रविवार, एप्रिल 27, 2025
Home Blog Page 245

महिला व बालविकास विभागातील योजना, उपक्रमांना गती द्यावी – मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. 14 : महिला व बालविकास विभागातर्फे महिला आणि बालकांच्या विकासासाठी विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. या योजना व उपक्रमांना गती द्यावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विभागाच्या आढावा बैठकीत दिले. यावेळी विभागाचे सचिव अनुपकुमार यादव उपस्थित होते.

यावेळी मंत्री कु. तटकरे यांनी राज्यातील महिला व बालकांच्या विकासासाठी राबविण्यात येणारा ‘सक्षम अंगणवाडी आणि पोषण’ उपक्रम, ‘ मिशन वात्सल्य ‘, ‘ मातृवंदना योजना ‘, ‘वन स्टॉप सेंटर (सखी)’ या योजना आणि उपक्रमांवर खर्च करण्यात येणाऱ्या निधी आणि विना खर्चित निधी याबाबत माहिती घेतली.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

वन्य प्राण्यांचे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना – वनमंत्री गणेश नाईक

मुंबई, दि. 14 :- वन्य प्राणी त्यांचा अधिवास सोडून मानवी वस्तीत येऊ नयेत यासाठी उपाययोजना करण्यात येत असून ब्रिटिश कालखंडात केलेल्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. वन्य प्राणी हे खाद्यासाठी मानवी वस्तीत प्रवेश करत असल्याने त्यांच्या अधिवासातच खाद्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे. यामुळे वन्य प्राण्यांचे मनुष्यावर हल्ले होणार नाही, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी मंत्रालयातील पत्रकार परिषदेत दिली.

वाघ तसेच बिबट्यांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी वनमंत्री श्री.नाईक यांनी आज पत्रकार परिषद घेतली. जंगलांच्या कोर क्षेत्रात विविध प्रकारची फळ झाडे लावल्यास शाकाहारी प्राण्यांना त्या ठिकाणी खाद्य उपलब्ध होऊन मांसाहारी प्राण्यांची देखील खाद्याची सोय होईल, असे मंत्री श्री. नाईक यांनी सांगितले.

नागपूर येथील गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात 20 डिसेंबर तसेच 23 डिसेंबर 2024 रोजी 3 वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू हा कोंबडीचे मांस खायला दिल्यामुळे झाले असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कोंबडीच्या मांसामध्ये बुरशीजन्य विषाणूचा प्रादुर्भाव असल्याचे आढळून आले आहे. याबाबतचा वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. कर्तव्यात कसूर करणाऱ्या वन अधिकाऱ्यांना आवश्यकतेनुसार निलंबीत किंवा बडतर्फ करण्यात येईल, असे मंत्री श्री.नाईक यांनी सांगितले.

मंत्री श्री.नाईक म्हणाले की, ब्रम्हपुरी वन विभागाच्या शिंदेवाडी वनपरिक्षेत्रात 2 जानेवारी 2025 रोजी एका वाघाचा नैसर्गिक मृत्यू झाला असून या वाघाच्या शरिराचे सर्व अवयव सुस्थितीत होते. पांढरकवडा वन विभागाच्या वणी वनपरिक्षेत्रात दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी एका वाघाचा शिकारीमुळे मृत्यू झाला. या वाघाचे शरीर पूर्णत: कुजलेले असल्याने त्याच्या मृत्यूचे कारण समजले नाही. तथापि, वाघाच्या शरीरातील दात तसेच नखे गायब झाल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व प्रकरणावर वन विभाग नजर ठेऊन तपास करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

जंगलामध्ये लागणारी आग विझविण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या विषयासंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावर कशा प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत त्यांचा अभ्यासही करण्याच्या सूचना दिल्याचे मंत्री श्री.नाईक यांनी सांगितले.

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात झालेल्या मनुष्यहानीसंदर्भात आवश्यक त्या उपाययोजना करण्याबरोबरच योग्य ती नुकसान भरपाई देण्याचा शासन विचार करत आहे. तथापि, बफरझोनमध्ये कोणत्याही व्यक्तीने जाऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे, वनसफारी करतांना काही पर्यटक वन्य प्राण्यांची वाट रोखून त्यांना पाहत असल्याने दिसून आले. यावरही वन अधिकाऱ्यांना लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आल्याचे वनमंत्री श्री.नाईक यांनी यावेळी सांगितले.

000

संजय ओरके/विसंअ/

पानिपत शौर्य स्मारकाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणार

पुतळा उभारणीसाठी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल समन्वयक

नवी दिल्ली, दि. 14 : मराठ्यांनी राष्ट्र संरक्षणार्थ पानिपतच्या युद्धात जीवाची बाजी लावून लढा दिला. या युद्धाच्या शौर्य स्मारकासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पानिपत येथे दिली.

पानिपत युद्धाला २६४ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने येथील कालाआम परिसरात आज मराठा शौर्य दिनाचे आयोजन करण्यात आले होते. मराठा वीर योद्ध्यांना अभिवादन करण्यासाठी गत १९ वर्षांपासून पानिपत शौर्य समितीच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

याप्रसंगी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय क्रीडा तथा युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे राजशिष्टाचार तथा पणन मंत्री जयकुमार रावल, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, खासदार राजाभाऊ वाझे आणि हरियाणा शासनाचे अधिकारी, स्थानिक नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, या युद्ध मोहिमेतून त्याकाळी बरेच काही शिकता आले.  छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला जाती पातीपलीकडे देशासाठी लढण्याची दिलेली शिकवण मावळ्यांनी पाळली आणि म्हणून दिल्लीचे तख्त मराठ्यांनी एकेकाळी राखले. ही एकीची  शिकवण कायम ठेवून विकसित महाराष्ट्र आणि भारत घडवूया ,असेही ते म्हणाले.

या स्मारकासाठी अधिकची जमीन आवश्यक असल्याने त्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे नमूद करुन या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळाही राज्य शासनातर्फे उभारला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केली. यासाठी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल समन्वयक म्हणून काम पाहतील, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पानिपत शौर्य समितीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी केले. यावेळी. समितीच्यावतीने अमरावतीचे नितीन धांडे यांना शौर्यस्मारक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सशक्त भारत परिवार, मराठा सेवा संघ, हरियाणा समस्त धानक मराठा समाज, धनुष्यधारी धानक समाज, मराठा उत्थान समिती, मुदगल चेतना परिवार चेरिटेबल ट्रस्ट छत्रपती शिवाजी महाराज वेलफेयर संघ, पानिपत सार्वजानिक मराठा गणेश मंडळ, यांनी प्रयत्न केले.

कार्यक्रमाची क्षणचित्रे

  • कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्य गीताने झाली.
  • शिंदेशाही पगडी, शौर्य स्मारकाची प्रतिमा आणि शाल देऊन मुख्यमंत्री यांचे स्वागत.
  • विविध राज्यातून तसेच महाराष्ट्रातील विविध पथकाकडून, मर्दानी खेळांचे प्रदर्शन
  • महाराष्ट्र, दिल्ली, आणि पानिपत येथून मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित. खासकरून ऑस्ट्रेलियातूनही काही नागरिक आवर्जून उपस्थित.

000

अंजु निमसरकर/ मपकेनदि/ १४.०१.२०२५

‘टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन’ म्हणजे सलोखा, एकता, संस्कृती आणि विविधतेचा उत्सव – क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. १४ : टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा म्हणजे सलोखा, एकता, संस्कृती आणि विविधतेचा उत्सव आहे. आपण सर्वजण मिळून १९ जानेवारी रोजी ही मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करुया, असे आवाहन क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथील व्हिविंग गॅलरी येथे टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेच्या  रिंगिंग बेल कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री आणि आमदार छगन भुजबळ, क्रीडा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनिल डिग्गीकर यांच्यासह या स्पर्धेचे आयोजक विवेक सिंग, उज्ज्वल माथूर, टी नारायण, प्रायोजकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री श्री. भरणे म्हणाले, ही स्पर्धा होण्यासाठी रिगिंग बेल वाजल्यापासून ४ दिवस १० तास ५० मिनिटे राहीले आहे. म्हणजे काऊंट डाऊन सुरू झाले आहे. जगातील प्रमुख दहा आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धापैकी टाटा मुंबई मॅरेथॉन ही एक प्रमुख स्पर्धा आहे. देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वाधिक बक्षीस रक्कम असणारी आणि सर्वाधिक स्पर्धक असणारी ही मॅरेथॉन स्पर्धा असून या स्पेर्धेचा नावलौकीक आहे.

टाटा मुंबई मॅरेथॉन ही मुंबई आणि महाराष्ट्राचा अभिमान आहे आणि देश विदेशातून ६०,००० हून अधिक धावपटूंचा सहभाग हे प्रेरणादायी आहे. टाटा, आयडीएफसी फर्स्ट बैंक, आणि टीसीएस यांसारख्या प्रायोजकांच्या समर्पण, दृढनिश्चय, आणि उत्साहाने भारताला धावण्याच्या जागतिक नकाशावर स्थान दिले आहे. ब्रिटनचे मो फराह, सर्वात यशस्वी ट्रॅक अॅथलीट्सपैकी एक, यंदा आंतरराष्ट्रीय इव्हेंट अॅम्बेसेडर आहेत, त्यांची उपस्थिती हा नामवंत धावपटू आणि हौशी धावपटूंना प्रेरणा देणारा ठरेल असे मंत्री श्री. भरणे सांगितले.

यावेळी माजी मंत्री आणि आमदार श्री. भुजबळ यांनी मनोगत व्यक्त केले.

जगभरामध्ये बेल वाजवून कोणत्याही चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात करण्याची पद्धत आहे. टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या ऐतिहासिक पर्वाच्या उत्सवाला आज प्रारंभ झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.

००००

राजू धोत्रे/विसंअ/

महापारेषणच्या राज्य भार प्रेषण केंद्राला सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल दोन राष्ट्रीय पुरस्कार

मुंबई, दि. 14 : विजेच्या उपलब्धतेनुसार पुरवठा व त्याचे नियंत्रण करण्यासाठी नावीन्यपूर्ण योजनांची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल महापारेषणच्या महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्र, ऐरोलीला देशातील सर्वोत्कृष्ट भार प्रेषण केंद्र व ओपन ऍक्सेस (एसएलडीसी) या दोन राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्काराबद्दल महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांनी अभिनंदन केले आहे.

इंडिपेंडेन्ट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (आयपीपीएआय) या राष्ट्रीय संस्थेने बेळगावमध्ये हा पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. देशभरातील विद्युत कंपन्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून हे पुरस्कार दिले.

याप्रसंगी केंद्रीय विद्युत प्राधिकरणचे अध्यक्ष घनश्याम प्रसाद, महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाचे माजी अध्यक्ष व्ही. राजा, केंद्रीय विद्युत प्राधिकरणचे माजी अध्यक्ष राकेशनाथ, ग्रीड इंडियाचे माजी व्यवस्थापकीय संचालक एस के. सोनी यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण झाले. या वेळी महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्र, ऐरोलीचे अधीक्षक अभियंता मिलिंद देवळे, उमेश भगत, उपमहाव्यवस्थापक नितीन पौनीकर, सहाय्यक महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) आनंद दळवी, कार्यकारी अभियंता दिनेश पाटील, व्यवस्थापक (मानव संसाधन) योगेश अघोर, सहाय्यक अभियंता विजय कांबळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

या पुरस्कारासाठी महाराष्ट्र राज्य भार प्रेषण केंद्राचे कार्यकारी संचालक शशांक जेवळीकर, मुख्य अभियंता गिरीश पंतोजी यांचे मार्गदर्शन लाभले.

००००

संजय ओरके/विसंअ/

आनंदवन येथील संस्थेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ३ कोटी ८ लाखांचा निधी

मुंबई, दि. 14 :- चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा येथील आनंदवन महारोगी सेवा समिती संस्थेला कुष्ठरुग्णांचे उपचार आणि पुनर्वसनासाठी 1 कोटी 86 लाख रुपये तर, आनंद अंध, मुकबधीर आणि संधीनिकेतन दिव्यांग कार्यशाळेसाठी  1 कोटी 22 लाख रुपये असे एकूण 3 कोटी 8 लाख रुपयांचा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिले असून उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर निधी वितरीत करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने दखल घेऊन केलेल्या या कार्यवाहीमुळे थोर समाजसेवक दिवंगत बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनी 75 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीसमोरील आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.

बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनी कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी 75 वर्षांपूर्वी 1949 मध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील आनंदवन येथे महारोगी सेवा समितीची स्थापना केली आहे. संस्थेचं यंदा अमृतमहोत्सवी वर्ष असून संस्था आर्थिक अडचणीत असल्याची बाब संस्थेचे सचिव डॉ. विकास आमटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लक्षात आणून दिली. डॉ. विकास आमटे यांच्या मागणीची तातडीने दखल घेत  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संस्थेस 3 कोटी 8 लाख रुपयांचा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यानुसार तातडीने कार्यवाही करीत हा निधी संस्थेस वितरीत करण्यात आला.

थोर समाजसेवक बाबा आमटे आणि  साधनाताई यांनी स्थापन केलेली ही संस्था गेली 75 वर्षे सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून कुष्ठरुग्णांचे उपचार, पुनर्वसनाच्या माध्यमातून त्यांची सेवा करत आहे. संस्थेतर्फे ग्रामीण भागांतील प्रकल्पांत पुनर्वसित दीड हजार कुष्ठरोग मुक्त दिव्यांग-निराधार ,वृद्ध, अनाथ, परित्यक्ता, मानसिकदृष्ट्या अपंग बांधवांची आणि त्यांच्या मुलांची काळजी घेतली जाते. विशेष शाळा आणि व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रात निवासी तीनशे दिव्यांग विद्यार्थी-प्रशिक्षणार्थींना शिक्षण-प्रशिक्षण दिले जाते.  आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अनिवासी विज्ञान, कला, वाणिज्य शाखेच्या साडेतीन हजार  विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या शिक्षणाची सोयही संस्थेमार्फत केली जात आहे. संस्थेच्या या सामाजिक बांधलकी आणि सेवाकार्याची दखल घेत उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी राज्य शासनाकडून देय  3 कोटी 8 लाख रुपयांचा निधी संस्थेस तत्काळ वितरीत केला आहे.

महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या ‘नाताळ भव्यतम सोडती’चा निकाल जाहीर

मुंबई, दि. १४ : महाराष्ट्र राज्य लॉटरी, महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र नाताळ भव्यतम सोडत दि. ३ जानेवारी २०२५ रोजी उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी यांचे कार्यालय सभागृह या ठिकाणी काढण्यात आली. पहिले सामायिक २५ लाख रुपयांचे एक बक्षीस चिराग एन्टरप्रायजेस, नाशिक येथील खरेदीदारास लागले असल्याचे उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी यांनी कळविले आहे.

या सोडतीमधून जनतेच्या सर्वांगीण आर्थिक विकासासाठी या ब्रीद वाक्याचा पुरेपूर अवलंब करण्यात आला. रक्कम १० हजारच्या आतील रकमेची ७० बक्षिसे व रु. १० हजार वरील रकमेची २ हजार ५८२ बक्षिसे लागली आहेत. एकूण सर्व बक्षिसांची रक्कम ४९ लाख ४ हजार इतकी होती.

सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या संकेतस्थळावर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम 10 हजार रुपयांवरील बक्षिसाची मागणी उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी कार्यालयाकडे सादर करावी. रक्कम रू. 10 हजार रुपयांच्या आतील बक्षीस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी, असे उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

0000

वंदना थोरात/विसंअ/

‘समग्र शिक्षा अभियाना’चे सूक्ष्म नियोजन करावे – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. 14 :- समग्र शिक्षा अभियानातील सर्वच उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात यावेत. या अभियानात राज्याची उल्लेखनीय कामगिरी व्हावी, या दृष्टीने विभागाने सूक्ष्म नियोजन करावे. या अभियानाच्या माध्यमातून शालेय शिक्षण सुधारणा, तंत्रशिक्षणाचा प्रसार, डिजिटल शिक्षणाचे आयोजन, शिक्षकांसाठीच्या कार्यशाळा आणि प्रशिक्षण प्रभावीपणे राबवावेत, अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या.

मंत्री श्री. भुसे यांनी मंत्रालयात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेकडील कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला, राज्य प्रकल्प समन्वयक गोविंद कांबळे, उपसंचालक (वित्त) शार्दुल पाटील, उपसंचालक (प्रशासन) संजय डोर्लीकर, मुख्य अभियंता (प्रकल्प) हेमंतकुमार सावंत आदी उपस्थित होते.

शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणाले की, शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता वाढीसाठी समग्र शिक्षा अभियानातील उपक्रम, योजनांचा लाभ प्रत्येक शाळा आणि विद्यार्थ्याला झाला पाहिजे. शाळांच्या विकासासाठी आवश्यक प्रयत्न केले जावेत. समाजातील प्रेरणादायी व्यक्तींचे संदेश ध्वनी रेकॉर्डद्वारे किंवा व्हिडीओ स्वरूपात मुलांना ऐकवावेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता आणि आत्मविश्वास वाढेल.

शिक्षण क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करावा. यातून त्यांच्या कामाला नवी ऊर्जा मिळेल. या बरोबरच काही संस्थाही उल्लेखनीय काम करीत आहेत. त्यांच्या चांगल्या कामाची दखल शिक्षण विभागाने घेऊन त्यांचाही गौरव करावा. शिक्षण क्षेत्रात वेगळे काम करणाऱ्यांची स्वतंत्र यादी तयार करावी, अशा सूचना मंत्री श्री. भुसे यांनी  दिल्या.

मंत्री श्री. भुसे म्हणाले की, शाळेत आवश्यक भौतिक सुविधा निर्माण करण्यात याव्यात. यामध्ये शुद्ध पाणी, शौचालये, लाइटिंग, संगणक, ग्रंथालय आदी बाबींचा समावेश असावा. प्रत्येक शाळेत खेळ व क्रीडासाहित्य उपलब्ध करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना द्यावी. इमारत दुरुस्ती, कंपाउंड वॉल  यासारख्या कामांचे वर्गीकरण करावे. कंपाउंड वॉलचे काम एमआरईजीएस मधून घेण्याबाबतही व शाळा दुरुस्तीची काही कामे सामजिक उत्तरदायित्व निधीतून करण्यासाठी त्यांनी सूचना केल्या.

शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी बैठकीतून बोर्डी ता. अकोला शाळेतील मुख्याध्यापक उमेश चोरे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून लर्निंग साहित्य वापराबाबत माहिती जाणून घेतली. शिक्षण विभागामार्फत पाठविण्यात आलेल्या साहित्याचा मुलांना शिकवताना चांगला उपयोग होत असल्याचे उमेश चोरे यांनी यावेळी सांगितले. सर्व शिक्षक ज्ञानदानाचे पवित्र काम करत आहात. शिक्षण विभाग शिक्षकांच्या सर्व अडचणी सोडवण्यास प्राधान्य देत आहे, असे मंत्री श्री. भुसे यांनी या संवादावेळी सांगितले.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ गरजूंपर्यंत प्रभावीपणे पोहोचवा – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

छत्रपती संभाजीनगर, दि.१४ (जिमाका)-केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ प्रशासनाने गरजूंपर्यंत प्रभावीपणे पोहोचवावा, असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहामध्ये सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या  विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र कुलगुरू विजय सरवदे, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक ग्रामीण डॉ. विनयकुमार राठोड, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण प्रदीप भोगले, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश केदार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

केंद्रशासनातर्फे पंतप्रधान आवास योजना, उज्वला गॅस योजना, जनधन योजना, दिव्यांगांसाठी सहाय्य, आंतरजातीय विवाहासाठी प्रोत्साहनपर अनुदान योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री, सामाजिक न्याय विभागामार्फत राबविल्या जातात. या योजना राबवत असताना जिल्हा प्रशासनातील प्रत्येक विभागाने जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे.  सर्वसामान्यांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी  शासन त्यांच्या  पाठीशी असून तसा विश्वास अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेने त्यांना  द्यावा, असे मंत्री आठवले यांनी सांगितले.

बैठकीत माहिती देण्यात आली की, ग्रामीण भागात रमाई आवास योजना व पंतप्रधान आवास योजना अंतर्गत जिल्ह्याला दिलेल्या उद्दिष्टापैकी ८० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे यांनी बैठकीत दिली.  महानगरपालिका क्षेत्रामध्ये ६ हजार १३६ घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण केले असून अजून ३० हजार घरकुलांची आवश्यकता असल्याचे मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी सांगितले.

जिल्ह्यात उज्वला गॅस योजनेअंतर्गत १ लाख ७० हजार १५ लाभार्थी असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी सांगितले. तर जनधन योजनेअंतर्गत १५लाख ३८ हजार लाभार्थ्यांनी बॅंक खाते उघडले आहे. तसेच मुद्रा योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना रोजगारासाठी सहाय्य  उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक मंगेश केदार यांनी सांगितले.

मंत्री आठवले यांनी यावेळी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाअंतर्गत दिव्यांगांच्या आणि ज्येष्ठांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना तसेच वयोश्री आणि तीर्थ दर्शन योजनेची अंमलबजावणी, पोलीस प्रशासनामार्फत अनुसूचित जातींच्या संदर्भात झालेल्या गुन्हे व त्याचे तपासकार्य याबाबतची माहिती  या बैठकीमध्ये सादर करण्यात आली.  आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना वेळेवर अनुदानाचा लाभ देण्याचे निर्देश यावेळी मंत्री आठवले यांनी दिले.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात मृदा शास्त्रज्ञ डॉ. संग्राम काळे यांची १५, १६, १७ आणि १८ जानेवारीला मुलाखत

मुंबई, दि. 14 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘मृदेचे जतन आणि संवर्धन’ या विषयावर सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील कृषी संशोधन केंद्राचे मृदा शास्त्रज्ञ डॉ. संग्राम काळे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

जमीन हा मर्यादित स्वरुपाचा नैसर्गिक स्त्रोत असून जमिनीचे आरोग्य सुस्थितीत ठेवणे ही काळाची गरज आहे. मातीच्या आरोग्याचा दर्जा, मातीच्या संरक्षणासाठी उपयुक्त असणारी सेंद्रिय शेती, एकात्मिक शेती, संवर्धित शेती, माती परीक्षण, आधुनिक शेतीचा मातीच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम, मातीतील सेंद्रिय घटकांचे महत्त्व आणि ते टिकवण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने मातीची धूप, काँक्रीटीकरण, मृदा संवर्धनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन, मृदेचं आरोग्य टिकविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची भूमिका, मातीतल्या सूक्ष्मजीवांची भूमिका, हवामान बदलाचा मृदा गुणवत्तेवर होणारा परिणाम, खतांचे व्यवस्थापन अशा महत्त्वपूर्ण विषयांवर मृदा शास्त्रज्ञ डॉ. काळे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत बुधवार दि. 15, गुरूवार दि. 16, शुक्रवार दि. 17 आणि शनिवार दि.18 जानेवारी 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. कोल्हापूरच्या माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

0000

जयश्री कोल्हे/ससं/

ताज्या बातम्या

गुणात्मक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन मॉडेल तयार करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम किरणोपचार प्रणालीचे लोकार्पण छत्रपती संभाजीनगर, दि.२७ (विमाका): सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या समन्वयातून आरोग्य सेवेतील त्रिस्तरीय यंत्रणा पुढील...

शासकीय कर्करोग रुग्णालयात ट्रू बीम लिनियर ॲक्सलरेटर प्रणालीचे लोकार्पण

0
छत्रपती संभाजीनगर, दि.२७: छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम युनिट या कर्करोगावरील अतिविशेष उपचार देणाऱ्या अत्याधुनिक यंत्र प्रणालीचे व कर्करोग संस्थेच्या इमारतीच्या विस्तारीत...

शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. २७: आज महाराष्ट्राची ५० टक्के लोकसंख्या ५०० शहरात आणि उर्वरित लोकसंख्या ४० हजार गावात राहते आहे. शहरांचा चेहरा आपण बदलू शकल्यास ५०...

पारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवेसाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम

0
राज्यातील नागरिकांना दिल्या जाणा-या सेवा पारदर्शक, गतिमान व कालबध्द पध्दतीने देण्याकरीता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ पारित करण्यात आला आहे.  हा अधिनियम २८ एप्रिल,...

महाराष्ट्रातील जनतेचा तसेच प्रशासनाचा ‘सेवा हक्क दिन’

0
महाराष्ट्र शासनाने दिनांक १ एप्रिल २०२५ रोजी '२८ एप्रिल' हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या जनतेसाठी तसेच सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे....