गुरूवार, मे 1, 2025
Home Blog Page 229

शाश्वत शेती, ऊर्जेच्या माध्यमातून परिवर्तन घडवू या – पालकमंत्री अतुल सावे

  • पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण
  • चित्ररथ व सादरीकरणाने लक्ष वेधले
  • पोलीस व विविध पथकाचे लक्षवेधी संचलन

नांदेड दि. २६: भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त इतर मागास बहुजन कल्याण,दुग्धविकास,अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान वजिराबाद नांदेड येथे ध्वजारोहन पार पडले. यावेळी त्यांनी नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी शाश्वत शेती व शाश्वत ऊर्जेच्या सर्व प्रकल्पांना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचा संदेश यंत्रणांना दिला. आजचा प्रजासत्ताक दिन विविध विभागांचे लक्षवेधी सादरीकरण व चित्ररथांमुळे स्मरणीय ठरला.

आज सकाळी 9.15 वा. पालकमंत्री श्री. सावे यांनी ध्वजवंदन केले. त्यानंतर पोलीस वाहनातून त्यांनी संचलन करणाऱ्या पथकांची पाहणी केली. आजच्या परेडचे नेतृत्व पोलीस उपअधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप यांनी केले.

यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद तिडके, विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, वरिष्ठ अधिकारी, स्वातंत्र सैनिक, वारसपत्नी आणि जेष्ठ सन्माननीय नागरिक, विविध पक्षांचे पदाधिकारी, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

आज या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांना अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांच्या उपलब्धीसाठी त्यांचा सत्कारही करण्यात आला.

यावेळी पालकमंत्र्यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी केंद्र व राज्य शासनाने शेती आणि अपारंपरिक ऊर्जेच्या स्त्रोतांना शाश्वत सुत्रामध्ये बांधण्याचे धोरण अधोरेखीत केले. जिल्ह्यातील सिंचन सुविधा आणखी बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले. यावेळी त्यांनी किवळा साठवण तलाव पिण्याच्या पाण्यासाठी उपयोगात आणल्यास सिंचन क्षमता आणखी वाढेल. यासाठी तातडीने शहराच्या पाणीपुरवठ्यामध्ये सुधारणा करण्याबाबतच्या सूचना केल्या.

भारताला अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रात भरारी घ्यायची आहे. दावोसमधील नुकत्याच झालेल्या व्यापारी करारामध्ये मोठे प्रकल्प अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतामध्ये होत असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. त्यामुळे या क्षेत्रात नांदेड जिल्हा अग्रेसर राहील यासाठी पुढील काळात प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतासोबतच शेतीच्या शाश्वत विकासाची हमी बारमाही सिंचन सुविधांनी वाढविण्यासाठी त्यांनी राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार, शेततळे व जलसंधारणाच्या अन्य कामाकडे जिल्ह्यामध्ये पुढील काळात लक्ष दिले जाईल, असे सुतोवाच केले.

शेतकरी आत्मनिर्भर होण्यासाठी केंद्र व राज्याच्या कृषी क्षेत्राशी संबंधित प्रधानमंत्री किसान योजना, नमो सन्मान योजना, पिक विमा योजना तसेच खते बियाणे कीटकनाशके याच्या खरेदीसाठी पतपुरवठा सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश यावेळी यंत्रणेला दिले. जिल्ह्यात सुरू असलेल्या उच्च मूल्य शेती अभियानाचे त्यांनी कौतुक केले मात्र नैसर्गिक शेती क्षेत्रात वाढ करण्याचे लक्ष्य त्यांनी यावेळी निर्धारित केले.

गेल्या वर्षी झालेल्या शेतीच्या नुकसानी संदर्भात 812 कोटीची मदत शासनाकडून करण्यात आली आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पशुसंवर्धन दुग्धविकास याबाबत जिल्ह्याच्या प्रगतीला वाव असल्याचे सांगताना त्यांनी पशुधनाची जी जनगणना सध्या सुरू आहे त्यामध्ये पशुपालकांनी शेतकऱ्यांनी प्रशासनाला साथ द्यावी असे आवाहनही केले.

राज्य शासनाच्या लोकप्रिय ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा उल्लेख करीत त्यांनी जिल्ह्यातील साडेआठ लाख महिला लाभार्थ्यांनी शासनाला साथ दिल्याबद्दल आभार व्यक्त केले लाडकी बहीण योजना यापुढेही कायम सुरू राहील अशी ग्वाही दिली.

राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात पदभरती सुरू केल्याचा उल्लेख त्यांनी केला मराठा समाजासाठी मोठ्या प्रमाणात अण्णासाहेब पाटील योजनेतून कर्ज वितरण सुरू आहे त्याचा लाभ घेण्याच्या आवाहन त्यांनी केले. 122 कोटीचा व्याज परतावा या योजनेतून शासनाने उद्योग व्यवसाय स्टार्टअप सुरू करणाऱ्या तरुणांसाठी दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य व केंद्र शासनाच्या विविध घरकुल योजनांमध्ये ग्रामीण भागातील व शहरी भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात घरे देण्यासाठी यंत्रणा आणखी गतिशील करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. घरकुल व आवास योजनेसंदर्भातील उर्वरित सर्व प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याचे त्यांनी सुचविले.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्यांक, इतर मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जातीसाठींच्या विविध योजना तसेच तृतीयपंथीयांसाठी असणाऱ्या योजनांची 100 टक्के अंमलबजावणी जिल्ह्यातील झाली पाहिजे, असे सांगितले.

समाज कल्याण विभागामार्फत वसतिगृहांच्या योजनेत कोणत्याही घटकातील विद्यार्थी सुविधांशिवाय वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याबाबत त्यांनी विभागांना सुचविले.

आरोग्य यंत्रणेने वंध्यत्व निवारणासारख्या समस्येवर सार्वत्रिक प्रयत्न सुरू केल्याबद्दल समाधान त्यांनी व्यक्त केले सोबतच ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यात यावी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील वैद्यकीय सुविधा औषधोपचार व तात्काळ प्रतिसाद अधिक गतिशील करण्याबाबत त्यांनी यावेळी यंत्रणेला सूचना केली.

नांदेडमध्ये राष्ट्रीय स्तरावरील व राज्यस्तरावरील विविध स्पर्धांच्या आयोजन क्रीडा विभागामार्फत होत आहे अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत विभागामध्ये नांदेडकडे क्रीडा विषयक अधिक सुविधा आहेत त्यामुळे नांदेड शिक्षणाप्रमाणेच खेळातही स्पोर्ट्स हब व्हावे ,अशी अपेक्षा त्यांनी आपल्या भाषणात शेवटी व्यक्त केली.यावेळी त्यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या उपलब्धीसाठी प्रमाणपत्र बहाल केले.

चित्ररथ ठरले लक्षवेधी

यावर्षी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी वेगवेगळ्या विभागांना मोठ्या प्रमाणात आपल्या उपलब्धीला चित्ररथाच्या स्वरूपात मांडण्याचे आवाहन केले होते त्याला प्रतिसाद देत अनेक विभागांनी आपले चित्ररथ तयार केले होते. पालकमंत्र्यांनी या चित्ररथांची पाहणी केली. महानगरपालिका, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, समाज कल्याण विभाग व क्रीडा विभागाचे चित्ररथ लक्षवेधी ठरले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली नाथू, रविंद्र पांडागळे यांनी केले.

०००

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

  • समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन वाटचाल
  • महिलांच्या सक्षमीकरणास शासनाचे प्राधान्य
  • सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवेसाठी प्रयत्नशील

सांगली, दि. २६, (जिमाका) : शेतकरी आणि सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून अनेक कल्याणकारी योजना राज्य शासन राबवित आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेवून राज्य शासन वाटचाल करीत आहे. सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली.

भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनी पोलीस संचलन मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात मंत्री श्री. पाटील यांनी ध्वजवंदन केले. तद्नंतर सर्व जिल्हावासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देवून संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपवनसंरक्षक नीता कट्टे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर, यांच्यासह आजी माजी लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रत्येक कार्यालयात संविधान प्रतसाठी आग्रही

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, दि. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान स्वीकारले व 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आणले गेले. भारतीय संविधान मार्गदर्शनीय आणि वंदनीय आहे. सर्व शैक्षणिक संस्था व शासकीय, निमशासकीय कार्यालयात सन्मानपूर्वक संविधान प्रत ठेवावी, असे त्यांनी सूचित केले.

ड्रगची माहिती देणाऱ्यास बक्षीस घोषित

सांगली जिल्ह्यात पोलीस विभागाने अंमली पदार्थ विरोधी मोहीम तीव्र केली आहे. पोलीस विभागास अंमली पदार्थांबाबत खात्रीशीर, ठोस आणि अचूक माहिती देणाऱ्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्याला मिळणाऱ्या वेतनातून वैयक्तिकरीत्या रक्कम रूपये 10 हजारचे बक्षीस यावेळी जाहीर केले.

शुभेच्छासंदेशात विकासकामांचा आढावा

पालकमंत्री श्री. पाटील यांनी जिल्हावासियांना उद्देशून साधलेल्या मार्गदर्शनपर शुभेच्छा संदेशात केंद्र व राज्य शासनाच्या जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध कल्याणकारी योजनांच्या कामगिरीचा आढावा घेतला.

जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून भरीव तरतूद केली आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून अनेक नाविन्यपूर्ण व लोकाभिमुख कामे हाती घेतली आहेत, असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, 100 दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी सात कलमी कृती आराखडा प्रभावीपणे राबवावा, यामुळे प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमध्ये वाढ होईल. सांगली जिल्ह्यात नऊ लाखहून अधिक शेतकरी आहेत. त्यांना ॲग्रिस्टॅक योजनेतून युनिक फार्मर आयडी देण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ वितरीत करण्यात सुलभता येईल.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून गेल्या पाच वर्षात एक हजारपेक्षा जास्त प्रकल्पांना मंजुरी दिली आहे व 25 कोटी रूपयांहून अधिक अनुदान मंजूर केले असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, या योजनेचे प्रकल्प मंजूर करण्याच्या बाबतीत सांगली जिल्हा देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. चालू आर्थिक वर्षात आजअखेर या योजनेच्या 339 प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. सांगली जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. रब्बी हंगामाकरिता जिल्ह्यात खते व बीबियाणांची पुरेशी उपलब्धता असल्याचे त्यांनी सांगितले.

उपसा सिंचन व जल जीवन मिशनच्या कामांमधून पिण्यासाठी, पशुधनासाठी व सिंचनासाठी पाणी मिळून दुष्काळी भागातील टँकर संख्या कमी होण्यास मदत झाली असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सर्वांसाठी घरे धोरणांतर्गत राज्यात 1 जानेवारी ते 10 एप्रिल या कालावधीत महाआवास अभियान राबविण्यात येत आहे. या दरम्यान विविध घरकुल योजनांतून जवळपास अकरा हजार घरकुलांना मंजुरी देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना 2.0 मधून 46 ठिकाणी प्रकल्प उभे करण्यात येत आहेत. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेतून अडीच लाखहून अधिक कृषी पंप ग्राहक वीजबिल माफीचा लाभ घेत आहेत. प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजनेतून या वर्षात 56 प्राथमिक आरोग्य केंद्रांकरिता एकूण 560 किलोवॅट क्षमतेचे सौरविद्युत प्रकल्प बसवण्यात येत आहेत. मागेल त्याला सौर ऊर्जा पंप योजनेतून अकराशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी सौर ऊर्जा पंप बसविले आहेत. या सर्वांतून शेतकरी बांधवांना अखंडित व शाश्वत वीज मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महिलांच्या सक्षमीकरणास शासनाचे प्राधान्य असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले,  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून जिल्ह्यात जवळपास पावणेआठ लाख महिलांना लाभ देण्यात येत आहे. तर लेक लाडकी योजनेतून गेल्या पावणेदोन वर्षात दोन हजारहून अधिक लाभार्थींना लाभ दिला आहे. उच्च शिक्षण व व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेशित निकषानुसार पात्र मुलींचे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क 100 टक्के माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यातून उच्चशिक्षित मुलींचे प्रमाण वाढून मुलींचे शैक्षणिक स्वप्न साकार होत आहे, असे ते म्हणाले. तसेच, त्यांनी लखपती दीदी, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, महिला सन्मान योजनेच्या कामगिरीचा आढावा घेतला.

सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मिरज व सांगली येथील शासकीय रूग्णालयात बसवण्यात आलेली अत्याधुनिक यंत्रे, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातून केलेल्या शस्त्रक्रिया, स्मार्ट पीएचसी उपक्रम, सार्वजनिक आरोग्य निर्देशांक, आरोग्य सेवेतील सर्वोच्च एन ए बी एच मानांकन, ई संजीवनी आशा कार्यक्रम यांच्या कामगिरीचा आढावा घेतला.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून गेल्या पाच महिन्यात तीन हजारहून अधिक प्रशिक्षणार्थींना लाभ दिला आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेतून जिल्ह्यात चालू वर्षी 480 लाभार्थींना लाभ दिला आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडील व्याज परतावा योजनेतून गेल्या सहा महिन्यात जवळपास साडेचारशे प्रकरणे झाली आहेत. यामध्ये बँकांनी 49 कोटी रूपयांहून अधिक कर्ज रक्कम मंजूर केली आहे, असे ते म्हणाले.

केंद्र सरकार पुरस्कृत अमृत 2.0 अंतर्गत कुपवाड भुयारी गटार योजनेची 160 किलोमीटर लांबीची ड्रेनेजची कामे पूर्ण झाली आहेत. स्वामित्व योजनेतून जिल्ह्यात आजअखेर एकूण 336 गावांतील जवळपास 68 हजार मिळकत पत्रिका व सनद तयार झाल्या आहेत. आजअखेर 232 गावात सनद वाटप शिबीर घेण्यात आले आहे.

जिल्हा नियोजन समितीमधून पोलीस दलाचे बळकटीकरण करण्यात येत असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्राधान्य कुटुंब योजना, अंत्योदय योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, अमृत ज्येष्ठ नागरिक योजना प्रभावीपणे राबवण्यात येत असल्याचे सांगितले.

जिल्ह्याचा सर्वंकष विकास करताना सीमाभागालगतच्या जत तालुक्याच्या विकासावरही लक्ष केंद्रीत केल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जतसाठी म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजना, मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना, मौजे मोरबगी येथे औद्योगिक क्षेत्र, उमदी येथे पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी अद्ययावत निवासस्थाने आदि कामे हाती घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. माझी वसुंधरा अभियानात जिल्हा परिषदेने सलग दुसऱ्या वर्षी राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले.

पुरस्कारार्थींचे विशेष अभिनंदन

अनेक सांगलीकरांनी जिल्ह्याची शान वाढवली असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अर्जुन पुरस्कार (जीवनगौरव) प्राप्त मुरलीकांत पेटकर, अर्जुन पुरस्कारप्राप्त पॅराॲथलिट सचिन खिलारी, आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आलेली स्मृती मानधना, अखिल भारतीय साहित्य संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे आणि सुनील फुलारी, राष्ट्रपती पोलीस पदकप्राप्त राष्ट्रीय तपास संस्था, मुंबईचे संपर्क अधिकारी अमोल हाके, राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक विजेती विश्वसम्राज्ञी माने यांचे विशेष अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस दलातील इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम, सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, पोलीस हवालदार नितीन बराले, हवालदार अहमद मणेर, हवालदार तुळशीराम गोरवे, पोलीस नाईक सलमा इनामदार यांचा गौरव करण्यात आला.

ॲग्रीस्टॅक योजनेंअंतर्गत प्रातिनिधीक स्वरूपात शेतकऱ्यांना प्रमाणपत्र व सातबारा वाटपही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा अभियान-2025 निमित्त प्रातिनिधीक स्वरूपात हेल्मेट वाटप व रस्ता सुरक्षा मार्गदर्शिका पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.

माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत सांगली जिल्ह्यातील 16 ग्रामपंचायतींनी राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन करीत 9 कोटी 15 लाख रक्कमेची 18 बक्षिसे प्राप्त केली. तसेच राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकविल्याबद्दल जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचा सन्मान करण्यात आला.

सन 2023-2024 च्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या स्पर्धेत कोल्हापूर विभाग स्तरामध्ये प्रथम क्रमाक प्राप्त जिल्हा परिषद शाळा सिध्देवाडी व उर्वरित इतर व्यवस्थापनांच्या शाळांच्या स्पर्धेत कोल्हापूर विभाग स्तरामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त अजितराव घोरपडे विद्यालय कळंबी यांचा सन्मान करण्यात आला.

असा झाला ध्वजवंदनाचा कार्यक्रम…

भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनी पोलीस संचलन मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रारंभी राष्ट्रध्वजास सलामी देवून राष्ट्रगीत व राज्यगीत वादन करण्यात आले. ध्वजारोहणानंतर पालकमंत्री श्री. पाटील यांनी परेड निरीक्षण करून मानवंदना स्वीकारली. संविधान अमृत महोत्सव सन 2024-2025 हर घर संविधान या अंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी पालकमंत्री श्री. पाटील यांना भारतीय संविधानाची प्रस्ताविका भेट दिली.

यावेळी विविध पथक प्रमुखांनी पालकमंत्री श्री. पाटील यांना मानवंदना दिली. प्रजासत्ताक दिनाच्या परेड संचलनात सांगली पोलीस दल, सशस्त्र पोलीस पथक, महिला पोलीस पथक, होमगार्ड, वाहतूक विभाग, महाराष्ट्र सुरक्षा बल, अग्निशमन दल, शाळांचे पथक, पोलीस दल बँड पथक, दंगल ‍विरोधी पथक, श्वान पथक, निर्भया पथक वाहन, फॉरेन्सिक लॅब वाहन, बॉम्ब शोधक व नाशक पथक वाहन, अग्निशमन वाहन आदि पथकांनी सहभाग घेतला. प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमानंतर शालेय विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. सूत्रसंचालन विजयदादा कडणे यांनी केले. या समारंभास स्वातंत्र्य सैनिक, अनेक मान्यवर पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

०००

 

नवीन आणि सशक्त महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प करूया – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभात छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर राष्ट्रध्वजाला वंदन

मुंबई, दि. २६ : सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित समारंभात दिली. सर्वांनी एकत्र येऊन नवीन आणि सशक्त महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प करूया आणि एक ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करूया, असे आवाहन त्यांनी केले.

भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथे आयोजित मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला वंदन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) डॉ. निखिल गुप्ता, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, तिन्ही सेना दलांचे वरिष्ठ अधिकारी, राज्यपालांच्या पत्नी सुमती, दक्षिण ऑस्ट्रेलिया राज्याचे मंत्री जो. झेकॅक्स, विविध देशांच्या वकिलातीमधील वरिष्ठ पदाधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, वीर सावरकर आणि सर्व महान नेते आणि समाजसुधारक यांना अभिवादन करून राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी राज्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या १०० दिवसांत लोककल्याणासाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांना गती देण्यासाठी सर्व विभागांना आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. याचबरोबर सर्व सरकारी सेवा सामान्य लोकांपर्यंत पोहोचत असल्याची खात्री करण्यासाठी ऑनलाइन आणि मोबाइल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

सरकारी कामाला गती देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चा उपयोग केला जात आहे. गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ‘महापे’ येथे सायबर सुरक्षा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे, ज्यामुळे पोलिसांना गुन्ह्यांच्या तपासात मदत होईल. थेट विदेशी गुंतवणुकीसाठी (एफडीआय) महाराष्ट्र हे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण राहिले आहे आणि एफडीआय आकर्षित करण्यात राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे, ही अतिशय अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. खरीप हंगाम २०२३ करिता कापूस व सोयाबीन उत्पादन करणाऱ्या राज्यातील ६८ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये २ हजार ८०० कोटींहून अधिक रकमेची आर्थिक मदत जमा करण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले.

उदंचन जलविद्युत प्रकल्प धोरणांतर्गत, सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) द्वारे ३८ प्रकल्पांसाठी सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या प्रकल्पांमुळे ५५,९७० मेगावॅट वीज निर्मिती करण्यात मदत होईल आणि २.९५ लाख कोटी इतकी गुंतवणूक आकर्षित होईल. याशिवाय ९०,३९० रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय घेण्याची भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आलेली आहे. याअंतर्गत राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील विवाहित महिला, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला आणि अशा कुटुंबातील एका अविवाहित महिलेला १५०० रुपये प्रति महिना दिला जात असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. या योजनेंतर्गत जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत सुमारे २ कोटी ४६ लाख महिला लाभार्थ्यांना सुमारे २१ हजार कोटी रुपयांचा आर्थिक लाभ देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी ऑलिम्पिक स्पर्धेतील पदक विजेत्यांसाठी रोख बक्षिसामध्ये ४ ते ५ पटीने वाढ करण्यात आलेली असून जागतिक स्तरावरील स्पर्धेत पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना देण्यात येणाऱ्या रोख पारितोषिकांच्या रकमेत देखील दहा पटीने वाढ करण्यात आली असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी राज्यपाल यांच्या भाषणाचा मराठी अनुवाद अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी वाचून दाखवला.

संचलनात विविध पथकांचा सहभाग

यावेळी झालेल्या संचलनात भारतीय नौदल, गोवा पोलीस, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल, बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र दल, बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दल, मुंबई लोहमार्ग पोलीस दल, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याचे सी-६० पथक, गृहरक्षक दल (पुरुष), बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, गृहरक्षक दल (महिला), राज्य उत्पादन शुल्क विभाग, वन विभाग, मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल, सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा, नागरी संरक्षण दल (पुरुष/ महिला), राष्ट्रीय सेवा योजना (मुले/मुली) एम.सी.एम गर्ल्स हायस्कूल काळाचौकी, सी. कॅडेट कोअर (मुली), सी. कॅडेट कोअर (मुले), रोड सेफ्टी पेट्रोल (मुली) रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल, दहिसर मुंबई, रोड सेफ्टी पेट्रोल (मुले) डॉ. अँटोनिओ डासिल्वा हायस्कूल दादर, मुंबई, रोड सेफ्टी पेट्रोल (मुली) अंजुमन ए इस्माईल हायस्कूल, बांद्रा मुंबई, रोड सेफ्टी पेट्रोल (मुले) रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल, दहिसर मुंबई, रोड सेफ्टी पेट्रोल (मुली) मनपा शाळा पंतनगर, घाटकोपर (पूर्व) मुंबई, रोड सेफ्टी पेट्रोल मनपा माणिकलाल एम. पी. एस इंग्लिश हायस्कूल, घाटकोपर मुंबई, स्टुडन्ट पोलीस कॅडेट (मुले-मुली) बृहन्मुंबई महानगरपालिका ब्रास बँड पथक, पाईप बँड पथक, महिला निर्भया वाहन पथक, नौदलाची वाहने, अग्निशमन दलाची वाहने आदींनी सहभाग घेतला. कमांडर सुमितसिंग चौहान हे संचलन प्रमुख होते.

संचलनात सहभागी वाहने

यावेळी भारतीय नौदलाचे एअरक्राफ्ट कॅरिअर (आयएनएस विक्रांत) (विमान वाहक युद्ध पोत), भारतीय नौसेना सुरत (विध्वंसक युद्ध पोत), वाघशीर पाणबुडी, तेजस फायटरजेट अँड अनमॅनेड एरियल व्हेईकल (हवेतून हवेत व जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र), ब्रह्मोज मिसाईल (जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र), वरुणास्त्र टोरपेडो,  इंडीजिनीअस रॉकेट लॉन्चर वेपन (पाण्यावरून पाण्याच्या आत मारा करणारे क्षेपणास्त्र) तर बृहन्मुंबई पोलीस दलाचे वाहतूक पोलीस मोटर सायकल पथक (४० गाड्या) आणि महिला निर्भय पथक (चार वाहने), तसेच बृहन्मुंबई अग्निशमन दलातील मिनी वॉटर टेंडर, २४ मीटर उंचीचे कम्बाईन फायर आणि ३२ मीटर टर्न टेबल लॅडर या वाहनांचा समावेश होता.

जनहिताचे संदेश देणारे चित्ररथ

राज्य शासनाच्या विविध विभागांनी जनहिताचे संदेश देणाऱ्या चित्ररथांसह संचलनात सहभाग घेतला. यामध्ये सहभागी झालेले विभाग (कंसात चित्ररथाचा विषय) पुढील प्रमाणे : सार्वजनिक बांधकाम (२४ तासात अष्टविनायक दर्शन), वन (आईच्या नावे एक झाड), आदिवासी विकास (वाघबारस), पर्यटन (महाराष्ट्र अनलिमिटेड), मराठी भाषा (अभिजात मराठी), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य (अनुसूचित जाती आणि विशेष घटकांचा सर्वांगीण विकास), मृद व जलसंधारण (जलयुक्त शिवार आणि गाळमुक्त धरण), कृषी (नैसर्गिक शेती), ऊर्जा (अक्षय ऊर्जा), अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण (शाश्वत अन्नपूर्णतेकडून सर्वस्पर्शी अन्न शाश्वततेकडे), पाणीपुरवठा आणि स्वच्छता (अटल भूजल योजना आणि जलजीवन मिशन), इतर मागास बहुजन कल्याण (ज्ञानदीप समतेचा), ग्रामविकास व पंचायत राज (लखपती दीदी आणि ग्रामीण घरकुल), कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता (कौशल्ययुक्त महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र), झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (झोपडपट्टी पुनर्वसन), नगरविकास (सिडको)(शहरांचे शिल्पकार), गृह (वाहतूक नियंत्रण शाखा)(गतिमान रस्त्यांचे रक्षक), कामगार (महाराष्ट्राची शान कामगारांचा सन्मान) सांस्कृतिक कार्य (महाराणी ताराराणी यांचे ३५० वे जन्म वर्ष).

प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित या समारंभात सांस्कृतिक कार्य संचालनाकडून किरण सुरेश शिंदे, अरुण सुरेश शिंदे, विवेक विनोद शिंदे, अरुण सुरेश शिंदे यांनी सनई चौघडा वादन केले. तर शिबानी जोशी आणि नरेंद्र बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले.

००००

किनारी रस्त्यामुळे वेळ आणि इंधनाची बचत तर प्रदूषणापासून मुक्ती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २६ : धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्याच्या उत्तर वाहिनीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाले. किनारी रस्त्यामुळे मुंबईकरांच्या प्रवासाच्या वेळेत तसेच इंधनामध्ये मोठी बचत होणार असून प्रदूषणापासून मुक्ती मिळण्यामध्ये हा मार्ग महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सांस्कृतिक कार्य तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव डॉ. अश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अमित सैनी, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर आदी यावेळी उपस्थित होते.

 

याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, मुंबई किनारी रस्त्याचे ९४ टक्के काम पूर्ण झाले असून आज उत्तरवाहिनी मार्गाचे उद्घाटन झाले आहे. प्रजासत्ताक दिनी हा मार्ग नागरिकांना समर्पित होत असून उद्या सोमवार दि. २७ जानेवारी पासून या मार्गासह अन्य तीन आंतरमार्गिका खुल्या होणार आहेत. यामध्ये मरीन ड्राईव्ह कडून प्रभादेवीकडे जाण्यासाठीची आंतरमार्गिका, मरीन ड्राईव्ह कडून बिंदूमाधव ठाकरे चौकाकडे जाणारी आंतरमार्गिका तसेच बिंदूमाधव ठाकरे चौकातून सागरी सेतूला जोडणारी आणि वांद्रेच्या दिशेने जाणारी आंतरमार्गिका यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रजासत्ताक दिनी उत्तरवाहिनीचे लोकार्पण होत असून या मार्गामुळे मुंबईकरांच्या जीवनात मोठा बदल घडेल, असा विश्वास व्यक्त केला. किनारी रस्त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तांत्रिक कामाचे त्यांनी यावेळी कौतुक केले.

या रस्त्याचे दुभाजक सुशोभीकरण करण्यात येत असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. हे सुशोभीकरण मे.टाटा सन्स लिमिटेड ॲण्ड अफेलेटसकडून करण्यात येत आहे.

दृष्टिक्षेपात प्रकल्प…

  • धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारा रस्ता दक्षिण या मार्गाचे लोकार्पण झाले. यामुळे मरीन ड्राईव्हकडून सागरी सेतूकडे जाणारी वाहतूक उत्तर वाहिनी पुलावरून सुरू होणार.
  • मरीन ड्राईव्हकडून प्रभादेवीकडे जाण्यासाठी आंतरमार्गिका सुरू होणार. मरीन ड्राईव्हकडून बिंदू माधव ठाकरे चौकाकडे जाणारी आंतरमार्गिका सुरू होणार.
  • बिंदू माधव ठाकरे चौकातून सागरी सेतूला जोडणारी आणि वांद्रेच्या दिशेने जाणारी आंतरमार्गिका देखील सुरू होणार.
  • वाहतूक स्थिती : १२ मार्च २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत ५० लाख वाहनांचा प्रवास तर दररोज सरासरी १८ ते २० हजार वाहनांचा प्रवास.
  • धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पामधील महत्त्वाचा टप्पा म्हणजे मुंबई किनारा रस्ता प्रकल्प व वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडणारा पुल. या पुलाची एकूण लांबी ८२७ मीटर असून वजन २४०० मेट्रीक टन इतके आहे.
  • धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) हा प्रकल्प शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत बांधण्यात येत आहे.
  • आजतागायत या प्रकल्पाचे ९४ टक्के काम पूर्ण झाले आहे.
  • प्रकल्पाचे फायदे : वेळेची सुमारे ७० टक्के बचत, तर इंधनात ३४ टक्के बचत. याचे फलित म्हणून परकीय चलनाचीही बचत. ध्वनी प्रदूषण व वायुप्रदूषणात घट होण्यास मदत. ७० हेक्टर हरित क्षेत्राची निर्मिती. मुंबईकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी हरितक्षेत्रात सायकल ट्रॅक, सार्वजनिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक, खुले प्रेक्षागृह साकारण्यात येत आहेत. या प्रकल्पामुळे मुंबईकरांना नवीन विहारक्षेत्र लाभणार. या प्रकल्पात सागरी संरक्षण भिंतीची उभारणी. यामुळे किनाऱ्याची धूप होणार नाही आणि समुद्राच्या उंच लाटांपासून प्रकल्पाचे संरक्षण होईल.
  • प्रकल्पाची वैशिष्ट्ये : बोगदा खनन संयंत्राच्या साहाय्याने भारतातील सर्वात मोठ्या व्यास (१२.१९ मीटर) असलेल्या बोगद्याची निर्मिती. भारतात प्रथमच रस्ते वाहतूक बोगद्यांमध्ये सकार्डो वायूजीवन प्रणालीचा वापर. भारतामध्ये प्रथमच एकलस्तंभ (मोनोपाईल) उभारून पुलाची बांधणी. एकाच प्रकल्पामध्ये पुन:प्रापण करून रस्ता, पूल, उन्नत मार्ग, उतरण मार्ग अच्छादित बोगदा, समुद्रक्षेत्र तसेच टेकडीखालून बोगदा, आरक्षणाची निर्मिती. भारतात सर्वप्रथम समुद्रकिनारी भरती-ओहोटी क्षेत्राखालून बोगद्याचे खनन व बांधकाम. या प्रकल्पात प्रवाळांच्या वसाहतींचे स्थलांतर ९० टक्के यशस्वी.
  • प्रकल्पाचा एकूण खर्च १३ हजार ९८३ कोटी.

0000

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदन कार्यक्रम

चंद्रपूर, दि. 26 : शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित, महिला, युवक-युवती यांच्यासह दुर्बल घटकाला विकासाचा केंद्रबिंदू मानून राज्य सरकार विकासाच्या मार्गावर वाटचाल करीत आाहे. यात चंद्रपूर जिल्हा प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर राहावा, यासाठी तन-मन-धनाने या जिल्ह्याचा पालकमंत्री आणि राज्याचा आदिवासी विकास मंत्री म्हणून सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबध्द आहोत, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी  दिली.

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सर्वश्री सुधाकर अडबाले, सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त विपील पालीवाल यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, स्वातंत्र्यसंग्राम सैनिक, जेष्ठ नागरिक आदी उपस्थित होते.

शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी सदैव कटिबध्द आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले, जिल्हा प्रशासनाने अनेक उपक्रमातून येथील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिला आहे. स्वातंत्र्याच्या इतिहासापासून स्वत:ची ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याला ऐतिहासिक गोंडकालीन वंशाचा वारसा लाभला आहे. या वारसामुळेच येथील संस्कृती बहरली आहे. त्याचे आपण साक्षिदार आहोत. अशा ऐतिहासिक आणि विविधतेने नटलेल्या, वनभूमी, खनिज संपत्तीने परिपूर्ण असलेल्या, तसेच जल, जंगल, जमीन आणि आदिवासी संस्कृतीचा वारसा जपणा-या चंद्रपूर जिल्ह्याचा पालकमंत्री आणि राज्याचा आदिवासी विकास मंत्री म्हणून आज ध्वजारोहण करताना आज मनस्वी आनंद होत आहे.

आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी येथील क्रांतीकारकांनी 1857 मध्ये इंग्रजांविरुध्द क्रांतीची मशाल हाती घेतली. 15 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री भारत स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आले. देश स्वतंत्र झाला तरी देशाचा कारभार भारतीयांच्या हातात नव्हता. आपल्या देशाचा कारभार आपल्याच पध्दतीने चालावा, यासाठी भारताची स्वतंत्र राज्यघटना तयार करण्याचे काम सुरू झाले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता यावर आधारीत तसेच बहुभाषिक, बहुसांस्कृतिक आणि अनेक धर्माचा समावेश असलेल्या या देशाची राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी तयार झाली. तो दिवस आपण ‘संविधान दिन’ म्हणून दरवर्षी साजरा करीत असतो. तसेच भारतीय संविधानाचे हे अमृत महोत्सवी वर्ष सुध्दा आहे.

पुढे पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, चंद्रपूर या नावाने प्रसिध्द असलेला हा जिल्हा प्राचीन काळी ‘लोकापूर’ या नावाने ओळखला जात होता. ब्रिटीशांच्या कारकिर्दीत म्हणजे 1874 पासून हा जिल्हा चांदा या स्वतंत्र नावाने गणला जाऊ लागला. कालांतराने त्याचे नामांतर इंद्रपूर आणि त्यानंतर जानेवारी 1964 चंद्रपूर असे झाले. क्रांतीकारक आणि हुतात्म्यांच्या बलिदानातून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यांच्या बलिदानाने मिळालेल्या स्वातंत्र्याचं सुराज्यात रुपांतर करण्याची जबाबदारी शासन, प्रशासन यांच्यासह प्रत्येक भारतीयाचीसुध्दा आहे. यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तत्पुर्वी पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर त्यांनी परेड संचलनाची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्वातंत्र संग्राम सैनिक, उपस्थित मान्यवरांची आस्थेने विचारपूस केली.

शहिदांच्या कुटंबियांना स्मृतीचिन्ह : पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते शहिदांच्या कुटुंबातील वीर नारी, वीर पिता, वीर माता, शौर्य चक्र प्राप्त जवानांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यात वीरपत्नी वैक्कमा गोपाल भिमनपल्लीवार, वीरपत्नी अरुणा सुनील रामटेके, वीर माता पार्वती वसंत डाहुले, वीर पिता वसंतराव डाहुले, वीरमाता छाया नवले, वीरपिता बाळकृष्ण नवले, शौर्य चक्र प्राप्त सुबेदार शंकर मेंगरे यांचा समावे होता. 

उत्कृष्ट काम करणा-या ग्रामपंचायतींचा सत्कार : लोकपयोगी योजनांमध्ये उत्कृष्ट कार्य करणा-या ग्रामपंचायतींचा यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात आकापूर (ता. नागभीड), चिचबोडी (ता. सावली),  माजरी (ता. भद्रावती).

००००००

 

लोककल्याणाचा विचार डोळ्यासमोर ठेवून विधानमंडळाची वाटचाल – सभापती प्रा. राम शिंदे

मुंबई, दिनांक २६ जानेवारी – भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला वंदन केले. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

आपले विधानमंडळ लोककल्याणाचा विचार दीपस्तंभाप्रमाणे डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करीत आहे, असे सांगून सभापती प्रा. शिंदे यांनी विधानमंडळाचे काम अधिक प्रभावी होण्यासाठी प्रश्नोत्तराचा तास विनाव्यत्त्यय होणे, समिती पद्धत अधीक सक्षम करणे, चर्चेनंतरच विधेयक संमत होणे आणि अर्थसंकल्पीय बाबींवर सदस्यांना मार्गदर्शन, ही आपली पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज अग्रक्रमासाठी चतु:सुत्री राहील, असे यावेळी स्पष्ट केले. भारतीय प्रजासत्ताक आणि भारतीय राज्यघटना अमृत महोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देत राज्यघटनेमुळे भारतातील संसदीय लोकशाही वैश्विकस्तरावर अधिक प्रभावी आणि प्रगल्भ झाल्याचे त्यांनी सांगितले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा लोककल्याणकारी राज्य संकल्पनेचा विचार पुढे नेला. त्यांच्या जन्म त्रिशताब्दीनिमित्त प्रा. राम शिंदे यांनी अभिवादन केले.

याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (१) (कार्यभार) जितेंद्र भोळे, सचिव (२) (कार्यभार) डॉ. विलास आठवले यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते ध्वजवंदन

मुंबई, दि. 26 : भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते आज दिमाखात ध्वजवंदन करण्यात आले.

वांद्रे पूर्व येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या समारंभास आमदार वरुण सरदेसाई, मुंबईं उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अतिरिक्त पोलिस आयुक्त परमजीत सिंग दहिया, पोलिस उपआयुक्त मनिष कलवानिया यांनी सलामी दिली.

या कार्यक्रमास माजी आमदार झिशान सिद्दिकी, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, शहीद परिवाराचे कुटुंबिय, शासकीय अधिकारी, पोलिस, क्रीडा मार्गदर्शक क्रीडा पटू, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री ॲड.शेलार यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय खो खो क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळालेल्या प्रशिक्षक, खेळाडू तसेच गुणवंत मार्गदर्शक व क्रीडापटू यांचा सत्कार करण्यात आला. यात केनिया पुरुष व स्त्री खो-खो संघाचे मुख्य प्रशिक्षक डॉ.नरेंद्र विठ्ठल कुंदर, खो-खो विश्वविजेत्या भारतीय संघामध्ये प्रतिनिधीत्व केलेले अनिकेत भगवान पोटे यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे, सन 2022- 23 या वर्षांकरिता क्रीडा मार्गदर्शक रमेश सकट, खेळाडू जान्हवी जाधव, अमन सिंग, रितिका महावर, अक्षता ढोकळे, प्रशांत गोरे, आदित्य खमासे आणि रितेश बोराडे यांना गुणवंत खेळाडू क्रीडा पुरस्कार देण्यात आले. सन 2023- 24 या वर्षांकरिता क्रीडा मार्गदर्शक योगेश पवार, खेळाडू निधी राणे, अभिषेक प्रसाद, आंचल गुरव, अर्ना पाटील, आकाश गोसावी आणि नमन महावर यांना गुणवंत खेळाडू क्रीडा पुरस्कार देण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महात्मा गांधी विद्यालयाचे शिक्षक राहुल प्रभू यांनी केले.

 

0000

संजय ओरके/विसअ

भारतीय प्रजासत्ताकाचा ७५ वा वर्धापन दिनोत्सव; विभागीय आयुक्तालयात तिरंग्यास मानवंदना

अमरावती, दि. 26 : भारतीय प्रजासत्ताकाच्या 75 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज प्रभारी विभागीय आयुक्त सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत तिरंग्यास मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी श्री. कटियार यांनी उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत व राज्यगीतानंतर पोलीस पथकाव्दारे तिरंग्यास मानवंदना देण्यात आली. यावेळी अपर आयुक्त गजेंद्र बावणे, उप आयुक्त रमेश आडे, राजीव फडके, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, तहसीलदार प्रज्ञा काकडे यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

0000

प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ध्वजवंदन

मुंबई, 26: भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी ध्वज फडकवून भारतीय तिरंग्यास वंदन केले.

 यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांसह राज्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी महाराष्ट्र पोलीस दलाच्यावतीने राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करून राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. यावेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

00000

सुनिल डहाळे/प्रतिवेदक

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा

मुंबई, दि. 26 :  भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योगकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे झालेल्या शासकीय सोहळ्यात राष्ट्रीय ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

 यावेळी जिल्हाधिकारी रवि कटकधोंड, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम कारभारी, उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, नागरिक, अधिकारी, कर्मचारी यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा सैनिक कार्यालयामार्फत वीर पत्नी यांचा सत्कार मंत्री श्री. लोढा यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच विविध विभागातील वैशिष्ट्यपूर्ण कार्य केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.

000

ताज्या बातम्या

भारताच्या निरंतर विकासामध्ये महाराष्ट्राची सर्वात महत्त्वाची भूमिका – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा मुंबई, दि. ०१: महाराष्ट्राकडे भारतातील सर्वात पुरोगामी आणि प्रगतिशील राज्य म्हणून पाहिले जाते. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब...

प्रगत, संपन्न महाराष्ट्र साकारण्यासाठी कटिबद्ध होऊया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ३० : - महाराष्ट्र देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असून, आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून, सहकार्यातून आणखी प्रगत, संपन्न महाराष्ट्र साकारण्यासाठी कटिबद्ध होऊया, असे...

एमएचटी-सीईटी २०२५ पीसीएम गटाच्या परीक्षेत तांत्रिक त्रुटी; ५ मे रोजी फेर परीक्षा 

0
मुंबई, दि. ३० : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून दि.२७ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी २०२५ (पीसीएम गट) सामाईक प्रवेश परीक्षेच्या सकाळच्या सत्रामध्ये...

जातनिहाय जनगणनेचा निर्णय क्रांतिकारी ठरेल – मंत्री अतुल सावे

0
मुंबई, ‍‍दि. ३० : केंद्र सरकारने घेतलेला जातनिहाय जनगणनेचा निर्णय हा ओबीसी व वंचित घटकांच्या दृष्टीने क्रांतिकारी ठरेल, असे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे...

अल्पसंख्यांक विभागांतर्गत योजनांच्या कामाचा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून आढावा 

0
मुंबई, दि. ३० : अल्पसंख्यांक विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या कामकाजाच्या अल्पसंख्यांक राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मंत्रालयात आढावा घेतला. राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, मौलाना...