गुरूवार, मे 22, 2025
Home Blog Page 209

येत्या २८ फेब्रुवारीला रवींद्र नाटयमंदिर आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे उद्घाटन

– सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांचे मुंबईकरांना आमंत्रण

मुंबई, दि. १८ : मुंबईच्या मध्यवर्ती भागी असलेले रवींद्र नाट्यमंदिर आणि पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी पुन्हा नव्याने २८ फेब्रुवारी २०२५ पासून नाट्यरसिकांच्या सेवेत दाखल होत आहे. या संकुलांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम शिवेंद्रराजे भोसले, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार अनिल देसाई, आमदार महेश सावंत आदी मान्यवरांच्या हस्ते २८ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजता होत आहे. या मुंबईतील अतिशय भव्य आणि सुशोभित असलेल्या नाट्यगृह आणि अकादमीच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी सर्व मुंबईकरांना येण्याचे आमंत्रण सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी आजच्या पत्रकार परिषदेतून केले आहे.

मंत्रालयात झालेल्या या पत्रकार परिषदेपूर्वी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नवीन बोधचिन्हाचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, उपसचिव नंदा राऊत आणि पु.ल.देशपांडे कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर उपस्थित होत्या.

बोधचिन्हाचे अनावरण करतांना लोक कला, अभिजात कला, दृश्यात्मक कला आणि दृकश्राव्य कला अशा सर्व प्रकारच्या कलांचे हक्काचे माहेरघर असलेल्या तसेच नाट्यगृहांची सुविधा देणाऱ्या अकादमीचे प्रतिबिंब असलेले नवे व आकर्षक बोधचिन्ह तयार करण्यात आले असल्याचे मंत्री ॲड.शेलार यांनी यावेळी सांगितले.

पु.ल.देशपांडे कला अकादमीने स्थापनेपासून कलाकार आणि कलाप्रेमीच्या अनेक पिढ्या घडविल्या असल्याचे सांगून मंत्री ॲड शेलार म्हणाले की, या अकादमीमध्ये नवोदित कलाकारांना त्यांची कला दाखवण्याची जशी सोय आहे, त्याचप्रमाणे उपजत कला गुण असलेल्या कलाकारांना त्यांचे कला बळ मिळण्याची सुद्धा अकादमी मध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर कला सादरीकरण, कलाशिक्षण, कलाआस्वादन, कलासंवर्धन आणि कलाविषयक रोजगार निर्मिती अशा बहुविध सुविधा अकादमीत एकाच ठिकाणी आता उपलब्ध होणार आहेत. कलाक्षेत्रातील २० वेगवेगळे प्रमाणपत्र व पदवीका अभ्यासक्रम येथे लवकरच सुरु होणार असून त्याचा फायदा नवोदित कलाकारांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री ॲड शेलार म्हणाले की, संकुलातील रवींद्र नाट्यमंदिर, २ लघु नाट्यगृह आणि ५ प्रदर्शन दालने तसेच १५ तालीम दालने यांच्यामुळे कलाकारांची कायमच मोठी सोय झाली आहे. त्याचबरोबर आता ही दोन्ही नाट्यगृहे नव्या रूपात, अत्याधुनिक सोयी-सुविधांसह उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नाटक आणि मराठी चित्रपट या दोन्हींसाठी आवश्यक अशी अत्याधुनिक ध्वनी व्यवस्था व अंतर्गत सजावट करण्यात आली असल्याचेही सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले.
000

माय मराठीला अभिजात दर्जा; भाषिक आणि वाङ्मय परंपरेचा मागोवा

सुमारे अडीच हजार वर्षाचा समृद्ध वारसा लाभलेल्या मायमराठीचे संतश्रेष्ठ ज्ञानोबाराया

‘माझा मराठीचे बोलू कवतुके।

परि अमृतातेहि पैजासी जिंके।’

असे यथार्थ वर्णन करतात. विमलसुरीचे ‘पौमचरियम’, भद्रबाहुचे ‘आवश्यक निर्युक्ती’, कालिदासाचे ‘शाकुंतल’, प्रवरसेनाचे ‘सेतुबंध,’ शूद्रकाचे ‘मृच्छकटिक’ आणि ‘पाणिनीच्या कालखंडापासूनचा मराठी भाषेच्या रुपकांचा समृद्ध इतिहास असलेल्या  या भाषेच्या प्राचीनत्वाची आणि अभिजाततेची महती सांगावी तेवढी थोडीच आहे. इ.स.780 च्या सुमारास लिहिलेल्या उद्योतनसुरी यांच्या ‘कुवलमाला’ ग्रंथातील मराठी माणसाचे वर्णन करणारी…

‘दढमडह सामलंगे सहिरे अहिमाण कलहसीले य |

दिण्णले गहिल्ले उल्लविरे तत्थ मरहट्ठे|’

अर्थात बळकट, ठेंगण्या, धडमुट, काळ्यासावळ्या रंगाच्या काटक, अभिमानी, भांडखोर, सहनशील, कलहशील  व ‘ दिण्णले’ (दिले) ‘गहिल्ले’ (घेतले) असे बोलणाऱ्या मरहठ्यास त्याने पहिले ही मराठीची पाऊलखुण असो की इ.स.वि.सन 1116-17 सालची श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या पायथ्याशी घडवलेल्या शिलालेखातील –

‘श्री चावुण्ड राजे करवियले श्री गंगराजे सुत्ताले करवियले’

हा उल्लेख असो अथवा बाराव्या शतकातील मुकुंदराज स्वामी यांनी लिहिलेला विवेकसिंधु हा मराठी आद्य काव्यग्रंथ किंवा महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामींचे शिष्य नागदेवाचार्य आणि म्हाईंभट्ट यांनी आपल्या लेखणीतून मराठी भाषेचा केलेला खणखणीत पुरस्कार या सगळ्यातून मराठीचा अभिजात, प्राचीन  समृद्ध वारसा ठळकपणे अधोरेखित होतो. कोणतीही भाषा काही एकाएकी प्रगल्भ होत नाही. ती तशी होण्यासाठी प्रवाही असावी लागते, त्यासाठी अनेक शतकांचा कालखंड जावा लागतो. मराठीत आज उपलब्ध असलेला पहिला ग्रंथ ‘गाथासप्तशती हा सुमारे दोन हजार वर्षे जुना आहे, शिवाय शेकडो शिलालेख, ताम्रपट, पोथ्या आणि हस्तलिखित ग्रांथिक पुरावे मराठीच्या प्राचीनत्वाची साक्ष देतात.

मराठी ही फक्त प्राचीन भाषा आहे असे नाही तर, तिच्यात श्रेष्ठ साहित्याची सातत्यपूर्ण परंपरा आहे: पुढे कालिदास, म्हाईंभट्ट, नागदेवाचार्य, ज्ञानोबा-तुकारामांसह सर्व संत महात्म्यांनी मराठी भाषेला सुयोग्य वळणे दिली. त्यापुढे मराठीतील अनेक शब्दरत्नाकारांनी फारसी अरबी शब्दांचा मऱ्हाठीत मेळ घालून लिहिल्या गेलेल्या बखरींचा दस्तावेज, पोवाडे, लावण्या, लोकवाङ्मय आणि केशवसुतांनी फुंकलेली तुतारी असा मराठी भाषेचा बदलत गेलेला अविष्काराचा प्रवास प्रवाही व संपन्न राहिलेला आहे. अशा या प्रवाही मराठी साहित्यातील अनेक सारस्वतांनी आपल्या साहित्य साधनेतून, शब्दसामर्थ्यातून या भाषेला सजविले, फुलविले व मोठे करुन मराठीचा वेलू गगणावरी नेला.

या दरम्यान मराठी भाषकांच्या महाराष्ट्रात कैक राजवटी आल्या आणि गेल्या. समाज बदलला, जगणे बदलले त्याप्रमाने मराठीही बदलत गेली. रीत बदलली पण अभिजाततेचा पोत मात्र तोच राहिला आहे.

मुळातच जातिवंत अभिजाततेच्या बळावर हजारो वर्षाची वैभवशाली परंपरा निर्माण  करणारी मायमराठी तामीळ, संस्कृत, तेलगू, उन्नड, मल्याळम, उडिया या भाषांच्या बरोबरीने अभिजाततेच्या संगतीत व पंगतीत मागील वर्षापर्यंत बसली नव्हती. ही सल मराठीजणांच्या मनात कायम होती. यासाठी शासन, प्रशासन आणि भाषाप्रेमींच्या माध्यमातून अनेक प्रयत्न सुरू होते. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली 10 जानेवारी 2012 रोजी एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीत प्रा. पठारे यांच्या समवेत प्रा. हरी नरके व अन्य सन्माननिय सदस्य होते. समितीने 52 बोली भाषेपासून नटलेल्या मराठी भाषेचे संशोधन करून व सूक्ष्म अभ्यास करुन  प्राचीन व अभिजाततेचे वस्तुनिष्ठ पुरावे गोळा केले. तसा अहवाल 12 जुलै 2013 रोजी साहित्य अकादमी आणि केंद्र सरकारला सादर केला, या समितीने आपल्या 500 पानी अहवालातून माय मराठीच्या अभिजातता आणि प्राचीनत्वाबद्दल  प्रश्न उपस्थित करणाऱ्या अनेक गैरसमजाचे परिमार्जन केले.

हा अहवाल आणि मराठी भाषाप्रेमींच्या तीव्र मागणीची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत केंद्र सरकारने दिनांक 03 ऑक्टोंबर 2024 ला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. शासनस्तरावरून मायमराठी अभिजात असल्याची शिक्के कट्यारीसह मान्यता मिळाली.

अभिजाततेच्या कसोट्यांवर उतरलेल्या आतापर्यंत भारतातील मराठीसह (2024), तामिळ (सन 2004), संस्कृत (2005), कन्नड (2008), तेलगू (2008), मल्याळम (2013), उडिया (2014), पाली (2024), पाकृत (2024), आसामी (2024), बंगाली (2024) या 11 वैशिष्ट्यपूर्ण भाषांना अभिजाततेचा दर्जा केंद्र सरकारद्वारे दिला गेला आहे.

भाषेला जेव्हा अशा प्रकारचा दर्जा मिळतो, तेव्हा त्या भाषेची नुसती प्रतिष्ठाच वाढत नाही, तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय  पातळीवर  संबधित भाषेसंदर्भात अनेक अनुकूल दुरगामी  परिणाम होतात.  त्या भाषेच्या संवर्धनासाठी अधिक चालना मिळते. केंद्र सरकारकडून त्या भाषेच्या विकासकार्यासाठी त्या त्या राज्याला भरीव अनुदान मिळते. यातून मराठीच्या बोलीचा अभ्यास, संशोधन आणि साहित्य संग्रह प्रकाशित करणे, प्राचीन दुर्मीळ अभिजात ग्रंथ अनुवाद करणे, त्यांचे प्रकाशन करून प्रचार-प्रसार करणे, ग्रंथालयांना बळकट करणे, भाषेचा उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी यांना भरीव मदत करणे इत्यादी भाषासंवर्धनासाठीची कामे केली जातात. यामुळे सांस्कृतिक आणि संशोधन क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.

अभिजात भाषांच्या पंगतीत बसण्याचे रीतसर अहोभाग्य आपल्या मायमराठीला नुकतेच प्राप्त आले असले, तरी भाषा म्हणून मराठी ही अभिजात होती आणि आहेच. मराठीची ही अभिजातता तोलामोलाने टिकून राहायला हवी असेल, तर तिच्या अभिवृद्धीचा गोवर्धन उचलून धरणे की आपल्या सगळ्या मराठी जणांची जबाबदारी आहे.

०००

  • श्रीमती रुपाली उगे, लेखालिपिक, माहिती व जनसंपर्क कार्यालय, नागपूर

 

सातारा जिल्ह्यातील अ. भा. मराठी साहित्य संमेलनांच्या आठवणींना उजळा

महाराष्ट्र गीतात आपण गौरवाने, अभिमानाने म्हणतो  की,…. दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा ! आता त्याच नवी दिल्लीत हे ९८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन होत आहे. यापूर्वीही १९५४ साली ३७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्ली येथे झाले होते. महाराष्ट्राला, मराठी भाषेला, संस्कृतीला शास्त्रशुद्ध, चिकित्सक अशा प्रबोधनाचे वैचारिक अधिष्ठान असलेले वाई, जि. सातारा येथील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी या संमेलनाचे अध्यक्ष होते. स्वागताध्यक्ष केंद्रीय मंत्री न. वि. तथा काकासाहेब गाडगीळ हे होते. तर त्याचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरु यांच्या हस्ते झाले होते. इतिहासाची पुनरावृत्ती होतेच या अनुषंगाने दि. 21 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या संमेलनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे.

प्रदीर्घकाळ केंद्र सरकारकडे प्रलंबित ‘अभिजात दर्जा’ मराठीला मिळाल्याने पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटनाचा योग आला आहे. यामुळेही मराठी माणसांचा आनंद द्विगुणित झाला आहे. स्वागताध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आहेत हाही योगायोगच आहे. पवार यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विविध नात्याने सर्वाधिक वेळा उपस्थित राहिलेले जाणते रसिक राज्यकर्ते आहेत.

साहित्य संमेलनाचा रंजक व प्रदीर्घ इतिहास

महाराष्ट्र हा प्रदीर्घ साहित्यिक, सांस्कृतिक, संतपरंपरा, प्रबोधन परंपरा, शौर्य, पराक्रम, अध्यात्म यातून घडलेला आहे. मराठी भाषा प्राचीन असल्याचा, म्हणजे साधारणपणे इ.स.पूर्व 300 वर्षापासून म्हणजे 2700 वर्षापासूनचा असल्याचा सर्वमान्य उल्लेख आहे. इ.स.पूर्व 300 मध्ये वररुची (कात्यायन) यांनी ‘प्राकृत प्रकाश’ हा ग्रंथ लिहिला होता. अर्थात तो त्यावेळी रुढ असलेल्या महाराष्ट्री प्राकृत भाषेत होता. याशिवाय त्याकाळी व नंतरही महाराष्ट्रातल्या विविध राजे, संस्थानिक, पराक्रमी योद्धे, लढाईतील विजेते, पराभूत अशा अनेकांनी जे प्राचीन शिलालेख, ताम्रपट, वीरगळ, विविध देवतांची स्तोत्रे, पोथ्या, ओव्या, अभंग, उखाणे इत्यादिमधून मराटी भाषेचे लिखित व बोली स्वरुपात संक्रमण होत गेले. ते महाराष्ट्री प्राकृत, मागधी, अर्धमागधी, पाली, संस्कृत यातूनही होत होते. संत ज्ञानेश्‍वरांनी 12 व्या शतकात लिहिलेली ‘ज्ञानेश्‍वरी’ हे मराठी भाषेचे अमृत लेणे आहे पण ते सन 1845 पर्यंत मौखिक, हस्तलिखित या स्वरुपात होते. कारण मुंबईत मुद्रणकला सन 1830 पासून ब्रिटीशांमुळे सुरु झाली. त्याआधी सेरामपूर येथे सन 1805 पासून मराठीत काही पुस्तके छापली जात होती. परंतु ‘ज्ञानेश्‍वरी’ हा वैश्‍विक साहित्य व मानवी मूल्य असलेला ग्रंथ असल्यामुळे पहिले मराठी वृत्तपत्र ‘दर्पण’ (6 जानेवारी 1832) व पहिले मराठी मासिक ‘दिग्दर्शन’ (1 मे 1840) सुरु करणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना त्याचे महत्त्व कळाले होते. म्हणून त्यांनी अनेक ‘ज्ञानेश्‍वरी’ची हस्तलिखिते तपासून एकनाथकृत ‘ज्ञानेश्‍वरी’ची पाठभेदासहित शुद्धीकृत ‘ज्ञानेश्‍वरी’ लिहून सन 1845 साली मुंबईतल्या प्रभाकर छापखान्यात छापून प्रथमच प्रकाशित करुन मुद्रित प्रत उजेडात आणली.

अशा अनेक ग्रंथ, पुस्तके, लेख, निबंध, इतिहास, चरित्र, कादंबरी, नाटक, कविता, प्रवासवर्णन, व्यक्तिचित्रण, आत्मचरित्र इत्यादी माध्यमातून उत्क्रांतित झालेली मराठी भाषा आता अभिजात भाषा हा दर्जा मिळवून आपला विविधांगी विस्तार करीत आहे. त्यामुळे हे सर्व मराठीत लिहिणारे सारस्वत यांना एकत्रित आणून मराठी भाषेची सांघिक सेवा व अस्तित्व अधिक गतिमान व्हावी असा विचार पुण्यामध्ये काही ग्रंथलेखकांच्या समूहामध्ये चर्चेला आला. त्यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ही महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रातील अग्रगण्य संस्था होती. लोकमान्य टिळक, न.चिं. केळकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्यासह चिंतामणराव वैद्य, विशूभाऊ राजवाडे आणि पांगारकर आदी महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांच्या साक्षीने महाराष्ट्र साहित्य परिषदेची (मसाप) अधिकृत स्थापना झाली. पुण्याच्या सदाशिव पेठेतील मळेकर वाड्यात सन 1906 मध्ये या संस्थेचे कार्य सुरु झाले. ही महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था होय. खरं तर या परिषदेची स्थापनाच मुळी पुणे येथील सन 1906 च्या चौथ्या ग्रंथकार संमेलनात झाली हे याचे वैशिष्ट्य होय.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची गंगोत्री ज्याला म्हणता येईल असे पहिले मराठी ग्रंथकार संमेलन पुण्यातील हिराबागमध्ये 11 मे 1878 रोजी झाले. याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. पण ही परंपरा दरवर्षी सुरु राहिली नव्हती. दुसरे संमेलन (1885 पुणे), 20 वर्षांनी प्रथमच तिसरे संमेलन पुण्याबाहेर सातारा येथे (1905) आणि चौथे सन 1906 मध्ये परत पुण्यालाच आणि त्यात वर उल्लेखल्याप्रमाणे महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ही संस्था सुरु झाली. त्यामुळे पुढची संमेलने महाराष्ट्र साहित्य परिषदेमार्फत सन 1964 पर्यंत 45 साहित्य संमेलने झाली. त्यानंतर अस्तित्वात आलेल्या अखिल भारतीय साहित्य महामंडळाने सन 1965 च्या हैदराबाद संमेलनापासून पुढे रितसर संमेलने घ्यायला सुरुवात केली. सध्या या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, विदर्भ साहित्य संघ, मुंबई मराठी साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद, आंध्र प्रदेश मराठी साहित्य परिषद, कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद, मध्यप्रदेश मराठी साहित्य परिषद, गोवा मराठी साहित्य परिषद, मराठी वाङ्मय मंडळ बडोदा आणि नव्याने कोकण मराठी साहित्य परिषद, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा अशा घटक संस्था आहेत.

सातारा जिल्ह्याचे साहित्य भाग्य

या पार्श्‍वभूमीवर या संमेलनामध्ये सातारा जिल्हा भाग्यवान आहे. मुळातच अखंड सातारा जिल्ह्याची (सांगलीसह) आणि नंतर सातारा जिल्ह्याची साहित्य परंपरा फार मोठी आहे. सध्याच्या सातारा जिल्ह्यात आंबेडकर अकादमी पुरस्कृत किशोर बेडकिहाळ यांच्या नेतृत्त्वात विचारवेध संमेलने, पार्थ पोळके व विजय मांडके यांची विद्रोही साहित्य संमेलने, फलटण येथील महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेतर्फे यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन, सातारा येथे महाराष्ट्र साहित्य परिषद शाहुपुरी शाखेतर्फे विनोद कुलकर्णी यांनी महाराष्ट्रात सर्वात प्रथम सुरु केलेला मराठी भाषा पंधरवडा निमित्तचे साहित्यिक कार्यक्रम, कृष्णा कोयना संगमावरील कराडमध्ये दिवंगत मोहन कुलकर्णी व आनंद परांजपे यांनी चौफेर व कराड जिमखाना यांच्या माध्यमातून वाङ्मय व नाट्य क्षेत्रातले अनेक कार्यक्रम, कृष्णा काठावरील वाईचे लोकमान्य टिळक वाचनालयाची वसंत व्याख्यानमाला, सातारा येथील कै. वि. ल. चाफेकर यांनी सुरु केलेल्या व आजही चालू असलेल्या ज्ञान विकास मंडळाची व्याख्यानमाला, दिलीपसिंह भोसले व अ‍ॅड. सौ. मधुबाला भोसले (फलटण) यांनी सुरु केलेली प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती व्याख्यानमाला, सातारा नगरवाचनालय येथील व्याख्यानमाला, तसेच शिरीष चिटणीस यांच्या दीपलक्ष्मी पतसंस्थेचे साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रम, ताराचंद्र आवळे यांच्या माणदेशी साहित्य सभेतर्फे होणारी कवी संमेलने, रविकिरण मंडळाचे प्रवर्तक कवि गिरीश (रहिमतपूर) व राजकवि यशवंत (य. दि. पेंढारकर) (चाफळ) येथील साहित्यिक व कविसंमेलने, अरुण गोडबोले (सातारा) व मधु नेने (वाई) आयोजित समर्थ सांप्रदायातील भक्ती कार्यक्रम, कादंबरीकार राजेंद्र माने व रवींद्र भारती यांच्या अश्‍वमेध संस्थेचे साहित्यिक कार्यक्रम, प्रकाश सस्ते (फलटण) आयोजित छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन इत्यादी वाड्मयीन व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यक्रमांनी सातत्याने सातारा जिल्ह्याची साहित्यिक व सांस्कृतिक उंची वाढविली आहे.

राजपुरी, ता. जावली येथील सोमनाथ मंदिरातील एक मराठी शिलालेख इ.स. 10 व्या, 12 व्या शतकातील आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्याचा साहित्यिक प्रवास सुमारे 1500 वर्षांपूर्वीपासूनचा आहे. तसेच सातारा जिल्ह्यात नाईक निंबाळकर यांचे फलटण संस्थान व पंतप्रतिनिधी यांचे औंध संस्थान यांनी स्वातंत्र्य पूर्वकाळात कला, नाट्य, वाड्मय, क्रीडा, लेखक, कवि यांना अर्थसहाय्य आणि प्रोत्साहन दिले आहे.

सातारा जिल्ह्याने अनेक प्रसिद्ध साहित्यिक व नाटककार व संत वाङ्मयातील लेखक महाराष्ट्राला दिले आहेत. त्यामध्ये यशवंतराव चव्हाण, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी (वाई), गोपाळ गणेश आगरकर (टेंबू, कराड), कवि गिरीश व नाटककार प्रा. वसंत कानेटकर (रहिमतपूर), प्राचार्य शिवाजीराव भोसले (फलटण), नाटककार शां.गो.गुप्ते (सातारा), ‘उपरा’कार लक्ष्मण माने (सातारा), बेबीताई कांबळे (फलटण), डॉ. आ. ह. साळुंखे (सातारा), पार्थ पोळके (सातारा), आधुनिक कविवर्य बा. सी. मर्ढेकर (मर्ढे), प्रा. दिलीप जगताप (वाई), जयवंत गुजर (सातारा रोड), जगन्नाथ शिंदे (पाचगणी), अरुण गोडबोले (सातारा), वासंती मुजुमदार (कराड), गौरी देशपांडे व जाई निमकर (फलटण), अशोक नायगावकर (वाई), रवींद्र भट (वाई), ना. सं. इनामदार (खटाव), विद्याधर म्हैसकर, दीपा गोवारीकर (कराड), प्रसिद्ध पटकथा लेखक प्रताप गंगावणे व कादंबरीकार डॉ. राजेंद्र माने (सातारा), डॉ. हे. वि. इनामदार (खटाव), रा. ना. चव्हाण (वाई), श्री. के. क्षीरसागर, चिंतामणराव कोल्हटकर व प्रा. श्री. म. माटे (सातारा), प्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत (कराड), किशोर बेडकिहाळ (सातारा), बाळशास्त्री जांभेकरांचे चरित्र अभ्यासक रवींद्र बेडकिहाळ (फलटण), प्रा. यशवंत पाटणे (सातारा), ललित लेखक श्रीनिवास कुलकर्णी (कराड), शांतिलाल भंडारी, मिरदेव गायकवाड (कोरेगाव), ऐतिहासिक कादंबरीकार ना. ह. आपटे (कोरेगाव), परदेशस्थ असूनसुद्धा मराठीच्या गाढ्या अभ्यासक डॉ. मॅक्सीन बर्नसन (फलटण, सध्या हैद्राबाद), मराठी कादंबरीचे जनक बाबा पद्मजी व लक्ष्मण मोरेश्‍वर शास्त्री हळबे (वाई), डॉ. न. म. जोशी (पाटण) यांसह अनेक साहित्यिकांचा समावेश आहे.

सातारा जिल्ह्यातील अ. भा. मराठी साहित्य संमेलने

नवी दिल्ली येथील साहित्य संमेलनाच्या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्ह्याचे या संमेलनात फार मोठे योगदान आहे. यापूर्वीच्या 97 संमेलनांपैकी 6 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने सातारा जिल्ह्यामध्ये झाली आहेत. सातारा, सांगली सह जेव्हा अखंड सातारा जिल्हा होता, त्यावेळी सन 1905 मध्ये सातारा येथे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. त्याचे अध्यक्ष होते तत्कालीन ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक रघुनाथ पांडुरंग करंदीकर. त्यानंतर सातारा जिल्हा स्वतंत्र झाल्यावर सातारा येथे 1962 – अध्यक्ष : नरहर गाडगीळ, 1975 – कराड – अध्यक्ष दुगाबाई भागवत, 1993 – सातारा – अध्यक्ष : विद्याधर गोखले, 2003 – कराड – अध्यक्ष : सुभाष भेंडे, 2009 – महाबळेश्‍वर – अध्यक्ष : आनंद यादव पण अनुपस्थित. यापैकी सन 1975 चे कराड आणि सन 2009 चे महाबळेश्‍वर येथील संमेलन वादग्रस्त झाले होते. आणीबाणीमध्ये विचार, भाषण आणि लेखन स्वातंत्र्यावर बरीचशी बंधने आली होती. अध्यक्ष होत्या प्रसिद्ध आणि अतिशय स्पष्टवक्त्या आणि बंडखोर स्वभावाच्या साहित्यिका दुर्गा भागवत आणि स्वागताध्यक्ष होते आणीबाणी लादणाऱ्या केंद्र सरकारमधील वजनदार परराष्ट्र मंत्री आणि कराडचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण. त्यामुळे आणीबाणीच्या पार्श्‍वभूमीवरील हे संमेलन आधीच वादग्रस्त झाले होते. तसेच राजकीय नेत्यांना संमेलनाच्या व्यासपीठावर कशाला घ्यायचे हा वादही त्यावेळी मोठ्या प्रमाणावर चालू होता. परंतु, यशवंतराव चव्हाणांच्या संयमी व रसिक साहित्यप्रेमीच्या भूमिकेमुळे संमेलन यशस्वी झाले. परंतु, यशवंतरावांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारण्यांचा वावर कितपत असावा याबद्दलचे त्यांनी केलेले भाष्य सर्वच संमेलनाच्या इतिहासातील मार्गदर्शक असे होते ते म्हणाले होते, ‘‘मित्र हो, माझे भाषण संपले आहे. आता फक्त शेवट. प्राचीन काळी तपस्व्यांच्या आश्रमात शिरताना राज्यकर्ते आपली राजचिन्हे काढून साध्या वेशात जात असत. तसेच या शारदेच्या उपवनात येताना भारत सरकारच्या मंत्रिपदाची बिरुदावली मी बाहेर ठेवून आलो आहे. मातृभाषेवर उत्कट प्रेम करणारा एक मराठी माणूस म्हणून मी इथे आलो आहे. आमचा पाहुणचार भाजी – भाकरीचा असला, तरी तो भावमिश्रीत आहे. जिव्हाळ्याचा आहे. सकस आहे, हे ध्यानात असू द्या. तो तुम्ही गोड करुन घ्यावा.’’

महाबळेश्‍वर येथील साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष, प्रख्यात ग्रामीण साहित्यिक आनंद यादव होते. परंतु त्यांच्या एका पुस्तकात संत साहित्य आणि वारकरी संप्रदाय तसेच संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह (?) मजकूर असल्यामुळे त्यावर महाराष्ट्राच्या साहित्यविश्‍वात प्रचंड खळबळ झाली होती. अखेर आनंद यादव यांचे अध्यक्षीय भाषण छापून तयार होवूनसुद्धा त्यांना अध्यक्षपदावर उपस्थित होता आले नाही. संमेलन अध्यक्षाविनाच हे साहित्य संमेलन पार पडले. परंतु पुरोगामी विचारातील संपन्न असलेल्या आणि सर्वधर्मसमभाव जागृत ठेवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या दुसऱ्या राजधानीत असे घडायला नको होते. ही भावनाही साहित्यविश्‍वात होती.

सातारा साहित्य संमेलनामुळे बा.सी.मर्ढेकर आणि

‘दर्पण’ कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मारकास चालना

सातारा येथे सन 1993 मध्ये झालेल्या साहित्य संमेलनात मराठी भाषा व्याकरणामधील शुद्ध, अशुद्धता यावर प्रचंड खल झाला होता. अध्यक्ष होते विद्याधर गोखले आणि स्वागताध्यक्ष होते छत्रपती श्रीमंत अभयसिंहराजे भोसले. या संमेलनात मुंबईच्या प्रसिद्ध साहित्यिक आणि आधुनिक कवीवर्य बा. सी. मर्ढेकर चरित्र व साहित्याच्या उपासक असलेल्या श्रीमती विजया राजाध्यक्ष. त्यांनी या संमेलनात सातारा जवळचे बा. सी. मर्ढेकर यांचे स्मारक मर्ढे (ता.जि.सातारा) येथे व्हावे याबद्दल आवाज उठवला आणि स्वागताध्यक्ष छत्रपती श्रीमंत अभयसिंहराजे भोसले यांनी तो तात्काळ मान्य केला. एव्हढेच नव्हे तर त्यांचे एक सहकारी साहित्यप्रेमी शिरीष चिटणीस यांना निवडक साहित्यिकांना मर्ढे घेवून जायला सांगितले व नियोजित स्मारकाची जागा पुढे कुठे असावी, स्मारक कसे असावे याचे नियोजन विजयाताईंना विचारुन ठरवावे अशी सूचना केली. त्यानंतर उशिरा का होईना पण महाराष्ट्र साहित्य परिषद सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ, म.सा.प. शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी व सातारा येथील पत्रकार हरिष पाटणे यांनी महाराष्ट्राचे तत्कालिन अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे तातडीने लक्ष वेधून प्रथमच रुपये 37 लाखाचे अर्थसहाय्य मंजूर करुन घेतले व मर्ढेकर स्मारकाची देखणी इमारत पूर्ण झाली. त्यानंतर किशोर बेडकिहाळ, विनोद कुलकर्णी, नंदकुमार सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली धडाडीने मर्ढेकरांच्या मूळ घराचे नूतनीकरणही झाले. आता पुन्हा ज्यांच्या पिताश्रींनी मर्ढे येथील मर्ढेकर स्मारकाला शुभारंभाची संजीवनी दिली, ते काम पुढे नेण्यासाठी दिवंगत श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांचे सुपुत्र आता महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले आहेत. त्यांनी मर्ढे गाव राष्ट्रीय नकाशावर आणून तिथे बा.सी.मर्ढेकर यांचे स्मारक राष्ट्रीय पातळीवरचे व्हावे असे प्रयत्न सुरु केले आहेत.

सन 1993 च्या सातारा येथील या साहित्य संमेलनाची आणखी एक फलश्रुती अशी. एक ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक रवींद्र बेडकिहाळ  मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे चरित्र व स्मारक यासाठी आग्रही होते. बाळशास्त्री जसे पहिले मराठी वृत्तपत्र ‘दर्पण’चे व पहिले मराठी मासिक ‘दिग्दर्शन’चे संस्थापक संपादक होते तसे मुद्रित स्वरुपात मराठी ग्रंथाचे समीक्षण करणारे, मराठी निबंधाची परंपरा सुरु करणारे व अनेक ग्रंथांचे लेखक होते व ‘ज्ञानेश्‍वरी’ची पहिली मुद्रित प्रत तयार करणारे मराठी साहित्य व संस्कृतीप्रेमी होते. म्हणून त्यांचे स्मारक कोकणातल्या त्यांच्या जन्मगावी पोंभुर्ले (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथे व्हावे व त्यात साहित्यिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन या संमेलनावेळी केले होते. त्याचे स्वागत व दखल या संमेलनाला खास उपस्थित असलेले प्रसिद्ध कवी, साहित्यिक कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर), नाटककार व लोकसत्ताचे संपादक विद्याधर गोखले, कोकणातले प्रसिद्ध साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी घेतली. त्यामुळे पुढे या स्मारकास चालना मिळाली आणि ते स्मारक रविंद्र बेडकिहाळ, अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी संस्थेने पुढाकार घेवून सन 1993 मध्ये पूर्ण केले.

संमेलन अध्यक्षातही सातारची बाजी

आजपर्यंतच्या 98 संमेलनाध्यक्षांमध्ये 17 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (नव्या व जुन्या) सातारा जिल्ह्याने दिले आहेत; ही सातारा जिल्ह्याची साहित्य क्षेत्रातील फार मोठी अभिमानाची बाब आहे. 1905 मध्ये प्रथमच साताऱ्यात झालेल्या संमेलनाचे अध्यक्ष खुद्द सातारचेच प्रसिद्ध वकील व लेखक रघुनाथ पांडुरंग करंदीकर होते. त्यानंतर औंधचे राजे भगवानराव पंतप्रतिनिधी (1935, इंदोर), प्रा. श्री. म. माटे (1943, सांगली), आचार्य शंकर दत्तात्रय जावडेकर (1949, पुणे), यशंवत पेंढारकर (1950, मुंबई), प्रा. पु. पां. कुलकर्णी (1952, अमळनेर), तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी (1954, नवी दिल्ली), प्रा. श्री. के. क्षीरसागर (1941, मिरज), न. वि. तथा काकासाहेब गाडगीळ (1962, सातारा), औंध संस्थानातील ग. दि. माडगुळकर (1973, यवतमाळ), व्यंकटेश माडगुळकर (1983, अंबेजोगाई), तसेच याच संस्थानमधील शंकरराव खरात (1984, जळगांव), प्रा. वसंत कानेटकर (1988, ठाणे), संतसाहित्यिक डॉ. यू. म. पठाण (1990, पुणे), ऐतिहासिक कादंबरीकार ना. स. इनामदार (1997, तत्कालीन अहमदनगर व आत्ताचे अहिल्यानगर), ज्येष्ठ कवी वसंत बापट (1999, मुंबई), प्रा. रा. ग. जाधव (2004 तत्कालीन औरंगाबाद व सध्याचे छत्रपती संभाजी नगर), साहित्यसम्राट न. चिं. केळकर (1921, बडोदा) यातील काहींचे जन्मगाव साताऱ्यातील तर काहींचे प्रदीर्घ वास्तव्य साताऱ्यामध्ये असे आहे. निवडणुकीशिवाय संमेलनाध्यक्ष ठरावही सातारा जिल्ह्यातूनच सन 2019 पूर्वी संमेलन अध्यक्षाची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या घटक संस्थांच्या कार्यकारी मंडळ सदस्यांतून होत असे. महामंडळ अस्तित्वात येईपर्यंत (1961) महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे संमेलने आयोजित करीत होती. तेव्हा अध्यक्षांची नियुक्ती सन्मानाने होत होती. पण 1961नंतर हळूहळू संमेलन जिथे होईल तिथले प्रादेशिक स्वागताध्यक्ष बहुतांश राजकारणीच होत होते. त्यामुळे स्वागत समितीतील सदस्यांची मते यावर राजकारण होवू लागले. निवडणूक प्रक्रियाही पोस्टल बॅलेटने. त्यानंतर नियोजित संमेलन अध्यक्षांची निवड सर्व घटक संस्थांकडून सुचविलेल्या अध्यक्षपदाच्या उमेदवारांमधून महामंडळात सन्मानाने सन 2019 पासून होऊ लागली. या पाठीमागे सातारचे पाठबळ होते हे सातारा जिल्ह्याला अभिमानास्पद आहे. अशा पद्धतीने पहिलीच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सन 2019 मधील 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांनी सुचविलेल्या संत वाङ्मयाच्या प्रसिद्ध लेखिका डॉ. अरुणा ढेरे (पुणे) यांची सन्मानाने निवड महामंडळाने केली.

यशवंतराव चव्हाण व महाराष्ट्र शासनाचे बहुमोल योगदान

यशवंतराव चव्हाण हे स्वत: उत्तम रसिक, वाचक, लेखक, समीक्षक, संयमी वक्ता असल्यामुळे संयुक्त महाराष्ट्राचे (1960) पहिले प्रभावशाली मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांनी मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती, लोककला यासाठी राज्यशासनामार्फत बहुमोल योगदान दिले. त्यामुळे मराठी विश्‍वकोश मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, स्वतंत्र मराठी भाषा विभाग, लोकसाहित्य समिती आदी उपक्रम त्यांनी सुरु केले. अनेक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ते रसिक साहित्यिक म्हणून उपस्थित राहिले आहेत. अनेक साहित्यिक, नाटककार, कलाकार यांना त्यांनी सहकार्य केले आहे. त्यांच्याशी मैत्र राखले होते. स्वत: त्यांनी 17 ग्रंथ लिहिले आहेत. अनेक ग्रंथांना त्यांनी प्रस्तावना लिहील्या आहेत. त्यांची भाषणे म्हणजे अमूल्य विचारांच्या तुषारांचा अमृत संगम अशी असत. साहित्य संमेलनांना राजाश्रय (शासनाचा) त्यांनीच सुरु केला.

आजचे शासनही साहित्याभिमुख आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही साहित्य, नाट्य, कला, क्रीडा यासाठी भक्कम अर्थसहाय्य देवून या क्षेत्रातील अनेकांना प्रोत्साहन दिले आहे. विशेषत: या शासनाने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा निधी गेल्या 2 वर्षांपासून रु. 2 कोटी केला आहे. आता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. त्यामुळे मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून भरघोस अर्थसहाय्याचे अनुदान उपलब्ध होणार आहे. त्यातून मराठी भाषा आता ज्ञान भाषा व्हावी यासाठी निश्‍चितच ठोस प्रयत्न होतील. आपली मराठी भाषा किती प्राचीन आहे आणि किती संपन्न आहे याचा प्रसार जिल्ह्याजिल्ह्यातून होईल. मराठी भाषा संशोधनासाठी अनुदान, जिल्हावार मराठी भाषा भवन व साहित्य केंद्र, राज्यातील 42 बोली भाषांमधील साहित्याचा विस्तार, इतर देशी व प्रमुख परदेशी भाषांमधील उत्तम ग्रंथांचे मराठीत अनुवाद, इतर प्रमुख देशी व प्रमुख परदेशी भाषांमधील ग्रंथ मराठी भाषेत होतील. मराठी भाषा ज्ञानभाषा होण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. त्यातून राज्यातला शैक्षणिक विस्तार वाढेल. मराठीतील साहित्य निर्मिती वाढेल. राज्यातील साहित्य संस्थांना भरघोस आर्थिक बळ मिळेल. हे सारे आपल्या भाषेला ‘अभिजात दर्जा’ मिळाल्यामुळे होईल.

जाता जाता एकच अपेक्षा

उद्घाटन सोहळा ऐतिहासिक असा होणारच आहे. पण संपूर्ण देशातील आणि जगाच्या कानाकोपऱ्यातील मराठी माणसांच्या अस्मितेचा ऐतिहासिक जागरही त्यातून होणार आहे. त्यामुळे आपल्या पूर्वसुरींचेही स्मरण यावेळी झाले पाहिजे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री  यशवंतराव चव्हाण यांचे मराठी भाषा, साहित्य, संस्कृती यातील दूरदृष्टीच्या योगदानाचीही राष्ट्रीय दखल घेतली पाहिजे. त्यांच्या नावाने ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मराठी साहित्य अकादमी’ राज्यशासनाने स्थापन करावी, यासाठी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे व  अजित पवार यांनी ही मागणी प्रधानमंत्री यांच्याकडून विशेष भरघोस अनुदानासहीत मंजूर करुन घ्यावी. स्वागताध्यक्ष  शरद पवार यांनीही आपल्या स्वागताच्या भाषणात हा मुद्दा अधोरेखित करावा, अशी अनेक साहित्यिकांची अपेक्षा आहे.

तेव्हा या मार्गाचे आतंरराष्ट्रीय मार्गात रुपांतर करण्याचे आव्हान राज्यशासन व साहित्यिक संस्था आणि मराठी भाषाप्रेमी यांनी स्वीकारले पाहिजे. त्याचे प्रवेशद्वार ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मराठी साहित्य अकादमी’’ मधून खुले व्हावे. दिल्लीतील हे संमेलन मोठ्या प्रमाणावर यशस्वी व्हावे ही शुभेच्छा !

०००

 

– रविंद्र बेडकिहाळ, फलटण.

(मोबा. 9422400321)

(लेखक महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी तसेच महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष आहेत. तसेच गेली 12 वर्षे महाराष्ट्रात प्रथमच फलटण येथे यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन आयोजनातील प्रमुख संयोजक आहेत.)

अभिजात मराठी आणि दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

नवी दिल्ली येथे होऊ घातलेले ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संमेलन अनेकप्रकारे ऐतिहासिक आहे. यापूर्वी १९५४ रोजी दिल्लीत झालेल्या संमेलनाने संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ मिळाले आणि १ मे १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यानंतर आता ७० वर्षांनी नवी दिल्लीत साहित्य संमेलन होत आहे. दिल्लीत संमेलन होणार अशी घोषणा झाल्यानंतर ‘यामुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा’ मिळणार आहे का?” याविषयी दोन्ही बाजूंनी चर्चा झडायला लागल्या आणि केंद्र सरकारने 3 ऑक्टोबर 2024 रोजी, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देत असल्याची घोषणा केली. याचे कारण काही का असेना,  प्रा. रंगनाथ पठारे यांच्यासह अनेक वर्षांपासून मराठी साहित्यिक, भाषा अभ्यासक आदींनी ही मागणी लावून धरली होती ती पूर्ण झाली. आपल्या मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन…

तसे पाहिले तर दिल्लीसह महाराष्ट्राबाहेर अनेक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने झाली. इंदूर, ग्वाल्हेर, मडगाव, हैदराबाद, कारवार, अहमदाबाद, भोपाळ, रायपूर, पणजी, बडोदे आणि घुमान ही ती शहरे. ही शहरे महाराष्ट्राबाहेर असली तरी या प्रत्येक शहराचा आणि मराठी माणसाचा, संस्कृतीचा अतिशय निकटचा संबंध आहे. शहाजीराजे भोसले, व्यंकोजीराजे भोसले यांच्यामुळे मराठी दक्षिणेत गेली. शिवाजी महाराज, त्यांचे सरदार, पेशवे, विशेषतः पानीपतच्या युद्धासाठी अनेक मराठी माणसे उत्तरेत गेली आणि युद्धानंतर त्या भागातच थांबली. तेलंगणातही मराठी माणूस महाराष्ट्रातून चौदाव्या शतकापासून जातो आहे, स्थायिक होतो आहे. तिथे अनेक शतकांपासून मराठी वस्ती आहे. तिथल्या भजन-कीर्तनात अनेक मराठी अभंग गायले जातात. चारशे वर्षांची मराठी लेखनाची परंपरा आहे. दखनी भाषा तर मराठीच्या सांगाड्यावर उभी राहिली आहे असे प्रतिपादन डॉ. श्रीधरराव कुलकर्णींनी केले आहे. यामुळे मराठीचा आणि ज्याला आपण साकल्याने ‘महाराष्ट्र धर्म’ म्हणतो त्याचा प्रचार आणि प्रसार झाला. त्यामुळे या प्रदेशांना मराठी भाषा तशी नवीन नाही. त्यामुळे संमेलन कुठेही असले तरी मला माझी मायबोली आज आली माहेराला। सभोवती साहित्यिक सुपुत्रांचा मेळा॥ ही सोपानदेव चौधरींची कविता आठवते. सोपानदेव चौधरींनी फार सुंदर वर्णन केले आहे या कवितेते मराठी भाषेचे! डॉ. ना. गो. नांदापुरकरांनीही मराठी भाषा कशी घडत गेली, विकसित होत गेली, जनसामान्यांतून राजदरबारी कशी पोहचली याविषयी फार लोभस शब्दांमध्ये लिहिले आहे.

‘भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचा मग दिवा विझे’, असे कवी कुसुमाग्रजांनी लिहून ठेवले आहे. आपण मात्र दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करुन भाषा आणि संस्कृती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतो आहोत. मराठी भाषेचे संमेलन जसे नियमितपणे होते तसे इतर भाषांचे होत नाही. याबाबत अनेक गैरमराठी साहित्यिकांनी कौतुकोद्गारच काढले आहेत.  गैर-मराठी भाषकांनीही मराठीत उत्तम साहित्यनिर्मिती केली आहे. मराठीपासून दूर गेलेल्या आणि परभाषिक संस्कृतीच्या प्रभावात येणाऱ्यांना मराठीशी पुन्हा जोडून घेण्याची हे संमेलन ही एक उत्तम संधी आहे. पंजाबमधील घुमान येथे ८८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले तेव्हा पंजाब आणि महाराष्ट्राच्या सातशे वर्षे जुन्या सांस्कृतिक समन्वयाला उजाळा मिळाला. तसेच दिल्ली येथेही घडेल. इतिहासातच नव्हे तर आजही दिल्ली आणि महाराष्टाचे राजनैतिक, सांस्कृतिक संबंध आहेतच.

मराठी ही प्राकृत भाषांमधील श्रेष्ठ भाषा आहे असा बहुमान कवी दंडीने केला आहे. असे असले तरी अगदी इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्या काळापासूनच मराठी लयाला जाते आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मराठीचे  स्थान राजदरबारी आणि समाजातही अवनत होत होते. तेव्हा कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनीही चिंता व्यक्त केली होती. आता ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळाल्याने राजदरबारी तरी तिची हेळसांड होणार नाही अशी आशा आहे. समाजाने मात्र तिला अधिक मान देण्याची गरज आहे. त्यामुळे, अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी मराठीला तिचे खरे स्थान तेव्हाच मिळेल जेव्हा ती ज्ञानभाषा होईल असे बहुतांश अभ्यासकांचे म्हणणे आहे. मात्र,  मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यास समर्थ नाही, असा विचार करणारेही अनेक आहेत. मराठी भाषा सिद्धांत, विचार, व्याख्या, संज्ञा समर्थपणे मांडू शकते म्हणून ती ज्ञानभाषाही होऊ शकते. प्राचीन मराठीत असे अनेक ग्रंथ आहेत ज्यामध्ये ज्ञानविचार आहेत, अनेक ग्रंथ असे आहेत जे व्यापार पद्धती, देशात होणारे व्यापार, देशाबाहेर जाणार्‍या व्यापाराची, व्यापारी मार्गांची माहिती देतात, त्यातून त्यावेळची अर्थव्यवस्था, समाजजीवन, संस्कृती, रीतीभाती या सगळ्यांची माहिती होते, मार्गदर्शन मिळते. ऐतिहासिक आणि भौगोलिक माहिती देणारे ग्रंथ आहेत. हे ज्ञानच नव्हे का? तेव्हा, गरज आहे ती आपण, सामन्य माणसांनी हे स्वीकारण्याची आणि तसा प्रचार-प्रसार करण्याची. असे केल्यास रोजगाराच्या संधीही आपोआप निर्माण होतील. तत्त्वज्ञान, नीतीशास्त्र, विज्ञान या ज्ञानशाखांचे लेखनही मराठीत आहेच. म्हणून, अभिजात दर्जा मिळाल्यानंतर अजून मौलिक ज्ञान निर्माण होण्याची शक्यता मला दिसते आहे. अनुवादाचे कार्यही मराठीत मोठ्या प्रमाणावर होते आहे. मराठी भाषेतील साहित्याचा इतर भाषांमध्ये अनुवाद व्हावा यासाठी मात्र आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे.

काळ बदलला की भाषा बदलते हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. प्रत्येक काळात भाषा टिकवणे आणि तिचा उत्कर्ष साधणे यापुढे बरीच आव्हाने असतात. त्या आव्हानांमध्ये तंत्रज्ञानाचाही समावेश आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या ओघात आपण कृत्रिम बुद्धिमत्ता या अचंबित करणाऱ्या आणि तेवढेच विचार करायला भाग पाडणाऱ्या तंत्रज्ञानाशी आलो आहोत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात तर आपल्या मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करायलाच हवे. इतर भाषांमधले शब्द स्वीकारले की किंवा शब्दांची नवनिर्मिती होत असली की भाषा प्रवाही राहाते असे अभ्यासक म्हणतात. मराठीनेही अनेक भाषांमधील अनेक शब्द सहज स्वीकारले आहेत. पण कोणत्याही तंत्रज्ञानाने भाषा गिळंकृत करू नये याची काळजी मात्र आपणच घ्यायला हवी. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दिल्लीत होणाऱ्या या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून सगळ्या आव्हानांना तोंड देत मराठीला आणखी पुढे घेऊन जाण्याचे बळ आपल्याला मिळेल, अशी मला खात्री आहे.

०००     

                  

  • प्रदीप दाते, अध्यक्ष विदर्भ साहित्य संघ, नागपूर, भ्रमणध्वनी 9422144817

 

 

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे लेखन अनमोल ठेवा…

संताची कर्मभूमी असलेल्या महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ, समर्थ रामदास स्वामी, संत जनाबाई, सोयराबाई यांच्या माध्यमातून १२ व्या शतकापासुन आजपर्यंत येथे मराठी भाषा रुजली. अभंग त्यांचे उपदेश आजच्या युगातही समाजाला मार्गदर्शक ठरतात. पुढे मराठीला अनेक जणांनी विविध माध्यमातून समृद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे हे त्यापैकी एक अग्रगण्य नाव म्हणता येईल…

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे आणि मराठी भाषा

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचा जन्म १२ जुलै, १८६४ चा आणि मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले ११ मे, १८७८ रोजी. येथून मराठी साहित्य संमेलनाची परंपरा सुरु झाली.

राजवाडे पुण्यात बीए उत्तीर्ण झाले. डेक्कन आणि एलफिस्टनमध्ये त्यांनी नोकरी केली. डेक्कनमध्ये त्यांनी इंग्रजी विषयाचा अभ्यास केला. ते सर्वभाषा तज्ज्ञ होते. इंग्रजी, पारसी, मोडी, गणित, विज्ञान, मराठी यासह त्यांनी कोपर्निकस, आर्थेलो टेनीसन, शेक्सपीअर, रसेल असे नामांकित लेखक आणि कवी यांचा अभ्यास केला होता. त्यांचे भांषातर करावे म्हणुन राजवाडे यांनी भांषातर मासिक सुरु केले. या सर्वाचे मराठी भांषातर करुन त्यात ते प्रसिध्द करीत असत. परंतु, विष्णुशास्त्री चिपळुणकरांची निंबधमाला राजवाडे यांच्या वाचण्यात आली आणि त्यांनी इंग्रजी लिखाण बंद केले. ज्याला माझ्या लिखाणाची आवड, वाचन, गरज असेल त्यांनी मराठी वाचावे. अशी जणू प्रतिज्ञा केली आणि त्यांचे लिखाण मराठीत सुरु झाले. त्यांचे मराठ्यांच्या इतिहासाची साधने 22 खंड त्यांच्या हयातीतच प्रकाशित केले. हे इतिहासाचे प्रचंड काम त्यांनी करुन ठेवले. आता तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. हे कौतुक पहावयास राजवाडे नाहीत. त्यांना इंग्रजीची चीड होती, असे म्हणून चालणार नाही. त्यांना स्वातंत्र्य हवे होते. कारण ते त्यांच्या चरित्रात खंत व्यक्त करतात की, आजची तरुण पिढी स्वातंत्र्यासाठी का लढत नाही. कारण ते जिथे शिकले तेथे इंग्रजी विद्यार्थी मोठ्या संख्येने होते. तो काळ पारतंत्र्याचा होता.

त्यांनी इतिहास हा इंग्रजीत लिहीला असता तर राजवाडे परदेशातही खूप प्रसिद्ध झाले असते, म्हणून ते म्हणतात मला प्रसिद्धीची हाव नाही. ज्याला गरज असेल तो माझे मराठीतील साहित्य वाचेल. ज्ञार्नाजनाची हौस असेल तर पाश्यात्य लोक माझी मराठी भाषा शिकतील, मी कीर्तिसाठी हपापलेला नाही.

राजवाडे यांना मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले नाही, याचे मात्र दु:ख होते. पण त्याची राजवाडे यांना पर्वाही नव्हती.

न्यायमुर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पहिले संमेलन पुणे येथे ११ मे १८७८ रोजी पुणे येथे भरले होते. न्यायमुर्ती रानडे आणि लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांच्या प्रेरणेने साहित्य संमेलनाला प्रारंभ झाला. ग्रंथकारांनी भरपूर ग्रंथ लिहावे व वाचकांनी भरपूर वाचन करावे, हाच याचा मुख्य हेतू होता.

दुसरे साहित्य संमेलन २४ मे, १८८५ रोजी सार्वजनिक संस्थेच्या जोशी सभागृहात झाले. वेदशास्त्री कृष्णशास्त्री राजवाडे हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. यावेळी महात्मा जोतिबा फुले, जंगली महाराज, डॉ. कानोबा रामछोडदास, महादेव चिमणाजी आपटे यांनी काही सूचना पाठविल्या होत्या.

कादंबरी, कथा, कविता, गझल याचा सगळा सार ग्रंथातच असतो. ग्रंथ वाचन करताना सुख दु:खाच्या गोष्टी कळतात. नवी पिढी, युवकांपर्यंत मराठी साहित्याबद्दल अधिक जवळीकता निर्माण व्हावी. सकारात्मता निर्माण व्हावी आणि वाचन चळवळ वाढावी या उद्देशाने 98 व्या साहित्य संमेलनात चर्चासत्रेही होणार आहे.

आता तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. भारताच्या प्रमुख भाषांमध्ये आता मराठी सन्मानाने विराजमान झालेली आहे. मराठीच्या दृष्टीने या साहित्य संमेलनातून निश्चितच काही तरी चांगले यश मिळेल असे वाटते.

तिसरे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे सन १९०५ या वर्षी झाले. या दरम्यान २० वर्षांचा कालवधी गेला. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी दादासाहेब करंदीकर होते. चौथे संमेलन पुणे येथे झाले. वि. वा. शिरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली गोव्यातील मडगाव येथे १९६४ मध्ये संमेलन झाले. १९६५ मध्ये वा. ल. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली हैदराबाद येथे साहित्य संमेलन झाले. लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर, वि. का. राजवाडे यांना मात्र संमेलनाध्यक्षपद मिळाले नाही.

पहिल्या २७ वर्षात तीन संमेलने झाली. नंतर 1909 ते 1926 दरम्यानही संमेलने झाली नाहीत. पुढे मात्र एखाद्या वर्षाचा अपवाद वगळता संमेलने नियमित भरु लागली.

साहित्य संमेलने आजही महत्त्वाची आहेत. यामुळे विविध ग्रंथांची माहिती मिळते. वाचनप्रेमींकडून ग्रंथाची मोठ्या प्रमाणावर खरेदी होते. विचारांचे आदान प्रदान होते, चर्चासत्रे होतात याचा फायदा होतो.

2027-28 मध्ये वि. का. राजवाडे यांची १०० वी पुण्यतिथी आहे त्या पार्श्वभूमीवर १०० वे साहित्य संमेलन धुळे येथे व्हावे, अशी अपेक्षा आहे.

०००

  • श्रीपाद नांदेडकर, माजी जिल्हा माहिती अधिकारी, 9833421127

 

साहित्य संमेलने:परंपरा आणि परिप्रेक्ष

साहित्यसंमेलनाची परंपरा आता शतकी वाटचाल करीत आहे. मात्र या परंपरेत अनेक परिप्रेक्ष या साहित्यसंमेलने आणि त्यातून निर्माण होणाऱ्या साहित्य प्रवाह, संमेलनांचे स्वरुप, त्यातून व्यक्त होणारे विषय याबाबत अनेक परिप्रेक्ष तयार होतांना दिसतात. त्याचाच धांडोळा घेतलाय ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यीक प्रशांत गौतम यांनी.
नवी दिल्ली येथे ७२ वर्षापूर्वी ऑक्टोंबर महिन्यात ५४ वे साहित्य संमेलन झाले होते. तेव्हा,महाराष्ट्र राज्याची निर्मितीही झाली नव्हती,आणि अ.भा.मराठी साहित्य महामंडळही अस्तित्वात नव्हते. या ५४ व्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरु यांनी केले होते. अध्यक्ष होते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी,आणि स्वागताध्यक्ष होते,काकासाहेब गाडगीळ. त्यानंतर दिल्लीत साहित्यसंमेलन होत आहे ते यंदाच. ९८ व्या संमेलनासाठी उद्घाटक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी लाभले आहेत,अध्यक्षपदाचा बहुमान डॉ.ताराबाई भवाळकर यांना मिळाला आहे.तर स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार आहेत.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला,त्या अनुषंगाने देशाच्या राजधानीत होणाऱ्या साहित्य संमेलनास महत्व आहे.
दोन मराठी माणसं एकत्र आली की साहित्य संस्था निर्माण होतात, असे म्हणतात ते खरेच आहे. आधीच्या काळात तेच होते, आणि आताच्या काळात ही तेच आहे. यात काहीही बदल झालेला नाही. संस्था व संमेलने वर्धिष्णू असतात. वर्षानुवर्ष हा साहित्याचा प्रवाह हा अखंड सुरुच असतात. साहित्य संमेलनाची परंपरा आता शतकाकडे जाते आहे. या प्रदिर्घ कालखंडात किती तरी बदल झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात मराठी भाषेचे अस्तित्व टिकवण्यासाठी संस्था आल्या. नंतर त्यांचा विस्तार झाला. पुढील काळात याच साहित्य संस्थांचे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ अस्तित्वात आले. संमेलने त्या आधीही ‘ग्रंथकार संमेलन, महाराष्ट्र साहित्य संमेलन’,या नावाने भरतच होती. तेव्हा निवडणूक नव्हती.
१९६४ साली अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय झाला,आणि १९६५ साली महामंडळाचे पहिले संमेलन हैदराबादेत समीक्षक प्रा.वा.ल कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली भरले. तेव्हा पासून ही परंपरा अखंडीत आहे.
नवी दिल्लीत तर यंदाचे संमेलन ७२ वर्षाने होत आहे. हे संमेलन झाले तेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मितीही झाली नव्हती. तो काळ संयुक्त महाराष्ट्र चळवळीने भारावलेला होता. दिल्लीचे संमेलन १९५४ साली झाले आणि १ मे १९६० साली महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. आणि मराठी साहित्यात साठोत्तरी प्रवाह यायला सुरूवात झाली.
मराठवाड्याच्या संदर्भात सांगायचे तर आजपर्यंत मराठवाड्यात झालेल्या सात संमेलनाचे अध्यक्षपद मराठवाड्याबाहेरील लेखकांनी भूषवले. केवळ एका संमेलनाचे अध्यक्षपद भूमीपुत्र भारत सासणे यांनी भूषवले. अनंत काणेकर (छत्रपती संभाजीनगर), शंकर पाटील (नांदेड), व्यंकटेश माडगुळकर (अंबाजोगाई), नारायण सुर्वे (परभणी), प्रा.द.मा.मिरासदार (परळी), प्रा.रा.ग.जाधव (छत्रपती संभाजीनगर), फादर फ्रान्सिस दिब्रिटो (धाराशीव), भारत सासणे (उदगीर) असे सांगता येईल. तर मराठवाड्यातील लेखक डॉ.यू.म.पठाण (पुणे), डॉ.नागनाथ कोत्तापल्ले (चिपळून), प्रा.फ.मु.शिंदे(सासवड), लक्ष्मीकांत देशमुख (बडोदा), डॉ.श्रीपाल सबनीस (पिंपरी-चिंचवड), नरेंद्र चपळगावकर(वर्धा) येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
मराठी साहित्य संस्कृती,कशी असते हे पाहयचे असेल तर साहित्य संमेलन चळवळीचा इतिहास आणि सद्याचे वर्तमान बघायला हवे. जगात मराठी ही अशी भाषा आहे की फक्त तिचाच साहित्य संमेलनाचा उत्सव उदंड उत्साहात होत असतो. आज सर्वाधिक साहित्य संमेलने ही मराठी भाषेचीच होतात. तालुका, जिल्हा, विभाग, राज्य पातळीवर तर मोठ्या संख्येने संमेलने होतात. विश्व मराठी साहित्य संमेलन होतात; पण कायम लक्षात राहातात ती प्रतिवर्षी होणारी अ.भा.मराठी साहित्य संमेलने. ही संमेलने नव्या-जुन्या लेखकांना हक्काचे व्यासपीठ देतात, वाचकांना आपल्या आवडीचा लेखक भेटतो आणि ग्रंथ प्रदर्शनातून त्याचे आवडीचे पुस्तक मिळते. अशा ग्रंथ प्रदर्शनातून प्रकाशकांनाही फायदा होतो.
१९८९ साली पहिली जागतिक मराठी साहित्य परिषद मुंबईयेथे कुसुमाग्रजांच्या अध्यक्षतेखाली भरली होती. नंतरच्या काळातही सातत्य राहिले. साहित्य महामंडळानेही अशा तीन चार जागतिक मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. यात गाजले ते सॅन होजे व (अमेरिका), दुबई येथील संमेलन, या निमित्ताने मराठीचा झेंडा साता समुद्रापार फडकला. राज्य सरकारने प्रतिवर्षी जिल्हा व विभागीय स्तरावर मराठी साहित्य संमेलन भरवण्याचा चांगला उपक्रम सुरू केला आहे. छोट्या व आटोपशीर संमेलनास प्रतिसादही उत्तम लाभतो. तसेच राज्य सरकारने तीन विश्व मराठी साहित्य संमेलनं आयोजित केली. मुंबई, नवी मुंबई आणि पुणे. पुण्यात नुकत्याच झालेल्या विश्वसंमेलनात तर कोट्यावधीची आर्थिक उलाढाल झाली, विक्रमी पुस्तक विक्री झाली. म्हणून प्रत्येक रसिक,वाचकांना साहित्य संमेलनाची उत्सुकता असते,तशी देशाच्या राजधानीत होणाऱ्या संमेलनाचीही आहे.
बृहन्महाराष्ट्रातील संमेलने
या मराठी साहित्य संमेलनास अनेक परंपरा आहेत. या ९८ वर्षातील २४ संमेलनं ही महाराष्ट्रा बाहेर झालेली आहेत. बडोदे, इंदूर, ग्वाल्हेर, बेळगाव, मडगाव, हैदराबाद, कारवार, अहमदाबाद, नवी दिल्ली, भोपाळ, रायपूर(छत्तीस गड) पणजी, घुमान(पंजाब) यातील काही ठिकाणी दोन-तीन वेळा संमेलने भरली आहेत. बृहन्महाराष्ट्रात तर बडोदा येथील वाड.मय परिषद यांची संमेलन वाटचाल अमृत महोत्सवाकडे सुरू आहे. नवी दिल्ली येथील बृहन्महाराष्ट्र मंडळाचीही तेवढीच अधिवेशनं झालीत. या शिवाय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनंही एका काळात भरली होती.
परंपरेची रुजुवात
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी सुरू केलेली १८७८ पासून सुरु असलेली ही परंपरा अखंडीत राहिली असती, त्यात सातत्य राहिले असते तर दिल्लीचे संमेलन हे ९८ ऐवजी १४७ वे ठरले असते. या प्रवाहात विविध कारणाने खंड पडला; हे मात्र खरे. स्वातंत्र्यपूर्व काळात संमेलनाचे आयोजन करणे ही साधी बाब नव्हती, त्यावर मात करीत संमेलन सातत्य राखण्याचा प्रयत्न तत्कालीन लेखक व कार्यकर्त्यांनी केला होता. तेव्हा पासूनचा आज पर्यंतचा साहित्य संमेलनाचा प्रवास फारच रंजक आहे,कसा तो आपण जाणून घेवू या!
साहित्यसंमेलनांची परंपरा
यंदाच्या संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. ताराबाई भवाळकर या नियोजित आहेत. आयोजक पुण्यातील सरहद्द संस्था आहे.संजय नहार हे संस्थापक अध्यक्ष आहेत. सरहद्दचे कश्मीर भागात उत्तम,शैक्षणिक, सामाजिक काम आहे. याच आयोजकांनी संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली घुमान येथील ८८ वे साहित्य संमेलन चांगले आयोजित केले होते. नंतरच्या वर्षी बहुभाषा संमेलनही डॉ.गणेश देवी यांच्या अध्यक्षतेखाली घुमान येथेच घेतले होते. दिल्ली येथील साहित्य संमेलनाचेही तेच आयोजक आहेत.
पहिले मराठी साहित्य संमेलन ७ फेब्रुवारी १८७८ या दिवशी पुण्यात न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते. या संदर्भात “ज्ञानप्रकाश ” या नियतकालिकात रानडे आणि लोकहितवादी(गोपाळ हरी देशमुख)यांचे संयुक्त निवेदन प्रसिध्द झाले. ग्रंथकार संमेलन भरविण्याचा प्रस्ताव आला, त्यास ५० साहित्यिकांचा पाठिंबा होता. खरे तर रानडे यांचे एकही पुस्तक नसले तरी त्यांनीच संमेलनाचे अध्यक्षपद भूषवावे, असा लोकहितवादींसह अन्य प्रतिष्ठीत लेखकांचा आग्रह होता. २४ मे १८८५ या दिवशी पुण्यात दुसरे ग्रंथकार संमेलन झाले. कृष्णाशास्त्री राजवाडे हे अध्यक्ष होते. संमेलनासाठी न्या.रानडे यांनी पुढाकार घेतला होता.
तो काळ होता संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा. साल होते १९५७. तत्कालीन औरंगाबाद आणि आताचे छत्रपती संभाजनगर येथे लघुनिबंधकार अनंत काणेकर यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन सरस्वती भुवन प्रशालेत झाले. मराठी साहित्यातील ऐकापेक्षा एक दिग्गज लेखक-दत्तो वामन पोतदार, कुसुमाग्रज, आचार्य अत्रे, पु.ल.देशपांडे, वसंत बापट, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर अशी ग्रेट मंडळी हजर होती. यात “,संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे “,असा ठराव मंजूर झाला. पु.ल.देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली इचलकरंजीत सुवर्ण महोत्सवी संमेलन झाले. कराडला जेव्हा १९७५ साली आणीबाणीच्या काळात जे अ.भा.मराठी साहित्य संमेलन झाले. त्याच्या अध्यक्ष दुर्गाबाई भागवत तर स्वागताध्यक्ष यशवंतराव चव्हाण होते. मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या प्रश्नाने पुण्यातील पु.भा.भावे यांच्या अध्यक्षते खालचे व कथालेखक वा.कृ.चोरघडे यांच्या अध्यक्षतेखालचे चंद्रपुर येथील संमेलन फारच गाजले होते. १९८१ मध्ये ५६ वे संमेलन मध्यप्रदेशात रायपूर येथे झाले.अध्यक्ष होते गंगाधर गाडगीळ. नगर येथे झालेले संमेलन उंचीवर नेणारेच होते. ऐतिहासिक कादंबरीकार ना.स.इनामदार अध्यक्ष होते. गुलजार उद्घाटक तर गिरीष कर्नाड समारोपात होते. एप्रिल १९९८ मध्ये परळी वैजनाथ येथे साहित्यसंमेलन झाले. द.मा.मिरासदार हे संमेलनाचे अध्यक्ष होते. समारोपात ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या लेखिका महाश्वेतादेवी हजर होत्या.आशा भोसले यांच्या गाण्यांची मैफल रंगली होती, अशा प्रकारे सामाजिक प्रश्नांवरही साहित्यसंमेलनातून भुमिका मांडण्यात आली आहे.
महिला अध्यक्षांची परंपरा
शतकाकडे वाटचाल करणाऱ्या या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून महिलांना मान मिळाला तो सहा महिला साहित्यिकांना. कुसुमावती देशपांडे(ग्वाल्हेर), दुर्गा भागवत(कराड), शांताबाई शेळके(आळंदी), डॉ.विजया राजाध्यक्ष(इंदूर), डॉ.अरुणा ढेरे(वर्धा)आणि आत्ताच्या संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष डॉ.ताराबाई भवाळकर(नवी दिल्ली).
संमेलन गाजतात लक्षात राहातात ती उत्तम नियोजन,भोजन व्यवस्थेमुळे. अशा संमेलनातून ग्रंथ विक्री उदंड होते,ती संमेलने यशस्वी होतात. संमेलन म्हटले की वाद-विवाद सोबतच येतात. असे असले तरी जगभरातील मराठी भाषक संमेलनावर फार प्रेम करतो,गर्दी करतो. संमेलन येण्याची उत्सुकता साहित्यप्रेमी वाचकांना असते आणि संमेलन संपले की रिकाम्या मांडवाकडे पाहून हुरहुर वाटते,आणि काही दिवसांनी पुन्हा संमेलनाचे दिवस आनंद घेवून येतात..
लेखक- प्रशांत गौतम.
(लेखक हे साहित्यिक,ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
०००००

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे ते दिल्ली यादरम्यान महादजी शिंदे यांच्या नावाने विशेष रेल्वे सेवा-डॉ.किरण कुलकर्णी

पुणे, दि.१७: दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर या संमेलनात सहभागी होणाऱ्या साहित्य रसिकांसाठी पुणे ते दिल्ली यादरम्यान महादजी शिंदे एक्सप्रेस ही विशेष रेल्वे सेवा सुरु करण्यात येणार आहे, ही विशेष रेल्वे १९ फेब्रुवारी रोजी दुपारी पुण्यातून निघणार असून २० फेब्रुवारी रोजी रात्री दिल्ली येथे पोहोचणार आहे, अशी माहिती मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांनी दिली आहे.

दिल्ली येथे २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी, ताल कटोरा स्टेडियम येथे हे संमेलन होत आहे. या साहित्य समेंलनात सहभागी होणाऱ्या साहित्य रसिकांकरीता सुरु करण्यात येणाऱ्या या रेल्वेच्या डब्यांना गडकिल्यांची नावे देण्यात येणार आहे.

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासादरम्यान फिरत्या चाकांवर प्रवासी साहित्य संमेलन या संकल्पनेतून ‘मराठी साहित्ययात्री संमेलन’ आयोजित करण्यात येणार आहे. मुख्य संमेलनानिमित्त रेल्वेत होणारे हे मराठीतील पहिलेच आणि जगातील सर्वात मोठे आणि दिर्घ साहित्य संमेलन असणार आहे.

पुणे-दिल्ली प्रवासादरम्यान रंगणार ‘मराठी साहित्ययात्री संमेलन’

साहित्यरसिकांना पुण्यातून दिल्लीला घेऊन जाणाऱ्या रेल्वेला महान सेनानी महादजी शिंदे यांचे नाव देण्यात येणार असून या विशेष रेल्वेला १६ डब्बे असणार असून डब्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांची नावे दिली जाणार आहेत. राज्याचे मराठी भाषामंत्री उदय सामंत या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून तेही ‘मराठी साहित्ययात्री संमेलनात’सहभागी होत आहेत. ते या रेल्वेद्वारे प्रवास करणार करणार आहेत आणि साहित्यिक, कलावंतांशी ते संवाद साधणार आहेत. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखिका डॉ. संगीता बर्वे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. प्रवासा दरम्यान प्रत्येक बोगीत विविध साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जाणार आहेत.

युवा साहित्यिक व कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ‘मराठी साहित्ययात्री संमेलन भरविण्यात येत आहे.‘मराठी साहित्ययात्री संमेलनात’महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गावा-गावांमधून साहित्यिक, युवक, लोककलाकार, स्टँडअप कॉमेडियन्स, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स तसेच शाहिर व भजनी मंडळांचा मोठ्या संख्येने सहभागी होणर आहे. मोठ्या प्रमाणात तरुणांच्या सहभागामुळे हे संमेलन तरुणाईचे संमेलन ठरणार आहे.

१९ रोजी असलेल्या शिवजयंतीचे औचित्य साधून सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्र गीताच्या सामूहिक गायनानंतर पुण्यातून रेल्वे निघणार आहे. तत्पूर्वी पुस्तक दिंडीही काढली जाणार आहे. याच रेल्वे प्रवासात १ हजार २०० पेक्षा अधिक साहित्यिक येणार असून जळगाव आणि ग्वाल्हेर येथे ही विशेष रेल्वे पोहोचल्यानंतर ग्वाल्हेर येथील स्थानिक नागरिक भव्य स्वागत करणार आहेत. रेल्वे २० फेब्रुवारी रोजी दिल्लीत पोहोचणार असून दिल्ली स्थानकावर पोहोचल्यानंतर पसायदानाने ‘मराठी साहित्ययात्री संमेलना’ची व पहिल्या टप्प्यातील प्रवासाची सांगता होणार आहे. या वेळी दिल्लीतील मराठीजन मोठ्या संख्येने स्वागतासाठी उपस्थित राहणार आहेत. परतीच्या प्रवासात देखील हे संमेलन रंगणार असून २५ फेब्रुवारी रोजी पुणे रेल्वे स्थानकावर या संमेलनाची समारोप होणार आहे.

या अभिनव उपक्रमाची संकल्पना सरहद, पुणेचे अध्यक्ष संजय नहार यांची आहे. संमेलनाच्या निमित्ताने स्वतंत्र संयोजन समितीची स्थापना करण्यात आली आहे. रावण द आंत्रप्रिन्युअर या पुस्तकांचे लेखक शरद तांदळे यांची संमेलनाध्यक्ष तर वंदेमातरम् संघटनेचे अध्यक्ष व व्हायरल माणुसकी या पुस्तकाचे लेखक वैभव वाघ हे संमेलनाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. डॉ. शरद गोरे (कार्याध्यक्ष), सचिन जामगे (कार्यवाह), ॲड. अनिश पाडेकर, सोमनाथ चोथे, गणेश बेंद्रे (मुख्य समन्वयक), अक्षय बिक्कड, सागर काकडे (निमंत्रक) यांचा कार्यकारिणीत समावेश आहे, अशी माहिती डॉ. कुलकर्णी यांनी दिली आहे.

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची नांदेड येथे उत्सुकता

मराठी सारस्वतांचा महामेळाव्याला लेखक, प्रकाशक व भाषा तज्ज्ञांच्या शुभेच्छा

नांदेड दि. १७ फेब्रुवारी  :- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे आणि त्यानंतर पहिल्यांदाच दिल्लीत 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य होणे हा दुग्ध शर्करा योग आहे. या साहित्य संमेलनाला मराठी साहित्यिक, सारस्वतांचा महामेळावा दिल्लीत भरणार असून मराठी व अमराठी रसिकांसाठी ही आनंदाची पर्वणी ठरणार आहे. यानिमित्ताने नांदेड येथील लेखक, साहित्यिक, संपादक यांनी या संमेलनाला उपस्थित राहून अनेक ग्रंथसंपदाचा आनंद घेणार असल्याचे मत व्यक्त केले आहे.

तमाम मराठी साहित्यिक, रसिक या संमेलनाची आतुरतेने वाट पाहत असतो. आता तो क्षण समिप आला आहे. या क्षणाला साक्षीदार होण्यासाठी अनेक मराठी साहित्यिक, रसिक, वाचक दिल्ली येथे हजेरी लावणार आहेत. अशा नांदेड जिल्ह्यातील कवि, विचारवंत, मराठी साहित्यीकांच्या बोलक्या प्रतिक्रीया ….

नांदेड येथील मराठी भाषा प्रमुख प्रा. डॉ. पृथ्वीराज तौर हे सांगतात की , ‘माझी मराठी मराठाच मी’ ना.गा. नांदापूरकर यांच्या कवितेतून स्वातंत्र्यपूर्व काळात दिलेली निजामी राजवटी विरोधात घोषणा या 98 व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आठवण होते. एके काळी मराठयांनी आपला सैन्य तळ दिल्लीत ठोकला होता, त्याच ठिकाणी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियमवर साहित्य संमेलन होत आहे. मराठीवर प्रेम करणाऱ्या, सर्व व्यक्तीसाठी तसेच मराठी संस्कृतीचा आग्रह धरणाऱ्यासाठी ही घटना महत्वाची आहे. दिल्ली येथे साहित्य संमेलनाच्या माध्यमातून उच्चारला जाणारा आवाज जगभर जावा ही मराठी भाषा, संस्कृतीची पताका जगभर फडकविण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यासोबत त्यांनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ऋण व्यक्त केले आहे.

ज्येष्ठ साहित्यिक ,कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर या सांगतात की, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जोरदार तयारी दिल्ली येथे सुरु आहे. याचा मला मनस्वी आनंद आहे. मराठी भाषा संत ज्ञानेश्वरानी म्हटल्यासारखे अमृता सोबत पैज जिंकल्यासारखे मधुर आहे. या संमेलनाला मराठी, अमराठी भाषिकांनी पहावे, एकावे, मराठीची मधूरता चाखावी असे आवाहनही त्यांनी केले. साहित्य संमेलन व मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर प्रत्येक मराठी माणसाने अचूक मराठी बोलावे, इतर भाषेचे शब्द न वापरता शुध्द मराठी भाषा बोलावी. यामुळे मराठी भाषा जगणार आहे. तसेच या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा साहित्यिक मा. डॉ. ता.रा. भवाळकर यांची निवड झाल्याबाबात त्यांना कवयित्री डॉ. किन्हाळकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

कवि कादंबरीकर मनोज बोरगावकर यांनी या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपले विचार व्यक्त केले आहेत की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यादाच दिल्लीत ९८ वे मराठी साहित्य संमेलन होत आहे. याबाबत त्यांनी केंद्र शासनाचे आभार मानले असून दिल्लीकराचे स्वागत केले आहे.

विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती, म्हणून तीजला भिती नव्हती पराभवाची

जन्मासाठी नव्हती कधी हटून बसली, म्हणून तिजला नव्हती मरणाची या सुंदर भावनेने साहित्यीकांचा हात लिहता राहतो. खेड्यात लहान मुले जसे जत्रेची आतुरतेने वाट पाहत असतात. तसा तमाम मराठी साहित्यिक या संमेलनाची वाट पाहत असतो. आज हा सोहळा दिल्लीत असून यानिमित्ताने सर्व साहित्यीकांना भेटता येईल, विचाराची शिदोरी बरोबर घेता येईलअसे मत त्यांनी व्यक्त केले.

प्रकाशक, संपादक, राम शेवडीकर यांनी या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी सारस्वतांचा मेळावा दिल्लीत भरणार असून यांचे आकर्षण तर सर्वाना आहेच, तसेच अभिमान ही वाटतो असे सांगितले. तसेच दिल्लीत मराठीचा झेंडा असाच उंच फडकत राहो अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या साहित्य संमेलनाच्या सर्व मराठी, अमराठी भाषिकांना शुभेच्छा दिल्या.

जिल्हा मराठी भाषा समितीच्या सदस्या प्रा. प्रतिक्षा तालंगकर या आपल्या शब्दातून व्यक्त होतात की, ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ ही कवी कल्पना नसून वास्तव आहे. 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने हे दाखवून दिलेले आहे. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ज्या मराठी माणसाची मुले इंग्रजी शाळेत भाषेत शिकतात, त्या मराठी माणसाने घरात, समाजात वावरताना मुलांसोबत मराठीत बोलले पाहिजे. मराठी भाषेचा वारसा देणे ही आपली जबाबदारी व कर्तव्य आहे. चला तर मग मराठी भाषेला ज्ञान भाषा बनविण्याची सुरवात आपल्या घरापासून करु यात व समृध्द मराठी भाषा बनवुयात, दिल्लीतील मराठी जागराचा आनंद घेऊ या !

0000

कोल्हापूर शहरातील अशा ६२४ कोटी रुपयांच्या प्रस्तावित प्रकल्पाला तत्त्वत: मान्यता- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 

कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग विकास कामांचा घेतला आढावा

कोल्हापूर शहरातील वाहतूक प्रश्न आणि महामार्गावरील पुरस्थितीवर निघणार लवकरच तोडगा

कोल्हापूर, दि.१७: रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री, नितीन गडकरी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग विषयक विकास कामांचा आढावा कोल्हापूर विमानतळ येथे घेतला. कोल्हापूर शहरातील वाहतूक प्रश्न आणि महामार्गावरील पुरस्थिती यावर मार्ग काढण्यासाठी शहरात फ्लायओव्हर आणि राष्ट्रीय महामार्गावर बास्केट ब्रिज अशा ६२४ कोटी रुपयांच्या प्रस्तावित प्रकल्पाला त्यांनी तत्त्वत: मान्यता दिली. तसेच याबाबतचे संकल्प चित्र डिझाइन तातडीने सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक संजय कदम यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

रत्नागिरी कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग १६६ वरील यावळुज ते शिवाजी पूल अशा १०.८ किमी रस्त्याचे रूंदीकरण, पुराच्या पाण्याच्या ठिकाणी उंची वाढविणे, पुराच्या पाण्यामुळे जो बंधारा निर्माण होत आहे त्या ठिकाणी काँक्रीटचे मोठे बॉक्स देणे जेनेकरुन वाहतूकीस अडथळा न होता पुराच्या पाण्याचा लवकर निचरा होईल. तसेच कोल्हापूर शहरातील शिवाजी पूल ते तावडे हॉटेल पर्यंतचा ६.८ किमीचा उड्डान पूलासाठी तत्वत: मान्यता दिली. यासाठी आवश्यक लाईट व पाऊसपाणी निचरा इ. अनुषंगिक कामांसाठी आवश्यक निधी महापालिका व राज्य शासनाने करावा असे ठरले. गगनबावडा ते रत्नागिरी मार्गावर महापालिकेच्या जागेवरील दोन किमीचा जोड रस्त्यासाठी जागा उपलब्ध करून देवून शहरातील फ्लायओवरला जोडावा असाही प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. तसेच सुरू असलेल्या सातारा कागल रस्त्याच्या कामातील अडथळे दूर करून डिसेंबर २०२५ पुर्वी सर्व कामे पुर्ण करण्याच्या सूचना केल्या.

याचबरोबर रत्नागिरी कोल्हापूर रस्त्यावरील असलेले जमीनीचे अडथळे दूर करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जमीनीचे प्रश्न आठ दिवसात मिटवून ती जागा हस्तांतरीत करू. तसेच ज्यांचे पैसे वाटप शिल्लक आहे त्यांचेपण एक महिन्यात पैसे वाटप करून तीही जागा हस्तांतरीत करू असे सांगितले. यामुळे राष्ट्रीय महामार्गचे आंबा ते पैजारवाडी व पैजारवाडी ते चोकाक ही दोन्ही कामे एप्रिल २०२६ अखेर पुर्ण होणार आहेत. याठिकाणच्या लोकप्रतिनीधी व नागरिकांच्या मागणीनुसार आंबा ते पैजारवाडी या दरम्यान ५ अंडरपास व ७ किमीच्या सेवा रस्त्याला तसेच पैजारवाडी ते चोकाक यादरम्यानच्या ५ अंडरपास व १७ किमीच्या सेवा रस्त्यालाही यावेळी तत्वत: मान्यता देण्यात आली. तसा प्रस्तावही दिल्लीला सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

उपस्थित खासदार धनंजय महाडिक आणि आमदार महोदयांनी जिल्हावासियांच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले. यावेळी खासदार श्री. महाडिक म्हणाले, ही बैठक व्यापक स्वरूपात झाली असून शहरातील वाहतूक प्रश्न मार्गी लागेल. यातुन जिल्ह्यातील नागरिक आणि येणारे सर्व भाविक पर्यटक यांना वाहतुकीचा त्रास सहन करावा लागणार नाही. तसेच गडहिंग्लज व आजरा शहरासाठी रींग रोडचीही मागणी करण्यात आली असून त्याचा प्रस्ताव देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

०००००००

स्व. बाळासाहेब ठाकरे सिंचन योजनेमुळे सांगोला तालुका पूर्णपणे दुष्काळमुक्त होणार – राधाकृष्ण विखे पाटील

योजनेसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही 

तीन वर्षात योजना पुर्ण करण्यात येणार

पंढरपूर (दि.१७) :- स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजेनेचे काम सुरु होणार असल्याने  १२ गावातील सुमारे १५ हजार ४०० हेक्टर जमीनींना बंदिस्त नलिकेव्दारे शेतीला लवकरच कायमस्वरुपी पाणी मिळणार आहे. यामुळे सांगोला तालुक्यातील  दुष्काळ कायमस्वरुपी संपून तालुका शंभर टक्के दुष्काळमुक्त होणार आहे असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना सांगोला या योजनेच्या कामाचे भूमिपूजन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख, माजी खासदार रणजीतसिंह नाईक- निंबाळकर, माजी आमदार शहाजीबापू पाटील, दीपक साळुंखे पाटील, जलसंपदा विभागाचे  मुख्य अभियंता डॉ. ह.तु.धुमाळ, भीमा कालवा अधिक्षक अभियंता धीरज साळी यांच्या मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बोलताना म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प केला आहे. राज्यातील शेतकरी  दुष्काळातून आता मुक्त झाला पाहिजे.  स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या कामास शासनाने सुधारीत प्रशासकीय मंजुरी दिली या योजनेकरिता उजनी धरणामधून  दोन टीएमसी पाण्याची तरतूद असून या पाण्याद्वारे सांगोला तालुक्यातील १२ गावातील सुमारे १३ हजार ५५ हेक्टर क्षेत्रास व सांगोला शाखा कालवा क्र. ५ अंतर्गत २ हजार ३४५ हे. असे एकूण १५ हजार ४०० हे. क्षेत्राचा सिंचनाचा लाभ मिळणार आहे. ब-याच वर्षापासून शेतकऱ्यांची मागणी यानिमित्ताने पूर्ण होत असून कायमस्वरुपी दुष्काळ असलेला हा भाग सिंचनाने सुजलाम-सुफलाम होणार आहे.  पुढील तीन वर्षात ही योजना पुर्ण करण्यात येणार आहे. या योजनेसाठी लागणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही . राज्यामध्ये   सांगोला तालुका हा पूर्णतः दुष्काळमुक्त होण्याचा काम होत आहे. आणि याचे भाग्य मला मिळाले याचा आनंद आहे.पुढील पाच वर्षांमध्ये  संपुर्ण महाराष्ट्र राज्य दुष्काळमुक्त  करण्यासाठी  शासन शासन  कटिबध्द आहे.

सांगोला तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी अविरत प्रयत्न्न केले असून त्यांची आठवण आज आल्याशिवाय राहत नाही.  पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी  दुष्काळी भागासाठी अविरतपणे संघर्ष करुन  माण खटाव तालुका पूर्णतः दुष्काळमुक्त केला आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून हा जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचा  संकल्प त्यांनी केला आहे. माजी आमदार शहाजी पाटील व माजी खासदार रणजिसिंह नाईक-निंबाळकर यांनी  ही योजना मार्गी लावण्यासाठी सतत पाठपुरावा केला   असल्याचे जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी यावेळी सागितले.

यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, सांगोला तालुका पिढयान-पिढया दुष्काळाशी संघर्ष करीत असणारा शेतकरी दुष्काळ संपावयसाठी आस लावून बसलेला आहे. आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजेनेच्या कामांमुळे सांगोला तालुका पुर्णपणे दुष्काळमुक्त होणार आहे. पिढ्यान् पिढ्या दुष्काळाशी संघर्ष करणाऱ्या मातीचे दुख संपले आहे.  माण-खटाव- फलटण -सांगोला तालुक्यातील दुष्काळ संपविण्यासाठी प्रयत्न केला असून ,सद्यस्थित माण-खटाव मध्ये शेतील मुबलक पाणी असून चार ते पाच साखर कारखाने आहेत.  सातारा जिल्ह्यातील राजेवाडी तलावातील शिल्लक राहणारे पाणी सांगोला तालुक्याला देणार असून,  दुष्काळ भागातील तुमचा सहकारी म्हणून कायम तुमच्या बरोबर उभा राहिन असेही त्यांनी यावेळी सांगतिले. तसेच दुष्काळी भागाच्या संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब विखे पाटील होते.. ज्या, कुटुंबातील माणसाने पाण्यासाठी संघर्ष केला होता. त्या बाळासाहेब विखे पाटील यांच्या मुलांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ होतोय. याचा अभिमान  वाटत असल्याचे पालकमंत्री श्री गोरे यांनी सांगितले.

यावेळी माजी खासदार  रणजितसिंह नाईक- निंबाळकर, माजी  आमदार शहाजी पाटील व माजी आमदार दिपक साळुंखे-पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

प्रारंभी सर्व मान्यवरांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजेनेच्या संकल्प चित्राची पाहणी केली.

00000000

ताज्या बातम्या

आयआयटी, आयआयएमच्या धर्तीवर राज्यात “इंडियन इन्स्टिट्युट ऑफ पब्लिक हेल्थ” स्थापन करण्यासह नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आरोग्यमंत्र्यांकडे...

0
मुंबई, दि. 21 : आरोग्य क्षेत्रात राज्य व देश पातळीवर अभिनव व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सर्वसामान्य नागरिकांना उत्कृष्ठ आरोग्यसेवा देणाऱ्या सेवाभावी संस्थानी आज आरोग्य...

भटक्या-विमुक्तांचे सर्वेक्षण करून दाखले तत्काळ वितरित करा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

0
मुंबई, दि. २१ : भटक्या व विमुक्त जमातींच्या नागरिकांसाठी मंडळनिहाय शिबिरे आयोजित करण्यात यावीत. सर्वेक्षण करून, त्यांना महत्वाच्या दाखल्यांचे वितरण करुन शासकीय योजनांचा तातडीने लाभ मिळवून...

धुळे जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतीची विशाल भरारी; देशपातळीवरील ई-गर्व्हनन्स सुवर्ण पुरस्कार जाहीर

0
धुळे, दि. २१ (जिमाका वृत्तसेवा) : केंद्र शासनामार्फत आयोजित राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स २०२३-२४ स्पर्धेत महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रोहिणी ग्रामपंचायत देशपातळीवरील ई-गर्व्हनन्स सुवर्ण पुरस्कार...

पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने तयारीचा विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी घेतला आढावा 

0
मुंबई, 21 : आगामी पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने  विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामकाज सुरळीत होण्यासाठी नियोजन योग्य करण्याच्या सूचना...

पुणे व पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेने पूररेषा नियंत्रित करून अतिरिक्त जागेचा विकास करावा – नगरविकास...

0
मुंबई, दि. 21 : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातून जाणाऱ्या नद्यांची पुररेषा नियंत्रित करून अतिरिक्त जागा विकासासाठी उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने गुजरात राज्याच्या धर्तीवर रिव्हर बंडिंगचा पर्याय...