गुरूवार, मे 15, 2025
Home Blog Page 467

द्राक्ष बागायतदारांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार-उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या द्राक्ष परिषद २०२४ परिषदेची सांगता

पुणे,दि.२६: राज्य शासनाच्यावतीने द्राक्ष बागायतदारांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. वाकड येथे २४ ते २६ ऑगस्ट या कालावधीत आयोजित द्राक्ष परिषदेचा समारोप उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार, उपाध्यक्ष कैलास भोसले, खजिनदार सुनील पवार, माजी अध्यक्ष सुभाष आर्वे यावेळी उपस्थित होते.

जवळपास एकवीस हजार सभासद संख्या असलेल्या या संघाच्या वार्षिक बैठकीला कधी काळी आपण द्राक्ष उत्पादक म्हणून उपस्थित होतो असे सांगून, उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, तीन दिवसीय द्राक्ष परिषदेच्या माध्यमातून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने चर्चा केली आणि त्यांच्या समस्यांचा आढावा घेतला. हा संवाद असाच पुढे सुरू ठेवावा. विविध पिकांसाठी पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये द्राक्ष पीकाचा समावेश करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.

शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी विविध योजना राबविण्यात येतात.  मागेल त्याला सौरपंप  योजना अर्थसंकल्पामध्ये जाहीर केली असून त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. कृषी वाहिन्यांचे सौर उर्जिकरण करण्यात येत आहे. सौर कृषी पंप प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यावर वीजचे दर कमी होण्याबरोबर या योजनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सात हजार कोटी रुपये खर्चाच्या नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्पाला शासनाने मान्यता दिली असून नाशिक, जळगांव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. नवनवीन तंत्रज्ञान आणि शेती अवजारांचा शेतकऱ्यांनी वापर करुन शेतीची कामे करावी असे आवाहन त्यांनी केले.

द्राक्ष निर्यातीसाठी अमेरिकेची बाजारपेठ मोठी असल्याने अमेरिकेत द्राक्ष निर्यात करणे, द्राक्ष वाहतूकीसाठी रेल्वेचे जाळे उभारणे, द्राक्षावर प्रक्रिया केल्यानंतर लागू होणारा जीएसटी कमी करणे, हळदी पिकाप्रमाणे बेदाण्यावर जीएसटी आकारणी, २००९-१० साली युरोपमध्ये निर्यात केलेल्या परंतु, नाकारण्यात आलेल्या द्राक्षांसाठी नुकसान भरपाई देणे हे प्रश्न केंद्र शासनाच्या कक्षेतील असून, केंद्रीय वाणिज्य मंत्री तसेच अन्य संबधित मंत्र्यांसमवेत यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात येईल आणि द्राक्ष उत्पादकांच्या समस्या सोडविण्यात येतील असे आश्वासन श्री.पवार यांनी दिले.

केंद्र शासनाची लखपती दीदी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे दीड हजार रुपयांची मदत अशा महत्त्वाच्या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात येणार असून, महिलांना कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्याबरोबरच आर्थिक उन्नती साधता येणार असल्याचे सांगून, पात्र महिलांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री.पवार यांनी केले.

यावेळी यशस्वी द्राक्ष उत्पादकांचा प्रातिनिधीक स्वरुपात उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी  प्रास्ताविक केले. महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर द्राक्षे निर्यात होतात, त्यापासून जवळपास ३ हजार ५०० रुपयांचे परकीय जलन प्राप्त होते अशी माहिती त्यांनी दिली.

बैठकीला द्राक्ष उत्पादक शेतकरी, शेतीसाठी आवश्यक अवजारे आणि औषधांचे उत्पादक, शेतकरी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

शिक्षण विभागासाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करणार -शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

बदलापूर आदर्श विद्यामंदिर प्रकरणी शिक्षण विभागाचा प्राथमिक अहवाल सादर

मुंबई, दि. २६ : बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिरमध्ये घडलेल्या दुर्देवी घटनेच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने नेमलेल्या शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष यांच्या समितीचा प्राथमिक अहवाल शासनास सादर झाला आहे. या अहवालातील निरीक्षणे तपास यंत्रणांना सादर करण्यात येणार असून शिक्षण विभागाअंतर्गत स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

शिक्षण विभागाच्या वतीने बदलापूर येथील आदर्श विद्या मंदिर शाळेमध्ये घडलेल्या घटनेसंदर्भात राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शाह यांच्या उपस्थितीत शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी चौकशी केली. हा चौकशी अहवाल सादर झाल्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना शालेय शिक्षण मंत्री श्री.केसरकर म्हणाले, या अहवालातील निरीक्षणांनुसार अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत सेविका असणे आवश्यक होते. त्यांना चौकशीदरम्यान आपले म्हणणे मांडण्याची संधी असताना त्या अनुपस्थित राहिल्याने त्यांचे काही म्हणणे नाही असे गृहीत धरुन त्यांना या प्रकरणी सहआरोपी करण्याची त्याचप्रमाणे ज्यांना या घटनेची माहिती मिळाली त्यांनी ती तातडीने वरिष्ठांना कळविली किंवा नाही, याचा तपास करण्याची शिफारस तपास यंत्रणांना करण्यात येत आहे. या अनुषंगाने शाळेतील संबंधित शिक्षिका, मुख्याध्यापक यांना नोटीस देण्यात येणार आहे. घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, दोषी ठरलेल्यांना पाठिशी घातले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुलींच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी शिक्षण विभागाने घेतली असल्याची माहिती मंत्री श्री.केसरकर यांनी यावेळी दिली.

शाळांच्या सुरक्षेसाठी आणि मुलांच्या संरक्षणासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये सीसीटीव्ही लावणे, त्याचे रेकॉर्ड्स सुरक्षित ठेवणे आदींचा समावेश आहे. शाळांमध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. महिलांवरील अन्याय टाळण्यासाठी मोबाईलवर पॅनिक बटन देता येईल, यासाठी महिला व बालविकास तसेच गृहविभागामार्फत निर्णय घेण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांमध्ये असे बटण देता येईल, यासाठी निर्णय घेतला जाईल, असे श्री.केसरकर यांनी सांगितले.

०००

बी.सी.झंवर/विसंअ

 

 

राज्यातील लोकसेवा हक्क कायदा क्रांतिकारी – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

??????????????????????????

मुख्य आयुक्तांसह सर्व राज्य सेवा हक्क आयुक्तांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र राज्याने पारित केलेला व सामान्य जनतेला विविध प्रकारच्या सेवा पारदर्शी पद्धतीने व कालमर्यादेत देणारा लोकसेवा हक्क कायदा अत्यंत क्रांतिकारी आहे. अशा प्रकारचा जनहिताचा कायदा अनेक राज्यांनी केला असला तरीही महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होत आहे ही अभिमानास्पद बाब असून सामान्य जनतेला सेवा देण्यासाठी सुरु केलेले ‘आपले सरकार’ पोर्टल अद्ययावत करण्याबाबत कार्यवाही सुरु असल्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले.

राज्याचे मुख्य लोकसेवा हक्क आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी राज्यातील सर्व विभागीय राज्य लोकसेवा हक्क आयुक्तांसह आज राज्यपालांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

राज्यात लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून जनतेला उत्कृष्ट सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांना सन्मानित करण्याची तरतूद कायद्यात असल्याची दखल घेऊन संबंधित तरतुदीची अंमलबजावणी करण्याची सूचना देखील आपण सरकारला करू असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

आपले सरकार पोर्टल २०१५ मध्ये तयार केले असून ते अद्ययावत करण्याबाबत कार्यवाही सुरु असल्याचे श्रीवास्तव यांनी सांगितले. त्यामुळे आपला अर्ज नेमका कुठे आहे याची माहिती जनतेला मोबाईलवरून देखील अचूक मिळू शकेल. भारत सरकार देखील राज्य सेवाहक्क कायद्याप्रमाणे केंद्र शासनाच्या सेवा जनतेला विनाविलंब उपलब्ध करून देण्याबद्दल कायदा करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

शासनाकडे आयोगाच्या स्थापनेपासून प्राप्त अर्जांपैकी ९५ टक्के अर्ज निकाली काढण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी श्रीवास्तव यांनी राज्यपालांना आयोगाच्या २०२२-२३ मध्ये विधानमंडळाला सादर केलेल्या अहवालाची प्रत सादर केली.

यावेळी लोकसेवा हक्क आयोगाचे राज्य आयुक्त दिलीप शिंदे (पुणे), बलदेव सिंह (कोकण), अभय यावलकर (नागपूर), डॉ. किरण जाधव (छत्रपती संभाजीनगर), डॉ. नारुकुला रामबाबू (अमरावती), चित्रा कुलकर्णी (नाशिक) तसेच सेवा हक्क आयोगाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

०००

 

कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा विद्यापीठास समूह विद्यापीठाचा दर्जा

मुंबई, दि. २६ : कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर येथील वारणा विद्यापीठास समूह विद्यापीठाचा दर्जा देण्याचा निर्णय २५ ऑगस्ट २०२४ रोजी  झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत  घेण्यात आला.या समूह विद्यापीठात तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, वारणानगर या प्रमुख महाविद्यालयासह यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, वारणानगर, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर, तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी, वारणानगर, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर- या महाविद्यालयांच्या समावेशासह समूह विद्यापीठ स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली.

समूह विद्यापीठामध्ये समाविष्ट यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, वारणानगर या अनुदानित महाविद्यालयाचे अनुदान विद्यापीठ स्थापन होण्याच्या दिनांकास त्यांना मंजूर असलेल्या शिक्षक, शिक्षकेतर पदांसह पुढे सुरु राहण्यास मान्यता देण्यात आली. या समूह विद्यापीठातील विनाअनुदानित महाविद्यालयांना वित्तीय सहाय्य मिळणार नाही, यास मान्यता देण्यात आली. तसेच  सांविधिक पदांच्या वेतनासाठी तसेच विद्यापीठाचा प्रशासकीय खर्च भागविण्यासाठी राज्य शासनाकडून दरवर्षी रु. १ कोटी रुपये इतकी  तरतूद पहिल्या ५ वर्षासाठी विद्यापीठाला देण्यास मान्यता देण्यात आली.तसेच  समूह विद्यापीठाचा अतिरीक्त व इतर सर्व प्रकारचा खर्च विद्यापीठाने त्यांच्या विद्यापीठ निधीतून भागविणे तसेच ५ वर्षामध्ये विद्यापीठाने आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होऊन संपूर्ण खर्च विद्यापीठ निधीतून करणे विद्यापीठावर बंधनकारक राहणार आहे.

०००

काशीबाई थोरात/विसंअ

नवीन प्रशासकीय इमारतीतून लोकाभिमुख सेवा देण्याचे काम करावे-उपमुख्यमंत्री अजित पवार

सासवड येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण

पुणे, दि. २६: नवीन प्रशासकीय इमारतीतून नागरिकांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख सेवा देण्याचे काम करावे, स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांवर सकारात्मक कार्यवाही करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

सासवड येथील नवीन प्रशासकीय भवनाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार संजय जगताप, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, उप विभागीय अधिकारी वर्षा लांडगे, अधीक्षक अभियंता बप्पा बहीर, कार्यकारी अभियंता अनुराधा भंडारे, तहसीलदार विक्रम राजपूत, गट विकास अधिकारी अमिता पवार, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम दर्जाची सेवा मिळावी म्हणून विविध शासकीय इमारतींचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे आज  या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले आहे. नागरिकांच्या शंकाचे समाधान करण्याकरीता त्यांच्या अडीअडचणी व्यवस्थितपणे समजून घेतल्या पाहिजे. त्यांना कार्यालयात वारंवार यावे लागू नये यासाठी उत्तम सेवा देण्यासाठी प्रशासनाने काम करावे.

या इमारतीच्या परिसरात हवामानाला अनुरूप सावली देणाऱ्या विविध वृक्षांचे वृक्षारोपण करावे. इमारतीचा परिसर स्वच्छ राहील याबाबत प्रशासनाने दक्षता घ्यावी, त्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे. नागरिकांसाठी परिसरात वाहनतळ करण्यात यावे, या इमारतीतील प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केल्या.

आगामी काळातही सासवड येथील उप विभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस ठाण्याचे बांधकाम करण्यात येईल. याकरीता वेगवेगळ्या वास्तुविशारदाकडून संकल्पचित्रे तयार करुन घ्यावेत, याकामांसाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते उपविभागीय अधिकारी, तहसीलदार कक्ष व सेतू सेवा केंद्राचे उद्घाटन केले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी प्रशासकीय इमारतीतील विविध कक्षाची पाहणी करुन कामांची माहिती घेतली.

नवीन प्रशासकीय इमारतीची वैशिष्ट्ये:

सासवड येथील दुमजली प्रशासकीय इमारतीचे एकूण क्षेत्रफळ ४ हजार ३१३ चौरस मीटर आहे. पहिल्या मजल्यावर तहसीलदार कक्ष आणि त्यांच्या अधिनस्त असलेली कार्यालये, दुसऱ्या मजल्यावर उप विभागीय अधिकारी कार्यालय, दूरदृष्यप्रणाली कक्ष, मुख्य बैठक कक्ष, लोक अदालत आदी कक्ष आहेत. परिसरात संरक्षण भिंत, भूमीगत सेप्टिक टॅंक, भूमीगत पाण्याचा टाकी, अंतर्गत रस्ते आदी कामे करण्यात आली आहेत. याकरीता ३४ कोटी ६८ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.

०००

मुंबईतील १५ केंद्रांवर जर्मन भाषेचे प्रशिक्षण; जर्मनीत रोजगाराच्या संधीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

मुंबई , दि. २६ : राज्यातील होतकरू तरुणांना जर्मनीत रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी आवश्यक असलेले जर्मन भाषेचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम शालेय शिक्षण विभागाने हाती घेतला असून मुंबईमध्ये 15 केंद्रांवर असे प्रशिक्षण मिळणार असल्याची माहिती, मुंबई प्रादेशिक विद्या प्राधिकरणच्या प्राचार्य मनीषा पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

राज्य शासनाने कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग राज्यासोबत करार केला आहे. यानुसार बाडेन वुटेनबर्ग येथे विविध 30 प्रकारच्या क्षेत्रांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. त्याकरिता आवश्यक असणारे जर्मन भाषेचे प्रशिक्षण गोथ्ये या जर्मनीतील प्राधिकृत संस्थेमार्फत दिले जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी राज्यातील तरुणांनी नोंदणी करण्याचे आवाहन राज्य शासनामार्फत करण्यात आले आहे.

पथदर्शी तत्वावर सुरुवातीला महाराष्ट्र शासनातर्फे बाडेन वुटेनबर्ग राज्याला 10 हजार कुशल मनुष्यबळ तातडीने पुरविण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य सेवा, आदरातिथ्य, विविध क्षेत्रातील कारागीर आदी 30 क्षेत्र निवडण्यात आली आहेत. जर्मनीमध्ये रोजगाराच्या संधीसाठी इच्छुक तरुणांनी नोंदणी केल्यानंतर त्यांना राज्य शासनामार्फत मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणाकरिता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांनी सुरू केलेल्या https://www.maa.ac.in/GermanyEmployment/ या लिंकवर नोंदणी करता येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. जर्मन भाषा शिकविण्यासाठी आवड असणाऱ्या शिक्षकांनी सुद्धा आपली नोंदणी करण्याचे आवाहन या निमित्ताने करण्यात आले आहे.

या 15 केंद्रांवर मिळणार प्रशिक्षण

प्रादेशिक विद्या प्राधिकरण अंतर्गत मुंबई जिल्ह्यातील पुढील 15 केंद्रांवर जर्मन भाषा प्रशिक्षण दिले जाणार आहे. श्रीराम वेल्फेअर सोसायटी हायस्कूल, अंधेरी पश्चिम; आई.इ.एस. न्यू इंग्लिश स्कूल, वांद्रे पूर्व; पार्ले टिळक विद्यालय, विलेपार्ले पूर्व; वेसावा विद्यामंदिर, अंधेरी पूर्व; शेठ चुनीलाल दामोदरदास बर्फीवाला हायस्कूल, अंधेरी पश्चिम; सेंट कोलंबा स्कूल, ग्रँड रोड; डी.एस. हायस्कूल, सायन पश्चिम; वालीराम बेहरूमल मेलवाणी मॉडेल हायस्कूल, ग्रँड रोड पश्चिम; अहिल्या विद्यामंदिर, काळाचौकी; एस.एस.एम.एम.सी.एम. गर्ल्स हायस्कूल, काळाचौकी; ओ.एल.पी.एस. हायस्कूल, चेंबूर; वाणी विद्यालय हायस्कूल, मुलुंड पश्चिम; पंत वालावलकर माध्यमिक विद्यालय, कुर्ला पूर्व; शेठ धनजी देवशी राष्ट्रीय शाळा, घाटकोपर पूर्व आणि संदेश विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, विक्रोळी पूर्व.

०००

बी.सी.झंवर/विसंअ

महिला सुरक्षिततेबाबत शैक्षणिक संस्थांमधून मोहीम राबवावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. २६: बदलापूर घटनेप्रमाणे अल्पवयीन मुलींवरील अत्याचार हे निंदनीय आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. भविष्यात अशा घटना घडूच नये, यासाठी शैक्षणिक संस्थांमधून मुली व महिला सुरक्षिततेबाबत विशेष मोहिमेद्वारे उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

विधानभवनातील समिती कक्षामध्ये महिला व मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांबाबत बैठक झाली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, परिवहन विभागाचे सह आयुक्त जितेंद्र पाटील, शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन, नगर विकास विभागाच्या सहसचिव सुशीला पवार,महिला व बाल अत्याचार प्रतिबंध विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी शुभदा चव्हाण, गृह विभागाचे अवर सचिव अशोक नाईकवडे उपस्थित होते.

लहान मुलांसाठी  ‘गुड टच बॅड टच’ उपक्रम विस्तृत व प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देत उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, मुलांच्या जनजागृतीविषयी असलेले साहित्य एकत्रित करावे. या साहित्यावर शालेय शिक्षण विभागाने उत्कृष्ट सादरीकरण बनवून शाळांमधून ते मुलांपर्यंत पोहचवावे. राज्यातील  81129 शाळांमध्ये सखी-सावित्री कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उर्वरित शाळांमधून हा कक्ष तातडीने कार्यान्वित करण्यात यावा. कक्ष स्थापन करण्यात आलेल्या शाळांपैकी सुरूवातीला किमान 8 हजार शाळांपर्यंत जनजागृतीपर उपक्रम पोहोचविण्यात यावा.

मुले आणि मुलींच्या सुरक्षिततेबाबत शालेय शिक्षण विभाग,उच्च व तंत्र शिक्षण विभाग, परिवहन, ग्रामविकास व नगरविकास विभागाने वेळोवेळी शासन निर्णय निर्गमीत केले आहे. या शासन निर्णयांच्या अंमलबजावणीचे मूल्यमापन करावे. शासन निर्णय अंमलबजावणीतील अडचणीही लक्षात घ्याव्यात. मुलींच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने शाळांमध्ये स्वच्छतागृहापर्यंत ने-आण करण्यासाठी महिला सहायक, विद्यार्थी बस वाहतूकीमध्ये महिला परिचर नियुक्तीबाबत पडताळणी करावी. शाळांमधून सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दर दोन ते तीन दिवसांनी कॅमेऱ्यांच्या रेकॉर्डींग्जची पडताळणी करावी. संबंधित विभागांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत हेल्पलाईन क्रमांक सुरु करावा. हेल्पलाईनवर तक्रारी करणे सोयीचे जाईल, असेही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

संबंधित विभागांनी परिपत्रक जारी केल्यावर त्याबाबत झालेली जागरुकता ते कितपत गांभीर्याने घेतले जात आहे याबाबत नियमित मूल्यमापन केले जावे अशी यंत्रणा विकसित करावी. असे देखील यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले. बस वाहतूक करणाऱ्या बसवर किंवा प्रवासी वाहनांवर, सर्व नियम पाळणाऱ्या वाहनावर सुरक्षित वाहन असे स्टीकर लावावे. स्टीकर दर्शनी भागात बसवर लावण्यात यावे. तसेच एसटी बसमधील मुलीं व महिलांशी गैरवर्तन रोखण्यासाठी साध्या वेशात महिला पोलीस असावेत यामुळे बसमधील मुली सुरक्षित प्रवास करू शकतील. शाळांच्या स्नेहसंमेलनांमधून जनजागृती करावी, तसेच  प्रदर्शने भरवावीत, विशेष कार्यक्रम करावेत अशा सूचनाही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी महिला व मुली यांचेवरील अत्याचार रोखण्यासाठी विभाग करत असलेल्या उपाययोजनेबाबत सविस्तर माहिती दिली.

०००

नीलेश तायडे/विसंअ

राज्यातील राज्यसभेच्या दोन जागांसाठी धैर्यशील पाटील आणि नितिन पाटील यांची बिनविरोध निवड

राज्यातील राज्यसभेच्या दोन जागांसाठी धैर्यशील पाटील आणि नितिन पाटील यांची बिनविरोध निवड

मुंबई, दि. २६ : राज्यसभेच्या राज्यातील दोन रिक्त जागांसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली. नितिन पाटील आणि धैर्यशील पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती विधीमंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

केंद्रिय वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याने महाराष्ट्रातील राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या. या दोन जागांवर नितिन पाटील आणि धैर्यशील पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे महाराष्ट्र विधिमंडळाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

०००

श्रद्धा मेश्राम/स.सं

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत आढावा बैठक

कोल्हापूर, दि. 26 (जिमाका) : जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रश्नांबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संबंधित अर्जदार व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये विविध प्रश्नांवर चर्चा करुन जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह संबंधित विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी कोल्हापूर जिल्हा दूधगंगा धरण प्रकल्पातील धरणग्रस्तांना दिलेल्या नोटीसीबाबत बैठक झाली. त्यानंतर माद्याळ, ता. कागल येथील गायरान गट नंबर ३९ पै. क्षेत्र ०.१० हे. आर इतकी जमीन सामाजिक सभागृहासाठी उपलब्ध करणेबाबत बैठक झाली. यात प्रस्तावावरती तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश घेण्याच्या सूचना पालकमंत्री मुश्रीफ यांनी यावेळी दिल्या.

संजय दादू पाटील, तानाजी शिवाजी सामंत व प्रदीप बाळासो पाटील, रा. केंबळी, ता. कागल, जि. कोल्हापूर यांची गट नं. ११६ मधील प्लॉटधारकांची ७/१२ व ८ अ पत्रकी नोंदीबाबत बैठक झाली. श्री लक्ष्मी आजी-माजी सैनिक कल्याणकारी संस्था, हासूर खुर्द यांनी जागा उपलब्ध करुन मिळणेबाबत केलेल्या विनंती अर्जाबाबत बैठक झाली. आंबेओहळ प्रकल्पातील संकलन दुरुस्तीच्या प्रलंबित असलेल्या रिव्हीजन प्रकरणाबाबत व मौजे चाफोडी तर्फे ऐनघोल, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर या गावाचे पुनर्वसन करणेबाबत बैठकीत चर्चा झाली. हुपरी गावातील छत्रपती शिवाजी नगर व इतर तत्सम भागांचा सिटी सर्व्हे होऊन प्रोपर्टी कार्ड देणेबाबत आणि कागल- मुकेश महुरे-प्रॉपर्टी कार्ड तसेच इचलकरंजी कबनूर – प्रॉप्रटी कार्ड श्री मुल्लाणी व उत्तूर गावठाण मधील प्लॉट नियमानुकूल करणेबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संबंधित विभागाला नियमानुसार लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश दिले.

००००

कामगार कल्याणासाठी शासन कटिबद्ध –  पालकमंत्री डॉ . सुरेश खाडे

सांगली ( जि.मा.का. ) दि. २६ : राज्यात सुमारे ५ लाख ८ हजार घरेलू कामगारांची नोंदणी झाली असून, आपल्या मंत्रिपदाच्या कालखंडात सुमारे ३० हजार ५०० इतक्या घरेलू कामगारांची नोंदणी महामंडळात करण्यात आली आहे . या घरेलू कामगारांच्या कल्याणासाठी शासन पर्यायाने आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ .सुरेश खाडे यांनी दिली.

मिरज येथील बालगंधर्व नाट्य मंदिरात महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ मुंबई यांच्यावतीने, आज घरेलू कामगारांना गृह उपयोगी वस्तु संचचे वितरण पालकमंत्री श्री. खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर अप्पर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ ,सहाय्यक कामगार आयुक्त (कोल्हापूर) विशाल घोडके, सहाय्यक कामगार आयुक्त (सातारा) आर.एन.भिसे, सहाय्यक कामगार आयुक्त (सांगली) मुजम्मिल मुजावर ,माजी नगरसेविका तथा घरेलू कामगार संघटक स्वाती शिंदे, श्रीमती सुमन खाडे आदी उपस्थित होते .

ते पुढे म्हणाले ,घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंद असणाऱ्या कामगारांसाठी विभागामार्फत चार लाभार्थी योजना सुरू असून, मागील वर्षभरात या कामगारांना विविध योजनेअंतर्गत सुमारे 1 कोटी 88 लाख इतकी लाभाची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर मंडळामार्फत अदा करण्यात आली .सांगली जिल्ह्याचा विचार करता 2 हजार 424 इतक्या कामगारांची नोंद झाली असून आज या मेळाव्यामध्ये 1324 घरेलू कामगारांना अंदाजित 9हजार रुपये इतक्या किंमतीच्या भांड्यांचा संच वाटप करण्यात आला आहे .उर्वरित घरेलू कामगारांनाही लवकरच मेळावा घेऊन त्यांनाही याचे वाटप केले जाईल असे सांगितले .

यावेळी श्रीमती प्रणाली कोळी व रूपाली पन्हाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले .प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक अप्पर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ तर आभार प्रदर्शन सहाय्यक कामगार आयुक्त श्री. मुजावर यांनी केले .

बालगंधर्व नाट्यमंदिरात झालेल्या या कार्यक्रमासाठी श्रीमती ज्योती कांबळे, प्रवीण लावंड, अनघा कुलकर्णी, अरुण राजमाने, काकासाहेब धामणे, स्नेहल जगताप , आम्रपाली कांबळे,अनुप वाडेकर, यांच्यासह हजारो घरेलू कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

00000

ताज्या बातम्या

संत भोजाजी महाराज देवस्थानच्या पर्यटनस्थळाचा दर्जा उन्नतीसाठी प्रस्ताव करा- मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १४ : विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या संत भोजाजी महाराज देवस्थानच्या पर्यटनस्थळाचा 'ब' दर्जा उन्नतीसाठी प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर...

उमरेड तालुक्यातील खाणपट्ट्यांची तपासणी करा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १४ : उमरेड तालुक्यातील शासकीय जागेवरील कोणतीही खाणपट्टी मंजूर करू नये. लीज संपलेल्या खाणपट्ट्यांची सोळा मुद्द्यांवर आधारित तपासणी करावी. खणलेल्या खाणपट्ट्यांच्या ठिकाणी...

महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ तांत्रिक अद्ययावत करण्यासाठी १५ व १६ मे रोजी बंद

0
मुंबई, दि. १४: महाराष्ट्र राज्य शासनाचे अधिकृत संकेतस्थळ www.maharashtra.gov.in  व शासन निर्णय संकेतस्थळ www.gr.maharashtra.gov.in  हे पोर्टल नियमित देखभालीबरोबरच तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्यात येणार आहे, त्यासाठी...

प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई दि. १४ : प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करून राज्यात या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नियोजन करावे. याचबरोबर सामुदायिक वनहक्क...

पालघर व ठाणे जिल्ह्यात मत्स्यव्यवसायाच्या नुकसान भरपाईसाठी सहकार्य – मंत्री मकरंद जाधव-पाटील

0
मुंबई, दि. १४ : अवकाळी पावसामुळे पालघर व ठाणे जिल्ह्यात मासेमारी बोटींचे, जाळी, सुकी मासळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकताच मत्स्य व्यवसायाला कृषी...