सोमवार, एप्रिल 28, 2025
Home Blog Page 248

योजना, निर्णयांची माहिती लोकांपर्यंत प्रभावीरित्या पोहोचविण्यासाठी डिजिटल माध्यम धोरण तयार करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 13 : शासनाच्या विविध योजना, उपक्रम, शासकीय निर्णय इत्यादी माहिती लोकांपर्यंत जलद गतीने आणि प्रभावीरित्या पोहोचविण्यासाठी शासनाचे डिजिटल माध्यम धोरण लवकरच तयार करण्यात येईल. यासाठी यापुढील काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्राचा वापर करण्यात येईल. विविध नवमाध्यमांचा प्रभावी वापर करून शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

राज्य शासनाच्या शंभर दिवस आराखड्यासंदर्भात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा आढावा घेतला. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, ‘माहिती व जनसंपर्क’चे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह आदी उपस्थित होते.

 

प्रधान सचिव तथा महासंचालक श्री. सिंह यांनी सादरीकरणाद्वारे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या १०० दिवसांच्या आराखड्याचे सादरीकरण केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कामकाजात यापुढे कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्यावर भर द्यावा. डिजिटल माध्यम धोरण तयार करून नवमाध्यमांचा प्रभावी वापर करून शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

श्री. फडणवीस म्हणाले की, राज्यात येणाऱ्या मान्यवरांना महाराष्ट्राचे विविध पैलू दर्शवणारे  कॉफी टेबल बुक तयार करावे. राज्य शासन घेत असलेले निर्णय, योजना व उपक्रमांची माहिती लोकांपर्यंत सर्व माध्यमांद्वारे जाणे आवश्यक आहे. राज्य शासनाच्या प्रतिमा संवर्धनासाठी व माहिती पोहोचविण्यासाठी एआय न्यूजरुम तयार करुन त्याद्वारे माहिती लवकरात लवकर प्रसारित करण्याचे नियोजन करावे. त्यासाठी आवश्यक साहित्य, मनुष्यबळ घेण्यात यावे. पत्रकारांसाठी असलेल्या आरोग्यविषयक तसेच इतर विविध कल्याणकारी योजनांना गती देण्यात यावी. पत्रकार पुरस्कारांचे लवकर वितरण करण्याचे नियोजन करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

राज्यस्तरावर संदर्भ कक्ष

शासकीय योजना, उपक्रम यांची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी राज्यस्तरावर संशोधन आणि संदर्भ कक्ष स्थापन करण्यात यावे. तसेच वर्तमानपत्रे व इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच डिजिटल माध्यमांद्वारेही योजना, निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी डिजिटल मीडिया धोरण लवकरच तयार करण्यात यावे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

– एआयच्या प्रभावी वापरावर भर

– माहिती जलद गतीने पोहोचविण्यासाठी यंत्रणा

– महासंचालनालयाच्या बळकटीकरणावर भर

– सध्या अस्तित्वातील सर्व होर्डिंग हे डिजिटल होर्डिंगमध्ये बदलणार

– सोशल मीडियाचा प्रभावी वापर वाढविणार

– एकाच ठिकाणी माहिती उपलब्धतेसाठी संशोधन आणि संदर्भ कक्ष

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

‘म्हाडा’ने सदनिकांचे काम तातडीने पूर्ण करावे : गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचे आढावा बैठकीत निर्देश

नाशिकदि.13 जानेवारी, 2025 (जिमाका वृत्तसेवा):  नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने (म्हाडा) आपल्या कार्यक्षेत्रातील घरकुलांच्या प्रकल्पांना गती देत त्या संबंधितांना तातडीने हस्तांतरीत करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश गृह (ग्रामीण), शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी  येथे दिले.

मंत्री डॉ. भोयर यांनी आज नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचा (म्हाडा) शासकीय विश्रामगृह येथे आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी म्हाडाचे सभापती रंजन ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवकुमार आवळकंठे, कार्यकारी अभियंता विहार बोडके आदींसह म्हाडाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले की, म्हाडाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घरकुल उपलब्ध होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. तसेच ‘म्हाडा’च्या अडचणी सोडविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. मंत्री डॉ. भोयर यांनी म्हाडाच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आवळकंठे, कार्यकारी अभियंता श्री. बोडके यांनी म्हाडाच्या माध्यमातून नाशिक विभागात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली.

‘एचएमपीव्ही’ विषाणूला घाबरू नका; शासनाच्या सूचनांचे पालन करा

सध्या चीनमध्ये Human Metapneumovirus (HPMV) उद्रेक झाल्याच्या बातम्या येत आहेत. मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे. हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँडस मध्ये 2001 मध्ये आढळला. मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे ज्यामुळे व श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास (सर्दीसारख्या) कारणीभूत ठरते. हा एक हंगामी रोग आहे जो सामान्यतः आरएसव्ही आणि फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो. यानुषंगाने डीजीएचएस आणि संचालक, एन सी डी सी, दिल्ली यांनी दि.03 जानेवारी 2025 रोजी एक निवेदन प्रसिध्द केले आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. वर्ष 2023 च्या तुलनेत डिसेंबर 2024 मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. तथापि खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये, या संदर्भातील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

हे करा:-

  • जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.
  • साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा.
  • ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
  • भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा.
  • संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्या.

हे करू नये:-

  • हस्तांदोलन.
  • टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर.
  • आजारी लोकांशी जवळचा संपर्क.
  • डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे.
  • सार्वजनिक ठिकाणी भुंकणे.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणे.

चीनमधून आलेल्या नवीन विषाणू Human Metapneumovirus (HMPV) अहवालांबाबत चिंतेचे कारण नाही. याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत असून नाहक भितीचे वातावरण निर्माण करण्याची गरज नाही. तथापि या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यक्षेत्रातील सर्वेक्षण अधिक गतिमान करुन सर्दी-खोकला अर्थात आय एल आय/ सारी रुग्णांचे नियमित सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात यावेत, असे आवाहन आरोग्य सेवा, पुणेचे संचालक डॉ.नितीन अंबाडेकर यांनी केले आहे.

मनोज सुमन शिवाजी सानप

जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे

विलास भुमरे यांनी घेतली विधानसभा सदस्यपदाची शपथ

मुंबई, दि. 13 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये पैठण येथून निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार विलास संदिपानराव भुमरे यांनी विधानसभा सदस्यपदाची विधानभवन येथे शपथ घेतली. विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर उपस्थित होते.

यावेळी खासदार संदीपान भुमरे, सचिव जितेंद्र भोळे, अध्यक्षांचे सचिव सुनील वाणी, यांच्यासह विधिमंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

000

श्रद्धा मेश्राम/स.सं

महाज्योती संस्थेमार्फत पाच जिल्ह्यांमध्ये उत्कृष्टता केंद्र सुरू करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १३  : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व‎ प्रशिक्षण संस्थेमार्फत विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचे कोचिंग आणि फेलोशिपसारख्या योजना राबविण्यात येतात. महाज्योती संस्थेमार्फत पुणे, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या पाच प्रमुख जिल्ह्यांमध्ये उत्कृष्टता केंद्र (Excellence Centres) स्थापन करण्यात येणार असून या केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला.

या बैठकीस इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या ‘विजाभज’ प्रवर्गाच्या खासगी अनुदानित निवासी आश्रमशाळामधील विद्यार्थ्यांना तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक गुणवत्तेचे शिक्षण डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी डिजिटल क्लासरूम प्रकल्प राबविण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) च्या धर्तीवर विमुक्त जाती व भटक्या जमाती करिता सीड अंतर्गत (Scheme for Economic Empowerment of DNT’S) घरकुले बांधण्यासाठी योजना राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ आणि वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांतर्गत एकूण १८ महामंडळे स्थापन करण्यात आली असून या महामंडळांच्या लाभार्थ्यांकरिता वेब पोर्टलची निर्मिती तात्काळ करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.

महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची कर्ज मर्यादा वाढविण्याबाबतही प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात यावा. इतर मागास प्रर्वगातील मुला-मुलींसाठी  जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृहे सुरु करण्याबाबत जागा उपलब्धेसाठी मुख्य सचिव यांच्याकडे  संबंधित जिल्ह्यातील  जिल्हाधिकारी यांच्यासमवेत बैठक घेण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

या बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिक, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल यांच्यासह विविध विभागांचे प्रधान सचिव, अपर मुख्य सचिव, सचिव उपस्थित होते.

०००००

शैलजा पाटील/विसंअ

‘न्युक्लिअस’अंतर्गत लाभार्थ्यांना २ लाख रुपयांपर्यंत मिळणार अनुदान : आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके

नाशिकदि.13 जानेवारी, 2025 (जिमाका वृत्तसेवा):  न्यूक्लिअस बजेट योजनेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना अनुदान दिले जाते. या योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात येईल. आगामी काळात लाभार्थ्यांना २ लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाईल. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.

महाकवी कालिदास कलामंदिरात मंत्री डॉ. उईके यांच्या उपस्थितीत आदिवासी विकास विभागातील लाभार्थ्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार राजेश पाडवी, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त संदीप गोलाईत, उपायुक्त सुदर्शन नगरे, प्रकल्प अधिकारी अर्पित चौहान, अकुनुरी नरेश आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात विविध बचतगट, भजनी मंडळ तसेच वैयक्तिक लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण मंत्री डॉ. उईके यांच्या हस्ते करण्यात आले.

महिला बचतगटांना पुरेसा निधी उपलब्ध करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. विविध योजनांचा लाभ देण्यासाठी प्रकल्प कार्यालयाने वर्षभराचे वेळापत्रक तयार करून लाभ द्यावा. महिला लाभार्थ्यांसाठी तालुकानिहाय बचत भवन उभारावे. त्यासाठी 25 लाख रुपयांचा निधी दिला जाईल, असेही मंत्री डॉ. उईके यांनी सांगितले.

कातकरी समाजासाठी स्वतंत्र पॅकेज

कातकरी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात स्वतंत्र पॅकेज दिले जाईल. त्या माध्यमातून कातकरी समाजाचे आर्थिक सक्षमीकरण करण्यात येईल. तसेच त्यांना विविध योजनांच्या माध्यमातून लाभ दिले जातील, असेही मंत्री डॉ. उईके यांनी सांगितले. दरम्यान, मेळाव्याच्या परिसरात उभारण्यात आलेल्या विविध स्टॉलला भेट देत विविध वस्तूंची पाहणी केली. प्रकल्प अधिकारी श्री. चौहान यांनी प्रास्ताविक केले.

भौगोलिक परिस्थितीनुसार योजना कराव्यात : मंत्री नरहरी झिरवाळ

शासनाकडून विविध योजना तयार केल्या जातात.  या योजना भौगोलिक परिस्थितीनुसार तयार करण्याची गरज आहे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे मुख्यालय पुणे येथे आहे. पुण्यात आदिवासी समाजाची लोकसंख्या कमी आहे. संशोधनासाठी या संस्थेचे उपकार्यालय नाशिक, धुळे अथवा नंदुरबार येथे सुरू करावे, अशी अपेक्षा अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री. झिरवाळ यांनी व्यक्त केली.

कातकरी समाजासह इतर समाजातील लाभार्थ्यांनी स्वानुभव कथन केले. त्यात लता अहिरे यांनी अनुदानामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे सोपे झाल्याचे सांगितले. यावेळी शाम गावित, नवनाथ कोळी यांनी मनोगत व्यक्त केले.

शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र आघाडीवर राहील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 13 : राज्यातील शालेय शिक्षकांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. त्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देऊन चांगले परिवर्तन घडू शकते. या बळावर महाराष्ट्र शालेय शिक्षणामध्ये नक्कीच आघाडीवर राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्ये शिकविण्यावर भर द्यावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

येत्या १०० दिवसात करावयाची कामे आणि उपाययोजना याबाबतच्या आराखड्यावर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, पणन मंत्री जयकुमार रावल, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मेघना साकोरे बोर्डीकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव आदी उपस्थित होते. प्रधान सचिव श्री.देओल यांनी सादरीकरणाद्वारे विभागाच्या आराखड्याची माहिती दिली.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, शासनाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. त्यांना घडविणारे उत्कृष्ट शिक्षक ही मोठी संपत्ती आहे, त्यांचा इतरांसाठी आदर्श म्हणून उपयोग करा. वेळोवेळी उपयुक्त ठरणाऱ्या शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या माहितीकरिता शाळा आणि शिक्षकांचा वेळ वाया जाऊ नये यासाठी ही माहिती डिजिटल स्वरूपात एकत्र करा. पूर्व प्राथमिक शिक्षणाची नोंदणी करून त्यांना कमीत कमी कोणत्या बाबी आवश्यक असाव्यात हे सांगून त्यांना प्रमाणपत्र द्या, पालकांचा विश्वास रहावा यासाठी हे प्रमाणपत्र त्यांनी दर्शनी भागात लावण्याची अट असावी, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

विद्यार्थिनींना सायकल वाटप केल्यामुळे त्यांचे शाळेत येण्याचे प्रमाण वाढल्याचे सिद्ध झाले आहे. ही योजना सुरू राहावी, असे सांगून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या शाळेतील पहिल्या दिवसाचे स्वागत करा. यासाठी सर्व मंत्री, सचिव यांच्यासह मान्यवरांना पहिल्या दिवशी शाळेत जाण्यासाठी सूचित करा. समूह शाळा ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि आवश्यक बाब आहे. तथापि, कमी संख्या असणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना समूह शाळांमुळे होणारे लाभ योग्य प्रकारे समजावून सांगा, असे निर्देश त्यांनी दिले.

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण देण्यावर भर

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी येत्या 100 दिवसात करावयाच्या उपाययोजनांचा आराखडा सादर केला. प्रत्येक बाबतीत सकारात्मक विचार घेऊन पुढे जाणार असल्याचे ते म्हणाले. शाळा परिसर आणि विद्यार्थ्यांची वैयक्तिक स्वच्छता, नीटनेटकेपणा, सीबीएसई पॅटर्नचा अंगिकार करून त्यात राज्याप्रमाणे आवश्यक बदल करणे, शाळांना गुणवत्तेनुसार रँकिंग देणे, एका केंद्रात किमान एका शाळेमध्ये दहावीपर्यंत शिक्षण व्यवस्था निर्माण करून त्या शाळा आदर्श तर त्यातील एक वर्ग स्मार्ट वर्ग करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण देण्यावर भर देणार असल्याचे ते म्हणाले.

शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी नियोजन

शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणाले की, उच्च शिक्षणामध्ये मराठी शाळेतील विद्यार्थी उत्कृष्ट कामगिरी करीत असल्याचे दिसून येत आहे. शालेय जीवनात शाळांमध्ये उत्कृष्ट भौतिक सुविधा मिळाव्यात यासाठी कोणकोणत्या माध्यमातून निधी उपलब्ध होईल त्याचबरोबर सामाजिक उत्तरदायित्व निधीचा योग्य वापर करता येईल, त्याचे नियोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांना आदर्श बनवून त्यांच्या प्राविण्याला प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे ते म्हणाले. सर्व मान्यवरांनी आपल्या भागातील एक शाळा दत्तक घेऊन त्या शाळेच्या उन्नतीसाठी नियमित भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. दीर्घकालीन उपाययोजनांबाबत असे म्हणाले, वीटभट्ट्यांवर जाणारे, ऊसतोड कामगार तसेच शेतीकाम करणाऱ्यांच्या शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी नियोजन करण्यात येईल. संस्थाचालक आणि शिक्षक यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली असून त्यातून निघालेले सकारात्मक निष्कर्ष स्वीकारुन काम करणार असल्याचेही श्री.भुसे यांनी सांगितले.

ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षण प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अभ्यासक्रमाव्यतिरिक्त कला, क्रीडा आदी विषयांकरिता किमान केंद्रस्तरावर शिक्षक असावेत, मुले मराठी शाळांमध्ये शिक्षण घेतील यासाठी प्रयत्न करावेत आदी सूचना केल्या. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी विद्यार्थ्यांचे आधार लिंक करण्याची कामे लवकर पूर्ण करावीत. तसेच शाळांच्या विकासासाठी समग्र शिक्षाच्या निधीचा वापर करावी, अशी सूचना यावेळी उपस्थित मान्यवरांनी केली.

*अन्य ठळक मुद्दे :*

  • राज्यगीत सर्व शाळांमध्ये सक्तीचे तसेच मराठी भाषेची प्रभावी अंमलबजावणी करणार.
  • राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील संरचना लागू करण्यासाठी सर्व शाळा/ अंगणवाडी केंद्रांचे जिओ टॅगिंग करून छायाचित्रांसह मॅप करणार.
  • राज्य अभ्यासक्रम आराखडा 2025-26 पासून लागू करणार.
  • पीएम श्री शाळा योजनेच्या धर्तीवर प्रत्येक क्लस्टरमधून एका शाळेचा सीएम श्री शाळा म्हणून विकास करणार.
  • सर्व विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकांची वैधता तपासणार.
  • शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करून बळकटीकरण करणार.
  • शिक्षक भरती प्रक्रिया जलद गतीने राबविणार.

००००

बी.सी.झंवर/विसंअ/

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून कोल्हापूर जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आढावा

कोल्हापूर दि.13 :वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत अधिकारी वर्गाचा आढावा घेतला.  यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कागल येथील एमआयडीसी, संकेश्वर ते बांदा हायवे, गडहिंग्लज येथील क्रीडा संकुल, गडहिंग्लज तालुक्यातील प्रशासकीय इमारत, शहरातील अमृत-२ या नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामासंबंधी तसेच इतर विविध कामांबाबत बैठक घेतली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कुमार कार्तिकेन एस., अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह कागल, गडहिंग्लज तालुक्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी उपस्थित होते.

गडहिंग्लज शहरातील व इतर गावांमधून जाणारा संकेश्वर ते बांधा हायवे वरील स्ट्रीट लाईट बाबत स्थानिकांचे अनेक प्रश्न होते. या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी तसेच अर्जदार यांच्यासोबत या विषयावर चर्चा करण्यात आली. गडहिंग्लज या ठिकाणी येत्या काळात विविध यात्रा तसेच उरूस आयोजित केले जाणार आहेत त्यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग विभाग तसेच स्थानिकांनी एकत्रित चर्चा करून स्ट्रीट लाईट बसवणे बाबत अंतिम निर्णय घ्यावा.  याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांनी येणाऱ्या वीजबिलाबाबत निर्णय घेऊन बसवण्यात येणाऱ्या स्ट्रीट लाईटचा प्रकार ठरवावा असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सूचना दिल्या. याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करा असेही त्यांनी पुढे सांगितले. या बैठकीत ओसवाल एफ.एम. हॅमरेल टेक्स्टाईल या कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित वेतनाबाबत व कंपनी बंद पडल्या बाबत संबंधित कंपनीचे मालक, कामगार आयुक्त कार्यालय तसेच संबंधित कंपनीतील कर्मचारी यांच्यासोबत विविध प्रश्नांवर चर्चा झाली. अर्जदार कामगारांनी याबाबत सविस्तर माहिती सांगून कंपनीकडून कामगारांचे दोन वर्षाचे वेतन थकीत असल्याचे सांगून कंपनीकडून आम्हाला आमच्या मागण्यांबाबत काहीतरी अंतिम शब्द मिळावा अशी विनंती केली. याबाबत कंपनीचे मालक श्री सोनवणे यांनी आठ दिवसाचा कालावधी मागून अंतिम निर्णय घेणार असल्याचे कळवले. तसेच त्यांनी सर्व कामगारांना त्यांचे थकीत वेतन कोणत्याही परिस्थितीत देऊ अशी ग्वाहीही दिली. जानेवारी २४ पर्यंत मुदत दिली असून यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

गडहिंग्लज येथील प्रशासकीय इमारत नव्याने बांधण्याबाबत स्थानिकांकडून मागणी करण्यात आली आहे.  प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी जागा आवश्यक असून यासाठी तहसील कार्यालयाची जागा व पशुसंवर्धन विभागाकडे असलेली जागा अशा दोन जागांचा पर्याय देण्यात आला. जिल्ह्यातील एका जागेची निवड अंतिम करून नव्याने प्रस्ताव सादर करा. यासाठी आवश्यक निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलून तातडीने मंजूर करू अशी ग्वाही मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. गडहिंग्लज शहरातील अमृत दोन या नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामासंबंधी आढावा घेतला. कोल्हापूर शहराजवळ असलेल्या कागल चेक पोस्ट वरील विविध सुविधा तसेच स्थानिक वाहनांना सूट देणे बाबत विविध संघटना तसेच स्थानिकांनी मागणी केली. यावेळी आरटीओ कोल्हापूर, संबंधित चेक पोस्टचे प्रकल्प अधिकारी हितेश पाटील यांच्यासह विविध संघटनांचे तसेच स्थानिक नागरिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. चेक पोस्ट परिसरातील विविध सुविधा तयार करणे बाबत व स्थानिकांना त्या ठिकाणी सूट देणे बाबत येत्या आठ दिवसात निर्णय घेण्याचे सूचना मंत्री मुश्रीफ यांनी दिल्या.

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यटन पोलीस नेमणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.१३ : पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी राज्यात पर्यटन पोलीस नेमण्यात येणार असून नाशिक येथील राम- काल पथ विकास, आणि सिंधुदुर्ग (मालवण) येथील समुद्रातील पर्यटन हे प्रकल्प वॉररूमशी जोडण्यात येतील, केंद्र व राज्य  शासनाकडून राबविण्यात येणारे पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे. यासह राज्य लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत पर्यटन विभागाच्या १४ सेवा ‘आपले सरकार’ संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे आगामी शंभर दिवसात पर्यटन विभागाने करावयाच्या कामकाजाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी घेतला.

यावेळी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, राज्यमंत्री  इंद्रनील नाईक, मुख्य सचिव सुजाता सौनिक,पर्यटन  विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी यांसह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, शासनाकडून  अनुदानित  प्रकल्पामध्ये  नाशिक येथील राम – काल पथ विकास, सिंधुदुर्गातील मालवण येथील  पाण्याखालील  सागरी पर्यटनाचा अनुभव, स्वदेश दर्शन अंतर्गत आंबेगाव पुणे येथे पुरंदर शिवसृष्टी ऐतिहासिक थीम पार्क उभारणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकास, अजंठा वेरूळ पर्यटन विकास ही कामे सुरू करून त्याला गती देण्यात येणार आहे. स्वदेश दर्शन २.० अंतर्गत अहिल्यानगर येथे किल्ल्यावरील पर्यटन आकर्षणासाठी उपक्रम राबविण्या संदर्भातील कामे तातडीने पूर्ण करावी. राज्याच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत अमृत सांस्कृतिक वारसा पालघर येथील आदिवासी विकास पर्यटनाला चालना देणे, शिवसृष्टी थीम पार्क राज्यातील पाच ठिकाणी उभारणे, पंढरपूर येथे सभा मंडप स्कायवॉक या सर्व कामांसाठी सल्लागार नेमून ही कामे तात्काळ सुरू करण्यात यावीत असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.

पर्यटन विभागाने ३१ मार्चपूर्वी उद्योग प्रमाणपत्र, कृषी पर्यटन युनिट नोंदणी प्रमाणपत्र ,साहसी पर्यटन युनिट नोंदणी प्रमाणपत्र, कॅराव्हॅन पर्यटन नोंदणी प्रमाणपत्र, आई महिला उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत नोंदणी, पर्यटन व्हिलाची नोंदणी, पर्यटन अपार्टमेंटची नोंदणी प्रमाणपत्र, होम स्टे नोंदणी प्रमाणपत्र, व्यावसायिक गृहाची पर्यटन नोंदणी प्रमाणपत्र या नवीन सेवा लवकरात लवकर सुरू कराव्यात असेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

राज्यातील पर्यटन पोहचणार आंतरराष्ट्रीय पातळीवर

आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्यातील पर्यटन पोहोचवण्यासाठी विविध फेस्टिवल तसेच ‘रोड शो’ आयोजनाबाबत महाराष्ट्र शासन सहभागी होणार आहे. माद्रिद येथे होणारा फितुर आंतरराष्ट्रीय ट्रेड फेअर, नाशिक येथील ग्लंम्पिंग फेस्टिवल, दिल्ली येथे  होणारा भारत पर्व, पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील हिंदवी स्वराज्य महोत्सव, बर्लिन येथे आयटीबी अंतर्गत, महाबळेश्वर येथे होणारे टुरिझम कॉन्क्लेवमध्ये पर्यटन विभाग सहभागी होणार आहे. याबाबत पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे यांनी सादरीकरण केले.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

पर्यटन विकासासाठी मूलभूत सोयी सुविधा निर्माण करणे, पर्यटन धोरण 2025 अंतर्गत पात्र पर्यटन प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देणे ही कामे प्राधान्याने करावी.

पर्यटन विभागाच्या कामकाजाकरिता ई ऑफिसचा वापर करावा.पर्यटन विभागाची वेबसाईट अद्यावत करावी.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने पर्यटन विभागातील उपक्रम यांना प्रसिद्धी देणे, चॅट बॉट, ऑनलाइन भाषांतर, प्रवासाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देणे या बाबींना प्राधान्य देणार

पर्यटन धोरण २०२४ ची प्रभावी अमंलबजावणी करण्यासाठी वने,नगरविकास,ग्रामविकास, महसूल, गृह आणि ऊर्जा  यांच्याकडून मार्गदर्शक तत्वे व अधिसूचना जाहीर करणार.

मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर आपल्या राज्यातील ज्या स्मारकाकडे पर्यटक आकर्षित होतात ती स्मारके अधिसूचित करण्यासाठी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली  पर्यटन सल्लागार समिती स्थापन करा.

पर्यटन विकासासाठी पुरातत्व व वस्तुसंग्रहालये  संचलनालय विभागाकडून जलद मंजुरी आणि सुविधा  मिळवण्यासाठी प्रयत्न करणार.

प्रत्येक जिल्ह्यात मत्स्यालय, धार्मिक स्थळे, विमानतळ विकसित करा. पहिल्या टप्प्यात शिर्डी, पुणे, नागपूर, शेगाव येथे काम सुरू करणार.

पाटबंधारे विभागाकडे उपलब्ध असलेल्या जमिनीचा काही भाग पर्यटनाव्दारे विकसित करणार.

गोराई आणि मनोरी येथे थीम पार्क विकसित करणे, विंटेज कार संग्रहालये विकसित करणे, मार्कंडा, लोणार येथे टेंट सिटी विकसित करणार.

मार्कंडा, लोणार व कळसूबाई  येथे फिरते तंबू  शहर विकसित करणे, कोकण  किनारपट्टीवरील तारकर्ली आणि काशिद बिचवर ब्ल्यूबीच मोहीम. समुद्रकिनाऱ्यावर वाळू कला प्रशिक्षण आणि पाहण्याची सुविधा निर्माण करण्यासाठी नामवंत कलाकार सुदर्शन पटनायक सारख्या कलाकारांचे सहकार्य घेणार.

००००

संध्या गरवारे/विसंअ

निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी पारदर्शक पद्धतीने पडताळणी प्रक्रिया राबवा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

पुणे, दि. १३: राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या बर्न्ट मेमरी, मायक्रो कंट्रोलरच्या तपासणी आणि पडताळणी प्रक्रियेच्या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी अर्थात यशदा येथे एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेवरील नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवा, असे निर्देश श्री. चोक्कलिंगम यांनी यावेळी दिले.

यावेळी राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, भारत निवडणूक आयोगाचे अवर सचिव कनिष्क कुमार, पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. जितेंद्र डूडी यांच्यासह राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे (बीईएल) अभियंता उपस्थित होते.

श्री. चोक्कलिंगम यावेळी म्हणाले, लोकसभा निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल होती. त्याबाबत न्यायालयाने सुनावण्या घेऊन, पक्षकारांचे म्हणणे ऐकून ईव्हीएम पूर्णतः विश्वसनीय असल्याचा निकाल दिला. याबरोबरच लोकांच्या ईव्हीएममधील मायक्रोकंट्रोलर चीपबाबत ज्या तक्रारी, शंका आहेत त्या देखील दूर व्हाव्यात यासाठी यंत्रणा निर्माण करावी, असे न्यायालयाने भारत निवडणूक आयोगाला निर्देशित केले. त्यादृष्टीने आयोगाने बीईएलच्या साहाय्याने ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या बर्न्ट मेमरी, मायक्रो कंट्रोलरच्या तपासणी आणि पडताळणीसाठी तांत्रिक प्रमाणित कार्यपद्धती तयार केली आहे.

ते पुढे म्हणाले, निवडणुकीनंतर या चीपमध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप करून निकालात बदल (मॅनीप्युलेशन) करण्यात आलेले नाही या बाबत नागरिकांची खात्री करणे यादृष्टीने या कार्यपद्धतीला महत्त्व आहे. लोकांचा निवडणूक प्रक्रियेवर विश्वास राहावा यासाठी ही कार्यपद्धती राबवायची आहे. त्यामुळे ही तपासणी व पडताळणी प्रक्रिया व्यवस्थितरित्या राबविण्याची मोठी जबाबदारी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांवर आहे. ही नवीन पद्धती असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी समजून घ्यावी यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे श्री. चोक्कलिंगम म्हणाले.

किरण कुलकर्णी म्हणाले, राजकीय पक्ष आणि उमेदवारांमधील संभ्रम दूर व्हावा या उद्देशाने या कार्यपद्धतीबाबत संक्षिप्त माहिती देणे ही जिल्हा निवडणूक अधिकारी यांची जबाबदारी आहे. त्यादृष्टीने पक्ष आणि उमेदवारांसोबत बैठक आयोजित करण्यात यावी, असेही ते म्हणाले.

यावेळी बीईएलच्या अभियंत्यांनी या तांत्रिक कार्यपद्धतीबाबत सादरीकरण केले तसेच ईव्हीएमच्या बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅटच्या पडताळणीचे प्रात्यक्षिक करून दाखवले. जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी मांडलेल्या विविध शंकांचे निरसनही यावेळी करण्यात आले.

0000

ताज्या बातम्या

दशकपूर्ती महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची!

0
राज्यातील नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध पद्धतीने लोकसेवा देता याव्या यासाठी शासनाने 'महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015' लागू केला आहे. यामुळे शासकीय आणि निमशासकीय...

देशाची आरोग्य व्यवस्था जगात सर्वात सक्षम आणि मोठी – केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा

0
छत्रपती संभाजीनगर, दि. २७ (जिमाका): जगात आपल्या देशाची आरोग्य व्यवस्था सर्वात मोठी असून या आरोग्यव्यवस्थेने प्रगती केली आहे. लसीकरण, महिलांचे आरोग्य, बाल आरोग्य तसेच...

सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार – विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

0
अमरावती, दि. २६: विधान परिषदेचे सभापती पद हे संविधानिक पद आहे. या पदाला समन्वय साधण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे या समन्वयातूनच येत्या काळात सर्व घटकांना...

महाहौसिंगने परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीचा वेग वाढवावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
मुंबई दि. २७: महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ म्हणजेच महाहौसिंगने प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या बांधकामांना गती देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. त्यांना येणाऱ्या अडचणींवर शासनाच्या स्तरावरून...

पनवेल महानगरपालिकेच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्रातून गुणवत्ताधारक खेळाडू घडतील – मंत्री ॲड. आशिष शेलार

0
मुंबई, दि. २७ : पनवेल महापालिकेने उभारलेल्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राची व्यवस्था उत्तम आहे. या प्रशिक्षण केंद्रासाठी महापालिकेने दिलीप वेंगसरकर यांची अगदी अचूक निवड केली...