गुरूवार, जुलै 31, 2025
Home Blog Page 1697

राज्यभरातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळी लोकसहभागातून स्वच्छता अभियान; नागरिक,स्वयंसेवी संस्था व पर्यटन प्रेमींनी सहभागी होण्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आवाहन

मुंबई, दि.25 : उद्यापासून राज्यभरातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळी लोकसहभागातून स्वच्छता अभियानास सुरुवात होत आहे. त्या अनुषंगाने ऐतिहासिक व पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या गेट-वे ऑफ इंडिया परिसरात पर्यटन दिनाच्या पुर्वसंध्येला स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. गेट-वे ऑफ इंडिया येथे उद्या दि. 26 सप्टेंबर, 2022 रोजी  दुपारी  3.00 ते सायं.6.00 या वेळेत होणाऱ्या स्वच्छता अभियानात नागरिक, स्वयंसेवी संस्था व पर्यटनप्रेमींनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

27 सप्टेंबर, 2022 या दिवशी जागतिक पर्यटन दिन जगभरात साजरा केला जातो. पर्यटन दिनाचे औचित्य साधून पर्यटन मंत्री, मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून सुप्रसिद्ध असणाऱ्या मुंबईतील गेट-वे ऑफ इंडिया परिसरात पर्यटन  विभाग व दिव्याज फाऊंडेशन यांच्या सहभागातून हा उपक्रम राबविला जात आहे.

या अभियानात श्रीमती अमृता फडणवीस, दिव्याज फाउंडेशनचे सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

000

कामगारांच्या मागण्यासंदर्भात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कर्नाटक एम्टाच्या अधिकाऱ्यांना सुनावले

चंद्रपूर,दि. 25 सप्टेंबर : भद्रावती तालुक्यातील बरांज येथे असलेल्या कर्नाटक एम्टा कंपनीतील कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यासंदर्भात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कंपनीच्या अधिका-यांना चांगलेच सुनावले. या कामगारांच्या मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असून कंपनी व्यवस्थापन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे गावक-यांनी निदर्शनास आणून दिले. यावर पालकमंत्री यांनी संबंधित अधिका-यांना जाब विचारला.

केंद्रीय कोळसामंत्री प्रल्हाद जोशी यांच्या बैठकीत मान्य झालेल्या मागण्या नंतरही सुधारीत नियुक्तीपत्र का दिले नाही. तसेच हजारीबाग (झारखंड) येथे असलेल्या त्रिवेणी माईन्सच्या धर्तीवर कामगारांचे किमान वेतन का लागू केले नाही. किमान कोल वेतनानुसार कामगारांचे वेतन ठरविणे आवश्यक आहे. यासंदर्भात 21 जुलै 2022 रोजी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली कामगारांच्या किमान कोल वेतनाबाबत बैठक घेण्यात आली. मात्र तरीसुध्दा कर्नाटक एम्टा याबाबत चालढकल करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. याबाबत लवकरच राज्य सरकार, कर्नाटक सरकार, एम्टा कंपनीच्या वरिष्ठ अधिका-यांशी मुंबईत बैठक घेतली जाईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

कंपनीच्या खाणीमध्ये आतापर्यंत 10 कामगारांचा मृत्यु झाला. मात्र केवळ सहा जणांनाच आर्थिक लाभ मिळाला असून उर्वरीत चार जणांना कधी लाभ देणार, अशी विचारणा पालकमंत्र्यांनी अधिका-यांना केली. तीन

दिवसांत संबंधित कुटुंबाला नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित होते. येत्या मंगळवारपर्यंत हा लाभ संबंधित कुटुंबाला मिळाला पाहिजे. पुनर्वसनास प्राप्त असलेल्या प्रकल्पग्रस्तांची यादी त्वरीत अंतिम करा. ब्लास्टिंग करतांना काही कामगारांच्या घराच्या भिंतीला तडे गेले आहे. त्याची नुकसानभरपाई कंपनीने तात्काळ द्यावी. तसेच यापुढे ब्लास्टिंगमुळे भिंतींना भेगा पडणार नाही, याची काळजी घ्यावी, असे निर्देश श्री. मुनगंटीवार यांनी दिले.

यावेळी गावक-यांनी सुधारीत नियुक्ती पत्र, किमान कोल वेतन, आंदोलनात सहभागी झालेल्या 25 जणांना नोकरीत सामावून घेणे, कामगारांसाठी घरे, पिण्याच्या शुध्द पाण्यासाठी आर.ओ. मशीन, गावात मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे आदी मागण्या कंपनीकडे केल्या.

बैठकीला सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, वरोराचे उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, राजुराचे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम, देवराव भोंगळे यांच्यासह मोठ्या संख्येने बरांज येथील गावकरी उपस्थित होते.

०००

मूर्ती विमानतळासाठी सर्व परवानग्या तीन महिन्यात मिळवा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर,दि. 25 सप्टेंबर : मूल तालुक्यातील मूर्ती विमानतळ देशाच्या संरक्षण दलाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. या विमानतळाचे काम रखडल्यामुळे जिल्ह्यात येणारी जवळपास 10 हजार कोटींची गुंतवणूक मागे पडली. या गुंतवणुकीमुळे येथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली असती. मात्र आता रखडलेले काम विमानाच्याच गतीने पुढे गेले पाहिजे. सर्व परवानग्या तीन महिन्यात म्हणजे 24 डिसेंबर 2022 पर्यंत मिळाल्याच पाहिजे. त्यासाठी काय करायला पाहिजे, हे अधिका-यांनीच ठरवावे. यापुढे कोणतेही कारण ऐकूण घेतले जाणार नाही, असे राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अधिका-यांना खडसावले.

नियोजन सभागृहात विमानतळाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नरेश झुरमुरे, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक गौरव उपश्याम, चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, ताडोबाचे क्षेत्र संचालक श्री. रामगावकर, बफर झोनचे उपसंचालक जी. गुरुप्रसाद, मध्यचांदाच्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, ब्रम्हपूरीचे उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, देवराव भोंगळे आदी उपस्थित होते.

बैठकीच्या आजच्या दिवसापासून पुढील तीन महिने म्हणजे 24 डिसेंबर 2022 ही परवानग्या मिळण्याची अंतिम तारीख आहे, हे अधिका-यांनी लक्षात ठेवावे, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, जिल्ह्यात वेळेत विमानतळ झाले असते तर 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली असती. याबाबत प्रसिध्द उद्योगपती रतन टाटा यांच्याशी बोलणेसुध्दा झाले होते. यातून जिल्ह्यातील किमान 10 ते 15 हजार नागरिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकला असता. मात्र यापुढे कोणतेही कारण ऐकूण घेणार नाही. विमानतळाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून 15 ऑगस्ट 2023 पर्यंत त्याचे लोकार्पण करण्याचा आपला मानस आहे. त्या दृष्टीने संबंधित अधिका-यांनी कामाचे नियोजन करून रोज पाठपुरावा करावा, असे त्यांनी सांगितले.

सोलर फेन्सींगबाबत आढावा : वन्यप्राण्यांचा संचार असलेल्या भागातील शेतक-यांना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वन जन योजनेंतर्गत सोलर फेन्सींग देण्याबाबत पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी आढावा घेतला. या योजनेंतर्गत शेतक-यांना झटका बॅटरी, तार आणि इन्सुलेशन या साहित्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. पाच एकर करीता वन विभागाकडून 15 हजार रुपये तसेच यात लाभार्थ्यांचे 25 टक्के असा हिस्सा आहे. वन विभागाने ही प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे राबवावी. तसेच ई – निविदेपेक्षा साहित्य खरेदीसाठी संबंधित शेतक-यांना कंपन्यांची निवड करू द्यावी. यासाठी साहित्य विकणा-या सर्व कंपन्यांचे वन विभागाने एक पॅनल तयार करावे. जेणेकरून शेतक-याला स्वत:च्या पसंदीने साहित्य खरेदी करता येईल. तसेच 33 टक्क्यांपेक्षा जास्त जंगल   असणा-या जिल्ह्यातील सर्व गावांना सोलर फेन्सिंग देण्याबाबत मंत्रीमंडळात चर्चा केली जाईल, असे पालकमंत्री श्री. मुनंगटीवर यांनी सांगितले.

सोलर फेन्सिंगकरीता जिल्ह्यातील 317 गावांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून लाभार्थी संख्या 28299 असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

०००

माथाडी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील; स्व. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या निधीत वाढ करू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि. २५ (जिमाका) : समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे हे सरकार आहे. माथाडी कामगाराच्या घरांचा, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा तसेच वैद्यकीय सुविधांचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. मराठा समाजात नव उद्योजक तयार व्हावेत यासाठी स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या निधीत वाढ केली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

माजी आमदार स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने तुर्भे येथील एपीएमसी मार्केटमध्ये आयोजित माथाडी कामगार मेळावा आणि गुणवंत कामगार पुरस्कार, माथाडी भूषण पुरस्कार वितरण सोहळा झाला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगार मंत्री सुरेश खाडे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, आमदार महेश शिंदे, माजी आमदार नरेंद्र पाटील, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक आदी उपस्थित होते.

कष्टकरी, मेहनती माथाडी बांधवाचे नेते म्हणजे आपले स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांना विनम्र अभिवादन करतो, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, अण्णासाहेब पाटील यांचं सामाजिक , राजकीय व कामगार क्षेत्रातील योगदान मोलाचं आणि आजही सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. स्व. अण्णासाहेब यांनी मराठा समाजातील तरुणांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दूरदृष्टीनं अनेक योजना , प्रकल्पांची मांडणी केली.

माथाडी कामगारांचे अनेक रखडलेले प्रश्न पुढील काळात मार्गी लावण्यात येतील. माथाडी कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. यासाठी मुंबई बँकेच्या मदतीने निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करू. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी उपसमिती स्थापन झाली आहे. तसेच मराठा युवकांच्या शासकीय नोकरीत नियुक्तीसाठी अधिसंख्य पदे निर्माण केली असून नियुक्ती प्रक्रिया सुरू केली आहे. स्व. अण्णासाहेब पाटील महामंडळ व सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजात नवीन उद्योजक तयार होण्यासाठी अनेक योजनांवर राज्य शासन काम करत आहे.महामंडळाची जबाबदारी पुन्हा एकदा माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांच्यावर सोपविण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

राज्य शासनाने गेल्या अडीच महिन्यात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. राज्यात पोलीस भरती प्रक्रिया आणि ७५ हजार रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

नवी मुंबईतील माथाडी तसेच भूमीपुत्रांना न्याय देण्यात येईल. नवी मुंबईतील प्रकल्पाना चालना देण्यात येईल. राज्याच्या विकासासाठी केंद्र शासनही आपल्यामागे खंबीरपणे उभे आहे, असेही मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की, मागील २०१४ ते २०१९ च्या काळात माथाडी कामगारांच्या अनेक प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेतले. अनेक प्रश्न सोडविले. या काळात स्व.अण्णासाहेब पाटील महामंडळाला पुनरुज्जीवित केले. त्यामाध्यमातून मागील काळात ५० हजार मराठा तरुणांना उद्योजक होण्याची संधी मिळाली.

माथाडी कामगाराच्या घराचा प्रश्न सोडविणे कठीण होते. पण जास्तीचा एफएसआय देऊन तो प्रश्न मार्गी लावला. या पुढील काळातही यासाठी निधी कमी पडू देणार नाही. माथाडी कामगारांचे उर्वरित प्रश्न निश्चितपणे सोडविल्याशिवाय राहणार नाही. नाशिकच्या लेव्हीचा प्रश्नही बैठक घेऊन लवकरच सोडविणार आहे. माथाडी कामगारांच्या चळवळीच्या मागे आपण भक्कमपणे उभे आहोत. माथाडी कामगार संघटनामध्ये घुसलेल्या अपप्रवृत्ती विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
हे सरकार सर्वसामान्यांचे निर्णय घेणारे सरकार आहे.


मुख्यमंत्री महोदय हे काल नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी दोन तास पायी चालत होते. हे जनतेच्या मनात कोरले जाते, असेही श्री. फडणवीस म्हणाले.

कामगार मंत्री सुरेश खाडे म्हणाले की, कोरोना काळात माथाडी कामगारांनी महत्वपूर्ण काम केले आहे. माथाडी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच सकारात्मक निर्णय घेऊ. माथाडी कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू.

माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये माथाडी कामगारांच्या समस्या मांडल्या. माथाडी कामगारांना वडाळा ट्रक टर्मिनल येथील घरांसाठी कर्ज उपलब्ध द्यावेत. नाशिक येथील लेव्हीचा प्रश्नही तातडीने सोडविण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. आमदार श्री नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मान्यवरांनी स्व अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्यास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माथाडी भूषण पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले.

000

अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील लम्पी आजार नियंत्रणात – महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

नांदेड (जिमाका) दि. 25 :- संपूर्ण राज्यात लम्पी आजाराबाबत दक्षतेचा इशारा प्रशासनाला दिला असून मी प्रत्यक्ष फिरुन आढावाही घेत आहे. राज्यातील 30 जिल्ह्यात या आजाराचा पशुधनात शिरकाव झाला आहे. अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात आपण वेळीच खबरदारी व उपाययोजना सुरु केल्याने लम्पी आजार नियंत्रणात आहे. पशुपालकांनी, शेतकऱ्यांनी घाबरून न जाता शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे आपल्या स्तरावर काळजी घ्यावी, असे आवाहन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.

नांदेड येथील मिनी सह्याद्री अतिथी गृहाच्या सभागृहात आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर –घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. एम.आर. रत्नपारखी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बी.यु. बोधनकर, डॉ. अरविंद गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

ज्या जनावरांना लम्पी आजार झाला आहे अशा जनावराना बाजूला ठेवून त्यावर औषधोपचार तात्काळ सुरु केले पाहिजे. पशुसंवर्धन विभागाकडे मुबलक प्रमाणात औषधे व लसीची मात्रा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना, पशुपालकांना लम्पी आजार लसीकरण दृष्टीकोनातून काही कमी पडू दिले जाणार नाही अशी निसंदिग्ध ग्वाही मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. सध्या ज्या गावात लम्पी बाधित जनावरे आढळत आहेत त्या गावाच्या 5 किलोमीटर परिघा पर्यत असलेल्या गावात प्राधान्याने लसीकरण केले जात आहे. 5 किलोमीटर असलेली मर्यादा वाढविण्यासाठी प्रयत्न करुन इतर गावातही लसीकरण वाढविण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

लम्पी आजारामूळे ज्या पशुपालकांनी आपली जनावरे गमावली आहेत त्यांच्यासाठी शासनातर्फे अर्थसहाय्य केले जात आहे. यात दुभत्या गायीसाठी 30 हजार रुपये, शेतात काम करणाऱ्या बैलासाठी 25 हजार रुपये, लहान कारवडी असल्यास 16 हजार रुपये मदत दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. याव्यतीरिक्त जिल्हा परिषदेलाही सानुग्रह अनुदान देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत, असे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.

000

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई, दि 25 : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव (विशेष चौकशी अधिकारी (1)) सीमा व्यास यांनी मंत्रालय येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी सुनिल तुमराम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कक्ष अधिकारी विजय शिंदे उपस्थित होते.

000

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई, दि. 25 :- ‘अंत्योदय’ संकल्पनेचे जनक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी ‘अंत्योदय’ दिनाच्याही शुभेच्छा दिल्या आहेत.

नंदनवन निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ‘पंडित दीनदयाळ यांनी अंत्योदय संकल्पना मांडून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहचविण्याचा ध्यास घेतला. त्यांचा हा ध्यास पूर्ण करण्यासाठी आपण एकजुटीने काम करूया, हेच त्यांना जयंतीनिमित्त अभिवादन ‘, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

 

000

केंद्रपुरस्कृत योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी यंत्रणा गतिमान करा – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

पुणे, दि. 24: केंद्रपुरस्कृत योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी योजनांच्या अंमलबजावणीला वेग देणे गरजेचे असून त्यासाठी सर्व यंत्रणांना गतिमान करा, असे निर्देश केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्याची केंद्रपुरस्कृत योजनांची आढावा बैठक विधानभवन येथे झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राम शिंदे, माधुरी मिसाळ, राहूल कुल, भीमराव तापकीर, महेश लांडगे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री बाळा उर्फ संजय भेगडे, विभागीय आयुक्त सौरभ राव आदी यावेळी उपस्थित होते.

केंद्र पुरस्कृत योजनांचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर श्रीमती सीतारामन म्हणाल्या, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी सौरपंप वितरण, सौर पॅनेलद्वारे ऊर्जानिर्मिती आणि त्यातून शेतकऱ्याला उत्पन्नाची संधी उपलब्ध करुन देणारी प्रधानमंत्री कुसुम योजना प्रभावीपणे राबवावी. पुणे जिल्ह्याच्या पर्यटन विकासाची क्षमता पाहता अधिकाधिक योजनांचे प्रस्ताव सादर करावेत. जिल्ह्यातील प्रत्येक गावात ऑप्टीकल फायबर जाळ्याने गतिमान इंटरनेंट सेवा पुरवण्याच्या भारत नेट योजनेला गती द्यावी.

किसान क्रेडिट कार्ड योजनेचा आढावा घेताना या योजनेंतर्गत आता केवळ शेतकरीच नाही तर मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन आदी पूरक व्यवसायांचाही कर्जपुरवठ्यासाठी समावेश केलेला असून त्यानुसार कर्जवितरण होते का अशी विचारणा करुन श्रीमती सीतारामन यांनी यावर विशेष लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना दिल्या. तसेच पोस्ट विभागाकडील प्रधानमंत्री जन विमा योजनेप्रमाणे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न करावेत, आदी सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी विभागीय आयुक्त श्री. राव यांनी सादरीकरणाद्वारे पुणे विभागात राबवण्यात येणाऱ्या केंद्र पुरस्कृत योजनांविषयी माहिती दिली. पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी अमृत सरोवर योजना, प्रधानमंत्री आवास योजना (पीएमएवाय), मुळा मुठा नदी सुधार, संपूर्ण कचरा प्रक्रिया, पीएमपीएमल कडून विद्युत व सीएनजी बसेसद्वारे प्रदुषणास आळा आदीबाबत सादरीकरण केले. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प, रिंग रोड आदींसाठीचे भूसंपादन, योजनांच्या लाभासाठी आधार लिंकींग, पीएम-किसान योजना आदींबाबत सादरीकरण केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी स्मार्ट सिटी, पीएमएवाय आदी विषयक सादरीकरण केले. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी मेट्रो प्रकल्पाचे, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त राहूल महिवाल यांनी मेट्रो तसेच रिंगरोडबाबत, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी हर घर जल, पीएमएवाय- ग्रामीण, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, स्वच्छ भारत मिशन, मनरेगा, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र आदींबाबत सादरीकरण केले.

यावेळी रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे विमानतळ यांच्या प्रकल्पांचाही आढावा घेण्यात आला. पर्यटन, महापारेषण, महावितरण, डाक विभाग, बीएसएनएल, कृषी, कौशल्य विकास आदी विभागामार्फत अंमलबजावणी होणाऱ्या योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.

बैठकीस पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आदींसह केंद्र शासनाच्या विभागाचे तसेच राज्य शासनाच्या विभागांचे जिल्हास्तरीय प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

राज्य शासनाच्या पत्रकारिता पुरस्कारांचे लवकरच वितरण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 22:   आज पत्रकारिता ही कितीही संक्रमणाच्या काळातून जात असली तरीही देशात पत्रकारिता टिकली तरच लोकशाही टिकेल. तिचे मूल्य जीवंत ठेवण्याचे कार्य सुरुच ठेवूयात. त्यामुळे पत्रकारिता क्षेत्राबाबत काळजी करण्याचे कारण नाही. राज्य शासनाकडून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारांना दिले जाणारे पुरस्कार मागील तीन वर्षापासून दिले गेले नाहीत. त्या पुरस्कारांचे लवकरच वितरण करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

विदर्भ गौरव प्रतिष्ठान व नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने ‘स्व. अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार 2021’ च्या पुरस्काराचे वितरण उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे आणि मुंबई सकाळचे संपादक महेंद्र सुके यांना प्रेस क्लब येथे त्यांच्या हस्ते करण्यात आले. रोख एकवीस हजार, शाल, श्रीफळ व स्मृतचिन्ह देवून गौरविण्यात आले.

माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यावेळी व्यासपीठावर उपस्थितीत होते. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी, प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, ज्येष्ठ पत्रकार जोसेफ राव व्यासपीठावर उपस्थित होते.

राज्यातील पत्रकाराचे प्रश्न समजावून घेऊन त्यांचे प्रश्न सोडविणार असल्याचे सांगून राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना थांबल्या होत्या. त्या सर्व योजना राबविण्याला प्राधान्य देणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले. नागपूर येथे विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि श्रमिक पत्रकार संघांच्या वतीने गेल्या चार दशकापासून पत्रकारितेत उत्कृष्ठ काम करणा-या पत्रकारांना पुरस्कार दिला जातो. ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते स्व. उमेशबाबू चौबे यांच्यापासून सुरु झालेला पत्रकारिता पुरस्कार आज दोन मान्यवरांना मिळत असल्याची भावना व्यक्त केली.

राहुल पांडे यांच्या कार्यावर प्रकाश टाकताना ते या पुरस्काराचे मानकरी ठरल्याबद्दल श्री. फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच पत्रकारितेमध्ये न्यायालयाचे काम पाहून जे कामकाज चालते त्या कामकाजाचे वृत्तांकन केले. कुठल्याही गोष्टीला सकारात्मक विचार करून त्या पद्धतीने वृत्तांकन करण्याचे काम त्यांनी सुरुवातीपासूनच केले असल्याचे सांगून आता राज्य माहिती आयुक्त पदावर काम करताना त्यांनी माहिती अधिकारचा गैरवापर करुन ब्लॅकमेलींग करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांच्याकडून होणार असल्याचा आशावाद उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

तसेच मूळचे नागपूरचे आणि आता मुंबई येथे स्थायिक झालेले  सकाळचे संपादक महेंद्र सुके यांनी पत्रकारिता करतानाच नाट्य लेखन, समीक्षणासह पत्रकारितेला साहित्याची जोड दिली. त्यांच्याकडून संवेदनशील पत्रकारिता होत आहे.  श्री. सुके यांचा पत्रकारितेचा प्रवास चांगला सुरु असून, त्यांचे अजून बरेच काही बाकी असल्याबाबत जीवनात सतत आशावादी आणि कार्यतत्पर राहण्याबाबत त्यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूती विकास सिरपूरकर यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना पत्रकारिता हे वृत आहे, असे सांगून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे उदाहरण देत पत्रकार हा कान, नाक, डोळे सतत उघडे ठेवून बातमीचा सतत शोध घेणारा असला पाहीजे. त्याची पत्रकारिता ही समाजाच्या भल्यासाठी असली पाहीजे. समाजोपयोगी पत्रकारिता न्यायमूर्ती श्री. सिरपूरकर यांनी महाभारतातील संजयाची दृष्टी ठेवली पाहीजे, असे सांगून अशी पत्रकारांना अशी दृष्टी लाभली तरच देशातील लोकशाही टिकेल आणि जगेल, असा आशावाद व्यक्त करत श्री. पांडे आणि श्री. सुके यांना शुभेच्छा दिल्या.

सत्काराला उत्तर देताना श्री. पांडे यांनी पुरस्काराचे श्रेय आई- वडील, पंजाबचे राज्यपाल तथा दै. हितवादचे विश्वस्त बनवारीलाल पुरोहीत, संपादक विजय फणशीकर यांना दिले. पुरस्कार कधी मिळाला यावर त्याचे मूल्य ठरत नाही तर तो मिळाला हे महत्त्वाचे असते, असे सांगितले. या पुरस्काराच्या रक्कमेमध्ये श्री. पांडे यांच्याकडून अधिकची पाच लाख रुपयांची रक्कम देशाच्या आंतरिक सुरक्षेच्या प्रश्नावर अभ्यास करणाऱ्या एखाद्या उमद्या, तरुण पत्रकाराला फेलोशीप मिळावी, असे त्यांनी सांगितले.

माध्यमांची विश्वासार्हता टिकवून ठेवण्याचे खूप मोठे आव्हान आहे. माध्यमांमध्ये काम करणा-या वृत्तपत्र प्रतिनिधींना खूप मोठा संघर्ष करावा लागतो आहे. माध्यमांबाबत सर्वसामान्य नागरिकांचे असलेले अज्ञान हा एक मोठा प्रश्न आहे. माध्यमांमध्ये काम करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना मिळणाऱ्या वेतनाच्या बाबीकडे श्री. पांडे यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

महेंद्र सुके यांनी नागपुरातील त्यांच्या पत्रकारितेला विविध अनुभवांतून उजाळा दिला. माध्यमांमध्ये काम करताना ते नाट्यलेखन, निर्मिती आणि समीक्षेकडे कसे वळले, याबाबतही त्यांनी सांगितले. या क्षेत्रामध्ये काम करताना त्यांचा नागपूर येथील पत्रकारिता करण्यामध्ये तत्कालीन संपादक अनिल महात्मे यांना श्रेय दिले.

तत्पूर्वी सामाजिक कार्यकर्ते तथा विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी प्रास्ताविकात पुरस्कार मिळालेल्या मान्यवरांच्या कार्यावर प्रकाश टाकत त्यांना शुभेच्छा दिल्या. तर कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्रेस क्लब नागपूरचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांचेही समयोचित भाषण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभदा फडणवीस यांनी केले तर ज्येष्ठ पत्रकार जोसेफ राव यांनी आभार मानले.

जागतिक पर्यटन दिनानिमित्त एमटीडीसीमार्फत दि. २३ ते २९ सप्टेंबरदरम्यान विविध उपक्रम

मुंबई, दि.२४ : जागतिक पर्यटन दिन हा पर्यटन मंत्रालय भारत सरकार, महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग यांच्याद्वारे विविध उपक्रमांतून साजरा केला जातो. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) यावर्षीही 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करत असून यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन (UNWTO) द्वारे सन 2022 करिता जागतिक पर्यटन दिनाचे घोषवाक्य ‘पुनर्विचारात्मक पर्यटन’ (Rethinking Tourism) हे घोषित करण्यात आले आहे.

या वर्षी इंडोनेशियातील बाली येथे 27 सप्टेंबर रोजी अधिकृत जागतिक पर्यटन दिन साजरा केला जाईल, जो विकासाचा महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्यटनाकडे वळवला जाणार आहे. जागतिक पर्यटन दिनाच्या घोषवाक्यानुसार आपण पर्यटन कसे करतो याचा फेरविचार करण्याची हीच योग्य वेळ आहे.

एमटीडीसीच्या प्रधान कार्यालयासमवेत महामंडळ स्वत: परिचलन करत असलेल्या सर्व प्रादेशिक कार्यालये, सर्व पर्यटक निवासे, उपहारगृहे, बोट क्लब्स, माहिती केंद्रे, कलाग्राम इ. ठिकाणी जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधत दि.23 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2022 या कालावधीत पर्यटनाशी निगडीत विविध उपक्रमांची अंमलबजावणी करत ‘पर्यटन सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये नजिकच्या नामवंत सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, शाळा, पुरातत्व विभाग आदींच्या सर्वसमावेशक योगदानातून हा पर्यटन सप्ताह विविध आकर्षक उपक्रमांची अंमलबजावणी करत उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात येत आहे.

पर्यटक निवासात वास्तव्य येणाऱ्या पर्यटकांचे विमानतळ, बस स्थानक, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येईल. पर्यटक निवासामध्ये या दिवशी येणाऱ्या पर्यटकांसाठी विविध स्पर्धा तसेच पारंपरिक खेळाचे आयोजन असेल. सर्व उपहारगृहामध्ये त्या त्या भागातील स्थानिक प्रसिद्ध असलेले विशेष पदार्थ तयार करण्यात येणार असून त्याबाबत उपहारगृहाच्या प्रवेशद्वारावर पर्यटकांना सूचना फलकाद्वारे अवगत करण्यात येणार आहे. पर्यटकांकरिता अनुभवात्मक पर्यटनाची सांगड घालताना वास्तव्यास आलेल्या अतिथी पर्यटकांना निवासाभोवताली असलेल्या नजिकच्या सुरक्षित – पर्यावरण पूरक ठिकाणी ट्रेक, जंगल ट्रेल, नॅचरल वॉक इ. चा मनमुराद आस्वाद पर्यटकांना देण्यात येणार आहे.

‘पर्यटनावर पुनर्विचार’ या विषयावर विविध स्पर्धा, व्याख्यानमाला, कलेतून प्रबोधन आदींचे आयोजन करण्यात येणार आहे.

महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यांच्या निर्देशानुसार आणि महाव्यवस्थापक चंदशेखर जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पर्यटन सप्ताह’ हा पर्यटनाशी पुरेपूर निगडित राहील व आयोजित होत असलेल्या उपक्रमांद्वारे पर्यटनवाढ वृद्धिंगत होण्यास हातभार लागेल, या दृष्टीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पर्यटन दिन साजरा करण्यात येणार आहे. ऐतिहासिक स्थळी पदयात्रांचे आयोजन, छोट्या मॅरथॉन, गायन व वादनाचे कार्यक्रम, ग्रामीण भागांचे दर्शन, शालेय मुलांसाठी विविध उपक्रम, जबाबदार आणि पर्यावरणपूरक पर्यटनाच्या अंतर्गत जंगल आणि शेती  येथे  पदभ्रमंती  असे  उपक्रम  राबविण्यात  येणार  आहेत. या  निमित्ताने पर्यटन राजधानी औरंगाबाद येथे एमटीडीसी, विनीत फाउंडेशन आणि औरंगाबाद Ploggers यांच्या संयुक्त विद्यमाने मायक्रोप्लास्टिक प्लॉगिंग (Microplastic Plogging)  या नाविण्यपूर्ण उपक्रमासोबतच 27 सप्टेंबर 2022 रोजी सायक्लोथॉन चे आयोजन करण्यात आले आहे.

पर्यावरणासाठी पूरक असे स्वच्छता अभियान, समुद्रकिनारा सफाई, हस्तकला, गडभ्रमंती असे उपक्रम सर्वत्र राबविण्यात येत आहेत. पर्यटनाचा पुनर्विचार करताना पर्यावरण आणि जबाबदार पर्यटनाची सांगड घालण्यात येणार आहे. पर्यटकांनी या उपक्रमांमध्ये भाग घेऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा, तसेच पर्यावरण रक्षणामध्ये आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

आदिवासी विकासमंत्र्यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद, उच्च ध्येय गाठण्याचे केले आवाहन

0
गडचिरोली, दि. ३० जुलै (जिमाका): आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आज सेमाना रोड येथील शासकीय इंग्रजी माध्यम आदिवासी आश्रमशाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी...

‘पीएम जनमन’ आणि ‘धरती आबा’ योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून आदिवासी विकासाला गती द्या – आदिवासी...

0
आदिवासी संस्कृतीचे आदर्श दर्शन, प्रदर्शन आणि सादरीकरण व्हावे  गडचिरोली, दि. ३० जुलै (जिमाका):  गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी 'पीएम जनमन' आणि 'धरती आबा' या केंद्र सरकारच्या...

‘धरती आबा’ आणि ‘पीएम जनमन’ योजना लोकचळवळ बनवण्याचे मंत्री डॉ. अशोक उईके यांचे आवाहन

0
गडचिरोली, दि. ३० जुलै (जिमाका):  आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य शासनाने सुरू केलेल्या 'धरती आबा' आणि 'पीएम जनमन' या महत्वाकांक्षी योजनांचा लाभ शेवटच्या...

शिक्षण हेच ‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना साध्य होण्याचे साधन  – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

0
पुणे, दि. ३०: संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे अर्थात 'वसुधैव कुटुंबकम' ही संकल्पना केवळ शिक्षणातून साध्य होऊ शकते. पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार...

महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील गुंठेवारी नियमितीकरण योजनेतर्गत पहिल्या प्रस्तावाला मंजुरी

0
छत्रपती संभाजीनगर, दि.३०, (विमाका) :- छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील गुंठेवारी नियमितीकरण योजनेतर्गत प्राप्त प्रस्तावाला महानगर प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त जितेंद्र...