शुक्रवार, मे 2, 2025
Home Blog Page 230

राज्यपालांच्या उपस्थितीत कोपरखैरणे येथील सेंट मेरीज शाळेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम

मुंबई, दि. २७ : कोपरखैरणे नवी मुंबई येथील सेंट मेरीज आयसीएसई स्कूल या शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबई येथील विष्णुदास भावे सभागृहात संपन्न झाला.

यावेळी मलंकरा ऑर्थोडॉक्स चर्चच्या मुंबई धर्मप्रांताचे मुख्य बिशप गीवर्गीस मार कुरीलोस, मुंबई मलंकरा ऑर्थोडॉक्स चर्च परिषदेचे सचिव थॉमस चाको, परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी फादर एब्राहम जोसेफ, शाळेच्या प्राचार्या ब्लेसी मॅथ्यूज, उपप्राचार्य फादर जॉन मॅथ्यूज, विश्वस्त तसेच आजी माजी प्रशासक, प्राचार्य, शिक्षक, पालक, विद्यार्थी व निमंत्रित उपस्थित होते.

रौप्य महोत्सवी वाटचालीबद्दल सेंट मेरीज स्कुलचे अभिनंदन करताना राज्यपालांनी मलंकारा ऑर्थोडॉक्स चर्चच्या कर्क रुग्ण सेवा, एचआयव्ही – एड्स रुग्ण सेवा, अनाथ मुलींचे शिक्षण आदी क्षेत्रातील सेवाकार्याचे कौतुक केले.

सेंट मेरीजच्या विद्यार्थ्यांच्या क्रीडा क्षेत्रातील उत्तम प्रदर्शनाचे कौतुक करताना खेळ व शिस्त यामुळे मानसिक व शारीरिक आरोग्य स्वस्थ राहण्यास मदत होते असे राज्यपालांनी सांगितले.

शिक्षण मिळवून धनसंपदा अर्जित करणे योग्यच आहे. मात्र केलेल्या धनसंचयाचा उपयोग स्वतःसाठी न करता समाजासाठी करावा असे राज्यपालांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले.

शाळेत वेळापत्रक महत्वाचे असते तसेच वेळापत्रक जीवनात देखील पाळले गेले पाहिजे कारण त्यातून वेळेचे चांगले नियोजन करता येते, असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी राज्यपालांचे हस्ते शाळेचे आजी – माजी समिती सदस्य, माजी प्राचार्य तसेच कला, क्रीडा व इतर उपक्रमांमध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीयस्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ग्रेसी मॅथ्यूज, आशा नारायण, जलतरणपटू तोषला भिरूड, बाल वैज्ञानिक अर्श चौधरी, माजी विश्वस्त जेकब वर्गीस, जॉन मथाई, के ए थॉमस, फुटबॉल पटू निल थॉमस यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

०००

‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त चौगुले पब्लिक स्कूलमध्ये काव्यवाचन उपक्रम

काव्यवाचन स्पर्धेस विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद

नवी दिल्ली, २७ : चौगुले पब्लिक स्कूलच्या पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी काव्यवाचन स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी त्यांनी वर्तमान विषयक तसेच बालकविता सादर केल्या. कोमडे दादा….,सॅण्डविच…., आई कशी होती रे…. भारत माता… माणूस…… आयुष्य…. स्त्रीशक्ती, कुतूहल…..चिमणीचे लग्न अशा विविध विषयांवरील कवितांचे वाचन केले.

‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने निवासी आयुक्त कार्यालय महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याअंतर्गत येथील चौगुले पब्लिक स्कूलमध्ये कविता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पाचवी ते आठवीपर्यंतच्या एकूण २१  विद्यार्थी सहभागी झाले. शाळेच्या प्राचार्य पुजा साल्पेकर यांच्या मार्गदर्शनात शिक्षिका दिपाली सावंत आणि दिपाली कदम   यांनी कविता स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सराव करून घेतला.

मराठी आणि अमराठी  भाषिक सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांनी मराठी कविता सादर केल्या. प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांना रोख आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.  तृतीय पारितोषिक दोन विद्यार्थ्यांना विभागून देण्यात आले.  सहभागी  झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना  प्रोत्साहन मिळावे, यासाठी त्यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

इयत्ता सातवीची अदिती माने या विद्यार्थींनीने स्त्रीशक्तीवर आधारित कविता सादर करून स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तनुजा सांळुके हिने आयुष्य…..या विषयावरील कविता स्पष्ट उच्चारात सादर केली. तिने  दुसऱ्या क्रमांक पटकावला. इयत्ता सातवीतील कमलेश याने आईवर……. सुंदर कविता सादर केली. तर तनुष्का या आठवीतील विद्यार्थ्यांनीने वर्तमान परिस्थितीवर आधारित कविता सादर केली.  या दोन्ही विद्यार्थ्यांना तृतीय पारितोषिक विभागून देण्यात आले.

या कविता स्पर्धेस परीक्षक आणि प्रमुख पाहुणे  म्हणून महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा आणि माहिती अधिकारी अंजु निमसरकर उपस्थित होत्या.

0000

अंजु  निमसरकर, मा.अ. वि.वृ.क्र.27 /दि. 27.01.25

गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण देण्यात शिक्षकांची जबाबदारी मोठी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. २७ – शालेय शिक्षणात महाराष्ट्र देशात आघाडीवर राहावा यासाठी शासनामार्फत सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण मिळावे यासाठी शिक्षकांवर मोठी जबाबदारी असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या धारावी काळा किल्ला शाळा संकुलातील मुंबई पब्लिक स्कूल तसेच धारावी ट्रान्झिट कॅम्प मधील इंग्रजी आणि सेमी इंग्रजी शाळांना भेट देऊन पाहणी केली.

यावेळी श्री. भुसे यांनी शाळेतील बालवाडीसह अन्य वर्ग, ग्रंथालय, विद्यार्थ्याला वाचन आणि लिहिता येते का, पाढे येतात का, कविता वाचन, विद्यार्थ्याची शारीरिक स्वच्छता याची पाहणी केली. त्यांनी पोषण आहारामध्ये दिले जाणारे अन्न, पिण्याचे पाणी स्वतः तपासले. स्मार्ट क्लासरूम, कंप्युटर लॅब, क्राफ्ट रूम मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचे योग्य ज्ञान मिळत आहे की नाही ते जाणून घेतले. परिसर स्वच्छता, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी असलेली स्वच्छतागृहे तसेच शाळेतील सीसीटीव्ही यांची देखील पाहणी करून मंत्री श्री. भुसे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

शाळांची पाहणी केल्यानंतर श्री.भुसे यांनी शिक्षक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शाळांमध्ये विद्यादानाचे कार्य चांगल्या पद्धतीने सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त करून हा दर्जा असाच कायम राखावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण मिळावे यासाठी शिक्षकांवर मोठी जबाबदारी असल्याचे सांगून समाजातील कोणत्याही घटकातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, जी उत्तर वार्ड च्या प्रशासकीय अधिकारी स्नेहलता डुंबरे, शाळेतील वर्ग शिक्षक यांनी शालेय शिक्षणमंत्री श्री.भुसे यांना शाळेविषयी सविस्तर माहिती दिली.

0000

बी.सी.झंवर/वससं/

येत्या ५ वर्षात २५ हजार स्वमालकीच्या बसेस घेण्यास अर्थमंत्र्यांची मान्यता – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई, दि.२७ :  एस. टी. महामंडळाला स्वमालकीच्या दरवर्षी पाच हजार या प्रमाणे येत्या ५ वर्षात २५ हजार नव्या बसेस घेण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी तत्वतः मान्यता दिली असून तसा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना त्यांनी परिवहन विभागाला दिल्या आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

सन २०२५-२६ अर्थसंकल्पासाठी परिवहन विभागाची आढावा बैठक उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ.पी गुप्ता, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर उपस्थित होते.

परिवहन मंत्री श्री. सरनाईक म्हणाले, सध्या एसटी महामंडळाकडे १४ हजार ३०० बसेस असून त्यापैकी १० वर्ष पेक्षा जास्त जुन्या झालेल्या  १० हजार बसेस आहेत. त्या पुढील ३-४ वर्षात प्रवासी सेवेतून बाद होतील. ही वस्तुस्थिती लक्षात घेता, भविष्यात एसटीला आत्मनिर्भर होण्यासाठी स्वतः च्या बसेस घेणे आवश्यक आहे. त्यासाठी दरवर्षी ५ हजार नवीन बसेस याप्रमाणे पुढील ५ वर्षांमध्ये २५ हजार बसेस घेण्याची पंचवार्षिक योजना आखली असून त्याला अर्थमंत्र्यांनी परवानगी द्यावी, असा प्रस्ताव मांडण्यात आला असून उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी या प्रस्तावाची निकड लक्षात घेऊन तातडीने तत्वतः मान्यता दिली.  त्याबद्दल परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

परिवहन मंत्री श्री. सरनाईक म्हणाले, दरवर्षी ५ हजार नवीन बसेस याप्रमाणे सन २०२९ मध्ये या २५  हजार बसेस व ५ हजार इलेक्ट्रिक बसेस याप्रमाणे ३०  हजार बसेसचा ताफा एसटीकडे तयार असेल” गाव तिथे एसटी आणि मागेल त्याला बस फेरी” आपण देऊ शकणार आहोत.

आनंद दिघे साहेब यांच्या जयंती निमित्त उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी  २५ हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला तत्वतः मान्यता देऊन एसटीवर प्रेम करणाऱ्या लाखो सर्वसामान्य जनतेला गोड भेट दिली आहे. याबद्दल परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी श्री. पवार यांचे आभारही मानले.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा द्याव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

क्रीडा व युवक कल्याण विभागाकडील शंभर दिवसात करावयाच्या उपक्रमांचा आढावा

मुंबई, दि. 27 : आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या राज्यातील स्पर्धकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा द्याव्या, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

क्रीडा व युवक कल्याण विभागामार्फत शंभर दिवसात करावयाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथील बैठकीत घेतला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूस आवश्यक सेवा सुविधा मिळाव्यात याबाबत क्रीडा विभागाने आवश्यक कार्यवाही करावी. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी खेळाडू सोबत जाणाऱ्या मार्गदर्शक व फिजिओथेरपिस्ट यांचा खर्च क्रीडा विभागाने करण्याबाबत नियोजन करावे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील  स्पर्धेसाठी खेळाडूंना आवश्यक असलेला व्हीसा लवकर मिळावा यासाठीही क्रीडा विभागाने समन्वय करावा.

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीयस्तरावर राज्यातील खेळाडूंना अधिक संधी मिळाली पाहिजे यासाठी शालेयस्तरावर विद्यार्थ्यांचे क्रीडा गुण अधिक विकसित होण्यासाठी जिल्हास्तरावर अधिक स्पर्धा घ्याव्यात. या स्पर्धांसाठी जिल्हा क्रीडा संकुलांचा वापर व्हावा, अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.

क्रीडा विभागामार्फत १०० दिवसाच्या कालावधीत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन २०२२-२०२३ व २०२३-२०२४ वितरण करणे, गट  अ आणि ब  करिता पात्र  खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती आदेश देणे, मिशन लक्ष्यवेध, विभागीय क्रीडा संकुल नागपूर, विभागीय संकुल, शिंपोली मुंबई, आणि  पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मधील पदक प्राप्त खेळाडू व मार्गदर्शकांना बक्षीस वितरण आदी उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

बैठकीस जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ. श्रीकर परदेशी, मदत व पुनर्वसन व विभागाच्या अपर मुख्य सचिव सोनिया सेठी, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, मत्स्यव्यवसाय सचिव डॉ. रामस्वामी एन. आदी उपस्थित होते.

क्रीडा विभागाचे सादरीकरण अतिरिक्त मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांनी केले.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

कॉर्पोरेट क्षेत्राच्या सहकार्यावर आधारित दिव्यांग कल्याणाचे धोरण तयार करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुढील १०० दिवसांमध्ये दिव्यांग कल्याण विभागाने करावयाच्या कामांचा घेतला आढावा

मुंबई, दि. 27 : दिव्यांग आपल्या शारीरिक व्यंगामुळे समाजात अनेक वेळा हीनतेच्या भावनेचा अनुभव घेत असतो. दिव्यांगाना सर्वतोपरी मदत करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन वेळोवेळी निर्णय घेते आहे. दिव्यांग कल्याणासाठी कॉर्पोरेट क्षेत्रातील मान्यवर सहकार्य करण्यास इच्छुक असतात. त्यांच्या मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणासाठी पुरेपूर उपयोग व्हावा याकरिता कॉर्पोरेट क्षेत्राच्या सहकार्यावर आधारित धोरण तयार करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे दिव्यांग कल्याण विभागाच्या पुढील 100 दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला.

दिव्यांगासाठी स्वतंत्र विभाग सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, दिव्यांग विभागाअंतर्गत असलेल्या अनुदानित विशेष शाळा व कार्यशाळा यामध्ये आधार कार्डसाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी. अनुदानित विशेष शाळा, कार्यशाळांमध्ये विद्यार्थी व कर्मचाऱ्यांसाठी आधार संलग्न बायोमेट्रिक हजेरी प्रणाली सुरू करावी. विविध शासकीय योजनांचा दिव्यांगांना लाभ मिळण्यासाठी वैश्विक ओळखपत्र (UDID कार्ड) अत्यावश्यक आहे. या ओळखपत्राचे वाटप करण्यासाठी राज्यात विशेष मोहिमेचे आयोजन करावे.

शालांतपूर्व शिष्यवृत्ती योजना व दिव्यांग व्यक्ती विवाह योजना डिबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येणार आहेत. नमो दिव्यांग शक्ती अभियान योजनेअंतर्गत उर्वरित जिल्ह्यांमध्ये दिव्यांगासाठी पुनर्वसन केंद्र तातडीने सुरू करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.

बैठकीत दिव्यांग कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून विभागाचा आराखडा सादर केला. तसेच येत्या शंभर दिवसात विभागाकडून करण्यात येणाऱ्या कामांची सविस्तर माहिती दिली.

बैठकीस पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे,  मुख्य सचिव सुजाता सौनिक, मदत व पुनर्वसन व विभागाच्या अपर मुख्य सचिव सोनिया सेठी,  मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

****

शैलजा पाटील/विसंअ/

दूध भेसळ रोखण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुढील १०० दिवसांमध्ये दुग्ध व्यवसाय विकास विभागाने करावयाच्या कामाचा घेतला आढावा

मुंबई, दि. २७  : दूधात अजिबात भेसळ होऊ नये, ग्राहकांना शुद्ध दूध मिळावे, अशीच राज्य शासनाची भूमिका आहे. भेसळयुक्त दूध मानवी आरोग्यास हानीकारक असल्याने दूध भेसळीस आळा घालण्यासाठीच्या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या पुढील १०० दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, दुधातील भेसळीचा दूध उत्पादक आणि डेअरी यांनाही  फटका बसतो. भेसळयुक्त दुधाच्या पुरवठ्यामुळे दूध उत्पादकांना कमी दर मिळतो. राज्यात दूध व दुग्धजन्य पदार्थात होणाऱ्या भेसळीवर समन्वयाने प्रतिबंधत्मक कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग आणि दुग्धव्यवसाय विकास विभाग यांच्यामार्फत संयुक्तरित्या मोहिमा राबविण्यात येतील. तसेच दूध उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करण्यात यावेत. सी. एस. आर. च्या माध्यमातून दूध उत्पादकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. राष्ट्रीय डेअरी विकास मंडळ राज्यात चांगले काम करत आहे. त्यांच्या माध्यमातून राज्यातील दुधाची उपलब्धता वाढवण्यावर भर द्यावा. विदर्भामध्ये दूध उत्पादनात वाढ झाली आहे. आणखी वाढीसाठी काम करावे अशा सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.

यावेळी दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन. यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून विभागाचा तसेच येत्या शंभर दिवसात विभागाकडून करण्यात येणाऱ्या कामांचा आराखडा मांडला.

बैठकीस पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे,  मुख्य सचिव सुजाता सौनिक, मदत व पुनर्वसन व विभागाच्या अपर मुख्य सचिव सोनिया सेठी,  मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे,  मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

****

शैलजा पाटील/विसंअ/

नदी प्रदूषण कमी करण्यासाठी अत्याधुनिक पाणी तपासणी यंत्रणा उभारावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २७ – राज्यातील नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी सातत्याने (रिअल टाईन मॉनिटिरिंग) करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात यावी. छोट्या छोट्या स्त्रोतांचे प्रदूषण कमी होण्यासाठी ग्रामीण भागात जनजागृती अभियान राबविण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली. बैठकीस पशुसंवर्धन व पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे,  मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह संबंधित विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव व सचिव उपस्थित होते. पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांनी आराखड्याचे सादरीकरण केले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, राज्यातील १०० पाणथळ जागांचे सर्वेक्षण करून त्याचे नकाशे व ब्रीफ डॉक्युमेंटशन करण्यात यावे. राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत २५ नवीन तलाव संवर्धन प्रस्तावांना मान्यता देण्यात यावी. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नमामि गोदावरी, नमानी चंद्रभागा  अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यात याव्यात तसेच नमामी पंचगंगा कार्यक्रम राबविण्यासाठी सविस्तर कृती आराखडा तयार करावा.

पर्यावरणविषयक तक्रारी, त्यावरील कार्यवाहीसंदर्भात महापर्यावरण अॅप तयार करण्यात यावे. तसेच पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग व महाराष्ट्र प्रदूषण मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, कामे, परवाने यासंदर्भात डाटाबेस तयार करण्यात यावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

केंद्र शासनाने परिचित समुद्र किनाऱ्यांच्या निल ध्वज (ब्लू फ्लॅग) प्रमाणीकरणाचा महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. ब्ल्यू फ्लॅग हे जागतिक इको लेबल प्रमाणन मानांकन आहे. त्यामुळे या योजनेत राज्यातील पाच समुद्र किनाऱ्यांचा समावेश करण्यात यावे. यामध्ये सिंधुदुर्ग येथील मेढा-निवती, रायगडमधील काशिद, पालघरमधील डहाणू, रत्नागिरीतील गुहागर आदींचा समावेश करून त्यासंदर्भातील कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

माझी वसुंधरा अभियानातील कामांचे मूल्यांकन व परिक्षण करणे, सीआरझेड अधिसूचनेअंतर्गत नवीन किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखडा नकाशे अंतिम करणे, पर्यावरण विषयक जनजागृतीसाठी विभागीय स्तरावर स्थानिक तज्ञांचा समावेश असलेली पर्यावरण रिसोर्स सेल तयार करणे हरित कार्यक्रमास मंजुरी घेणे आदी विषयी शंभर दिवस आराखड्यानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे,  मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, मदत व पुनर्वसन व विभागाच्या अपर मुख्य सचिव सोनिया सेठी, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, मत्स्यव्यवसाय सचिव डॉ. रामस्वामी एन. आदी यावेळी उपस्थित होते.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

पाळीव प्राण्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालये उभारा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २७ : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाळीव प्राण्यांसाठी रुग्णालय उभारण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे पशुसंवर्धन विभागाच्या १०० दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली. बैठकीस पशुसंवर्धन व पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह संबंधित विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव व सचिव उपस्थित होते. पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी यांनी सादरीकरण केले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पाळीव प्राणी जखमी झाल्यास अथवा त्यांच्या आजारपणात उपचारासाठी पशुसंवर्धन विभागाकडे तज्ज्ञ उपलब्ध असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात यासाठी रुग्णालये उभारण्याचा प्रस्ताव तयार करावा. तसेच पशुसंवर्धन विभागातील मनुष्यबळाची रिक्त पदे तातडीने भरण्यासंदर्भात कार्यवाही पूर्ण करावी. पशुसंवर्धन व्यवसायाला कृषि व्यवसायाचा दर्जा देण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील पशुधन वाढविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने गायी पैदासीसाठी स्वतःची यंत्रणा उभारावी. तसेच गायी पैदासीसाठी शेतकऱ्यांचा सहभाग घ्यावा. तसेच चारा उपलब्ध व्हावा, यासाठी चारा व्यवस्थापन करावे. चारा उत्पादनासाठी जमीनींची उपलब्ध करून घेऊन उत्पादन वाढवावे. विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन राबविताना इतर विभागांचेही सहाय्य घेण्यात यावे, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केल्या.

शेळ्यांमधील देवी/लंपी चर्मरोग प्रतिबंधक लस निर्मिती लवकर करण्यात यावी. राष्ट्रीय संदर्भ लस चाचणी प्रयोगशाळा लवकर कार्यान्वित करण्याचे नियोजन करावे. लाळ खुरकत व पीपीआर प्रतिबंध लसीकरण मोहीम राबवावी. बर्ड-फ्ल्यूसारखे रोग पसरू नयेत, यासाठी काळजी घ्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.

पशुप्रजनन धोरणात कालानुरुप बदल करणे आवश्यक असून त्यानुसार नवीन धोरण निश्चित करण्यात येणार आहे. तसेच पशुधनाची संख्या वाढविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहे. तसेच पशुपालन व्यवसायात लोकसहभाग वाढविण्यासाठी पशुवैद्यकीय संस्था पातळीवर अभियान राबविण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे,  मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, मदत व पुनर्वसन व विभागाच्या अपर मुख्य सचिव सोनिया सेठी, मत्स्यव्यवसाय सचिव डॉ. रामस्वामी एन. आदी यावेळी उपस्थित होते.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

राज्यातील तिसरे दिव्याशा केंद्र बुलढाण्यात; दिव्याशा केंद्र दिव्यांगासाठी पर्वणी – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

केंद्रीय राज्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण

बुलढाणा,दि.27 (जिमाका) : दिव्यांगांना आवश्यक असलेल्या उपकरण, साहित्यासाठी मुंबई, नागपूर अशा ठिकाणी जावे लागत असे. आता दिव्यांगाना आवश्यक साहित्य दिव्याशा केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातच सहज आणि कमी वेळेत उपलब्ध होणार असून दिव्याशा केंद्र हे दिव्यांगांसाठी पर्वणी ठरणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.

प्रधानमंत्री दिव्याशा केंद्राचा लोकार्पण सोहळा धाड रोड स्थित असलेल्या अपंग निवासी शाळा आणि पुनर्वसन केंद्र येथे आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार संजय गायकवाड, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगमचे उपव्यवस्थापक के.डी. गोते, दिव्यांग कल्याण व पुनर्वसन संस्थाचे अध्यक्ष जयसिंग जयवार, संस्थेचे विश्वस्त गजानन कुलकर्णी, ओमसिंग राजपूत, देशोन्नतीचे सहसंपादक राजेंद्र काळे आदी उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री श्री. जाधव म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्यावतीने दिव्यांग बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनेअंतर्गत दिव्यांगाना आवश्यक असलेले उपकरणे, साहित्य सहज आणि कमी वेळेत मोफत उपलब्ध व्हावेत यासाठी प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र बुलढाणा येथे सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचा बुलढाणा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील दिव्यांगांना लाभ होणार आहे. या केंद्रामुळे दिव्यांगांना साहित्य मिळविण्यासाठी होणारा त्रास कमी होणार असून त्यांची क्षमता वाढविण्यास मदत होणार आहे. सर्वसामान्य नागरिकाप्रमाणेच त्यांनाही सन्मानाने जगणे सोपे होणार आहे. दिव्यांगाना जास्तीत जास्त सोईसुविधा, साहित्य वाटप व आरोग्याच्या मुलभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र मुंबई, नागपूर नंतर राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे व देशातील 67 वे केंद्र बुलढाणा जिल्ह्यात सुरू झाले आहे. ही बाब जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. दिव्यांगाप्रमाणे दारिद्र रेषेखालील वयोवृद्ध नागरिकांनाही त्यांच्या आवश्यकतेनुसार साहित्य या केंद्रातून देण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग व वयोवृद्धावर आधुनिक पद्धतीने उपचार करुन आवश्यक साहित्य कमी वेळेमध्ये उपलब्ध होतील. जिल्ह्यातील गरजू दिव्यांग आणि वयोवृद्ध नागरिकांनी दिव्याशा केंद्रात भेट देवून लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते 47 दिव्यांगांना 3 लक्ष 51 हजार रुपयांचे साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये व्हील चेअर, श्रवण यंत्र, ट्र्राय साईकल, कुबड्या, अंधकाठी अशा विविध प्रकारचे साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एलिम्कोचे उपव्यवस्थापक के.डी. गोते यांनी तर संचालन रमेश आराख यांनी केले.

0000000

ताज्या बातम्या

महाराष्ट्र व गुजरात देशाच्या विकास आणि जागतिक पटलावर नाव चमकणारी राज्ये : केंद्रीय गृहमंत्री...

0
नवी दिल्ली, दिनांक १ : भारताला समृद्ध करणारे भारताचे नाव जागतिक पटलावर येण्यात मोठी भूमिका निभावणारे महत्वाचे राज्य ठरणाऱ्या महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांचा राज्य...

मुंबईत साकारणार ‘आयआयसीटी’- माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

0
वेव्हज् परिषद – २०२५ मुंबई, दि. ०१ : भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) मुंबईत स्थापन होणार असून, त्यासाठी केंद्र सरकारने ४०० कोटी...

सृजनशीलतेत चैतन्य निर्माण करण्याची क्षमता – पंतप्रधान नरेंद्र मोदी

0
मुंबई, दि. ०१ : व्यक्तीला चैतन्यमय व प्रसन्नतेने जगण्याचा अनुभव देण्याची ताकद ही सृजनशीलतेत आहे. त्याचप्रमाणे वाईट गोष्टींना निष्प्रभ करण्याची क्षमता असलेली सृजनशीलता प्रत्येकाने...

बॉलिवूडचे महान अभिनेते मनोज कुमार यांना ‘वेव्हज्’ ची श्रद्धांजली

0
मुंबई, दि. ०१: वेव्हज् २०२५ मध्ये ‘मनोज कुमार यांच्या आठवणींना उजाळा : उत्कृष्ट चित्रपट निर्माते, अस्सल राष्ट्रवादी’ या ‘वेव्हज् ब्रेकआउट’ सत्रात श्रद्धांजली वाहण्यात आली....

‘वेव्हज्’ सारख्या सुंदर उपक्रमाचा भाग असल्याचा अतिशय आनंद – हेमा मालिनी

0
वेव्हज् परिषद – २०२५ कला आणि व्यावसायिक सिनेमा यामध्ये भेदभाव नाही - लोकांच्या हृदयाला स्पर्श करतं ते कथाकथन - मोहनलाल अभिनय हे माझं बालपणापासूनचं...