सोमवार, मे 26, 2025
Home Blog Page 235

भंडारा जिल्ह्यातील ‘साहित्य’ सोनियाच्या खाणी

नवी दिल्ली येथे होऊ घातलेल्या ९८ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनानिमित्त भंडारा जिल्ह्यातील साहित्यविषयक आढावा घेतलेला प्रा.नरेश दे.आंबिलकर यांचा विशेष लेख

भंडारा जिल्ह्याच्या नावाची उत्पत्ती ‘भण भण’या शब्दापासून झाली आहे असे सांगितले जाते. पितळी भांड्याच्या ठोकापिटीतून या जिल्ह्याचे नाव भंडारा पडले असावे. भंडारा जिल्हा तलावांचा, धानाच्या कोठाराचा आणि विविध खाणींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात  प्राचीन काळापासून साहित्याच्याही खाणी असल्याचे आढळून येते. भंडारा जिल्ह्याने साहित्यासाठी दिलेल्या योगदानातून या जिल्ह्याचे वेगळेपण अधोरेखांकित होते.

भंडारा जिल्ह्याचे महत्त्व सांगताना कवी द.सा.बोरकर म्हणतात

“ महाराष्ट्राच्या पूर्व क्षितिजी चमचम चमके तारा /

इतिहासाशी नाते सांगतो आमचा भंडारा /

माझा प्यारा भंडारा //

भंडाऱ्याच्या प्रांती होती परगणे प्रसिद्ध /

कालिदास भवभूती  नांदले हरीनाथ सिद्ध /

आद्य मराठी ग्रंथ निर्मिला मुकुंदराजे आंभोरा /

इतिहास असे नाते सांगतो आमचा भंडारा /

माझा प्यारा भंडारा “

भंडारा जिल्ह्याचे  साहित्यातील योगदान मोठे असल्याचे इतिहासावरून लक्षात येते. नाटक हा कलाप्रकार राजप्रसादातून सामान्य जनतेपर्यंत नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य भवभूती या नाटककाराने केले.  भवभूतीचे कार्यस्थान आमगाव तालुक्यातील पदमपुर हे आहे. भवभूतीने सुरू केलेली नाट्यलोकाश्रयाची  परंपरा आजही  झाडीपट्टीतील नाटकांच्या रुपाने जिवंत आहे. इसवी सन 1188 मध्ये लिहिल्या गेलेल्या आद्य काव्यग्रंथ ‘विवेकसिंधू’ने भंडारा जिल्ह्याच्या साहित्याची मोहर संपूर्ण मराठी साहित्यावर उमटवली आहे.  ‘विवेकसिंधू’ या ग्रंथात भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीचा व आंभोऱ्याचा उल्लेख  पुढील प्रमाणे आहे

वैन्यागंगेचिये तीरी/मनोहर अंबानगरी /

तेथे प्रकटले श्रीहरी/ जगदीश्वरु /

या ओळीतून भंडारा जिल्ह्यातील जीवनदायी वैनगंगा नदीच्या तीरावरील मनोहर असलेली अंबानगरी  म्हणजे आजचे आंभोरा हे ठिकाण होय. या ग्रंथाच्या निर्मितीची साक्ष देत आंभोरा आज अभिमानाने उभा आहे.

भंडारा जिल्ह्याने महानुभव संप्रदायाचे संस्थापक श्रीचक्रधर स्वामी यांना पहिला शिष्य दिला. या पहिल्या शिष्याचे नाव आहे नीळोभट्ट भांडारेकर. लीळाचरित्राच्या एकाकातील ‘भांडारेकरां भेटी’ या लीळेत भंडाऱ्याच्या या शिष्याचा सविस्तर उल्लेख आलेला आहे. श्रीचक्रधरस्वामी  भंडारा येथे आले असतांना त्यांची नीळोभट्ट भांडारेकर यांच्याशी भेट झाली. श्रीचक्रधरस्वामी यांच्या भेटीनंतर नीळोभट्ट भांडारेकर हे सदैव श्रीचक्रधरांच्या सोबत राहिले. भंडारा येथून जातांना नीळोभट्ट भांडारेकर पत्नीला उद्देशून म्हणाले “एतुले दिस तुम्हांपासि होते: आता जयाचे तयापाठी जात असे:तुम्ही राहा:”

नीळोभट्ट व श्रीचक्रधरस्वामी यांच्या गुरु – शिष्य प्रेमाचे दाखले लीळाचरित्रात पदोपदी आढळतात. ‘भांडारेकारा देहावसान’  या लीळेतून श्रीचक्रधरस्वामी आणि नीळोभट्ट भांडारेकर यांचे  नाते किती अतूट होते हे दिसून येते.

मृत्यूसमयी त्यांचे डोके श्रीचक्रधरस्वामींच्या मांडीवर होते. मृत्यूसमयी नीळोभट्ट भांडारेकर श्रीचक्रधरांना म्हणाले  “ना:जी:हे सन्निधान जानु उसीसेया: जी जी : आता देह जाए तरि बरवे” . श्रीचक्रधरस्वामींनी  नीळोभट्टाचे अंत्यसंस्कार केल्याचा उल्लेख आहे.

श्रीचक्रधरांच्या पदस्पर्शाने पावन झालेले भंडारा शहरातील पाणीपात्र मंदिर, भोजनता मंदिर, दत्तात्रय मंदिर, पट्टीशाळा, वनदेवबाबा मंदिर तसेच आद्य शिष्य नीळोभट्ट भांडारेकर यांचे  घर राहते  ही सर्व ठिकाणे आज सर्व महानुभाव संप्रदायाच्या भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहेत.

श्रीचक्रधरांनी झाडीपट्टीतील या भागाला अनेक वेळा भेटी दिल्याचे लीळाचरित्रातील लीळांवरुन स्पष्ट होते. ‘डाकरामी व्याघ्र बीद्रावण’,‘झाडी रामद्रणेचा भेटी’ या लीळा झाडीपट्टीतील आहेत.  झाडीपट्टीचा आणि लीळाचरित्राचा संबंध डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी ‘लीळाचरित्रातील अर्थभेद’ या लेखातून उलगडून दाखविला आहे. यात आहाता, बुड्डा, आंबिल, कांजी, वेळण (येरन) गुळ, भेली, अडणी, तिवाई, भावसन, भाणे, सिलीक, सीत, खराटा, पालो, कोर, खांड, फोड, बोडी, पेंडी, पाटनी, वखर, कडप, वाक, पाड, मेर, वागूर, तीज, दर, इसाळ, गडन, लवन, हेंदडा, नोकणे, करु, सुसवणे, वोदरणे, भवणे, आटणे, उमटणे, खिरणे, पाचारणे या झाडीपट्टीतील शब्दांचा नेमका अर्थ सांगितला  आहे.  झाडीपट्टीतील या शब्दांचा नेमका अर्थ समजून न घेता काही नामवंत अभ्यासकांनी कसा चुकीचा अर्थ सांगितला आहे  हे साधार  डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी पटवून दिले आहे.

भंडारा जिल्ह्यात मध्ययुगीन काळातील साहित्य सापडत नाही मात्र साहित्याच्या बाबतीत अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला हा जिल्हा मध्यंतरीच्या काळात कसा कोरडा राहिला याचे आश्चर्य वाटते. कदाचित काळाच्या उदरात हे साहित्य आजही लपलेले असावे. चिकाटीने शोध घेत राहिल्यास मध्ययुगातील हे साहित्य समोर यायला वेळ लागणार नाही.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे वरदहस्त भंडारा जिल्ह्याला प्राप्त झाले आहे.  ग्रामगीतेची प्रयोगशाळा राष्ट्रसंतांनी भंडारा जिल्ह्यातील आमगाव या ठिकाणी उभारली होती. राष्ट्रसंताच्या साहित्यातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणजे ‘ग्रामगीता’. ग्रामविकासाचे वेगवेगळे उपाय राष्ट्रसंतांनी 41 अध्यायातून सांगितले आहेत. खेडी समृद्ध झाली तरच देश समृद्ध होईल या संकल्पनेतून साकारलेल्या ग्रामगीतील बहुतांश प्रयोग हे भंडारा जिल्ह्यातील ‘आदर्श आमगाव’ या ठिकाणी  राष्ट्रसंतांनी प्रत्यक्ष करुन पाहिले.

राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेतील आदर्श गाव हे भंडारा जिल्ह्यातील आमगाव हेच आहे. या आमगावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी राबविलेल्या उपक्रमात ग्रामनियोजन वर्ग, न्यायपंचायत, ग्रामपंचायत संमेलन, सामुदायिक कृषी योजना, गौसेवा, महिला सर्वागीण शिक्षण प्रशिक्षण वर्ग यांचा समावेश होता.

आमगावात श्रीगुरुदेव सहकारी धान्य भंडार, श्रीगुरुदेव तेलघाणी, कला मंदिर, चिकित्सा मंदिर, सेवाश्रम, अध्ययन मंदिर, व्यायाम मंदिर, श्रीगुरुदेव जंगल कामगार सोसायटी, श्रीगुरुदेव भारत नवनिर्माण विद्या मंदिर, प्रचार प्रशिक्षण केंद्र यांची स्थापना केली. याच ठिकाणी पहिल्यांदा अत्याधुनिक विद्युतदीप राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुरु केले. आमगावातील या सर्व यशस्वी प्रयोगाची नोंद  ग्रामगीतेच्या प्रत्येक अध्यायात आलेली आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेची प्रयोगशाळा असलेल्या या आमगावाला राष्ट्रसंतांनी राज्यपाल श्रीपट्टाभिसीतारामय्या, आरोग्यमंत्री मा.सा.कन्नमवार, मध्यप्रांताचे अन्नमंत्री दीनदयाल गुप्ता, उद्योगमंत्री अशोक मेहता, विकास मंत्री रा.कृ. पाटील, कृषिमंत्री शंकरराव तिवारी, नागपूर विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू पंडित कुंजीलाल दुबे, लोककर्म मंत्री राजा नरेशचंद्र, रेल्वेमंत्री व नंतरचे भारताचे प्रधानमंत्री झालेले लालबहादूर शास्त्री, संत गाडगेबाबा, तुकारामदादा गीताचार्य, मंत्री गुलजारीलाल नंदा, मुख्यमंत्री पंडित रविशंकर शुक्ल, गृहमंत्री कैलासनाथ काटूज, जयप्रकाश नारायण या सर्वाना भेट द्यायला लावून आदर्श गावाची संकल्पना समजून सांगितली.

सर्वात महत्त्वाची  बाब म्हणजे भंडारा जिल्ह्यातील तुमसर या ठिकाणी आयोजित 18 व्या विदर्भ साहित्य संघाच्या संमेलनाचे अध्यक्ष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ‘ग्रामगीते’चे प्रकाशन 25 डिसेंबर 1955 ला तुमसर येथील या संमेलनात करण्यात आले. या संमेलनात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विविध साहित्यसंपदेबद्दल सांगोपांग चर्चा करण्यात आली. अध्यक्षीय भाषणात तुकडोजी महाराज म्हणाले होते “हा ग्रामगीता ग्रंथ बिघडलेल्या जीवनाला विशाल मानवतेची जाण करून देईल” राष्ट्रसंतांच्या साहित्य निर्मितीत भंडारा जिल्ह्याचे योगदान  किती मोठे होते हे लक्षात येते.

आधुनिक काळात भंडारा जिल्ह्यातील साहित्यिक ना.रा.शेंडे यांचे साहित्यक्षेत्रात महत्त्वाचे स्थान आहे. भंडारा शहरातील गणेशपुर येथील रहिवाशी असलेले ना.रा.शेंडे  विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष होते. विदर्भ साहित्य  संघाच्या संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते.ना.रा.शेंडे यांनी विपुल  साहित्य निर्मिती केली. त्यांनी लिहिलेल्या ‘मी व माझे लेखन’ या पुस्तकात ते म्हणतात “ मी 20 कादंबऱ्या, 8 नाटके, 65 लघुकथा, 150 कविता, एक धर्मग्रंथ, एक चरित्रग्रंथ  लिहिला.” मात्र त्यांनी यातील बहुतांश ग्रंथ होळीत जाळून टाकल्याचे त्यांनी ‘मी व माझे लेखन’या ग्रंथात नमूद केले आहे.ना.रा.शेंडे यांनी अनेक संत व राजकीय व्यक्तिमत्त्वांच्या चरित्राचे लेखन केले. महाराष्ट्र शासनाकडून त्यांना ‘माहिती अधिकारी’हे पद मिळाले होते. त्यांचा आज उपलब्ध असलेला व अत्यंत परिश्रमपूर्वक लिहिलेल्या ग्रंथ म्हणजे ‘लोकसाहित्य संपदा’ हा आहे. हा ग्रंथ महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केला. मात्र आज ना.रा.शेंडे यांचे ग्रंथ दुर्मिळ झाले आहेत.

‘बोलीमहर्षी’या पदवीने सन्मानित असलेले डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांचेही साहित्य क्षेत्रातील स्थान फार मोठे आहे. संशोधक, लोककलेचे तारणहार म्हणून डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांचा नावलौकीक  आहे. शासनाचे अनेक साहित्य पुरस्कार त्यांच्या ग्रंथांना मिळाले आहे.त्यांनी साकारलेला ‘झाडीबोली मराठी शब्दकोश’ हा बोलीतील एक मैलाचा दगड आहे. झाडीपट्टीतील लुप्त पावलेल्या लोककलांना त्यांनी पुनरुज्जीवित केले. आज झाडीपट्टीत जेवढे नाट्यप्रयोग होतात तेवढे संपूर्ण महाराष्ट्रात होत नाहीत. त्यांच्यामुळे दंडार, खडीगंमत या लोककलांना संपूर्ण भारतभर ओळख मिळाली आहे. एकंदरीत भवभूतीपासून सुरू झालेला हा साहित्य प्रवाह आजही भंडारा जिल्ह्यात अविरतपणे वाहत आहे

संदर्भ

१) प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास – ल. रा. नसीराबादकर फडके प्रकाशन कोल्हापूर .

२)  झाडीबोलीतील मराठी शब्दकोश – डॉ.  हरिश्चंद्र बोरकर विजय प्रकाश,  नागपूर.

३) ग्रामगीता – वं. राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज  साहित्य प्रकाशन समिती अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ मोझरी.

४) लोकसाहित्य संपदा -ना. रा. शेंडे विदर्भ साहित्य संघ प्रकाशन नागपूर

५) मी आणि माझे लेखन -ना. रा. शेंडे श्रीशेष प्रकाशन गणेशपुर.

६) लीळाचरित्र – डॉ. वि. भ. कोलते, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई

७) झाडीपट्टीत राष्ट्रसंत – डॉ. हरिश्चंद्र बोरकर झाडीबोली साहित्य मंडळ साकोली

०००

  • प्रा.नरेश दे.आंबिलकर, मराठी विभाग प्रमुख, नटवरलाल जशभाई पटेल कला वाणिज्य महाविद्यालय मोहाडी, जि.भंडारा भ्रमणध्वनी- 9423112181, ई-मेल  ambilkarnaresh@gmail   

आशियातील सर्वात मोठ्या ‘एआय’ महोत्सवाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घोषणा

मुंबई, दि. १२ : ‘मुंबई टेक वीक २०२५’ या आशियातील सर्वात मोठ्या ‘एआय’ महोत्सवाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली. टेक आंत्रप्रेन्योअर्स असोसिएशन ऑफ मुंबई (TEAM) सोबत झालेल्या विशेष बैठकीत त्यांनी मुंबईच्या तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही दिली.

मुख्यमंत्र्यांनी या महोत्सवाच्या माध्यमातून मुंबईला ‘आशियाचा AI सँडबॉक्स’ म्हणून जागतिक स्तरावर स्थान मिळवून देण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ दृष्टिकोनाला गती देण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व उद्योजक, संशोधक आणि तंत्रज्ञांना MTW 2025 मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री श्री. पीयूष गोयल, श्री. अश्विनी वैष्णव, आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

याशिवाय, टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, उद्योगपती आकाश अंबानी तसेच गुगल डिपमाईंड, ॲन्थ्रोपिक, स्केल, कृत्रिम, सर्वम, मेटा, गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि सेल्सफोर्स यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांचे ‘एआय’ क्षेत्रातील तज्ज्ञ देखील उपस्थित राहणार आहेत.

मुंबईची टेक इकोसिस्टम आणि TEAM ची भूमिका

TEAM ही मुंबईतील तंत्रज्ञान उद्योजकांची अग्रगण्य स्वायत्त संघटना आहे. या संघटनेमध्ये 65 हून अधिक स्टार्टअप आणि युनिकॉर्न कंपन्यांचे संस्थापक असून, त्यांची एकत्रित बाजारपेठेतील किंमत $60 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक आहे.

TEAM च्या गव्हर्निंग काउंसिलमध्ये ड्रिम11 चे सह-संस्थापक हर्श जैन, हापटिकचे सह-संस्थापक आकृत वैष, द गुड ग्लॅम ग्रुपच्या नय्या साग्गी, लॉगीनेक्स्टचे ध्रुविल संघवी आणि GoQii चे विशाल गोंडल यांसारखे नामवंत उद्योजक समाविष्ट आहेत.

मुंबई टेक वीक 2025 : भारताला जागतिक ‘एआय’ स्पर्धेत आघाडीवर आणण्याचा प्रयत्न

या महोत्सवाच्या माध्यमातून ‘एआय’ तंत्रज्ञानाचा व्यावसायिक वापर, स्टार्टअप्ससाठी नवीन संधी, भारतीय ‘एआय’ संशोधन, आणि उद्योजकांसाठी गुंतवणूक व नोकऱ्या उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. देश-विदेशातील तंत्रज्ञ, संशोधक आणि गुंतवणूकदारांसाठी हा कार्यक्रम या क्षेत्रातील संधींचे दार उघडणारा ठरणार आहे.

MTW 2025 साठी नोंदणी आणि अधिक माहिती

➡️ अधिकृत वेबसाइट: www.mumbaitechweek.com

➡️ ताज्या घडामोडींसाठी आम्हाला फॉलो करा: LinkedIn | Twitter | Instagram

 

——000——-

चंद्रपूरच्या मराठी साहित्य संमेलनाचा उजाळा

मराठीला नुकताच ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर येत्या २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान नवी दिल्ली येथे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. देशाच्या राजधानीत होणारा मराठी भाषेचा जागर केवळ महाराष्ट्र आणि देशापुरता मर्यादीत न राहता जगाच्या कानाकोपऱ्यातील तमाम मराठी बांधवांसाठी एक अविस्मरणीय क्षण असणार आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात पार पडलेल्या संमेलनाच्या आठवणींया याद्वारे उजाळा देण्याचा प्रयत्न…

चंद्रपूर ही ऐतिहासिक नगरी आहे. प्राचीन काळापासून मौर्य, गुप्त, सातवाहन, राष्ट्रकुट, चालुक्य, वाकाटक, यादव, गोंड आणि मराठ्यांनी या भूमीवर राज्य केले. देवटक येथे सापडलेल्या शिलालेखामुळे मौर्यकालीन इतिहासात अधिक भर पडते. तर भद्रावती येथील विजासन गुंफावरील शिलालेख सातवाहनकालीन इतिहासावर प्रकाश टाकतो. चंद्रिका मंदीर येथील शिलालेखाद्वारे यादवकालीन इतिहास उलगडतो. चंद्रवंशीय माना राजांचे प्रभुत्व संपुष्टात आणून गोंड राजवटीने या भागावर स्थिर शासन प्रस्थापित केले.

असा प्राचीन व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या चंद्रपूर शहराच्या स्थापनेस 500 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभुमीवर चंद्रपूर येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात 3 ते 5 फेब्रुवारी 2012 दरम्यान अ. भा. मराठी साहित्य महामंडळातर्फे 85 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले होते.

साहित्य हा समाजाचा आरसा मानला जातो. तत्कालीन काळाचे प्रतिबिंब तत्कालीन साहित्यामध्ये उमटते. तसेच समाजमन बदलण्याची ताकदसुद्धा साहित्यात असते. संत ज्ञानेश्वरांपासून खऱ्या अर्थाने मराठी भाषा विकसीत होऊ लागली. त्यानंतरच्या काळात संत, समाजसुधारक, विचारवंत आणि साहित्यिकांनी आपल्या उत्तम साहित्याने त्यात मोलाची भर घातली. एकप्रकारे साहित्य हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. साहित्य, कला, संगीत, नाटक या बाबींचा तत्कालीन समाजव्यवस्थेवर फार मोठा प्रभाव असल्याचे जाणवते. अलिकडच्या काळात हा प्रभाव कमी होत असला तरी आजही साहित्यावर प्रेम करणारे आपल्या निदर्शनास येतात. जंगलांनी वेढलेल्या, निसर्गाचे वरदान लाभलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातही कवी, साहित्यिक, संशोधक आणि लेखकांनी फार मोठे योगदान दिले आहे.

याच पार्श्वभुमीवर चंद्रपूर येथे 85 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 3 ते 5 फेब्रुवारी 2012 या कालावधीत घेण्यात आले. हे साहित्य संमेलन साधनाताई आमटे यांच्या स्मृतीला समर्पित होते. त्यांना अभिवादन करणारे ‘समिधा’ व स्वागत गीत चंद्रपूर येथील सुप्रसिध्द कमी व नाटककार श्रीपाद प्रभाकर जोशी यांनी लिहिले होते.

85 व्या मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी केंद्रीय वित्त राज्यमंत्री शांताराम पोटदुखे होते तर संमेलनाचे अध्यक्ष साहित्य अकादमी पुरस्कृत प्रसिध्द कवी, कादंबरीकार, लेखक व चित्रकार प्रा. वसंत आबाजी डहाके हे होते. संमेलनाचे उद्घाटन न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या शुभहस्ते झाले होते. प्रमुख अतिथी म्हणून हिंदी साहित्यात अत्यंत आदरस्थानी असलेले कथालेखन, कादंबरीलेखन, व्यंगात्मक लिखाण, निबंध लेखन, शोध निबंध तसेच चरित्रात्मक लिखाण करणारे डॉ. महिपसिंग उपस्थित होते.

संमेलनानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या ‘हिराई’ स्मरणिकेत ‘संमेलनाध्यक्ष वसंत आबाजी डहाके : शतकाच्या चित्रलिपीचे महावाक्य’ या प्रा. रणधीर शिंदे यांच्या लेखात वसंत आबाजी डहाके यांचा विशेष उल्लेख करण्यात आला होता. तो पुढीलप्रमाणे ‘माझ्यापुरतं बोलायचं तर चंद्रपूरचा परिसर आणि त्या परिसरातील विविध प्रतिमांचं माझ्या कवितेतील प्रतिमांशी काहीएक नातं असावं असं वाटतं. माझी घडण या परिसरात झाली. इथल्या लाल मातीत माझीही लहानशी पावलं उमटली. इथल्या झाडांमध्ये आणि उद्ध्वस्त अवशेषांमध्ये मी वावरलो. इथल्या पावसाच्या झडीनं आणि भाजून काढणाऱ्या उन्हानं, थंडीनं, वाऱ्यानं माझ्यावर चिन्हं कोरली. चंद्रपूरच्या शिवेबाहेर टाकून दिल्यासारख्या अवाढव्य प्रतिमांनी माझ्यावर चेटुक केलं. पुढे कित्येक दिवसांनी मी एका शब्दापुढे दुसरा शब्द ठेवण्याचं साहस केलं. जिथून आपण निघतो, तिथचं परत यावं असं वाटतं’…

संमेलनस्थळाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तर मुख्य प्रवेशद्वारास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व मुख्य सभामंडपास दिवंतग मुख्यमंत्री कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांचे नाव देण्यात आले होते. विशेष म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सर्व पुर्वाध्यक्षांना संमेलनासाठी निमंत्रीत करण्यात आले होते. संमेलनाच्या निमित्ताने पहिल्याच दिवशी रात्री रोचित कला अकादमी, पुणे आणि कथ्थक साधना केंद्र, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मार्कंडा देव नृत्यशिल्पातील साहित्यिक आशय’ हा अभिनव कार्यक्रम सादर करण्यात आला होता.

०००

  • राजेश का. येसनकर, जिल्हा माहिती अधिकारी, चंद्रपूर

ऊस तोडणी यंत्रासाठी राज्य शासनाने केंद्र शासनास सुधारित प्रस्ताव सादर करावा – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे निर्देश

नवी दिल्ली दि. 12 : केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्रास अनुदान प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री  नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे बैठक झाली. या बैठकीत सन २०२२-२३ पासून राज्यात राबविण्यात येत असलेल्या योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, कृषी आयुक्त सुरज मांढरे, साखर आयुक्त कुणाल खेमणार, केंद्र शासनाच्या कृषी विभागाचे सह सचिव व अन्य अधिकारी उपस्थित होते.

या योजनेअंतर्गत ९०० ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी शासनाने मान्यता दिली असून आत्तापर्यंत राज्यातील २५७ पात्र लाभार्थ्यांनी ऊस तोडणी यंत्राची खरेदी केली आहे. त्यापैकी ११६ लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम वितरित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्र खरेदी किंमतीच्या ४०% अथवा कमाल रु. ३५ लाख अनुदान देण्यात येते.

उर्वरित १४१ लाभार्थ्यांना देय असलेली केंद्र शासनाच्या हिश्श्याची रक्कम त्वरित वितरित करण्याबाबत कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी बैठकीत विनंती केली.

या योजनेचा राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी मजुरांच्या संस्था व शेतकरी उत्पादक कंपन्यांना अधिक लाभ मिळण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने योजनेत सुधारणा करून सुधारित प्रस्ताव केंद्र शासनास त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निर्देश दिले. या सुधारित प्रस्तावास केंद्र शासनाची त्वरित मान्यता देण्यात येईल, असे श्री. गडकरी यांनी स्पष्ट केले.

****

संध्या गरवारे/विसंअ/

कोल्हापूर फुटबॉल क्रीडा प्रबोधिनीस तत्वत: मान्यता – क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. 12 :- शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आहेत. या सुविधा अद्ययावत कराव्यात, काही सुविधा आवश्यतेनुसार नव्याने कराव्यात, असे निर्देश देत गणवेश दर्जा, प्रशिक्षक मानधन, भोजन दरात वाढ करण्याचा तसेच फुटबॉल खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कोल्हापूर येथे फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्याबाबत तत्वत: मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात शिवछत्रपती क्रीडापीठ उच्चस्तर धोरण समितीची बैठक झाली. बैठकीला शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल, क्रीडा विभागाचे सहसचिव मंगेश शिंदे, क्रीडा विभागाचे सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक सहास पाटील, नवनाथ फडतारे उपस्थित होते.

क्रीडा मंत्री भरणे म्हणाले की, महाराष्ट्रातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय व ऑलिंपिक दर्जाचे खेळाडू घडविणे, राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलित आहार देणे, अद्ययावत क्रीडा सुविधा देणे त्याचबरोबर क्रीडा संस्कृती रुजविण्याच्या हेतूने शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे स्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे हा हेतू साध्य करत महाराष्ट्राच्या लौकीकाला साजेसे काम या क्रीडापीठाच्या माध्यमातून झाले पाहिजे. त्यासाठी आवश्यक मदत करण्यास शासन तत्पर आहे. शिवछत्रपती क्रीडापीठ, पुणे व राज्यातील क्रीडा प्रबोधिनींचे व्यवस्थापन, देखभाल दुरुस्ती, नवीन कामे करताना सूक्ष्म नियोजन करून कामाचा दर्जा, गुणवत्ता कायम राखावी, असेही निर्देशही दिले.

कोल्हापूर येथे फुटबॉल क्रीडा प्रबोधिनीला तत्वत: मान्यता

क्रीडा मंत्री भरणे म्हणाले, कोल्हापूर कुस्तीसाठी प्रसिद्ध आहे. याबरोबरच आता फूटबॉल खेळासाठी देखील कोल्हापूर प्रसिद्ध होत आहे. या ठिकाणी फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी असावी अशी मागणी पुढे येत आहे. या मागणीचा, फुटबॉल खेळाडूंचा, फुटबॉल प्रेमींचा आदर करुन कोल्हापूर येथे फुटबॉल क्रीडा प्रबोधिनीला तत्वत: मान्यता देण्याचा निर्णय घेत असल्याचे स्पष्ट करत या निर्णयामुळे फूटबॉल खेळाला प्रोत्साहन मिळणार असून नामवंत खेळाडू घडण्यासाठी ही प्रबोधिनी उपयुक्त ठरेल, असा विश्वासही क्रीडा मंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

खेळाडूंचे प्रमाणपत्र पडताळणी

कायाकिंग कनोईंग क्रीडा प्रकारातील खेळाडूंच्या प्रमाणपत्राच्या पडताळणीचा प्रश्न विनाविलंब मार्गी लावण्याचे आदेश क्रीडा मंत्री भरणे यांनी दिले. खेळाडूंच्या प्रमाणपत्र पडताळणीसंदर्भात उपाययोजना कराव्यात. कोणत्याही खेळाडूंवर अन्याय होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी या दिले.

0000

सागरकुमार कांबळे/विसंअ/

कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षण आणि सामाजिक उन्नतीचे कार्य प्रेरणादायी – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

सातारा, दि. 12:  कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षण आणि सामाजिक उन्नतीचे कार्य पिढ्यानं पिढ्यासाठी प्रेरणादायी आहे. रयत शिक्षण संस्था त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा दाखला देते. त्यांनी ग्रामीण भागातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या वंचित जनतेच्या शिक्षणासाठी आपले जीवन समर्पित केले, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा (राज्य सार्वजनिक विद्यापीठ) प्रथम दीक्षान्त समारंभ राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी कॉलेज येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलाधिकारी चंद्रकांत दळवी, कुलगुरु डॉ. ज्ञानदेव मस्के, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्र. संचालक डॉ. हेमंत उमाप, कुलसचिव डॉ. विजय कुंभार आदी उपस्थित होते.     

राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले, शिक्षण आणि जीवन व्यवहारांचा समन्वय असणे आवश्यक आहे. जगाच्या बाजारपेठेत यशस्वी होण्यासाठी जे आवश्यक आहे त्याचा शिक्षणामध्ये अंतर्भाव असणे आवश्यक आहे. हा समन्वय साधण्याच्या दृष्टीने नवीन शैक्षणिक धोरण महत्त्वाचे आहे. याचा विचार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आणि विद्यापीठांमध्ये दिले जाणारे शिक्षण हे जगाच्या बाजारात टिकणारे असले पाहिजे, या दृष्टीने शैक्षणिक धोरण विकसित केले.

कर्मवीर भाऊराव पाटील यांचा वारसा त्यांच्या सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणासाठीच्या चिकाटीच्या बांधिलकीत आहे. शिक्षणाद्वारे वंचितांना सक्षम बनविणे, त्यांना  चांगले जीवन जगण्यास सक्षम करणे यावर त्यांचा विश्वास होता, असे सांगून राज्यपाल म्हणाले, आज आपण एकता, बंधुता, सामाजिक न्याय यावर चर्चा करतो पण याची सुरुवात छत्रपती संभाजी महाराज यांनी केली. जाती, धर्माच्या आधारावर आपण माणसा-माणसात भेद करु शकत नाही. एखाद्या विशिष्ट जातीत जन्म घेतला म्हणून आपण कोणाला थोर अथवा कनिष्ठ ठरवू शकत नाही. माणसाचे श्रेष्ठत्व हे त्याच्या कतृत्वावरुन ठरते, ही गोष्ट आपण जन्मभर लक्षात ठेवली पाहिजे.

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे अलिकडेच सन 2021 मध्ये स्थापन झालेले विद्यापीठ आहे. पण या 4 वर्षाच्या काळात या विद्यापीठाने उल्लेखनीय प्रगती केली आहे, असे सांगून राज्यपालांनी विद्यापीठाचा परिसर स्वच्छ आणि सुव्यस्थित ठेवल्याबद्दल कौतुक केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरु केलेले आहे. ते सुरु करताना भारताला सर्वात स्वच्छ, सुव्यस्थित आणि हरित देश बनविण्याचे स्वप्न त्यांच्या उराशी होते. हे लक्षात ठेवून आपणही त्यामध्ये योगदान दिले पाहिजे, असे सांगितले.

विद्यापीठाबद्दल बोलताना ते म्हणाले, 2021 मध्ये स्थापन झालेल्या विद्यापीठात तीन घटक महाविद्यालयांचा समावेश आहे. ज्यामध्ये 7 हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत हे ज्ञान आणि उत्कृष्टतेला चालना देण्यासाठी शिक्षक, प्रशासक आणि विद्यार्थी यांच्या एकत्रित प्रयत्नांचे हे प्रतिबिंब आहे. पण एवढ्यावरच संतुष्ट न राहता आपण अधिकाधिक प्रगती करत राहिलो तरच विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करु शकू. विद्यार्थ्यांनो तुम्ही प्रथम आज्ञाधारकपणा शिका, कारण विद्यापीठांमधले जीवन आणि बाहेरच्या जगातले जीवन यात फार फरक असतो. चांगले सामाजिक जीवन जगणे ही अवघड पण फार महत्त्वाची बाब आहे. पहिल्यांदा तुम्ही आज्ञाधारकपणा शिका, आदेश देणे तुम्हाला आपोआप जमेल.

कोणतेही यश हे समर्पण, कष्ट याशिवाय मिळत नाही. संपूर्ण क्षमता वापरुन, झोकून दिल्याशिवाय ते मिळत नाही. जीवन हे पुढे पुढेच जात असते, पण जर आपण जीवनात यशस्वी झालो नाही तर त्याचा काय लाभ असे सांगून राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले, तुमची उद्दिष्टे निश्चित करा. त्यासाठी गतीने प्रयत्न करा. आपली तुलना कधीही दुसऱ्याशी करु नका. प्रत्येकाच्या क्षमता वेगवेगळ्या असतात. कधीकधी उद्दिष्टपूर्तीच्या वाटेत नैराश्यही येते,  अशावेळी अल्प विश्रांती घेण्यात काहीही गैर नाही. पण ध्येय अर्धवट सोडू नका. सातत्यपूर्ण प्रयत्न करा, यश नक्की मिळेल. तुमच्यात उत्सुकता, प्रेरणा, उर्जा सदैव जागृत ठेवा, अशा शब्दात त्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी कुलाधिकारी श्री. दळवी म्हणाले, देश व राज्य सुसंस्कृत करण्यात रयत शिक्षण संस्थेचे योगदान अमुल्य आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्वप्नातील ग्रामीण विद्यापीठ स्थापन करण्याचे स्वप्न शासनाच्या धोरणामुळे शक्य झाले आहे. हे विद्यापीठ रयत शिक्षण संस्थेसाठी मानबिंदू आहे. यशाचा रस्ता अनेकदा खडतर असतो आपण संपादन केलेल्या ज्ञानाचा उपयोग राष्ट्राच्या विकासासाठी केला तर तुम्ही कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे विद्यार्थी म्हणून वेगळी ओळख निर्माण करु शकाल. शिक्षण आणि प्रशिक्षणाबरोबरच रोजगाराच्या आवश्यक संधी उपलब्ध करुन देण्यासाठी हे विद्यापीठ प्रयत्नशील आहे. या विद्यापीठामध्ये सर्वोत्कृष्ट विद्यापीठ बनण्याची क्षमता आहे.

यावेळी कुलगुरु डॉ. मस्के यांनी विद्यापीठाच्या कामगिरीचा वार्षिक अहवाल सादर केला. विविध विद्या शाखांच्या अधिष्ठातांनी स्नातकांना सादर केले. विविध विद्याशाखांमध्ये उत्कृष्ट गुण मिळविलेल्या तीन स्नातकांना प्रत्यक्ष समारंभात राज्यपाल यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. यानंतर सर्वोत्कृष्ट गुण मिळविलेल्या 31 स्नातकांना पदवी देण्यात आली. पदवी परिक्षेत 679 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांच्या अर्जांनुसार पदवी देण्याची व्यवस्था विद्यापीठाने केली आहे.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, नियामक मंडळाचे सदस्य, विद्यार्थी, विद्यार्थींनी उपस्थित होते.

0000

राज्यपालांचे संत रविदास महाराज यांना अभिवादन

मुंबई, दि. 12 : संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, राज्यपालांचे परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ तसेच राजभवनातील अधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000

मत्स्य उत्पादन वाढीच्या दृष्टीने मच्छिमारांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविणार – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. 12 : राज्यातील गोड्या पाण्यातील आणि सागरी मत्स्योत्पादन वाढीसाठी मच्छिमारांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी घेतला आहे. मंत्रालयात आज मत्स्योत्पादन वाढ आणि मच्छिमारांचा कौशल्य विकास, रोजगार आणि या व्यवसायामध्ये नाविन्यता आणण्याच्या दृष्टीने तोडगा काढण्यासाठी बैठक झाली. या बैठकीस मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे, सकाळ ग्रुपचे बॉबी निंबाळकर आदी उपस्थित होते.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावर प्रशिक्षणाचा कार्यक्रम सुरू करण्याचे निर्देश देऊन मंत्री श्री. राणे म्हणाले की, किनारपट्टीच्या एका जिल्ह्यातही हा प्रशिक्षण कार्यक्रम प्रायोगित तत्वावर राबवण्यात यावा. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाने मूल्यमापन करावे आणि या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मत्स्य उत्पादनामध्ये किती आणि कशी वाढ झाली आहे, मच्छिमारांना कशा प्रकारे फायदा झाला याचा या मूल्यमापनामध्ये समावेश असावा. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी विभागाने त्या त्या जिल्ह्यांच्या नियोजन समितीच्या निधीमधून तरतूद करावी, अशा सूचनाही मंत्री श्री. राणे यांनी दिल्या.

मंत्री श्री. राणे म्हणाले की, पालघर जिल्ह्यात उभारण्यात येत असलेले वाढवण बंदर हे 2026 पर्यंत कार्यान्वित होणार आहे. या वाढवण बंदरासाठी लागणाऱ्या कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी एक प्रशिक्षण कार्यक्रम तयार करावा आणि तो तातडीने राबवण्याचे नियोजन करण्यात यावे. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी मुख्यतः किनारपट्टीच्या जिल्ह्यांना प्राधान्य द्यावे. जेणेकरून किनारपट्टीच्या भागात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील. यासाठीही जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तरतूद करण्यासाठी विभागाने पुढाकार घ्यावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तरतूद करण्यात येईल. वाढवण बंदरासाठी मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. ती राज्यातूनच पूर्ण करण्यासाठी या प्रशिक्षण कार्यक्रमाचा उपयोग होणार आहे. तरी याविषयीची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी, अशा सूचना मंत्री श्री. राणे यांनी दिल्या.

मच्छिमारांसाठी देण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये शाश्वत मासेमारी व्यवसाय, पर्यावरणस्नेही मच्छिमारी, मच्छिमारांना व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवणे, त्यांची सुरक्षा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यांचा समावेश असणार आहे.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

एआय तंत्रज्ञान आधारित प्रणालीमुळे राज्यात दुसरी निल क्रांती – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. 12 : मत्स्य उत्पादन वाढीसोबतच मच्छिमारांची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची आहे. यासाठी एआय तंत्रज्ञानावर अधारित प्रणालीचा वापर ही काळाची गरज आहे. या प्रणालीच्या वापरामुळे राज्यात दुसरी निल क्रांती शक्य असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले. सागरी सुरक्षा आणि मत्स्य उत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाच्या वापराविषयी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीवेळी ते बोलत होते.

यावेळी मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, महाराष्ट्र प्रगत संशोधन आणि प्रगत कायद्यासाठी दक्षता अंमलबजावणीचे संचालक बी.व्ही. सत्यसाईकृष्णा आदी उपस्थित होते.

सागरी सुरक्षा तसेच मच्छिमारांची सुरक्षा हा महत्त्वाचा विषय असल्याचे सांगून मंत्री श्री. राणे म्हणाले की, मत्स्यव्यवसाय विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या पारदर्शी अंमलबजावणीसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर कशाप्रकारे करता येईल याचा आराखडा तयार करावा. तसेच मासळीच्या उत्पादनामध्ये वाढ करणे, मच्छिमारांची सुरक्षा निश्चित करणे, मच्छिमार नोंदणी, मच्छिमारी नौका नोंदणी, गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय, मासळी विक्रीची व्यवस्था, त्याची वाहतूक, आपत्तीच्या काळात राबवावयाची सुरक्षा व प्रतिसाद यंत्रणा यासाठी एआयचा वापर करावा. अशा प्रकारच्या सुरक्षा प्रणालीचे एक मॉडेल प्रायोगिक तत्वावर ससून डॉक येथे उभारण्यात यावे. त्याचे मुल्यमापन करून सर्व राज्यभरात ही प्रणाली कशा प्रकारे लागू करता येईल यासाठी चाचपणी करावी. एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मच्छिमारांचे जीवनमान उंचावणे त्याचबरोबर राज्याच्या मत्स्य उत्पादनात वाढ करुन राज्याच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा वाटा उचलणे शक्य असल्याचेही मंत्री श्री. राणे यांनी सांगितले.

ससून डॉक येथे उभारण्यात येणाऱ्या या एआय तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणालीमध्ये मासळीचे मूल्यमापन, आपत्तीच्या काळात मच्छिमारांची सुरक्षा, मासळी आजारांचा शोध घेणारी प्रणाली, एआय आधारित मासळी बाजार प्रणाली, सागरी सुरक्षा, सागरी गस्त, बेकायदेशीर मासेमारीवर लक्ष ठेवणे व त्याला आळा घालणारी प्रणाली, मच्छिमार कल्याणाच्या योजनांची देखरेख करणारी प्रणाली यांचा समावेश असणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून मासळीचे उत्पादन वाढीसाठीही मदत होणार असून पारदर्शकता येणार आहे.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

 

संत रविदास महाराज जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

मुंबई,दि. १२:  संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव सचिन कावळे, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, नितीन राणे, विजय शिंदे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही पुष्प अर्पण करून संत रविदास महाराज यांना अभिवादन केले.

ताज्या बातम्या

महाबीजकडून खरीप हंगामासाठी अडीच लाख क्विंटल प्रमाणित बियाण्यांचा पुरवठा

0
मुंबई, दि. २५ :- केंद्र सरकारच्या साथी पोर्टलच्या अंमलबजावणीत मोठी भूमिका बजावत महाबीज येत्या खरीप हंगामात "साथी" प्रणालीच्या क्यूआर (QR)कोडसह अडीच लाख क्विंटल प्रमाणित...

गुजरात, केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगाल येथील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका जाहीर – निवडणूक...

0
मुंबई, दि. २५ : भारत निवडणूक आयोगाने गुजरात, केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगाल येथील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. या मतदारसंघांमध्ये...

भारत चौथ्या क्रमांकाची जागतिक अर्थशक्ती

0
मुंबई, दि. 25: “भारताची अर्थव्यवस्था चार ट्रिलियन डॉलर्सच्या टप्प्यावर पोहोचली असून, आपला देश आज जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थशक्ती ठरला आहे, ही बाब...

मान्सूनच्या प्रवासाची गती लवकरच कमी होणार असल्यामुळे राज्यात पावसात घट होणार

0
मुंबई, दि २५ : या वर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरु असल्यामुळे तो २५ मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला आहे, जे सामान्य तारखेपेक्षा १०...

‘उडान’ मुळे नागपूर जिल्ह्यात मानसिक आरोग्य सेवांचे सशक्तीकरण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. २५ : ‘उडान’ या जिल्हास्तरीय मानसिक आरोग्य कार्यक्रमाने नागपूर जिल्ह्यात उल्लेखनीय यश मिळवले असून, या उपक्रमामुळे ग्रामीण भागात मानसिक आरोग्य सेवा अधिक...