शनिवार, ऑगस्ट 16, 2025
Home Blog Page 179

विभागीय आयुक्त दिलीप गावडे सेवानिवृत्त

छत्रपती संभाजीनगर : दि.30 (विमाका) :- मराठवाडयात विभागीय आयुक्त म्हणून काम करताना एक दिवस गावकऱ्यांसोबत, सस्ती अदालत, संवाद मराठवाडयाशी असे उपक्रम राबवून सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला. शासकीय सेवेत विविध पदावरून सर्वसामान्यांसाठी काम केल्याचा आनंद मिळाला अशी भावना विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी व्यक्त केली. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून विविध उपक्रम लोकाभिमूख करणारे अधिकारी अशी ओळख असणारे श्री. गावडे आज (31 मे) रोजी नियत वयोमानानूसार सेवा निवृत्त होत आहेत.

विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात आयोजित निरोप समारंभात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी छत्रपती  संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, अपर आयुक्त विजयसिंह देशमुख, डॉ. अनंत गव्हाणे, अपर आयुक्त खुशालसिंह परदेशी, सहआयुक्त (नगर परिषद प्रशासन) देविदास टेकाळे, उप आयुक्त (आस्थापना) सुरेश बेदमुथा, विभागीय आयुक्त श्री. गावडे यांच्या पत्नी मनिषा गावडे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

श्री.गावडे म्हणाले, शासकीय सेवेत उपजिल्हाधिकारी पदावरून सुरूवात केली असून राज्यातील विविध विभागात 35 वर्ष सेवा केली आहे. सर्वसामान्य माणसासाठी काम करताना समर्मित भावनेने काम केले आहे. पुणे, सांगली, सातारा, अहिल्यानगर तसेच विदर्भातही काम करण्याची संधी मिळाली. सेवानिवृत्त् होताना मराठवाडयात सेवा करण्याची संधी मिळाली, व या सेवेत कामाचा मोठा आनंद मिळाला. विभागातील प्रश्न सोडविण्यासाठी कमी वेळेत ऑनलाईन उपक्रमातून सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी  सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. सेवेत समवेत काम करणाऱ्या प्रत्येक अधिकारी तसेच नागरिकांनी सहकार्य केले असल्याचे सांगताना श्री. गावडे यांनी सेवा कालावधीतील प्रसंगानिहाय आपले अनुभव विषद केले.

यावेळी विभागातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विभागनिहाय अधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी अपर आयुक्त सुरेश वेदमुथा यांनाही सेवानिवृत्तीनिमित्त निरोप देण्यात आला. श्री वेदमुथा यांनी मराठवाडयात सर्व एकत्रितपणे काम करतात, याचा अनुभव आपल्याला आल्याचे सांगितले. पुणे जिल्हयातील गावडेवाडी सारख्या छोटे गाव ते विभागीय आयुक्त असा आयुक्तांचा प्रवास आमच्यसाठी प्रेरणा देणारा असल्याचे सांगितले.

प्रास्ताविक अपर आयुक्त श्री परदेशी यांनी केले, त्यांनी श्री गावडे यांच्या सेवाकालावधी व त्यांनी राबविलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली.

यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

******

नुकसानीचे पंचनामे तात्काळ पुर्ण करा; भरपाई आराखडे त्वरीत सादर करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा, दि.30:  सातारा जिल्ह्यात 20 ते 28 मे या दरम्यान एकूण सरासरी 294 मिमी पर्ज्यनमान झाले, मे महिन्यातील पावसाची ही टक्केवारी सर्वसाधारण 880 टक्‌यांपेक्षा जास्त आहे.  माण, खटाव, फलटण या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन घरे, रस्ते, पूल, पिके यांचे नुकसान झाले आहे.  या नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करुन भरपाईसाठीचे आराखडे त्वरीत सादर करावेत, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.  यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोषी, उपवनसंरक्षक आदीती भारद्वाज, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, जयंत शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहूल अहिरे यांच्यासह पाटण, कराडचे उपविभागीय अधिकारी, विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

माहे मे मध्ये जिल्ह्यातील 50 महसूल मंडळांमध्ये 65 मिमीपेक्षा जास्त पर्ज्यन्यमान झाले आहे असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, आतापर्यंत झालेल्या पंचनाम्यानुसार या पावसाने 282 बाधित गावांमधील माण तालुक्यातील 27, फलटण तालुक्यातील 10 आणि महाबळेश्वर तालुक्यातील 1 अशा 38 घरांची पूर्णत: पडझड झाली आहे. तर जिल्ह्यातील 1826 घरांची अंशत: पडझड झाली असून 16 गोठे बाधित झाले आहेत.  शेतपीकांचे नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले असून 6 हजार 190 शेतकऱ्यांचे 1 हजार 860 हेक्टर बागायती पिकांखालील क्षेत्र तर 17 शेतकऱ्यांचे 8 हेक्टरहून अधिक फळपिकांखालील क्षेत्र बाधित झाले आहे.  या कालावधीत माण येथील 1 व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून जावून मयत झाला आहे तर खटाव मधील एक व्यक्ती विद्युत शॉक लागून मयत झाला आहे.  18 लहान, 22 दुधाळ, ओढकाम करणारी  3  जनावरे मयत झाली आहेत.  तर 150 कोंबड्याही मयत झाल्या आहेत. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्यापही सुरु असून यंत्रणांनी युध्दपातळीवर काम करुन पंचनामे त्वरीत पूर्ण करावेत.  भरपाईसाठीचे प्रस्ताव सादर करावेत.

गावापासून वाडीवस्तीला जोडणारे रस्ते, पूल यांचे नुकसान झाले असून त्यांच्या दुरुस्तीचेही प्रस्ताव संबंधित यंत्रणांनी तात्काळ सादर करावेत, असे निर्देश देवून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, ज्यांच्या घरात पाणी शिरले आहे त्यांनाही शासन नियमानुसार भरपाई देण्यात यईल, जिथे जमीन खरवडून निघाली आहे त्या जमीनींसाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करावेत.  आपत्तीच्या काळात दरडी कोसळून घाट रस्ते बंद होऊ नयेत यासाठी जेसीबी, पोकलॅन सारखी यंत्रणा तयार ठेवावी, असेही निर्देश श्री. देसाई यांनी दिले.

20 मे ते 28 मे या कालावधीत झालेल्या पावसाची आकडेवारी तालुका निहाय पुढीलप्रमाणे, सातारा 305 मि.मी., जावळी- 340.4 मि.मी., पाटण-286.9 मि.मी., कराड 246.9 मि.मी., कोरेगाव -338.4 मि.मी., खटाव-292.9 मि.मी., माण-270.8 मि.मी., फलटण-367.3 मि.मी., खंडाळा 257.1 मि.मी., वाई 279.6 मि.मी., महाबळेश्वर-297.6 मि.मी. एकूण जिल्ह्यात 294.1 मि.मी. सरासरी पाऊस या कालावधीत झाला आहे.

000

एमएसआरडीसीकडून राज्यात सुरू असलेल्या कामांचा वेग वाढवा

  • मुंबई- नाशिक महामार्गावरील रखडलेल्या कामांना गती द्यावी
  • कामात हयगय करणारे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर कठोर कारवाई करणार

मुंबई, दि. ३०: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू असलेल्या विविध रस्ते विकास कामांचा वेग वाढवा, तसेच मुंबई-नाशिक महामार्गावरील शक्य तेवढी कामे मान्सूनआधी पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

एमएसआरडीसीच्या वतीने राज्यात सुरू असलेल्या राज्यातील विविध विकास प्रकल्पांचा त्यांनी आढावा घेतला. ही सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावीत अशी अपेक्षा उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. बैठकीस एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड आणि अधिकारी उपस्थित होते.

मुंबई – नाशिक महामार्गाचा आढावा घेऊन महामार्गावरील रखडलेल्या कामांना गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. मान्सूनपूर्वी ज्या रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण होणार नाही त्याचे डांबरीकरण करून रस्ता वाहतूक करण्यास योग्य बनवावा, या मार्गावरील 31 किलोमीटरचे काँक्रीटीकरण होणे अद्यापही बाकी आहे, तसेच पिंपळास चारोटी, रेल्वे ओव्हर ब्रिज येथील काम रखडले आहे या कामांना तत्काळ गती द्यावी, कंत्राटदार ही कामे वेळेत पूर्ण करण्यास हयगय करत असल्यास त्यालाही नोटीस पाठवून ताकीद द्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

रेल्वे पुलाच्या कामासाठी गर्डर आल्यानंतर तत्काळ रेल्वेकडून मेगाब्लॉक मागून घ्यावा आणि हे काम येत्या महिन्याभरात पूर्ण करावे. या महामार्गावरील कशेळी येथील खाडीवरील पुलाचे काम ऑक्टोबरपर्यंत तर कळवा येथील खाडी पुलाचे काम जूनअखेर पूर्ण होणार आहे. येत्या पावसाळ्यात ठाणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक सुरळीत व्हायला हवी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाची मिसिंग लिंक डिसेंबर अखेर होणार पूर्ण

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकच्या कामातील सर्वात अवघड असलेले व्हर्टिकल ब्रिजचे काम सध्या सुरू आहे. हे काम अत्यंत अवघड असल्याने ते नियोजनबद्धरित्या पूर्ण करावे असे त्यांनी सांगितले. तसेच हे काम येत्या डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर तो प्रवाशांसाठी खुला होईल.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता हा महामार्ग सहा ऐवजी दहा मार्गिकांचा करण्याचा प्रस्ताव एमएसआरडीसीच्या विचाराधीन असून फिरायला जाणाऱ्या  लोकांना दिलासा देण्यासाठी हे काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे रिंगरोडच्या कामात बाधित होणाऱ्या 10 हजार  झाडांचे पुनर्रोपण करणार

पुणे रिंगरोडचे कामही सुरू झाले असून, यात एकूण १२ पेकेजेस आहेत. यातील  नऊ पेकेजेसची कामे सुरू झाली आहेत. या रिंग रोडच्या कामात बाधित होणाऱ्या दहा हजार झाडांचे पुनर्रोपण होणार आहे. यातील चार हजार झाडांचे पुनर्रोपण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.

नवीन एक्सेस कंट्रोल रस्त्यामुळे कोकणचा कायापालट

कोकणात सुरू असलेल्या रेवस रेड्डी सागरी महामार्गावर नऊ ठिकाणी खाडीवर पूल उभारण्याचे काम सुरू आहे. यात रेवस-कारंजा, रेवदंडा, आगरदांडा, केळशी, काळबादेवी, दाभोळ, जयगड अशा खाडीपुलांचा समावेश आहे. यातील काही पुलांची कामे प्रगतीपथावर असून या कामांची गती वाढवावी, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

तसेच कोकणात प्रस्तावित असलेल्या कोकण द्रुतगती एक्सेस कंट्रोल महामार्गाच्या कामाला गती देण्यात यावी, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. या महामार्गामुळे मुंबई आणि सिंधुदुर्ग हे अधिक जवळ येतील तसेच कोकणात जलद पोहोचणे शक्य होईल.

कोकणातील निवारा केंद्राच्या कामांचा वेग वाढवावा

कोकणात वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवेळी नागरिकांच्या तात्पुरत्या निवाऱ्यांची सोय व्हावी. यासाठी एमएसआरडीसीच्या वतीने ८६ निवारा केंद्रे उभारण्यात येणार होती. यातील ३७ निवारा केंद्राचे काम प्रगतीपथावर असून या कामांना वेग देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. तसेच शक्यतो शाळांच्या जवळ ही निवारा केंद्र उभारावीत जेणेकरून पावसाळ्यानंतर शाळांना त्यांचे उपक्रम राबवण्यासाठीही निवारा केंद्रे वापरता येतील, असे त्यांनी सांगितले.

नवीन महाबळेश्वरच्या कामाला गती द्यावी

महाबळेश्वरच्या पायथ्याला नवीन महाबळेश्वर विकसित करण्याचे काम एमएसआरडीसीने हाती घेतले असून तिथे सुरू असलेल्या कामांचा आज आढावा घेतला. यात आधी २३५ तर आता २९४ गावे नव्याने समाविष्ट करण्यात आलेली आहेत. याठिकाणी तापोळा येथील उत्तेश्वराच्या मंदिराचे काम, उत्तेश्वर रोप वेचे काम याचीही प्रगती जाणून घेतली. तसेच या कामांची गती वाढवण्यास त्यांनी सांगितले.

एमएसआरडीसीला शासनाने अनेक प्रकल्प शासनाने दिले असून ते दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे, तसेच सिडको, एमएमआरडीएप्रमाणे झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात सहभागी व्हावे असे त्यांनी सांगितले. एमएसआरडीसीची कामे ज्याठिकाणी सुरू आहेत तिथे राडारोडा दूर करून बॅरिकेड्स बसवावेत. पुलाखाली उत्तम झाडे लावून सुशोभीकरण करावे. तसेच पावसाळ्यापूर्वी करायच्या कामांना प्राधान्य देऊन ती सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत दिले.

०००

‘खजिन्याची शोधयात्रा’ पुस्तकाच्या माध्यमातून देशाचे प्राचीन वैभव, इतिहास, संस्कृतीची मांडणी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे दि. ३०:खजिन्याची शोधयात्रा या पुस्तकाच्या लेखनासाठी प्रशांत पोळ यांनी व्यापक संशोधन आणि अभ्यास केला आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून देशाचे प्राचीन वैभव, इतिहास, संस्कृती मांडण्यात आली असल्याने शासनाच्या माध्यमातून हे पुस्तक अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. पुस्तकाच्या माध्यमातून ज्ञानाचा मोठा खजिना जनतेपर्यंत जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

प्रशांत पोळ लिखितखजिन्याची शोधयात्राया पुस्तकाच्या बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, मध्य प्रदेशचे सार्वजनिक बांधकाम मंत्री राकेश सिंह, मंदिर स्थापत्य व मूर्तीशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, स्नेहल प्रकाशनचे रवींद्र घाटपांडे, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे संचालक व पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे आदी उपस्थित होते.

प्रशांत पोळ यांचे पुस्तक लेखनासाठी अभिनंदन करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आपला इतिहास, परंपरा, संस्कृतीचे जतन करणे आपले कर्तव्य आहे. आपल्या समाजाचे तेज आणि आत्माभिमान संपविण्याचे काम परकियांनी केल्याने आपण पारतंत्र्यात गेलो. भारत समृद्ध देश होता, परकीय आक्रमकांनी आपल्या संपत्तीची लूट केली. आपले ज्ञान आणि संस्कृती ही आपली शक्ती आहे हे लक्षात घेऊन ज्ञानकेंद्रे उध्वस्त करणे, आपल्या संस्कृतीची प्रतिके जमिनदोस्त करणे आणि आपल्यावर त्यांची संस्कृती, परंपरेचा पगडा बसविण्याचे काम सातशेहून अधिक वर्ष चालले. त्यामुळे आपला इतिहास माहित नसलेल्या पिढ्या तयार झाल्या आणि भारत पारतंत्र्यात गेला.

वेगवेगळ्या संशोधकांनी आपल्या संशोधनाने आपली संस्कृती भारताबाहेर गेली हा निष्कर्ष काढला आहे. जगातील इतर संस्कृती नष्ट पावल्या आहेत. पूर्वीपासून असलेली आणि अजूनही चालत आलेली भारत ही एकमेव संस्कृती आहे. ढोलावीरा, लोथलबद्दल प्रशांत पोळ यांनी पुस्तकात वर्णन केले आहे. आजच्या स्थापत्य शास्त्राला अपेक्षित गोष्टी सहा हजार वर्षापूर्वी असल्याचे त्यातून पहायला मिळते.

युरोपीय देशात जेव्हा संस्कृतीची संकल्पना स्पष्ट नव्हती तेव्हा आपली संस्कृती विकसित स्वरुपात होती. संस्कृतसारखी भाषा विकसित स्वरुपात आपल्याला माहित होती. भारताचा हा ज्ञानाचा खजिना फार जुना आहे. ही सिंधू संस्कृतीदेखील आहे आणि सरस्वती संस्कृतीदेखील आहे. भौतिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न अशी ही संस्कृती होती. पहिल्या शतकातले भारताचे जगातील व्यापारातले स्थान ३३ टक्के होते. आपल्या या इतिहासाची माहिती आपल्याला असायला हवी. देशाचा हा इतिहास, आपले वैभव आणि गणितात भारताने केलेली प्रगतीदेखील या पुस्तकातून मांडण्यात आली आहे.

देशात हिंदवी स्वराज्य, मराठ्यांचे साम्राज्य होते ते आपण शिकू शकलो नाही. त्यामुळे आपली संस्कृती ज्ञान आपल्याला माहिती पाहिजे आणि ते पुढेही न्यावे लागेल. आयुर्वेदातील संहितावरही संशोधन झाले पाहिजे. या पुस्तकातून सर्वांना मार्गदर्शन मिळेल. ज्ञानाची ही शोधयात्रा अशीच सुरू रहावी, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली.

यावेळी मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील म्हणाले, भारताला जगद्गुरू पदापर्यंत पोहोचविण्यासाठी भारतीय ज्ञानपरंपरेची माहिती, जाणिव, महत्त्व लक्षात आणून दिले पाहिजे. त्यासाठीच नव्या शैक्षणिक धोरणात भारतीय ज्ञानाची परंपरा समाविष्ट करण्यावर भर देण्यात आला आहे. पोळ यांच्या पुस्तकात प्राचीन काळातील व्यापार वैभवाचेही वर्णन करण्यात आले आहे. पुस्तकातून अशा अनेक नव्या बाबी मांडल्या आहेत.

मध्यप्रदेशचे मंत्री सिंह म्हणाले, भारतीय संस्कृतीचे पुनरुज्जीवन होत असताना लेखणीच्या माध्यमातून देशाचा इतिहासही नागरिकांसमोर येत आहे. हे पुस्तक भारताला जाणून घेण्यासाठीची आणि देशाच्या सांस्कृतिक वैभवाचे स्मरण करण्यासाठी दिलेली हाक आहे. प्रशांत पोळ यांच्यासारख्या लेखकांमुळे आपण देशाचे सांस्कृतिक वैभव अनुभवू शकतो. त्यांच्या लेखणीत प्रामाणिकपणासोबतच भारताच्या संस्कृती प्रति निष्ठा आहे, असे त्यांनी सांगितले. हे पुस्तक देशाच्या सर्व भाषेत प्रकाशित होऊन देशभरात पोहोचेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

डॉ. देगलुरकर म्हणाले, भारतीय संस्कृती जगातील पहिली संस्कृती आहे, ती समाजानुसार बदलणारी आहे. आपली संस्कृती प्रवाही आहे. वेद, उपनिषदे, भगवद्गीतेतील ज्ञान आपण जगासमोर ठेवले. आपली विचारांची श्रीमंती आपल्या लक्षात येत नाही. भारतीय संस्कृती, ज्ञानोपासना, विचारांकडे पाहिल्यास हा ज्ञानाचा खजिना जनतेसमोर येण्याची गरज आहे. असे भारतीय प्राचीन ज्ञान समाजासमोर आल्यास देशाचा अभ्युदय निश्चितपणे होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रशांत पोळ म्हणाले, २०१७ साली प्रकाशितभारतीय ज्ञानाचा खजिनाया पुस्तकाला सर्व शासकीय वाचनालयात वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. भारतीय विचारवंत अनेक ज्ञानशाखांमध्ये जगामध्ये पुढे होते. दुर्दैवाने जगात ज्या परदेशी संशोधकांच्या नावावर विविध शोधांचे जनक असे नाव लागले ते अनेक शोध त्यापूर्वी भारतात लागलेले आहेत. मात्र, ते आपल्याला पुढे सांगितले गेले नाही. जगाचे विश्वगुरू होण्यासाठी आपण प्रयत्न करत असताना आपल्याला आपल्या समृद्ध संस्कृतीची, ज्ञानपरंपरेची माहिती आणि अभिमान असला पाहिजे, असेही ते म्हणाले.

यावेळी राजेश पांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. खजिन्याच्या शोधात हे पुस्तक देशाच्या वैभवावर आधारित आहे. पुणे पुस्तकप्रेमींचे शहर असल्याने या पुस्तकालाही वाचक प्रतिसाद देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

०००

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्जाची ऑनलाईन प्रक्रिया १५ जूनपासून सुरू

मुंबई, दि. ३०: भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना शासनाच्या महाडिबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता महाडीबीटी प्रणालीवर नविन तसेच नूतनीकरण अर्जांसाठी ऑनलाईन स्वीकृती प्रक्रिया २५ जुलै २०२४ पासून सुरू करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील नूतनीकरण अर्ज तसेच २०२४-२५ मधील नविन अर्ज सादर करण्यासाठी ३१ मे २०२५ पर्यंत अंतिम मुदत आहे. त्यानुसार शिष्यवृत्तीसाठी नवीन व नुतनीकरणाचे अर्ज महाडीबीटी पोर्टलद्वारे १५ जूनपासून ऑनलाईन स्वीकारण्यात येतील.

सर्व महाविद्यालयांनी आपापल्या स्तरावर प्राप्त अर्जांची प्रथम प्राधान्याने पडताळणी करून ते ऑनलाईन पद्धतीने मंजूर करावेत. त्यानंतर संबंधित अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर यांच्या लॉगिनवर तत्काळ पाठवावेत.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक पुढील प्रमाणे:

कनिष्ठ महाविद्यालयातील अभ्यासक्रम इ. 11वी, 12 वीसाठीचे (सर्व शाखा, एमसीव्हीसी, आयटीआय आदी) नवीन अर्ज व नुतनीकरणाचे प्राप्त अर्ज 15 जून ते 15 ऑगस्ट 2025  या मुदतीत महाविद्यालयांनी ऑनलाईन अग्रेषित करावेत. वरिष्ठ महाविद्यालयातील बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम प्रथम, द्वितीय व तृतीय सर्व शाखा कला, वाणिज्य, विज्ञान आदींसाठी नवीन व नुतनीकरणाचे अर्ज 15 जून ते 10 सप्टेंबर 2025 पर्यंत महाविद्यालयांनी ऑनलाईन अग्रेषित करावेत.

वरिष्ठ महाविद्यालयातील व्यावसायिक अभ्यासक्रम (प्रथम, द्वितीय, तृतीय अंतिम वर्ष (सर्व व्यावसायिक अभ्यासक्रम अभियांत्रिकी, वैद्यकीय व्यवस्थापन अभ्यासक्रम, फार्मसी व नर्सिंग अभ्यासक्रम) आदींचे नवीन व नुतनीकरणाचे अर्ज महाविद्यालयांनी 15 जून ते 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन अग्रेषित करावेत.

भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती तसेच शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या लाभापासून अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी वंचित राहणार नाहीत यांची दक्षता महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर सुनिता मते यांनी केले आहे.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ११४४ कोटींच्या योजनांचा आढावा

मुंबई, दि. ३०: मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री तथा माहिती, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीत २०२४-२५ च्या योजनांची अंमलबजावणी, खर्चाचे विश्लेषण तसेच २०२५-२६ च्या नव्या योजनांची आखणी यावर सविस्तर चर्चा झाली. गेल्या आर्थिक वर्षात मंजूर कामांसाठी उपलब्ध असलेल्या ₹१०८८.७७ कोटींपैकी ९९.८ टक्के म्हणजेच ₹१०८६.७५ कोटी निधी विविध यंत्रणांना वितरित करण्यात आला होता.

यावेळी २०२५-२६ साठी एकूण ₹११४४.०२ कोटींच्या प्रस्तावित योजनांची माहिती देण्यात आली. यामध्ये सर्वसाधारण योजना ₹१०६६ कोटी, अनुसूचित जाती उपयोजना ₹७१ कोटी, तर आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजना ₹७.०२ कोटींचा समावेश आहे.

नवीन प्रस्तावांमध्ये विशेषतः झोपडपट्टी सुधारणा, पोलीस यंत्रणा बळकटीकरण, महिला व बालकल्याण आणि अपारंपरिक ऊर्जा उपक्रमांचा समावेश आहे.

प्रमुख कामे –

  • झोपडपट्टी सुधारणा व पुनर्वसन : ₹५९७.४२ कोटींची नागरी दलितेतर वस्ती सुधारणा, ₹१२५ कोटींच्या संरक्षक भिंती, ₹६४.७४ कोटी दलितवस्ती योजना, तसेच ₹४.५ कोटींचे कौशल्य विकास कार्यक्रम.
  • पोलीस व तुरुंग विभाग : पायाभूत सुविधांसाठी, वाहने व संगणकीय साधने पुरवण्यासाठी ₹१४.०६ कोटींचा निधी
  • आपत्कालीन व महसूल यंत्रणा : गतीशील प्रशासनासाठी ₹४.५ कोटींचा निधी.
  • महिला व बाल विकास : बालगृहांसाठी सीसीटीव्ही आणि संस्थांचे बळकटीकरणासाठी ₹१४.०६ कोटी निधी.
  • सौरऊर्जा उपक्रम : ₹२ कोटींच्या सौर संचांची उभारणी.

या बैठकीत लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघातील समस्या मांडल्या असून, त्या सोडवण्यासाठी संबंधित विभागांनी तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री ॲड. शेलार यांनी दिले.

बैठकीस खासदार, आमदार, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व अंमलबजावणी यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

०००

संजय ओरके/विसंअ/

गुणवंत विद्यार्थी आणि अधिकाऱ्यांचा गौरव सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात सर्वांचे योगदान आवश्यक – पालकमंत्री नितेश राणे

• दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कटिबध्द
• दरडोई उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न
• सिंधुदुर्गला विकसित जिल्हा बनविणार

सिंधुदुर्गनगरी दि 30 (जिमाका) सिंधुदुर्ग जिल्हा विकासाकडे घोडदौड करत आहे. साक्षरतेमध्ये राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये आपल्या  जिल्ह्याचा समावेश आहे. दहावी आणि बारावीच्या निकालात कोकण विभागात आपला जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. प्रशासनातील अधिकारी देखील जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबध्द आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकसित जिल्हा बनविण्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

जिल्ह्यातील इयत्ता बारावीच्या (विज्ञान, कला आणि वाणिज्य विद्याशाखा) व इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना आणि १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिमेमध्ये कोकण विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या तालुका स्तरीय शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक दिवे, पोलिस अधीक्षक डॉ. मनोज दहिकर, अपर पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, जिल्हा बँकेच अध्यक्ष मनीष दळवी, प्रभाकर सावंत तसेच विभाग प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेमध्ये आपल्या जिल्ह्याने उत्कृष्ट काम केले आहे. राज्य स्तरावरील मोहिमेमध्ये क्रमांक पटकाविलेल्या अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री महोदयांनी सत्कार केला आणि त्यांच्या  पाठीवर थाप मारली. आणि मी तेव्हाच ठरविले होते, की या मोहिमेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट काम केले असेल त्यांचा मी जिल्हावासियांच्या वतीने आभार मानणार आणि त्यांचा सत्कार करणार. तुम्ही चांगलं काम करत असाल, तर तुमच्या मागे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी नेहमी उभा आहे. जनतेचे सेवक म्हणून जिल्ह्यातील नागरिकांना सेवा द्या. चांगले काम करणाऱ्यांना मी नेहमीच शाबासकी देणार.

आज तुम्ही चांगलं काम कराल, तर आम्ही जिल्हावासीय तुमच्या सोबत सदैव आहोत असेही ते म्हणाले. जनतेच्या हिताचे निर्णय घ्या, विविध क्षेत्रात नव नवीन प्रयोग करा, जगामध्ये तसेच देशामध्ये जे चांगलं आहे ते तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणा. तुम्ही अशाच पद्धतीने प्रशासनाच्या माध्यमातून चांगले काम करत जा, काहीतरी नवीन घडवा, काहीतरी नवीन प्रयत्न करा आणि आपल्या जिल्ह्याला पुढे घेऊन जा.  150 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला पहिल्या तीन क्रमांकामध्ये स्थान मिळावे ही माझी अपेक्षा आहे. पुढील पाच वर्षामध्ये जिल्ह्याला पुढे घेऊन जायचे आहे. यामध्ये मला तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे असेही ते म्हणाले.

पालकमंत्री पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात शिक्षण क्षेत्राचा मोठा वाटा आहे. म्हणून खासदार राणे साहेबांनी देखील शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे.   जिल्ह्यातील शाळांचा स्तर उंचवला पाहिजे, त्यातून दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहणार आहे.  कोकणातल्या संपूर्ण निकालामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. म्हणून या क्षेत्रामध्ये नवनवीन प्रयोग करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.  तसेच जिल्ह्यामध्ये पायाभूत सुविधा, शिक्षणासाठी चांगले वातावरण, कायदा आणि सुव्यवस्था योग्य पद्धतीने राखणे, जिल्ह्याची प्रतिमा सुधारणे या सगळ्या गोष्टींकडे आम्ही फार बारकाईने लक्ष देत आहोत. आज विद्यार्थ्यांचा सत्कार झाला आहे तो त्या व्यक्तीचा नाही तर त्यांच्यात असलेल्या गुणांचा सत्कार झालेला आहे. तुम्ही दहावी-बारावी मध्ये एवढे चांगले मार्क्स मिळवलेले आहेत, एवढ्या चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे तुम्ही पुढेही अशाच चिकाटीने अभ्यास करत राहा. मी तुम्हाला आणि तुमच्या पालकांना विश्वास देतो की तुमच्यासाठी दर्जेदार शिक्षणाची दालने आम्ही निश्चितपणे उघडे करू. त्या दिशेने आमच्या सगळ्यांची वाटचाल सुरू असल्याचेही ते म्हणाले.

इयत्ता १० वी मध्ये मालवण येथील टोपीवाला हायस्कूल मधील. कु.आर्या अजित राणे आणि कु. श्रेयश चंद्रशेखर बर्वे आणि  कुडाळ हायस्कूल मधील कु.चैतन्या रुपेश सावंत या तीन विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. स्मितेश विनोद कडुलकर, रेश्मा पालव, विधी विरेंद्र चिंदरकर,  ध्रुव आनंद तेंडुलकर,  हर्षदा किसन हडलगेकर  या पाच विद्यार्थ्यांनी ९९.४० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे तर नक्षत्रा राजेंद्र काळे या विद्यार्थीनीने ९९.२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. इयत्ता बारावी मधील विज्ञान शाखेतील जाधव अथर्व अतुल, तेंडुलकर मधुकर विवेक, पालव काशीराम विठोबा, कला शाखेतील दळवी तनिषा विनय, कोकरे प्रियंका प्रकाश, मांजरेकर मानसी पांडुरंग तर वाणिज्य शाखेतील भोगटे आयुषी रुपेश, वाळुंजे चित्राली राजेश, परब तनुज निलेश या विद्यार्थ्यांना देखील पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
१०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिमेमध्ये कोकण विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेली शासकीय कार्यालये-
१. उपविभागीय कार्यालय, कणकवली, (३ रा क्रमांक)
२. तहसिलदार कार्यालय, कणकवली (२ रा क्रमांक)
३. गट विकास अधिकारी कार्यालय, कणकवली (३ रा क्रमांक)
४. तालुका कृषि अधिकारी कार्यालय, वेंगुर्ला (३ रा क्रमांक)
५. पोलिस निरीक्षक, मालवण (३ रा क्रमांक)
६. उप अभियंता कार्यालय, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण , देवगड (३ रा क्रमांक)
७. सहायक पशुसंवर्धन कार्यालय, (२ रा क्रमांक)
८. पशुधन विकास अधिकारी कार्यालय, कणकवली (प्रथम क्रमांक)
९. मख्याधिकारी कार्यालय, वेंगर्ला (३ रा क्रमांक)
१०. उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, सावंतवाडी (२ रा क्रमांक)

000000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त पशुसंवर्धन विभागामार्फत विविध कार्यक्रम  – मंत्री पंकजा मुंडे

मुंबई, दि. ३०: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य, विचार आणि प्रेरणादायी जीवनगाथा जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचविणे आवश्यक असल्याने त्यांच्या ३०० व्या जयंती दिनाचे औचित्य साधून ३१ मे २०२५ रोजी पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

अहिल्यादेवी या भारतीय इतिहासातील एक तेजस्वी, कर्तबगार व दूरदृष्टी असणाऱ्या स्त्रीशक्तीचे प्रतीक आहेत. त्यांनी धार्मिक सहिष्णूता, समाजकल्याण, सार्वजनिक बांधकाम, न्यायप्रविष्ट प्रशासन आणि स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून आदर्श राज्यकारभाराची उभारणी केली. त्यांचे कार्य समाजसेवा, धर्मनिष्ठा आणि कुशल प्रशासनाचे प्रतीक असून, ते महाराष्ट्र राज्याच्या प्रगत व उन्नत वाटचालीसाठी नेहमीच पथदर्शी ठरले आहे. यास अनुसरुन ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांच्या 300 व्या जयंती वर्षानिमित्त पशुसंवर्धन विभागामार्फत अधिनस्त संस्थांमध्ये कार्यालय/ दवाखाना परिसर स्वच्छता व सुशोभिकरण करणे, गाव पातळीवर वंधत्व/सर्वोपचार शिबिरांचे आयोजन करणे, फिरस्ती मेंढपाळांची भेट घेऊन त्यांना तांत्रिक मार्गदर्शन करणे, मेंढपाळांच्या शेळ्या-मेंढ्यांचे मान्सूनपूर्व लसीकरण करणे, पशुधनाचे जंतनिर्मूलन, गोचीड निर्मूलन, करडे/कोकरे मरतूक कमी करण्याबाबत उपाययोजना करणे, मेंढपाळांसाठी तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी शिबिर/परिसंवादाचे आयोजन करणे, वृक्ष लागवड करणे इत्यादी उपक्रम राबविण्यात यावेत, अशा सूचना मंत्री मुंडे यांनी दिल्या आहेत.

पशुसंवर्धन आयुक्त रामस्वामी एन. आणि पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती वर्षानिमित्त विभागाच्या मुख्यालयातही अभिवादनपर कार्यक्रम होणार आहे.

“पशुसंवर्धन विभागाच्या या उपक्रमांमुळे मेंढी-शेळी पालकांशी थेट संवाद साधत शासनाचे विविध उपक्रम, योजना तसेच शेळी-मेंढी तांत्रिक व्यवस्थापनाविषयी माहिती पशुपालकांना देणे शक्य होईल. तसेच शेळी-मेंढीपालनाला आधुनिक व्यवसाय व्यवस्थापनाच्या माध्यमातून अधिक किफायतशीर करण्यासाठी विभागाला आवश्यक धोरणांची निर्मिती व अंमलबजावणी करणे सुलभ होईल”, असा विश्वास मंत्री मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

०००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काटोल तालुक्यातील पाणंद रस्त्याची केली प्रत्यक्ष पाहणी

नागपूर,दि. 30 :  शेतकऱ्यांना आपल्या शेतातील उत्पादने वेळेत बाजारपेठेपर्यंत पोहचविता यावीत यासाठी त्यांच्या शेतापासून रस्त्याची नितांत आवश्यकता प्रत्येक भागात असते. शेतकऱ्यांची ही अडचण दूर व्हावी याउद्देशाने या योजनेअंतर्गत आपण जिल्ह्यात सर्व तेरा तालुक्यात एकूण 649 कामांना मंजूरी दिली असून यापैकी 491 कामांना कार्यारंभ आदेश दिले आहेत. जी कामे हाती घेतली आहेत ती  गुणवत्तेची निकष लक्षात घेऊन पूर्ण करावीत, असे निर्देश महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

काटोल तालुक्यातील नायगाव ते खाणगाव या एक किलोमीटर पाणंद रस्त्याची पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वत: पाहणी केली. राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला किमान कच्चा रस्ता देण्याचे उद्दिष्ट आम्ही निश्चित केले असल्याचे सांगितले. यात शेतकरी कोणताही वाद न आणता स्वत: पुढे येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

जिल्ह्यात या योजनेअंतर्गत भिवापूर तालुक्यात 30, हिंगणा तालुक्यात 31, कळमेश्वर तालुक्यात 27, कामठी तालुक्यात 55, काटोल तालुक्यात 58, कुही तालुक्यात 73, मौदा तालुक्यात 77, नागपूर तालुक्यात 43, नरखेड तालुक्यात 57, पारशिवनी तालुक्यात 23, रामटेक तालुक्यात 32, सावनेर तालुक्यात 92, उमरेड तालुक्यात 51 अशी जिल्ह्यात एकूण 649 पाणंद रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली आहेत.

 महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नरखेड तालुक्यातील भिष्णूर येथे महाराजस्व शिबीराला भेट 

नरखेड तालुक्यातील भिष्णूर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सुरु असलेल्या शिबीरात भेट देऊन नागरिकांची विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासमवेत  उपविभागीय अधिकारी पियुष चिवंडे, तहसीलदार उमेश खोडके, गटविकास अधिकारी निलेश वानखेडे व इतर अधिकारी उपस्थित होते. या ग्रामस्तरीय शिबीरात 161 नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला.

******

आदर्श राजमाता : पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर 

आदर्श राजा म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप डोळ्यासमोर येतं, तर आदर्श राज्यकर्त्या म्हटलं की, पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव पुढं येतं. आदर्श कन्या, सुशील भार्या, सर्वगुणसंपन्न माता अन् प्रजाहितदक्ष शासक अशा वैविध्यपूर्ण भूमिकेतून त्यांनी आजीवन जनसेवा केली. इतकेच नव्हे तर, सर्वधर्मियांना विश्वासात घेऊन उत्तम राज्यकारभार केला. महत्वाचे म्हणजे हिंदू-मुस्लिम हे अहिल्यादेवी यांच्या कारकिर्दीत गुण्यागोविंदाने नांदलेत. राजकारणातून समाजकारण करून धर्मपरायणात सर्वोच्च शिखर गाठणाऱ्या अहिल्यादेवींना हिंदू संस्कृतीतील पुण्यश्र्लोक ही उपाधी बहाल करण्यात आली. ही गोष्ट मराठी जनमानसाच्या दृष्टीने मोठ्या अभिमानाची आहे.

अहिल्यादेवी होळकर ह्या अहमदनगर जिल्ह्यामधील चौंडी गावातल्या धनगर समाजाचे माणकोजी शिंदे-पाटील यांच्या कन्या. वयाच्या बाराव्या वर्षी अहिल्यादेवी यांचा विवाह पेशव्यांचे सुभेदार मल्हारराव होळकर यांचे सुपुत्र खंडेराव होळकर यांच्याशी झाला. परंतू काळाने घात केला अन् दुर्दैवाने 1766 साली खंडेरावांचे आकस्मिक निधन झाले. तथापि स्वतःला मोठ्या धैर्याने सावरून, मल्हारराव होळकर या पित्यासमान सासऱ्यांची आज्ञा शिरसावंद्य मानत अहिल्यादेवींनी आपले उर्वरित आयुष्य लोकसेवेत व्यतित केले.

स्वकर्तृत्वाच्या बळावर या राजमातेने होळकरांच्या राज्याची धुरा समर्थपणे सांभाळून सर्व जाती-धर्मातील लोकांना समान न्याय दिला. वैधव्याच्या दुःखानं अन् पुत्रशोकानं व्यथित झालेल्या या कर्तृत्ववान व धाडसी मातेनं धिरोदत्तपणे पुनश्च खंबीरपणे उभं राहून होळकर साम्राज्याचा क्रांतीसूर्य तळपत ठेवला. अहिल्यादेवींनी “मरावे परी कीर्तीरूपे उरावे” ही उक्ती आदर्श राज्यकारभार करून खरी करून दाखविली.

अहिल्यादेवींनी आपल्या कारकीर्दीत हिंदू देवळांच्या व तीर्थक्षेत्रांच्या जीर्णोद्धाररासाठी ठोस उपाययोजना करताना मशिदी, दर्गे यांचा विसर पडू दिला नाही. त्यांच्यासाठी देखील राजकोषात आर्थिक तरतूद केली. बारा ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार तसेच बद्रीकेश्वरपासून रामेश्वरपर्यंत आणि जगन्नाथपुरीपासून सोमनाथपर्यंत अनेक मंदिरे, उद्याने, विश्रामगृहे, अन्नछत्रे, विहिरी, धर्मशाळा, रस्ते, पाणपोया असे विविध लोकोपयोगी उपक्रम राबवून त्यांनी खऱ्या अर्थानं दातृत्वाची भूमिका बजावली. नर्मदा, गंगा, गोदावरी या नद्यांवर घाट बांधल्याने, त्या कालखंडापासून पुढच्या काळातही नद्यांवर घाट बांधण्याचा पायंडा अखंडपणे चालत राहिला आहे. राज्यातल्या गोरगरीब लोकांना राजमाता ह्या नित्यनेमाने अन्नदान, वस्त्रदान अन् सणासुदीला दानधर्मही करीत असत. चारित्र्यसंपन्नता अन् स्त्रीत्वाचे वैभव जतन करून प्रपंच व परमार्थाची सांगड घालत या महान मातेनं गतकाळातील दुःखद घटनांना पाठीमागे टाकत, आपल्या जीवनाची सुव्यवस्थित घडी बसवली. या पार्श्वभूमीवरच अहिल्यादेवी होळकर यांचा रयतेत आदर्श राजमाता म्हणून नावलौकिक होता अन् आजही आहे.

पुरोगामी विचारसरणी असलेल्या अहिल्यादेवींनी कालबाह्य झालेल्या पूर्वीच्या कायद्यांमध्ये काळानुरूप सुधारणा केल्या. करपद्धती सौम्य केली. विधवांचे धन जप्त करून ते राजकोषात जमा करण्याची जुलमी प्रथा त्यांनी बंद केली. विधवेला मुल दत्तक घेण्याची इच्छा असल्यास तिला तशी कायद्याने मुभा देण्यात आली. न्यायप्रक्रियेत आडकाठी आणणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा देण्याचे अहिल्यादेवींनी फर्मान काढले होते. त्या उत्तम लढवय्या होत्या. त्या राजकारणाबरोबर अर्थकारणातही पारंगत होत्या. गावोगावी लोकांसाठी जागीच न्यायनिवाडा व्हावा, यासाठी त्यांनी पंचाधिकारी नेमले होते. भिल, गोंड जमातीतील लोकांकडून पडीक जमिनीवर लागवड करून घेतली. त्याद्वारे अहिल्यादेवींनी मल्हाररावांच्या काळापेक्षा अनेक पटीने राजकोषात वृद्धी केली. प्रजेकडून कररूपात प्राप्त झालेल्या धनराशीतून जनहिताचे विविध उपक्रम राबवून प्रजेला सुखी व आनंदी ठेवण्यासाठी त्यांनी आपलं सारं आयुष्य पणाला लावलं. जनसामान्यांबद्दल त्यांच्या अंत:करणात अपार करुणा होती.

उल्लेखनीय बाब म्हणजे अहिल्यादेवींनी आपल्या राज्यात शिक्षणावर अधिक भर दिला. होळकरांची राजधानी महेश्वर हे शिक्षणाचे प्रमुख केंद्र होते. मराठी, हिंदी पाठशाळेतून संस्कृत भाषेचेही शिक्षण दिले जायचे. याशिवाय वेद-पुराण, शास्त्रे, वेदांत, व्याकरणाचे शिक्षण हे विद्वान-पंडितांमार्फत देण्याची व्यवस्था अहिल्यादेवींच्या कारकीर्दीत करण्यात आली होती. त्यांच्या राजदरबारात शिल्पकार, साहित्यिक, कलाकार, विद्वान-पंडित यांना विशेष मानसन्मान मिळत असे. कवी मोरोपंत, शाहीर अनंत फंदी यांना सरकार दरबारी मानाचे स्थान होते. अहिल्यादेवींनी सैनिकी शिक्षणही घेतले होते. त्या जाबांज लढवय्या होत्या. आपल्या सैनिकांचे मनोधैर्य टिकवून त्यांचा आत्मविश्वास वाढावा, या उद्देशाने त्या आपल्या सैन्यदलाला वेळोवेळी भेटी देत असत. विशेष म्हणजे अहिल्यादेवींनी आपल्या सैन्यदलात महिलांची विशेष तुकडी तयार केली होती.

अभिमानाची गोष्ट म्हणजे मोगल, टिपू, निजाम, पेशवे यांच्यावर अहिल्यादेवीच्या कर्तबगारीची मोठी छाप होती. परधर्माविषयी त्यांच्या मनात नितांत आदर व सहिष्णुता होती. “राजा हा विश्वस्तासारखा असावा अन् प्रजेचे कल्याण चिंतणारा असावा”, हा आदर्श त्यांनी आपल्या राज्यकारभारात घालून दिला होता. त्यामुळेच त्यांना एक आदर्श शासनकर्त्या म्हणून रयतेकडून सन्मान मिळायचा. अहिल्यादेवी ह्या प्रजाहितदक्ष राजमाता म्हणून साऱ्या राज्यात किर्तीमान होत्या.

आदर्श राजमाता पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पावलावर पाऊल टाकत, त्यांचासारखा राज्यकारभार या पार्श्वभूमीवर शासन जनसामन्यांसाठी लोकहिताचे निर्णय घेत आहे. पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणार्थ सर्वसमावेशक धोरण जाहीर करण्याचा राज्य सरकारचा मानस असून त्याचाच एक भाग म्हणून महिलांना एस.टी. प्रवासात सरसकट 50 टक्के सूट देण्यात आली आहे. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत गोरगरीब महिलांना माहे 1500 रुपये आर्थिक मदत राज्य शासनातर्फे देण्यात येत आहे. राज्यातील कोट्यवधी माता-भगिनींना या योजनेमुळे आर्थिक आधार मिळून त्याद्वारे त्या छोटेखानी उद्योग करून कुटुंबाला हातभार लावत आहेत. विशेष म्हणजे त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहताहेत. याशिवाय वयोश्री योजनेंतर्गत वयोवृद्ध महिला-पुरुषांना मोफत वैद्यकीय सुविधा व उपकरणे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. माता सुरक्षित तर घर सुरक्षित या विशेष मोहिमेत महिलांना आरोग्य तपासणी, हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी रुग्णवाहिका, औषधं उपलब्ध करून देणे, यासाठी दोन कोटींचा निधी निर्धारित केला आहे.

पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासनाने अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथील त्यांच्या जन्मस्थळी मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. अशी ही बैठक महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासूनची पहिलीच बैठक होय. या बैठकीत चौंडीच्या सर्वंकष विकासाचा आराखडा तयार करून त्यासाठी 681 कोटी 32 लाखाची तरतूद करून तिला प्रशासकीय मंजूरी देण्यात आली. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनातील महत्वपूर्ण गोष्टींचे येथे जाणाऱ्या नागरिकांना दर्शन होईल. इतकेच नव्हे तर गत होळकर साम्राज्याची अन् अहिल्यादेवींच्या आदर्श राज्यकारभाराची जाणीव होईल. अन् त्यांच्या आठवणींना उजाळा मिळेल. खरंतर महायुती सरकारने पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त अर्पण केलेली हीच खरी आदरांजली होय.

बंधू भगिनींनो, अल्पवयात विधवा झालेल्या एका स्त्रीनं सर्वधर्मसमभावाची कास धरून सन 1765 ते 1795 अशी तब्बल 30 वर्षे इंदूर संस्थानावर अधिराज्य करून भारतीय इतिहासात जणू एक विक्रमच नोंदविला. राजमातेचा मानवतावादी दृष्टिकोन सर्वधर्मीयांना प्रिय होता. मुस्लिम समाजाचे लोक तर अहिल्यादेवींच्या इंदूर संस्थानच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मशिदीत नमाज अदा करून दुवा मागत असत. म्हणूनच सकल जनमानसात पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी असे सन्मानाने म्हटले जात असे. अहिल्यादेवी म्हणजे मानवी जीवनातला अज्ञान, अध:कार, दुःख दूर करून त्यास प्रकाशमान करणारी दिव्यज्योत होती. राज्यातील सर्वधर्मीय जनतेच्या वतीने पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकरांना आदरांजली अन् त्रिवार वंदन!

00000

लेखक: रणवीर राजपूत, ठाणे

निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी

 

ताज्या बातम्या

राष्ट्रध्वज स्तंभ तरुण पिढीला देशभक्तीची प्रेरणा देईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
बारामती, दि. १५: नटराज नाट्य कला मंडळाच्यावतीने उभारण्यात राष्ट्रध्वज स्तंभ तरुण पिढीला देशभक्तीची प्रेरणा आणि या स्तंभावर फडकणारा तिरंगा नागरिकांना राष्ट्र प्रेमाची आठवण करुन...

समडोळी रोड घनकचरा प्रकल्प येथील बायो-मिथनायझेन प्रकल्पाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

0
सांगली, दि. १५, (जि. मा. का.) : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून शासन निधीतून कार्यान्वीत बायो-मिथनायझेशन प्रकल्पाचे उद्घाटन व सक्शन ॲण्ड जेटींग...

हिंगोलीत सेवादूत प्रणालीतून ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते प्रारंभ

0
राज्यात सेवादूत उपक्रम राबविणार व्हॉट्स अँप चँट बोट्सवर ऑनलाईन करा अर्ज कागदपत्रांसाठी आवश्यक पुराव्यांचीही माहिती एका क्लिकवर उपलब्ध नागरिकांचा वेळ...

कल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री नरहरी झिरवाळ

0
निर्भया पथक व ॲनिमियामुक्त हिंगोली अभियान जनजागृती रथाला पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ स्वातंत्र्यदिनानिमित्त तंबाखू मुक्त व अवयवदाची घेतली शपथ हिंगोली, दि. १५(जिमाका):...

शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून लातूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार – पालकमंत्री शिवेंद्रसिंह भोसले

0
लातूर, दि. १५: जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येत आहे. यामाध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधून नागरिकांना गुणवत्तापूर्ण आणि...