सोमवार, जुलै 28, 2025
Home Blog Page 404

इंग्लंडच्या प्रिन्स एडवर्ड यांची राज्यपालांशी भेट; भारत-ब्रिटन परस्पर सहकार्य वाढविण्यावर चर्चा

मुंबई, दि. 3 : सध्या मुंबई भेटीवर असलेल्या ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स एडवर्ड यांनी रविवारी (2 फेब्रुवारी) महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.

राणी एलिझाबेथ द्वितीय व ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप यांचे सर्वात धाकटे सुपुत्र; तसेच राजे चार्ल्स तृतीय यांचे धाकटे बंधू असलेल्या प्रिन्स एडवर्ड यांनी भारत आणि ब्रिटन मधील संबंध मजबूत होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करताना उभय देशांमधील सहकार्य अधिक वृद्धिंगत होण्याची इच्छा व्यक्त केली.

आपण इंग्लंडमधील बाथ विद्यापीठाचे पदसिद्ध कुलपती असल्याचे सांगताना उच्च शिक्षण क्षेत्रातील सहकार्य भारत व इंग्लंड या दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरेल असे त्यांनी नमूद केले.

व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना युवराज एडवर्ड यांनी वर्गखोलीच्या बाहेर होत असलेले शिक्षण देखील जीवनात महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

भारतात क्रिकेट ‘अभूतपूर्व’ वाढले असल्याचे नमूद करून बॅडमिंटनमधील भारताच्या प्रगतीचेही त्यांनी कौतुक केले. रविवारी संध्याकाळी मुंबईत होणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० सामन्याच्या नाणेफेकीचा वेळी आपण उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सध्या अस्तित्वात असलेल्या कॉमनवेल्थ क्रीडा महोत्सवासोबतच कॉमनवेल्थ व्यवसाय महोत्सव आणि सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्याच्या संकल्पनेवर देखील यावेळी चर्चा झाली.

प्रिन्स एडवर्ड यांचे राज्यात स्वागत करताना भारत आणि इंग्लंड ही जगातील दोन महान लोकशाही राष्ट्रे असल्याचे राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी सांगितले.

भारतीय लोकांना इतर देशांच्या तुलनेत लंडनमध्ये ‘आपल्या घरासारखे’ वाटते. उच्च शिक्षण दोन्ही देशांमध्ये सहकार्याचे महत्त्वाचे क्षेत्र ठरू शकते, असे राज्यपालांनी सांगितले.  भारतीय विद्यार्थ्यांना इंग्लंडमधील शिक्षण पद्धतीशी जुळवून घेणे अधिक सोपे जाते, असेही त्यांनी नमूद केले.

हरित ऊर्जा आणि औषधनिर्माण क्षेत्राबरोबरच भारताला इंग्लंडकडून हॉस्पिटल व्यवस्थापन क्षेत्रातील सहकार्याचा लाभ होऊ शकतो, असे राज्यपालांनी सांगितले.  इंग्लंडमधील हॉस्पिटल व्यवस्थापन प्रणाली उत्तम असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यातील विद्यापीठांचे कुलपती या नात्याने आपण राज्यातील कुलगुरूंना इंग्लंडमधील विद्यापीठांसोबत सामंजस्य करार (MoU) करण्यासाठी प्रोत्साहन देऊ असेही राज्यपालांनी सांगितले.

भारत आज जगातील सर्वात बलशाली अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत असून आणि भारत – इंग्लंड यांच्यातील मजबूत व्यापार संबंध इतर अनेक क्षेत्रांतील संबंध बळकट करण्यास साहाय्यभूत ठरतील, असे राज्यपालांनी सांगितले.

भारत आणि इंग्लंड यांच्यात मुक्त व्यापार करार करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

भारतात क्रिकेटशिवाय फुटबॉल खेळ अतिशय लोकप्रिय असून, देशात फुटबॉलला अधिक चालना देण्यासाठी इंग्लंडने भारताला मदत करावी, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

बैठकीला ब्रिटनचे उप-उच्चायुक्त हरजिंदर कांग, ड्यूक यांचे खाजगी सचिव अ‍ॅलेक्स पॉट्स आणि राजकीय व द्विपक्षीय व्यवहार विभागप्रमुख जॉन निकेल उपस्थित होते.

0000

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची केंद्रीय अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया

जळगाव दि. 03 फेब्रुवारी (जिमाका) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. आरोग्य क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी ९५,९५७.८७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, यामुळे आरोग्य सेवांमध्ये मोठे सुधार होण्याची शक्यता आहे.

या अर्थसंकल्पातील तरतुदींवर प्रतिक्रिया देताना राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन म्हणाले, “हे आरोग्य क्षेत्रासाठी ऐतिहासिक पाऊल असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे देशातील आरोग्य व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडणार आहे.”

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी ₹9,406 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, त्यामुळे गरीब व गरजू लोकांसाठी आरोग्य सुविधा वाढणार आहेत. तसेच, प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियानाला ₹4,200 कोटींचे अनुदान देण्यात आले आहे, ज्यामुळे आरोग्य सेवा पायाभूत सुविधा मजबूत होणार आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियानासाठी ₹37,226.92 कोटींची तरतूद करण्यात आली असून, ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. राष्ट्रीय टेली मानसिक आरोग्य कार्यक्रमासाठी ₹79.6 कोटींची तरतूद करून डिजिटल मानसिक आरोग्य सेवांना चालना दिली जाणार आहे.

कर्करोग उपचार सुविधांसाठी मोठी तरतूद करण्यात आली असून, २०२५-२६ दरम्यान २०० नवीन कर्करोग केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. पुढील तीन वर्षांत सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये डे-केअर कॅन्सर सेंटर्स उभारण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, यामुळे दुर्गम भागांमध्येही उपचार उपलब्ध होतील.

वैद्यकीय शिक्षणासाठी मोठी तरतूद करण्यात आली असून, पुढील वर्षभरात १०,००० नवीन वैद्यकीय जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पुढील पाच वर्षांत ७५,००० जागा वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गेल्या १० वर्षांत १३० टक्के वाढ होऊन पदवीपूर्व आणि पदव्युत्तर वैद्यकीय जागांची संख्या १.१ लाखांवर पोहोचली आहे.

या संपूर्ण अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन म्हणाले, “ही तरतूद भारताच्या आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवणारी ठरेल. वैद्यकीय शिक्षणाच्या संधी वाढल्याने ग्रामीण भागातील डॉक्टरांची संख्या वाढेल. तसेच, कर्करोग उपचार केंद्रांमुळे हजारो रुग्णांना वेळेत उपचार मिळतील.”

केंद्रीय अर्थसंकल्पातील या तरतुदींचा लाभ महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर मिळेल, असेही महाजन यांनी सांगितले.

000

कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर ‘एआय’चा वापर करण्यासाठी सहकार विभागासोबत समन्वय करून प्रकल्पाची व्यवहार्यता तपासून घ्यावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. ०३ : शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी येत्या काळात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (‘एआय’चा) वापर अनिवार्य आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडविण्यासाठी कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन आहे. त्यासाठी कृषी विभागाने सहकार विभागासोबत समन्वय करून या प्रकल्पाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासून पाहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

राज्यातील कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल (दूरदृष्यप्रणालीद्वारे), सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, अखिल भारतीय द्राक्ष बागायत संघाचे अध्यक्ष कैलास पाटील, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे (व्यय) प्रधान सचिव सौरभ विजय, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सुरज मांढरे, साखर आयुक्त कुणाल खेमनार, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंग, सहकार विभागाचे सहसचिव संतोष पाटील, बारामती कृषी विज्ञान केंद्राचे प्रा. निलेश नलावडे, प्रा. योगेश फाटके, प्रा. तुषार जाधव, प्रा. शरद ताटे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जगभरातील प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे क्रांतिकारी बदल घडत आहेत. कृषी क्षेत्र सुद्धा याला अपवाद नाही. येत्या काळात बदलते हवामान, अवेळी पडणारा पाऊस, पीकांवर वारंवार होणारा रोगांचा प्रादुर्भाव, मजुरांचा तुटवडा यांवर मात करत शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेला पर्याय नाही. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यामुळे पीक आरोग्याचे विश्लेषण, मातीतील कार्बन प्रमाण शोधणे, मातीच्या आरोग्याची सविस्तर माहिती, तणाचा प्रकार ओळखणे, पूर्वीच्या उत्पन्नाची तुलना, मातीचे तापमान, वातावरणातील आर्द्रता, पिकांवरील कीड व रोगांचा प्रादुर्भाव ओळखणे, तसेच पिकांवरील जैविक-अजैविक ताण ओळखणे शक्य होणार आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर केल्यास पीकांच्या उत्पादनात वाढ, मजुरी खर्चात बचत, रसायनिक खते व औषधांच्या वापरात कपात, कापणी कार्यक्षमतेत वाढ, रोगनियंत्रणाद्वारे बचत, पुरवठा साखळीतील कार्यक्षमतेत वाढ आणि एकूण खर्चात कपात होणे शक्य होईल. राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक आणि आमूलाग्र बदल घडविण्यासाठी कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन आहे. त्यासाठी कृषी विभागाने सहकार विभागासोबत समन्वय करून या प्रकल्पाची तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता तपासून पाहावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

००००

पंचायत समित्यांसाठीच्या चारचाकी वाहनांचे वितरण

कोल्हापूर, दि.०२ (जिमाका):  जिल्हा परिषदेच्या आजरा, भुदरगड, शाहूवाडी, पन्हाळा, कागल व शिरोळ या पंचायत समित्यांसाठीच्या चारचाकी वाहनांचे आज सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या दालनाचेही उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई तसेच सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी व विभाग प्रमुख, गट विकास अधिकारी यावेळी उपस्थित होते.

केंद्र सरकार व  राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोनातून गट विकास अधिकारी यांना गावपातळीवर भेटी देण्यासाठी ही वाहने उपयुक्त ठरतील. ही वाहने  जिल्हा परिषदेच्या निधीतून घेण्यात आली आहेत.

स्त्रियांनी चिरस्थायी, शाश्वत लिखान करावे – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे, दि. ०२: स्त्रियांच्या साहित्यात लिहिण्याची सुरूवात पुरुषांनी केल्यामुळे स्त्रियांचे अंतरंग लेखनातून यायला वेळ लागला. आता स्त्रिया स्वत: लिहित असल्यामुळे त्यांचे मनोगत व्यक्त होत आहे. स्त्रियांनी चिरस्थायी आणि शाश्वत राहिल असे लेखन केले पाहिजे, असे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

विश्व मराठी संमेलनात आयोजित ‘मराठी भाषा आणि स्त्री साहित्य’ या विषयीच्या चर्चासत्रात त्या बोलत होते. या चर्चासत्रात मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, साहित्यिका डॉ. सिसिलिया कार्व्हालो या देखील सहभागी झाल्या होत्या. निवेदन उत्तरा मोने यांनी केले.

डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या, स्त्रियांना आपल्या कामाची प्रेरणा अनेकदा पुरुषांकडूनच मिळाल्याचे आपण पाहतो. स्त्री संघटना आणि स्त्रियांनी नेहमी सांगितले आहे की, स्त्रियांची भूमिका पुरूषविरोधी नसून पुरुषी वर्चस्वाविरुद्ध आहे. पुरुषाची भूमिका ही सहकाऱ्याची, मित्राची असावी. पुरुषांचा आणि स्त्रियांचा प्रवास जेव्हा माणूसपणाकडे जाईल तेव्हा अजून चांगले घडेल, असेही त्या म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या, गेल्या ५० वर्षात स्त्रियांच्या जाणीवांचा प्रभाव समाजावर मोठ्या प्रमाणात पडला आहे. स्त्रियांना अबला समजण्याची भूमिका आता बदलली आहे. पंचायत राजमध्ये ५० टक्के आरक्षण ही स्त्रियांसाठी महत्त्वाची बाब ठरली आहे. तथापि, स्त्रियांकडे पाहण्याची नजर आणि भूमिका बदलणे हे आव्हान अजून समोर आहे. त्यामुळे स्त्रियांनी कोणत्याही टिकेला न घाबरता निर्भिडपणे नेहमी लिहिते राहिले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

श्रीमती भिडे म्हणाल्या, भाषा आणि आशय हे एकाच बाबीचे दोन पैलू आहेत. स्त्रियांनी, स्वत:ला वाटतेय म्हणून लिहिले पाहिजे. आशयाची समृद्धी भाषेतून येते. पूर्वी स्त्रिया घरात असत त्यामुळे त्यांचे अनुभव विश्व खूप छोटे होते. स्त्रिया जेव्हापासून घराच्या बाहेर पडू लागल्या तेव्हापासून त्यांचे अनुभव विश्व विस्तारले असून आशयदार लेखन करू लागल्या आहेत. असे असतानाही लेखकाच्या पुस्तकातील पात्रात जी अलिप्तता पाहिजे ती अद्याप स्त्रियांच्या साहित्यात आलेली नाही. हळूहळू अनुभवातून ती जायला काही वेळ लागेल. आजच्या स्त्रिया नोकरी, मोठ्या पदांवर, कॉर्पोरेट जगतात वावरू लागल्या असल्या तरी अद्याप तेथील आशय स्त्रियांच्या साहित्यात आलेला नाही, असेही त्या म्हणाल्या.

श्रीमती कार्व्हालो म्हणाल्या, भाषा आणि साहित्य हे काळाला जोडणारे असावे. लेखक, कवि, कवयित्री जेव्हा बोलतात ते समाजाचे मनोगत होते. आपल्या संत कवयित्रींनी श्री विठ्ठलाला आपल्या घरातील पुरुष मानले. त्यातून त्यांनी समस्त स्त्रियांचे मनोगत मांडले. जे आपली पणजी, आजी बोलू शकली नाही ते आताच्या स्त्रिया लिहून व्यक्त होत आहेत, ही चांगली बाब आहे, असेही त्या म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या, जितका माणूस सजग होत असतो तितकी भाषेची समृद्धी सतत होत असते. बोलीभाषेत लेखन झाले पाहिजे. काळाच्या पडद्याआड गेलेले शब्द पुन्हा बाहेर काढले पाहिजेत. महिला लेखकांचा कोश, स्त्रियांच्या कार्याचे कोश तयार केले पाहिजेत. व्याकरणाच्या क्षेत्रात त्या पुढे आल्या पाहिजेत. लोकविज्ञानाचे अभियान करण्यात महिला पुढे आल्या पाहिजेत, असेही त्या म्हणाल्या.

०००

पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मानाची गदा प्रदान

अहिल्यानगर दि.०२:  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या ६७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताबासाठी झालेल्या लढतीत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करीत विजतेपद पटकाविले. स्पर्धेचा विजेता पृथ्वीराज मोहोळ याला उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते मानाची गदा प्रदान करण्यात आली. राज्यातील क्रीडा विकासाला चालना देताना प्रत्येक खेळासाठी आवश्यक आर्थिक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही श्री.पवार यांनी दिली.

मॅट विभागात नांदेडचा (मूळचा पुण्याच्या राजगुरुनगरमधील राक्षेवाडीचा) डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात लढत झाली. यात पृथ्वीराज मोहोळ विजेता ठरला. माती विभागातून सोलापूर जिल्ह्याचा महेंद्र गायकवाड आणि परभणीचा साकेत यादव यांच्यात अंतिम लढत झाली. यात महेंद्र गायकवाड विजेता ठरला.

अहिल्यानगर येथील वाडिया पार्कमध्ये कै.बलभिम अण्णा जगताप क्रीडानगरीत  झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संग्राम जगताप, माऊली खटके, काशिनाथ दाते,  महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै.रामदास तडस, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आदी उपस्थित होते.

स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, राज्यातील क्रीडा रसिकांनी या स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला. स्पर्धेसाठी पारितोषिकेही  मोठी ठेवण्यात आली आहेत. गेले पाच दिवस स्पर्धेच्या भव्य आयोजनाचा आनंद राज्याच्या जनतेला घेता आला. यापुढेदेखील या स्पर्धेचे आयोजन करतांना या स्पर्धेचे दिमाखदार आयोजनाचे आव्हान आयोजकांसमोर असेल. खेळांना प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्य शासनदेखील प्रयत्नशील आहे.  प्रत्येक खेळाच्या विकासासाठी राज्य शासन सहकार्य करेल आणि अहिल्यानगरच्या क्रीडा विकासासाठीदेखील आवश्यक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे भव्य आयोजन झाल्याचे नमूद करून केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ म्हणाले, ही मानाची स्पर्धा आहे. स्व.मामासाहेब मोहोळ यांनी या स्पर्धेला सुरूवात केली. त्यानंतर राज्यात कुस्तीच्या वैभवात भर पडून ही परंपरा आणखी पुढे जात आहे. महाराष्ट्र कुस्तीची पंढरी आहे. राज्याने देशाला अनेक मल्ल दिले. महाराष्ट्राच्या तीन मल्लांना शासनाने वर्ग एक दर्जाच्या पदावर नियुक्ती दिली आहे.  येत्या काळातही कुस्तीला राजाश्रय मिळेल असा विश्वास व्यक्त करून राज्याची ही परंपरा अधिक समृद्ध करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कुस्ती खेळाला डोपींगसारख्या प्रकाराने गालबोट लागू नये यासाठी  येत्या काळात अधिक प्रयत्न होतील असे त्यांनी सांगितले.

विधान परिषदेचे सभापती प्रा.शिंदे  यांनी जिल्ह्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल राज्य शासन आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाला धन्यवाद दिले. कुस्तीप्रेमी जनता चांगल्या खेळालाच प्रोत्साहन देते असे सांगून त्यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, महाराष्ट्र केसरी स्पर्धा अहिल्यानगर वासियांसाठी मोठी पर्वणी आहे. वाडिया पार्कचे मोठ्या स्टेडिअममध्ये रुपांतर करायचे आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या क्रीडा विकासाला चालना मिळेल असे सांगून त्यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उत्तम आयोजनाबद्दल संयोजकांचे अभिनंदन करून क्रीडा मंत्री भरणे म्हणाले, २००५ मध्ये अहिल्यानगरमध्ये ‘हिंद केसरी’ स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. राज्याला कुस्तीची गौरवशाली परंपरा आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्याने मल्ल दिले आहेत. अहिल्यानगरच्या क्रीडा विकासासाठी शासनाकडून आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

प्रास्ताविकात आमदार जगताप यांनी कुस्ती स्पर्धेविषयी माहिती दिली. लाल मातीच्या खेळातून संस्कार होत असल्याने राज्यभरात या खेळाचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या कुस्ती स्पर्धेमुळे  अहिल्यानगरचे नाव प्राधान्याने घेतले जाईल असे ते म्हणाले.

माजी आमदार अरुण जगताप, पद्मश्री पोपट पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, माजी खासदार सुजय विखे पाटील, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, सरचिटणीस हिंदकेसरी पै. योगेश दोडके, चित्रपट दिग्दर्शक प्रविण तरडे,   जिल्हा कुस्तीगीर कार्याध्यक्ष संघाचे संतोष भुजबळ आदी उपस्थित होते.

०००

 

नागपुरातील छोट्या मैदानांच्या विकासासाठी १५० कोटींचा निधी देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. ०२ : खासदार क्रीडा महोत्सवाच्या आयोजनातून नागपूर शहराची क्रीडा क्षेत्रातील वाटचाल गतीने सुरू आहे. शहरात ७०० कोटींच्या खर्चातून मानकापूर क्रीडा संकुलाच्या पुनर्निमाणाद्वारे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा येत्या दोन वर्षात उपलब्ध होणार आहेत. स्थानिक खेळाडुंना सरावासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील छोट्या मैदानांचा विकास करण्यात येईल व यासाठी  महाराष्ट्र शासनाच्यावतीने १५० कोटींचा निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

येथील यशवंत स्टेडियमवर आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपाचे मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, आमदार प्रवीण दटके, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, महोत्सवाचे संयोजक संदीप जोशी, अर्जुन पुरस्कार प्राप्त दिव्यांग खेळाडू शितल देवी, क्रिकेटपटू मोहित शर्मा आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून नागपूर व विदर्भातील खेळाडुंना मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. ५८ क्रीडा प्रकारात विजेत्यांना १२ हजारांवर पदके प्रदान करण्यात आली आहेत, ही अभिमानास्पद बाब आहे. खासदार सांस्कृतिक महोत्सव व क्रीडा महोत्सवातून विदर्भातील गुणवान कलाकार व खेळाडू पुढे येत आहेत. यातून विदर्भ व नागपूरचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवणारे कलाकार व खेळाडू घडतील. शहरात ऑलिम्पीकसह आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने आवश्यक सर्व क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने ७०० कोटींच्या निधीतून मानकापूर विभागीय क्रीडा संकुलाच्या पुनर्निमाणाचे कार्य सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले की, गत सात वर्षांपासून खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून खेळाडूंना संधी उपलब्ध करून देणे, त्यांचा व्यक्तीमत्व विकास साधणे व नेतृत्वही घडवणे हा या मागील मुख्य उद्देश आहे. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शहरातील क्रीडा मैदानाच्या विकासासाठी यापूर्वी १०० कोटींचा निधी दिला आहे. अजूनही छोट्या मैदानांच्या विकासासाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते खेळाडू, प्रशिक्षक आदींना उल्लेखनीय कामगिरीसाठी क्रीडा महर्षी, क्रीडा प्रशिक्षक, क्रीडा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले. शितल देवी आणि मोहित शर्मा यांनीही यावेळी उपस्थितींना मार्गदर्शन केले. खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक संदीप जोशी यांनी प्रास्ताविक केले.

खासदार क्रीडा महोत्सवाचे हे सातवे वर्ष आहे. १२ जानेवारी २०२५ पासून यावर्षीच्या खासदार क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली. २१ दिवस चाललेल्या महोत्सवात ५८ क्रीडा प्रकारात ७७ हजार ६६३ स्पर्धक सहभागी झाले. नागपुरातील ६९ मैदानावर स्पर्धा घेण्यात आल्या. एकूण दीड कोटींची बक्षीस तर १२ हजार ३१७ पदके प्रदान करण्यात आले.

०००

 

आदिवासींसाठी सर्वसमावेशक आरोग्य धोरण करू –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

▪️पारंपारिक आदिवासी उपचार व आधुनिक वैद्यकाचा एकात्मिक उपयोजन महत्वपूर्ण

▪️सेवाभावी संस्थांच्या सहयोगातून गडचिरोली जिल्हा होणार मलेरिया मुक्त

▪️आदिवासी समाजातील निसर्गपूरक उपचाराला आधुनिकतेची जोड मिळावी

नागपूर, दि. ०२ : एम्स  येथील तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत आदिवासींच्या आरोग्याबाबत झालेले तज्ज्ञांचे विचारमंथन अधिक मोलाचे आहे. याबाबत आता पुढचे पाऊल म्हणून परिषदेतील उपस्थित झालेले प्रश्न, त्याची असलेली उत्तरे, तज्ज्ञांच्या सूचना यांना अधोरेखित करून आरोग्य विद्यापीठ, एम्सच्या माध्यमातून आदिवासींच्या आरोग्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे सर्वसमावेशक असे आरोग्य धोरण तयार केले जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ’एम्स’ नागपूर येथे आयोजित आदिवासी आरोग्य परिषदेच्या समारोप समारंभात ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त), ’एम्स’ नागपूरचे संचालक डॉ. प्रशांत जोशी,  परिषदेचे संयोजक डॉ. संजीव चौधरी, विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ उपस्थित होते.

या आरोग्य धोरणात आदिवासींच्या आरोग्य विषयक मूलभूत प्रश्नांवर निश्चित उपाययोजनांचा आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी कुलगुरूंना केल्या. हे धोरण केवळ महाराष्ट्रीय स्तरापुरते मर्यादित न राहता राष्ट्रीय व वैश्विक स्तरावर उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याला महाराष्ट्र शासनातर्फे सर्वातोपरी सहकार्य केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

हजारो वर्षांपासून आदिवासी समाज आपल्या उपजत ज्ञानावर स्वतःचे अस्तित्व टिकून आहे. काळाच्या प्रवाहात अनेक स्थित्यंतरे झाली, मात्र आदिवासी संस्कृती टिकून राहिली. यातील मूल्य, विविध भागातील पारंपारिक आदिवासी उपचार आणि आधुनिक वैद्यकाचा एकत्रित विचार करुन त्याचे उपयोजन केल्यास आदिवासींच्या आरोग्यविषयक मुलभुत सुविधांवर उत्तरे प्राप्त होऊ शकतील असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

आजही आदिवासी क्षेत्रात कुपोषण, सिकलसेल आणि मलेरिया यासारखे मूलभूत प्रश्न आहेत. यावर राज्यशासन व केंद्रसरकारतर्फे विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. अनेक योजनांना यशदेखील प्राप्त होत आहे. सिकलसेल आजार निर्मूलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करूयात, असे आवाहन त्यांनी केले.

या परिषदेसाठी निवडलेले स्थळ व ठिकाण याबद्दल त्यांनी संयोजकांना धन्यवाद दिले. आदिवासी गोंड राजा बख्त बुलंद शाह हे या शहराचे संस्थापक होते. इथे आदिवासी संस्कृतीच्या पाऊलखुणा आहेत असे त्यांनी सांगितले.

बिल गेट्स फाउंडेशन, सनफार्मा, आयसीएमआरए यांच्या सहयोगातून आदिवासी गडचिरोली जिल्हा मलेरियामुक्त करू असे त्यांनी सांगितले.

आदिवासींच्या आरोग्य समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी  MUHS FIST-25  परिषद महत्त्वपूर्ण आहे. या परिषदेच्या माध्यमातून एकत्रित झालेला डेटा धोरण निश्चितीसाठी महत्वपूर्ण आहे विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले.

’एम्स’ नागपूरचे संचालक डॉ. प्रशांत जोशी यांनी प्रास्ताविकात सांगितले की, आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि ’एम्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासींच्या आरोग्य समस्यांसाठी सुरु करण्यात आलेली परिषद नक्कीच जागतिक स्तरावर नावलौकिक करणार आहे. ’एम्स’ तर्फे विविध योजना कार्यान्वीत करण्यात आल्या आहे त्याचा सकारात्मक परिणाम मुर्त रुपात दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.

आदिवासी भागातील लोकांच्या आरोग्य समस्यांसाठी  MUHS FIST-25 च्या यासाठी आरोग्य विद्यापीठाने व ’एम्स’ ने केलेल सहकार्य महत्वपूर्ण आहे.  आदिवासींच्या आरोग्य समस्या सोडविण्यासाठी परिषदेच्या माध्यमातून तरुण पिढीसाठी आदर्श निर्माण झाला आहे. जेणेकरुन सामाजिक काम करण्याची नवीन टीम तयार होईल असे परिषदेचे आयोजक सचिव डॉ. संजीव चौधरी यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी एम्स परिसरात उभारण्यात आलेल्या ट्रायबल व्हिलेज येथे भेट देवून पाहणी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दर्शन दक्षिणदास यांनी केले तसेच उपस्थितांचे आभार MUHS FIST-25 चे संयोजन समितीचे सदस्य संदीप राठोड यांनी केले.

०००

 

 ५० हजार हक्काची घरे देण्यासाठी मिशन मोडवर काम करा -पालकमंत्री प्रकाश आबिटकर 

  • ‘आम्ही सोबती घरकुलाचे’ मोहीमेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

कोल्हापूर, दि. ०२ (जिमाका): प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व अन्य राज्यस्तरीय योजनांतून कोल्हापूर जिल्ह्यातील गरजू कुटुंबांसाठी कमीत कमी 50 हजार हक्काची घरे उपलब्ध करुन देण्यासाठी महसूल, समाज कल्याण, जिल्हा परिषद व संबंधित यंत्रणेने मिशन मोडवर काम करावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केल्या.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण- टप्पा 2 ची आढावा बैठक पालकमंत्री श्री. आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार अशोक माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश गोडसे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे आदी उपस्थित होते.

यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळा सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षित केल्याबद्दल पालकमंत्री श्री. आबिटकर यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, सरपंच व गट विकास अधिकारी, ग्रामसेवक यांना सन्मानित करण्यात आले.

पालकमंत्री श्री. आबिटकर म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वपूर्ण योजना असून राज्य शासनही या योजनेला सर्वतोपरी सहकार्य करत आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मधून जिल्ह्यातील 44 हजार लाभार्थ्यांना या आर्थिक वर्षात घरकुलाचा लाभ देण्यात येणार असून अन्य राज्यस्तरीय योजनांमधून 10 हजार घरकुले अशाप्रकारे किमान 50 हजारांहून अधिक घरकुलांचा लाभ जिल्ह्यातील लाभार्थ्यांना देण्यासाठी चोख नियोजन करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. गरजू कुटुंबांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणेने समर्पित भावनेने काम करावे. लाभार्थ्यांची यादी निश्चित करण्यापासून ते त्यांच्या गृह प्रवेशा पर्यंतची सर्व कामे वेळेत व गतीने मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व ग्रामसेवकांनी परस्पर समन्वय साधून झोकून देऊन काम करावे, असे त्यांनी सूचित केले.

आम्ही सोबती घरकुलाचेया मोहीमेचा पालकमंत्री श्री.आबिटकर यांच्या हस्ते शुभारंभ

प्रधानमंत्री आवास योजना व अन्य राज्यस्तरीय घरकुल योजनेतून लाभार्थ्यांसाठी घरकुले उभी करताना त्यांना मूलभूत सुविधा देणे आवश्यक आहे. यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून ‘आम्ही सोबती घरकुलाचे’ ही मोहीम कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येणार असून या मोहिमेचा शुभारंभ श्री.आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला.

या मोहिमेमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सोबतीने तसेच सर्व प्रशासकीय यंत्रणेमार्फत घरकुल लाभार्थ्यांच्या सोयीसाठी सर्व योजनांचा कृतीसंगम एकाच व्यासपीठावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. बहुतांश लाभार्थी हे ग्रामीण व डोंगरी भागात राहत असल्यामुळे त्यांना चांगल्या सुविधा, आरोग्य, शिक्षण व अन्य सुविधा पुरवून त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. यामुळे लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होईल.

या विषयाच्या अनुषंगाने पालकमंत्री श्री. आबिटकर म्हणाले, जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना घरकुले उपलब्ध करुन देताना ‘आम्ही सोबती घरकुलाचे’ या मोहिमेअंतर्गत पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, आरोग्य, शिक्षण, रस्ते, वीज पुरवठा, कौशल्य प्रशिक्षण, गृह कर्ज देण्यासाठीही चोख नियोजन करा. त्याचबरोबर यासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या देण्याचे काम संबंधित विभागांनी वेळेत पूर्ण करावे. जिल्ह्यातील बहुतांश लाभार्थी हे ग्रामीण व डोंगरी भागात राहत असल्यामुळे त्यांना चांगल्या सुविधा, आरोग्य, शिक्षण व अन्य सुविधा पुरवून त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यासाठी प्रयत्न करा. तसेच ही मोहीम राज्याला मार्गदर्शक ठरेल अशा पद्धतीने काम करुन मोहीम यशस्वी करा, असेही त्यांनी सूचित केले.

जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, आजवर प्रत्येक योजना कोल्हापूर जिल्ह्यात यशस्वीपणे राबवण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचे काम प्रभावीपणे करून राज्यात कोल्हापूर जिल्हा अग्रेसर ठरण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.

१० एप्रिल पर्यंत घरकुल बांधून पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना बक्षीस

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी या योजनेचे सादरीकरण केले. ते म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजने मधून चालू आर्थिक वर्षात सुमारे 700 कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला उपलब्ध झाला आहे. प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात जवळपास 94 टक्के घरकुले पूर्ण करण्यात आली आहेत. या दुसऱ्या टप्प्यातही घरे उपलब्ध करुन देताना विविध योजनांचा कृती संगम घडवून लाभार्थ्यांना सर्व सोयीसुविधांनी युक्त घरकुले उपलब्ध करुन देण्याचे नियोजन केले आहे. घर गृहलक्ष्मीचे, प्रधानमंत्री सूर्य घर, गृह कर्ज, हर घर जल, उज्वला गॅस, स्वच्छ भारत मिशन, तसेच वीज कनेक्शन देण्यात येणार आहे. तसेच नाविन्यपूर्ण योजनेतून बहुमजली इमारती उभ्या करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प म्हणून प्रीकास्ट तंत्रज्ञानाचा वापर करुन घरकुलाची निर्मिती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

आम्ही सोबती घरकुलाचे या मोहिमे अंतर्गत घरकुलाचे काम स्पर्धात्मक होण्यासाठी एक विशेष प्रतियोगिता सुरु करण्यात आली आहे. 2 फेब्रुवारी ते 10 एप्रिल 2025 या कालावधीत घराचे काम पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना बक्षीस स्वरुपात गृहोपयोगी वस्तू देण्यात येणार असून लाभार्थ्यांनी या मोहिमेचा लाभ घेवून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी 10 एप्रिल पर्यंत आपले घरकुल बांधून पूर्ण करावे, असे आवाहन कार्तिकेयन एस. यांनी केले.

बैठकीला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नाबार्डचे व्यवस्थापक, गटविकास अधिकारी, ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक तसेच संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

०००

नूतनीकरण केलेल्या जिल्हाधिकारी दालनाचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूर,दि. ०२ : जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी यांच्या सुसज्ज दालनाचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या नूतनीकरण केलेल्या दालनासह राजर्षी शाहू सभागृह, अभ्यागतांसाठी प्रतिक्षा कक्ष व स्वीय सहायक कक्षाचेही नूतनीकरण करण्यात आले आहे.  यावेळी नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास, औकाफ  राज्यमंत्री तथा सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ, खासदार छत्रपती शाहु महाराज, खासदार धैर्यशील माने, सर्वश्री आमदार चंद्रदीप नरके, अमल महाडिक, डॉ. अशोकराव माने, शिवाजी पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे आदी उपस्थित होते.

०००

जळव ते बामणेवाडी रस्ता कामाचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते भूमिपूजन

सातारा दि.२ (जिमाका):  मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्रमांक २ रिसर्च अँड डेव्हलपमेंट या योजनेमधून मंजूर टीआर १७ ते सीपीआर ७ जळव ते बामणेवाडी या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाले.

जळव ते बामणेवाडी या काँक्रिटीकरण रस्ता कामाचे भूमिपूजन जळवफाटा येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच रामचंद्र पवार , विश्वास पवार , विजयराव सपकाळ,  अभियंता कांबळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले की, जळव ते बामणेवाडी या रस्त्याच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता दहा कोटी 17 लाखाची असून तांत्रिक मंजुरी आठ कोटी पंधरा लाखाची मिळाली आहे या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी दहा वर्षात 47 लाख 64 हजार रुपये लागणार आहेत. या अनेक वर्षे मागणी होत असलेल्या रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना चांगली सुविधा निर्माण होणार आहे. सदरचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे तसेच कामाचा दर्जा चांगला राखावा अशी सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी यांनी दिली.

०००

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सेमी इंग्लिश करण्यावर भर – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार...

0
सातारा दि.28- जिल्हा परिषदेचे शाळांमधील विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांना  सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबर या सर्व शाळा सेमी इंग्लिश करण्यावर भर...

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आदर्श स्मारकाच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्या...

0
अहिल्यानगर दि.२७ - आजच्या प्रगत महाराष्ट्रात विकसित देशाचा पाया क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी रचला. समाजसुधारणा, महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेल्या...

अहिल्यानगर शहरात संविधान भवन उभारण्यास १५ कोटींचा निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
अहिल्यानगर, दि.२७ जुलै - अहिल्यानगर शहरात लवकरच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावेला साजेसे असे संविधान भवन उभारले जाईल. यासाठी जिल्हा नियोजन निधीतून ५ कोटी रूपये...

पुढील चार वर्षात देशातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
सिकलसेल, थॅलेसिमिया, ॲनिमियावरील उपचारासाठी नवीन योजना तयार करणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती नागपूर, दि. 27 - प्राथमिक आरोग्य सुविधांच्या दृष्टीने प्रत्येक...

नागपूर महानगराच्या वाढत्या विस्ताराला आकार देण्यासाठी तीन टप्प्यात गतिशीलता आराखडा साकार करू – मुख्यमंत्री...

0
दळणवळण यंत्रणेला भक्कम करणाऱ्या आरखड्याबाबत लोकप्रतिनिधींसह जनेतेनेही आपली मते नोंदविण्याचे आवाहन भक्कम व सुलभ वाहतूक व्यवस्था नागपूरकरांसाठी होणार उपलब्ध सुमारे २५ हजार ५६७...