रविवार, एप्रिल 27, 2025
Home Blog Page 246

‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १६ जानेवारीला उद्घाटन – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती

मुंबई, दि. 14 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने एम्पॉवरींग इनोव्हेशन, एलिव्हेटिंग महाराष्ट्र (Empowering Innovation, Elevating Maharashtra) या संकल्पनेवर आधारित ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये १६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे. महाराष्ट्रासह देशभरातील तंत्रज्ञान, कृषी, सेवा क्षेत्र, औषधनिर्माण तसेच पर्यटन अशा विविध क्षेत्रांतील १००० स्टार्टअप या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमास मेरीको लिमिटेडचे अध्यक्ष हर्ष मारीवाला, अपग्रेड अँड स्वदेस फाउंडेशनचे सह संस्थापक रॉनी स्क्रूवाला, नायकाच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी फाल्गुनी नायर, व्हेंचर कॅपिटल अँड स्टार्ट अप्स गुगलचे जागतिक प्रमुख अपूर्वा चमरिया, स्थानिक सरकार आणि शिक्षण AWS चे राज्य प्रमुख अजय कौल, ईव्ही कॅप वेंचर्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय पार्टनर विक्रम गुप्ता, अवेंडसचे सह-संस्थापक आणि कार्यकारी उपाध्यक्ष राणू वोहरा, इनक्युबेशन MGB इनोव्हेशन फाउंडेशन पार्टनर अध्यक्ष JITO जिनेंद्र भंडारी, व्हेंचर कॅटालिस्ट अँड नाईन युनिकॉर्नचे सह-संस्थापक अपूर्व रंजन शर्मा, ब्लू स्मार्टचे सह-संस्थापक पुनीत गोयल, रेनट्री फाउंडेशनच्या संस्थापक आणि संचालिका लीना दांडेकर, ओपन सीक्रेटच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अहाना गौतम, चलो मोबिलिटीच्या सह संस्थापक आणि संचालक प्रिया सिंग, जिओ जेन नेक्स्टच्या प्रमुख अमेय माशेलकर, सुपर बॉटम्सच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी उतगी, अस्थिरोग तज्ज्ञ आणि कलाकार सलोनी पटवर्धन इ. मान्यवर उपस्थित राहुन आपल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण  करणार आहेत.

दिवसभरात होणार विविध पॅनेल चर्चा : कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, दिवसभरात होणाऱ्या पॅनेल चर्चांमध्ये गुंतवणूकदारांच्या गरजा आणि युवा उद्योजकांच्या यशकथा यावर विशेष सत्रे आयोजित केली जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 जानेवारीला राष्ट्रीय स्टार्टअप दिन घोषित केला आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाज माध्यमांवरही कार्यक्रम थेट प्रक्षेपित केला जाणार आहे.

एक दिवसीय कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, कौशल्य विकास आयुक्त प्रदीपकुमार डांगे यांनी केले आहे.

****

संध्या गरवारे/विसंअ/

छत्रपती महाराणी ताराबाई यांचे कार्य सर्वदूर जाण्यासाठी लेखणीची गरज – श्रीमंत शाहू महाराज छत्रपती

कोल्हापूर, दि. 13 : छत्रपती ताराबाई यांच्या कार्याची स्फूर्ती घेऊन आत्ताच्या पिढीने पुढे जात राहिले पाहिजे यासाठी त्यांचा इतिहास प्रत्येकाला माहित असणे गरजेचे असून त्यांनी केलेले कार्य लेखणीतून समोर येणे आवश्यक आहे. ज्येष्ठ इतिहास तज्ञ जयसिंगराव पवार यांनी लिहिलेल्या पुस्तकातून छत्रपती ताराबाई यांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचेल अशी आशा श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केली. महाराणी ताराबाई यांच्या ३५० व्या जयंती वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन  करण्यात आले आहे.  या सर्वांचा एक भाग म्हणून महाराणी ताराबाई यांच्या जीवनकार्याची माहिती देणाऱ्या चित्ररथाची बांधणी करण्यात आलेली असून त्याचे भव्य उद्घाटन छ.शाहू महाराज समाधी स्थळ, नर्सरी बाग, कोल्हापूर  येथे  करण्यात आले. महाराणी ताराबाई यांच्या जीवनावर आधारीत विशेष चित्ररथाची संकल्पना ॲड. आशिष शेलार मंत्री सांस्कृतिक कार्य यांची असून विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनातून चित्ररथाची निर्मिती झाली आहे. उद्घाटन प्रसंगी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, हसन मुश्रीफ, मंत्री वैद्यकीय शिक्षण, खासदार धनंजय महाडिक, इतिहास तज्ञ जयसिंगराव पवार तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मान्यवर या सर्वांच्या हस्ते  विशेष चित्ररथाचे  उद्घाटन करण्यात आले.  मंत्री सांस्कृतिक कार्य आशिष शेलार हे ऑनलाइन उपस्थित होते. हा चित्ररथ कोल्हापूर शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रदर्शित करण्यात येणार आहे. 

महाराणी ताराबाई यांचा पराक्रम महानच – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले मराठा साम्राज्य पुढे चांगल्या प्रकारे महाराणी ताराबाई यांनी चालवले. त्यांनी दिलेला लढा आणि त्यांचे कार्य महानच असून त्यांचा इतिहास सर्वांना कळवा, त्यांनी केलेल्या महान कार्याची ओळख सर्वांना व्हावी यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने आयोजित केलेला हा कार्यक्रम अतिशय अभिनंदनीय असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी उद्घाटन कार्यक्रमावेळी सांगितले.

ज्येष्ठ इतिहास तज्ञ जयसिंगराव पवार यांनी लिहिलेल्या छत्रपती ताराबाई यांच्या पुस्तकातून त्यांचा इतिहास राज्याला प्रेरक ठरेल – सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार

कोणताही इतिहास उद्याचे भविष्य घडवतो. महाराणी ताराबाई यांनी मराठा साम्राज्यासाठी दिलेले योगदान तसेच त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन ही संकल्पना सांस्कृतिक कार्य विभागाकडून राबविण्यात येत आहे. ज्येष्ठ इतिहास तज्ञ जयसिंगराव पवार यांनी लिहिलेल्या छत्रपती ताराबाई यांच्या पुस्तकातून त्यांचा इतिहास नक्कीच राज्याला प्रेरक ठरेल असे मत सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केला. ते दूरदृश्य प्रणालीद्वारे चित्ररथाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. ते म्हणाले छत्रपती ताराबाई यांचा लढा, त्यांचे नेतृत्व जनतेसमोर आणायचे आहे. यासाठी चित्ररथ तसेच विविध प्रदर्शनातून लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी राज्यातील सहा विभागात सहा ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. तसेच येत्या काळात छत्रपती ताराबाई यांच्या नावाने टपालाचे तिकीटही प्रसिद्ध केले जाणार आहे. येत्या वर्षभरात छत्रपती ताराबाई यांच्यावर आधारित विविध नाटकांचे आयोजनही करण्यात येणार आहे. त्यांचे शौर्य, इतिहास चांगल्या प्रकारे लोकांच्या समोर येईल. तसेच मंत्री हसन मुश्रीफ यांनी मागणी केल्यानुसार जयसिंगराव पवार यांचे पुस्तकही सर्वांसमोर पोहोचेल यासाठी नियोजन केले जाईल असे ते म्हणाले. अभ्यासक, इतिहास संशोधक व नागरीकांनी या महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर आधारीत विशेष चित्ररथाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन मंत्री शेलार यांनी यावेळी केले.

ज्येष्ठ इतिहास तज्ञ जयसिंगराव पवार यांनी महाराणी ताराबाई यांनी केलेल्या कार्याची माहिती थोडक्यात सांगितली. खासदार धनंजय महाडिक यांनीही या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देऊन महाराणी ताराबाई यांच्या कार्याबाबत थोडक्यात माहिती दिली. कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीताने झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रस्ताविक सहसंचालक सांस्कृतिक कार्य विभाग श्रीराम पांडे यांनी केले तर आभारही त्यांनीच मानले.

टेकड्यांच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने उपाययोजना करा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचना

महानगरपालिकेशी संबंधित विषयांसदर्भात २३ जानेवारी रोजी बैठकीचे आयोजन

पुणे, दि.13: पुणे शहर परिसरात 17 टेकड्या असून त्यावर सातत्याने लागणाऱ्या आगी रोखण्यासाठी सुरक्षितेतच्यादृष्टीने प्रशासन, महानगरपालिकाने नागरिकांनासोबत घेऊन सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, याकरीता निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. टेकड्यांवरील अनाधिकृत बांधकामावरही कारवाई करावी, असे निर्देश देत महानगरपालिकेशी संबंधित विषयांसदर्भात 23 जानेवारी रोजी महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पुणे शहरातील टेकड्यांची सुरक्षा, त्याअनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसंदर्भात वनभवन येथे आयोजित आढावा बैठक झाली. या बैठकीत प्रामुख्याने कोथरुड मधील म्हातोबा टेकडीवरील आगीच्या तीन घटनांनतर करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा मंत्री श्री. पाटील यांनी घेतला. यावेळी उपवसंरक्षक महादेव मोहिते, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, विभागीय वन अधिकारी स्नेहल पाटील, सहायक वनसंरक्षक दीपक पवार, पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त अविनाश सपकाळ, नागरिक उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, कोथरूड मधील म्हातोबा टेकडीवर सुमारे 6 हजार 500 वृक्षांची लागवड केली होती. त्यांना आग लावून सुमारे 2 हजार 500 वृक्ष नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात.

टेकड्यावरील झाडांची योग्य पद्धतीने वाढ होण्यासाठी  तणांची विल्हेवाट लावण्यासाठी वन विभागाने प्रयत्न करावेत. संरक्षक भिंतीची जलदगतीने कामे पूर्ण करावे. वन क्षेत्र संरक्षित करावेत, प्रवेशद्वार सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी. टेकड्यांवरील झाडांच्या देखभालीसाठी टेकड्यावरील ठिकाणे निश्चित करुन उच्चक्षमतेचे सोलारयुक्त सीसीटीव्ही कॅमरे बसवावेत. अनुचित प्रकार टाळण्यासाठी परिसरात गस्त घालणाऱ्या सुरक्षारक्षकाची संख्या 2 वरुन ८ करावी. त्यांना गस्त घालण्यासाठी लागणाऱ्या दुचाकी, सौर दिवे आदी बाबींकरीता लागणारा निधी उपलब्ध करुन देण्याचा येईल, असे श्री. पाटील म्हणाले.

श्री. मोहिते यांनी टेकड्याच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. तसेच काही विषय महापालिकेशी संबंधित असल्याने महानगर पालिका आयुक्तांसोबत बैठक लावण्याची त्यांनी विनंती केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘विहंग संस्कृती कला महोत्सव’चा सांगता समारोह संपन्न

ठाणे, दि.१३(जिमाका) :- संस्कृती युवा प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला महोत्सव संघ यांच्या वतीने ११ व्या वार्षिक विहंग संस्कृती कला महोत्सवाचा सांगता समारोह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, संजय वाघुले, पूर्वेष सरनाईक, सुप्रसिद्ध गायक मिका सिंग उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, संस्कृती कला महोत्सवाच्या माध्यमातून ठाणेकरांना त्यांच्या रुचीप्रमाणे सर्व कलांचा आनंद देण्यात येतोय. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा तसेच नुकतेच नवीन वर्ष सुरू झाले आहे. हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुख समाधानाचे आणि आनंदाचे जावो, हीच सदिच्छा.

प्रास्ताविक करताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तळागाळापर्यंत पोहोचलेल्या परिवहन खात्याची जबाबदारी सोपविल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. तसेच त्यांनी संस्कृती कला महोत्सवबद्दल उपस्थितांना माहिती दिली.

ते म्हणाले, तळागाळापर्यंत पोहोचलेल्या परिवहन खात्याची प्रतिमा उंचाविण्यासाठी चांगले काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन. शंभर दिवस कालावधीसाठी आखण्यात आलेल्या कामांच्या नियोजनबद्ध आराखड्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी मनःपूर्वक अभिनंदनही केले.

महाबळेश्वर, पाचगणीसह कांदाटी खोऱ्यातील पर्यटन वाढीसाठी कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा दि. 13(जि.मा.का.) :  महाबळेश्वर, पाचगणीसह कांदाटी खोऱ्यातील स्थानिक नागरिकांना रोजगार मिळावा हा प्रमुख उद्देश ठेवून या भागातील पर्यटन वाढीसाठी  शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

दरे, ता. महाबळेश्र्वर येथे   तापोळा, कोयना व महाबळेश्वर परिसरातील सुरू असलेल्या व प्रस्तावित पर्यटन प्रकल्पाच्या कामांचा आढावा  बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.  बैठकीस  अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधिक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सार्वजनिक बांधकाम विभागाचे  अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता श्री. वसईकर,  सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक,  जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प (राखीव) कराडचे उपसंचालक किरण जगताप, एम टी डी सी च्या अतिरिक व्यवस्थापक मोशनी कोसे, राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वर्षा पवार आदी, पाटण चे प्रांताधिकारी सोपान टोणपे, महाबळेश्र्वर, पाटण व जावळीचे तहसीलदार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाबळेश्वर व पाचगणीसह कंदाटी खाऱ्यात येणाऱ्या पर्यटकांना वाहतूक कोंडीसह पार्कींग समस्येचा सामना करावा लागतो. यातून पर्यटकांना दिलासा मिळण्याच्या दृष्टीने मार्ग काढावा. पाचगणी व महाबळेश्वर येथे एस टी डेपो जवळ 300 गाड्यांची पार्कींग व्यवस्था होईल, असे वाहनतळ विकसित करावे. तसेच येणाऱ्या पर्यटकांकडून प्रति माणूस टोल जातो, यात सुसुत्रता आणण्यासाठी प्रतिवाहन फॅास्टटॅग पध्दतीने कराची रक्कम गोळा करावी. त्यामुळे लोकांची गैरसोयी दूर होतील.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे महाबळेश्वर येथे कार्यालय सुरु करावे, असे सांगून श्री. शिंदे म्हणाले, तेथील अधिकाऱ्यांना पुरेसे अधिकार द्यावेत.  नवीन ठिकाणच्या पर्यटन वाढीसाठी ड्रोनद्वारे तात्काळ सर्व्हे करावा, जेणेकरुन पायाभूत सुविधा देता येतील.  हेलीपॅड राईडसाठी पर्यटनाच्या ठिकाणी हेलीपॅड व्यवस्था करावी. मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देऊ शकतात. तापोळा ते उत्तरेश्वर येथे रोपवे करण्याच्या कामास गती द्यावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

पाण्याचे प्रदूषण न करता हाऊस बोटी सुरु करा, यातून स्थानिकांना रोजगार मिळेल, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व  महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ ह्या दोघांनी मिळून पर्यटकांना राहण्यासाठी चांगल्या प्रकारच्या टेंटची निर्मिती करावी.  यातून स्थानिक लोकांना रोजगार मिळेल, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.

बांबू लागवडीसाठी प्रत्येक झाडाला 175 अनुदान मिळते. तीन वर्षात प्रति हेक्टर 7 लाखापर्यत अनुदान मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी बांबू लागवड व इतर फळ पिकांच्या लागवडीसाठी प्रयत्न करावे, असे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी  महाबळेश्वर तालुक्यातील 105 गावांच्या पाणी पुरवठा योजनांचा व बुडीत बंधाऱ्यांचा आढावाही घेण्यात आला.  कोयना धरणातील पाणी जसे जसे कमी होत जाईल तसा त्यातील गाळ काढण्याच्या कामाला प्राधान्य द्यावे, असेही निर्देश उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुनावळेच्या कोयना जल पर्यटन केंद्राला भेट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुनावळे येथील कोयना जल पर्यटन केंद्राला भेट देवुन सद्यपरिस्थितीतील चालू  व प्रस्तावित प्रकल्पांची माहिती घेतली. यावेळी स्थानिक नागरिकांनी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांना भेटून आपल्या समस्या मांडल्या. यावेळी पर्यटन प्रकल्प विकसित करताना  स्थानिक नागरिकांनाच रोजगार मिळण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासनही श्री. शिंदे यांनी दिले.

शालेय शिक्षण विभागाकडील योजना, उपक्रम मिशन मोडवर राबवावेत -शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. १३ :-  शालेय शिक्षण विभागाकडील योजना, उपक्रम कार्यक्रम मिशन मोडवर राबवावेत. यामध्ये १०० दिवसांचा कार्यक्रम, नवीन शैक्षणिक धोरण व आरटीआयची प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत दिल्या.

मंत्री श्री. भुसे यांनी मंत्रालयातील समिती सभागृहात शालेय शिक्षण विभागाचा आढावा घेतला. यावेळी प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. भुसे म्हणाले, केंद्र शासनाने जाहीर केलेले नवीन शैक्षणिक धोरण राज्यात राबविताना  याची सर्व शाळांना पूर्वसूचना द्यावी. यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण संबंधितांना देण्यात यावे. अभिनव प्रयोगांद्वारे, शालेय शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण  करावे. शिक्षणाच्या गुणवत्ता, सुधारणा, आणि भविष्यकालीन धोरणांवर लक्ष केंद्रित करावे. शिक्षकांच्या कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी अधिक प्रशिक्षण कार्यक्रमांची अंमलबजावणी करावी.

मंत्री श्री. भुसे म्हणाले, दहावी, बारावी परीक्षा कॉपी मुक्त व्हाव्यात हे शिक्षण विभागाचे अभियान अत्यंत प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वच यंत्रणांनी दक्ष राहिले पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कॉपीपासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शन करावे. विद्यार्थ्यांना कॉपी मुक्त परीक्षा देण्यासाठी प्रेरित करावे. यासाठी जे-जे उपाय करता येतील ते करावेत, अशा सूचना शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी आढावा बैठकीत दिल्या.

शिक्षणात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी उपाययोजना करून शाळांमध्ये पाणी, शौचालय, स्वच्छता, क्रीडासुविधा उपलब्ध करून देण्याची   कार्यवाही करावी. शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान एका शाळेला भेट दिली पाहिजे. या भेटीचा अहवाल त्यांनी शिक्षण विभागास सादर करावा.

पीएमश्री शाळा योजनेच्या धर्तीवर सीएमश्री शाळा योजना राबविण्यात येणार असल्याचे सांगून  शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणाले, या योजनेंतर्गत तालुकास्तरावर किमान एक आदर्श शाळा झाली पाहिजे. या शाळेत ग्रंथालय, लॅब, क्रीडा विभाग यासाठी आवश्यक साधने असावीत. ही शाळा डिजिटल सुविधांनी परिपूर्ण असावी.

जर्मनी देशात कुशल मनुष्यबळ पुरवणे या कामास गती देण्याच्या सूचना करून  या योजनेच्या अंमलबजावणीसाठी संबंधितांशी पत्रव्यवहार करावा, अशा सूचना मंत्री श्री. भुसे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

बैठकीत विद्यार्थ्यांचे शिक्षण, शिक्षकांची क्षमता, शाळांच्या सुविधांची स्थिती, विविध योजनांची अंमलबजावणी, विद्यार्थ्यांना देण्यात येणारा पोषण आहार, शालेय अभ्यासक्रमाशी निगडीत बाबी, शाळाबाह्य मुलांचे सर्व्हेक्षण, शिष्यवृत्ती योजना, पवित्र पोर्टल,संच मान्यता, शाळा व्यवस्थापन यासह विभागाकडील विविध योजना व उपक्रमाची माहिती जाणून घेऊन संबंधितांना आवश्यक त्या सूचना  दिल्या.

०००००

एकनाथ पोवार/विसंअ/

आर्टीच्या प्रशिक्षणाला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद उमेदवारांची नोंदणी प्रक्रिया सुरळीत होणार – व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे

मुंबई, दि. १३ : मातंग आणि त्यातील तत्सम जातींच्या उन्नतीकरिता आर्टीकडून कौशल्य प्रशिक्षण, स्पर्धा पूर्व प्रशिक्षण, विविध योजना राबवण्यात येत आहेत. त्याकरिता इच्छुक उमेदवारांनी आपल्या आवडीनुसार स्पर्धा परीक्षा, कौशल्य प्रशिक्षणाचे गुगल फॉर्म भरण्याचे आवाहन आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला तरूणाईने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

समाजातील शेवटच्या घटकापर्यंत गुगल लिंक शेअर करण्यात आली. त्यामुळे मातंग समाजातील हजारो तरुणांनी एकाच वेळी फॉर्म भरण्यास सुरुवात केल्यामुळे गुगल फॉर्म हँग होत असल्याच्या अडचणी नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. भविष्यात अनेक उमेदवारांनी एकाचवेळी ऑनलाईन नोंदणी केली तरी अडचण येऊ नये यासाठी नोंदणी फॉर्मवर तांत्रिक विभागाचे काम सुरु आहे. लवकरच उमेदवारांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरळीत होईल असे आर्टी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक श्री. वारे यांनी सांगितले.

0000

शैलजा पाटील/विसंअ/

 

ऑनर किलिंग रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘सुरक्षागृह’या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. 13 : आंतरजातीय आणि आंतरधर्मीय जोडप्यांना लग्नानंतर सुरुवातीच्या काळात सुरक्षित निवारा महत्त्वाचा असतो. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अनेकदा गंभीर होत असून अशा प्रकरणात बेदम मारहाण ते खुनापर्यंतच्या घटना घडतात.  ऑनर किलिंग रोखण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात ‘सुरक्षागृह’ सुविधेचा निर्णय घेतला आहे. यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

आज लातूर, संभाजीनगर, कोल्हापूर येथे झालेल्या ऑनर किलिंगच्या घटनांबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली या घटनांचा आढावा घेण्यात आला.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सुरक्षागृह (सेफ हाऊस) निर्णयाची अंमलबजावणी करावी आणि याबाबतचा सविस्तर अहवाल दि. 30 जानेवारी 2025 पर्यंत  सादर करावा. ऑनर किलिंग च्या घटनेमधील पीडित मुलींचे समुपदेशन व्हावे तसेच मनोधैर्य योजनेतून पीडित महिलेला काही मदत म्हणून लाभ देता येईल का पहावे, त्यामुळे अशा मुलींना मदत होईल. तसेच, या पीडित महिलांना सक्षम करण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत त्यांना प्रशिक्षण देऊन रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आराखडा तयार करावा, अशा सूचनाही यावेळी दिल्या.

आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांची सामाजिक मानहानी, कौटुंबिक त्रास आ​णि ऑनर किलिंगपासून संरक्षण कण्यासाठी ‘अॅट्रॉसिटी’च्या धर्तीवर ‘आंतरजातीय विवाह कायद्या’ची निर्मिती  करण्यासाठी समिती गठीत केली होती या समितीचे पुनर्गठन करावे.

आपत्कालीन परिस्थितीत महिलांना त्वरित मदत मिळावी यासाठी सुरू करण्यात आलेल्या महिला सुरक्षेसाठीच्या हेल्पलाइन आणि विविध समित्यांची राज्यस्तरीय प्रचार प्रसिद्धी करावी, ज्यामुळे महिलांना सुरक्षितता आणि कायदेशीर मदत वेळेत उपलब्ध होईल आणि या महिलांना कायदेशीर संरक्षण मिळेल,” असेही डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

त्याचबरोबर, आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या काही तक्रार प्राप्त झाल्यास अप्पर पोलीस अधीक्षक दर्जाच्या आधिकाऱ्याने त्याचा तपास करून अहवाल सादर करावा. पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने तक्रार दाखल करून पुढील कार्यवाही करावी आणि अशा जोडप्यांच्या संरक्षणाकरिता विशेष कक्ष आरक्षित करावेत किंवा वसतीगृह द्यावे, अशा सूचनाही उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केल्या.

यावेळी, बैठकीला सामाजिक न्याय आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, महिला व बालविकास आयुक्त राहुल मोरे, संभाजीनगर विभागीय आयुक्त दिलीप गावडे, संभाजीनगर पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित कोल्हापूर, लातूर निवासी जिल्हाधिकारी संगीता टकले, सोमय मुंडे, पोलीस आयुक्त, आयुक्तालय पुणे संबंधित अधिकारी  ऑनलाइन उपस्थित होते.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

 

यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी, युवकांनी स्वयंशिस्त पाळावी – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, दि.१३ : जन्मापासून आपण समाजाकडून सर्व काही घेत असतो. त्यामुळे समाजाच्या ऋणाची उतराई होणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे सांगून यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी तसेच युवकांनी स्वयंशिस्त पाळावी तसेच समाजाप्रति उत्तरदायित्वाची भावना ठेवावी असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी विद्यार्थी व युवकांना संबोधित करताना केले.

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून मुंबईतील रामकृष्ण मठ आणि मिशनतर्फे आयोजित विवेक कार्यशाळेचा शुभारंभ राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. १३) रामकृष्ण मिशन सभागृह, खार येथे संपन्न झाला.

स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केलेली रामकृष्ण मिशन ही संस्था शिस्त, भक्ती, उत्तरदायित्व व सर्वधर्मसमभावासाठी प्रसिद्ध आहे.  आपल्या सर्व उपक्रमात रामकृष्ण मिशन सर्व धर्म, जाती व पंथाच्या विद्यार्थ्यांना सहभागी  करून घेते हे सर्वधर्मसमभावाचे उत्तम उदाहरण असल्याचे राज्यपालांनी सांगितले. समाजाकडून घेतलेल्या दानाचा मिशन कसा विनियोग करते, हे पारदर्शीपणे समाजापुढे मांडत असल्याबद्दल राज्यपालांनी रामकृष्ण मिशनचे कौतुक केले.

अगोदर बिझनेस क्लास आता इकॉनॉमी क्लासने प्रवास

पूर्वी आपण गारमेंट निर्यातदार असताना बिझनेस क्लासने प्रवास करीत असायचो. त्यावेळी पैसा स्वतःचा असायचा.  परंतु राज्यपाल झाल्यानंतर आपण इकोनॉमी क्लासने प्रवास करतो कारण आपल्यासाठी खर्च होत असलेला पैसा जनसामान्यांचा आहे ही जाणीव आपण नेहमी बाळगतो असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी सांगितले.

रामकृष्ण मिशन मुंबईचे अध्यक्ष स्वामी सत्यदेवानंद यांनी स्वागतपर  भाषण केले तर मिशनच्या धर्मादाय हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्वामी दयाधिपानंद यांनी हॉस्पिटल तसेच युवकांसंबंधी उपक्रमाबद्दल अहवाल सादर केला. मिशनचे व्यवस्थापक स्वामी तन्नमानंद यांनी मिशनच्या बेलूर मठ येथे झालेल्या वार्षिक सभेच्या अहवालाचे वाचन केले.

रामकृष्ण मिशन मुंबईचे सहाय्यक सचिव स्वामी देवकांत्यानंद यांनी आभार प्रदर्शन केले. संयोजक शंतनू चौधरी यांनी सूत्रसंचालन केले तर विवेकानंद स्टडी सर्कलचे सदस्य डॉ हार्दिक गुप्ता  व आराधना धार यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला मिशनचे वरिष्ठ साधू तसेच विवेकानंद स्टडी सर्कलचे सदस्य व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

००००

Maharashtra Governor inaugurates Viveka Workshops on the occasion

 of Vivekananda Jayanti in Mumbai

 

Mumbai Dated 13 : Maharashtra Governor C. P. Radhakrishnan inaugurated the ‘Viveka Workshops’ organised by the Ramakrishna Math and Mission Mumbai on the occasion of Swami Vivekananda Jayanti at the Ramakrishna Mission Auditorium, Khar, Mumbai on Mon (13 Jan).

Addressing the students and youths on the occasion, the Governor stressed the importance of self discipline, accountability, selfless service, patience and hard work to succeed in life.

Swami Satyadevananda , President of Ramakrishna Mission Mumbai, Dr. Swami Dayadhipananda, Medical Superintendent, Ramakrishna Mission Charitable Hospital, Swami Tannamananda, Swami Devakantyananda, other senior Swamijis, members of the Vivekananda Study Circle and students from various schools were present.

००००

शक्तिपीठ महामार्गाचे काम सुरु करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १३ : राज्यातील दळणवळण सुविधा तसेच व्यावसायिक संधी आणि पर्यटनाला गती  देणाऱ्या शासनाच्या महत्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्गाच्या कामाचे नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन तत्परतेने सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे आगामी शंभर दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाने करावयाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी घेतला. बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री   शिवेंद्रसिंहराजे भोसले, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मेघना साकोरे बोर्डीकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या  अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, सचिव सदाशिव साळुंखे (रस्ते), सचिव संजय दशपुते (बांधकामे), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी  राज्यातील महामार्गाची उभारणी आणि रस्त्यांचे जाळे दर्जेदार आणि अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने नियोजन करण्याचे सूचित करुन सांगितले की, राज्यातील धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या आणि पर्यटन उद्योगाला प्रोत्साहन देणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाची उभारणी दर्जेदार आणि गतिमानतेने करावयची असून सर्वांना विश्वासात घेऊन त्यासाठीची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दिले.

समृद्धी महामार्गाचे उर्वरित अंतिम  टप्प्याचे आमणेपर्यंतचे ७६ कि.मी. काम तत्परतेने पूर्ण करुन फेब्रुवारीपर्यंत हा महामार्ग पूर्णपणे खुला करावा. तसेच यावर्षी समृद्धी महामार्गाचे कर्जरोखे प्रक्रिया पूर्ण करण्यात  यावी. प्रवाशांना उपयुक्त ठरणाऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती  मार्गावरील १३.३० कि.मी. मिसिंग लिंकचे कामही गतीने पूर्णत्वास न्यावे. नाशिक- मुंबई या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करण्याचे काम ही तातडीने  पूर्ण करावे. मंत्रालय परिसरात नवीन सात मजली इमारतीची उभारणी कामाची सुरुवात करण्यात यावी.

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कामांची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी संबंधितांकडून योग्यरित्या पार पाडली जाणे आवश्यक असून त्याचे नियंत्रण करणारी यंत्रणा विभागाने कार्यान्वित करावी.  विभागाच्या आर्थिक सक्षमतेसाठी नियोजन विभागाच्या निर्देशानुसार आर्थिक प्रारुप तयार करावे. रस्त्यांच्या निर्मितीसाठी भूसंपादन प्रक्रिया शासनाने करुन रस्त्याचे काम  बीओटी तत्वावर करण्याचे धोरण स्वीकारावे.  विविध विभागांच्या बांधकामांसंदर्भात केंद्रीय कार्यपद्धती अंमलात आणणे गरजेचे आहे. त्यासाठी बांधकाम विभागातच संबंधित विभागांच्या  बांधकामासाठीचा  स्वतंत्र  कक्ष तयार करण्यात येईल. रस्त्यांच्या दुर्तफा  वृक्ष लागवड  करताना भविष्यातील रस्ता विस्तारीकरणाची निकड लक्षात घेऊन वृक्षसंगोपन करणात  यावे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन दर्जेदार आणि गतिमान कामे करण्याच्या  दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विभागामार्फत गुणवत्तापूर्ण आणि गतिमानतेने काम करण्यास प्राधान्य देण्यात येणार असून विभागाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणि कालमर्यादा प्रामुख्याने पाळण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच महामार्गावर प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असण्यावर, प्राधान्याने महिला प्रवाशांसाठी प्रसाधनगृहांची सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले.

विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती म्हैसकर यांनी विभागाच्या आगामी शंभर दिवसांच्या नियोजनाबाबत माहिती देताना कार्यक्षमता, गुणवत्ता, पारदर्शकता याला प्राधान्य देत विभागाच्या माध्यमातून येत्या शंभर दिवसांत विविधांगी महत्त्व पूर्ण प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात येणार असून  विभागाच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने राबवण्यात येणा-या कामांची सविस्तर माहिती दिली.

0000

वंदना थोरात/विसंअ/

ताज्या बातम्या

पारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवेसाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम

0
राज्यातील नागरिकांना दिल्या जाणा-या सेवा पारदर्शक, गतिमान व कालबध्द पध्दतीने देण्याकरीता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ पारित करण्यात आला आहे.  हा अधिनियम २८ एप्रिल,...

महाराष्ट्रातील जनतेचा तसेच प्रशासनाचा ‘सेवा हक्क दिन’

0
महाराष्ट्र शासनाने दिनांक १ एप्रिल २०२५ रोजी '२८ एप्रिल' हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या जनतेसाठी तसेच सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे....

पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक संपन्न

0
धुळे, दिनांक 26 एप्रिल, 2025 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील खेडाळूंना चांगल्या क्रीडा सुविधा उपलब्ध होण्यासाठी धुळे जिल्हा क्रीडा संकुलात विविध सुविधा निर्माण करण्याच्या 16...

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

0
धुळे, दिनांक 26 एप्रिल, 2025 (जिमाका वृत्तसेवा) :  राज्य शासनाच्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतंर्गत विशेष रेल्वे गाडी जिल्ह्यातील आठशे भाविकांना घेऊन अयोध्येच्या दिशेने जय श्री...

पाणी टंचाईच्या कामात हयगय केल्यास संबंधितांवर कारवाई – पालकमंत्री संजय राठोड

0
टंचाईस जबाबदार असणाऱ्यांची वेतनवाढ थांबविणार मागील वर्षाचा अधिग्रहणाचा मोबदला ३० एप्रिलपर्यंत द्या एसडीओंनी तालुकास्तरावर टंचाई आढावा घेण्याचे निर्देश यवतमाळ, दि. 26 (जिमाका) : उन्हाळ्यात...