रविवार, मे 4, 2025
Home Blog Page 234

बालगृहातील मुली व माजी संस्थाश्रयी महिलांचे प्रश्न तात्काळ सोडवावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. २८ : बालगृहातून बाहेर पडलेल्या मुली आणि माजी संस्थाश्रयी महिलांच्या उन्नतीसाठी शासन प्रयत्नशील आहे. त्याअनुषंगाने बालगृहातून बाहेर पडलेल्या मुली व या महिलांचे अनाथ प्रमाणपत्र तसचे मूलभूत प्रश्न तात्काळ सोडवण्यावर भर द्यावा, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

चौथे महिला धोरण व बालगृहातून बाहेर पडलेल्या मुली व माजी संस्थाश्रयी महिला यांच्या मागण्यांबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आढावा घेतला. यावेळी महिला व बाल कल्याण विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, पोलीस महानिरीक्षक (प्रशिक्षण) प्रवीण पडवळ, महिला व बालविकास विभागाचे सह आयुक्त राहुल मोरे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक रुपेश राऊत,गृहविभागाचे सह सचिव राहुल कुलकर्णी, महिला व बाल विकास विभागाचे उपसचिव आनंद भोंडवे, कौशल्य विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे, सनाथ वेल्फेअर फाउंडेशनच्या अध्यक्ष गायत्री पाठक उपस्थित होत्या.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, बालगृहातून बाहेर पडलेल्या मुली व माजी संस्थाश्रयी महिलांना अनाथ प्रमाणपत्र देण्यासाठी लोकशाही दिनासारखा महिन्यातील एक दिवस निश्चित करण्यात यावा, तसेच अनाथ मुली व महिलांसाठी महिला व बाल विकास विभाग व कौशल्य विकास विभागाने संयुक्तपणे प्रशिक्षण सत्र आयोजित करावे. भूमिहीन, अनाथ महिलांना प्रधानमंत्री आवास योजना व घरकुल योजनांमध्ये तसेच ‘लाडकी बहीण’ व संजय गांधी निराधार योजनांमध्ये कसे सामावून घेता येईल याचा देखील विचार करण्यात यावा.

कोरोनामध्ये आई-वडील गमावलेल्या बालकांच्या सद्य:परिस्थितीचा आढावा महिला व बालविकास विभागाने घ्यावा. पॉक्सो प्रकरणातील मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी व्हाट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होऊन त्या सक्षमतेने स्वतःसाठी लढतील, असेही यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

बालगृहांचे आधुनिकीकरण करावे

बालकांना बालगृहांमध्ये आल्यावर आपलेपणाची जाणीव निर्माण व्हावी, तसे सकारात्मक वातावरण तयार होण्यासाठी बालगृहांचे आधुनिकीकरण करावे, असे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले. पोलीस विभागाने देखील बालस्नेही पोलीस स्टेशन उभारावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

0000

मोहिनी राणे/ससं/

सोयाबीन खरेदीसाठी सात दिवस मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्राला पाठवला – पणन मंत्री जयकुमार रावल

मुबई दि. 28 :- राज्यात सोयाबीनची खरेदी वेगाने चालू असून 31 जानेवारी नंतर सोयाबीनची खरेदी पुढे काही दिवस चालू राहावी, अशी मागणी होत आहे. त्या मागणीच्या अनुषंगाने सोयाबीन खरेदीसाठी आणखी सात दिवस मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

लातूर जिल्ह्याचे खरेदी उद्दिष्ट पूर्ण झाले असून शेतकरी आणि लोकप्रतिनिधी यांची वाढीव उद्दिष्ट देण्याची मागणी लक्षात घेता लातूर जिल्ह्यासाठी आता 20 हजार मेट्रिक टन सोयाबीन खरेदीच्या वाढीव उद्दिष्टालाही आता मंजुरी देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यासाठी दहा हजार मेट्रिक टनाचे वाढीव उद्दिष्ट मंजूर करण्यात आले होते.

राज्यात 31 जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदीची मुदत देण्यात आली आहे. राज्यात नाफेड आणि एनसीसीएफ च्या माध्यमातून 562 खरेदी केंद्रावर 25 जानेवारी पर्यंत 7 लाख 81 हजार 447 मेट्रिक टन पेक्षा अधिक सोयाबीनची खरेदी झालेली आहे. 31 जानेवारीपर्यंत यामध्ये मोठी वाढ होणार आहे. अनेक जिल्ह्यांनी आपले उद्दिष्टे पूर्ण केले आहे. लातूर जिल्ह्याने आपले पीपीएस खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण केले असून 1 लाख 28 हजार 417 मेट्रिक टन खरेदी पूर्ण झालेली आहे. काही शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करणे बाकी असल्याने तेथील लोकप्रतिनिधी व शेतकरी यांच्या मागणीनुसार आता लातूर जिल्ह्यासाठी वाढीव 20 हजार मेट्रिक टनासह एकूण 30 हजार मेट्रिक टनाचे वाढीव उद्दिष्ट मंजूर करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन 12 जानेवारी पर्यंत होणाऱ्या सोयाबीन खरेदीला मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान यांना विनंती करून 31 जानेवारी पर्यंत मुदतवाढ मिळविली होती. आता पुन्हा राज्यातील शेतकरी आणि लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता राज्यात 31 तारखेनंतर सात दिवस सोयाबीन खरेदीची मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाला प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याची माहिती, पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

 

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी प्रयत्न करावे – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. 28 : शासनाने ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी ‘परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापन केली आहे. या महामंडळाच्या माध्यमातून समाज विकासासाठी प्रयत्न करावेत. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) व परशुराम आर्थिक विकास महामंडळाने महिला लाभधारक वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

विधानभवनात ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित समस्या व प्रश्नांबाबत आढावा बैठक झाली, बैठकीस परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅ.आशिष दामले, माधव भंडारी, वित्त विभागाचे अवर सचिव गजानन कातकाडे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक रुपेश राऊत, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे उप सचिव वर्षा देशमुख, महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) च्या निबंधक डॉ. प्रिया देशपांडे,  कौशल्य विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे, ब्राह्मण सभेचे पदाधिकारी उपस्थित होते.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, ब्राम्हण समाज हा खुल्या प्रवर्गात असून ब्राह्मण समाजातील काही कुटुंब आर्थिक उत्पन गटाच्या निकषात बसणारी आहेत. त्यामुळे कमी उत्पन्न असणाऱ्या ब्राह्मण समाजातील घटकांना शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) व परशुराम आर्थिक विकास महामंडळाने ब्राह्मण समाजातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या घटकाला लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे.

वेद पाठशाळांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करावे. तसेच  संत विद्यापीठ व वैदिक पाठशाळा यांच्या एकत्रीकरणातून प्रमाणपत्र कोर्स सुरू करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाने याबाबत अभ्यासपूर्ण अहवाल सादर करावा, असे निर्देशही डॉ.गोऱ्हे यांनी दिले.

ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आर्थिक सहाय्य आणि विकासाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने शासनाने परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली असून ब्राह्मण समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी महामंडळाने गतीने काम करावे, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) महामंडळाच्या कामकाजाबाबत डॉ.गोऱ्हे समाधान व्यक्त केले.

0000

फिरत्या वाहनावरील दुकान योजनेचा लाभ घेण्याचे दिव्यांगांना आवाहन

मुंबई, दि. २८ : दिव्यांग व्यक्तीना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल ऑन ई व्हेइकल) महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळामार्फत मोफत उपलब्ध करुन देण्याबाबतची योजना आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. ६ फेब्रुवारी २०२५ पूर्वी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभय करगुटकर यांनी केले आहे.

दिव्यांग व्यक्तीना पुरेशा सोयी उपलब्ध करुन देवून रोजगार निर्मितीस चालना देणे, दिव्यांग व्यक्तीचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, त्यांना कुटुंबासोबत जीवन जगण्यास सक्षम करणे हा  या योजनेचा उद्देश आहे. दिव्यांग व्यक्तीनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी नाव नोंदणी, अर्ज करण्यासाठी पोर्टल  २२ जानेवारी २०२५ रोजी पासून सुरू करण्यात आले आहे.  या योजनेत लाभ घेण्यासाठी https://register.mshfdc.co.in ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या लिंकद्वारे दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत ६ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध असेल. या योजनेचा जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी लाभ घेण्याचे आवाहन दिव्यांग व वित्त विकास महामंडळाने केले आहे.

000

शैलजा पाटील/विसंअ/

सफाई कामगारांना वारसा हक्काने नियुक्तीच्या आदेशाची अंमलबजावणी करावी – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

मुंबई, दि. 28 : उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 8 जानेवारी 2025 रोजी दिलेल्या आदेशान्वये सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने देण्यात येणाऱ्या नियुक्तीवरील स्थगिती उठविली आहे. त्यामुळे सफाई कामगारांना वारसा हक्काने नियुक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून या आदेशाची  अंमलबजावणी करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले आहेत.

लाड समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने सफाई कामगारांना वारसा हक्काने नियुक्तीबाबत दि. 24 फेब्रुवारी 2023 च्या शासन निर्णयान्वये सुधारीत तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत.  या  निर्णयान्वये सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणाऱ्या सर्व सफाई कामगारांना लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला. तथापि, उच्च न्यायालयाच्या  औरंगाबाद खंडपीठाने  दाखल विविध याचिकांच्या अनुषंगाने  पुढील आदेश होईपर्यंत वाल्मिकी, मेहतर, भंगी, अनुसूचित जाती व नवबौद्ध या समुदायातील व्यक्ती वगळता इतर सफाई कामगारांना वारसा हक्काने नियुक्ती देण्यास स्थगिती दिली.

उच्च न्यायालयाचे 8 जानेवारी 2025 चे आदेश विचारात घेऊन 24 फेब्रुवारी 2023 च्या शासन निर्णयान्वये तसेच त्यानुषंगाने वेळोवेळी विहीत केलेल्या शासन निर्णय व सुधारणा, शुध्दीपत्रकातील तरतुदीस अनुसरुन तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री श्री. शिरसाट यांनी सर्व विभागांना तसेच राज्यातील सर्व आयुक्त, महानगरपालिका, आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय आणि आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांना निर्देश दिले आहेत. कोणत्याही सफाई कामगारांवर वारसा हक्क नियुक्तीच्या अनुषंगाने अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना श्री. शिरसाट यांनी दिल्या आहेत.

0000

शैलजा पाटील/विसंअ/

 

 

राज्यात आर्टीफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) विद्यापीठाची होणार स्थापना – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 28 : विकसित भारत 2047 मिशनच्या यशस्वी पूर्ततेसाठी आणि भारताच्या 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचालीसाठी शिक्षण आणि तंत्रज्ञान यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ लवकरच स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी समिती गठीत करण्याच्या सूचना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव, बी वेणूगोपाल रेड्डी, माहिती तंत्रज्ञान प्रधान सचिव पराग जैन-नैनुटीया, उपसचिव अशोक मांडे, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर  राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ.प्रमोद नाईक उपस्थित होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले,  कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ स्थापन करण्यासाठी समिती गठीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अत्याधुनिक संशोधन आणि तंत्रज्ञान यांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना आणि तरुणांना आवश्यक आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचे आणि जागतिक स्पर्धेत सक्षम ठेवणारे ज्ञान उपलब्ध होईल असे विद्यापीठ असावे.

माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार म्हणाले, आर्टीफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान भविष्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. एआय किंवा संबंधित क्षेत्रांवर प्रभुत्व मिळविल्यास मोठ्या आणि फायदेशीर रोजगाराच्या संधी मिळू शकतात. या पार्श्वभूमीवर देशात पहिल्या एआय विद्यापीठाची स्थापना होईल.

यासंदर्भात एक विशेष कृतीदल (टास्क फोर्स)  स्थापन करण्यात आले आहे. यामध्ये  उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव, बी वेणूगोपाल रेड्डी, माहिती तंत्रज्ञान प्रधान सचिव पराग जैन-नैनुटीया, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर,उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर,  राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ.प्रमोद नाईक, परेश पागे यांचा समवेश आहे.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

 

 

काळी पिवळी मीटर टॅक्सी व ऑटो रिक्षा भाडे दरात वाढ करण्यास मान्यता

मुंबईत, दि. २८: मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या दि. २६ सप्टेंबर २०२२ रोजीच्या बैठकीत काळी पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) व ऑटोरिक्षा (सीएनजी) भाडेदर सुधारणा करण्यात आली होती. त्यानंतर वाहनाची सरासरी किंमत, ग्राहक निर्देशांक, वाहन कर्जाचा व्याजदर आदी मध्ये वाढ झाल्यामुळे प्राधिकरणाने काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) व ऑटोरिक्षांचे भाडेदरवाढ करण्यास राज्य परिवहन प्रकरणाच्या 23 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत मान्यता  दिली आहे.

भाडेदर सुधारणा मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण क्षेत्रातील सर्व काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) व ऑटोरिक्षा (सीएनजी) यांना लागू राहील.  भाडेदर  सुधारणा १ फेब्रुवारी २०२५ पासून लागू होईल.

जे टॅक्सी व ऑटोरिक्षा परवानाधारक सुधारीत भाडेदरानुसार भाडेमिटरचे रिकॅलीब्रेशन करून घेतील. त्या ऑटोरिक्षा, टॅक्सीना  ही भाडेवाढ लागू होईल. भाडेमिटरचे रिकॅलीब्रेशन दिनांक १ फेब्रुवारी २०२५ पासून दिनांक ३० एप्रिल २०२५ पर्यंत करून घेणे आवश्यक राहील. (भाडेमिटरचे रिकॅलीब्रेशन होईपर्यंत सुधारीत अधिकृत टॅरिफ कार्ड दिनांक ३० एप्रिल २०२५ पर्यंतच अनुज्ञेय राहील.)  मोटार वाहन अधिनियमनुसार बृहन्मुंबई विदयुत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या (बेस्ट) १८५० बसेसचे ६ टप्पा प्रवासी वाहतूक परवान्याचे नुतनीकरण करण्यास प्राधिकरणाने मान्यता दिली आहे.

मुंबई महानगर क्षेत्र प्राधिकरणाच्या क्षेत्रामध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी व “लास्ट माईल कनेक्ट‍िविटी” अनुषंगाने नवीन ०२ काळी-पिवळी मीटर टॅक्सी स्टॅण्ड, ६८ ऑटोरिक्षा स्टॅण्ड व ०९ शेअर-ए ऑटोरिक्षा स्टँड उभारण्यास प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) व ऑटोरिक्षांचे भाडेदर सूत्र विहित करण्याबाबत शासनाने खटुआ समितीची स्थापना केली होती. समितीने सादर केलेल्या  अहवालास शासनाने ०९ मार्च २०२० रोजीच्या निर्णयाव्दारे मान्य केले आहे. त्यानुसार काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) व ऑटोरिक्षा (सीएनजी) भाडे निश्चितीच्या सुत्रानुसार व वाहनाची सरासरी किंमत, ग्राहक निर्देशांक, वाहन कर्जाचा व्याजदर आदी बाबी विचारात घेऊन भाड्याची परिगणना केली जाते. मोटार वाहन कायदा, १९८८ कलम ६८ अन्वये, राज्य शासनाकडून मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण समिती गठित करण्यात आलेली आहे.

असे आहेत सुधारित दर :-

काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) साठी पूर्वीचे प्रति कि.मी. १८.६६  रुपये वरून २०.६६ रुपये भाडेदर सुधारणा करण्यात आली आहे.  आता काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) साठी किमान देय प्रति १.५ कि.मी. भाडे रूपये २८ रुपये वरून  ३१ रुपये  भाडेदर असणार आहे.

कुलकॅबसाठी पूर्वीचे प्रति कि.मी. भाडे रुपये २६.७१ वरून  ३७.२ रुपये (२० टक्के वाढीप्रमाणे) भाडेदर सुधारणा करण्यात आली. आता कुल कॅबसाठी किमान देय प्रति १.५ कि.मी. भाडे रुपये ४०  वरून  ४८ रुपये  (२० टक्के वाढीप्रमाणे) भाडेदर असणार आहे.

ऑटोरिक्षा (सीएनजी) साठी पूर्वीचे प्रति कि.मी. भाडे रुपये १५.३३  रुपये वरून १७.१४ रुपये भाडेदर सुधारणा करण्यात आली आहे. आता ऑटोरिक्षा (सीएनजी) साठी किमान देय प्रति १.५ कि.मी भाडे रूपये २३ वरून  २६ रुपये भाडेदर असणार आहे.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

 

 

वाघांचे अपघाती मृत्यू रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश

  • राज्यात सरासरी ३५० ने वाघांची संख्या वाढली
  • एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३० टक्के पर्यंत वनक्षेत्र वाढविणार

मुंबई, दि. २८ : राज्यात वाघांचे होणारे मृत्यू शासनाने गांभीर्याने घेतले असून वन अधिकाऱ्यांना अपघाती मृत्यू रोखण्याचे निर्देश दिल्याची माहिती वन मंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे. त्याचबरोबर मागील सोळा वर्षात राज्यामध्ये वाघांची संख्या सरासरी ३५० ने वाढली असल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे राज्यातील वनक्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३० टक्के पर्यंत वाढविण्याचा प्रयत्न असणार आहे, असेही श्री. नाईक यांनी सांगितले.

३० डिसेंबर २०२४ ते २२ जानेवारी २०२५ या कालावधीमध्ये राज्यात विविध घटनांमध्ये बारा वाघांचा मृत्यू झाला. पाच वाघांचा मृत्यू आपापसातील संघर्षातून जखमी झाल्याने, आजारपणामुळे  इत्यादी  नैसर्गिक कारणांनी झालेला आहे. चार वाघांचा मृत्यू अन्य जनावरांसाठी  लावण्यात आलेल्या विजेच्या तारांचा शॉक लागल्याने झाला आहे. किंवा वाहनांच्या धडकेने झाला आहे. तीन प्रकरणांमध्ये  वाघांचा मृत्यू हा शिकारीने झाल्याचे समोर आले आहे. या तीनही प्रकरणांमध्ये एकूण नऊ आरोपींना वन विभागाने अटक केली आहे.

राज्यात वाघांच्या संख्येत वाढ

राज्यात २००६ मध्ये १०३ वाघांची संख्या होती. २०१० मध्ये ही संख्या वाढून १६९ झाली. २०१४ मध्ये  यामध्ये आणखी वाढ होऊन वाघांची संख्या १९० वर पोहोचली. २०१८ मध्ये वाघांची संख्या ३१२ होती. तर २०२२ मध्ये  झालेल्या वाघांच्या  गणनेमध्ये  वाघांची संख्या ४४४  नोंदली गेली. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार दर चार वर्षांनी वाघांची गणना करण्यात येते. या पुढील गणना २०२६ मध्ये होणार आहे, असेही वनमंत्री श्री नाईक यांनी सांगितले.

वन क्षेत्रात वाढीसाठी प्रयत्न करणार

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार  राज्याचे वनक्षेत्र किमान ३० टक्के असायला हवे. या अनुषंगाने  महाराष्ट्राचे वनक्षेत्र २१ टक्यावरून ३०% पर्यंत नेण्यासाठी  प्रयत्न करण्यात येणार आहेत. जंगलांच्या गाभा क्षेत्रामध्ये रानफळांची रायवळ आंबे, बोर, जांभूळ इत्यादी झाडे लावल्यास शाकाहारी प्राण्यांना त्या ठिकाणीच  अन्नाची सोय होईल आणि मांसाहारी प्राण्यांच्या अन्नाची सोय देखील होईल. त्यामुळे भक्षाच्या शोधार्थ वाघ मानवी वस्तीपर्यंत येणार नाहीत, असे वनमंत्री गणेश नाईक म्हणाले.

पालघर मधील बहाडोई येथे जांभळाची प्रगत जात उत्पादित केली जाते. वनखात्याच्या नर्सरीमधून जागतिक दर्जाची जांभूळ रोपे तयार करून वन खात्याच्या विविध विभागांमध्ये लावण्याची सूचना देण्यात आल्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी यावेळी सांगितले.

खासगी वनीकरणाला प्रोत्साहन

खासगी वनीकरणाला  प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन श्री. नाईक यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचित केल्याप्रमाणे  प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी  अद्ययावत  नर्सरी उभारण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून  या जिल्ह्यामध्ये लवकरच  विविध तालुक्यांमध्ये जनता दरबार आयोजित करण्यात येणार असल्याचे वनमंत्री श्री. गणेश नाईक यांनी सांगितले.

वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी उपाययोजना

  • जिल्हास्तरीय व्याघ्र समितीच्या बैठकीत वाघ, बिबट इतर वन्य प्राण्यांच्या संरक्षणाच्या उपाययोजनांची आखणी करण्यात येत आहे.
  • विद्युत प्रवाहाचा धक्का लागून वाघांचे होणारे मृत्यू थांबवण्यासाठी वनविभाग व महावितरण कंपनी मिळून प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येत आहे.
  • अवैध शिकाऱ्यांची माहिती मिळण्याकरिता परिक्षेत्र स्तरावर खबऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
  • व्याघ्र संरक्षण दलातील पथकामार्फत अतिसंवेदनशील क्षेत्रात नियमित गस्त करण्यात येते. तसेच डॉग स्कॉड अंतर्गत सुध्दा गस्ती करून शिकारी हालचालीवर नियंत्रण ठेवण्यात येते.
  • M – Stripes प्रणाली असलेल्या मोबाईलचा पुरवठा क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना करण्यात आला आहे.  त्याद्वारे संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यात येते.
  • अतिसंवेदनशील क्षेत्रात बिनतारी संदेश यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
  • राज्यातील वन्यप्राण्यांबाबत गुन्हे प्रकरणांची अद्यावत माहिती ठेवण्याकरिता वन्यजीव गुन्हे कक्ष Wildlife Crime Cell प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालय, नागपूर येथे तयार करण्यात आला आहे.
  • मेळघाट व्याघ्र प्रकल्पात तयार करण्यात आलेल्या सायबर सेलच्या माध्यमातून शिकारीच्या घटनांमधील आरोपींचा शोध घेण्यात येतो.
  • अतिसंवेदशील क्षेत्रात आवश्यक त्या ठिकाणी तपासणी नाके तयार करण्यात आले आहेत.
  • परिक्षेत्र स्तरावर वाघ व बिबट या वन्यप्राण्यांचे मागोव्याचा निश्चित कार्यक्रम राबवून त्यांच्या अस्तित्वाबाबतची माहिती घेण्यात येते.
  • वाघाचे भ्रमणमार्ग, पाणवठे व महत्वाचे ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावून संशयास्पद हालचालींवर पाळत ठेवण्यात येते. तसेच पाण्यामध्ये विष प्रयोग होऊ नये याकरिता पाणवठ्याची नियमीत तपासणी केली जाते.
  • मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने पाणवठ्याकडे जाणाऱ्या मार्गावर शिकारी लोकांद्वारे लोखंडी ट्रॅप लावले नसल्याची खातरजमा करण्यात येणार.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

 

 

गिया बारे सिंड्रोम आजाराबाबत आरोग्य यंत्रणांनी समन्वय साधून कार्य करावे – वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, दि. 28 : गिया बारे सिंड्रोम (GBS) या आजाराचे काही रुग्ण पुण्यातील खडकवासला, नांदेड सिटी नांदेड गाव, किरकटवाडी या परिसरामध्ये आढळले आहेत. दूषित पाण्यामुळे या रोगाची लागण झाली असल्याचे प्राथमिक अहवालात दिसून येत आहे. शासकीय दवाखान्यामध्ये या आजाराच्या उपचारासाठी सर्व यंत्रणा सज्ज असून याबाबत शासन प्राधान्याने उपाययोजना करत आहे. आरोग्य विभाग व महापालिकेतील आरोग्य यंत्रणा यांनी समन्वय साधून कार्य करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले आहेत.

गिया बारे सिंड्रोमच्या उपचारासाठी पुणे महानगरपालिकेचे कमला नेहरू रुग्णालय सज्ज असुन वैद्यकीय सहाय्यता निधीची मर्यादा एक लाखावरुन दोन लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेने याबाबत नोडल अधिकारी यांची नेमणूक केली असल्याचेही राज्यमंत्री यांनी सांगितले. पुणे महानगरपालिकेने 65 हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण केले असून IVIG इंजेक्शनची उपलब्धता करण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि पाणी उकळून प्यावे, असे आवाहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केले आहे.

0000

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

 

कलाकारांवरील अन्याय दूर करण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापण्याबाबत सकारात्मक – कामगार मंत्री आकाश फुंडकर 

मुंबई, दि. 28 : चित्रपट उद्योगामध्ये काम करणारे कलाकार, सह-कलाकार, नायक, सह-नायक यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापण्यासंदर्भात विधी व न्याय विभागाकडे विचारणा करण्याचे निर्देश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले.

चित्रपट क्षेत्रात लहान भूमिका करणाऱ्या कलाकारांवर होत असलेल्या अन्यायाबद्दल सिने टी. व्ही. असोशिएशनचे पदाधिकारी मनोज जोशी, जॉनी लिव्हर, बिंदू दारासिंग, संजय पांडे, उपासना सिंग यांनी मंत्रालयात कामगार मंत्री श्री.फुंडकर यांची भेट घेतली. यावेळी कामगार विभागाचे उपसचिव स्वप्नील कापडणीस, उपसचिव दिपक पोकळे उपस्थित होते.

कामगार मंत्री श्री.फुंडकर म्हणाले की, लहान भूमिका करणाऱ्या कलाकारांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन केला जाणार नाही. कलाकारांवर कंत्राटदार किंवा निर्मात्यांकडून अन्याय झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर या कलाकारांना वेळेत वेतन मिळावे, यासाठी नियमावली तयार करण्यात येणार असून तो लवकरच केंद्रीय कामगार मंत्रालयाकडे पाठविण्यात येईल, असेही कामगार मंत्री श्री.फुंडकर यांनी सांगितले.

000

संजय ओरके/विसंअ/

ताज्या बातम्या

अल्पसंख्याक समुहातील विद्यार्थ्यांना परदेश शिक्षणाची संधी

0
अल्पसंख्याक समुहाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना विविधतेत एकता असलेला भारत देश हा अनेक जाती समुहांचा एकसंध देश आहे. याची संस्कृती आणि एकता अबाधित राहण्यासाठी सर्व...

साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार २०२५ साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

0
नवी दिल्ली, दि. 3 : साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार वर्ष २०२५ साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख...

‘क्रिएट इन इंडिया’ स्पर्धेतील विजेत्यांचे उद्या सादरीकरण

0
मुंबई, दि. ०३ : जिओ वर्ल्ड सेंटर, बीकेसी येथे वेव्हज्‌ 2025 या आंतरराष्ट्रीय दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेत उद्या ४ मे रोजी ' क्रिएट इन...

स्थानिक विषयावरील आशयघन निर्मिती जागतिक स्तरावर प्रभावशाली ठरेल – डिबेरा रिचर्ड्स

0
मुंबई, दि. ०३ : मनोरंजनाच्या स्पर्धेत यशस्वी होत दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी कोणत्याही माध्यमातून व्यक्त होताना आशयघन मांडणी महत्त्वाची बाब आहे. त्यादृष्टीने स्थानिक विषयावरील सकस...

‘आयआयसीटी’ची स्थापना भारतासाठी महत्त्वाची – केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

0
मुंबई, दि. ०३: भारताच्या एव्हीजीसी-एक्सआर परिसंस्थेला सक्षम बनवण्याच्या दिशेने एक मोठी झेप घेत, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने, फिक्की आणि सीआयआयच्या सहकार्याने, केवळ एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्रासाठी...