मंगळवार, एप्रिल 29, 2025
Home Blog Page 237

सांगली शहरातील एल धारणाधिकार सत्ता प्रकार जमिनीबाबत निर्णय लवकरच – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. २१ : – सांगली शहरातील एल धारणाधिकार सत्ता प्रकारच्या जमिनीचे रूपांतर ए या सत्ता प्रकारात करण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी  सांगितले.

सांगली शहरात एल धारणाधिकार सत्ता प्रकारच्या जमिनीचे रूपांतर ए या सत्ता प्रकारात करण्यासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस आमदार  सुधीर गाडगीळ, महसूल विभागाचे उपसचिव धनंजय निकम, सत्यनारायण बजाज आदी उपस्थित होते. सांगली  जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

महसूल मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, खासगी व्यक्तीचे क्षेत्राचा धारणाधिकार एल बदलून त्याचे रूपांतर ए मध्ये करणे हा धोरणात्मक निर्णय आहे.  या निर्णयास मंत्रिमंडळाची मान्यता घेणे उचित ठरणार असल्याने त्यामुळे याबाबत लवकरच मंत्रिमंडळात निर्णय घेतला जाईल.

00000

एकनाथ पोवार/विसंअ

न्या. आलोक आराधे यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

मुंबई, दि. 21 : तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्या.आलोक आराधे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली.

राजभवन येथे मंगळवारी (दि. 21) झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी न्या. आलोक आराधे यांना पदाची शपथ दिली.

शपथ दिल्यानंतर राज्यपालांनी व त्यांच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी न्या. आराधे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

शपथविधी सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा तसेच मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश उपस्थित होते.

राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी न्या. आलोक आराधे यांच्या नियुक्तीबाबत केंद्र सरकारची अधिसूचना वाचून दाखवली. शपथविधी सोहळ्याची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

न्या. आलोक आराधे यांचा जीवन परिचय

न्या. आलोक अराधे यांचा जन्म १३ एप्रिल १९६४ रोजी रायपूर, छत्तीसगड येथे झाला. त्यांनी १२ जुलै १९८८ रोजी वकील म्हणून नोंदणी केली. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या जबलपूर खंडपीठात त्यांनी नागरी आणि घटनात्मक प्रकरणांवर काम केले. एप्रिल २००७ मध्ये त्यांची वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती झाली. २९ डिसेंबर २००९ रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश व  १५ फेब्रुवारी २०११ रोजी ते कायमस्वरूपी न्यायाधीश झाले. न्या. आराधे २० सप्टेंबर २०१६ रोजी जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले आणि ११ मे २०१८ रोजी हंगामी मुख्य न्यायमूर्ती झाले. १७ नोव्हेंबर २०१८ रोजी त्यांची कर्नाटक उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती. ३ जुलै २०२२ ते १४ ऑक्टोबर २०२२ त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात हंगामी मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम पहिले.  दिनांक १९ जुलै २०२३ रोजी त्यांची तेलंगाणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदावर नियुक्ती करण्यात आली.

न्या. आलोक अराधे यांनी मध्यस्थी व सामंजस्य केंद्रे, न्यायिक अकादमी, तसेच कायदेशीर सेवा प्राधिकरणांमध्ये नेतृत्व केले आहे. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी न्यायव्यवस्थेच्या विविध अंगांवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

००००

स्तन व गर्भाशयमुख कर्करोग निदानासाठी तपासणी मोहीम राबवावी – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, दि. 21 : राज्यामध्ये स्तन व गर्भाशयमुख कर्करोगाचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. या दोन्ही कर्करोगाच्या निदानासाठी राज्यात मोहीम राबविण्यात यावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

आर्थिक वर्ष 2025 – 26 च्या नियोजनासाठी आरोग्य भवन येथे आयोजित बैठकीत आरोग्य मंत्री श्री. आबिटकर बोलत होते. बैठकीस सचिव वीरेंद्र सिंग, आरोग्य सेवा आयुक्त अमगोथू श्रीरंगा नायक, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत डांगे, राज्य सेवा हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, सहसंचालक श्रीमती कमलापुरे आदींसह विविध शाखांचे अधिकारी उपस्थित होते.

आरोग्य मंडळाच्या ठिकाणी संदर्भ सेवा रुग्णालये उभारण्याबाबत  पुढील वर्षात आर्थिक तरतुदीची मागणी करण्याबाबत सूचना देताना आरोग्य मंत्री श्री.अबिटकर म्हणाले, नाशिक व अमरावती येथील संदर्भ सेवा रुग्णालय कार्यान्वित झाली आहे. उर्वरित सर्व ठिकाणी रुग्णालयाच्या उभारणीसाठी जागा शोधून निधीची मागणी करण्यात यावी. मागील आर्थिक वर्ष 2024 – 25 मध्ये मिळालेला संपूर्ण निधी खर्च करण्यात यावा. याबाबत विहित कालमर्यादा निश्चित करण्यात यावी. क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी. तसेच कुष्ठरोग रुग्ण शोध मोहीमही प्रभावीपणे राबविण्यात यावी.

जिल्हास्तरावर आरोग्य विभागाच्या योजनांची माहिती तसेच तक्रारीच्या अनुषंगाने संपर्क यंत्रणा निर्माण करण्यात यावी. यामध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाची नियुक्ती करावी. या संपर्क यंत्रणेचे केंद्र मुंबईत असावे. महात्मा फुले जन आरोग्य अभियान अंतर्गत उपलब्ध खाटांची माहिती ऑनलाईन पद्धतीने मिळण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचनाही यावेळी मंत्री सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी दिल्या.

००००

निलेश तायडे/विसंअ

अवैध गर्भपात प्रकरणी पुढाकार घेत माहिती देणाऱ्या महिलेचे मानधन वाढविणार -सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, दि. 21 : अवैध गर्भपात प्रकरणी शासन गांभीर्याने कार्यवाही करत असून अशा गुन्ह्यांमध्ये आरोपींना कठोर शिक्षा करण्यात येत आहे. तरीही अवैध गर्भपात प्रकरणांमध्ये अधिकाधिक पुराव्याच्या साहाय्याने प्रकरण मजबूत करून आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी कार्यवाही करण्याची गरज आहे. अशा प्रकरणात महिला पुढे येऊन माहिती देतात, अशा महिलांचे मानधन वाढविण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत घेण्यात आला.

राज्यात गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (लिंग निर्धारण प्रतिबंधक) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून पोलीस यंत्रणेच्या समन्वयाने अशा प्रकरणावर कारवाया वाढविण्यात याव्यात, अशा सूचनाही आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी दिल्या.

आरोग्य भवन येथे गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (लिंग निर्धारण प्रतिबंधक) कायदा (पीसीपीएनडीटी) अंमलबजावणीबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस सचिव विरेंद्र सिंग, आयुक्त अमगोथू श्री रंगा नायक, संचालक डॉ नितीन अंबाडेकर, सहसंचालक श्रीमती कमलापुरे आदी उपस्थित होते. ऑनलाईन पद्धतीने राज्यातील जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महानगर पालिकांच्या वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

राज्यात स्त्री – पुरुष लिंग गुणोत्तर प्रमाण सुधारणेसाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. यासोबतच अवैध गर्भपात रोखण्यासाठी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (लिंग निर्धारण प्रतिबंधक) कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. गुन्हा सिद्ध करून कठोर शिक्षा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. अशा प्रकरणात गुन्हे सिद्धता वाढविण्यात येईल. आंतरराज्य जिल्ह्यामध्ये शेजारच्या राज्यातील जिल्ह्यातील प्रशासनाशी समन्वय साधून दोषींविरुद्ध प्रभावी कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही मंत्री श्री. आबिटकर यांनी दिले.

सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर म्हणाले, अवैध गर्भपात प्रकरणात दाखल केसेस  जलदगती न्यायालयात चालविण्याबाबत शासन विचार करीत आहे. तसेच गर्भपात करण्यात येणाऱ्या गोळ्या सहज उपलब्ध होवू नये, यासाठी काळजी घेण्यात यावी. ऑनलाईन विक्री होत असल्यास याबाबत पडताळणी करून दोषींविरुद्ध कारवाई करावी. जिल्हा स्तरावर असलेल्या समित्यांमध्ये सामाजिक कार्यकर्ते, चळवळीतील नागरिकांचा सहभाग करण्यात यावा. या समित्या आणखी सक्षम करण्यात यावी. खबरी बक्षीस योजनेतील बक्षीस वाढविण्याबाबत कार्यवाही करावी.

०००

निलेश तायडे/विसंअ

राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे मणिपूर, मेघालय व त्रिपुरा राज्य स्थापना दिवस साजरा

मुंबई, दि. 21 : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राजभवन येथे मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा या तीन राज्यांचा राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी एचएसएनसी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा राज्यांच्या संस्कृती आणि परंपरांचे दर्शन घडवणारा पारंपरिक नृत्य व गीतांचा कार्यक्रम सादर केला.

मणिपूर, मेघालय व त्रिपुरा राज्यांनी आपल्या स्थापनेपासून शिक्षण, आरोग्य व पर्यटन या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली. गेल्या दहा वर्षांमध्ये उत्तर पूर्वेतील राज्ये रेल्वे, रस्ते तसेच हवाई मार्गाने संपूर्ण देशाशी जोडले गेले आहेत.

‘एक भारत श्रेष्ठ भारत’ कार्यक्रमांतर्गत आयोजित राज्य स्थापना दिवस साजरे केल्यामुळे त्या त्या राज्यांची भाषा, लोककला, जीवनशैली यांचा सर्वांना परिचय होत असून राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ होत असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या तिन्ही राज्यांच्या माहितीपटाचे प्रदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाला एचएसएनसी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ.हेमलता बागला, कुलसचिव डॉ. भगवान बालानी, विविध विभागांचे अधिष्ठाता, प्राचार्य, प्राध्यापक, एचएसएनसी विद्यापीठातील विद्यार्थी तसेच राजभवन येथील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. राज्यपालांचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी प्रास्ताविक केले तर परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ यांनी आभारप्रदर्शन केले.’

एप्रिलमध्ये होणाऱ्या महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाचे नियोजनपूर्वक आयोजन करावे – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. २१ : महाराष्ट्र पर्यटन विभागातर्फे महाबळेश्वर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र पर्यटन महोत्सवाच्या नियोजनासंदर्भात आढावा बैठक पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या महोत्सवानिमित्त होणाऱ्या अनेक उपक्रमांचा आढावा पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी सादरीकरणाद्वारे घेतला.

मंत्रालयात या बैठकीस विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे  व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी, पर्यटन संचालनालयाचे संचालक भगवंतराव पाटील, पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक सुशील पवार तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हा पर्यटन महोत्सव एप्रिलमध्ये महाबळेश्वर येथे तीन दिवसांसाठी आयोजित करण्यात येणार आहे. हा महोत्सव राज्यातील तसेच देशातील पर्यटकांसाठी आकर्षणबिंदू ठरणार असून अनेक सांस्कृतिक तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमांचा यामध्ये समावेश असणार आहे. यामध्ये स्ट्रॉबेरी महोत्सव, लाईव्ह मनोरंजन, महाबळेश्वर मिनी मॅरॅथॉन, हॉट एअर बलून, हेलिकॉप्टर सुविधा इत्यादी पर्यटन आकर्षण उपक्रम असणार आहेत.

या महोत्सवादरम्यान होणाऱ्या कार्यक्रमांच्या आयोजनाचे दिवसनिहाय वेळापत्रक तयार करावे, त्याचप्रमाणे हे कार्यक्रम महाबळेश्वर मधील विविध प्रसिद्ध पर्यटन स्थळांवर आयोजित करावे. हा महोत्सव गौरवशाली व्हावा यादृष्टीने प्रयत्न करण्यात यावेत. या पर्यटन महोत्सवाच्या नियोजनासंदर्भात नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. या पर्यटन महोत्सवाचे नियोजन काटेकोरपणे करण्याचे निर्देश पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

***

संध्या गरवारे/विसंअ/

पर्यटक निवासांच्या ठिकाणी पर्यटन वाढीवर भर द्या – पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. २१ : पर्यटन विभागाच्या सर्व पर्यटक निवासांच्या ठिकाणी पर्यटन वाढीसाठी  कोणकोणत्या बाबी करता येऊ शकतील हे विचारात घेऊन नियोजन करावे, त्याचबरोबर पर्यटन विभागाच्या मालकीच्या सर्व मालमत्तांची गुणवत्ता तपासणी करणारी पथके नियुक्त करण्याचे निर्देश पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

मंत्रालयात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची बैठक झाली. या बैठकीत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, अधीक्षक अभियंता शैलेंद्र बोरसे यांसह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पर्यटनमंत्री श्री.देसाई म्हणाले की, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ चालवत असलेले पर्यटक निवास, विकसित करत असलेले पर्यटक निवास, दीर्घ व अल्प मुदतीवर चालवण्यासाठी दिलेल्या मालमत्ता यांची योग्य ती निगा राखणे आपली जबाबदारी आहे. सर्व मालमत्तांची तपासणी करून त्या सुव्यवस्थितपणे वापरल्या जातील याची देखील खात्री करणे गरजेचे आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जोतीबा मंदिराच्या ठिकाणी असलेल्या ‘एमटीडीसी’चे पर्यटक निवासी व्यवस्थेची दुरूस्ती करण्यात यावी. ज्या ठिकाणी पर्यटन वाढू शकते अशा ठिकाणांवर पर्यटन विकासाची कामे करण्याचे प्रस्तावित करावीत, असेही पर्यटनमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.

***

संध्या गरवारे/विसंअ/

सिंहस्थ कुंभमेळा स्वतंत्र कक्षासाठी प्रस्ताव सादर करणार – विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

नाशिक, दि.21 जानेवारी, 2025 (जिमाका वृत्तसेवा): आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या अनुषंगाने सर्व यंत्रणांचे कामकाज सूत्रबद्धतने पार पाडण्यासाठी सिंहस्थ कुंभमेळा स्वतंत्र कक्षाचा आराखड्यासह प्रस्ताव राज्य शासनास सादर करण्यात येईल, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी आज दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित आढावा बैठकीत विभागीय आयुक्त डॉ. गेडाम बोलत होते. यावेळी  नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

दोन वर्षांवरील कामांसाठी अंदाज पत्रक तयार करावे

विभागीय आयुक्त डॉ. गेडाम म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळा कक्षासाठी प्राथमिक स्वरूपाचा आरखडा तयार करण्यात आला आहे. यात अधिकारी व कर्मचारी यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. कुंभ कक्षासाठी लागणाऱ्या अनुषंगिक बाबी व सोयी-सुविधांसाठी  प्रस्ताव तयार करून आगामी काळात आवश्यक फेरबदलासह तो पूर्णत्वास येईल. सिंहस्थ कुंभमेळासाठी विविध विभागांनी प्रस्ताव सादर केले आहेत. या प्रस्तावात नमूद कामांपैकी ज्या कामांसाठी दोन वर्षापेक्षा अधिक कालावधी लागणार आहे, ती कामे त्वरीत सुरू करण्याचे निर्देश देतानाच अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी दिल्या.

मोबाईल कंपन्यांसमवेत संवाद साधावा

रामकालपथसाठी सल्लागार यांच्याशी चर्चा करून अंतिम निधीसाठी प्रस्ताव सादर करावा. नाशिक व त्र्यंबकेश्वर व शहरालगतचे महामार्ग येथे कुंभमेळा काळात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता मोबाईल डाटा वापर वाढणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने मोबाईल कंपनी व्यवस्थापनाची बैठक आयोजित करून कुंभमेळा कालावधीत इंटरनेट सेवा सुरळीत राहण्याच्या दृष्टीने टॉवरची संख्या वाढविणे, इंटरनेट डाटा क्षमता वाढविण्याबाबत चर्चा करून नियोजन करावे, अशा सूचनाही विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी  बैठकीत दिल्या.

माध्यमांनी बातमीस सनसनाटी स्वरुप देणे टाळावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 21 : एखाद्या घटनेची वस्तुनिष्ठता तपासूनच माध्यमांनी बातमी द्यावी. बातमीला सनसनाटी स्वरुप देणे माध्यमांनी टाळावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सन 2023 व सन 2024 च्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते मंत्रालयातील समिती सभागृहात झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे, माहिती व जनसंपर्कचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, उपाध्यक्ष महेश पवार, सरचिटणीस प्रवीण पुरो, खजिनदार विनोद यादव आदी उपस्थित होते.

  उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात ज्या पत्रकारांनी, निर्भिड पत्रकारिता केली. पत्रकारितेचा आदर्श निर्माण केला. त्यांचा वारसा, परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करावा. सध्या तंत्रज्ञानाच्या वाढीमुळे माध्यम क्षेत्रातही मोठे बदल झाले आहेत. आता इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल प्लॅटफॉर्म्स, आणि सोशल मीडियाने माध्यमांचे रूप पालटले आहे. आज बातम्या केवळ वृत्तपत्रांपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. मोबाइलवर, सोशल मीडियावर काही सेकंदांत बातम्या पोहोचतात. माध्यमांचा वेग झपाट्याने वाढला आहे. त्यातच आता माध्यम क्षेत्रातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झाला असून या क्षेत्रावर ‘एआय’चा मोठा प्रभाव पडणार आहे. ‘एआय’ आपल्याला सहाय्यक ठरू शकतो, मात्र पत्रकारितेच्या मुळाशी असलेली सत्य, पारदर्शकता, आणि सामाजिक बांधिलकी ही मूल्ये केवळ पत्रकारच जपू शकतात, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

माध्यम क्षेत्रात बदल होत असताना मीडिया ट्रायल सारखी आव्हानेही समोर येत आहेत. ‘मीडिया ट्रायल’मुळे समाजात संभ्रम निर्माण होतो आणि एखाद्या व्यक्तीचं जीवन उद्ध्वस्त होऊ शकते, एखाद्याचे करिअर संपू शकते. माध्यमांनी सत्य, पारदर्शकता आणि नैतिकतेला महत्त्व द्यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

चुकीच्या गोष्टीवर टीका करणे, टीपणी करणे हा माध्यमांचा हक्क आहे. सगळीकडे नकारात्मक गोष्टी घडताना चांगल्या, सकारात्मक गोष्टी सुद्धा समाजाच्या समोर येणे आवश्यक असल्याचे मतही श्री. पवार यांनी व्यक्त केले.

पत्रकारांच्या विविध मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मी स्वतः सकारात्मक आहोत. माध्यमकर्मींचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेसंदर्भात अभ्यास करुन निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

वार्ताहर संघाने आपल्या सदस्यांना उत्कृष्ट वार्तांकनासाठी प्रेरणा मिळण्याच्या दृष्टीने पुरस्कार देण्याची ही बाब कौतुकास्पद असून अशारितीने आपल्याच सदस्यांचा गुणगौरव करणारा आपला एकमेव संघ असावा. मंत्रालय वार्ताहर संघाकडून, मंत्रालयात दिला जाणारा हा पुरस्कार आपल्या कार्यकर्तृत्वाला अधिक प्रकाशमान करणारा ठरेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

श्री.चोरमारे आजच्या माध्यम क्षेत्राविषयी मत व्यक्त करताना म्हणाले की, सध्याच्या पत्रकारितेपुढे मोठे आव्हाने निर्माण झाली आहेत. गंभीरपणे व प्रामाणिकपणे पत्रकारिता करणाऱ्यास मध्यवर्ती पत्रकारितेमध्ये स्थान राहिले नाही. मात्र, तरीही गंभीरपणे व प्रामाणिकपणे काम करणारे पत्रकार स्वतःची जागा निर्माण करत आहेत. पत्रकारांना समाजातील समस्या जाणून घेऊन त्याचे वार्तांकन करण्यासाठी माध्यम संस्थांनी पाठबळ देणे आवश्यक आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोविड काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्याजोगे काम केले आहे. मात्र, माध्यमांनी याची अधिक दखल घेणे गरजेचे होते असे श्री. चोरमारे यांनी यावेळी सांगितले.

प्रास्ताविकात अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी शासनाने पत्रकारांचे विविध प्रश्न सोडवावे, अशी मागणी केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिताली तापसे यांनी केले तर आभार श्री. यादव यांनी मानले. निवड समिती सदस्य सर्वश्री अभय देशपांडे, मंदार पारकर, खंडूराज गायकवाड, सुरेंद्र गांगण, संजय बापट व भगवान परब यांचा यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पुरस्कार्थींची नावे :

कै. कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार

ज्येष्ठ पत्रकार श्री. पंढरीनाथ सावंत (सन 2023) आणि ज्येष्ठ पत्रकार श्रीमती प्रतिमा जोशी (सन 2024)

राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सन 2023 :

मुद्रित माध्यम – ज्येष्ठ पत्रकार संदिप आचार्य, लोकसत्ता

वृत्तवाहिनी – पत्रकार विनया देशपांडे, सीएनएन आयबीएन

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार वार्ताहर संघ सदस्य – ज्येष्ठ पत्रकार दीपक भातुसे, लोकमत, मुंबई

राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सन 2024 :

मुद्रित माध्यम – ज्येष्ठ पत्रकार प्रगती पाटील, लोकमत, सातारा

वृत्त वाहिनी – मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे

वार्ताहर संघाच्या संदस्यांमधून दिला जाणार पुरस्कार : राजन शेलार, पुढारी, मुंबई

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

शासकीय धोरणांना प्रसारमाध्यमांनी व्यापक प्रसिद्धी द्यावी – संचालक डॉ. गणेश मुळे

चंद्रपूर, दि. 21 : महाराष्ट्र सरकारने राज्याच्या भविष्यातील विकासाचा रोडमॅप तयार केला असून विविध विभागांसाठी पहिल्या 100 दिवसांचा आराखडा तयार केला आहे. तसेच नागरिकांना जलद गतीने आणि वेळेत शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शासकीय विभागांनी सात कलमी कृती कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सुचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारतर्फे राबविण्यात येणारी ही शासकीय ध्येयधोरणे तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रसारमाध्यम हे प्रभावी शस्त्र आहे. त्यामुळे या धोरणांना प्रसारमाध्यमांनी व्यापक प्रसिद्धी द्यावी, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर – अमरावती विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे यांनी केले.

जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. संचालक डॉ. मुळे म्हणाले, राज्य सरकारने अनेक विकासकामे हाती घेतली आहेत. सामान्य लोकांना शासनाच्या सेवा वेळेत आणि तत्परतेने मिळाव्यात, यासाठी देखील पाऊले उचलली आहेत. या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. यासाठी प्रसारमाध्यमांची भुमिका महत्वाची आहे. पहिल्या 100 दिवसांत नागपूर विभागातसुध्दा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आराखडा तयार करण्यात आला आहे. यात विदर्भातील संपूर्ण 11 जिल्ह्यांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशल इंटलिजन्स) वापर करून अधिक जलद गतीने नागरिकांपर्यंत पोहचण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी प्रसारमाध्यमात कार्यरत असणाऱ्या पत्रकारांसाठी आर्टिफिशिअल इंटलिजन्सचे प्रशिक्षणसुद्धा घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, पत्रकार रविंद्र जुनारकर, संजय रामगिरवार, प्रमोद उंदिरवाडे, अरुणकुमार सहाय, हरविंदरसिंग धुन्ना, यशवंत दाचेवार, मुरलीमनोहर व्यास, कल्पना पलीकुंडवार, सुनील तिवारी, अनिल देठे, राजेश सोलापन, डॉ. आरती दाचेवार, वैभव पलीकुंडवार, रवी नागपुरे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा : तत्पूर्वी संचालक डॉ. गणेश मुळे यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांची भेट घेतली. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पहिल्या 100 दिवसांच्या आराखड्याच्या अंमलबजावणीकरीता माहिती व जनसंपर्क महासंचालनालय कटिबध्द असून सर्व जिल्ह्यांची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होईल, याबाबत जिल्हा‍धिकाऱ्यांना अवगत केले.

ताज्या बातम्या

प्रत्येक मंडळात महाराजस्व अभियान राबविणार -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती, दि. २८ : राज्य शासनाने पारदर्शी आणि गतीमान सरकारचे धोरण ठरविले आहे. शासकीय कार्यालयातील कामे सहजपणे आणि विनातक्रार होण्यासाठी यंत्रणा राबविण्यात येत आहे....

नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा गौरव करणार – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
धुळे, दि. २८ (जिमाका):  महसूल विभाग हा शासनाचा चेहरा असून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याची भूमिका राबविण्याबरोबर सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान सुकर होण्यासाठी विविध नाविण्यपूर्ण उपक्रम...

उद्योगांसाठी रावेर येथील २ हजार एकर जमीन उपलब्ध करुन देणार -महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
उद्योगांना सोईसुविधा व सवलती देण्यासाठी शासन कटिबद्ध गुंतवणूक परिषद ठरणार धुळे जिल्ह्यासाठी गेमचेंजर परिषदेमध्ये 8436 कोटींचे गुंतवणूक करार, 11506 रोजगार उपलब्ध होणार रोजगार...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा विशेष सन्मान

0
नांदेड दि. २८ :  महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची दशकपुर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त आज मुंबई येथे अतिथीगृहात आयोजित राज्यस्तरीय सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

परोटी तांडा येथे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन

0
नांदेड दि. २८: राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचा भूमिपूजन समारंभ कार्यक्रम किनवट तालुक्यातील परोटीतांडा येथे उद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),...