रविवार, मे 11, 2025
Home Blog Page 469

उद्योग आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी विमानतळ महत्त्वाचे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रत्नागिरी विमानतळ टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन

रत्नागिरी, दि. 21 (जिमाका) :- उद्योग, व्यवसाय आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी विमानतळ अत्यंत महत्त्वाचे आहे. हेलिकॉप्टर सेवा, टुरिस्ट सर्कीट तयार केल्यास मोठा फायदा होणार आहे. नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे हात तयार करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

रत्नागिरी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे कुदळ मारुन आणि कोनशिलेचे अनावरण करुन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आज भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम, रविंद्र फाटक, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे,  जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, सिंधुरत्न समृद्ध योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत, मिरजोळे सरपंच रत्नदिप पाटील, शिरगाव सरपंच फरिदा काझी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीच्या बांधकामाचा प्रारंभ झाला, नवं दालन तयार झाल्याशिवाय राहणार नाही. जगाला टक्कर देणारे इथले पर्यटन आहे. त्यासाठी कनेक्टीव्हीटी खूप महत्त्वाची आहे. नाईट लँडीगची सुविधा केल्यास परदेशी पर्यटक वाढण्यास मदत होणार आहे. पूर्ण क्षमतेने विमानतळ चालले पाहिजे, असे करा. 10 हजार कोटींचे डिफेन्स सेक्टरमधील उद्योग इच्छुक आहेत. उद्योगासाठी पायाभूत सुविधा आणि वातावरण चांगले आहे.

दावोसमध्ये 5 लाख कोटीचे सामंजस्य करार केले होते. त्यातील 70 टक्के अमंलबजावणी स्तरावर आहेत. उद्योग क्षेत्रात भरभराट होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनातूनही विकासाची मोठी संधी आहे. मासेमारीतून खूप मोठ्या प्रमाणात परकीय चलन उपलब्ध होत आहे. या सर्व विकासाचा पुढचा टप्पा गाठण्यासाठी विमानतळ ही सर्वात मोठी सुविधा आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

जास्तीत जास्त उद्योग महाराष्ट्रात यावेत, यासाठी उद्योजकांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा सरकार देत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही अनेक नवे उद्योग येत आहेत. निसर्ग सौंदर्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचा पर्यटनाच्या माध्यमातून विकास होणार आहे. मासेमारी हा रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाचा उद्योग आहे. या सर्व क्षेत्रांच्या विकासासाठी कनेक्टिव्हिटी हा सर्वात महत्त्वाचा दुवा आहे. या इमारतीचे काम लवकरच पूर्ण होईल आणि विमान वाहतूक सुरू होईल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.

पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले,  दोन महिन्यापूर्वी विमानतळाबाबत बैठक आयोजित केली होती. मुख्यमंत्री महोदयांनी टर्मिनल इमारतीसाठी 100 कोटी देण्याचा निर्णय घेतला. गतिमान पद्धतीने सर्व परवानग्या मिळाल्या. दीड वर्षात हे टर्मिनल पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करताना टर्मिनलवर बांबूपासून बनविलेले फर्निचर सर्वत्र पहायला मिळेल, असेही ते म्हणाले.

श्रीमती पांडे यांनी प्रास्ताविक करुन सविस्तर माहिती दिली. यावेळी चित्रफितीमधून विमानतळाची माहिती दर्शविण्यात आली. मिरजोळे, शिरगाव ग्रामस्थ आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000

लोकनेते शामराव पेजे अभियांत्रिकी महाविद्यालय प्रेरणा आणि ऊर्जा देणारे स्मारक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रत्नागिरी येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उद्घाटन

रत्नागिरी, दि. 21 (जिमाका) : लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय हे युवकांना प्रेरणा देणारे चालते बोलते स्मारक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

आज रत्नागिरी येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उद्घाटन आणि लोकनेते शामराव पेजे अभियांत्रिकी महाविद्यालय नामकरण सोहळ्यात ते बोलत होते.

या कार्यक्रमात पालकमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम, रविंद्र फाटक, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, विद्यार्थ्यांना ज्ञानासोबत स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभे राहण्यासाठी शासन बळ देत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भारत हा देश २०४७ साली महासत्ता बनवायचा आहे. त्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य संपादित करण्याची आवश्यकता आहे. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी तरुणांनी पराकाष्ठा करावी. महाराष्ट्रात उद्योगासाठी चांगले वातावरण आहे. त्यासाठी लागणारी स्कील मॅनपॉवर देखील राज्यात उभी राहत आहे.  ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.  त्याचप्रमाणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेलाही प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. पदवीधर असेल तर दहा हजार रुपये महिन्याला दिले जातात. हे सरकार सर्व घटकांसाठी विविध योजना राबवित आहे.  जर्मन सरकारशी राज्याने करार करुन चार लाख रोजगाराची संधी विविध वीस प्रकारच्या विभागात उपलब्ध करुन दिली आहे. यामुळे अनेक तरुणांना काम मिळेल. ड्रोन तंत्रज्ञान काम करण्यासाठीही योजना निर्माण केली आहे.  परिसस्पर्श योजनेतंर्गत २ हजार महाविद्यालयात ही योजना राबविली जाणार आहे.  हे सरकार नोकऱ्या उपलब्ध करुन देणारे सरकार आहे.

डाव्होस येथे झालेल्या परिषदेत पहिल्या वर्षी १ लाख ३७ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणकीचे करार झाले तर दुसऱ्या वर्षी ३ लाख ५० कोटी रुपयांचे करार झाले.  त्यातून ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आपल्या राज्यात झाली आहे.  उद्योगासाठी पोषक वातावरण आणि आवश्यक त्या सोयी सवलती एक खिडकी योजनेत उपलब्ध करुन दिल्या जात असल्याने राज्यात उद्योग मोठ्या प्रमाणावर येत आहेत.  त्यासाठी लागणारे रोजगार कौशल्य देखील येथील तरुण घेत आहेत. संरक्षण साहित्य निर्मिती करणारा १० हजार कोटी रुपये गुंतवणूकीचा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात उभा राहतो आहे. काही महिन्यांपूर्वी कोकाकोला कंपनीचे भूमिपूजन केले. औद्योगिकीकरणाला अधिक गती देण्यासाठी चांगले वातावरण निर्माण केले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, दोन वर्षापूर्वी मी पाहिलेलं रत्नागिरी हे शैक्षणिक हब व्हावे हे स्वप्न आज केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे साकार होत आहे याचा मला विशेष आनंद आहे.  दोन वर्षापूर्वी या इमारतीचे भूमिपूजन केले आणि इमारत पूर्ण झाली. गतिमान सरकार म्हणून जिल्ह्यात विविध कामे उभी राहत आहेत. ५०० कोटी रुपये वैद्यकीय महाविद्यालयासाठी आणि २५० कोटी अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ मंजूर केल्याने शैक्षणिक हब हे स्वप्न पूर्ण झाले आहे.  ही इमारत बांधताना निर्माण ग्रुपने मोठी मेहनत घेतली आणि आयआयटीच्या धर्तीवर देखणी इमारत उभी राहिली आहे.  पुढील वर्षापासून शासकीय विधी महाविद्यालय देखील सुरु होणार आहे.  मुख्यमंत्री छात्र प्रशिक्षण योजनेतंर्गत जिल्ह्यात ३१९ मुलांना रोजगार प्राप्त झाला याचा विशेष आनंद आहे. आमदार श्री. निकम यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमात विकास पेजे आणि सहकारी यांनी मुख्यमंत्री यांचा विशेष सत्कार केला.  कुणबी समाजाच्या वतीने मुख्यमंत्री यांचा विशेष प्रातिनिधीक सत्कार संजय झिमण यांच्या हस्ते करण्यात आला.            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते निर्माण ग्रुपच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रारंभी तंत्रशिक्षण सहसंचालक प्रमोद नाईक यांनी प्रास्ताविक केले तर प्रा. सुनिल पाटील यांनी आभार मानले.  या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी, युवक उपस्थित होते.

0000000

केंद्रीयमंत्री रक्षा खडसे यांनी घेतला जळगावमध्ये 25ऑगस्टला होणाऱ्या कार्यक्रमाचा आढावा

विभागीय आयुक्तांनी केल्या सूचना;  जिल्हाधिकाऱ्यांनी केले सादरीकरण

जळगाव, दिनांक 20 ऑगस्ट (जिमाका वृत्त) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दि. २५ऑगस्ट रोजी होणाऱ्या ऐतिहासिक ‘लखपतीदीदी’ या महिला मेळाव्याला येणाऱ्या महिलांच्या जेवणाची, पाण्याची, स्वच्छतागृहाची अत्यंत नियोजनबद्द सोय करावी अशा सूचना केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जळगाव महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा या कार्यक्रमाचे समन्व्यक आर. एस. लोखंडे, संबंधित यंत्रणांचे नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पार्किंग व्यवस्थेबाबत अलर्ट रहा

त्या त्या ठिकाणा वरून येणाऱ्या बसेसची सोय, त्यांच्यासाठी सोयीची होईल अशीच करावी. याची जबाबदारी महानगरपालिकेची असली तरी पोलिसांच्या समन्वयाने ही पार्किंग केली जावी. याबाबत संबंधित यंत्रणांनी अलर्ट राहावे अशा सूचना केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिल्या.

कार्यक्रम स्थळी बॅग, पाणी बॉटल आणू नयेत कार्यक्रमस्थळी येताना सोबत कोणतीही बॅग किंवा पाणी बॉटल घेवून येऊ नयेत. इथे प्रत्येक सेक्टर वाईज पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे यासंदर्भातील जबाबदारी असणाऱ्या विभागाने, व्यक्तीने हा संदेश द्यावा. प्रत्येक बसेसला क्रमांक द्यावेत, जेणे करून महिलांना त्यांच्या गाडे शोधणे सुलभ होईल अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली. सर्वांनी दिलेल्या जबाबदारी चोखपणे पार पाडावी, यानंतरही आपण याचा आढावा घेणार असल्याचे विभागीय आयुक्तांनी सांगितले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा, आणि कोणत्या विभागाची कोणती जबाबदारी राहिल याविषयी सादरीकरण केले.

 

कार्यक्रमस्थळाचीपाहणी

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याणमंत्री रक्षा खडसे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विमानतळाच्या समोर जिथे कार्यक्रम होणार आहे. तिथे सुरु असलेल्या कामाची पाहणी केली.

 

0 0 0 0 0 0

बदलापूर घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. 20 : बदलापूर येथे शालेय अल्पवयीन मुलींच्या बाबतीत झालेली घटना अत्यंत दुर्देवी घटना असून ही घटना ज्या शाळेत घडली आहे त्या शाळेची आणि शाळेशी संबंधितांची चौकशी शिक्षण विभागाचे उपसंचालक व बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष करीत आहेत. त्याचा प्राथमिक अहवाल आल्यानंतर या घटनेमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

श्री.केसरकर यांनी बदलापूर येथे जाऊन या घटनेबाबत सविस्तर माहिती घेऊन चौकशी केली. त्यानंतर मुंबईत परतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

श्री.केसरकर म्हणाले, विद्यार्थ्यांचे हित हेच माझे अंतिम ध्येय आहे. कोणत्याही विद्यार्थ्यावर झालेला अत्याचार सहन केला जाणार नाही. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविले जाणार आहे. या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यात येणार असून डॉक्टर, पोलीस यांच्याकडून दिरंगाई झाल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्यावरही संबंधित विभागांमार्फत कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

उद्या बुधवारी सायंकाळी 4 वाजता पालकांना भेटायला पुन्हा बदलापूर येथे जाणार असल्याचे सांगून त्यावेळी पालकांनी आपले म्हणणे कळवावे, त्या सर्वांचे म्हणणे ऐकून घेण्यात येईल, असेही श्री.केसरकर यांनी सांगितले. पीडितांच्या पालकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार असल्याचेही ते म्हणाले.

मंत्री श्री.केसरकर म्हणाले, राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘सखी सावित्री’ समिती स्थापन करण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले आहेत. 82 हजार शाळांमध्ये अशी समिती नेमण्यात आली असून ज्या शाळांमध्ये अशी समिती अद्याप नेमण्यात आली नाही त्यांची चौकशी करण्यात येऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल. लहान विद्यार्थिनींना अडचणीच्या प्रसंगी मोठ्या विद्यार्थिनींशी संवाद साधता यावा या दृष्टीने शाळांमध्ये देखील विशाखा समिती स्थापन करण्यात येईल. या व्यतिरिक्त विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. सर्व शाळांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटिव्ही लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या कार्यामध्ये ठराविक कालावधीनंतर बदल करणे, किमान चौथीपर्यंतच्या वर्गातील विद्यार्थिनींसाठी महिला कर्मचारी नियुक्त करणे, परिसरात पुरेसा प्रकाश राहील अशी व्यवस्था करणे, अलार्म बेल ची सुविधा उपलब्ध करणे, स्वच्छतागृहांची देखभाल महिला कर्मचाऱ्यांमार्फत करणे, विद्यार्थिनींमध्ये लैंगिक संवेदनशीलतेबाबत प्रशिक्षणाच्या माध्यमातून जागृती निर्माण करणे आदी उपाययोजना करण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांची गुणवत्ता, सुरक्षितता आदी बाबींच्या दृष्टीने सर्व शाळा शालेय शिक्षण आयुक्त कार्यालयाशी जोडल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

00000

बी.सी.झंवर/विसंअ

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, पशु प्रदर्शन, धान्य महोत्सव, चर्चासत्रे, प्रात्यक्षिके, रानभाज्या महोत्सव, शेतकऱ्यांचा सन्मान, यशोगाथा, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री यांसह राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनेक उपक्रम

राज्यभरातून शेतकऱ्यांनी कृषी महोत्सवात सहभागी होण्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडेंचे आवाहन

स्वागतासाठी परळी वैद्यनाथ नगरी सज्ज!

मुंबई दि. 20 : परळी येथील कृषी महोत्सवाच्या माध्यमातून राज्यातील सुमारे एक कोटी शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या नमो किसान महासन्मान योजनेचा चौथा हफ्ता मुख्यमंत्री, केंद्रीय कृषिमंत्री व मान्यवरांच्या हस्ते बुधवारी वितरित करण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

याच कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावयाच्या अनुदानाचे वितरण करण्यासाठी सुरू करण्यात येत असलेल्या पोर्टलचेही अनावरण करण्यात येणार आहेत.

21 ते 25 ऑगस्ट पर्यंत असे पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथे आयोजन करण्यात आले असुन, परळी व बीड जिल्ह्याच्या इतिहासात राज्यस्तरीय कृषी महोत्सव पहिल्यांदाच होते आहे. या महोत्सवाचे आज दुपारी 1 वाजता दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

परळी वैद्यनाथ नगरीमध्ये प्रथमच होत असलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री तानाजी सावंत, मंत्री अतुल सावे, खासदार सुनील तटकरे, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आ.पंकजा मुंडे यांच्यासह राज्यातील व बीड जिल्ह्यातील मान्यवर आमदार, खासदार व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

21 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या भव्य सभामंडपामध्ये या कृषी महोत्सवाचे उद्घाटन संपन्न होणार असून, कृषी प्रदर्शनाच्या भव्य सभामंडपास शेतकरी नेते स्व.पंडित अण्णा मुंडे यांचे नाव देण्यात आले आहे. उद्घाटन समारंभाच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भव्य रॅली द्वारे मान्यवरांचे स्वागत करण्यात येणार आहे.

या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून पाच दिवसीय भव्य असे कृषी प्रदर्शन, पशुप्रदर्शन, धान्य महोत्सव, चर्चासत्रे व संवाद, विविध आधुनिक अवजारांची प्रात्यक्षिके, रानभाज्या महोत्सव, यशस्वी शेतकऱ्यांचा सन्मान व त्यांच्या यशोगाथा, त्याचबरोबर महिला बचत गटांनी बनवलेल्या विविध उत्पादनांची विक्री, शेतीतील वेगवेगळ्या उत्पादनांची उत्पादक ते ग्राहक थेट विक्री, ड्रोन फवारणीची प्रात्यक्षिके, यांसह शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरणाऱ्या असंख्य उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सेंद्रिय शेती व नैसर्गिक शेती यांची दालने, भाजीपाला महोत्सव, शेतकरी उत्पादक कंपन्यांनी उत्पादित केलेल्या पदार्थांची थेट विक्री, कृषी विद्यापीठांमधील नवनवीन संशोधनाची प्रात्यक्षिके यांसारखे अनेक उपक्रम नाविन्यपूर्ण पद्धतीने या कृषी महोत्सवात शेतकऱ्यांना अनुभवायला मिळणार आहेत. यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात कृषी विभागाने जय्यत तयारी केली असून भव्य वॉटरप्रूफ सभामंडप, चर्चा सत्र व अन्य कार्यक्रमांसाठी आणखी मंडप, आसन व्यवस्था, त्याचबरोबर विक्रेत्यांसाठी शेकडो वॉटरप्रूफ स्टॉल्स यासह वाहन पार्किंग, भोजन आदी चोख व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान या कृषी महोत्सवात राज्यभरातून शेतकरी तसेच शेती विषयी आवड असणारे नागरिक सहभागी होणार असून त्यांच्या सर्व मान्यवरांच्या स्वागतासाठी संपूर्ण परळी वैद्यनाथ नगरी सज्ज झाली आहे.

दरम्यान बीड जिल्ह्यात प्रथमच होत असलेल्या या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या योजनांसह शेतकरी बांधवांना अनेक प्रकारचे लाभदायक मार्गदर्शन मिळणार असून ही शेतकऱ्यांसाठी एक आगळी वेगळी पर्वणी ठरणार आहे  तरी राज्यभरातील शेतकरी बांधवांनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री श्री. मुंडे यांनी केले आहे.

00000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी ग्रंथालयांचा गुणात्मक विकास आवश्यक – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. २० : समाजमाध्यमांचा वाढता वापर, बदललेली जीवनशैली यामध्ये सुद्धा ग्रंथालयाचे महत्व अबाधित आहे. ग्रंथ आणि ग्रंथालय हे शाश्वत असून वाचनसंस्कृती ही ग्रंथालयांमुळेच टिकून आहे. वाचनसंस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी ग्रंथालयांचा गुणात्मक विकास आवश्यक आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना दिला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार व ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ता व सेवक यांना डॉ.एस.आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार प्रदान सोहळा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते पाटकर सभागृह, एसएनडीटी महिला विद्यापीठ येथे झाला.

 

            यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी,उपसचिव प्रताप लुबाळ, ग्रंथालय संचालक, अशोक गाडेकर,राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ.गजानन कोटेवार, ज्येष्ठ पत्रकार  कुमार केतकर आदी उपस्थित होते. यावेळी पुरस्कारार्थींना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

            उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले, ग्रंथालयांना आर्थिक सहाय्य योग्य पद्धतीने मिळणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे जर नवीन पिढी ग्रंथालयाकडे जात नसेल तर नवनवीन प्रयोग करून त्यांच्यापर्यंत ग्रंथालय आणणे गरजेचे आहे.  फिरते वाचनालय, ई वाचनालय अशा विविध पद्धतीने लोकांपर्यंत वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी ग्रंथालय संचालनालय काम करीत आहे. सर्वांनी मिळून ग्रंथालय, वाचनालयाचा आत्मा समजून घेऊन ग्रंथालयाची चळवळ विकसित करण्याची गरज आहे.

            प्रधान सचिव श्री. रस्तोगी म्हणाले की, महाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळ खूप मोठी आहे. ही चळवळ बळकट होऊन वाचकांना अधिक चांगली सेवा चळवळी मार्फत देण्यात यावी. ग्रंथालयाच्या आस्थापनांनी ग्रंथालयाचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. यातही आधुनिक तंत्रज्ञान, नवीन पिढीची आवड ओळखून काम करावे. पुस्तके सहज उपलब्ध होण्यासाठी  डिजिटल तसेच ई-लायब्ररी करण्याकडे अधिक  भर देण्यात यावा. ग्रंथालयातील पुस्तके, सोयीसुविधा आणि परिसर यात सुधारणा कराव्यात असेही त्यांनी यावेळी सांगितले.

(अ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार

शहरी विभाग

१)  हिंद नगर वाचनालय व ग्रंथालय, रहिमतपूर ता. कोरेगाव, जि. सातारा ( पुरस्काराची रक्कम रु. १ लाख)

२) विवेकानंद सार्वजनिक वाचनालय, नांदुरा, श्री. शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, बुलढाणा रोड, नांदुरा जि. बुलढाणा (पुरस्काराची रक्कम रु. ७५ हजार)

*ग्रामीण विभाग* :

(अ)  १) शहीद भगतसिंग वाचनालय, कुऱ्हा, मु.पो. कुऱ्हा ता. तिवसा जि. अमरावती (पुरस्काराची रक्कम १ लाख रु.)

(आ)     संत गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालय, भिडी ता. देवळी, जि. वर्धा (७५ हजार रु.)

(इ)       कै. जयकुमारजी जैन सार्वजनिक वाचनालय, बोरी, ता. जिंतूर जि. परभणी (५० हजार रुपये)

(ई)       कै. रघुनाथ रामचंद्र बुरांडे ग्रंथालय, बिरोबा मंदिराजवळ, कोडोली ता. पन्हाळा जि. कोल्हापूर (२५ हजार रु.)

(ब) डॉ. एस.आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र) पुरस्कार (पुरस्काराची रक्कम रु. ५० हजार प्रत्येकी)

राज्यस्तरीय पुरस्कार

१) राज्यस्तरीय ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र)

श्री. विनायक दत्तात्रय गोखले, अनंत आनंद को. ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, आनंद पार्क, ठाणे (प) मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे

२) राज्यस्तरीय ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र)

श्री. सुरेश बळिराम जोशी, ग्रंथपाल, विजय वाचनालय, ता. तुळजापूर जि. धाराशिव

डॉ. एस.आर. रंगनाथन् उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र) विभागस्तरीय पुरस्कार (पुरस्काराची रक्कम  रु. २५ हजार प्रत्येकी) :

१) अमरावती –  विनोद बाळकृष्ण मुंदे, श्री. सरस्वती सार्वजनिक वाचनालय, राजना पो. काजना ता. नांदगाव खंडे, जि. अमरावती

२) छत्रपती संभाजीनगर –  युवराज मोहनराव जाधव, लोकमान्य सार्वजनिक वाचनालय, शिवणी (खुर्द), पो. शिवणी (बु.). ता.जि. लातूर

३) नागपूर –  धनराज देवीलाल रहांगडाले, श्री. शारदा वाचनालय, गोंदिया जि. गोंदिया

४) नाशिक –  गोपीचंद जगन्नाथ पगारे, मातृभूमी प्रबोधन समिती संचलित महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय, जेल रोड, नाशिक जि. नाशिक

५) पुणे – ज्योत्स्ना चंद्रशेखर कोल्हटकर, श्री छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालय, भवानी पेठ, सातारा जि. सातारा

६) मुंबई – अनंत आपाजी वैद्य, रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय आणि ग्रंथसंग्रहालय, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग

डॉ. एस. आर. रंगनाथन् उत्कृष्ट ग्रंथालय सेवक (ग्रंथमित्र) विभागस्तरीय पुरस्कार (पुरस्काराची रक्कम  रु. २५ हजार प्रत्येकी) :

१) अमरावती – ज्योती रामदास सरदार (धबाले), ग्रंथपाल, सानेगुरुजी वाचनालय, जठार पेठ, अकोला, जि. अकोला

२) छत्रपती संभाजीनगर – गणेश रामभाऊ शेंडगे, ग्रंथपाल, ए. एच. वाडिया सार्वजनिक वाचनालय, ता. जि. बीड

३) नागपूर – नंदू दामोदर बनसोड, ग्रंथपाल, दादासाहेब निकम सार्वजनिक वाचनालय, महाल, ता.जि. नागपूर

४) नाशिक –  अमोल संभाजी इथापे, ग्रंथपाल, अहमदनगर जिल्हा वाचनालय, चितळे रोड, अहमदनगर जि. अहमदनगर

५) पुणे – भगवान पांडुरंग शेवडे, ग्रंथपाल, श्री शिवाजी सार्वजनिक वाचनालय, मांगले, ता.शिराळा, जि. सांगली

६) मुंबई – मंजिरी अनिल वैद्य, ग्रंथपाल, श्रीधर वासुदेव फाटक ग्रंथसंग्रहालय, विलेपार्ले (पूर्व) मुंबई.

००००

काशीबाई थोरात/विसंअ

दंत वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालय, गट-अ पदाचा निकाल जाहीर

मुंबई, दि.२० :महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्राध्यापक, दंतव्यंगोपचारशास्त्र (Orthodontics and Dentofacial Orthopedics), शासकीय दंत वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालय, गट-अ या पदाच्या मुलाखती दि. ९ ऑगस्ट, २०२४ रोजी घेण्यात आल्या होत्या. या संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे, असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे कळविण्यात आले आहे.

000000

मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात खादी प्रदर्शनाचे आयोजन

मुंबई, दि. २० :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात खादीचा प्रचार-प्रसार वाढावा यासाठी खादी वस्त्र खरेदी केलेल्या आवाहनाला अनुसरून महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने दि २१ ते २३ ऑगस्ट या कालावधीत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे महाखादी प्रदर्शनाचे आयोजन केल्याची माहिती मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी दिली आहे.

या प्रदर्शनात सेवाग्राम, वर्धा, अमरावती येथील कस्तुरबा महिला खादी, छत्रपती संभाजीनगर येथील सत्यम खादी, बोरिवली, भाईंदर, पालघर, नागपूर सह विविध जिल्ह्यातील खादी संस्था या प्रदर्शनात सहभागी  होणार आहेत.

खादीचा वापर जास्तीत जास्त लोकांनी करावा. तसेच मंत्रालयातील शासकीय कर्मचारी यांना खादी सहज उपलब्ध व्हावी, यासाठी हे प्रदर्शन आयोजित केल्याचे मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी सांगितले आहे.

या प्रदर्शनात जास्तीत जास्त अधिकारी-कर्मचारी यांनी भेट देऊन दि. 21 ते 23 ऑगस्ट 2024 या कालावधीत खादीचे कापड खरेदी करावे, असे आवाहन देखील सभापती श्री.साठे यांनी केले आहे.

0000

संजय ओरके/विसंअ

पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाचे कामकाज अधिक सक्षम करणार – पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मेंढपाळांच्या उन्नतीसाठी विविध यंत्रणा उभारल्या जाणार

मुंबई, दि.२० : राज्यात मेंढीपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय योजनेअंतर्गत “राजे यशवंतराव होळकर महामेष योजना” पुढे सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाचे कामकाज सक्षम होण्यासाठी पुणे येथे सुसज्ज मुख्य प्रशासकीय भवन उभारण्यात येईल असे महसूल पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

महामंडळाच्या ६ क्षेत्र बळकटीकरणबाबत आढावा बैठक मंत्री श्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, अपर मुख्य सचिव राजेश कुमार, महामंडळाचे कार्यकारी संचालक डॉ शितल कुमार मुकणे, उपसचिव निवृत्ती मराळे यांच्यासह इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत मार्गदर्शन करताना पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री श्री विखे पाटील म्हणाले, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होऊन राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेस गती देण्यात येत आहे. महामंडळाच्या मुख्य प्रशासकीय भवन उभारणीसाठी सुधारित आराखडा तयार करण्यात यावा. प्रशिक्षण केंद्रासाठी छत्रपती संभाजीनगर येथे जागा निश्चित केली आहे. तेथे प्रशिक्षणार्थी मेंढपाळ यांच्यासाठी वसतीगृह असलेले प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येईल,

कामाबाबत नियोजन करून सर्व प्रक्षेत्रही त्या-त्या विभागातील जातिवंत शेळ्या मेंढ्यांसाठी विकास केंद्र व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या प्रक्षेत्राचे बळकटीकरण व आधुनिकीकरण करण्यासाठी 66 कोटी 85 लाख रुपये निधी देण्यात येत आहे. यामध्ये मुख्यालयासह  रांजणी, जि. सांगली , महूद, जि. सोलापूर, दहिवडी, जि. सातारा, पडेगाव, जि. छत्रपती संभाजीनगर, बिलाखेड, जि. जळगांव, अंबेजोगाई, जि. बीड , तीर्थ, जि. धाराशिव, मुखेड, जि. नांदेड, बोंद्री, जि. नागपूर, पोहरा, जि. अमरावती प्रक्षेत्रचा विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रम व विकासकामांचा समावेश केला आहे.

महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादित होणाऱ्या लोकरीवरती प्रक्रिया करून त्यापासून विविध लोकर वस्तू तयार करण्यासाठी लोकर प्रक्रिया केंद्र स्थापन करून यामधून मेंढपाळांना रोजगार उपलब्ध होणे शक्य आहे. त्यासाठी केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन संस्था यांची तांत्रिक सल्लागार म्हणून नेमणूक करून प्रक्रिया केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मेंढपाळांची भटकंती थांबून त्यांना एका ठिकाणी स्थिर करून त्यांची आर्थिक व सामाजिक उन्नती करण्यासाठी भागीदारी तत्त्वावर पोहरा (जि.अमरावती) येथील प्रक्षेत्रावर अर्धबंदिस्त मेंढीपालन करण्यासाठी चा प्रायोगिक तत्त्वावरचा प्रकल्प राबवण्यासंदर्भात बैठकीमध्ये निर्देश श्री. विखे- पाटील यांनी दिले.

राज्यामध्ये बहुतांश मेंढपाळ हे भटकंती करून आपला व्यवसाय करतात. अपुरे  कुरण क्षेत्र व पडीक जमीन यामुळे त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे त्यामुळे चराऊ कुरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महसूल विभाग व वन विभाग यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

०००

किरण वाघ/विसंअ

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी समन्वयाने प्रभावी अंमलबजावणी करावी – मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव

मुंबई, दि.२० :आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व  मतदारसंघांत अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व विभागांनी  समन्वयाने प्रभावी अंमलबजावणी करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश मुंबई शहर जिल्हा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत  जिल्हाधिकारी श्री यादव बोलत होते. यावेळी सर्व विभागाचे समन्वयक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले की, मतदारांच्या फाँर्मची प्रक्रिया दोन दिवसात पूर्ण करावी. लोकशाहीचा उत्सव म्हणजे मतदान प्रक्रिया होय. या उत्सवात प्रत्येक मतदाराने आपला सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक मतदाराला मतदानासाठी प्रवृत्त करावे. प्रत्येक मतदाराला मतदान स्लिप देण्यात यावी. ज्या भागात मागील निवडणुकीत कमी मतदान झाले आहे. त्याठिकाणी विशेष लक्ष वेधून आणि कमी मतदान का झाले याचा अभ्यास करून त्याप्रमाणे नियोजन करावे.

मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व मतदारांपर्यंत मतदान केंद्रांची माहिती पोहोचवावी. मतदान केंद्रांवर वीज, पाणी, मंडप यासह सर्व मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. जिल्ह्यात गृहनिर्माण संस्थांची संख्या मोठी आहे, त्यासाठी जिल्हा निबंधकांनी संबंधित संस्थांमधील मतदारांच्या प्रबोधनासाठी प्रयत्न करावेत. मतदारांमध्ये जनजागृतीसाठी आवश्यक साहित्य पुरविण्यात यावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी दिले.

०००

राजू धोत्रे/विसंअ

ताज्या बातम्या

जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत बाधित क्षेत्रासह आरोग्य व शाश्वत विकासाला प्राधान्य – पालकमंत्री चंद्रशेखर...

0
️नियामक परिषद बैठक संपन्न नागपूर, दि. १० : जिल्ह्यातील प्रत्यक्ष खाण बाधीत क्षेत्र व अप्रत्यक्ष खाण बाधित क्षेत्रात शासन निर्णयान्वये दिलेल्या निर्देशानुसार येत्या आर्थिक वर्षात...

गुणवत्तापूर्ण कामे करण्याला प्राधान्य द्यावे – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

0
सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक सिंधुदुर्गनगरी, दि.10 (जिमाका) सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही तडजोड न करता कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा. कंत्राटदारांकडून योग्यप्रकारे कामे...

तणावाच्या परिस्थितीमुळे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांचा दौरा रद्द

0
मुंबई, दि.10 : तणावपूर्ण परिस्थिती पाहता सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी "आय.ओ.टी. सोल्यूशन वर्ल्ड काँग्रेस अँड बार्सिलोना सायबर सिक्युरिटी काँग्रेस...

विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्याला ५.७८ लाख एकर सिंचन लाभ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
भोपाळ, दि. 10 : तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत  महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांमध्ये एका ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी करण्यात आली. सुमारे 19,244 कोटींच्या या...

भारतीय सैन्य दलाच्या समर्थनार्थ सातारा जिल्ह्यात रविवारी तिरंगा रॅलीचे आयोजन – पालकमंत्री शंभूराज देसाई

0
सातारा दि.10  : भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती अनुषंगाने भारतीय सैन्य दलाच्या समर्थनार्थ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी तिरंगा रॅलीचे आयोजन करा, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज...