रविवार, एप्रिल 27, 2025
Home Blog Page 247

ऑनर किलिंग रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘सुरक्षागृह’या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. 13 : आंतरजातीय आणि आंतरधर्मीय जोडप्यांना लग्नानंतर सुरुवातीच्या काळात सुरक्षित निवारा महत्त्वाचा असतो. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अनेकदा गंभीर होत असून अशा प्रकरणात बेदम मारहाण ते खुनापर्यंतच्या घटना घडतात.  ऑनर किलिंग रोखण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात ‘सुरक्षागृह’ सुविधेचा निर्णय घेतला आहे. यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

आज लातूर, संभाजीनगर, कोल्हापूर येथे झालेल्या ऑनर किलिंगच्या घटनांबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली या घटनांचा आढावा घेण्यात आला.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सुरक्षागृह (सेफ हाऊस) निर्णयाची अंमलबजावणी करावी आणि याबाबतचा सविस्तर अहवाल दि. 30 जानेवारी 2025 पर्यंत  सादर करावा. ऑनर किलिंग च्या घटनेमधील पीडित मुलींचे समुपदेशन व्हावे तसेच मनोधैर्य योजनेतून पीडित महिलेला काही मदत म्हणून लाभ देता येईल का पहावे, त्यामुळे अशा मुलींना मदत होईल. तसेच, या पीडित महिलांना सक्षम करण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत त्यांना प्रशिक्षण देऊन रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आराखडा तयार करावा, अशा सूचनाही यावेळी दिल्या.

आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांची सामाजिक मानहानी, कौटुंबिक त्रास आ​णि ऑनर किलिंगपासून संरक्षण कण्यासाठी ‘अॅट्रॉसिटी’च्या धर्तीवर ‘आंतरजातीय विवाह कायद्या’ची निर्मिती  करण्यासाठी समिती गठीत केली होती या समितीचे पुनर्गठन करावे.

आपत्कालीन परिस्थितीत महिलांना त्वरित मदत मिळावी यासाठी सुरू करण्यात आलेल्या महिला सुरक्षेसाठीच्या हेल्पलाइन आणि विविध समित्यांची राज्यस्तरीय प्रचार प्रसिद्धी करावी, ज्यामुळे महिलांना सुरक्षितता आणि कायदेशीर मदत वेळेत उपलब्ध होईल आणि या महिलांना कायदेशीर संरक्षण मिळेल,” असेही डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

त्याचबरोबर, आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या काही तक्रार प्राप्त झाल्यास अप्पर पोलीस अधीक्षक दर्जाच्या आधिकाऱ्याने त्याचा तपास करून अहवाल सादर करावा. पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने तक्रार दाखल करून पुढील कार्यवाही करावी आणि अशा जोडप्यांच्या संरक्षणाकरिता विशेष कक्ष आरक्षित करावेत किंवा वसतीगृह द्यावे, अशा सूचनाही उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केल्या.

यावेळी, बैठकीला सामाजिक न्याय आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, महिला व बालविकास आयुक्त राहुल मोरे, संभाजीनगर विभागीय आयुक्त दिलीप गावडे, संभाजीनगर पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित कोल्हापूर, लातूर निवासी जिल्हाधिकारी संगीता टकले, सोमय मुंडे, पोलीस आयुक्त, आयुक्तालय पुणे संबंधित अधिकारी  ऑनलाइन उपस्थित होते.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

 

यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी, युवकांनी स्वयंशिस्त पाळावी – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, दि.१३ : जन्मापासून आपण समाजाकडून सर्व काही घेत असतो. त्यामुळे समाजाच्या ऋणाची उतराई होणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे सांगून यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी तसेच युवकांनी स्वयंशिस्त पाळावी तसेच समाजाप्रति उत्तरदायित्वाची भावना ठेवावी असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी विद्यार्थी व युवकांना संबोधित करताना केले.

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून मुंबईतील रामकृष्ण मठ आणि मिशनतर्फे आयोजित विवेक कार्यशाळेचा शुभारंभ राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. १३) रामकृष्ण मिशन सभागृह, खार येथे संपन्न झाला.

स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केलेली रामकृष्ण मिशन ही संस्था शिस्त, भक्ती, उत्तरदायित्व व सर्वधर्मसमभावासाठी प्रसिद्ध आहे.  आपल्या सर्व उपक्रमात रामकृष्ण मिशन सर्व धर्म, जाती व पंथाच्या विद्यार्थ्यांना सहभागी  करून घेते हे सर्वधर्मसमभावाचे उत्तम उदाहरण असल्याचे राज्यपालांनी सांगितले. समाजाकडून घेतलेल्या दानाचा मिशन कसा विनियोग करते, हे पारदर्शीपणे समाजापुढे मांडत असल्याबद्दल राज्यपालांनी रामकृष्ण मिशनचे कौतुक केले.

अगोदर बिझनेस क्लास आता इकॉनॉमी क्लासने प्रवास

पूर्वी आपण गारमेंट निर्यातदार असताना बिझनेस क्लासने प्रवास करीत असायचो. त्यावेळी पैसा स्वतःचा असायचा.  परंतु राज्यपाल झाल्यानंतर आपण इकोनॉमी क्लासने प्रवास करतो कारण आपल्यासाठी खर्च होत असलेला पैसा जनसामान्यांचा आहे ही जाणीव आपण नेहमी बाळगतो असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी सांगितले.

रामकृष्ण मिशन मुंबईचे अध्यक्ष स्वामी सत्यदेवानंद यांनी स्वागतपर  भाषण केले तर मिशनच्या धर्मादाय हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्वामी दयाधिपानंद यांनी हॉस्पिटल तसेच युवकांसंबंधी उपक्रमाबद्दल अहवाल सादर केला. मिशनचे व्यवस्थापक स्वामी तन्नमानंद यांनी मिशनच्या बेलूर मठ येथे झालेल्या वार्षिक सभेच्या अहवालाचे वाचन केले.

रामकृष्ण मिशन मुंबईचे सहाय्यक सचिव स्वामी देवकांत्यानंद यांनी आभार प्रदर्शन केले. संयोजक शंतनू चौधरी यांनी सूत्रसंचालन केले तर विवेकानंद स्टडी सर्कलचे सदस्य डॉ हार्दिक गुप्ता  व आराधना धार यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला मिशनचे वरिष्ठ साधू तसेच विवेकानंद स्टडी सर्कलचे सदस्य व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

००००

Maharashtra Governor inaugurates Viveka Workshops on the occasion

 of Vivekananda Jayanti in Mumbai

 

Mumbai Dated 13 : Maharashtra Governor C. P. Radhakrishnan inaugurated the ‘Viveka Workshops’ organised by the Ramakrishna Math and Mission Mumbai on the occasion of Swami Vivekananda Jayanti at the Ramakrishna Mission Auditorium, Khar, Mumbai on Mon (13 Jan).

Addressing the students and youths on the occasion, the Governor stressed the importance of self discipline, accountability, selfless service, patience and hard work to succeed in life.

Swami Satyadevananda , President of Ramakrishna Mission Mumbai, Dr. Swami Dayadhipananda, Medical Superintendent, Ramakrishna Mission Charitable Hospital, Swami Tannamananda, Swami Devakantyananda, other senior Swamijis, members of the Vivekananda Study Circle and students from various schools were present.

००००

शक्तिपीठ महामार्गाचे काम सुरु करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १३ : राज्यातील दळणवळण सुविधा तसेच व्यावसायिक संधी आणि पर्यटनाला गती  देणाऱ्या शासनाच्या महत्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्गाच्या कामाचे नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन तत्परतेने सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे आगामी शंभर दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाने करावयाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी घेतला. बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री   शिवेंद्रसिंहराजे भोसले, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मेघना साकोरे बोर्डीकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या  अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, सचिव सदाशिव साळुंखे (रस्ते), सचिव संजय दशपुते (बांधकामे), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी  राज्यातील महामार्गाची उभारणी आणि रस्त्यांचे जाळे दर्जेदार आणि अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने नियोजन करण्याचे सूचित करुन सांगितले की, राज्यातील धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या आणि पर्यटन उद्योगाला प्रोत्साहन देणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाची उभारणी दर्जेदार आणि गतिमानतेने करावयची असून सर्वांना विश्वासात घेऊन त्यासाठीची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दिले.

समृद्धी महामार्गाचे उर्वरित अंतिम  टप्प्याचे आमणेपर्यंतचे ७६ कि.मी. काम तत्परतेने पूर्ण करुन फेब्रुवारीपर्यंत हा महामार्ग पूर्णपणे खुला करावा. तसेच यावर्षी समृद्धी महामार्गाचे कर्जरोखे प्रक्रिया पूर्ण करण्यात  यावी. प्रवाशांना उपयुक्त ठरणाऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती  मार्गावरील १३.३० कि.मी. मिसिंग लिंकचे कामही गतीने पूर्णत्वास न्यावे. नाशिक- मुंबई या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करण्याचे काम ही तातडीने  पूर्ण करावे. मंत्रालय परिसरात नवीन सात मजली इमारतीची उभारणी कामाची सुरुवात करण्यात यावी.

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कामांची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी संबंधितांकडून योग्यरित्या पार पाडली जाणे आवश्यक असून त्याचे नियंत्रण करणारी यंत्रणा विभागाने कार्यान्वित करावी.  विभागाच्या आर्थिक सक्षमतेसाठी नियोजन विभागाच्या निर्देशानुसार आर्थिक प्रारुप तयार करावे. रस्त्यांच्या निर्मितीसाठी भूसंपादन प्रक्रिया शासनाने करुन रस्त्याचे काम  बीओटी तत्वावर करण्याचे धोरण स्वीकारावे.  विविध विभागांच्या बांधकामांसंदर्भात केंद्रीय कार्यपद्धती अंमलात आणणे गरजेचे आहे. त्यासाठी बांधकाम विभागातच संबंधित विभागांच्या  बांधकामासाठीचा  स्वतंत्र  कक्ष तयार करण्यात येईल. रस्त्यांच्या दुर्तफा  वृक्ष लागवड  करताना भविष्यातील रस्ता विस्तारीकरणाची निकड लक्षात घेऊन वृक्षसंगोपन करणात  यावे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन दर्जेदार आणि गतिमान कामे करण्याच्या  दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विभागामार्फत गुणवत्तापूर्ण आणि गतिमानतेने काम करण्यास प्राधान्य देण्यात येणार असून विभागाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणि कालमर्यादा प्रामुख्याने पाळण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच महामार्गावर प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असण्यावर, प्राधान्याने महिला प्रवाशांसाठी प्रसाधनगृहांची सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले.

विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती म्हैसकर यांनी विभागाच्या आगामी शंभर दिवसांच्या नियोजनाबाबत माहिती देताना कार्यक्षमता, गुणवत्ता, पारदर्शकता याला प्राधान्य देत विभागाच्या माध्यमातून येत्या शंभर दिवसांत विविधांगी महत्त्व पूर्ण प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात येणार असून  विभागाच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने राबवण्यात येणा-या कामांची सविस्तर माहिती दिली.

0000

वंदना थोरात/विसंअ/

योजना, निर्णयांची माहिती लोकांपर्यंत प्रभावीरित्या पोहोचविण्यासाठी डिजिटल माध्यम धोरण तयार करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 13 : शासनाच्या विविध योजना, उपक्रम, शासकीय निर्णय इत्यादी माहिती लोकांपर्यंत जलद गतीने आणि प्रभावीरित्या पोहोचविण्यासाठी शासनाचे डिजिटल माध्यम धोरण लवकरच तयार करण्यात येईल. यासाठी यापुढील काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्राचा वापर करण्यात येईल. विविध नवमाध्यमांचा प्रभावी वापर करून शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

राज्य शासनाच्या शंभर दिवस आराखड्यासंदर्भात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा आढावा घेतला. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, ‘माहिती व जनसंपर्क’चे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह आदी उपस्थित होते.

 

प्रधान सचिव तथा महासंचालक श्री. सिंह यांनी सादरीकरणाद्वारे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या १०० दिवसांच्या आराखड्याचे सादरीकरण केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कामकाजात यापुढे कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्यावर भर द्यावा. डिजिटल माध्यम धोरण तयार करून नवमाध्यमांचा प्रभावी वापर करून शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

श्री. फडणवीस म्हणाले की, राज्यात येणाऱ्या मान्यवरांना महाराष्ट्राचे विविध पैलू दर्शवणारे  कॉफी टेबल बुक तयार करावे. राज्य शासन घेत असलेले निर्णय, योजना व उपक्रमांची माहिती लोकांपर्यंत सर्व माध्यमांद्वारे जाणे आवश्यक आहे. राज्य शासनाच्या प्रतिमा संवर्धनासाठी व माहिती पोहोचविण्यासाठी एआय न्यूजरुम तयार करुन त्याद्वारे माहिती लवकरात लवकर प्रसारित करण्याचे नियोजन करावे. त्यासाठी आवश्यक साहित्य, मनुष्यबळ घेण्यात यावे. पत्रकारांसाठी असलेल्या आरोग्यविषयक तसेच इतर विविध कल्याणकारी योजनांना गती देण्यात यावी. पत्रकार पुरस्कारांचे लवकर वितरण करण्याचे नियोजन करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

राज्यस्तरावर संदर्भ कक्ष

शासकीय योजना, उपक्रम यांची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी राज्यस्तरावर संशोधन आणि संदर्भ कक्ष स्थापन करण्यात यावे. तसेच वर्तमानपत्रे व इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच डिजिटल माध्यमांद्वारेही योजना, निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी डिजिटल मीडिया धोरण लवकरच तयार करण्यात यावे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

– एआयच्या प्रभावी वापरावर भर

– माहिती जलद गतीने पोहोचविण्यासाठी यंत्रणा

– महासंचालनालयाच्या बळकटीकरणावर भर

– सध्या अस्तित्वातील सर्व होर्डिंग हे डिजिटल होर्डिंगमध्ये बदलणार

– सोशल मीडियाचा प्रभावी वापर वाढविणार

– एकाच ठिकाणी माहिती उपलब्धतेसाठी संशोधन आणि संदर्भ कक्ष

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

‘म्हाडा’ने सदनिकांचे काम तातडीने पूर्ण करावे : गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचे आढावा बैठकीत निर्देश

नाशिकदि.13 जानेवारी, 2025 (जिमाका वृत्तसेवा):  नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने (म्हाडा) आपल्या कार्यक्षेत्रातील घरकुलांच्या प्रकल्पांना गती देत त्या संबंधितांना तातडीने हस्तांतरीत करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश गृह (ग्रामीण), शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी  येथे दिले.

मंत्री डॉ. भोयर यांनी आज नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचा (म्हाडा) शासकीय विश्रामगृह येथे आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी म्हाडाचे सभापती रंजन ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवकुमार आवळकंठे, कार्यकारी अभियंता विहार बोडके आदींसह म्हाडाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले की, म्हाडाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घरकुल उपलब्ध होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. तसेच ‘म्हाडा’च्या अडचणी सोडविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. मंत्री डॉ. भोयर यांनी म्हाडाच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आवळकंठे, कार्यकारी अभियंता श्री. बोडके यांनी म्हाडाच्या माध्यमातून नाशिक विभागात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली.

‘एचएमपीव्ही’ विषाणूला घाबरू नका; शासनाच्या सूचनांचे पालन करा

सध्या चीनमध्ये Human Metapneumovirus (HPMV) उद्रेक झाल्याच्या बातम्या येत आहेत. मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे. हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँडस मध्ये 2001 मध्ये आढळला. मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे ज्यामुळे व श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास (सर्दीसारख्या) कारणीभूत ठरते. हा एक हंगामी रोग आहे जो सामान्यतः आरएसव्ही आणि फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो. यानुषंगाने डीजीएचएस आणि संचालक, एन सी डी सी, दिल्ली यांनी दि.03 जानेवारी 2025 रोजी एक निवेदन प्रसिध्द केले आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. वर्ष 2023 च्या तुलनेत डिसेंबर 2024 मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. तथापि खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये, या संदर्भातील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

हे करा:-

  • जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.
  • साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा.
  • ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
  • भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा.
  • संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्या.

हे करू नये:-

  • हस्तांदोलन.
  • टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर.
  • आजारी लोकांशी जवळचा संपर्क.
  • डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे.
  • सार्वजनिक ठिकाणी भुंकणे.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणे.

चीनमधून आलेल्या नवीन विषाणू Human Metapneumovirus (HMPV) अहवालांबाबत चिंतेचे कारण नाही. याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून नाहक भितीचे वातावरण निर्माण करण्याची गरज नाही. तथापि या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यक्षेत्रातील सर्वेक्षण अधिक गतिमान करुन सर्दी-खोकला अर्थात आय एल आय/ सारी रुग्णांचे नियमित सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात यावेत, असे आवाहन आरोग्य सेवा, पुणेचे संचालक डॉ.नितीन अंबाडेकर यांनी केले आहे.

मनोज सुमन शिवाजी सानप

जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे

विलास भुमरे यांनी घेतली विधानसभा सदस्यपदाची शपथ

मुंबई, दि. 13 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये पैठण येथून निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार विलास संदिपानराव भुमरे यांनी विधानसभा सदस्यपदाची विधानभवन येथे शपथ घेतली. विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर उपस्थित होते.

यावेळी खासदार संदीपान भुमरे, सचिव जितेंद्र भोळे, अध्यक्षांचे सचिव सुनील वाणी, यांच्यासह विधिमंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

000

श्रद्धा मेश्राम/स.सं

महाज्योती संस्थेमार्फत पाच जिल्ह्यांमध्ये उत्कृष्टता केंद्र सुरू करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १३  : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व‎ प्रशिक्षण संस्थेमार्फत विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचे कोचिंग आणि फेलोशिपसारख्या योजना राबविण्यात येतात. महाज्योती संस्थेमार्फत पुणे, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या पाच प्रमुख जिल्ह्यांमध्ये उत्कृष्टता केंद्र (Excellence Centres) स्थापन करण्यात येणार असून या केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला.

या बैठकीस इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या ‘विजाभज’ प्रवर्गाच्या खासगी अनुदानित निवासी आश्रमशाळामधील विद्यार्थ्यांना तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक गुणवत्तेचे शिक्षण डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी डिजिटल क्लासरूम प्रकल्प राबविण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) च्या धर्तीवर विमुक्त जाती व भटक्या जमाती करिता सीड अंतर्गत (Scheme for Economic Empowerment of DNT’S) घरकुले बांधण्यासाठी योजना राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ आणि वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांतर्गत एकूण १८ महामंडळे स्थापन करण्यात आली असून या महामंडळांच्या लाभार्थ्यांकरिता वेब पोर्टलची निर्मिती तात्काळ करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.

महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची कर्ज मर्यादा वाढविण्याबाबतही प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात यावा. इतर मागास प्रर्वगातील मुला-मुलींसाठी  जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृहे सुरु करण्याबाबत जागा उपलब्धेसाठी मुख्य सचिव यांच्याकडे  संबंधित जिल्ह्यातील  जिल्हाधिकारी यांच्यासमवेत बैठक घेण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

या बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिक, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांच्यासह विविध विभागांचे प्रधान सचिव, अपर मुख्य सचिव, सचिव उपस्थित होते.

०००००

शैलजा पाटील/विसंअ

‘न्युक्लिअस’अंतर्गत लाभार्थ्यांना २ लाख रुपयांपर्यंत मिळणार अनुदान : आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके

नाशिकदि.13 जानेवारी, 2025 (जिमाका वृत्तसेवा):  न्यूक्लिअस बजेट योजनेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना अनुदान दिले जाते. या योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात येईल. आगामी काळात लाभार्थ्यांना २ लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाईल. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.

महाकवी कालिदास कलामंदिरात मंत्री डॉ. उईके यांच्या उपस्थितीत आदिवासी विकास विभागातील लाभार्थ्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार राजेश पाडवी, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त संदीप गोलाईत, उपायुक्त सुदर्शन नगरे, प्रकल्प अधिकारी अर्पित चौहान, अकुनुरी नरेश आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात विविध बचतगट, भजनी मंडळ तसेच वैयक्तिक लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण मंत्री डॉ. उईके यांच्या हस्ते करण्यात आले.

महिला बचतगटांना पुरेसा निधी उपलब्ध करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. विविध योजनांचा लाभ देण्यासाठी प्रकल्प कार्यालयाने वर्षभराचे वेळापत्रक तयार करून लाभ द्यावा. महिला लाभार्थ्यांसाठी तालुकानिहाय बचत भवन उभारावे. त्यासाठी 25 लाख रुपयांचा निधी दिला जाईल, असेही मंत्री डॉ. उईके यांनी सांगितले.

कातकरी समाजासाठी स्वतंत्र पॅकेज

कातकरी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात स्वतंत्र पॅकेज दिले जाईल. त्या माध्यमातून कातकरी समाजाचे आर्थिक सक्षमीकरण करण्यात येईल. तसेच त्यांना विविध योजनांच्या माध्यमातून लाभ दिले जातील, असेही मंत्री डॉ. उईके यांनी सांगितले. दरम्यान, मेळाव्याच्या परिसरात उभारण्यात आलेल्या विविध स्टॉलला भेट देत विविध वस्तूंची पाहणी केली. प्रकल्प अधिकारी श्री. चौहान यांनी प्रास्ताविक केले.

भौगोलिक परिस्थितीनुसार योजना कराव्यात : मंत्री नरहरी झिरवाळ

शासनाकडून विविध योजना तयार केल्या जातात.  या योजना भौगोलिक परिस्थितीनुसार तयार करण्याची गरज आहे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे मुख्यालय पुणे येथे आहे. पुण्यात आदिवासी समाजाची लोकसंख्या कमी आहे. संशोधनासाठी या संस्थेचे उपकार्यालय नाशिक, धुळे अथवा नंदुरबार येथे सुरू करावे, अशी अपेक्षा अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री. झिरवाळ यांनी व्यक्त केली.

कातकरी समाजासह इतर समाजातील लाभार्थ्यांनी स्वानुभव कथन केले. त्यात लता अहिरे यांनी अनुदानामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे सोपे झाल्याचे सांगितले. यावेळी शाम गावित, नवनाथ कोळी यांनी मनोगत व्यक्त केले.

शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र आघाडीवर राहील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 13 : राज्यातील शालेय शिक्षकांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. त्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देऊन चांगले परिवर्तन घडू शकते. या बळावर महाराष्ट्र शालेय शिक्षणामध्ये नक्कीच आघाडीवर राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्ये शिकविण्यावर भर द्यावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

येत्या १०० दिवसात करावयाची कामे आणि उपाययोजना याबाबतच्या आराखड्यावर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, पणन मंत्री जयकुमार रावल, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मेघना साकोरे बोर्डीकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव आदी उपस्थित होते. प्रधान सचिव श्री.देओल यांनी सादरीकरणाद्वारे विभागाच्या आराखड्याची माहिती दिली.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, शासनाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. त्यांना घडविणारे उत्कृष्ट शिक्षक ही मोठी संपत्ती आहे, त्यांचा इतरांसाठी आदर्श म्हणून उपयोग करा. वेळोवेळी उपयुक्त ठरणाऱ्या शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या माहितीकरिता शाळा आणि शिक्षकांचा वेळ वाया जाऊ नये यासाठी ही माहिती डिजिटल स्वरूपात एकत्र करा. पूर्व प्राथमिक शिक्षणाची नोंदणी करून त्यांना कमीत कमी कोणत्या बाबी आवश्यक असाव्यात हे सांगून त्यांना प्रमाणपत्र द्या, पालकांचा विश्वास रहावा यासाठी हे प्रमाणपत्र त्यांनी दर्शनी भागात लावण्याची अट असावी, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

विद्यार्थिनींना सायकल वाटप केल्यामुळे त्यांचे शाळेत येण्याचे प्रमाण वाढल्याचे सिद्ध झाले आहे. ही योजना सुरू राहावी, असे सांगून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या शाळेतील पहिल्या दिवसाचे स्वागत करा. यासाठी सर्व मंत्री, सचिव यांच्यासह मान्यवरांना पहिल्या दिवशी शाळेत जाण्यासाठी सूचित करा. समूह शाळा ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि आवश्यक बाब आहे. तथापि, कमी संख्या असणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना समूह शाळांमुळे होणारे लाभ योग्य प्रकारे समजावून सांगा, असे निर्देश त्यांनी दिले.

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण देण्यावर भर

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी येत्या 100 दिवसात करावयाच्या उपाययोजनांचा आराखडा सादर केला. प्रत्येक बाबतीत सकारात्मक विचार घेऊन पुढे जाणार असल्याचे ते म्हणाले. शाळा परिसर आणि विद्यार्थ्यांची वैयक्तिक स्वच्छता, नीटनेटकेपणा, सीबीएसई पॅटर्नचा अंगिकार करून त्यात राज्याप्रमाणे आवश्यक बदल करणे, शाळांना गुणवत्तेनुसार रँकिंग देणे, एका केंद्रात किमान एका शाळेमध्ये दहावीपर्यंत शिक्षण व्यवस्था निर्माण करून त्या शाळा आदर्श तर त्यातील एक वर्ग स्मार्ट वर्ग करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण देण्यावर भर देणार असल्याचे ते म्हणाले.

शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी नियोजन

शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणाले की, उच्च शिक्षणामध्ये मराठी शाळेतील विद्यार्थी उत्कृष्ट कामगिरी करीत असल्याचे दिसून येत आहे. शालेय जीवनात शाळांमध्ये उत्कृष्ट भौतिक सुविधा मिळाव्यात यासाठी कोणकोणत्या माध्यमातून निधी उपलब्ध होईल त्याचबरोबर सामाजिक उत्तरदायित्व निधीचा योग्य वापर करता येईल, त्याचे नियोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांना आदर्श बनवून त्यांच्या प्राविण्याला प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे ते म्हणाले. सर्व मान्यवरांनी आपल्या भागातील एक शाळा दत्तक घेऊन त्या शाळेच्या उन्नतीसाठी नियमित भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. दीर्घकालीन उपाययोजनांबाबत असे म्हणाले, वीटभट्ट्यांवर जाणारे, ऊसतोड कामगार तसेच शेतीकाम करणाऱ्यांच्या शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी नियोजन करण्यात येईल. संस्थाचालक आणि शिक्षक यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली असून त्यातून निघालेले सकारात्मक निष्कर्ष स्वीकारुन काम करणार असल्याचेही श्री.भुसे यांनी सांगितले.

ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षण प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अभ्यासक्रमाव्यतिरिक्त कला, क्रीडा आदी विषयांकरिता किमान केंद्रस्तरावर शिक्षक असावेत, मुले मराठी शाळांमध्ये शिक्षण घेतील यासाठी प्रयत्न करावेत आदी सूचना केल्या. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी विद्यार्थ्यांचे आधार लिंक करण्याची कामे लवकर पूर्ण करावीत. तसेच शाळांच्या विकासासाठी समग्र शिक्षाच्या निधीचा वापर करावी, अशी सूचना यावेळी उपस्थित मान्यवरांनी केली.

*अन्य ठळक मुद्दे :*

  • राज्यगीत सर्व शाळांमध्ये सक्तीचे तसेच मराठी भाषेची प्रभावी अंमलबजावणी करणार.
  • राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील संरचना लागू करण्यासाठी सर्व शाळा/ अंगणवाडी केंद्रांचे जिओ टॅगिंग करून छायाचित्रांसह मॅप करणार.
  • राज्य अभ्यासक्रम आराखडा 2025-26 पासून लागू करणार.
  • पीएम श्री शाळा योजनेच्या धर्तीवर प्रत्येक क्लस्टरमधून एका शाळेचा सीएम श्री शाळा म्हणून विकास करणार.
  • सर्व विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकांची वैधता तपासणार.
  • शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करून बळकटीकरण करणार.
  • शिक्षक भरती प्रक्रिया जलद गतीने राबविणार.

००००

बी.सी.झंवर/विसंअ/

ताज्या बातम्या

गुणात्मक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन मॉडेल तयार करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम किरणोपचार प्रणालीचे लोकार्पण छत्रपती संभाजीनगर, दि.२७ (विमाका): सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या समन्वयातून आरोग्य सेवेतील त्रिस्तरीय यंत्रणा पुढील...

शासकीय कर्करोग रुग्णालयात ट्रू बीम लिनियर ॲक्सलरेटर प्रणालीचे लोकार्पण

0
छत्रपती संभाजीनगर, दि.२७: छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम युनिट या कर्करोगावरील अतिविशेष उपचार देणाऱ्या अत्याधुनिक यंत्र प्रणालीचे व कर्करोग संस्थेच्या इमारतीच्या विस्तारीत...

शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पुणे, दि. २७: आज महाराष्ट्राची ५० टक्के लोकसंख्या ५०० शहरात आणि उर्वरित लोकसंख्या ४० हजार गावात राहते आहे. शहरांचा चेहरा आपण बदलू शकल्यास ५०...

पारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवेसाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम

0
राज्यातील नागरिकांना दिल्या जाणा-या सेवा पारदर्शक, गतिमान व कालबध्द पध्दतीने देण्याकरीता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ पारित करण्यात आला आहे.  हा अधिनियम २८ एप्रिल,...

महाराष्ट्रातील जनतेचा तसेच प्रशासनाचा ‘सेवा हक्क दिन’

0
महाराष्ट्र शासनाने दिनांक १ एप्रिल २०२५ रोजी '२८ एप्रिल' हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या जनतेसाठी तसेच सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे....