मंगळवार, एप्रिल 29, 2025
Home Blog Page 236

‘मराठी भाषा पंधरवडा’ व ‘विश्व मराठी संमेलन’ यानिमित्त ‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात विजया डोनीकर यांची मुलाखत

मुंबई दि. 22 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास आणि जय महाराष्ट्र कार्यक्रमात मराठी भाषा पंधरवडा आणि तिसरे विश्व मराठी संमेलन यानिमित्त मराठी भाषा संचालनालयाच्या संचालक विजया डोनीकर यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे. 

           दिलखुलास कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि. 24, शनिवार दि.25, सोमवार दि. 27 आणि मंगळवार दि. 28 जानेवारी 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. तर जय महाराष्ट्र कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 28 जानेवारी 2025 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत ऐकता येणार आहे. निवेदिका पल्लवी मुजुमदार यांनी ही मुलाखत घेतली आहे.

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

महाराष्ट्र राज्याची बोली भाषा म्हणजेच मराठी भाषेचे जतन व संवर्धन व्हावे यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण घेतला. ही तमाम महाराष्ट्रातील जनतेसाठी अभिमानास्पद बाब आहे. मराठी भाषेची महती आतंरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावी, तिचे महत्त्व वाढावे यासाठी मराठी भाषा विभागामार्फत विविध उपक्रम व योजना राबविण्यात येत आहेत. मराठी भाषा वृद्धीगत व्हावी आणि जनमाणसात तीचे महत्व वाढावे यासाठी दरवर्षी जानेवारी महिन्यात 14 ते 28 या कालावधीत मराठी भाषा पंधरवडा चे आयोजन केले जाते. या पंधरवाड्यात कोणकोणते उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचबरोबर दिनांक 31 जानेवारी व दिनांक 1 आणि 2 फेब्रुवारी रोजी तीसरे विश्व मराठी संमेलन आयोजित केले आहे. त्याचे नियोजन कशा प्रकारे करण्यात आले आहे व कोणकोणत्या विषयांवर या संमेलनातून चर्चा करण्यात येणार आहे याबाबत संचालक श्रीमती डोनिकर यांनी दिलखुलास आणि जय महाराष्ट्र कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

०००

जयश्री कोल्हे/ससं/

प्रजासत्ताक दिनी होणार संविधानाचा जागर; सामाजिक न्याय विभागाचा ‘घर घर संविधान’ उपक्रम

मुंबई, दि. 22 : भारतीय संविधानास 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सन 2024-25 पासून घर घर संविधान उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत  प्रजासत्ताक दिनी संविधानाचा जागर होणार आहे. प्रजासत्ताक दिनी म्हणजेच दि. 26 जानेवारी 2025 रोजी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी भारतीय संविधानाबद्दल माहिती देणारे कार्यक्रम व संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाटप पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय विभागांतर्गत सर्व आस्थापनांमध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात येणार आहे. 

भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता तसेच संविधानाची मूल्ये शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच नागरिकांपर्यंत पोहोचावीत यासाठी राज्यातील प्राथमिक,माध्यमिक सर्व प्रकारचे व्यावसायिक, बिगर व्यावसायिक महाविद्यालय, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृह, निवासी शाळा, शासन मान्यताप्राप्त अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळा, आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था, महाराष्ट्र विधान परिषद, विधानसभा अशा सर्व ठिकाणी घर घर संविधानहा उपक्रम राबवण्यात येत आहे. दि. 26 नोव्हेंबर 2024 ( संविधान दिवस) पासून हा उपक्रम राबविण्यात येत  आहे. या उपक्रमांतर्गत विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धांचे, व्याख्यान, रॅली व संविधान जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन  राज्यभरात करण्यात आले  आहे, अशी माहिती सामाजिक न्याय विभागाने दिली आहे.

****

शैलजा पाटील/विसंअ/

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचा मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ग्रंथचर्चा व भातखंडे संगीत परंपरा सादरीकरण

मुंबई, दि. 22 : मराठी भाषा विभागाच्यावतीने 14 जानेवारी ते 28 जानेवारी हा ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने प्रकाशित झालेल्या महाराष्ट्राचे शिल्पकार विष्णू नारायण भातखंडे या पुस्तकावर ‘ग्रंथचर्चा व भातखंडे संगीत परंपरा सादरीकरण’ हा कार्यक्रम गुरुवार, दिनांक 23 जानेवारी, 2025 रोजी सकाळी 11 वाजता रवींद्र नाट्यमंदिर, न्यू मिनी थिएटर, 5 वा मजला येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात ज्येष्ठ लेखक रामदास भटकळ, सारंगी आंबेकर, निसर्ग देहूक्कर, ज्ञानेश्वर सोनावणे व जयंत नायडू यांचा सहभाग असणार आहे. तसेच  ‘अभिजात मराठी अभिमान मराठी’ लेखक, गायक डॉ.आशुतोष जावडेकर यांचा भावसंवाद कविता, गाणी, अभिवाचन आणि मनसोक्त गप्पा… हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक 24 जानेवारी रोजी सायंकाळी 05.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम डॉ.आशुतोष जावडेकर सादर करणार आहेत.  मंडळाने आयोजित केलेले वरील दोन्ही कार्यक्रम सर्वांकरिता मोफत खुले असून सर्वांनी सदर कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ.मीनाक्षी पाटील यांनी  केले आहे.

0000

बी.सी. झंवर/विसंअ/

 

संत्रावर्गीय फळ पिकाच्या फळगळतीमुळे झालेल्या नुकसानीस विशेष बाब म्हणून १६५ कोटी ८३ लाखाची मदत देण्यास राज्य शासनाची मंजुरी – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील 

मुंबई, दि. २२ :- वर्धा जिल्ह्यातील आर्वी उपविभागात ऑगस्ट २०२४ मध्ये  ढगाळ वातावरण आणि जुलै ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत अमरावती, अकोला व बुलढाणा जिल्ह्यात ढगाळ वातावरण व सततच्या पावसामुळे संत्रा पिकाच्या फळगळतीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यास विशेष बाब म्हणून १६५ कोटी ८३ लाख ८ हजाराची मदत देणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.

नैसर्गिक आपत्तीमुळे शेत पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी खचला जातो. या नुकसानग्रस्त  शेतकऱ्याला आधार व दिलासा  देण्यासाठी  शासन त्याच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितले.

वर्धा जिल्ह्यातील आर्वी उपविभागात ढगाळ वातावरण व सततच्या पावसामुळे ऑगस्ट २०२४ कालावधीत ५ हजार ९३३ शेतकऱ्यांचे ३०१३.८५ हेक्टर  क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी विशेष बाब  म्हणून १०८४.९८ लाख रुपये मदत देण्यास मंजुरी दिली आहे.

तसेच, जुलै ते ऑगस्ट २०२४ कालावधीत अमरावती जिल्ह्यातील  ४१ हजार ९११ शेतकऱ्यांचे ३७३९३.९७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी विशेष बाब म्हणून १३४६१.८३ लाख रुपये, अकोला जिल्ह्यातील  ३ हजार ४३३ शेतकऱ्यांचे ३०२९.५० हेक्टर  क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी विशेष बाब म्हणून १०९०.६२ लाख रुपये, बुलढाणा जिल्ह्यातील ३ हजार ८५२ शेतकऱ्यांचे २६२६.८० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी विशेष बाब म्हणून ९४५.६५ लाख रुपयांची मदतीस विशेष बाब  म्हणून मंजुरी दिली आहे.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

 

एसटी बसस्थानकांवर ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ राबविणार..! – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. २२ : स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारी रोजी पुढील वर्षभर एसटीच्या राज्यभरातील सर्व बसस्थानकांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ” हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान ” राबवण्यात येणार आहे. तब्बल ३ कोटी रुपयांची बक्षिसे या अभियानांतर्गत देण्यात येणार असून राज्यात ‘ अ ‘ वर्गात पहिला येणाऱ्या बसस्थानकाला १ कोटीचे बक्षीस जाहीर करण्यात येत आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. या अभियानाचा शुभारंभ २३ जानेवारी रोजी मंत्री श्री. सरनाईक यांच्याहस्ते कुर्ला नेहरूनगर बसस्थानकावर सकाळी ११ वाजता होणार आहे. यानिमित्ताने सर्व राज्यभर प्रत्येक बसस्थानकावर शालेय विद्यार्थी, सामाजिक संस्था व एसटी कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.

मागील वर्षी हे अभियान सुरू करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अभियानाची संकल्पना विषद करताना, सर्वसामान्य प्रवाशांना स्वच्छ व सुंदर बसस्थानक तसेच निर्जंतूक , टापटीप प्रसाधनगृहे कायमस्वरूपी उपलब्ध करून देणे हे एस. टी. महामंडळाचे प्रथम कर्तव्य आहे. या जाणिवेतून हे अभियान सुरू करण्यात येत आहे, असे स्पष्ट केले होते.

तसेच ” आपलं गाव, आपलं बसस्थानक ” या संकल्पनेवर आधारित लोकसहभागातून बसस्थानकांचा सर्वांगीण विकास करणे हा या अभियानाचा मुख्य ” गाभा ” राहणार आहे. हे देखील आवर्जून सांगितले होते. अर्थात, कोणतेही बसस्थानक हे त्या गावचे मध्यवर्ती ठिकाण असते. त्याअर्थाने बसस्थानक हे त्या गावची ” शान ” असल्यामुळे गावातील तरुण मंडळे, महिला बचत गट, विविध सामाजिक संस्था, उद्योग समूह यांनी पुढे येऊन त्या बसस्थानकाचे सुशोभीकरण आणि सौंदर्यींकरणासाठी मदत करावी, असे आवाहन मंत्री श्री. सरनाईक यांनी केले आहे.

वर्षभर चालणाऱ्या या अभियानामध्ये दर ३ महिन्यांनी प्रत्येक बसस्थानकाचे मूल्यमापन होणार आहे. त्यासाठी एस.टी. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली परीक्षण समित्या नेमण्यात आल्या असून त्यांनी दिलेल्या गुणांच्या आधारे सरासरीद्वारे बसस्थानकाचे क्रमांक निश्चित करण्यात येतील. राज्यभरात एसटीच्या असलेल्या सर्व बसस्थानकाचे तेथील प्रवासी चढ-उतार संख्येच्या आधारे शहरी ‘ अ ‘ वर्ग, निमशहरी ‘ ब ‘ वर्ग व ग्रामीण ‘ क ‘ वर्ग अशा तीन गटांमध्ये विभागणी केलेली आहे. प्रथम प्रादेशिक स्तरावर प्रत्येक गटनिहाय पहिला, दुसरा आणि तिसऱ्या क्रमांकासाठी स्पर्धा रंगणार असून अंतिम स्पर्धा राज्यस्तरावर घेण्यात येईल. त्यासाठी प्रत्येक प्रादेशिक स्तरावर गटनिहाय पहिला आलेल्या बसस्थानकाचा विचार केला जाणार आहे. राज्यपातळीवर ‘ अ ‘वर्ग गटातून पहिला येणाऱ्या बसस्थानकाला १ कोटी रुपये ‘ ब ‘ वर्ग गटातून पहिला येणाऱ्या बसस्थानकाला ५० लाख रुपये तर ‘ क ‘ वर्ग गटातून पहिला येणाऱ्या बसस्थानकाला २५ लाख रुपये इतक्या रकमेची बक्षिसे देण्यात येणार आहेत.

००००

नीलेश तायडे/विसंअ/

केईएम रुग्णालय मुंबईकरांचे आधारवड; रुग्णांना जागा कमी पडू नये यासाठी केईएममध्ये आयुष्मान शताब्दी टॉवर उभे करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 22 : रुग्णसेवेचे अखंड व्रत घेतलेले केईएम रुग्णालय हे मुंबईकरांचे खऱ्या अर्थाने आधारवड आहे. ज्या विश्वासाने रुग्ण येथे येतात त्यांना जागा कमी पडू नये यासाठी केईएममध्ये आयुष्मान शताब्दी टॉवर उभे करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

अविरत रुग्णसेवेची शंभर वर्ष पूर्ण करणाऱ्या आणि लाखो रुग्णांना जीवनदान देणाऱ्या केईएम रुग्णालयाच्या चरणी मी नतमस्तक होतो, अशी भावना उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी आज केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी समारंभात व्यक्त केली.

सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि केईएम रुग्णालयाच्या ९९ वा वर्धापन दिन सोहळा रुग्णालयाच्या प्रांगणात झाला. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार कालिदास कोळंबकर, सुनील शिंदे, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त विपिन शर्मा, केईएमच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले की, केईएमने घेतलेले रुग्णसेवेचे व्रत अवघड आहे. आजही इथली रुग्णसेवा अहोरात्र चालू आहे. इथल्या डॉक्टरांचे, नर्सेसचे, कर्मचाऱ्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. तुम्ही आहात, म्हणून सामान्य मुंबईकर आज जगतो आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.

सेवाभाव हा परमभाव आहे, असे आपली संस्कृती सांगते. डॉक्टर देखील वैद्यकीय क्षेत्रात येताना सेवाधर्माची शपथ घेतात. ही शपथ घेऊनच ९९ वर्षांपूर्वी हे हॉस्पिटल उभे राहिले. आजही मुंबई आणि आसपासच्या रहिवाशांना आधार देत उभे आहे, असेही श्री. शिंदे यावेळी म्हणाले.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, घरातल्या आधारवडासारख्या बुजुर्ग व्यक्तीबद्दल आपल्याला आदरभाव असतो. आपुलकी असते, तशीच भावना केईएम बद्दल आहे. एखाद्या आरोग्य क्षेत्रातील संस्थेनं सुवर्ण किंवा शताब्दी महोत्सव साजरा करणे ही त्या संस्थेसाठी अभिमानास्पद बाब असते. आज केईएम रुग्णालय हे देशातील सर्वोत्तम रुग्णालयांपैकी एक आहे. केईएम हे कुटुंब आहे. त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतली जाते. सांस्कृतिक वारसा जपत अत्याधुनिकतेची कासही केईएमने धरलीये. आरोग्य क्षेत्राच्या नव्या दिशा आणि आंतरराष्ट्रीय मानके केईएमने स्थापित केली असल्याचे त्यांनी सांगितले.

केईएम सारखी रुग्णालये ही सर्वसमान्यांसाठी देवदूतासारखी आहेत.  अरुणा शानबाग यांची ४१ वर्षे सेवा केईएमच्या कर्मचाऱ्यांनी केली.जगातल्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेचे असे उदाहरण नसेल. केइएमसोबत नाव येते ते जीएस वैद्यकीय महाविद्यालयाचे कितीतरी नामवंत, दिग्गज डॉक्टर या कॉलेजच्या प्रांगणात तयार झाले. इथल्या डॉक्टरांची संशोधकांची कीर्ती जगभर पसरलेली असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी काढले.

भारतातील पहिली हृदय शस्त्रक्रिया केईएम रुग्णालयात १९६८ मध्ये झाली. त्यानंतर २०२४ रोजी यशस्वी हार्ट ट्रान्सप्लाण्ट येथे करण्यात आले. अवयवदानामध्ये वाखाणण्यासारखे कार्य केल्याबद्दल केईएम रुग्णालयाचा काही दिवसांपूर्वीच दिल्लीत गौरव करण्यात आला. भारतातील पहिली टेस्ट ट्युब बेबीही केईएम रुग्णालयात १९८७ साली डॉ. इंदिरा हिंदुजा यांनी घडवली आणि आता इथे रोबोट या अत्याधुनिक तंत्रज्ञानामार्फत गुडघ्याच्या सांधेबद्दल शस्त्रक्रिया करण्यात येतात. वैद्यकीय क्षेत्रात केईएमने केलेली ही क्रांती ऐतिहासिक असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

केईएमच्या शताब्दी महोत्सवानिमित्त महानायक अमिताभ बच्चन यांच्याहस्ते फॅटी लिव्हरवरील उपचाराच्या क्लिनीकचे उद्घाटन झाले. ते या आजाराच्या जनजागृतीसाठी ब्रॅण्ड अम्बॅसिडर म्हणून काम करणार आहेत.त्याबद्दल अमिताभ बच्चन यांचे शासनाच्यावतीने आभार मानतो. केईएमचे शताब्दी महोत्सव वर्षे पुढील पिढीसाठी खुप काही देण्यासाठी पायाभरणीचे ठरेल, यात तीळमात्र शंका नाही, असेही ते म्हणाले.

रुग्णालयात झिरो प्रिस्किप्शन पॉलिसी लागू करावी त्याचबरोबर रुग्णांना जागा कमी पडू नये यासाठी शताब्दी महोत्सवी वर्षात आयुष्मान टॉवर उभे करतानाच रुग्णाच्या नातेवाईकांची परवड होवू नये यासाठी व्यवस्था निर्माण करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. याठिकाणी डॉक्टरांचे म्युझियम करण्यात यावे अशी सूचनाही त्यांनी केली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्मरणिकेचे आणि वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने तर समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

००००

 

पहिल्या दिवशीचे गुंतवणूक करार ६,२५,४५७ कोटींवर

महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी केले निमंत्रित, टाटा समूह ३०,००० कोटी गुंतवणूक करणार

दावोस, दि. २२ : दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकोनॉमिक फोरम) पहिल्या दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ६,२५,४५७ कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले आहेत. एकाच दिवशी इतक्या मोठ्या रकमेचे करार होणे, हा एक नवा विक्रम आहे. दरम्यान आज दुसऱ्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार होणार आहेत.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सामंजस्य करारांच्या व्यतिरिक्त विविध कंपन्यांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी निमंत्रित केले. टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचीही काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. टाटा समूह 30 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे.

काल्सबर्ग समूहाचे सीईओ जेकब अरुप अँडरसन यांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. काल्सबर्ग समूहाने महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा प्रदर्शित केली असून, त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.

रिटेल क्षेत्रात कार्यरत लुलू समूहाचे प्रबंध संचालक एमए युसुफ अली यांचीही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भेट घेतली. त्यांनी नागपुरात गुंतवणूक करण्याची इच्छा प्रदर्शित केली असून, महाराष्ट्रातही त्यांनी विस्तार करण्याची तयारी दर्शविली आहे. याबरोबरच रिन्यू पॉवरचे अध्यक्ष आणि सीईओ सुमंत सिन्हा यांचीही त्यांनी भेट घेतली. बीड जिल्ह्यात १५,००० मेवॉ पाईपलाईन आणि पवन ऊर्जा प्रकल्पाबाबत यावेळी चर्चा झाली.

शिंडर इलेक्ट्रीक इंडियाचे प्रबंध संचालक आणि सीईओ दीपक शर्मा यांचीही त्यांनी भेट घेतली. जागतिक बँकेच्या मदतीने राज्यातील आयटीआयच्या सक्षमीकरण कार्यक्रमात तसेच ऊर्जा क्षेत्रात एआयच्या वापराबाबत सहकार्य करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. अहिल्यानगर आणि नाशिक येथे विस्तार करण्याच्या त्यांच्या योजनांचेही सूतोवाच श्री. शर्मा यांनी केले.

मास्टरकार्ड, एपीएसीचे अध्यक्ष लाईंग हाई यांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. लुईस ड्रेफसचे सीईओ मायकेल ग्लेंची यांच्याशी शेती, अन्नप्रक्रिया, आंतरराष्ट्रीय शिपिंग आणि वित्तीय क्षेत्राबाबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. शेतीच्या क्षेत्रात अधिक सहकार्य वाढविण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली.

कॉग्निझंटचे सीईओ रविकुमार एस. यांचीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली.

0000

महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • पहिला करार राज्यातील पहिला जिल्हा गडचिरोलीसाठी
  • बाहर बर्फ, लेकिन अंदर गरमी है, असे का म्हणाले सज्जन जिंदाल?
  • नागपूर, गडचिरोलीसाठी जेएसडब्ल्यूशी ३ लाख कोटींचा सामंजस्य करार
  • ९२,२३५ रोजगार निर्मिती

दावोस, 21 जानेवारी : दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे काल रात्री उद‌्घाटन झाल्यानंतर आज पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विक्रमी 4 लाख 99 हजार 321 कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत. यातून सुमारे 92,235 इतकी रोजगारनिर्मिती होणार आहे. यातील एकच करार 3 लाख कोटींचा असून हा जेएसडब्ल्यू यांच्यासोबत करण्यात आला असून, तो स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स इत्यादी क्षेत्रात करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट देणारा हा करार असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करीत याबद्दल जेएसडब्ल्यूचे सज्जन जिंदाल यांचे आभार मानले आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते.

आजचा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक दिवस आहे. दावोसमध्ये बाहेर बर्फ पडतो आहे. पण, येथे आतमध्ये गुंतवणुकीचा ओघ येत असल्याने गर्मी आहे, असे सांगताना ते म्हणाले, महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ची प्रक्रिया अतिशय वेगवान आणि तितकीच सहजसोपी प्रक्रिया आहे. गुंतवणूकदारांच्या बाहेर मोठ्या रांगा लागल्या आहेत. महाराष्ट्रात एकदा याल तर पुन्हा तुम्ही बाहेर जाणार नाही, असे मी त्यांना सांगितल्याचे सज्जन जिंदाल यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, आज दावोसमध्ये पहिला करार हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, त्याप्रमाणे राज्यातील शेवटच्या नाही, तर पहिला जिल्हा असलेल्या गडचिरोलीसाठी झाला. कल्याणी समूहासोबत संरक्षण, स्टील, ईव्ही क्षेत्रासाठी हा करार झाला. यात गुंतवणूक 5200 कोटी रुपयांची असून 4000 रोजगार निर्मिती होणार आहे. आज झालेले सामंजस्य करार हे कल्याणी समूह, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, बालासोर अलॉय लि., विराज प्रोफाईल्स प्रा. लि., एबी इनबेव, जेएसडब्ल्यू, वारी एनर्जी, टेम्बो, एलमाँट, ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी, अवनी पॉवर बॅटरिज, जेन्सॉल, बिसलरी इंटरनॅशनल, एच टू पॉवर, झेड आर टू, ब्ल्यू एनर्जी मोटर्स, इस्सार, बुक माय शो, वेल्स्पून इत्यादी कंपन्यांचा समावेश असून, लॉजिस्टिक, ऑटोमोबाईल्स, स्टील, इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, पायाभूत सुविधा, करमणूक, हरित ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन आदी क्षेत्रातील हे करार आहेत.

फ्युएलची पुण्यात संस्था

यातील एक करार फ्युएल अर्थात फ्रेंडस युनियन फॉर एनर्जायझिंग लाईव्हज यांच्याशी करण्यात आला असून, ते महाराष्ट्रातील 5000 युवकांना आर्टिफिशियल इंटिलिजन्स, डिजिटल मार्केटिंग आणि बिझनेस अ‍ॅनालिटिक्स या क्षेत्रात प्रशिक्षित करणार आहेत. फ्युएल स्किलटेक युनिव्हर्सिटी पुण्यात स्थापन करण्याचा मनोदय सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे.

सामंजस्य करारांची सविस्तर यादी पुढीलप्रमाणे…

(टीप : ही यादी भारतीय वेळेनुसार सायं. 8.30 पर्यंत)
आतापर्यंत झालेले सामंजस्य करार
एकूण : 4,99,321 कोटींचे

1) कल्याणी समूह
क्षेत्र : संरक्षण, स्टील, ईव्ही
गुंतवणूक : 5200 कोटी
रोजगार : 4000
कोणत्या भागात : गडचिरोली

2) रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि.
क्षेत्र : संरक्षण
गुंतवणूक : 16,500 कोटी
रोजगार : 2450
कोणत्या भागात : रत्नागिरी

3) बालासोर अलॉय लि.
क्षेत्र : स्टील आणि मेटल्स
गुंतवणूक : 17,000 कोटी
रोजगार : 3200

4) विराज प्रोफाईल्स प्रा. लि.
क्षेत्र : स्टील आणि मेटल्स
गुंतवणूक : 12,000 कोटी
रोजगार : 3500
कोणत्या भागात : पालघर

5) एबी इनबेव
क्षेत्र : अन्न आणि पेये
गुंतवणूक : 750 कोटी
रोजगार : 35
कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

6) जेएसडब्ल्यू समूह
क्षेत्र : स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स
गुंतवणूक : 3,00,000 कोटी
रोजगार : 10,000
कोणत्या भागात : नागपूर/गडचिरोली

7) वारी एनर्जी
क्षेत्र : हरित ऊर्जा, सौर उपकरणे
गुंतवणूक : 30,000 कोटी
रोजगार : 7500
कोणत्या भागात : नागपूर

8) टेम्बो
क्षेत्र : संरक्षण
गुंतवणूक : 1000 कोटी
रोजगार : 300
कोणत्या भागात : रायगड

9) एल माँट
क्षेत्र : पायाभूत सुविधा
गुंतवणूक : 2000 कोटी
रोजगार : 5000
कोणत्या भागात : पुणे

10) ब्लॅकस्टोन
क्षेत्र : माहिती तंत्रज्ञान
गुंतवणूक : 25,000 कोटी
रोजगार : 1000
कोणत्या भागात : एमएमआर

11) ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी
क्षेत्र : डेटा सेंटर्स
गुंतवणूक : 25,000 कोटी
रोजगार : 500
कोणत्या भागात : एमएमआर

12) अवनी पॉवर बॅटरिज
क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स
गुंतवणूक : 10,521 कोटी
रोजगार : 5000
कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

13) जेन्सोल
क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स
गुंतवणूक : 4000 कोटी
रोजगार : 500
कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

14) बिसलरी इंटरनॅशनल
क्षेत्र : अन्न आणि पेये
गुंतवणूक : 250 कोटी
रोजगार : 600
कोणत्या भागात : एमएमआर

15) एच टू ई पॉवर
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक : 10,750 कोटी
रोजगार : 1850
कोणत्या भागात : पुणे

16) झेड आर टू समूह
क्षेत्र : ग्रीन डायड्रोजन अँड केमिकल्स
गुंतवणूक : 17,500 कोटी
रोजगार : 23,000

17) ब्ल्यू एनर्जी मोटर्स
क्षेत्र : ऑटोमोबाईल्स, ईव्ही
गुंतवणूक : 3500 कोटी
रोजगार : 4000
कोणत्या भागात : पुणे

18) इस्सार (ब्ल्यू एनर्जीसोबत सहकार्याने)
क्षेत्र : हरित ऊर्जा
गुंतवणूक : 8000 कोटी
रोजगार : 2000

19) बुक माय शो
क्षेत्र : करमणूक
गुंतवणूक : 1700 कोटी
रोजगार : 500
कोणत्या भागात : एमएमआर

20) वेल्स्पून
क्षेत्र : लॉजिस्टीक
गुंतवणूक : 8500 कोटी
रोजगार : 17,300

 

राष्ट्रीय स्कूल बँड स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत महाराष्ट्रातील दोन शाळा

नवी दिल्ली, दि. 21 :  प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा एक भाग म्हणून आयोजित राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धा 2024-25 ची महाअंतिम फेरी 24 आणि 25 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम येथे होणार आहे.

यामध्ये महाराष्ट्रातील दोन शाळा महाअंतिम फेरीत पोहोचल्या आहेत. ही स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम आणि एकात्मतेची भावना जागृत करण्यासाठी आयोजित केली जाते. या स्पर्धेत 16 शाळा बँड संघ निवडले गेले आहेत. त्यात बॉयज ब्रास बँड, गर्ल्स ब्रास बँड, बॉयज पाईप बँड, गर्ल्स पाईप बँड असे असून,  466 मुले महाअंतिम फेरीत सहभागी होणार आहेत.

महाअंतिम फेरीसाठी महाराष्ट्रातील राजारामबापू पाटील मिलिटरी स्कूल आणि स्पोर्टस् अकॅडमी, इस्लामपूर (पश्चिम झोन) आणि भोसला मिलिटरी स्कूल गर्ल्स, नाशिक (पश्चिम झोन) या दोन शाळांची निवड झाली आहे.

सशस्त्र दलांचे वरिष्ठ अधिकारी परिक्षक असून हे परिक्षक मंडळ स्पर्धतील बँड चमुच्या कामगिरीचे मूल्यमापन करतील. विजेत्यांना 25 जानेवारी 2025 रोजी सरंक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील.

प्रत्येक गटातील अव्वल तीन संघांना रोख पारितोषिक (प्रथम – रु. 21,000/-, द्वितीय – रु. 16,000/- आणि तृतीय – रु. 11,000/-), चषक तसेच प्रमाणपत्रे दिली जातील. प्रत्येक गटातील उर्वरित संघाला प्रत्येकी 3,000/- चे प्रोत्साहनपर रोख पारितोषिक दिले जाईल.

0000

अंजु निमसरकर –कांबळे  /वृत्त वि. क्र. 11/ दिनांक 21.01.2025

सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करण्याच्या धोरणाबाबत निर्णय लवकरच – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. २१ :- सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करणे, निर्वासित इनाम (नुकसान भरपाई आणि पुर्नवसन) याबाबत नवीन धोरण तयार करून याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात आयोजित बैठकीत दिली.

सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करणे, निर्वासित इनाम (नुकसान भरपाई आणि पुर्नवसन) अधिनियम १९५४ नुसार मौजा, गांधी चौक, ता.वणी, जि.यवतमाळ येथील निर्वासित सिंधी समाजाच्या विस्थापितांना दिलेले वाणिज्य भुखंडाचे पट्टे नियमित करुन मालकी हक्क प्रदान करणे आणि  जरीपटका कॉलनी, नागपूर येथील अतिक्रमीत जागेसंदर्भात  महसूल मंत्री यांच्या समिती कक्षात बैठक झाली. बैठकीस महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार, उपसचिव श्रीमती अश्विनी यमगर व संबधित अधिकारी उपस्थित होते.

००००००

एकनाथ पोवार/विसंअ

ताज्या बातम्या

प्रत्येक मंडळात महाराजस्व अभियान राबविणार -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती, दि. २८ : राज्य शासनाने पारदर्शी आणि गतीमान सरकारचे धोरण ठरविले आहे. शासकीय कार्यालयातील कामे सहजपणे आणि विनातक्रार होण्यासाठी यंत्रणा राबविण्यात येत आहे....

नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा गौरव करणार – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
धुळे, दि. २८ (जिमाका):  महसूल विभाग हा शासनाचा चेहरा असून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याची भूमिका राबविण्याबरोबर सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान सुकर होण्यासाठी विविध नाविण्यपूर्ण उपक्रम...

उद्योगांसाठी रावेर येथील २ हजार एकर जमीन उपलब्ध करुन देणार -महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
उद्योगांना सोईसुविधा व सवलती देण्यासाठी शासन कटिबद्ध गुंतवणूक परिषद ठरणार धुळे जिल्ह्यासाठी गेमचेंजर परिषदेमध्ये 8436 कोटींचे गुंतवणूक करार, 11506 रोजगार उपलब्ध होणार रोजगार...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा विशेष सन्मान

0
नांदेड दि. २८ :  महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची दशकपुर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त आज मुंबई येथे अतिथीगृहात आयोजित राज्यस्तरीय सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

परोटी तांडा येथे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन

0
नांदेड दि. २८: राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचा भूमिपूजन समारंभ कार्यक्रम किनवट तालुक्यातील परोटीतांडा येथे उद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),...