सोमवार, ऑगस्ट 18, 2025
Home Blog Page 187

मुंबई शहरातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील ठिकाणांवरील बांधकामाबाबत दोषींवर कारवाई करावी – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. 28 : मुंबई शहरातील काही विभागात पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील ठिकाणी बांधकामांसाठी दोषींवर कारवाई करण्यात यावी. यासाठी विधी व न्याय विभागाचे साहाय्य घेतले जावे, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.

विधानपरिषदेतील तारांकित प्रश्नाबाबत मंत्रालयात झालेल्या बैठकीस आमदार प्रवीण दरेकर, सहसचिव संजय बनकर, विशेष तपास पथकाचे पोलीस उपायुक्त श्याम घुगे यासह विधी व न्याय विभाग, महसूल विभाग चे अधिकारी उपस्थित होते, तसेच भूमी अभिलेख विभागाचे संचालक दिवसे, मुंबई महानगरपालिकेच्या विभागीय अधिकारी मनीषा कापसे हे दूरदृश्य प्रणाली द्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

मुंबई महानगरपालिका हद्दीतील विभागांमध्ये पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील जागांचे वापराकरिता बनावट नकाशे  बनविण्याचे आढळले या प्रकरणातील दोषी व्यक्तींवर विशेष तपास पथकामार्फत कारवाई केली जात आहे.

या जागांवर बनावट नकाशा आधारे झालेल्या बांधकामांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. या जागांवरील बांधकामे तोडून सदर प्लॉट मोकळे करण्यात येत आहेत. याबरोबरच दोषपूर्ण आढळलेल्या नकाशे आधारित मालमत्तांबाबत न्यायवैद्यक विभागाकडून बनावट नकाशांची तपासणी करणे, दोषपूर्ण प्रकरणात नोटिसा बजावणे, दोषींना अटक करणे, आदि कायदेशीर कारवाई केली जात आहे.

बैठकीमध्ये मुंबई पोलीस आयुक्तालयाचे उपयुक्त श्री घुगे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विभागीय अधिकारी श्रीमती कापसे यासह उपस्थित अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

मुंबईतील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील ठिकाणांवरील 102 बनावट नकाशे बाबत विधानपरिषदेत तारांकित प्रश्न 152 द्वारे माहिती विचारण्यात आली होती.

सन 2007 -08 मध्ये सदर भूमी अभिलेख विभागातील काहीच्या सहभागाने बनावट नकाशे तयार करण्यात आले होते. मागील काळात न्यायालयातील कायदेशीर प्रक्रियेत काही जागांवरील नकाशांबाबत स्थगिती मिळविण्यात आली होती. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य शासन विधी व न्याय विभागाचे सहकार्य घेण्यात येणार आहे.

बैठकीस मार्गदर्शन करताना, सदर कारवाई दरम्यान सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये परंतु कोणतीही दोषी व्यक्तिना सोडू नये, अशा सूचना देखील महसूल मंत्री श्री बावनकुळे यांनी यावेळी दिल्या.

00000

किरण वाघ/विसंअ/

घोषित झोपडपट्टी खालील जमीन क्षेत्राचे अभिहस्तांतरण मूल्यांकन शुल्क बाबत सविस्तर प्रस्ताव सादर करा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. 28 : मीरा-भाईंदर महानगरपालिकेतील घोषित झोपडपट्टी खालील जमीन क्षेत्राचे अभिहस्तांतरण करण्यासाठी शासनाचे मूल्यांकन शुल्क मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर घेण्यासाठीचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्यात यावा असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

मंत्रालयात महसूल विभागातील विविध विषयाबाबत झालेल्या बैठकींमध्ये आमदार नरेंद्र मेहता, सहसचिव सत्यनारायण बजाज, नोंदणी व मुद्रांक, भूमि अभिलेख, महसूल विभागातील विविध अधिकारी उपस्थित होते. तसेच ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मीरा भाईंदर महानगरपालिकाचे आयुक्त राधाबिनोद शर्मा दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेतील झोपडपट्टी खालील जमीन क्षेत्राचे अभिहस्तांतरण करण्यासाठी मूल्यांकन शुल्क मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर घेण्याबाबत मागणी करण्यात आली आहे. याबाबत सहनिबंधक यांनी जिल्हाधिकारी ठाणे, महानगरपालिका आयुक्त मीरा- भाईंदर व नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक यांच्या मार्फत सविस्तर प्रस्ताव शासनास पाठवावा.

000

किरण वाघ/विसंअ/

सिने अँड आर्टिस्ट्स असोसिएशनने मांडलेल्या मुद्यांबाबत कामगार विभाग सकारात्मक – कामगार मंत्री आकाश फुंडकर

मुंबई दि. 28 :-  सिने अँड आर्टिस्ट्स असोसिएशन मुंबईच्या शिष्टमंडळाने कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या मांडल्या. यावेळी कामगार मंत्री श्री. फुंडकर म्हणाले सिने अँड आर्टिस्ट्स असोसिएशनने मांडलेल्या मुद्यांचा सकारात्मक विचार करून या संदर्भात एक समिती स्थापन केली जाईल. या समितीमध्ये फिल्म सिटी मधील सर्व संबंधितांचा समावेश केला जाईल.

मानधनावर काम करणाऱ्या सिने कलाकारांना वेळेत मानधन मिळावे, कामाचे तास आणि कन्व्हेन्शन अलाउन्स या संदर्भात सिने अँड आर्टिस्ट्स असोसिएशनने कामगार मंत्री श्री. फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुद्दे मांडले.

या बैठकीस कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त श्री. तुम्मोड, उप सचिव श्री. कापडणीस यांच्यासह पूनम ढिल्लो, पद्मिनी कोल्हापुरे, कनवजीत पेंटल, दीपक पराशर, हेतल परमार आदी उपस्थित होते.

००००

एकनाथ पोवार/विसंअ

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर, दि. 28 : अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर तालुक्यातील तीन मंडळाच्या 45 गावांमध्ये शेतपीक, फळपीक, बंधारे, रस्ते, घरे, पुलांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पशुधनाचीही हानी झाली आहे. आपत्तीच्या काळात शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून नुकसानीच्या मदतीपासून एकही नागरिक वंचित राहणार नाही, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

अहिल्यानगर तालुक्यातील अकोळनेर, खडकी व वाळकी गावात झालेल्या नुकसानीची जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत उपस्थित शेतकरी व नागरिकांशी संवाद साधत झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.

यावेळी आमदार शिवाजी कर्डीले, आमदार काशिनाथ दाते, माजी आमदार बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सागर चौधरी, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंभारे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अकोळनेर गावातील वालुंबा नदी परिसरात झालेल्या नुकसानीची पाहणी करत झालेल्या नुकसानीची ग्रामस्थांकडून माहिती घेतली.

खडकी गावामध्ये ऋषिकेश निकम यांच्या शेतामधील मोसंबीसह इतर पिकाची, शकुंतला तात्याराम कोठुळे यांच्या नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून त्यांच्याशी संवाद साधत झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. तसेच पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या सयाजी कोठुळे यांच्या कुटुंबातील सदस्यांसमवेत संवाद साधून कुटुंबियांना धीर देत घाबरू नका, शासन तुमच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाहीही पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी यावेळी दिली.

वाळकी येथे गावठाणातील पूल परिसरातील तसेच जुंदरे मळा परिसरातील नुकसानीची पाहणी करून ग्रामस्थांकडून  झालेल्या नुकसानीची माहितीही त्यांनी घेतली.

वाळकी येथे अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

नुकसानीच्या पाहणीनंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळकी येथे अधिकाऱ्यांकडून आढावा घेतांना म्हणाले, मागील ५० ते ६० वर्षानंतर एकाच दिवसात १०० मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झाल्याने नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा संकटाच्या काळात नागरिकांना आधार देण्याची गरज आहे. नुकसानग्रस्त गावातील पंचनामे तातडीने होण्यासाठी जिल्ह्याच्या  इतर तालुक्यातील मनुष्यबळ याकामी उपयोगात आणावे. ज्या गावामध्ये पावसाच्या पाण्यामुळे रस्ते खराब झाले असतील त्या रस्त्यांची तसेच बंधाऱ्यांची तातडीने दुरुस्ती करावी. गावांतील विद्युत प्रवाह सुरळीत होणे अत्यंत आवश्यक आहे.  ज्या ठिकाणी रोहित्र बदलण्याची आवश्यकता असेल त्याठिकाणी ती तातडीने बदलून  विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी विद्युत विभागाने तातडीने उपाययोजना राबविण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री.विखे पाटील यांनी दिल्या.

पशुधनासाठीच्या चाऱ्याचेही नुकसान झाल्याने इतर तालुक्यात उत्पादित केलेल्या चाऱ्याची वाहतूक करत नागरिकांच्या मागणीनुसार चारा उपलब्ध करून देण्यात यावा. पावसाच्या पाण्यामुळे ज्या नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले असेल अशा कुटुंबांच्या निवाऱ्याची तात्पुरती व्यवस्था जिल्हा परिषदांच्या शाळेमध्ये करण्यात यावी. त्याठिकाणी अन्न, पाणी, वीज व पुरेश्या प्रमाणात औषधी उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

ज्या गावांतील ओढे, नदीचा प्रवाह अतिक्रमणामुळे बदलला असेल त्या ठिकाणची अतिक्रमणे तातडीने काढण्यात यावीत. भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी नागरिकांनी ही अतिक्रमणे काढण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री.विखे पाटील यांनी केले.

***

श्रीक्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखड्यासाठी नियोजन विभागाकडून १ हजार ८६५ कोटी खर्चास प्रशासकीय मान्यता

मुंबई, दि. 28 :- तुळजापूर येथील श्रीक्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकासासाठी १ हजार ८६५ कोटी रुपयांच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता दिली असून त्या संदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. या आराखड्याच्या संनियंत्रण व अंमलबजावणीची जबाबदारी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात सातत्याने यासंबंधीच्या बैठका घेऊन पाठपुरावा केला होता.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून श्रीतुळजाभवानी देवीला महत्त्व आहे. देवीच्या साडेतीन शक्तीपिठांपैकी आदिशक्तीचे मूळ स्थान तुळजापूर येथे आहे. देवीच्या दर्शनासाठी वर्षभर भाविक मोठ्या संख्येने येत असतात. नवरात्रीच्या काळात मंदिरात मोठा उत्सव, भक्तांची गर्दी असते. ऐतिहासिक, आध्यात्मिक, सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या तुळजाभवानी देवस्थानच्या विकासाच्या दृष्टीने आजचा हा शासन निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. वित्तमंत्री श्री. पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पीय भाषणात नमूद केलेल्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाची महत्त्वाची स्थळे, तीर्थक्षेत्र परिसर विकास आराखडे यांची व्याप्ती आणि स्वरूप लक्षात घेऊन, संबंधित आराखडे नियोजन विभागामार्फत राबवण्यात येतात.

स्थानिक पातळीवरील सर्व संबंधितांशी चर्चा करून श्रीक्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखडा व लागणारा निधी याचा आराखडा धाराशिवचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने तयार केला आणि मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीच्या माध्यमातून ६ मे २०२५ रोजी चौंडी येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यास मान्यता घेण्यात आली. त्यानंतर दोन आठवड्यातच या आराखड्यास प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय नियोजन विभागाने जारी केला आहे. या शासन निर्णयानुसार विकास आराखड्यातील कामे करताना ऐतिहासिक वास्तूंची मूळ शैली जपण्याचे तसेच पुरातत्वीय जाण असलेल्या संस्थांकडून ही कामे करून घ्यावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत. नियोजन विभागाने तत्परतेने जारी केलेल्या या शासन निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे देवीभक्तांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

 

शासन निर्णय – tuljabhavani

अष्टविनायक विकास आराखड्यासाठी १४८ कोटी खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता

मुंबई, दि. 28 :- उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने 147 कोटी 81 लाख रुपये खर्चाच्या ‘अष्टविनायक गणपती मंदिरांचा जीर्णोद्धार  व विकास आराखड्या’स सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून त्यासंबंधीचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. अष्टविनायक विकास आराखड्यामुळे अष्टविनायक मंदिरांचा जीर्णोद्धार तसेच परिसराचा विकास होणार असून देवस्थानांना भेट देणाऱ्या भाविकांना, पर्यटकांना पायाभूत, नागरी सुविधा उपलब्ध होणार आहेत. अष्टविनायक क्षेत्रांच्या विकासामुळे राज्यातील आध्यात्मिक पर्यटनाला गती  मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

अष्टविनायक मंदिरे जीर्णोद्धार व विकास आराखड्यास गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्याने प्रयत्नशील होते. यासंदर्भात मंत्रालयात सातत्याने संबंधीतांच्या बैठका घेऊन त्यांनी अष्टविनायक मंदिर जीर्णोद्धार आणि विकासाच्या कामांना गती देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे यासंबधीच्या प्रस्तावाला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या माध्यमातून 6 मे 2025 रोजीच्या चौंडी येथील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता घेण्यात आली. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर दोन आठवड्यातंच 147 कोटी 81 लाख खर्चाचा सुधारित प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय आज जारी झाला. त्याबद्दल अष्टविनायक भक्तांकडून, स्थानिक नागरिकांकडून अजित पवार यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

वित्तमंत्री श्री. पवार यांच्या यंदाच्या अर्थसंकल्पीय भाषणात नमूद केलेली राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाची महत्वाची स्थळे, तीर्थक्षेत्रे परिसर विकास आराखडे यांची व्याप्ती आणि स्वरुप लक्षात घेऊन, संबंधित आराखडे नियोजन विभागामार्फत राबविण्यात येतात. स्थानिक पातळीवरील संबंधित आणि तज्ज्ञांशी चर्चा करुन चौंडी स्मृतीस्थळ जतन व विकास व त्यास लागणाऱ्या निधीचा आराखडा तयार करण्यात येतो. त्यानुसार 2021-22 मध्ये 92 कोटी 19 लाखांचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानंतर 2024 मध्ये  147 कोटी 81 लाखांचा सुधारित प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यास आज सुधारीत प्रशासकीय मान्यता  देण्यात आली.

सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार, पुणे जिल्ह्यातील मोरगावच्या श्रीमयुरेश्वर मंदिरासाठी 8 कोटी 21 लाख, थेऊरच्या श्रीचिंतामणी मंदिरासाठी  7 कोटी 21 लाख,  ओझरच्या श्रीविघ्नेश्वर मंदिरासाठी  7 कोटी 84 लाख, रांजणगावच्या श्रीमहागणपती मंदिरासाठी 12 कोटी 14 लाख रुपयांच्या खर्चास सुधारीत मान्यता देण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील महडच्या श्रीवरदविनायक मंदिरासाठी 28 कोटी 24 लाख, पालीच्या श्रीबल्लाळेश्वर मंदिरासाठी 26 कोटी 90 लाख रुपये खर्चास सुधारित मान्यता मिळाली आहे. अहिल्यानगरच्या  श्रीसिद्धटेक मंदिरासाठी 9 कोटी 97 लाख रुपयांच्या खर्चास सुधारित मान्यता देण्यात आली आहे. यासाठी एकूण  शंभर कोटी 53 लाख रुपये खर्च करण्यात येणार असून विद्युतीकरण, रोषणाई, वास्तूविशारद, जीएसटी आदी खर्चासाठी 47 कोटी 39 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने 147 कोटी  81 लाख खर्चाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे अष्टविनायक क्षेत्राच्या विकासाला गती मिळणार असून त्याबद्दल भाविकांकडून, नागरिकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे

शासन निर्णय – अष्टविनायक

श्री क्षेत्र जोतिबा मंदिर विकास आराखड्यासाठी २६० कोटी खर्चास प्रशासकीय मान्यता

मुंबई, दि. 28 : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र जोतिबा मंदिर (कोल्हापूर) येथील सर्वसमावेशक विकास आराखड्यासाठी 259 कोटी 59 लाख रुपये खर्चास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. हा शासन निर्णय आज (दि. 28) नियोजन विभागाने जारी केला. या विकास आराखड्यातील अंमलबजावणी व संनियंत्रणाची जबाबदारी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामागे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा कारणीभूत ठरला आहे. श्री क्षेत्र जोतिबा हे राज्यातील एक ऐतिहासिक व धार्मिक श्रद्धास्थान असून, त्याचा विकास करण्यासाठी शासनाने विविध पातळ्यांवर व्यापक विचार करून आराखडा तयार केला आहे.

या विकास आराखड्याअंतर्गत श्री क्षेत्र जोतिबा मंदिर संवर्धन व दुरूस्ती करणे, यमाई मंदिर संवर्धन व दुरूस्ती करणे, श्री जोतिबा डोंगरावर येणाऱ्या पायवाटा संवर्धन व सुशोभीकरण करणे, श्री जोतिबा डोंगर कड्यांचे संवर्धन करणे, देवस्थान समिती/प्राधिकरण नवीन कार्यालय बांधणे, श्री जोतिबा डोंगरावर दोन ठिकाणी ज्योत स्तंभाची निर्मिती करणे, श्री जोतिबा डोंगरावर नवे तळे परिसर विकास करणे, श्री जोतिबा डोंगरावर केदार विजय गार्डन निर्मिती करणे, श्री जोतिबा डोंगरावर यमाई परिसर विकास (चाफेवन) करणे, श्री जोतिबा डोंगरावर कर्पूर तलाव संवर्धन करणे, श्री जोतिबा डोंगरावर चव्हाण तलाव संवर्धन करणे, श्री जोतिबा डोंगरावर मुरलीधर पुष्करणी तलाव संवर्धन करणे, श्री जोतिबा डोंगरावर ऐतिहासिक अंगारकर वाडा व बाब संवर्धन करणे, श्री जोतिबा डोंगरावर वाहनाकरिता पार्कंग व्यवस्था करणे, श्री जोतिबा डोंगरावर पाणपोई व शौचालय बांधणे आदी बाबींचा समावेश आहे. या कामांवर पहिल्या टप्प्यात 259.59 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून त्यापैकी 81.60 कोटींच्या कामे थेट नियोजन विभागामार्फत करण्यात येणार आहेत.

या प्रकल्पाची अंमलबजावणी 31 मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाची तत्त्वतः जपणूक करत पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली कामे होणार आहेत. संबंधित कामांसाठी आवश्यक असलेल्या पर्यावरणीय आणि पुरातत्त्वीय परवानग्या घेण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. या विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती, तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती गठित करण्यात येणार असून या समित्यांचे संपूर्ण नियंत्रण जिल्हाधिकाऱ्यांकडे राहील.

महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री. जोतिबा देवस्थानाच्या सर्वांगीण विकासाचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

शासन निर्णय – 28.05.2025 जोतिबा विकास आराखडा

***

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे मुंबई येथून प्रयाण

मुंबई, दि. 28 : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय  विमानतळ  येथून भारतीय वायू सेनेच्या विमानाने संध्याकाळी  6.15 वाजता प्रयाण झाले.

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना निरोप दिला. यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर – पाटणकर, अतिरिक्त पोलिस महासंचालक शेरिंग दोरजे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर तसेच पोलिस व राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपराष्ट्रपती यांनी दिल्ली येथे प्रयाण केले.

0000

जनसंख्याशास्त्र, लोकशाही आणि विविधता’ हा नवभारताचा आत्मा – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

मुंबई, दि. २८ : “जनसंख्या विज्ञान, लोकशाही आणि सांस्कृतिक विविधता हे नवभारताचे आत्मिक स्तंभ आहेत. या त्रिसूत्रीचा अभ्यास आणि तिचे संरक्षण ही आजच्या तरुणांची जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेच्या (IIPS) ६५व्या आणि ६६व्या पदवी प्रदान समारंभात केले.

या समारंभात उपराष्ट्रपती यांच्या पत्नी डॉ.सुदेश धनखड, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि रसायन व खत मंत्रालय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, राजशिष्टाचार तथा पणन मंत्री जयकुमार रावल, आमदार सना मलिक, संस्थेचे संचालक प्रो.डी.ए.नागदेवे आणि विविध शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले, “ही केवळ पदवी मिळविण्याची वेळ नाही, तर नवभारत घडवण्याच्या जबाबदारीची सुरुवात आहे. भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. आपली लोकशाही, लोकसंख्याशास्त्र आणि विविधता हे घटक भारताच्या सामाजिक व आर्थिक विकासाचे दिशादर्शक आहेत.”

डेटा म्हणजे देशाचा दिशा-निर्देश

उपराष्ट्रपती धनखड म्हणाले, “आधुनिक भारतात लोकसंख्याशास्त्र हे केवळ आकडेवारी नाही, तर ते आपल्या राष्ट्राची ओळख आहे. बेरोजगारी, आरोग्य सेवांतील असमानता, आणि प्रादेशिक असंतुलन या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी योग्य डेटाचा उपयोग अत्यावश्यक आहे. जनसंख्याशास्त्राचे विद्यार्थी, हे बदल घडवू शकता.”

“सरकारने आगामी जनगणनेत जातीनिहाय माहिती गोळा करण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय समाजात समता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी मैलाचा दगड ठरेल,” ‘IIPS’ सारख्या संस्थांना या डेटाचे विश्लेषण करून सर्वसमावेशक धोरणं तयार करण्यासाठी महत्वाचे योगदान देण्याचे आवाहन श्री. धनखड यांनी केले.

लोकशाहीसमोरील आव्हाने

धर्मांतरण आणि अनियंत्रित बेकायदेशीर स्थलांतर हे केवळ सामाजिक प्रश्न नाहीत, तर ही आपल्या लोकशाही आणि अस्तित्वासमोरील गंभीर आव्हाने आहेत. आपली सीमा सुरक्षित ठेवणे, सामाजिक समरसता जपणे आणि सार्वजनिक संवादात प्रामाणिकपणा राखणे हे सर्व एकत्रितपणे लोकशाही टिकवतात.

“शांती ही सहिष्णुतेने मिळते, पण तिचे रक्षण शक्तीनेच करता येते. भारताच्या सैन्यदलांनी दाखवलेली रणनीती आणि हे त्याचे उदाहरण आहे,” असे ते म्हणाले.

“तुमचे शिक्षण केवळ नोकरीसाठी नव्हे, तर समाज बदलण्यासाठी आहे. भारताच्या विकासाच्या मार्गात तुम्ही केवळ आकड्यांमध्ये अडकून न पडता, त्या आकड्यांमागची माणसे समजून घेऊन काम करा. आकडे धोरण ठरवतात, पण लोकच देश घडवतात” असेही उपराष्ट्रपती धनखड यांनी सांगितले.

 

जनसांख्यिकीय अभ्यास धोरणनियोजनासाठी अत्यावश्यक – केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल

केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल म्हणाल्या, तुम्ही देशाच्या भविष्याचे शिल्पकार आहात,” जनसांख्यिकीय अभ्यास धोरणनियोजनासाठी अत्यावश्यक आहे. लोकशाही, लोकसंख्या आणि विविधता नवभारताच्या आत्म्याचे प्रतिबिंब आहे. “भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे आणि त्यामुळे लोकसंख्याविषयक संशोधन ही राष्ट्रीय गरज आहे,” सखोल जनसांख्यिकीय विश्लेषणावर भर देण्यात यावा.

हा कार्यक्रम केवळ एक शैक्षणिक समारंभ न राहता, राष्ट्रीय जबाबदारीची जाणीव करून देणारा ठरल्याबद्दल ‘IIPS’ मधील नवपदवीधरांचे त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले.

यावेळी उपराष्ट्रपती श्री.धनखड, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती पटेल, मंत्री श्री.रावल यांच्या हस्ते स्नातक विद्यार्थ्यांना पदवी आणि पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

000

संजय ओरके/विसंअ/

अतिवृष्टी : मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके तैनात

मुंबई, दि. २८ :-  राज्यात सध्या सुरू अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्तीच्या परिस्थितीत मदत व बचाव कार्यासाठी मुंबई येथे दोन रायगड ठाणे, पालघर, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येकी एक एनडीआरएफचे पथक पोहोचले आहे. तर गडचिरोली आणि नांदेड येथे एसडीआरएफचे प्रत्येकी एक पथक पोहोचले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन संचालक सतीशकुमार खडके यांनी दिली.

९३ लाख ३३ हजार एसएमएस

सचेत ॲपमार्फत आज २८ मे २०२५ रोजी १७ अलर्ट पाठविण्यात आले आहेत. हे अलर्ट संदेश ९३ लाख ३३ हजार  नागरिकांना आपत्तीपासून सतर्क राहण्यासाठी पाठविण्यात आले आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यातील ३९ नागरिकांचा बचाव

अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर तालुक्यातील अकोळणेर, खडकी, वाळकी, सोनेवाडी रोड, शिरढोण येथे  अतिवृष्टीमुळे  पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या ठिकाणी पुरात अडकलेल्या ३९ नागरिकांना लष्कर, अग्निशमन दल आणि पालिका प्रशासनाच्या पथकांमार्फत सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

श्री. खडके यांनी सांगितले, भारतीय हवामान खात्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी पुढील २४ तासांकरीता ऑरेंज अलर्ट दिला आहे.

गेल्या २४ तासांमध्ये राज्यातील बुलढाणा (४७.९ मिमि), अकोला (४६ मिमि), जालना (४४.६ मिमि), यवतमाळ (३९.७ मिमि) आणि रत्नागिरी (३५.७ मिमि) या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पाऊस झाला असल्याचेही संचालक श्री. खडके यांनी सांगितले.

राज्यात भिंत कोसळणे, झाड पडणे, वीज कोसळणे, पाण्यात बुडणे, आगीत जळणे, पुराचे पाणी या घटनांमुळे २७ ते दि.२८ मे २०२५ (दु. ४.०० वाजेपर्यंत) १४ व्यक्ती आणि २० प्राणी मृत झाली आहेत. तर १६ व्यक्ती आणि १ प्राणी जखमी झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

ताज्या बातम्या

जनसंवादद्वारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या

0
नागपूर दि. १७: महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जनसंवाद कार्यक्रमात वृद्ध, महिला, विद्यार्थी, दिव्यांग, तृतीय पंथी अशा समाजाच्या सर्व थरातील जनतेच्या...

प्रस्ताव सादर करा, खंडपीठही लवकरच करू – सरन्यायाधीश भूषण गवई

0
शाहू महाराजांप्रमाणे समानतेच्या न्यायदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन सर्किट बेंचच्या शुभारंभाला कोल्हापूरने अनुभवला सरन्यायाधीशांचा कृतज्ञता सोहळा कोल्हापूर, दि. १७: राज्याच्या सीमेवरील दुर्गम भागातील सर्वसामान्य...

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

0
जळगाव दि. १७ (जिमाका):  जळगाव- छत्रपती संभाजीनगर रोडवरील चिंचोली शिवारात 66.27 एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेल्या भव्य मेडिकल हबची पाहणी आज उपमुख्यमंत्री अजित पवार...

येत्या बजेटमध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
जळगाव जिल्ह्यातील उद्योगांनाही मराठवाडा, विदर्भासारख्या सवलती देणार तीन दिवसातील अतिवृष्टीच्या पंचनाम्याचे आदेश जळगाव दि. १७ (जिमाका वृत्तसेवा): आपण प्रत्येक जिल्ह्यात गेल्यानंतर त्या जिल्ह्यात जिल्हा...

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन

0
कोल्हापूर, दि. १७ (जिमाका): सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन व कोनशिला अनावरण करण्यात आले. या ऐतिहासिक...