रविवार, मे 25, 2025
Home Blog Page 258

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अधिक सक्षम करा – कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

मुंबई, दि.०४: महाराष्ट्र कृषी-उद्योग विकास महामंडळाने विविध उत्पादनाला व शेतकऱ्यांच्या कृषी मालाला विक्रीसाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अधिक सक्षम करून त्याची माहिती शेतकऱ्यांना द्यावी. ड्रोनद्वारे औषध फवारणीसाठी प्रत्येक गावात ड्रोनची उपलब्धता करणे, शेतीमाल विक्रीसाठी निर्यात माल केंद्र उभारणे या नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यवाही करण्याचे निर्देश कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले.

मंत्रालयात महाराष्ट्र कृषी-उद्योग विकास महामंडळाच्या कामकाजाच्या आढावा बैठकीत कृषी मंत्री ॲड माणिकराव कोकाटे बोलत होते. यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, महाराष्ट्र कृषीउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले,कृषी विभागाचे संचालक सुनिल बोरकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

कृषिमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, महाराष्ट्र कृषि-उद्योग विकास महामंडळाने शेतकऱ्यांना रास्त भावात उपलब्ध होणारे उत्कृष्ट दर्जाचे पशुखाद्य निर्माण करावे. शेतकऱ्यांना परवडेल असा त्याचा दर असावा याची काळजी घ्यावी. खते, किटकनाशके शेतकऱ्यांना उपलब्ध करून देताना त्यांचा दर बाजारातील दरापेक्षा अधिक नसावा. शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेला कृषी माल त्याचप्रमाणे महाराष्ट्र कृषी-उद्योग विकास महामंडळाच्या उत्पादनांसाठी ई – कॉमर्स विभागाचे मार्केटींग करावे. ड्रोनद्वारे शेतीत औषध फवारणी करताना अत्यल्प, अल्प व जास्त जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ होईल असे पहावे. ड्रोन प्रत्येक गावात उपलब्ध होण्यासाठी विविध सामाजिक उत्तरदायित्व मध्ये सहभागी संस्था, राज्य शासन, केंद्र सरकार यांच्याकडून निधी उपलब्धतेसाठी कार्यवाही करावी. रायगड जिल्ह्यात रसायनी (ता.पनवेल) येथे कृषी निर्यात क्षेत्र उभारणी साठीचा प्रस्ताव शासनाला सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

०००

 

संध्या गरवारे/विसंअ/

राज्यपालांच्या हस्ते नवभारत कॉर्पोरेट सामायिक दायित्व पुरस्कार प्रदान

मुंबई, दि.०४: नवभारत वृत्तपत्र समूहातर्फे आयोजित चौथे नवभारत नवराष्ट्र कॉर्पोरेट सामाजिक दायित्व पुरस्कार राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मुंबई येथे प्रदान करण्यात आले.

आपल्या सामाजिक दायित्व निधीतून आरोग्य, शिक्षण यांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते कॉर्पोरेट समूह, सार्वजनिक उपक्रम, उद्योग, सामाजिक संस्था व समाजसेवी व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नवभारत- नवराष्ट्र तेजोत्सव या कॉफी टेबल पुस्तकाचे देखील प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाला नवभारतचे व्यवस्थापकीय संपादक निमिष माहेश्वरी, मेघाश्रेय फाउंडेशनच्या संस्थापिका सीमा सिंह, अध्यक्ष, बजाज फाउंडेशनचे अध्यक्ष शिशिर बजाज तसेच निमंत्रित उपस्थित होते.

यावेळी जेएसडब्ल्यू फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षवर्धन नवाथे, सचिन तेंडुलकर फाउंडेशनच्या संचालिका सारा तेंडुलकर, पीएनजी ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांसह एल अँड टी,  टाटा मोटर्स, एसबीआय फाउंडेशन, डॉ डी  वाय पाटील  शिक्षण समूह, क्रॉम्प्टन ग्रीव्हज, रायन इंटरनॅशनल, ग्रांट मेडिकल फाउंडेशन आदी संस्थांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.

०००

उच्च व तंत्र शिक्षण विभागातील प्रलंबित प्रकरणे वेळेत निकाली काढा – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

  • मुंबई विभागातील ४१६ प्रलंबित प्रकरणे निकाली

मुंबई, दि.४: उच्च व तंत्र शिक्षण विभागातील प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि गतिमान होण्यासाठी ‘झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल ड्राइव्ह’ ही विशेष मोहीम  राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत मुंबई विभागातील ४१६ प्रकरणे तातडीने निकाली काढण्यात आली आहेत. विभागातील एकही प्रकरण प्रलंबित राहता कामा नये, सर्व प्रकरणे वेळेत निकाली काढावीत, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी दिले.

मुंबई सहसंचालक कार्यालयात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री यांनी अचानक भेट देऊन झिरो पेंडन्सी विशेष मोहिमेंतर्गत प्रलंबित प्रकरणांच्या कार्यवाहीचा आढावा घेतला.यावेळी उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, संचालक शैलेंद्र देवळणकर, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ.प्रमोद नाईक,उच्च शिक्षण सहसंचालक रुपेश राऊत संबंधित अधिकारी उपस्थित होते.

प्रत्येक प्रकरणाचा जलदगतीने निपटारा करावा

विभागातील प्रत्येक प्रकरणाचा जलदगतीने निपटारा करावा. विलंबाच्या कारणांचा सखोल तपास करा. जाणूनबुजून दिरंगाई होत असल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. संपूर्ण विभागातील प्रलंबित प्रकरणांचा पुन्हा आढावा घेणार असून प्रकरणांच्या निपटाऱ्यात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. विभागातील सर्व प्रकरणे वेळेत निकाली काढा.असे स्पष्ट निर्देश मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिले.

विभागाने ४१६ प्रकरणे निकाली काढली

उच्च व तंत्र शिक्षण विभागात न्यायप्रविष्ट प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी ठोस नियोजन करून न्यायालयीन आणि प्रशासकीय प्रकरणांचे कालबद्ध नियोजन करावे,  दि. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुंबई विभाग स्तरावर ४८५ प्रकरणे प्रलंबित होती. १ जानेवारी २०२५ ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत विभागाने ४१६ प्रकरणे निकाली काढली. उर्वरित प्रकरणांमध्ये काही त्रुटी असतील तर त्या संबंधित महाविद्यालयांना व संबंधितांना कळवाव्यात आणि प्रकरणे वेळेत निकाली काढावी. अशा सूचनाही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिल्या.

प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

उच्च व तंत्र शिक्षण विभागात उच्च व सर्वोच्च न्यायालयांसह विविध न्यायालयांमध्ये विभागाची ३ हजार २०० हून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर, न्यायालयीन प्रकरणांचे कालबद्ध नियोजन करून ही प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.या मोहिमेत प्रलंबित प्रकरणे जलद सोडवली जात असल्याने वेळेची आणि आर्थिक बचत होत असून नागरिकांना अधिक समाधानकारक सेवा मिळत आहेत. प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. ही समाधानाची बाब असल्याचेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

या विशेष मोहिमेत एकाच विषयावरील अनेक याचिका/खटले एकत्र करून त्यांचे एकत्रिकरण केले जात आहे. शासनावर मोठा वित्तीय भार येणारी प्रकरणे आणि विद्यार्थी हितासंदर्भातील महत्त्वाची प्रकरणे प्राधान्याने सोडवली जात आहेत. यामध्ये वेतनवाढ, वैद्यकीय प्रतिपूर्ती, पदोन्नती आणि निवृत्तीवेतनाशी संबंधित प्रलंबित प्रशासकीय प्रकरणे, अशासकीय अनुदानित महाविद्यालयांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतननिश्चिती, अनुकंपा, सेवाखंड, सेवानिवृत्ती लाभ, भविष्य निर्वाह निधी आणि वैयक्तिक लाभांच्या प्रकरणांची सोडवणूक असे विषय युद्धपातळीवर सोडवली जात असल्याचेही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.

०००

काशीबाई थोरात/विसंअ

‘दिलखुलास’ कार्यक्रमात महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची मुलाखत

मुंबई दि. ०४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ऊर्जा विभागाच्या शंभर दिवसाच्या कामकाजाच्या अनुषंगाने तसेच सौर ऊर्जेच्या क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रमांबद्दल महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत गुरुवार दि. 6, शुक्रवार दि. 7, शनिवार दि.8, सोमवार दि.10 आणि मंगळवार दि.11 फेब्रुवारी 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व विभागांच्या शंभर दिवसांच्या कामकाजाचा आढावा घेत असून यामध्ये ऊर्जा विभागाचे देखील सादरीकरण करण्यात आले आहे. राज्याला ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी घेतलेले धोरणात्मक निर्णय, सौर ऊर्जेच्या क्षेत्रात राबविण्यात येत असलेले प्रकल्प, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजना तसेच सौर ऊर्जेच्या क्षेत्रात राबविण्यात येत असलेले नाविन्यपूर्ण उपक्रम या निर्णयांची अंमलबजावणी आणि आराखडा, याविषयी ‘महावितरण’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. चंद्र यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात माहिती दिली आहे.

०००

 

पाणी पुरवठा योजना गतीने पूर्ण करा – मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. ०४ : राज्यातील पाणी पुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या योजनांची कामे गतीने करावीत, असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

मंत्रालयात अहिल्यानगर पाणी पुरवठा अंतर्गत जल जीवन मिशनच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आमदार सदानंद दाते, प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, अहिल्यानगरचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, नाशिक विभागाचे मुख्य अभियंता राम लोलपोड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले, नागरिकांना पाणी मिळविण्यासाठी सुरू असलेल्या योजना गतीने पूर्ण कराव्यात. समस्यांवर तातडीने उपाययोजना कराव्यात. पाणी पुरवठा योजनेतील कामांची तपासणी करण्यात यावी. जे ठेकेदार किंवा अधिकारी कामामध्ये विलंब करतात, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी.

पाणी पुरवठा योजना ही ग्रामीण भागांतील नागरिकांसाठी जीवनावश्यक आहे. त्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीसाठी ठोस रोडमॅप तयार करणे, पाणीपुरवठ्याची गुणवत्ता आणि प्रमाण तपासणे आणि कामाच्या प्रगतीचा नियमित आढावा घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.

०००

राजू धोत्रे/विसंअ/

जळगाव जिल्ह्याला मिळेल विकासाची सोनेरी झळाळी…!!

भारत हा कृषिप्रधान देश असून, वाढत्या नागरीकरणासोबतच कृषी आणि कृषीपूरक व्यवसाय, उद्योग, आरोग्य, रोजगार निर्मिती, वीज पुरवठा योजना बळकट करणे आवश्यक आहे. जळगाव जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत विविध क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार (तत्कालीन मंत्री) अनिल पाटील आणि खासदार, आमदार यांच्या सूचनांवर आधारित या योजना राबविल्या जात आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांच्या प्रयत्नांतून अनेक पथदर्शी विकासकामे वेग घेत आहेत. जळगाव जिल्हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा औद्योगिक व कृषी जिल्हा असून, येथील पायाभूत सुविधांचा विकास हा जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात येत आहे. यात परिवहन, जलसंपत्ती, ऊर्जा, आरोग्य, शिक्षण, नागरी सुविधा आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांचा समावेश आहे. या सर्व क्षेत्राचा विस्ताराने घेतलेला हा आढावा…!!

परिवहन आणि रस्ते विकास:- राष्ट्रीय व राज्य महामार्गांचे जाळे, जळगाव जिल्ह्यातून अनेक महत्त्वाचे राष्ट्रीय महामार्ग जातात, ज्यामुळे राज्यातील आणि देशातील इतर भागांशी दळणवळण सुलभ होते. या महामार्गांचे विस्तार आणि दुरुस्ती यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी वितरित करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्ग

राष्ट्रीय महामार्ग 53 कचखली ते फागणे,राष्ट्रीय महामार्ग 53 एफ जळगाव ते फतेहपूर, राष्ट्रीय महामार्ग 52 चाळीसगाव ते पुणे, राष्ट्रीय महामार्ग 753 बी ई -अंकलेश्वर ते बुर्हाणपूर तर ग्रामीण आणि शहरी रस्ते विकासातील ग्रामीण भागातील 119 कि.मी. रस्त्यांचे डांबरीकरण आणि मजबुतीकरण, 187 कि.मी. इतर जिल्हा रस्त्यांच्या दुरुस्तीचे कामं सुरु आहेत, अपघात प्रवण क्षेत्रांवर सुरक्षा उपाययोजना करण्यात येत असून नवीन पूल आणि रस्त्यांची उभारणी सुरु आहे.

रेल्वे विकास

जळगाव जिल्ह्यातून 10 महत्त्वाच्या रेल्वे लाईन्स जातात.भुसावळ जंक्शन हे मध्य रेल्वेचे प्रमुख केंद्र आहे, जे रेल्वे वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. रेल्वे स्थानकांच्या सुधारणेसाठी निधी मंजूर.

जलसंपत्ती आणि सिंचन प्रकल्प

जळगाव जिल्ह्यातील सिंचन व्यवस्था सुधारणे आणि शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने पाझर तलाव: 482, साठवण बंधारे: 1849, गाव तलाव: 259, लघु सिंचन प्रकल्प: 248 नवीन प्रकल्प, या सर्व प्रकल्पातून एकूण सिंचन क्षमता: 2,65,785 हेक्टर एवढी होणार आहे.

पाणीपुरवठा आणि जल व्यवस्थापन
पिण्याच्या पाण्यासाठी 5 सौर उर्जा-आधारित पाणीपुरवठा योजना, जलसंधारणासाठी मृदा व जल संवर्धन योजना, नदीजोड प्रकल्प आणि भूजल पुनर्भरणासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत.

ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत
वीज वितरण आणि सुधारणा प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला 23 कोटी रुपये एवढा निधी देण्यात आला आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील वीज पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी 33/11 केव्ही उपकेंद्रांचे बांधकाम तसेच कृषी पंपांसाठी विशेष वीजपुरवठा योजना राबविण्यात येत आहेत.
सौर उर्जा प्रकल्प आणि पर्यायी ऊर्जा स्रोत निर्माण करण्यासाठी 350 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प, तसेच सौर उर्जा पंप योजनेसाठी शेतकऱ्यांसाठी अनुदान दिले जात आहे.शासकीय इमारतींवर सौर पॅनेल उभारणी योजनापण राबविली जात आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर वीजेची बचत आणि वीज बिलाची रक्कम वाचविली जात आहे.

 

नागरी सुविधा आणि नगर विकास
नागरी पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी महाराष्ट्र नगरोत्थान अभियान अंतर्गत 30 कोटींची तरतूद करण्यात आली आहे तर मलनिस्सारण, पथदीप, उद्याने आणि सामाजिक सभागृह उभारणी सुरु आहे. अग्निशमन सेवा बळकटीकरणासाठी 2 कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनात स्मार्ट वॉटर सप्लाय आणि मलनिस्सारण प्रकल्प आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने स्वच्छ भारत अभियान योजनांची अंमलबजावणी करण्याचे नियोजन झाले आहे.

आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा
वैद्यकीय महाविद्यालय, 19 ग्रामीण रुग्णालये आणि 81 प्राथमिक आरोग्य केंद्रे, नवीन आधुनिक सुसज्ज जिल्हा रुग्णालय त्यात सी. टी. स्कॅन मशीन खरेदी, जळीतग्रस्त रुग्णासाठी नवीन वॉर्ड आणि SNCU युनिट स्थापन करण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य सेवांमध्ये सुधारणा त्यात प्रामुख्याने 3 नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे, 12 केंद्रांचे अद्ययावत नूतनीकरण,96 उपकेंद्रांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे.

शिक्षण आणि डिजिटल सुविधा
शाळा आणि उच्च शिक्षण पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत असून त्यात 102 नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम, 196 शाळांचे नूतनीकरण आणि दुरुस्ती, सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही बसविण्यासाठी 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर डिजिटल क्लासरूम आणि विज्ञान प्रयोगशाळा स्थापन करणे, महाविद्यालयीन शिक्षण सुधारणा, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात नवीन सुविधा देणे, कौशल्य विकास कार्यक्रमासाठी विशेष अनुदान देण्यात येत आहे.

औद्योगिक आणि ग्रामीण विकास
औद्योगिक वसाहती आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांणा प्रोत्साहन देण्यात येत असून त्यासाठी क्लस्टर योजना राबविली जाणार आहे. नवीन औद्योगिक वसाहतींची निर्मिती बरोबर केळी फायबर आणि कापड उद्योगासाठी गुंतवणूक योजना आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ग्रामीण पायाभूत सुविधा विकास- यात प्रामुख्याने 162 ग्रामपंचायत इमारतींचे नूतनीकरण करण्यात येत आहे. प्रत्येक गावात अंतर्गत रस्ते सुधारणेवर भर देवून स्वच्छ पाणीपुरवठा आणि जल व्यवस्थापनावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
जळगाव जिल्ह्याच्या पायाभूत सुविधांचा विकास हा जिल्ह्याच्या आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जिल्हा वार्षिक योजना 2025-26 अंतर्गत विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून दळणवळण, जलसंपत्ती, वीज, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण विकास या सर्वच क्षेत्रांमध्ये सुधारणा केली जात आहे. या उपाययोजनांमुळे जिल्ह्यातील जीवनमान उंचावेल आणि भविष्यातील विकासाला नवी गती मिळेल आणि जळगाव जिल्ह्याला नवी सोनेरी झळाळी मिळेल असा सर्वांगीन विकास होतो आहे.

युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव

‘एमएसआरडीसी’च्या द्रुतगती महामार्गांमुळे राज्यातील दळणवळण व्यवस्था सक्षम होणार – राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मुबंई, दि. ०४: ‘एमएसआरडीसी’च्या अंतर्गत राज्यात द्रुतगती मार्गाचे विविध प्रकल्प कार्यान्वित असून काही प्रगतीपथावर आहेत. या प्रकल्पामुळे राज्यातील दळणवळण व्यवस्था सक्षम होणार असल्याचा असा विश्वास सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केला.

सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी निर्मल भवन येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (मर्या.) च्या कामकाजाचा व १०० दिवसांत करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेतला. यावेळी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड, सह व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव, सह व्यवस्थापकीय संचालक मनुज जिंदल आदी अधिकारी उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या, राज्यातील दळणवळण व्यवस्था सक्षम करण्यासाठी विविध महत्वाकांक्षी द्रुतगती मार्ग प्रकल्प हाती घेतले आहेत. या प्रकल्पाद्वारे राज्यातील विविध जिल्ह्यांना द्रुतगती महामार्गांनी जोडल्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होणार आहे.

नागपूर ते गोवा ८०२ किमी शक्तिपीठ महामार्ग हा आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग, नाशिक रिंग रोड, कोकण एक्सप्रेस, शेगाव-सिंदखेडराजा भक्ती मार्ग  आदी प्रकल्पांमुळे राज्यातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होईल, प्रवासाचा वेळ कमी होईल, आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल, असेही राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी यावेळी सांगितले.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्ग, राजीव गांधी बांद्रा-वरळी सी-लिंक, ठाणे खाडी पूल क्र.३ या पूर्ण झालेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला. तसेच प्रगतीपथावरील समृद्धी महामार्गाचा ७६ कि.मी लांबीचा शेवटचा टप्पा,  यशवंतराव चव्हाण मुबंई-पुणे एक्सप्रेस वे मिसिंग लिंक, स्वातंत्र्यवीर सावरकर वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू, जीएसटी भवन तसेच समृद्धी महामार्गावर वाहतूक नियंत्रण सुलभ होण्यासाठी प्रस्तावित आयटीएमएस यंत्रणेचाही राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी आढावा घेतला.

०००

मोहिनी राणे/ससं/

 

 

शेतकऱ्यांनी ‘ॲग्रीस्टॅक’ योजनेचा लाभ घ्यावा – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि.4: राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करुन शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरीता केंद्र शासनाची ॲग्रिस्टॅक योजना राज्यात राबविण्यास सुरुवात केलेली आहे.  जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

पाटण येथे केंद्र शासनाच्या ॲग्रीस्टॅक योजनेमधून शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात अग्रीस्टॅग योजनेंतर्गत फार्मर आयडीचे सन्मानपत्र पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी पाटणचे प्रातांधिकारी सोपान टोणपे, पाटणचे तहसीलदार अनंत गुरव उपस्थित होते.

या योजनेत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री), शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच (क्रॉप सोन रजिस्ट्री) व शेतांचे भू संदर्भिकृत (जिओ रेफरन्स लँड पार्सल) यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करणे व सातत्याने अद्ययावत करण्याचे काम करण्यात येत आहे.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, या योजनेमूळे राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र-राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सुलभ, पारदर्शक पद्धतीने तसेच वेळेवर उपलब्ध होणार आहे.  शेतकऱ्यांना स्वस्त कर्ज, उच्च गुणवत्तेची कृषि निविष्ठा, विपणन, स्थानिक आणि विशिष्ट तज्ञ मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.  पीएम किसान योजनेंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी आवश्यकतेच्या अटी पूर्ण करून लाभ प्राप्त करण्यामध्ये सुलभता येणार आहे. शेतकऱ्यांना पिकासाठी कर्ज मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि कृषि इन्फ्रास्ट्रक्चर फंड व शेतीच्या विकासासाठी इतर कर्जे उपलब्ध करुन घेण्यात सुलभता येईल.  पिक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शेतकऱ्यांचे देय नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात सुलभता येणार आहे.

000

रशियन संसद ड्युमाचे अध्यक्ष वोलोदीन यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई, दि. ०४: रशियन संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे (डयूमा) अध्यक्ष व्याचेस्लाव वोलोदिन यांच्या नेतृत्वाखालील भारत दौऱ्यावर आलेल्या रशियाच्या संसदीय शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज्य विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर हे देखील उपस्थित होते.

सशक्त राष्ट्र निर्माण होण्यासाठी राज्ये सशक्त होणे आवश्यक आहे असे सांगून संसदीय सहकार्य राज्यस्तरावर व विभाग स्तरावर देखील वाढावे या दृष्टीने ही भेट असल्याचे रशियन संसदेच्या अध्यक्षांनी यावेळी सांगितले.

रशियात ८९ प्रांत आहेत. प्रत्येक प्रांतात विधानसभा व स्थानिक सरकारे आहेत.  भारतात देखील राज्ये व विधानमंडळे आहेत. या स्तरावर संसदीय संबंध वाढवून परस्परांच्या चांगल्या संसदीय प्रथा परस्परांना अंगीकारता येतील असे वोलोदिन यांनी सांगितले.

आपल्या भेटीत आपण विधानमंडळ, उद्योग व्यापार प्रतिनिधी यांसह मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना भेटत असल्याचे सांगून वोलोदिन यांनी मुंबई विद्यापीठात १९६४ पासून रशियन भाषा विभाग कार्यरत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

रशिया आंतरराष्ट्रीयस्तरावर अनेक आव्हानांना तोंड देत असताना भारत देत असलेल्या पाठिंब्याबद्दल वोलोदिन यांनी भारताप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

विविध आव्हानांना सामोरे जात आपल्या देशाने सातत्याने प्रगती केली आहे, असे सांगून भारत रशिया व्यापार सध्याच्या ५७ अब्ज डॉलरवरून २०३० पर्यंत १०० अब्ज डॉलर इतका होईल असा विश्वास वोलोदिन यांनी व्यक्त केला.

रशिया नेहमी भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे असे सांगून भारत-रशिया संबंध नेहमी बहीण भावाप्रमाणे बळकट असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

उभय देशांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान यांसह ब्रिक्स व्यासपीठावर देखील सहकार्य वाढत आहे. उभय देशांमधील विद्यापीठांमध्ये सहकार्य वाढल्यास युवा पिढी परस्परांजवळ येईल, असे राज्यपालांनी सांगितले. मुंबईजवळील वाढवण बंदर पूर्ण झाल्यावर भारत इराण रशिया व्यापार वाढेल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

यावेळी वोलोदिन यांनी राज्यपाल श्री. राधाकृष्णन तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांना रशिया भेटीवर येण्याचे निमंत्रण दिले.

०००

प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनचा शाळा सर्वेक्षणाचा अहवाल ‘असर- २०२४’ मुख्यमंत्र्यांना सादर

मुंबई, दि. ०४: प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनचा शाळा सर्वेक्षणाचा अहवाल (Annual Status of Education Report) ‘असर-२०२४’ मंगळवारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रालयात सादर करण्यात आला. या अनुषंगाने चालू शैक्षणिक वर्षात राज्यातील शाळांनी इयत्ता पहिलीच्या मुलांसाठी राबविलेल्या शाळा पूर्व तयारी मेळावा- ‘पहिले पाऊल’ चे कौतुक करुन मुख्यमंत्र्यांनी देशाच्या तुलनेत महाराष्ट्राच्या सद्यस्थितीबाबत समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर भविष्यात शालेय शिक्षणात देशात अग्रेसर राहण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने अधिक प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.

यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव डॉ.अश्विनी भिडे, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार,, प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला, प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनच्या संचालक फरिदा लांबे, फाऊंडेशनचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

अहवालातील ठळक बाबी :

प्रथम संस्थेने महाराष्ट्रात 33 ग्रामीण जिल्ह्यातील 987 गावांतील 19,573 घरांमधील 33,746 मुलांचे सर्वेक्षण केले. तीन वर्षांच्या पूर्व प्राथमिक शाळेमध्ये नोंदणी असलेल्या मुलांचे प्रमाण 2022 च्या 93.9 टक्क्यांच्या तुलनेत 2024 मध्ये 95 टक्के इतके आहे. 6 ते 14 वयोगटातील पटनोंदणी दर गेल्या आठ वर्षांपासून 99 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. कोरोनाच्या काळात शाळा बंद असूनही 2018 मधील 99.2 टक्क्यांवरुन एकूण पटनोंदणीचे आकडे 2022 मध्ये 99.6 पर्यंत वाढून 2024 मध्ये सुद्धा स्थिर आहेत.

पटनोंदणीबरोबरच वाचन, गणित, डिजिटल साक्षरता आदींबाबतही अहवालामध्ये नोंद घेण्यात आली आहे. 14 ते 16 वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये विविध डिजिटल टास्क करण्याचे प्रमाण 83.4 ते 92.3 टक्के इतके आहे. इयत्ता तिसरी मधील पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यामध्ये कोरोना मध्ये झालेला अध्ययन क्षय भरून काढण्यात येत आहे असे दिसून येते. इयत्ता तिसरीतील मुले जी इयत्ता दुसरीच्या पातळीचे वाचन करू शकतात याचे महाराष्ट्राचे प्रमाण देशपातळीपेक्षा 10 टक्क्यांनी जास्त आहे.

वय वर्ष 15 ते 16 याच्यामध्ये 98 टक्के विद्यार्थी हे शाळांमध्ये प्रवेशित आहेत. सर्वात कमी शाळाबाह्य विद्यार्थी असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र हे एक राज्य आहे. वय वर्ष 14 ते 16 मधील विद्यार्थ्यांच्या डिजिटल साधनांची उपलब्धता मध्ये राज्यातील 94.2 टक्के विद्यार्थ्यांच्या घरी स्मार्टफोन आहे व यातील 84.1 टक्के विद्यार्थी त्याचा वापर करू शकतात. यातील 63.3 टक्के विद्यार्थी हे शिक्षणाच्या संदर्भात स्मार्टफोनचा वापर करतात, अशी नोंदही ‘असर’ अहवालात घेण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

०००

 

ताज्या बातम्या

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांत्वन

0
पुणे, दि. २४: ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ स्व. डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाषाण येथील निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. श्री....

पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आपत्ती नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्याचे आदेश

0
हेल्पलाईन क्रमांक प्रदर्शित जनतेला मिळणार अधिकृत माहिती हेल्पलाईन क्रमांक जतन करण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी दि 24 (जिमाका) :- पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्काळ संपर्कासाठी...

रोजगार हमी योजना अधिक प्रभावीपणे राबवा -रोहयो मंत्री भरत गोगावले

0
सिंधुदुर्गनगरी दिनांक २४ (जिमाका) :- रोजगार हमी योजना ही ग्रामीण विकासासाठी एक महत्त्वाची योजना आहे. ग्रामीण भागात ‘रोजगार हमी’ मुळे बदल होत आहेत. या बदलाची गती वाढवण्यासाठी...

शेतीमध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये देणार – कृषीमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे

0
 पुणे, दि.24: शेतकऱ्यांचे जीवन सुरळीत होण्यासाठी, त्यांच्या जीवनात सुटसुटीतपणा आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून गेल्या सहा महिन्यात 50 ते 55 धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. शेतीला प्रोत्साहन म्हणून शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक...

पुढील वर्षी बाल पुस्तक जत्रेत सांस्कृतिक कार्य विभागाचा सहभाग- सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार

0
पुणे, दि. 24:  ‘पुणे बाल पुस्तक जत्रा’ सारख्या उपक्रमातून बालमनावर चांगले संस्कार होत असल्याने पुढील वर्षांपासून बाल पुस्तक जत्रेत सांस्कृतिक कार्य विभागातर्फे विविध सांस्कृतिक...