परभणी, दि. ०९ (जिमाका): सेवा संकल्प शिबीराच्या माध्यमातून शासनाच्या लोकोपयोगी योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. नागरिकांनी या शिबिराचा लाभ आवश्य घ्यावा. विकासाकडे वाटचाल करणाऱ्या परभणी जिल्ह्याच्या प्रगतीसाठी निश्चितपणे आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिली.
शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच शासकीय विभाग अधिक लोकाभिमुख करण्यासाठी दि. 8 ते 10 एप्रिल 2025 या कालावधीत सेलू येथे नूतन महाविद्यालयाच्या प्रांगणात सेवा संकल्प शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज या शिबीराचा दुसरा दिवस होता. यानिमित्त आयोजित कार्यक्रमप्रसंगी मान्यवर बोलत होते.
कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक राहूल गुप्ता, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, सेलूच्या उपविभागीय अधिकारी अधिकारी संगीता सानप उपस्थित होते.
सभापती प्रा. शिंदे म्हणाले की, शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, तसेच विविध सेवांचा लाभ जनतेला सुलभपणे मिळावा, याकरीता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांना शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून सेलू येथे आयोजित सेवा संकल्प शिबीर हा उपक्रम पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी चांगल्या पद्धतीने राबविला आहे. परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्री टास्क फोर्स हा उपक्रमही कौतुकास्पद आहे. सेलू हे सोलार शहर करण्याचा संकल्प निश्चितपणे पूर्ण होईल. तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल.
शासनाच्या योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्यात –मंत्री शिवेंद्रसिंह भोसले
मंत्री शिवेंद्रसिंह भोसले म्हणाले की, जनतेच्या कल्याणासाठी राज्यशासन विविध योजना राबवित आहे. थेट लाभार्थ्यांपर्यंत या योजना प्रभावीपणे पोहोचविण्यात याव्यात. प्रगतीसाठी जनतेने या योजनांचा अवश्य लाभ घ्यावा. श्रीसार्वजनिक बांधकाम मंत्री या नात्याने परभणी जिल्ह्यातील विकास कामांना प्राधान्य दिले जाईल. सेलू व जिंतूर येथील शासकीय विश्रामगृहाचे काम प्रस्तावित असून ते लवकरच मार्गी लावण्यात येईल. शासनाच्या योजनांचा जनतेने अवश्य लाभ घ्यावा. लाडकी बहिण ही योजना बंद होणार नाही, त्यामुळे महिलांनी अजिबात काळजी करु नये, असा दिलासाही मंत्री भोसले यांनी दिला.
शासनाच्या लोककल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत नेण्याचा संकल्प – पालकमंत्री मेघना बोर्डीकर
पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, शासनाच्या लोककल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत नेण्याचा संकल्प असून प्रत्येक योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्याचा कसोशीने प्रयत्न केला जाईल. सेवा संकल्प शिबीराच्या माध्यमातून नागरिकांनी योजनांचा अवश्य लाभ घ्यावा.
शेतकरी, महिला, तरुण यांच्याकरीता विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येतील. पालकमंत्री टास्क फोर्सच्या माध्यमातून विभागप्रमुखांना 100 गावे दत्तक देण्यात आली आहेत. येत्या पाच वर्षात सुमारे 500 गावांचा या उपक्रमाच्या माध्यमातून कायापालट करण्यात येईल. महिला बचतगटांनाही सक्षम केले जाईल. लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून दोन लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ते एक वर्षातच पूर्ण केले जाईल. प्रधानमंत्री सूर्यघर योजना प्रभावीपणे राबविण्यात येईल. आपला जिल्हा या योजनेत पुढे असण्यासाठी प्रयत्न केला जाईल. या योजनेचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा.
यावेळी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्यावतीने निधन झालेले ऊसतोड कामगार सचिन नारायण आढे यांची आई सिंधू नारायण आढे यांना रुपये 5 लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नाशिक येथील रेनायसन्स फार्मा कंपनीच्यावतीने जिंतूर व सेलु तालुक्यातील प्रत्येकी एक गाव दत्तक घेऊन त्या गावात लागणाऱ्या एक वर्षाचे औषधी व लसीचा मोफत पुरवठा करण्याबाबतच्या प्रस्तावाचेही यावेळी विमोचन करण्यात आले. यानंतर संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
०००