सोमवार, एप्रिल 28, 2025
Home Blog Page 244

दीपाली चित्ते यांच्या वारसांना शासन सर्वोतोपरी मदत करणार – मंत्री डॉ. अशोक उईके

  • मृत दिपाली ह्या आदिवासी (पावरा) समुदायाच्या
  • अनुसूचित जमातीच्या कुठल्याही महिलेवर अत्याचार सहन केला जाणार नाही
  • केवळ आरोपीला अवैध व्यवसायासाठी विरोध केला म्हणून झाली हत्या

नंदुरबार, दि. १६ (जिमाका): मलोनी येथे झालेल्या हाणामारीत मृत झालेल्या दिपाली सागर चित्ते या महिलेच्या वारसांना शासनाकडून सर्वोतोपरी मदत केली जाईल. तसेच तिच्या वारसांच्या शिक्षणासह पालन पोषणाची जबाबदारी शासनाच्या आदिवासी विकास विभागाने घेतली असल्याचे आश्वासन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके दिले.

मंत्री डॉ. उईके आज शहादा तालुक्यातील मलोनी/लोणखेडा येथे पंधरा दिवसांपूर्वी हाणामारीत मृत झालेल्या दीपाली सागर चित्ते यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी कुटुंबियांसोबत सहवेदना प्रकट करताना ते बोलत होते. यावेळी आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., नंदुरबारचे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, प्रांताधिकारी सुभाष दळवी, तहसिलदार दीपक गिरासे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी तसेच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

मंत्री डॉ. उईके म्हणाले, चित्ते यांच्या हत्येतील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. तसेच, पीडित कुटुंबाला आदिवासी विकास विभागातून सर्वतोपरी मदत केली जाईल. येथील घटनेप्रमाणे अन्य घटना महाराष्ट्रात पुन्हा घडू नयेत यासाठी दक्षता घेतली जाईल.भविष्यात अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी कठोर पावले उचलली जातील, असेही मंत्री डॉ. उईके म्हणाले.

राज्यातील आदिवासी आश्रमशाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी पुढील सहा महिन्यांत विशेष प्रयत्न केले जातील, असे मंत्री उईके यांनी सांगितले. आमदार व प्रकल्प अधिकाऱ्यांनी आश्रमशाळा दत्तक घेण्याचा उपक्रम राबवला जाईल, ज्यामुळे शाळांची गुणवत्ता सुधारेल आणि विद्यार्थ्यांना उत्तम सुविधा मिळतील.

अवैध व्यवसायासासाठी विरोध केल्यानेच हत्या

मृतक दीपाली चित्ते ह्या अनुसूचित जमातीच्या रणरागिणी होत्या. तिने आरोपीच्या अवैध व्यवसायांना विरोध केल्यामुळे त्या वैमनस्यातून दिपाली चित्ते यांची हत्या करण्यात आली असल्याचे त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधल्यानंतर लक्षात आल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके यांनी यावेळी सांगितले.

०००

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आयोजित होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी, खोखो, कुस्ती, व्हॉलीबॉल या चार स्पर्धांच्या आयोजनासाठी आता एक कोटींचा निधी- उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. १५ : राज्य शासनाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि महाराष्ट्र क्रीडा असोसिएशन यांनी बारामती येथे संयुक्तपणे आयोजित केलेल्या २३ व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचे’ चे उद्घाटन आज सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन समारंभावेळीस्पर्धेत सहभागी खेळाडूमार्गदर्शकप्रशिक्षककबड्डी रसिकांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनीमहाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने आयोजित होणाऱ्या कबड्डीखोखोकुस्ती आणि व्हॉलीबॉल या चार राज्यस्तरीय स्पर्धांसाठी दिले जाणारे ७५ लाख रुपयांचे अनुदान वाढवून ते एक कोटी करण्याची घोषणा केली.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या या घोषणेमुळे देशी खेळांच्या प्रचार-प्रसार आणि खेळाडूंच्या विकासाला अधिक बळ मिळणार आहे. उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या या घोषणेचे क्रीडा जगतातून स्वागत होत आहे.

००००–

 

आध्यात्मिक संस्कृतीचा प्रमुख पाया सेवाभाव हेच प्रमाण मानून शासन कार्यरत- पंतप्रधान नरेंद्र मोदी

रायगड, दि. १५ (जिमाका) :- भारताची आध्यात्मिक संस्कृती अभ्यासकांना समाजाशी जोडते, करुणा वाढवते आणि त्यांना सेवेकडे नेते.  खरी सेवा ही नि:स्वार्थी असते. आपल्या आध्यात्मिक संस्कृतीचा मुख्य पाया सेवाभाव असून आपले सरकार हाच सेवाभाव ठेवून काम करीत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.

भारताच्या सांस्कृतिक वारसाला चालना देण्याच्या वचनबद्धतेनुसार, पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खारघर येथील श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिर या इस्कॉन प्रकल्पाचे लोकार्पण झाले, त्यावेळी ते बोलत होते.  नवी मुंबई मधील खारघर येथील नऊ एकर परिसरात वसलेल्या या प्रकल्पात अनेक देवदेवतांची मंदिरे, वैदिक शिक्षणाचे केंद्र, प्रस्तावित वस्तुसंग्रहालय, सभागृह, आणि उपचार केंद्र यांचा समावेश असून विश्वबंधुत्व, शांतता आणि सौहार्द वाढविणे, हे वैदिक शिक्षण केंद्राचे उद्दिष्ट आहे.

यावेळी व्यासपीठावर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  खासदार हेमा मालिनी, इस्कॉन मंदिर मुख्य चिकित्सक सूरदास प्रभु उपस्थित होते. प्रधानमंत्री श्री.मोदी यांचे स्वागत मुख्य चिकित्सक सूरदास प्रभू आणि खासदार हेमामालिनी यांनी केले.

याप्रसंगी पंतप्रधान श्री.मोदी म्हणाले की, आपला भारत देश  विलक्षण आणि अद्भुत भूमी असलेला आहे. देश केवळ भौगोलिक सीमांनी बांधलेला भूमीचा तुकडा नसून जिवंत संस्कृती आणि जिवंत भूमीचे प्रतीक आहे. आपल्या या संस्कृतीचे सार हे आध्यात्म आहे आणि भारताला समजून घेण्यासाठी आधी आध्यात्म स्वीकारले पाहिजे. जगाकडे केवळ भौतिक दृष्टीकोनातून पाहणारे भारताला विविध भाषा आणि प्रांतांचा संग्रह म्हणून पाहतात. जेव्हा कोणी त्यांचा आत्मा या सांस्कृतिक जाणिवेशी जोडतो तेव्हा त्यांना खऱ्या अर्थाने भारत दिसतो.  संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी गीतेद्वारे भगवान कृष्णाचे गहन ज्ञान उपलब्ध करून दिले.  त्याचप्रमाणे श्रील प्रभुपादांनी इस्कॉनच्या माध्यमातून गीता लोकप्रिय केली, भाष्य प्रकाशित केले आणि लोकांना तिच्या साराशी जोडले.  वेगवेगळ्या ठिकाणी आणि काळात जन्मलेल्या या संतांनी प्रत्येकाने आपापल्या अनोख्या पद्धतीने कृष्णभक्तीचा प्रवाह पुढे नेला आहे. ते पुढे म्हणाले की, त्यांच्या जन्मकाळात, भाषांमध्ये आणि पद्धतींमध्ये फरक असूनही, त्यांची समज, विचार आणि जाणीव एक होती आणि या सर्वांनी भक्तीच्या प्रकाशाने समाजात नवीन चैतन्य, प्रेरणा दिली. नवी दिशा आणि ऊर्जा दिली.

भारताच्या अध्यात्मिक संस्कृतीचा पाया ही सेवा आहे, असे नमूद करून श्री.मोदी यांनी अध्यात्मात देवाची सेवा करणे आणि लोकांची सेवा करणे हे एक होते यावर भर दिला.  भारताची आध्यात्मिक संस्कृती अभ्यासकांना समाजाशी जोडते, करुणा वाढवते आणि त्यांना सेवेकडे नेते.  खरी सेवा ही नि:स्वार्थी असते असा श्रीकृष्णाच्या श्लोकाचा उल्लेख करून पंतप्रधानांनी सर्व धार्मिक ग्रंथ आणि धर्मग्रंथ सेवेच्या भावनेवर आधारित असल्याचे अधोरेखित केले.  इस्कॉन ही एक विशाल संस्था शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरणासाठी योगदान देत सेवेच्या या भावनेने कार्यरत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.  कुंभमेळ्यात इस्कॉन महत्त्वपूर्ण सेवा उपक्रम राबवित असल्याचे त्यांनी नमूद केले.

त्याच सेवेच्या भावनेने सरकार सातत्याने नागरिकांच्या कल्याणासाठी काम करीत असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले.  प्रत्येक घरात शौचालये बांधणे, उज्ज्वला योजनेतून गरीब महिलांना गॅस कनेक्शन देणे, प्रत्येक घरात नळाला पाणी देणे, प्रत्येक गरीब व्यक्तीला ५ लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार देणे, ७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे ही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.  वयानुसार, आणि प्रत्येक बेघर व्यक्तीला पक्की घरे उपलब्ध करून देणे या सर्व कृती या सेवेच्या भावनेने चालतात.  सेवेची ही भावना खरा सामाजिक न्याय मिळवून देते आणि खऱ्या धर्मनिरपेक्षतेचे प्रतिक आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला.

कृष्णा सर्किटच्या माध्यमातून सरकार देशभरातील विविध तीर्थक्षेत्रे आणि धार्मिक स्थळांना जोडत आहे. हे सर्किट गुजरात, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि ओडिशापर्यंत विस्तारलेले आहे. स्वदेश दर्शन आणि प्रसाद योजनेंतर्गत या स्थळांचा विकास करण्यात येत असल्याचे सांगून त्यांनी कृष्णा सर्किटशी जोडलेल्या या श्रद्धा केंद्रांमध्ये भक्तांना आणण्यासाठी इस्कॉन मदत करू शकते, असे त्यांनी सुचविले.  तसेच इस्कॉनला त्यांच्या केंद्रांशी संबंधित सर्व भाविकांना भारतातील अशा किमान पाच ठिकाणी भेट देण्यास प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले.

ज्ञान आणि भक्तीच्या या महान धर्तीवर इस्कॉन मंदिराचे उद्घाटन होत आहे. श्री राधा मदनमोहनजी मंदिर संकुलाची रचना आणि संकल्पना अध्यात्म आणि ज्ञानाच्या संपूर्ण परंपरेचे प्रतिबिंबित करते. मंदिरात दिव्यत्वाची विविध रूपे दिसून येतात, जी ‘एको अहं बहु स्यम’ ही कल्पना व्यक्त करते. नवीन पिढीच्या आवडी आणि आकर्षणांना पूर्ण करण्यासाठी येथे रामायण आणि महाभारतावर आधारित संग्रहालय बांधले जात आहे. त्याचप्रमाणे वृंदावनच्या १२ वनांपासून प्रेरित एक बाग विकसित केली जात आहे. हे मंदिर भारताच्या चेतनेला श्रद्धेसह समृद्ध करणारे एक पवित्र केंद्र बनेल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.  समाज जसजसा अधिक आधुनिक होत जातो तसतसा त्याला अधिक करुणा आणि संवेदनशीलतेची आवश्यकता असते. मानवी गुण आणि आपलेपणाची भावना असलेल्या संवेदनशील व्यक्तींचा समाज निर्माण करण्याची गरज आहे. इस्कॉन, त्यांच्या भक्ती वेदांताद्वारे जागतिक संवेदनशीलतेत नवीन जीवन फुंकू शकते आणि जगभरात मानवी मूल्यांचा विस्तार करू शकते, असे सांगून शेवटी पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला की, इस्कॉनचे सदस्य श्रील प्रभुपाद स्वामींच्या आदर्शांचे पालन करीत राहतील.

पंतप्रधान श्री.मोदी पुढे म्हणाले, गेल्या दशकात देशाने विकास आणि वारसा यामध्ये एकाच वेळी प्रगती पाहिली आहे. इस्कॉनसारख्या संस्थांचे वारशाच्या माध्यमातून विकासाच्या या मोहिमेत महत्त्वपूर्ण योगदान आहे. मंदिरे आणि धार्मिक स्थळे शतकानुशतके सामाजिक जाणीवेचे केंद्र आहेत आणि गुरुकुलांनी शिक्षण आणि कौशल्य विकासाला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. इस्कॉन आपल्या कार्यक्रमांद्वारे तरुणांना अध्यात्माला त्यांच्या जीवनाचा भाग बनवण्यास प्रेरित करते. इस्कॉनचे तरुण अभ्यासक त्यांच्या परंपरांचे पालन करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करतात, त्यांचे माहिती नेटवर्क हे इतरांसाठी एक आदर्श आहे. इस्कॉनच्या मार्गदर्शनाखाली, तरुण सेवा आणि समर्पणाच्या भावनेने राष्ट्रीय हितासाठी काम करतील, असा विश्वास आहे. मंदिर संकुलात स्थापन झालेल्या भक्तीवेदांत आयुर्वेदिक उपचार केंद्र आणि भक्तिवेदांत वैदिक शिक्षण महाविद्यालयाचा समाज आणि संपूर्ण देशाला फायदा होईल, असे सांगून पंतप्रधान श्री.मोदी यांनी ‘हील इन इंडिया’ असे आवाहनही केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इस्कॉन मंदिराचे मुख्य चिकित्सक सूरदास प्रभू यांनी केले. या कार्यक्रमास इस्कॉन मंदिराचे सदस्य, प्रसिद्ध आध्यात्मिक नेते आणि संत आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

 

दूध भेसळ तपासणीत दोषी आढळल्यास कारवाई होणार- अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

मुंबई१५ – :  आरोग्याच्या दृष्टिकोनातून दूध हे शरीरासाठी खूप उपयुक्त असून मोठ्या प्रमाणावर दुधाचा वापर लहान बालकांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत पिण्यासाठी केला जातो. मात्र राज्यात काही ठिकाणी दुधात  भेसळीचे प्रकार होत असल्याचे   निदर्शनास येत आहे.  त्यानुसार अन्न व औषध प्रशासन  विभागाने आज एकाच दिवशी दूध भेसळ तपासणी मोहीम राबविण्यात येऊन १ हजार ६२ दुधाचे सर्वेक्षण नमुने  विश्लेषणासाठी  ताब्यात घेतले. या तपासणी नमुन्यात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्या आहेत अशी माहिती, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.

अन्न व औषध प्रशासन विभाग अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नियम व नियमन २०११ ची अंमलबजावणी करुन राज्यातील नागरिकांना सकस व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध करुन त्यांचे जीवनमान उंचावण्याबाबत विविध उपाययोजना करीत असल्याचे मंत्री श्री. झिरवाळ यांनी सांगितले.

दूध/दुग्धजन्य अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्यांवर जरब बसण्याकरिता व भेसळ रोखण्याकरिता तसेच राज्यातील जनतेस उपलब्ध होणाऱ्या दूध व दुग्धजन्य अन्नपदार्थांची गुणवत्ता तपासण्याच्या अनुषंगाने  आज १५ जानेवारी रोजी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळराज्यमंत्री  योगेश कदम यांच्या  मार्गदर्शनाखाली प्रशासनामार्फत संपूर्ण राज्यात व्यापक स्वरूपात दूध या अन्नपदार्थाची सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेअंतर्गत एकाचवेळी राज्यभरातील विविध ठिकाणांहून दूधाचे सर्वेक्षण नमुने घेऊन त्यांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी १०३ अन्न सुरक्षा अधिकारी यांना सर्वेक्षण नमुने घेण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आज सकाळी ५.०० वाजेपासून राज्यभरातील अन्न सुरक्षा अधिकारी यांनी दूध उत्पादकवितरकविक्रेते व रस्त्यावरील विक्री केंद्रांवरून १ हजार ६२ दुधाचे सर्वेक्षण नमुने विश्लेषणासाठी घेतले.  त्यापैकी राज्यात विक्री होणाऱ्या विविध ब्रान्डच्या दुधाचे ६८० पाउच / पिशवी पॅकिंग मधून व ३८२ सुट्या स्वरूपातील दुधाचे आहेत. ताब्यात घेण्यात आलेले  नमुने अन्न सुरक्षा व मानके प्राधिकृत अन्न प्रयोगशाळेत पाठवून भेसळरसायनांचे प्रमाण व दूधाच्या गुणवत्तेची तपासणी केली जाणार आहे.

या सर्वेक्षण नमुने विश्लेषणांती दुधाच्या नमुन्यामध्ये भेसळ आढळल्यास तात्काळ या आस्थापनेमधून कायदेशीर नमुने घेऊन संबंधित उत्पादक व पुरवठादार यांचेवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अन्न व औषध प्रशासन आयुक्त  राजेश नार्वेकर यांनी  सांगितले की, “दूधातील भेसळ ही गंभीर समस्या आहे. नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम टाळण्यासाठी  दूध भेसळ हा विषय  गांभीर्याने घेतला आहे. भेसळ करणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुषंगाने आज राज्यभरामध्ये दूधाचे सर्वेक्षण नमुने घेण्याची मोहीम राबविण्यात आली आहे. अन्न भेसळ रोखण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा वारंवार घेण्यात येणार आहेत. नागरिकांनी दूध किंवा अन्नपदार्थांमध्ये भेसळ दिसल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या हेल्पलाइन क्रमांक [१८००२२२३६५] वर त्वरित संपर्क साधावा किंवा jc-foodhq@gov.in या ईमेल वर किंवा https://foscos.fssai.gov.in/consumergrievance या पोर्टलवर तक्रार नोंदवावी.” असे आवाहन अन्न व औषध प्रशासन आयुक्त  राजेश नार्वेकर  यांनी केले आहे.

००००

‘युपीएससी’ परीक्षेच्या मुलाखतीसाठी मोफत प्रशिक्षण

मुंबई, दि. १५:‘युपीएससी’ तर्फे घेतल्या गेलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२४ या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ४ फेब्रुवारी २०२५ पासून राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC) मुंबई येथे मुलाखत प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आल्याची माहिती, राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या संचालक डॉ.भावना पाटोळे यांनी दिली.

या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी राज्यातील विद्यार्थ्यांनी दि. ३० जानेवारी २०२५ पूर्वी siac@1915@gmail.com या ई-मेलवर अर्ज करावेत. मुलाखत प्रशिक्षण नोंदणीसाठी www.siac.org.in या संकेतस्थळावरील सूचनांचे अवलोकन करावे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२२-२२०७०९४२ येथे संपर्क साधावा असे संचालक, राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई यांनी कळविले आहे.

0000

 

महाराष्ट्रातील १३२ शासकीय औद्योगिक संस्थांना नवी ओळख नामकरणास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय जाहीर

मुंबई, दि. १५ : महाराष्ट्रातील १३२ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण यशस्वीपणे करण्यात आले आहे. प्रथम १४ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाद्वारे घेण्यात आला होता. महाराष्ट्रातील फक्त २ औद्योगिक संस्था सोडल्या तर इतर औद्योगिक संस्थांना या आधी कोणत्याही प्रकारची नावे नव्हती. त्यानंतर कौशल्य विकास विभागाद्वारे महाराष्ट्रातील शासकीय औद्योगिक संस्थांसाठी नागरिकांकडून नावांबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे राज्यातील १३२ आयटीआयचे नामकरण करण्याचा निर्णय आज जाहीर करण्यात आला. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही माहिती दिली.

त्यानुसार अकोला, अमरावती, कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, छत्र

पती संभाजीनगर, जळगाव, जालना, धाराशिव, धुळे, नंदुरबार, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, बीड, बुलढाणा, भंडारा, मुंबई उपनगर, यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली, सातारा, सोलापूर आणि हिंगोली जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक संस्थांना नवीन ओळख मिळाली. याबाबतचा सविस्तर निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर आजच प्रसिद्ध करण्यात आला आहे.

0000

राज्य कामगार विमा सोसायटीच्या रुग्णालयांमधून दर्जेदार आरोग्य सुविधा द्याव्यात- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, दि. १५ : राज्य कामगार विमा सोसायटी कामगारांसाठी आपल्या १२ रुग्णालयांच्या माध्यमातून आरोग्य सुविधा देत असते. राज्यात विमाधारक कामगारांची ४८ लाख ७० हजार ४६० कुटुंब आहेत. लाभार्थी संख्या जवळपास दोन कोटी पर्यंत आहे. विमा सोसायटीने विमाधारक कामगारांसाठी या रुग्णालयांमधून दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज दिले.

राज्य कामगार विमा सोसायटीने मिळणाऱ्या निधीचा रुग्ण सेवेसाठी पुरेपूर उपयोग करावा. या निधीतून आरोग्य व्यवस्था बळकट करावी.  तसेच संलग्न केलेल्या २५३ रुग्णालयांमधील उपचारांची कामगारांना माहिती होण्यासाठी जनजागृती करावी. रिक्त जागा भरण्यासाठी आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी,  अशा सूचनाही मंत्री श्री. आबिटकर यांनी दिल्या.

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीचा आढावा मंत्री श्री. आबिटकर यांनी आरोग्य भवन येथे आयोजित बैठकीत घेतला. बैठकीस आरोग्य सेवा आयुक्त अमगोतू श्री रंगा नायक, राज्य कामगार विमा सोसायटीचे संचालक (वैद्यकीय) शशी कोळनुरकर, सहसचिव श्री. लहाने, सहसंचालक तुलसीदास सोळंके उपस्थित होते.

आरोग्य मंत्री म्हणाले, राज्य कामगार विमा सोसायटीच्या शिखर समितीची बैठक तातडीने घेण्यात यावी. सोसायटीच्या नव्याने मंजूर १८ रुग्णालयांसाठी भूसंपादन पूर्ण करावे. राज्य कामगार विमा सोसायटीने मागील तीन वर्षातील कार्य अहवाल सादर करावा. सद्यस्थितीत असलेल्या कामगार रुग्णालयांची डागडुजी करून त्यांचा मेक ओव्हर करावा. सोसायटीच्या रुग्णालयांची जागा अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी आहे, अशा ठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध केल्यास कामगारांना महागड्या खाजगी रुग्णालयांमधून उपचार घ्यावे लागणार नाही. दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या कामगारांसाठी ही रुग्णालये संजीवनी आहेत. सोसायटीच्या कामकाजाचा  दरमहा आढावा घेण्यात यावा. या सोसायटीच्या रुग्णालयांमधून गतिमान वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचनाही मंत्री श्री. आबिटकर यांनी दिल्या.

सोसायटीचे संचालक श्री. कोळनुरकर यांनी यावेळी सादरीकरण केले. बैठकीला संबंधित अधिकारी उपस्थित होते.

००००

धरणातील पाण्याचा पूर्ण क्षमतेने सिंचनासाठी वापर करावा- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

मुंबई, दि. १५ :- धरणातील पाण्याचे नियोजन आणि व्यवस्थापन करावे. धरणाची साठवण क्षमता, सध्याची पाणी पातळी याचा नियमित आढावा घ्यावा. पाण्याची उपलब्धता, शेतकऱ्यांची मागणी आणि पिकांच्या प्रकारानुसार विभागणी करून धरणातील पाण्याचा सिंचनासाठी पूर्ण क्षमतेने  वापर करावा अशा सूचना जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या.

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची बैठक मंत्री श्री. महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात झाली. बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, लाभक्षेत्र विकास सचिव संजय बेलसरे, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरचे संचालक रा.श्री.सोनटक्के, मुख्य अभियंता अभय पाठक  यांच्यासह वित्त व नियोजन विभागाचे आणि  विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. महाजन म्हणाले, पाटबंधारे प्रकल्पाची कामे नियोजनबध्द व गतीने पूर्ण करावीत. सिंचन क्षेत्र वाढून शेतकऱ्यांना सिंचनाच्या पाण्यासाठी अडथळा येऊ नये असे नियोजन जलसंपदा विभागाने करणे आवश्यक आहे. मोठ्या प्रकल्पांच्या सुधारित मान्यतेचे प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणावेत अशा सूचना त्यांनी दिल्या. त्यानुसार पूर्व विदर्भातील गोदावरी खोऱ्यातील वैनगंगा नदीवर बांधकामाधिन व केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत (PMKSY) अर्थ सहाय्यीत  महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पास चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता देणे, बुलढाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ बुलढाणा अंतर्गत पाणी वापर संस्थेच्या बळकटीकरण अंतर्गत बैठका व प्रशिक्षणाकरिता सहभागृहाचे बांधकाम तसेच लघु पाटबंधारे विभाग बुलढाणा अंतर्गत कार्यालयीन इमारतीच्या दुरुस्ती व विस्तार कामाचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्यासाठी नियामक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासह विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाकडील अन्य १३ कामांना नियामक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाकडील सर्वच पदांचा आकृतीबंध त्वरित तयार करण्यात  येऊन रिक्त पदांचा अनुशेष भरण्याबाबतची कार्यवाही करावी, अशा सूचना मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

००००

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुंबई येथून प्रयाण

मुंबई, दि. १५ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई  येथून संध्याकाळी प्रयाण झाले.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, पणन, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, आमदार रवींद्र चव्हाण यांनी निरोप दिला. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर पाटणकर, अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सक्सेना तसेच पोलिस व राजशिष्टाचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई दि. १५ : राज्य शासनाच्या क्रीडा विभागाद्वारे राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटुंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा “शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार” प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारासाठी सन २०२३-२०२४ करिता अर्ज करण्याचे आवाहन क्रीडा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

अर्ज सादर करण्या-या इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडू यांनी विहित मुदतीत क्रीडा विभागाच्या http://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर स्क्रोलिंग लिंक (Scrolling Link) मध्ये उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर दि. १४ ते २६ जानेवारी, २०२५ या कालावधीत व दि. २६ जानेवारी, २०२५ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्यात यावेत.

क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा महर्षीकरिता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांकरिता उत्कृष्ठ क्रीडा मार्गदर्शक / जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारीत नियमावली २०२३ विहित केली आहे. या नियमावलीनुसार सन २०२३-२४ या वर्षाच्या पुरस्कारासाठी राज्यातील क्रीडा मार्गदर्शक, खेळाडु, दिव्यांग खेळाडू व साहसी उपक्रमात सहभागी झालेले खेळाडू / व्यक्ती यांच्याद्वारा दि. १५ जानेवारी ते २६ जानेवारी, २०२५ ह्या कालावधीमध्ये ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे मुंबई उपनगरचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.

००००

ताज्या बातम्या

दशकपूर्ती महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची!

0
राज्यातील नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध पद्धतीने लोकसेवा देता याव्या यासाठी शासनाने 'महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015' लागू केला आहे. यामुळे शासकीय आणि निमशासकीय...

देशाची आरोग्य व्यवस्था जगात सर्वात सक्षम आणि मोठी – केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा

0
छत्रपती संभाजीनगर, दि. २७ (जिमाका): जगात आपल्या देशाची आरोग्य व्यवस्था सर्वात मोठी असून या आरोग्यव्यवस्थेने प्रगती केली आहे. लसीकरण, महिलांचे आरोग्य, बाल आरोग्य तसेच...

सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

0
अमरावती, दि. २६: विधान परिषदेचे सभापती पद हे संविधानिक पद आहे. या पदाला समन्वय साधण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे या समन्वयातूनच येत्या काळात सर्व घटकांना...

महाहौसिंगने परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीचा वेग वाढवावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
मुंबई दि. २७: महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ म्हणजेच महाहौसिंगने प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या बांधकामांना गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. त्यांना येणाऱ्या अडचणींवर शासनाच्या स्तरावरून...

पनवेल महानगरपालिकेच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्रातून गुणवत्ताधारक खेळाडू घडतील – मंत्री ॲड. आशिष शेलार

0
मुंबई, दि. २७ : पनवेल महापालिकेने उभारलेल्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राची व्यवस्था उत्तम आहे. या प्रशिक्षण केंद्रासाठी महापालिकेने दिलीप वेंगसरकर यांची अगदी अचूक निवड केली...