रविवार, मे 25, 2025
Home Blog Page 257

‘ॲग्री स्टॅक’ योजना – कृषी क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल…

कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शेतकऱ्यांना जलदगतीने सेवा देण्यासाठी युनिक आयडीचा उपयोग होणार आहे. यात शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असेल तर त्यांना फार्मर आयडी अर्थात शेतकरी ओळख क्रमांक दिला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषिविषयक सेवा, सुविधा तसेच शासकीय योजनांचे लाभ पारदर्शकपणे मिळू शकतील. यासाठी ‘ॲग्री स्टॅक’ नावाने डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. याची नोंदणी प्रत्येक महा ई-सेवा केंद्रावर सुरू असून ॲग्री स्टॅक उपक्रमाची गावस्तरावर मोहिम राबवून सर्व शेतकऱ्यांचा फार्मर आयडी तयार होण्यासाठी हा उपक्रम प्रशासनाकडून प्राधान्याने हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाबाबत शेतकऱ्यांना अनेक प्रश्न पडले असतील. आपण याठिकाणी या उपक्रमाबाबत विस्ताराने पाहू.

भारत एक कृषिप्रधान देश असून, देशाची अर्थव्यवस्था मुख्यतः कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा सर्वांगीण विकास कृषी क्षेत्राच्या विकासामुळेच शक्य होणार आहे. महाराष्ट्रात कृषी क्षेत्राशी संबंधित लोकसंख्या ५५ टक्के आहे. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य शासनाद्वारे अनेक महत्त्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपलब्ध संसाधनांचा उचित विनियोग करुन योग्य व पात्र लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहचवून कृषी क्षेत्राचा अधिकाधिक विकास शक्य आहे. केंद्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या अॅग्री स्टॅक योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ॲग्री स्टॅक हे कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवा वापरुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने व परिणामकारकरित्या पोहचण्यासाठी स्थापित केले जाणारे डिजिटल फाउंडेशन आहे. कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे हा अॅग्री स्टॅक उपक्रमाचा उद्देश आहे. या प्रकल्पामुळे माहिती आधारित योग्य निर्णय घेणे, गरजू शेतकऱ्यांना योग्य वेळी सेवा प्रदान करणे, कृषी उपक्रमांची कार्यक्षमता सुधारणे शक्य होईल. विविध शेतकरी आणि कृषी-केंद्रित योजनांची आखणी करणे व अंमलबजावणी करणे सुलभ होईल.

विविध योजनांतर्गत शेतकऱ्यांना लाभ देताना आधार प्रणालीचा वापर करुन लाभार्थीची ओळख पटविण्यात येते. तसेच महसूल विभागाने त्यांच्याकडील अधिकार अभिलेखाचे तसेच गाव नकाशांचे संगणकीकरणाचे काम पूर्ण केले आहे. त्या अभिलेखांपैकी अधिकार अभिलेख हे संगणकीय पद्धतीने अद्ययावत केले जात असल्याकारणाने तात्काळ उपलब्ध होऊ शकतात. याशिवाय महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग संस्थेने राज्यातील जमिनींचे भू-संदर्भीकरण करुन दिले आहे. यामुळे शेत जमिनीची इत्यंभूत अद्ययावत माहिती डिजिटाईज स्वरुपात तात्काळ उपलब्ध होत आहे.

त्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री), शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच (क्रॉप सोन रजिस्ट्री) व शेतांचे भू संदर्भिकृत (जिओ रेफरन्स लँड पार्सल) यांचा माहिती संच तयार करण्यासाठी आवश्यक मूलभूत माहिती उपलब्ध आहे. सर्व प्रथम बीड जिल्ह्यात २०२३-२४ या वर्षात अॅग्री स्टॅक अंतर्गत शेतकऱ्यांचा आधार जोडणी केलेला माहिती संच निर्मिती करण्याचा पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात आला. बीड जिल्ह्यातील पथदर्शी कार्यक्रमातील या आशादायक व दूरगामी परिणाम करणाऱ्या अनुभवावरुन महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात कालबद्ध पद्धतीने अॅग्री स्टॅक योजना अंमलबजावणी करण्याचे निश्चित केले आहे. 

ॲग्रिस्टॅक योजनेचा उद्देश

शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच, हंगामी पिकांचा माहिती संच व शेतांचे भू संदर्भिकृत माहिती संच एकत्रितरित्या तयार करणे व सातत्याने अद्ययावत करणे हे प्रमुख उद्द‍िष्ट आहे. याचबरोबर  शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र-राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सुलभ, पारदर्शक पद्धतीने तसेच वेळेवर उपलब्ध करणे, शेतकऱ्यांना स्वस्त कर्ज, उच्च गुणवत्तेची कृषी निविष्ठा, विपणन, स्थानिक आणि विशिष्ट तज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करुन देणे, शेतकऱ्यांना बाजारपेठेपर्यंत अधिक माहितीपूर्ण आणि सोयीस्कर प्रवेश मिळवून देणे, शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ जलदगतीने देण्यासाठी शेतकऱ्यांची ओळख पटवण्याची पारदर्शक व सोपी पद्धत विकसीत करणे तसेच प्रमाणिकरणाची सुलभ पद्धत विकसित करणे, शेतकऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी कृषी व संलग्न विभाग यांच्यात विविध योजनांच्या अभिसरण प्रक्रियेत सुलभता आणणे व उच्च-गुणवत्तेचा डेटा व अॅग्रि-टेकद्वारे कृषी उत्पादने आणि सेवांमध्ये नवकल्पना वाढविणे यांचा समावेश आहे. 

योजनेचे फायदे

ॲग्रिस्टॅकमुळे पीएम किसान योजनेंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी आवश्यकतेच्या अटी पूर्ण करून लाभ प्राप्त करण्यामध्ये सुलभता येईल, पीएम किसान योजनेंतर्गत पात्र सर्व लाभार्थी समाविष्ट करुन घेण्यास सहाय्य मिळेल, शेतकऱ्यांना पिकासाठी कर्ज मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड व शेतीच्या विकासासाठी इतर कर्जे उपलब्ध करुन घेण्यात सुलभता राहील, पिक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शेतकऱ्यांचे देय नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात सुलभता येईल, किमान आधारभूत किंमतीवर खरेदीमध्ये शेतकऱ्यांचे नोंदणीकरण ऑनलाईन पध्दतीने होऊ शकेल, शेतकऱ्यांसाठी कृषी कर्ज, वित्त, निविष्ठा आणि इतर सेवा देणाऱ्या यंत्रणांना कृषी सेवा सहजपणे उपलब्ध करुन देण्यासाठी सुलभता येईल, शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी, कृषी व संलग्न विभागांना शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री) च्या उपलब्ध आकडेवारीच्या आधारे योजनांचा लाभ वितरीत करण्यामध्ये सुलभता येईल आणि लाभार्थ्याची वारंवार प्रमाणिकरणाची आवश्यकता राहणार नाही, शेतकऱ्यांना वेळेवर कृषी विषयक सल्ले, विविध संस्थांकडून शेतकऱ्यांना संपर्क करण्याच्या संधीमध्ये वाढीसह नाविन्यपूर्ण कार्यक्रमांच्या विस्तार-प्रचारात सफलता प्राप्त होईल. अॅग्री स्टॅक योजनेची राज्यात सुयोग्य अंमलबजावणी कार्यान्वित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने भारत सरकार सोबत सामंजस्य करार ११ जुलै, २०२३ रोजी केला आहे.

-सचिन अडसूळ, जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर

 000000

 

विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधा तपासणीसाठी मंत्री, अधिकाऱ्यांनी वसतिगृह, शाळांना अचानक भेटी द्याव्यात – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • गुणवत्ता नियंत्रण पथक स्थापन करावे
  • योजनांचा लाभ शंभर टक्के डीबीटीमार्फतच जमा करावा

मुंबई, दि. ०४: राज्यातील सामाजिक न्याय विभागाची वसतीगृहे, शाळांमधील स्वच्छता, विद्यार्थ्यांना देण्यात येणारे भोजन याविषयीची पडताळणी करण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री, सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक भेटी देऊन पाहणी करावी. त्यासाठी विभागात गुणवत्ता नियंत्रण पथक स्थापन करण्यात यावे. विशेष सहाय्याच्या सर्व योजनांचा लाभ शंभर टक्के थेट बॅंक खात्यात (डिबीटीद्वारे)जमा होईल याची दक्षता घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय विभागाची आढावा बैठक झाली. यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, शिक्षणमंत्री दादाजी भुसे, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष तथा माजी खासदार आनंदराव अडसूळ, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, महाप्रीतचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी आदी यावेळी उपस्थित होते.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, समाजातील तळागाळातील घटकांच्या योजनांचा लाभ हा प्रत्येक लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे. त्यासाठी शासनाकडून निधीची कमतरता भासणार नाही. या योजनांचा लाभ थेट बॅंक खात्यात जमा होईल यासाठी विभागाने प्रयत्न करावेत. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणाबाळ निवृत्ती वेतन योजना यांचे लाभ देताना शंभर टक्के ते थेट बॅंक खात्यातच जमा झाले पाहिजे याची दक्षता घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.

सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारितील वसतीगृहे, शाळा यामध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छता, राहण्याची व्यवस्था, भोजन आदींची गुणवत्ता कशी आहे याच्या पाहणीसाठी अधिकाऱ्यांनी अचानक भेटी देणे सुरू करावे. भोजनाचा दर्जा मंत्री, सचिव, अधिकाऱ्यांनी तपासावा, विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड करण्यात येऊ नये, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

विभागाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन समाजातील दुर्बल, वंचित आणि मागासलेल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणावे. विभागाच्या योजना स्थानिक पातळीवर सुलभतेने पोहचविण्यावर भर द्यावा. सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात असलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या सोयी- सुविधांमध्ये  सुधारणा  करुन विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पध्दतीने शिक्षण घेता यावे यासाठी सामाजिक  न्याय विभागामार्फत विशेष प्रयत्न करण्यात यावेत. विभागात गुणवत्ता नियंत्रण पथकाची स्थापना करावी त्यांच्या मार्फत वसतीगृह, शाळांमधील सुविधांच्या गुणवत्तेची पडताळणी करावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले. वसतीगृह, शाळा यामधील सुविधा तसेच तेथील साहित्य, बांधकाम याविषयी तक्रार दाखल करण्यासाठी ॲप विकसती करण्याचे निर्देश देखील उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.

केंद्र शासन तसेच राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची अंमलबजावणी, अस्तित्वातील योजनांमध्ये सुधारणा, नव्या योजना सुरू करणे, योजनांच्या अंमलबजावणीमधील अडथळे दूर करणे आदींच्या अनुषंगानेही बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी विभागामार्फत सुरू असलेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.

००००

शैलजा देशमुख/विसंअ/

अभिनव उपक्रम, डिजीटल तंत्रज्ञानाने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ०४ : शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून राज्यात अभिनव उपक्रम, प्रयोगांद्वारे  डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे. भविष्यकालीन धोरणांवर अधिक लक्ष केंद्रित करून विद्यार्थी गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी विभागाने अधिक जोमाने काम करावे आणि त्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक झाली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांच्यासह शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, शाळा भेट उपक्रम स्तुत्य असून त्यामुळे शालेय व्यवस्थापन, शिक्षणाचा दर्जा, मुलांना देण्यात येणाऱ्या सुविधा,  शाळेतील भौतिक सुविधा याची माहिती नियमित मिळण्यास मदत होईल. हा उपक्रम राज्यात प्रभावीपणे राबवण्यात यावा. शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान एका शाळेला भेट दिली पाहिजे. शाळा आणि वसतीगृहांना अचानक भेटी देण्यासाठी अधिकाऱ्यांनी  पथके करावीत.

प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कला गुण असतात. त्यांना शालेयस्तरावरूनच वाव मिळाला पाहिजे. शिक्षण क्षेत्रास मदत, सहकार्य करण्यासाठी काम करण्यासाठी अनेक दानशूर व्यक्ती व संस्था इच्छुक आहेत. या व्यक्तींचे तसेच सामाजिक संस्थांचे सहकार्य घ्यावे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्वाचे आहे. मुलांची नियमित आरोग्य तपासणी केली जावी. यासाठी आरोग्य विभागाचे सहकार्य घ्यावे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

शिक्षणाचा दर्जा, गुणवत्ता वाढीसाठी सांगली, सातारा जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या स्मार्ट स्कूल उपक्रमाची माहिती घ्यावी आणि हा उपक्रम राज्यात सुरू करावा, असे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.

शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणाले, पीएमश्री शाळा योजनेच्या धर्तीवर सीएमश्री शाळा योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत तालुकास्तरावर किमान एक आदर्श शाळा निर्माण केली जाणार आहे. ही शाळा  डिजिटल सुविधांनी परिपूर्ण  करून शाळेत ग्रंथालय, लॅब, क्रीडा विभाग यासाठी आवश्यक साधने दिली जाणार आहेत.

यावेळी उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते शाळा गुणवत्ता मुल्यांकन आणि आश्वासन आराखड्याचा शुभारंभ करण्यात आला.

०००

एकनाथ पोवार/विसंअ/

बारावी, दहावीच्या परीक्षांदरम्यान कॉपीमुक्त अभियान यशस्वी करा – मुख्य सचिव सुजाता सौनिक

मुंबई, दि. ०४:  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 ची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) परीक्षा दि. 11 फेब्रुवारी ते दि. 18 मार्च 2025 आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. दहावी) परीक्षा दि. 21 फेब्रुवारी ते दि. 17 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कॉपी प्रकरणास पूर्णतः प्रतिबंध करण्यासाठी राज्यभर कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचे आवाहन मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी बारावी आणि दहावीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त आणि निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पडाव्यात यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने प्रयत्न करण्याचे निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत यासंदर्भात आढावा घेतला. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यावेळी उपस्थित होते. तर शालेय शिक्षण आयुक्त, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.

मुख्य सचिव यांनी दिलेल्या निर्देशानुसार शिक्षण मंडळामार्फत राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरामध्ये जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेराद्वारे परीक्षा केंद्राची निगराणी करण्यात येईल. परीक्षा सुरू होण्याच्या एक दिवस आधी परीक्षा केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा सुव्यवस्थित आहेत का ? याची जिल्हा प्रशासनाकडून खात्री केली जाईल. परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व विभागांचे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर भरारी पथके व बैठी पथके उपलब्ध होतील याचे नियोजन करण्यात येणार आहे.

जिल्हा प्रशासनाकडून परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या केंद्र संचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधीत घटकांची फेशियल रेकग्निशन सिस्टीमद्वारे तपासणी करण्यात येईल. तसेच विभागीय मंडळामार्फत परीक्षेशी संबंधित सर्व घटकांना अधिकृत ओळखपत्र देण्यात येईल. महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ मालप्रॅक्टीसेस ॲक्ट 1982 या कायद्याची अंमलबजावणी करुन व कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल. परीक्षा केंद्रापासून 500 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात येतील तसेच संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात 144 कलम लागू करण्यात येईल.

मंडळामार्फत करण्यात येणाऱ्या या उपाययोजनांची सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व परीक्षेशी संबंधित सर्व घटकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मंडळाच्या सचिव डॉ.माधुरी सावरकर यांनी केले आहे.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/

रायगडमधील विकासकामांचा मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून आढावा

मुंबई दि. ०४ : आदगाव समुद्रकिनारी पर्यटनाच्या दृष्टीने सौंदर्यीकरण करण्याबरोबर पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्याचबरोबर नाममात्र दरात ग्रामपंचायतीने देखभाल दुरूस्तीचे काम करावे असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

आदगाव बीच, श्रीवर्धन, सी.डी. देशमुख जैव विविधता प्रकल्प जामगाव, श्रीवर्धन परिसरातील नगरपरिषद, नगरपंचायत मधील नगरविकास विभागातील प्रलंबित विषय, प्रादेशिक परिवहन क्षेत्र माणगाव येथे ब्रेक टेस्ट ट्रेक करणेसंदर्भातील कामांचा आढावा मंत्री कु. तटकरे यांनी मंत्रालयात घेतला.

बैठकीत माजी आमदार अनिकेत तटकरे, रोहाचे मुख्य अधिकारी अजयकुमार एडके, श्रीवर्धनचे मुख्य अधिकारी विराज लबडे, मेरिटाईम बोर्डचे अभियंता श्री. देवरे, उपविभागीय अभियंता तुषार लुंगे, सहायक अभियंता सोनिया महंद, श्रीवर्धनचे प्रांत अधिकारी महेश पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, आदगाव येथील अस्तित्वातील दगडी बंधाऱ्याच्या पृष्ठभागाचे काँक्रिटीकरण करून त्यावर मत्स्यजेट्टीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या कामाच्या प्रक्रियेस गती द्यावी. श्रीवर्धन मधील नगरपरिषदमधील प्रलंबित कामांसाठी निधी वितरीत करण्याची प्रक्रिया राबवावी. घनकचरा व्यवस्थापन करुन पर्यावरण व शहराची स्वच्छता राखण्यासाठी रोहा नगरपरिषदेस वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून घनकचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात यावा. रोहा वन विभागातील मौजे जामगांव येथे विकसित करावयाच्या डॉ. चिंतामणराव देशमुख जैवविविधता, वन व वनस्पती उद्यान अंतर्गत कामांना गती देण्याच्या सूचनाही मंत्री कु.तटकरे यांनी दिल्या.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

कर्करोग प्रतिबंधासाठी जनजागृती गरजेची – मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, दि. ०४ : कर्करोगापासून बचाव करण्यासाठी राज्यात जनजागृती आवश्यकता असून वैद्यकीय क्षेत्रातील सर्व तज्ज्ञ याकामी सेवाभावाने काम करत आहेत. आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून हे काम अधिक चांगल्या पद्धतीने, अधिक गतीने आणि एकजुटीने करावे. कर्करोगावर मात करण्यासाठी योग्य औषध उपचारांबरोबर अत्याधुनिक आरोग्य केंद्राच्या उभारणीवर भर द्यावा लागणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज व्यक्त केली.

जागतिक कर्करोग दिना निमित्ताने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह, आरोग्य सेवा तथा अभियान संचालनालयानाचे आयुक्त अमगोथू श्री रंगा नायक, आरोग्य सेवा संचालक डॉ.नितीन अंबाडेकर, टाटा मेमोरियल इस्टिट्यूटचे संचालक डॉ.सुदिप गुप्ता, कॅन्सर वॉरियर, आरोग्यसेविका, आशासेविका तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील डॉक्टर्स आदी उपस्थित होते.

सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री.आबिटकर म्हणाले की, कर्करोगाची रूग्णसंख्या वाढत असून मुंबईतील टाटा हॉस्पिटलच नाही तर प्रत्येक शहरांमध्ये सुद्धा हॉस्पिटलची आवश्यकता निर्माण झाली आहे. आरोग्य विभागाच्या यंत्रणेनेही यासाठी सजगतेने काम करणे गरजेचे आहे. आज चांगला आहार, जीवनशैली यामुळे आयुर्मान वाढले आहे. परंतु शेतीशी, शारीरिक श्रमाशी ज्यांची नाळ तुटली, ती माणसं मात्र साठीतच अनेक व्याधीने ग्रस्त झाली आहेत. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेने सूर्यनमस्कार, योगासने यांच्या प्रशिक्षणाबरोबरच कर्करोग होऊ नये यासाठी प्रबोधनाची मोहीम राबविण्याची गरज आहे. कर्करोग मुक्तीच्या अभियानांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर येण्यासाठी सगळ्यांनी हातात हात घालून काम करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री श्री.आबिटकर यांनी केले.

सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की, कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे, त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. कर्करोगाच्या बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, उपचार आणि उपचारानंतरची पुनर्वसन प्रक्रिया या तीनही गोष्टीवर लक्ष देण्याची मोठ्या प्रमाणात गरज आहे. प्रत्येक देशामध्ये कर्करोगाच्या बाबतीत वेगवेगळी पावले उचलली जात आहेत. याच्यामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनेपासून उपचार, संशोधन आणि वेगवेगळे उपाय यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या माध्यमातूनही लोकांना सेवा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमादरम्यान रायगड कर्करोग आरोग्यसेवा व मुखकर्करोग आणि कर्करोग सदृश्य या दोन माहिती पुस्तिकेचे प्रकाशन आरोग्यमंत्री श्री.आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयुक्त अमगोथू श्री रंगा नायक तर आभारप्रदर्शन संचालक डॉ.नितीन अंबाडेकर यांनी केले.

* राज्यात कर्करोग प्रतिबंध व नियंत्रणाबाबत राबविण्यात येत असलेले उपक्रम :

* राष्ट्रीय कर्कराग, मधुमेह, हृदयरोग व पक्षाघात प्रतिबंधक कार्यक्रम 34 जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आला आहे.

* शासकीय रूग्णालयांमध्ये कर्करोग, मधुमेह व उच्चरक्तदाब इत्यादीकरिता तपासणी व मोफत उपचार केले जातात.

* 2018-19 पासून राज्यात पॉप्युलेशन बेस्ड स्क्रीनिंग हा उपक्रम सुरू आला आहे. ग्रामीण भागातील जनतेसाठी 30 वर्षावरील  वयोगटासाठी पाच आजारांकरिता (मधुमेह, उच्चरक्तदाब, मौखिक कर्करोग, स्तर कर्करोग, व गर्भाशय मुख कर्करोग) प्राथमिक तपासणी आशा व एएनएमद्वारे करण्यात येते. लवकर निदान करून रूग्णांना वेळेत योग्य उपचार देण्यात येत आहे.

* सन 2018-19 मध्ये जिल्हास्तरावर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, अमरावती, नाशिक, गडचिरोली, अकोला व बीड येथे कर्करोग आरोग्य सुविधा DAY CARE CENTER सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत रूग्णांना केमोथेरेपी उपचार उपलब्ध करून देण्यात येतात.

* सन 2018-19 पासून आजतागायत एकूण 2028 कर्करोग रूग्णांना केमोथेरेपी सेंटरमध्ये उपचार देण्यात आले आहेत.

* राज्यात अमरावती व नाशिक या जिल्ह्यामध्ये सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल उभारण्यात आले असून त्यामध्ये कर्करोग रूग्णांना बाहृयरूग्ण, आंतररूग्ण, शस्त्रक्रिया, केमोथेरेपी सेवेसह रूग्ण व कुटुंबांना समुपदेशन सेवा उपलब्ध करून देण्यात येते.

* राज्यात 4 ठिकाणी रेडिऐशन ऑन्कॉलॉजीचे विभाग स्थापन करण्यात येणार आहे.

* टर्शरी कॅन्सर केअर सेंटर या योजनेंतर्गत राज्यातील कर्करोग रूग्णालयांचे बळकटीकरण अंतर्गत कर्करोग रूग्णांना माफक दरात व दारिद्र्य रेषेखालील रूग्णांना मोफत उपचार उपलब्ध करून दिले जातात.

०००

 

राज्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विशेष स्पर्धा

मुंबई दि. ०४ : राज्यातील उपयोजित कला (अप्लाईड आर्ट) महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून मुंबईतील सर ज.जी.कला महाविद्यालयासह महाराष्ट्रात असलेल्या उपयोजित कला महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण, प्रभावी याबरोबरच सर्जनशील आणि कलात्मक जाहिरातींच्या संकल्पना, जाहिरात डिझाईन आणि टॅगलाईन अशा तीन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेसाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने केले आहे.

सर्जनशील आणि कलात्मक जाहिरातींच्या संकल्पना, डिझाईन आणि टॅगलाईन स्पर्धेच्या प्रवेशिका स्पर्धकांनी दिनांक ५ ते १६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत dgiprdlo@gmail.com या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीने पाठवाव्या. स्पर्धेसाठी आलेल्या प्रवेशिकांचे परीक्षण करून २७ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘मराठी भाषा गौरव दिनी’ विजेत्या स्पर्धकांना पुरस्कार देण्यात येतील. या स्पर्धेसाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने केले आहे.

उपयोजित कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून क्रिएटिव्ह संकल्पना, डिझाईन तसेच उत्कृष्ट टॅगलाईन स्पर्धेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. डिजिटल डिझाइन मध्ये पोस्टर्स, सोशल मीडिया क्रिएटिव्ह, बॅनर्स, इन्फोग्राफिक्स तसेच प्रिंट डिझाइनमध्ये पोस्टर्स, फ्लायर्स, ब्रोशर्स, बॅनर्स, स्टॅण्डीज अशा स्वरूपाची स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी खुली असून सहभागी होणाऱ्यास वेगवेगळ्या स्पर्धांसाठी एकूण 3 प्रवेशिका पाठविता येतील.

विजेत्यांना मिळणार ही बक्षीसे –

प्रथम पारितोषक विजेता (१) – २५ हजार रुपये

द्वितीय पारितोषक विजेता (१) – १५ हजार रुपये

तृतीय पारितोषक विजेता (१) – १० हजार तसेच

उत्तेजनार्थ म्हणून एकूण १५ स्पर्धकांना प्रत्येकी एक हजार याप्रमाणे एकूण १५ हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.

असे आहेत स्पर्धेचे विषय –

बृहन्मुंबई महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, मेट्रो, परिवहन , सांस्कृतिक कार्य, मराठी भाषा, पर्यटन, राजशिष्टाचार, मृद व जलसंधारण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, कौशल्य विकास, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, गृह, राज्य उत्पादन शुल्क, विधी व न्याय, कामगार, सामाजिक न्याय, आदिवासी विकास, दिव्यांग कल्याण, इतर मागास व बहुजन कल्याण, वने, पर्यावरण व वातावरणीय बदल, ऊर्जा, पाणी पुरवठा व स्वच्छता, रोजगार हमी योजना, महिला व बालविकास, क्रीडा व युवक कल्याण, अन्न व नागरी पुरवठा, अन्न व औषध प्रशासन, सामान्य प्रशासन/वित्त व नियोजन/ माहिती व तंत्रज्ञान, कृषि/सहकार/पणन, वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन/दुग्धव्यवसाय/मत्स्यव्यवसाय/फलोत्पादन, महसूल, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.

अशा आहेत स्पर्धेच्या अटी व शर्ती –

सादरीकरणे मूळ आणि सहभागी स्पर्धकांनी स्वत:ने तयार केलेली असावी. सादरीकरण कोणत्याही कॉपीराइट किंवा बौद्धिक संपदा अधिकारांचे उल्लंघन करणारी नसावीत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला सादर केलेली कोणतीही रचनात्मक सामग्री प्रचार, विपणन, किंवा प्रकाशन उद्देशाने वापरण्याचा अधिकार महासंचालनालयाला असेल. अंतिम निर्णय महासंचालनालयाचा असेल. विजेते ईमेलद्वारे सूचित केले जातील आणि अधिकृत मंचावर जाहीर केले जातील. कोणतीही कॉपीराइट सामग्री वापरली जाऊ नये. असभ्य भाषा/आक्षेपार्ह शब्द/हिंसात्मक भाषा वापरण्यास बंदी असून राज्य शासनाची प्रतिमा मलीन होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. सहभागींनी महाराष्ट्र शासनाने निर्दिष्ट केलेल्या थीम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणारे माहितीपट सादर करणे आवश्यक आहे. डिजिटलसाठी JPEG/PNG/PDF (प्रिंट डिझाइनसाठी किमान 300 dpi रिझोल्यूशन) असणे आवश्यक आहे. तर व्हिडिओसाठी एचडी असल्यास HD 1280 X 720 पिक्सेल तसेच फुल एचडी असल्यास 1920 x 1080 पिक्सेल असणे आवश्यक आहे. पोस्टर्स: A3 आकार (297 x 420 मिमी). सोशल मीडिया क्रिएटिव्ह: 1080 x 1080 पिक्सेल, फ्लायर्स/ब्रॉशर्स: A4 आकार (210 x 297 मिमी) स्वरुपात असणे आवश्यक आहे.

असे आहेत स्पर्धेचे निकष…

जाहिरात किती अनोखी आणि कल्पक आहे. ती इतरांपासून वेगळी आहे का? संकल्पना ताज्या आणि नाविन्यपूर्ण आहेत का हे परीक्षकांकडून तपासण्यात येतील. जाहिरात नवीन विचार किंवा पद्धतीवर तसेच रचनात्मक पद्धतीने सादर करण्यात आली आहे का हे पाहण्यात येईल. जाहिरात प्रेक्षकांवर कोणता भावनिक किंवा मानसिक प्रतिसाद निर्माण करते. ती लक्ष वेधून घेते का, प्रभावशाली प्रतिक्रिया निर्माण करते का, किंवा समज बदलते का?याचा विचार यावेळी होईल. जाहिरातीचे सौंदर्यशास्त्र. ती दृश्यात्मकदृष्ट्या आकर्षक आहे का?, मांडणी नीटनेटकी आहे का?, आणि संदेश प्रभावीपणे पोहोचवते का हे पाहण्यात येईल. जाहिरातमधील लिखित सामग्रीची गुणवत्ता. भाषा स्पष्ट, आकर्षक आणि संदेश प्रभावीपणे पोहोचवणारी आहे का हे तपासण्यात येईल. जाहिरात निवडलेल्या माध्यमाचा (जसे की टीव्ही, प्रिंट, डिजिटल इ.) कसा वापर करते. ते प्लॅटफॉर्मवर योग्य प्रकारे वापरले जाते का, ज्यामुळे जास्तीत जास्त रिच आणि प्रभावशाली होते का हे पाहण्यात येईल. सर्जनशीलता, थीमशी सुसंगतता, संदेशाची स्पष्टता, दृश्य प्रभाव, मौलिकता यावर निर्णय घेण्यात येईल. या स्पर्धांबाबत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा निर्णय अंतिम राहिल.

याबाबतचा सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केलेला शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर ४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.

०००

वर्षा आंधळे/वससं/

लिंग समभावासाठी संस्थात्मक यंत्रणा उभारताना येणाऱ्या आव्हानांवर ६ फेब्रुवारी रोजी चर्चासत्र

मुंबई, दि. ०४: लिंगसमभावासाठी संस्थात्मक यंत्रण उभारताना येणारी आव्हाने, अडथळे व कार्यपद्धतीबाबत ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते ४ या वेळेत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रास उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित राहणार आहेत.

बिजिंग परिषदेला ३० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त जगातील सर्व देशांनी व राज्यांनी स्वीकृत केलेल्या कृती कार्यक्रमाला अनुसरून कृती कार्यक्रमांचा आढावा कमिशन ऑन स्टेटस ऑफ वूमन कडून संयुक्त राष्ट्रसंघ, न्यूयॉर्क येथे मार्च २०२५ मध्ये घेतला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

या चर्चासत्रात महिला व मुलींचे आरोग्य व प्रजननविषयक हक्क, महिलाविरोधी हिंसाचार प्रतिबंध करण्यासाठी स्थायी कार्यपद्धती, लिंग समभाव वाढविण्यासाठी विविध शासकीय विभागांच्या समन्वयाने तसेच लोकसहभागातून संस्थात्मक कार्यप्रणाली उभारणी, नागरी भागातील रोजगार, ग्रामीण भागात रोजगार हमी योजना आणि कौशल्य विकास कार्यक्रम तसेच महाराष्ट्राचे चौथे महिला धोरण यावर यावेळी चर्चा होणार आहे.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

बुडीत बंधारा बांधकामामुळे पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल -मंत्री मकरंद जाधव-पाटील

मुंबई दि. ०४: सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व जावळी तालुक्यातील कोयना जलाशयामध्ये बुडीत बंधारे बांधण्याच्या कामास विशेष बाब म्हणून मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे. या निर्णयामुळे या भागात पाण्याचे दुर्भिक्ष असणाऱ्या गावांना व शेतकऱ्यांना याचा लाभ होऊन पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी व्यक्त केला.

मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव पाटील म्हणाले, कोयना जलाशय परिसरातील हे २५ बंधारे बुडीत क्षेत्रात येत आहेत. जलाशयाची पाणी पातळी फेब्रुवारी ते मे या महिन्यांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात कमी होते. त्यामुळे या परिसरातील स्थानिक रहिवाश्यांना पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याची समस्या भेडसावते. ही समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना म्हणून या बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे.

मृद व जलसंधारण विभागामार्फत कोयना जलाशयामध्ये बुडीत बंधारे बांधण्यात येणार आहेत.  या बंधाऱ्यांमुळे आवश्यक पाणी साठा होऊन या भागात पिण्यास व शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल. या कामास मंत्रिमंडळाने विशेष बाब म्हणून मान्यता दिल्याने या भागातील नागरिकांचे जीवन अधिक सुकर होण्यास मदत होईल, असेही मंत्री श्री. जाधव पाटील म्हणाले.

२५ बंधारा बांधकामाच्या कामास १७० कोटीची तरतूद

महाबळेश्वर व जावळी तालुक्यातील कोयना जलाशयामध्ये २५ बंधारे बांधण्यासाठी १७० कोटी रूपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये बुडीत बंधारा आकल्पे, आहिरे, फुरुस, हरचंदी, कळम गाव, लामज, कोट्रोशी, म्हावशी, मुनावळे, निवळी क्र. १, निवळी क्र. २, पाली तर्फ आटेगाव, पिंपरी तर्फ तांब, रेनोशी, उचाट, वाळणे, आवळण,  दरे तर्फ तांब क्र १, दरे तर्फ तांब क्र. २, आणि जावळी तालुक्यातील आमशी, गावढोशी, केळघर तर्फ सोळशी,  तेटली, शेंबडी आणि  वेंगळे या बुडीत बंधाऱ्याच्या समावेश आहे.

०००

एकनाथ पोवार/विसंअ/

 

 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातील कामे पारदर्शकपणे करा- कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

मुंबई, दि. ०४ :  नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राज्यात राबवताना 21  जिल्ह्यातील 7201 गावातील कामांममध्ये पारदर्शकता असावी, शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी संवर्धित शेती पद्धतीद्वारे कृषिपूरक उद्योगांना चालना देण्यावर भर द्यावा, असे निर्देश कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले. मंत्रालयात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, नानाजी  देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंग, उपसंचालक संतोष अमदापुरे, कृषी विद्यावेत्ता विनय कोळेकर यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

कृषिमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, या प्रकल्पातील टप्पा एकमधील कामे पूर्ण झाली आहेत तर दुसऱ्या टप्प्यातील होणारी कामेही शेतकऱ्यांना विश्वासात घेवून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे करावीत. कृषी उत्पादन पद्धतींची कार्यक्षमता वाढविणे, नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये विविध संशोधन संस्थाशी समन्वय व सामंजस्य करार करणे, शेतीमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, क्षमता बांधणी, मनुष्यबळ व्यवस्थापन, सनियंत्रण व मूल्यमापन यावर भर देण्यात यावा. प्रकल्पातील गाव निवडीचे निकष, शेतीशाळा हा उपक्रम राज्यभरात वाढवून शेतकऱ्यांना योग्य ती माहिती देण्यात यावी.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंग यांनी प्रकल्पाची सद्यस्थिती आणि सुरू असलेल्या कामांच्या माहितीचे यावेळी सादरीकरण केले.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

 

ताज्या बातम्या

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांत्वन

0
पुणे, दि. २४: ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ स्व. डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाषाण येथील निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. श्री....

पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आपत्ती नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्याचे आदेश

0
हेल्पलाईन क्रमांक प्रदर्शित जनतेला मिळणार अधिकृत माहिती हेल्पलाईन क्रमांक जतन करण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी दि 24 (जिमाका) :- पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्काळ संपर्कासाठी...

रोजगार हमी योजना अधिक प्रभावीपणे राबवा -रोहयो मंत्री भरत गोगावले

0
सिंधुदुर्गनगरी दिनांक २४ (जिमाका) :- रोजगार हमी योजना ही ग्रामीण विकासासाठी एक महत्त्वाची योजना आहे. ग्रामीण भागात ‘रोजगार हमी’ मुळे बदल होत आहेत. या बदलाची गती वाढवण्यासाठी...

शेतीमध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये देणार – कृषीमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे

0
 पुणे, दि.24: शेतकऱ्यांचे जीवन सुरळीत होण्यासाठी, त्यांच्या जीवनात सुटसुटीतपणा आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून गेल्या सहा महिन्यात 50 ते 55 धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. शेतीला प्रोत्साहन म्हणून शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक...

पुढील वर्षी बाल पुस्तक जत्रेत सांस्कृतिक कार्य विभागाचा सहभाग- सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार

0
पुणे, दि. 24:  ‘पुणे बाल पुस्तक जत्रा’ सारख्या उपक्रमातून बालमनावर चांगले संस्कार होत असल्याने पुढील वर्षांपासून बाल पुस्तक जत्रेत सांस्कृतिक कार्य विभागातर्फे विविध सांस्कृतिक...