रविवार, मे 25, 2025
Home Blog Page 254

राज्याच्या विकासाचा वेग कायम राखण्यासाठी विकास आराखडा महत्त्वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि ०५:  विकसीत भारत २०४७ यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पथदर्शी कार्यक्रमास सुसंगत विकास आराखडा तयार करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही.आर. सुब्रह्मण्यम यांनी आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची मेघदूत या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

या भेटीवेळी श्री. सुब्रह्मण्यम यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे निती आयोगाच्या संकल्पना आणि राज्याने कोणत्या क्षेत्रात काम करण्याची अपेक्षा आहे याविषयी माहिती दिली.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, ‘राज्याच्या विकासाचा वेग इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहे. भविष्यात त्यात वाढ करण्यासाठी काम करत आहोत. तसेच राज्यात अनेक मोठे प्रकल्प आणि विकास कामे सुरू आहेत. त्यांना गती दिली जात आहे. नवीन गुंतवणूक येत आहे.’

श्री. सुब्रह्मण्यम म्हणाले की, मुंबई मध्ये गुंतवणुकीच्या मोठ्या संधी आहेत. २ ट्रिलियन क्षमतेचे मुंबई हे देशातील एकमेव शहर आहे. महाराष्ट्राने कृत्रिम बुद्धिमत्ता, जैव तंत्रज्ञान आणि क्वांटम संगणक क्षेत्रात काम करावे. या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात संधी आणि क्षमता दोन्ही आहेत. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राने केलेले काम देशात सर्वोत्कृष्ट आहे. राज्याचे हे काम देशातील इतर राज्यांसाठी मार्गदर्शक ठरावे. महाराष्ट्राचा विकासाचा आराखडा तयार आहे. त्यास आणखी वेग देण्यात यावा. सुरू असलेल्या विकासकामांचे वॉर रुमच्या माध्यमातून नियमित आढावा घेतला जावा”अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, बृहन्‍मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे,

गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगन यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

०००

 

नागपुरातील सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ दुरुस्त करा – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

  • शासनाकडे हस्तांतरण करा
  • देखभाल,दुरुस्तीसाठी १० कोटी

मुंबई, दि. ०५ : नागपूर शहरातील बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे येत्या १५ दिवसांत दुरुस्त करून ते शासनाकडे हस्तांतरित करावेत, असे सक्त निर्देश महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. या प्रकल्पाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही श्री. बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

नागपूर शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आढावा घेण्यासाठी महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात बैठक झाली. नागपूर शहरात एल अँड टी कंपनीकडून ३६०० कॅमेरे बसविण्यात आले होते. त्यातील २००० कॅमेरे हे बंद आहेत. यापैकी ११०० कॅमेरे हे विविध प्रकारची कामे सुरू असल्याने बंद असल्याचे एल अँड टी कंपनीकडून सांगण्यात आले.

माहिती तंत्रज्ञान विषयक टीमने पाहणी करावी

एल अँड टी कंपनीने दुरुस्त करून सुरू केलेले कॅमेरे चांगल्या पद्धतीने काम करत आहेत की नाही हे पाहण्यासाठी पोलिस आयुक्तालयातील माहिती तंत्रज्ञान या विषयाचे विशेष ज्ञान असणाऱ्या टीमने याची पाहणी करावी, असेही आदेश महसूलमंत्री श्री. बावनकुळे यांनी  दिले.

गुन्ह्यांचा शोधासाठी कॅमेरे उपयोगी

नागपूर शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गुन्ह्याचा शोध घेणे सोपे होईल. चोरी, खून, दरोडा तसेच अपघातातील गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी हे कॅमेरे उपयोगी ठरणार असून, त्यामुळे बंद असलेले कॅमेरे 15 दिवसांत दुरुस्त करून ते कार्यान्वित करावेत, असे स्पष्ट निर्देश मंत्री श्री. बावनकुळे यांनी एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच, हे काम पूर्ण झाल्यानंतर त्याची कार्यवाही कशी करायची याच्या देखील सूचना त्यांनी दिल्या.

या वेळी बैठकीला माहिती तंत्रज्ञान विभागाचे मंत्री आशिष शेलार, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव  पराग जैन नैनुटिया, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, दूरदृश्यप्रणालीद्वारे नागपूरचे पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तथा नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आंचल गोयल आदी उपस्थित होते.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/

 

स्वतंत्र कला विद्यापीठासंदर्भात समितीची बैठक

मुंबई, दि. ०५: महाराष्ट्रात स्वतंत्र कला विद्यापीठ स्थापन व्हावे, अशी मागणी कला क्षेत्रातील नागरिक आणि विद्यार्थ्यांकडून अनेक वर्षांपासून केली जात आहे. यासंदर्भात शासन स्तरावर गठीत करण्यात आलेल्या समितीची बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, डि नोव्हो अभिमत विद्यापीठ कुलगुरू तसेच समितीचे अध्यक्ष डॉ. रजनीश कामंत, सर जे.जे. उपयोगिता कला महाविद्यालयाचे अधिव्याख्याता तथा प्रभारी संचालक संतोष क्षीरसागर, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ हटाव कृती समितीने शासनास सादर केलेल्या निवेदनातील तक्रारींच्या अनुषंगाने गठीत समितीने सखोल अभ्यास करून तातडीने सविस्तर अहवाल शासनाला सादर करावा, अशा स्पष्ट सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिल्या.

राज्यातील कला महाविद्यालयांना अनुदान देण्यासंदर्भात वर्गवारी करून सविस्तर प्रस्ताव तयार  करावा, प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर  वित्त विभागाकडे सादर करून यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

सध्या शासकीय किंवा विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना ‘पदवीधर’ असा दर्जा दिला जातो, तर इतर कला महाविद्यालयांतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना “पदविका धारक” मानले जाते. या असमानतेमुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि व्यावसायिक नुकसान होते. त्यामुळे कला महाविद्यालयांचे विद्यापीठात रूपांतर करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ हटाव कृती समितीने केली आहे.

बैठकीत राज्यात स्वतंत्र कला विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. यामुळे कला शिक्षण अधिक दर्जेदार आणि व्यावसायिकदृष्ट्या उपयुक्त ठरू शकेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

०००

काशीबाई थोरात/विसंअ/

 

पाणी पुरवठा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, दि. ०५ : पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

राज्यातील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या कार्यप्रणालीचा आढावा घेण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. ही बैठक एचएसबीएस, फोर्ट, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. या वेळी विभागातील विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

या बैठकीला प्रधान सचिव संजय खंदारे,  संचालक ई. रवींद्रन, सहसचिव बी. जी. पवार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अजय सिंग तसेच मुख्य अभियंता व विशेष कार्यकारी अधिकारी प्रशांत भांबरे यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्रीमती साकोरे – बोर्डीकर म्हणाल्या, ग्रामीण व शहरी भागातील पाणी पुरवठा आणि स्वच्छता व्यवस्थापन अधिक दर्जेदार करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. राज्यात स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी नवीन धोरणांवर विचारविनिमय करण्यात आला. याबरोबरच सार्वजनिक शौचालयांच्या देखभालीसाठीच्या उपाययोजना करण्यावर भर देण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या.

पावसाळ्यात अधिक पाणी साठवण करण्यासाठी जलसंधारण प्रकल्पांचे नियोजन करण्यात यावे. गावागावांत रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रणाली लागू करण्याचा यावे, पाणी टंचाईग्रस्त भागांसाठी तातडीच्या उपाययोजना ज्या भागांमध्ये उन्हाळ्यात पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न उद्भवतो, अशा ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा, नवीन विहिरी खोदणे, जलस्त्रोत वाढवणे यासारख्या उपाययोजना हाती घेण्याचे यावेत अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

ग्रामस्तरावरील पाणीपुरवठा योजनांचे नियोजन व अंमलबजावणी, ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सुरू असलेल्या योजनांचा आढावा घेण्यात आला. तसेच पाणी पुरवठा योजनेची प्रगती आणि उर्वरित गावांमध्ये जलवाहिन्या पोहोचवण्याच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

०००

राजू धोत्रे/विसंअ/

महाबळेश्वर येथे २६ ते २८ एप्रिल दरम्यान पर्यटन महोत्सव – पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. ०५: महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभाग, पर्यटन संचालनालयाद्वारे राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी  दि. 26 ते 28 एप्रिल 2025 या कालावधीत तीन दिवस महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. पर्यटन विभाग व स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणाऱ्या तीन दिवसीय महोत्सवात प्रेक्षणीय स्थळे, स्थानिक कला – संस्कृती, खाद्यसंस्कृतीची ओळख पर्यटकांना व्हावी आणि या माध्यमातून पर्यटन वृद्धी व्हावी हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

या तीन दिवसीय पर्यटन महोत्सवाला पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी,सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील.

स्ट्रॉबेरी व कृषी पर्यटन महोत्सवाचे आयोजन

या महोत्सवात कला-संस्कृती, हस्तकला, पाककृती तसेच स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी व स्थानिक पर्यटन स्थळांना पर्यटनात्मक प्रसिध्दी देण्यात येईल. यासह महोत्सवात स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडविणारे कार्यक्रम तसेच नामांकीत कलाकारांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमांचे आयोजन करणे. त्याचप्रमाणे, स्ट्रॉबेरी व कृषी पर्यटन महोत्सवाचे आयोजन, महाबळेश्वर परिसरातील पाचगणी, कास पठार, कोयनानगर, तापोळा, गड-किल्ले दर्शन व इतर पर्यटन स्थळ दर्शन सहलीचे आयोजन , पर्यटकांसाठी विविध श्रेणीच्या तंबू निवास उभारणी, पॅराग्लाडींग, पॅरामोटरींग, जलक्रिडा, ट्रेकींग, रॉक क्लायबींग, घोडेस्वारी इ. विविध साहसी उपक्रम राबविणे, स्थानिक बचत गटांचे हस्त कला-कृतीचे प्रदर्शन व विक्रीचे दालन उभारणी, स्थानिक पाककलाकृती संस्कृती व खाद्य महोत्सव दालन उभारणी, महाबळेश्वर येथील विविध प्रेक्षणीय स्थळे व पुरातन मंदिरांचे दर्शन इत्यादी कार्यक्रम आयोजित केले आहेत.

या महोत्सवात विशेषतः देशांतर्गत विविध राज्यातील पर्यटन क्षेत्राशी निगडीत भागधारक, प्रवासी संस्थांचे प्रतिनिधी, ट्रॅव्हल एजेंट, टूर ऑपरेटर्स, सोशल मीडिया प्रभावक यांना आमंत्रित करुन त्यांचा समावेश असलेल्या परिचय सहलीचे आयोजन करण्यात येईल.

तीन दिवसीय महोत्सवाची वैशिष्ट्ये 

स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडविणारे कार्यक्रम तसेच नामांकीत कलाकारांचा सहभाग,स्ट्रॉबेरी व कृषी पर्यटन महोत्सवाचे आयोजन, पर्यटकांसाठी विविध श्रेणीच्या तंबू निवास उभारणी,पॅराग्लायडींग, पॅरामोटरींग, जलक्रीडा, ट्रेकींग, रॉक क्लायबिंग, घोडेस्वारी इ. विविध साहसी उपक्रम राबविणे,स्थानिक बचत गटांचे हस्त कला-कृतीचे प्रदर्शन व विक्रीचे दालन,स्थानिक पाककलाकृती संस्कृती व खाद्य महोत्सव दालन,महाबळेश्वर येथील विविध प्रेक्षणीय स्थळे व पुरातन मंदिरांचे दर्शन असे उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

महाबळेश्वरनजिक अन्य पर्यटन स्थळे 

महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाटात वसलेले हे एक गिरीस्थान आहे. हे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर समुद्रासपाटीपासून सुमारे ४५०० फूट उंचीवर वसलेले आहे. जुन्या बॉम्बे प्रेसीडेन्सीची ही पूर्वीची ऊन्हाळी राजधानीचे ठिकाण होते. येथील विलक्षण हिरवळ सुंदर बागा आणि श्वास रोखून धरणारी दृश्य हे पर्यटकांना भुरळ घालतात. ब्रिटीश काळात बांधलेल्या असंख्य भव्य वास्तू आजही गत स्मृतीची आठवण करुन देतात. हे ठिकाण स्ट्रॉबेरी व्यतिरिक्त असंख्य नद्या, भव्य कॅस्केड, भव्य शिखरे, प्राचीन मंदीरे, बोर्डींग स्कूल, सुंदर आणि हिरवेगार घनदाट जंगल, धबधबे, टेकड्या व दऱ्यांसाठी देखील प्रसिध्द आहे.

निवासव्यवस्था आणि उपक्रम

पर्यटकांसाठी विविध श्रेणींतील निवास व्यवस्था उपलब्ध असणार आहे. ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग आणि घोडेस्वारी यासारख्या साहसी उपक्रमांचा अनुभवही पर्यटकांना घेता येईल. तसेच, स्थानिक बाजारापेठांमध्ये फेरफटका, सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीचा आस्वादही पर्यटकांना घेता येईल. रोजच्या दिनक्रमातून दूर जात अनुभवसमृद्ध पर्यटनासाठी हा महोत्सव उत्तम पर्याय आहे.

परिचय सहली आणि परिसंवाद कार्यक्रम

भागधारक, ट्रॅव्हल एजन्सीचे प्रतिनिधी, टूर ऑपरेटर आणि सोशल मीडिया प्रभावक यांच्यासाठी परिचय सहलीचे आयोजन केले जाईल. त्याचप्रमाणे, पर्यटन क्षेत्राशी निगडीत भागधारक, व्यावसायिक व ट्रॅव्हल एजेंट इ. यांचा सहभाग असलेल्या परिसंवाद कार्यक्रमही पार पडेल. महाबळेश्वरची संस्कृती, सौंदर्य आणि साहस अनुभवू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी महाबळेश्वर पर्यटन महोत्सव हा परिपूर्ण उपक्रम आहे.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

 

‘जीबीएस’संदर्भात नागरिकांनी घाबरून जाऊ नये, आरोग्य यंत्रणेने अलर्ट रहावे!

मुंबई, दि. ०५ : ‘जीबीएस’ आजाराचे संशयित रुग्ण जिल्ह्यात आढळत आहेत. मात्र आरोग्य यंत्रणा सक्षम असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये.सातारा जिल्ह्यात ‘जीबीएस’ अर्थात गुइलन बॅरे सिंड्रोम या आजाराचे सात संशयित रुग्ण आढळले आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण तथा सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आरोग्य यंत्रणेची व्हीसीद्वारे बैठक घेऊन सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या बैठकीला सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यशिनी नागराजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खलपे आदी व्हीसीद्वारे उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.देसाई म्हणाले की, सातारा जिल्ह्यात जीबीएस आजाराचे संशयित रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने सतर्क रहावे, जिल्हा रुग्णालयात जीबीएस संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र १० बेड आरक्षित करावे, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये २४ तास डॉक्टर उपस्थित राहतील अशी खबरदारी घ्यावी, जिल्ह्यात कुठेही दूषित पाणीपुरवठा होणार नाही याची दक्षता घ्यावी. अशा सूचना पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिल्या.

आतापर्यंत एकूण सात रुग्ण आढळले असून त्यापैकी एका रुग्णाला उपचारासाठी पुण्याला हलविले आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती यावेळी जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

नवीन ऊर्जा स्रोतांच्या विकासाबरोबरच वीज वितरणातील सुधारणांवर भर द्या – उर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, दि. ५ : राज्यात आगामी काळात नवीन ऊर्जा स्रोतांचा विकास, ग्रीन एनर्जी प्रकल्प आणि वीज निर्मितीमध्ये सुधारणांवर विशेष भर देण्यात यावा असे निर्देश उर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले. एचएसबीसी फोर्ट, मुंबई येथे आयोजित उर्जा विभागाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी, संचालक संजय मारुडकर, अभय हरणे, बाळासाहेब थिटे, कार्यकारी संचालक राजेंश पाटील, पंकज नागदेवते, नितीन चांदुरकर उपस्थित होते.

उर्जा राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ऊर्जा क्षेत्रात सुधारणा करण्याचे निर्देश दिले. राज्यात सौर आणि पवन ऊर्जेचा अधिकाधिक वापर वाढवून प्रदूषणमुक्त ऊर्जा निर्मितीला गती देण्यात यावी. शेती, उद्योग, व्यापार वापरासाठी वीज आणि नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा मिळेल यावर विशेष भर देण्यात यावा, अशा सूचनाही राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी दिल्या.

राज्यातील विविध उर्जा प्रकल्प, निर्मितीच्या व्यवस्था आणि वीज मागणी यांचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.

राज्यातील ऊर्जा निर्मिती, साठवणूक आणि वितरण यंत्रणांसह वीज निर्मिती केंद्रे, नवीन प्रकल्प, सौर व पवन उर्जा विकास योजना आणि औद्योगिक वसाहतींसाठी वीज पुरवठ्याच्या गरजा याविषयीही चर्चा झाली.

राज्यातील वीज उत्पादन क्षमता, मागणी-पुरवठा तफावत, भार नियमन धोरणे आणि नवीन प्रकल्पांच्या प्रगतीचा अहवाल यावेळी सादर करण्यात आला. अपूर्ण वीज प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना यावरही यावेळी चर्चा झाली.

०००

राजू धोत्रे/विसंअ/

राज्यातील निवासी डॉक्टरांना आवश्यक सेवा सुविधा द्याव्या – मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई दि. ०५ :  राज्यातील निवासी डॉक्टर हे रुग्णसेवेचे महत्त्वाचे काम करतात. निवासी डॉक्टरांची सुरक्षा आणि त्यांच्या राहण्याची उत्तम सोय होणे महत्वाचे आहे. यासाठी महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये त्यांना आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात, अशा सूचना  वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.

मंत्रालयातील दालनात महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) च्या विविध प्रश्नांबाबत बैठक झाली. बैठकीस वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षणचे संचालक डॉ. अजय चंदनवाले, उपसचिव तुषार पवार, शंकर जाधव आदी उपस्थित होते.

वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, निवासी डॉक्टरांची सुरक्षा महत्त्वाची असल्याने सुरक्षेसाठी रुग्णालयांमध्ये अलार्म सिस्टीम आणि सीसीटीव्ही बसविण्यात यावेत. निवासी डॉक्टर्सना रुग्ण कक्षाशेजारी साईड रुम, महाविद्यालय व रुग्णालयात स्वतंत्र पोलिस चौकी सुरू  करण्याबाबत गृह विभागासोबत समन्वय साधून त्याचा पाठपुरावा करावा. डॉक्टरांना मूलभूत सुविधा देऊन त्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्यात यावा.

निवासी डॉक्टरांसाठी वसतीगृहाची सुविधा करावी. नवीन वसतीगृहे बांधकामांबाबत प्रस्ताव सादर करावेत. काही ठिकाणी वसतीगृहासाठी भाडेतत्वावर इमारती उपलब्ध करून घ्याव्यात. ज्या डॉक्टरांची वसतीगृहात निवासव्यवस्था होत नाही, अशा डॉक्टरांना घरभाडे भत्ता देण्याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश श्री. मुश्रीफ यांनी दिले.

बैठकीत मूलभूत सुविधा मिळणे बाबत तसेच निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन वेळेत मिळावे. शासकीय रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांना भेटीसाठी पासेस प्रणाली लागू करणेबाबत चर्चा झाली. निवासी डॉक्टरांना प्रलंबित महागाई भत्ता देण्यासंदर्भात महाविद्यालय स्तरावरून माहिती घेऊन याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.

०००

एकनाथ पोवार/विसंअ/

‘एमएसआयडीसी’द्वारे महाराष्ट्रतील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटच्या कामांसाठी ३७,००० कोटी रुपयांचा प्रकल्प सुरु

मुंबई: दि. ०५: राज्य सरकारचा उपक्रम असलेल्या महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये ६,००० किलोमीटरपेक्षा जास्त रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यासाठी ३७,००० कोटी रुपयांच्या प्रकल्पाची सुरुवात केली आहे. हा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुधारणा करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

“राज्य सरकारने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तीन वर्षांचा कालावधी निश्चित केला असून, यामध्ये राज्य महामार्ग आणि उच्च वाहतूक असलेल्या ग्रामीण रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या रस्त्यांचा विकास आर्थिक वृद्धी आणि जलद वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे,” असे MSIDC चे व्यवस्थापकीय संचालक श्री. ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.

.क्र. प्रदेश जिल्हा लांबी

(कि.मी.)

प्रकल्प किंमत

(रु. कोटी)

1 नाशिक नाशिक, अहिल्यानगर 517.92 3217.14
2 नाशिक – 2 धुळे, नंदुरबार, पालघर, रायगड, रत्नागिरी,सिंधूदुर्ग 552.53 3448.57
3 कोंकण 538.25 4450.00
4 नागपूर नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली 606.15 3387.14
5 पुणे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर 1330.75 8684.29
6 नांदेड नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर 548.02 3207.14
7 छत्रपती संभाजीनगर छ.संभाजीनगर, जालना, धाराशीव, बीड 680.16 3395.71
8 अमरावती अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ 1175.41 7174.00
एकूण 5949.19 36964.00

या संदर्भात MSIDC चे व्यवस्थापकीय संचालक श्री. दीक्षित म्हणाले, “हा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ज्यायोगे राज्य महामार्ग आणि ग्रामीण जिल्ह्यांतील रस्ते वर्षभर योग्य स्थितीत राहून वाहनांच्या जलद चालनासाठी सक्षम होतील. विविध रस्ते जोडून राज्याच्या विकासाला आणि आर्थिक समृद्धीस प्रचंड चालना देईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि MSIDC चे अध्यक्ष आणि मंत्री, सा.बां. (सा.उ. वगळून) शिवेंद्रसिंह भोसले यांनी MSIDC द्वारे रस्ता सुधारणा कामांना निर्धारित कालावधीत गुणवत्तेमध्ये तडजोड न करता पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

श्री. दीक्षित यांनी सांगितले की, हा प्रकल्प हायब्रिड ऍन्युटी मॉडेल (HAM) अंतर्गत राबविला जाईल, जो केंद्रीय सरकारने देशातील रस्ता बांधकामाचा वेग वाढवण्यासाठी स्वीकारलेले मॉडेल आहे. “राज्य सरकार प्रकल्प खर्चाचा ३०% हिस्सा समभाग म्हणून प्रदान करेल, तर उर्वरित रक्कम MSIDC द्वारे राज्य स्वामित्व असलेल्या बँकांकडून कर्ज स्वरुपात उपलब्ध करणार आहे.

०००

नाथ संप्रदायाचे सर्वसामान्यांशी नाते; मंदिर परिसर विकासासाठी निधी उपलब्ध करून देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड, दि. ०५: नाथ संप्रदायाची परंपरा देशातील सर्वात मोठी आणि प्रभावशाली परंपरा मानली जाते. देशभरात नाथ संप्रदायाचे अनुयायी, या परंपरेनुसार साधना करणारे साधू, संत, महंत आहेत, त्यांच्यासमवेत सामान्य माणसांचेही नाथ संप्रदायाशी नाते घट्ट आहे, असे सांगून मंदिर परिसर विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.

सावरगाव (ता. आष्टी, जि. बीड) येथील श्री मच्छिंद्रनाथ समाधी मंदिराचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास जलसंपदा मंत्री (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील, पर्यावरण आणि हवामान बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार मोनिका राजळे, श्री क्षेत्र नारायण गड संस्थान, बीडचे महंत शिवाजी महाराज, अश्वलिंग देवस्थान, पिंपळवंडीचे मधुकर महाराज शास्त्री, मदन महाराज संस्थान, कडाचे बबन महाराज बहिरवाल, बंकटस्वामी महाराज संस्थान, नेकपूरचे लक्ष्मण महाराज मेंगडे, ओम शिव गोरक्षनाथ योगी आस्थाना, अहिल्यानगरचे अशोकनाथ पालवे महाराज, नालेगाव, अहिल्यानगरचे मस्तनाथ महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, नाथ संप्रदायाने भक्तीचा मार्ग दाखविला आहे. या भक्तीमार्गानेच मुक्तीचा मार्ग दाखविला आहे. नाथांनी हे आपल्या आचरणातून सिद्ध केले आहे. मंदिराच्या भूमिपूजनानिमित्त येथे येण्याची संधी मिळाली हे भाग्य समजतो. मंदिर परिसर विकासाच्या विविध कामांना पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल. रोप वेबाबत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

भारत हा भाविकांचा देश आहे. सध्या प्रयागराज येथे कुंभमेळा सुरू आहे. तेथे आतापर्यंत कोट्यवधी भाविकांनी गंगेत स्नान केले. भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली. मात्र,  भक्तीमार्गामुळे आपली संस्कृती आणि संस्कार टिकून राहिले. वारकरी संप्रदाय आणि विविध पंथांनी ईश्वरी विचारांना आणि संस्कृतीला जिवंत ठेवले. मच्छिंद्रनाथांचे आशीर्वाद घेताना  भक्ती आणि माणुसकीचा संदेश आपल्याला मिळतो, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

आमदार सुरेश धस आणि मोनिका राजळे यांनी भाविकांची वाढती गर्दी पाहता कानिफनाथ मंदिरापासून मच्छिंद्रनाथ मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरणाची आवश्यकता असल्याचे सांगितले. तसेच मच्छिंद्रनाथ मंदिरापासून कानिफनाथ मंदिरापर्यंत रोप वे तयार व्हावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.

मच्छिंद्रनाथ देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, तर सचिव बाबासाहेब म्हस्के व कोषाध्यक्ष रमेश ताठे यांच्यासह सर्व विश्वस्तांनी मान्यवरांचे स्वागत केले.

०००

ताज्या बातम्या

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांत्वन

0
पुणे, दि. २४: ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ स्व. डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाषाण येथील निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. श्री....

पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आपत्ती नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्याचे आदेश

0
हेल्पलाईन क्रमांक प्रदर्शित जनतेला मिळणार अधिकृत माहिती हेल्पलाईन क्रमांक जतन करण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी दि 24 (जिमाका) :- पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्काळ संपर्कासाठी...

रोजगार हमी योजना अधिक प्रभावीपणे राबवा -रोहयो मंत्री भरत गोगावले

0
सिंधुदुर्गनगरी दिनांक २४ (जिमाका) :- रोजगार हमी योजना ही ग्रामीण विकासासाठी एक महत्त्वाची योजना आहे. ग्रामीण भागात ‘रोजगार हमी’ मुळे बदल होत आहेत. या बदलाची गती वाढवण्यासाठी...

शेतीमध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये देणार – कृषीमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे

0
 पुणे, दि.24: शेतकऱ्यांचे जीवन सुरळीत होण्यासाठी, त्यांच्या जीवनात सुटसुटीतपणा आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून गेल्या सहा महिन्यात 50 ते 55 धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. शेतीला प्रोत्साहन म्हणून शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक...

पुढील वर्षी बाल पुस्तक जत्रेत सांस्कृतिक कार्य विभागाचा सहभाग- सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार

0
पुणे, दि. 24:  ‘पुणे बाल पुस्तक जत्रा’ सारख्या उपक्रमातून बालमनावर चांगले संस्कार होत असल्याने पुढील वर्षांपासून बाल पुस्तक जत्रेत सांस्कृतिक कार्य विभागातर्फे विविध सांस्कृतिक...