गुरूवार, मे 8, 2025
Home Blog Page 470

शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीवर विकासाचे आलेख उंचावतात – मंत्री गिरीश महाजन

  •  भोकर तालुक्यामध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते ९२७ कोटींच्या विविध प्रकल्पाचे भूमिपूजन व लोकार्पण

नांदेड दि. १७ : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना विकासासाठी आपल्या पुढ्यात उभ्या आहेत. ज्या लोकप्रतिनिधीमध्ये लोकभावना व ज्यांच्याकडे लोकजागृती, लोकांबद्दल कणव आहे. त्यांच्या मतदारसंघामध्ये विकास धावत असतो. शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीवरच विकासाचे आलेख उंचावतात, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, पर्यटनमंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी येथे केले.

 

 

नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे जिल्हास्तरीय ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या शुभारंभानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या सोबत भोकर मतदार संघामध्ये एकाच दिवशी 926.71 कोटी रुपयांच्या विकास कामाच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यादरम्यान ते बोलत होते.

राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये पाठपुराव्याला प्रचंड महत्त्व आहे. त्यामुळे भोकरसारख्या शहरात आज मोठमोठे प्रकल्प उभे राहत असून राज्य शासनाच्या, केंद्र सरकारच्या सर्व योजनांची योग्य अंमलबजावणी सुरू आहे. जो समाज, जो समाज घटक आणि जे नेतृत्व उपलब्ध योजनांचा योग्य वापर करेल त्यांच्या विकासाचा आलेख कायम उंच राहतो असेही, त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे आज नगरपरिषदेच्या अंतर्गत श्री संत सेवालाल महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. सात कोटी खर्च करून हे स्मारक उभारले जाणार आहे. त्यानंतर उपस्थित मान्यवरांना संबोधित करताना त्यांनी सरकारच्या सर्व योजना समाजाच्या उन्नतीसाठी वापरणे आणि त्या योग्य प्रकारे वापरल्या जात आहे अथवा नाही याची खातरजमा करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाला  पालकमंत्र्यासह माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण,  खासदार डॉ.अजित गोपछडे, आमदार राजेश पवार, आमदार डॉ. तुषार राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, माजी आमदार अमर राजूरकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर, श्रीजया चव्हाण, रोहिदास जाधव, अॅड. रामराव नाईक विनोद चीदगीरीकर धर्मगुरू महंत बाबुसिंगजी महाराज (संस्थान पोहरादेवी), दीक्षागुरु संत प्रेमसिंगजी महाराज (संस्थान माहूर व कोतापल्ली), श्री संत सेवालाल महाराज समितीचे अध्यक्ष डॉ. यु. एल. जाधव यांच्यासह बंजारा समाजातील समाजभूषण, ज्येष्ठ नेते, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी देखील संबोधित केले. भोकरचा अनुशेष पूर्ण केला जाईल. विकास कामांसाठी निधी कमी पडणार नाही. याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन दिले. अन्य मान्यवरांचेही यावेळी मार्गदर्शन झाले.

तत्पूर्वी आज दिवसभरात 926.71 कोटी रूपयांच्या विकास कामांचे उद्घाटन झाले. यामध्ये प्रामुख्याने पिंपळढव साठवण तलाव आणि रेणापूर-सुधा बृहद लघुपाटबंधारे प्रकल्पाची उंची वाढविण्याच्या कामाचा उल्लेख करावा लागेल. या प्रकल्पांमुळे भोकर तालुक्याच्या सिंचन क्षमतेत वाढ होणार असून, भोकर शहरासह अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

तत्पूर्वी आज सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह भोकर येथे अस्तित्वातील विश्रामगृहावर समस्थर विस्तारीकरण करण्याच्या  6 कोटी 87 लाख रुपयाचे कामाचे लोकार्पण झाले. भोकर विश्रामगृहाचे रूप यामुळे पालटले आहे.

त्यानंतर माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम झाला. त्यानंतर नांदा म.प. भोकर येथे  जिल्ह्याच्या भोकर तालुक्यातील राज्यमार्ग 251 धावरी-थेरबन-सोमठाणा-किनी-पाळज-दिवशी लगळुद राममा तुराटी-बोथी-बितनाळ-सोमठाणा-गोरठा-जामगाव-कुदळा-बोळसा-भायेगाव-अंतरगाव-सावरखेडा-कृष्णूर रामा-419 रस्त्याची हुडको अंतर्गत सुधारणा करण्याच्या व. कि.मी.0/00 ते 42/200 असे 550 कोटी रुपयांचे कामाचे भूमिपूजन झाले.

त्यानंतर परिसरातील शेतकरी व मान्यवरांच्या उपस्थितीत पिंपळढव साठवण तलाव ता. भोकर जि. नांदेड माती धरण सांडवा मुख्य विमोचक व मुख्य कालव्याचे काम व रेणापुर सुधा प्रकल्प बृ.ल.पा.प्रकल्पाची उंची वाढविण्याच्या   येथे 116 कोटी 48 लाख रुपयाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

त्यानंतर हायब्रिड ॲन्युईटी कार्यक्रम टप्पा-2 ND –II 33 बी पिंपळढव, बल्लाळ तांडा, मोघाळी कामणगाव एमडीआर 97 किमी 0/000 ते 20/000 ता. भोकर जि. नांदेड रस्त्याची सुधारणा, भोकर येथील सा.बां. विभागीय कार्यालय इमारतीचे बांधकाम , उपविभागीय कार्यालय व तहसिल कार्यालय भोकर येथील महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थानांचे बांधकाम ,भोकर येथील 30 खाटाच्या रुग्णालयाचे 100 खाटाच्या उपजिल्हा रुग्णालय श्रेणीवर्धन अंतर्गत निवासस्थानाचे बांधकाम. भोकर शहरातील गावतलावाचे पुर्नरुज्जीवन व सुशोभिकरण. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भोकर येथील प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, नगरपरिषद, भोकर अंतर्गत बालाजी मंदिर ते बोरगाव रस्त्याची सुधारणा, भोकर शहरासाठी वळण मार्गावरील बांधकामाचे लोकार्पण करण्यात आले.

०००

 

 

शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन पाल्यांना सनदी अधिकारी बनवा -पालकमंत्री हसन मुश्रीफ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत जिल्हास्तरीय महिला लाभार्थी सन्मान सोहळा संपन्न

 कोल्हापूर, दि.  १७ (जिमाका) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारख्या अनेक योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असून या सर्व योजनांचा लाभ घेऊन महिलांनी आर्थिक उन्नती साधावी तसेच आपल्या मुला, मुलींना उच्च शिक्षण देवून सनदी अधिकारी घडवावेत, असे आवाहन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत राज्यस्तरीय महिला लाभार्थी सन्मान सोहळा पुण्यातील बालेवाडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या योजनेंतर्गत जिल्हास्तरीय सोहळा मार्केट यार्ड जवळील रामकृष्ण हॉलमध्ये हा सोहळा दूरदृश्य पद्धतीने पार पडला. यावेळी पालकमंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. यावेळी पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते लाभार्थी महिलांना अभिनंदन प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. तसेच या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्याचे काम उत्कृष्ट पद्धतीने केल्याबद्दल प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र देऊन अंगणवाडी सेविकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लाभार्थी महिलांनी पालकमंत्री व उपस्थित मान्यवरांना राख्या बांधून या योजने प्रति असणाऱ्या कृतज्ञता भावना व्यक्त केल्या.

यावेळी खासदार धैर्यशील माने, माजी आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ.के मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मान्यवर तसेच लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत गेल्या दोन दिवसांपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जुलै व ऑगस्ट असे दोन महिन्याचे तीन हजार रुपये खात्यावर जमा झाले आहेत. त्यांच्या संसाराला ही छोटीशी मदत आहे. अद्याप आधार लिंकींग न झालेल्या आपले आधार कार्ड लिंक करुन घ्यावे. ही योजना बंद होणार नसून सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्याचा लाभही आचारसंहिता सुरु होण्यापूर्वी खात्यात जमा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शासनाच्यावतीने महिलांसाठी अनेक योजना राबवण्यात येत आहेत. पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी मुलींना मोफत शिक्षण, एसटी प्रवासात 50 टक्के सवलत, गौरी गणपती सणामध्ये आनंदाचा शिधा, महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी निधी तसेच सामुदायिक विवाह नोंदणीसाठी अनुदान, वर्षातून तीन सिलेंडर मोफत, महिला बचत गटांसाठी अनुदानात वाढ,  व्यवसाय करण्यास इच्छुक महिलांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना अशा बऱ्याच योजना महिलांसाठी सुरु केल्या आहेत. शासनाच्या वतीने अनेक योजना राबविण्यात येत असून या सर्व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करुन  सर्व महिलांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

खासदार धैर्यशील माने म्हणाले की, जिल्ह्यातील 7 लाख महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणेच रक्षाबंधनाआधीच ओवाळणी म्हणून प्रत्येक महिलेच्या खात्यात लाभाची रक्कम जमा झाली आहे. शासन महिलांच्या पाठीशी असून ही योजना निश्चितच सुरु राहणार असून या योजने पासून कोणीही वंचित राहणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपस्थित सर्व मान्यवर व लाभार्थी महिलांचे स्वागत केले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत कोल्हापूर जिल्हा आघाडीवर असून ही योजना राबवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका, सीआरपी, बचत गटाच्या महिला, ग्राम स्तरावरील यंत्रणेने खूप कष्ट घेतले आहेत. तसेच लाभार्थी महिलांनीही स्वतः नोंदणी केल्यामुळे यात आपला जिल्हा आघाडीवर होता. जिल्ह्यात 6 लाख 92 हजार 513 अर्ज मंजूर झाले असून बॅंकांमध्ये महिलांच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे, सर्व लाभार्थी महिला व नोंदणी होण्यासाठी काम केलेल्या यंत्रणेचे त्‍यांनी यावेळी आभार मानले.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्येक बहीण माझी बहीण असा विचार करुन मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु केली आहे. दोन दिवसांपूर्वी या योजनेची रक्कम आमच्या खात्यावर जमा झाली आहे. रक्षाबंधनाआधीच खात्यावर पैसे आल्यामुळे आम्हाला खूप आनंद झालाय.. भावानं जशी आम्हा बहिणींची आठवण ठेवली  तशीच आम्ही बहिणीही इथून पुढे साहेबांची आठवण ठेवणार.. , असा विश्वास या सोहळ्यात उपस्थित कोल्हापूर जिल्ह्यातील लाभार्थी महिलांनी व्यक्त केला.

०००

 

स्वप्नील कुसाळेच्या स्वागत समारंभाचे व्यवस्थित नियोजन करा -पालकमंत्री हसन मुश्रीफ

  • ऑलिम्‍पिक पदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळेची बुधवारी कोल्हापुरात भव्य मिरवणूक
  • प्रशासनाच्या वतीने दसरा चौकात होणार जंगी सत्कार
  • कावळा नाका येथील महाराणी ताराराणी पुतळा येथून सकाळी नऊ वाजता होणार मिरवणुकीला प्रारंभ
  • कावळा नाका – महालक्ष्मी चेंबर -दाभोळकर कॉर्नर -व्हिनस कॉर्नर- दसरा चौक मार्गे निघणार मिरवणूक

कोल्हापूर दि.१७ (जिमाका): ऑलिम्पिकमध्ये देशाचे नाव उंचावणारा कोल्हापूर जिल्ह्याचा सुपुत्र स्वप्नील कुसाळे याचे जिल्ह्यात जोरदार स्वागत होण्यासाठी चोख नियोजन करा, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.

पॅरीस येथे झालेल्या ऑलिंपिकमध्ये 50 मीटर रायफल थ्री पोजीशनमध्ये कांस्य पदक प्राप्त झाल्यानंतर स्वप्नील कुसाळे पहिल्यांदाच आपल्या जिल्ह्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वप्नील कुसाळे याची बुधवार 21 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता स्वागत मिरवणूक व दसरा चौकात सत्कार  समारंभ होणार आहे. कावळा नाका येथील महाराणी ताराराणी पुतळा ते दसरा चौकापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून या मिरवणुकीनंतर दसरा चौकात सन्मानपत्र देवून भव्य सत्कार गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनाची रुपरेषा ठरवण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत (दूरदृश्यप्रणालीद्वारे) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली.

यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र कृषी, शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा आमदार प्रकाश आबिटकर, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत तासगावकर, आमदार राजेश पाटील आदी मान्यवर बैठकीमध्ये ऑनलाईन सहभागी झाले. जिल्हाधिकारी अमोल येडगे, महानगरपालिका आयुक्त डॉ. के.मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, करवीर विभागाचे उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक, जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ, क्रीडा अधिकारी अरुण पाटील आदी बैठकीस उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की,कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी येथील स्वप्नील कुसाळे याचे सुपुत्राचे जंगी स्वागत व्हायला हवे. मिरवणूक मार्ग तसेच सत्कार समारंभाचे प्रशासनाने सूक्ष्म नियोजन करा. ही मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी वाहतुकीचे योग्य नियोजन करा. तसेच आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवा. एलईडी स्क्रीन, फ्लेक्स, कमानी, मिरवणुकीचा रोड मॅप आदी सर्व विषयांबाबतचा आढावा त्यांनी बैठकीत घेतला.

जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, जिल्ह्याचे नाव लौकीक करणाऱ्या स्वप्नील कुसाळे याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने भव्य स्वागत करण्यात येणार आहे. कावळा नाका येथील महाराणी ताराराणी पुतळा येथून मिरवणुकीस सुरुवात होईल. यानंतर पुढे दाभोळकर कॉर्नर ते रेल्वे स्टेशन मार्गे दसरा चौकात मिरवणूक येऊन या ठिकाणी मिरवणुकीची सांगता होईल. दसरा चौकात भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या मिरवणूक व सत्कार सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी केले. तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने केलेल्या नियोजनातील  सर्व बाबींची माहिती त्यांनी दिली.

स्वप्नील कुसाळे यांच्या मिरवणूक प्रसंगी प्रमुख तीन चौकात हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करावी. स्वप्नील कुसाळे यांना बक्षीस जाहीर केलेल्या क्रीडाप्रेमी नागरिकांना त्याचा सत्कार करण्याची संधी उपलब्ध करुन द्यावी, अशा सूचना लोकप्रतिनिधींनी केल्या.

स्वप्नील कुसाळे यांचा सत्कार करावयाचा असणाऱ्या संस्था संघटना आणि नागरिकांनी करवीर  तहसील कार्यालयात सोमवार  19 ऑगस्ट रोजी कार्यालयीन वेळेत आपली नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

गौरव सोहळा झाल्यानंतर शिवाजी पुतळा येथे अभिवादन, आंतरराष्ट्रीय कीर्ती स्तंभ भवानी मंडप येथे अभिवादन, यानंतर श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन स्वप्नील कुसाळे कांबळवाडी कडे प्रयाण करेल, अशी माहिती क्रीडा विभागाने दिली.

०००

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ शासनाची महत्त्वाकांक्षी योजना – मंत्री दीपक केसरकर

  • योजनेच्या लाभाचे भायखळा येथे महिलांना प्रत्यक्ष वितरण
  • नवीन कल्पना, नवीन कार्यक्रमांद्वारे सरकार सर्वसामान्यांसाठी काम करत आहे – मंत्री मंगल प्रभात लोढा 
  • रक्षाबंधनाची ओवाळणी मिळाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण

मुंबई, दि. १७:  ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे तसेच कुटूंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या वतीने ही योजना जाहीर केली. या योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा,’ असे आवाहन मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय, महिला व बाल विकास मुंबई शहर, उपनगर आणि मुंबई महानगरपालिका यांच्या समन्वयाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभाचे भायखळा येथे महिलांना प्रत्यक्ष वितरण करण्यात आले. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे केसरकर बोलत होते.

या समारंभास मुंबई उपनगर चे पालकमंत्री  मंगल प्रभात लोढा दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच आमदार यामिनी जाधव, आमदार कॅप्टन तमिळ सेल्वन, तसेच मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेश क्षीरसागर, मुंबई उपनगर महिला व बालविकास अधिकारी शरद कुऱ्हाडे, मुंबई जिल्हा महिला बालविकास अधिकारी शोभा शेलार, भायखळा समितीचे अध्यक्ष अतुल शहा, शिवडी समिती अध्यक्ष आशा मामेडी, उपजिल्हाधिकारी श्री. सुरवसे,  तहसीलदार दीपाली गवळी, उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे, एकात्मिक बाल विकास योजनेचे उपायुक्त विजय सागर, मुंबई उपनगरचे नोडल अधिकारी अबुल चौधरी, मुंबई शहरचे नोडल अधिकारी  शशिकांत चौहान, तसेच जिल्हा  बाल विकास विभागातील अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, या सरकारने सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ज्या माता-भगिनीसाठी दिवसरात्र काम करुन ही योजना त्यांच्यापर्यंत पोहचवली, त्या अधिकारी कर्मचारी यांच्यासह सर्वांचा सकारात्मक सहभाग राहिल्यामुळे ही योजना कमी वेळेत राबविता आली. महिला जर सक्षम असेल तर संपूर्ण कुटूंब सक्षम होते. यामध्ये महिलांना मिळणाऱ्या रकमेला महत्व नसून तिच्याप्रती कुटुंबप्रमुख म्हणून व्यक्त केलेली भावना महत्त्वाची आहे. यामुळे महिलांचा आत्मसन्मान वाढीस लागणार आहे, तसेच कुटुंबाचे उत्पन्नही वाढीस लागण्यास हातभार मिळणार आहे. या योजनेचा समाजातील सर्व महिलांनी लाभ घ्यावा.

नवीन कल्पना, नवीन कार्यक्रमांद्वारे सरकार सर्वसामान्यांसाठी काम करत आहे – मंत्री मंगल प्रभात लोढा

मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, नवीन कल्पना, नवीन कार्यक्रमाद्वारे सरकार सर्वसामान्यांसाठी काम करत आहे. सर्वासाठी स्वयंरोजगार आणि रोजगार  मिळावा यासाठी  हे सरकार काम करत आहे. व्यवसाय सुरु करण्यासाठी  कौशल्या विभागाने एक स्वतंत्र ॲप तयार केले आहे. त्याद्वारे नोंदणी करून आपल्या व्यवसायाची परिपूर्ण माहिती देता येणार आहे. यामध्ये आपला माल कसा तयार करायचा, कुठे विकायचा याचे प्रशिक्षण या ॲपद्वारे देण्यात येणार आहे.

यावेळी मुंबई शहर आणि उपनगरमधील लाभार्थी महिलांचे अभिनंदन आणि सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मुंबई उपनगर महिला व बालविकास अधिकारी, शरद कुऱ्हाडे यांनी केले, तर सूत्रसंचालन स्वाती गवाणकर यांनी केले. मुंबई जिल्हा महिला बालविकास अधिकारी,  शोभा शेलार यांनी आभार मानले

०००

 

 

 

 

 

 

शासनाने जाहीर केलेल्या सर्व योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उत्तर भारतीय संघातर्फे रक्षाबंधनानिमित्त स्त्रीशक्ती सन्मानसोहळा

मुंबई दि.१७ : शासनाने ज्या ज्या योजना जाहीर केल्या त्यांची शंभर टक्के अंमलबजावणी सुरू आहे.आजच पुणे येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतंर्गत एक कोटी पेक्षा अधिक बहिणीच्या खात्यात रक्कम जमा झाली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले .

उत्तर भारतीय संघातर्फे आयोजित रक्षाबंधन निमित्त स्त्रीशक्ती सन्मान सोहळा आणि पाच हजार बहीणींना साड्या भेट देण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, उत्तर भारतीय संघाचे संतोष आरएन सिंह, उत्तर भारतीय संघाचे पदाधिकारी आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला. भावालाही मदत करण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे. सर्वांच्या जीवनात सुखाचे क्षण यावे यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.राज्यात अनेक पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. महाराष्ट्राला अग्रेसर राज्य बनविण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

उत्तर भारतीय संघाचे सामाजिक क्षेत्रात अनेक चांगले उपक्रम राबविले आहेत. सरकार नेहमीच तुमच्या सोबत राहील. अयोध्या हे सर्वांसाठी पवित्र स्थळ आहे. तेथे महाराष्ट्र भवन बांधण्यात येणार आहे. उतर भारतीय संघाने महिला भगिनींसाठी चांगला उपक्रम आयोजित केला आहे. तसेच येथील महिला भगिनींनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला नसेल तर ३१ ऑगस्टपर्यंत भरावा, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उत्तर भारतीय महिला, भगिनींना साड्या वाटप करण्यात आल्या. महिला भगिनींनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधली.

०००

कायदा व सुव्यवस्था बाधित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी – पालकमंत्री दादाजी भुसे

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा घेतला आढावा

नाशिक, दि. १७ (जिमाका) : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बाधित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे दिले.

नाशिक जिल्ह्यात दि. १६ ऑगस्ट रोजी निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त (शहर) संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) विक्रम देशमाने उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री श्री. भुसे यांनी घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती घेतली.

जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने समन्वयाने जिल्ह्यात निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती संयमाने व संवेदनशीलतेने हाताळल्याबद्दल समाधान व्यक्त करून पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, 16 ऑगस्ट रोजी नाशिक शहर येथे उद्भवलेल्या परिस्थितीवर नाशिक शहर पोलिसांनी वेळीच कार्यवाही करून शांतता प्रस्थापित केली आहे. परिस्थिती शांत असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यानी यावेळी केले. तसेच, घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी परिस्थितीवर सतर्कतेने नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती सादर केली. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घटनेची वस्तुस्थिती स्पष्ट केली. यावेळी पालकमंत्री श्री. भुसे यांनी तणावपूर्ण परिस्थिती वेळेत हाताळलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.

०००

जेएनयुमध्ये कुसुमाग्रज यांच्या नावाने मराठी अध्यासनासाठी निधी देणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा कार्यारंभ

पुणे दि.१७: जवाहरलाल नेहरु विद्यापीठात माय मराठीच्या जागरासाठी थोर साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या नावाने मराठी भाषेचे अध्यासन सुरू करण्यासाठी निधी देण्यात येईल, तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. दिल्ली येथे ७० वर्षानंतर होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सर्वांनी मिळून यशस्वी करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे, सरहद संस्थेचे संजय नहार, शैलेश वाडेकर, मिलिंद जोशी, विनोद कुलकर्णी, सुनीताराजे पवार, माजी मंत्री विजय शिवतारे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ऐतिहासिक वास्तूत भेट देण्याची संधी मिळणे हे आपले भाग्य असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, दिल्लीत साहित्य संमेलन होणे ही महाराष्ट्र, मराठी साहित्यप्रेमींसाठी एक अभिमानाची बाब आहे. अशा संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषेचे मोठेपण जगभरातील नागरिकांना कळायला हवे. साहित्यिकांचे समाजासाठी मोठे योगदान आहे, जीवनाचा अर्थ त्यांच्यामुळे कळतो, नवी पिढी घडविताना समाजाला दिशा दाखविण्याचे कार्य साहित्यिक करतात. म्हणून अशा साहित्य संमेलनाचा समाज जागरणासाठी उपयोग होतो. त्यामुळे सर्वांनी एकत्रितपणे दिल्लीतील मराठी साहित्य संमेलन यशस्वी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की,  देशाच्या राजधानीत होणाऱ्या या साहित्य संमेलनाच्या आयोजनाला विद्येच्या माहेरघरातून सुरूवात होत आहे. मराठी संस्कृतीच्या राजधानीपासून सत्तेच्या राजधानीपर्यंत मायमराठीचा डंका वाजतो आहे. संमेलनाच्या तयारीची सुरूवात चांगली झाली असून या संमेलनाला काही कमतरता भासणार नाही. जगातल्या १२ कोटी मराठी नागरिकांना जोडणारे हे संमेलन आहे. परदेशातही मराठी भाषा आणि संस्कृतीचा अभिमान आहे. प्रत्येक मराठी माणसांचा अभिमान असणारा हा भाषेचा उत्सव ७० वर्षानंतर दिल्लीत होत आहे.

संत नामदेवांनी भक्तीमार्गाने मराठीचा झेंडा पंजाबपर्यंत नेला होता. मराठी राज्यकर्त्यांनी देशभर पराक्रम गाजविला. मराठी माणसे जेथे गेली तिथे त्यांनी आपली भाषा आणि संस्कृती रुजविण्याचे कार्य केले. इंदोर, ग्वाल्हेर, हैदराबाद, तंजावर आदी भागात मराठी संस्कृती रुजलेली दिसते. सरहद संस्थेच्या माध्यमातून राज्याची सरहद्द ओलांडून मायमराठी राष्ट्रीय पातळीवर जात आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. दिल्लीसह उत्तर भारतात राहणाऱ्या मराठी भाषिकांना हा सोहळा अनुभवता येणार आहे. हे संमेलन यशस्वी होण्यासाठी शासन संस्थेच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्रस्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. मुंबईत मराठी भाषा भवन उभारण्यात येत आहे. विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. इतर योजनांसोबत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा आपला अभिमान असल्याने त्यासाठी आवश्यक सहकार्य करणे शासनाचे कर्तव्य आहे आणि शासन ते प्रामाणिकपणे पार पाडेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.  मुख्यमंत्र्यांनी सरहद संस्थेतर्फे जम्मू काश्मिरमध्ये करण्यात येणाऱ्या सामाजिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.

डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, मराठी भाषा अनिवार्य करणारा कायदा महाराष्ट्रात एकमताने मंजूर झाला. गेल्या दोन वर्षात ज्या शाळेमध्ये मराठी शिक्षक नसल्याने मराठी शिकवले जात नव्हते त्या शाळांमध्ये मुलांना मराठीचे अध्ययन करता यावे, यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करत आहे. दुकानाच्या पाट्या मराठी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मराठी साहित्य परिषद म्हणजे मराठी भाषा भवनच आहे. भारतातील मराठी प्रेमींना जोडून घेण्यासाठी सरहदचे कार्य मोलाचे आहे. त्यामुळे दिल्लीतील हे संमेलन नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी श्रीमती तांबे यांनी संमेलनाच्या स्थळ निवडीबाबत प्रक्रिया सांगून संमेलनाचा निधी ५० लाखाहून वाढवून २ कोटी केल्याबद्दल शासनाचे आभार मानले. संजय नहार यांनी सरहद संस्थेच्या कार्याची माहिती देऊन हे संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाला माजी संमेलनाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक आणि साहित्यप्रेमी उपस्थित होते.

०००

डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी केंद्रस्तरावर कडक कायदा करण्याबाबत सकारात्मक विचार करावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

डॉक्टरांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्याची केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबत चर्चा

मुंबई, दि. १७ : राज्यासह देशात डॉक्टरांच्या सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केंद्रीय सार्वजनिक आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय स्तरावर एक कडक कायदा तयार करण्यात यावा, याअनुषंगाने यावेळी चर्चा झाली. यासंदर्भात सकारात्मक विचार करावा, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

कोलकत्ता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणी देशातील आयएमए इत्यादी संघटनेच्या डॉक्टरांनी संप, मोर्चा आंदोलन केले आहे. राज्यातील मार्ड संघटनाही आंदोलनात आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत ठोस पावले उचलण्यास सरकार सकारात्मक आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात ऑडिट केले जाईल. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कायदेशीर संरक्षण मिळेल, तसेच हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येतील. आरोग्य सेवा संरक्षण कायद्यासंदर्भात राज्य सरकार केंद्राकडे विनंती करेल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मार्डच्या पदाधिकाऱ्यांसमवेत नुकत्याच झालेल्या चर्चेदरम्यान सांगितले होते. त्यानुसार मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासमवेत चर्चा करुन वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षितता मिळण्यासाठी कायदा करण्याबाबत चर्चा केली.

डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी यांनी त्यांचे आंदोलन मागे घ्यावे. सरकार त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक कारवाई करत असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

०००

राज्यात कायदा-सुव्यवस्था, सामाजिक सलोखा राखण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

मुंबई, दि. १७ : राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित राखण्यासाठी सर्व नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्यांनी सर्व समाज घटकांना शांतता राखण्याचे आणि आगामी सण व उत्सव एकोप्याने साजरे करण्याचे आवाहन केले आहे.

नाशिक शहरातील काही भागांमध्ये काल निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे परिस्थिती आटोक्यात आली असली तरी अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी सर्वांनी जागरूक राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र हे सामाजिक सलोख्याचे राज्य आहे. राज्याच्या या समृद्ध परंपरेला धक्का लावणारे कोणतेही कृत्य सहन केले जाणार नाही. कोणत्याही समाज घटकाने कायदा हातात घेऊ नये. काही समस्या असल्यास त्या संवादाच्या माध्यमातून सोडविण्यात याव्यात. येत्या काळात विविध सण येत असून या सर्व उत्सवांमध्ये सर्व समाजांनी सहभागी होऊन ते आनंदाने साजरे करावेत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. आपले सण हे आपल्या सांस्कृतिक वैविध्याचे प्रतीक आहेत. त्यामुळे प्रत्येक समुदायाने इतरांच्या भावना लक्षात घेऊन आपले सण साजरे करावेत, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

राज्य सरकारने सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त, अधीक्षकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून कोणतीही अफवा किंवा खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सोशल मीडियावर देखील कडक नजर ठेवली जात असून, समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट्सवर त्वरित कारवाई केली जाईल. मुख्यमंत्र्यांनी सर्व नागरिकांना एकजुटीने राहण्याचे आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचे आवाहन केले आहे.

००००

भव्य आणि नेटक्या कार्यक्रमाच्या आयोजनाने भगिनी भारावल्या

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना राज्यस्तरीय लाभ वितरण कार्यक्रम

पुणे, दि. १७: राज्यस्तरीय भव्य आणि नेटक्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळणार असल्याने आणि त्यापेक्षाही योजनेचा लाभ देणाऱ्या लाडक्या भावांची भेट होणार असल्याने कार्यक्रमाला आलेल्या महिला भगिनी भारावून गेल्या.

शिवछत्रपती क्रीडा संकुल येथील बॅडमिंटन हॉलमध्ये मुख्य कार्यक्रमाच्या व्यासपीठावर या योजनेच्या लाभार्थी भगिनींना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात हा लाभ वितरण सोहळा दिमाखात पार पडला.

मुख्य मंचासमोर रांगोळीत भव्य राखी साकारण्यात आली होती. मुख्य सभागृहाच्या दोन्ही बाजूच्या हॉलमध्येही महिलांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त बैठक व्यवस्थेसाठी बॅडमिंटन हॉलच्या दोन्ही बाजूसही मोठे हँगर्स उभारण्यात आले. तसेच क्रीडा संकुल परिसरात इतर ठिकाणी उत्कृष्ट अशी बैठक व्यवस्था करण्यात आली. या सर्व महिलांशी थेट संवाद साधण्यासाठी हॉलच्या मध्यातून बनविण्यात आलेल्या उंच पदमार्गावरून जात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही बाजूच्या महिलांशी संवाद साधला. सर्व महिलांनी आपल्या मोबाईलचे दिवे सुरू करून त्यांचे स्वागत केले.

येणाऱ्या प्रत्येक महिलेची प्रवास आणि इतर व्यवस्था प्रशासनाने केली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला येऊनही कुठेही गैरसोय झाली नाही.

योजनेचे आकर्षक सेल्फी पॉइंटही प्रशासनाने प्रवेशद्वारांवर उभारले होते. क्रीडा संकुलाच्या एवढ्या मोठ्या भव्य परिसरात पहिल्यांदाच येण्याची संधी मिळालेल्या महिला उत्साहाने या सेल्फी पॉइंट तसेच ठिकठिकाणी असलेल्या बॅनर्ससमोर सेल्फी घेत होत्या.

 

सांस्कृतिक कार्यक्रमांनी आणली बहार

लोकप्रिय गायक अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत आदींनी सादर केलेल्या एकाहून एक सरस गीतांनी कार्यक्रमात बहार आणली. उपस्थित महिलांनी टाळ्यांच्या कडकडाटात, आपल्या जागी उत्स्फूर्त नृत्य करत या गीतांना आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना दाद दिली.

सासुरवाशीणी आज खऱ्या अर्थाने आल्या माहेरी

यावेळी वैशाली सामंत यांनी कार्यक्रमाला आलेल्या सासुरवाशीणी आज खऱ्या अर्थाने आपल्या माहेरी आलेल्या माहेरवाशिणीसारख्या दिसत असल्याच्या अतिशय समर्पक शब्दात महिलांच्या मनातील भावना व्यक्त केल्या. यावेळी वैशाली सामंत यांनी ‘गुलाबाची कली बघा हलदीनं माखली’,’गोजिरी’, ‘मेरा इंडिया’, ‘ऐका दाजीबा’, आदी सर्वांना भावणारी रंगतदार गीते सादर केली.

अवधूत गुप्ते यांनी ‘एक हजारो मे मेरी बेहना है’ या गाण्याने सुरुवात करताच उपस्थित महिला हळव्याही झालेल्या पाहायला मिळाल्या. मनमोराचा कसा पिसारा फुलला, पोरी जरा हळू हळू चाल, शिवबा राजं नाव गाजं जी आदी गुप्ते आणि बांदोडकर यांनी गणाधीशा मोरया, स्वप्नील बांदोडकर यांनी ‘जहा डाल डाल पर सोने की चिडिया’ यासह गायलेल्या ‘राधा ही बावरी’ या गीताला महिलांनी कोरसची साथ देत उत्स्फूर्त दाद दिली. मुग्धा कराडे यांनी आधुनिक रूपातील छबिदार छबी गीत सादर केले.

सांस्कृतिक कार्यक्रमांचे रंगतदार सूत्रसंचालन टिव्ही कलाकार अभिजित खांडकेकर, अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आदींनी खुसखुशीत शैलीत केले.

देखणे आणि नेटके आयोजन असलेल्या या कार्यक्रमाचा शुभारंभही तेवढाच दिमाखदार झाला. सभागृहाच्या मध्यभागी येऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कळ दाबताच संपूर्ण सभागृह रंगीत पताकांची वृष्टी आणि आकर्षक आतिषबाजीने भरून गेले.

मान्यवरांच्या स्वागताला महिला ढोल पथकाने केलेले सादरीकरण, प्रत्येक महिलेची आवर्जून भेट घेणारे मान्यवर मंत्रीगण, घरगुती सोहळ्याप्रमाणे महिलांचा सहभाग हीदेखील स्मरणात राहणारी क्षणचित्रे होती.

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या नेतृत्वात जिल्हा प्रशासन, महिला व बालविकास विभाग, पुणे व पिंपरी चिंचवड महानगर पालिका, जिल्हा परिषद आदी विभागांनी अतिशय नेटके नियोजन केल्यामुळेच हा सोहळा दिमाखदार झाला.

०००

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमात महिलांचा आनंदोत्सव

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीने भगिनी भारावल्या

यंदाचा रक्षाबंधनाची ओवाळणी कायम स्मरणात राहणार असल्याच्या व्यक्त केल्या भावना

पुणे, दि. १७ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभाच्या निमित्ताने म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीचा परिसर महिला भगिनींनी फुलला होता. सर्वत्र महिलांचे आनंदी आणि उत्साही चेहरे दिसत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीने उपस्थित महिला भगिनी भारवल्या. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळालेली रक्षाबंधनाची ओवाळणी कायम स्मरणात राहणार असल्याच्या भावना यावेळी व्यक्त केल्या. सांस्कृतिक कार्यक्रमाच्यावेळी त्यांनी केलेल्या जल्लोषाने त्यांना झालेला आनंद दिसून आला.

पिंपरीच्या संगीता विलास वाकोडे यांनी मुख्यमंत्र्यांनी रक्षाबंधन सण गोड केला अशा शब्दात उत्स्फूर्तपणे आपल्या भावना व्यक्त केला. मुलांसाठी दोन पैसे अधिक खर्च करता येतील, असे त्या म्हणाल्या.

ढोल ताशांचा गजर, लेझीम पथके, महिलांच्या मनोरंजनासाठी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम आणि संगीताचे सूर असे घरगुती समारंभाचे स्वरुप अनुभवतांना महिलांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. शासनाने सांगितल्याप्रमाणे रक्षाबंधनपूर्वी योजनेत रक्कम जमा झाल्याने शासनाविषयी विश्वासाची भावनाही कार्यक्रमात दिसून आली. आताप्रमाणे दर महिन्यात रक्कम जमा होईल याची खात्री आहे अशा प्रतिक्रिया महिलांनी दिल्या.

राज्यातील महिलांचे आर्थिक स्वावलंबन, आत्मनिर्भर करणे, महिलांचे आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी शासनाने सुरु केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे थेट महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्याने कुटुंबातील आमची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनाने महिलांना दिलेला आधार खूप मोलाचा आहे. लाडक्या बहिणींना हक्काचा आधार दिला असल्याच्या प्रतिक्रियाही महिलांनी दिल्या.

या योजनेंतर्गत पात्र महिलांना प्रतिमाह १ हजार ५०० रुपयांचा लाभ देण्यात येत असून जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे एकत्रित ३ हजार रुपये लाभार्थी भगिनींच्या खात्यावर जमा होण्यास १४ ऑगस्टपासूनच सुरूवात झाली आहे. घरसंसाराला हातभार लावणारी कल्याणकारी योजना सुरु केल्याने शासनाचे आभार मानत व रक्कम जमा झाल्याचा मोबाईल संदेश मोठ्या उत्साहाने महिला एकमेकींना दाखवत होत्या.

मुळशी तालुक्यातील नांदगाव येथून आलेल्या मनीषा वसंत भालेकर म्हणाल्या, मी गृहिणी आहे. या योजनेत मिळालेल्या रकमेमुळे अडचणीच्या वेळेला कुटुंबाच्या खर्चासाठी उपयोग होईल. माझ्या स्वतःसाठीही काही खर्च करता येईल. दर महिन्याला हक्काचे पैसे मिळणार असल्याने आमच्या संसाराला आधार झाल्याचे पेरणेगाव येथून आलेल्या निर्मला कानिफनाथ वाळके यांनी सांगितले. रक्षाबंधनाला मुलांसाठी गिफ्ट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवरीच्या मनीषा सुभाष सावंत यांनी योजनेमुळे मुख्यमंत्र्यांची बहीण झाल्याचा आनंद व्यक्त केला. लसूण विक्रीचा व्यवसाय वाढविण्यास हातभार लागू शकेल याचा आनंद त्यांना होता. शासनाने लाडक्या बहीण योजनेत मला हक्काचे पैसे दिले असून मला बहिणीचा मान दिला आहे. त्या रकमेचा उपयोग मी मुलांच्या शिक्षणासाठी करणार आहे, असे जांभेगावच्या रेश्मा मोहंमद शेख यांनी सांगितले.

आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडीच्या ममताबाई जारकड व रत्नाबाई भोजने या शेतात काम करत असल्याने ही रक्कम आमच्यासाठी खूप मोलाची असल्याचे त्यांनी सांगितले. आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागापर्यंत ही योजना पोहोचली याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अशा अनेक चांगल्या प्रतिक्रिया कार्यक्रमाला आलेल्या महिलांनी व्यक्त केल्या. शासनाची ही भेट त्यांच्यासाठी अमूल्य असल्याचे दिसून आले आणि त्यामुळेच शासनाला त्यांनी धन्यवादही दिले.
000

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांचा दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांबाबत थेट संवाद

0
छत्रपती संभाजीनगर, दि.७, (विमाका) :- छत्रपती संभाजीनगर विभागातील दिव्यांग यांच्या प्रलंबित अडचणी सोडविण्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनाने आवश्यक उपाययोजना करावी, दिव्यांगांच्या अडचणी सोडविण्याला सर्वोच्च प्राधान्य...

केंद्रीय मंत्री डॉ.वीरेंद्र कुमार यांनी साधला जीवन विकास प्रतिष्ठानमधील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद

0
छत्रपती संभाजीनगर, दि.7, (विमाका) :- केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी आज येथील जीवन विकास प्रतिष्ठानला भेट देऊन ज्येष्ठ नागरिकांशी...

१६ वा वित्त आयोग ८ ते ९ मे रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर

0
मुंबई,दि.७ : सोळाव्या वित्त आयोगाचा दोन दिवसीय महाराष्ट्र दौरा   ८ व ९ मे , २०२५ रोजी  नियोजित आहे. आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगरिया यांच्या सह...

राज्यात १६ ठिकाणी सिक्युरिटी मॉक ड्रिल

0
मुंबई, दि. 7: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना बुधवार, दि. 7 मे रोजी विविध...

विरार-डहाणू रेल्वे चौपदरीकरणातील बाधितांना सानुग्रह अनुदान द्यावे  – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. ७ : विरार – डहाणू रोड रेल्वे चौपदरीकरण व रेल्वे कारशेड बांधण्यासाठी प्रकल्पामधील सर्व्हे न. २१६ आसनगाव येथील कुटुंबे बाधित होत आहेत....