रविवार, मे 25, 2025
Home Blog Page 256

महाराष्ट्र क्वांटम विज्ञान व तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष साजरे करणार – मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई, दि. ०५ : महाराष्ट्र शासनाचा माहिती तंत्रज्ञान विभाग हा युनेस्कोसोबत भागीदारी करणार असून २०२५ हे वर्ष क्वांटम विज्ञान व तंत्रज्ञानशी संबंधित आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरे केले जाणार असल्याची घोषणा माहिती तंत्रज्ञान मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांनी केली.

नोबेल पारितोषिक विजेत्या, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ व्हर्नर हायझेनबर्ग यांनी शोधलेली आधुनिक क्वांटम यांत्रिकीच्या १०० व्या वर्धापन दिनानिमित्त, संयुक्त राष्ट्रांनी २०२५ हे वर्ष क्वांटम विज्ञान व तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे. क्वांटम विज्ञानाच्या परिवर्तनकारी क्षमतेला ओळखून, महाराष्ट्र शासनाने या क्षेत्रात संशोधनाचा, नवकल्पनांचा आणि क्षमता निर्माण करण्याचा संकल्प केलेला आहे.

मंत्री अ‍ॅड.शेलार म्हणाले की, ही भागीदारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत २०४७’ या दृष्टीकोणाशी जोडलेली आहे. भारत सरकारने २०२३ मध्ये विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयालांतर्गत राष्ट्रीय क्वांटम मिशन सुरू केले असून, ते भारताच्या क्वांटम क्षेत्रातील नव्या संधींसाठी मार्ग तयार करत आहे.

“महाराष्ट्र या क्षेत्रातील जागतिक आणि राष्ट्रीय संस्थांसोबत सक्रियपणे जोडले जाण्याचा प्रयत्न करीत असून एक एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकत आहे,” असेही मंत्री अ‍ॅड.शेलार यांनी सांगितले.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान विभाग, विद्यार्थी, संशोधक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ञांसाठी परिषद, कार्यशाळा आणि तज्ञांची व्याख्याने आयोजित करणार आहे. कौशल्यविकास, तंत्रशिक्षण आणि उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, राष्ट्रीय क्वांटम मिशन आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालय यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला जाईल, अशी माहिती देखील मंत्री अ‍ॅड.शेलार यांनी दिली.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विश्वविद्यालयासोबत भागीदारी करून क्वांटम संबंधित कौशल्यविकास कार्यक्रम राबवण्याचा आणि केंद्र सरकाराच्या सहकार्याने ‘क्वांटम सेंटर ऑफ एक्सलन्स लॅब’ स्थापन करण्याचा विचार करत असल्याबाबत देखील मंत्री अ‍ॅड.शेलार यांनी सांगितले.

उच्चस्तरीय तज्ञांच्या टास्कफोर्स अंतर्गत स्थापन करण्यात येणाऱ्या महाराष्ट्रात पहिल्या कृत्रिम बुद्धीमत्ता विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात क्वांटम तंत्रज्ञानाचा आधीच समावेश करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र एआय धोरण टास्कफोर्स आणि सायबर सुरक्षा धोरण टास्कफोर्स क्वांटम तंत्रज्ञानाच्या परिणामांचा अभ्यास करत असून, ते त्यांच्या धोरणात्मक शिफारशींमध्ये संबंधित विषय समाविष्ट करतील, असेही मंत्री अ‍ॅड.शेलार यांनी यावेळी सांगितले.

०००

संजय ओरके/विसंअ/

 

शासकीय कार्यालयामध्ये सौरऊर्जा वापराकडे विशेष लक्ष द्या – उपमुख्यमंत्री अजित पवार 

नांदेड, दि. ०५ : केंद्र व राज्य शासनाच्या अक्षय ऊर्जा निर्मिती संदर्भात सर्व जिल्ह्यांनी सकारात्मकतेने काम करावे. जिल्ह्याच्या वार्षिक आराखड्यामध्ये शाळा, कार्यालयांच्या सौर ऊर्जे संदर्भात प्रस्तावाचा समावेश करावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज येथे केली.

उपमुख्यमंत्री कार्यालय मंत्रालय मुंबई येथून सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा वार्षिक योजना (डीपीसी) संदर्भातील राज्यस्तरीय ई – बैठक घेण्यात आली. या बैठकीला मंत्रालयातून इतर मागास बहुजन कल्याण,पशुसंवर्धन,अपारंपारिक ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची उपस्थिती होती तर वित्त नियोजन राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, नवी दिल्लीवरून खासदार अशोक चव्हाण, अप्पर मुख्य सचिव राजगोपाल वर्मा, वित्त व नियोजन विभागाचे वरिष्ठ अधिकारी ई-उपस्थित होते. तर नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातून आमदार श्रीजया चव्हाण, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, सहाय्यक जिल्हाधिकारी अनुष्का शर्मा नांदेड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे व सर्व विभाग प्रमुखांची ई -उपस्थिती होती.

यावेळी लोकप्रतिनिधींनी गाव तिथे स्मशानभूमी, पानंद रस्ते, शाळांची दुरुस्ती, मराठवाडा मुक्ती संग्राम कार्यक्रमांसाठी वाढीव निधी, माळेगाव यात्रा, जलजीवन मिशन, नव्या रोहित्रांसाठी वाढीव निधी, तसेच शाळा व सर्व शासकीय कार्यालयांवर सोलर सिस्टम बनविण्याबाबतची मागणी केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी यांनी सादर केलेल्या प्रस्तावाला समजून घेतले. उपस्थित लोकप्रतिनिधींच्या प्रारूप आराखड्यासंदर्भातील मतांना लक्षात घेतले. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये नांदेड जिल्ह्याच्या अंतिम आराखड्याला मान्यता देण्यात येईल असे त्यांनी  स्पष्ट केले.

तत्पूर्वी, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2025 -26 च्या प्रारूप आराखड्याचे सविस्तर सादरीकरण केले. जिल्ह्यासाठी नियोजन विभागाने दिलेल्या रुपये 477.47 कोटी मर्यादेत आराखडा सादर करून विविध योजनेसाठी रुपये २०० कोटींची अतिरिक्त मागणी यावेळी करण्यात आली.

०००

 

सर्वसामान्यांना परवडणारी, दर्जेदार घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे,दि.०५ (जिमाका): प्रत्येक सर्वसामान्य माणूस त्याचे स्वत:चे हक्काचे घर असावे, असे स्वप्न घेवून जगत असतो. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो खूप कष्ट घेतो. अशा सर्वसामान्यांचे हे स्वप्न म्हाडा पूर्ण करीत आहे. अशाप्रकारे सर्वसामान्यांना परवडणारी, दर्जेदार घरे देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आज ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे कोकण विभागातील विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत 2 हजार 147 सदनिका आणि 117 भूखंड विक्रीसाठी संगणकीय सोडत कार्यक्रम पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे, कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, मुंबईच्या मुख्याधिकारी रेवती गायकर, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, म्हाडाच्या सह अधिक्षक वंदना सुर्यवंशी, मुख्य अभियंता शिवकुमार आडे, देखरेख कमिटीचे सदस्य व इतर अधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मागील आठवड्यात पुणे व पिंपरी-चिंचवड येथील घरांची लॉटरी काढण्यात आली. घरांच्या दर्जामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड न करण्याच्या स्पष्ट सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. ज्यांना आज घरे मिळाली त्यांचे अभिनंदन व ज्यांना नाही मिळाली त्यांना येथील पारदर्शी व्यवस्थेमुळे पुढील लॉटरीत निश्चितपणे घरे मिळतील, असा विश्वास आहे. सर्वसामान्य आणि गरजूंना आपल्या हक्काचे परवडणारे दर्जेदार घर मिळावे, यासाठी शासन कटिबद्ध आहे. अडीच वर्षांपासून या राज्यातल्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके ज्येष्ठ व लाडके शेतकरी या सर्वांसाठी शासनाने विविध योजना आणल्या आहेत. त्या माध्यमातून राज्याच्या विकासाचा वेग आपण वाढविला आहे.

ठाण्यात विविध विकासकामे सुरु आहेत. मेट्रोची कामे सुरु आहेत, सुशोभिकरणाची कामे सुरु आहेत, तलाव सुशोभिकरणाची कामे सुरु आहेत, वाहतूक कोंडीवर उपाययोजना करीत आहोत. शासनामार्फत मागील अडीच वर्षात अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यात आले. अडीच वर्षात शासनाने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. आपण आता नवीन गृहनिर्माण धोरण करतोय. या गृहनिर्माण धोरणामध्ये अनेक बदल आम्ही घडवतोय. त्यामध्ये परवडणारी घरे पाहिजेत, परवडणारी भाड्याची घरे पाहिजेत त्याचबरोबर ज्येष्ठांसाठी घरे पाहिजेत. वर्किंग वूमन साठी घरे, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, गिरणी कामगार, कंपन्यांमधील कामगारांसाठी घरे, पोलीसांसाठी, डबेवाले तसेच पत्रकारांसाठी घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गिरणी कामगारांनादेखील या माध्यमातून आपण घरे देणार आहोत. मुंबई उभी करण्यात गिरणी कामगारांचे मोठे योगदान आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले की, जेव्हा जेव्हा सोडतीचा कार्यक्रम असतो तेव्हा मी आवर्जून उपस्थित असतो. कारण हा एक आनंदाचा कार्यक्रम असतो. म्हाडाच्या लॉटरीत पारदर्शकता असल्याने या लॉटरीवर लोकांचा विश्वास आहे. 2 हजार 264 सदनिकांकरिता प्राप्त झालेल्या 31 हजार 465 अर्जांवरून नागरिकांमध्ये म्हाडाबद्दलची विश्वासार्हता वाढल्याचे दिसून येते.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले की, आशिया खंडातील सर्वात मोठे क्लस्टर आपण ठाण्यात निर्माण करतोय. पाच ठिकाणी कामेदेखील सुरू आहेत. क्लस्टर ही संकल्पना आशिया खंडात आपण सुरू केली. क्लस्टर म्हणजे ‘सिटी विधीन डेव्हलप्ड सिटी’. शासन शाश्वत विकास देण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेला चालना देण्यात आली आहे. पाच वर्षात आठ लाख घरे निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. काही घरे दिल्यानंतर आम्ही तेथे भेट देऊन त्यांची गुणवत्ता तपासणार आहोत.

यावेळी प्राथमिक स्वरूपात उपमुख्यमंत्री श्री.  शिंदे यांच्या हस्ते उपस्थित लाभार्थ्यांना घरांचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित लाभार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कोकण मंडळात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधूदुर्ग या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. सध्याच्या लॉटरीमध्ये 2 हजार 147 सदनिकांचा समावेश आहे. यात 20 टक्के सर्वसमावेशक योजनेमधील 594 सदनिका (ठाणे व कल्याण), म्हाडा कोकण गृहनिर्माण योजनेतील 728 सदनिका (ठाणे, कल्याण, रत्नागिरी), 15 टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेतील 825 सदनिका (डोंबिवली) यांचा समावेश आहे. या सदनिकांसाठी एकूण 31 हजार 465 अर्ज प्राप्त झाले. या सदनिकांचे चटई क्षेत्रफळ 23 चौरस मीटर ते 50 चौरस मीटर दरम्यान असून सदनिकांची सरासरी किंमत रुपये 10 लक्ष ते 35 लक्षपर्यंत आहे. तर सिंधूदुर्ग जिल्ह्यातील मौजे ओरस येथे निवासी भूखंड योजना राबविण्यात आली. यात सदर भूखंडाचे 60 चौरस मीटर ते 150 चौरस मीटर (600 चौरस फुट ते 1500 चौरस फुट) इतक्या क्षेत्राचे आहे. 117 भूखंडांसाठी 231 अर्ज प्राप्त झाले.

०००

गडचिरोली जिल्हा मलेरियामुक्त करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ०५ : आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार गडचिरोली हा देशातील मलेरियामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या ६ जिल्ह्यांपैकी एक आहे. या जिल्ह्याला मलेरियामुक्त करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून यासाठी डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखालील टास्क फोर्सने सादर केलेल्या जिल्हा मलेरियामुक्त करण्याच्या आराखड्याची येत्या 1 एप्रिलपासून अंमलबजावणी सुरू करण्यात येत आहे. यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत 25 कोटी रुपयांची तरतूदही उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनेदेखील डासांमध्ये कीटकनाशक प्रतिरोधकता निर्माण झाल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे गडचिरोलीमध्ये मलेरियावर नियंत्रण मिळवणे ही अत्यंत महत्त्वाची प्राथमिकता आहे. गडचिरोलीमध्ये मलेरिया निर्मूलनासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्यासह 2017 मध्ये विविध निर्णय घेण्यात आले होते. डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत मलेरिया निर्मूलन टास्क फोर्स सुरू करण्यात आला होता. त्यानुसार, टास्क फोर्सने राष्ट्रीय आणि जागतिक तज्ज्ञांच्या शिफारशींचा समावेश करून गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया निर्मूलनासाठी उत्कृष्ट आराखडा तयार केला आहे. गडचिरोलीत येत्या १ एप्रिल २०२५ पासून या आराखड्यातील शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी करून गडचिरोली जिल्हा लवकरच मलेरियामुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. यासाठी 25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याकरिता हा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत आदिवासी विकास विभागाकडे सादर करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

बिल ॲण्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशन आणि सन फार्माचेही सहकार्य

गडचिरोली जिल्ह्यातील मलेरिया नियंत्रणाच्या या कामासाठी बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन यांच्यामार्फतही महत्त्वपूर्ण मदत केली जाणार आहे. त्याचबरोबर सन फार्मा/एफडीईसी यांचा सहभाग घेण्यात येणार आहे. सन फार्मा कंपनीच्या FDEC ने मलेरिया निर्मूलनासाठी मध्यप्रदेशातील मंडला जिल्ह्यात काम केले आहे. मलेरिया दूर करण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया आणि तांत्रिक मार्गांचे मॉडेल विकसित केले आहे. मनुष्यबळाला प्रशिक्षण देणे, फील्ड प्रोग्रामचे निरीक्षण करणे, तांत्रिक पुनरावलोकन यासारख्या विविध गोष्टींमध्ये सन फार्मा कंपनीमार्फत मदत करण्यात येणार आहे. गेट्स फाउंडेशन आणि सन फार्मा यांच्या योगदानामुळे गडचिरोली जिल्हा मलेरियामुक्त करण्याच्या कार्यात महत्वपूर्ण मदत मिळू शकेल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

ooo

 

राज्यपालांच्या हस्ते ६४ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे उद्घाटन

मुंबई, दि. ०: महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयातर्फे आयोजित ६४ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचे उद्घाटन (कलाकार विभाग २०२४ – २५) राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि. ४ ) जहांगीर कलादालन येथे पार पडले.

यावेळी ज्येष्ठ अमूर्त चित्रकार लक्ष्मण श्रेष्ठ यांना राज्यपालांच्या हस्ते वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.  पाच लाख रुपये, शाल, श्रीफळ व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शकुंतला कुलकर्णी यांना ज्येष्ठ कलाकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कला हा इतर प्रत्येक विषयाला समृद्ध करणारा विषय आहे. कला विषयामुळे जाणिवा विस्तारतात, त्यामुळे वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी अथवा इतर व्यावसायिक शिक्षणाला कलेची जोड दिली गेली पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. नव्या शैक्षणिक धोरणानुसार अशा प्रकारे कला विषय निवडण्याचा अधिकार विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्याला चित्रकला, स्थापत्यकला व वास्तू निर्माण कलेचा मोठा वारसा लाभला आहे. शिवकालीन गडकिल्ले, भित्तिचित्रे व शिल्पकलेचा देखील वारसा राज्याला लाभला आहे. अशा कला संपन्न राज्यात कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी अधिक प्रदर्शने आयोजित केली जावी तसेच कलाकारांना दिली जाणारी बक्षीस राशी वाढवली जावी, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरात देशविदेशातून पर्यटक येतात. अशावेळी शहरामध्ये एकाच वेळी अनेक कलाकारांना व्यासपीठ देणारे भव्य बहुमजली कला केंद्र असावे, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. मुंबईत कला प्रदर्शनासाठी दालनांची संख्या सध्या कमी आहे. ही उणीव दूर करण्यासाठी  भव्य व प्रशस्त कला प्रदर्शन कला केंद्र असावे, असेही त्यांनी सांगितले.

प्रदर्शनासाठी राज्यभरातील कलाकारांकडून ७७५ कलाकृती प्राप्त झाल्या होत्या; त्यापैकी १४८ कलाकारांच्या १८० कलाकृतींची प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली, अशी माहिती कला संचालक डॉ संतोष क्षीरसागर यांनी प्रास्ताविकात दिली.

शकुंतला कुलकर्णी यांच्यावतीने त्यांच्या भगिनी चित्रा पालेकर यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते रेखा व रंगकला, शिल्पकला, उपयोजित कला, मुद्राचित्रण विभाग व दिव्यांग विभाग या प्रवर्गातून १५ कलाकारांना पुरस्कार देण्यात आले.

कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव बी वेणुगोपाल रेड्डी, सर ज जी कला अभिमत विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु प्रा. राजनीश कामत, प्रदर्शन अधिकारी संदीप डोंगरे उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते सुलेखनकार अच्युत पालव यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले तसेच कला प्रदर्शन स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

०००

क्रीडा विभागाची एकात्मिक संगणक प्रणाली विकसित करा – मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. ०५: क्रीडा विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच क्रीडा विकासाच्या बाबींचे सुनियोजित व्यवस्थापन करणे, विभागाचे कामकाज अधिक गतीने होण्यासाठी एकात्मिक संगणक प्रणाली विकसित करणे आवश्यक आहे. ही प्रणाली विकसित करण्याचे निर्देश क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

ई – गव्हर्नन्स अंतर्गत क्रीडा संचालनालय स्तरावर एकात्मिक संगणक प्रणाली विकसित करण्यासंदर्भात आज मंत्रालयात क्रीडा मंत्री श्री. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक सुधीर पाटील, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. भरणे म्हणाले की, योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, क्रीडा विकासाच्या बाबींचे सुनियोजितरित्या व्यवस्थापन करण्यासाठी सुसज्य एकात्मिक संगणक प्रणाली विकसित करणे आवश्यक आहे. अशी प्रणाली विकसित झाल्यावर खेळाडूंना योजनांचा लाभ वेळेत मिळेल. स्पर्धा व खेळाडूंच्या कामगिरीचा तपशील एकत्रित प्रणाली अंतर्गत जतन करता येईल. विभागाचे कामकाज अधिक गतिमान होण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाअंतर्गत ई गव्हर्नन्स – प्रशासकीय व्यवस्थापनासाठी एकात्मिक संगणक प्रणाली विकसित करावी, असे मंत्री श्री. भरणे यांनी स्पष्ट केले.

मंत्री श्री. भरणे म्हणाले की, क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत क्रीडा विकास व युवा हितावह विविध योजना राबविण्यात येत आहेत. पायाभूत क्रीडा सुविधा निर्माण करणे, यशस्वी व प्रतिभावान खेळाडू घडविणे, अत्याधुनिक प्रशिक्षणाकरीता आर्थिक सहाय्य करणे, खेळाडूंना प्रोत्साहन सवलती व गौरव, शालेय विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी क्रीडा स्पर्धाचे आयोजन, वयोवृद्ध खेळाडूंना मानधन, व्यायामशाळा व क्रीडांगण विकास योजना अंतर्गत अनुदान, खेळाडूंना शासकीय व निमशासकीय सेवेत आरक्षण, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र अंतर्गत दैनंदिन क्रीडा प्रशिक्षण, क्रीडा गुण सवलत, खेळाडूंना शिष्यवृत्ती तसेच युवा महोत्सव, युवा कल्याण उपक्रमांना सहाय्य इ. योजनांचा समावेश आहे. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्राधान्य द्यावे.

०००

सागरकुमार कांबळे/विसंअ/

 

धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजना वेळेत पूर्ण करा – मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. ०५ : धुळे, नंदुरबार जिल्ह्यात सुरू असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण कराव्यात. कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करावी, असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील मंत्रालयात धुळे नंदुरबार पाणी पुरवठा योजनेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशनचे अभियान संचालक ई. रवींद्रन व विभागाचे मुख्य अभियंता, सह सचिव बी.जी.पवार, मुख्य अभियंता तथा विशेष कार्य अधिकारी प्रशांत भामरे व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. धुळे व नंदुरबारचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ई-उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, १०० दिवस कार्यक्रमात पाणी पुरवठा व स्वच्छ भारत अभियानाच्या सर्व योजना पूर्ण कराव्यात. कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करावी, कामांना गती देण्यासाठी अधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी नियमित भेटी द्याव्यात. वेळेत कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा, असे निर्देश दिले.

पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाची कामे मिशन मोडवर करावी

उन्हाळ्याचे दिवस लवकरच सुरू होणार आहे. उन्हाळ्यात ग्रामीण भागात प्रत्येकाला पिण्याचे पाणी सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावे. त्यात नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा असून पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या आहे. यासाठी ग्रामीण भागात जल जीवन मिशन, पाणी पुरवठा विभागांतर्गत सुरु असलेली पाणीपुरवठ्याची कामे ‘मिशन मोड’ वर  दर्जेदार करावीत, असे निर्देश मंत्री श्री. पाटील यांनी दिले. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामकाजाचाही यावेळी आढावा घेण्यात आला.

०००

मोहिनी राणे/ससं/

देशाच्या संरक्षणात मराठा लाईट इन्फंट्रीची भूमिका महत्त्वाची – सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड.आशिष शेलार

मुंबई,  दि. ५ : देशाच्या संरक्षणात मराठा लाईट इन्फंट्रीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मोजक्या सैनिकांसह प्रकाशाच्या वेगाने चपळता दाखवून मराठा लाईट इन्फंट्रीने अतुलनीय पराक्रम गाजवला आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला सर केला, त्या प्रित्यर्थ मराठा लाईट इन्फंट्री ४ फेब्रुवारी हा दिवस “मराठा दिन” म्हणून साजरा करत आहे. ही सर्व महाराष्ट्रीयनांसाठी अभिमानाची बाब असल्याचे गौरवोद्गार सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी काढले.

मराठा लाईट इन्फंट्रीला २५६ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच मराठा दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत काल बेळगाव येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस व्यासपीठावर माजी खासदार आण्णासाहेब जोल्ले, निपाणीच्या आमदार श्रीमती जोल्ले, ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी, पोस्ट विभागाच्या संचालक व्ही. तारा, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. सांस्कृतिक कार्य विभागाने प्रथमच यावर्षी बेळगाव येथे मराठा लाईट इन्फंट्री च्या “मराठा दिन” या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला.

मराठा लाईट इन्फंट्री ही देशाचा आणि महाराष्ट्राचा मानबिंदू असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीची जपणूक  करून, देशात व देशाबाहेर मोठा पराक्रम गाजवत असल्याचा अभिमान असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.शेलार यांनी मत व्यक्त केले.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त एका विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. ४ फेब्रुवारी १६७० रोजी नरवीर तानाजी मालुसरे यांनी असीम पराक्रम करून कोंढाणा किल्ला ताब्यात घेतला होता. या घटनेचे स्मरण म्हणून नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वरील विशेष टपाल तिकिटाचे अनावरण यावेळेस करण्यात आले. यावेळेस नरवीर  तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनक्रम उलगडवून दाखवणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले.

000

बायोमॅट्रीक व कागदपत्रे तपासणी सुविधा केंद्रावरच- कामगार मंत्री आकाश फुंडकर

मुंबई, दि. ५ : महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना त्यांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने कोठूनही करता येते. तथापि, त्यांची मूळ कागदपत्रे पडताळणी, फोटो आणि बायोमेट्रीककरिता प्रत्येक नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी त्यांच्या सोईच्या तारखेला, जिल्हा किंवा तालुका सुविधा केंद्रावरच जाऊन करावे. यासाठी राज्यात ३६६ तालुका सुविधा केंद्रे निर्माण करण्यात आली आहे. ही सुविधा राज्यातील सर्व बांधकाम कामगारांना आजपासून म्हणजे ५ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू करण्यात आली असल्याची माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले आहे.

बांधकाम कामगारांच्या नोंदणी, नुतनीकरण आणि लाभ वाटपाकरीता एकात्मिक कल्याणकारी मंडळ संगणकीय प्रणाली (IWBMS) ही ऑनलाईन प्रणाली आहे. जिल्हा स्तरावर जिल्हा इमारत कामगार सुविधा केंद्राद्वारे यापूर्वी हे काम होत होते. केंद्र शासनाच्या अधिसूचनेद्वारे राज्य शासनाने आता ३६६ तालुका सुविधा केंद्रे निर्माण केली असून प्रत्येक तालुका सुविधा केंद्रावर प्रति दिन १५० अर्ज हाताळण्यात येतील, असे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले.

राज्यात ८ नोव्हेंबर, २०२४ पासून सुविधा केंद्रे कार्यान्वित करण्यात आली असून, आज अखेर एकूण ५ लाख १२ हजार ५८१ अर्ज ऑनलाईन पद्धतीने हाताळण्यात आले आहेत. सध्या अर्ज तालुका सुविधा केंद्रावरून भरले जात आहेत, यामध्ये कामगारांची काही ठीकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते व कामगांचा वेळ व रोजगाराचे नुकसान होत असल्याच्या बाबी निदर्शनास येत आहेत. कामगारांच्या वेळेचे व रोजंदारीचे नुकसान न होता निश्चित वेळेत त्यांचे अर्ज भरले जाणे आवश्यक असून विविध लोकप्रतिनिधी, कामगार संघटना यांच्या विनंतीनुसार यामध्ये अधिकची सुलभता, सुसुत्रता व पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने सुधारीत सूचना देण्यात आल्या असल्याचेही मंत्री श्री.फुंडकर यांनी सांगितले.

कामगार मंत्री श्री.फुंडकर यांनी सांगितले की, लाभ वाटप अर्जाकरिता जिल्हा सुविधा केंद्राचे उशिराची तारीख मिळाली असल्यास ती तारीख रद्द करून त्या कामगारांना तालुका स्तरावर नजीकची तारीख उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचबरोबर जिल्हा मुख्यालय असलेल्या तालुक्याकरिता अतिरिक्त तालुका इमारत कामगार सुविधा केंद्र म्हणून कार्यान्वित करण्यात येईल. जिल्हा सुविधा केंद्रमधील पाच पैकी तीन कर्मचारी हे एंट्री ऑपरेटर म्हणून काम करतील. तर उर्वरीत दोन डाटा एंट्री ऑपरेटर बांधकाम कामगारांना त्याच्या तपशिल बदलाचे काम करतील. बांधकाम कामगारांचे सर्व प्रलंबित अर्ज दिनांक ३१ मार्च, २०२५ पूर्वी निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्याने या सर्व कामाकरीता मंडळ स्तरावर समन्वय कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहितीही कामगार मंत्री श्री.फुंडकर यांनी दिली आहे.
000

अल्पसंख्याक समाजाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा-अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे 

मुंबई,दि.५:-राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ या घटकातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा, यासाठी काटेकोर नियोजन करा, असे निर्देश अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षेतेखाली विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत मंत्रालयात आज आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला विभागाचे सचिव रुचेश जयवंशी, राज्यातील जिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी (दूरदृश्य प्रणालीद्वारे) उपसचिव मिलिंद शेणॉय, श्रीमती विशाखा आढाव उपस्थित होते.

मंत्री श्री. भरणे म्हणाले, अल्पसंख्याक समाजासाठीच्या योजनांची प्रभावी अमंलबजावणी करावी, लोकाभिमुख उपक्रम राबवावेत. या समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी निधी कमी पडू देणार नाही. अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहत आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी कटिबद्ध आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजना, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचा निधी वाढविण्यासाठी पाठपुरावा करणे, स्वयंसहायता बचतगट योजना, शाळा आधुनिकीकरण अशा महत्वपूर्ण योजना आहेत. अशा सर्व लोकाभिमुख योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.
000000

ताज्या बातम्या

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांत्वन

0
पुणे, दि. २४: ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ स्व. डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाषाण येथील निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. श्री....

पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आपत्ती नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्याचे आदेश

0
हेल्पलाईन क्रमांक प्रदर्शित जनतेला मिळणार अधिकृत माहिती हेल्पलाईन क्रमांक जतन करण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी दि 24 (जिमाका) :- पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्काळ संपर्कासाठी...

रोजगार हमी योजना अधिक प्रभावीपणे राबवा -रोहयो मंत्री भरत गोगावले

0
सिंधुदुर्गनगरी दिनांक २४ (जिमाका) :- रोजगार हमी योजना ही ग्रामीण विकासासाठी एक महत्त्वाची योजना आहे. ग्रामीण भागात ‘रोजगार हमी’ मुळे बदल होत आहेत. या बदलाची गती वाढवण्यासाठी...

शेतीमध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये देणार – कृषीमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे

0
 पुणे, दि.24: शेतकऱ्यांचे जीवन सुरळीत होण्यासाठी, त्यांच्या जीवनात सुटसुटीतपणा आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून गेल्या सहा महिन्यात 50 ते 55 धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. शेतीला प्रोत्साहन म्हणून शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक...

पुढील वर्षी बाल पुस्तक जत्रेत सांस्कृतिक कार्य विभागाचा सहभाग- सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार

0
पुणे, दि. 24:  ‘पुणे बाल पुस्तक जत्रा’ सारख्या उपक्रमातून बालमनावर चांगले संस्कार होत असल्याने पुढील वर्षांपासून बाल पुस्तक जत्रेत सांस्कृतिक कार्य विभागातर्फे विविध सांस्कृतिक...