घरोघरी तिरंगा मोहिमेतून राष्ट्रीय भावना जागृत ठेवण्याचे कार्य
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न
सोलापूर, दिनांक 15(जिमाका) :- भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास हा सोलापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्य लढ्याचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. ब्रिटिशांच्या 150 वर्षाच्या राजवटीत मार्शल लॉ ची अंमलबजावणी झालेले एकमेव शहर सोलापूर होते. त्यामुळे सोलापूरचा स्वातंत्र्यलढा हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक ऐतिहासिक लढा होता, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
भारताचा 78 व स्वातंत्र्य दिन निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद त्यांच्या हस्ते संपन्न झाले, त्याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते.
यावेळी खासदार प्रणिती शिंदे, सोलापूर महापालिका आयुक्त शितल उगले-तेली, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, वैशपांयन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. संजीव ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह सर्व विभाग प्रमुख तसेच अन्य अधिकारी कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्याचे आणि अखंडतेचे प्रतीक म्हणजे आपला राष्ट्रध्वज. आपल्या देशाचा तिरंगा हा प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे, त्याबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर आहे. हर घर तिरंगा मोहिमेतून राष्ट्रीय भावना जागृत ठेवण्याचे कार्य केले जात आहे. ही मोहीम संपूर्ण देशासह सोलापूर जिल्ह्यात ही अत्यंत प्रभावीपणे राबवली जात आहे, असे त्यांनी सांगितले.
विकासाच्या दिशेने वाटचाल करणारा आपला सोलापूर जिल्हा उद्योग, कृषी, शैक्षणिक, आरोग्य, संस्कृती, पर्यटन या क्षेत्रात चांगली प्रगती करत आहे सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन ही सर्व प्रकारचे सहकार्य करत आहे. प्रशासन ही सर्व शासकीय योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करून शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचतील यासाठी प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.
प्रारंभी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या हस्ते भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. त्यानंतर राष्ट्रगीत व राज्य गीत गायन झाले. या समारंभास उपस्थित असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य, सैनिक ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक, पत्रकार त्यांची सदिच्छा भेट घेऊन सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्राचा अभिमान असलेला राष्ट्रध्वज तिरंगा ची सर्व मान्यवरांनी शपथ घेतली.
*मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण-
जिल्हाधिकारी कार्यालय–
उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक तीन सोलापूर श्री संतोष कुमार व्यंकटराव देशमुख यांना उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी योजना शाखा श्रीमती जयश्री पंच उत्कृष्ट नायब तहसीलदार, आस्थापना शाखा लक्ष्मीकांत आयगोळे उत्कृष्ट अव्वल कारकून, महसूल शाखा अविनाश स्वामी उत्कृष्ट महसूल सहाय्यक, महसूल शाखा गणेश जगताप उत्कृष्ट शिपाई यांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
पोलीस आयुक्त कार्यालय-
नक्षलग्रस्त जिल्ह्यामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल विशेष सेवा पदक सहाय्यक पोलीस निरीक्षक नानासाहेब बाळू सावंत व पोलीस उपनिरीक्षक नागेश आप्पासाहेब येणपे यांना तर पोलीस दलामध्ये उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुनील हांडे यांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस आयुक्त एम राजकुमार व पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले.
3.जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी कार्यालयाचे मुख्य लिपिक शाम सुरवसे यांना लेखाविषयक महत्त्वपूर्ण कामकाज केल्याबद्दल उत्कृष्ट मुख्य लिपिक म्हणून जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
स्वातंत्र्यदिनाचा 77 वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न
धुळे, दिनांक 15 ऑगस्ट, 2024 (जिमाका वृत्त): जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासोबत नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य शासनाने गत दोन वर्षाच्या कालावधीत सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक लोकाभिमुख निर्णय घेतल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, पंचायत राज व पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभात जिल्हावासीयांना शुभेच्छा देताना पालकमंत्री श्री. महाजन बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, आमदार कुणाल पाटील, आमदार मंजुळाताई गावित, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अनिल पवार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक प्रभाकर शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, सहायक पोलीस अधिक्षक एस. ऋषिकेश रेड्डी, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, संजय बागडे, संदीप पाटील, गंगाराम तळपाडे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार,जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, कार्यकारी अभियंता आर.आर.पाटील, जिल्हा सैनिक अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील, तहसिलदार अरुण शेवाळे, पंकज पवार, वैशाली हिंगे, माजी खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी महापौर प्रदीप कर्पे, प्रतिभाताई चौधरी यांचेसह सर्व शासकीय विभागांचे अधिकारी, मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. महाजन आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले की, गेल्या 77 वर्षात देशाच्या विकासासाठी अनेकांनी योगदान दिले, त्याग केला. आज देश अनेक क्षेत्रात अग्रेसर आहे. याचे श्रेय देशातील प्रत्येक नागरिकाला आहे. सर्वांच्या सामूहिक शक्तीतून मजबूत भारत उदयास येत आहे. अशाप्रसंगी स्वातंत्र्य चळवळीत सहभागी देशभक्तांच्या त्याग आणि बलिदानाला विसरता येणार नाही.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले.
जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 2 लाख 65 हजार लाभार्थी
राज्यातील महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेत जिल्ह्यात 2 लाख 72 हजार 897 महिलांनी अर्ज केले. यापैकी 2 लाख 65 हजार 297 अर्ज मंजूर करण्यात आले आहे. पात्र महिलांना येत्या 17 तारखेला दोन महिन्याचे दरमहा 1500 प्रमाणे 3 हजार रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु केली. या योजनेंतर्गत धुळे जिल्ह्यात 2 हजार 271 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.
पालकमंत्री श्री.महाजन पुढे बोलतांना म्हणाले की, राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राज्यातील 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे दैनंदिन जीवनमान सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना आवश्यक सहायक साधने, उपकरणे खरेदीकरीता वयोश्री योजनेतून प्रत्येकी 3 हजार रुपये देण्यात येणार आहे. राज्यातील सर्व धर्मियांच्या 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत प्रती व्यक्ती 30 हजार इतका खर्च शासनामार्फत करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेतंर्गत पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडर मोफत भरुन मिळणार आहे. राज्यातील शासकीय, शासन अनुदानित अशासकीय, कायम विनाअनुदानित महाविद्यालय, तंत्र निकेतन, विद्यापीठातील व्यवसायिक, वैद्यकीय अभ्यासक्रमांस प्रवेशित आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील, इतर मागास प्रवर्गातील, नविन तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कात 100 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना एप्रिल 2024 पासून 5 वर्षासाठी मोफत वीज मिळणार आहे. तर सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्यास मान्यता देण्यात आली आहे.
पर्यटन विभागाचे एकच घोषवाक्य
पर्यटन विभागाच्या अंतर्गत असलेल्या पर्यटन संचालनालय तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यामार्फत वापरण्यात येणारे बोधचिन्ह तसेच घोषवाक्य हे स्वतंत्र वेगळ्या स्वरूपातील होते. मात्र आता पर्यटन विभागाला एकच घोषवाक्य असणार आहे. राज्यातील पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी शासनाने नुकतेच ‘पर्यटन धोरण 2024’ जाहीर केले आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात आला विविध योजनेचा लाभ
यावर्षी जिल्ह्यात आतापर्यंत 125 टक्के पाऊस झाला आहे. यंदाच्या खरीप हंगामात 3 लाख 77 हजार हेक्टर क्षेत्रात विविध पिकांची पेरणी झाली आहे. शेतकरी सुखी आणि समाधानी राहण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पिक विमा योजना सुरु केली. या योजनेत जिल्ह्यातील 2 लाख 41 हजार 186 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 1 लाख 62 हजार 232 शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना फळबाग लागवड कार्यक्रमात जिल्ह्यात 165.35 हेक्टर क्षेत्रावर फळबागांची लागवड केली आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेत 36 शेतकऱ्यांना 70 लाखाचे अनुदान देण्यात आले. राष्ट्रीय कृषि विकास योजनेत 1 हजार 38 शेतकऱ्यांना 676.70 लाख अनुदान देण्यात आले. कृषि औजारांसाठी 241.30 लाख रक्कम देण्यात आली. साक्री तालुक्यात पशु चिकित्सालयाच्या इमारतीसाठी 466 लक्ष निधी मंजूर झाला आहे. राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेच्या माध्यमातून सहा मोठे पशु प्रकल्प जिल्ह्यात सुरू होत आहे. गोशाळा अनुदान योजनेत शिंदखेडा व शिरपूर तालुक्यातील दोन गोशाळांना अनुदान वितरीत केले आहे.
महसुल पंधरवड्याचे आयेाजन
राज्यात महसूल व वनविभागामार्फत 1 ऑगस्ट पासून महसूल पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या पंधरवड्यात प्रत्येक दिवशी नवनवीन उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, कृषी मार्गदर्शन कार्यक्रम, शेती, पाऊस आणि दाखले, युवा संवाद, महसूल-जनसंवाद, महसूल ई-प्रणाली, सैनिक हो तुमच्यासाठी, आपत्ती व्यवस्थापन मागर्दर्शन असे 581 शिबिर घेण्यात आले. यात 17 हजार 555 नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला.
केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेत अनुसूचित जमातीच्या 300 महिला बचतगटांना प्रति बचतगट 10 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. एकात्मिक कुकुटपालन व्यवसाय अर्थसहाय्य योजनेत आदिवासी महिला बचत गटांना 78 लाख 75 हजार रक्कम देण्यात आली आहे. ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेत 1 हजार 120 कामांना मान्यता दिली आहे. जिल्ह्यात सन 2016-17 पासून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत 59 हजार 451 घरकुले, राज्यस्तरीय शबरी आवास योजनेतंर्गत 9 हजार 173 घरकुले, राज्यस्तरीय रमाई आवास योजनेंतर्गत 7 हजार 104 घरकुले पूर्ण करण्यात आली. मोदी आवास योजनेत जिल्ह्यास 9 हजार 709 घरकुलाचे उद्दिष्ट असून सर्व घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. जलजीवन मिशन अतंर्गत ग्रामीण भागातील सर्व कुटूंबांना सन 2024 पर्यंत हर घर नल से जल प्रमाणे पाणी पुरवठा करण्यास शासन कटिबध्द असून धुळे जिल्ह्यात जल जीवन मिशन योजनेतून नवीन व सुधारणात्मक पुनर्जोडणीच्या एकूण 357.51 कोटी किमतीच्या 451 योजना हाती घेण्यात आल्या असून आजअखेर 127 योजना पूर्ण झाल्या असून जिल्ह्यातील 3 लाख 2 हजार 716 ग्रामीण कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील 673 गावापैकी 194 गावे हर घर जल घोषीत झाली आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी सन 2024-2025 या वर्षांसाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत एकूण 469 कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
यांचा झाला सन्मान
भारतीय स्वातंत्र्याचा 77 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतंर्गत श्रीमती भावना आकाश पाटील, कु. दिशा सोनवणे, श्रीमती वैष्णवी विलास मराठे, श्री. हिम्मतसिंग देवीसिंग गिरासे, श्री. सिध्दांत महेंद्र महिरराव यांना नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली.
मतदार जनजागृती व नावनोंदणीबाबत प्रचार प्रसाराचा उल्लेखनीय कामगिरीबाबत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दिनेश सैंदाणे व सुभाष कुलकर्णी यांना पुरस्कार देण्यात आला. सन 2023-24 मध्ये उतकृष्ठ कामगिरी बजावल्याने धुळे जिल्हा कारागृह वर्ग 1 येथील तुरुंगाधिकारी सचिन झिंजुर्डे, कारागृह शिपाई धनराज चव्हाण, निलेश जाधव तसेच सन 2020-21 करिता प्रशंसनीय सेवेबद्दल कारागृह शिपाई कैलास चौधरी यांना पुरस्कार देण्यात आला.
जिल्हा उद्योग केंद्र, धुळे यांच्यावतीने सन 2022-2023 साठी पात्र उद्योग घटक प्रथम पुरुस्कार मे.यु.के.प्लॅस्टिक, धुळे तर द्वितीय पुरस्कार मे. बाबुजी ॲग्रो इंडस्ट्रिज, शिंदखेडा जि. धुळे या कंपनीला देण्यात आला. तसेच सन 2023-2024 वर्षांसाठी प्रथम पुरुस्कार मे. वर्धमान पेंटस, एमआयडीसी अवधान. धुळे तसेच द्वितीय पुरस्कार मे. सागर एन्टरप्राईजेस, एमआयडीसी अवधान, धुळे या कंपनीला देण्यात आला.
त्याचप्रमाणे गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या बेकायदेशीर कारवायांना परिणामकाररित्या आळा घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या पोलीस उप निरिक्षक हरिशचंद्र पाटील, संदिप ठाकरे, मिलींद नवगिरे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच पोलीस दलात उल्लेखनिय व उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल भारत सरकारकडून राष्ट्रपती पदकासाठी निवड करण्यात आलेले पोलीस उप निरिक्षक देवीदास वाघ, सहायक पोलीस उप निरिक्षक, संजय पाटील यांचा सन्मान करण्यात आला. उप अधिक्षक भूमि अभिलेख कार्यालयामार्फत स्वामित्व योजनेतंर्गत रघुनाथ पाटील, किरणकुमार पाटील, सुभाष पाटील, देवीदास मिस्तरी, प्रविण पाटील यांचा स्वामित्व योजनेतंर्गत सनद वाटप कार्यक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल पालकमंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
धुळे राखीव पोलीस दलाचे परेड कमांडट मुकेश माहुले यांनी मंत्री महोदयांना मानवंदना दिली. यावेळी तिरंगा शपथ देण्यात आली. जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते नागरीकांना तिरंगा ध्वजाचे वितरण करण्यात आले. राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्याचा निर्णय घेतल्यामुळे स्थानिक महिलांनी पालकमंत्री श्री. महाजन यांना राखी बांधली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पुनम बेडसे आणि जिल्हा आपत्ती व्यस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी केले.
ग्रामविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी तयार करण्यात आलेल्या एलईडी मोबाईल व्हॅनचे उद्धटन पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. या व्हॅनद्वारे राज्यातील 34 जिल्हा परिषद क्षेत्रातील 288 ठिकाणी या व्हॅनद्वारे प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास घरकुल योजना, ग्रामीण महाआवास अभियान, पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, ग्रामीण भागातील पायाभूत विकास, संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना, बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तीथक्षेत्र विकास योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, स्वच्छ वारी, सुंदर वारी या योजनांची प्रचार व प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
शिरपूर येथील सीसीटीव्ही यंत्रणेचे ई लोकार्पण संपन्न
शिरपूर शहरातील नवीन सीसीटीव्ही यंत्रणेचे ई-लोकार्पण पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात संपन्न झाले. पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या निर्देशानुसर जिल्हा नियोजन समितीमार्फत शिरपुर शहरात निश्चित केलेल्या 37 संवेदनशिल ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरा बसविण्यासाठी 1 कोटी 81 लक्ष 14 हजारच्या रक्कमेस मान्यता देण्यात आली होती. यातून शिरपुर शहरात 37 संवेदनशिल ठिकाणी एकुण 105 फिक्सड बुलेट, 10 पी.टी. झेड कॅमेरे व 18 ए.पी.आर. कॅमेरे बसविण्यात आले आहे. यामुळे शिरपुर शहरातील मुख्य वर्दळीच्या ठिकाणी, शाळा / कॉलेज, महाविद्यालये, मुख्य बाजारपेठ भागात मुख्य महामार्ग या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत होणार आहे.
चांगल्या कामासाठी मुख्यमंत्री निधी खर्च झाल्याचे समाधान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे ,14(जिमाका) : ठाणेकरांच्या आरोग्यासाठी उपयुक्त अशी विनामूल्य सुविधा स्व.मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह आणि डायलिसिस केंद्राच्या रूपाने मिळाली आहे. चांगल्या कामासाठी मुख्यमंत्री निधी खर्च झाला, याचे समाधान मला या लोकार्पण सोहळ्यामुळे मिळाले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे इस्टेट येथील शिवाजीनगर भागातील जुन्या स्वर्गीय मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह आणि डायलिसिस केंद्राच्या अद्ययावत नूतन वास्तूचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवारी (14 ऑगस्ट रोजी) झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी नगरसेवक राम रेपाळे, दिलीप बेतकर, माजी नगरसेविका जयश्री फाटक, सुखदा मोरे, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त उमेश बिरारी, मनीष जोशी, जी. जी. गोदेपूरे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतना नितील, वैद्यकीय अधिकारी डॉ. राणी शिंदे, कार्यकारी अभियंता भगवान शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, या इमारतीचे काम संरचनात्मक दुरुस्ती करून पूर्ण झाले आहे. सर्व सोयींनी युक्त असे वातानुकुलित प्रसूतिगृह आणि डायलिसिस केंद्र नागरिकांसाठी खुले झाले आहे, याचा मनस्वी आनंद होत आहे.
प्रसूतिगृहाची वास्तू अतिशय सुंदर तयार कऱण्यात आली आहे. व्यवस्थाही अद्ययावत दिल्या आहेत. त्यांची काळजी घेणे आणि नीट वापरणे यांची जबाबदारी येथील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची आहे. मी कधीही अचानक भेट देईन तेव्हा हे प्रसूतिगृह मला याच स्थितीत दिसले पाहिजे, अशी अपेक्षा याप्रसंगी मुख्यमंत्री महोदयांनी व्यक्त केली.
श्रीनगरमधील मातोश्री गंगूबाई शिंदे रुग्णालयासाठी नवीन इमारत घेण्यात येत आहे. त्यामुळे तेथेही रुग्ण खाटा वाढणार आहेत. याचा लाभ नागरिकांना होणार आहे. हॉस्पिटलच्या बिलाची नागरिकांनी चिंता करायची नाही. ती काळजी सरकार घेत आहे. महात्मा फुले योजनेत राज्याच्या सर्व नागरिकांना पात्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही मुख्यमंत्री महोदय म्हणाले.
प्रशिक्षण नियुक्ती पत्रे प्रदान
याच लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत पात्र ठरलेल्या १० प्रातिनिधिक प्रशिक्षणार्थींना ठाणे महापालिकेतील प्रशिक्षण नियुक्ती पत्रे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते देण्यात आली. त्यात एका दिव्यांग युवकाचाही समावेश होता.
ठाणे महापालिकेत ५४३ तर परिवहन सेवेत १७२ युवकांना अशा प्रकारे प्रशिक्षण नियुक्ती दिली जाणार आहे. अशा प्रशिक्षणार्थींना दरमहा प्रशिक्षण भत्ता देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
या प्रसूतिगृहाची उत्तम वास्तू व व्यवस्था उभी केल्याबद्दल नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, कार्यकारी अभियंता भगवान शिंदे, उपायुक्त (आरोग्य) उमेश बिरारी, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतना नितील, वैद्यकीय अधिकारी डॉ. राणी शिंदे, फेरफॅक्स इंडिया, सीएसबी बँक आणि अपेक्स किडनी केअर प्रायव्हेट लिमिटेडचे प्रतिनिधी या सर्वांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
स्व.मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह आणि डायलिसिस केंद्र
ठाणे महापालिका क्षेत्रात माता बाल संगोपन कार्यक्रम राबविताना येणाऱ्या विविध अडचणींचा विचार करून त्यावर मात करण्यासाठी ‘मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत माता बाल संगोपन कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट प्रतीच्या सेवा देण्यासाठी प्रसूतिगृहांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. वागळे प्रभाग समिती अंतर्गत १० खाटांचे स्वर्गीय मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह मागील तीस वर्षापासून कार्यान्वित आहे. या इमारतीचे बांधकाम जुने असल्याने या ठिकाणी पाण्याची गळती तसेच फ्लोअर स्लॅब पडणे , अशा प्रकारची नादुरुस्ती झाली होती. मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजनेंतर्गत सुमारे ३ कोटी ७८ लाख रुपये खर्च करून या वास्तूचे बळकटीकरण करण्यात आले आहे.
स्व.मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह येथे आता ०७ खाटांचा एएनसी वॉर्ड, १० खाटांचा पीएनसी वॉर्ड, दोन खाटांची रिकव्हरी रूम, न्यू बॉन्सेबलायझेशन युनिट, लेबर रूम, मॉड्युलर ओटी (अद्ययावत शस्त्रक्रियागृह), ओपीडी, प्रयोगशाळा तपासण्या, सोनोग्राफी तपासणी, सात खाटांचे डायलिसिस केंद्र या सुविधांचा समावेश आहे.
त्याचबरोबर माता बालसंगोपन कार्यक्रमांतर्गत दररोज प्रसूतीविषयक सेवा, नॉर्मल व सिझेरियन प्रसूती, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, कुटुंब कल्याण साधने, महिलांच्या आजारासंबंधी दैनंदिन स्त्री रोग तज्ज्ञ यांच्याद्वारे कन्सल्टेशन, गरोदर मातांच्या रक्त चाचण्या,गरोदर मातेची सोनोग्राफी तसेच प्रसूतीपश्चात द्यावयाच्या सेवा , नवजात शिशूची काळजी घेण्यासाठी न्यू बॉर्न स्टेबलायझेशन युनिट ज्यामध्ये फोटोथेरेपी, बेबी वॉर्मर या सुविधाही उपलब्ध होणार आहेत.
तसेच या ठिकाणी सात खाटांचे डायलिसिस केंद्र सुरू करण्यात येत आहे. याकरिता डायलिसिस मशीन या सीएसआरच्या माध्यमातून फेरफॅक्स इंडिया व सीएसबी बँक यांच्यामार्फत मोफत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. हे डायलेसिस केंद्र हे मेसर्स अपेक्स किडनी केअर प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेमार्फत चालविण्यात येणार असून गरजू रुग्णांना डायलिसिसच्या सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
सर्व महापालिकांनी त्यांच्या क्षेत्रात एक लाख झाडे लावण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
ठाणे,14(जिमाका)- राज्यातील सर्व महापालिकांनी त्यांच्या क्षेत्रात एक लाख झाडे लावावीत, असे निर्देश दिले असून त्याप्रमाणे सर्व महापालिका वृक्षारोपण करीत आहेत. पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने वृक्षारोपण करणे, ही भविष्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे येथे ‘एक पेड माँ के नाम’ अभियानाच्या शुभारंभप्रसंगी केले.
‘एक पेड माँ के नाम’ या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन प्रत्येकाने आपल्या आईच्या नावे एक झाड लावावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नागरिकांना केले.
ठाणे महानगरपालिका, महाराष्ट्र वन विभाग, ग्रीन यात्रा आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मुख्यमंत्री हरित ठाणे एक लक्ष वृक्ष लागवड’ या अभियानांतर्गत ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, लोकमान्य नगर येथे वृक्षारोपण करून करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त शंकर पाटोळे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे उपसंचालक उदय ढगे, वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार पाटील, ज्येष्ठ माजी नगरसेवक हणमंत जगदाळे, एकनाथ भोईर, दिगंबर ठाकूर, विहंग सरनाईक, माजी नगरसेविका राधाबाई जाधवर, आशा डोंगरे, वनिता घोगरे, प्राजक्ता खाडे, वृक्ष प्राधिकरण समितीच्या माजी सदस्य नम्रता भोसले तसेच ग्रीन यात्राचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
राज्यातील सर्व महापालिकांनी वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेतला असून आतापर्यंत ठाणे महापालिकेने सर्वाधिक म्हणजे ६१ हजार झाडे लावल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आयुक्त सौरभ राव यांचे विशेष अभिनंदन केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण राज्यात जाहीर केलेल्या “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” या योजनेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या योजनेचे दोन हप्ते महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली असून महिलांसाठी ही योजना सुरू केल्याबद्दल लोकमान्य नगरमधील महिलांनी मुख्यमंत्र्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला.
मुंबई, दि.१४ : राज्य विविध क्षेत्रात अग्रेसर असून विविध कल्याणकारी योजनांद्वारे सर्वसामान्यांना न्याय देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे लोकशाही या वृत्तवाहिनीच्या संवाद २०२४ या कार्यक्रमात मुलाखतीत दरम्यान ते बोलत होते. लोकशाही वृत्त वाहिनीचे गणेश नायडू यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, राज्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांनमध्ये सुटसुटीतपणा आणून पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळविण्यासाठी प्रक्रिया सुकर करण्यात आली आहे. राज्यातील पात्र महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी मुख्यमंत्री –माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली. लाभार्थी कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणाऱ्या महिलांना लाभ मिळणार आहे. उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर पिवळे व केशरी रेशनकार्ड असेल त्यांना उत्पन्नचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येणार आहे. लवकरच दोन महिन्याचे पैसे बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी “मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना – २०२४” शासनाने लागू केली आहे. त्यामुळे आता ७.५ अश्वशक्ती पर्यंतच्या शेतीपंपाचा वापर करणाऱ्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना या सर्व योजनांची सविस्तर माहिती यावेळी त्यांनी सांगितली. माध्यमांनी शासनाच्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी जेणेकरून जनतेला त्याचा लाभ घेता येईल.
गणेशोत्सव पर्यावरण पुरक पद्धतीने व शांततेत साजरा करावे. ग्लोबल वार्मिंगचा धोका निर्माण होवू नये म्हणून सर्वांनी वृक्षारोपण करावे. बांबू लागवडीसाठी प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
राज्यात मोठे उद्योग येत आहेत. त्यांच्यासाठी विविध उपक्रम सुरू करण्यात येत आहेत. मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहेत. राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. आरक्षणाबाबत शासन सकारात्मक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुंबई, दि.१४ :महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार, दिनांक २५ ऑगस्ट, २०२४ रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ करिता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावरील प्रवेशपात्र उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे आयोगाने कळविले आहे.
प्रवेशप्रमाणपत्र मिळविण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या contact- secretary@mpsc.gov.in व support-online@mpsc.gov.in या ईमेल व/अथवा ०२२६९१२३९१४ किंवा ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावरुन विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल असे आयोगाने कळविले आहे.
मुंबई,दि.१४ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी बँकेची प्रक्रिया सुरू झाली आहे. असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
महिला व बाल विकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक झाली. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनूपकुमार यादव,आयुक्तडॉ.प्रशांत नारनवरे, बँकेचे अधिकारी उपस्थित होते.
महिला व बाल विकास मंत्री तटकरे म्हणाल्या की, राज्यात आतापर्यत १ कोटी ६४ लाख ४० हजारपेक्षा अधिक महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे. अजूनही नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. यासाठी पात्र महिलेचे बँक खाते आधार लिंक असणे आवश्यक आहे. असेही तटकरे यांनी यावेळी सांगितले.
मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई, दि .१४:–नागरिकांमध्ये महसूल विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाबाबत जागरूकता वाढावी, महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा नागरिकांपर्यंत पोहचाव्या, शासनाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दींगत व्हावा यासाठी महसूल दिन व १ ते १५ ऑगस्ट, २०२४ कालावधीत महसूल पंधरवडा करून विविध लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात आले, मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’योजना मुंबई शहर जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाचा आरंभ
महसूल पंधरवडा कालावधीत महाराष्ट्र विधानसभे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाचा आरंभ करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान पात्र लाभार्थी यांना उत्पन्न दाखला व विशेष कार्यकारी अधिकारी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
यावेळी मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव, अपर जिल्हाधिकारी रवि कटकधोंड, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी व महसूल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
२ ऑगस्ट रोजी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” उपक्रमाची माहिती जिल्हा कौशल्य विकास अधिकारी श्री. संदिप गायकवाड यांना दिली. उपस्थित विभागप्रमुख अधिकारी, कर्मचारी यांना योजनेची व्याप्ती व अंमलबजावणीबाबत माहिती देण्यात आली. याबाबतची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया व प्राप्त झालेल्या अर्जावर कार्यवाही करणेबाबत सुचना देण्यात आल्या. “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” याबाबत जेष्ठ नागरिकांना प्रसिद्ध तीर्थस्थळांना भेटी देण्यासाठी राज्यातील सर्व धर्मातील वयोवृद्धांसाठी योजना लागू असल्याचे सांगण्यात आले. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. प्रसाद खैरनार, सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग यांच्या मार्गदर्शनात ३ ऑगस्ट रोजी “स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. ४ ऑगस्ट रोजी कार्यालयात स्वच्छतेची विशेष मोहिम राबविण्यात आली. कार्यालयातील अभिलेखांचे व्यवस्थापन कामे करण्यात आली.
तर “जमिन विषयक प्रश्नांबाबत मार्गदर्शन” कार्यक्रमाचे आयोजन ५ ऑगस्ट रोजी करण्यात आले. यावेळी नागरिकांना मुंबई शहरातील शासकीय भाडेपट्टा करिता भोगवटदार वर्ग १ च्या हस्तांतरण बाबत राबविण्यात येणाऱ्या प्रकियेची माहिती नगर भूमापन व भूमि अभिलेख शाखेमार्फत देण्यात आली. त्याचप्रमाणे मुंबई शहरातील जमीन विषयक प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यात आले.
6 ऑगस्ट रोजी “पाऊस आणि दाखले” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भारतीय हवामान विभाग कुलाबा येथील अतिरिक्त महासंचालक सुनिल कांबळे यांचे पर्जन्यमान व इतर हवामान घटकांविषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले. पाऊस व इतर हवामानाचे अंदाज कशाप्रकारे व्यक्त केले जातात याबाबत माहिती दृक श्राव्य माध्यमातून देण्यात आली. तसेच मुंबईतील हवामान परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली.
७ ऑगस्ट रोजी “युवा संवाद” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महसूल अधिकारी यांनी प्रत्यक्ष जयहिंद कॉलेज, सिद्धार्थ कॉलेज, एसएनडीटी कॉलेज, केसी कॉलेज इत्यादी महाविद्यालयांना भेटी देऊन युवकांशी संवाद साधला. ८ ऑगस्ट रोजी “महसूल जन संवाद” या कार्यक्रमाचे आयोजन, ९ ऑगस्ट रोजी “महसूल ई-प्रणाली” बाबत, ११ ऑगस्ट रोजी “आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन” करण्यात आले.
दिव्यांग मासिक अनुदान प्रमाणपत्रे वितरण
१२ ऑगस्ट रोजी “एक हात मदतीचा – दिव्यांगांच्या कल्याणाचा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याबाबत समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिव्यांग व्यक्तीकरिता राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमाबाबत माहिती दिली. ८ लाभार्थ्यांना मासिक अनुदान प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली.१३ रोजी “कार्यरत व सेवानिवृत्त महसूल अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संवाद”तर १४ ऑगस्ट रोजी ” महसूल पंधरवडा वार्तालाप” दिन झाला.तसेच १५ ऑगस्ट रोजी ” महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी पुरस्कार वितरण” व महसूल पंधरवडा सांगता समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना संबंधित घटकांपर्यंत पोहोचवून महिलांना, वंचित-उपेक्षितांना आत्मसन्मान मिळवून देण्यात सहभागी व्हा! – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. १४ :- भारतीय स्वातंत्र्याच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या असून देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेल्या स्वातंत्र्यवीरांना, क्रांतीकारकांना, हौतात्म्य पत्करलेल्या शहिद वीरांना, अभिवादन केले आहे. असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी वचनबद्ध होऊया, सामाजिक जाणीव, राष्ट्रीय कर्तव्य-जबाबदारीच्या भावनेतून राष्ट्रविकासात योगदान देऊया, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त केले आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्तच्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणतात की, स्वातंत्र्यदिन हा आपल्यासाठी सर्वात मोठा राष्ट्रीय उत्सव आहे. हा उत्सव तितक्याच उत्साहात, आनंदात, व्यापक स्वरुपात साजरा करायचा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सुरु केलेल्या ‘हर घर तिरंगा..’ अभियानाने याची सुरुवात झाली आहे. यंदाच्या स्वातंत्र्यदिनी आपण दृढसंकल्प करुया की, राष्ट्रविकासात सर्वांना सोबत घेऊन जाताना शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक यांना प्रगतीची योग्य संधी उपलब्ध करून द्यायची आहे. त्यांचे आर्थिक-सामाजिक सक्षमीकरण करायचे आहे. देशाला आत्मनिर्भर बनवताना महिलांना, वंचितांना, उपेक्षितांना, अल्पसंख्याकांना समाजात मान, सन्मान, आदर, प्रतिष्ठा मिळवून द्यायची आहे. पात्र लाभार्थी महिलांना महिन्याला १५०० रुपये अर्थसहाय्य देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, वर्षाला तीन गॅस सिलिंडर देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, पिंक ई-रिक्षा योजना, शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला मोफत वीज देणारी बळीराजा वीजसवलत योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, युवकांना विद्यावेतन देणारी मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना, ज्येष्ठ नागरिकांना धार्मिक पर्यटनासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अशा विविध महत्त्वाकांक्षी योजना संबंधित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग द्यावा, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
देशाचे स्वातंत्र्य, एकता, अखंडता, सार्वभौमता, लोकशाही मूल्ये अबाधित राखणे, भारतीय राज्यघटनेवरचा विश्वास अधिक दृढ करणे, ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. ती पार पाडण्यासाठी भारतमातेच्या अनेक सुपुत्रांनी आजवर सर्वोच्च त्याग केला, अमूल्य योगदान दिले. त्या सर्वांबद्दल आपण कायम कृतज्ञ असले पाहिजे. देशाचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व, लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी आपण सर्वांनी एकजूट होऊन देशाला समृद्ध, बलशाली देश बनवण्याचा निर्धार करुया, असेही आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त संदेशात केले आहे.
मुंबई, दि. १४ : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक गणेशोत्सवातील विविध जनजागृती उपक्रमांचा आरंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झाला.
पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची, सजावटीची व आभूषणांची वाढती मागणी लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांनी इको बाप्पा हे मोबाईल ॲप विकसित केले असून याचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते झाले. या मोबाईल ॲपच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना पर्यावरणपूरक मूर्ती तयार करणाऱ्या कारखानदारांची ठिकाणे उपलब्ध होणार असून यामुळे पर्यावरणपूरक मूर्ती नागरिकांना खरेदी करणे सहज शक्य होणार आहे. ‘इको बाप्पा’ हा ॲप मोबाईल प्लेस्टोर मधून विनामूल्य डाऊनलोड करता येणार असून यामध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची खरेदी, आभूषणे, सजावटीचे साहित्य व विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची माहिती उपलब्ध होणार आहे.
मंडळाने या वर्षीच्या पर्यावरणपूरक उत्सवाला चालना देण्यासाठी शहाणपण देगा देवा या संकल्पनेतून रेडिओ जिंगल्स्, व्हिडिओज् तयार केले असून एक लहान बालक पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचा अभिनव संदेश यात देत आहे. याचा देखील आरंभ मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, म.प्र.नि.मंडळाचे सदस्य सचिव डॉ.अविनाश ढाकणे हे उपस्थित होते तर विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त जिल्हाधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फर्सिंगच्या माध्यमातून राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका यांच्या आयुक्त व मुख्याधिकारी यांच्याशी संवाद साधून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी व्यापक जनाजगृती व उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे राज्यातील प्रमुख पदाधिकारी व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
अल्पसंख्याक समुहाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना
विविधतेत एकता असलेला भारत देश हा अनेक जाती समुहांचा एकसंध देश आहे. याची संस्कृती आणि एकता अबाधित राहण्यासाठी सर्व...
मुंबई, दि. ०३ : मनोरंजनाच्या स्पर्धेत यशस्वी होत दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी कोणत्याही माध्यमातून व्यक्त होताना आशयघन मांडणी महत्त्वाची बाब आहे. त्यादृष्टीने स्थानिक विषयावरील सकस...
मुंबई, दि. ०३: भारताच्या एव्हीजीसी-एक्सआर परिसंस्थेला सक्षम बनवण्याच्या दिशेने एक मोठी झेप घेत, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने, फिक्की आणि सीआयआयच्या सहकार्याने, केवळ एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्रासाठी...