शनिवार, मे 3, 2025
Home Blog Page 474

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी मोहीम राबवावी – महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे

१७ ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लाभ वितरण कार्यक्रम घेण्यात यावे

मुंबई, दि. 13 – मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरण येत्या 17 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. दि.31 जुलै पर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थी महिलांना आधार जोडणी केलेल्या त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ मिळणार आहे. ज्या पात्र महिलांच्या बँक खात्याशी आधार जोडणी झालेली नाही, अशा लाभार्थ्यांचे बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घेण्यासाठी जिल्ह्यात विशेष शिबिरांचे आयोजन करावे. आधार जोडणी झाल्यावर या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेचा लाभ मिळणार आहे, असे महिला व बालविकास मंत्री कु. अदिती तटकरे यांनी आज येथे सांगितले.

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे यांनी आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महिला व बालविकास अधिकारी यांच्याशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यादव, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे आदी यावेळी उपस्थित होते.

कु.तटकरे म्हणाल्या की, मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची आहे. या योजनेच्या लाभ वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम येत्या 17 ऑगस्ट रोजी पुण्यात होणार आहे. त्याचवेळी प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात यावेत. जेथे पालकमंत्री उपलब्ध नसतील त्या जिल्ह्यात खासदार/आमदार यांच्या उपस्थितीत त्याचवेळी लाभ वितरणाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम घेण्यात यावा. त्या ठिकाणी राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात यावे.

या योजनेत आतापर्यंत 1 कोटी 35 लाख लाभार्थ्यांची यादी तयार झाली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात डिबिटीद्वारे लाभ जमा करण्यात येणार आहेत. पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे 27 लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत. या लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहिम प्रत्येक जिल्ह्यात राबवावी. कोणताही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. त्यासाठी जिल्हास्तरीय बँकर्सची मदत घेण्यात यावी. येत्या 17 ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावेत, अशा सूचना कु. तटकरे यांनी दिल्या.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी दि. ३१ ऑगस्ट़ पर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे. दि. ३१ ऑगस्ट़ नंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यानाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. असेही कु. तटकरे यांनी सांगितले.

बँक खात्याशी आधार क्रमांक जोडल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना मिळणार लाभ

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येत्या 17 ऑगस्ट रोजी लाभाचे दोन हप्ते मिळणार आहेत. परंतु ज्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेले नाही, अशा पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्याशी आधार क्रमांक जोडले गेल्यानंतर लाभाची रक्कम मिळणार आहे. कोणतीही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाहीत. 17 ऑगस्ट रोजी लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांनी आपले बँक खात्याशी तातडीने आधार क्रमांक जोडून घ्यावेत, असे आवाहनही कु. तटकरे यांनी यावेळी केले.

 

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी दि. 1 ऑगस्ट़ नंतर येणाऱ्या अर्जाच्या मान्यतेची प्रक्रिया उद्यापासून सुरु होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील अर्जांचे छाननीसाठी सुधारित ॲप्लिकेशन तयार केले आहे. अर्जासंबंधी प्रक्रिया करण्यासाठी स्थानिकस्तरावर अधिकारही देण्यात आले आहेत. यासंबंधी क्षेत्रिय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून हे नवीन ॲप्लिकेशन वापरण्यास सोपे आहे. या ॲप्लिकेशनमध्ये वॉर्डस्तरीय, विधानसभा निहाय आकडेवारी उपलब्ध होणार आहे, असे श्री. यादव यांनी यावेळी सांगितले.

0000

नंदकुमार वाघमारे/विसंअ

 

बीडच्या शेतकऱ्यांना पिक विमा ३१ ऑगस्टपूर्वी  वितरीत करावेत – कृषिमंत्री धनंजय मुंडे

बीड जिल्ह्याच्या प्रलंबित पीक विम्यासंदर्भात बैठक

मुंबई दि. 13 – बीड जिल्ह्यात सन 2023-24च्या खरीप व रब्बी हंगामात एकूण 400 कोटी 24 लाख रुपये पीकविमा आतापर्यंत मंजूर करण्यात आला असून त्यापैकी आजपर्यंत 378 कोटी 21 लाख रुपयांचे वितरण संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात करण्यात आले आहे. तर उर्वरित 22 कोटी 3 लाख रुपयांचे वितरण विमा कंपनीने कोणतेही कारण न देता 31 ऑगस्टच्या आत पूर्ण करावे, असे निर्देश आज कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विमा कंपनीस दिले.

विमा कंपनीने अंबाजोगाई, परळीसह काही तालुक्यातील महसूल मंडळांमध्ये कोणतेही कारण न देता काही शेतकऱ्यांचे विमा अर्ज नाकारल्याचे निदर्शनास आले असून, कोणतेही तांत्रिक कारण किंवा सबब न देता ते सर्व विमा अर्ज कंपनीने मंजूर करून त्या शेतकऱ्यांना देखील त्यांचा प्रलंबित पीकविमा 31 ऑगस्ट पूर्वी वितरित करावा, असेही निर्देश श्री. मुंडे यांनी आज दिले.

तसेच या दोन्हीही प्रक्रियांचा कृषी संचालक यांनी दैनंदिन स्वरूपात आढावा घेवून अहवाल सादर करण्याचे निर्देश मंत्री मंत्री श्री. मुंडे आजच्या बैठकीत दिले आहेत.

बीड जिल्ह्यातील प्रलंबित पिकविम्याच्या संदर्भात आज कृषीमंत्री श्री. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख अधिकारी व भारतीय कृषी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक झाली. या बैठकीस कृषी संचालक विनयकुमार आवटे, उपसचिव  श्रीमती पाटील, भारतीय कृषी विमा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक श्री सावंत यांच्यासह अधिकारी आदी उपस्थित होते.

बीड जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीकविमा मिळावा यासाठी कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. मुंडे यांनी सातत्याने पीकविमा कंपनीसमवेत बैठका घेऊन वेळोवेळी विमा वितरणाची व्यवस्था केलेली आहे. पावसाचा खंड, दुष्काळाचे निकष अशा तांत्रिक बाबीत अडचणी येताच श्री.मुंडेंनी कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, हवामान तज्ज्ञ यांची मदत घेऊन विमा कंपनीस पीकविमा देण्यास भाग पाडले. दरम्यान कोणतेही कारण न देता नाकारलेले विमा अर्ज मंजूर करून त्या विमा रक्कमा सुद्धा कंपनीस शेतकऱ्यांना 31 ऑगस्ट पूर्वी द्याव्या लागणार आहेत.

000000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

 

अमळनेर शहरासाठी १९५ कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

मुंबई, दि. १३ :- अमळनेर शहरातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी नगरोत्थान महाभियानांतर्गत अमळनेर शहर नगरपरिषदेच्या १९५.३४ कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेस राज्य शासनाने  प्रशासकीय मंजुरी दिली आहे.

मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नांमुळे १९५.३४ कोटीची नवीन पाणी पुरवठा योजना साकारणार आहे. या योजनेमध्ये प्रकल्प किंमतीच्या ९० टक्के  रक्कम राज्य शासनामार्फत तर  १० टक्के  रक्कम संबधित स्थानिक स्वराज्य संस्थेची राहणार आहे. यानुसार योजनेसाठी राज्य शासनाकडून १७५.८१ कोटी रुपये उपलब्ध होणार असून १९.५३ कोटी रुपयाचा हिस्सा अमळनेर नगरपरिषदेचा राहणार आहे.

नगरोत्थान महाअभियानांतर्गत अमळनेर शहर पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यतेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले. या पाणी पुरवठा योजनेस मंजुरी देण्याबाबतचा शासन निर्णय नुकताच नगरविकास विभागाकडून जारी करण्यात आला आहे. या योजनेमुळे अमळनेर शहरातील नागरिकांना पुरेसे व मुबलक पाणी उपलब्ध होणार असल्याचेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

000

एकनाथ पोवार/विसंअ

लाडकी बहीण योजनेमुळे अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणाबरोबर महिला सक्षमीकरणाला चालना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • जळगाव जिल्ह्यातील रस्ते कामांसाठी शंभर कोटींचा निधी, एमआयडीसीत नवीन उद्योग आणणार
  • महिला सक्षमीकरणाच्या विराट मेळाव्यात विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वितरण
  • धरणगाव येथील बालकवी स्मारकाचे ई‌ – भूमिपूजन

जळगाव, दि. १३ (जिमाका वृत्तसेवा) :- “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत. यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळ, महिला सक्षमीकरणाला चालना मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेबरोबर राज्यातील विकास कामांना खीळ न बसू देता ते अविरतपणे चालू ठेवण्यात येतील. असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे महिला सक्षमीकरण मेळाव्यात केले. जळगाव जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांसाठी शंभर कोटी रुपये देण्यात येतील. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील एमआयडीसीत युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नवीन उद्योग आणण्यात येतील. अमळनेर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनांना निधी उपलब्ध करून देण्यात येईल. अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

सागर पार्क मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान मेळावा आज संपन्न झाला. महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह‌ विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. धरणगाव बालकवी स्मारकाचे ई- भूमिपूजन यावेळी संपन्न झाले.

या महिला सक्षमीकरण मेळाव्यास व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन, आपत्ती व्यवस्थापन व मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ, आमदार सर्वश्री चिमणराव पाटील, सुरेश भोळे, संजय सावकारे, लता सोनवणे, किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी बोलताना‌ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कवयित्री बहिणाबाई यांच्या कवितेचा संदर्भ दिला. ते म्हणाले की, ‘अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर’ जळगावच्या पवित्र भूमीत जन्मलेल्या बहिणाबाईंचं हे काव्य आहे. संपूर्ण जगणे, आयुष्य बहिणाबाईंनी या दोन ओळीतून मांडलंय. संसाराचा गाडा हाकताना हाताला चटके हे लागतात. बहिणींच्या हाताचे हे चटके कमी करण्यासाठीच आम्ही राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणली आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, रक्षाबंधनाच्या आधी म्हणजे पुढच्या आठवड्यात १७ ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्याचे हप्ते जमा होतील. आणि नंतर प्रत्येक महिन्यात दीड हजार रुपयांचा हप्ता मिळत राहील. या महिन्यात ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना एकाचवेळी तीन महिन्यांचे पैसे मिळणार आहेत. योजना चालू होऊन एक महिनाही झालेला नाही. राज्यात १ कोटी ४० लाख महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे. शासन-प्रशासनाच्या मेहनतीमुळे हे शक्य झाले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यासाठी शासन स्तरावर दहा महिन्यांपासून काम सुरू होते. या योजनेसाठी ३३ हजार कोटी आर्थ‍िक तरतूद करण्यात आली आहे. ही यापुढेही कायम सुरूच राहणार आहे. अशा‌ शब्दात मुख्यमंत्र्यांनी यावेळी महिला भगिनींना आश्वस्त केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले की, राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून ३ गॅस सिलिंडर मोफत देण्यात येत आहेत. तरूणांसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहेत‌. यात तरूणांना महिन्याला १० हजार मानधन देण्यात येत आहे. गेल्या वर्षी शासनाने मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान सुरु केले. केवळ वर्षभरात २ कोटींपेक्षा जास्त माता भगिनींना याचा फायदा झाला. लेक लाडकी योजनेतून मुलींना वयाच्या १८ वर्षानंतर एक लाख रूपये मिळणार आहेत. असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, लाडकी बहीण, अन्नपूर्णा योजना, तीर्थदर्शन, युवा कार्य प्रशिक्षण, बळीराजा वीज सवलत, वयोश्री योजना तसेच मुलींना उच्च शिक्षणासाठी शंभर टक्के शुल्क माफीचा निर्णय अशा योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजनेमुळे शेतकरी, कष्टकरी, महिला व युवकांच्या जीवनात आमूलाग्र बदल होणार असून यातील एकही योजना बंद होणार नाही याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

जळगाव जिल्ह्यात नार-पार प्रकल्पाचे पाणी आणणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गिरणा नदीवरील नार-पार प्रकल्पासाठी राज्यपालांची मान्यता घेण्यात आली आहे. या सिंचन प्रकल्पाचे पाणी जिल्ह्यात आणण्यात येईल. जळगाव जिल्ह्यातील सिंचनाचे प्रकल्प मार्गी लावण्यात आले आहेत. पाडळसे व बोदवड सिंचन प्रकल्पास निधी उपलब्ध करून दिला आहे. जळगाव जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प मार्गी लावून जिल्हा सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी शासन कटिबध्द असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी दिली.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, राज्यातील महिला शक्तीचा विकास झाला पाहिजे. यासाठी महिला सक्षमीकरणाचे काम राज्यात करण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेत महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येत आहे. यातून महिलांच्या संसाराला हातभार लागणार आहे. महिलांना एकदा दिलेले पैसे कधीच परत घेतले जाणार नाहीत. अशी १ कोटी ३५ लाख अर्ज पात्र आहेत. यातील ३५ लाख महिलांचे बॅंक खाते आधार लिंक बाकी आहेत. या महिलांचे खाते लिंक करून लवकरच त्यांनाही लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे एकही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही.

महाराष्ट्रात १५ लाख महिला लखपती दिदी करण्यात आलेल्या आहेत. या महिलांना लाभ देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २५ तारखेला जळगाव येथे येत आहेत. महिलांना तीन सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत. महिलांना एसटीतील ५० टक्के सवलतीमुळे एसटीची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. महिलांच्या हातात पैसे पडल्यामुळे ते त्याचा सदुपयोग करतात‌ त्यामुळेच महिलांना बळ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मुलींकरिता शासनाने मोफत शिक्षणाची व्यवस्था केली आहे. महिला सक्षम झाल्यावर महाराष्ट्र देशात विकासाच्या पुढे जाईल.

जिल्ह्यातील केळी पिकाला, पाटबंधारे प्रकल्पांना न्याय देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

जळगाव जिल्ह्यातील केळी पिकाला, पाटबंधारे प्रकल्पांना न्याय देण्याचे काम शासन करणार आहे. असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले की, गरीब, युवा, शेतकरी व महिलांसाठी हितकारक ठरणाऱ्या योजना राबविण्याचा निर्णय यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आला. अडीच लाखांच्या आत उत्पन्न असलेल्या महिलांना जुलैपासून महिन्याला पंधराशे रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महाराष्ट्राचे देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक उत्पन्न आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी निधीची चणचण नाही. ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे‌. राज्यातील विकासकामांवर परिणाम होऊ न देता ही योजना राबविण्यात येत आहे. हे पैसे थेट महिलांच्या बॅंक खात्यात येणार आहे. या योजनेमुळे वर्षाला ४६ हजार कोटी खर्च होणार आहे. त्यातून बाजारात पैसा येऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी वीजबिल सवलतीची बळीराजा योजना आणण्यात आली आहे‌.असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यात ५ लाख ९ हजार एवढ्या बहिणी पात्र ठरल्या आहेत. यातून महिन्याला ८८ कोटी रूपये बहिणींना देण्यात येणार आहेत. मागील अडीच वर्षांत सर्वात जास्त योजना महाराष्ट्रात महिलांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत.

याप्रसंगी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते सामुदायिक निधी अंतर्गत सावित्रीबाई फुले प्रभातसंघ, झेप महिला प्रभात संघ,स्त्री शक्ती महिला प्रभात संघ या महिला बचतगटांना प्रत्येकी 24 लाख 60 हजार रूपयांच्या अनुदानाचा धनादेशांचे वितरण करण्यात आले.

लाभांचे प्रातिनिधिक स्वरुपात वितरण

या सोहळ्यात विविध योजनांच्या लाभार्थी महिलांना प्रमाणपत्राचे व लाभांचे प्रातिनिधिक स्वरुपात वितरण करण्यात आले. श्री.समर्थ महिला बचत गट, अयोध्या नगर ( नागरी उपजीविका मिशन अंतर्गत धनादेश वितरण ), तनिषा पोरवाल ५० लक्ष, शितल विसपुते २० लक्ष, अक्षिता पाटील १० लक्ष (मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अंतर्गत लाभ धनादेश वितरण), माऊली महिला बचत गट, बिलवाडी, श्री.गणेश महिला बचतगट,बोरनार ( समुदाय गुंतवणूक निधी प्रत्येकी ६ लाख धनादेश वितरण) दुर्गा महिला बचत गट,चिंचखेडे प्र., कालिंका माता महिला बचत गट,चिंचगट प्र.( मानव विकास मिशन अंतर्गत ई-रिक्षा ), शितल वानखेडे, रोहन देसले ( मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना नियुक्ती पत्र), आरती श्रीनाथ, सरला भिसे, निकीता पाटील, जागृती पाटील, पुजा श्रीनाथ ( पंडीत दिनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत नियुक्ती पत्र ) जनाबाई कोळी, धानोरा, मीराबाई कसोदे पाळधी खु., शांताबाई गरजे बाभळे, आशा तडवी, आडगाव यांना (राज्य पुरस्कृत आवास योजनेतंर्गत शबरी व रमाई घरकुल आवास योजना ) धनश्री नेमाडे, देवाश्री पाटील यांना (कृषी विभागामार्फत ड्रोन वाटप ), देवांश्री पाटील या लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यात आले. यातील‌ काही महिलांनी शासकीय योजनांच्या लाभामुळे जीवनमानात झालेल्या बदलाविषयी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी सर्वधर्मीय महिलांनी व्यासपीठावर जाऊन मुख्यमंत्र्यांना राखी बांधली व त्यांच्याशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्र्यांचे महिलांनी मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात स्वागत केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कवियित्री बहिणाबाईंचा पुतळा व बचतगटांच्या वस्तूंचा संच देऊन स्वागत करण्यात आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी लिहिलेल्या मानपत्राचे यावेळी वाचन करण्यात आले. त्यानंतर ते मुख्यमंत्र्यांना प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमापूर्वी, जळगाव जिल्ह्यातील बहिणींनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेले भावनिक पत्र जिल्ह्यातील बहिंणींच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात दोन बहिणींच्या वतीने देण्यात आले. याप्रसंगी या पत्राची दृकश्राव्य चित्रफित ही दाखविण्यात आली. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची रूपरेषा डॉ.अमोल शिंदे यांनी सादर केली. सूत्रसंचालन‌ हर्षल पाटील आणि अपूर्वा वाणी यांनी केले.

00000

स्वातंत्र्य दिन समारंभाची मंत्रालयात रंगीत तालीम

मुंबई, दि. १३ – भारतीय स्वातंत्र्याचा ७७ वा वर्धापन दिन १५ ऑगस्ट २०२४ रोजी साजरा करण्यात येणार आहे. राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालय येथे सकाळी ९.०५ वा. ध्वजारोहण करून साजरा करण्यात येणार आहे.

सामान्य प्रशासन (राजशिष्टाचार) विभागामार्फत भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय येथे ध्वजारोहण समारंभाची रंगीत तालीम आज सकाळी घेण्यात आली. यावेळी राजशिष्टाचार विभागाचे उपसचिव हेमंत डांगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी मंत्रालयीन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

०००००

हेमंतकुमार चव्हाण/सं.स

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मंत्रालयात आयोजित बचतगटांच्या प्रदर्शनाचे मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, दि.१३ :- महिला व बाल विकास विभागाअंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्यावतीने राज्यातील विविध जिल्ह्यातील महिला बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, यांच्या हस्ते आज करण्यात आले.

मंत्री तटकरे म्हणाल्या की, महिलांना जास्तीत जास्त आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.  या उपक्रमांना मिळणारा प्रतिसाद पाहून महिला व बालविकास मंत्री म्हणून मला आनंद आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या  सक्षम करण्याच्या दृष्टीने महिला आर्थिक विकास महामंडळ नेहमीच अग्रेसर राहिला आहे. मंत्री कु. तटकरे यांनी यावेळी सांगितले.

प्रदर्शन १४ ऑगस्टपर्यत असून ठाणे, चंद्रपूर, सातारा, सांगली, पुणे, जालना, नाशिक, रायगड, पालघर, कोल्हापूर या दहा जिल्ह्यामधील महिला बचत गटांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला आहे.

या प्रदर्शनात महिला बचत गटातील महिलांनी तयार केलेले हस्त निर्मित राखी, पर्स, खाद्यपदार्थ, वारली पेंटिंग कोल्हापूरी चप्पल, घरगुती सरबत, तोरण, फुलांच्या माळा, बांबूपासून आकर्षित शोभेच्या वस्तू इत्यादी उत्पादीत वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.

००००

काशीबाई थोरात/विसंअ

 

महाराष्ट्रातील ‘अहिल्याभवन’ संपूर्ण देशात आदर्श ठरेल – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि.१३ : कौशल्य विकास मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि भारतातील पहिले ‘अहिल्याभवन’ मानखुर्द येथे उभारले जाणार असल्याची घोषणा आज केली. जिल्हा नियोजन समिती निधीच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या अहिल्याभवनासाठी ४७ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. तसेच ३५,५०० स्क्वेअर मीटर इतक्या परिसरात हे भवन उभारले जाणारे आहे. या अहिल्याभवनामध्ये मुंबई उपनगरातील महिला आणि बालविकास विभागाची विविध कार्यालये एकाच छताखाली येणार आहेत.

चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने चेंबूर येथील फाईन आर्ट्स सोसायटी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्या ठिकाणी मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी याबाबत घोषणा केली.

मंत्री श्री लोढा म्हणाले की, “आज  भारतात प्रथमच आंतरराष्ट्रीय दर्जाचे अहिल्या भवन उभारले जाणार आहे. महिला आणि बालकांच्या विकासासाठी शासनाची कटिबद्धता दर्शवणारे हे भवन फक्त राज्यातच नव्हे, तर देशात आदर्श ठरेल. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा आदर्श आज संपूर्ण महाराष्ट्रासमोर आहे. त्यांची शिकवण जपण्यासाठी, त्यांच्या कार्याला आदरांजली वाहण्यासाठी शासनाचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे. महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या सबलीकरणासाठी अहिल्या भवनाच्या माध्यमातून अतिशय महत्वाचे कार्य केले जाईल हा विश्वास आहे.

अहिल्याभवन येथे संकटात अडकलेल्या, हिंसाचाराचे बळी ठरलेल्या महिलांना मानसिक व कायदेविषयक समुपदेशन करण्यासाठी कार्यरत असलेल्या समुपदेशन केंद्रांच्या योजनेचे अद्ययावत समुपदेशन केंद्र या इमारतीत कार्यरत होईल. याद्वारे पीडित महिलांना आवश्यक ते समुपदेशन करून, त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सोबतच महिलांना विविध कायदे, योजना व विकासाच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेले विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी २०० व्यक्तींची क्षमता असलेले अद्ययावत ऑडिटोरियम या संकुलात उभे राहणार आहे. त्याचबरोबर महिला व बालविकास विभागाच्या राज्यभरातील अधिकाऱ्यांना मुंबईत हक्काचे विश्रामगृह या संकुलात उभारण्यात येणार आहे. याशिवाय महिला व बालकांच्या विविध विकासात्मक चळवळीसाठी कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना देखील या विश्रामगृहाचा लाभ घेता येणार आहे.

बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) यांचे एकूण २० कार्यालये या इमारतीत असतील. सद्यस्थितीत यातील बहुतांश कार्यालये मुंबईत भाड्याच्या इमारतीत आहेत. महिला आयोगाचे मुंबई विभागीय कार्यालय,बालहक्क आयोगाचे मुंबई विभागाचे कार्यालय , बालकल्याण समिती : मुंबई उपनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ व लोकसंख्या विचारात घेऊन या जिल्ह्यात २ बालकल्याण समिती कार्यालय आहेत. काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांच्या बाबतीत या समितीला निर्णय घेण्याचे न्यायिक अधिकार असतात. त्यांचे अद्ययावत सुविधांनी सुसज्ज असलेले दोन स्वतंत्र कार्यालये या इमारतीत असतील.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील बालकांच्या वाढत्या गुन्ह्यांमधील समावेशाचे प्रमाण लक्षात घेता या जिल्ह्यात प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या दोन बालन्याय मंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. या इमारतीत या दोन्ही बालन्याय मंडळांसाठी अद्ययावत सुसज्ज असे कार्यालये असतील.महिला आर्थिक विकास महामंडळ यांचे मुंबई जिल्ह्याचे कार्यालय : बचतगटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाची चळवळ यशस्वीपणे राबविणाऱ्या महिला आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय या इमारतीत असेल.

०००००

संध्या गरवारे/विसंअ

 

 

 

 

 

जिल्ह्यातील प्रत्येक घरावर दिमाखात राष्ट्रध्वज फडकवा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

ध्वजारोहण करून ‘हर घर तिरंगा’ अभियानाला प्रारंभ

चंद्रपूर, दि. 13 : जिल्ह्यातील प्रत्येक घरावर अभिमानाने तिरंगा फडकवून ‘हर घर तिरंगा’ अभियान चंद्रपूर जिल्ह्यात यशस्वी करावे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने या अभियानात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा आणि स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करावे, असे आवाहन राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. 13 ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान साजरे होणार आहे. या निमित्ताने मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथील निवासस्थानी ध्वजारोहण केले आणि अभियानाचा शुभारंभ केला.

ध्वजारोहणानंतर श्री. मुनगंटीवार म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा… हर मन तिरंगा’ अभियानात सहभागी होण्याचे देशवासियांना आवाहन केले आहे. ‘देशभक्ती ना हो क्षणिक उबाल… मन में पले वह पूरे साल’ अशी त्यामागची भावना आहे. 15 ऑगस्ट 1947 ला देशाच्या स्वातंत्र्याचा शताब्दी महोत्सव साजरा करताना विकासात योगदान द्यायचे आहे, असा संकल्प प्रत्येकाने करावा.’

महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात अभियान सुरू झाले आहे. तिरंगा यात्रा मनामनापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला आहे. तिरंगा आपल्यासाठी प्राणप्रिय आहे. देशाची शान आहे. त्यामुळे या अभियानात प्रत्येकाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा,’ असे आवाहन पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले.

तिरंगा ध्वज हा केवळ चौकोनी कापडाचा तुकडा नाही. भारतीय अस्मितेचे प्रतीक आहे. लाखो शहिदांनी प्राणांची आहुती दिल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि त्यानंतर हा तिरंगा ध्वज हाती आला आहे. स्वातंत्र्य सैनिकांनी हसत हसत देशासाठी आपले प्राण अर्पण केले. स्वतः च्या परिवारापेक्षा माझा देश म्हणजेच माझा परिवार या भावनेने त्यांनी आपले आयुष्य भारतमातेच्या चरणी अर्पण केले. अशा वीर शहिदांचे स्मरण करूया, असेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

राज्यपालांची छेडानगर सुब्रमण्यम समाज मंदिराला भेट

चंडी महायज्ञात दिली पूर्णाहुती; पिठाधिपती विजयेंद्र सरस्वती यांचे संबोधन

मुंबई, दि. 13 : महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी छेडानगर,चेंबूर, मुंबई येथील दक्षिण भारतीयांच्या जुन्या श्री सुब्रह्मण्य समाज मंदिराला काल (दि. 12) भेट दिली.

अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत असलेल्या सुब्रह्मण्य समाजाच्या श्री मुरुगन (कार्तिक स्वामी) मंदिरात चंडी महायज्ञ, लक्ष्मीनारायण हृदय पारायण तसेच संपूर्ण चतुर्वेद पारायणाचे समापन राज्यपाल श्री.राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत झाले.

भारतात लोककल्याणासाठी आणि शांततेसाठी वेळोवेळी महायज्ञ व अनुष्ठानाचे आयोजन होत आले आहे. त्यामुळे देशात शांती व सौहार्द निर्माण होऊन देश सुजलाम सुफलाम राहण्यास मदत झाली आहे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

यावेळी राज्यपालांनी सुब्रह्मण्य समाज मंदिरात वल्ली – देवसेना सहित श्री सुब्रह्मण्य स्वामी, महागणपती, अय्यप्पन, गुरुवायुरप्पन, दुर्गा देवी, शिव पार्वती आणि नवग्रहांचे दर्शन घेतले तसेच चंडी महायज्ञात पूर्णाहुती दिली.

महाराष्ट्र ही  संतांची तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. कांची कामकोटी पिठाचे महास्वामी शंकराचार्य तसेच जयेंद्र स्वामी यांचे महाराष्ट्रावर विशेष प्रेम राहिले आहे असे पिठाचे विद्यमान पिठाधिपती विजयेंद्र सरस्वती यांनी दृकश्राव्य माध्यमातून संबोधित करताना सांगितले.

छेडानगर येथील मंदिरात आजवर चारवेळा पूर्ण कुंभाभिषेक झाल्यामुळे हे मंदिर विशेष महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सुब्रमण्यम समाजाचे सचिव पी. सुब्रमण्यम, डी. विजया भानू गणपतीगल, श्रुती स्मृती सेवा ट्रस्ट व श्री सुब्रह्मण्य समाजाचे पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.

००००

Maharashtra Governor visits Subramanya Samaj Mandir on its Platinum Jubilee; Kanchi Seer Vijayendra Saraswati blesses people

 

Mumbai Dated 13 : Maharashtra Governor C.P. Radhakrishnan visits Subramanya Samaj Mandir on its Platinum Jubilee; Kanchi Seer Vijayendra Saraswati blesses people

Maharashtra Governor C.P. Radhakrishnan visited the Subramanya Samaj’s Lord Murugan (Kartik Swami) temple at Chhedanagar, Chembur in Mumbai on the occasion of the 120th day of the Chandi Maha Yagyam on Mon (12 Aug)

The temple, which is one of the biggest and oldest Lord Murugan temples in Mumbai is celebrating its Platinum Jubilee this year.

The Governor had the darshan of Valli Devasena Sameth Sri Subramania Swamy, Shiva Parvathi, Nataraja, Maha Ganapathi, Dharmasanstha Ayyapa, Guruvayurappan, Durga Devi and the Navagrahas.

The Governor offered Purnahuthi at the Chandi Maha Yagyam and interacted with devotees assembled on the occasion.

The Peethadhipati of Kanchi Kamakoti Peetam Vijayendra Swamy addressed the meeting through online mode.

Along with the Chandi Maha Yagyam, the temple also organised Lakshmi Narayana Hridaya Stotram and Sampoorna Chaturveda Paranayam to commemorate the occasion.

The Secretary of Sri Subramania Samaj P. Subramanian, D. Vijaya Banu Ganapadigal, Vice President of Sri Subramania Samaj Ramnath S, Chairman of Shruti Smruti Seva Trust and devotees were present.

0000

बचावकार्यासाठी अत्याधुनिक साधनसामुग्रीचा वापर करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नैसर्गिक आपत्ती प्रतिबंधक १९५० कामांना मंजुरी; मंत्रालयातील राज्य आपत्कालीन प्रतिसाद केंद्र अद्ययावत करणार

मुंबई, दि. १३ : नैसर्गिक आपत्ती रोखण्यासाठी प्रभावी उपायोयजना असणाऱ्या २,७६६ कोटी रुपयांच्या १९५० विविध कामांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी दिली. दरड प्रतिबंधक, वीज कोसळण्यापासून प्रतिबंध, पूर संरक्षण भिंत, लहान पुलांचे काम, नाला खोलीकरण दुष्काळ निवारणासाठी भूजल पुनर्भरण, तलाव दुरुस्ती, वनीकरण आदी कामांचा समावेश आहे. मंत्रालयातील राज्य आपत्कालीन प्रतिसाद केंद्र अद्ययावत करण्याचा देखील निर्णय यावेळी घेण्यात आला.

मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी आदी यावेळी उपस्थित होते.

नैसर्गिक आपत्ती रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याने ही आपत्ती प्रतिबंधक उपाययोजनेची कामे वेळेत आणि गुणवत्ता पूर्ण पद्धतीने करा. आपत्तीमध्ये बचावकार्यासाठी उपयुक्त ठरतील असे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असलेली साधनसामुग्री घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.

मंत्रालयातील राज्य आपत्कालिन प्रतिसाद केंद्राचे अद्ययावतीकरण करताना अत्याधुनिक साधन सामुग्रींचा वापर केला जाणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक जिल्हाधिकारी यांना या केंद्राची कनेक्टीव्हीटी देखील दिली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा आपत्कालिन प्रतिसाद केंद्राचे देखील अद्ययावतीकरण करण्यात येणार असून त्यासाठी १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

यावेळी राज्य भुस्खलन व्यवस्थापन आराखडा, ग्रामपंचायत आपत्ती व्यवस्थापन आराखडा, महाराष्ट्र राज्य उष्मलाट कृती आराखडा या आपत्ती विषयक आराखड्यांना तसेच पालघर-वसई भूमिगत विद्युत वाहिनीच्या कामाला मंजुरी देण्यात आली.

००००

ताज्या बातम्या

जागतिक माध्यम संवाद २०२५ : सदस्य राष्ट्रांद्वारे वेव्हज जाहीरनाम्याचा स्वीकार

0
‘एआय’च्या युगात सर्जनशीलतेला प्रोत्साहन देताना परंपरा आणि वारशाला अभिव्यक्ती देण्यासाठी दर्शवली सहमती पक्षपात कमी करत, सामग्रीचे लोकशाहीकरण करून आणि नीतिमत्तेला प्राधान्य देताना उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या जबाबदार...

नवी मुंबईतील ‘एज्युकेशन सिटी’मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांच्या माध्यमातून शिक्षण मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. २ - विकसित भारताच्या उभारणीसाठी आखण्यात आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताचे दरवाजे जगासाठी खुले झाले आहेत. नवी मुंबईत आकाराला येत असलेल्या ‘एज्यूकेशन...

अखिल भारतीय सिनेमा दंतकथा नाही; चित्रपट उद्योगातील दिग्गजांचा भारतीय चित्रपटातील एकतेवर भर

0
कोविडनंतर चित्रपट पाहण्यातील बदलते कल अनुपम खेर यांनी केले अधोरेखित ज्यावेळी आपली परस्पर सामायिक संस्कृती, गाणी, कथा, माती याचा आदर करता, त्यावेळी तो...

‘वेव्हज्’ने मांडली जागतिक स्ट्रीमिंग आणि चित्रपट अर्थव्यवस्थेत भारताची विकसित होणारी भूमिका

0
“आशयाने खऱ्या अर्थाने सीमा ओलांडून प्रवास करावा यासाठी भारताने स्टुडिओ संबंधित पायाभूत सुविधा, निर्मिती केंद्रे आणि तंत्रज्ञान-चालित प्रणालीमध्ये गुंतवणूक केली पाहिजे” - शिबाशिष सरकार सर्जनशीलतेत...

जगाचे आशय निर्मिती केंद्र बनण्याकरिता भारतासाठी उत्तम काळ  – अभिनेत्री श्रद्धा कपूर

0
भारत आशय निर्मितीत अभूतपूर्व वाढ अनुभवत आहे -  इंस्टाग्राम प्रमुख अॅडम मोसेरी वेव्हज्‌ २०२५ मध्ये अनौपचारिक संभाषणात कल आणि व्हायरल होणे यावर विचारमंथन मुंबई,...