शुक्रवार, जुलै 11, 2025
Home Blog Page 1795

१९ ते २५ नोव्हेंबरदरम्यान राज्यात ‘कौमी एकता सप्ताह’

मुंबई, दि. 15 : केंद्र शासनाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार राज्यात१९ ते २५ नोव्हेंबर दरम्यानकौमी एकता सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या काळात अनुक्रमे राष्ट्रीय एकात्मता दिवस, अल्पसंख्याक कल्याण दिवस, भाषिक सुसंवाद दिवस, ध्वजदिन तसेच दुर्बल घटक दिवस, सांस्कृतिक एकता दिवस, महिला दिन आणि जोपासना दिवस साजरे होणार असून त्याअंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत.

१९नोव्हेंबर रोजी शासनाच्या विविध कार्यालयात राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय एकात्मतेचे संदेश देणारे चित्रपट दाखवले जाणार आहेत. त्याचबरोबर आठवडाभर दुर्बल घटकातील व्यक्तींना इंदिरा आवास योजना आणि घरांचे वाटप, भूमिहीन मजुरांना जमिनीचे वाटप, गरिबांना कायदेविषयक सहाय्य देणे, चर्चा संमेलने, मिरवणुका आणि सभा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कौमी एकता सप्ताहामध्ये“सांप्रदायिक सद्भावना मोहीम निधी संकलन सप्ताह”साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन शासनाने केले आहे. हे शासन परिपत्रक www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्याचे पूर्णत: वितरण

मुंबई, ता. 15 : मुंबई/ठाणे Îशधावाटप क्षेत्रात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे होत आहे. शिधावाटप यंत्रणेत प्रधान कार्यालयासह 5‍ परिमंडळ कार्यालये कार्यरत असून 19 लाख 69 हजार 581 शिधापत्रिका संगणकीकृत झालेल्या आहेत. त्यापैकी 18 लाख 68 हजार 724‍  शिधापत्रिकांचे आधार सीडिंग झाले आहे. यंत्रणेतील 4 हजार 269 अधिकृत  शिधावाटप दुकानांमध्ये ई-पॉस  मशीन  बसविण्यात  आले असून या मशीनद्वारेच शिधापत्रिकाधारकांना  वितरण केले जाते. ऑफलाइन पद्धतीने अन्नधान्याचे वितरण होत नाही. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेची अंमलबजावणी यशस्वीरित्या होत असून प्रत्येक शिधापत्रिकाधारकाची बायोमेट्रिक ओळख पटवून ‍वितरण होत आहे. यामुळे मागील एक वर्षात 450 कोटी रूपयांच्या अन्नधान्याची बचत झाली आहे. सप्टेंबर 2019 पासून मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्र केरोसिन मुक्त झाले आहे. पाच परिमंडळांचे मंजूर  नियतन सप्टेंबर 2019 मध्ये 31 हजार 540, आक्टोबरमध्ये 36 हजार 65, भारतीय खाद्य निगममधून सप्टेंबर मध्ये 31 हजार 540, ऑक्टोबरमध्ये 36 हजार 65 साठा उचल केला आहे. सप्टेंबर मध्ये 32 हजार 965 तर ऑक्टोबर 2019 मध्ये 32 हजार 640 अधिकृत शिधावाटप दुकानांमधून ऑनलाइन विक्री झाली आहे

बायोमेट्रिक नोंद आवश्यक

शिधापत्रिकाधारक यांनी अधिकृत शिधावाटप दुकानात हजर राहून बायोमेट्रीक नोंद करणे आवश्यक आहे. अशी नोंद करीत नाही तोपर्यंत त्यांना अन्नधान्याचे वाटप केले जात नाही. कोणत्या लाभार्थ्याने कोणत्या महिन्यात किती अन्नधान्याची उचल केली याबाबत पूर्ण माहितीmahaepos.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना; ३० नोव्हेंबर अर्ज करण्याची अंतिम मुदत

मुंबई, दि. 15 : महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागातर्फे डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येत आहे. मुंबई शहर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील मदरशांनी विहित अटी व शर्तींची पूर्तता करुन 2019-20 या आर्थिक वर्षाकरिता अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याची दिनांक 30 नोव्हेंबर 2019 ही अंतिम मुदत आहे.

या योजनेअंतर्गत मदरशांमध्ये शिकत असलेल्या विविध वयोगटातील विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पारंपरिक धार्मिक शिक्षणाबरोबर विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी आणि उर्दू या विषयांचे शिक्षण देणे, मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या इयत्ता 9 वी, 10वी, 11वी आणि 12वी यातील तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे, जेणेकरुन त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत व रोजगार क्षमतेत वाढ होऊन त्यांचा आर्थिक दर्जा सुधारण्यास मदत होईल यादृष्टीने मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी पायाभूत सुविधा, ग्रंथालयासाठी अनुदान देणे, शिक्षकांच्या मानधनासाठी अनुदान देण्याची डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना शासनाने आणली आहे.

राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणी केलेल्या तसेच मुंबई शहर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील मदरसे या योजनेसाठी पात्र ठरतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी, मुंबई शहर, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई 400001 या पत्त्यावर सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांनी केले आहे. या योजनेसाठीच्या अर्जाचा नमुना शासनाच्या https://mdd.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मुंबईतील अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी अनुदानासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

मुंबई, दि. 15 : अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी अल्पसंख्याक विकास विभागाच्या अनुदान योजनेसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी यांनी केले आहे. या योजनेसाठी मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाने मुंबई जिल्हा कार्यक्षेत्रातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य, खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांकडून प्रस्ताव मागविले आहेत. हे प्रस्ताव २०१९-२० या आर्थिक वर्षाकरिता मागविण्यात आले आहेत.

७ ऑक्टोबर, २०१५ रोजी अल्पसंख्याक विकास विभागाच्या संकेतस्थळावरील उपलब्ध विहित नमुन्यातील अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी, मुंबई शहर, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई ४०० ००१ यांच्याकडे पाठवावेत. पात्र शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी प्रस्ताव पाठवण्यासाठीची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर,२०१९आहे.

योजनेसंदर्भातील अधिक तपशील अथवा विहित अर्जाचा नमुनाhttps://mdd.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

तिवसा, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे पंचायत समितीसाठी ८ डिसेंबरला मतदान

मुंबई, दि. 15 : अमरावती जिल्ह्यातील तिवसा, चांदूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे या तीन पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 8 डिसेंबर 2019 रोजी मतदान; तर 9 डिसेंबर 2019 रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

श्री. मदान यांनी सांगितले, या पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2019 या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. त्यांची छाननी 25 नोव्हेंबर 2019 रोजी होईल. छाननीनंतर त्याच दिवशी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरूद्ध जिल्हा न्यायाधीशांकडे 28 नोव्हेंबर 2019 पर्यंत अपील दाखल करता येईल. अपील नसलेल्या ठिकाणी 30 नोव्हेंबर 2019 रोजी; तर अपील असलेल्या ठिकाणी 4 डिसेंबर 2019 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. 8 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 9 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.

०-०-०

(Jagdish More, SEC)

लोकनायक बिरसा मुंडा यांना जयंतीदिनी राज्यपालांनी केले अभिवादन

मुंबई, दि. 15 : क्रांतिकारी स्वातंत्र्यसेनानी लोकनायक बिरसा मुंडा यांच्या१४४व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता तसेच राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार उपस्थित होते.

आदिवासी व ग्राम विकास विभागातर्फे सादरीकरण

आदिवासी विकास विभाग तसेच ग्रामविकास विभागातर्फे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना आज आदिवासी विकास योजनांसंदर्भात विस्तृत माहितीचे सादरीकरण करण्यात आले.

राज्याच्या एकूणलोकसंख्येच्या ९.३५ टक्के लोकसंख्या अनुसूचित जमातीची असून अनुसूचित क्षेत्रात आदिवासी उपयोजना राबविली जाते. आदिवासी विकासासाठी उपलब्ध नियतव्ययापैकी मोठा खर्च आदिवासी शिक्षण व आरोग्य क्षेत्रासाठी केला जात असल्याची माहिती प्रधान सचिव मनिषा वर्मा यांनी दिली. राज्यपालांच्या सूचनेनुसार राज्याच्या अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना पाच टक्के निधी थेट दिला जातो. गेल्या ४ वर्षांमध्ये राज्यातील पेसा ग्रामपंचायतींना एकूण ८७७.४३कोटी रु निधी देण्यात आला. या निधीतून ग्रामपंचायती आपल्याला आवश्यक त्या योजना सुरु करू शकतात, अशी माहिती असीम कुमार गुप्ता यांनी दिली. महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाची राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने प्रशंसा केली असल्याचे मनिषा वर्मा यांनी सांगितले.  

‘आपलं मंत्रालय’च्या दिवाळी अंकाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, दि. 15 : आपलं मंत्रालयच्या दीपोत्सवया दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे यांच्या हस्ते आज येथे करण्यात आले. यावेळी माहिती व जनसंपर्कचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, संचालक (वृत्त/ माहिती) सुरेश वांदिले, उपसंचालक (वृत्त) गोविंद अहंकारी, उपसंचालक अनिरूध्द अष्टपुत्रे, वरिष्ठ सहायक संचालक कीर्ती पांडे आदी उपस्थित होते. श्री. चहांदे हे या अंकाचे अतिथी संपादक आहेत.

या विशेषांकामध्ये मंत्रालयातील अधिकारी/कर्मचाऱ्यांनी लिहिलेल्या दर्जेदार लेखांची मेजवानी आहे.‘आपलं मंत्रालयच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेच्या विजेत्यांच्या साहित्याचा यात समावेश करण्यात आला आहे. अंकातील कथा, कविता, लेख, अनुभव, छायाचित्र यांची सुरेख गुंफण वाचकांना खिळवून ठेवते. याशिवाय हास्यविनोद, व्यंगचित्रे, पाककृती यामुळे हा अंक अधिक वाचनीय व संग्राह्य झाला आहे.  

आपलं मंत्रालय द्वितीय वर्धापनदिन स्पर्धेचे विजेते

आपलं मंत्रालयच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या साहित्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविधांगी आणि बहुढंगी विषयांवरील लेख, कथा, अनुभव, कविता या स्पर्धेसाठी प्राप्त झाले. परीक्षणाच्या विविध टप्प्यांवर आणि कसोट्यांवर पडताळणीनंतर प्रथम पाच क्रमांक काढण्यात आले आहेत, तर पर्सन ऑफ द आपलं मंत्रालयहा पुरस्कार किरण शार्दुल यांना जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :

कथा स्पर्धा :1) सलाईन – सुधीर वेदपाठक, कक्ष अधिकारी, जलसंपदा विभाग, 2) टेलर – भरत लब्दे , सहायक कक्ष अधिकारी, विधि व न्याय विभाग, 3) दाटुनी कंठ – मानसिंग उ. पाटील, सहायक कक्ष अधिकारी, कृषी व पदुम विभाग, 4) शकुंतला – सारिका निलेश चौधरी, सहायक कक्ष अधिकारी, विधि व न्याय विभाग 5) भूक एक? (प्रश्‍नचिन्ह) – दिवाकर मोहिते, लिपिक टंकलेखक, शासकीय मुद्रणालय.

लेख स्पर्धा : 1) किरण शार्दूल – कार्यासन अधिकारी, सामान्य प्रशासन.विभाग, 2) सारिका निलेश चौधरी – विधी व न्याय विभाग, 3) अतुल नरहरी कुलकर्णी – कक्ष अधिकारी, वित्त विभाग

छायाचित्र स्पर्धा : 1) फ्लेमिंगो – दुर्गाप्रसाद मैलावरम, अवर सचिव, गृहनिर्माण विभाग

2) काळ्या डोळ्याचा हळद्या – प्रशांत वाघ, कक्ष अधिकारी, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग 3) वरदहस्त – नंदकिशोर नीलम साटम, प्रकल्प अधिकारी, पर्यावरण माहिती प्रणाली केंद्र 4) पक्ष्यांची छायाचित्रे – पंकज कुंभार, वन विभाग 5) कास पठार – महादेव शांताराम मगर, लिपिक टंकलेखक, गृह विभाग

अनुभव स्पर्धा : 1) मेगाब्लॉक – किरण शार्दूल, कार्यासन अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग 2) अविस्मरणीय – पद्मजा श्रीपाद पाठक, प्रधान सचिवांचे स्वीय सहायक, सामान्य प्रशासन विभाग 3) तीन दृश्ये – चित्रा धनंजय चांचड, कक्ष अधिकारी, वित्त विभाग 4) ओली भेळ – महेश पांडुरंग पाटील, लिपिक टंकलेखक, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग 5) धडा – प्रियंका बापर्डेकर, सहायक कक्ष अधिकारी, सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग.

कविता स्पर्धा : 1) पूर – सुरेश नाईक, अवर सचिव, मृदा व जलसंधारण विभाग 2) गहिर्‍या रात्री – मानसिंग उ. पाटील, सहायक कक्ष अधिकारी, कृषी व पदुम विभाग 3) पिल्लासाठी – वृषाली सचिन चवाथे, कक्ष अधिकारी, मुख्यमंत्री कार्यालय 4) विनाकारण फसतो मी – संजीव केळुस्कर, उप-सचिव, सामान्य प्रशासन विभाग 5) पाऊस – शैला जंगम, सहायक कक्ष अधिकारी, जलसंपदा विभाग.

0000

उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पहिले‘नॉर्थइस्ट अनसंग हिरोज रेड कार्पेट सोशल अवॉर्डप्रदान

मुंबई, दि. 15 : देशाच्या पूर्वोत्तर राज्यातील दुर्लक्षित मात्र उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन प्रोत्साहन देण्याचे कार्य कौतुकास्पद आहे, अशा कार्यक्रमांचा प्रसार करुन  सामाजिक कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. यातून राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होण्यास मदत होईल, अशी भावना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे व्यक्त केली.

यूएफओच्या संयुक्त विद्यमाने फाईंड स्टुडिओज आणि एसआयईएलद्वारा आयोजित बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येथे आयोजित पहिल्या‘नॉर्थइस्ट अनसंग हिरोज रेड कार्पेट सोशल अवॉर्डकार्यक्रमात श्री.कोश्यारी बोलत होते.

आंतरराज्यीय जीवनपद्धतीचे कौतुक करत राज्यपाल म्हणाले, सामाजिक जीवनात चांगले काम करणाऱ्यांकडे अनेकवेळा दुर्लक्ष होते. मात्र त्यांना पुरस्काराने सन्मानित करुन प्रोत्साहन देण्याचे कार्य सामाजिक संस्थांकडून केले जात असून अशा कार्यक्रमांचा प्रसार अधिकाधिक लोकांना प्रोत्साहित करेल अशी अपेक्षा आहे. देशाला एकत्रित ठेवण्यात विविध राज्यांतील व्यक्तींचे योगदान लाभले आहे. आपला देश उत्तम संस्कृती लाभलेला देश आहे. देशाच्या सर्वच प्रदेशातील नागरिकांमध्ये एकतेची भावना दरवळत असते. हा देश आणि आपण सर्व एक आहोत अशी भावना रुजविणे महत्त्वाचे आहे. एकमेकांच्या राज्यातील जीवनपद्धती, संस्कृतीचे आदान-प्रदान यातून एकता निर्माण होते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, आज सन्मानित झालेल्या व्यक्तींनी एवढ्यातच संतुष्ट न राहता राष्ट्रीय पातळीवर कौतुक व्हावे असे कार्य करावे. तसेच देशाला एकात्मतेचा संदेश देण्यात सर्वांनी योगदान द्यावे. याचबरोबर सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांनी ईशान्येकडील राज्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी उत्पन्नाच्या किमान एक टक्का अर्थसहाय्य करावे, असेही आवाहन श्री.कोश्यारी यांनी यावेळी केले.

ईशान्येकडील आसाम, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मणिपूर, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय या आठ राज्यातील प्रत्येकी तीन व्यक्तींची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या पुरस्कारांसाठी एकूण 65 अर्ज प्राप्त झाले होते. कला व संस्कृती, नवउद्योजक आणि क्रीडा क्षेत्रातील रोझ लाँगचर, टोई स्वुउरो, मेन्होडिल्हो मोरीस उसो यांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी एसईआयएलचे अध्यक्ष अतुल कुलकर्णी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संघटक सचिव सुनिल अंबेकर, आशिषकुमार चौहान, संस्थापक रेबेका चंकेजा सीमा आणि पुरस्कारर्थी आदी उपस्थित होते. या उपक्रमाला मुंबई डबेवाला संघटनेने पाठिंबा दर्शविला असून मुंबई विद्यापीठ आणि आयआयएम, शिलाँग या संस्था भागीदार आहेत.

रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ‘पु.ल. कला महोत्सव २०१९’चा समारोप

मुंबई,दि. १५ : पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे आयोजित पु.ल. कला महोत्सव २०१९ चा समारोप रसिकांच्या उस्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला.

समारोप समारंभाला सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी,सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे,भरत जाधव,सिद्धार्थ जाधव,अकादमीचे सल्लागार मिलिंद लेले,सतीश जकातदार,नारायण जाधव,पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे प्रकल्प संचालक बिभीषण चवरे उपस्थित होते.

समारोप कार्यक्रमात अकादमीच्या’महाकला’या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्रातील लोप पावत चाललेल्या सांस्कृतिक घटकांचे संवर्धन होण्यासाठी या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे .

यावेळी अकादमीच्या पुलं कट्टा या उपक्रमात सहभागी कलावंतांचा सत्कार करण्यात आला. तसेच अकादमीतर्फे पत्र लेखनाला प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या’सनविवि’या उपक्रमाची माहिती यावेळी देण्यात आली. या उपक्रमांतर्गत उपस्थित मान्यवरांना पोस्टकार्ड देऊन पत्रलेखनास प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आले.

प्रास्ताविक श्री. चवरे यांनी केले. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमार्फत प्रभादेवी ( मुंबई ) येथील रवींद्र नाट्यमंदिरात दि. ८ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.’पु. ल. कला महोत्सव २०१९’दरम्यान विविध कला आविष्कारांवर आधारित दर्जेदार कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.

पंडित जवाहरलाल नेहरु यांना जयंतीनिमित्त विधानभवन, मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. 14 : स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती आज विधानभवनात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी विधानपरिषदेचे सदस्य सर्वश्री रामहरी रुपनवर, दत्तात्रय सावंत, श्रीकांत देशपांडे, विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत, उपसचिव विलास आठवले, श्रीमती मेघना तळेकर, शिवदर्शन साठये, राजेश तारवी, अध्यक्षांचे सचिव राजकुमार सागर, अवर सचिव सोमनाथ सानप, सुनिल झोरे, श्रीमती पूनम ढगे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात मुख्य सचिव अजोय मेहता यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, मुख्य सचिव कार्यालयाचे सहसचिव राजेश निवतकर, सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव श्रीमती अंशू सिन्हा, उपसचिव जे.जे. वळवी यांनीही पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेस गुलाब पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. तसेच यावेळी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – पालकमंत्र्यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

0
चंद्रपूर, दि. 10 : गत काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मोठ्या प्रमाणावर नागरिकांची घरे, शेती पिके...

देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी ‘जनसुरक्षा’ विधेयक महत्त्वाचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
विधेयकावरील चर्चेला मुख्यमंत्र्यांचे उत्तर मुंबई, दि. १० : महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत बहुमताने मंजूर करण्यात आले. हे विधेयक देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे....

ऊसतोड महिला कामगारांच्या समस्यांवर ठोस उपाययोजना कराव्यात – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

0
मुंबई, दि. १० : ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्य, सुरक्षा आणि सामाजिक संरक्षणाच्या समस्या तातडीने मार्गी लावाव्यात, असे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी...

प्रत्येक शाळेत मराठी शिकविणे बंधनकारक – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

0
मुंबई, दि. १० - शाळा अनुदानित असो वा विनाअनुदानित, सरकारी असो वा खासगी तेथे मराठी विषय शिकवलाच गेला पाहिजे. प्रत्येक शाळेत मराठी भाषा बंधनकारक...

मावळच्या मंगरूळमधील अवैधरित्या वृक्षतोड व उत्खननप्रकरणी अहवाल सादर करावा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

0
मुंबई, दि. १० : मावळ तालुक्यातील मंगरूळ मध्ये अवैधरित्या वृक्षतोड व उत्खनन प्रकरणी संबंधित विभागांनी लवकरात लवकर अहवाल सादर करावा, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा...