शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
Home Blog Page 1876

‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या ‘जैवविविधता जतन व संवर्धन’ या विषयावर मुलाखत

मुंबई,दि. 12 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित’जय महाराष्ट्र’व  ‘दिलखुलास’कार्यक्रमात’जैवविविधता जतन व संवर्धन’या विषयावर महाराष्ट्र राज्य  जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ. विलास बर्डेकर  यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.  ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि.13 डिसेंबर रोजी  संध्याकाळी 7.30 वाजता प्रक्षेपित होणार आहे.  तसेच राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून’दिलखुलास’कार्यक्रमात व’न्यूज ऑन एअर’या ॲपवरही  ही मुलाखत शुक्रवार दि.13  डिसेंबर व सोमवार दि. 16  डिसेंबर रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत ही मुलाखत प्रसारित होईल. संध्या गरवारे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

        

महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाची स्थापना व उद्देश,बदलत्या तापमानाचे जैवविविधतेवर होणारे परिणाम,महाराष्ट्रातील जंगलांचे आणि प्राण्यांचे प्रकार,जैवविविधतेच्या दृष्टीने संपन्न असलेला महाराष्ट्र,जैवविविधता बोर्डाने केलेली लक्षवेधी कामगिरी,राज्यातील फुलपाखरांचे मराठी नामकरण,महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ राबवित असलेले उपक्रम व योजना,जैवविविधतेमध्ये नोंदवहीचं महत्त्व,जैवविविधतेचा पोवाडा या विषयांची सविस्तर माहिती डॉ. विलास बर्डेकर  यांनी’जय महाराष्ट्र’व  ‘दिलखुलास’  कार्यक्रमात दिली आहे.

महिला सुरक्षेसाठी महाराष्ट्राला १९५ कोटींचा निधी

                

नवी दिल्ली,12 :महिला सुरक्षेच्या विविध योजनांतर्गत केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला195कोटी54लाख30हजारांचा निधी वितरित करण्यात आला आहे.  

केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या वतीने देशातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी चालविण्यात येणाऱ्या निर्भया फंड,वनस्टॉप सेंटर,महिला हेल्पलाईन या योजनांसाठी राज्य व केंद्रशासित प्रदेशांना निधी वितरित करण्यात आला आहे.महाराष्ट्राला या योजनांतर्गत एकूण195कोटी54लाख30हजारांचा निधी वितरित करण्यात आला आहे.   

 निर्भया फंडअंतर्गत राज्याला149कोटींचा निधी

महिला सुरक्षेसाठी केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या वतीने‘निर्भया फंड’तयार करण्यात आला असून देशातील राज्य व केंद्रशासित प्रदेशांना याअंतर्गत निधी वितरित करण्यात आला आहे.महाराष्ट्राला‘निर्भया फंड’अंतर्गत एकूण149कोटी40लाख6हजारांचा निधी वितरित करण्यात आला आहे.याच कार्यक्रमांतर्गत राज्याच्या विधी व न्याय विभागाला31कोटी5लाखांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

 वनस्टॉपसेंटरउभारण्यासाठी14कोटी

अडचणीत सापडलेल्या महिलांना तात्काळ मदत पोहोचविण्यासाठी देशभर‘वन स्टॉप सेंटर’ उभारण्यात आले आहेत. महाराष्ट्रात असे सेंटर उभारण्यासाठी14कोटी46लाख54हजारांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

अडचणीत सापडलेल्या महिलांना तात्काळ संपर्क करता यावा म्हणून सुरु करण्यात आलेल्या‘महिला हेल्पलाईनचे’सार्वत्रिकरण करण्यासाठी महाराष्ट्राला62लाख70हजारांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री  स्मृती इराणी  यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही  माहिती दिली.

00000 

रितेशभुयार/वृत्तवि.क्र.267/  दिनांक12.12.2019

मैदानी खेळामुळे शारीरिक आणि बौद्ध‍िक विकास -मंत्री सुभाष देसाई

42 व्या प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन

मुंबई, दि.12 : मैदानी खेळामुळे शारीरिक आणि बौद्ध‍िक विकास होतो. तसेच एकाग्रता आणि कार्यक्षमतेतही वाढ होते, यासाठी विद्यार्थ्यांनी मैदानी खेळात सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री सुभाष देसाई यांनी केले.

गोरेगाव येथील प्रबोधन क्रीडा भवन येथे 42 व्या प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन मंत्री सुभाष देसाई यांनी केले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रबोधन क्रीडा महोत्सवाचे अध्यक्ष नितिन शिंदे यांच्यासह सुनिल वेलणकर, रमेश इसवलकर, गोविंद गावडे, पद्माकर सावंत उपस्थित होते.

मंत्री श्री. देसाई म्हणाले, 42 वर्षांपूर्वी या महोत्सवाची सुरुवात छोट्याशा रोपट्याने केली आज याचा मोठा वटवृक्ष झाला आहे. मी या महोत्सवाचा संस्थापक असून या महोत्सवाच्या स्पर्धेच्या माध्यमातून विविध शाळेतील स्पर्धकांनी राष्ट्रीय स्तरावरही पुरस्कार प्राप्त केले आहेत. याचा मला मनस्वी आनंद होत आहे. विद्यार्थ्यांनी मैदानी खेळामध्ये सहभागी होऊन राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये स्वत:सह देशाचे नाव उज्ज्वल करावे यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

42 व्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत 191 शाळांच्या एकूण 3 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. हा क्रीडा महोत्सव 12 ते 15 डिसेंबरदरम्यान होणार आहे. या महोत्सवात कबड्डी, खो-खो, ॲथलेटिक्स, बुद्ध‍िबळ, कराटे, धनुर्विद्या यासह विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विद्यार्थी स्पर्धक, शिक्षक, मार्गदर्शक, प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी पोलीस बॅण्ड पथकासह विविध संघाच्या विद्यार्थ्यांनी संचलन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार वायरन वास यांनी केले.

0000

राजू धोत्रे/12.12.2019

आययूएमएस प्रणालीमध्ये सर्व विद्यापीठांनी सकारात्मक सहभाग घेण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

मुंबई,दि.12: राज्यभरातील विद्यापीठांच्या कामामध्ये सुसूत्रता यावी यासाठी तयार करण्यात येत असलेल्या‘इंटिग्रेटेड युनिव्हर्सिटी मॅनेजमेंट सिस्टीम’ (IUMS)मध्ये सहभागी होण्यासाठी सर्व विद्यापीठांनी सकारात्मक सहभाग नोंदवावा असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज राज भवन,मुंबई येथे केले. राज्यातील सर्व विद्यापीठांचा आढावा घेण्यासाठी  आयोजित  कुलगुरूंच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पी.व्ही. आर श्रीनिवास,उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय,महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञानचे व्यवस्थापकीय संचालक अजित पाटील उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले,महाराष्ट्र राज्य हे अनेक बाबतीत अग्रेसर असणारे राज्य आहे. विद्यापीठाअंतर्गत येणारी सर्व महाविद्यालये,कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी  एकात्मिक अशा या प्रणालीचा वापर सुरु करणारे देशातील  पहिले राज्य होण्याचा या निमित्ताने प्रयत्न करावा. यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण घ्यावे. या प्रणालीच्या वापरासंदर्भात काही सूचना असल्यास कळवाव्यात. प्रत्येक विद्यापीठाची गरज लक्षात घेऊन प्रणालीमध्ये त्या अनुषंगाने सुधारणा कराव्यात असेही त्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित कुलगुरुंच्या शंकांचे समाधान माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव श्री. श्रीनिवास यांनी  केले,ते म्हणाले  या प्रणालीचा वापर केल्यास माहिती दुसरीकडे जाण्याची भीती बाळगू नये. सर्व विद्यापीठांची कार्यपद्धती वेगेवेगेळी आहे. त्यामुळे राज्यभरातील विद्यापीठातील कामांमध्ये सुसूत्रता यावी यासाठी तयार करण्यात येत असलेल्या‘इंटिग्रेटेड युनिव्हर्सिटी मॅनेजमेंट सिस्टीम’वापरण्यास सुरुवात केली तरी प्रत्येक विद्यापीठाची स्वायत्तता कायम राहणार आहे.

       

उच्च व तंत्रज्ञान विभागाचे सचिव सौरभ विजय म्हणाले,अशी प्रणाली तयार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. विद्यापीठांच्या हिताची अशी ही प्रणाली आहे. यात14विद्यापीठे, 4हजार600महाविद्यालये26लाख विद्यार्थी  आणि80हजार शिक्षकांचा समावेश असेल. जानेवारी2020पर्यंत प्रशिक्षण देण्यात येईल तर येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून या प्रणालीद्वारे कामकाज सुरु करता येईल.

राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सवात मुंबई विद्यापीठाने सांस्कृतिक नृत्य गायन स्पर्धेसह गोल्डन बॉय आणि गोल्डन गर्ल अशा किताबासह विजेतेपद प्राप्त केल्याबद्दल मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांचे राज्यपालांनी विशेष अभिनंदन केले.

यावेळी विविध विद्यापीठांचे कुलगुरू तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

००००

अर्चना शंभरकर/विसंअ/12.12.19

१ ते १५ जानेवारीदरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

मुंबई, दि. 12 : मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी व संवर्धनासाठी 1 ते 15 जानेवारी 2020 या कालावधीत मराठी भाषा विभागामार्फत‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये राज्यातील सर्व शासकीय,निम-शासकीय कार्यालय,महामंडळे तसेच राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारितील सर्व कार्यालये,मंडळे, सार्वजनिक उपक्रम सर्व खाजगी व व्यापारी बँका,सर्व शैक्षणिक संस्था,विद्यापीठे,महाविद्यालये आदी सर्व संस्थांमध्ये‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’साजरा करण्यात येणार आहे.

राज्यामध्ये मराठी भाषेचा राजभाषा म्हणून सार्वत्रिक वापर करण्याच्या दृष्टीने सर्व कार्यालय प्रमुखांनी भाषा पंधरवड्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करावे तसेच त्यामध्ये जास्तीत जास्त व्यक्तींचा सक्रीय सहभाग असावा. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा असे फलक सर्व कार्यालयांनी लावावेत असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘व्हर्जिन’समूहाच्या रिचर्ड ब्रॅन्सन यांनी घेतली सदिच्छा भेट

वाहतूक क्षेत्रातील उच्च तंत्रज्ञान युक्त प्रकल्पांची चर्चा

मुंबई,दि. 12 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्रेट ब्रिटनमधील’व्हर्जिन’उद्योग समूहाचे प्रमुख सर रिचर्ड ब्रॅन्सन यांनी सदिच्छा भेट घेतली.

या भेटीत पुणे-मुंबई दरम्यान प्रस्तावित’हायपर-लूप’या प्रवासी वाहतुकीसाठीच्या वेगवान तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पासंदर्भात तसेच हवाई वाहतूक क्षेत्राशी निगडीत चर्चा करण्यात आली. श्री.ब्रॅन्सन यांनी त्यांच्या समूहाच्या विविध प्रकल्पांबाबत माहिती दिली. भारतात विशेषतः महाराष्ट्रात त्यांच्या उद्योग समूहाला उच्च तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प निर्माण करण्यात स्वारस्य असल्याचे सांगितले. त्यामुळे निर्माण होणाऱ्या गुंतवणूक आणि रोजगार संधीची माहिती दिली.

यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता,मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी,आमदार आदित्य ठाकरे तसेच’व्हर्जिन’समूहाचे अधिकारी आदी उपस्थित होते. या उद्योग समूहाच्या प्रकल्पासंदर्भात सादरीकरण करण्यात आले.

००००

संतोष तोडकर/मुख्यमंत्री सचिवालय/12.12.19

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

मुंबई,दि. 12 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मान्यता दिली आहे. खातेवाटप पुढीलप्रमाणे…

1.   श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे,मुख्यमंत्री :  कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा त्यांचे भाग.

2.  श्री. एकनाथ संभाजी  शिंदे :     गृह,नगर विकास,वने,पर्यावरण,पाणी पुरवठा व स्वच्छता,मृद व जलसंधारण,पर्यटन,सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम),संसदीय कार्य,माजी सैनिक कल्याण.

3.  श्री. छगन चंद्रकांत भुजबळ :    ग्रामविकास,जलसंपदा व लाभक्षेत्र विकास,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य,राज्य उत्पादन शुल्क,कौशल्य विकास व उद्योजकता,अन्न व औषध प्रशासन.

4.  श्री. विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात :     महसूल,ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा,वैद्यकीय शिक्षण,शालेय शिक्षण,पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय.

5.  श्री. सुभाष राजाराम देसाई :      उद्योग आणि खनिकर्म,उच्च व तंत्रशिक्षण,क्रीडा व युवक कल्याण,कृषि,रोजगार हमी योजना,फलोत्पादन,परिवहन,मराठी भाषा,सांस्कृतिक कार्ये,राजशिष्टाचार,भूकंप पुनर्वसन,बंदरे आणि खारभूमी विकास.

6.  श्री. जयंत राजाराम पाटील :      वित्त आणि नियोजन,गृहनिर्माण,सार्वजनिक आरोग्य,सहकार व पणन,अन्न,नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण,कामगार,अल्पसंख्याक विकास.

7.  डॉ. नितीन काशिनाथ राऊत :    सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),आदिवासी विकास,महिला व बाल विकास,वस्त्रोद्योग,मदत व पुनर्वसन,इतर मागासवर्ग,सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग,विमुक्त जाती,भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण.

—–000—–

निळवंडे प्रकल्पाच्या कामाला गती देऊन कालबद्ध पद्धतीने काम करण्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आदेश

मुंबई,दि. 12 : निळवंडे धरणाचे काम येत्या जूनअखेर पूर्ण करून धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा उपलब्ध होईल यासाठी‘निळवंडे’प्रकल्पाच्या कामाला अधिक गती देऊन,कालबद्ध पद्धतीने काम पूर्ण करण्याचे आदेश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज दिले.

आज मंत्रालयात ऊर्ध्व प्रवरा प्रकल्प (निळवंडे-2) संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रकल्पाचा पूर्ण आढावा घेऊन प्रकल्पाच्या कामात काय अडचणी आहेत,त्या जाणून घेतल्या आणि प्रकल्पाला गती देण्याचे आदेश श्री. थोरात यांनी दिले.

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि पाणीप्रश्न सोडविण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा  आहे. या प्रकल्पाचे काम वेळेत  पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रकल्पासाठी  निधीची कमतरता नाही पण कामाला पाहिजे त्या प्रमाणात गती दिसत नाही यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करून त्याचे नियोजन करावे आणि संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून प्रकल्प पूर्ण करावा अशा सूचनाही श्री. थोरात यांनी दिल्या.

या प्रकल्पाच्या कामाचा पुन्हा आढावा घेण्यासाठी लवकरच प्रकल्पाची पाहणी करण्यात येईल,असे आश्वासनही श्री. थोरात यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले.

यावेळी संबंधित अधिकारी,शेतकरी ज्ञानेश्वर वर्षे,गंगाधर गमे,नानासाहेब शेळके,उत्तमराव घोरपडे,रवींद्र गागरे,संजय येलमे,दादासाहेब पवार उपस्थित होते.

मुंबई महानगरपालिकेमार्फत लवकरच स्वतंत्र वीजनिर्मिती सुरु होणार

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयातून होणार वीजनिर्मिती – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंजुरी

मुंबई दि12 :मध्य वैतरणा जलाशयातून मुंबई महानगरपालिकेचे स्वतंत्र वीजनिर्मिती केंद्र सुरु करण्यास आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली.

राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयात मुंबई महानगरपालिकेला आपले स्वतंत्र वीजनिर्मिती केंद्र सुरु करण्याची परवानगी देण्यात आली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयातून ही वीजनिर्मिती केली जाईल. याबाबतची तांत्रिक यंत्रणा कार्यान्वित होऊन त्याच्या निविदा लवकरच उपलब्ध होतील.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन

मुंबई,दि.12: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते,माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी श्री. पवार यांना’सिल्व्हर ओक’या निवासस्थानी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांना दीर्घायुरारोग्य चिंतले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे,आमदार अजित पवार,आमदार आदित्य ठाकरे,सौ.रश्मी ठाकरे,सदानंद सुळे आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

गणेशोत्सव काळात नागरिकांची गैरसोय टाळा -पालकमंत्री नितेश राणे

0
सिंधुदुर्गनगरी दि २१ (जिमाका):- सततच्या पावसामुळे शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे रस्त्यांची डागडूजी व दुरूस्तीची कामे २५ ऑगस्ट पर्यंत पूर्ण...

पालकमंत्री नितेश राणे यांनी साधला उपोषणकर्त्यांशी संवाद

0
NHM काम बंद आंदोलन मागे घेण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी दि. २१ (जिमाका) :-  नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. रुग्णांना सेवा देताना कोणत्याही प्रकारची...

मिशन शक्ती अंतर्गत पाळणा योजनेची राज्यात अंमलबजावणी – महिला व बालविकास मंत्री आदिती...

0
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात ३४५ ठिकाणी ही पाळणाघरे सुरू करण्यास मान्यता मुंबई दि २१ : केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य या उपक्रमामध्ये महिलांना नोकरीदरम्यान मुलांची...

महाराष्ट्र सदनात लवकरच स्वयंसहायता गटांचे दालन

0
नवी दिल्ली, दि.21 : राजधानी दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील स्वयं सहायता गटांच्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी एक स्वतंत्र दालन सुरू करण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश...

अमृत, नगरोत्थानच्या पायाभूत सुविधांच्या कामांची गती वाढवण्यासाठी महत्वाच्या सुधारणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलले...

0
मुंबई, दि २१ : केंद्राचे अमृत अभियान त्याचप्रमाणे नगरोत्थान महाभियानातील पायाभूत सुविधा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन नागरिकांना सुविधांचा लाभ जलद गतीने मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ...