बुधवार, एप्रिल 23, 2025
Home Blog Page 31

परभणी जिल्ह्याच्या सर्वांगिण प्रगतीसाठी कटीबध्द – पालकमंत्री मेघना बोर्डीकर

सेलू येथील सेवा संकल्प शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

 तीन दिवसीय शिबीराचे थाटात उदघाटन

 विविध स्टॉलच्या माध्यमातून लोककल्याणकारी योजनांची प्रसिध्दी

महिला बचतगटाचे स्टॉल ठरले विशेष आकर्षण

१० एप्रिल रोजी महाआरोग्य शिबीर

परभणी, दि. (जिमाका) : शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून महिलांचे आरोग्य चांगले ठेवणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि तरुणांना रोजगार व संधीच्या दृष्टीने सक्षम करण्यासह परभणी जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी  प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन राज्याच्या  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले. तर केंद्र व राज्यशासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन नागरिकांनी प्रगती करावी, असे आवाहन  गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म राज्यमंत्री पंकज भोयर यांनी केले.

सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर आज सेवा संकल्प शिबीराचे थाटात उद्घाटन पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सदानंद भिसे, जिंतूर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बेनिवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार, जिल्हा आरोग्य अधिकारी राहूल गिते, क्रेडिट सोसायटीच्या मार्गदर्शक संगीता चव्हाण, सेलूच्या उपविभागीय अधिकारी अधिकारी संगीता सानप उपस्थित होत्या.

शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच शासकीय विभाग अधिक लोकाभिमुख करण्याकरीता दि. ते १० एप्रिल २०२५ या कालावधीत सेवा संकल्प शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराच्या उदघाटनप्रसंगी बचतगटांच्या महिलांसह शहर व ग्रामीण भागातील नागरिक, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाच्या विविध विभागांचे स्टॉल या ठिकाणी असून त्या माध्यमातून लोकाभिमुख योजनांची माहिती नागरिकांनी दिली जात आहे. तसेच बचतगटाचे स्टॉलही येथे आहेत. सर्वच स्टॉलवर माहिती घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

आयोजित कार्यक्रमप्रसंगी  श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या की, शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सेवा संकल्प शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 10 एप्रिलपर्यंत आयोजित या शिबीराचा लाभ परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी अवश्य घ्यावा. तसेच 10 एप्रिल रोजी सर्वांसाठी महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात करण्यात आले आहे. या शिबीराच्या माध्यमातून जनतेने आरोग्य तपासण्या अवश्य करुन घ्याव्यात.

परभणी जिल्ह्याच्या प्रगतीबाबत बोलताना श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या की, परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी मी कटीबध्द असून आजच सेलू येथे डायलेसीस केंद्राचे उदघाटन करण्यात आले आहे. पूर्णा येथे लवकरच डायलेसीस केंद्र सुरु करण्यात येणार आहे. परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात आले आहे. लवकरच मुख्यमंत्री यांच्या हस्ते या महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमीपूजन करण्यात येणार असून अठरा महिन्यात इमारतीचे काम पूर्ण केले जाईल. परभणी येथील सरकारी रुग्णालयात स्तन कॅन्सरवरील केमोचे उपचार सुरु करण्यात आले आहे. भविष्यात जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट केल्या जातील. पाच किलोमीटरच्या आत नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहेत. जिल्ह्यात पालकमंत्री टास्क फोर्सच्या माध्यमातून विभागप्रमुखांना एक गाव दत्तक देण्यात आले आहे. या माध्यमातून शासनाच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहाचविल्या जात आहेत. महिलांना आर्थिक दृष्टया सक्षम करण्यासाठी लखपती दीदी योजना, महिलांची क्रेडीट सोसायटी यासारखे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सुमारे चार लाख पेक्षा जास्त महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ दिला जात आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी गुंतवणुकीवरही भर दिला जाईल. प्रगतीसाठी महिला, तरुण, नागरिकांनी सेवा संकल्प शिबीराचा अवश्य लाभ घ्यावा, असे शेवटी त्यांनी आवाहन केले.

श्री. भोयर यांनी आपल्या भाषणात सेवा संकल्प शिबीराचे कौतुक केले. ते म्हणाले की, या शिबीराच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मदत होणार आहे. या शिबीराचा सर्वांनीच लाभ घ्यावा. विशेषत: महिलांनी विविध योजनांच्या माध्यमातून स्वत:ला आर्थिक दृष्टया सक्षम बनवावे. क्रेडिट सोसायटीच्या माध्यामातून महिलांनी उदयोग सुरु करावेत.  सेवा सहकारी संस्था या ग्रामीण भागासाठी वरदान ठरल्या आहेत. शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेऊन ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत करावी, असेही त्यांनी आवाहन केले.

यावेळी संगीता चव्हाण यांनी महिला क्रेडिट सोसायटीचे महत्व विषद केले. त्या म्हणाल्या की, नागपूर येथे सुरुवातीला बचतगट सुरु केल्यानंतर आम्ही काही महिला एकत्र येऊन नागपूर महिला सन्मान क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी सुरु केली. या माध्यमातून महिला आर्थिक दृष्टया सक्षम होण्यास मदत झाली आहे. आता महिलांनी  स्वत:हून क्रेटिड सोसायटी स्थापन करुन महिलांची बँक सुरु करावी. आत्मविश्वासाने उद्योगही सुरु करावेत. केंद्र शासनाच्या लखपती दीदी योजनेचा लाभ महिलांनी अवश्य घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

प्रास्ताविक जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले. त्यांनी सेवा संकल्प शिबीराबाबत सविस्तर माहिती दिली. आभार उपविभागीय अधिकारी संगीता सानप यांनी मानले. कार्यक्रमानंतर मान्यवरांनी विविध विभागांचे स्टॉल व बचतगटांच्या स्टॉलला भेट दिली.

*-*-*-*-*

आदर्श शाळांसाठी शिक्षण विभागाने कसोशीने प्रयत्न करावेत- शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर

परभणी, दि. (जिमाका):- विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध गुणवत्तापूर्ण उपक्रमातून जिल्हयात आदर्श शाळांसाठी शिक्षण विभागाने कसोशीने प्रयत्न करावेत, असे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शालेय शिक्षण विभागाच्या छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय‌ आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय शिक्षण उपसंचालक प्रकाश मुकुंद यावेळी उपस्थित होते.

या बैठकीत आदर्श शाळा, निपुण महाराष्ट्र अभियानामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत झालेली वृद्धी, त्याची सद्यसि्थती, सीएम श्री शाळाबाबत माहिती, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान 2024-25 जिल्ह्यात राबविले जाणारे विविध गुणवत्तापूर्ण उपक्रम आणि विद्यार्थी लाभाच्या विविध योजना व त्यांची प्रभावी अंमलबजावणी याबाबत श्री. भोयर यांनी आढावा घेतला.

निपुण महाराष्ट्रासोबतच कॉपीमुक्त महाराष्ट्र उपक्रमाबाबत आग्रही भूमिका घेताना राज्यमंत्री श्री. भोयर यांनी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट)च्या प्राचार्यांची शिक्षणाचा आणि विद्यार्थ्यांचा गुणात्मक दर्जा वाढविण्यासाठी तसेच आदर्श शाळांचे पायाभूत सोयी सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात काही निवडक शाळांचे बांधकाम, डागडुजी, दुरुस्ती व पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देत असताना सर्वांनी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिले. जिल्ह्यात आदर्श शाळा सुरू करण्यात येत असून, शिक्षण विभागाने पालकमंत्र्यांना ‘पालकमंत्री आदर्श शाळा’ दत्तक घेण्याबाबत विनंती करण्याच्या सूचना केल्या. तसेच या आदर्श शाळांना जिल्हा नियोजन समितीमधून निधी मिळवून घेण्याबाबत त्यांनी शिक्षण विभागाला सांगताना पालकमंत्री आदर्श शाळेच्या धर्तीवर आमदार आदर्श शाळा सुरू करण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या.  तसेच विविध कंपन्या, संस्था सीएसआर निधीतून अशा आदर्श शाळांची जबाबदारी घेत असून, शिक्षण विभागासह संबंधित शाळेच्या प्राचार्यांसह शिक्षकांनी अशा संस्थांच्या संपर्कात राहण्याचे निर्देश दिले.

खासगी शाळांसोबतच्या‌ स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शासन सतत प्रयत्नरत असून डायटच्या प्राचार्यांनी शाळांच्या गुणवत्ता वर्धनासाठी नोडल अधिकारी म्हणून विशेष लक्ष देण्याबाबत सांगितले. या प्राचार्यांनी संगणक, फर्निचर, पायाभूत सोयीसुविधा, शालेय क्रीडांगण, शाळांची रंगरंगोटी, जिल्हा नियोजन समितीमधून मिळणारा निधी, तसेच शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच शैक्षणिक गुणवत्तेसोबतच पायाभूत सोयीसुविधा तयार करण्यासाठी सर्वांनी विशेष प्रयत्न करण्यास शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले.

शासन आदर्श शाळांवर मोठ्या प्रमाणावर खर्च करत असून, प्रत्येक तालुक्यातून सुरुवातीला किमान २ तरी आदर्श शाळा तयार व्हाव्यात. त्यातून जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने आदर्श शाळांची संख्या लक्षणीयरित्या वाढेल, असा विश्वास व्यक्त केला. विभागातील सर्वच शाळांनी पुढील चार दिवसांमध्ये त्याबाबतचा अहवाल सादर करावा. सोबतच या शाळांची लघुचित्रफितही बनवण्याचे निर्देश श्री. भोयर यांनी दिले.

विज्ञान प्रदर्शनावर शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांचा भर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विज्ञान प्रदर्शन भरविण्यावर भर दिला असल्याचे सांगून भविष्यात महाराष्ट्रातून चांगले आणि जास्तीत जास्त शास्त्रज्ञ, वैज्ञानिक घडावेत. त्‍यासाठी सुरुवातीला तालुकास्तरावर, नंतर जिल्हास्तरावर आणि पुढे राज्यस्तरावर विज्ञान प्रदर्शन भरविण्यावर शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विशेष भर दिला. विजेत्या स्पर्धकाला देण्यात येणा-या रक्कमेत वाढ करण्यात येणार असून, शिक्षकांनी ही विज्ञान प्रदर्शनाची स्पर्धा गांभिर्याने आयोजित करण्याच्या सूचना केल्या. याच धर्तीवर पालकमंत्री विज्ञान प्रदर्शन असे नाव दिल्यास पालकमंत्रीही जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करून देऊ शकतील. या उपक्रमात व्हिडीओ स्पर्धाही आयोजित करण्यास सांगून जिल्हास्तरीय स्पर्धा उत्कृष्टरित्या पार पाडण्यासाठी शिक्षक आणि प्राचार्यांनी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.

जालना जिल्हा शिक्षण विभागाने आदर्श शाळांच्या बांधकामाबाबत अत्यंत निष्काळजीपणा दाखविला असून, सर्वाधिक निधी मिळालेल्या या जिल्ह्यात केवळ दोन आदर्श शाळांच्या इमारतींचे बांधकाम झाल्याबाबत शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय शिक्षण उपसंचालक प्रकाश मुकुंद यांना संबंधितांना नोटीस देण्याचे निर्देश दिले. तसेच त्यांचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर तो शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांकडे पाठविण्याच्या सूचना केल्या. जालना जिल्ह्याला मिळालेला 19 कोटी 96 लक्ष रुपयांचा निधी हा विभागातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक असून, केंद्र शासनाने दिलेला निधी हा परत जाणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या उपसंचालक श्री. मुकुंद यांना सूचना केल्या.

******

गिग कामगारांना संरक्षण; ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

मुंबई, दि. ०८: असंघटित कामगारांसाठी विविध योजना सध्या अस्तित्वात आहेत, मात्र गेल्या काही वर्षापासून गिग कामगारांची संख्यादेखील लक्षणीय वाढत आहे. अशा कामगारांसाठी केंद्र सरकारकडून विशेष पोर्टल तयार करण्यात आले असून, त्याअंतर्गत त्यांना सोयीसुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्यामुळे अशा गिग कामगारांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय व कामगार विभागाने पुढाकार घेतला असून, केंद्राच्या ई-श्रम पोर्टलवर नावनोंदणी करण्याचे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त नि. वा. नगरारे यांनी प्रसिद्ध पत्रकान्वये केले आहे.

गेल्या काही वर्षात ओला, उबेर, झोमॅटो, स्वोगी अशी प्लॅटफॉर्म इकोनॉमी भारतात आणि जागतिक स्तरावर रोजगारनिर्मितीचे एक मोठे साधन बनले आहे. लाखो गिग कामगार या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना सुरक्षित भविष्यासाठी शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्हणून केंद्र शासनामार्फत अशा असंघटित कामगारांच्या नोंदणीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या आशा कामगारांना विधिध सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यामुळे झोमॅटो, स्वीगी, ओला, उबेर यासारख्या प्लॅटफॉर्मवर काम करण्याऱ्या डिलिव्हरी बॉय, राइडर, ड्रायव्हर आणि इतर गिग कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे. भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाने अशा गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी ई-श्रम पोर्टलवर नोंदणीसाठी सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. पात्र गिग कामगारांनी http://register.eshram.gov.in/#/user/platform-worker-registration  या अधिकृत लिंकवर जाऊन त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचे फायदे

ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यास नोंदणीधारकास विविध सामाजिक सुरक्षा योजना आणि कल्याणकारी योजनांचा लाभ मिळू शकतो. या नोंदणीद्वारे गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांना औपचारिक ओळख मिळेल. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांचा लाभ घेण्यासाठी ही नोंदणी आवश्यक आहे.

०००

मोहिनी राणे/ससं/

 

तोरणमाळमध्ये पर्यटन सुविधा निर्माण करण्यासाठी सर्वसमावेशक प्रस्ताव तयार करा – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. ०८: नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेले तोरणमाळ हे निसर्गरम्य पर्यटनस्थळ असून येथे पुरेशा पर्यटन सुविधा तयार कराव्यात त्याचप्रमाणे पर्यटकांची संख्या वाढावी, यासाठी पर्यटन विभागाने सर्व समावेशक प्रस्ताव तयार करावा, असे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी निर्देश दिले.

मंत्रालयातील दालनामध्ये पर्यटन मंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली तोरणमाळ पर्यटनाच्या विकासाबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार आमशा पडवी, विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील उपस्थित होते.

पर्यटन मंत्री देसाई म्हणाले की, तोरणमाळ हे पर्यटकांना पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसात खूपच चांगले वातावरण या परिसरात असते. या भागात मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात हे लक्षात घेवून या भागात पर्यटन सुविधा वाढविण्याची गरज आहे. रस्त्यांचे नुतनीकरण आणि विस्तारीकरण, दर्जेदार निवास व्यवस्थ (होमस्टे) व हॉटेल्स, स्थानिक मार्गदर्शकांची व्यवस्था, पर्यावरणपूरक पर्यटन केंद्रांची उभारणी,ऑनलाइन माहिती व बुकिंग सुविधा या बाबत सर्व समावेशक प्रस्ताव तयार करावा.

पर्यटन मंत्री देसाई म्हणाले की, तोरणमाळमध्ये पर्यटन वाढले, तर स्थानिक आदिवासी समाजाला रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. शेतीपूरक व्यवसाय, हस्तकला विक्री, व पर्यटन सेवा यामधून स्थानिक लोकांचा आर्थिक स्तर उंचावू शकतो. शासनाच्या योजनांद्वारे प्रशिक्षित गाईड या सेवा नाचा दर्जा वाढवून या भागाला एक आदर्श पर्यटनस्थळ बनवता येईल, असेही ते म्हणाले.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

शाश्वत आदिवासी विकासासाठी डिजिटल उपक्रम — एक दिशादर्शक पाऊल- मंत्री डॉ. अशोक उईके

मुंबई दि. ०८: आदिवासी विकास विभागाच्या विविध नाविन्यपूर्ण पोर्टल्समुळे आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी घेतलेला हा डिजिटल पुढाकार भविष्यातील सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने टाकलेल एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असा विश्वास आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी व्यक्त केला.

सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित दोन दिवसीय प्रकल्प अधिकारी कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंत्री डॉ. उईके यांच्या हस्ते विविध नाविन्यपूर्ण पोर्टलचे ई- उ‌द्घाटन करण्यात आले. यावेळी आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड,आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त समीर कुर्तकोटी, आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त गोपीचंद कदम उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते आदिवासी आयुक्तालयाची वार्षिक आराखडा आणि आर्थिक नियोजन संकलन पुस्तिकेचे प्रकाशन  करण्यात आले. तसेच तक्रार निवारण पोर्टल, शबरी नॅचरल्स ई-कॉमर्स पोर्टल, न्यूक्लियस बजेट पोर्टल, सन्मान पोर्टल, कॉल आऊट सुविधा, इ निरीक्षक ॲप, टास्क मॅनेजर सॉफ्टवेअर, AEBAS उपस्थिती प्रणाली या नाविन्यपूर्ण पोर्टल्सचे उद्घाटन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

मंत्री डॉ. उईके म्हणाले की, आदिवासी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी अधिकाऱ्यांनी व्यापक कृती आराखडा तयार करावा. हा कृती आराखडा म्हणजे फक्त योजना नव्हे, तर आदिवासी समाजाच्या शाश्वत विकासासाठीचा एक दृढ संकल्प असला पाहिजे. राज्यातील प्रत्येक आदिवासी कुटुंबाच्या उन्नतीसाठी विभाग कटिबद्ध आहे. विभागामार्फत विविध योजनांसाठी इतर विभागांना दिल्या जाणाऱ्या निधीच्या वापराबाबत अनियमितता  यासंबंधी विभागाने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.

विभागामार्फत राज्यातील आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवण व्यवस्थापनामध्ये पारदर्शकता आणि गुणवत्तेचा दर्जा सुनिश्चित करण्यासाठी सेंट्रलाइज्ड डॅशबोर्ड प्रणाली कार्यान्वित करावी. समाजातील शेवटच्या घटकातील विद्यार्थ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचवणे ही आदिवासी विकास विभागाची प्राथमिक जबाबदारी आहे. विकासाचा केंद्रबिंदू हा विद्यार्थी असून, त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. त्यामुळे विभागामार्फत विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी प्रभावी नियोजन आणि प्रयोजनशील उपाययोजना राबविणे आवश्यक आहे.

पालक मेळावे यांचे आयोजन करावे. कारण आदिवासी समाजाच्या विकासासाठी संवाद होणे आवश्यक आहे. सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांनी आदर्श आश्रम शाळेसाठी नियोजन करावे. वसतिगृहामध्ये सल्लागार समिती गठीत करून प्रकल्प अधिकाऱ्यांनी दर महिन्याला वसतिगृहांना भेट देऊन तेथील सोयी सुविधांची पाहणी केली पाहिजे असेही मंत्री डॉ. उईके यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सचिव विजय वाघमारे आणि आयुक्त लीना बनसोड यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यशाळेस विभागातील वरिष्ठ अधिकारी, प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.

पोर्टल विषयी थोडक्यात माहिती

शबरी नॅचरल्स इ कॉमर्स पोर्टल : आदिवासी बांधवांची प्रीमियम उत्पादने ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध होणार आहे.

न्यूकलियस बजेट : आदिवासी बांधवांना प्रकल्प अधिकारी स्तरावरून अनुदान देण्यासाठी पोर्टल

कॉल आउट सुविधा : लाभार्थ्यांना लाभ मिळाला की नाही, त्यांना काय अडचणी आल्या याबाबत आता कॉल आउट सुविधा सुरू करण्यात आली आहे.

सन्मान पोर्टल : सहकार्य, न्याय, मार्गदर्शन आणि निवारण असे हे पोर्टल आदिवासी विभागातील कर्मचाऱ्यांच्या तक्रार निवारण प्रणाली आहे.

अबीईएएस पोर्टल : आधार च्या माध्यमातून सर्व कर्मचारी अधिकारी यांची दैनंदिन हजेरी फेस आयडी नुसार घेतली जाणार आहे.

ई- निरीक्षक ऍप्लिकेशन : शाळांची मॉनिटरिंग करून त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी वापरण्यात येणारी प्रणाली.

टास्क मॅनेजर : अधिकारी कर्मचारी यांची नियमित दैनंदिन कामे ऑनलाईन पोर्टल वर नियंत्रित करणे.

०००

एसआयटी नेमण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. ०८: पुणे जिल्ह्याच्या राजगुरुनगर तालुक्यातील शेतकऱ्यांची भूमाफीयांकडून फसवणूक झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यानुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता विशेष तपास पथकाची (एसआयटी) नेमण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती मंत्री बावनकुळे यांनी यावेळी दिली.

राजगुरुनगर तालुक्यातील शेतकऱ्यांची पोपट मारुती घनवट व इतरांकडून फसवणूक झाल्याबाबत चेतन राजेंद्र चिखले यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह संबंधित शेतकरी यावेळी उपस्थित होते. तर, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी आणि संबंधित अधिकारी ई-उपस्थित होते.

राजगुरुनगर तालुक्यातील पाईट या गावासह पोपट घनवट यांची विविध नावांनी तसेच कुटुंबियांच्या नावांनी अन्य ठिकाणी सुद्धा खरेदी केलेली जमीन आहे. त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन शेतकऱ्यांविरुद्धच अनेक तक्रारी दाखल केलेल्या आहेत. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी दमानिया यांनी यावेळी केली.

मंत्री बावनकुळे म्हणाले की, या प्रकरणी जिल्हाधिकारी पुणे यांनी घनवट यांच्या नावे असलेल्या जमिनींची चौकशी केली आहे. तथापि, त्यांच्या जमिनी जिल्हाधिकारी यांच्या कार्यक्षेत्राबाहेर असण्याची सुद्धा शक्यता दिसून येत आहे. त्यामुळे जमाबंदी आयुक्तांच्या माध्यमातून घनवट यांची राज्यात किती ठिकाणी आणि निवासी, कृषी, औद्योगिक आदी किती प्रकारच्या जमिनी असतील याबाबत त्याचप्रमाणे यासाठी आर्थिक व्यवहार कसा झाला याबाबतही चौकशी होणे आवश्यक आहे. या चौकशीची व्याप्ती कशी असावी याबाबत विभागाने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देऊन मंत्री बावनकुळे यांनी या प्रकरणी एसआयटी नेमण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे यावेळी सांगितले.

पुणे जिल्हाधिकारी डूडी यांनी याप्रकरणी आतापर्यंत केलेल्या चौकशीनुसार घनवट यांच्या नावे असलेल्या जमिनीबाबतची उपलब्ध झालेली माहिती यावेळी सादर केली.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींचा सुधारित प्रस्ताव तयार करा

मुंबई, दि. ०८: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्च २०१७ च्या मंत्रिमंडळ निर्णयानुसार शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला आहे. याबाबतचा शासन निर्णयही जारी झाला, मात्र वेतन आणि भत्त्यांबाबत शासन निर्णयात शासनाने दायित्व स्वीकारूनही थकीत वेतन व वेतनश्रेणी नुसार विहित भत्ते मिळत नाहीत. यामुळे त्यांच्या सेवाविषयक बाबी, वेतन आणि भत्त्यांबाबत सुधारित प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री पाटील बोलत होते. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, संचालक (वित्त) सीताराम काळे यांच्यासह विधी व न्याय, सामान्य प्रशासन, वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले की, जीवन प्राधिकरणातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेचा दर्जा देण्याबाबत शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला होता. सामान्य प्रशासन, वित्त विभागाने यावर दर्जा दिला म्हणजे ते शासकीय कर्मचारी ठरत नसल्याचा अभिप्राय दिल्याने त्यांच्या सेवाविषयक बाबी, वेतन-भत्त्याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. निवृत्ती कर्मचाऱ्यांना सर्व लाभ मिळाले, मात्र सेवेतील कर्मचाऱ्यांना लाभ देण्यासाठी वित्त विभाग, विधी व न्याय आणि सामान्य प्रशासन विभागाने सकारात्मक निर्णय घेवून विषय मार्गी लावावा. काही कर्मचाऱ्यांना वेतन-भत्त्यांपासून डावलणे योग्य होणार नसल्याने वित्त विभागाने यावर तोडगा काढून निर्णय घ्यावा. घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता पाचव्या वेतन आयोगानुसार मिळत असल्याने ७ व्या वेतन आयोगानुसार मिळण्याबाबतही सहानुभूतीपूर्वक निर्णय घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

प्रधान सचिव खंदारे यांनीही वेतन व भत्त्याबाबत शासनाने दायित्व स्विकारल्यामुळे त्यानुसार वित्त विभागाने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

०००

राजू धोत्रे/विसंअ/

बांधकाम कामगारांना ९० दिवसाच्या प्रमाणपत्राबाबत सोप्या पद्धतीची अंमलबजावणी करा

मुंबई, दि. ०८: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत बांधकाम कामागारांना शासन विविध योजनांच्या माध्यमातून लाभ देत असते. त्यांच्यासाठी सामाजिक सुरक्षेच्या विविध कल्याणकारी योजनाही राबविते. बांधकाम कामगारांना नोंदणी करण्यासाठी ९० दिवसाचे बांधकाम क्षेत्रासंबंधीत काम केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते. हे ९० दिवसाचे प्रमाणपत्र देण्याची सोपी आणि सुटसुटीत पद्धत करावी, असे निर्देश कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी आज दिले.

मंत्रालयात ९० दिवसांचे प्रमाणपत्र देण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय. ए कुंदन, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विकास आयुक्त (असंघटीत कामगार) तुकाराम मुंढे आदी उपस्थित होते.

कामगार मंत्री ॲड. फुंडकर म्हणाले की, ग्रामीण भागात बांधकाम कामगार कल्याणकारी मंडाळाच्या योजनांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहे. गावपातळीवर ग्रामविकास विभागाने २०१७ मध्येच काढलेल्या शासन निर्णयानुसार ग्रामसेवक ९० दिवसाचे प्रमाणपत्र देतो. मात्र सध्या ग्रामसेवकांमध्ये संभ्रमावस्था दिसून येते. ग्रामविकास विभागाने याच शासन निर्णयानुसार ग्रामसेवकांना प्रमाणपत्र देण्याबाबत निर्देशीत करावे.

बांधकाम क्षेत्राशी निगडीत असलेल्या कुठलाही कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहता कामा नये, याबाबत दक्षता घेण्यात यावी. मुंबई शहरात बांधकाम कामगारांची नोंदणी वाढविण्यात यावी. शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकाम कामगार आहेत, मात्र नोंदणीअभावी लाभापासून वंचित असल्याचे निदर्शनास आले आहे. पात्र शेवटच्या बांधकाम कामगाराला कल्याणकारी मंडळाचा लाभ मिळाला पाहिजे, अशा सूचनाही कामगार मंत्री ॲड. फुंडकर यांनी दिल्या.

नीलेश तायडे/विसंअ/

 

मंत्रिमंडळ निर्णय

नागपूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर प्राधिकरणांना त्यांच्या हद्दीतील शासकीय जमिनी मिळणार

राज्यातील नागपूर, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या हद्दीतील शासकीय जमिनी संबंधित प्राधिकरणांच्या नावावर वर्ग करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

या निर्णयानुसार, महानगर प्रदेशातील सर्व भारमुक्त शासकीय जमिनी राज्य शासनाच्या अटी व शर्तींनुसार प्राधिकरणांना हस्तांतरित करण्यात येणार आहेत. संबंधित प्राधिकरण या जमिनींचा उपयोग मंजूर प्रादेशिक किंवा विकास योजनेनुसार पायाभूत सुविधांसाठी निधी उभारण्याच्या स्रोत म्हणून करू शकतील.

प्राधिकरणांकडे वर्ग होणाऱ्या जमिनींची विल्हेवाट विहित नियमावलीनुसार करण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, राज्य शासनाच्या मान्यतेने प्रत्येक प्राधिकरणानाला स्वतंत्र जमीन विल्हेवाट नियमावली तत्काळ तयार करावी लागणार आहे.

या जमिनींच्या वापराबाबत महसूल व वन विभागाच्या स्तरावर स्वतंत्र अभिलेख ठेवले जातील आणि त्याचे डिजिटायझेशन केले जाणार आहे.

गायरान, गुरचरण, देवस्थान किंवा वन जमिनींचा समावेश असल्यास, त्या जमिनींवर सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसारच कार्यवाही करावी लागेल, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे.

तसेच, जर हस्तांतरित होणाऱ्या जमिनी स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषदेच्या ताब्यात असतील, तर त्यांचा विकास करण्याआधी संबंधित संस्थेची परवानगी किंवा ठराव घेणे प्राधिकरणांना अनिवार्य राहील.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे महानगर प्रदेश विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणीसाठी निधी उभारण्यास प्राधिकरणांना मोठा आधार मिळणार आहे, यातून विकास कामांना वेग येणार आहे.

०००

विविध योजनांमधील घरकुलांच्या लाभार्थ्यांसाठी ५ ब्रासपर्यंत मोफत वाळू; वाळू-रेतीबाबचे धोरण जाहीर, डेपो पद्धती ऐवजी लिलाव पद्धतीने विक्री

विविध योजनांमधील राज्यातील घरकूल लाभार्थ्यांसाठी ५ ब्रास पर्यंत मोफत वाळू उपलब्ध करुन देण्याच्या निर्णयासह आज राज्याच्या वाळू-रेती निर्गती धोरणास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या पुढे नदी, खाडीपात्रातील वाळू, रेतीचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन विक्री (डेपो पद्धती) ऐवजी लिलाव पद्धतीद्वारे करण्यात येणार आहे.

नैसर्गिक वाळूचे पर्यावरणीय महत्त्व, नैसर्गिक वाळूचा तुडवडा विचारात घेता कृत्रिम वाळूस प्रोत्साहन देण्यात येईल. यासाठी सुरवातीस विविध शासकीय/निमशासकीय बांधकामामध्ये २० टक्के कृत्रिम वाळू वापरणे बंधनकारक करण्यात येईल. या बांधकामामध्ये पुढील ३ वर्षात कृत्रिम वाळू बंधनकारक करण्यात येणार आहे.

या धोरणानुसार आता पर्यावरण विभागाच्या परवानगीनंतर नदीपात्रातील वाळू गटांसाठी जिल्ह्यातील प्रत्येक उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व वाळू गटांचा एकत्रितरित्या एकच ई-लिलाव प्रसिद्ध करण्यात येईल. या लिलावाचा कालावधी २ वर्षासाठी राहणार. तसेच खाडीपात्रातील वाळू गटांसाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने निश्चित केलेल्या प्रत्येक वाळू गटासाठी ई-लिलाव पद्धतीने कार्यवाही करण्यात येईल. या लिलावाचा कालावधी ३ वर्ष इतका राहील.

लिलावाद्वारे उत्खनन करण्यात येणाऱ्या प्रत्येक वाळू गटामधील १० टक्के वाळू विविध घरकूल लाभार्थ्यांसाठी ५ ब्रास पर्यंत मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांच्या दि.२८ मार्च, २०२० च्या अधिसूचनेत परिशिष्ट-९ मध्ये अनुक्रमांक ४ नुसार निश्चित केले गेलेले वाळूगट तसेच, ज्या वाळू गटांना पर्यावरण विभागाची परवानगी मिळालेली नाही व जे वाळू गट लिलावामध्ये गेलेले नाहीत अशा नदी, नाले, ओढे इत्यादी वाळू गटामधील वाळू शासनाच्या गृहनिर्माण योजनेच्या लाभार्थ्यांना (घरकूल लाभार्थी), गावकऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक व सामुहिक कामासाठी तसेच, शेतकऱ्यांना त्याच्या स्वतःच्या विहिरीसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

हातपाटी-डुबी या पारंपरिकपद्धतीने वाळू उत्खननासाठी वाळू गट राखीव ठेवण्यात येणार असून, ते विनानिविदा परवाना पद्धतीनुसार वाटप केले जाणार आहेत.

पूर परिस्थिती अथवा इतर नैसर्गिक कारणामुळे शेत जमिनीमध्ये वाळू जमा झाल्यास, अशी शेतजमीन पुन्हा लागवड योग्य करण्यासाठी वाळूची निर्गती करण्यात येणार आहे.

केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या खाणीमधील ओव्हरबर्डमधून निघणाऱ्या वाळू/रेती (Wash Sand) साठी प्रती ब्रास २००/- रुपये व इतर गौण खनिजासाठी प्रती ब्रास रुपये २५/- प्रमाणे स्वामित्वधनाची रक्कम आकारण्यात येणार आहे. तसेच परराज्यातून येणाऱ्या वाळूचे सनियंत्रण करण्यात येणार आहे. ट्रॅक्टरद्वारे अवैध गौण खनिज वाहतूक केल्यास १ लाख रुपयांची दंडाची रक्कम कायम ठेवण्यात आली आहे.

राज्यात १९ एप्रिल २०२३ व १६ फेब्रुवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार वाळू डेपो धोरण राबविण्यात येत होते. या धोरणांतर्गत शासनामार्फत वाळूचे उत्खनन, वाहतूक डेपो निर्मिती व विक्री करण्यात येत होती. या धोरणाचा विभागीय आयुक्त नाशिक यांच्या समितीने अभ्यास करून अहवाल तयार केला होता. या अहवालावरून राज्याचे वाळू-रेती निर्गती धोरण-२०२५ चे प्रारुप तयार करण्यात आले. त्यावर हरकती, सूचना मागविण्यात आल्या. अशा १९१ हरकती व सूचना विचारात घेऊन सुधारित वाळू धोरण-२०२५ तयार करुन ते आज मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आले. या धोरणास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

०००

म्हाडाच्या वांद्रे रिक्लेमेशन, आदर्श नगर येथील इमारतींच्या एकत्रित पुनर्विकासासाठी मान्यता

वांद्रे रिक्लेमेशन आणि वरळी येथील आदर्श नगर या दोन म्हाडा अंतर्गत असलेल्या इमारतींचा एकत्रित पुनर्विकास करण्यासाठी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

वांद्रे रिक्लेमेशन आणि आदर्श नगर वरळी येथील म्हाडा अंतर्गत असलेल्या काही सहकारी गृहनिर्माण संस्थांना पुनर्विकास करण्यासाठी परवानगी दिली आहे. असे परवानगी देण्यात आलेले भूखंड वगळून उर्वरित एकल इमारतींच्या पुनर्विकासाकरिता मंजुरी न देता म्हाडा मार्फत बांधकाम आणि विकसन संस्था ( कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी) नियुक्ती करण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

या एकत्रित पुनर्विकासासाठी चार चटई क्षेत्र निर्देशांक शासनाच्या पूर्व मान्यतेने मंजूर करण्यात येईल. चारपैकी एक चटई क्षेत्र निर्देशांक गृहसाठ्याच्या स्वरुपात मंजूर येईल. त्यामुळे म्हाडास जास्तीत जास्त गृहसाठा देण्याची तयारी दाखवणाऱ्या आणि निविदा प्रक्रियेतील आर्थिक आणि भौतिक अटींची पूर्तता करणाऱ्या निविदाकाराची पुनर्विकास करण्यासाठी म्हाडाकडून नियुक्ती करण्यात यावी. निविदा प्रक्रिया राबविताना सर्व शासन निर्णयांचे पालन करणे, आवश्यक राहणार आहे. वांद्रे रिक्लेमेशन परिसरातील जागा १,९७,४६६ चौरस मीटर तर आदर्श नगरची (वरळी) ६८,०३४ चौरस मीटर क्षेत्र आहे. म्हाडाकडून नियुक्ती करण्यात आलेल्या विकासकास दोन्ही परिसरातील एकूण सभासदांच्या ५१ टक्के सभादांची संमती पत्रे म्हाडास सादर करणे बंधनकारक राहणार आहे.

सदर प्रकल्पांमधील मूळ गाळेधारक आणि रहिवाश्यांचे पुनर्वसन करणे, त्यांच्या तात्पुरत्या निवासाची सोय करणे, पर्यायी जागेचे भाडे देणे, कॉर्पस फंड, सर्व पायाभूत सुविधांचा विकास करण्याची जबाबदारी बांधकाम आणि विकसन संस्थेची राहणार आहे.

०००

सिंधी निर्वासितांच्या जमिनींचे पट्टे नियमित करण्यासाठी विशेष अभय योजना

राज्यातील सिंधी समाजातील निर्वासितांच्या जमिनींचे पट्टे ‘विशेष अभय योजना-२०२५’ अंतर्गत नियमित करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयामुळे सिंधी निर्वासित बांधवांच्या राज्यातील ३० ठिकाणच्या वसाहतींमधील जमिनींचे पट्टे नियमित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही अभय योजना वर्षभरासाठी लागू राहणार आहे.

भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी पश्चिम पाकिस्तानातून आलेल्या निर्वासितांसाठी महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणच्या मालमत्ता भरपाई संकोष मालमत्ता म्हणून घोषीत करण्यात आल्या आहेत. अशा जमिनी नियमित करण्याबाबत विशेष मोहिम राबविण्याबाबत शासनाच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यामध्ये समावेश केला होता. त्याअनुषंगाने ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर वगळून २४ जानेवारी १९७३च्या राजपत्रात घोषित ३० अधिसूचित क्षेत्रात ही विशेष अभय योजना राबविण्यात येणार आहे. यात सिंधी निर्वासितांच्या निवासी व वाणिज्यिक जमिनींचे पट्टे नियमित करण्यात येणार आहेत. या जमिनी नियमित (मालकी हक्काचे पट्टे नियमानुकुल/फ्री होल्ड (भोगवटादार वर्ग-१/सत्ता प्रकार-अ) करण्याकरिता १५०० चौ. फुटापर्यंत सवलतीचे दर लागू करण्यात आले आहेत. जमीन १५०० चौ. फुटांपर्यंत निवासी वापरात असल्यास ५ टक्के अधिमूल्य तर वणिज्यिक प्रयोजनासाठी वापरात असल्यास १० टक्के अधिमूल्य आकारले जाणार आहे. तर १५०० चौ. फुटांपेक्षा जास्त क्षेत्रफळासाठी या दराच्या दुप्पट अधिमूल्य आकारले जाणार आहे. या योजनेस आवश्यकता वाटल्यास पुढे एक वर्षापर्यंत मुदतवाढ देण्यात येणार आहे.

०००

शासकीय आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी महाविद्यालयांतील अध्यापकांच्या मानधनात वाढ

राज्यातील शासकीय आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी तसेच योग व निसर्गोपचार महाविद्यालयांतील कंत्राटी अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

शासकीय महाविद्यालयांतील सेवानिवृत्ती, राजीनामा, पदोन्नती व इतर कारणांमुळे पदे सातत्याने रिक्त होत असतात. या रिक्त पदांवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नियमित भरती होईपर्यंत २०२२ मध्ये कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार ठोक मानधन तत्वावर अध्यापकांची नियुक्ती करण्यात येत आहे.

काही विषयांसाठी पात्र उमेदवार सहज उपलब्ध होत नसल्याने ठोक मानधनात वाढ करण्याची आवश्यकता जाणवत होती. या पार्श्वभूमीवर ठोक मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवीन मानधन पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे – प्राध्यापक -१ लाख ५० हजार रुपये, सहयोगी प्राध्यापक १ लाख २० हजार रुपये, सहाय्यक प्राध्यापक – १ लाख रुपये मानधन देण्यास मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे रिक्त पदे भरताना अधिक पात्र उमेदवार आकर्षित होण्यास मदत होणार असून, शैक्षणिक गुणवत्ताही कायम राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

०००

खासगी अनुदानित आयुर्वेद, युनानी संस्थांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना

राज्यातील खासगी अनुदानित आयुर्वेद व युनानी संस्थांमधील गट-ब, क व ड संवर्गातील शासन मंजूर पदावरील शिक्षकेतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एक व दोन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा मुदतीनुसार निश्चित वेतनवाढीचा लाभ मिळणार असून, त्यांच्या आर्थिक व सेवाविषयक स्थैर्यात वाढ होणार आहे. वेतनामध्ये येणारी कुंठितता टळणार आहे.

वित्त विभागाच्या दि. ०१ एप्रिल २०१०, ०५ जुलै २०१० व ०६ सप्टेंबर २०१४ च्या शासन निर्णयांमध्ये नमूद केलेल्या सर्व अटी व तरतुदी पूर्वलक्षी प्रभावाने या योजनेत लागू केल्या जातील.

ही योजना आयुष संचालनालय, मुंबईच्या अधिपत्याखालील संबंधित खासगी अनुदानित संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या शासन मंजूर पदावरील पात्र कर्मचाऱ्यांसाठी लागू असेल.

या योजनेचा लाभ देताना संबंधित कर्मचाऱ्यांची सेवा भरती ही संस्थेमार्फत प्रचलित सेवाप्रवेश नियमांनुसार करण्यात आलेली आहे की नाही, तसेच त्यांची पात्रता तपासण्याची जबाबदारी आयुष संचालनालयाची राहणार आहे.

या निर्णयामुळे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागणीला दिलासा मिळाला आहे.

०००

ग्रामपंचायत, पंचात समिती, जिल्हा परिषद सदस्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ

राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. याबाबत अध्यादेश काढण्यास बैठकीत मंजूरी देण्यात आली.

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या परंतु, जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने सदस्यत्व रद्द झालेल्या सदस्यांना प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी अनेक लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली होती.

त्यानुसार ग्राम पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या १ ऑगस्ट २०२२ रोजी किंवा त्यानंतर अध्यादेश जारी होईपर्यंत झालेल्या सर्वसाधारण निवडणुका अथवा पोट निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आणि त्या अनुषंगिक बाबींसाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आली.

यासाठी महाराष्ट्र जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास तात्पुरती मुदतवाढ अध्यादेश, २०२५ काढण्यास मान्यता देण्यात आली.

०००

झोपडपट्टी मुक्त महाराष्ट्र योजनेला गती देण्यासाठी अधिनियमात सुधारणा

झोपडपट्टी घोषित झाल्यानंतर पुनर्वसनाचा प्रस्ताव ६० दिवसांत द्यावा लागणार

राज्यातील झोपडपट्टी पुनर्वसनाला गती देऊन महाराष्ट्र झोपडमुक्ती करण्यासाठी महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र सुधारणा व पुनर्वसन कायद्यात सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

या निर्णयानुसार महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सुधारणा निर्मुलन व पुनर्वसन) अधिनियम-१९७१ मधील तीन तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. झोपडपट्टीची जमीन झोपडपट्टी क्षेत्र घोषित केल्यानंतर, जमीन मालक, विकासक किंवा सहकारी संस्थेला या जमिनीवरील पुनर्वसनाचा प्रस्ताव १२० दिवसात सादर करावा द्यावा लागत असे. ही मुदत आता ६० दिवसांची करण्यात येणार आहे. या ६० दिवसांत संबंधितांनी प्रस्ताव न दिल्यास झोपडपट्टीचे क्षेत्र पुनर्विकासासाठी इतर प्राधिकऱणास सोपवू शकणार आहेत, याबाबतची दुरूस्ती कलम १५(१) मध्ये केली जाणार आहे.

मुंबई महानगर प्रदेशातील झोपडपट्टी पूनर्वसन योजना शासकीय, निमशासकीय महामंडळे, प्राधिकरणे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत संयुक्त भागीदारी तत्वावर राबवण्यात येत असल्यास, त्यांना आता योजनेला आशयपत्र दिल्यानंतर ३० दिवसांच्या आत ही जमीन ३० वर्षांच्या भाडेपट्ट्याने उपलब्ध करून दिली जाईल. जेणेकरून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी बँक किंवा वित्तीय सस्थांकडून कर्ज, अर्थसहाय्य मिळवणे शक्य होणार आहे. याबाबतची दुरूस्ती कलम १५ – अ मध्ये केली जाणार आहे.

झोपडपट्टी पुनर्वसन योजना व प्रकल्पांमध्ये स्वेच्छेने सहभागी न होणाऱ्या झोपडपट्टीवासियांबाबत करावयाची कार्यपद्धती आता कलम ३३-अ मध्ये विस्ताराने समाविष्ट करण्यात येत आहे.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमध्ये झोपडीधारकांना संक्रमण शिबीराऐवजी भाडे देण्यात येते. पण झोपडपट्टी धारकांना विकासकांकडून हे भाडे वेळेत दिले जात नाही. त्याची थकबाकी वाढत जाते. संक्रमण शिबीराचे भाडे किंवा इतर देणे विकासकाकडून वसूल करता यावे यासाठीची कायदेशीर तरतूद करण्यासाठी कायद्यात ३३-बी नव्याने समाविष्ट करण्यात येणार आहे. यात विकासकांकडून भाडे थकबाकीची वसुली महसुली कायद्यानुसार केली जाणार आहे.

०००

नागपूर येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेची स्थापना

राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था नागपूर येथे स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थे (NIDM) च्या धर्तीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था (State Institute of Disaster Management) स्थापन करण्यात येणार आहे. राज्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींना सक्षमपणे प्रतिसाद देण्यासाठी आपत्ती पूर्व तयारी, सौम्यीकरण, आपत्ती प्रवणता, धोका, आपत्तीनंतर मदत व पुनर्वसन, पुनर्बांधणी, तसेच प्रतिसाद, प्रशिक्षण ह्या बाबींचे व्यवस्थापन व नियोजन राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेमार्फत (एसआयडीएममार्फत) होणार आहे.

संस्थेसाठी नागपूर येथील महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण (मिहान) येथे दहा एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संस्थेच्या इमारतीच्या बांधकामासाठी १८७ कोटी ७३ लाख रुपयांच्या निधीच्या तरतूदीस मंजूरी देण्यात आली. तसेच संस्थेसाठी कामाच्या स्वरुपानुसार आवश्यक असणारी संवर्गनिहाय नियमित व कंत्राटी/पदे तसेच तांत्रिक सल्लागार इत्यादी मनुष्यबळ घेण्यास व त्यासाठीच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. राज्याच्या मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील राज्य कार्यकारी समिती ही या संस्थेसाठी नियामक समिती म्हणून काम पाहणार आहे.

०००

ठाणे शहरात ३ बेकायदेशीर हुक्का पार्लरवर कारवाई

मुंबई, दि. ०८: ठाणे पोलीस दलाकडून हुक्का पार्लरच्या आड चालणाऱ्या बेकायदेशीर धंद्यांवर सातत्यपूर्ण कारवाई करण्यात येत आहे. ठाणे पोलीस दल गोपनीय छापे, गुन्हे दाखल करणे, परवाने तपासणे अशा अनेक स्तरांवर कारवाई करीत आहे. ठाणे शहरामध्ये जाने २०२५ ते अद्यापपर्यंत एकूण ३ बेकायदेशीर हुक्का पार्लरवर छापे टाकून संबधितांवर कोटपा कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

ठाणे शहरामध्ये तरूणांमध्ये प्रसिद्ध असलेल्या मॉल्स, कॅफे आणि हँग आऊट्स येथे विशेष गस्त व गुप्त तपासणी सुरू आहे. अशा ठिकाणी होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे निर्देश स्थानिक पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत. ठाणे पोलीस दलाने अशा बेकायदेशीर प्रवृत्तींवर ‘ झिरो टोलरन्स’ धोरण अवलंबिले आहे. पुढील काळातही अशा हुक्का पार्लरच्या आड सुरू असणाऱ्या बेकायदेशीर धंद्यांवर कारवाई करण्याची मोहिम अधिक गतीने राबविण्यात येत आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांनी दिली आहे.

०००

नीलेश तायडे/विसंअ/

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुका कायदेशीर तरतुदीनुसारच – भारत निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

0
मुंबई, दि. २३ : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकानंतर मतदार यादी व मतदानप्रक्रियेवर करण्यात येत असलेल्या आरोपांना भारत निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. आयोगाच्या स्पष्टीकरणानुसार, निवडणूक...

जम्मू काश्मीर दहशतवादी हल्ला; मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आपत्कालीन मदत कक्ष

0
मुंबई, दि. २३: पहेलगाम, जम्मू काश्मीर येथे पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्यात मुंबई शहर व जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असल्यास किंवा आपल्या ओळखीतील कोणी नातेवाईक किंवा व्यक्ती...

जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी ‘राज्य आपत्ती व्यवस्थापन’च्या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन

0
मुंबई, दि. २३ : पहेलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे जम्मू काश्मीरच्या विविध भागात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक आणि  त्यांचे नातेवाईक यांच्या मदतीसाठी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य...

प्रत्येक नागरिकाला सुखरुप घरी परत आणणे हीच प्राथमिकता-उपमुख्यमंत्री अजित पवार

0
पर्यटकांना परत आणण्यासाठी अतिरिक्त विमानाची व्यवस्था मुंबई, दि. २३: पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि...

पहलगाम येथील अतिरेक्यांच्या हल्ल्यात ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली मधील तीन पर्यटकांचा मृत्यू; मृतांच्या नातेवाईकांना मदतीसाठी जिल्हा...

0
ठाणे, दि.२२(जिमाका): जम्मू- काश्मिरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश आहे. पहलगाम इथे झालेल्या...