शुक्रवार, जुलै 11, 2025
Home Blog Page 1797

भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात ‘महाराष्ट्रातील व्यवसाय सुलभता’

उद्या होणार महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन

नवी दिल्ली, 14 : भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यासाठी महाराष्ट्र दालन सज्ज झाले आहे. “व्यवसाय सुलभता”(इज ऑफ डुईंग बिजनेस) या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या मेळ्यात महाराष्ट्राने यंदा “महाराष्ट्रातील व्यवसाय सुलभता” साकारली आहे. महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त समीर सहाय यांच्या हस्ते उद्या 14 नोव्हेंबरला या मेळ्यातील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन होणार आहे.

प्रगती मैदान येथे दि.14 ते 27 नोव्हेंबर 2019 या कालावधीत वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायजेशनच्यावतीने 39 व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचेआयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्यावतीने “व्यवसाय सुलभतेच्या” माध्यमातून राज्याच्या उद्योग क्षेत्रातील प्रगतीचे दर्शन घडविणारे सुरेख प्रदर्शन साकारण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या विविध विभागांचे 8 आणि बचतगटांचे 2 असे एकूण 10 स्टॉल्स या ठिकाणी मांडण्यात आले आहेत.‘इज ऑफ डुईंग बिजनेसच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रातील महाराष्ट्राची भरारी यंदा राज्याच्यावतीने प्रदर्शित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त समीर सहाय यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बी.वेणुगोपाल रेड्डी यांच्या उपस्थितीत14 नोव्हेंबर 2019 रोजी दुपारी 3 वाजता प्रगती मैदान येथील हॉल क्रमांक 12 –मध्ये होणार आहे.

20 नोव्हेंबर रोजी साजरा होणारमहाराष्ट्र दिन 

व्यापार उद्येागासह या मेळाव्यात सहभागी विविध देश आणि राज्यांच्यावतीने आपली सांस्कृतिक परंपरा दर्शविणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जातो. याअंतर्गत 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता प्रगती मैदान येथील‘हंसध्वनी रंगमंचयेथे महाराष्ट्र दिनसाजरा होणार आहे. मुंबई येथील पृथ्वी इनोव्हेशन्स ग्रुपचे कलाकार हा कार्यक्रम सादर करणार असून या माध्यमातून व्यापार मेळ्यास भेट देणाऱ्या देश-विदेशातील उद्योजक व ग्राहकांना महाराष्ट्राच्या वैविद्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन होणार आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या बालकांचे हक्क व सुरक्षितता या विषयावर मुलाखत

मुंबई, दि.13 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात युनिसेफचे राज्य समन्वयक विकास सावंत यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून गुरुवार, दि. १४ आणि शुक्रवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदक हेमंत बर्वे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

युनिसेफतर्फे १४ ते २० नोव्हेंबरदरम्यान बालकांचे हक्क व सुरक्षितता सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहाच्या आयोजनामागील उद्देश, बालहक्क म्हणजे काय, बालकांची सद्य:स्थिती, जनजागृती मोहिमेची उद्दिष्टे, बालकांचे हक्क व सुरक्षिततेसाठी करण्यात येत असलेले प्रयत्न, सप्ताहादरम्यान करण्यात येणारी जनजागृती,  बालकांना सर्व प्रकारच्या लैंगिक शोषण आणि लैंगिक गैरवर्तनापासून संरक्षित कसे करता येईल, बालगुन्हेगारीसाठी कारणीभूत घटक आदी विषयांची सविस्तर माहिती श्री.सावंत यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.

ईशान्य भारत आणि उर्वरित भारतातील जनतेत सौहार्दपूर्ण संबंधासाठी ‘माय होम इंडिया’ एक सेतू- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

छोडेन लेपचा यांना राज्यपालांच्या हस्ते ‘वन’ इंडिया पुरस्कार’ प्रदान

मुंबई, दि. 13 : ईशान्य भारत आणि उर्वरित भारत यामधील लोकांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध मजबूत करण्यासाठी ‘माय होम इंडियाही संस्था एक सेतू म्हणून कार्य करत आहे, असे गौरवोद्‌गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले.

दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात सिक्कीम येथील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या छोडेन लेपचा यांना माय होम इं‍डियाया संस्थेचा वन’ इंडिया पुरस्कारराज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, श्रीमती लेपचा कठोर परिश्रमातून समाजाच्या विकासासाठी विविध क्षेत्रात निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य करत आहेत. अनाथ मुलांसाठीसुद्धा त्यांचे मोठे कार्य असून हे राष्ट्रीय कार्य अभिनंदनीय असल्याचेही श्री.कोश्यारी यांनी सांगितले.

त्रिपुराचे माजी राज्यपाल पद्मश्री डी.वाय.पाटील, सारस्वत बँकेचे चेअरमन गौतम ठाकूर, ‘माय होम इंडियाचे संस्थापक सुनिल देवधर, राहूल राठी, केंद्रीय विद्यापीठ (बिलासपूर) कुलगुरु अंजली गुप्ता आदी उपस्थित होते.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या ‘चित्रकला व महाराष्ट्र’ या विषयावरील मुलाखतीचा दुसरा भाग

मुंबई, दि. 11 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र‘  कार्यक्रमात सर जे.जे.स्कूल ऑफ आर्टचे अधिष्ठाता प्रा.विश्वनाथ साबळे व चित्रकार डॉ.नरेंद्र बोरलेपवार यांची ‘चित्रकला व महाराष्ट्र‘ या विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. या मुलाखतीचा दुसरा भाग दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर 2019 रोजी संध्याकाळी 7.30 वाजता प्रसारित होईल. निवेदिका रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.

चित्रकलेचं व्यवसायात रूपांतर कसं करावं, प्रशिक्षण घेतल्यानंतर उपलब्ध असलेल्या व्यवसायाच्या संधी, चित्रकलेचा जीवनावर होणारा सकारात्मक परिणाम, राज्यात चित्रकलेला प्रोत्साहन देण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न, कलेकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन या प्रश्नांना अधिष्ठाता प्रा.विश्वनाथ साबळे व चित्रकार डॉ.नरेंद्र बोरलेपवार यांनी सविस्तर उत्तरे ‘जय महाराष्ट्र‘  कार्यक्रमातून दिली आहेत.

स्वच्छता ही सवय व्हावी – प्रधान मुख्य वन संरक्षक दिनेशकुमार त्यागी

गिरगाव चौपाटी किनारा स्वच्छता अभियानाचा प्रारंभ

मुंबई, दि. 11: स्वच्छता राखणे हे आपले सामाजिक आणि संवैधानिक कर्तव्य असून त्याचे पालन आपण सर्वांनी मनापासून करायला हवे. स्वच्छता ही सवय व्हायला हवी, असे आवाहन प्रधान मुख्य वन संरक्षक दिनेशकुमार त्यागी यांनी केले.

आज त्यांच्या हस्ते गिरगाव चौपाटी किनारा स्वच्छता अभियानाचा आरंभ करण्यात आला. श्री.त्यागी म्हणाले की, स्वच्छता ही आपल्या निरोगी आयुष्यासाठी आवश्यक आहे. 90 टक्के आजार हे प्रदुषित पाण्यामुळे होतात. त्यामुळे जलस्त्रोतांचे संरक्षण करणे, पाण्याची स्वच्छता राखणे अगत्याचे झाले आहे. या उद्देशानेच आज आपण सर्वजण गिरगाव चौपाटी समुद्र किनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी एकत्र जमलो आहोत. सर्वांनी मनापासून यात सहभागी व्हावे, ज्यांना जिथे शक्य असेल तिथे त्यांनी आपल्या नद्या आणि जलस्त्रोतांच्या स्वच्छतेसाठी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.

गिरगाव चौपाटीच्या स्वच्छतेसाठी सरसावले शेकडो हात

पर्यटकांच्या गर्दीनं फुलून जाणारी गिरगाव चौपाटी आज तरूणाईच्या सळसळत्या उत्साहात न्हाऊन निघाली होती. शेकडो हात गिरगाव चौपाटी समुद्र किनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी सरसावले होते. कुणी प्लास्टिक गोळा करत होतं, कुणी कचरा उचलत होतं, कुणी तुटलेल्या चपला उचलत होतं तर कुणी आणखी काही. प्रत्येकजण उत्साहाने या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाला होता. विद्यार्थ्यांनी आपले ग्रुप तयार करून कामं वाटून घेतली. काहींनी जसा कचरा उचलला तर काहींनी बॅगांमध्ये भरलेला कचरा चौपाटीवर कचरा टाकण्यासाठी ठेवण्यात आलेल्या कुंभात नेऊन टाकला.

समुद्र आणि मुंबईकर यांचं नातंच विलक्षण. आपला समुद्र स्वच्छ झाला पाहिजे, समुद्र किनारा स्वच्छ झाला पाहिजे या एकाच ध्येयाने ही सगळी मंडळी काम करत होती. यात सामाजिक, स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींबरोबर एन.एस.एस, एन.सी.सीचे विद्यार्थी, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय हरित सेनेचे सदस्य, सामाजिक वनीकरण शाखेचे तसेच वन विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.

हे सर्वजण एकत्र आले होते ते सागरी किनारा स्वच्छता मोहिमेच्या निमित्ताने. पर्यावरण, वन व जलवायु मंत्रालय यांच्या विद्यमाने विभागीय अधिकारी, सामाजिक वनीकरण शाखा, ठाणे यांच्यामार्फत दि. 11 ते 17 नोव्हेंबर 2019 या कालावधीत गिरगाव चौपाटी समुद्र किनारा स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली आहे. त्याचा आरंभ आज प्रधान मुख्य वन संरक्षक दिनेशकुमार त्यागी यांनी आज केला. त्यावेळी ठाण्याचे विभागीय वन अधिकारी जितेंद्र रामगांवकर आणि सामाजिक वनीकरण शाखेतील इतर अधिकारी उपस्थित होते.

या मोहिमेमध्ये समुद्र किनारा स्वच्छता, समुद्रीय परिसंस्थेचा परिचय, छायाचित्र स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, पथनाट्याचे आयोजन अशा स्वरूपाचे कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे श्री. त्यागी यांनी सांगितले. ते म्हणाले की, आतापर्यंत उरण, गणपतीपुळे, तारकर्ली समुद्र किनाऱ्याची स्वच्छता सामाजिक वनीकरण शाखेच्यावतीने करण्यात आली आहे. आजपासून पुढील सात दिवस गिरगाव चौपाटीची स्वच्छता केली जाईल.

यापूर्वीही कांदळवन कक्षाच्यावतीने स्वच्छ कांदळवन अभियानाची अंमलबजावणी करण्यात आली होती. याअंतर्गत मुंबई, नवी मुंबई बांद्रा, वर्सोवा, दहिसर, शिवडी, ऐरोली, भांडूप, गोराई, वाशी अशा विविध ठिकाणच्या कांदळवनाची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये 11.03 कि.मी समुद्र आणि खाडी किनारी क्षेत्रातील 8 हजार टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले. 25 हजार लोकांनी यात सहभाग घेतला होता. “शहरी वनक्षेत्र स्वच्छतेचे सर्वात मोठे पाऊल या निमित्ताने पडले. याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डनेही घेतली असल्याची माहिती त्यांनी दिली.

महाराष्ट्राला आठ ‘राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार’

                        

नवी दिल्ली,दि.9 : उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी आज महाराष्ट्रातील एकूण आठ संस्थांना  केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे यांच्या हस्ते राष्ट्रीय उद्योजकता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या 5 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून येथील प्रवासी भारतीय केंद्रात आज राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार 2019’ चे वितरण करण्यात आले. मंत्रालयाचे सचिव डॉ. के.पी. कृष्णनन, सह सचिव ज्योत्स्ना सिटलींग आणि दलित चेंबर ऑफ कॉमर्स (डिक्की)चे संस्थापक मिलींद कांबळे यावेळी मंचावर उपस्थित होते. 

देशातील प्रतिभावान युवा लघुउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार अंतर्गत आज एकूण चार श्रेणींमध्ये देशातील 36 संस्थांना सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्रातील एकूण 8 संस्थांचा समावेश आहे.

या पुरस्कारांना  आणि  अशा दोन श्रेणींमध्ये विभागण्यात आले होते. अ श्रेणीमध्ये तीन उपश्रेणी करण्यात आल्या होत्या. याअंतर्गत 1’ या उपश्रेणीत 1 लाख रुपयांपर्यंत सुरुवातीची गुंतवणूक असणाऱ्याउद्योजकांची निवड करण्यात आली. या श्रेणीमध्ये पुण्यातील लोहगाव परिसरातील अर्ली फुड्स प्रा.लि. चा सन्मान करण्यात आला. संस्थेच्या संस्थापक शालिनी कुमार आणि विजयालक्ष्मी नागराज यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 2016 मध्ये स्थापन झालेली ही संस्था मुलांसाठी ऑर्गनिक बिस्कीट तयार करते. स्थानिक महिलांना या उद्योगामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे.

1 श्रेणीमध्येच नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथील क्रांतीज्योती महिला बचत गटाला सन्मानित करण्यात आले. बचत गटाच्या दीपा चौरे, अरुणा खडसे आणि अंजुमन शेख यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 2012 पासून कार्यरत या बचत गटाच्या माध्यमातून 100 महिला उद्योजिका तयार झाल्या असून कापडी पिशव्या बनविण्याचे कौशल्य त्यांनी अवगत केले आहे.

2’ या उपश्रेणीत 1 लाख ते 10 लाखापर्यंतची आरंभीची गुंतवणूक असणाऱ्याउद्योजकांची निवड करण्यात आली. यात राज्यातील 4 संस्थांना सन्मानित करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील पाचगणी नजीकच्या देवरी गावातील देवरी कला गाव या संस्थेला यावेळी सन्मानित करण्यात आले. संस्थेचे संस्थापक मंदाकिनी व अतुल माथुर, सुरेश पुंगटी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.  2009 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने स्थानिक आदिवासींच्या कला व संस्कृतीची जोपासणा करून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. 

याच श्रेणीत नवी मुंबई येथील लेटस् कँप आऊट कँप ग्राऊंड प्रा.लि. चा सन्मान करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अभिजीत आणि मंगला म्हात्रे यांनी पुरस्कार स्वीकारला. 2010 मध्ये स्थापना असलेल्या संस्थेने मोठ्या शहरानजिकच्या ग्रामीण भागातील जनतेला त्यांच्या शेतावर उत्तम नियोजनबध्द मनोरंजन पार्क उभारून देत रोजगार उपलब्ध करून दिला आहे. वर्धा येथील ग्लोबल एंटरप्रायजेसचाही यावेळी सन्मान करण्यात आला. संस्थेचे संस्थापक बलवंत ढगे यांनी पुरस्कार स्वीकारला. 2012 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने तंत्रशुद्ध पद्धतीचा वापर करून खादी कापडांचा उद्योग सुरु केला आहे. या माध्यमातून स्थानिकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. नाशिक येथील स्त्री स्वाभिमान सॅनिटरी नॅपकीन निर्मिती युनिटचाही यावेळी सन्मान करण्यात आला. दिव्यांग असूनही समाजसेवेच्या प्रेरणेने 2016 मध्ये ही संस्था स्थापन करणारे रवींद्र सुपेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या संस्थेने बायोडीग्रेडेबल आणि रासायनिक द्रव्यांचा उपयोग न करता व स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिनची निर्मिती करत ग्रामीण भागातील महिलांना या नॅपकिन्स उपलब्ध करून दिल्या.

3’ या उपश्रेणीत 10 लाख ते 1 कोटीपर्यंतची आरंभीची गुंतवणूक असणाऱ्याउद्योजकांची निवड करण्यात आली. या श्रेणीत ठाणे पश्चिम येथील स्काऊट माय ट्रिप या संस्थेला सन्मानित करण्यात आले. संस्थेचे संस्थापक विनीत राजन आणि दीपक अनंथ यांनी पुरस्कार स्वीकारला. पर्यटकांना विविध सोयी उपलब्ध करून देणारी ही संस्था 2016 मध्ये स्थापन झाली आहे. 

 श्रेणी अंतर्गत पर्यावरणपूरक वस्तू निर्मात्यांना एकूण 6 पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात राज्यातील पुणे येथील पाषाण भागातील व्हेंचर सेंटर या संस्थेचा सन्मान करण्यात आला. संस्थेच्या नुरेल पेझारकर आणि डॉ. रेणुका दिवाण यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

 श्रेणीतील पुरस्काराचे स्वरूप 5 लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे आहे  तर  ब श्रेणीतील पुरस्काराचे स्वरूप 10 लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे आहे. 2016 पासून दरवर्षी राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

३० नोव्हेंबरपर्यंत निवृत्तीवेतनधारकांनी हयातीचा दाखला सादर करण्याचे अधिदान व लेखा अधिकारी यांचे आवाहन

        

मुंबई दि.८ : अखिल भारतीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले अधिकारी व महाराष्ट्र राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी दिनांक ३० नोव्हेंबर २०१९ या कालावधीत  हयातीचा दाखला द्यावा असे आवाहन अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे, मुंबई यांनी केले आहे.

        

प्रसिद्धीस पाठवलेल्या पत्रकात त्यांनी असे नमूद केले आहे की, निवृत्तीवेतनधारकांची आद्याक्षरनिहाय अद्ययावत यादी निवृत्तीवेतनधारकांच्या संबंधित बँक शाखांकडे पाठविण्यात आली आहे. निवृत्ती तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारक ज्या बँकेतून निवृत्तीवेतन घेत असतील त्यांनी ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंतबँकेत प्रत्यक्ष हजर राहून यादीतील त्यांचे नाव पाहावे तसेच स्वाक्षरीच्या रकान्यात शाखा व्यवस्थापकासमक्ष स्वाक्षरी करावी किंवा अंगठ्याचा ठसा उमटवावा. हे करताना त्यांनी अचूक पॅन क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. पुनर्विवाह तसेच पुनर्नियुक्तीबाबत माहिती लागू असल्यास ती नोंदवणे ही अनिवार्य आहे.

        

याशिवायhttp://jeevanpramaan.gov.inया केंद्र शासनाच्या संकेतस्थळावरून जीवन प्रमाण दाखला (डिजिटल लाईफ सर्टिफिकेट) सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

        

अधिदान व लेखा कार्यालयातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतनधारकांसाठी चालू वर्षी दिनांक१ नोव्हेंबर २०१९नंतर दाखल करावयाचे हयातीचे दाखले या संकेतस्थळावरून नोंदणी करून सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जीवनप्रमाण पोर्टलवर नोंदणी करताना निवृत्तीवेतनधारकांनी ते ज्या कोषागारामधून निवृत्तीवेतन घेत आहेत, त्या कोषागाराची निवड करावी. तसेच स्वत:चे संपूर्ण नाव, भ्रमणध्वनी क्रमांक, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक व निवृत्तीवेतन प्रदान आदेश क्रमांक (पीपीओ नंबर) अचूक नोंदवणे आवश्यक आहे.

        

जे निवृत्तीवेतनधारक नजीकच्या आधार केंद्रावर अथवा खासगी संगणकीकृत जीवनप्रमाण सुविधा केंद्राद्वारे हयातीचे दाखले सादर करून इच्छितात त्यांनी प्रथम या कार्यालयाकडे त्यांचा पीपीओ नंबर अचूक असल्याची खात्री करून घ्यावी.

         

जे निवृत्तीवेतनधारक अधिदान व लेखा कार्यालयात समक्ष उपस्थित राहून जीवनप्रमाण पोर्टलद्वारे जीवनप्रमाण संगणीकृत हयातीचा दाखला (डिजिटल सर्टिफिकेट) सादर करू इच्छितात त्यांच्यासाठी अधिदान व लेखा कार्यालयात निवृत्तीवेतन शाखेत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

        

ज्या निवृत्तीवेतनधारकानी यादीतील त्यांच्या नावासमोर स्वाक्षरी किंवा अंगठ्याचा ठसा केला नसेल किंवा संगणकीकृत जीवनप्रमाण दाखल (डिजिटल लाईफ सर्टिफिकेट) सादर केला नसेल त्यांचे निवृत्तीवेतन डिसेंबर२०१९पासून स्थगित करण्यात येईल याची कृपया सर्व निवृत्तीवेतनधारकानी नोंद घ्यावी असे आवाहन ही अधिदान व लेखा कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेअंतर्गत गिरगाव चौपाटी होणार स्वच्छ

मुंबई दि.८ : पर्यावरण, वन व जलवायु मंत्रालय, भारत सरकार यांच्या विद्यमाने विभागीय अधिकारी, सामाजिक वनीकरण शाखा, ठाणे यांच्यामार्फत स्वच्छता ॲक्शन प्लॅन अंतर्गत गिरगाव चौपाटी समुद्रकिनारा स्वच्छता मोहिम आखण्यात आली आहे. ही मोहिम   दि. ११ ते १७ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत सायंकाळी ४ ते ६ या वेळेत राबविण्यात येईल अशी माहिती विभागीय अधिकारी, सामाजिक वनीकरण शाखा ठाणे यांनी कळवली आहे.

या मोहिमेत शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक संस्था, स्थानिक नागरिक सहभागी होणार आहेत. या मोहिमेचा आरंभ ११ नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी ४ वाजता तर समारोप १७ नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी ६वाजता होईल.

या कार्यक्रमास वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींनाही निमंत्रित करण्यात आले आहे.

गिरगाव चौपाटी समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत समुद्र किनारा स्वच्छता, समुद्रीय परिसंस्थेचा परिचय, छायाचित्र स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, पथनाट्याचे आयोजन अशा स्वरूपाचे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

कार्तिकी एकादशीनिमित्त महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा

पंढरपूर,दि. 8 : राज्यातील शेतकरी आणि सामान्य जनता सुखी होऊ दे,असे साकडे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी आज सकाळी घातले.

महसूलमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी यांची शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर संत तुकाराम भवन येथे झालेल्या कार्यक्रमात श्री. पाटील यांच्या हस्ते मानाचे वारकरी श्री. सुनील महादेव ओमासे आणि सौ. नंदा ओमासे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

श्री. पाटील म्हणाले, ‘यावर्षी राज्यासमोर अनेक आव्हाने आली. सुरुवातील दुष्काळस्थिती होती. त्यानंतर महापुराला सामोरे जावे लागले आणि आता अवकाळी पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाने उपाययोजना केल्या आहेत. केंद्र सरकारकडेही  मदत  मागितली आहे’.

मागील तीन चार वर्षे वारी ‘निर्मल वारी’ करण्यासाठी प्रयत्न केला गेला. वारीच्या मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठी प्रयत्न केले गेले. त्याला अतिशय चांगले यश आले. पुढील वर्षी धूरमुक्त वारी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असणार आहे,असे श्री. पाटील यांनी सांगितले.

बेडग गावचे ओमासे ठरले मानाचे वारकरी

मानाचा वारकरी ठरलेले सुनील ओमासे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडग येथील आहेत. शेतकरी कुटुंबातील ओमासे२००३ पासूनवारी करतात. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांना चांदीची विठ्ठल रुक्मिणी मूर्ती,शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना मोफत एसटी पासही देण्यात आला.

प्रसारभारतीच्या ‘न्यूज ऑन एअर’ ॲपवरही ऐका ‘आपला महाराष्ट्र’ हे विशेष वार्तापत्र

मुंबई, दि.  8 : प्रसारभारतीच्या  न्यूज ऑन एअरया ॲपवर माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित आपला महाराष्ट्रहे विशेष वार्तापत्र  दि. 9 नोव्हेंबर रोजी  सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत ऐकण्याची सुविधा उपलब्ध आहे.

राज्यातील  मुंबई, पुणे, नागपूर,औरंगाबाद,‍नाशिक,जळगाव, कोल्हापूर, परभणी, रत्नागिरी, सांगली, अहमदनगर,अकोला, अमरावती, बीड, चंद्रपूर, धुळे, नांदेड, सिंधुदुर्गनगरी, उस्मानाबाद, सातारा, सोलापूर, यवतमाळ या 22 आकाशवाणी केंद्रांवरून हे विशेष वार्तापत्र  प्रसारित केले जाईल.                                                            

ताज्या बातम्या

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – पालकमंत्र्यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

0
चंद्रपूर, दि. 10 : गत काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मोठ्या प्रमाणावर नागरिकांची घरे, शेती पिके...

देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी ‘जनसुरक्षा’ विधेयक महत्त्वाचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
विधेयकावरील चर्चेला मुख्यमंत्र्यांचे उत्तर मुंबई, दि. १० : महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानसभेत बहुमताने मंजूर करण्यात आले. हे विधेयक देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे....

ऊसतोड महिला कामगारांच्या समस्यांवर ठोस उपाययोजना कराव्यात – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

0
मुंबई, दि. १० : ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्य, सुरक्षा आणि सामाजिक संरक्षणाच्या समस्या तातडीने मार्गी लावाव्यात, असे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी...

प्रत्येक शाळेत मराठी शिकविणे बंधनकारक – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

0
मुंबई, दि. १० - शाळा अनुदानित असो वा विनाअनुदानित, सरकारी असो वा खासगी तेथे मराठी विषय शिकवलाच गेला पाहिजे. प्रत्येक शाळेत मराठी भाषा बंधनकारक...

मावळच्या मंगरूळमधील अवैधरित्या वृक्षतोड व उत्खननप्रकरणी अहवाल सादर करावा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

0
मुंबई, दि. १० : मावळ तालुक्यातील मंगरूळ मध्ये अवैधरित्या वृक्षतोड व उत्खनन प्रकरणी संबंधित विभागांनी लवकरात लवकर अहवाल सादर करावा, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा...