सोमवार, जुलै 28, 2025
Home Blog Page 403

आदिवासी बांधवांच्या उत्कर्षासाठी सर्वोतोपरी प्रयत्न – आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके

अमरावती, दि. ०३ : देशातील विविधता, सामाजिक समृद्धी आणि एकात्मता टिकून राहण्यासाठी संस्कृतीचे जतन होणे आवश्यक आहे. आदिवासी समाजातील सांस्कृतिक वारसा, भाषा, कला आणि परंपरेचे संवर्धन करण्यासाठी भर देणार असल्याचे सांगत आदिवासी बांधवांच्या उत्कर्षासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी आज येथे केले.

सामाजिक न्याय भवन येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, आदिवासी विकास विभाग, आदिवासी विकास महामंडळ, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचा आढावा डॉ. उईके यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार सर्वश्री किरण सरनाईक, केवलराम काळे, प्रविण तायडे, उमेश यावलकर, राजेश वानखडे, गजानन लेवटे, माजी आमदार प्रविण पोटे-पाटील, एमआयडीसीचे किरण पातुरकर, आदिवासी विकास अपर आयुक्त जितेंद्र चौधरी, धारणी प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मंत्री श्री. उईके म्हणाले, आदिवासी समाजाच्या हक्कांचे संरक्षण आणि उत्कर्षासाठी शासन विविध योजना राबवित आहे. आदिवासींचे प्रश्न समजून घेण्यासाठी लवकर मेळघाटचा दौरा करण्यात येईल. त्यानुसार तेथील प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्यात येतील. नवसारी वसतिगृहाजवळील         कचरा काढून ती जागा त्वरित स्वच्छ करण्यात यावी. डीबीटी वेळेवर देण्यात येईल. सर्व पात्र विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळेल. स्थानिकांची गरज लक्षात घेऊन आदिवासी बांधवांच्या हाताला काम देण्यात येईल. वन हक्क जमीन पट्ट्यांपासून आदिवासी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल. शासकीय वसतिगृह, आश्रम शाळांमध्ये सर्व आवश्यक  सोयी -सुविधा निर्माण करण्यात येईल. प्रत्येक आदिवासी महिलेला सन्मानपूर्वक वागणूक दिल्या जाईल. आदिवासींच्या समस्या सोडविण्यावर भर देणार, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला .

यावेळी सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी, आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिंनी, नागरिक यांच्याशी डॉ. उईके यांनी संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर त्वरित उपाययोजना आखण्यासाठी संबंधितांना सूचित केले.

डॉ. उईके यांनी सकाळी श्री. शिवाजी शिक्षण संस्थेतील डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. गजाननराव पुंडकर, ॲड. जे.व्ही.पाटील पुसदेकर आदी उपस्थित होते.

०००

ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांची ब्रिटिशकालीन बंकर, ऐतिहासिक वास्तूंना भेट

मुंबई, दि. ३ : मुंबई भेटीवर आलेल्या ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स एडवर्ड यांनी रविवारी (दि. २) राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. आपल्या औपचारिक भेटीनंतर एडवर्ड यांनी राजभवनातील ब्रिटिशकालीन ऐतिहासिक वारसा वास्तूंना भेट दिली.

राणी एलिझाबेथ द्वितीय व ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप यांचे सर्वात धाकटे सुपुत्र तसेच राजे चार्ल्स तृतीय यांचे धाकटे बंधू असलेल्या प्रिन्स एडवर्ड यांनी सुरुवातीला राजभवनातील पूर्वी जमिनीखाली तोपखाना असलेल्या हिरवळीची पाहणी केली.

याच हिरवळीवर एडवर्ड यांचे ज्येष्ठ बंधू प्रिन्स ऑफ वेल्स चार्ल्स यांच्या सन्मानार्थ सन १९८० मध्ये चहापान झाले होते.

त्यानंतर एडवर्ड यांनी ‘जल लक्षण’ या राष्ट्रपती व पंतप्रधान यांचेसाठी राखीव असलेल्या अतिथिगृहाला भेट दिली. या अतिथीगृहात सन १९६१ मध्ये राणी एलिझाबेथ व त्यांचे पती ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप यांचा राष्ट्रीय अतिथी या नात्याने मुक्काम होता.

राज्यपालांचे सचिव प्रविण दराडे व जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी त्यानंतर एडवर्ड यांना ‘जल किरण’ अतिथीगृह, ‘जल विहार’ हे ऐतिहासिक सभागृह तसेच ब्रिटिश कालीन बंकर दाखवले.

यावेळी ब्रिटनचे उप-उच्चायुक्त हरजिंदर कांग, ड्यूक यांचे खासगी सचिव अ‍ॅलेक्स पॉट्स आणि राजकीय व द्विपक्षीय व्यवहार विभागप्रमुख जॉन निकेल हे देखील उपस्थित होते.

राजभवनातील अधिकाऱ्यांचे आभार मानून प्रिन्स एडवर्ड पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.

स्वातंत्र्यपूर्व काळात राजभवन येथे असलेले ‘गव्हर्मेंट हाऊस’ स्वातंत्र्यानंतर मुंबई राज्याचे व राज्य निर्मितीनंतर महाराष्ट्राचे राजभवन झाले.

0000

मुंबई शहर ग्रंथोत्सव ५ व ६ फेब्रुवारीला; वाचनसंस्कृतीचा उत्सव दादरमध्ये रंगणार

मुंबई, दि. ३ : मुंबई शहराचा जिल्हा ग्रंथोत्सव दि. ५ आणि ६ फेब्रुवारी २०२५ रोजी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर (पू.) येथे संपन्न होणार आहे. या ग्रंथोत्सवात विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता ग्रंथोत्सवाची सुरुवात भव्य ग्रंथदिंडीने होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ ते १ या वेळेत प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनानंतर “लेखक तुमच्या भेटीला” आणि “एका संगीतकाराची मुशाफिरी” या विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर दि. ६ फेब्रुवारी रोजी मराठीतील दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन, व्याख्याने आणि परिसंवाद होणार आहेत. तसेच “शब्दव्रती” या कार्यक्रमात निवडक मराठी कवयित्रींच्या कविता सादर केल्या जातील. याशिवाय, ग्रंथालयातील महत्त्वपूर्ण घटकांचा प्रातिनिधिक गौरव करून ग्रंथोत्सवाचा समारोप करण्यात येणार आहे.

मराठीतील दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन आणि परिसंवाद होणार आहेत. दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा मुंबईकर नागरिक, ग्रंथप्रेमी व साहित्य रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी, मुंबई शहर शशिकांत काकड यांनी केले आहे.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

महिलांसाठी तालुकास्तरावर ‘अस्मिता भवन’ उभारावे – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई दि. ३ : महिलांना औद्योगिक क्षेत्रात सक्षम करण्यासाठी  तालुकास्तरावर अस्मिता भवन उभारण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी. बाजारपेठ असलेल्या तालुकास्तरावर हे भवन उभारण्यात येणार असून, यामध्ये ‘माविम’च्या जास्तीत जास्त महिला बचतगटांना व्यवसाय करण्याची संधी प्राप्त होणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी सांगितले.

मंत्रालय येथील दालनात रोहा येथे गारमेंट प्रकल्प कार्यान्वित करणे, तालुकास्तरावर अस्मिता भवन उभारणे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे कामकाज, राज्य बालहक्क संरक्षण आयोग तसेच १०० दिवस कृती आराखड्याबाबत बैठक झाली. यावेळी विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, आयुक्त कैलास पगारे, राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा, ‘माविम’च्या कार्यकारी संचालक वर्षा लड्डा, विभागाचे सहसचिव वि. रा. ठाकूर, अवर सचिव सुनिल सरदार, उपसचिव आनंद भोंडवे आदिंसह अधिकारी उपस्थित होते.

महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे म्हणाल्या की, श्रीवर्धन येथे सोलार फिश ड्राईंग प्रोजेक्ट अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ मार्फत नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत बाजारभिमुख उद्योग विकास घटकांतर्गत शेती, शेतीसंलग्न व बिगर शेती आधारित उद्योगांना व नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

याचबरोबर रोहा येथील गारमेंट प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठीचे युनिट शहरासह ग्रामीण भागातही सुरू करण्यात यावे. प्रकल्पासाठी पात्र महिलांना योग्य प्रशिक्षण आणि मानधन मिळण्यासाठी पारदर्शक कार्यप्रणाली राबवावी. या प्रकल्पाच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही तटकरे यांनी दिले.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ५० व्या वर्धापन दिनानिमत्त ‘माविम’ अंतर्गत असलेल्या जास्तीत जास्त बचतगटांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, तसेच ‘माविम’चे कार्य ग्रामीण भागातही पोहोचावे यासाठी राज्यस्तरीय महोत्सवाचे आयोजन करण्याचे निर्देश मंत्री कू. तटकरे यांनी दिले.

बालकांच्या हक्क आणि संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या राज्य बाल हक्क संरक्षण आयोगामधील रिक्त पदे कायम स्वरुपासह बाह्यस्त्रोत व कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आल्याची माहिती सचिव अनुपकुमार यादव यांनी दिली.

राज्यस्तरीय बाल महोत्सवात साहित्य‍िक बालकांना व्यासपीठ उपलब्ध करावे

बालगृह व निरीक्षण गृहातील प्रवेशितांसाठी दरवर्षी राज्यस्तरीय बालमहोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवाअंतर्गत जी बालके कथा, कविता लिहितात, ज्यांचे साहित्य प्रसिद्ध आहे अशा साहित्य क्षेत्राशी निगडीत असलेल्या बालकांसाठी विशेष व्यासपीठ या बालमहोत्सवात उपलब्ध करून देण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे यांनी दिले.

महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे यांनी विभागातील विविध योजना आणि कामांचा तसेच १०० दिवस कृती आराखड्यासंदर्भात आढावा घेतला.

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत गरोदर महिला, स्तनदा माता, बालके यांना घरपोच आहार, लाभार्थी बालकांचे ग्रोथ मॉनिटरींग, लाभार्थ्यांना गृहभेटीद्वारे मार्गदर्शन, पोषण विषयक जनजागृतीकरिता समुदाय आधारित कार्यक्रम, ग्राम बाल विकास केंद्र, नागरी बाल विकास केंद्र, अंगणवाडी केंद्रांना शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय, जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, भिक्षेकरींच्या कामाचा मोबदला, पिंक रिक्षा, लाडकी बहीण योजना, फिरते पथक यासंदर्भातही यावेळी आढावा घेण्यात आला.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

कृषी व सहकार विभागाने समन्वयाने प्रकल्पाची व्यवहार्यता तपासून घ्यावी

मुंबई, दि. 03 :- शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी येत्या काळात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (‘एआय’चा) वापर अनिवार्य आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडविण्यासाठी कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन आहे. त्यासाठी कृषी विभागाने सहकार विभागासोबत समन्वय करून या प्रकल्पाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता तपासून पाहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

राज्यातील कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल (दूरदृष्यप्रणालीद्वारे), सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, अखिल भारतीय द्राक्ष बागायत संघाचे अध्यक्ष कैलास पाटील, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे (व्यय) प्रधान सचिव सौरभ विजय, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, साखर आयुक्त कुणाल खेमनार, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंग, सहकार विभागाचे सहसचिव संतोष पाटील, बारामती कृषी विज्ञान केंद्राचे प्रा. निलेश नलावडे, प्रा. योगेश फाटके, प्रा. तुषार जाधव, प्रा. शरद ताटे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जगभरातील प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे क्रांतिकारी बदल घडत आहेत. कृषी क्षेत्र सुद्धा याला अपवाद नाही. येत्या काळात बदलते हवामान, अवेळी पडणारा पाऊस, पीकांवर वारंवार होणारा रोगांचा प्रादुर्भाव, मजुरांचा तुटवडा यांवर मात करत शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्याबरोबरच त्यांच्या उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेला पर्याय नाही. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यामुळे पीक आरोग्याचे विश्लेषण, मातीतील कार्बन प्रमाण शोधणे, मातीच्या आरोग्याची सविस्तर माहिती, तणाचा प्रकार ओळखणे, पूर्वीच्या उत्पन्नाची तुलना, मातीचे तापमान, वातावरणातील आर्द्रता, पिकांवरील कीड व रोगांचा प्रादुर्भाव ओळखणे, तसेच पिकांवरील जैविक-अजैविक ताण ओळखणे शक्य होणार आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर केल्यास पीकांच्या उत्पादनात वाढ, मजुरी खर्चात बचत, रसायनिक खते व औषधांच्या वापरात कपात, कापणी कार्यक्षमतेत वाढ, रोगनियंत्रणाद्वारे बचत, पुरवठा साखळीतील कार्यक्षमतेत वाढ आणि एकूण खर्चात कपात होणे शक्य होईल. राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक आणि आमूलाग्र बदल घडविण्यासाठी कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन आहे. त्यासाठी कृषी विभागाने सहकार विभागासोबत समन्वय करून या प्रकल्पाची तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता तपासून पाहावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

0000

जलसंधारणाच्या प्रकल्पांच्या कायमस्वरूपी दुरुस्ती व देखभालकरिता नवीन धोरण आणणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 3 : राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जलसंधारणाची चळवळ उभी करण्यात आली आहे. राज्य शासन जुने प्रकल्पांच्या कायमस्वरूपी दुरुस्ती व देखभाल करीता नवीन धोरण आणणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मृद व जलसंधारण विभाग आणि संबंधित विविध संस्था आणि संघटना यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला यावेळी ते बोलत होते. यावेळी मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक, सचिव गणेश पाटील, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव अश्विनी भिडे, नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा, टाटा मोटर्स चे प्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी जुने आणि अर्धवट राहिलेले जलसंधारणाचे प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याची योजना मांडली आहे. यामुळे कमी खर्चात अधिक काम पूर्ण होईल आणि जलसंधारणाचा प्रभावी वापर होईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जलसंधारण प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, तीन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले आहेत. यामध्ये नाम फाउंडेशन, टाटा मोटर्स आणि भारतीय जैन संघटनेचा सहभाग आहे.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले,नाम फाउंडेशनने शेतकऱ्यांना जलसंधारणाच्या कामामध्ये सहभाग वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहे. जलसंधारणाविषयी शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, जनजागृती करणे आणि ग्रामीण भागाच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे  महत्वपूर्ण काम नाम फाउंडेशनच्या माध्यमातून होत आहे.

भारतीय जैन संघटनेने जलसंधारणाच्या चळवळीला प्रोत्साहन दिले असून, तलावांचे खोलीकरण, गाळ काढणे आणि अन्य महत्त्वाची जलसंधारण कामे लोकसभागातून केली जात आहेत. जलसंधारण विषयी प्रशिक्षण देऊन जलतज्ञ निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम या संघटनेच्या माध्यमातून होत असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

टाटा मोटर्सनेही जलसंधारणामध्ये मोठे योगदान दिले आहे, जे राज्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले  असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

सामंजस्य करारांचे तपशील

सामंजस्य करार-1

टाटा मोटर्स, नाम फाउंडेशन व मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र शासन

राज्यातील जलाशयांमध्ये साठलेला गाळ काढून व त्यांचे खोलीकरण करून त्यांची साठवण क्षमता वाढविणे, त्या योगे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविणे, परिसरातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे या उद्देशाने शासन गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना राबववित आहे.

या योजनेंतर्गत राज्यातील २३ जिल्ह्यांमधील किमान १००० जलाशय जसे चेक डॅम, सार्वजनिक तलाव, नद्या यांच्यातील गाळ काढून त्यांची साठवण क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने सदर सामंजस्य करार करण्यात येत आहे.

नाम फाउंडेशन सदर सामंजस्य करारांतर्गत प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारी संस्था असेल. टाटा मोटर्स या प्रकल्पाचे संपूर्ण व्यवस्थापन करणार असून निवडलेल्या प्रत्येक जिल्ह्यात एका वॉटर फेलोची नियुक्ती त्यांच्या मार्फत केली जाणार आहे, जेणे करुन सर्व संबंधित यंत्रणांमध्ये योग्य प्रकारे समन्वय साधला जाईल व प्रकल्प वेळेत पूर्ण होईल.

सामंजस्य करार-2

भारतीय जैन संघटना व मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र शासन

गावांकडून / ग्रामपंचयतींकडून गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत मागणी जमा करणे, ती शासनापर्यंत पोहोचविणे, योजनेची प्रचार प्रसिद्धी व एकूणच पाण्याच्या विषयावर राज्यात जनजागृती करणे यासाठी सदर सामंजस्य करार करण्यात येत आहे. यासाठी भारतीय जैन संघटना राज्य व जिल्हा स्तरावर समन्वयकांची नियुक्ती करणार आहे.

सामंजस्य करार-3

महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र, नागपूर (MRSAC) व मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र शासन

राज्यात मागील २०-२५ वर्षात विविध विभागांमार्फत विविध योजनांतर्गत मृद व जलसंधारणाची कामे झालेली असून मोठ्याप्रमाणावर संरचना (स्ट्रक्चर) निर्माण करण्यात आल्या आहेत. या सर्व संरचनांचे मॅपिंग व पडताळणी करण्याच्या उद्देशाने हा सामंजस्य करार करण्यात येत आहे.

सॅटेलाईट डेटा व विविध योजनांखालील उपलब्ध डेटाच्या आधारे संरचनांची भौगोलिक स्थाने नकाशावर चिन्हांकित केली जातील. यासाठी वेब पोर्टल व मोबाईल ऍप तयार केले जाईल. शिवार फेरीच्या आधारे या सर्व संरचनांची सद्यस्थिती समजून घेऊन त्याची नोंद ऍप द्वारे घेतली जाईल. त्यानुसार भविष्यात जलयुक्त-०.३ साठी देखभाल, दुरुस्ती आदी कामांचा नियोजन आराखडा बनविला जाईल. पुढील ५ वर्षांच्या कालावधीसाठी सदर सामंजस्य करार करण्यात येत असून भविष्यात होणारी नवीन कामे तसेच देखभाल, दुरुस्तीची कामे याची नोंदही ठेवली जाईल.

००००

राजू धोत्रे/विसंअ/

प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या कामांना गती द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ग्रामीण आवासच्या १९.६६ लाख उद्दिष्टांपैकी १६.८१ लाख घरकुलांना मंजुरी

शहरी आवास योजनांनाही गती देण्याचे निर्देश

जलजीवन मिशनची कामे वेगाने पूर्ण करा

आयुष्मान कार्ड वितरणातील त्रुटी दूर करून कार्डचे वाटप पूर्ण  करा

मुंबई, दि. 3 : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोनमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी 19 लाख 66 हजार घरकुलांचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत 16 लाख 81 हजार 531 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. सामाजिक उत्तरदायित्व निधीची मदत घेऊन कामांना गती देण्याचे व घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक क्षेत्रातील फ्लॅगशिप योजनांचा वॉररुमध्ये आढावा घेऊन या योजनांना गती देण्याचे निर्देश दिले. यामध्ये आरोग्य, गृहनिर्माण व पाणी पुरवठा विभागाच्या योजनांच्या सद्यस्थितीचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी  घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री पंकज भोयर, योगेश कदम, मेघना बोर्डीकर, मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांच्यासह संबंधित विभागाचे सचिव उपस्थित होते.

शहरी व ग्रामीण भागातील प्रधानमंत्री आवास योजनांच्या सद्यस्थिती व अंमलबजावणीची माहिती घेऊन श्री. फडणवीस म्हणाले की, भूमीहीन लाभार्थ्यांना घरकुलांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे, ही आनंदाची बाब आहे. मात्र, उर्वरित लाभार्थ्यांना तातडीने जमीन उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समन्वयाने मार्ग काढावेत. ज्या जिल्ह्यांत घरकुलांचे उद्दिष्टपूर्ती कमी आहे, तेथील जिल्हाधिकाऱयांनी ती पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे. तसेच घरकुल योजनेतील अडचणी दूर करून कामांना वेग द्यावे. गायरान जमिनींवरही आवास योजना राबविण्यासाठी कार्यवाही करावी. आवास योजनांसाठीच्या जमिनींच्या समस्या सोडविण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्राधान्य द्यावे.

आवास योजनांच्या घरकुलांसाठी वाळू, वीटा व सिमेंट आदी एकाच ठिकाणी मिळावे, यासाठी घरकुल मार्ट संकल्पना राबविण्यात यावी. यासाठी बचत गटांचे सहाय्य घ्यावे. तसेच आवास योजनांसाठी वाळू देण्यासंदर्भातील परिपत्रक पुन्हा निर्गमित करण्यात यावे. तसेच महसूल विभागाने गावठाणासंदर्भात योग्य ती कार्यवाही करावी. शहरी भागातील आवास योजनांना गती देण्यासाठी नगर विकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश द्यावे. तसेच आवास योजनांच्या प्रगतीची माहिती नियमित अद्ययावत करावी. प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोनची मंजुरी, कामे आदी कार्यवाही स्थानिक स्वराज्य संस्थांनी वेगाने करावी, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

आयुष्मान कार्डच्या वितरणाला गती द्यावी

आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनांचा लाभ राज्यातील रुग्णांना मिळावा, यासाठी नोंदणीच्या कामाला गती द्यावी. तसेच यामधील मानवी हस्तक्षेप विरहित डिजिटल यंत्रणा सज्ज करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.

या दोन्ही योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळण्यासाठी जास्तीत जास्त खाजगी रुग्णालयाचा तसेच मुंबई शहर व उपनगरातील महापालिकेच्या रुग्णालयांचाही समावेश करावा. आयुष्मान कार्डच्या प्रत्यक्ष १०० टक्के वितरणाकरिता तांत्रिक अडचणी दूर करून आयुष्मान कार्डच्या वितरणाला गती द्यावी. तसेच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेसाठीही आयुष्मान कार्ड सारखे कार्ड तयार करण्यात यावे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनामध्ये रुग्णालयांच्या समावेशासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जल जीवन मिशनची कामे वेगाने करा

जल जीवन मिशन योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी मुबलक उपलब्ध व्हावे यासाठी जलजीवन मिशन योजनेतील कामे गतीने, कालमर्यादेत व गुणवत्ता पूर्ण करावीत. या योजनांचे सोलरायजेशन झाल्यास वीजेबरोबरच वीज बिलात बचत होईल, असेही श्री. फडणवीस म्हणाले.

नळाच्या पाण्याची आणि स्त्रोतांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी वर्षातून दोनदा जीवाणूजन्य आणि एकदा रासायनिक चाचणी करावी. पाणी गुणवत्ता चाचणी प्रयोगशाळांमधील पदभरती तत्काळ करावी, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

०००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय बैठकीत नागपूर विभागासाठी १ हजार ७६३ कोटींचा जिल्हा वार्षिक सर्वसाधारण आराखडा सादर

नागपूर, दि. 03 सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 चा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांची बैठक उमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. जिल्हा वार्षिक योजनेचा (सर्वसाधारण) सन 2025-26 साठी शासनाने कळविलेल्या आर्थिक मर्यादेत नागपूर विभागाचा 1 हजार 763 कोटी 70 लक्ष रूपयांचा आराखडा सादर करण्यात आला.

याबैठकीस उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी जिल्हानिहाय सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचा संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांचा दूरदृष्यप्रणालीद्वारे आढावा घेतला तसेच जिल्ह्यातील विविध विकास योजनावरही याबैठकीत चर्चा करण्यात आली.

यावेळी पालकमंत्र्यांसह वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार, आमदार जिल्ह्यांचे पालकसचिव, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अतिरीक्त मुख्य सचिव मिलींद म्हैसकर, प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, उपायुक्त नियोजन अनिल गोतमारे, जिल्हा नियोजन अधिकारी उपस्थित होते.

नागपूर विभागातील जिल्ह्यांनी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 च्या प्रारूप आरखड्यास जिल्हा नियोजन समितीची शासनाने कळविलेल्या आर्थिक मर्यादेत मान्यता घेतली आहे. यानुसार नागपूर जिल्ह्यासाठी 509.6 कोटी, वर्धा 207.22 कोटी, भंडारा 173.27 कोटी, गोंदिया 198.51 कोटी, चंद्रपूर 340.88 कोटी तर गडचिरोली जिल्ह्यासाठी 334.76 कोटी रूपयांच्या आर्थिक मर्यादेत जिल्हा वार्षिक आराखडा सादर करण्यात आला आहे.

नागपूर विभागाच्या जिल्हा वार्षिक योजना प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठीचा बैठकीस नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर, भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे, गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईक, गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड आशिष जयस्वाल, प्रभारी विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर (नागपूर), वान्मती शी (वर्धा), संजय कोलते (भंडारा), प्रदिप नायर (गोंदिया), अविशांत पंडा (गडचिरोली) आणि विनय गौडा (चंद्रपूर) आदी दुरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

 

भंडारा जिल्ह्याला भरीव तरतूद देण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार

ऑनलाइन बैठकीद्वारे पालकमंत्र्यांची उपस्थिती

भंडारा, दि. 3 : जिल्हा नियोजन समितीद्वारे जिल्ह्यातील विकास कामांना निधी देण्यात येतो. गतवर्षीपेक्षा भंडारा जिल्ह्याला 2025 -26 या वर्षासाठी भरीव निधी देण्याचा शासनाचा प्रयत्न राहील, असे आश्वस्त उद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे काढले.

ऑनलाईन बैठकीद्वारे भंडारा जिल्ह्याचा जिल्हा नियोजन समितीचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी पालकमंत्री संजय सावकारे, वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल हे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. तर जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी डॉ.संजय कोलते, मुख्य कार्यकारी अधिकारी, समीर कुर्तकोटी व सर्व विभाग प्रमुख सभागृह परिषद कक्षात उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री. पवार म्हणाले की, शासकीय इमारतींचे विद्युतीकरण हे सौरऊर्जेद्वारे करण्यात यावे. या कामाला प्राधान्य देण्यात यावे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा सर्व शासकीय कार्यालय विभाग प्रमुख असतील यांनी सौर ऊर्जेवर विद्युतीकरण प्रक्रियेसाठी पुढाकार घ्यावा.

भंडारा जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी व तीर्थक्षेत्र विकासासाठी देखील यंत्रणांनी या दृष्टीने विचार करून विकास आराखडा सादर करावा. जल पर्यटनाला  प्रोत्साहन देण्यासाठी वेगळा निधी देण्याचे त्यांनी आश्वस्त केले.

यावेळी ऑनलाईन पद्धतीने नागपूर विभागीय अपर आयुक्त कार्यालयातून डॉ.माधवी खोडे-चवरे उपस्थित होत्या.

0000

निबंध स्पर्धेमुळे भगवान महावीर यांचे जीवनकार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचेल – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. 3 : आज जैन धर्म पश्चिम आणि उत्तर भारतात दिसत असला तरी एकेकाळी तामिळनाडू राज्यात जैन धर्मियांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. तामिळ भाषेत जैन साहित्य देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. तीर्थकर भगवान महावीर यांचे जीवनकार्य सर्वकाळ प्रेरणादायी असून भगवान महावीर यांच्या जीवनावर राज्यातील शाळाशाळांमधून निबंध स्पर्धा आयोजित केल्यामुळे भगवान महावीर यांचे जीवनकार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचेल, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

भगवान महावीर स्वामी २५५० निर्वाण कल्याणाक महोत्सव समितीतर्फे राज्यातील शाळांमध्ये आयोजित निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ राज्यपालांच्या हस्ते रविवारी (दि. २) राजभवन, मुंबई येथे संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

भगवान महावीरांचे जीवन त्यागमय होते असे सांगताना केवळ स्वतःसाठी जगणे पाप असून इतरांसाठी जगल्यास ईश्वर आपली काळजी वाहिल, असे राज्यपालांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले.

या स्पर्धेत राज्यातील शाळांमधील १.२ कोटी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला ही अतिशय उत्साहवर्धक बाब असल्याचे सांगून मुलांनी लिखाण तसेच वाचनाची सवय ठेवावी, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. मुलांनी मोबाईल फोनवर आपला वेळ वाया न घालवता वेळेचे नियोजन करून मोबाईलचा वापर करावा, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शुभेच्छा संदेश वाचून दाखविण्यात आला.

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुलांच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम राजभवन येथे होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. अहिंसा परमो धर्म हा भगवान महावीरांचा संदेश घरोघरी पोहोचवण्यासाठी स्पर्धा उपयुक्त असल्याचे आमदार चैनसुख संचेती यांनी सांगितले. स्पर्धेमुळे १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी भगवान महावीरांच्या जीवनाचे अध्ययन केले असे जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले. यावेळी भगवान महावीरनिर्वाण कल्याणक महोत्सव समितीचे निमंत्रक हितेंद्र मोटा उपस्थित होते.

राज्यपालांच्या हस्ते स्पर्धेतील  विविध जिल्ह्यांमधून आलेल्या विजेत्यांना बक्षीस रकमेचे धनादेश प्रदान करण्यात आले. ही स्पर्धा जिल्हास्तरावर आयोजित करण्यात सहकार्य केल्याबद्दल नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा व मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल यांचा देखील सत्कार करण्यात आला.

000

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सेमी इंग्लिश करण्यावर भर – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार...

0
सातारा दि.28- जिल्हा परिषदेचे शाळांमधील विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांना  सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबर या सर्व शाळा सेमी इंग्लिश करण्यावर भर...

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आदर्श स्मारकाच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्या...

0
अहिल्यानगर दि.२७ - आजच्या प्रगत महाराष्ट्रात विकसित देशाचा पाया क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी रचला. समाजसुधारणा, महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेल्या...

अहिल्यानगर शहरात संविधान भवन उभारण्यास १५ कोटींचा निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
अहिल्यानगर, दि.२७ जुलै - अहिल्यानगर शहरात लवकरच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावेला साजेसे असे संविधान भवन उभारले जाईल. यासाठी जिल्हा नियोजन निधीतून ५ कोटी रूपये...

पुढील चार वर्षात देशातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
सिकलसेल, थॅलेसिमिया, ॲनिमियावरील उपचारासाठी नवीन योजना तयार करणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती नागपूर, दि. 27 - प्राथमिक आरोग्य सुविधांच्या दृष्टीने प्रत्येक...

नागपूर महानगराच्या वाढत्या विस्ताराला आकार देण्यासाठी तीन टप्प्यात गतिशीलता आराखडा साकार करू – मुख्यमंत्री...

0
दळणवळण यंत्रणेला भक्कम करणाऱ्या आरखड्याबाबत लोकप्रतिनिधींसह जनेतेनेही आपली मते नोंदविण्याचे आवाहन भक्कम व सुलभ वाहतूक व्यवस्था नागपूरकरांसाठी होणार उपलब्ध सुमारे २५ हजार ५६७...