सोमवार, ऑगस्ट 18, 2025
Home Blog Page 188

आपत्ती काळात यंत्रणांनी सतर्क रहावे – मुख्य सचिव सुजाता सौनिक

मुंबई, दि. 28 : आपत्ती काळात राज्य शासनामार्फत मदत व बचाव कार्य मोठ्या प्रमाणात करण्यात येते. आपत्तीमध्ये शासन व प्रशासन आपद्ग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण करणे गरजेचे आहे. संभाव्य आपत्तीचा धोका लक्षात घेता नागरी आणि आपत्ती व्यवस्थापनमध्ये काम करणाऱ्या यंत्रणांनी या काळात सतर्क राहण्याच्या सूचना मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिल्या.

मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली अतिवृष्टी, आपत्ती व व्यवस्थापन संदर्भात बैठक झाली. या बैठकीस मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अपर मुख्य सचिव सोनिया सेठी, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिम गुप्ता, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, आपत्ती व्यवस्थापन संचालक सतीशकुमार खडके आदी उपस्थित होते.

आवश्यक ठिकाणी सावधानतेची चिन्हे लावावीत

मुख्य सचिव सुजाता सौनिक म्हणाल्या, आपत्ती काळात कोणतीही जीवित हानी होणार नाही याची दक्षता आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेत काम करणाऱ्या यंत्रणांनी घ्यावी. यासाठी अपूर्ण कामे, रिटेनिंग वॉल्स, नाल्यांचे काठ आणि इतर धोका दायक ठिकाणांची नियमित तपासणी व पाहणी करावी. आवश्यक त्या ठिकाणी सावधानतेची चिन्हे लावावीत आणि नागरिकांना त्याबाबत माहिती द्यावी. आपत्ती काळात रेल्वे स्थानक, वाहतूक व्यवस्था, जलपुरवठा केंद्रे यासारख्या ठिकाणी धोकादायक स्थिती जाणवल्यास या सेवा तात्पुरत्या थांबविण्यात याव्यात.

यंत्रणांनी वस्तुनिष्ठ माहिती द्यावी

आपत्तीत काम करणाऱ्यांना आवश्यक साधनसामग्री दिली जावी. आपत्ती काळात घ्यावयाची दक्षता याबाबत नागरिकांना देण्यात येणाऱ्या सूचना एकाच ठिकाणाहून दिल्या जाव्यात. आपत्तीमध्ये दिल्या जात असलेल्या मदतीची माहिती समाजमाध्यमे, इलेक्ट्रॉनिक मीडिया, वृत्तपत्रे व अन्य माध्यमातून नागरिकांना दिली जावी. याबरोबरच आपत्तीमधील घटनांची वस्तुनिष्ठ माहिती देण्यात यावी. पाण्याचे नमुने घेऊन त्याची तपासणी करावी. संसर्गजन्य आजारांबाबत जनजागृती करावी. पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांचा संभाव्य धोका लक्षात घेता नागरी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांनी सजगता दाखवावी, असे निर्देशही मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी दिले.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

कुपोषण कमी करण्याचे निकष पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता देणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. 28 : एकात्मिक बालविकास सेवा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, पूर्व शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे यासाठी विविध निकषांवर अंगणवाडीचे गुणात्मक मूल्यमापन करण्यात येणार आहे. याचबरोबर गुणांकनानुसार प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

मंत्रालयात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेल्या प्रोत्साहन भत्ताच्या निकषांमध्ये सुधारणा करणेबाबत तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार वितरणाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सचिव डॉ. अनुपकुमार यादव, सह सचिव वी. रा. ठाकूर, एकात्मिक बाल विकास विभागाच्या उपायुक्त श्रीमती संगीता लोंढे, विभागाचे उपायुक्त राहुल मोरे, उपसचिव प्रसाद कुलकर्णी आदींसह अधिकारी उपस्थित होते.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार ग्रॅच्युइटी
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सेवा निवृत्ती नंतर किंवा मृत्यू झाल्यास कुटुंबियांना ग्रॅच्युइटी (एकरकमी आर्थिक सहाय्य) देण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री तटकरे यांनी दिले.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी एकत्रित केलेल्या कामाच्या निकषानुसार प्रोत्साहन भत्ता दिला देण्याकरिता अंगणवाडी केंद्राकरिता निकष ठरविण्यात येणार आहेत. अंगणवाडी केंद्राने 10 पैकी 7 निकष पूर्ण केल्यास 1400 रुपये, 6 निकष पूर्ण केल्यास 1600 रुपये, 9 निकष पूर्ण केल्यास 1800 रुपये व 10 निकष पूर्ण केल्यास 2000 याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे.

यामध्ये घरपोच आहार, वृद्धी संनियंत्रण क्षमता, तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचे पूर्व शालेय शिक्षण, गरम ताजा आहार, आहार आरोग्य दिवस, मुलांचे पोषण उपचार पुनर्वसन, स्थूल लठ्ठ बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे, खुजी बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे असे निकष ठरविण्यात आले आहेत.

000

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

सर्व विभागांच्या समन्वयातून ‘आषाढी वारी’ यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबई, दि. 28 : पंढरपुरची ‘आषाढी वारी’ पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. वारकरी आणि वारी राज्याचे वैभव वाढविणारी आहे. यावर्षी पावसाचे आगमन लवकर झाले असून या पार्श्वभूमीवर सर्व मानाच्या पालख्यांना आणि वारकऱ्यांसाठी पाणी, आरोग्य सुविधा, फिरती शौचालये आणि पोलीस बंदोबस्तासाठी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे. ही वारी यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे आषाढी एकादशी वारीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठकीत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. बैठकीला उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, माढ्याचे आमदार अभिजित पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांच्यासह वित्त, नियोजन, सार्वजनिक बांधकाम, नगरविकास, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, मानाच्या 10 दिंड्यांचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.

पुण्याच्या प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे वारीच्या तयारीची माहिती सादरीकरणातून दिली. त्यानंतर प्रमुख दिंडीचे प्रतिनिधी, विश्वस्त यांनी वारीसंबंधात सूचना, अडचणी मांडल्या.

पुणे शहराच्या ठिकाणी विविध स्वागत मंडप, लाऊड स्पीकरवर बंदी, प्रत्येक पालख्यांना जास्तीचा पोलीस बंदोबस्त, अरूंद रस्त्यांचे रूंदीकरण, वाखरी मॉडेल वारकरी तळ, पालखीसोबत साध्या ॲम्ब्युलन्ससोबत कार्डियाक ॲम्ब्युलन्स, दर्शन पासची संख्या, वॉटर प्रूफ टेंट, पाण्याचे टँकर, मुबलक औषध साठा, पालख्यांच्या पारंपरिक मार्गाचा विकास, फिरती शौचालये, याबाबत सूचना मांडण्यात आल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, वारीचे योग्य नियोजन करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आयुक्तांनी पालख्यांच्या स्वागतासाठी वेगळी व्यवस्था करावी. रस्त्याच्या बाजूला मंडप टाकून स्वागत करावे, मात्र पालख्यांना विलंब होवू नये, याची दक्षता घ्यावी. वारीच्या यशस्वी नियोजनासाठी आपत्ती व्यवस्थापनाने दक्ष राहावे.

विभागीय आयुक्तांनी समन्वयाने काम करावे

राज्यातील विविध भागातून पालख्या पंढरपूरला येतात. नाशिक, विदर्भ, मराठवाडा या ठिकाणाहून येणाऱ्या पालख्यांना पालखी मार्गात सोयीसुविधा देण्यासाठी नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागीय आयुक्तांनी समन्वयांनी बैठक घेऊन उपाययोजना कराव्यात. आपापल्या जिल्ह्यातून पालख्या जाताना स्थानिक प्रशासनाने रस्ते, पाणी, वीज, पोलीस बंदोबस्त, आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी तत्काळ बैठका घेऊन नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

पोलीस महासंचालक यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी योग्य समन्वय साधून पालख्यांच्या बंदोबस्ताची, वाहतूक, अपघात होणार नाहीत, यासंदर्भात दक्षता घ्यावी. सर्व मानाच्या पालख्यांना सेवा सुव्यवस्थित राहील याची व्यवस्था करावी. जिल्ह्याची हद्द संपल्यावर पोलीस बंदोबस्तासाठी पुढील जिल्ह्यातील पोलिसांनी अगोदरच हजर राहून कोणतीही पालखी, दिंडी पोलिसांविना राहणार नाही, याची दक्षता घ्यावी.

वाखरी : मॉडेल वारकरी तळ करणार

सर्व संतांच्या मानाच्या पालख्या वाखरीजवळ एकत्र येतात. राज्यभरातून शेकडो पालखी सोहळे पंढरीची वाट चालत असताना पालख्यांच्या स्वागतासाठी संत नामदेव महाराजांची पालखी वाखरी येथे येते. याठिकाणी पालख्यांच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी होते. सोलापूर जिल्हा प्रशासनाने गर्दी नियंत्रणात राहण्यासाठी योग्य नियोजन करून दक्षता घ्यावी. नामदेव महाराज यांचा ओट्याचा पुनर्विकास करावा. गर्दी लक्षात घेऊन वाखरीचे विशिष्ट मॉडेल वारकरी तळ होण्यासाठी आराखडा तयार करणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

यावर्षीही राहणार समूह विमा

पंढरपूर येथील वारीमध्ये दरवर्षी 15 ते 20 लाख वारकरी सहभागी होतात. पंढरपूर दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचे आजारपण, अपघात किंवा मृत्यू झाल्यास या संदर्भात संबंधितांना दिलासा देण्यासाठी शासनाने मागील वर्षी ‘विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना’ सुरु करण्याचा निर्णय घेतला. यावर्षीही वारीमध्ये सामील होणाऱ्या वारकऱ्यांना समूह विमा राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मानाच्या पालखीमधील वारकऱ्यांना यापुढे दर्शन पास योग्य प्रमाणात वाढवून दिले जातील, असेही त्यांनी सांगितले.

‘निर्मल वारी, हरित वारी’साठी काम वाढवून आराखडा करा

वारी कालावधीमध्ये ‘निर्मल वारी, हरित वारी’ हा उपक्रम अत्यंत महत्वाचा आहे. पालखी मार्गातील जिल्ह्यात प्रशासनाने निर्मल वारीचे अधिक काम होण्यासाठी प्रयत्नशील रहावे. शिवाय हरित वारीने निसर्ग पर्यावरणपूरक आहे. रस्त्याच्यी दुतर्फा देशी, सावली देणारी झाडे लावण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.

36 वॉटरप्रुफ मंडप

पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर राहणार असल्याचा अंदाज असल्याने वारकऱ्यांच्या निवाऱ्यासाठी पालखी मुक्काच्या ठिकाणी 36 वॉटरप्रुफ मंडपाची तयारी केली आहे. आवश्यकता भासल्यास आणखी वॉटरप्रुफ मंडप वाढविण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

वारीमध्ये प्रयागराजच्या धर्तीवर महिलांचाही विचार करण्यात आला असून हिरकणी कक्षासह महिलांना स्नानासाठी वेगळ्या स्नानगृहांची सोय उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वारकऱ्यांची गैरसोय टाळणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे   

सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याने विविध मानाच्या पालख्यांच्या सूचना लक्षात घेऊन वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता शासन घेणार आहे, असे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. शुद्ध पिण्याचे पाणी, वीज, वॉटर प्रुफ टेंट, जास्तीत जास्त आरोग्यसुविधा, फिरते शौचालये, पुरविण्यात येणार आहे. अॅम्ब्युलन्सबाबत कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता आरोग्य विभाग घेईल. महिलांच्या आरोग्याबाबतही विशेष काळजी घेण्यात आली असून वारकऱ्यांना अधिक बसेस, रेल्वे उपलब्ध होण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. रस्त्यावर चिखल होणार नाही, ते सुस्थितीत राहतील याची दखल घेण्यात येत असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

यावेळी वारकरी, पालख्यांसाठी विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीने केलेल्या सोयीसुविधांबाबतची माहिती सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर यांनी दिली.

विविध पालखी संस्थानच्या वतीने योगी निरंजननाथ, चैतन्य कबीर महाराज, जालिंदर मोरे, सोमनाथ घाटेकर, अक्षय महाराज भोसले, श्री. साधू यांनी सूचना मांडल्या.

०००००

धोंडिराम अर्जुन/ससं/

छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजना ऑक्टोबर अखेरपर्यंत कार्यान्वीत करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि 28 – छत्रपती संभाजीनगर शहराची पाणी पुरवठा योजना सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून ऑक्टोबर अखेरपर्यंत कार्यान्वीत करा. तसेच सर्व प्रलंबित कामे तातडीने मार्गी लागण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे छत्रपती संभाजीनगर पाणी पुरवठा योजनेसंदर्भात आढावा बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

पाणी पुरवठ्यासाठी जॅकवेल महत्वाचे असून त्याचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून पाणी उपसा सुरू करण्याच्या सूचना देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या योजनेतील २६ एम एल डी पाणी पुरवठा करणारा टप्पा जून अखेरपर्यंत पूर्ण करावा. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अपूर्ण कामे लवकर होण्याच्या दृष्टीने तातडीने मान्यता द्यावी. पाईप लाइन टाकण्याच्या कामासाठी महानगरपालिकेने १५ जूननंतर शटडाउन घ्यावा. ठेकेदारांनी ती कामे ऑगस्ट अखेरपर्यंत पूर्ण करावी. ‘आरओडब्लू’चे काम एक आठवड्यात मार्गी लावावे, ठेकेदाराने किमान 35 ईएसआर आणि जीएसआर पूर्ण करून द्याव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ठेकेदारांना काम करताना येणाऱ्या अडचणी महानगरपालिका आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून सोडवाव्यात आणि ठेकेदारांनीही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाचे नियोजन करावे. या योजनेतील पाणी पुरवठ्याच्या टाक्या तातडीने कार्यान्वीत करण्यासाठी नियोजन करावे. ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यंत पाणी टाक्यांची कामे पूर्ण करावीत. यामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महानगरपालिकेनी समन्वयाने काम करावे. कामामध्ये खंड पडू नये यासाठी महानगरपालिकेला ८२२ कोटी रुपयांचा कर्ज निधी उभारण्याची मंजुरी तातडीने द्यावी. तसेच याच्या व्याजामध्ये असलेला जास्तीचा दर फरक शासन स्तरावरून भरून द्यावा. पाणी पुरवठ्याचे हायड्रॉलिक टॅप कार्यान्वित करावे आणि त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदारावर असावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ठेकेदाराने वेळेत काम पूर्ण न केल्यास त्याला काळ्या यादीत टाकण्यात येईल. पोलिस, महानगरपालिका आणि जीवन प्राधिकरण यांनी समन्वयाने काम करून ही योजना वेळेत पूर्ण करावी. पाणी पुरवठा करणाऱ्या टाक्यांची कामे तातडीने पूर्ण करावे.

यावेळी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजी नगरचे पालकमंत्री संजय शिरसाट, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे,    यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

00000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ

धारावीचा पुनर्विकास पर्यावरणपूरक आणि एकात्मिक पद्धतीने करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई,दि.28 : धारावी हे देशातील वैशिष्टपूर्ण उद्योग समूहांचे विस्तीर्ण क्षेत्र आणि महत्वाचे आर्थिक केंद्र आहे. त्यादृष्टीने धारावीच्या मूळ संकल्पनेचे जतन करत पर्यावरणपूरक आणि एकात्मिक पद्धतीने विकास करावा, स्थानिक कारागिरांच्या, व्यावसायिकांच्या पुनर्वसनाला धारावी पुनर्विकास प्रकल्पात सर्वोच्च प्राधान्य देऊनच प्रकल्प राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे धारावी पुनर्विकास प्रकल्प आढावा बैठक मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या  अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी, यंत्रणाप्रमुख उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, धारावीचा पुर्नविकास पर्यावरणपूरक आणि एकात्मिक पद्धतीने करावयाचा असून धारावीतील व्यावसायिक उलाढाल सर्वात महत्त्वाचा भाग आहे. त्याला प्राथिमकता देत या ठिकाणच्या गुणवंत कारागिरांना, त्यांच्या कौशल्य आधारित विविध व्यवसायांच्या पुनर्वसनास सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे. येथील मूळ रहिवासी असलेल्या प्रत्येकाला घर द्यायचे आहे. धारावीमधील प्रत्येकाला पुनर्वसन प्रकल्पात न्याय मिळाला पाहिजे, येथील प्रत्येकजण या पुनर्विकास प्रकल्पासाठी पात्र असणार आहे, त्याचे निकष वेगवेगळे असतील, मात्र धारावीतील प्रत्येकाला पुनर्वसनाचा लाभ मिळाला पाहिजे, याची खबरादारी घेण्यात यावी. ठरल्याप्रमाणे नियमानुसार पात्र लाभार्थ्यांना विकासप्रकल्पात देय असलेली जागा देण्यात यावी. धारावीची मूलभूत व्यावसायिक ओळख जपून, मूळ वैशिष्ट्यांना सुरक्षित ठेऊन धारावी विकास प्रकल्पाची संकल्पना राबवावी. यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक तो समन्वय ठेवावा. स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन लोकभावना जपून समन्वयपूर्वक विकासाची कामे करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दिले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सर्व संबंधित विभागांनी विकास प्रकल्पासाठी आवश्यक ती मान्यता, पुढील कार्यवाही तत्परतेने  करण्याचे निर्देश दिले.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली.

बैठकीस महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, उपमुख्यमंत्री (नगरविकास) कार्यालयाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नवीन सोना, महानगर आयुक्त (एमएमआरडीए) संजय मुखर्जी, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्यासह संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

००००

वंदना थोरात/विसंअ/

कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केली सिन्नर बसस्थानकाची पाहणी

नाशिक, दि. , 28 मे 2025 (जिमाका वृत्तसेवा):*  सिन्नर शहरात 25 मे रोजी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सिन्नर बसस्थानकाच्या गॅलरीचा स्लॅब कोसळून स्थानकावर उभ्या असलेल्या शिवशाही बसचे नुकसान झाले होते. आज कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सिन्नर बस स्थानकास भेट देऊन पाहणी केली.
यावेळी समवेत मुंबईचे महाव्यवस्थापक स्थापत्य दिनेश महाजन, विभाग नियंत्रक  श्रावण सोनवणे, विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले, कल्याणी ढगे, आगर व्यवस्थापक हेमंत नेरकर, विभागीय स्थापत्य अधिकारी  चैताली भुसारे, स्थानक प्रमुख सुरेश पवार आदी उपस्थित होते.
बसस्थानकाच्या नुकसान झालेल्या भागाचे नवीन बांधकाम करण्यासाठी तातडीने अंदाजपत्रक सादर करावे. तसेच बस स्थानकाच्या छतावर पावसाचे पाणी साठणार नाही यादृष्टीने पाण्याचा निचरा होण्यासाठी जास्तीत जास्त आउटलेटचा अंदाजपत्रकात समावेश करावा, अशा सूचना कृषिमंत्री ॲड. कोकाटे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

जिल्हा वार्षिक योजनेच्या २०२४-२५ च्या खर्चास मान्यता

हिंगोली (जिमाका), दि. 28 :  जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 2024-25 च्या खर्चास पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज मान्यता दिली. तसेच जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 2025-26 साठीच्या 311 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून, 30 जानेवारी 2025 च्या बैठकीतील इतिवृताच्या अनुपालनासही मान्यता देण्यात आल्याचे पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्यप्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीला खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार तानाजीराव मुटकुळे, आमदार राजुभैय्या उर्फ चंद्रकांत नवघरे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा नियोजन अधिकारी गं. गो. चितळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. जी. पोत्रे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त यादव गायकवाड, आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी सुनिल बारसे यांच्यासह सर्व कार्यान्वयीन यंत्रणेच्या प्रमुखांची उपस्थिती होती.

जिल्ह्याच्या विकासात सर्वसामान्य केंद्रीत योजनांना महत्त्वाचे स्थान देण्यात येणार असून, शिक्षण, आरोग्य, वीज, पर्यटन, कृषि, सिंचन यासह विविध क्षेत्रांचा विकास करण्यासाठी प्राधान्य देण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी दिले. जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्य सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात येईल. जिल्ह्यातील अंगणवाड्यांचे बांधकाम करताना प्राथमिकता ठरवून ते टप्प्याटप्प्याने सुरु करावे. जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघातील विकास कामे करताना लोकप्रतिनिधींच्या सूचनांचीही अंमलबजावणी करावी. अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान अनुदानाची रक्कम ईकेवायसी न झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया वेगाने पार पाडण्याचे निर्देशही पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले. वळवाच्या पावसामुळे जिल्ह्यातील घरकुल आणि हळद, केळी आणि भुईमूग पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोबतच वीज पडून झालेली जीवित व वित्तहानी झाली आहे. कृषि व महसूल विभागाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

लोकप्रतिनिधींनी सूचविलेल्या श्री दक्षिण मुखी हनुमान मंदिर बळसोंड, श्री जगदंबा देवी मंदिर देवस्थान दरेगाव तसेच इतर तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळांचे श्रेणीवर्धन करण्यासाठीचे प्रस्ताव व कार्यवाही करण्याच्या त्यांनी सूचना केल्या. जिल्ह्यातील अपघातप्रवण रस्त्यांची तपासणी करून त्यांना ब्लॅकस्पॉट घोषित करण्याची कार्यवाही आरटीओंनी पूर्ण करावी. जलसंधारण विभागाने जिल्ह्यातील सर्व तलावांची पाहणी व सर्वे करून त्याबाबतचा अहवाल सादर करावा. चिरागशहा, नागेशवाडी, गवळेवाडी, सारंगवाडी तलावांच्या दुरुस्ती, डागडुजीची कामे तात्काळ सुरु करून पावसाळ्यात होणारी जीवित किंवा वित्तहानी होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या. तसेच आवश्यक तिथे वनविभागाने त्यांच्या कार्यक्षेत्रात नियमानुसार छोटे पाझर तलाव बांधणी करून पावसाचे पाणी अडविण्यासाठी कामे हाती घ्यावीत,असेही पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, जिल्ह्यातील विविध गावांमध्ये आदर्श शाळा विकसित करा. तेथील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे शालेय, क्रीडा साहित्य, पाठ्यपुस्तके खरेदी करा. तसेच शाळा, वाड्या तपासून घ्या. या निधीतून चांगली  क्रीडांगणे तयार करून भावी खेळाडू घडवण्यावर भर देण्याच्या सूचना केल्या. डोंगरी विकास योजनेतून डोंगरी भागातील अंगणवाड्यांचे बांधकाम करण्याचे निर्देश दिले.

शाळा आणि शहरातील विविध भागात सीसीटीव्ही बसवावेत. पावसाळ्यापूर्वी ग्रामीण रस्त्याची कामे पूर्ण करावीत. आरोग्य विभागामार्फत सामान्य नागरिकांला आरोग्य सेवा मिळण्यासाठी आरोग्य विभागाने सर्व पायाभूत सोयीसुविधा निर्माण कराव्यात. यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन दिला जाईल,असे पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी सांगितले.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आरोग्य विभाग, महावितरण विभाग, शालेय शिक्षण विभाग, जलसंधारण, तीर्थस्थळ, पर्यटन स्थळ यासाठी उपलब्ध निधीचे योग्य नियोजन करुन सदर निधी लोककल्याणकारी योजना राबविण्यासाठी वेळेत खर्च करावा. तसेच सन 2024-25 आराखड्यातील 277 कोटींची तरतूद प्राप्त झाली होती. त्याचे सर्व विभागांना वितरण करण्यात आले व विविध कामांवर सर्व 272 कोटी खर्च करण्यात आला. सर्व संबंधित विभागांनी सन 2025-26 अंतर्गत 311 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, अनुसूचित उपयोजनेत 54 कोटी तर आदिवासी उपयोजनेत 24 कोटी 74 लाख 89 हजार नियतव्यय मंजूर आहे. या सर्व निधीसाठीचे प्रस्ताव वेळेत तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी यावेळी संबंधितांना दिले.

यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी विभागनिहाय आढावा घेताना मृदा व जलसंधारण, वन विभाग, कृषि, पर्यटन, क्रीडा विभाग, जिल्हा ग्रंथालय, सार्वजनिक आरोग्य विभाग, कौशल्य विकास विभाग, आदिवासी विकास विभाग, महावितरण, पोलीस प्रशासन, पाणीपुरवठा विभाग यासह सर्व विभागांचा आढावा घेतला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी तसेच पशुसंवर्धन विभागासाठी औषध खरेदी करण्याबाबत निर्देश देण्यात आले. तसेच नाविन्यपूर्ण योजनांमध्ये करण्यात येणाऱ्या कामांचाही आढावा घेतला. तसेच यावेळी जिल्हा अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनेच्या खर्चाचाही आढावा घेण्यात आला.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी दिलेल्या सूचना व मागण्यांच्या अनुषंगाने सर्व संबंधित शासकीय यंत्रणेने तात्काळ कार्यवाही करावी, असे निर्देशही पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी दिले.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सादरीकरणाद्वारे जिल्हा विकास आराखड्यानुसार कृषि, सिंचन, फळबाग लागवड, हळद लागवड, उद्योग व स्वयंरोजगार, पर्यटन यासह विविध विषयावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती दिली.

            गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात पडत असलेल्या वळवाच्या पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये. पुरेसा पाऊस पडल्याशिवाय पेरणी करु नये. बोगस खते व बियाण्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी व जिल्हा प्रशासनाने नियंत्रण पथकामार्फत बारकाईने लक्ष ठेवावेत. दैनंदिन पर्जन्यमानाविषयीची माहिती नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचवावी. पावसाळ्यात आरोग्य यंत्रणेने मुख्यालयी राहून तात्काळ आरोग्य सेवा पुरवाव्यात. महसूल विभागाने विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे वेळेत उपलब्ध करुन द्यावेत. शेतकऱ्यांना बँकांनी वेळेत  आणि सहज व सुलभ पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावेत, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी बैठकीत दिल्या.

मौजे दिघी कोळीवाडा येथील मच्छिमार जेट्टीचे बांधकाम गुणवत्तेसह कालमर्यादेत पूर्ण करा – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. 28 : रायगड, मौजे दिघी कोळीवाडा येथील मच्छिमार जेट्टीचे बांधकाम उत्तम दर्जाचे आणि कालबद्ध पद्धतीत पूर्ण करावे. मासळी उतरविण्याच्या ठिकाणी मच्छिमारांना मुलभूत सुविधा पुरविण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

श्रीवर्धन येथील मच्छिमार जेट्टीच्या बांधकाम कामाच्या आढावा संदर्भात आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले हेाते. यावेळी मंत्री तटकरे बोलत होत्या. यावेळी खासदार सुनिल तटकरे यांच्यासह मौजे दिघी कोळीवाडा, मुळगाव, भरडकोल, जीवनेश्वर येथील कोळीबांधव  उपस्थित होते.

मंत्री तटकरे म्हणाल्या की, या बांधकामामध्ये त्रुटी आढळून आल्याचे निदर्शनास आले असून, त्यावर तत्काळ कार्यवाही करावी. नव्याने बांधकाम करावे अथवा डागडुजी करावी. उर्वरित काम चांगल्या गुणवत्तेचे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावे. त्याचप्रमाणे प्रलंबित डिझेल परतावा लवकरात लवकर मिळावा अशा सुचना दिल्या. तसेच, जेट्टीअंतर्गत आईस फॅक्ट्री, कोल्ड स्टोरेज, पंपटाकी, उर्वरित जागेचा योग्य वापर करण्याची तरतुदीसह मच्छीमारांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे त्यांनी सांगितले.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

इजिप्त सोबत सौहार्दाचे संबंध वाढविण्यास महाराष्ट्र उत्सुक – राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. २८ : इजिप्त सोबत महाराष्ट्राचे अनेक दशकांपासूनचे सौहार्दाचे संबंध असून महाराष्ट्र हे संबंध वृद्धिंगत करण्यास उत्सुक असल्याचे प्रतिपादन राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

इजिप्तच्या महावाणिज्यदूत दाहिला तावाकोल यांनी राजशिष्टाचार मंत्री श्री. रावल यांची भेट घेतली. पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यावेळी उपस्थित होते.

राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल म्हणाले, महाराष्ट्र हे भारताचे शक्ती केंद्र असून भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था होण्यामध्ये महाराष्ट्राचा मोठा सहभाग आहे. राज्यात कृषी उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. त्याअनुषंगाने येथे अन्न प्रक्रिया उद्योगांना मोठी संधी आहे. इजिप्तमधील उद्योजकांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी पुढे आल्यास त्यांचे येथे स्वागत होईल. राज्यात पर्यटकांना आकर्षित करणारी सर्व प्रकारची पर्यटन स्थळे असून पर्यटक सुरक्षित पर्यटनाला अधिक महत्त्व देत असल्याने महाराष्ट्राला अधिक पसंती मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

इजिप्तच्या महावाणिज्यदूत दाहिला तावाकोल यांनी इजिप्तविषयी माहिती देऊन महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात चांगली कामगिरी करीत असल्याबद्दल महाराष्ट्राचे कौतुक केले. इजिप्त आणि महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या आणि व्यापाराच्या संधींचा अभ्यास करण्यासाठी इजिप्तचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ राज्यात येऊ इच्छित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

००००

बी.सी.झंवर/विसंअ/

‘भाषिणी’ उपयोजकासाठी भाषिक डेटा संकलनाची गरज – सचिव किरण कुलकर्णी

मुंबई, दि. 28 :- भाषिणी उपयोजक (भाषिणी अ‍ॅप्लिकेशन) अधिकाधिक प्रगत, सक्षम आणि उपयोगी व्हावे यासाठी भाषिक डेटाचे व्यापक स्तरावर संकलन करणे अत्यावश्यक आहे. या डाटा संकलनासाठी सर्व विभागांनी सामुहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांनी सांगितले.

मराठी भाषा विभाग आणि केंद्र सरकारच्या भाषिणी टीम यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयात ‘भाषिणी’ उपयोजकांच्या वापराच्या अनुषंगाने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सह सचिव डॉ. नामदेव भोसले, डिजिटल इंडिया भाषिणी विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ नाग, प्रा. मितेश खापरा,  मराठी भाषा विभागातील तसेच मंत्रालयातील इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सचिव श्री. कुलकर्णी म्हणाले, मराठी भाषेचा प्रचार-प्रसार आणि मराठी भाषेचे व्यापक स्तरावर सुलभीकरण करणे यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. भाषिणी उपयोजकासाठी आवश्यक असलेला डाटा संकलित करण्यासाठी सर्व मंत्रालयीन विभागांनी त्यांच्या कामकाजामध्ये वापरले जाणारे शब्द व संज्ञा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी एक व्यापक मोहीम राबविणे आवश्यक असून, राज्यातील विविध प्रशासकीय कार्यालयांमध्ये नियुक्त केलेल्या मराठी भाषा अधिकाऱ्यांचे देखील या कामासाठी सहकार्य घेता येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

भारत सरकारने भाषिणी उपयोजक (भाषिणी अॅप्लीकेशन) हा एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. भाषिणी अॅप्लीकेशन हे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि नैसर्गिक भाषा प्रक्रियेवर (एनएलपी) आधारित प्लॅटफॉर्म आहे, जे ए.आय. आणि एन.एल. पी. चा वापर करून भारतीय भाषा डिजिटल आणि तांत्रिक सेवांमध्ये अधिक प्रवेशयोग्य बनवण्याचा प्रयत्न करते. तसेच भारतीय अधिकृत भाषांमध्ये सेवा देते. डिजिटल सेवा भारतीय भाषांमध्ये सहज उपलब्ध करून देणे. भारतातील विविध भाषांमध्ये भाषांतर आणि संवाद साधने सुलभ करणे हा यामागचा हेतू आहे.

या कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून असलेले श्री. नाग आणि श्री. खापरा यांचे भाषिणी उत्पादने आणि त्यांचा वापर व डेटासेटची भूमिका आणि अधिक सुधारित भाषिक एआय मॉडेल विकसित करण्यासाठी प्रादेशिक योगदानाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन झाले. यावेळी श्री. नाग यांनी मराठी भाषा विभागामार्फत हॅकॅथॉन स्पर्धा राबविण्यात येईल असे सांगितले.

या कार्यशाळेत महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेकडून करण्यात आलेल्या कामाची दृकश्राव्य चित्रफीत दाखवण्यात आली.

०००

शैलजा पाटील/विसंअ

ताज्या बातम्या

जनसंवादद्वारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या

0
नागपूर दि. १७: महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जनसंवाद कार्यक्रमात वृद्ध, महिला, विद्यार्थी, दिव्यांग, तृतीय पंथी अशा समाजाच्या सर्व थरातील जनतेच्या...

प्रस्ताव सादर करा, खंडपीठही लवकरच करू – सरन्यायाधीश भूषण गवई

0
शाहू महाराजांप्रमाणे समानतेच्या न्यायदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन सर्किट बेंचच्या शुभारंभाला कोल्हापूरने अनुभवला सरन्यायाधीशांचा कृतज्ञता सोहळा कोल्हापूर, दि. १७: राज्याच्या सीमेवरील दुर्गम भागातील सर्वसामान्य...

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

0
जळगाव दि. १७ (जिमाका):  जळगाव- छत्रपती संभाजीनगर रोडवरील चिंचोली शिवारात 66.27 एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेल्या भव्य मेडिकल हबची पाहणी आज उपमुख्यमंत्री अजित पवार...

येत्या बजेटमध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
जळगाव जिल्ह्यातील उद्योगांनाही मराठवाडा, विदर्भासारख्या सवलती देणार तीन दिवसातील अतिवृष्टीच्या पंचनाम्याचे आदेश जळगाव दि. १७ (जिमाका वृत्तसेवा): आपण प्रत्येक जिल्ह्यात गेल्यानंतर त्या जिल्ह्यात जिल्हा...

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन

0
कोल्हापूर, दि. १७ (जिमाका): सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन व कोनशिला अनावरण करण्यात आले. या ऐतिहासिक...