सोमवार, मे 12, 2025
Home Blog Page 468

कामगार हितासाठी बामणी प्रोटीन्स कंपनी लवकरात लवकर सुरू करावी – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची व्यवस्थापनाला सूचना

मुंबई, दि. २१ : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील बामणी प्रोटीन्स कंपनी कामगारांच्या हितासाठी सुरू होणे आवश्यक आहे. कामगारांनीही कंपनी व्यवस्थापनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. याबाबतीत राज्य शासन आणि स्थानिक जिल्हा प्रशासनही आवश्यक ते सर्व सहकार्य करेल, असे सांस्कृतिक कार्य, वन आणि मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

मंत्रालयात बामणी प्रोटीन्स कंपनीच्या अनुषंगाने पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी बैठक घेतली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश ढाकणे, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्यासह बामणी प्रोटीन्स कंपनीचे संचालक प्रदीपकुमार,  व्यवस्थापक सतीश मिश्रा यांच्यासह कामगारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, बामणी प्रोटीन्स कंपनी पुन्हा सुरू व्हावी, अशी तेथील कामगारांची मागणी आहे. त्यासाठी कामगार आवश्यक ते सहकार्य करायला तयार आहेत. अशावेळी कंपनीने सकारात्मक पुढाकार घेऊन कंपनी सुरू करण्यासाठी पावले उचलावीत. आवश्यक ते सहकार्य राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन करण्यास तयार आहे. जिल्ह्यातील रोजगार निर्मितीसाठी राज्य शासन पुढाकार घेत आहे. राज्यात अधिकाधिक गुंतवणुक व्हावी, रोजगार निर्माण व्हावा, ही भूमिका आहे. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आणि कामगारांचे हित डोळ्यासमोर ठेवून कंपनी सुरू करण्यास प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने श्री. प्रदीपकुमार यांनी, प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन यासंदर्भात कंपनी संचालक मंडळास वस्तुस्थिती सांगून निश्चित लवकरात लवकर निर्णय घेऊ, असे सांगितले. कंपनी व्यवस्थापनाला आवश्यक ते सर्व सहकार्य  करण्याचे आश्वासन कामगार प्रतिनिधींनी यावेळी दिले.

00000

दीपक चव्हाण/वि.सं.अ

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत महाप्रीत आणि जिल्हा परिषद यांच्या दरम्यान करार

चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना आता सौर ऊर्जेची जोड; राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प

मुंबई, दि. २१:  चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या २० ग्रामीण प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना आता सौर ऊर्जेची जोड मिळणार आहे. त्यामुळे विजेच्या बिलामध्ये बचत होणार आहे. सांस्कृतिक कार्य, वन आणि मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा आणि पायाभूत प्रौद्योगिकी (महाप्रीत) आणि जिल्हा परिषद, चंद्रपूर यांच्या दरम्यान यासंदर्भातील करार करण्यात आला. राज्यातील अशा प्रकारचा हा पहिला प्रकल्प आहे, पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प आकाराला येत आहे.

मंत्रालयात पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत महाप्रीतचे व्यवस्थापकीय संचालक बिपिन श्रीमाळी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी या करारावर सह्या केल्या. यावेळी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, महाप्रितचे संचालक दिनेश इंगळे, प्रकल्प संचालक राधाकृष्ण मूर्ती, जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे,  सल्लागार  श्रीनिवास देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, जिल्ह्यातील ग्रामीण प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांसाठी हा करार अतिशय उपयुक्त ठरणार आहे. अनेक ठिकाणी केवळ वीज बिल थकीत असल्याने पाणीपुरवठा योजना बंद पडल्याचे आपण पाहतो. त्यामुळे तेथील नागरिकांना पाणी उपलब्ध असूनही पाणी समस्येचा सामना करावा लागतो. आता महाप्रित आणि जिल्हा परिषद यांच्यातील करारामुळे वीज बिलामध्ये बचत तर होणार आहे, त्याचबरोबर नियमित पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.

सध्या जिल्ह्यातील २० प्रादेशिक पाणीपुरवठा योजना यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पाच वर्ष त्याची देखभाल आणि दुरुस्ती महाप्रीतच्या माध्यमातून केली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

00000

दीपक चव्हाण/वि.सं.अ

महाराष्ट्रातील पहिल्या ‘राज्यगीत’ शिल्पाचे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते अनावरण

मुंबई दि. 21 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते राज्यगीत शिल्पाचे अनावरण करण्यात आले.

महाराष्ट्राचे राज्यगीत या शिल्पावर कोरले असून, महाराष्ट्रात असे शिल्प प्रथमच उभारण्यात आले आहे. मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीमार्फत नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात हे शिल्प स्थापित करण्यात आले आहे.

आपल्या राज्यगीताला एक सुवर्ण इतिहास आहे, महाराष्ट्राविषयी अभिमान जागवण्याची ताकद या सुरांमध्ये आहे, आणि आपल्या राज्याची महती सांगणारे हे शब्द प्रत्येकाच्या मनात वर्षानुवर्षे घर करून आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात शिल्पाची स्थापना करण्याचा मुख्य उद्देश नागरिकांना महाराष्ट्राच्या गौरवाची सतत आठवण करून देण्याचा असल्याचे पालकमंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या वाटेवर हे गीत प्रेरणेचा स्रोत म्हणून सोबत राहील असा विश्वास पालकमंत्री लोढा यांनी यावेळी व्यक्त केला.

दि. २१ ऑगस्ट २०२४ रोजी क्रांतिदिनीमित्त पालक मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते संजय गांधी नॅशनल पार्कच्या मुख्यद्वारापाशी 75 फुटी राष्ट्रध्वज स्तंभाचे अनावरण करण्यात आले. जेणेकरून मुंबई उपनगर परिसरात येताना प्रत्येकाला आपला ध्वज दिसेल आणि स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण राहील. त्याचप्रमाणे आता जिल्हाधिकारी कार्यालयात निर्माण करण्यात आलेल्या या शिल्पामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी झटणाऱ्या, बलिदान देणाऱ्या विभूतींची आठवण सदैव आपल्या सोबत राहील. देशाचा अभिमान आणि राज्याचा गौरव जपण्यासाठी मुंबई उपनगरात पालकमंत्री श्री. मंगल प्रभात लोढा यांच्या माध्यमातून, विविध प्रयत्न केले गेले आहेत आणि करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत यावेळी देण्यात आली.

0000

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना : अंशत: रद्द अर्जाची त्रुटी पूर्तता करून अर्ज पुन्हा दाखल करण्याचे आवाहन

मुंबई दि. २१ : मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनाअंतर्गत दि. ०९ ऑगस्ट, २०२४ पर्यंत मुंबई शहर जिल्ह्यातील ९२९४ इतके Disapproved म्हणजे अंशतः रद्द केलेले अर्ज त्रुटी पूर्तता करुन Online Resubmit करणे प्रलंबित आहेत. तरी सर्व संबधितांनी  तातडीने योग्य त्या दुरुस्त्या करुन Disapproved अर्ज Resubmit करावे, जेणेकरुन त्यांची पडताळणी करुन पात्र लाभार्थीना तातडीने लाभ देणे सोईचे होईल. कोणताही पात्र लाभार्थी मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, असे आवाहन मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व संबंधितांना जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नारीशक्ती दूत या मोबाईल अॅपवरुन ज्यांनी स्वतःचे वा अन्य लाभार्थीचे अर्ज केले असतील अशा सर्व १. महिला २. समूह संसाधन व्यक्ती ३. बचत गट अध्यक्ष ४. बचतगट सचिव ५. गृहिणी ६. अंगणवाडी सेविका/मदतनीस ७. ग्रामसेवक ८. वॉर्ड अधिकारी ९. सेतू १०. बालवाडी सेविका ११. आशा सेविका १२. पर्यवेक्षिका (मुख्यसेविका) १३. CMM2 १४. मदतकक्ष प्रमुख यांना आवाहन करण्यात येते की, नारीशक्ती दूत अॅप मधील आपल्या प्रोफाईलला लॉगीन करुन यापूर्वी केलेले अर्ज या टॅगवर क्लिक करुन आपल्याद्वारे सबमिट केलेले संपूर्ण अर्जाची यादी पाहू शकता. त्यामुळे Aprroved, Disapproved, Pending, Rejected असे शेरे आणि लाभार्थीचे नाव, मोबाईल नंबर सुद्धा पाहता येतील.

सर्व संबंधितांनी Disapproved असलेल्या सर्व लाभार्थ्यांना संपर्क करुन अंशतः अर्ज रद्द होण्याचे कारण View Reason या टॅबवर बघून त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन Edit Form टॅबवर जाऊन यापूर्वी केलेल्या नोंदी चुकीच्या असतील तर त्या दुरुस्त करुन Form Submit करावा, यामध्ये फक्त Form एकदाच Edit करता येईल, याची नोंद घ्यावी. असे मुंबई शहरच्या जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तथा मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना जिल्हा समन्वय अधिकारी शोभा शेलार यांनी कळविले आहे.

0000

जत २९ गावे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसाठी २०५ कोटी रुपये उपलब्ध – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

पाण्याचे शाश्वत स्त्रोत निश्चित करून कामे मार्गी लावण्याचे निर्देश

जलजीवन मिशन अंतर्गत धुळे, नाशिक जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनातील कामांना गती द्यावी

मुंबई, दि. २१ : जत २९ गावे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसाठी २०५ कोटी रुपये उपलब्ध असून पाण्याचे शाश्वत स्त्रोत निश्चित करून कामे मार्गी लावावीत. जलजीवन मिशन अंतर्गत धुळे व नाशिक जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनातील कामांना गती द्यावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

विविध जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांतील कामांच्या स्वतंत्र आढावा बैठका मंत्रालय येथे झाल्या. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, आमदार विक्रम सावंत यांच्यासह प्रधान सचिव संजय खंदारे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, कार्यकारी अभियंता श्रीमती पलांडे, कार्यकारी अभियंता विजय वाईकर, एस. सी. निकम  यांच्यासह संबंधित गावातील लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते. सांगली जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. पाटोळे दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

पाणीपुरवठा मंत्री श्री.पाटील यांनी पाणीपुरवठा योजनातील जल जीवन मिशन अंतर्गत सुरु कामांविषयी लोकप्रतिनिधींकडून आलेल्या सूचनांची दखल  घेतली. श्री. पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ प्रकल्प अंतर्गत जत 29 गावांसाठी सुरू असलेल्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 205 कोटी रुपये निधी मंजूर आहे. 29 गावांपैकी ज्या गावांना शाश्वत स्रोत नाहीत त्या गावांसाठी पाण्याचे शाश्वत स्त्रोत निश्चित करून कामे पूर्ण होण्यासाठी गती दिली जावी. संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी एकत्रित चर्चा करून बाबी निश्चित कराव्यात. ग्रामपंचायतीकडून स्वीकृती व लोकवर्गणी ठरावाबाबत अडचण येणाऱ्या गावातील अडथळे दूर करण्यात यावे असे सांगितले.

यावेळी श्री. पाटील यांनी धुळे जिल्ह्यातील  कापडणे, सोनगीर, बेटावद, मसदी, सामोडे आणि जिल्हा परिषद अंतर्गत सुरू असलेल्या  जल जीवन मिशन अंतर्गत कामांचा स्वतंत्र आढावा घेतला. शिथिलता आलेल्या कामांना गती देण्यासाठी अधिकाऱ्यांनी अशा ठिकाणी सतत भेट देऊन वेळेत कामे व्हावी त्यासाठी पाठपुरावा करावा अशा सूचना श्री. पाटील यांनी यावेळी दिल्या.

शिंदखेडा व येवला तालुक्यातील कामांची स्थिती असमाधानकारक असून शिंदखेडा येथील काम सहा महिन्यापासून बंद आहे, याबाबत नाराजी व्यक्त करून संबंधित कंत्राटदारास नोटीस बजावून  पुढील कारवाई करण्याचे, निर्देश मंत्री श्री. पाटील यांनी दिले.

सोनगीर येथील काम या महिन्याअखेरीस पूर्ण होणार आहे. तर मसदी येथील दोन तीन महिन्यात पूर्ण होईल. धुळे जिल्हा परिषद अंतर्गत 560 कामे पूर्ण झाले असून “हर घर नल से जल” साठी घोषित करण्यात आली आहे यापैकी 104 कामे प्रमाणित झाली आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

0000

किरण वाघ/विसंअ/

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात – पालकमंत्री दादाजी भुसे  

बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमिवर सुरक्षा योजनांचा घेतला आढावा

 नाशिकदि२० ऑगस्ट२०२४ (जिमाकावृत्तसेवा) : बदलापूर येथील अनुचित घटनेच्या पार्श्वभूमिवर शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षेबाबत संबंधित यंत्रणांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज दिले.

बदलापूर येथील अनुचित घटनेच्या पार्श्वभूमिवर पालकमंत्री दादाजी भुसे यांनी वेळीच खबरदारी म्हणून जिल्ह्यात अशी घटना घडू नये यासाठी शिक्षण संस्था व शाळांमध्ये करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा तात्काळ आढावा घेतला. तसेच संस्थाचालक, प्राचार्य यांच्याशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली.

नियोजन भवन सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) विक्रम देशमाने, प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांच्यासह शिक्षणसंस्था चालक, प्राचार्य, शिक्षक उपस्थित होते.

बदलापूर येथील अनुचित घटना दुर्दैवी असल्याचे सांगून पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, शालेय विद्यार्थ्यांच्या विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजनांसंदर्भात शासन स्तरावरून वेळोवेळी आदेशित करण्यात आले आहे. या अनुषंगाने शाळा व परिसरात सीसीटीव्ही लावावेत. तक्रार पेटी बसवावी. विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठण करावे. याच बरोबर प्रशासनाकडून शाळा परिसरात शाळा भरताना व सुटताना पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यासाठी महानगरपालिका शिक्षण विभाग, जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांनी पोलीस प्रशासनाशी समन्वय साधावा. पोलीस विभागाला जिल्हा नियोजन समितीमधून वाहने उपलब्ध करून दिली आहेत. आवश्यकतेनुसार पोलिसांनी गस्त घालावी. दामिनी पथकांनी प्रभावी कामगिरी करावी. तसेच संस्थाचालकांनी खाजगी सुरक्षा नेमण्यापूर्वी त्यांची चारित्र्य पडताळणी करून घ्यावी, असे त्यांनी यावेळी सूचित केले. अनुदानित शाळांतील रिक्त पदे भरण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तसेच, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व शिक्षण विभागाने त्यांना नेमून दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे त्यांनी सूचित केले.

000

विद्यार्थ्यांच्या सुरक्षा उपाययोजनांशी तडजोड नाही – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत शासन निर्णय जारी

मुंबई, दि. 21 – शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांची सुरक्षा देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यासाठीच्या  उपाययोजनांसंदर्भात शासनस्तरावरून वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आले असून या उपायोजनांशी तडजोड केली जाणार नाही, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने अलिकडील काळात काही अनुचित घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच काही नवीन उपाययोजना लागू करण्याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.

शाळा व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे

शाळा व परिसरात विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा हा उत्तम पर्याय असून खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांकरिता येत्या एक महिन्यात मोक्याच्या ठिकाणी पर्याप्त संख्येने सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक राहील, तर शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत अशा शाळांनी प्राधान्याने कॅमेरे बसविण्याबाबत कार्यवाही करणे आवश्यक आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत पायाभूत सुविधांचे निर्माण या घटकांतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पाच टक्के प्रमाणात राखीव ठेवण्यात आलेल्या निधीचा वापर करता येणार आहे. शाळा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ठराविक अंतराने तपासणे आवश्यक असून अशा फुटेजमध्ये आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास त्यावर योग्य कार्यवाही करण्याची जबाबदारी विशेषत्वाने मुख्याध्यापकांची आणि सर्वसाधारणपणे शाळा व्यवस्थापन समितीची असेल.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी

नियमित कर्मचाऱ्यांबरोबरच बाह्य स्त्रोतांद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने केल्या जाणाऱ्या नेमणुकांबाबत शाळा व्यवस्थापनामार्फत काटेकोर तपासणी होणे आवश्यक आहे. यासाठी नेमणुकीपूर्वी चारित्र्य पडताळणी अहवाल स्थानिक पोलीस यंत्रणेमार्फत प्राप्त करून घेणे आवश्यक राहणार आहे. त्याचप्रमाणे नेमणुकीनंतर संबंधित व्यक्तीच्या छायाचित्रासह त्याची सर्व तपशीलवार माहिती स्थानिक पोलीस यंत्रणांकडे देणे आवश्यक राहील. शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त करताना सहा वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, असेही सूचविण्यात आले आहे.

तक्रार पेटी

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत करावयाच्या ठोस उपाययोजनांचा भाग म्हणून शाळांमध्ये तक्रार पेटी बसविण्याबाबत 5 मे 2017 रोजी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. यासंदर्भात शाळा व्यवस्थापनावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. तक्रारपेटी उघडण्याबाबत तसेच त्यात प्राप्त झालेल्या तक्रारीवर करावयाच्या कार्यवाही संदर्भात या परिपत्रकान्वये सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. या तक्रार पेटीचा वापर प्रभावीपणे होतो किंवा कसे याची तपासणी होणे आवश्यक असून ही जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकाची असणार आहे.

सखी सावित्री समिती

शाळा, केंद्र, तालुका अथवा शहर साधन केंद्र या स्तरावर 10 मार्च 2022 च्या परिपत्रकान्वये सखी सावित्री समितीचे गठन करण्यात आले आहे. यानुसार समितीने करावयाची कार्य तपशीलवारपणे नमूद करण्यात आली असून राज्यातील समित्यांनी त्यांना नेमून दिलेले कार्य विहित कालावधीत पार पाडणे आणि त्यांचा नियमित आढावा घेणे आवश्यक आहे.

विद्यार्थी सुरक्षा समितीचे प्रस्तावित गठन

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने अनुचित प्रकारांचे समूळ उच्चाटन होणे आवश्यक आहे. यासाठी ज्या प्रकारे कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाबाबतच्या तक्रारींच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात आल्या आहेत, त्याचप्रकारे शालेय विद्यार्थ्यांच्या प्रकरणी देखील अशा उपाययोजना होणे गरजेचे आहे. यासाठी शाळास्तरावर शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावरून ‘विद्यार्थी सुरक्षा समिती’चे गठन एक आठवड्यात करण्यात यावे, जेणेकरून ही समिती वेळोवेळी विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या समजावून घेऊ शकेल.

राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात करण्यात आलेल्या उपाययोजनांचा राज्यस्तरावर आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता प्रदान करण्यात आली आहे. या समितीमध्ये महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक, शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), तसेच शालेय शिक्षण आयुक्त यांनी नामनिर्देशित केलेल्या शालेय शिक्षण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या गट-अ मधील दोन महिला अधिकारी हे सदस्य असतील. तर, शालेय शिक्षण आयुक्त कार्यालयातील सहसंचालक (प्रशासन) हे या समितीचे सदस्य सचिव असतील.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या संदर्भातील उपाययोजनांचा गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक) यांनी अनुक्रमे महिन्यातून एकदा व दोन महिन्यातून एकदा आढावा घ्यावा. यासाठी आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांचे व पालकांचे जबाब नोंदवावेत. याबाबतचा अहवाल राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती सादर करावा. राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समितीने तीन महिन्यातून एकदा शैक्षणिक विभागनिहाय उपरोक्त उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घ्यावा आणि त्याबाबतचा अहवाल शासनास वेळोवेळी सादर करावा. याबाबतची जबाबदारी शालेय शिक्षण आयुक्त यांची राहणार आहे.

शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत अनुचित प्रकार घडल्याचे उघड झाल्यानंतर संबंधित शाळा व्यवस्थापन/ संस्था/ मुख्याध्यापक/ शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांनी सदर बाब 24 तासाच्या आज संबंधित शिक्षणाधिकारी यांना कळवावी. अशी अनुचित घटना कोणत्याही प्रकारे दडवून ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्ती अथवा संस्था गंभीर शास्तीस पात्र ठरतील, असेही या शासन निर्णयाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

[pdf-embedder url=”https://mahasamvad.in/wp-content/uploads/2024/08/शाळांमध्ये-करावयाच्या-उपाययोजना-21-ऑगस्ट-2024.pdf” title=”शाळांमध्ये करावयाच्या उपाययोजना 21 ऑगस्ट 2024″]

00000

शहरी भागातील बांधकाम परवानगीच्या अडचणींबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार – आदिवासी विकासमंत्रीडॉ. विजयकुमार गावीत

नंदुरबार, दिनांक 21 ऑगस्ट, 2024 (जिमाकावृत्त) जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात बांधकाम परवानगीसाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी आज केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात नगरपालिका क्षेत्रात बांधकाम परवानगीबाबत आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपविभागीय अधिकारी विनायक महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष भामरे, नगरपालिका प्रशासन अधिकारी नितीन कापडणीस, नगर रचना सहायक संचालक महेंद्र परदेशी, ऑर्कीटेक, ठेकेदारआदि उपस्थित होते.

यावेळी आर्कीटेक व ठेकेदार यांनी ऑनलाईन परवानगीसाठी 3 ते 4 महिने लागत असून प्रणालीमध्ये वेळोवेळी अडचणी उद्भवत असल्यामुळे शहरी व ग्रामीण भागासाठी कायमस्वरुपी तांत्रिक अभियंतायांची नेमणूक करावी. तसेच ऑनलाईन प्रणाली सुरळीत होत नाही तोपर्यंत ऑफलाईन परवानगी देण्याबाबत मागणी केली.

आदिवासी विकास मंत्री डॉ.गावित यांनी यावेळी समस्या एकूण त्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करु नये त्या आठ दिवसात त्या सोडविण्यात येतील अशी ग्वाही यावेळी दिली.

 

000

मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत होणारे महाशिबिर यशस्वी करावे – पालकमंत्री दादाजी भुसे

तयारीचा आढावा घेऊन कार्यक्रमस्थळाची केली पाहणी

नाशिक, दि. २० ऑगस्ट, २०२४ (जि. मा. का. वृत्तसेवा) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत होणारे महाशिबिर संवेदनशीलतेने व जबाबदारीने सूक्ष्म नियोजन करून यशस्वी करावे, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज दिले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या योजनेसह महिलांविषयक अन्य कल्याणकारी योजनांच्या लाभार्थींशी संवाद व योजनांची प्रचार प्रसिद्धी होण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत शुक्रवार, दि. २३ ऑगस्ट रोजी सिटी बस लिंक डेपो शेजारील मैदानात हे महाशिबिर होत आहे. या महाशिबिरासाठी जवळपास ५० हजार लाभार्थी उपस्थित राहण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन नियोजन करत आहे. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी महाशिबिराच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला.

नियोजन भवन सभागृहात झालेल्या या बैठकीस खासदार शोभा बच्छाव, आमदार सीमा हिरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, महानगरपालिका अतिरीक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्यासह संबंधित सर्व यंत्रणांचे प्रमुख उपस्थितीत होते.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास ११ लाखहून अधिक लाभार्थी नोंदणी झाल्याबद्दल समाधान व्यक्त करुन पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, उपस्थित महिलांना शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती होण्यासाठी फलक लावावेत. त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी कार्यक्रमस्थळाजवळ शिबिर आयोजित करावे. या महिलांची कसल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, यासाठी विशेष खबरदारी घ्यावी. पार्किंगची सुव्यवस्थित आखणी करावी. शहर व जिल्ह्यातून या कार्यक्रमासाठी बसेस येणार आहेत. त्या अनुषंगाने शहर व ग्रामीण वाहतुकीचे नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यावेळी महाशिबिरासाठी नियुक्त नोडल अधिकाऱ्यांनी त्याना नेमून दिलेल्या कामासंदर्भात केलेल्या नियोजनाची सविस्तर माहिती सादर केली.

कार्यक्रमस्थळाची केली पाहणी

दरम्यान बैठकीपूर्वी पालकमंत्री श्री. भुसे यांनी कार्यक्रमस्थळास भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी मुख्य सभा मंडप, मान्यवर पार्किंग, त्याचबरोबर लाभार्थी व नागरिकांची बैठक व्यवस्था, दिव्यांगांसाठी रॅम्पची व्यवस्था, शासकीय विभागांमार्फत तसेच बचतगटामार्फत लावण्यात येणारे विविध स्टॉल, वाहन पार्किंग व्यवस्था आदिंची पाहणी केली.

यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी लाभार्थ्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकरिता आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या व सोईसुविधा पुरविण्याच्या सूचना सर्व विभागाच्या संबंधितांना दिल्या. तसेच वाहनतळ व्यवस्था व लाभार्थ्यांच्या वाहतूक व्यवस्थेबरोबरच पिण्याचे पाणी, शौचालय सुविधा आदिबाबत संबंधितांना सूचना केल्या.

00000

स्वदेशीचा पुरस्कार केल्यामुळे विकास शाश्वत होईल – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

राज्यपालांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय उद्योजकता दिन संपन्न

मुंबई, दि. २१ : गेल्या दहा वर्षात भारत जगातील पाचव्या क्रमांकाची महासत्ता झाला असून २०३० पर्यंत तिसरी मोठी महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी स्वदेशीचा स्वीकार केला जात असून स्वदेशीचा पुरस्कार केल्यामुळे विकास शाश्वत व सर्वसमावेशक होईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

आंतरराष्ट्रीय उद्योजकता दिनानिमित्त राज्यपाल राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. २१) मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे ‘उद्योजकता प्रोत्साहन’ संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

संमेलनाचे आयोजन आंतरराष्ट्रीय वैश्य महासंमेलन, मुंबई व स्वदेशी जागरण मंच, कोकण यांच्या वतीने करण्यात आले.

स्वदेशी संकल्पनेचा पुरस्कार लोकमान्य टिळक, महात्मा गांधी या नेत्यांनी केल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात स्वदेशीला चळवळीचे रूप आले. आज उत्पादन व सेवा क्षेत्रात भारत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करीत आहे. उत्पादनासह देश तंत्रज्ञानात देखील आत्मनिर्भर होत आहे. मात्र, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अत्युच्च गुणवत्ता व स्पर्धात्मक मूल्य ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

एकेकाळी अन्नधान्य आयात करणारा भारत आज अनेक क्षेत्रात निर्यातदार झाला आहे असे सांगून सर्वांनी सशक्त भारत निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन राज्यपालांनी केले.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते युवा उद्योजक डॉ. दिव्या राठोड व निकुंज मालपाणी यांचा सत्कार करण्यात आला.

राज्यपालांच्या हस्ते ‘३७ कोटी स्टार्ट अप्सचा देश’ आणि ‘मंदिर अर्थशास्त्र’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाला स्वदेशी जागरण मंचचे अखिल भारतीय सह-संयोजक अजय पत्की, रा.स्व. संघाचे मुंबई विभाग संघचालक रवींद्र संघवी, आंतरराष्ट्रीय वैश फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप माहेश्वरी आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईचे अध्यक्ष विजय कलंत्री उपस्थित होते.

0000

Swadeshi will make economic development sustainable

– C P Radhakrishnan

 

Mumbai dated 21 : Maharashtra Governor C P Radhakrishnan today said that India is aspiring to become a developed nation by 2047. Stating that the Government is providing strong impetus to Make in India, he said Swadeshi will make economic development of the nation sustainable.

 

The Governor was speaking at the ‘Entrepreneurship Promotion Programme’ on the occasion of World Entrepreneur Day at World Trade Centre in Mumbai on Wed (21 Aug).

 

The programme was jointly organised by the International Vaish Federation and Swadeshi Jagran Manch, Mumbai.

 

The Governor felicitated young entrepreneurs Dr Divya Rathod  and Nikunj Malpani on the occasion.

 

The Governor also released two books ’37 Crore Start Ups Ka Desh’ and ‘Temple Economics’ on the occasion.

 

Ajay Patki, All India Co-Convenor of Swadeshi Jagran Manch (SJM), Konkan, Ravindra Sanghvi, Vibhag Sanghachalak (RSS) Mumbai, Dilip Maheshwari, President, International Vaish Federation and Vijay Kalantri, President, World Trade Centre Mumbai were present.

0000

ताज्या बातम्या

जिल्ह्यात २८ शहीद स्मारके उभारणार  – पालकमंत्री गुलाबराव पाटील

0
▪️ भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या जवानांकडून ‘गौरव सलामी’ जळगाव, दि. ११ (जिमाका): मातृभूमीसाठी प्राणार्पण करणाऱ्या 9 वी वाहिनी, भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या शहीद जवान सुनील...

नागपूर येथे लवकरच जागतिक दर्जाच्या वेल्डिंग इन्स्टीट्यूटची पायाभरणी –  कामगार मंत्री आकाश फुंडकर

0
नागपूर, दि. ११: बॉयलर हा औद्योगिक क्षेत्राचा आत्मा आहे. बॉयलरच्या कार्यक्षमतेवर उत्पादन खर्च अवलंबून असतो. याची कार्यक्षमता ही बॉयलरच्या निर्मितीशी निगडीत असून परिपूर्ण कौशल्य...

गोमाता संवर्धनाशिवाय नैसर्गिक शेतीला गती नाही — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
‘गोवर्धन गोशाळा कोकण’ प्रकल्पाचे उद्घाटन सिंधुदुर्गनगरी, दि. ११ : शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी देशी गायींचे संवर्धन महत्त्वाचे असून, गोमातेचे संवर्धन केल्याशिवाय नैसर्गिक शेतीला गती मिळणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पुढील पिढ्यांना स्फूर्तिदायक  -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
विक्रमी वेळेत आकर्षक पुतळ्याची उभारणी परिसराचा विकास करुन पर्यटनाला चालना सिंधुदुर्गनगरी, दि. ११ (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज महान योद्धा होते. त्यांचे विचार सर्वांसाठी...

निवडणूक आयुक्तांचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाशी संवाद

0
मुंबई दि. ११:  मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू व डॉ. विवेक जोशी यांनी आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे...