बुधवार, एप्रिल 30, 2025
Home Blog Page 226

प्रत्येक भारतीयासाठी संविधान महत्त्वाचे – राज्यमंत्री इंद्रनिल नाईक

अमरावती, दि. 26 : भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना घटनात्मक अधिकार दिले आहे. संविधान प्रत्येक भारतीयासाठी महत्त्वाचे आहे, त्यामुळे संविधानाचे प्रत्येकाने वाचन करावे, असे आवाहन उद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी केले.

जवाहरलाल नेहरू स्टेडीयम येथे 76 वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, विशेष पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर आदी उपस्थित होते.

श्री. नाईक म्हणाले, स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाने देश स्वतंत्र झाला. त्यानंतर भारतीय संविधानाच्या रूपाने देशाला अमूल्य देणगी मिळाली आहे. संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला अधिकार मिळाला असल्यामुळे प्रत्येकाने संविधानाचे वाचन करावे. संविधानाचा आदर राखून राज्य शासन विविध घटकांसाठी कार्य करीत आहे. शेतकऱ्यांना वेळेवर आणि वाजवी दरात बियाणे, खते उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच केवळ एक रूपयात विमा काढण्यात आला आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामात 1464 कोटी, तर रब्बीमध्ये 148 कोटी रूपये वितरीत करण्यात आले आहे.

कृषीसाठी वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून जिल्ह्यात 840 एकर शासकीय जमिनीवर सौर प्रकल्प उभारणी करण्यात येत आहे. यातून 184 मेगावॅटचे सौर प्रकल्प उभारण्यात येत आहे. प्रधानमंत्री सुर्यघर मोफत योजनेतून 78 हजार रूपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. जिल्ह्यातील पानपिंपळी आणि हरभरा पिकांना जीआय मानांकन प्राप्त झाले आहे.

महिलांना बचतगटाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण करण्यात येत आहे. बचतगट उत्पादित वस्तूंच्या ब्रँडींग, पॅकेजिंगवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. जिल्ह्यातील 600 महिलांना रोजगाराचे साधन देऊन स्वयंपूर्ण बनविण्यासाठी अनुदानावर पिंक ई-रिक्षा देण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ 7 लाख महिलांना होत आहे. 99 टक्क्याहून अधिक महिलांना योजनेचा लाभ मिळत आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून 5 हजार युवकांना 14 कोटी रूपयांचे विद्यावेतन देण्यात आले आहे. तसेच नांदगावपेठ अतिरिक्त एमआयडीसीमध्ये टेक्सटाईल्स पार्क निर्माण करण्यात आला आहे. याठिकाणी 13 मोठे उद्योग सुरु झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

सुरवातीला ध्वज वंदनानंतर श्री. नाईक यांनी परेडचे निरीक्षण केले. सामाजिक न्याय विभागातर्फे संविधानाची प्रत आणि उद्देशिकेची भेट त्यांना देण्यात आली. यावेळी पोलिस, होमगार्ड, राष्ट्रीय छात्र सेना, स्काऊट गाईड पथक यांनी संचलन केले. यावेळी सामाजिक न्याय विभाग, महिला व बालविकास विभाग, कौशल्य विकास विभाग, जलद प्रतिसाद पथक, दामिनी पथक, अग्निशमन,परिवहन महामंडळ, श्वान पथक, शिवाजी संस्था, सामाजिक वनीकरण आदी विभागांच्या चित्ररथाने संचलन केले. मान्यवरांनी ॲग्रीस्टॅक चित्ररथाला हिरवी झेंडी दाखविली. तसेच खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या खासदार निधीतून दिव्यांगांना तीनचाकी वाहनाचे वाटप करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

प्रजासत्ताक दिनी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव

जिल्ह्यात विविध क्षेत्रात कार्यरत आणि उल्लेखनीय यश मिळविणाऱ्यांचा राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. जवाहरलाल नेहरू स्टेडीयम येथील प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यात हा कार्यक्रम पार पडला.

जिल्ह्यातील सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनासाठी प्रयत्न करून 126 टक्के निधी संकलित केल्याबद्दल जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचा सत्कार करण्यात आला. जिल्हा क्रीडा पुरस्कार प्राप्त प्रा. डॉ. योगेश निर्मळ यांच्या वतीने त्यांच्या पत्नी अपर्णा निर्मळ यांनी पुरस्कार स्विकारला. प्रवीण आखरे यांना जिल्हा क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयातील जनसंपर्क अधिकारी मिलिंद तायडे, योगेश पानझाडे, स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगरविकास शाखेचे सहआयुक्त सुमेध अलोणे, महसूल सहायक एस. एम. काशीकर, सहायक ग्रंथालय संचालक डॉ. राजेश पाटील, डॉ. सुरजकुमार मडावी, पोलीस विभागातील राम नागे, इक्बाल सैय्यद, सॉफ्टबॉल खेळाडू सौरभ टोकसे, जिम्नॅस्टिक हिमांशू जैन, वुशु क्रीडा प्रकारासाठी वैष्णवी बांडाबुचे, मध्यवर्ती कारागृह शिपाई सुधाकर मालवे, ॲग्रीस्टॅक प्रकल्पातील रमेश खुलसांजे, मिथून अंबाडकर, रमेश माहेकर, पंकज चकुले, सिद्धार्थ खडसे, मधुकर अंबाडकर, नाना यमगर, गजानन भुरे, प्रविण मेंढे, चंदन दातीर, रामराव इंगोले यांना गौरविण्यात आले.

00000

 

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला

सोलापूर येथून लवकरच विमान सेवा सुरू होणार

जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यातील कामे पूर्ण झाल्यानंतर मोठ्या 

प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार

पालकमंत्री यांच्याकडून सर्व नागरिकांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

सोलापूर, दिनांक २६ (जिमाका):- विकासाच्या   दिशेने   वाटचाल   करणारा   आपला  सोलापूर   जिल्हा  उद्योग, सामाजिक,  शैक्षणिक, आर्थिक,   वैद्यकीय, सांस्कृतिक  आणि पर्यटन क्षेत्रात  चौफेर  प्रगती   करत  असून जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी  सहकार्य  केले  जाईल, अशी  ग्वाही राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७६ वा समारंभानिमित्त पोलीस आयुक्त मुख्यालय पोलीस परेड ग्राउंड येथे सकाळी 9.15 वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शितल उगले तेली,  शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सोलापूर शहर मध्य चे आमदार देवेंद्र कोठे, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांच्यासह सर्व विभाग प्रमुख तसेच स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक व अन्य मान्यवर नागरिक उपस्थित होते.

पालकमंत्री जयकुमार गोरे पुढे म्हणाले की, आपला भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. आपण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटना स्वीकारुन ती २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आणली. भारतीय लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ ठरलेली राज्यघटना ज्या समितीने तयार केली, त्या घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. संविधान निर्मितीमध्ये त्यांचं बहुमोल योगदान लाभलं. नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या आपल्या भारत देशाने २६ जानेवारी १९५० रोजी संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाचा शुभारंभ केला होता. त्यामुळे आपण सर्व भारतीय नागरिक हा दिवस देशभरात अत्यंत उत्साहानं साजरा करतो.

सोलापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आज रोजी पर्यंत सोलापूर जिल्ह्यात  एकूण ११ लाख २० हजार अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी १० लाख ५५ हजार अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत. तसेच राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींसाठी शासनाने लेक लाडकी योजना सुरू केली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये आज रोजी पर्यंत लेक लाडकी योजनेअंतर्गत ६ हजार १४४ लाभार्थी बालिकांना लाभाच्या पहिल्या टप्प्याची रक्कम प्रति बालिका ५ हजार रुपये प्रमाणे ३ कोटी ७ लाख २० हजार लाभार्थी बालिका व मातेच्या संयुक्त बँक खात्यावर जमा करण्यात आलेली आहे, अशी माहिती पालकमंत्री श्री. गोरे यांनी दिली.

सोलापूर जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा जिल्हा आहे. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर पर्यटन पूरक उद्योग वाढवून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती शक्य आहे. यामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला वेग येईल, तसेच येथून होणारे स्थलांतर ही थांबण्यास मदत होणार आहे.  राज्य शासनाने सोलापूर जिल्ह्याच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यासाठी एकूण २८२.७५ कोटीचा निधी मंजूर केलेला आहे. श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी येत असतात. परंतु भाविकांना दर्शनासाठी खूप वेळ दर्शन रांगेत उभे राहावे लागते त्यामुळे दर्शन मंडप व दर्शन रांग याकरिता १२९.४० कोटीचा आराखडा शासनाने मंजूर केला असून ही कामे लवकरच सुरू होणार आहेत. पंढरपूर देवस्थान मंदिर विकासाकरिता ७३.८५ कोटीचा आराखडा मंजूर करण्यात आलेला असून या अंतर्गत कामे पूर्ण झाल्यानंतर त्याचा लाभ भाविकांना मिळणार असल्याचे पालकमंत्री श्री गोरे यांनी सांगितले.

सोलापूर येथून लवकरच विमान सेवा सुरू होणार आहे. तसेच मुख्यमंत्री महोदयांच्या शंभर दिवसात उद्दिष्ट पुर्ती कार्यक्रमाचे प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याप्रमाणेच केंद्र व राज्य शासन बेघरांना स्वतःचे घरकुलाचे स्वप्न पूर्ती करण्यासाठी प्रयत्नशील असून जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना व अन्य सर्व आवास योजनेचे अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन २०२४-२५ आर्थिक वर्षात ७०२ कोटी निधी मंजूर आहे. या सर्व निधीतून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची कामे घेण्यात आलेली आहेत. बेटी बचाओं बेटी पढ़ाओ ही योजना राबविण्यात येते. या योजनेला दिनांक २२ जानेवारी २०२५ रोजी दहा वर्षे पूर्ण होत आहेत. महिला व बालविकास विभागाच्या वतीने जिल्ह्यात दिनांक २२ जानेवारी २०२५ ते ०८ मार्च २०२५ या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या माध्यमातून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात प्रबोधन करावे, असे आवाहन पालकमंत्री श्री. गोरे यांनी केले.

जलयुक्त शिवार अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून संपूर्ण जिल्हा पाणीदार करण्यासाठी यंत्रणांनी प्रयत्न करावेत असे निर्देश पालकमंत्री श्री गोरे यांनी देऊन कृषी क्षेत्रातील कृषी विषयक माहिती आणि डिजिटल सेवा देण्यासाठी ॲग्रिस्टॅक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे त्यांनी सुचित केले. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यभरात एक लाख मराठा उद्योजक बनवण्याचे संकल्प पूर्ती झालेली आहे. प्रत्येक घरावर सौर ऊर्जा पॅनल बसून प्रधानमंत्री सुर्यघर योजनेत सहभागी होण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री. गोरे यांनी केले.

पोलीस परेड ग्राउंड येथे सकाळी ठीक नऊ वाजून पंधरा मिनिटांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी परेड कमांडर परिविक्षा दिन पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा वी. एस. यांचे समवेत परेड संचलन केले.  त्यानंतर पतसंचलन झाले. यावेळी भारतीय उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले तसेच पालकमंत्री महोदय यांनी सर्व उपस्थित नागरिकांना तंबाखू विरोधी दिन व कुष्ठरोग मुक्त भारत बाबत शपथ दिली. त्यानंतर पोलीस विभाग, कृषी विभाग, सैनिक कल्याण विभाग, शिक्षण विभाग, महिला बालकल्याण, क्रीडा विभागाचे पुरस्कार वाटप पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.

या ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, ज्येष्ठ नागरिक अन्य मान्यवर नागरिक यांचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भेट घेऊन त्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

0000

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – पालकमंत्री मेघना बोर्डीकर 

परभणी, दि.२६ (जिमाका) : परभणी जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडवणे, त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवणे यासह नागरिक, शेतकरी, महिला, तरुण, आणि विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्याबरोबरच परभणी जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले.

परभणी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडीयम येथे भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनी मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी ध्वजवंदन केले. यावेळी शुभेच्छापर संदेश देताना त्या बोलत होत्या. यावेळी खासदार संजय जाधव, आमदार राहूल पाटील, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, पदाधिकारी,  पत्रकार, नागरिक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाल्या की, 15 ऑगस्ट, 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. या स्वतंत्र देशाची राज्यघटना तयार करण्याचे महान कार्य घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.  26 जानेवारी, 1950 रोजी भारत देश प्रजासत्ताक झाला आणि अंतिम सत्ता प्रजेच्या हाती सोपविण्यात आली.  आपला भारत हा एक मोठा लोकशाही देश आहे. ज्या देशाची सर्व सत्ता प्रजेच्या हाती असते, तो देश म्हणजे प्रजासत्ताक होय.

परभणी विकासाभिमुख जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याच्या सर्वांगिण प्रगतीसाठी मी कटिबद्ध आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाल्या की, सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला आहे. आपल्या जिल्ह्यात हा कृती कार्यक्रम यशस्वीपणे राबविला जाईल, अशी खात्री आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्यासाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देण्याकरीता विविध यांत्रिकी कृषी औजारांसाठी केंद्र व राज्यशासन पुरस्कृत योजने अंतर्गत अनुदान दिले जाते. या योजनेव्दारे मागील तीन वर्षांत 7 हजार पेक्षा जास्त लाभार्थ्यांना रुपये 45 कोटी इतके अनुदान महाडीबीटी पोर्टल प्रणालीव्दारे अदा करण्यात आले आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतंर्गत सन 2023-24 या वर्षात 282 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड झालेली असून 127 लाभार्थ्यांना रुपये एक कोटी 90 लाख अनुदान अदा करण्यात आले आहे. मनरेगा अंतर्गत शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात परभणी जिल्हा अग्रेसर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत चालू वर्षात नवीन विहिरीसाठी 231 लाभार्थी व इतर बाबींकरीता 546 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अंतर्गत नवीन विहिरीसाठी 18 आणि इतर बाबींकरीता 67 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

पालकमंत्री पुढे म्हणाल्या की, ऊर्जेची गरज भागविण्यासाठी सध्या पर्यावरणपूरक सौरउर्जेला महत्त्व देण्यात येत आहे. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेली प्रधानमंत्री सौर कृषी पंप व कुसुम घटक योजनेतंर्गत परभणी जिल्हयातील 9 हजार 882 लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. अन्य शेतकऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेऊन आपले कृषी उत्पन्न वाढवावे. परभणी जिल्हयात रुग्णांना चांगल्या अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेल. जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीने रक्त संकलनात राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. जिल्हा रुग्णालयात नवीन कॅथलॅबचे काम प्रगतीपथावर असून भविष्यात रुग्णांना ॲन्जिओग्राफी, ॲन्जिओप्लास्टी इत्यादी सुविधा मोफत मिळणार आहे. सेलू येथे 50 बेडचे नवीन स्त्री रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम सध्या सुरु आहे. लवकरच हे रुग्णालय कार्यान्वित होईल. जिल्ह्यात सुमारे 5 लाख 47 हजार लाभार्थ्यांना ई-हेल्थ कार्डचे वाटप करण्यात आले आहे.

महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा मानला जातो. मागील वर्षात या विभागाने वसुलीचे शंभर टक्के उद्दीष्ट्य पूर्ण केले आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असणारी ॲग्रिस्टॅक योजनेची सध्या अंमलबजावणी सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळणार आहे. यासाठी 635 पथकांची गावनिहाय नियुक्ती करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी अवश्य घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पालकमंत्री म्हणाल्या की, विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यच्या औद्योगिक विकास साधण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. शासनाच्या औद्योगिक समूह विकास योजनेतंर्गत सेलू येथे केशवराज कॉटन क्लस्टर सुरु झाले आहे. 185 लघुउद्योजकांनी शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घेऊन उद्योग सुरु केला आहे. महिला व बालकांच्या कल्याणासाठी विविध योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेमुळे सर्वसामान्य महिलांना दिलासा मिळाला आहे. मागासवर्गीयांच्या  कल्याणासाठी  सामाजिक न्याय  विभागामार्फत विविध योजना राबविल्या जातात. भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षात अनुसूचित जातीच्या एकूण 3 हजार 100 विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळा अंतर्गत ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी गंगाखेड, पालम, सोनपेठ येथे 6 वसतीगृह सुरु करण्यात आले आहेत. रमाई आवास योजने अंतर्गत 24 हजार 979 लाभार्थ्यांना हक्काचा निवारा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. क्रीडा विभागाच्यावतीने जिल्हा क्रीडा संकुल, परभणी येथे क्रीडा सुविधा निर्मितीसाठी नव्याने रुपये 123 कोटींची प्रशासकीय मान्यता शासनाकडून मिळालेली आहे. लवकरच सुविधा निर्मितीचे कामे पूर्ण करण्यात येईल.  पुर्णा, जिंतूर, सेलू  व गंगाखेड  येथे तालुका क्रीडा संकुल उभारण्याचे कामही प्रगतीपथावर आहे.

‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतंर्गत’ शासकीय व खासगी आस्थापनांवर सुमारे 1 हजार 744 रूजू झाले आहेत.  ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा’मार्फत राबविण्यात येत असलेल्या कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे एक हजार 594 लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर रुपये 12 कोटी इतका व्याज परतावा जमा करण्यात आला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना सन 2023-24 अंतर्गत भटक्या जमाती प्रवर्गातील 4 हजार 403 लाभार्थींना घरकुल बांधण्यासाठी शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. तर मोदी आवास घरकुल योजने अंतर्गत इतर व विशेष मागास प्रवर्गातील 13 हजार 596 लाभार्थींना मान्यता देण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था आबाधित ठेवण्यासाठी  पोलीस यंत्रणा सदैव  सक्रीय असते. आपल्या जिल्हयात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरीता जनतेनेही पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री यांनी केले.

प्रारंभी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी पोलिस, गृहरक्षक दल तसेच अन्य जवानांच्या पथ संचलनाचे निरिक्षण करुन संचलनाची मानवंदना स्वीकारली. यामध्ये पोलीस विभागाचे गृहरक्षक दल, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक शाळा, पृथ्वीराज देशमुख सैनिक शाळा धर्मापूरी, जवाहर नवोदय विद्यालय, गांधी विद्यालय, जलद प्रतिसाद पथक, बॉम्ब शोधक वाहन, श्वान पथक, दंगा नियत्रंण पथक,  अग्निशमन दल, जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांचे पथक संचलनात सहभागी झाले होते.

यावेळी पालकमंत्री यांनी स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, उपस्थित नागरिकांची भेट  घेऊन त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  तत्पूर्वी पालकमंत्री यांच्या हस्ते सन 2023-24 जिल्हा क्रीडा पुरस्कार, शाळांना प्रोत्साहनात्मक अनुदान, सन 2024-25 या वर्षातील पदक विजेते राष्ट्रीय खेळाडू, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी आणि मान्यवरांना पुरस्कार व प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सहशिक्षक प्रविण वायकोस यांनी केले.

०००

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजवंदन

अमरावती, दि.२६ : भारत देशाचा ७६वा प्रजासत्ताक दिन आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी पोलीस वाद्यवृंद पथकाच्या तालावर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. ध्वजवंदनानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधून प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

जिल्हाधिकारी श्री. कटियार यांच्या हस्ते यावेळी उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देवून गौरविण्यात आले.यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत मस्के, जिल्हा सूचना अधिकारी मनीष फुलझेले, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे,  तहसीलदार विजय लोखंडे, प्रशांत पडघम, निलेश खटके, सांख्यिकी उपसंचालक केतकी धरमारे, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा,  तसेच अधिकारी  व कर्मचारी आदी उपस्थित होते.

000000

जिल्ह्यात ७ लाख ९१ हजार महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ – पालकमंत्री संजय राठोड

  • मोफत वीज योजनेतून १९१ कोटींची बील माफी
  • युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे ११ कोटीचे विद्यावेतन
  • लाख ४२ हजार शेतकऱ्यांना १८९ कोटींचे वाटप

यवतमाळ, दि.26 (जिमाका) : मागील काळात राज्य शासनाने अनेक लोकोपयोगी योजना सुरु केल्या. त्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांचा आत्मसन्मान वाढविणारी योजना ठरली आहे. जिल्ह्यात 6 लाख 91 हजार महिलांना प्रती महिना 1 हजार 500 रुपयांचे अर्थिक सहाय्य दिले जात आहे. बळीराजा मोफत वीज योजनेतून शेतकऱ्यांच्या कृषि पंपांना देखील मोफत विज पुरवठा केला जात असून अवघ्या काही महिन्यात 191 कोटी रुपयांची विज बील माफी देण्यात आली असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

येथील समता मैदानात भारतीय प्रजासत्ताकाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री संजय राठोड यांनी ध्वजवंदन झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य संग्राम सैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली. हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. देशाच्या इतिहासात स्वातंत्र्य दिन जितका महत्वाचा आहे, तितकेच महत्व प्रजासत्ताक दिनाचे आहे. जगात सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून आपल्या देशाकडे पाहिले जाते. ही आपल्या सर्वांसाठी गौरवाची बाब आहे, असे पुढे बोलतांना पालकमंत्री म्हणाले.

शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन सातत्याने काम करत आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेतून केवळ 1 रुपयात शेतकऱ्यांना पिकाला संरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात 7 लाख 99 हजार तर रब्बी हंगामात 1 लाख 49 हजार शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदविला. प्रधानमंत्री किसान योजना आणि याच योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने सुरु केलेली नमो किसान महासन्मान निधी योजना शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या योजना ठरल्या आहे. यावर्षी या दोनही योजनेतून जिल्ह्यातील 2 लाख 85 हजार शेतकऱ्यांना 232 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य वितरीत करण्यात आले आहे.

2023 च्या खरीप हंगामात कापुस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टर पर्यंत प्रति हेक्टरी 5 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा शासनाने केली होती. त्यानुसार जिल्ह्यातील 3 लाख 42 हजार शेतकऱ्यांना 189 कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहे. यावर्षी नैसर्गिक आपत्तीत शेतपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आपण 267 कोटी रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे. ही रक्कम देखील लवकरच प्राप्त होऊन शेतकऱ्यांना वाटप केली जातील.

एकही पात्र शेतकरी पिककर्जापासून वंचित राहू नये, अशा सूचना मी केल्या होत्या. यावर्षी खरीप हंगामात 1 लाख 65 हजार शेतकऱ्यांना 1 हजार 857 कोटीचे पिक कर्ज वाटप आपण केले आहे. युवकांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम करण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ सुरु करण्यात आली. जिल्ह्यात 3 हजार 211 युवक या योजनेतून प्रशिक्षण घेत आहे. या प्रशिक्षणार्थ्यांना आतापर्यंत 11 कोटी 15 लाख रुपयांचे विद्यावेतन वितरीत करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम युवकांचे उद्योग निर्मितीचे स्वप्न साकार करणारी योजना ठरली आहे. गेल्यावर्षी या योजनेतून 628 प्रस्ताव आपण मंजूर केले. यावर्षी 1 हजार 105 नवउद्योजक नव्याने तयार करण्याचे उद्दिष्ट आपण ठेवले आहे. जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, मोदी आवास योजना, जनमन आवास योजनेतून 1 लाख 20 हजार 920 घरकुले आपण बांधतो आहे. त्यापैकी 85 हजारावर घरे बांधून पुर्ण झाली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून जिल्ह्यातील शहरी भागात देखील 13 हजारावर घरे बांधली जात आहे. त्यापैकी 5 हजारावर घरे पुर्ण झाली आहे.

खनिज विकास निधीतून वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अद्ययावत ऑपरेशन थिएटर आपण तयार केले. विविध आरोग्य विषयक सुविधांसाठी 44 कोटी रुपयांचा निधी महाविद्यालयास दिला. खनिज मधूनच जिल्ह्यातील 15 प्राथमिक आरोग्य केंद्रांना विविध प्रकारच्या सुविधांसाठी 23 कोटी रुपयांचा निधी दिला. जिल्हा परिषदेच्या 63 शाळा मॅाडेल शाळा करत असून त्यासाठी 65 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

महात्मा ज्योतिराव फुले आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतून 1 हजार 356 आजारांवर विनामुल्य उपचार केले जातात. जिल्ह्यात 82 हजार 580 रुग्णांवर या योजनेतून उपचार करण्यात आले. त्यासाठी 371 कोटी शासनाने उपलब्ध करून दिले आहे. ईमारत व इतर बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनेतून 24 हजार कामगारांना 22 कोटी 33 लाखाच्या लाभाचे वितरण करण्यात आले. 38 हजार कामगारांना सुरक्षा व अत्यावश्यक संच तर 55 हजार कामगारांना गृहउपयोगी वस्तु संचाचे वाटप करण्यात आले.  जलजीवन मिशनमधून जिल्ह्यात 4 लाख 8 हजार कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आली.

केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने ॲग्रीस्टॅक ही संकल्पना राबविली जात आहे. शेतकरी, ग्राहक, विक्रेते आणि सरकार यांना एकत्र आणणारी ही संकल्पना असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याअंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे. मृद व जलसंधारणाच्या व्यापक जनजागृतीसाठी राज्यस्तरीय पाणलोट यात्रा आपण काढतो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते आपल्या जिल्ह्यातून या यात्रेचा शुभारंभ होणार आहे. केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चव्हाण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यावेळी उपस्थित राहणार आहे.

याच दिवशी गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेंतर्गत गाळ काढण्याच्या मोहिमेचा शुभारंभ देखील आपण करतो आहे. या मोहिमेसाठी नाम, पाणी फाऊंडेशन, भारतीय जैन संघटना, आर्ट ऑफ लिव्हींग अशा नामवंत संस्थांचा सहभाग आपल्याला लाभत आहे. राज्यातील सर्व टॅंकरग्रस्त गावांना टॅंकरमुक्त करण्याची मोहिम देखील आपण हाती घेतो आहे. या मोहिमेचा शुभारंभ देखील लवकरच होणार आहे, असे पालकमंत्री श्री.राठोड यांनी सांगितले.

ध्वजवंदनानंतर पोलिस व विविध विभाग तसेच शालेय विद्यार्थ्यांचे पथसंचलन झाले. विविध पुरस्कारांचे वितरण देखील पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यानी सांस्कृतिक व क्रीडा विषयक कार्यक्रम सादर केले. तंबाखुमुक्तीची सामुहिक शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाचे संचलन चंद्रबोधी घायवटे व शुभांगी वानखेडे यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

 

पायाभूत सुविधा, रस्ते विकास, शेती प्रगती, सामाजिक अन् आरोग्य क्षेत्रातील सुधारणांमध्ये ठाणे जिल्हा अग्रेसर राहिल्याचे समाधान-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे,दि. २६ (जिमाका):- आज आपण जेव्हा महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करतो, त्यावेळी मुंबई महानगर आणि विशेषतः ठाणे जिल्ह्याचा विशेष उल्लेख करावाच लागतो. एक सर्वसामान्य शिवसैनिक ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या प्रवासात ठाणे जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याची जबाबदारी मी पार पाडली याचे समाधान आहे. देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अडीच वर्षात ठाणे जिल्ह्याला चांगले प्रोजेक्ट्स मिळाले. त्यांच्या हस्ते अनेक चांगल्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमीपूजन होऊ शकले. पायाभूत सुविधा, रस्त्यांचा विकास, शेतीची प्रगती, सामाजिक आणि आरोग्याच्या सुधारणा अशा सर्व क्षेत्रांमध्ये ठाणे जिल्हा अग्रेसर राहिला याचे समाधान वाटते, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पोलीस क्रीडा संकुल, साकेत मैदान, ठाणे येथील मुख्य शासकीय सोहळ्याप्रसंगी उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, रविंद्र फाटक, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, कल्याण स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माधवी सरदेशमुख, पोलीस सह आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस अधीक्षक डॉ.डी. स्वामी, नगरपालिका प्रशासन संचालनालयाचे संचालक मनोज रानडे, महाराष्ट्र रस्ते विकास प्राधिकरणाच्या सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये, अपर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, उपजिल्हाधिकारी (सर्वसाधारण) हरिश्चंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्केपाटील, मल्लिकार्जून माने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, ठाणे प्रांताधिकारी उर्मिला पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख बाबासाहेब रेडेकर, जिल्हा राष्ट्रीय सूचना व विज्ञान अधिकारी नरेंद्र भामरे, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, पराग मणेरे, मीना मकवाणा, पंकज शिरसाठ, शशिकांत बोराटे, शेखर बागडे, जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, डॉ.अर्चना पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, प्रमोद काळे, संजय बागूल, जिल्हा हिवताप अधिकारी संतोषी शिंदे, सहायक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे, तहसिलदार डॉ.आसावरी संसारे, संदीप थोरात, रेवण लेंभे, उज्वला भगत, उमेश पाटील, नायब तहसिलदार दिनेश पैठणकर, राहुल सूर्यवंशी, सहाय्यक अभियंता कल्याणी पाटील, जिल्हा प्रशासनातील इतर अधिकारी-कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम पोलीस दलाच्या पथकाने राष्ट्रीय ध्वजास मानवंदना दिली तसेच यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीताची धून वाजविण्यात आली.

देशाच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातल्या जनतेला हार्दिक शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अन्य महान समाजसुधारकांना अभिवादन करून म्हणाले की, भारत नावाच्या प्रजासत्ताकात आपण सगळे जन्मलो. इथे लोकशाही आहे. प्रजेची सत्ता आहे. २६ जानेवारी १९५० रोजी आपला देश प्रजासत्ताक म्हणून घोषित झाला. लोकशाहीत प्रजेची सत्ता सर्वोपरि असते. निवडून येणारे नेते येतात, सत्तेच्या खुर्चीत बसतात. मान- सन्मान मिळतो. पण हे सगळे जनतेनेच ठरविलेले असते. तू त्या खुर्चीत बस आणि आमची कामं कर, असा आदेश सत्तेवर असलेल्या प्रजेने दिलेला असतो. सत्ताधारी हे फक्त सत्तेचे विश्वस्त असतात ट्रस्टी! जनतेने त्यांना दिलेले कर्तव्य बजावून शांतपणे दूर व्हायचे, हे ठरलेले असते. प्रजासत्ताकात प्रजा आधी येते, मग सत्ता येते, हे आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे.

ते पुढे म्हणाले की, नुकताच लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव देशात आणि राज्यातही पार पडला. नागरिकांनी राष्ट्रीय कर्तव्याच्या भावनेतून मतदान केले. भारतासारख्या सार्वभौम राष्ट्रामध्ये पारदशी आणि नियोजनबद्ध निवडणुका होणे, हा लोकशाही यंत्रणेवरचा विश्वास अधिकाधिक वाढविणारा आहे. या देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दहा वर्षापूर्वी या प्रजासत्ताकात खऱ्या अर्थाने लोकशाहीचे रंग भरले. हे लोकांचे राज्य आहे. याची जाणीव कामातून करुन दिली.

आज आपला देश विकासाच्या वाटेवर घोडदौड करताना दिसतो. परदेशात भारताकडे लोक आदराने बघू लागले आहेत. मोठमोठ्या महासत्तांनाही भारताचे मत जाणून घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. दहा वर्षात भारताचं अंतराळयान चंद्रावर गेले. मंगळाकडे झेपावले, इतकेच नाही तर भारतीय शास्त्रज्ञांनी सूर्याकडेही हनुमानउडी घेतली. हा पूर्वीचा भारत नाही. आताचा भारत शत्रूला “घुस के मारेंगे” हे ठणकावून सांगतो. “सीने में जुनून, आंखों में देशभक्ती की चमक रखता हूं… दुश्मन की सांसे थम जाये, आवाज में वो धमक रखता हूं” हे शब्द आहेत शहीद भगतसिंग यांचे. त्यांचाच तेजस्वी वारसा मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपल्याला पुढे न्यायचा आहे.

महाराष्ट्र हे तर भारताचे ग्रोथ इंजिन आहे. महाराष्ट्राने विकास साधला, तर देशही विकास साधणारच, ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, देशाला महासत्ता करण्याचे जे स्वप्न आहे ते साकार करण्यासाठी महाराष्ट्राला मोठे योगदान द्यायचे आहे. त्यासाठी महाराष्ट्र सर्वार्थाने सज्ज आहे. नवा महाराष्ट्र नवी उत्तुंग झेप घेतोय. आपण कोणीही असू. लहान असू, मोठे असू… सरकारी सेवेत असू, खासगी नोकरी करीत असू, उद्योजक असू, विद्यार्थी असू, शेतकरी असू …. जिथे असू तिथे महाराष्ट्रासाठी, देशासाठी खारीचा वाटा तरी उचललाच पाहिजे. तीच खरी देशसेवा असते.

श्री.शिंदे पुढे म्हणाले की, राज्यातील महायुतीच्या सरकारने गेल्या अडीच वर्षात विकास आणि कल्याणकारी योजनांची ऐतिहासिक सांगड घातली आणि या राज्यातील जनतेच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला. लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके युवा, लाडके ज्येष्ठ प्रत्येक समाज घटकाचे कल्याण व्हावे यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. त्यातूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री बळीराजा संजीवनी योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींना व्यावसायिक शिक्षण पूर्णतः मोफत, मुख्यमंत्री वयोश्री योजना अशा अनेक कल्याणकारी योजनांची मुहुर्तमेढ रोवली गेली. शेतीसाठी ४४ हजार कोटींपेक्षा जास्तीचा निधी दिला. राज्यात पायाभूत सुविधांची १० लाख कोटींपेक्षा जास्तीची कामे सुरु आहेत. महिलांचे कल्याण, रोजगार, सामाजिक न्याय, शिक्षण, आरोग्य यासाठी महाराष्ट्राचा आदर्श इतर राज्यांनी घ्यावा, असे काम सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील आमचे सरकार विकास आणि कल्याणकारी योजनांची कास कधीही सोडणार नाही, याची खात्री मी देतो.

ते म्हणाले की, आज आपण जेव्हा महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करतो, त्यावेळी मुंबई महानगर आणि विशेषतः ठाणे जिल्ह्याचा विशेष उल्लेख करावाच लागतो. एक सर्वसामान्य शिवसैनिक ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या प्रवासात ठाणे जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याची जबाबदारी मी पार पाडली याचं समाधान आहे. देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अडीच वर्षात ठाणे जिल्ह्याला चांगले प्रोजेक्ट्स मिळाले. त्यांच्या हस्ते अनेक चांगल्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमीपूजन होऊ शकलं. पायाभूत सुविधा, रस्त्यांचा विकास, शेतीची प्रगती, सामाजिक आणि आरोग्याच्या सुधारणा अशा सर्व क्षेत्रांमध्ये ठाणे जिल्हा अग्रेसर राहिला याचे समाधान वाटते.

ठाणेकरांना प्रतिक्षा असलेल्या इंटर्नल ठाणे मेट्रो प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यता मिळाली. ठाणे बोरिवली दुहेरी बोगद्याच्या कामाला सुरुवात झाली. त्यामुळे या भागात वाहतु‌कीची कोंडी खूप कमी होणार आहे. सध्याच्या फ्रीवेला छेडा नगरपासून ठाण्याच्या आनंदनगरपर्यंत वाढवित आहोत. नवी मुंबईमध्ये मेट्रो धावायला सुरुवात झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील अन्य मेट्रो प्रकल्पसुध्दा टप्याटप्प्याने सुरू होतील. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आता टेक ऑफसाठी सज्ज झाले आहे. पंतप्रधानांच्या हस्ते ३३ हजार कोटी रुपयांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमीपूजन व उ‌द्घाटन झाल्याने जिल्ह्यातील पायाभूत सुविधांना वेग येतो आहे. आनंदनगर गायमुख बायपास यांचीही कामे होणार आहेत. कल्याण शिळ मार्गावरून आता प्रवास अधिक वेगवान होणार आहे. इथल्या उड्डाणपूलांच्या तीन मार्गिका सुद्धा खुल्या केल्यामुळे वाहनांची आता फारशी कोंडी होत नाही. या मार्गाचं सहा पदरीकरण झाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. सायन-पनवेल महामार्गावर मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेचे उद्घाटन आणि रेवस ते रेडी या सागरी महामार्गावरील सात खाडी पूलांच्या कामांचे भूमीपूजनही मी मुख्यमंत्री असताना झाले आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले, दहा हजार घरे आम्ही क्लस्टर योजनेच्या माध्यमातून बांधत आहोत. आशियातली ही सर्वात मोठी क्लस्टर योजना असेल. सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेतून २६ हजार घरे मिळणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्याच्या आवास योजनेत मिळून ठाणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने १६ हजार घरे बांधली आहेत. आवास योजनेमध्ये ठाणे जिल्हा सतत अव्वल राहिला आहे. मुंबईपाठोपाठ आज ठाणे महानगरपालिकेचे नाव घेतले जाते.

ठाणे पालिकेची नवीन आयकॉनिक इमारत उभी राहणार आहे. माझी वसुंधरा 4.0 अभियानात ठाणे महानगरपालिकेने तिसरा क्रमांक पटकावून पर्यावरण संवर्धनातही आपण मागे नाही, हे दाखवून दिले आहे. ठाणे, भिवंडी-निजामपूर आणि मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रास पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्रकल्पाला मोठी गती आम्ही दिली आहे. ५०० दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन पंप हाऊस आणि बारा किलोमीटरची नवीन जलवाहिनी यांच्या कामाचा शुभारंभ झाला आहे. जिल्हा परिषदेच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या कमी झाली आहे. ठाणे ग्रामीण भागात २८ स्मार्ट ग्राम ग्रंथालये सुरू करून आपण तंत्रज्ञानामध्ये सुद्धा मागे नाही आहोत हे दाखवून दिले आहे. पोलीस दलाचे आधुनिकीकरण व वाहतूक विभागाचे बळकटीकरण करायला सुरुवात केली आहे. त्यांच्यासाठी मॉडर्न वाहने खरेदी केली आहेत. पोलीस ठाण्यांमध्ये दामिनी पथक, पोलीस काका, पोलीस दीदी यांची पथके स्थापन केली आहेत. ठाणे पोलिसांनी आपले ठाणे सुरक्षित ठाणे हे अॅप सुरू केले आहे. सुमारे साडे सहा हजार ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू आहे. नवी मुंबईतील महापे इथे महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. केवळ ठाणेच नाही तर जिल्ह्यातील सर्वच महानगरपालिकांमध्ये नागरिकांना जास्तीत जास्त सेवा जलद आणि पारदर्शी मिळाव्यात आणि नागरिकांना सुविधा व्हावी म्हणून संगणकीय प्रणालीवर भर देण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.

नीती आयोग आम्हाला मुंबईच्या Total Transformation साठी मदत आणि मार्गदर्शन करतोय. मुंबई महानगराच्या आर्थिक विकासासाठी एमएमआरडीए आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये एमओयू देखील झाला आहे. यामुळे मुंबईचे जागतिक आर्थिक केंद्राचे स्वप्न आता स्वप्न राहिलेले नाही. आगामी काळात मुंबईचा जीडीपी दुप्पट होणार आहे. यामध्ये अर्थातच मुंबई एवढेच पालघर, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांचे देखील मोठे योगदान असणार आहे, असे सांगून श्री.शिंदे पुढे म्हणाले की, ठाणे जिल्ह्याचे एकूण अर्थव्यवस्थेतले योगदान ४८ बिलियन डॉलरचे आहे. २०३० पर्यंत ते १५० बिलियन डॉलर इतके करण्याचे ठरविले आहे. सर्वात मोठे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं महानगर म्हणून ठाण्याची ओळख करायची आहे. ठाणे हे विकासाचं खणखणीत नाणं आहे, हे सिद्ध करायचे आहे.

ठाणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करतो आहोत आणि करीत राहू, मात्र यासाठी आपण सर्व एकजुटीने काम कराल, अशी आशा व्यक्त करून श्री.शिंदे यांनी महाराष्ट्र शांतताप्रिय राज्य आहे. इथे न्यायाचे राज्य आहे. कारण ही छत्रपती शिवरायांची पवित्र भूमी आहे, याचा विसर एक सेकंदभरही पडता कामा नये. सामाजिक सलोखा राखून एकोप्याने राहून आपण या विकासाच्या वाटचालीत योगदान देणे गरजेचे आहे. या महाराष्ट्रभूमीतल्या प्रत्येक लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू असावे. प्रत्येक लाडक्या भावाच्या मनगटात आत्मविश्वासाचे बळ असावे. प्रत्येक लाडक्या शेतकऱ्याच्या शिवारात समृध्दीचे पीक बहरावे. प्रत्येक तरुणाच्या भविष्याला यशस्वीतेची सोनेरी किनार असावी, हा आमच्या महायुती सरकारचा निर्धार आहे. त्यासाठी हे प्रजासत्ताक अधिक मोठे, अधिक समृध्द आणि अधिक सामर्थ्यवान करायचे आहे. मातृभूमीची आपल्याकडून हीच अपेक्षा आहे. “वतन के जां – निसार हैं वतन के काम आएंगे… हम इस ज़मीं को एक रोज़ नया आसमां बनाएँगे” या पंक्तींनी मनोगताचा समारोप केला.

यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे-डमाळे यांच्या नेतृत्वाखाली विविध पथकांमार्फत शानदार संचलनही करण्यात आले. कार्यक्रम संपल्यानंतर उपमुख्यमंत्री महोदयांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट घेतली. या दिमाखदार सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ.तरुलता धानके यांनी केले.

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारीव्यक्ती/संस्थांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

या सोहळ्याच्या निमित्ताने स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०२२-२३ जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती, विशेष पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती, ॲग्री स्टॅक योजनेमध्ये सहभागी झालेल्या व शेतकरी ओळख क्रमांक तयार झालेले शेतकरी, जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू क्रीडा मार्गदर्शक, उत्कृष्ट सेवा बजावलेले पोलीस अधिकारी-अंमलदार, उद्योग विभागाने “वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट” आणि “एक्सपोर्ट प्रमोशन” या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल उद्योग विभागाच्या सह संचालक विजू शिरसाट व उपसंचालक सीमा पवार तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरात शासनाच्या विविध योजनांसंबंधीच्या विविध उपक्रम/कार्यक्रमांना प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाच्या माध्यमातून जिल्हा माहिती कार्यालयाने व्यापक प्रसिध्दी दिल्यामुळे शासनाची आणि ठाणे जिल्हा प्रशासनाचीही प्रतिमा उंचाविण्यास उल्लेखनीय यश मिळाले. या उत्कृष्ट कामाबद्दल जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

00000

गडचिरोलीच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

गडचिरोली,(जिमाका),दि.26: गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आणि प्रगती यासाठी शासन वचनबद्ध असून जिल्ह्याला उन्नत आणि प्रगत बनवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी केले.

७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ॲड. आशिष जयस्वाल यांनी पोलिस कवायत मैदान येथील मुख्य शासकीय कार्यक्रमात राष्ट्रध्वज वंदन करून नागरिकांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हा पोलिस अधिक्षक श्री निलोत्पल, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार आदि प्रामुख्याने उपस्थित होते.

ॲड. आशिष जयस्वाल पुढे म्हणाले की, गेल्या काही वर्षांत केंद्र आणि राज्य शासनाच्या प्रयत्नांमुळे गडचिरोली जिल्ह्यात विकासाचा वेग वाढला आहे. नुकत्याच दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्यासाठी पहिल्या गुंतवणुकीचा करार करण्यात आला. या करारामुळे जिल्ह्यातील लोह प्रकल्पाला चालना मिळेल. भविष्यातला ‘स्टील हब’ ही नवी ओळख निर्माण करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याचा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 2027 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याच्या ध्येयात महत्त्वाचा वाटा असेल, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाचा उल्लेख करताना रेल्वे, विमान, आणि रस्ते कनेक्टिव्हिटी प्रकल्प वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घराघरापर्यंत पोहोचवून आर्थिक उत्पन्न वाढवणे आणि जनतेच्या जीवनमानात सुधारणा घडवणे हे शासनाचे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय आरोग्य सेवेतही जिल्ह्याने चांगली प्रगती केली असून भविष्यात अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन ठोस पावले उचलत असल्याचे त्यांनी सांगितले.

समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जिल्ह्याला प्रगतिपथावर नेण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पोलिस दलाच्या माओवादाविरोधी कारवाईचे कौतुक केले आणि लवकरच गडचिरोली जिल्हा माओवादमुक्त होईल, असा विश्वास व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारून जिल्ह्याचा शाश्वत विकास करण्याचा संकल्प केला असून त्याच दिशेने सहपालकमंत्री म्हणून आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्याला प्रगत आणि उन्नत बनवण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू असून भविष्यात गडचिरोली राज्यात सर्वाधिक प्रगत जिल्हा म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी राज्यमंत्री जयस्वाल यांनी परेडचे निरीक्षण केले तसेच परेड संचलनाची मानवंदना स्विकारली. त्याच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी पोलिस दलाच्या श्वान पथकाने आकर्षक प्रात्याक्षिक सादर केले तसेच सांस्कृतिम कार्यक्रमात सरस्वती विद्यालय, विद्याविहार कॉन्व्हेंट, नवजीवन पब्लिक स्कुल, प्रज्ञा संस्कार कॉन्व्हेंट, छत्रपती शिवाजी ॲकेडमी यांनी देखील समुहनृत्य सदर केले.

0000

जिल्ह्याची आता परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल – पालकमंत्री मकरंद पाटील

बुलढाणा,दि.26 (जिमाका) : बुलढाणा  जिल्हा हा भक्ती-शक्तीचा सुरेख संगम आहे. जिल्ह्यातील कृषी, उद्योग, आरोग्य, शिक्षण, पर्यटन, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रातील विकासातुन जिल्ह्याची परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. या सर्वांगीण विकासाच्या वाटचालीत बुलढाणा जिल्हा आता थांबणार नाही, यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी आज केले.

देशाच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानात पालकमंत्री श्री. पाटील यांच्या उपस्थितीत मुख्य शासकीय ध्वजवंदन करण्यात आले. याप्रसंगी संबोधित करताना ते बोलत होते.  यावेळी आमदार संजय गायकवाड, मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांच्यासह प्रशासनातील अधिकारी, विभाग प्रमुख, स्वातंत्र सेनानी, वीरमाता, वीरपत्नी, ज्येष्ठ नागरिक, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आता बुलढाणा जिल्ह्याच्याही विकासाला नक्कीच गती मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीच्या पहिल्या शंभर दिवसांचा आराखडा तयार केला असून त्यानुसार राज्य सरकार काम करणार आहे. यात बुलढाण्याचे मोलाचे योगदान राहील.

बुलढाणा हे विदर्भाचे प्रवेशद्वार, भक्ती-शक्तीचा सुरेख संगम, स्वराज्याचे आजोळ आणि आधुनिक संत विचारांचे माहेरघर आहे. शूर सरदार लखोजी जाधवराव यांच्या घरात स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ आई साहेबांचा जन्म सिंदखेडराजा या ऐतिहासिक गावी झाला असून हे मातृतीर्थ आपल्यासाठी प्रेरणास्त्रोत आहे.

आपल्या देशाची कृषि प्रधान देश म्हणून जगभरात ओळख आहे. त्याचप्रमाणे आपला जिल्हाही कृषि प्रधान आहे. शेतकऱ्यांच्या परिश्रमामुळे गेल्या हंगामात जिल्ह्याची सोयाबीनची उत्पादकता देशाच्या सरासरीपेक्षा अधिक राहिली आहे. बदलत्या वातावरणामुळे शेतीवर होणाऱ्या विपरीत परिणामावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करण्याची गरज आहे. ही गरज ओळखून जिल्ह्यात या चालू वर्षात 14 हजार हेक्टर क्षेत्रात संत्रा, मोसंबी, सीताफळ, केळी, पेरू, आंबा या फळपिकांची लागवड करण्यात आली आहे. सेंद्रिय शेतीचे क्षेत्रही वाढत असून ते आता आठ हजार हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. आगामी काळात भाजीपाला, तेलबिया आणि बियाणे उत्पादन केंद्र विकसित करण्यावर भर दिला जात आहे. तसेच बियाणे उत्पादनात शेतकऱ्यांनी दिलेल्या योगदानामुळे सोयाबीन बियाण्यांच्या उत्पादनात जिल्हा अव्वल राहिला आहे.

यंदाच्या आर्थिक वर्षाच्या खरीप हंगामामध्ये सुमारे सात लाख पस्तीस हजारपेक्षा जास्त तर रब्बी हंगामामध्ये सव्वा तीन लाखांपेक्षा जास्त हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यावर्षी एक लाख बारा हजार हेक्टर क्षेत्रावर निर्मित सिंचन क्षमता निर्माण करण्याचे नियोजन आहे.  सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत पंचाहत्तर हजार हेक्टरपर्यंत सिंचन क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे.

गतवर्षी खरीप हंगामावर अतिवृष्टीमुळे काही तालुक्यातील पिकांवर संकट आले. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात आले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत सन 2023-24 मध्ये खरीप व रब्बी हंगामातील 497 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. अवेळी पाऊस अतिवृष्टी पूर, आणि दुष्काळ बाधित नऊ लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत 815 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मदत व पुनर्वसन विभागामार्फत देण्यात आलेली आहे. या मदतीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी शासन पुरेपूर प्रयत्न करीत आहे.

शासनाने शेतकऱ्यांसाठी शेतमाल तारण योजना व ई-नाम योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना ई-लिलाव पद्धतीने आपला शेतमाल विक्री करण्याची सुविधा उपलब्ध झाली असून आतापर्यंत सुमारे 30 हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. वर्षाअखेर जवळजवळ पस्तीस लाख क्विंटल शेतमालाची विक्री झाली आहे. यातून सुमारे 1300 कोटी रुपयांहून अधिक रकमेची उलाढाल झाली असून शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यास मदत झाली आहे, ही मोठी उपलब्धी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हमीभाव व बाजारभावासाठी नजीकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ई-नाम प्रणालीवर नोंदणी करुन जास्त भाव देणाऱ्या व्यापाऱ्याकडेच शेतमाल विक्री करावी, असे आवाहन पालकमंत्री ना. पाटील यांनी यावेळी केले.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसायाचा विस्तार हा जिल्ह्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा घटक आहे. यावर्षी एक लाख सत्तेचाळीस हजार लिटर दूध उत्पादन झाले आहे. याबरोबरच मत्स्यबीज उत्पादन वाढविण्यावर देखील भर दिला जात आहे आणि शेतकऱ्यांची औद्योगिक क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात 3 हजार 215 शेतकरी उत्पादक संस्था तर 202 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

जिल्ह्यात जिगांव, राहेरा, आलेवाडी हे प्रमुख सिंचन प्रकल्प होत आहेत. जिगांव प्रकल्पातून सव्वा लाख हेक्टर क्षेत्रापैकी माहे जून 2025 पर्यंत दहा हजार हेक्टर, राहेरा लघु सिंचन प्रकल्पातून मार्च 2025 पर्यंत 465 हेक्टर तर आलेवाडी लघु सिंचन प्रकल्पातून जून 2025पर्यंत 750 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. जिगांव, राहेरा, आलेवाडी या तीनही सिंचन प्रकल्पाचा तीनशे गावांना लाभ होणार आहे. जिल्ह्यात एकूण 35 हजार 311 कोटी रुपयांचे सिंचन प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. या सिंचन प्रकल्पातून एक लाख बारा हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाचा मानला जाणारा 139 दशलक्ष घनमीटर साठवण क्षमतेचा वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्प 88 हजार 575 कोटी रुपये खर्चाचा असून, यामध्ये 386 मीटर लांबीच्या कालव्याचे बांधकाम प्रस्तावित आहे. यात नळगंगा, कोलोरी आणि शेलोडी हे तीन प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. या प्रकल्पामुळे बुलढाण्यातील सुमारे 38 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. हा प्रकल्प जिल्ह्याच्या जलसंधारण आणि कृषी विकासात मोठी भूमिका बजावेल, अशी अपेक्षा पालकमंत्री यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यातील जिगाव, वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्प, सिंदखेडराजा विकास आराखडा, ऐतिहासिक लोणार सरोवर विकास आराखड्यातील कामे, जिल्ह्यातील रस्ते विकास इत्यादी प्रकल्पांना पुढील काळात गती देऊन पूर्ण करण्याचा माझा मानस आहे. याशिवाय शिक्षण, आरोग्य, कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी करण्यासाठी मोठा वाव असून या क्षेत्रांचा विकास करण्यात कोणत्याही प्रकारचा हात आखडता न घेता प्राधान्य देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख पासष्ठ हजार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत जिल्ह्यात दोन हजार एकरात 91 उपकेंद्राद्वारे 401 मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट आहे. यापैकी पळशी आणि बोरी येथे दोन सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले असून उर्वरित 67 प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. या प्रकल्पांतून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्याची सुविधा उपलब्ध केली जात आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया आणि मुद्रा योजना या सारख्या योजनांद्वारे जिल्ह्यात नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी अल्प दराने कर्ज सवलत देवून त्यांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. या योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राच्या विस्ताराच्या दृष्टीने मोताळा येथे नविन एमआयडीसी प्रस्तावित करण्यात आली असून खामगांव आणि देऊळगांव राजा येथील औद्योगिक क्षेत्राचे विस्तारीकरण प्रस्तावित आहे. याद्वारे स्थानिक युवकांना नोकऱ्या व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न राहणार आहे. समृद्धी महामार्गांतर्गत सिंदखेडराजा तालुक्यातील सावरगाव माळ, निमखेड व गोळेगाव आणि मेहकर तालुक्यात साब्रा-काब्रा या दोन नवीन टाउनशिप प्रस्तावित आहेत. हा प्रकल्प बुलढाणा जिल्ह्याच्या औद्योगिक व आर्थिक विकासाला चालना देईल, असा विश्वास पालकमंत्री यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यात अकोला-खंडवा हा 23 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग आणि जालना- खामगाव हा 162 किलोमीटर लांबीचा रेल्वे प्रकल्प बांधणीचे काम लवकरच सुरु होणार आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना या एकत्रित आयुष्मान भारत योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात सव्वा सात लाखापेक्षा अधिक आयुष्मान कार्ड वितरित करण्यात आले असून 90 हजार रुग्णांनी योजनेचा लाभ घेतला आहे.

तसेच बुलढाणा येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इमारतीकरिता 403 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून सध्या त्याचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. तसेच जळगाव जामोद येथे नवीन आयुर्वेद महाविद्यालयाकरीता जागा उपलब्ध करुन देण्यात आली असून यास देखील लवकरच अंतिम मान्यता प्राप्त होणार आहे.

बुलढाणा जिल्ह्याच्या पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्राचा विकास जलदगतीने होत आहे. शेगाव विकास आराखड्यातील सर्व कामे पूर्ण झाली आहेत. लोणार सरोवर विकास आराखड्याची अंमलबजावणी सुरु असून सिंदखेडराजा विकास आराखड्यासाठी 233 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसेच ज्ञानगंगा, अंबाबर्वा अभयारण्य, मियावाकी, इकोटुरीझम, ॲग्री टुरीझमला देखील प्रोत्साहन दिले जात आहे. या उपक्रमातून जिल्ह्यात पर्यटन विकास आणि रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहे. यासह जंगल संसाधने आणि वन्य परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांचा प्रामुख्याने विचार करुन या भागातील आदिवासी बांधवांना मदत करण्यास आगामी काळात प्राधान्य दिले जाईल.

शहरी व ग्रामीण भागातील वंचित व गरजू लोकांना हक्काचे घर मिळावे यासाठी जिल्ह्यात शबरी आवास, रमाई आवास, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर धनगर आवास, मोदी आवास, प्रधानमंत्री आवास इत्यादी विविध आवास योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात चालू वर्षात एकूण 17 हजार 55 घरकुलांकरीता 267 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत जिल्ह्यातील सुमारे साडेसहा लाख महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची मदत देण्यात आली आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधताना सामाजिक स्तरही उंचावण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यासाठी वसतिगृह, निवासी शाळा, आश्रमशाळा, स्वाधार योजना, भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना, मुलींच्या विवाहासाठी कन्यादान योजना इत्यादी विविध योजना शासनाकडून राबविण्यात येत आहे. यामुळे समाजातील मागे पडलेल्या वंचित घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात सामिल करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधान आहे. या संविधानामुळे राष्ट्र निर्माणासाठी हातभार लागला आहे. प्रत्येक नागरिकाने सकारात्मक विचारातून प्रगतीकडे वाटचाल करण्याचा संकल्प करावा. येत्या काळात आपण सर्व जण चिकाटीने देशाला प्रगतीपथावर नेऊ, असे आवाहन पालकमंत्री मकरंद पाटील यांनी यावेळी केले.

प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या अधिकारी, कर्मचारी व खेळाडूंना पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी ध्वजदिन निधी संकलन 2023 चे बुलढाणा जिल्ह्याचे 104 टक्के उदिष्ट पूर्ण केल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्कॉ. लिडर रुपाली सरोदे यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाचे उत्कृष्ठ महसूल अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, तहसिलदार निलेश मडके, नायब तहसिलदार प्रविण घोटकर यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, निवडणूक विभाग, जिल्हा क्रीडा कार्यालयातील खेळाडू, समाजकल्याण कार्यालय, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव करण्यात आला. तसेच शेगाव तालुक्यातील 11 गावामध्ये केस गळती प्रकरणी प्रशासनाला केलेल्या सहकार्याबाबत बोंडगावचे माजी सरपंच रामेश्वर थारकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ॲलीमको व जिल्हा प्रशासनामार्फत दिव्यांगाना विनामुल्य व्हिल चेअर, रोलेटर, एलबो क्रंच आणि टायसिकल व बॅटरी मोटर सायकलचे वाटप करण्यात आले. अॅग्रीस्टॅक उपक्रमातंर्गत फार्मर आयडी प्राप्त केलेल्या शेतकऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारंभात पोलीस विभागाने शानदार पथसंचलन केले. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांव्दारे बॅण्ड ड्रिल, डंबेल्स कवायत, डिश कवायत, ॲरोबिक्स डान्स व कराटे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यावेळी प्रेक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणाला दाद दिली. कार्यक्रमाचे संचालन चंद्रशेखर जोशी व श्री. मोरे यांनी केले.

00000

विकसित महाराष्ट्रासाठी संकल्पबद्ध होवून काम करुया –  पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर, दि. 26 : नागपूर आणि विदर्भात विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. रोजगार निर्मिती, उद्योगांचा विकास, शिक्षण, आरोग्य, कृषी, महसूल अशा सर्वच क्षेत्रात विकास सुरु असून देशासह महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्वांनी संकल्पबद्ध होवून कार्य करण्याचे आवाहन, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले.

कस्तुरचंद पार्क मैदानावर आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार श्यामकुमार बर्वे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, अपर आयुक्त डॉ. माधवी चवरे, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल, विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप भुजबळ, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मिना, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

महसूल मंत्री श्री.बावनकुळे म्हणाले, इंग्रजांच्या गुलामगिरीच्या जोखडातून स्वतंत्र झालेल्या भारतदेशाला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले. संविधानाला आधार ठेवूनच देशाची विविध क्षेत्रात प्रगती होत आहे. प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतदेश तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र विकासाकडे अग्रेसर झाला आहे. प्रधानमंत्र्यांनी देशाला वर्ष 2047 पर्यंत विकसित करण्याचा संकल्प केला आहे व या दिशेने कार्य सुरु आहे. पुढच्या दहा वर्षात देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी योजनाबद्ध पद्धतीने विविध क्षेत्राचा विकास होत आहे. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याने भारताच्या विकासात मोलाचा वाटा उचलला आहे. दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमी फोरममध्ये मुख्यमंत्र्यांनी राज्यात 15 लाख 70 हजार कोटींची गुंतवणूक आणली. नागपूरसह विदर्भातही मोठी गुंतवणूक आली आहे. नागपुरात रोजगार निर्मितीसाठी ऑटोमोबाईल ईव्ही क्षेत्रात 500 कोटी तर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात (लिथियम बॅटरी) 42 हजार कोटींची गुंतवणूक आली आहे. बुटीबोरी भागात हरीत ऊर्जा क्षेत्रात जवळपास 16 हजार कोटींची गुंतवणूक आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात स्टील व मेटलमध्ये 10 हजार 319 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे.

नागपूर शहरातील मेयो, मेडीकल आणि डागा रुग्णालयांच्या बळकटीकरणाकरिता राज्य शासनाने भरघोस निधी दिला आहे. उच्च तंत्रज्ञानाधारीत आरोग्य सुविधा येथे पुरविण्यात येत आहेत. दिवांग्य पार्क, ॲग्रो टुरीझम, मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल, कौशल्य विकास केंद्र उभारण्याच्यादृष्टीने जोमाने कार्य सुरु आहे. पायाभूत सुविधांसह सर्वच क्षेत्रात नेटाने कार्य करुन येत्या 5 वर्षात नागपुरला अंतरराष्ट्रीय शहर बनविण्यासाठी प्रयत्‍ करु, असेही त्यांनी सांगितले.

कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी राज्य सरकार कटीबद्ध असून विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. महसूल विभागाच्या योजना सुलभ पद्धतीने राबविण्यात येत असल्याचे सांगत पीएम किसान योजनेच्या लाभाचे थेट हस्तांतरण, पीक विमा योजनेसाठी पिकांच्या नुकसानीची अचूक नोंद, पीक कर्ज मिळण्यासाठी शेतकरी ओळखपत्र देणारी ॲग्रीस्टॅक योजना सुरु करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ॲग्रीस्टॅक योजनेद्वारे शेतकऱ्यांना रियल टाईममध्ये आवश्यक माहिती व सेवा उपलब्ध होणार आहे. या महत्वाकांक्षी योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असे आवाहनही त्यांनी केले. महसुलासह अन्य विभागांच्या योजनांचा लाभ सामान्य जनतेला होण्यासाठी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी सांगितले. शासन, प्रशासन आणि लोकसहभागातून विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी संकल्पबद्ध होऊन काम करुया असेही ते म्हणाले.

तत्पूर्वी, श्री. बावनकुळे यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन  झाले. परिमंडळ ३ नागपुरच्या पोलीस उपायुक्त महक स्वामी यांच्या नेतृत्वात खुल्या जिप्सीमधून श्री. बावनकुळे यांनी परेड निरीक्षण केले. राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ४, नागपूर शहर पोलीस, नागपूर ग्रामीण, नागपूर लोहमार्ग पोलीस, महिलांचे गृहरक्षकदल, भोसला सैनिकी शाळा, श्वान पथक, प्रहार समाज जागृती संस्था व प्रहार डिफेन्स अकादमी आदी पथकांनी पथसंचलन केले. विविध विभागांच्या चित्ररथांचे पथसंचलनही यावेळी झाले.

उत्कृष्ट कार्याचा सन्मान

विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा श्री. बावनकुळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. पोलीस उपायुक्त रोशन यादव, वरिष्ठ तुरुंगाधिकारी वामन निमजे आदींसह राष्ट्रपती पदक विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. ध्वजनिधी संकलन, गौरव पुरस्कार, जिल्हा क्रीडा पुरस्कार, जिल्हा युवा पुरस्कार, पोलीस पाटील उल्लेखनीय शौर्य पुरस्कार आदी पुरस्कार प्रदान करण्यात आले.  यावेळी जिल्हा परिषद व महानगरपालिका शाळांच्या विद्यार्थ्यांनी कवायती व सांस्कृतिक कार्यक्रमाची प्रस्तुती दिली.

घर घर संविधानचित्ररथास हिरवा झेडा

भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने श्री. बावनकुळे यांच्या हस्ते समाज कल्याण विभागाच्या ‘घर घर संविधान’ या प्रचार, प्रसिद्धी व जनजागृती चित्ररथास हिरवा झेडा दाखवून रवाना करण्यात आले. सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी हा चित्ररथ संपूर्ण जिल्ह्यांमध्ये फिरवण्यात येणार असल्याची माहिती दिली. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख आदी यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ.दीपक साळीवकर, आकाशवाणीच्या प्रांजली बाविस्कर आणि महेश बागदेव यांनी केले.

००००

७५ वर्षांच्या गौरवशाली वाटचालीत विविध संकटांवर मात करत भारत देश भक्कम उभा -उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. २६:  भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान, शिवाजीनगर येथे झालेल्या शासकीय कार्यक्रमात ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी त्यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

लोकांनी, लोकांसाठी चालवलेले, लोकांचे राज्य, हा विचार घेऊन, देशाने गेल्या ७५ वर्षांची गौरवशाली वाटचाल केली. या ७५ वर्षात देशासमोर अनेक संकटे आली, आव्हाने निर्माण झाली; परंतु देश कुणापुढे झुकला नाही. वाकला नाही. डगमगला नाही. भक्कम उभा राहीला, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी काढले.

यावेळी आमदार बापुसाहेब पठारे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, ‘पीएआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, स्वातंत्र्यसैनिक यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.

नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, शेकडो वर्षांच्या पारतंत्र्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला. त्यावेळी आपल्यासमोर अनेक संकटे, आव्हाने होती. त्या संकट व आव्हानांवर मात करण्याची दिशा २६ जानेवारी १९५० ला भारताला प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून स्विकारुन आपण निश्चित केली. तेव्हापासून ७५ वर्षात देशासमोरच्या प्रत्येक संकटाला, आव्हानाला, एकजुटीनं, निर्धारानं सामोर जाण्याचं काम प्रत्येक देशवासियांनी केलं.

देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता, संविधान, देशातली लोकशाही, देशाच्या सीमा, सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक सुपुत्रांनी प्राणांचं बलिदान दिल. अनेक कुटुंबांनी सर्वस्वाचा त्याग केला. त्या सर्वांच्या त्याग, बलिदानापुढे नतमस्तक होण्याचा आजचा दिवस आहे. भारतीय प्रजासत्ताकाचा, भारतीय लोकशाहीचा, भारतीय स्वातंत्र्याचा उत्सव आज साजरा करण्याचा दिवस आहे.

देशांतर्गत कितीही मनभेद, मतभेद असले तरी, देशासमोरच्या बाह्य संकटासमोर संपूर्ण देश एक आहे, ही भावना गेल्या ७५ वर्षात अधिक मजबूत केली. ही भावना मजबूत होण्यामागे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाची ताकद आहे. देशानं स्विकारलेला सर्वधर्मसमभावाच्या विचारांचं बळ आहे. गेल्या ७५ वर्षात जगातल्या इतर देशात लोकशाही व्यवस्थेला धक्के बसत असतांना आपली लोकशाही सुरक्षित राहीली. याचं श्रेय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेला, राज्यघटनेवरच्या, लोकशाहीवरच्या देशवासियांच्या विश्वासाला आहे.

देशानं गेल्या ७५ वर्षात, शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, सहकार, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, सामाजिक सुधारणा अशा क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली. या प्रगतीचं श्रेय ७५ वर्षांच्या काळात, देशाच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक, आर्थिक क्षेत्रातल्या नेतृत्वानं जी मेहनत घेतली, कार्यकर्त्यांनी जी साथ दिली. त्यांच्या त्या मेहनतीला आहे.

पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारतर्फे राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (मरणोत्तर), गायक पंकज उधास (मरणोत्तर), निर्देशक-अभिनेते शेखर कपूर यांना पद्मभूषण तसेच अभिनेते अशोक सराफ, गायिका आश्विनी भिडे देशपांडे, निसर्गअभ्यासक मारुती चितमपल्ली, वनसंवर्धक चैत्राम पवार, होमिओपॅथी डॉ. विलास डांगरे, गायिका जसपिंदर नरुला, बासरीवादक रोणु मजुमदार, चित्रकार वासुदेव कामत, सुलेखनकार अच्चुत पालव, बँकर अरुंधती भट्टाचार्य, कृषी क्षेत्रातील कामगिरीबद्दल सुभाष खेतुलाल शर्मा यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत, हे  पुरस्कार राज्याच्या राजकीय संस्कृती, कलासमृद्धीचा गौरव आहे, अशा शब्दात श्री. पवार यांनी पुरस्कारार्थीचे अभिनंदन केले.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने पोलिस-अग्निशमन पदक तसेच सेवापदक व शौर्यपदक तसेच ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने प्रदान करण्यात  आलेल्या वीर गाथा राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्याचेही अभिनंदन केले. ज्या अधिकारी, कर्मचारी बांधवांना, मान्यवरांना आज उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरवण्यात आलं, त्यांचा हा प्रातिनिधीक सत्कार आहे, याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे.

यावेळी समाज कल्याण विभागाच्यावतीने पालकमंत्री श्री. पवार यांना भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रत  देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.

‘जीबीएस’ आजारग्रस्त रुग्णांवर पुणे महानगरपालिकेने कमला नेहरु रुग्णालय, पिंपरी-चिंचवड महानगरापालिके यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

श्री. पवार यांच्या हस्ते ॲग्री स्टॅक योजेनाच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच ‘पीएमआरडीए’च्या आपत्ती प्रतिसादक दलाकरीता वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी डेहराडून (उत्तराखंड) येथे होणार्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचा ध्वज उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते पथकप्रमुख संजय शेटे यांच्याकडे ध्वज हस्तांतरित करण्यात आला.

यावेळी उल्लेखनीय सेवेबाबत अपर पोलीस महासंचालनालयाचे तुरुगांधिकारी तात्यासाहेब निंबाळकर, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनील ढमाळ, तुरंगाधिकारी प्रकाश उकरंडे, सेवानिवृत्त सुभेदार आनंदा हिरवे राष्ट्रपती सुधार सेवा पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवेबाबत अधीक्षक येरवडा खुले कारागृहाचे अधीक्षक अनिल खामकर, तुरुंगाधिकारी तानाजी धोत्रे, सुभेदार प्रकाश सातपुते, कारागृह उपमहानिरीक्षक कार्यालयाचे तुरुगांधिकारी विजय कांबळे राष्ट्रपती सुधार सेवा पदक प्राप्त झाले असून त्यांचा उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावेळी झालेल्या शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. परेड संचलनात पुणे शहर, पुणे जिल्हा ग्रामीण, पिंपरी-चिंचवड पोलीस दल, पुणे शहर पोलीस आयुक्तालय परीमंडळ १ ते ५, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १ व २, पुणे लोहमार्ग, राज्य उत्पादन शुल्क, गृहरक्षक दल, वनविभाग पुरुष व महिला, वाहतूक विभाग, डायल ११२ वाहन, वज्र वाहन दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, वरुण वाहन दंगल नियंत्रण पथक, शासकीय रुग्णवाहिका १०८, बालभारती, श्वान पथक, अग्निशमन दल, पीएआरडीए आपत्ती प्रतिसादक दल तसेच विविध शाळांच्या पथकांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, निमंत्रितांची भेट घेऊन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

****

ताज्या बातम्या

राजधानीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन

0
नवी दिल्ली ३०:  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत महात्मा बसवेश्वर जयंतीदिनी महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्रात अभिवादन  करण्यात आले. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहातील कार्यक्रमात...

स्वच्छतेसाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे – मंत्री गुलाबराव पाटील

0
मुंबई, दि. ३०: राज्यातील ग्रामीण भागात वैयक्तिक स्वच्छतेसोबतच शाश्वत सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे तसेच गावात दृश्यमान शाश्वत स्वच्छता राखणे आवश्यक आहे. यासाठी ग्रामीण...

जिल्ह्यात वन पर्यटन विकसित करा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

0
गडचिरोली, (जिमाका) दि.30: गडचिरोली जिल्हा वेगाने विकसित होत असताना येथील नैसर्गिक वैभव आणि पर्यटनाच्या संभावनांना चालना देण्यासाठी जिल्ह्यात वनपर्यटन विकसित करण्याचे निर्देश राज्याचे वित्त,...

खासगी आस्थापनांतील अंतर्गत तक्रार समितीची नोंद करण्यासाठी ‘शी बॉक्स पोर्टल’

0
मुंबई दि. ३०: कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळास प्रतिबंध करण्यासाठी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे अनिवार्य आहे. असे न केल्यास ५० हजार रूपये दंडात्मक...

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या अनुदान व बीज भांडवल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

0
मुंबई, ‍‍दि. ३० : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, जिल्हा कार्यालया मुंबई शहर/उपनगर कार्यालयामार्फत सन 2025-26 या वर्षासाठी 50 टक्के अनुदान योजना व...