संवाद

नागपूर, दि. 20 : शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथील सुयोग पत्रकार निवासस्थानी सदीच्छा भेट देत पत्रकारांशी संवाद साधला. सुयोग पत्रकार निवासस्थानी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन) हेमराज बागुल, मराठी भाषा विभागाचे विभागीय सहायक संचालक श्री. सुर्यवंशी, सुयोग पत्रकार निवासस्थान प्रमुख विवेक भावसार आदी उपस्थित होते.

भेटीदरम्यान मंत्री श्री. केसरकर यांनी सुयोग निवासस्थान येथील पत्रकारांच्या सुविधांबाबत माहिती घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत शालेय शिक्षण विभाग शिक्षक, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी करीत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.

 000

शाहिरांच्या समस्यांवर सकारात्मक निर्णय घेणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

नागपूर, दि. 20: राज्यातील शाहिरांच्या समस्यांची शासनाला जाणीव असून त्या समस्यांवर सकारात्मक निर्णय घेत मार्ग काढला जाईल अशी ग्वाही राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात मोर्चा घेऊन आलेल्या महाराष्ट्र शाहिर परिषदेच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना ते बोलत होते.
यावेळी बोलतांना श्री.मुनगंटीवार म्हणाले की,महाराष्ट्राच्या संस्कृतीत शाहिरांचे मानाचे स्थान आहे. महाराष्ट्राचा इतिहास गावागावात लोकांच्या मनात जीवंत ठेवण्याचे काम शाहिरांनी केले आहे. अशा शाहिरांकडे शासन दुर्लक्ष करणार नाही. मात्र अनुदानाच्या मदतीवर शाहिरांनी अवलंबून राहू नये तर त्यांना काम देता यावे असा शासनाचा प्रयत्न आहे. शासनाच्या विविध विभागांच्या योजनांच्या प्रसिद्धी प्रसाराच्या कामी शाहिरांची कला कशी वापरता येईल याची चाचपणी करीत आहोत असे त्यांनी शाहिरांच्या प्रतिनिधी मंडळाला सांगितले.राज्यातील कलाकारांचा डेटाबेस तयार करण्याच्या सूचना विभागाला दिल्या आहेत असेही श्री मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सांस्कृतिक विभागाचे सचिव सौरभ विजय यांच्यासह महाराष्ट्र शाहिर परिषदेचे हितचिंतक संजय बजाज, महाराष्ट्र शाहिर परिषदेचे पदाधिकारी शाहिर  राजेंद्र बावनकुळे,  भगवान लामजेवार, ज्ञानेश्वर मांढरे, अंबादास नागदिवे, नरहरी वासनिक,दीपमैला मालेकर, गणेश देशमुख, अरूण मेश्राम, पत्रकार खंडूराज गायकवाड हे उपस्थित होते.

चित्र अमृत प्रदर्शनीचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन

नागपूर, दि. 20 : चित्र अमृत प्रदर्शन म्हणजे चित्रकारांनी साजरा केलेला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी सोहळा आहे, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चित्र अमृत प्रदर्शनाचे कौतुक केले.

नागपूर मध्यवर्ती संग्रहालयाने नटराज आर्ट ॲन्ड कल्चर सेंटरच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या “चित्र अमृत” या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करताना त्यांनी हे उद्गार काढले. यावेळी सांस्कृतिक विभागाचे सचिव सौरभ विजय, उपसचिव विलास थोरात, नागपूर मध्यवर्ती संग्रहालयाच्या अभिरक्षिका डॉ. जया वाहने, नटराज आर्ट कल्चर सेंटरचे प्राचार्य डॉ.रवींद्र हरिदास यांच्यासह अनेक अधिकारी व चित्रकार उपस्थित होते.

नागपूर मध्यवर्ती संग्रहालय (अजब बंगला) येथे हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. डॉ. जया वाहने आणि डॉ. रवींद्र हरिदास यांनी या उपक्रमाची माहिती मंत्री महोदयांना दिली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “75 दिवस – 75 कलाकार – 75 चित्रे – 75 गावात प्रदर्शने” अशी या “चित्र अमृत” प्रदर्शनाची संकल्पना आहे. ही सर्व चित्रे स्वातंत्र्ययुद्धाशी संबंधित घटना वा व्यक्तींची आहेत. तसेच स्वतंत्र भारताला उंची गाठून देणाऱ्या व्यक्ती व घटनाही यात आहेत.

000

मिनी ऑलिंपिकच्या निमित्ताने पुण्याचे क्रीडावैभव देशपातळीवर पोहोचविण्याची संधी -विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे दि.२० : महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे आयोजित करण्यात येत असलेल्या मिनी ऑलिंपिक स्पर्धेच्या निमित्ताने पुण्याचे क्रीडा वैभव आणि क्रीडा क्षेत्रातील ओळख देशपातळीवर पोहोचविण्याची संधी आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले.

विधानभवन येथे महाराष्ट्र ऑलिंपिक स्पर्धा आयोजनाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक संघटनेचे सचिव नामदेव शिरगावकर, उपायुक्त नयना बोदार्डे, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, माहिती उपसंचालक डॉ.पुरुषोत्तम पाटोदकर उपस्थित होते.

श्री.राव म्हणाले की, महाराष्ट्र ऑलिंपिक स्पर्धेचे आयोजन पुण्यासाठी गौरवाची बाब आहे. दोन दशकानंतर असे आयोजन पुण्यात होत आहे. यासोबत जी-२० बैठका आणि एटीपी टेनिस स्पर्धेचे देखील आयोजन नववर्षाच्या सुरुवातीला होत आहे. त्यामुळे स्पर्धा आयोजनाची चांगली तयारी करण्यासोबत पुण्याचे ब्रँडीगदेखील करण्यात यावे. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उत्तम क्रीडा कौशल्य पाहण्याची संधी असल्याने त्यांनाही आयोजनात सहभागी करून घ्यावे.

स्पर्धेसाठी वाहतूकीचे योग्य नियोजन करावे. त्यासाठी वाहतूक मार्शलची  नेमणूक आवश्यक ठिकाणी करण्यात यावी. खेळाडूंना स्पर्धा कालावधीत आवश्यक आरोग्य सुविधा देण्यासाठी पथकांची नेमणूक करण्यात यावी. खेळाडूंची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या.

क्रीडा आयुक्त सुहास दिवसे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा २ ते  १२ जानेवारी २०२३ या कालावधीत पुणे येथे होत आहेत. या स्पर्धेत ३९ क्रीडा प्रकारांचा समावेश असून सुमारे ९ हजारापेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. राज्यात क्रीडा वातावरण निर्माण करणे, खेळाला उत्तेजना देणे, खेळाडूंना नैपुण्य दाखवण्याची संधी मिळावी हा या आयोजनामागचा उद्देश आहे. बालेवाडी येथे २५, जळगाव-४, नाशिक-२, नागपूर-४, मुंबई-२, बारामती, एमआयटी, पुणे, औरंगाबाद व पूना क्लब येथे प्रत्येकी १ याप्रमाणे महाराष्ट्रात स्पर्धांचे आयोजन होईल.

श्री. शिरगावकर म्हणाले की, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्याची कामगिरी उंचावण्याच्या हेतूने महाराष्ट्र ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा स्पर्धांमुळे राज्यात क्रीडाक्षेत्राला अनुकूल वातावरण निर्माण होईल. या क्रीडा स्पर्धांमुळे क्रीडा क्षेत्राचे माहेरघर म्हणून पुण्याची ओळख होईल.

महाराष्ट्र ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा जिल्हा आणि राज्यासाठी महत्वाच्या असून स्पर्धांसाठी प्रशासनाच्यावतीने आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी सांगितले.

यावेळी क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाशी संबंधित विविध बाबींचा आढावा घेण्यात आला. खेळाडू आणि प्रशिक्षकांना योग्य सुविध देण्याच्यासूचना आयुक्त श्री. राव यांनी संबंधितांना दिल्या. बैठकीला विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

000

संसदीय अभ्यासवर्गात विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा सदस्य बाळासाहेब थोरात यांचे उद्या मार्गदर्शन

नागपूर, दि. 20 : राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने राज्यातील विद्यापीठांतील राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 49 व्या संसदीय अभ्यासवर्गात बुधवार दिनांक 21 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 8.30 वा. विधानपरिषद सभागृह, विधानभवन, नागपूर येथे ‘विधिमंडळात विधेयकांचे महत्त्व व कार्यपद्धती तसेच विधिमंडळाचे विशेषाधिकार’ या विषयावर विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच सकाळी 9.30 वा. ‘विविध संसदीय आयुधे, विधिमंडळाची समिती पद्धती व अर्थविषयक समित्यांचे कामकाज’ या विषयावर विधानसभा सदस्य बाळासाहेब थोरात मार्गदर्शन करणार आहेत.

भारतातील संसदीय लोकशाही कशा पद्धतीने कार्यरत आहे, कार्यकारी मंडळावर विधानमंडळामार्फत कशाप्रकारे नियंत्रण ठेवले जाते, त्यासाठी कोणकोणत्या संसदीय आयुधांचा  वापर केला जातो, अर्थसंकल्पीय प्रक्रिया, विधिमंडळाची समिती पद्धती, कायदा तयार करण्याची प्रक्रिया इत्यादी बाबतची प्रत्यक्ष माहिती नामांकित संसदपटू व तज्ज्ञांच्या व्याख्यानांमधून तसेच सभागृहाच्या प्रत्यक्ष कामकाजाच्या अवलोकनद्वारे विद्यार्थ्यांना या व्याख्यानातून मिळत असते.

००००

दत्तात्रय कोकरे/जिमाअ/20.12.22

अनुसूचित जाती वस्ती विकास योजनेच्या अंमलबजावणीसाठी जीआयएस मॅपिंग – मंत्री संजय राठोड

नागपूर, दि. २० : राज्यातील अनुसूचित जाती वस्ती योजनेतील कामांमध्ये दुबारता टाळावी आणि कामामध्ये पारदर्शकता यावी यासाठी या योजनांच्या माहितीचे जीआयएस मॅपिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हे काम गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती मंत्री संजय राठोड यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य लहू कानडे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवेळी मंत्री श्री. राठोड बोलत होते.

अनुसूचित जाती वस्ती विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जातो. ग्रामसभेच्या माध्यमातून कामांची यादी गटविकास अधिकारी यांच्यामार्फत जिल्हा परिषदेकडे येते आणि नंतर ती जिल्हा नियोजन समितीकडे पाठविली जाते. सर्वच अनुसूचित जाती वस्त्यांमध्ये  विकास कामे मार्गी लावणे, त्या भागाचा सर्वांगीण विकास व्हावा हाच हेतू त्यामध्ये आहे, अशीही माहिती मंत्री श्री. राठोड यांनी दिली

कामांमध्ये पारदर्शकता असावी यासाठी राज्य शासन आग्रही आहे.  त्यासाठी जीआयएस मॅपिंग काम गतीने व्हावी यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. लोकसंख्येच्या निकषानुसार अनुसूचित जाती वस्ती विकासासाठी या योजनेत निधी दिला जातो. शहरी भागात नागरी वस्ती दलित वस्ती सुधार योजना राबवली जाते. वस्ती विकासासाठी दिलेला निधी त्याच कामांसाठी खर्च होईल.कामातील दुबारता टळेल, असे मंत्री श्री. राठोड यांनी सांगितले.

लक्षवेधीवरील या चर्चेत विधानसभा सदस्य श्री. कानडे यांच्यासह सदस्य वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, ज्ञानराज चौगुले, जितेंद्र आव्हाड, दीपक चव्हाण आदींनी सहभाग घेतला.

000

गोपाळ साळुंखे/ससं/

अंधेरी येथे शनिवारी रोजगार मेळावा

मुंबई, दि. २० : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर यांचे विद्यमाने दिनांक २४ डिसेंबर, २०२२ रोजी नित्यानंद शाळा, गरवारे कंपनीसमोर, सहार रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०००६९ येथे सकाळी १० ते सायं ४ या वेळेत पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. तरी १० वी, १२ वी उत्तीर्ण/आयटीआय/पदवीधर उमेदवारांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी वरील नमुद पत्यावर उपस्थित रहावे. असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर यांचे वतीने करण्यात येत आहे.

000

श्रद्धा वालकर हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालावे यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांना विनंती करणार

नागपूर, दि. २० : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी आरोपीला लवकरात लवकर कडक शिक्षा व्हावी यासाठी हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना विनंती करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

विधानसभा सदस्य अतुल भातखळकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवेळी झालेल्या चर्चेस उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, श्रद्धा वालकर हत्या प्रकरण ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिस करत आहेत. यापूर्वी श्रद्धाने तिला होत असलेल्या त्रासाबद्दल पोलिसात तक्रार दिली होती. महिन्याभराने नंतर ती तक्रार मागे घेण्यात आली. याप्रकरणी कोणाचा दबाव होता का, याची विशेष पथकामार्फत चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानंतर राज्यात ४० हून अधिक मोर्चे निघाले. विविध मोठ्या १५ हून अधिक संघटनांनी त्यात सहभाग घेतला. आंतरधर्मीय विवाहाला कोणाचा विरोध नाही. मात्र, जाणीवपूर्वक एका षडयंत्राचा भाग म्हणून असे विवाह काही जिल्ह्यात होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यासंदर्भात काही राज्यांनी कायदे केले आहेत. या कायद्यांचा अभ्यास करून अधिक प्रभावी कायदा करण्याचा विचार करण्यात येईल. षडयंत्राचा भाग म्हणून कोणाची फसवणूक होऊ नये, हीच राज्य शासनाची भूमिका असल्याचे ते म्हणाले.

राज्यातील छेडछाड, अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी शक्ती कायदा लागू करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. केंद्रीय कायद्याचा अधिक्षेप करून आपण तो कायदा करतोय त्यामुळे विविध विभागांचे म्हणणे त्यामध्ये विचारात घ्यावे लागते. यासंदर्भात राज्य शासन पाठपुरावा करत असल्याचीही माहिती उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

लक्षवेधीवरील या चर्चेत विधानसभा सदस्य श्री. भातखळकर यांच्यासह सदस्य अबू आझमी, सुनील प्रभू, आशिष शेलार आदींनी सहभाग घेतला.

0000

गोपाळ साळुंखे/ससं/

 

 

गतिमानपणे मुंबईचा कायापालट – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही

नागपूर दि. २० : रस्त्यांचे काँक्रिटीकरण, पदपथ, रस्ते, उड्डाणपूल यांचे सुशोभीकरण आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण या सर्व कामांमुळे मुंबई बदलत आहे. मुंबईकरांच्या कल्याणासाठी आगामी काळात अशाच गतिमानपणे मुंबईचा कायापालट करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.

मुंबई मालमत्ताकर विधेयकावर विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, मुंबईच्या विकासासाठी दिलेला शब्द आम्ही पाळला आहे. मुंबई बदलत असून आता महानगरातील सर्व रस्त्यांचे ६००० कोटी रुपये खर्च करून काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. सोबतच मुंबईच्या सुशोभीकरणालादेखील सुरुवात झाली आहे. त्यामध्ये रस्ते, वाहतूक बेट, पदपथ, उड्डाणपूल यांचे सौंदर्यीकरण केले जात आहे.

मुंबईत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला असून प्रत्येक वॉडमध्ये हा दवाखाना सुरू होणार आहे. त्याद्वारे उपचार आणि महत्त्वाच्या वैद्यकीय चाचण्यादेखील मोफत करण्यात येणार आहेत. मुंबईत ५५०० आशा स्वयंसेविकांची सेवा आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर शहर स्वच्छतेसाठी ५००० स्वच्छतादूतांची नियुक्ती केली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

जी २० परिषद बैठकीसाठी मुंबई सजली होती. त्यासाठी केलेल्या कामाचे कौतुक जी २० परिषदेचे शेर्पा अमिताभ कांत यांनीदेखील केले. विविध विकास कामांच्या माध्यमातून मुंबई बदलत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

००००

ताज्या बातम्या

महसूल दिनानिमित्त बेळी येथे २३ घरकुल लाभार्थ्यांना शासकीय जागेचे वाटप आदेश

0
जळगाव, दि. १ (जिमाका ): महसूल सप्ताहाचे औचित्य साधून बेळी (ता. जळगाव) गावात घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना शासकीय जागेचे वाटप आदेश  पालकमंत्री  गुलाबराव पाटील यांच्या...

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लोकाभिमुख काम करणे आवश्यक – मंत्री आदिती तटकरे

0
रायगड दि. ०१ (जिमाका): महसूल विभाग हा शासनाचा कणा असून महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लोकाभिमुख काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री...

महसूल विभाग शासनाचा आधारस्तंभ – पालकमंत्री मकरंद जाधव पाटील

0
महसूल दिनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे व अनुदानाचे वाटप बुलढाणा, दि. १ (जिमाका): महसूल विभागाच्या...

तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्या – मंत्री मकरंद जाधव पाटील

0
बुलढाणा,दि. ०१ (जिमाका) : बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, सिंदखेडराजा आणि मेहकरसह इतर तालुक्यांमध्ये मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, शेतपिकांचे,...

नैसर्गिक आपत्तीसंदर्भात तत्काळ मदत करा – मंत्री मकरंद जाधव पाटील

0
बुलढाणा, दि. १ (जिमाका): जिल्ह्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानीची गंभीर दखल घेत मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी आज...