शुक्रवार, ऑगस्ट 15, 2025
Home Blog Page 177

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य सर्वांना प्रेरणादायी – उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील

सोलापूर, दि. 31- रणरागिणी, राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सबंध भारतभर बारा हजाराहून अधिक मंदिरांचा जिर्णोद्धार केला. पाण्यासाठी पाणवठे तसेच बारवे निर्माण करून जलव्यवस्थापनाचे उत्कृष्ट कार्य केले. त्यांचा आदर्श राज्यकारभार, युद्धनीती, न्यायव्यवस्था यातून सर्वांनाच प्रेरणा मिळते, असे गोरवोद्गार राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री श्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काढले.

शनिवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त विद्यापीठात आयोजित विविध कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे ग्रामविकास, पंचायतराज मंत्री व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील, कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले. यावेळी पीएम उषा योजनेतून दोन नवीन इमारतींचा पायाभरणी समारंभ तसेच विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थी, कर्मचाऱ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य मोठे असून त्यांच्या कार्याचा गौरव व सन्मान केंद्र व राज्य सरकारकडून त्रिशताब्दी जयंतीनिमित्त करण्यात येत आहे. 2019 मध्ये सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देऊन एक प्रकारचा सन्मान तत्कालीन सरकारकडून करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना सासरे मल्हारराव होळकर यांच्याकडून चांगली शिकवण मिळाली. पुढे त्या राज्यकारभारात व न्यायदानात पारंगत झाल्या. विद्यापीठाने त्यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा पुढे घेऊन जाताना त्यांच्या नावाप्रमाणे साजेशे कारभार करावे. विविध नवनवीन कोर्सेस सुरू करावेत. बांधकामास व विद्यापीठाच्या विविध कामास कसलाही निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

अहिल्यादेवीच्या आदर्श समाजव्यवस्था व न्यायव्यवस्थेचे अनुकरण आजच्या पिढीने करावे -पालकमंत्री जयकुमार गोरे

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या शुभेच्छा देऊन विद्यापीठातील अहिल्यादेवींच्या स्मारकाचे काम 15 जुलैपर्यंत पूर्ण होईल, असे सांगितले. एक भव्य स्मारक येथे उभा राहत असून यातून सर्वांनाच प्रेरणा मिळेल. अहिल्यादेवी होळकर यांचे काम संपूर्ण देशात आदर्शवत असे आहे. संपूर्ण देशात हिंदू मंदिरांचा त्यांनी जिर्णोद्धार केला. हिंदू संस्कृती जोपासण्याचे काम त्यांच्या हातून झाले. आज देशात त्यांच्या आदर्श विचारांचा व कार्याचा जागर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त सुरू आहे. अहिल्यादेवींच्या आदर्श समाजव्यवस्था, न्यायव्यवस्थेचे अनुकरण आजचा पिढीने केले पाहिजे. विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर केला आहे. रस्त्याचे कामही लवकरच पूर्ण होईल, असेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी सांगितले.

कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे आदर्श विचार व कार्य डोळ्यासमोर ठेवून विद्यापीठाची वाटचाल सुरू आहे. आज विद्यापीठाची विद्यार्थिनी भुवनेश्वर जाधव हिने कराटे स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पातळीवर कांस्यपदक पटकाविले. 154 हून अधिक कौशल्य विकासाचे कोर्सेस विद्यापीठात सुरू आहेत. त्याचबरोबर पंढरपुरात आंतरराष्ट्रीय वारकरी संशोधन केंद्र सुरू करण्या संदर्भात शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तृतीयपंथी तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सोयी सुविधा केंद्र देखील सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.. यासाठी शासनाकडून मदत मिळण्याची अपेक्षा कुलगुरू प्रा. महानवर यांनी यावेळी व्यक्त केली.

महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे प्रशासकीय कार्य लोकाभिमुख होते, असे सांगून प्रशासनात आजही त्यांच्या कार्याचा पगडा आहे, असे सांगितले. या कार्यक्रमास व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, सिनेट सदस्य तथा भाजपच्या शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, मोहन डांगरे, सिनेट सदस्य प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, गणेश डोंगरे, यतीराज होनमाने, अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीचे सदस्य अमोल कारंडे, माऊली हळणवर यांच्यासह विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, विद्यापीठ अभियंता गिरीश कुलकर्णी, विविध प्राधिकरणाचे सदस्य, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे व प्रा. श्रुती देवळे यांनी केले.

000000

जिल्ह्यात एकही दस्त अन्यायकारक ठरणार नाही याची काळजी घ्या – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर, दि.३१ : जिल्ह्यातील मुद्रांक व नोंदणी कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा घेताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी  सांगितले की, जिल्ह्यात एकही दस्त अन्यायकारक ठरणार नाही याची काळजी घ्या. कोणत्याही प्रकारचे नियमबाह्य काम होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात झालेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, तसेच सह जिल्हा निबंधक (मुद्रांक) अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्यासह सर्व तालुका सह दुय्यम निबंधक उपस्थित होते.

पालकमंत्री आबिटकर यांनी मुद्रांक नोंदणी कार्यालयांना जनतेच्या हितासाठी काम करण्याचे आवाहन केले. दस्त नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता राखून लोकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी विशेष काळजी घेण्याचे निर्देश दिले.

ते म्हणाले, ‘नोंदणी प्रक्रियेत होणाऱ्या गैरव्यवहारांवर तातडीने अंकुश आणला जावा. दस्त नोंदणी ही प्रक्रिया सरळसोप्या पद्धतीने पार पडावी यासाठी उपाययोजना राबविण्यात याव्यात. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला पाठीशी घातले जाणार नाही. जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होणार नाही, याची खात्री करणे हे आपले कर्तव्य आहे. नियमांनुसार काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले जाईल, तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई होईल असे त्यांनी ठामपणे सांगितले.

या बैठकीत लोकाभिमुख सेवा सुधारण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा झाली. मुद्रांक व दस्त नोंदणी प्रक्रिया अधिक गतिमान व पारदर्शक करण्यासाठी डिजिटल पद्धतींचा अधिकाधिक उपयोग करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील मुद्रांक व नोंदणी कार्यालयांच्या चांगल्या कामकाजातून जिल्ह्यातील नागरीकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न व्हावेत आणि ही त्यांची जबाबदारी आहे. नियमांचे काटेकोर पालन, पारदर्शकता, व कार्यक्षम व्यवस्थापनाच्या माध्यमातून या क्षेत्रातील फसवणूक थांबवण्यासाठी त्यांनी कटिबद्ध असले पाहिजे असे ते पुढे म्हणाले. बैठकीवेळी मान्यवरांचे स्वागत बाबासाहेब वाघमोडे यांनी पुस्तिका भेट देऊन केले.

०००००

घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रासपर्यंत मोफत वाळू उपलब्ध करून देण्याच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश 

कोल्हापूर, दि.31 : कोल्हापूर जिल्हा गौणखनिज विभाग व त्याअंतर्गत विविध विषयांवर आढावा घेण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विशेष अतिथी म्हणून ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आशिष जयस्वाल, राज्यमंत्री (वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार विभाग) हे सहभागी झाले होते. त्यांनी दिनांक 08 एप्रिल 2025 रोजीच्या सुधारित वाळू निर्गती धोरण, दिनांक 30 एप्रिल 2025 रोजीच्या शासन निर्णय आणि वन व पर्यावरण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचेकडील दिनांक 28 मार्च 2020 च्या अधिसूचनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन करत धोरणांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यावर भर दिला.

बैठकीची सुरुवात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी पालकमंत्री आणि राज्यमंत्री यांचे स्वागत करून आढावा बैठकीच्या उद्दिष्टांचा परिचय करून दिला. यानंतर पालकमंत्री आबिटकर यांनी आपले मार्गदर्शन करत दिनांक 08/04/2025 च्या सुधारित वाळू निर्गती धोरणानुसार व दिनांक 30/04/2025 च्या शासन निर्णयामध्ये नमूद घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रासपर्यंत मोफत वाळू उपलब्ध करून देण्याच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.

त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या दिनांक 28/03/2020 च्या अधिसूचनेनुसार पर्यावरण विभागाची मंजुरी आवश्यक नसलेल्या प्रकरणांची तात्काळ निश्चीती करण्यात यावी. यासाठी सर्व तहसिलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी सजग राहून कार्यवाही करावी व उपविभागीय अधिकाऱ्यांनी या कामावर नियंत्रण ठेवावे.

या बैठकीस जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा खनिकर्म अधिकारी अमोल थोरात, तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, प्रकल्प संचालक (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा), जिल्हा परिषद कोल्हापूर, कार्यकारी अभियंता (पाटबंधारे विभाग – उत्तर कोल्हापूर), उपविभागीय अभियंता गडहिंग्लज उपविभाग व अन्य संबंधित अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत वाळू निर्गती धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या अडचणी, उपाययोजना व सहकार्याच्या बाबीवर चर्चा झाली. घरकुल लाभार्थ्यांना वेळेत आणि अडथळेविना वाळूचा पुरवठा होण्यासाठी यंत्रणांमध्ये समन्वय साधण्याचा निर्णय घेण्यात आला.

पालकमंत्री आबिटकर यांनी सर्व अधिकाऱ्यांना नागरिकाभिमुख दृष्टिकोन ठेवून हे धोरण वेळेत प्रभावीपणे राबवावे व कोल्हापूर जिल्ह्याला मॉडेल जिल्हा बनवण्याचा प्रयत्न करावा, असे सांगितले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी येत्या आठ दिवसात उद्दिष्ट ठेवून एक उपक्रम हाती घेऊन काम सुरू करण्याच्या सूचना केल्या. यामध्ये उपलब्ध वाळूचे स्रोत निश्चित करून घरकुल लाभार्थ्यांना वाळूचे पासेस वितरित करण्यास सुरुवात करण्याच्या सूचना केल्या. हे करीत असताना तयार करण्यात येत असलेल्या मार्गदर्शक सूचनानुसारच कार्यवाही करावी व कोणत्याही प्रकारे नियमांच्या बाहेर जाऊन व्यावसायिक कारणासाठी वाळू दिली जाणार नाही याची खबरदारी प्रत्येक महसूल अधिकाऱ्याने घ्यावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

०००००

 

शासनाकडून कोल्हापूरच्या विकासासाठी आवश्यक ती मदत देणार – सह पालकमंत्री माधुरीताई मिसाळ

कोल्हापूर, दि. ३१ : जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने सुरू असून, येत्या काळात शासनाकडून कोल्हापूरच्या विकासासाठी आवश्यक ती मदत वेळेत दिली जाईल, अशी ग्वाही राज्यमंत्री नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, महाराष्ट्र राज्य तथा सह पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा माधुरीताई मिसाळ यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात त्यांनी त्यांच्या कार्यभाराखालील विविध विभागांचा आढावा घेतला. या बैठकीला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार राहुल आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे यांच्यासह संबंधित विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.
यावेळी सह पालकमंत्री म्हणाल्या, श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर विकास आराखड्यासह श्री ज्योतिबा मंदिर व परिसर विकास आराखड्याची अंमलबजावणी करीत असताना त्या ठिकाणी व्यावसायिक तसेच सर्वसामान्य नागरिकांना पुनर्वसनाबाबत जी काही भीती आहे, त्याबाबत प्रशासन नेमके काय करणार आहे, याबाबतची माहिती द्या. त्यामुळे त्यांचे गैरसमज दूर होऊन आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी ते सहकार्य करतील. श्री अंबाबाई मंदिराबाबत मागील दोन भेटीदरम्यान विविध कामांचा अंतर्भाव करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यासह विविध कामांचा समावेश करून तयार केलेल्या मंदिर विकास आराखड्यात अजून शंभर कोटी रुपयांच्या कामांचा अंतर्भाव केल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. संबंधित व्यावसायिकांबरोबर येत्या काळात बैठका घेऊन त्यांचे प्रश्न सोडवून पुनर्वसनाबाबतची माहिती त्यांना देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
शहराच्या हद्दवाढीबाबतही सह पालकमंत्री यांनी आजूबाजूच्या गावांमधून प्राधान्याने काही निवडक गावांचा समावेश करून त्या गावांसाठी महानगरपालिका कोणत्या सुविधा देत आहे आणि देणार आहे, याबाबत माहिती देऊन इतर गावांपुढे एक चांगले उदाहरण निर्माण करा, यामुळे आजूबाजूच्या गावांमधील हद्दवाढीबाबतचे गैरसमज दूर करता येतील, अशा सूचना त्यांनी केल्या. कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पंचगंगा नदीच्या व राष्ट्रीय महामार्गाच्या आतील गावांचा हद्द वाढीमध्ये समावेश करणे आवश्यक असल्याचे सांगून यातील दहा गावे शहरात एकरूप झाल्याचे सांगितले. याचबरोबर शहरातील रस्त्यांसाठी मागणी केलेला उर्वरित निधीही मिळावा, अशी मागणी सह पालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्याकडे केली.
आमदार राहुल आवाडे यांनी इचलकरंजी महानगरपालिके अंतर्गत रवींद्रनाथ टागोर वाचनालयासाठी आवश्यक निधी मिळावा, अशी मागणी केली. तसेच त्यांनी इचलकरंजी शहरातील एचपीसीएल गॅस पाईपलाईनसाठी तीन टप्प्यांमध्ये खोदाई झाली असल्याचे सांगून यामध्ये महानगरपालिकेला देय महसूल संबंधित कंपनीकडून मिळाला नसल्याचे सांगितले. याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आवश्यक देय महसुलाबाबतची माहिती तयार करून एचपीसीएलला देण्यास सांगितले जाईल असे सांगून लवकरच याबाबत बैठक आयोजित केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.
या बैठकीत परिवहन विभागाकडील एचएसआरपीए नंबर प्लेटबाबत अनेक तक्रारी असल्याचे सांगून प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना त्यांनी नागरिकांच्या तक्रारी सोडवून फसवणूक करणाऱ्या पुरवठादार तसेच संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच शहरातील खाजगी वाहतूक करणाऱ्या बसेस तसेच इतर वाहनांमुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी गर्दी होते, तसेच प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा नाहीत याबाबत तक्रारी असून प्रादेशिक परिवहन कार्यालयासह महानगरपालिकेने खाजगी वाहतूक व्यवस्थेसाठी उपाययोजना राबवून प्रवाशांचे प्रश्न सोडवावेत, अशा त्यांनी आरटीओ संजीव भोर यांना सूचना केल्या.
तसेच त्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेऊन जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्थेसाठी आवश्यक बसेसची मागणी असल्यास त्वरित प्रस्ताव देण्यात यावा, अशा सूचना केल्या. तसेच प्रत्येक एसटी स्टँडमधील स्वच्छतागृहांची व्यवस्था चांगली असल्याची खात्री करून आवश्यक दुरुस्त्या करण्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कोल्हापूर विभागाचे विभाग नियंत्रक शिवराज जाधव यांना सेवानिवृत्तीबद्दल त्यांचा मंडळातील ३१ वर्षांच्या सेवेबद्दल सन्मान सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आला.
कोल्हापूर महानगरपालिकेसह इचलकरंजी महानगरपालिका तसेच जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायतींच्या पूर परिस्थितीच्या अनुषंगाने पूर्वतयारीबाबतचा आढावा सह पालकमंत्री मिसाळ यांनी घेतला. यावेळी त्यांनी सांगितले, दरवर्षी पावसाळा येण्याआधी नालेसफाईसह इतर अनेक प्रकारची कामे केली जातात. या काळात धावपळ करून कामे करण्यापेक्षा वर्षातील इतर कालावधीतही पूर परिस्थितीच्या अनुषंगाने शाश्वत तयारी केली जावी.
भेटीदरम्यान सहपालकमंत्री माधुरी ताई मिसाळ यांनी अंबाबाई मंदिरात आणि जोतिबा मंदिरात जाऊन विधीवत पूजा करून विकास आराखड्याचा अनुषंगाने माहिती जाणून घेतली.

००००००

पहलगाम दहशतवादी हल्ला : राज्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत वितरीत

मुंबई, दि. 31: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या सहा नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची आर्थिक मदत वितरित करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत झालेल्या राज्यातील नागरिकांच्या कुटुंबियांना सुरवातीस 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती.  मात्र, नंतर झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही मदत रक्कम वाढवून प्रत्येकी 50 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला.  या निर्णयानुसार मदत व पुनर्वसन विभागाने मृतांच्या कुटुंबियांना ही आर्थिक मदत वितरित केली.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पीडित कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारकडून मिळालेली ही मदत ही अशा कठीण काळात कुटुंबीयांना थोडा आधार देणारी आहे, अशी भावनाही मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी व्यक्त केली.

००००

 

महिला व मुलींच्या  सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषद उत्पन्नाच्या निधीतून योजना राबविण्याचा ग्रामविकास विभागाचा निर्णय 

मुंबई,दि. ३१: महिला व बाल विकासाशी संबंधित विविध कार्यक्रम राबविण्यासाठी सर्व जिल्हा परिषदांमध्ये महिला व बाल कल्याण समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. महिला व मुलींना सर्व क्षेत्रात सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद क्षेत्रात महिला व बाल कल्याण समित्यांमार्फत जिल्हा परिषद उत्पन्नाच्या 10 टक्के निधीतून खालील योजना सक्षमपणे राबविण्याचा निर्णय घेतला असून याआधीचे  शासन निर्णय, पुरक पत्रे व शुध्दीपत्रके या द्वारे अधिक्रमित करून गट अ प्रशिक्षण व सक्षमीकरणाच्या योजना तसेच गट ब च्या योजना (वस्तु व खऱेदीच्या योजना ) राबवण्याचा निर्णय ग्रामविकास विभागमार्फत घेण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

गट अ प्रशिक्षण व सक्षमीकरणाच्या योजनेअंतर्गत मुलींना व महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण,मुलींना स्वसंरक्षणासाठी व त्यांच्या शारिरिक विकासासाठी प्रशिक्षण,महिलांसाठी समुपदेशन केंद्र,इयत्ता 7 वी ते 12 वी पास मुलींना संगणक प्रशिक्षण, तालुकास्तरावर शिकणा-या मुलींसाठी हॉस्टेल चालवणे, किशोरवयीन मुलींना व महिलांना जेंडर,आरोग्य,कुटुंबनियोजन,कायेदविषयक प्रशिक्षण, अंगणवाड्यांसाठी स्वतंत्र इमारत,भाडे, बालवाडी व अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका, आशा वर्कर्स आणि जिल्हा परिषदेअंतर्गत मानधन तत्वावर कार्यरत कर्मचारी यांना पुरस्कार देणे, पंचायत महिला शक्ती अभियान अंतर्गत पंचायत राज संस्थामधील लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण व महिला मेळावे व मार्गदर्शन केंद्र, बालवाडी व अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका यांचे प्रशिक्षण, विशेष प्राविण्य मिळवेलल्या मुलींचा सत्कार, महिला व बालकल्याण समिती सदस्यांचा दौरा या बाबींचा समावेश आहे.

तर गट ब च्या योजना (वस्तू खरेदीच्या योजना ) या मध्ये अंगणवाडींना विविध साहित्य पुरविणे, कुपोषित मुलामुलींसाठी व किशोरवयीन मुलींसाठी, गरोदर,स्तनदा माता यांना अतिरिक्त आहार,दुर्धर आजारी मुलांचे शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य, महिलांना विविध साहित्य पुरवणे, 5 वी ते 12 वी पर्यंतच्या शिकणा-या मुलींसाठी सायकल पुरवणे,या बाबींचा समावेश आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कारः

महिला व बाल विकास विभागाने प्रत्येक ग्रामपंचायत/गट ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित दिनांक 31 मे रोजी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. या शासन निर्णयामध्ये पुरस्काराचे स्वरूप, पात्रता निकष, पुरस्कारार्थी महिलेची निवड करण्याची कार्यपद्धती व यंत्रणा निश्चित करण्यात आले आहे. या पुरस्कारासाठी प्रति ग्रामपंचायत/गट ग्रामपंचायत अपेक्षित असलेला अंदाजे रूपये दोन हजार इतका खर्च महिला व मुलींना सर्व क्षेत्रात सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद क्षेत्रात महिला व बाल कल्याण समित्यांना उपलब्ध होणा-या जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाच्या 10% निधीतून करण्यात  यावा, असे शासन निर्णयात नमूद केले आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

शासन निर्णय वाचण्यासाठी शासन निर्णय महिला बालविकास योजना signed येथे क्लिक करा.

00000

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे पत्रकारितेच्या सीमा विस्तारल्या – प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह

रत्नागिरी, दि. ३१ (जिमाका)- कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे पत्रकारितेच्या सीमा विस्तारल्या आहेत, असे मार्गदर्शन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले.

कोकण विभागीय पत्रकारांच्या कार्यशाळेत ‘कृत्रिम बुद्धिमत्ता, समाजमाध्यम आणि जबाबदार पत्रकारिता विषयावर श्री.सिंह यांनी मार्गदर्शन केले.

ते म्हणाले, मोबाईलमुळे मोठा बदल घडून आलेला आहे. पत्रकारितेतील कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर फायदेशीर आहे. त्यामुळे कामांमध्ये सुलभता आली आहे. एकाचवेळी ९ भाषांमध्ये लाईव्ह भाषणाचे भाषांतर करता येते, असे सांगून, समाज माध्यमांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा अतिरेक, कृत्रिम बुध्दीमत्तेमुळे होणारे फायदे आणि होणारे नुकसान याबद्दल मार्गदर्शन केले. सत्य तुमच्याकडे आहे मात्र एआय ला सत्य काय आहे हे माहीत नसते.

श्री. सिंह म्हणाले की, मी स्वत: पत्रकार कुटुंबातून आलो आहे. माझे वडील अधिस्वीकृतीधारक पत्रकार होते. शासनाने मला त्याच विभागात काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी शासनाचा ऋणी आहे.

यावेळी कार्यशाळेत उपस्थित पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची श्री. सिंह यांनी दिलखुलास उत्तरे दिली.

००००

पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी – पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे

मुंबई, दि. ३१ : देशाचे जबाबदार नागरिक म्हणून पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे, नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करून प्रदूषण कमी करणे, तसेच वन्यजीव आणि वनस्पतींचे संरक्षण ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. हा कार्यक्रम धार्मिक स्थळाच्या परिसरात पर्यावरणपूरक सवयी रुजविण्या बरोबरच पुढच्या पिढ्यांसाठी स्वच्छ आणि हरित भविष्य घडवण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचे पाऊल ठरणार असल्याचा विश्वास पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.

आज मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर परिसरात नागरिकांमध्ये सिंगल युज प्लास्टिक टाळण्याचे आवाहन तसेच सिंगल यूज प्लास्टिक बंदीबाबत जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री श्रीमती. मुंडे बोलत होत्या. या कार्यक्रमास सिद्धिविनायक मंदिर समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, सिंगल युज प्लास्टिकचा भस्मासुर रोखायलाच हवा, सिंगल युज प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे याकरिता सिंगल युज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळण्यासाठी संकल्प, संयम आणि प्रत्यक्ष कृती याची नितांत गरज आहे. शासन स्तरावर सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरामुळे होणाऱ्या पर्यावरणीय समस्यांना आळा घालण्यासाठी वेळोवेळी महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. यासाठी विभागामार्फत प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी प्रभावी धोरणे आणि नियम ही लागू करण्यात आले आहेत. सिंगल यूज प्लास्टिकवर निर्बंध घालण्याबरोबरच, जनतेमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी शाळा, कॉलेज, आणि सार्वजनिक ठिकाणी जागरूकता मोहिम देखील राबवल्या जात आहेत. कार्यशाळा, चर्चासत्रे, आणि विविध शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून पर्यावरणाच्या संवर्धनाचा संदेश पोहोचवला जात आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या उपक्रमाअंतर्गत मंत्री पंकजा मुंडे यांनी सिद्धिविनायक मंदिर परिसरातील स्टॉलधारकांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर थांबवण्याचे सांगत स्वत: कापडी पिशव्यांचे वाटप करून पर्यावरणपूरक जीवनशैलीकडे वळण्याचे आवाहन केले. तसेच या कार्यक्रमाच्या वेळी प्लास्टिकच्या पर्यायांविषयी माहिती देणारे सूचना फलकांबरोबरच पर्यावरण जनजागृतीच्या घोषवाक्यांनी मंदिर परिसराचे वातावरण दुमदुमून गेले. पर्यावरण रक्षणासाठी शासन, संस्था आणि नागरिकांनी एकत्र येवून काम केल्यास नक्कीच सकारात्मक बदल दिसून येतील असेही मंत्री श्रीमती मुंडे यांनी यावेळी सांगितले. यावेळी सिद्धिविनायक ट्रस्टने सुद्धा प्लास्टिक बंदीसंबंधी जनजागृती कार्यक्रमात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

00000

 

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या‌ कार्याचा आदर्श घेत राज्य शासन वंचितांच्या कल्याणासाठी काम करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अहिल्यानगर, दि. ३१ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य व विचार आजही राज्यव्यवस्थेला मार्गदर्शक आहेत. अहिल्यादेवी होळकर यांनी न्यायदानाची आदर्श व्यवस्था भक्कमपणे उभी केली. अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांच्या प्रजाहितदक्ष,  राज्यकारभाराचा आदर्श समोर ठेऊन राज्य शासन देखील वंचितांच्या कल्याणासाठी काम करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  केले.

श्रीक्षेत्र चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, इतर मागासवर्गीय बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे, क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रय भरणे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अहिल्यादेवींनी 28 वर्षं राज्यकारभार केला. त्यांनी केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात क्रांती घडवली. मंदिरांचे पुनरुज्जीवन, घाटांचे बांधकाम, धर्मशाळांची उभारणी, गरीब जनतेसाठी पाणीपुरवठ्याची यंत्रणा आणि महिला सक्षमीकरणाचे कार्य  त्यांनी अत्यंत समर्पित वृत्तीने केले.

अहिल्यादेवी होळकर यांनी काशी, अयोध्या, मथुरा, पंढरपूर, नाशिक, जेजुरीसह देशभरातील धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार त्यांच्या स्वतःच्या निधीतून केला.  त्यांनी सोमनाथ येथील मंदिर नव्याने बांधले. घाट, मंदिरे बांधताना, दानपुण्य करतांना सरकारी तिजोरीतून खर्च न करता स्वतःच्या संपत्तीतून खर्च केला. एवढी श्रीमंती असतानाही त्या योग्याप्रमाणे जीवन त्या साधेपणाने जीवन जगल्या. त्यांनी स्वतःसाठी धन खर्च केले नाही, तर समाजाच्या कल्याणासाठी खर्च केले, म्हणून त्या ‘लोकमाता’ ठरल्या.

महिला सक्षमीकरण आणि आदर्श न्यायदान

गोरगरिबांना रोजगार मिळवून देण्यासाठी अहिल्यादेवी होळकर यांनी माहेश्वर येथे त्यांनी एक मोठे वस्त्रउद्योग केंद्र उभारले, तेथे माहेश्वरी वस्त्र तयार होऊ लागले. त्यांनी एक समृद्ध अर्थव्यवस्था उभी केली. महिला सैनिकांची स्वतंत्र तुकडी निर्माण करणाऱ्या त्या पहिल्या महिला शासक होत्या. त्यांच्या सैन्यदलात शिस्त होती, कौशल्य होतं, आणि युद्धसज्जतेसाठी त्यांनी स्वदेशी तोफांचं उत्पादनही सुरू केलं. न्यायपद्धतीमध्ये त्यांचा दृष्टिकोन अत्यंत प्रगतीशील होता. अहिल्यादेवींची आदर्श न्यायदानाची व्यवस्था भक्कमपणे उभी केली. अन्यायग्रस्तांना न्याय देण्याचे कार्य त्यांनी केले.  सर्वसामान्यासारखे न्यायदान करतांना हुंडाबंदी केली. महिलांचे जीवन समृद्ध करण्याचे कार्य त्यांनी केले.

श्रीक्षेत्र चौंडी विकासासाठी 681 कोटी रुपयांचा विकास आराखडा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे चरित्र, कार्य आणि आदर्श आज 300 वर्षांनंतरही तितकंच प्रभावी आणि प्रेरणादायी आहे. त्यांच्या जन्म त्रिशताब्दी  निमित्ताने शासनाने 681 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. त्यांच्या नावाने एक भव्य स्मारक, महिला सक्षमीकरणासाठी ‘आदिशक्ती अभियान’, आणि त्यांच्यावर आधारित एक बहुभाषिक चित्रपट तयार करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. या माध्यमातून त्यांचे कार्य देशभरात पोहोचविले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अहिल्यादेवी होळकर यांचे प्रजाहिताचे धोरण राबविण्यावर शासनाचा भर – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जन्मस्थान चौंडी मराठी संस्कृतीचे जागृत देवस्थान आहे. लोककल्याणकारी राज्य, सुराज्य जगाला दाखविण्याचे काम अहिल्यादेवींनी केले. अहिल्यादेवींनी सर्वसामान्य माणसांच्या विकासाचे काम केले. त्यांनी धर्मरक्षणासाठी आयुष्य समर्पित केले. महिलांसाठी सैनिक तुकडी सुरू करण्याची त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. त्यांनी महिलांना अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची शिकवण दिली आहे.

अहिल्यादेवी निष्पक्ष व न्यायप्रिय राजमाता होत्या. प्रजेसाठी रोजगार निर्माण करण्याची दूरदृष्टी अहिल्यादेवींकडे होती. त्यांनी रस्ते, पूल व घाट बांधले. अहिल्यादेवींचे प्रजाहिताचे धोरण आज शासन राबवित आहे. याच व्यासपीठावरून जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. अहिल्यादेवी होळकरांच्या आदर्शावर शासन काम करत आहे. चौंडी विकासासाठी जो काही आवश्यक निधी लागणार होता, तो देण्याचे काम शासनाने केले आहे.

आज आपण लेक लाडकी म्हणतो तसे सूनही लाडकी मानली पाहिजे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कधीही बंद केली जाणार नाही, असेही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

प्रास्ताविकात प्रा. राम शिंदे म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती शासनाच्यावतीने 2017 पासून साजरी करण्यात येत आहे. श्रीक्षेत्र चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीस्थळासाठी शासनाने 681 कोटी रुपये मंजूर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मागणी केल्यानंतर अवघ्या 16 महिन्यांच्या कालावधीतच जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर  करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, आज देशभरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली जात आहे. जिल्ह्यातील एक लाख एकल महिलांच्या पुनर्वसनासाठी जिल्ह्यात प्रकल्प राबविण्यात येणार आहे. श्रीक्षेत्र चौंडी विकासासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.

क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, अहिल्यादेवी होळकरांच्या आदर्श समोर ठेवीत शासनाने लोकहिताचे अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. धनगर समाजातील नागरिक, विद्यार्थ्यांना सवलती मिळाव्यात यासाठी राज्य शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. अहिल्यादेवी होळकरांचा वारसा जपण्यासाठी श्रीक्षेत्र चौंडीच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती सोहळ्याच्या निमित्ताने लोकराज्यचा विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित इतर विशेषांक आणि पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाला आमदार गोपीचंद पडळकर, मोनिकाताई राजळे,  शिवाजीराव कर्डीले, सुरेश धस, आमदार विठ्ठलराव लंघे, काशिनाथ दाते, आमदार अमोल खताळ, माजी मंत्री अण्णा डांगे, बबनराव पाचपुते, स्नेहलता कोल्हे, रमेश शेंडगे, प्रा. लक्ष्मण हाके, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आदी उपस्थित होते.

00000

यवतमाळ नगरपरिषद क्षेत्रातील विकास कामे तातडीने पुर्ण करा – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि. 31 (जिमाका) : यवतमाळ नगरपरिषद क्षेत्रात विविध प्रकारची जवळजवळ 70 कोटी रुपयांची विकास कामे, सिमेंट रस्ते सुरु आहे. या कामांमध्ये ज्या ठिकाणी अडचणी आहेत, त्या अडचणींची सोडवणूक करून कामे तातडीने पुर्ण करा, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.

महसूल भवन येथे पालकमंत्र्यांनी यवतमाळ शहरात सुरु असलेली विकास कामे, रस्ते व जिल्ह्यातील सिंचन सुविधांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला माजी राज्यमंत्री मदन येरावार, जिल्हाधिकारी विकास मीना, यवतमाळ सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता योगेश सोनवणे, उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे, यवतमाळ नगरपरिषदेचे मुध्याधिकारी श्री.क्यातमवार यांच्यासह जलसंपदा, बांधकाम, जलसंधारण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यवतमाळ शहरात ठिकठिकाणी सिमेंट रस्त्यांची कामे सुरु आहे. केंद्र शासनाच्या केंद्रीय मार्ग निधीतील ही कामे काही ठिकाणी संथगतीने सुरु आहे. या कामांमध्ये काही अडचणी असल्यास नगर परिषद, बांधकाम विभाग, जीवन प्राधिकरण, नगर रचना विभागाने संयुक्त पाहणी करून अडचणींची सोडवणूक करावी. या कामांसह सर्व कामे तातडीने पुर्ण करण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. अमृत योजना, नगरोत्थान योजनेंतर्गत पुर्ण झालेली कामे, सुरु असलेली व सुरूच न झालेल्या कामांचा आढावा देखील यावेळी घेण्यात आला.

यवतमाळ जिल्ह्यात सर्व सिंचन प्रकल्पांद्वारे निर्मित सिंचन क्षमता, सद्या होत असलेले सिंचन, सिंचन व्यवस्थेतील अडचणी, पाणी वापर संस्थांची उभारणी, त्यांचे सक्षमीकरण व जिल्ह्यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याबाबत पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. डेहणी उपसा सिंचन प्रकल्पाची कामे तातडीने पुर्ण करा. या प्रकल्पातून नियोजित सात हजार हेक्टरवर सिंचन क्षमता निर्माण झाली पाहिजे, असे ते म्हणाले.

जिल्ह्यात विविध सिंचन प्रकल्प मिळून असलेली सिंचनाची क्षमता प्रत्यक्षात साकार झाली पाहिजे. यासाठी आवश्यक ती कामे करा. याबाबत प्रकल्प निहाय सिंचन क्षमता व निर्माण झालेल्या सिंचन क्षमतेचा आढावा घेऊ, असे पालकमंत्री म्हणाले. श्री. येरावार यांनी शहरातील विकास कामांना गती देण्यासोबतच सिंचन सुविधेच्या बाबत मुद्दे उपस्थित केले. श्री.येरावार यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देखील पालकमंत्र्यांनी दिले.

00000

 

ताज्या बातम्या

समडोळी रोड घनकचरा प्रकल्प येथील बायो-मिथनायझेन प्रकल्पाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

0
सांगली, दि. १५, (जि. मा. का.) : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून शासन निधीतून कार्यान्वीत बायो-मिथनायझेशन प्रकल्पाचे उद्घाटन व सक्शन ॲण्ड जेटींग...

हिंगोलीत सेवादूत प्रणालीतून ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते प्रारंभ

0
राज्यात सेवादूत उपक्रम राबविणार व्हॉट्स अँप चँट बोट्सवर ऑनलाईन करा अर्ज कागदपत्रांसाठी आवश्यक पुराव्यांचीही माहिती एका क्लिकवर उपलब्ध नागरिकांचा वेळ...

कल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री नरहरी झिरवाळ

0
निर्भया पथक व ॲनिमियामुक्त हिंगोली अभियान जनजागृती रथाला पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ स्वातंत्र्यदिनानिमित्त तंबाखू मुक्त व अवयवदाची घेतली शपथ हिंगोली, दि. १५(जिमाका):...

शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून लातूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार – पालकमंत्री शिवेंद्रसिंह भोसले

0
लातूर, दि. १५: जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येत आहे. यामाध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधून नागरिकांना गुणवत्तापूर्ण आणि...

ज्ञानेश्वरीतील विश्वात्मक विचार जगाला मार्गदर्शक-मुख्यमंत्री

0
पुणे, दि. १५ : संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानाद्वारे अखिल विश्वाच्या कल्याणाची भावना मांडली आहे. ज्ञानेश्वरीतील हा विश्वात्मक विचार भारतीय संस्कृतीचे मूळ असून तो जगाला...