शनिवार, मे 3, 2025
Home Blog Page 233

गिया बारे सिंड्रोम आजाराबाबत आरोग्य यंत्रणांनी समन्वय साधून कार्य करावे – वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, दि. 28 : गिया बारे सिंड्रोम (GBS) या आजाराचे काही रुग्ण पुण्यातील खडकवासला, नांदेड सिटी नांदेड गाव, किरकटवाडी या परिसरामध्ये आढळले आहेत. दूषित पाण्यामुळे या रोगाची लागण झाली असल्याचे प्राथमिक अहवालात दिसून येत आहे. शासकीय दवाखान्यामध्ये या आजाराच्या उपचारासाठी सर्व यंत्रणा सज्ज असून याबाबत शासन प्राधान्याने उपाययोजना करत आहे. आरोग्य विभाग व महापालिकेतील आरोग्य यंत्रणा यांनी समन्वय साधून कार्य करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले आहेत.

गिया बारे सिंड्रोमच्या उपचारासाठी पुणे महानगरपालिकेचे कमला नेहरू रुग्णालय सज्ज असुन वैद्यकीय सहाय्यता निधीची मर्यादा एक लाखावरुन दोन लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेने याबाबत नोडल अधिकारी यांची नेमणूक केली असल्याचेही राज्यमंत्री यांनी सांगितले. पुणे महानगरपालिकेने 65 हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण केले असून IVIG इंजेक्शनची उपलब्धता करण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि पाणी उकळून प्यावे, असे आवाहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केले आहे.

0000

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

 

कलाकारांवरील अन्याय दूर करण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापण्याबाबत सकारात्मक – कामगार मंत्री आकाश फुंडकर 

मुंबई, दि. 28 : चित्रपट उद्योगामध्ये काम करणारे कलाकार, सह-कलाकार, नायक, सह-नायक यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापण्यासंदर्भात विधी व न्याय विभागाकडे विचारणा करण्याचे निर्देश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले.

चित्रपट क्षेत्रात लहान भूमिका करणाऱ्या कलाकारांवर होत असलेल्या अन्यायाबद्दल सिने टी. व्ही. असोशिएशनचे पदाधिकारी मनोज जोशी, जॉनी लिव्हर, बिंदू दारासिंग, संजय पांडे, उपासना सिंग यांनी मंत्रालयात कामगार मंत्री श्री.फुंडकर यांची भेट घेतली. यावेळी कामगार विभागाचे उपसचिव स्वप्नील कापडणीस, उपसचिव दिपक पोकळे उपस्थित होते.

कामगार मंत्री श्री.फुंडकर म्हणाले की, लहान भूमिका करणाऱ्या कलाकारांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन केला जाणार नाही. कलाकारांवर कंत्राटदार किंवा निर्मात्यांकडून अन्याय झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर या कलाकारांना वेळेत वेतन मिळावे, यासाठी नियमावली तयार करण्यात येणार असून तो लवकरच केंद्रीय कामगार मंत्रालयाकडे पाठविण्यात येईल, असेही कामगार मंत्री श्री.फुंडकर यांनी सांगितले.

000

संजय ओरके/विसंअ/

दिनेश वाघमारे यांनी स्वीकारला राज्य निवडणूक आयुक्तपदाचा पदभार

मुंबई, दि. 28 (रा.नि.आ.) : राज्याचे माजी अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारे यांनी आज राज्य निवडणूक आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी त्यांचे स्वागत केले.

राज्यपाल महोदयांनी श्री. वाघमारे यांची पाच वर्षांसाठी राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. त्यासंदर्भातील अधिसूचना 20 जानेवारी 2025 रोजी प्रसिद्ध झाली होती. त्यानुसार त्यांनी आज राज्याचे सातवे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला.

श्री. वाघमारे यांनी इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीमध्ये बीटेक (1987) केले आहे. आयआयटी खरगपूरमधून त्यांनी संगणकशास्रात एमटेक (1989); तर यूकेमधून ‘विकास व प्रकल्प नियोजन’ या विषयात एम.एस्सी. (2007) केले आहे. 1994 च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असलेले श्री. वाघमारे यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आहे.

रत्नागिरीचे सहायक जिल्हाधिकारी म्हणून श्री. वाघमारे यांच्या प्रशासकीय कारकीर्दीला सुरुवात झाली होती. वाशिम आणि यवतमाळ जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर त्यांनी बुलढाण्याचे जिल्हाधिकारीपद भूषविले होते. ते नागपूर सुधार प्रन्यासचे अध्यक्षही होते. विविध शासकीय महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, सदस्य सचिव; तसेच नवी मुंबई व पिंपरी- चिंचवड महानरपालिकेचे आयुक्त म्हणूनही ते कार्यरत होते. अमरावतीचे विभागीय आयुक्त म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. वैद्यकीय शिक्षण विभागासह सामाजिक न्याय, ऊर्जा, गृह इत्यादी विभागांतही त्यांनी विविध पदे भूषविली आहेत.

श्री. वाघमारे यांना स्कॉच अवॉर्ड, नवभारत गव्हर्नन्स अवॉर्ड, सीएसआर इंडिया 2021 अवॉर्ड, पीएसयू अवॉर्ड फॉर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, ग्रीनटेक लीडिंग डायरेक्टर अवॉर्ड 2021, सत्यन मित्रा नॅशनल अवॉर्ड इत्यादी पुरस्कारांनी वेळोवेळी गौरविण्यात आले आहे.

०००

गतिशील व दायित्वपूर्ण प्रशासनाचे १०० दिवसांचे नियोजन पूर्ण करा : राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

नांदेड दि. 28 जानेवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासाठी निर्धारित केलेल्या सातसूत्री शंभर दिवसाच्या कार्यक्रमाची नांदेडमध्येही गतिशील व दायित्वपूर्ण अंमलबजावणी करा, असे आवाहन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आज येथे केले.

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला आणि बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांचा नांदेड येथील आजचा प्रथम दौरा होता. त्यांनी नियोजन भवन येथे आज विविध विभागांचा आढावा घेतला. या बैठकीला खासदार अजित गोपछडे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी अधीक्षक अभियंता महावितरण, महापारेषण, कार्यकारी अभियंता जलजीवन मिशन, पाणीपुरवठा विभाग, नांदेड कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नांदेड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग जिल्हा महिला बाल विकास अधिकारी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा परिषद. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यकारी अभियंता महावितरण व महापारेषण, वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि यंत्रणा जिल्हा समन्वयक महिला आर्थिक विकास महामंडळ आदी विभागांचा त्यांनी आढावा घेतला. खासदार अजित गोपछडे यांनीही यावेळी अनेक योजनांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात उत्तम प्रशासनाचे 100 दिवस हा संकल्प पुढे ठेवण्यात आला आहे. 7 कलमी कार्यक्रम त्यासाठी दिला गेला आहे. या शंभर दिवसांमध्ये प्रशासनामध्ये झालेला बदल दर्शनी दिसला पाहिजे. येणाऱ्या प्रत्येक अभ्यागतांचे व्यवस्थित स्वागत झाले पाहिजे, सर्व वेबसाईट अपडेट असाव्यात, कार्यालयाची स्वच्छता व प्राथमिक सुविधा परिपूर्ण असल्या पाहिजे. पारदर्शी व उद्दिष्टपूर्ण कार्यप्रणाली आत्मसात केली पाहिजे,अशा पद्धतीच्या सूचना त्यांनी केल्या.

विविध विभागाच्या सादरीकरण संदर्भात त्यांनी समाधान व्यक्त केले. तथापि, कागदावरचा विकास प्रत्यक्षात उतरण्यासाठी 100 दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार नियोजन करण्याचे त्यांनी आदेश दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी केले.

महाबळेश्वर परिसरातील पर्यटन विकासकामे गतीने पूर्ण करा – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. 28 :  महाबळेश्वर नगरपरिषद हद्दीतील मुख्य बाजारपेठ विकसित करणे तसेच डॉ. साबणे रोड लगतचा सर्व परिसर विकसित करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने करावे, असे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिले.

मंत्रालयात पर्यटन विभागाच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र पर्यटन महोत्सवाच्या नियोजनासंदर्भात आढावा बैठकीत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई बोलत होते.या बैठकीस मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव (पाटील), विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे,महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे  व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी, पर्यटन संचालनालयाचे संचालक भगवंतराव पाटील, दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी संतोष पाटील तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पर्यटन मंत्री श्री. देसाई म्हणाले की, महाबळेश्वर येथे एप्रिलमध्ये पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी महाबळेश्वर परिसरातील विकासकामे गतीने पूर्ण करावी. किल्ले प्रतापगड येथील कामे सर्व कार्यान्वय यंत्रणांनी समन्वयाने पूर्ण करावीत. प्रतापगड किल्ल्याचे सुशोभीकरण करताना किल्ल्याच्या सौंदर्याला बाधा येणार नाही याची दक्षता घ्यावी. गुणवत्तापूर्ण कामांवर भर द्यावा. पर्यटन महोत्सवाच्या अगोदर ही कामे पूर्ण करावीत. कोयनानगर पर्यटन प्रकल्पासाठी लवकरात लवकर सल्लागार नियुक्त करावा तसेच या प्रकल्पासाठी येणारा खर्च आणि करावयाच्या सर्व कामांचा आराखडा सादर करावा. कोयनानगर परिसरामध्ये असलेले ‘एमटीडीसी’चे पर्यटक निवास संकुल अद्ययावत करावे, अशा सूचनाही पर्यटन मंत्री श्री देसाई यांनी दिल्या.

0000

संध्या गरवारे/विसंअ/

 

 

मलेशियासोबत सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध वृद्धींगत करण्यात महाराष्ट्राचा पुढाकार – राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. 28 : महाराष्ट्र आणि मलेशियादरम्यान विविध सांस्कृतिक बाबींमध्ये समानता आहे. महाराष्ट्र कृषी उत्पादने, पर्यटन अशा विविध क्षेत्रांमध्ये आघाडीवर असून सांस्कृतिक आणि व्यापारी क्षेत्रातील परस्पर संबंध वृद्धींगत करण्यासाठी महाराष्ट्र मलेशियाचे स्वागत करेल, असे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

मलेशियाचे महावाणिज्य दूत अहमद झुवारी युसूफ यांनी मंगळवारी राज्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची सह्याद्री अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली. वाणिज्य दूतावासातील मो.स्यारकावी यावेळी त्यांच्यासमवेत उपस्थित होते.

मंत्री श्री.रावल यांनी समृद्धतेने नटलेल्या महाराष्ट्रातील विविध बाबींची श्री.युसूफ यांना माहिती दिली. नाशिकचा कांदा आणि द्राक्षे, कोकणचा जगप्रसिद्ध हापूस आंबा, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, सह्याद्रीच्या रांगांमधील सुगंधी इंद्रायणी तांदूळ, ताजी फळे, भाजीपाला अशा विविध उत्पादनांची निर्यात महाराष्ट्रातून होत असते. मलेशियाला निर्यात करण्याबाबत महाराष्ट्र सकारात्मक असून मलेशियाने यांची आयात करण्यासाठी पुढाकार घ्यावा, महाराष्ट्राच्यावतीने त्यांचे स्वागत आणि संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र पर्यटन स्थळांनी समृद्ध आहे. पर्यटनाच्या माध्यमातून संस्कृतीचा विस्तार होतो. मलेशियाच्या पर्यटकांनी राज्यात पर्यटनासाठी यावे, असे आवाहन मंत्री श्री.रावल यांनी केले. महाराष्ट्र आणि मलेशियादरम्यान सांस्कृतिक, आणि व्यापारी संबंध अधिक दृढ होण्यासाठी मलेशियाच्या कृषी आणि पर्यटन विषयक सदस्यांनी महाराष्ट्राला भेट देण्याचे निमंत्रणही त्यांनी दिले.

मलेशियाच्या महावाणिज्यदूतांनी यावेळी परस्पर संबंध वृद्धींगत करण्यासाठी मलेशिया करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/

 

राज्य शासनातर्फे यावर्षीपासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव

  • साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने घोषित
  • तांत्रिक आणि बालकलाकार विभागातले पुरस्कार जाहीर

मुंबई दि. २७ : मराठी चित्रपट क्षेत्राला बळ देण्यासाठी यावर्षीपासून राज्य शासन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली. त्याचबरोबर साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार विभागातले पुरस्कार जाहीर करण्यात आले.

मागील ६० वर्षापासून राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. राज्यात विविध ठिकाणी विविध संस्थांच्या मार्फत आंतरराष्ट्रीय चित्रपटांचे आयोजन केले जाते. अशा संस्थांना १० लाखापासून ४ कोटीपर्यंत शासन अर्थसहाय्य करते. यावर्षीपासून मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्याची संकल्पना सांस्कृतिक मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांनी मांडली, त्याला आता मुर्त स्वरूप आले आहे. यावर्षीचा हा पहिला चित्रपट महोत्सव मुंबईत होणार असून तीन दिवसांचा हा महोत्सव असेल. जे मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचत नाहीत असे चित्रपट या महोत्सवात दाखविण्यात येतील. प्रत्येक चित्रपटासोबत त्या चित्रपटाची टीम उपस्थित असेल जी थेट दर्शकांशी संवाद साधेल, या निमित्त काही विशेष परिसंवाद व या विषयातील अभ्यासकांच्या मुलाखती अशा आंतरराष्ट्रीय मानकांच्या स्वरूपात राज्याचा मराठी चित्रपट महोत्सव आयोजित केला जाणार आहे. याबाबतच्या तारखा व नियमावली लवकरच जाहीर करण्यात येतील. या महोत्सवात दर्जेदार मराठी चित्रपटांचा आस्वाद घेण्याची संधी चित्रपट रसिकांना मिळणार आहे. याबाबतची अंमलबजावणी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत करण्यात येणार आहे.

राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने

सन 2022 या वर्षातील साठाव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या अंतिम फेरीसाठी अनन्या, पाँडिचेरी, सनी, धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे, ४ ब्लाईंड मेन, समायरा, गाभ, ह्या गोष्टीला नावच नाही, ग्लोबल आडगाव, हर हर महादेव या दहा चित्रपटांना अंतिम फेरीत नामांकन प्राप्त झाले आहे.

तर उत्कृष्ट बालकलाकार म्हणून श्रीनिवास पोकळे (छुमंतर) व अर्णव देशपांडे (आम्ही बटरफ्लाय) यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट कला दिग्दर्शन महेश कुंडलकर (उनाड), उत्कृष्ट छाया लेखन अभिजीत चौधरी (फोर ब्लाइंड मेन) ओंकार बर्वे (ह्या गोष्टीला नावच नाही) उत्कृष्ट संकलन यश सुर्वे (काटा किर्र), उत्कृष्ट ध्वनिमुद्रण सुहास राणे (ह्या गोष्टीला नावच नाही), उत्कृष्ट ध्वनी संयोजन लोचन प्रताप कानविंदे (हर हर महादेव), उत्कृष्ट वेशभूषा उज्वला सिंग (ताठ कणा), उत्कृष्ट रंगभूषा सुमित जाधव (ताठ कणा), यांना तांत्रिक विभागातील पुरस्कार जाहीर झाले आहेत.

पुरस्काराच्या प्राथमिक फेरीसाठी १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या वर्षात सेन्सॉर झालेल्या एकूण ५० प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. या चित्रपटांचे परीक्षण मुग्धा गोडबोले, विवेक लागू, बाबासाहेब सौदागर, विजय भोपे, श्रीरंग आरस, राजा फडतरे, शरद सावंत, मेधा घाडगे, चैत्राली डोंगरे, विनोद गणात्रा, प्रकाश जाधव, शर्वरी पिल्लेई, जफर सुलतान, देवदत्त राऊत, विद्यासागर अध्यापक यांनी केले होते.

नामनिर्देशन विभागातील पुरस्कारांची नामांकने पुढीलप्रमाणे ;

  • सर्वोत्कृष्ट कथा :

१. अनिल कुमार साळवे (ग्लोबल आडगाव)

२. पूर्वल धोत्रे (4 ब्लाईंड मेन)

३. सुमित तांबे (समायरा )

  • उत्कृष्ट पटकथा :

१. इरावती कर्णिक (सनी)

२. पूर्वल धोत्रे- अभिषेक मेरुरकर (4 ब्लाईंड मेन)

३. तेजस मोडक – सचिन कुंडलकर (पॉंडिचेरी)

  • उत्कृष्ट संवाद :

१. प्रवीण तरडे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)

२. मकरंद माने (सोयरिक)

३. सचिन मुल्लेमवार (टेरिटरी)

  • उत्कृष्ट गीते :

१. प्रशांत मडपूवार (ग्लोबल आडगाव/गाणे – यल्गार होऊ दे)

२. अभिषेक रवणकर (अनन्या/गाणे-ढगा आड या)

३. प्रकाश (बाबा) चव्हाण : (फतवा/गाणे-अलगद मन हे)

  • उत्कृष्ट संगीत :

१. हितेश मोडक (हर हर महादेव)

२. निहार शेंबेकर (समायरा)

३. विजय गवंडे (सोंग्या)

  • उत्कृष्ट पार्श्वसंगीत :

१. अविनाश विश्वजीत (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)

२. हनी सातमकर (आतुर)

३. सौमिल सिध्दार्थ (सनी)

  • उत्कृष्ट पार्श्वगायक :

१. मनिष राजगिरे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे/गीत – भेटला विठ्ठल माझा)

२. पद्मनाभ गायकवाड (गुल्ह/ गीत – का रे जीव जळला)

३. अजय गोगावले (चंद्रमुखी/गीत – घे तुझ्यात सावलीत)

  • उत्कृष्ट पार्श्वगायिका :

१. जुईली जोगळेकर (समायारा/गीत – सुंदर ते ध्यान)

२. आर्या आंबेकर (चंद्रमुखी/गीत – बाई ग कस करमत नाही)

३. अमिता घुगरी (सोयरिक/गीत – तुला काय सांगु कैना)

  • उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक :

१. राहूल ठोंबरे-संजीव होवाळदार (टाईमपास 3 / गीत – कोल्ड्रीक वाटते गार, वाघाची डरकाळी )

२. उमेश जाधव (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे/गीत- आई जगदंबे)

३. श्री. सुजीत कुमार (सनी/ गीत – मी नाचणार भाई)

  • उत्कृष्ट अभिनेता :

१. प्रसाद ओक (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)

२. वैभव तत्ववादी (पॉन्डीचेरी)

३. ललीत प्रभाकर (सनी)

  • उत्कष्ट अभिनेत्री :

१. सई ताम्हाणकर (पॉन्डीचेरी)

२. अमृता खानविलकर(चंद्रमुखी)

३. सोनाली कुलकर्णी (तमाशा लाईव्ह)

  • उत्कृष्ट विनोदी अभिनेता :

१. मकरंद अनासपुरे (वऱ्हाडी वाजंत्री)

२. संजय नार्वेकर (टाईमपास)

३. भरत गणेशपुरे ( पिल्लू बॅचलर)

  • सहाय्यक अभिनेता :

१. योगेश सोमण (अनन्या)

२. किशोर कदम (टेरीटरी)

३. सुबोध भावे (हर हर महादेव)

  • सहाय्यक अभिनेत्री :

१. स्नेहल तरडे (धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे)

२. क्षिती जोग (सनी)

३. मृण्मयी देशपांडे (चंद्रमुखी)

  • उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता :

१. अकुंर राठी (समायरा)

२. रोनक लांडगे (ग्लोबल आडगाव)

३. जयदीप कोडोलीकर (हया गोष्टीला नावच नाही)

  • उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री :

१. ऋता दुर्गुळे (अनन्या)

२. सायली बांदकर (गाभ)

३. मानसी भवालकर (सोयरिक)

  • प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती :

१. आतुर

२. गुल्हर

३. ह्या गोष्टीला नावच नाही

  • प्रथम पदार्पण दिग्दर्शन :

१. 4 ब्लाइंड मेन

२. गाभ

३. अनन्या

0000

संजय ओरके/विसंअ/

भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी लिपी जिवंत ठेवणे आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 28 : अक्षरलिपी या सभ्यता व संस्कृतीच्या वाहक असतात. भारतीय संस्कृती प्राचीन असून संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या लिपीचे जतन करणे गरजेचे आहे. अन्यथा आपला इतिहास विसरला जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सुलेखनकार अच्युत पालव लिखित ‘अक्षरभारती’ या कॅलिग्राफी पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते जहांगीर आर्ट गॅलरी येथे झाले. यावेळी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, नवनीत प्रकाशनाचे संचालक अनिल गाला, पद्मश्री अच्युत पालव उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, पद्मश्री श्री.पालव अक्षर कलेला सर्वत्र पोहोचवत असून अनेक लोकांना या कलेमध्ये समाविष्ट करत आहेत. कोणत्याही व्यक्तीला एखाद्या विषयात चांगले गुण मिळवायचे असतील तर त्यांचे अक्षर चांगले असणे आवश्यक आहे. एक मोठा ज्ञानाचा खजिना देखील या अक्षरांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतो, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी श्री.पालव यांचे पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.

0000

संजय ओरके/विसंअ/

जीबीएस रुग्णांवरील उपचारासाठी विशेष व्यवस्था करा

मुंबई, दि. 28 : गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयात  विशेष व्यवस्था निर्माण करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या आजाराबाबत आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या आजाराबाबत सादरीकरण करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की,  सध्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र रुग्णांना योग्य प्रकारे उपचार मिळावेत यासाठी शासकीय रुग्णालयात विशेष व्यवस्था करावी.या आजारावर केले जाणारे उपचार महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट आहेत. अजून काही प्रक्रिया करायची असल्यास सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करावी.

हा आजार दूषित पाण्यामुळे आणि न शिजवलेले अन्न, मांस खाल्यामुळे होतो. त्यामुळे अशाप्रकारचे अन्न टाळावे, पाणी उकळून पिण्याबाबत नागरिकांना आवाहन करावे. पुण्यात ३१ तारखेला क्रिकेट सामना आहे. त्यावेळी पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य विभागाला केली.

पुणे शहरांतील रुग्णांवर उपचारासाठी पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयात उपचार करण्याची सूचना करण्यात आली आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

हा आजार दुर्मिळ आहे पण बहुतेक रुग्ण बरे होतात. हा आजार संसर्गजन्य  नाही, प्रतिकारशक्ती कमी झाल्याने हा आजार होतो. याबाबत पुण्यात आढावा घेतला आहे. उपचार आणि तपासणी बाबतच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभाग, दोन्ही महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने कार्यवाही सुरू आहे, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

पुण्यात सध्या 111 रुग्ण आहेत, 80 रुग्ण पाच किमीच्या परिघातील आहेत. 35,000 घरे आणि 94,000 नागरिकाच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. चाचणी घेण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी यांची मदत घेतली जाते आहे. एक मृत्यू झाला तो अद्याप GBS मुळेच झाला याची अजून पुष्टी नाही, असे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

बुलढाणा जिल्ह्यातील केस गळती प्रकाराची समस्या नियंत्रणात आली आहे. यात आता नव्याने रुग्ण वाढ झालेली नाही. याबाबत ‘आयसीएमआर’ कडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

000

मंत्रिमंडळ निर्णय

अटल सेतूवर सध्याच्याच सवलतीच्या दराने आणखी एक वर्षभर पथकर आकारणी

अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवर सध्या सुरू असलेल्या सवलतीच्या दरानेच आणखी एक वर्षभर पथकर आकारणी करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूच्या वापराकरिता यापुर्वी ४ जानेवारी २०२४ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत एमएमआरडीएने प्रस्तावित केलेल्या दराच्या ५० टक्के सवलतीच्या दराने पथकर (कमीत कमी २५० रुपये इतका) आकारणीचा निर्णय घेण्यात आला होता. या दराचा एक वर्षानंतर आढावा घेण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. त्यानुसार आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आणखी एक वर्षभर म्हणजेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत सध्या सुरु असलेल्या सवलतीच्या दरानेच पथकर आकारणीस मान्यता देण्यात आली.

मुंबई महानगर विकास प्राधिकरणातर्फे उभारण्यात आलेला हा सुमारे २२ किलोमीटर लांबीचा अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू प्रकल्प १३ जानेवारी २०२४ पासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

—–०—–

ताज्या बातम्या

‘जगभरातील रसिकांच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या कथा’ यावर विशेष चर्चासत्र

0
वेव्हज - 2025 मध्ये कथाकथनाच्या भविष्याबाबत जागतिक संवादाला चालना प्रसारण, चित्रपट आणि साहित्य यांचा मिलाफ मुंबई, दि. ०३ : पहिल्यांदाच आयोजित करण्‍यात आलेल्या वेव्हज्‌...

भारतासाठी परंपरा आणि तंत्रज्ञानाचा मिलाफ असलेल्या नव्या कथांची निर्मिती करण्याची हीच वेळ – किरण...

0
किरण मझुमदार शॉ यांनी वेव्हज‌्मध्ये मांडला भारताच्या सृजनशील भवितव्याचा आलेख स्टार्ट अप्सनी चित्रपटांच्या पलीकडचा विचार करण्याचे आवाहन मुंबई, दि. ०३ : सृजनशील आशय निर्मिती...

‘एआय’च्या वापरामुळे नवउद्योगाला उज्ज्वल भविष्य

0
मुंबई, दि. ०३ : भारतात स्टार्टअप्सची संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रामुख्याने आयटी, फिनटेक, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात नव्या संधी निर्माण होत आहेत. राज्य शासनाकडून...

डिजिटल माध्यमांसाठी नाविन्यता आणि सातत्य आवश्यक – डॉली सिंग

0
मुंबई, दि. ०३ : स्पर्धात्मक डिजिटल युगात स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी चांगली संहिता, विषयांची प्रभावी मांडणी, व्हिज्युअलचा योग्य वापर याबरोबरच नाविन्यता आणि सातत्य असणे आवश्यक...

डिजिटल पत्रकारिता : वर्गणी, गुणवत्ता आणि विशिष्ट वाचकवर्गावर केंद्रीत

0
मुंबई, दि. ०३ : डिजिटल पत्रकारितेचा भविष्यातील मार्ग हा वर्गणी, गुणवत्ता आणि विशिष्ट वाचकवर्गावर केंद्रित असणार आहे. जाहिरातीतून टिकाव धरण्याचा पारंपरिक मार्ग आता पुरेसा...