शनिवार, मे 24, 2025
Home Blog Page 252

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. ६ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार या विविध पुरस्कारांसाठी दि. १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन सामाजिक न्याय विभागामार्फत करण्यात आले आहे.

इच्छुक स्वयंसेवी संस्था व व्यक्ती यांनी पुरस्कारासाठी त्यांचे विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे दि. १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सर्व नमूद कागदपत्रांसह दाखल करावेत. अर्जाचा नमुना संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण यांचे कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या पुरस्काराची जाहिरात व अर्जाचा नमुना शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याच्या सहायक आयुक्त, समाजकल्याण या कार्यालयाशी संपर्क साधावा.

0000

शैलजा पाटील /वि.सं.अ/.

अंगणवाडी भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

मुंबई, दि. 6 : महिला व बालविकास विभागाअंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडीत पर्यवेक्षकीय अधिकारी, संरक्षण अधिकारी, अधीक्षक ही पदे भरण्यात येत आहेत. भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शक पद्धतीने होणार असून, कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.

राज्य शासनाच्या 100 दिवस उद्दिष्टपूर्ती अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील रिक्त पदांची भरती विभाग करीत आहे. परीक्षा केंद्रांवर जॅमर बसविण्यास येणार आहे. सरळसेवा व पदोन्नती प्रकारातील पद भरती प्रक्रिया संदर्भातही कार्यवाही सुरू आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी शासन यंत्रणा सज्ज असून, उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

 

क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाने सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्राची मोठी हानी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ६ : क्रीडा समीक्षणात साहित्यविश्वाचे सौंदर्य ओतून आपल्या ओघवत्या कथनशैलीमुळे क्रीडाक्षेत्राची आवड मनामनांत पेरणारे प्रसिद्ध समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनामुळे मराठीच्या सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

आपल्या शोक संदेशात उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, द्वारकानाथ संझगिरी हे साक्षेपी साहित्यिक, पत्रकार, स्तंभलेखक आणि चित्रवाणी कार्यक्रमांचे निर्माते अशा विविध क्षेत्रांत ठसा उमटविणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनाने एका मिश्किल आणि खुमासदार शैलीच्या क्रीडा पत्रकाराला महाराष्ट्र मुकला आहे.

उत्कृष्ट पत्रकारिता, लेखनशैली, समीक्षा अशा अनेक गुणांनी संपन्न असलेल्या संझगिरी यांनी मराठी, इंग्रजी आदी भाषांतील लेखनातून वाचकांशी साधलेल्या संवादाचा धागा तुटला आहे. त्यांच्या असंख्य पुस्तकांनी मराठी वाचकांना आनंद दिला आणि त्यांचे अनुभवविश्व समृद्ध केले. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी दीर्घकाळ जाणवत राहील, असेही उपमुख्यमंत्र्यांनी शोक संदेशात म्हटले आहे.

००००

महाराष्ट्राच्या क्रिकेट प्रेमाची ख्याती जगभर पोहोचवणारा आवाज निमाला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ६ :- महाराष्ट्राच्या क्रिकेट प्रेमाची ख्याती जगभर पोहोचवणारा व मिरवणारा आवाज या खेळातील संज्ञेप्रमाणेच अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनामुळे आज निमाला, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक, लेखक द्वारकानाथ संझगिरी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणतात, महाराष्ट्राचे क्रिकेट प्रेम सर्वश्रृत आहे. पण या प्रेमाची जगभर ख्याती मिरवण्याची किमया संझगिरी यांनी साधली. क्रिकेट सामन्यांचे ओघवत्या शैलीतील त्यांच्या वृत्तांकनांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यांचे क्रिकेट समीक्षण रसरशीत आणि तितकेच रोमांचक असे. क्रिकेट शिवाय नाटक, चित्रपटांचे लेखन यांसह अनेकविध क्षेत्रात त्यांनी मुशाफिरी केली. क्रिकेट या खेळावर त्यांनी अखेरपर्यंत निस्सीम प्रेम केले. त्यांच्या निधनाने एक उत्कट क्रीडाप्रेमी, क्रिकेट विषयीच्या लेखन-समीक्षणाने मराठी साहित्यात मोलाची भर घालणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांचे चाहते, कुटुंबियांच्या आम्ही दुःखात सहभागी आहोत, असे नमूद करून, मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक, लेखक द्वारकानाथ संझगिरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

0000

क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाने हरहुन्नरी समीक्षकाला मुकलो-क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई,दि.६:- प्रख्यात क्रिकेट समीक्षक, लेखक द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाने क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. क्रिकेटवर लिहिणे, बोलणे आणि मराठी साहित्यातली रुची यामुळे त्यांनी क्रिकेट प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांच्या निधनाने हरहुन्नरी समीक्षकाला मुकलो असल्याची शोकभावना क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली आहे.

आपल्या शोकसंदेशात क्रीडा मंत्री श्री. भरणे म्हणतात की, मराठमोळे समीक्षक म्हणून द्वारकानाथ संझगिरी यांची ओळख होती. क्रिकेटचा सामना आपल्या लेखणीतून समोर उभा करण्याचे त्यांचे कोशल्य अतुलनीय होते. म्हणूनच क्रिकेट चाहत्यांनी त्यांच्या लेखणीला कायमच दाद दिली. क्रिकेटची माहिती देणारा, त्यातली सौंदर्यस्थळं आपल्या लेखणीने अचूक मांडणारा लोकप्रिय असा अवलिया समीक्षक आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाने हरहुन्नरी लेखणी शांत झाली आहे. त्यांचे लोकप्रिय व्यक्तिमत्व, त्यांचे लेखन क्रिकेट रसिकांच्या नेहमीच स्मरणात राहील. मी या प्रख्यात मराठमोळ्या समीक्षकाला श्रद्धांजली वाहतो. संझगिरी कुटुंबियांवर, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकावर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखात आम्ही सहभागी आहोत.अशा शब्दात क्रीडा मंत्री श्री. भरणे यांनी शोकभावना व्यक्त केली आहे.
0000000

क्रिकेटरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा क्रीडाविश्वाचा चालताबोलता ज्ञानकोष हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. ६ :- कोट्यवधी क्रिकेटरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा क्रीडाविश्वाचा चालताबोलता ज्ञानकोष हरपला आहे. प्रदीर्घ काळ क्रीडा पत्रकारिता केलेल्या द्वारकानाथ संझगिरी यांच्याकडे क्रिकेटसह क्रीडा विश्वातील रंजक गोष्टींचा खजिना होता. रंजक गोष्टी खुमासदार शैलीत लिहिण्याची, सांगण्याची कला अवगत होती. या कलागुणांच्या जोरावर त्यांनी कोट्यवधी क्रिकेटरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांचं निधन ही महाराष्ट्राला चटका लावणारी घटना आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातलं त्यांचं स्थान अढळ आणि योगदान अविस्मरणीय आहे. संझगिरी यांनी पत्रकारितेच्या पलिकडे जावून क्रिकेट, क्रीडाक्षेत्राची खेळाची सेवा केली. खेळांचा आत्मा समजून घेत खेळ, खेळाडूं आणि क्रीडारसिकांना जोडण्याचं काम केलं. क्रीडाक्षेत्रातील घटना, त्या घटनेचं विश्लेषण खुमासदार लेखनशैली, जिवंत समालोचनाद्वारे रसिकांपर्यंत पोहचवण्याचं काम केलं. क्रिकेटसह सर्वच क्रीडा प्रकारांबद्दल त्यांना सखोल ज्ञान होतं. खेळांमधले बारकावे समजावून सांगण्याची शैली अद्वितीय होती. त्यांच्याकडे बघत क्रीडा पत्रकार, क्रीडारसिकांच्या अनेक पिढ्या मोठ्या झाल्या. त्यांच्या निधनाने मराठी क्रीडा पत्रकारितेतील दीपस्तंभ ढासळला आहे. क्रीडा पत्रकारिता आणि क्रीडाक्षेत्राच्या इतिहासात त्यांचं नाव अजरामर राहणार आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली आहे.
——०००००——

कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांनी शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली – राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे

सोलापूर, दि.05 : कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांनी 1934 साली बार्शी येथे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली . खेड्यापाड्यातील मुले शिक्षणापासूण वंचित  राहू नये, त्यांना चांगले शिक्षण घेता यावं यासाठी वसतिगृह काढले. मामांचे शैक्षणिक कार्य अत्यंत प्रतिकूल परस्थितीत निर्माण झाले असून,  त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली. असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले.

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे पुरस्कार प्रदान सोहळा कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर, पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शीचे अध्यक्ष डॉ. बी.वाय.यादव, उपाध्यक्ष श्री.एन. एन. जगदाळे, जनरल सेक्रेट्ररी श्री.पी.टी.पाटील, जाँईट सेक्रेटरी श्री.ए.पी.टेबडवार,खजिनदार श्री.शितोळे, विदयार्थी,आदी मान्यवर  मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, वसतिगृह चालविण्यासाठी  मामांनी  लोकांकडून धान्य गोळा करणे निधीची उपलब्धता करणे यासाठी अथक प्रयत्न केले. वसतिगृह चांगल्या प्रकारे सुरू झाले. लोकांनी दिलेले दान सत्पात्री लागावं आणि ते जगदाळे मामांच्या रूपाने सत्पात्री लागत होतं त्यामुळे लोकांनीही भरभरून दान दिले. महाराष्ट्रात कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी शिंदे यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी  या संस्थेचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. डॉ. अनिल काकोडकर, डॉ. रघुनाथ माशेलकर. या दोन्ही व्यक्तींचे कर्तव्य मोठे आहे. शास्त्रज्ञाला स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतः कष्ट करून मोठे व्हावे लागते असेही  त्यांनी यावेळी सांगितले.

सर्वसामान्य लोकांपर्यंत शिक्षण पोहचविण्याचे काम तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविण्याचे प्रचंड मोठे काम डॉ.मामासाहेब जगदाळे यांनी केले असल्याचे डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी सांगितले.

कार्यक्रमाप्रसंगी  डॉ.अनिल काकोडकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, यांना राज्यपाल श्री.हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह,सन्मानपत्र रुपये एक लाख रुपयांचा धनादेश देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नवतंत्रज्ञान जाणून घेण्याच्या विद्यार्थ्यांच्या उत्सुकतेला नाविन्यपूर्ण उपक्रमांची जोड आवश्यक –  शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

नागपूर,दि.5 : शिक्षक हा शिक्षण विभागाचा मानबिंदू तर विद्यार्थी हे दैवत आहे. विद्यार्थ्यांची शाळेतील पटसंख्या वाढविण्यासह त्यांच्या मनात शिक्षणाविषयी अधिक गोडी निर्माण व्हावी यासाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे आहे. बदलत्या तंत्रज्ञानाप्रमाणे मुलांची आकलन क्षमता व नवतंत्रज्ञान जाणून घेण्याच्या उत्सुकतेला शिक्षकांनी नाविन्यपूर्ण उपक्रमाची जोड द्यावी, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

सिव्हील लाईन्स येथील सेंट उर्सूला गर्ल्स हायस्कूल येथे नागपूर विभागातील उपक्रमशील शिक्षक या विषयावर विभागातील सर्व शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी व प्रयोगशील शिक्षक यांच्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.  या चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी, शिक्षण उपसंचालक दिपेंद्र लोखंडे उपस्थित होते.

परिपूर्ण शिक्षणाची प्रक्रिया ही सामूहिक कृतीशी निगडीत आहे. सर्व विषय शिक्षकांच्या सांघिक भावनेत आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  प्राथमिक व माध्यमिक शिक्षणावर दूरदृष्टी ठेवून मूलभूत विकासाचा संकल्प केला आहे.  विविध आव्हानांवर मात करीत ग्रामीण, दुर्गम भागातील शिक्षकांनी दिलेले योगदान हे मोलाचे आहे. अशा सकारात्मक योगदानातून नागपूर शिक्षण विभागाचा अपूर्व ठसा निर्माण झाल्याचे गौरोद्गार शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी काढले.

अनेक जिल्ह्यातील शाळेत विविध समस्या आहेत त्या दूर करण्याचा शासनातर्फे प्रयत्न करण्यात येईल.  उत्तम शिक्षणासाठी अनुभवाच्या आधारावर शिक्षकांनी केलेले कष्ट वाया जाणार नाही याची मला खात्री आहे. शिक्षकांना मानसन्मान कसा मिळेल याकडे शिक्षण विभागाचे लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.

चर्चासत्रात नागपूर विभागातील 70 तालुक्याचे शिक्षक सहभागी झाले होते. दुर्गम, आदिवासी बहुल भागात केलेल्या कार्याचा प्रयोगशिल शिक्षकांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. प्रत्येक जिल्हृयातील दोन आदर्श शिक्षकांनी आपले सादरीकरण सादर केले. यात एक पाऊल गुणवत्तेकडे, भौतिक सुविधा, लोकसहभागातून शालेय शिक्षणास प्रोत्साहन, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, माझी जिव्हाळयाची शाळा, सुरक्षित व सुयोग्य तंत्रज्ञान, विज्ञानाची जिज्ञासा, रात्र शाळा, 365 दिवस शाळा, वाढदिवस पालकांचा उपक्रम, विद्यार्थ्यांना बचतीची सवय, दत्तक शाळा, लोकसहभागातून शाळेचे सौदर्यीकरण अशाविविध उपक्रमांचा सहभाग होता. माध्यमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी आभार मानले.

राज्याच्या विकासाचा वेग कायम राखण्यासाठी विकास आराखडा महत्त्वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि ०५:  विकसीत भारत २०४७ यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पथदर्शी कार्यक्रमास सुसंगत विकास आराखडा तयार करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही.आर. सुब्रह्मण्यम यांनी आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची मेघदूत या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

या भेटीवेळी श्री. सुब्रह्मण्यम यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे निती आयोगाच्या संकल्पना आणि राज्याने कोणत्या क्षेत्रात काम करण्याची अपेक्षा आहे याविषयी माहिती दिली.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, ‘राज्याच्या विकासाचा वेग इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहे. भविष्यात त्यात वाढ करण्यासाठी काम करत आहोत. तसेच राज्यात अनेक मोठे प्रकल्प आणि विकास कामे सुरू आहेत. त्यांना गती दिली जात आहे. नवीन गुंतवणूक येत आहे.’

श्री. सुब्रह्मण्यम म्हणाले की, मुंबई मध्ये गुंतवणुकीच्या मोठ्या संधी आहेत. २ ट्रिलियन क्षमतेचे मुंबई हे देशातील एकमेव शहर आहे. महाराष्ट्राने कृत्रिम बुद्धिमत्ता, जैव तंत्रज्ञान आणि क्वांटम संगणक क्षेत्रात काम करावे. या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात संधी आणि क्षमता दोन्ही आहेत. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राने केलेले काम देशात सर्वोत्कृष्ट आहे. राज्याचे हे काम देशातील इतर राज्यांसाठी मार्गदर्शक ठरावे. महाराष्ट्राचा विकासाचा आराखडा तयार आहे. त्यास आणखी वेग देण्यात यावा. सुरू असलेल्या विकासकामांचे वॉर रुमच्या माध्यमातून नियमित आढावा घेतला जावा”अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, बृहन्‍मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे,

गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगन यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

०००

 

नागपुरातील सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ दुरुस्त करा – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

  • शासनाकडे हस्तांतरण करा
  • देखभाल,दुरुस्तीसाठी १० कोटी

मुंबई, दि. ०५ : नागपूर शहरातील बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे येत्या १५ दिवसांत दुरुस्त करून ते शासनाकडे हस्तांतरित करावेत, असे सक्त निर्देश महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. या प्रकल्पाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही श्री. बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

नागपूर शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आढावा घेण्यासाठी महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात बैठक झाली. नागपूर शहरात एल अँड टी कंपनीकडून ३६०० कॅमेरे बसविण्यात आले होते. त्यातील २००० कॅमेरे हे बंद आहेत. यापैकी ११०० कॅमेरे हे विविध प्रकारची कामे सुरू असल्याने बंद असल्याचे एल अँड टी कंपनीकडून सांगण्यात आले.

माहिती तंत्रज्ञान विषयक टीमने पाहणी करावी

एल अँड टी कंपनीने दुरुस्त करून सुरू केलेले कॅमेरे चांगल्या पद्धतीने काम करत आहेत की नाही हे पाहण्यासाठी पोलिस आयुक्तालयातील माहिती तंत्रज्ञान या विषयाचे विशेष ज्ञान असणाऱ्या टीमने याची पाहणी करावी, असेही आदेश महसूलमंत्री श्री. बावनकुळे यांनी  दिले.

गुन्ह्यांचा शोधासाठी कॅमेरे उपयोगी

नागपूर शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गुन्ह्याचा शोध घेणे सोपे होईल. चोरी, खून, दरोडा तसेच अपघातातील गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी हे कॅमेरे उपयोगी ठरणार असून, त्यामुळे बंद असलेले कॅमेरे 15 दिवसांत दुरुस्त करून ते कार्यान्वित करावेत, असे स्पष्ट निर्देश मंत्री श्री. बावनकुळे यांनी एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच, हे काम पूर्ण झाल्यानंतर त्याची कार्यवाही कशी करायची याच्या देखील सूचना त्यांनी दिल्या.

या वेळी बैठकीला माहिती तंत्रज्ञान विभागाचे मंत्री आशिष शेलार, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव  पराग जैन नैनुटिया, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, दूरदृश्यप्रणालीद्वारे नागपूरचे पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तथा नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आंचल गोयल आदी उपस्थित होते.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/

 

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या हक्काचे संरक्षण करण्यासोबतच कृषी क्षेत्राच्या बळकटीकरणाकरिता राज्य शासन कटिबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवार

0
पुणे, दि.२४: शेतकरी हा राज्यशासनाच्या केंद्रस्थानी असून संकट काळात त्यांना मदत करणे हे राज्यशासनाचे कर्तव्य आहे. त्यांच्या हक्काचे संरक्षण, तांत्रिक मदत, आर्थिक सहाय्य, जलसिंचनावर...

महाराष्ट्र पोलीस दलाचा लौकिक वाढविण्यासोबतच सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी काम करावे-उपमुख्यमंत्री अजित पवार

0
पुणे, दि.२४: महाराष्ट्र पोलीस दलातील शूर कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस दलाचा लौकिक वाढविला आहे, यामुळे पोलीस दलाचा एक गौरवशाली इतिहास आहे; यापुढेही अशाच...

मुंबई महानगरातील नालेसफाई ७ जूनपर्यंत पूर्ण करावी; नालेसफाईच्या कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार...

0
एआय तंत्रज्ञान आणि रोबोटचाही वापर मुंबई, दि. २३ : मुंबई शहर आणि उपनगरात सुरू असलेली नालेसफाईची सर्व कामे ७ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांचा होणार सन्मान

0
मुंबई, दि. २३ : इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्यासह यश संपादन करणाऱ्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून ‘राघोजी भांगरे गुणगौरव योजना’ राबविण्यात येत...

मतदारांसाठी मतदान केंद्राबाहेर मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार – भारत निवडणूक आयोग

0
मुंबई, दि. २३ : मतदारांच्या सोयीसाठी आणि मतदान दिवशीच्या व्यवस्थापनात सुधारणा करण्याच्या उद्देशाने, भारत निवडणूक आयोगाने मतदान केंद्राच्या बाहेर मोबाईल ठेवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे...