बुधवार, मे 21, 2025
Home Blog Page 210

अंगणवाडीत साजरी होणार शिवजयंती- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. १७ : राज्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये शिवजयंती साजरी करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

१९ फेब्रुवारी रोजी निमित्त राज्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यावेळी अंगणवाडीतील बालकांनाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची महती समजावी व त्यांच्या बालमनावर महाराजांच्या कार्याचे संस्कार व्हावे, याकरिता अंगणवाड्यांमध्येही मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात येणार आहे. यावेळी बालकांना शिवाजी महाराजांच्या बालपणीच्या गोष्टी सांगण्यात येतील तसेच राजमाता जिजाऊ आणि शिवाजी महाराज यांची वेशभूषा परिधान असे अनुषांगिक उपक्रमही घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

000

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

राज्यपाल, उदय सामंत यांच्या उपस्थितीत ‘आम्ही असू अभिजात’चे प्रकाशन

राज्यपाल राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत मराठी साहित्य संमेलन गीताचे राजभवन येथे उदघाटन संपन्न

मुंबई, दि. १७ : नवी दिल्ली येथे होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त तयार करण्यात आलेल्या संमेलन गीताचे प्रकाशन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते तसेच उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन, मुंबई येथे करण्यात आले.

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून चित्रित करण्यात आलेल्या या गीतासोबत राज्याचा गौरवशाली इतिहास दाखविण्यात आला आहे.

सन २०२४ या वर्षात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे हे वर्ष मराठी भाषेकरिता अतिशय संस्मरणीय झाले आहे. मराठी भाषेला जागतिक स्तरावर नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, इंग्रजीच्या वाढत्या प्रभावामुळे प्रादेशिक भाषांच्या संवर्धनासाठी सर्वांनाच कसोशीने प्रयत्न करावे लागतील नाहीतर प्रादेशिक भाषा केवळ बोलण्याच्या  भाषा राहतील असे राज्यपालांनी सांगितले.

मराठी भाषा ही संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, यांची भाषा असून या भाषेसोबत नैतिक मूल्ये व संस्कार जोडले असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी ही छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक, महर्षी कर्वे, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची देखील भाषा असून त्यांचे समाजासाठी योगदान अनन्यसाधारण आहे, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर काही पिढ्या गेल्यानंतर आपण आपली संस्कृती विसरून गेलो असतो व इतर संस्कृती अंगिकारली असती. तामिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करण्यासाठी फार लढावे लागले होते व पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी तामिळ भाषेला अभिजात दर्जा बहाल केला होता असे सांगून मराठी भाषेला अभिजात दर्जा बहाल केल्याबद्दल राज्यपालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र शासनाचे आभार मानले. पंतप्रधान स्वतः प्रादेशिक भाषांचा संवर्धनाला प्रोत्साहन देत असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात देखील मातृभाषेतून शिक्षणाला महत्व देण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

‘आम्ही असू अभिजात’ या संमेलन गीताचे गीतकार डॉ. अमोल देवळेकर, संगीतकार आनंदी विकास, गायक मंगेश बोरगावकर, समन्वयक विकास सोनताटे, तसेच आयोजक संस्थेचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

संमेलन गीत ज्येष्ठ गायक हरिहरन, शंकर महादेवन, प्रियंका बर्वे, मंगेश बोरगावकर, शमीमा अख्तर आदींनी गेले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

००००

Maha Governor releases Sammelan Song of All India Marathi Literary Meet

Mumbai 17 : Maharashtra Governor C P Radhakrishnan accompanied by Minister of Industries and Marathi language Uday Samant released the ‘Sammelan Geet’ of the 98th edition of the Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan at Raj Bhavan Mumbai on Mon (17 Feb).

The All India Marathi Literary Meet is being held in New Delhi from 21st to 23rd February

The Sammelan Song has been sung by playback singer Hariharan, Shankar Mahadevan, Priyanka Barve, Mangesh Borgaonkar, Shamima Akhtar among others.

Lyricist of the Sammelan Geet ‘Aamhi Asu Abhijat’ Dr. Amol Deolkear, Music Composer Anandi Vikas, Singer Mangesh Borgaonkar, Coordinator Vikas Sontate and Members of organizing committee were present.

००००

अधिकाधिक मुलींना उच्च शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी महिला विद्यापीठाने शाळांशी संपर्क वाढवावा- राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. १७ : स्थापनेचे १०९ वे वर्ष साजरे करीत असलेल्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाने अधिकाधिक मुलींना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्यातील, विशेषतः ग्रामीण व आदिवासी भागातील, शाळांशी संपर्क वाढवावा, असे आवाहन राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला विद्यापीठाचा ७४ वा दीक्षान्त समारोह विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात सोमवारी (दि. १७) संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

महिला विद्यापीठाने नुकतेच चंद्रपूर येथे उपकेंद्र सुरू केले असल्याचे नमूद करून विद्यापीठाने आदिवासी भागातील मुलींची उच्च शिक्षणातून होणारी गळती कमी करण्याच्या दृष्टिने या संपूर्ण समस्येचे अध्ययन करावे, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. विद्यापीठाने पारंपरिक अभ्यासक्रमांशिवाय विद्यार्थिनींना कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, आरोग्य सेवा व्यवस्थापन आदी क्षेत्रातील आधुनिक पदवी अभ्यासक्रम उपलब्ध करुन द्यावे, असेही यावेळी राज्यपाल यांनी सांगितले.

पदवीधर विद्यार्थिनींनी जीवनात यशस्वी होण्यासाठी आपले उद्दिष्ट निश्चित करावे त्या दृष्टीने कठोर परिश्रम करावे, प्रत्येकाला निसर्गाने वेगवेगळी कौशल्ये, क्षमता दिल्या असल्यामुळे कोणीही इतरांशी तुलना करीत बसू नये व आपल्या गतीने आपले निर्धारित उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे. स्वतःसाठी जगणे चुकीचे नाही, परंतु केवळ स्वतःसाठी जगणे चुकीचे आहे असे सांगून विद्यार्थ्यांनी आयएएस, आयपीएस किंवा इतर परीक्षा उत्तीर्ण कराव्या. मात्र समाजातील अशिक्षित तसेच गोरगरीब महिलांची काळजी घ्यावी.विद्यापीठांनी आपले शैक्षणिक वेळापत्रक पुरेसे अगोदर तयार करुन जाहीर करावे, तसेच सर्व परीक्षांच्या व दीक्षान्त समारोहाच्या तारखा अगोदरच जाहीर कराव्या, असे राज्यपालांनी सांगितले

समाज एका महिलेला सुशिक्षित करतो त्यावेळी तिच्या सर्व भावी पिढ्यांना सुशिक्षित करीत असतो, असे सांगताना यशस्वी महिलांनी आपला काही वेळ समाजातील उपेक्षित महिलांच्या कल्याणासाठी द्यावा तसेच आत्मसन्मानाशी कधीही तडजोड करू नये असे उद्गार एकात्मिक संशोधन आणि विकास कृतीच्या कार्यकारी संचालिका डॉ. ज्योती पारिख यांनी यावेळी काढले.

कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांनी आपल्या अहवालात नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, विदेशी विद्यापीठांशी सहकार्य, हवामान बदल या विषयावर आधारित आंतरराष्ट्रीय परिसंवाद, विद्यापीठाने क्रीडा तसेच इतर क्षेत्रात केलेल्या कामगिरीची माहिती दिली.

दीक्षान्त समारोहाला डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत, माजी कुलगुरू डॉ. चंद्रा कृष्णमूर्ती, विद्यापीठाच्या प्रकुलगुरु डॉ. रूबी ओझा, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाचे संचालक, अधिष्ठाता आणि विभाग प्रमुख, शैक्षणिक आणि अशैक्षणिक कर्मचारी, तसेच स्नातक उपस्थित होते.

दीक्षान्त समारोहात १५,३९२ विद्यार्थ्यांना पदवी व पदविका प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. एकूण ४६ संशोधकांना पीएचडी तर ७७ स्नातकांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.

००००

Maha Governor presides over 74th Convocation

of SNDT Women’s University

Mumbai Dated 17 : Maharashtra Governor and Chancellor of the state universities C P Radhakrishnan presided over the 74th Annual Convocation of the SNDT Women’s University in Mumbai on Mon (17th Feb)

Executive Director of Integrated Research and Action for Development Smt Jyoti Kirit Parikh, Vice-Chancellor, SNDT Women’s University and HoDs, Prof Dr. Ujwala Chakradeo, Pro-Vice-Chancellor Prof. Dr. Ruby Ojha, Registrar Dr. Vilas Nandavadekar, Director of the Board of Examination and Evaluation, Deans and HoDs, Principals, teaching and non-teaching staff and graduating students were present.

A total of 15,392 students were awarded degrees and diplomas. In all 46 scholars were awarded PhDs while gold medals were presented to 77 students.

0000

मराठी साहित्य दृकश्राव्य माध्यमांवर उपलब्ध करा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १७ : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता तिचा प्रचार आणि प्रसार व्यापक प्रमाणात व्हावा, यासाठी राज्य सरकारकडून महत्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. मराठी भाषा विभागाने मराठी साहित्य दृकश्राव्य माध्यमांवर उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

मराठी भाषा विभागाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस मराठी भाषा मंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, प्रधान सचिव नवीन सोना, मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, सहसचिव नामदेव भोसले, भाषा संचालक विजया डोणीकर, साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील तसेच राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मराठी साहित्य दृकश्राव्य माध्यमांवर आणण्याच्या गरजेवर भर दिला. ” जागतिक स्तरावरील मराठीप्रेमी यांना साहित्याची ओळख व्हावी, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा आहे. दृकश्राव्य स्वरूपात साहित्य उपलब्ध झाल्यास ते सहजतेने लोकांपर्यंत पोहोचू शकेल,” असे त्यांनी सांगितले.

मराठी भाषेचा जागतिक स्तरावर विस्तार करण्यासाठी सुमारे ५०० बृहमंडळे कार्यरत आहेत. या बृहमंडळांमार्फत मराठी साहित्याचा प्रसार होण्यासाठी प्रत्येक बृहमंडळाला ५०० मराठी पुस्तके प्रदान करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. यामुळे परदेशातही मराठी भाषेची गोडी वाढेल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. परदेशात ज्याठिकाणी बृहन महाराष्ट्र मंडळ आहेत तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याबाबत कार्यवाही करण्याबाबत विभागाने कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मराठी भाषा जतन, संवर्धन व प्रचारासाठी विविध आधुनिक उपक्रम राबवण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी केल्या. मराठी भाषा येत नसलेल्या नागरिकांना मराठीबद्दल माहिती व्हावे,यासाठी रेल्वे स्थानके, बस स्थानके इत्यादी ठिकाणी क्यू आर कोड तयार करावेत. मराठीची जास्तीत जास्त पुस्तके इंटरनेटवर उपलब्ध करून देण्याची सूचनाही उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी केली.

0000

कोल्हापूरच्या लौकिकात भर पाडणारं १९९२ चं ६५ वे मराठी साहित्य संमेलन

३१ जानेवारी, १९९२ हा उद्घाटनाचा दिवस. सकाळी बरोबर सव्वासात वाजताच वेगवेगळ्या चार ठिकाणांहून चारीही ग्रंथदिंड्यांना प्रारंभ झाला. राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळापासून समता ज्योत आणि एक ग्रंथदिंडी निघाली, तर राजारामपुरीतील वि. स. खांडेकर यांच्या ‘नंदादीप’ या निवासस्थानापासून ज्ञानज्योत निघाली. समता ज्योत आणि ग्रंथदिंडीचं पूजन प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी केलं, तर ज्ञानज्योत आणि ग्रंथदिंडीचं पूजन महापौर शामराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. महाराष्ट्र साहित्य परिषदेची ही दिंडी. पालखीत खांडेकरांची ग्रंथसंपदा ठेवलेली. ही पालखी अध्यक्ष रमेश मंत्री, डी. वाय. पाटील आणि डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी वाहिली. लेझीम आणि बँडपथकाच्या सुरावटीवर दिंडी मार्गस्थ झाली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित चित्ररथ आणि महाराणी ताराराणींच्या वेशातील अश्‍वारुढ नव्या युगाची रणरागिणी महिला, या लवाजम्यानं कोल्हापूरकरांचं लक्ष वेधून घेतलं.

त्याचवेळी इकडे प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावरून महापालिकेच्या वतीनं छत्रपती राजाराम महाराजांच्या नावे एक ग्रंथदिंडी निघाली, तर वरुणतीर्थ वेस येथील गांधी मैदानावरून मुख्य दिंडीला प्रारंभ झाला. साऱ्या दिंड्या पूर्वनियोजित पद्धतीनुसार दसरा चौकात एकत्र आल्या. त्या ठिकाणी रमेश मंत्री, डी. वाय. पाटील आणि डॉ. प्रतापसिंह जाधव अशा तिघांनी या अतिभव्य दिंड्याचं स्वागत केलं. सजवलेला गजराज, घोडे आणि उंट असा लवाजमा, तसेच आकर्षक चित्ररथ, लेझीम पथकं, शिवाय धनगरी ढोल यांच्या दर्शनानं आणि निनादानं सारं शहर न्हाऊन निघालं होतं.

२५ हजारांहून जास्त विद्यार्थी, नागरिक आणि विविध क्षेत्रांतील मातब्बर आणि मान्यवर ग्रंथदिंडीत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते, तर सुमारे साडेतीनशे वारकरी टाळ-मृदंगाच्या तालावर ‘ग्यानबा तुकाराम’चा गजर करीत ब्रह्मानंदी एकरूप झाले होते. ‘ग्यानबा तुकाराम काय, सोपान-मुक्‍ताबाई काय, नि एकनाथ-नामदेव काय’; सगळे साहित्य पंढरीचे वारकरीच! त्यांचे अभिजात अभंग आजही मराठी माणसांच्या ओठी-ओठी घोळत असतात. ते तर खरे आद्य सारस्वत! मग त्यांच्या नावाचा जयजयकार झाल्याशिवाय साहित्याची दिंडी पुढे कशी बरं जाईल?

या दिंडीत ६५ बैलगाड्याही सामील झालेल्या होत्या. त्या जणू अण्णा भाऊ साठेंपासून शंकर पाटलांपर्यंतच्या ग्रामीण साहित्यिकांच्या गावरान साहित्याचं प्रतिनिधित्वच करीत होत्या, असं म्हटलं तर वावगं ठरणार नव्हतं. ही चार दिंड्यांची मिळून एक झालेली अतिभव्य ग्रंथदिंडी राजर्षी शाहू साहित्यनगरीजवळ आली, तेव्हा सव्वा अकरा वाजले होते. संमेलनासाठी आलेले रसिकमनाचे नगरविकासमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह हजारो उपस्थितांचे ग्रंथदिंडी पाहून डोळ्यांचे पारणे फिटले. उद्घाटक प्रा. वसंत कानेटकर यांनी पालखीतील ग्रंथांना पुष्पांजली अर्पण केली. दिंडीचं स्वागत केलं. सखारामबापू खराडे, डी. बी. पाटील, जी. बी. आष्टेकर तसेच विविध शिक्षण संस्थांचे संचालक, मुख्याध्यापक आणि अनेक शिक्षक यांनी या ग्रंथदिंडीसाठी परिश्रम घेतले.

३१ जानेवारी! करवीरनिवासिनी अंबाबाईच्या साक्षीनं ‘राजर्षी शाहू साहित्यनगरीत’ साहित्य शारदेचा दरबार सुरू झाला. सनई-चौघड्याचे मंगलस्वर दरबाराचे अल्काब पुकारत होते. प्रवेशद्वारावर तुतारीच्या निनादात पाहुण्यांचं आगमन झालं. टी. ए. बटालियनच्या वाद्यवृंदांनी आणि गुलाबपुष्पांच्या वर्षावानं पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं. पाहुणे व्यासपीठावर विराजमान झाले. प्रथम स्वागत गीताचे मंजूळ स्वर साहित्याच्या दरबारात घुमले आणि त्यापाठोपाठ महाराष्ट्र गीत झंकारलं. आता दिग्गज ज्ञानवंतांचे विचार मनोमनी साठवण्यासाठी श्रोत्यांनी पंचप्राण कानांत आणून ठेवले.

हे संमेलन म्हणजे प्रकाशकांसाठी मोठी पर्वणीच ठरली. या साहित्यनगरीतील स्टॉल्सवर लाखो रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाली. तसेच गूळ आणि कोल्हापुरी चप्पल खरेदीसाठीही लोकांची झुंबड उडाली, तर संमेलनाला आलेला महिला वर्ग हुपरीतील खास कलाकुसर केलेल्या दागिन्यांच्या खरेदीत मग्न झाल्याचं चित्र दिसत होतं. अशा या ‘नव नवल नयनोत्सवा’ची रसिकांनी अनुभूती घेतली.

संमेलनाचा दुसरा दिवस कविवर्यांसाठी आणि काव्यप्रेमींसाठी मेजवानीचाच ठरला. कवी कृ. ब. निकुंब यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन संपन्न झालं. सुरेश भट, सुधांशू, नारायण सुर्वे, रामदास फुटाणे यांसारख्या बिनीच्या कविवर्यांनी आपल्या कविता सादर करून रसिक श्रोत्यांची मनापासून दाद मिळवली. तसेच फ. मु. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नवोदितांचं कवी संमेलन झालं. त्यालाही श्रोत्यांनी तेवढीच दाद दिली. कवींची एक नवी पिढी जोमानं पुढं येऊ पाहतेय, हे या नवोदित कवी संमेलनातून दिसून आलं. जणू ही सागराला भरती येण्यापूर्वीची गाज होती.

६५व्या मराठी साहित्य संमेलनाची सांगता झाली. तीन दिवस चाललेल्या या शारदोत्सवाला लोकोत्सवाचंच स्वरूप आलं होतं. अस्सल कोल्हापुरी भोजन, उत्तम निवास व्यवस्था यासह कोणतीही उणीव न जाणवणारं संयोजन हा सर्वांसाठीच एक सुखद अनुभव होता. कोल्हापुरी खास तांबड्या, पांढऱ्या रश्श्यासह चमचमीत मटणाच्या जेवणावर खवय्यांनी चांगलाच ताव मारला! या अविस्मरणीय क्षणांच्या स्मृती जागवीत श्रोते आणि साहित्यिक मंडळी माघारी परतले. कोल्हापूरच्या लौकिकात भर पाडणारं असं हे संमेलन झालं.

00000

(संदर्भ – सिंहायन आत्मचरित्र : साहित्य संमेलनाची यशोगाथा – डॉ.प्रतापसिंह जाधव)

 

(छायाचित्र – ३१ जानेवारी, १९९२ रोजी ६५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीत सहभागी झालेले मान्यवर साहित्यिक. डावीकडून शंकर पाटील, डॉ. प्रतापसिंह जाधव, उद्घाटक वसंत कानेटकर, स्वागताध्यक्ष डॉ. डी. वाय. पाटील, संमेलनाध्यक्ष रमेश मंत्री, मधु मंगेश कर्णिक, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, संमेलनाचे कार्यवाह प्रा. भैरव कुंभार)

00000

साहित्य संमेलने:परंपरा आणि परिप्रेक्ष

साहित्यसंमेलनाची परंपरा आता शतकी वाटचाल करीत आहे. मात्र या परंपरेत अनेक परिप्रेक्ष या साहित्यसंमेलने आणि त्यातून निर्माण होणाऱ्या साहित्य प्रवाह, संमेलनांचे स्वरुप, त्यातून व्यक्त होणारे विषय याबाबत अनेक परिप्रेक्ष तयार होतांना दिसतात. त्याचाच धांडोळा घेतलाय ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यीक प्रशांत गौतम यांनी.

नवी दिल्ली येथे ७२ वर्षापूर्वी ऑक्टोंबर महिन्यात ५४ वे साहित्य संमेलन झाले होते. तेव्हा,महाराष्ट्र राज्याची निर्मितीही झाली नव्हती,आणि अ.भा.मराठी साहित्य महामंडळही अस्तित्वात नव्हते. या ५४ व्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरु यांनी केले होते. अध्यक्ष होते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी,आणि स्वागताध्यक्ष होते,काकासाहेब गाडगीळ. त्यानंतर दिल्लीत साहित्यसंमेलन होत आहे ते यंदाच. ९८ व्या संमेलनासाठी उद्घाटक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी लाभले आहेत,अध्यक्षपदाचा बहुमान डॉ.ताराबाई भवाळकर यांना मिळाला आहे.तर स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार आहेत.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला,त्या अनुषंगाने देशाच्या राजधानीत होणाऱ्या साहित्य संमेलनास महत्व आहे.

दोन मराठी माणसं एकत्र आली की साहित्य संस्था निर्माण होतात, असे म्हणतात ते खरेच आहे. आधीच्या काळात तेच होते, आणि आताच्या काळात ही तेच आहे. यात काहीही बदल झालेला नाही. संस्था व संमेलने वर्धिष्णू असतात. वर्षानुवर्ष हा साहित्याचा प्रवाह हा अखंड सुरुच असतात.  साहित्य संमेलनाची परंपरा आता शतकाकडे जाते आहे. या प्रदिर्घ कालखंडात किती तरी बदल झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात मराठी भाषेचे अस्तित्व टिकवण्यासाठी संस्था आल्या. नंतर त्यांचा विस्तार झाला. पुढील काळात याच साहित्य संस्थांचे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ अस्तित्वात आले. संमेलने त्या आधीही ‘ग्रंथकार संमेलन, महाराष्ट्र साहित्य संमेलन’,या नावाने भरतच होती. तेव्हा निवडणूक नव्हती.

१९६४ साली अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय झाला,आणि १९६५ साली महामंडळाचे पहिले संमेलन हैदराबादेत समीक्षक  प्रा.वा.ल कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली भरले. तेव्हा पासून ही परंपरा अखंडीत आहे.

नवी दिल्लीत तर यंदाचे संमेलन ७२ वर्षाने होत आहे. हे संमेलन झाले तेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मितीही झाली नव्हती. तो काळ संयुक्त महाराष्ट्र चळवळीने भारावलेला होता. दिल्लीचे संमेलन १९५४ साली झाले आणि १ मे १९६० साली महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. आणि मराठी साहित्यात साठोत्तरी प्रवाह यायला सुरूवात झाली.

मराठवाड्याच्या संदर्भात सांगायचे तर आजपर्यंत मराठवाड्यात झालेल्या सात संमेलनाचे अध्यक्षपद मराठवाड्याबाहेरील लेखकांनी भूषवले. केवळ एका संमेलनाचे अध्यक्षपद भूमीपुत्र भारत सासणे यांनी भूषवले. अनंत काणेकर (छत्रपती संभाजीनगर), शंकर पाटील (नांदेड), व्यंकटेश माडगुळकर (अंबाजोगाई), नारायण सुर्वे (परभणी), प्रा.द.मा.मिरासदार (परळी), प्रा.रा.ग.जाधव (छत्रपती संभाजीनगर), फादर फ्रान्सिस दिब्रिटो (धाराशीव), भारत सासणे (उदगीर) असे सांगता येईल. तर मराठवाड्यातील लेखक  डॉ.यू.म.पठाण (पुणे), डॉ.नागनाथ कोत्तापल्ले (चिपळून), प्रा.फ.मु.शिंदे(सासवड), लक्ष्मीकांत देशमुख (बडोदा), डॉ.श्रीपाल सबनीस (पिंपरी-चिंचवड), नरेंद्र चपळगावकर(वर्धा) येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

मराठी साहित्य संस्कृती,कशी असते हे पाहयचे असेल तर साहित्य संमेलन चळवळीचा इतिहास आणि सद्याचे वर्तमान बघायला हवे. जगात मराठी ही अशी भाषा आहे की फक्त तिचाच साहित्य संमेलनाचा उत्सव उदंड उत्साहात होत असतो. आज सर्वाधिक साहित्य संमेलने ही मराठी भाषेचीच होतात. तालुका, जिल्हा, विभाग, राज्य पातळीवर तर मोठ्या संख्येने संमेलने होतात. विश्व मराठी साहित्य संमेलन होतात; पण कायम लक्षात राहातात ती प्रतिवर्षी होणारी अ.भा.मराठी साहित्य संमेलने. ही संमेलने नव्या-जुन्या लेखकांना हक्काचे व्यासपीठ देतात, वाचकांना आपल्या आवडीचा लेखक भेटतो आणि ग्रंथ प्रदर्शनातून  त्याचे आवडीचे पुस्तक मिळते. अशा ग्रंथ प्रदर्शनातून प्रकाशकांनाही फायदा होतो.

१९८९ साली पहिली जागतिक मराठी साहित्य परिषद मुंबईयेथे कुसुमाग्रजांच्या अध्यक्षतेखाली भरली होती. नंतरच्या काळातही सातत्य राहिले. साहित्य महामंडळानेही अशा तीन चार जागतिक मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. यात गाजले ते सॅन होजे व (अमेरिका), दुबई येथील संमेलन, या निमित्ताने मराठीचा झेंडा साता समुद्रापार फडकला.  राज्य सरकारने प्रतिवर्षी जिल्हा व विभागीय स्तरावर मराठी साहित्य संमेलन भरवण्याचा चांगला उपक्रम सुरू केला आहे. छोट्या व आटोपशीर संमेलनास प्रतिसादही उत्तम लाभतो. तसेच राज्य सरकारने तीन विश्व मराठी साहित्य संमेलनं आयोजित केली. मुंबई, नवी मुंबई आणि पुणे. पुण्यात नुकत्याच झालेल्या विश्वसंमेलनात तर कोट्यावधीची आर्थिक उलाढाल झाली, विक्रमी पुस्तक विक्री झाली. म्हणून प्रत्येक रसिक,वाचकांना साहित्य संमेलनाची उत्सुकता असते,तशी देशाच्या  राजधानीत होणाऱ्या संमेलनाचीही आहे.

बृहन्महाराष्ट्रातील संमेलने

या मराठी साहित्य संमेलनास अनेक परंपरा आहेत. या ९८ वर्षातील २४ संमेलनं ही महाराष्ट्रा बाहेर झालेली आहेत. बडोदे, इंदूर, ग्वाल्हेर, बेळगाव, मडगाव, हैदराबाद, कारवार, अहमदाबाद, नवी दिल्ली, भोपाळ, रायपूर(छत्तीस गड) पणजी, घुमान(पंजाब) यातील काही ठिकाणी दोन-तीन वेळा संमेलने भरली आहेत. बृहन्महाराष्ट्रात तर बडोदा येथील वाड.मय परिषद यांची संमेलन वाटचाल अमृत महोत्सवाकडे सुरू आहे. नवी दिल्ली येथील बृहन्महाराष्ट्र मंडळाचीही तेवढीच अधिवेशनं झालीत. या शिवाय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनंही एका काळात भरली होती.

परंपरेची रुजुवात

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी सुरू केलेली  १८७८ पासून सुरु असलेली ही परंपरा अखंडीत राहिली असती, त्यात सातत्य राहिले असते तर दिल्लीचे संमेलन हे ९८ ऐवजी १४७ वे ठरले असते. या प्रवाहात विविध कारणाने खंड पडला; हे मात्र खरे. स्वातंत्र्यपूर्व काळात संमेलनाचे आयोजन करणे ही साधी बाब नव्हती, त्यावर मात करीत संमेलन सातत्य राखण्याचा प्रयत्न तत्कालीन लेखक व कार्यकर्त्यांनी केला होता. तेव्हा पासूनचा आज पर्यंतचा साहित्य संमेलनाचा प्रवास फारच रंजक आहे,कसा तो आपण जाणून घेवू या!

साहित्यसंमेलनांची परंपरा

यंदाच्या संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. ताराबाई भवाळकर या नियोजित आहेत. आयोजक पुण्यातील सरहद्द संस्था आहे.संजय नहार हे संस्थापक अध्यक्ष आहेत. सरहद्दचे कश्मीर भागात उत्तम,शैक्षणिक, सामाजिक काम आहे. याच आयोजकांनी संत साहित्याचे अभ्यासक  डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली  घुमान येथील ८८ वे साहित्य संमेलन चांगले आयोजित केले होते. नंतरच्या वर्षी बहुभाषा संमेलनही डॉ.गणेश देवी यांच्या अध्यक्षतेखाली घुमान येथेच घेतले होते. दिल्ली येथील साहित्य संमेलनाचेही तेच आयोजक आहेत.

पहिले मराठी साहित्य संमेलन ७ फेब्रुवारी १८७८ या दिवशी पुण्यात न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते. या संदर्भात  “ज्ञानप्रकाश ” या नियतकालिकात रानडे आणि लोकहितवादी(गोपाळ हरी देशमुख)यांचे संयुक्त निवेदन प्रसिध्द झाले. ग्रंथकार संमेलन भरविण्याचा प्रस्ताव आला, त्यास ५० साहित्यिकांचा पाठिंबा होता. खरे तर रानडे यांचे एकही पुस्तक नसले तरी त्यांनीच संमेलनाचे अध्यक्षपद भूषवावे, असा लोकहितवादींसह अन्य प्रतिष्ठीत लेखकांचा आग्रह होता. २४ मे १८८५ या दिवशी पुण्यात दुसरे ग्रंथकार संमेलन झाले. कृष्णाशास्त्री राजवाडे हे अध्यक्ष होते. संमेलनासाठी न्या.रानडे यांनी पुढाकार घेतला होता.

तो काळ  होता संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा. साल होते १९५७. तत्कालीन औरंगाबाद आणि आताचे छत्रपती संभाजनगर येथे लघुनिबंधकार अनंत काणेकर यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन सरस्वती भुवन प्रशालेत झाले. मराठी साहित्यातील ऐकापेक्षा एक दिग्गज लेखक-दत्तो वामन पोतदार, कुसुमाग्रज, आचार्य अत्रे, पु.ल.देशपांडे, वसंत बापट, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर अशी ग्रेट मंडळी हजर होती. यात “,संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे “,असा ठराव मंजूर झाला. पु.ल.देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली इचलकरंजीत सुवर्ण महोत्सवी संमेलन झाले. कराडला जेव्हा १९७५ साली आणीबाणीच्या काळात जे अ.भा.मराठी साहित्य संमेलन झाले. त्याच्या अध्यक्ष दुर्गाबाई भागवत तर स्वागताध्यक्ष यशवंतराव चव्हाण  होते. मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या प्रश्नाने पुण्यातील पु.भा.भावे यांच्या अध्यक्षते खालचे व कथालेखक  वा.कृ.चोरघडे यांच्या अध्यक्षतेखालचे  चंद्रपुर येथील संमेलन फारच गाजले होते. १९८१ मध्ये ५६ वे संमेलन मध्यप्रदेशात रायपूर येथे झाले.अध्यक्ष होते गंगाधर गाडगीळ. नगर येथे झालेले संमेलन उंचीवर नेणारेच होते. ऐतिहासिक कादंबरीकार ना.स.इनामदार अध्यक्ष होते. गुलजार उद्घाटक तर गिरीष कर्नाड समारोपात होते. एप्रिल १९९८ मध्ये परळी वैजनाथ येथे साहित्यसंमेलन झाले. द.मा.मिरासदार हे संमेलनाचे अध्यक्ष होते. समारोपात ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या लेखिका महाश्वेतादेवी हजर होत्या.आशा भोसले यांच्या गाण्यांची मैफल रंगली होती, अशा प्रकारे सामाजिक प्रश्नांवरही साहित्यसंमेलनातून भुमिका मांडण्यात आली आहे.

महिला अध्यक्षांची परंपरा

शतकाकडे वाटचाल करणाऱ्या या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून महिलांना मान मिळाला तो सहा महिला साहित्यिकांना. कुसुमावती देशपांडे(ग्वाल्हेर), दुर्गा भागवत(कराड), शांताबाई शेळके(आळंदी),  डॉ.विजया राजाध्यक्ष(इंदूर), डॉ.अरुणा ढेरे(वर्धा)आणि आत्ताच्या संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष डॉ.ताराबाई भवाळकर(नवी दिल्ली).

संमेलन गाजतात लक्षात राहातात ती उत्तम नियोजन,भोजन व्यवस्थेमुळे. अशा संमेलनातून ग्रंथ विक्री उदंड होते,ती संमेलने यशस्वी होतात. संमेलन म्हटले की वाद-विवाद सोबतच येतात. असे असले तरी जगभरातील मराठी भाषक संमेलनावर फार प्रेम करतो,गर्दी करतो. संमेलन येण्याची उत्सुकता साहित्यप्रेमी वाचकांना असते आणि संमेलन संपले की रिकाम्या मांडवाकडे पाहून हुरहुर वाटते,आणि काही दिवसांनी पुन्हा संमेलनाचे दिवस आनंद घेवून येतात..

लेखक- प्रशांत गौतम.

(लेखक हे साहित्यिक,ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

०००००

केंद्रीय राज्यमंत्री ना.प्रतापराव जाधव यांच्या मध्यस्थीने पेनटाकळी येथील गावकऱ्यांचे उपोषण मागे

बुलढाणा, (जिमाका), दि.१७ : पेनटाकळी प्रकल्पाच्या काठावर गेल्या बारा दिवसांपासून गावठाण हद्दवाढ करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले ग्रामस्थांचे उपोषण गावठाण हद्दवाढ प्रकरणाचा निवाडा मान्य झाल्याने केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते आज लिंबू पाणी घेऊन उपोषण मागे घेण्यात आले.

पेनटाकळी गावकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव, माजी आमदार संजय रायमुलकर यांनी शासनाकडे सातत्याने प्रयत्न केले. सिंचन प्रकल्पाच्या खालच्या बाजूच्या गावाचे पुनर्वसन नियमानुसार होऊ शकत नाही. त्यामुळे गावठाण हद्दवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला. हद्दवाढ मागणीसाठी पेनटाकळी येथील गावकऱ्यांनी बेमुदत उपोषण आरंभले होते. याची दखल घेत आज केंद्रीय राज्यमंत्री ना.प्रतापराव जाधव यांनी उपोषण स्थळी गावाकऱ्यांशी संवाद साधला.

त्यावेळी ते म्हणाले की, भूमी अभिलेख खात्याने संबंधित जागेचे सीमांकन करावे. शासकीय अभियंत्यांची मदत घेऊन आराखडा तयार करण्यात यावा. या जागेवर असलेले अतिक्रमण ग्रामपंचायतने काढावे, त्यासाठी पोलीस निरीक्षक साखरखेर्डा यांनी योग्य तो बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा. ग्रामसभा घेऊन सर्वांच्या सहमतीने सदर भूखंडाचे वाटप ग्रामपंचायतने करावे, असे निर्देश दिले.

यावेळी स्थानिक नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.

000

मराठी बोलीभाषेचे संवर्धन…

९८वे अखिल भारतीय साहित्य संमेलन दिल्ली येथे होत आहे. या संमेलनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीचे ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांना २०१२ चंद्रपूर येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा सन्मान मिळाला होता. त्यांच्या अध्यक्षीय भाषणातील काही अंश यानिमित्ताने…

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे त्रेपन्नावे अधिवेशन ५ जानेवारी १९७९ रोजी चंद्रपूर येथे झाले होते. त्यावेळी संमेलनाचे अध्यक्ष प्रख्यात कथाकार प्रा. वामन कृष्ण चोरपडे हे होते. आणि स्वागताध्यक्ष श्रीयुत शांतारामजी पोटदुखे हे होते. त्यावेळच्या संमेलनात मी माझ्या एकदोन कविता वाचल्या होत्या. तेहतीस वर्षांनंतर आज दिनांक ३ फेब्रवारी २०१२ रोजी मी माझे अध्यक्षीय भाषण करायला उभा राहिलो आहे. खरे तर मी माझ्या घरी. माझ्या कुटुंबात परत आलो आहे. अशीच माझी भावना आहे. मी भाषेच्या घरात राहतो, भाषेच्या प्रदेशात माझा रहिवास आहे. हे घर खूप मोठे आहे. हा प्रदेश खूप विस्तीर्ण आहे. मी या घराच्या विविध दालनांमधून वावरतो. गवाक्षांतून बाहेर पाहातो. याच्या तळघरांतून आणि भुयारांतून हिंडत असतो. याची कित्येक दालने अजून मी पाहिलेली देखील नाहीत. परंतू माझे संचित मोठे आहे. याच घरात वावरलेल्या कित्येक महानभावांचे ते अक्षरसंचित आहे. तो माझा ठेवा आहे, मी काही थोडी टिपणे तेवढी काढलेली आहेत.

 थोडा विसावा घ्यावा म्हणून मधून मधून मी माझ्या महाकाय पूर्वजांच्या तळहाताएवढ्या कोपऱ्यात येतो. या जागेजवळ एक अवाढव्य खिडकी आहे. तीमधून मी बाहेर डोकावतो. मी आत आणि बाहेर पाहण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असतो. फार थोडे मला जमले आहे. माझ्या आतही एक जग आहे आणि त्यात सतत कोलाहल सुरू असतो. या कोलाहलातही एक शांत स्वर शोधण्याचा माझा प्रयत्न असतो, मी आता या क्षणी मी माझ्या आतल्या आणि बाहेरच्या कोलाहलासह आपणासमोर उभा आहे.

तेहतीस वर्षांनंतरचे चंद्रपूर पुष्कळच वाढले, विस्तारले आहे. सगळीच निमशहरे, शहरे, महानगरे आपले रूप बदलत आहेत. इतिहासातच झोपून गेल्यासारखे वाटणारे हे शहरही आता पापण्या उघडून इकडेतिकडे पाहू लागले आहे. श्रीमहाकाली, अचलेश्वर यांच्यानंतर सुपर थर्मल पॉवर प्लांट हे आधुनिक काळातले नवे देवालय इथे आलेले आहे. या रोपट्यातून निघालेले विजेचे हात दूरपर्यंत पोचलेले आहेत. शहरांत झगमगाट आहे, परंतु खेड्यांमध्ये, रानांमध्ये प्रकाशाचे थेंब पाझरत आहेत की नाहीत याबद्दल मी साशंक आहे. मधून मधून मला मात्र डोळ्यांमधले अंगार फुललेले दिसतात.

उन्हाचा, पावसाचा स्पर्श झाला नाही तर झाडेही वेडीवाकडी वाढत जातात, तेथे माणसांचे काय. याच शहराच्या रस्त्यांवरून माझे बालपण चालत गेले आणि याच शहरात मला केव्हातरी कवितेच्या कीटकाचा दंश झाला. महाकाली, त्या देवीच्या पलिकडच्या अजस्त्र पाषाणमूर्ती माझ्या कवितांमध्ये प्रतिमा म्हणून येऊ लागल्या. तेव्हाच्या योगभ्रष्ट या प्रदीर्घ कवितेत मी लिहिले होते: चांदा हे शहर अमुकसाठी प्रसिद्ध असून तमूकसाठी अप्रसिद्ध असले तरी येथे दर चैत्र पौर्णिमेला महाकालीची मोठी यात्रा भरते.

त्यावेळी महाकालीचे जे मला जाणवले होते तेही लिहिले

महाकाली.

जळते डोळे.

जळते हास्य.

जळते. उघडे नागडे नृत्य.

हे नृत्य विध्वंसाचे नाही, सर्जनाचे आहे. विध्वंसापेक्षा सर्जनावर माझा जास्त विश्वास आहे. समाजाची जुनाट खिळखिळी झालेली संरचना नष्ट केली पाहिजे. परंतु त्या ठिकाणी नवी आणि अधिक उत्तम अशी संरचना उभारली पाहिजे हे मी त्यावेळच्या ‘माझ्या लोकांचा आकांत’ या कवितेत लिहिले होते. अर्थात माझ्या लोकांचा आकांत अद्याप मावळला नाही. अजूनही दूरवर पसरलेल्या अरण्यांमधून दुःखितांचे विव्हल स्वर वाऱ्यावरून माझ्यापर्यंत पोचतात.

जोवर मराठीच्या विविध बोली बोलल्या जात आहेत, प्रमाण मराठीत शिक्षित लोक आपले व्यवहार करीत आहेत, मराठी माध्यमांच्या शाळा बहुसंख्येने आहेत तोपर्यंत मराठी भाषा टिकून राहण्याचे उपाय करणे शक्य आहे. मराठीला पर्याय म्हणून इंग्रजीची (आणि माहिती तंत्रज्ञानाची, इलेक्ट्रॉनिक्सची) निवड करण्याचा विकल्प आपण ठेवतो तेव्हाच मराठीचे स्थान दुय्यम कसे आहे हे आपण दाखवत असतो. या विषयांचा स्वीकार करूनही मराठी हा विषय अनिवार्य असलाच पाहिजे असे धोरण आखले पाहिजे आणि त्याची कडक अंमलबजावणी केली पाहिजे. गेली काही वर्षे मराठीची गरज कशी नाही याचा वृत्तपत्रांतून प्रचार करण्यात गेलेली आहेत, विशेषतः विज्ञान आणि वाणिज्य शाखांमधल्या विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या पालकांवर मराठी नको या मताचा प्रभाव टाकण्यात आलेला आहे. पुढे तर प्रश्नच नाही. भाषेचा किंवा साहित्याचा बाराही लागू नये अशीच व्यवस्था केलेली आहे. आपण पहिलीपासून दहावीपर्यंत मराठीचा आग्रह धरलेला आहे.

अकरावीपासून मराठी विषय सोडला तरी चालेल अशी व्यवस्था केलेली आहे. हे योग्य नाही. लोकांनी ते रोखायला हवे आहे. कुठलेही विषय घ्या, पण एक विषय मराठी हा असलाच पाहिजे असा लोकांनी आग्रह धरायला पाहिजे, आणि शासनानेही विचार करायला पाहिजे. जी मुले अकरावी-बारावीला मराठी विषय घेतात त्यातही काही बीएला जातात आणि मराठी साहित्य हा विषय घेतात. बीएससी, बीकॉमकडे जाणाऱ्यांना मराठी साहित्य हा विषय घेण्याची संधीच आपण नाकारलेली आहे. अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, वैद्यकविद्या, व्यवस्थापनविद्या यांच्याकडे बहुसंख्य विद्यार्थी जातात. त्याच्या अभ्यासात भाषा नाही आणि साहित्यही नाही. म्हणजे मराठी वाचवण्याची सगळी जबाबदारी बीएला जाणाऱ्या मूठभर विद्यार्थ्यांच्या डोक्यावर आपण टाकलेली आहे. ही वस्तुस्थिती आहे.

काही थोडे लोक मराठीचे अध्ययन करतात. बाकीच्यांना मराठीशी काही देणेघेणे नाही. ही वस्तुस्थिती भाषेच्या, साहित्याच्या संस्कृतीच्या आणि त्या विद्यार्थ्यांच्या जीवनाच्याही दृष्टीने चांगली नाही. भाषेपासून, साहित्यापासून मुलांना तोडून टाकता आणि मराठी भाषेचे काय होईल, मराठी साहित्याचे काय होईल अभी चिंता करता. ही विसंगती आहे. मी असे सुचवतो आहे की आपण अन्य विद्याशाखांमध्येही साहित्य हा विषय ठेवावा.

प्रमाण मराठीचा जीवनाच्या सर्व क्षेत्रात कुशल वापर आणि मराठीच्या बोलीचे संवर्धन या दोन्ही बाबतीत शासनाच्या भाषाविभागाने भरीव काम केले पाहिजे. महाराष्ट्रात अनेक बोली आहेत. वऱ्हाडी, नागपुरी, हळबी, अहिराणी, डांगी, मालवणी, कडाळी, झाडी, डांगणी, माणदेशी मराठवाडी, भिलोरी, पोवारी, गोंडी, इत्यादी. आजच्या मराठी साहित्यात या विविध बोलींमधले लेखन केले जात आहे. कथा, कादंबरी, आत्मचरित्र, कविता या साहित्यप्रकारांतील लेखनात बोलींचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. दलित, भटक्या विमुक्त, आदिवासी जाती-जमातीमधून आलेल्या लेखकाच्या स्वकथनांतून त्या त्या प्रदेशाशी, व्यवसायाशी, समाजगटाशी निगडित बोली आलेली आहे.

उदाहरणार्थ लक्ष्मण माने यांच्या उपरामध्ये कैकाडी बोली, रुस्तुम अचलखांब यांच्या गावकीमध्ये जालना परिसरातील बोली, दादासाहेब मल्हारी मोरे यांच्या गबाळमध्ये मिरज-जत परिसरातील कुडमुडे जोशी जमातीची बोली, शरणकुमार लिंबाळे यांच्या अक्करमाशीत अक्कलकोट परिसरातील बोली, लक्ष्मण गायकवाड यांच्या उचल्यामध्ये लातूर परिसरातील संतामुच्चर जमातीची बोली, रावजी राठोड यांच्या तांडेलमध्ये नांदेड परिसरातील बंजारा बोली, भगवान इंगळे यांच्या ढोरमध्ये जामखेड परिसरातील बोली, योगीराज बागूल यांच्या पाचटमध्ये वैजापूर परिसरातील ऊसतोडीच्या कामगारांची बोली अशा कितीतरी बोली मराठी साहित्यात आलेल्या आहेत. बोलीबरोबर ती बोली बोलणाऱ्यांची संस्कृतीही अशा कथनांतून व्यक्त होते. या बोलीचा आणि प्रमाण मराठीचा सांधा जोडण्याचे काम विद्यापीठातील मराठीचे, समाजशास्त्राचे आणि सांस्कृतिक मानवशाखाचे प्राध्यापक करू शकतात; नव्हे, ते त्यांनी करावे असे मी सुचवतो.

भारतासारख्या कृषिप्रधान देशावर आर्थिक जागतिकीकरणाचा किती गंभीर विपरीत परिणाम होतो याविषयी वंदना शिवा यांनी लिहिले आहे: आर्थिक जागतिकीकरणामुळे बीज-बियाणे उद्योगाचे केंद्रिकरण, जागतिक व्यापारी प्रतिष्ठानांचा (ग्लोबल कार्पोरेशन्स) कृषिव्यवसायात प्रवेश, कीटकनाशकांचा वाढता वापर, वाढत चाललेली कर्जे, निराशा, त्यामुळे लहान शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या या गोष्टी घडत आहेत. भांडवल गुंतवणारी कार्पोरेट-नियंत्रित कृषिव्यवस्था अस्तित्वात येते आहे. अशा स्थितीत गरीब शेतकरी टिकून राहणे अशक्य झाले आहे. जागतिकीकरणात निर्यातीला प्राधान्य आहे. त्यामुळे शेतकरी अन्नधान्य पिकवण्याऐवजी निर्यात करता येईल अशी पिके घेऊ लागले आहेत. उत्पादनखर्चात वाढ झाल्यामुळे कर्ज काढण्याची प्रवृत्ती वाढीस लागली. पाहिजे तसे उत्पन्न झाले नाही किंवा भाव मिळाले नाहीत तर शेतकरी बुडतो, तो वैफल्याने ग्रासला जातो.

जागतिकीकरणाच्या अवस्थेत इंग्रजीसारख्या एकाच भाषेत संज्ञापन आणि ज्ञानव्यवहार होत असेल तर इतर भाषा बोलणाऱ्यांचे आणि त्यांच्या भाषांचे भवितव्य काय हा प्रश्न उपस्थित होणे अपरिहार्य आहे. इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय व्यापाराची, राजकारणाची, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या व्यवस्थापनाची, ज्ञानाची, अनुवादाची, संगणकाची, इंटरनेटची आणि मोबाईल फोनची, भाषा आहे. ती ग्लोबल लैंग्वेज आहे. थोडक्यात ती जागतिकीकरणाची भाषा आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत इंग्रजी भाषेला अत्यंत महत्त्व आलेले आहे. पूर्वी ब्रिटिश वसाहती असलेल्या देशांतच नव्हे तर जगाच्या सर्वच खंडांतील देशांमध्ये ती शिकली, बोलली, लिहिली जाते आहे. तथापि पूर्वी वसाहती असलेल्या देशांवर तिचा अधिक प्रभाव आहे. घानासारख्या आफ्रिकन प्रजासत्ताकात इंग्रजी भाषेला प्रथम क्रमांकाचे स्थान आहे. राज्यकारभाराची, व्यापाराची, शिक्षणाची तीच भाषा आहे. जागतिकीकरणाच्या अर्थकारणामुळे विकसनशील देशांच्या अर्थकारणावर जसे विपरीत परिणाम होत आहेत तसेच ते भाषांच्या बाबतीतही होतील का अशी चिंता अनेक देशांतील भाषातज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. इंग्रजीमुळे राष्ट्रीय भाषांचे, प्रादेशिक भाषांचे, बोलींचे अस्तित्व मिटून जाईल काय या प्रश्नाने जगभरातील विचारवंत अस्वस्थ झालेले आहेत. कारण तशी काही चिन्हे वास्तवात दिसत आहेत.

भारतामध्ये भाषांची विविधता आहे. आसामी, उड़िया, उर्दू, कब्रड, काश्मिरी, कोकणी, गुजराती, डोगरी, तमिळ, तेलुगू, नेपाली, पंजाबी, बंगाली, बोडो, मणीपुरी, मराठी, मलयालम, मैथिली, संथाली, संस्कृत, सिंधी, हिंदी या प्रमुख भाषा आहेत. हिंदी ही उत्तरप्रदेश, उत्तरांचल, छत्तीसगड, झारखंड, बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान, हरयाणा, हिमाचल प्रदेश, आणि राजधानी दिल्ली व केंद्रशासित प्रदेश यांची अधिकृत भाषा आहे. इंग्रजी भाषेचा सहभाषा म्हणून स्वीकार केलेला आहे. राष्ट्रीय पातळीवर इंग्रजी आणि हिंदी या भाषांना विशेष महत्त्व आहे. प्रादेशिक भाषांना राज्यभाषेचा दर्जा असला तरी सर्वच राज्यांमध्ये इंग्रजी ही भाषा सार्वजनिक व खासगी क्षेत्रांमध्ये उपयोगात आणली जाते. या मान्य प्रादेशिक भाषांखेरीज अन्य भाषाही आहेत महाराष्ट्रात मराठीच्या बोलींखेरीज भिली, गोंडी, कोरकू, वारली या भाषा आहेत. या मराठीच्या बोली नसून स्वतंत्र भाषा आहेत आणि त्या भाषांमध्ये त्या भाषक समुहांचे सांस्कृतिक संचित आहे.

आज आपण सगळेच पूर्वी न अनुभवलेल्या संक्रमणाच्या अवस्थेतून जात आहोत. सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, सामाजिक क्षेत्रांमध्ये उत्पन्न झालेल्या संभ्रमाच्या मुद्रा पाहतो आहोत. गावे, शहरे बदलत आहेत. पुष्कळदा असे वाटते की आपण अवाढव्य अशा बाजारपेठेतून हिंडतो आहोत. आजच्या या स्थितीत संस्कृती, भाषा, साहित्य यांचे भवितव्य काय या प्रश्नाने आपण अस्वस्थ आहोत. याशिवायही अनेक प्रश्न आपल्या मनात आहेत. स्पेस मिळाली की आपण प्रश्न मांडायला लागतो. काही वेळा आपल्याला अशी स्पेस तयार करावी लागते. झाडीपट्टी रंगभूमी ही अशा स्पेसचे उत्तम उदाहरण आहे. उर्वरित महाराष्ट्राला कितपत कल्पना आहे कोण जाणे. झाडीपट्टीची दंडार ही परंपरेने चालत आलेली लोककला आहे. दंडार म्हणजे हातात डहाळी घेऊन केलेला नाच असा एक अर्थ दिलेला आहे. म्हणजे हे सृजनाचे नृत्य आहे. जंगलात, निसर्गात राहणाऱ्या लोकांचा निर्मितीचा उत्सव, आता सर्वत्र पसरलेल्या जंगलात कार्पोरेट हत्ती शिरून उच्छाद मांडायला सिद्ध झालेले आहेत.

साम्राज्यवाद नष्ट झाला आहे. परंतु साम्राज्ये आपल्या डोळ्यांसमोर आकार घेत चालली आहेत. जागतिकीकरण हे या साम्राज्याचे नाव आहे. या साम्राज्यात आधुनिकता आणि समृद्धी यांची आमिषे दाखवली जातात, परंतु प्रत्यक्षात सामाजिक दुभंगलेपण आणि सांस्कृतिक मागासलेपण यांचे पोषण केले जाते. व्यक्तीचे बाहेरच्या जगाशी असलेले संबंध, बाजारपेठेचा प्रभाव आणि त्याच्याशी निगडित उपभोक्तावादी संस्कृती आणि धार्मिकता व धर्मजातीवाद यांचा उदय या तीन गोष्टींचा अनेक विचारवंतांनी परामर्ष घेतला आहे. व्यक्तीच्या दृष्टीने सामाजिक प्रश्न महत्त्वाचे राहिलेले नाहीत. सार्वजनिकतेच्या ठिकाणी वैयक्तिकता आलेली आहे. व्यक्ती स्वतःच्या प्रश्नांमध्ये जास्त गुंतून गेली आहे. बाजारपेठेचे स्वरूप बदलले आहे. पूर्वी अप्राप्य अशा वस्तु व्यक्तीच्या हाताशी आलेल्या आहेत असा आभास तयार केला जातो. परंतु व्यक्तीची वास्तविक स्थिती आणि तिच्या निवडीला केले जाणारे आवाहन यांत विसंगती तयार होते. वस्तूंमध्येच सर्वस्व आहे. खरा आनंद आहे असे वाटणे. वस्तूंनी झपाटले जाणे अशी एक मानसिक अवस्था तयार होते. आर्थिक क्षमता नसल्याने बहुसंख्यांना त्या मिळवता येत नाहीत.

सर्वसामान्य माणसांच्या सुखदु:खाची हायस्ट्रीट फिनिक्सच्या मोराला काही पर्वा नसते तो चमचम दिव्यांचा पिसारा फुलवून दिमाखात उभा असतो. जयंत पवार यांची ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ ही कथा जागतिकीकरणावरचे, मुक्त बाजारपेठेवरचे नवमध्यमवर्ग आणि कनिष्ठवर्ग यांच्यात पडलेल्या दरीवरचे एक प्रखर भाष्य आहे.

जागतिकीकरण ही भिन्न भिन्न आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक विचारप्रवाहांना सामावून घेणारी संज्ञा आहे. जागतिकीकरण ही एक अवस्था आहे आणि सिद्धांतही आहे. वर्तमानकाळात जागतिकीकरण या शब्दात विविध अर्थच्छटा दडलेल्या आहेत. उदाहरणार्थ: मुक्त बाजारपेठ, आर्थिक उदारीकरण, राजकीय-आर्थिक-सांस्कृतिक जीवनावर पाश्चात्य धारणांचा प्रभाव, पश्चिमीकरण किंवा अमेरिकीकरण, माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार, इंटरनेट क्रांती, जागतिक एकात्मता, इत्यादी. जागतिकीकरणाची ही अवस्था एक अपूर्ण अवस्था आहे. भांडवलशाहीचा हा पुढचा टप्पा आहे. वाफेवर चालणारी जहाजे, टेलिग्राफ, टेलिफोन, रेल्वे ही भांडवलशाहीची संचार साधने होती. प्रगत भांडवलशाहीला संगणक, उपग्रहांवर अधारित दृक-श्राव्य माध्यमे, भ्रमणध्वनी, द्रुत आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक ही संचार-संज्ञापन साधने मिळालेली आहेत. समाजवैज्ञानिकांच्या मते जागतिकीकरण या संज्ञेत सामाजिक अस्तित्वाशी निगडित स्थल आणि काल या संकल्पनांतील मूलभूत बदलांचा निर्देश आहे.

वसंत आबाजी डहाके,

ज्येष्ठ साहित्यिक,

अमरावती.

मराठी साहित्यात लीळाचरित्राचे स्थान

मराठी साहित्याचा प्रांत अतिशय समृद्ध आणि सशक्त आहे. मराठी साहित्याला दीर्घ आणि प्राचीन अशी परंपरा लाभली आहे. आज इतर भाषांमधील जी साहित्य संपदा आहे त्यामध्ये मराठी साहित्य कुठेही मागे नाही. उलट मराठी साहित्याने आपले भावविश्व अतिशय व्यापक केलेले असून जागतिक साहित्याला तोडीस तोड साहित्य मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहे. समाजातील सर्वच अंगांना स्पर्श करण्याचे कार्य मराठी साहित्याने केले आहे. कविता,कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, प्रवासवर्णन अशा विविध प्रकारांनी मराठी साहित्य बहरलेले आहे. प्रामुख्याने वैचारिक आणि ललित अशा दोन्ही प्रांतात मराठी साहित्याची मुशाफिरी दिसून येते.

या दोन्ही प्रांतात अतिशय विपलु असे लेखन मराठी भाषेत आढळून येते. मराठी साहित्याचा मागोवा ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी आपण बाराव्या शतकात जाऊन पोहोचतो. बारावे शतक हे मराठी साहित्याच्या दॄष्टीने सुवर्णकाळ होय. याच काळात मराठी साहित्य गंगेचा उगम झालेला दिसून येतो. मराठीचा पहिला लिखित स्वरुपातील ग्रंथ लीळाचरित्र याच काळात लिहिल्या गेला. गद्य निर्मितीचा पाया या ग्रंथाने घातला. याप्रमाणेच धवळे हे आद्य काव्य देखील याच काळात रचल्या गेले. इथून सुरु झालेला मराठी आणि गद्य आणि पद्य साहित्याचा प्रवास अविरतपणे अद्यापही सुरुच आहे. मराठीच्या आरंभकाळाला सुवर्णयुग असे म्हटल्या गेले आहे कारण मानवी जीवनाच्या सर्व अंगाला स्पर्श करणारा आद्य ग्रंथ लीळाचरित्र एक मानदंड ठरला. पुढे ‘ज्ञानेश्वरी’ सारखे महाकाव्य असेल किंवा नरेंद्राचे ‘रुक्मिनी स्वयंवर’ हे काव्य असेल यांनी मराठी साहित्याला श्रीमंती प्राप्त करुन दिली आहे.

या ग्रंथांचा आदर्श पुढे ठेवतच आजतागायत शेकडो ग्रंथ मराठी भाषेमध्ये निर्माण झाले. महानुभाव साहित्याचे तर मराठी भाषा श्रीमंत करण्यात फार मोठे योगदान आहे. महानुभावांनी मराठी साहित्याला साडेसहा हजार ग्रंथ दिले आहेत. एवढया मोठया प्रमाणात एकाच संप्रदायाने ग्रंथ निर्मिती करावी हे जगाच्या पाठीवर कुठेच घडलेले नाही. महानुभाव साहित्याशिवाय मराठी भाषेचा इतिहास अपूर्णच राहील. एवढे महत्वपूर्ण साहित्य या संप्रदायाने मराठी भाषेला दिलेले आहे. आधुनिक काळात देखील महानुभाव साहित्याची निर्मिती सुरुच आहे. आधुनिकतेशी महानुभाव साहित्याने जुळवून घेतले आहे. संशोधना सोबतच आधुनिक काव्यात चितपरिचीत असलेले कथा, कादंबरी आणि काव्य प्रकार देखील महानुभाव साहित्यिक हाताळत असून ते मराठी साहित्याच्या प्रांतात आपला ठसा उमटवित आहेत- असे असले तरी लीळाचरित्राचे मराठी साहित्यात आगळे वेगळे स्थान आहे हे मान्य करावेच लागेल.

लीळाचरित्र ग्रंथ कसा तयार झाला याविषयी अत्यंत उद्बोधक माहिती आहे. श्रीचक्रधर स्वामींच्या प्रयाणानंतर त्यांचे पट्टशिष्य नागदेवाचार्य व इतर भक्तमंडळी रिद्धपूरला श्रीगोविंदप्रभूंच्या सेवेसाठी येऊन राहिले. स्वामीच्या विरहाचे दुःख सर्वांच्याच अंतःकरणात भरलेले होते. नागदेवाचार्य तर श्रीगोविंदप्रभूंची सेवा आटोपल्यानंतर एकांतात बसून स्वामींच्या लीळांचे स्मरण करीत असतं. हे केवळ विरह दुःखाचे ओवले-पोवलेपण नाही.आचार्य कशाचे तरी निरंतर स्मरण करीत असतात. हे चाणाक्ष म्हाइंभटांच्या लक्षात आले. एके दिवशी त्यांनी नागदेवाचार्यांना विचारले ‘भटो: तुम्ही निरंतर काइसयाचे मनन करीत असा, तुम्हासी केव्हळीही मननावेगळेया न देखो:’ यावर नागदेवाचार्यांनी उत्तर दिले. ‘मी नेहमी स्वामींच्या लीळा मनन करीत असतो. स्वामींच्या सान्निध्यात मी जेव्हा हिरवळीला होतो, तेव्हा एके दिवशी त्यांनी मला तेथून रिद्धपूरला पाठविले. मी जायला निघालो, तेव्हा सर्वज्ञांनी मला म्हटले, वानरेया: एथोनि निरोपीले विचारशास्ञ: अर्थशास्ञ: तयाचे श्रवण: मनन: निदिध्यसन करावे: तेही एक स्मरणचि कीं गा: एथीची चरित्रे आठविजेति: आइकीजेति: तेही एक स्मरणचि कीं गा:’ असे निरुपण सर्वज्ञांनी मला त्यावेळी केले होते.

म्हणून त्यावेळी रिद्धपूरला म्हणजे येथे श्रीप्रभूंच्या सान्निध्यात असताना श्रीप्रभूच्या ज्या खेळक्रीडा पाहिल्या त्या सर्वांचे मी निरंतर स्मरण करीत असतो.’ ‘‘मी जैलागुनी अनुसरलां तैलागुनी मज देखता जीया सर्वज्ञांचीया लीळा वर्तलीया तीया मी आवांकीतेचि असे: जै मज पवाड नसे: सर्वज्ञांच्या सेंवादास्यालागी कव्हणीकडे जाए तरी जीए भक्ते सर्वज्ञांजवळि असेति त्याते एऊनि पुसे: आन मी अनुसरलां नव्हता तै बाइसादेखत जिया लीळा वर्तलीया तीया मीया सर्वज्ञाते पुसीलीया: आन सर्वज्ञे प्रसंग परांत नीरुपीले इतिहास तेही आवांकीत असे: आन सर्वज्ञे जे नीरोपीले परावर नीरुपन तेही आवांकीतूची असे: आन अळजपुरीहून सर्वज्ञे बीजे केले तेथौनि प्रतिष्ठानापर्यंत जीया लीळा वर्तलिया तीया सर्वज्ञे प्रसंगे भक्तापरिवारात सांगीतलीया तीया आठवीतूचि असे: आन सर्वज्ञे जै एकांकी राज्य केले तीया लीळा: सर्वज्ञे प्रसंगे भक्ताप्रती नीरुपीलीया: तीयाही आठवितूचि असे: आन सर्वज्ञे द्वापरिचीया लीळा: श्रीप्रभूचीया लीळा प्रसंगे भक्ताप्रति नीरुपीलिया तीयाही आठवितुची असे:’’

आपण कशाचे मनन करीत असतो याचा वृत्तांत नागदेवाचार्यांकडून ऐकल्यावर दूरदर्षी प्रज्ञावंत म्हाइंभटांच्या मनात एक विचार स्फुरला व तो त्यांनी ताबडतोब बोलूनही दाखविला. आचार्यांना ते म्हणाले, भटो तुम्हासी सर्वज्ञांचा वरु: म्हणौणि सर्वज्ञे नीरोपीले ज्ञान: शास्त्र ज्ञात: सर्वज्ञे जीया केलीया सांगितलीया तीया तुम्हासि आठविताति: तरि आता श्रीचरणा सन्निधानी आम्हांसी: आन पुढे जो सर्वज्ञांचा मार्ग होइल त्यासि तवं इतुके शास्त्र न धरे: तरि सर्वज्ञांचिया लीळा तुम्ही सांगा आन मी लीहिन:’ भटी म्हणीतले: ‘हो कां: लिहीले मार्गासी उपयोगा जाईल: सर्वज्ञाते मार्गाची प्रवृत्ती असे: कां पाः सर्वज्ञे म्हणीतले: शास्त्र घेइजे: मग काळे करुनी उपयोगा जाये:’

लीळाचरित्राच्या रुपाने स्वामींच्या आठवणी लिहून काढण्याचा विचार ज्यावेळी म्हाइंभटांना स्फुरला तो क्षण मराठी साहित्याच्या दृष्टीने अपूर्व क्षण होता यात शंका नाही. या आठवणी लिहून काढण्याचे प्रयोजन जरी महानुभाव पंथा पुरते मर्यादित असले तरी त्यामुळे महाराष्ट्र,मराठी भाषा व मराठी साहित्य यांची म्हाइंभट व नागदेवाचार्य या दोन्ही पंडितांकडून कशी अनमोल सेवा घडली हे आपणास आज अनुभवाला येते.

पुढे नागदेवाचार्यांनी आठवणी सांगायच्या आणि म्हाइंभटांनी त्या लिहून काढायच्या असे ठरले. ‘मग माहिभटी लेखन आरंभीले: भट माहीभट वाजेश्वरी वीजन करीत: ऐसे अवघे भटोबासी लीळा कथन केले: ते माहीभट सा मासा लीहिले:’ आणि अशारितीने सहा महिण्यात लीळाचरित्राचा कच्चा खर्डा तयार झाला.  लीळाचरित्राचा खर्डा तयार झाल्यावर त्यातील मजकूर यथार्थ असावा, त्यात कोणतीही चूक किंवा कमी अधिकपणा राहू नये म्हणून ज्या विद्यमान व्यक्तींचा त्यात संबध आला होता त्यांच्याकडून त्या मजकुराची खात्री करुन घेणे आचार्यांना आवश्यक वाटले.

म्हणून म्हाइंभटांना त्यांनी म्हटले, माहीभटो जै मी सर्वज्ञाते अनुसरलां नाही तै बाइसां अवीद्यमान जीया लीळा वर्तलीया तिया तयाचीये अनुभवीचीया तयाते पुसावीया: जानोचेया अनुभवीचीया जानोते पुसावीया: नाथोचीये अनुभवीचीया नाथो ते पुसावीया: येल्होचीये अनुभवीचीया येल्होते पुसावीया: एये जीयाचाची परी ज्या ज्या ज्याचिये अनुभवीचीया लीळा त्या त्यासि पुसाविया: श्रीप्रभूचा सन्निधानी जे भक्त होते त्याचीये अनुभवीचीया लीळा त्याते पुसावीया:’ मग म्हाइंभटांनी आचार्यांच्या आज्ञेप्रमाणे गावोगावी फिरुन स्वामींच्या लीळा गोळा केल्या व पुन्हा त्या नागदेवाचार्यांना दाखविल्या व शके ११९७ मध्ये लीळाचरित्र हा ग्रंथ तयार केला.

म्हाइंभटांनी लिहिलेल्या लीळाचरित्राची एकच प्रत होती. लीळाचरित्र म्हाइंभटांनी बाळबोध लिपीत लिहिले होते. त्यावेळी त्याच्या प्रतिलिपी तयार केल्या नाहीत. ही प्रत नागदेवाचार्यांजवळ होती. त्यांच्या निधनानंतर ती बाइदेवबासाकंडे व नंतर कवीश्वरबासाकंडे आली व त्यांच्याजवळ असतांनाच खालशाची धाड आली व त्यावेळी ही आद्य प्रत नाहीशी झाली. सिद्धांते हरिबास व धाकटे सोंगोबास यांच्या अन्वयस्थळात ‘आन तिन्ही रुपेचरित्रे महाइभटीचि केली परि ते लीळासंबंध खालसाचिया धाडीसी नाहीचि जाले:’ असा स्पष्ट उल्लेख आहे. पुढे लीळाचरित्रावर अनेक पिढीपाठ तयार झाले. हे सर्व पाठ लिपीबद्ध होते.

खालशाच्या धाडीत मुळ प्रत नष्ट झाल्यावर त्याच्या पुर्नलेखनाचे काम प्रथम कमळाइसाची शिष्या हिराइसा हिने केले. हिराइसाला एकछंदी प्रज्ञा होती. त्यामुळे एकदा ऐकलेले तिच्या डोक्यात पक्के बसतं असे. तिने लीळा सांगितल्या व पाटकुले मालोबास यांनी लिहून काढल्या. हे पुर्नलेखनाचे काम शके १२३२ मध्ये झाले.

महानुभावांनी अचाट साहित्य निर्मितीचे काम करुन महाराष्ट्र वाङ्eय इतिहास समृद्ध केला आहे. महाराष्ट्राबाहेर  पंजाब, काश्मीर, उत्तप्रदेश, आंध्रपदेश किंबहुना अफगाणिस्थान, काबुल- कंदहार पर्यंत महानुभावांनी मराठी भाषा पोहोचविली. सोबत महाराष्ट्राच्या संस्कृतीला सर्वदूर नेले.  महानुभाव विचारधारा असलेले साहित्यिक आधुनिक साहित्यात संचार करीत असून ते मराठी साहित्य विश्वाला दमदार साहित्यकृती देत आहेत. याची दखल मराठी साहित्य विश्वाने घेणे आवश्यक आहे. काव्यातील अभंग, गझल अशा प्रकारांचा देखील वापर महानुभाव साहित्यिक करीत आहेत. कलगीतुरा याचा देखील अंतर्भाव महानुभाव साहित्यिकांनी केला आहे.

अशाप्रकारे मराठीच्या आरंभकाळी एक सशक्त आणि परिपूर्ण साहित्य निर्मिती करुन मराठी साहित्य निर्मितीचा पाया घालणाऱ्या महानुभाव साहित्यिकांनी आधुनिक काळात देखील आपली साहित्य निर्मिती सुरुच ठेवली असून महानुभावीय विचारधारेच्या ग्रंथ निर्मितीसोबतच इतरही अनेक ग्रंथांची निर्मिती करुन आपली देखील नाळ आधुनिक साहित्यासोबत जुळलेली आहे हे दाखविण्याचा एक उत्तम प्रयत्न या साहित्यिकांनी केला आहे. भविष्यात हा प्रवाह अधिक जोमाने प्रवाहित होत जाईल यात कुठलीच शंका नाही.

प्रा. डॉ. किरण वाघमारे,

सहायक प्राध्यापक

अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने तपासणीमध्ये वाढ करून दोषींवर कठोर कारवाई करावी- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगलीदि. १७ (जि. मा. का.) : अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने अमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करावी. तपासणीमध्ये वाढ करून कायद्याचा धाक निर्माण करावा व कायद्याच्या चौकटीत राहून दोषींवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

अमली पदार्थ टास्क फोर्सच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम. आय. डी. सी.) च्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, मा. पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदि उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, अमली पदार्थांच्या दुष्परिणामसंदर्भात सार्वजनिक ठिकाणी जनजागृती करावी. त्यासाठी अमली पदार्थांचे दुष्परिणाम सांगणारी लघुचित्रफीत तयार करून याबाबत शाळा महाविद्यालयातील मुले, युवकांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व औद्योगिक क्षेत्रातील  बंद कारखाने तपासणी मोहिम तातडीने पूर्ण करावी. जे उद्योग बंद आहेत, ज्या उद्योगासाठी परवाना घेतला आहे तो उद्योगच तेथे सुरू आहे का याची तपासणी करून विहीत नियमांनुसार कार्यवाही करावी. कारवाई करण्यासंदर्भात काही अडचण येत असेल तर संबंधित विभागास कायद्यात सुधारणा करण्याबाबत कळवावे.सांगली, मिरज शहरातील सीसीटीव्हे कॅमेरे सुस्थितीत आहेत का याची तपासणी करावी. त्याच्या दुरूस्तीसाठी व अनुषंगिक कामाकासाठी अंदाजपत्रक तयार करावे जेणेकरून त्यासाठी जिल्हा नियोजन मधून निधी देण्यात येईल, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शाळा, कॉलेजच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यावर बंदी आहे. याबाबत महानगरपालिका, नगरपालिका व संबंधितांनी तपासणीसाठी आवश्यक कार्यवाही करावी. ‍विटा येथील पत्रकारांवर मारहान झालेल्या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असल्याचे सांगून संबंधितांवर एमपीडीए लावण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्या आठवड्याभरात घडलेल्या घटना व त्याअनुषंगाने केलेल्या कारवाईचा आढावा घेतला. पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.

000000

ताज्या बातम्या

बी.बी.एफ. (रुंद वरंबा सरी) तंत्रज्ञान : पर्जन्याधारित शेतीस वरदान

0
अवर्षणप्रवण भागात शेती करताना पाऊस वेळेवर आणि प्रमाणात होईल याची खात्री देता येत नाही. त्यामुळे अशा भागात जलसंधारण व पाणी ताण कमी करणाऱ्या तंत्रज्ञानाचा...

वीज आणि पशुधन : संरक्षणाचे प्रभावी उपाय

0
राज्यात सध्या अवकाळी पावसाचे आणि वादळी वाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे आणि यामुळे वीज पडण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. मान्सूनपूर्व काळात, विशेषत: शेतीच्या कामांच्या वेळी,...

मुंबईत उभारणार अल्पसंख्याक वर्गातील मुलींसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय – अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे

0
मुंबई, दि. 21 : अल्पसंख्याक वर्गातील मुलींना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी मुंबईत अणुशक्तीनगर येथे मुलींसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्याचा शासनाचा मानस असल्याचे अल्पसंख्यांक...

पुरंदर व कोपरगाव येथे बहुउद्देशीय तालुका क्रीडा संकुल उभारावे – क्रीडा व युवक कल्याण मंत्री...

0
मुंबई, दि. 21 : पुण्यातील पुरंदर व अहमदनगर येथील कोपरगाव येथे सुसज्ज बहुउद्देशीय तालुका क्रीडा संकुल उभारण्यात यावे, असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री...

मुंबई देशातील सर्वाधिक निधी प्राप्त करणाऱ्या स्टार्टअपचे हब महाराष्ट्र स्टार्टअप्समध्ये संपूर्ण देशात अग्रेसर –...

0
मुंबई, दि. २१: स्टार्टअप आणि उद्योगांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी फिनटेक धोरण तयार करणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. देशातील सर्वाधिक निधी प्राप्त करणाऱ्या स्टार्टअपचे मुंबई...