शुक्रवार, मे 2, 2025
Home Blog Page 475

शेतकऱ्यांचे पीक विमाबाबत प्रश्न निकाली निघाल्याचे समाधान – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

  • ३१ ऑगस्टपर्यंत मिळणार शेतकऱ्यांना रक्कम

  • शेतकऱ्यांकडून पालकमंत्री मुनगंटीवार यांचे आभार

चंद्रपूर, दि. ११ : राज्य शासनाने अर्थसंकल्पामध्ये पीक विमा योजनेसाठी तरतूद करूनसुद्धा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त शेतीच्या विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत होती. याबाबत शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी होत्या. या तक्रारींची दखल घेऊन केवळ पाच दिवसांत चंद्रपूर येथे दोन बैठका तर मुंबई येथे कृषिमंत्री आणि सचिवांच्या उपस्थितीत तातडीने बैठक घेण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न निकाली निघाला असून जिल्ह्यात प्रथमच पीक विम्याची 202 कोटी 76 लाखांची रक्कम 31 ऑगस्टपर्यंत मिळणार असल्याचे समाधान आहे, अशा भावना राज्याचे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

नियोजन भवन येथे प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा कृषी अधिक्षक शंकर तोटावार, उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, चंदनसिंग चंदेल, नियोजन समितीचे सदस्य डॉ. मंगेश गुलवाडे, ब्रिजभूषण पाझारे, बंडू गौरकर आदी उपस्थित होते.

पीक विम्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन 5 ऑगस्ट रोजी चंद्रपूरात, लगेच 7 ऑगस्ट रोजी मुंबई येथे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि (शनिवारी )10 ऑगस्ट रोजी पुन्हा चंद्रपूर येथे पीक विमा योजनेचा आढावा घेण्यात आला, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केल्यामुळेच जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांचे पीक विमा योजनेचा प्रश्न सुटलेला आहे.

पुढे पालकमंत्री म्हणाले, नो रेनफॉल या अटीअंतर्गत 20095 शेतकऱ्यांचे अर्ज होते. हे सर्व अर्ज आता मान्य करण्याचे विमा कंपनीने म्हटले आहे. तसेच पेरील नॉट कव्हर्ड या अंतर्गत असलेले 6864 अर्ज, लेट इंटिमेशन (सुचना वेळेवर न देणे) अंतर्गतचे 7959 अर्ज, क्लेम स्क्रुटीनी अंतर्गत 4811 अर्ज व इतर त्रृटी असलेले असे साधारणत: 37 हजारांच्या वर अर्ज आता मान्य करण्याचे विमा कंपनीने कबूल केले आहे. याशिवाय 4668 डुप्लीकेट अर्जांची पुन्हा पडताळणी करून स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये मान्य करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. क्रॉप मिसमॅचचे 1762 अर्जांची कृषी विभाग आणि विमा कंपनी पुन्हा नव्याने पडताळणी करणार असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनीसुध्दा मार्गदर्शन केले. सादरीकरण जिल्हा कृषी अधिक्षक शंकर तोटावार यांनी केले.

प्रशासनाची ही तत्परता

प्रधानमंत्री पीक विमा योजना या संवेदनशील विषयावर जिल्हाधिकारी विनय गौडा, तसेच संपूर्ण जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाची अतिशय तत्परता जाणवली. जिल्हाधिकाऱ्यांनी वारंवार या गोष्टीचा पाठपुरावा करून संबंधित विभागाचा आढावा घेतला आणि सुचना केल्या. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चांगले काम केल्याबद्दल पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी प्रशासनाचे कौतुक केले.

जिल्ह्यात प्रथमच पीक विम्यासाठी ऐवढी मोठी रक्कम

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे एकूण 202 कोटी 76 लाख 23 हजार 944 रुपयांचे क्लेम आहेत. यात 1 लाख 51 हजार 352 शेतकऱ्यांचा समावेश असून यापैकी 86,657 शेतकऱ्यांना 80 कोटी 66 लाख 34 हजार 910 रुपयांचे विमा रक्कम मिळाली आहे. कंपनीकडून उर्वरीत 63 कोटी रुपये रक्षाबंधनाच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सुचना दिल्या आहेत. शासनाच्या वतीने उर्वरित 59 कोटीची रक्कम लवकरच देण्यात येणार आहे.

जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विम्याचे 3 लक्ष 46 हजार अर्ज

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत यापूर्वी केवळ 62 हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. मात्र गतवर्षी 1 लक्ष 84 260 शेतकऱ्यांचे 3 लक्ष 41 हजार 233 अर्ज आले. तर यावर्षी आतापर्यंत 1 लक्ष 79 हजार 443 शेतकऱ्यांचे 3 लक्ष 46 हजार 692 अर्ज आले आहेत.

पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे उर्वरित 46,500 हजार शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा

ज्या शेतकरी बांधवांना आतापर्यंत पीकविम्याचा क्लेम मिळाला नाही . अशा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना त्यांच्या लाभ होणार आहे. उर्वरित 46500 हजार शेतकऱ्यांना आवश्यक बाबींची पूर्तता करून लवकरच साधारण 56 कोटी रुपये मिळणार आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामूळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना दरवर्षी पेक्षा सर्वाधिक पीक विमा रक्कम या वर्षी मिळणार आहे. हे विशेष.

शेतकऱ्यांनी मानले पालकमंत्री यांचे आभार

सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे व विशेष प्रयत्नाने ही पीक विम्याची रक्कम मिळणार असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

000000

 

आगीत नुकसान झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

नाट्यगृह पुन्हा उभारण्यासाठी लागणारा निधी वेळेतच देणार; नव्याने बांधकाम करताना जसं नाट्यगृह होतं तसं उभं करण्याच्या केल्या सूचना

कोल्हापूर दि. ११ (जिमाका) : दुर्देवी घटनेत कोल्हापूर शहरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे अतोनात नुकसान झाले. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेला निधी वेळेअभावी न मिळाल्याने काम थांबले ही अडचण येवू देणार नाही, निधी वेळेतच देणार असल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली.

आगीमुळे नुकसान झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आज पाहणी केली, त्यावेळी उपस्थित कलावंतांशी संवाद साधाला. ते म्हणाले, ऐतिहासिक वास्तूचे जसे बारकावे असतात तसेच पुन्हा करण्यासाठी या कामाला वेळ लागू शकतो परंतु कामे चांगली करण्यात येतील. लाकडी काम, दगडी काम आणि सिसम सारख्या लाकडांचा वापर करण्यात येणार असल्याने बारकावे लक्षात घेवून नाट्यगृह उभारण्याच्या सूचना प्रशासनाला त्यांनी दिल्या.

यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमकार दिवटे तसेच महापालिका प्रशासनाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री यांनी काल्हापूरमध्ये आल्यानंतर विमानतळावरून थेट केशवराव भोसले नाट्यगृहाला भेट दिली. सुरूवातीला आल्यानंतर त्यांनी भीषण आगीमुळे भस्मसात झालेल्या मुख्य रंगमंचाची पाहणी केली. याठिकाणी त्यांनी शक्य असेल तर नव्याने काम करताना नाट्यगृहाची उंची वाढविण्याच्या सूचना केल्या. नाट्यगृहाशी कलावंत आणि श्रोत्यांचं जिव्हाळ्याचं नातं जोडलं गेलं आहे. जशा कोल्हापूरवासियांच्या या नाट्यगृहाशी भावना जोडल्या आहेत त्याप्रमाणे आमच्याही भावना जोडल्या गेल्या आहेत. हे पुनर्बांधनीचे काम मोठं असून यासाठी लागणारा वेळ आर्किटेक्चरच सांगतील असेही ते यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या निधीपेक्षा जरी जास्त निधी लागला तरी तो दिला जाईल, मात्र नाट्यगृह पुर्वीसारखे पुन्हा तयार झाले पाहिजे अशा सूचना त्यांनी महापालिका आयुक्तांना दिल्या.

त्यानंतर त्यांनी बाहेरील संरक्षक भिंतीची पाहणी करून खासबाग मैदानावरील स्टेजच्या नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी एसी नव्याने बसविताना त्याचे बाहेरील युनिट सुरक्षित ठिकाणी बसवा. खासबाग मैदान आणि नाट्यगृहासाठी आवश्यक छताचा पत्रा उत्कृष्ट दर्जाचा वापरा. बाहेरील संरक्षक भिंतीही जुने पुरावे किंवा छायाचित्र पाहून चांगल्या पद्धतीने तयार करण्याच्या सूचना केल्या. स्वच्छतागृह, इतर भिंती आणि दगडांचे बांधकाम करताना मजबूत, एकसारखे ऐतिहासिक दिसेल अशा पद्धतीने करा. ऐतिहासिक बांधकाम करणाऱ्या आर्किटेक्चरची निवड करून त्यांच्याकडून सर्व इमारत जशी आहे तशी एकसारखी दिसेल असा आराखडा तयार करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या.

००००

कापूस-सोयाबीन अर्थसहाय्यासाठी प्रती हेक्टरी ५ हजारांचे अनुदान; ई-पीक पेरा नोंदणी असणारे सर्व शेतकरी लाभार्थी – कृषिमंत्री धनंजय मुंडे

Virendra Dhuri DGIPR,Mantralaya

मुंबई दि. ११ :  सन २०२३ मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या आधार व बँक खात्याशी संलग्न असलेल्या माहितीचा वापर व्हावा यासाठी त्यांचे वैयक्तिक संमतीपत्र किंवा सामूहिक ना-हरकत पत्र आपल्या कृषी सहाय्यकाकडे जमा करणे आवश्यक असल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.

२०२३ च्या खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीनचे कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीवर उपाययोजना म्हणून राज्य शासनाने मागील वर्षीच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे, दोन हेक्टर पर्यंत मदत देण्याच्या निर्णय घेतला आहे.

सदर रक्कम सोयाबीन-कापूस उत्पादक असलेल्या व ज्यांनी ई-पीक पेऱ्यांची नोंदणी केलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. शेतकऱ्यांचे आधार व बँक खाते संलग्न असलेली माहिती, कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या खात्यांवर रक्कम वर्ग करण्यासाठी वापरावी. यासाठी शेतकऱ्यांनी वैयक्तिक संमतीपत्र किंवा सामूहिक शेती असल्यास सामूहिक नाहरकत प्रमाणपत्र तातडीने सादर करावे, जेणेकरून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी वितरीत करता येईल असेही मंत्री श्री. मुंडे यांनी सांगितले.

00000

शासन निर्णय वाचा : [pdf-embedder url=”https://mahasamvad.in/wp-content/uploads/2024/08/202407291753274401.pdf”] 

 

शिक्षण, संस्कृती आणि संस्कारातून करा जीवनाची वाटचाल -पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

  • महर्षी विद्या मंदिर येथे पुलाचे लोकार्पण
  • एक झाड एक विद्यार्थीउपक्रमाचा शुभारंभ

चंद्रपूर दि. १०: भारताची अध्यात्मिक संस्कृती जगाने अनुभवली आहे. भारत आता शिक्षण क्षेत्रातही अग्रेसर होत आहे. मात्र संस्कृती आणि शिक्षणाला संस्कारांचीही जोड आवश्यक आहे. महर्षी विद्या मंदिरने हेच ब्रीदवाक्य जोपासले आहे. या मार्गाने विद्यार्थ्यांनी वाटचाल केली, तर त्यांचे उज्ज्वल भवितव्य निश्चित आहे, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

महर्षी विद्या मंदिर येथील पुलाचे लोकार्पण तसेच ‘एक विद्यार्थी एक झाड’ या उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, उपअभियंता प्रकाश अमरशेट्टीवार, मनपाचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त रवींद्र भिलावे, संस्थेचे अध्यक्ष गिरीश चांडक, उपाध्यक्ष वसुधा कंचर्लावार, सचिव दत्तात्रय कंचर्लावार, उमेश चांडक, अनुपम चिलके, वीरेंद्र जयस्वाल, डॉ. मंगेश गुलवाडे, कल्पना पलीकुंडवार, मनोज सिंघवी, सोहम बुटले, आदींची उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘केवळ सहा महिन्यांत 1 कोटी 97 लक्ष 63 हजार 726 रुपये खर्च करून शाळेच्या विद्यार्थ्यांकरिता हा पूल बांधण्यात आला आहे. महर्षी विद्या मंदिर ही केवळ एक शाळा नव्हे, तर ज्ञानाचे मंदिर आहे. शिक्षण, संस्कार आणि संस्कृती हे या शाळेचे ब्रीदवाक्य असून हाच जीवनाचा खरा मार्ग आहे. आज आपण शिक्षणामध्ये अग्रेसर आहोत, मात्र संस्कारांमध्ये कमी पडत आहोत, ही एक शोकांतिका आहे. त्यामुळे आजच्या विद्यार्थ्यांना संस्कारी शिक्षण मिळणे गरजेचे आहे.

प्रत्येक विद्यार्थ्यामागे एक झाड, ही शाळेची अतिशय उत्तम संकल्पना आहे. माता आणि धरणीमाता यांचे आपल्यावर फार मोठे ऋण आहे. वसुंधरेच्या रक्षणासाठी प्रत्येकाने एक झाड लावलेच पाहिजे. वृक्ष लावूनच आपण या वसुंधरेचे ऋण फेडू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम सुरू केला असून महाराष्ट्र राज्याने वृक्ष लागवडीकरिता ‘अमृत ॲप’ विकसित केले आहे. विद्यार्थी आणि नागरिकांनी एक झाड लावून या ‘अमृत ॲप’मध्ये सेल्फी अपलोड करावा. राज्य शासनाकडून त्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांजवळ हे प्रमाणपत्र राहील त्याला भविष्यात या प्रमाणपत्रामुळे फायदा होईल, असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले.

पुढे ते म्हणाले, ‘आजपासून शाळेचे रौप्य महोत्सवी वर्ष सुरू झाले आहे. हा प्रवास रौप्य महोत्सवापासून सुरू होऊन सुवर्ण महोत्सवापर्यंत आणि त्याहीपुढे होईल. शाळेकडून शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचाही आवर्जून प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने बघून त्यासाठी परिश्रम सुद्धा करावे. केवळ पैशाच्या मागे न धावता आनंदी, संस्कारी आणि समाधानी जीवन जगावे. या गोष्टी पैशाने विकत घेता येत नाहीत. ‘एक झाड एक विद्यार्थी’ हा शाळेने सुरु केलेला उपक्रम अतिशय चांगला आहे.’ प्रास्ताविकातून संस्थेचे अध्यक्ष गिरीश चांडक यांनी उपक्रमाबद्दल माहिती दिली.

विद्यार्थी व पालकांना वृक्षांचे वाटप

पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात साईश कोंडावार, निहाल भोयर, आर्यन चौधरी, कीर्तन पटेल, महेक बेले, प्रेरित बोरकर, अर्जुन माताघरे, नक्ष उरकुडे, इशिता ठाकरे, समाइरा राजुरकर या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना वृक्ष वाटप करण्यात आले.

०००

नक्षत्रवाडी गृह प्रकल्पाचे बांधकाम अत्याधुनिक तंत्रज्ञानाने करण्यात येणार -गृहनिर्माण मंत्री अतुल सावे

छत्रपती संभाजीनगर, दि.१०,(विमाका) :  नक्षत्रवाडी गृह प्रकल्पाचे बांधकाम अत्याधुनिक तंत्रज्ञानाने करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे  हा संपूर्ण प्रकल्प दीड ते दोन वर्ष कालावधीत पुर्ण होईल, असा विश्वास गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.

छत्रपती संभाजीनगर  क्षेत्रविकास मंडळ प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत  नक्षत्रवाडी येथील 1056 अत्यल्प उत्पन्न गट अंतर्गत गृह प्रकल्पाचे भूमिपूजन गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल ना सावे यांच्या हस्ते करण्यात आले.

नक्षत्रवाडी येथे आयोजित कार्यक्रमाला आमदार संजय सिरसाट, गृहनिर्माण  क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वैद्य, कार्यकारी अभियंता नितीन शिंदे, राजेंद्र जंजाळ, विकास जैन, अनिल मकरिये, हर्षदा सिरसाट, विवेक देशपांडे  आदी उपस्थित  होते.

गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून गरजू कुटुंबाला आपले हक्काचे असावे म्हणून त्यांनी 2014  पासून प्रधानमंत्री योजनेतंर्गत देशभरात 3 कोटी घरे उभारण्यात आली आहेत तर 3 कोटी घरांची कामे बाकी आहेत. नक्षत्रवाडी मधील 6.4 हेक्टर क्षेत्रावर 1056  सदनिकांच्या प्रकल्पास मंजूरी मिळाली असून सदर घराची किंमत 14 लाख ठेवण्यात आली आहे.  त्यापैकी 2.5 लाख रुपये प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान प्रदान करण्यात येणार आहे.

नक्षत्रवाडी प्रकल्पाचे बांधकाम अत्याधुनिक तंत्रज्ञानाने करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे  हा संपूर्ण प्रकल्प दीड ते दोन वर्ष कालावधीमध्ये पुर्ण होईल. यामध्ये स्लॅबप्रमाणेच भिंतीचेही काम करण्यात येणार आहे.सर्व इमारती भूकंप अवरोधक असण्याच्या दृष्टीने डिझाईन करण्यात आली आहे. या प्रकल्पामध्ये रस्तालगत, मोकळया जागेवर बाग, वृक्षरोपण, पथदिवे, सुरक्षा सुरक्षा विभाग आदी सुविधा उपलब्ध राहणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर विभागात म्हाडाकडून यापुर्वी  1494 घराची लॉटरी प्रमाणे सोडत काढण्यात आली आहे.  2800 घराची उपलब्धता बाकी आहे.

महाराष्ट्रात  म्हाडाने 1 लाख घरे तयार करण्याचा संकल्प केला आहे. तर मुंबई येथील गिरणी कामगार यांच्यासाठी 98 हजार कुटुंबीयांची स्वतंत्र गृह प्रकल्प निर्मितीचा संकल्प आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर येथे विविध प्रकल्पासाठी 50 ते 52 हजार कोटी रुपयाची  नवीन कंपन्याची गुतंवणूक करण्यात येणार आहे.

आमदार संजय सिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर येथे 200 कोटी रुपयाचा निधी हा ड्रेनेज लाईनसाठी मंजूर करण्यात आला असून भविष्यात पाईपलाईचा प्रश्न निर्माण होणार नाही. तसेच म्हाडा हा प्रकल्प माझ्या मतदार संघात निर्सगरम्य ठिकाणी उभा राहतोय याचा  मला आनंद आहे. सुत्रसंचालन ज्योती सुर्यवंशी यांनी केले तर आभार सिमरन सोळंखी यांनी मानले.कार्यक्रमास नक्षत्रवाडी येथील ग्रामस्थ व म्हाडाचे अधिकारी व  कर्मचारी उपस्थित होते.

०००

निष्पक्ष व भयमुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यात नोकरशाहीची भूमिका महत्त्वाची -मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

  •  मतदार याद्या बिनचूक असाव्यात याबाबत दक्षता घ्यावी
  • शाळा- महाविद्यालयातील अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी

सोलापूर, दि. १० (जिमाका): लोकशाहीच्या बळकटीकरणात नोकरशाहीचाही सहभाग मोठा व महत्त्वाचा असतो. त्यामुळे नोकरशाहीने निष्पक्ष व भयमुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी अत्यंत तटस्थपणे आपली भूमिका पार पाडली पाहिजे, असे आवाहन राज्याचे प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित विशेष मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत आयोजित आढावा बैठकीत श्री. चोक्कलिंगम मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर,  उप जिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, स्वीप चे नोडल अधिकारी सुधीर ठोंबरे व सर्व उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.

श्री. चोक्कलिंगम पुढे म्हणाले की, आगामी निवडणुका यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी अत्यंत जबाबदारीने काम करावे. विशेष मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत मतदार यादया अत्यंत बिनचूक होतील याची संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व मतदार नोंदणी अधिकारी यांनी खात्री करावी. मतदार यादीतून नावांची वगळणी करत असताना निवडणूक आयोगाने निर्देशित केल्याप्रमाणे कार्यवाही करावी. स्थलांतरित होणाऱ्या मतदाराबाबत संबंधित जिल्ह्याच्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवून नावे वगळणे अथवा मतदार यादीत ठेवण्याची कार्यवाही करावी, असेही त्यांनी सुचित केले.

जिल्ह्यातील 18 ते 19 वयोगटातील मतदारांची मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी शाळा महाविद्यालयात विशेष मोहीम राबवावी. या गटातील मतदारांची मोठ्या प्रमाणावर मतदार म्हणून नोंदणी होण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रारूप मतदार या प्रत्येक राजकीय पक्षाला त्वरित पोहोच कराव्यात. तसेच या याद्या प्रत्येक मतदान केंद्रावर प्रसिद्ध होतील याची खात्री करावी. सर्व मतदारांनी मतदार यादीत आपले नाव आहे की नाही याची खात्री आत्ताच करणे आवश्यक आहे, ऐनवेळी मतदानाच्या दिवशी मतदान यादीत नाव नसल्याबाबतच्या तक्रारी येतात, त्या होऊ नयेत यासाठी संबंधित मतदारांनी व प्रशासनाने ही योग्य खबरदारी घ्यावी, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोक्कलिंगम यांनी केले.

आगामी विधानसभा निवडणूकच्या पार्श्वभूमीवर जिपीएस ट्रॅकिंग सिस्टीम व वेब कास्टिंग ॲप हे राज्यस्तरावरून प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी चांगला अभ्यास करावा व तंत्रज्ञानाचा वापर निवडणूक कामकाज अधिक सुलभ व गतीने कशा पद्धतीने करता येईल यावर अधिक भर द्यावा, असे श्री. चोक्कलिंगम यांनी सांगून लोकसभा निवडणूक 2024 अनुषंगाने सोलापूर जिल्ह्याचा 57 कोटीचा खर्च झालेला असून राज्याकडून 22 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आलेले होते. त्यापैकी फक्त 11 कोटीचा खर्च झालेला दिसून येत आहे. तरी 14 ऑगस्ट 2024 पर्यंत शंभर टक्के खर्च होण्याच्या दृष्टीने सर्व उपविभागीय अधिकारी यांनी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी निर्देशित केले.

प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी 1 जुलै 2024 च्या अहर्ता दिनांकावर आधारित प्रारूप मतदार यादी दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या असून पाच राजकीय पक्षांनी सदरील याद्या घेऊन गेलेले असून उर्वरित पक्ष प्रतिनिधींना त्वरित याद्या पोहोच करण्यात येणार आहेत. दिनांक 6 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात एकूण 36 लाख 92 हजार 409 इतके मतदार असून मतदान केंद्राच्या संख्येत 124 ने वाढ होऊन सध्या 3 हजार 723 इतकी मतदान केंद्रांची संख्या आहे. लोकसभा निवडणुकीनंतर 35 हजार 576 इतकी मतदार संख्या वाढलेली आहे. मतदार नोंदणी प्रलंबित अर्ज, वयानुसार मतदार संख्या, फॉर्म नंबर 6 ची सद्यस्थिती, होम टू होम सर्व्हेची माहिती तसेच स्वीप कार्यक्रमाची सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली.

श्री. चोक्कलिंगम यांची रामवाडी गोदामाला भेट व पाहणी:

मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोक्कलिंगम यांनी आज सकाळी रामवाडी येथील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामाला भेट देऊन ईव्हीएम मशीनची प्रथम स्तरीय तपासणीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी उपस्थित होते.

०००

जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त चंद्रपूर शहरात प्रथमच भव्य रॅली व प्रबोधन कार्यक्रम

चंद्रपूर, दि. १० : प्रकल्प कार्यालय चंद्रपूर व आदिवासी सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 9 ऑगस्ट 2024 रोजी जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त चंद्रपूर शहरात भव्य रॅली तसचे प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रकल्प कार्यालयअंतर्गत येणाऱ्या 13 शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाची सुरवात वीर बाबुराव शेडमाके स्मारक, चंद्रपूर येथून झाली. यावेळी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार सुधाकर अडबाले, आमदार  किशोर जोरगेवार, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तथा प्रकल्प कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, प्रकल्पाअंतर्गत येणारे सहभागी शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरवात केली. उपस्थित रॅलीला संबोधित करतांना त्यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व शासनामार्फत आदिवासी समाजासाठी विधिध प्रकारच्या योजना राबविल्या जातात, याची माहिती दिली. अशा प्रकारच्या रॅलीचे आयोजन केल्यामुळे चंद्रपूर प्रकल्प कार्यालयाचे कौतुक केले.

यावेळी प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार म्हणाले, प्रकल्प कार्यालय व आदिवासी सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर शहरात अशा प्रकारचे प्रथमच विविध कार्यक्रम व भव्य रॅली तसचे प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला ज्या ज्या सामाजिक संघटना, चंद्रपूर प्रकल्पातील शाळा वसतिगृह, प्रकल्प कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला व हा संपुर्ण कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सहकार्य केले त्या सर्वांचे त्यांनी आभार व्यक्त केले.

सदर रॅलीमध्ये जवळपास 30 ट्रॅक्टरवर आदिवासी संस्कृतीवर आधारीत झॉकी तयार करण्यात आल्या होत्या. सदर रॅली वीर शहिद बिरसा मुंडा स्मारक जेल रोड, चंद्रपूर येथून सुरु होऊन गांधी चौक मार्गे येऊन प्रियदर्शनी सभागृह येथे रॅलीचा समारोप झाला. त्यानंतर आदिवासी नृत्य, पथनाट्य, विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक, सादर करण्यात आले.  कार्यक्रमाचे संचालन श्री. वड्डेट्टीवार यांनी तर आभार विस्तार अधिकारी श्रीमती कुत्तरमारे यांनी मानले.

 

संपूर्ण कार्यक्रम प्रकल्प अधिकारी श्री. विकास राचेलवार यांच्या मार्गदर्शनात पार पाडण्यात आला. यावेळी सहायक प्रकल्प अधिकारी डी. के. टिंगुसले,  जी. एम. पोळ, आर एस. बोंगीरवार, आर. टी. धोटकर, श्री. जगताप, श्री पाटील, वाय. आर. चव्हाण, एम, डी. गीरडकर, पी. पी. कुळसंगे, एस. डी. श्रीरामे, पी. बी. कुत्तरमारे, आदिवासी विकास निरीक्षक अमोल नवलकर, अमोल शिंदे, श्री. कुंटेवार व प्रकल्प कार्यालयातील सर्व कर्मचारी, आदिवासी सामाजिक संघटना, सर्व शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद उपस्थित होते.

या विषयांवर होत्या झॉकी: आदिवासी समाजासाठी शासनाच्या विविध योजना, प्रकल्प कार्यालयाने राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम, आदिवासी संस्कृती, मिशन शिखरमुळे शिक्षणामध्ये झालेला बदल, जल, जंगल, जमीन याबाबत बिरसा मुंडा यांचे कार्य, महाराष्ट्रातील विविध आदिवासी भाषा, जमाती, वेशभुषा, वारली पेंटीग, जंगलातील जीवन इत्यादी.

०००

 

 

मातंग समाजाच्या सर्व प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन वचनबद्ध – मंत्री शंभूराज देसाई

 ‘आर्टी ‘ची मागणी पूर्ण केल्याबद्दल राज्यस्तरीय मातंग समाजाच्या मेळाव्यात शासनाचे आभार

 मंत्री श्री. देसाई यांनी मुख्यमंत्र्यांच्यावतीने समाज बांधवांतर्फे स्वीकारला सत्कार

नांदेड दि. १० : अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थे (आर्टी )ची स्थापना झाली आहे. आरक्षणाचाही प्रश्न लवकरच निकाली निघेल.राज्य शासन मातंग समाजाच्या सर्व प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यास वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे केले. मुखेड येथे कै. गोविंदराव राठोड सभागृह क्रीडा संकुल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आज नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात राज्यातील समस्त मातंग समाजाच्यावतीने राज्यस्तरीय समाज मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये राज्य शासनाने ‘आर्टी ‘ची मागणी पूर्ण केल्याबद्दल राज्य शासनाचे मातंग समाजाच्या धुरीनांकडून जाहीर आभार व्यक्त करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी समाजाकडून जाहीर सत्कार स्वीकारला.

या कृतज्ञता सोहळ्याला मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह आ.डॉ. तुषार राठोड, आ.बालाजी कल्याणकर, माजी खासदार हेमंत पाटील, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी आ. सुभाष साबणे, माजी आ. अविनाश घाटे, माजी आ. राम पाटील रातोळीकर, मा.मुख्यमंत्री महोदयाचे खासगी सचिव बालाजी पाटील खतगावकर,आयोजक नारायणराव गायकवाड यांच्यासह महाराष्ट्रातील मातंग समाज संघटनेचे राज्यभरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1 ऑगस्टला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 104 व्या जयंती महोत्सवानिमित्त ‘अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था’ (आर्टी) या संस्थेचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

राज्यातील मातंग समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक, विकास करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे या संस्थेच्या धर्तीवर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी)ची स्थापना करण्याची मागणी मातंग समाजाची होती. आझाद मैदानामध्ये यासाठी आंदोलनही झाले होते. ही मागणी पूर्ण झाल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील सामाजिक कार्यकर्ते नारायणराव गायकवाड यांच्या पुढाकारात समस्त मातंग समाज बांधवाकडून  महाराष्ट्र सरकारचे जाहीर आभार व्यक्त करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री श्री. देसाई यांनी राज्य शासन मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी सकारात्मक  असल्याचे सांगितले. मातंग समाजाने आझाद मैदान येथे ज्या ज्या प्रमुख मागण्या मागितल्या होत्या. त्या मागण्या जवळपास पूर्ण झाल्या असून अन्य मागण्याही कायद्याच्या चौकटीत राहून पूर्ण करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले.

आझाद मैदान येथील मातंग समाजाच्या आंदोलनातील आपल्या आश्वासनानंतर व त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो शब्द दिला होता तो पूर्ण केला आहे.अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी)ची स्थापना झाली असून गोवंडी ( मुंबई ) येथे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. अंतर्गत आरक्षण अबकड गटाचा प्रश्न सोडविण्यासाठी सुरुवातीला अभ्यास गट गठीत करून ज्या राज्यामध्ये हे आरक्षण देण्यात आले होते. तेथील अभ्यास करण्यात आला. आरक्षण विषयक अंतर्गत वर्गवारी न्यायालयाच्या निर्देशानंतर पूर्ण केल्या जाईल असेही त्यांनी सांगितले.

यावेळी या विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.तुषार राठोड यांनी ‘आर्टी ‘साठी आपण सभागृहात बोललो होतो. त्याची पूर्तता झाल्याचे समाधान आहे, असे सांगितले. मुखेड एमआयडीसीचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली. तसेच लेंडी नदीवरील प्रकल्प पूर्णत्वास नेण्याबाबतही पाठपुरावा करण्याची विनंती केली.

मुखेड -देगलूर परिसरातील भूमिपुत्र आणि मुख्यमंत्री महोदयांचे खासगी सचिव बालाजी पाटील खतगावकर यांनी ‘आर्टी ‘च्या माध्यमातून समाजाच्या शैक्षणिक विकासाला चालना मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी देखील यावेळी समाजाने आपला शैक्षणिक आलेख वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. माजी खासदार हेमंत पाटील यांनीही यावेळी संबोधित केले. तसेच समाजाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.या कृतज्ञता सोहळ्याला राज्यभरातील विविध जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रसिद्ध गायिका कोमल पोटाळे यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला.

०००

 

राज्यातील पहिल्या १ हजार खाटांच्या पंढरपूर येथील सामान्य रुग्णालयास मान्यता

शासन निर्णय जारी; आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचा पुढाकार

मुंबई, दि. १०:  आषाढी, कार्तिकी, चैत्री, माघ या चार वारी कालावधीत दाखल होणारे लाखो वारकरी तसेच दैनंदिन वाढत असलेल्या रूग्णांची मोठी संख्या लक्षात घेत तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे सर्व सुविधायुक्त राज्यातील पहिले १ हजार खाटांचे सामान्य रूग्णालय उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे विशेष बाब म्हणून यासाठी मान्यता देण्यात येत असल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

पंढरपुरात सध्या १०० खाटांचे उपजिल्हा रूग्णालय कार्यरत आहे. मात्र, वर्षभरात येथे भरणाऱ्या प्रमुख चार वारीच्या कालावधीत लाखोंच्या संख्येने वारकरी दाखल होतात. यासह श्री विठ्ठल-रूक्मिणीच्या दर्शनासाठी दररोज वारकरी, भाविकांची वर्दळ असते. पंढरपूर तीर्थक्षेत्र राष्ट्रीय महामार्गांनी जोडले आहे. त्यामुळे बाहेरूनही मोठ्या प्रमाणावर रूग्ण येथे येत असतात. या सर्वांचा मोठा ताण उपजिल्हा रूग्णालयावर पडतो. तसेच अनेकांना नाईलाजास्तव खासगी रूग्णालयांमध्ये महागडे उपचार घ्यावे लागतात. या पार्श्वभूमिवर नुकतेच आषाढी यात्रा कालावधीत सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. सावंत यांनी येथील उपजिल्हा रूग्णालयाची क्षमता तसेच आरोग्य सेवेवर पडणारा ताण याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधले होते. यावर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ येथे १ हजार खाटांचे सर्व सोयी-सुविधांनीयुक्त रूग्णालय उभारणीस मंजुरी देण्याचे सूतोवाच केले होते. तसेच याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाला दिले होते.

दि.५ ऑगस्ट रोजी आरोग्य सेवा विभागाचे सहसंचालक यांनी पंढरपूर येथे १ हजार खाटांचे सामान्य रूग्णालय उभारणीबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला. यात विशेष बाब म्हणून येथील उपजिल्हा रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करणे प्रस्तावित केले होते. त्यानुसार राज्य शासनाने तात्काळ मान्यता दिली असून शासन निर्णयही गुरूवारी जारी करण्यात आला आहे.

नवनिर्मित सामान्य रुग्णालयात अशी असेल रचना

नवनिर्मित १ हजार खाटांच्या या रूग्णालयात सामान्य रूग्णालय ३०० खाटा, महिला व शिशु रूग्णालय ३०० खाटा, ऑर्थोपेडिक व ट्रामा केअर रूग्णालय १५० खाटा, सर्जरी रूग्णालय १०० खाटा, मेडिसीन अतिदक्षता रूग्णालय १०० खाटा व मनोरूग्णालय ५० खाटा अशी रचना असणार आहे. यासाठी जागा उपलब्ध करून बांधकाम व पदनिर्मितीची स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येईल, असे निर्णयात नमूद करण्यात आले असून सार्वजनिक बांधकाम विभागास एकत्रित अंदाजपत्रक व आराखडे सादर करण्यास सूचित करण्यात आले असण्याची माहिती देण्यात आली आहे.

०००

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सिन्नरमधील शासकीय इमारतींचे लोकार्पण

नाशिक, दि. १० (जिमाका):  सिन्नर तालुक्यातील सिन्नर उपजिल्हा ग्रामीण रूग्णालय, प्रशासकीय इमारत तहसिल कार्यालय यासोबतच सिन्नर व एमआयडीसी पोलीस ठाणे अशा चार इमारतींचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले.

सिन्नर उपजिल्हा ग्रामीण रूग्णालय लोकार्पण

सिन्नर उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी फित कापून तसेच कोनशीलेचे अनावरण करुन केले. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार माणिकराव कोकाटे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे, उपविभागीय अधिकारी  हेमांगी पाटील, तहसिलदार सुरेंद्र देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. निर्मला गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता पी.आर.भोसले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव,  नगरपालिकेचे मुख्याधिकारी रितेश बैरागी यांच्यासह आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सिन्नर उपजिल्हा ग्रामीण रूग्णालय हे 1 मे 2020 पासून कार्यरत असून कोरोना साथरोगाच्या काळात येथे रूग्णांसाठी 200 खाटांची व्यवस्था करून अविरत सेवा देण्यात आली होती. एप्रिल 2022 नंतर या रूग्णालयात इतर सेवाही कार्यान्वित करण्यात आल्या. येथे 30 खाटांचे ग्रामीण रूग्णालय सुद्धा कार्यरत असून 3 वैद्यकीय विशेतज्ञ अधिकारी नियुक्त केलेले आहेत. याठिकाणीच मुत्रपिंड आजाराच्या रूग्णांसाठी 5 खाटांचे डायलेसिसची सुविधा देणारे केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

तहसिल कार्यालय प्रशासकीय इमारत लोकार्पण

तहसिल कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पणही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार प्रफुल्ल पटेल आमदार माणिकराव कोकाटे जिल्हाधिकारी जलज शर्मा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरूंधती शर्मा, कार्यकारी अभियंता उदय पालवे, उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील, तहसिलदार सुरेंद्र देशमुख, सहाय्यक अभियंता पी.आर.भोसले, निवासी नायब तहसिलदार सागर मुंदडा उपस्थित होते.

पोलीस ठाणे एमआयडीसी व पोलीस ठाणे इमारतीचे लोकार्पण

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते सिन्नर तालुक्यातील 4 कोटी 42 लाख निधीतून साकारलेले पोलीस ठाणे एमआयडीसी सिन्नर व सिन्नर पोलीस ठाणे या दोन्ही इमारतींचे लोकार्पण पार पडले. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार प्रफुल्ल पटेल आमदार माणिकराव कोकाटे, पोलीस अधीक्षक नाशिक (ग्रामीण) विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, पोलीस निरीक्षक यशवंत बावीस्कर व संभाजी गायकवाड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

०००

ताज्या बातम्या

ऑस्करमध्ये भारताचे प्रतिनिधित्व व्यापक करण्याची गरज ‘इंडियाज रिच टू ऑस्कर्स’ या विषयावरील चर्चासत्रात तज्ज्ञांचे...

0
मुंबई दि. 2 :- भारतात सध्याच्या घडीला ३५ हून अधिक भाषांमध्ये चित्रपट निर्मिती होत असून ऑस्करमध्ये एकाच प्रवेशिकेने संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व करणे कठीण आहे....

माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी शासनाचा ऐतिहासिक पुढाकार – अभिनेते अमीर खान

0
मुंबई, दि. 2 : राज्य शासनाने माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या विकासासाठी पुढाकार घेतला आहे. या क्षेत्रासाठी सकारात्मक विचार होत असून भारत या क्षेत्रामध्ये उत्तुंग...

वेव्हज् २०२५ : कृत्रिम बुद्ध‍िमत्ता आणि सर्जनशीलतेचा मेळ

0
मुंबई, दि. २ : ५०० दशलक्षाहून अधिक भारतीय ऑनलाइन आशय वापरत आहेत आणि प्रादेशिक भाषांकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. सर्जनशीलता आणि उत्पादन सशक्त करणे,...

‘वेव्हज् २०२५’ मध्ये माध्यम आणि मनोरंजनासह साहस, समानतेचा उत्सव

0
मुंबई, दि. २ : कथानकांमध्ये बदल घडवण्यासाठी आणि लोकांना एकत्र आणण्यासाठी एक व्यासपीठ वेव्हज २०२५ ने उपलब्ध करून दिले आहे. चित्रपटसृष्टीत नवीन संधी निर्माण...

‘एआय’ आणि मनोरंजन क्षेत्रात भारताला नेतृत्वाची संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि.  २ : जागतिक स्तरावर मनोरंजनक्षेत्रात ‘एआय’चा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. येत्या काळात नवी मुंबई येथे ‘एआय’ तंत्रज्ञानची शिक्षणनगरी उभारण्यात येणार आहे....