शनिवार, मे 3, 2025
Home Blog Page 473

ई – पॉस मशिनच्या तांत्रिक अडचणींवर अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून उपाययोजना

ऑफलाईन पद्धतीने माहे जुलै व ऑगस्टच्या धान्य वितरणास मान्यता

मुंबई, दि. १४:  राज्यात ई – पॉस मशिनच्या माध्यमातून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वाटप केले जाते. गेल्या काही दिवसांपासून ई – पॉस मशिनबाबत तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे राज्यातील पात्र लाभार्थी अन्न धान्यापासून वंचित राहू नयेत यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने जुलै व ऑगस्ट मधील अन्नधान्य वितरण ऑफलाईन पद्धतीने करण्यास मान्यता दिली आहे.

ई-पॉस मशीनमध्ये लाभार्थ्यांची बायोमेट्रिक ओळख पटवून अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. यासाठी रास्त भाव दुकानांमध्ये ई-पॉस मशीन बसवण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून ई-पॉस मशीनद्वारे अन्नधान्य वितरणामध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत.  या तांत्रिक समस्या एनआयसीकडील धान्य वितरण प्रणाली, क्लाऊड सर्व्हर यांच्याशी संबधित आहेत. या समस्या तात्काळ दूर करण्याच्या सूचना एनआयसी व क्लाऊड सर्व्हर सुविधा पुरवठादारांना शासनाकडून देण्यात आल्या आहे.

ई-पॉस मशीनमध्ये आलेल्या अडचणींमुळे लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये, त्यांना अन्नधान्याचा सुयोग्य पुरवठा व्हावा, यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाने जुलै व ऑगस्ट 2024 या महिन्यांकरिता अन्नधान्याचे वितरण ऑफलाइन पद्धतीने करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयास दिल्या आहेत.

०००

हेमंतकुमार चव्हाण/स.सं

स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी ०९.०५ वाजता ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ

मुंबई, दि. १४: गुरूवार १५ ऑगस्ट २०२४ रोजी भारताचा ७८ वा स्वातंत्र्यदिन समारंभ साजरा करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यात एकाच वेळी सकाळी ०९.०५ वाजता आयोजित करण्यात येणार असून सकाळी ०८.३५ ते ०९.३५ या वेळेत इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये, असे राजशिष्टाचार विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

या अनुषंगाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालय, मुंबई येथे सकाळी ०९.०५ वाजता ध्वजारोहण करून साजरा करण्यात येईल. तर, पुणे येथे राज्यपाल  सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.

प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी शासनाने जाहीर केल्याप्रमाणे संबंधित पालकमंत्री अथवा अन्य मंत्री यांच्यामार्फत ध्वजारोहण करण्यात येईल. काही अपरिहार्य कारणामुळे मंत्री उपस्थित राहू न शकल्यास, विभागीय मुख्यालयी विभागीय आयुक्त आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी हे ध्वजारोहण करतील. शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयाव्यतिरिक्त एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी ०८.३५ पूर्वी किंवा ०९.३५ नंतर आयोजित करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत वाजविण्यात येईल व त्यानंतर लगेचच सावधान स्थितीत येऊन राज्यगीत वाजविण्यात येईल. समारंभास उपस्थित राहणाऱ्या सर्व व्यक्तींनी राष्ट्रीय पोषाख परिधान करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक क्रमांक : एफएलजी- 1091 / 30, दिनांक 20 मार्च, 1991 व क्रमांक एफएलजी-1091 (2)/30, दिनांक 5 डिसेंबर, 1991 आणि परिपत्रक क्रमांक : एफएलजी 1098/343/30, दिनांक 11 मार्च, 1998 अन्वये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन राजशिष्टाचार विभागामार्फत करण्यात आले आहे.

०००

बी.सी.झंवर/ वि.स.अ

टाटा मुंबई मॅरेथॉन ही मुंबईकरांचे चैतन्य – दीपक केसरकर

मुंबई, दि.१३: टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा ही मुंबईकरांचे खरे चैतन्य असल्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

 हाँटेल ट्रायडेट येथे टाटा मुंबई मॅरेथॉनमधील नोंदणीचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा अध्यक्ष अँड राहुल नार्वेकर, टाटा मुंबई मॅरेथॉनचे आयोजक उपस्थित होते.

मंत्री श्री.केसरकर म्हणाले,मुंबई मॅरेथॉन ही दरवर्षी जानेवारीच्या तिसऱ्या रविवारी मुंबईत येथे आयोजित केलेली वार्षिक आंतरराष्ट्रीय मॅरॅथॉन आहे. टाटा समूहाच्या प्रायोजकत्वाच्या कारणास्तव ही टाटा मुंबई मॅरेथॉन म्हणून देखील ओळखली जाते. ही आशियातील सर्वात मोठी मॅरेथॉन तसेच खंडातील सर्वात मोठी जनसहभागी क्रीडा स्पर्धा आहे.

जागतिक स्तरावरील स्पर्धा  मुंबईत होत असल्याचा अभिमान आहे. मुंबईतील मोठ्या रस्त्यावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आता कोस्टल रोड झाला आहे. मुंबईचा विकास होत आहे.

मंत्री श्री.भुजबळ म्हणाले, टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. विविध क्षेत्रातील नामवंत कलाकार, खेळाडू, उद्योगपती यामध्ये सहभागी होतात. राज्य शासन, महानगरपालिका, पोलीस, सर्व यंत्रणा यामध्ये सहभागी होवून स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करतात.

विधानसभा अध्यक्ष अँड. नार्वेकर म्हणाले, टाटा मुंबई मॅरेथॉन ही एक वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धा आहे.मुंबई ही फक्त देशाची आर्थिक राजधानी नाही तर या ठिकाणी टाटा मुंबई मॅरेथॉन सारखे जागतिक उपक्रम राबविण्यात येतात. १९ जानेवारी २०२५ रोजी होणाऱ्या या स्पर्धेत आमची मुंबई तयार आहे. आयोजकांचे अभिनंदन करुन सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

आशियातील सर्वात प्रतिष्ठित मॅरेथॉनच्या प्रवर्तकांनी आज जाहीर केले की या स्पर्धेसाठी नोंदणी 14 ऑगस्ट 2024 पासून सकाळी 7 वाजता www.tatamumbaimarathon.procam.in वर   सुरू होईल.

०००

महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

SPK DGIPR Mantralay Mumbai

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वाणिज्य निकाय सदस्यसाठी आयोजित कार्यक्रम

मुंबई,  दि. १३ – महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. हॉटेल ताज पॅलेस येथे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वाणिज्य निकाय सदस्य, मंत्रिमंडळ सदस्य व मान्यवरांसाठी आयोजित कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे कौशल्य विकास, उद्योजकता व रोजगार मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, राज शिष्टाचार विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, मुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव इकबालसिंग चहल, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ पी गुप्ता, ऊर्जा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह विविध देशातील उच्चायुक्त  उपस्थित होते.

उपस्थित सर्वांना ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे, कृषी, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान, उद्योग, शिक्षण, पायाभूत सोयी सुविधा अशा सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राने नेत्रदीपक प्रगती केली आहे. राज्याची अर्थ व्यवस्था एक ट्रिलियन करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. राज्यात उद्योगस्नेही वातावरण आहे. तसेच राज्यात उद्योग उभारणी आणि वाढीसाठी मोठ्या संधी आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला जागतिक नेतृत्व दिले आहे. त्यांच्या नेतृत्वात देश लवकरच जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होईल असेही मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले.

०००००

महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेच्या नूतन वास्तूचे मुंबईत उद्घाटन

नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे औषध व्यवसाय परिषदेची वेगळी ओळख – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ 

मुंबई, दि.१३ : फार्मासिस्ट आणि सामान्य नागरिकांसाठी नवनवीन उपक्रम हाती घेऊन औषध व्यवसाय परिषद एक वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाली असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेच्या मुलुंड येथील नूतन वास्तूच्या उद्घाटनाप्रसंगी मंत्री श्री.मुश्रीफ बोलत होते. यावेळी परिषदेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्यासह परिषदेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, परिषदेने मुलुंड येथे स्वमालकीची जागा खरेदी करुन यामध्ये अत्याधुनिक सेवा देणारे कार्यालय, जागतिक स्तराप्रमाणे विकसित औषध माहिती केंद्र  आणि फार्मासिस्टचे ज्ञान व कौशल्य याचे निरंतर प्रशिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनविलेले सभागृह बनविले आहे. हे राज्याच्या आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा मानला पाहिजे. फार्मासिस्टचे ज्ञान अद्ययावत करण्यासाठी व जागतिक स्पर्धेला स्पर्धेनेच उत्तर देण्यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमाची निर्मिती करून कार्यशाळा राज्याच्या तालुका, जिल्हा पातळीवर तज्ञ मार्गदर्शकामार्फत आयोजित केल्या जातात हा अतिशय महत्त्वाचा उपक्रम आहे.कारण अपडेट असणे काळजी गरज आहे ते तुम्ही करता.यामुळे परिषद अधिक गुणवत्तापूर्ण काम करेल अशी  खात्री असल्याचे त्यांनी सांगितले.

आजअखेर महाराष्ट्र राज्यामध्ये ४७९ पदविका (Diploma) आणि ३१२ पदवी (Degree) व फार्म. डी. (Doctor of Pharmacy) ची ७ शासन मान्य फार्मसीची कॉलेज कार्यान्वित आहेत. कायद्याअंतर्गत फार्मसीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी- विद्यार्थीनी फार्मसीचा व्यवसाय करणे, उत्पादन क्षेत्रामध्ये महत्वपुर्ण भुमिका बजावणे यासह सरकारी, निमसरकारी सेवा (फार्मासिस्ट, ड्रग इन्स्पेक्टर, फार्मसी इन्स्पेक्टर) करण्यासाठी नियम व अटींच्या आधीन राहून पंजीकरण (नोंदणी) करणे अनिवार्य आहे. आज अखेर ४.३ लाख फार्मासिस्टची नोंदणी परिषदेकडे झाली आहे.

परिषदेचे मागील २५ वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक महत्त्वाचे कार्यक्रम आणि योजना कार्यान्वित केल्या आहेत. महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवली आहे.

१९९८ मध्ये परिषदेने संकेतस्थळाची निर्मिती करुन कालानुरुप परिषदेचे सर्व कामकाज नोंदणी, पुर्नर्नोदणी, नूतनीकरण, इ. कामकाज ऑन लाइन पद्धतीने करण्यात येते.

फार्मासिस्ट प्रोफेशनल प्रोफाइल (पी.पी.पी. कार्ड) ची नवीन संकल्पना अंमलात आणून त्याचे स्मार्टकार्डमध्ये रूपांतर केले आहे. यास अन्न आणि औषध प्रशासनाने देखील मान्यता दिली आहे. फार्मासिस्ट, औषध क्षेत्रातील संशोधक, प्राध्यापक, डॉक्टर्स, हॉस्पिटल्स आणि नागरीकांना औषधाची माहिती, त्याचे शरीरावर होणारे अनुकूल व प्रतिकूल परिणाम, रासायनिक बदल बाबतची योग्य माहिती मिळू लागली आहे. यासाठी जगप्रसिद्ध Micromedex या डाटाबेस ची उपलब्धता केली जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

000000000

राजू धोत्रे/विसंअ

 

खादी हे शाश्वत विकासाचे साधन – सभापती रविंद्र साठे

मुंबई, दि. 13 : खादी हे कापड नसून जीवनाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे. खादी हे शाश्वत विकासाचे एक साधन आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमांत देशातील जनतेने खादी वापरण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर राज्यातील लघुउद्योजकांना सक्षम करण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाने मागील 64 वर्ष अविरतपणे काम केले आहे, असे राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी व्यक्त सांगितले.

राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या 64 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ग्रामीण भागात यशस्वी उद्योग करणाऱ्या उद्योजकांना ग्रामोद्योग भरारी पुरस्काराचे वितरण यशवंतराव चव्हाण सभागृह येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला, सह मुख्य कार्यकारी अधिकारी रेश्मा माळी, अर्थसल्लागार स्मिता खरात, उप मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, खादी आयोगाचे संचालक योगेश भामरे, नित्यांनद पाटील, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी तसेच राज्यातील विविध भागातील यशस्वी उद्योजक उपस्थित होते.

सभापती श्री.साठे म्हणाले  की, पुरस्काराने ग्रामीण उद्योजकांना प्रेरणा मिळते. ग्रामीण रोजगार निर्मिती व्हावी यासाठी मंडळ अनेक योजना राबवित आहे. मधाचे गाव ही नावीन्यपूर्ण योजना राज्यात प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. मधमाशी पालन हा शेतीला पूरक असणारा व्यवसाय लोकाभिमुख होत आहे. मंडळ 64 वर्ष ग्रामीण जनतेसोबत असून त्यांच्याकरिता रोजगार निर्माण करून लोकांना अर्थसहाय्यासोबत अनुदान देखील मंडळाकडून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला म्हणाल्या, रोजगार, पर्यावरण आणि लोकाभिमुख काम करण्यासाठी मंडळाचे योगदान मोठे आहे आजअखेर हजारो लोकांना मंडळाने हाताला काम देऊन स्वावलंबी केले आहे. ग्रामीण उद्योजक खऱ्या अर्थाने समाजहिताचे काम करीत आहेत. वर्धापनदिनाचे औचित्य साधून पुरस्कार कार्यक्रम अनेकांना प्रेरणा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले.

पुरस्कारामध्ये  सिंधुदुर्ग येथील कौसर खान यांना प्रथम, पुणे येथील प्रमोद रोमन यांना द्वितीय तर गोंदिया येथील श्रीकांत येरणे यांना तृतीय पुरस्कार देण्यात आले. उत्तेजनार्थ पुरस्कार ठाणे येथील सुजाता पवार, नांदेडचे बालाजी काजलवाड अमरावतीच्या उज्वला गोपाळ चंदन यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.

या कार्यक्रमात बिपीन जगताप, योगेश भामरे, यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमात मंडळाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ग्रामोद्योग अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमात पुरस्कार्थींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी म्हाम्बरे यांनी तर आभार रेश्मा माळी यांनी मानले.

000

संजय ओरके/विसंअ

 

 

 

 

जमीन अधिग्रहणासंदर्भातील प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढलेले नाहीत

‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण’ योजनेसंदर्भात न्यायालयाने केलेले भाष्य, तो एक संवादाचा भाग

मुंबई दि.१३:– जमीन अधिग्रहणासंदर्भातील सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथील सुरू असलेली सुनावणी आणि ‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अनुषंगाने विविध प्रसार माध्यमातून दिशाभूल करणारे वृत्त प्रसारित झालेले असून याबाबत वस्तुस्थिती पुढील प्रमाणे आहे.

पुण्याच्या एका जमीन अधिग्रहणा संदर्भातील प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही प्रकारचे ताशेरे आदेशात ओढलेले नाहीत. हे प्रकरण उद्या सुनावणीसाठी ठेवलेले आहे. न्यायालयाने जे ‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण’ योजने संदर्भात भाष्य केले तो एक संवादाचा भाग होता. न्यायालयाने प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान आज कोणत्याही प्रकारचे प्रतिकूल शेरे दिलेले नाहीत’, असा खुलासा राज्याच्या महसूल विभागाच्या वतीने राज्य शासनाचे सर्वोच्च न्यायालयातील विशेष समुपदेशी (Special Counsel for Maharashtra Govt) यांनी केला आहे.

जमीन अधिग्रहण प्रकरणी राज्य शासनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात येत असून सदर याचिकाकर्त्यांची मोबदला रक्कम 37,42,50,000/- रुपये देण्याची तयारी दर्शवली आहे. तरीही याचिकाकर्त्याने अधिक रकमेची मागणी केल्याने उद्यापर्यंत वेळ मागितला आहे . आणि न्यायालयाने हे प्रकरण सुनावणीसाठी उद्या ठेवलं आहे, असे विभागाने कळविले आहे.

00000

किरण वाघ/विसंअ

 

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कला शिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी प्रयत्न करावे – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ नियामक परिषदेची पहिली बैठक

मुंबई,दि.१४ कलावंतांची खरी संपत्ती ही कलेची  निर्मिती असते.  ती राज्याची, देशाची व जगाचीही असते. त्या कलेचे वैभव जोपासण्यासाठी कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच कला शिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाने प्रयत्न करावे, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्या.

मंत्रालयात महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ नियामक परिषदेची पहिली बैठक उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  झाली. यावेळी उच्च व तंत्र  शिक्षण विभागाचे प्रधान सचिव  विकासचंद्र रस्तोगी,कला संचालक राजेश मिश्रा, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

याबैठकीत शासकीय उच्च कला  परीक्षा, शासकीय रेखाकला परीक्षा यांचे प्रस्तावित परीक्षा शुल्कास तसेच उच्चकला पदविका प्रमाणपत्र परीक्षेसाठी  विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सेवांच्या शुल्कास मान्यता, राज्यकला शिक्षण मंडळासाठी लेखा परिक्षणासाठी लेखा परीक्षकाची नेमणूक, महाराष्ट्र राज्य कला संचालनालय पीएलएमधून तात्पुरत्या स्वरूपात निधी देण्यास मान्यता,महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या बालचित्रकला स्पर्धा परीक्षा,शुल्क निश्चित समितीच्या कामासाठी संगणक प्रणाली  राबविणे याविषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

0000

काशीबाई थोरात/विसंअ

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आर.के.लक्ष्मण फाउंडेशन आणि डॉ.होमी भाभा विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार

मुंबई, दि. 13 :  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिवंगत आर.के.लक्ष्मण यांच्या व्यंगचित्र दालन संदर्भात आर.के.लक्ष्मण फाउंडेशन आणि डॉ. होमी भाभा विद्यापीठ,मुंबई यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी  आणि आर. के. लक्ष्मण फाउंडेशन यांच्यातील या सामंजस्य कराराच्या माध्यमातून  आर. के. लक्ष्मण यांच्या सर्जनशील तत्त्वज्ञानाचा समावेश करून कला शिक्षणाचा विकास करणे, विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना कला आणि संवाद शिक्षण सुधारण्यासाठी प्रशिक्षण आणि सर्जनशील अभिव्यक्ती, चिंतनशील विचार, आणि संवाद कौशल्ये विकसित करण्याच्या संधी प्रदान करण्यात येणार आहे.

या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी, डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी  आणि आर. के. लक्ष्मण फाउंडेशन ११ वी इयत्तेपासून पुढील विद्यार्थ्यांसाठी कला शिक्षण कार्यक्रम सह-निर्मित आणि व्यवस्थापित करतील. या कार्यक्रमांमध्ये संग्रहालय दौऱ्यांचे आयोजन, कार्यशाळा, आणि ख्यातनाम कलाकारांशी संवाद अशा प्रत्यक्ष शिक्षणाच्या संधी समाविष्ट केल्या जातील. शिवाय, आर. के. लक्ष्मण फाउंडेशन डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यावहारिक कौशल्ये आणि सर्जनशील विकासावर लक्ष केंद्रित करणाऱ्या इंटर्नशिप संधी उपलब्ध करून देईल.

मंत्रालयात झालेल्या सामंजस्य कराराच्यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू रजनीश कामत, डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलसचिव विलास पाध्ये,आर.के.लक्ष्मण फाउंडेशनचे संचालक उषा लक्ष्मण, डॉ.विशाल बानेवार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलसचिव विलास पाध्ये यांनी तर आर.के.लक्ष्मण फाउंडेशनचे संचालक उषा लक्ष्मण यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

००००

काशीबाई थोरात/विसंअ

डी-नोव्हो विद्यापीठाच्या पदभरती संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई,दि.१३ : मुंबईतील सर जे.जे. कला महाविद्यालय, उपयोजित कला महाविद्यालय आणि वास्तुशास्त्र महाविद्यालय अशा तीनही शासकीय महाविद्यालयांचा मिळून डी-नोव्हो प्रकारांतर्गत अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे.या विद्यापीठाच्या पदभरती संदर्भात  सकारात्मक निर्णय घेण्यात येईल,असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत  पाटील यांनी सांगितले.

मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी उच्च व तंत्र  शिक्षण विभागाचे प्रधान सचिव  विकासचंद्र रस्तोगी, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या विद्यापीठासाठी आवश्यक पदे भरण्यास मान्यता, अध्यापकीय पदांची पदभरती, शिक्षकेत्तर  पदभरती, वसतिगृह,याबाबत सविस्तर यावेळी चर्चा करण्यात आली.

००००

काशीबाई थोरात/विसंअ

 

 

ताज्या बातम्या

भारतासाठी परंपरा आणि तंत्रज्ञानाचा मिलाफ असलेल्या नव्या कथांची निर्मिती करण्याची हीच वेळ – किरण...

0
किरण मझुमदार शॉ यांनी वेव्हज‌्मध्ये मांडला भारताच्या सृजनशील भवितव्याचा आलेख स्टार्ट अप्सनी चित्रपटांच्या पलीकडचा विचार करण्याचे आवाहन मुंबई, दि. ०३ : सृजनशील आशय निर्मिती...

‘एआय’च्या वापरामुळे नवउद्योगाला उज्ज्वल भविष्य

0
मुंबई, दि. ०३ : भारतात स्टार्टअप्सची संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रामुख्याने आयटी, फिनटेक, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात नव्या संधी निर्माण होत आहेत. राज्य शासनाकडून...

डिजिटल माध्यमांसाठी नाविन्यता आणि सातत्य आवश्यक – डॉली सिंग

0
मुंबई, दि. ०३ : स्पर्धात्मक डिजिटल युगात स्वतःचे वेगळेपण जपण्यासाठी चांगली संहिता, विषयांची प्रभावी मांडणी, व्हिज्युअलचा योग्य वापर याबरोबरच नाविन्यता आणि सातत्य असणे आवश्यक...

डिजिटल पत्रकारिता : वर्गणी, गुणवत्ता आणि विशिष्ट वाचकवर्गावर केंद्रीत

0
मुंबई, दि. ०३ : डिजिटल पत्रकारितेचा भविष्यातील मार्ग हा वर्गणी, गुणवत्ता आणि विशिष्ट वाचकवर्गावर केंद्रित असणार आहे. जाहिरातीतून टिकाव धरण्याचा पारंपरिक मार्ग आता पुरेसा...

जळगावातील शासकीय आरोग्यसेवा हायटेक; संपूर्ण सुविधा असलेले राज्यातील पहिले केंद्र– पालकमंत्री गुलाबराव पाटील

0
मानवी अवयव प्रत्यारोपण वगळता सर्व शस्त्रक्रिया होणारे रुग्णालय; राज्यातील पहिले मेडिकल हब जळगावमध्ये– जलसंपदामंत्री गिरीश महाजन जळगाव, दि. ०३ (जिमाका): जळगावमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात...