बुधवार, एप्रिल 30, 2025
Home Blog Page 482

‘अमृतवृक्ष’ संकल्पना घरोघरी पोहोचवा – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 2 :  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  ‘एक पेड मॉ के नाम’ ही संकल्पना मांडली. त्याच धर्तीवर राज्यात आपण ‘अमृतवृक्ष आपल्या दारी’ ही संकल्पना मांडली आणि त्यानुसार काम सुरु केले आहे. राज्यातील वृक्षलागवड आणि जोपासनेला प्रोत्साहन देण्याची ही संकल्पना ‘अमृतवृक्ष’ ॲपच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत जावी, असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते ‘अमृतवृक्ष’ या ॲपचे अनावरण करण्यात आले. राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल) श्रीमती शोमिता विश्वास यांची यावेळी उपस्थिती होती. नागपूर येथून अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प नियोजन व विकास ) कल्याणकुमार यांच्यासह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

वन मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी ॲपची निर्मिती ही अतिशय चांगली संकल्पना आहे. मात्र, ती नागरिकांना वापरण्यास सुलभ आणि विना तांत्रिक अडथळा अशी असली पाहिजे. त्यामुळे नागरिकांना त्याची उपयुक्तता पटेल. या अमृतवृक्ष ॲपच्या माध्यमातून नागरिकांनी केलेल्या वृक्ष लागवडीबाबतची माहिती मिळेलच. त्याचसोबत, त्यांना वनसंवर्धनाच्या अनुषंगाने विविध माहिती उपलब्ध करुन देण्याची सूचनाही त्यांनी केली.

श्रीमती विश्वास म्हणाल्या की, वन विभागाच्या माध्यमातून ‘अमृत वृक्ष आपल्या दारी’ ही योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत 30 सप्टेंबरपर्यंत वन महोत्सव आयोजित करुन सवलतीच्या दरात नागरिकांना रोपांची विक्री केली जाणार आहे. याशिवाय शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापनांनाही वृक्षारोपण उपक्रमासाठी वनमहोत्सवातून मोफत रोपे देण्यात येणार आहेत.  लागवड केलेल्या वृक्षांची माहिती या ॲपमध्ये भरावी लागणार आहे. सलग तीन वर्षे वृक्षांच्या जोपासनेबाबतची माहिती संकलित केली जाणार आहे. त्यासाठी संबंधितांनी वृक्षलागवड करतानाचा फोटो या ॲपमध्ये अपलोड करावा लागणार आहे आणि ठराविक काळानंतर वृक्षाच्या वाढीसह जोपासना करतानाचा फोटो अपलोड करावा लागणार आहे. त्यासाठी संबंधितांना मंत्रीमहोदयांच्या स्वाक्षरीचे ऑनलाईन प्रमाणपत्र प्राप्त करुन घेता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

००००

दीपक चव्हाण/विसंअ

राज्याचे सांस्कृतिक धोरण लवकरच जाहीर करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 2 : राज्याचे सांस्कृतिक धोरण हे सर्वसमावेशक असण्यावर भर देण्यात येत असून राज्याची संस्कृती, येथील पर्यटन, कारागिरी, गड-किल्ले यांचे संवर्धन आणि विविध लोककला, नृत्य, संगीत यांना या धोरणाच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळेल. लवकरच या धोरणास राज्य मंत्रिमंडळात मंजुरी मिळेल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

सांस्कृतिक धोरण 2010 पुनर्विलोकन समितीने दिलेल्या अहवालाच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृह येथे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या धोरण समितीचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे,  विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, उपसचिव नंदा राऊत, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक सुजितकुमार उगले आदी यावेळी उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, राज्य शासनाचे सांस्कृतिक धोरण हे खऱ्या अर्थाने बहुआयामी असे असणार आहे.  आपल्या संस्कृतीची ओळख त्यातून प्रतिबिंबीत व्हावी, यासाठी हे धोरण तयार करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. धोरण समितीने दिलेला अहवाल आणि त्यातील शिफारशी लक्षात घेऊन राज्य शासन व्यापक असे सांस्कृतिक धोरण जाहीर करेल. राज्यातील गड-किल्ले, कारागिरी, पुरातत्व, भाषा साहित्य, ग्रंथव्यवहार आणि वाचन संस्कृती, लोककला, भक्ती संस्कृती, संगीत, नृत्य, रंगभूमी, चित्रपट, दृश्यकला अशा विविध बाबींचा विचार या धोरणात असेल. याशिवाय, राज्याच्या दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण बाबींचाही यात समावेश असेल, असे त्यांनी सांगितले.

राज्यात विविध संस्कृती, पेहराव, खाद्य, आभूषण, मौखिक परंपरा संस्कृती आहे. ती जपली जावी, यादृष्टीने साकल्याने विचार करण्यात येत असल्याचे श्री मुनगंटीवार यांनी सांगितले.

यावेळी सांस्कृतिक धोरण 2010 पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष डॉ.सहस्त्रबुद्धे यांनीही या धोरणातील शिफारशींच्या अनुषंगाने माहिती दिली. या धोरणात सर्वसमावेशकतेचा आग्रह धरण्यात आला आहे. या समितीच्या एकुण 18 बैठका झाल्या. तसेच, विविध विषयांच्या अनुषंगाने नेमलेल्या उपसमितीच्या 108 बैठका झाल्या. समितीकडे एकूण 137 व्यक्ती आणि 43 संस्था-संघटनांनी त्यांची निवेदने सादर केल्याचे त्यांनी सांगितले.

सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. खारगे यांनी या धोरणाचा मसुदा मंत्रिमंडळासमोर ठेवला जाईल. त्यापूर्वी या धोरणातील शिफारशींच्या अनुषंगाने इतर शासकीय विभागांशी निगडीत बाबींसंदर्भात त्यांची मते जाणून घेण्यात येतील, असे सांगितले.

००००

दीपक चव्हाण/विसंअ

‘अवयवदान दिवस’….मरावे परी शरीर मागे उरावे

शरीर मर्त्य आहे आत्मा अमर आहे, असे म्हणतात.. मात्र आता शरीरही अमर होऊ शकते. आपल्या अमूल्य अशा दायित्वाच्या भावनातून शरीराचे अनेक अंग आपण दान करू शकतो. अनेकांना दृष्टी देऊन हजारोंना सृष्टी बघायला कारणीभूत ठरू शकतो. आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीराची राख करायची की जातानाही दातृत्वाचा परमोच्च आनंद घ्यायचा याचा निर्णय घेणे म्हणजे अवयवदान करणे आहे. जेंव्हा एखादा व्यक्ती किंवा मेंदू मृत झालेल्या व्यक्तीच्या जवळचा नातेवाईक अवयवदान करून गरजू व्यक्तीला ज्याला जगण्यासाठी अवयवांची गरज असते त्याला वैद्यकीय साहित्याच्या माध्यमातून अवयवाची मदत करतात त्याला अवयवदान म्हणतात.

18 वर्षावरील कोणताही व्यक्ती आपल्या स्वेच्छेने शासनाला सांगून अवयव दान करू शकतो. व्यक्ती जिवंत असताना स्वत:निर्णय घेऊन किंवा एखाद्या व्यक्तीचा मेंदू मृत झाला असेल तर त्याच्या जवळचे नातेवाईक त्या व्यक्तीचे अवयवदान करण्याचा निर्णय घेऊ शकतात.

अवयव दान का करावे.. ?

जनतेने हे लक्षात घेतले पाहिजे की, आपण एके दिवशी जग सोडून जाणार आहोत. आपला मृत्यू अटळ आहे. तो कोणालाही टाळता येणार नाही. आयुष्यभर आपण स्वतःसाठी जगलो. मृत्यूनंतर आपले शरीर जाळून राख करताना देखील आपण तीन क्विंटल लाकडासाठी तेरा वर्षे वयाची झाडे नष्ट करतो. प्रदूषण वाढविण्यात कारणीभूत ठरतो. हे आता परवडणारे नाही. त्यामुळे काही ठिकाणी मृतदेह लाकडाने जाळण्याऐवजी व्हाईट् कोलने जाळला. पुणे, नागपूरने व्हाईट कोलचा प्रयोग यशस्वी केला. पुणे महानगरपालिकेने कोरोना काळात 2019 मध्ये 589 मृतदेह व्हाईट कोलने दहन केले. तसा प्रयोग नांदेड महानगरपालिकेने करावा अशी अपेक्षा आहे.

परंपरा, रूढीचे अडथळे दूर सारा

अवयवादांना दुसरा मोठा अडथळा परंपरा, रुढी, अंधश्रद्धेचा आहे. आपला समाज परंपरा प्रिय असला तरी बदलत्या परिस्थितीचे भान ठेवून मानसिकता बदलली तर सर्वांचे कल्याण होईल. शहराच्या तुलनेत ग्रामीण जनतेला अवयवदानाच्या विषयी प्रचंड गैरसमज आणि अज्ञान आहे. परंपरा आणि रूढीच्या वाढत्या प्रभावामुळे लोक अवयदानाविषयी तर्क वितर्क मांडून अवयवदान करण्याला बगल देतात. शिवाय विविध धर्माच्या रीती रिवाजानुसार अंत्यविधीचे प्रकार ही वेगवेगळे आहेत. त्यामुळे अवयवदानाला अडथळे येतात. देशातील सर्वच धर्मगुरूंनी जरी अवयवादानाला समर्थन दिले असले तरी सर्वसामान्य जनतेची मानसिकता सहजासहजी बदलणार नाही. मानसिकता बदलासाठी मोठ्या प्रमाणावर प्रचाराची गरज आहे. जिल्ह्याच्या प्रत्येक ग्रामसभेत यासाठी ठराव होणे आवश्यक आहे. शाळांपासून अवयवदानाच्या चर्चेचा विषय मना-मनामध्ये रुजविण्याचे कार्य गरजेचे आहे.

अवयव दान तीन प्रकारे करता येते

जीवंतपणी : रक्त, यकृत ,स्वादुपिंड, फुफ्फुस, मूत्रपिंड आणि आतड्याचा काही भाग दान केल्या जाऊ शकतो.

नैसर्गिक मृत्यूनंतर : नेत्र आणि त्वचा याशिवाय हृदयाची झडप, त्वचेखालील आवरण, बंद कानातील हाडे, रक्तवाहिन्या दान केल्या जाऊ शकतात.

ब्रेनडेथ नंतर : नेत्र पटले, कर्ण पटल, मूत्रपिंड, त्वचा, हाडे, हात, पाय, गर्भाशय, यकृत, हदय स्वादुपिंड आणि आतडे

ब्रेन डेडचा निर्णय घेणारी सरकारी समिती छत्रपती संभाजीनगर येथे आहे. झोनल ट्रान्स प्लांट को-ऑर्डिनेशन समिती पाच तासात रुग्णालयाशी, प्रशासक निवासी डॉक्टर, उपचार करणारे डॉक्टर यांची व्यवस्था करते. ज्यांना अवयवदानाची करण्याची इच्छा आहे त्यांनी या समितीकडे नाव नोंदणी गरजेचे आहे.

शासन स्तरावरही प्रयत्न सुरू

1984 ला भारत सरकारने अवयवदानाच्या कार्यालयाला मंजुरी दिल्यानंतर पंधरा वर्षानंतर 2015 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कायद्याच्या अंमलबजावणीचे महत्त्व आणि गरज लक्षात घेऊन देशाला अवयव दानाचे आवाहन केले. त्यांना प्रतिसाद देत तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या परिवारासह मुंबईतून या महाअभियानाला सुरूवात केली. राज्यात सध्या अवयवादानासाठी कार्य करणाऱ्या 25 सेवाभावी संस्था आहेत. यामध्ये  फेडरेशन ऑफ ऑरगॅनिक अँड बॉडी डोनेशन या संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम पवार आणि सुनील देशपांडे यांच्या कार्याची दखल घ्यावीच लागेल. त्यांनी अवयवदानासाठी नऊ पदयात्रा काढल्या. 4 हजार किलोमीटर प्रवास केला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे की, प्रत्येक अवयवदात्याच्या अंत्यसंस्काराला शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून त्याला शहिदाचा सन्मान द्यावा. दुखी परिवाराचे सांत्वन करून भावनिक आधार द्यावा. त्यामुळे शासन, प्रशासन या चळवळीच्या पाठीशी आहे. राज्याचे आरोग्य शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांना अवयवादानाची प्रक्रिया सुलभ करावी. प्रत्येक रुग्णालयात अवयवदानाचा स्वतंत्र कक्ष सुरू करून तज्ञाची नेमणूक करावी. लोकांना अवयवदान करण्यासंदर्भातील पत्रे उपलब्ध करून द्यावी, अशा महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. त्यामुळे जिल्हास्तरावर देखील मोठ्या प्रमाणात यासंदर्भातील जनजागृती होत असून नांदेडमध्ये आम्ही यासाठी झटत आहोत. या आमच्या अवयवदान यज्ञाला आपल्या स्वीकृतीचे दान मिळावे ही अपेक्षा आहे. अत्यंत सोपी पद्धत आहे. आपल्याला स्वतः सुरुवातीला यासंदर्भात स्वीकृती द्यावी लागते. त्यानंतर मृत्यू पश्चात नातेवाईकांनी याबाबत संबंधितांना माहिती देणे आवश्यक आहे.

नांदेडची मोहिमेत आगेकूच

17 ऑक्टोंबर 2016 रोजी नांदेड पहिले अवयवदान सुधीर रावळकर यांचे झाले. त्यानंतर 3 जुलै 2024 रोजी अभिजीत ढोकेचे अवयदान झाले. अवयवदानाच्या प्रचारात आपण स्वतःही 2017 पासून वाहून घेतले आहे. या मोहिमेत जिल्ह्याच्या  यशात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयाची यंत्रणा व शहरातील खासगी वैद्यकीय संस्थांनी देखील आपले दायित्व निभवले आहे. नांदेड मधील एका खाजगी हॉस्पिटलने तर परवा सहावे अवयव दान करून ग्रीन कॉरिडोर यशस्वी केला. शहरातील खासगी हॉस्पिटलच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी यासाठी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत. नांदेडमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी अवयदानाला स्वीकृती दिली आहे. नांदेडमध्ये सामान्य नागरिकाला कोणालाही अवयव दान करायचे असेल तर आपल्या हयातीत डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय विष्णुपुरी याठिकाणी आपला अर्ज देता येतो. आपल्या पश्चात आपल्या नातेवाईकांच्या परवानगीने मृतदेह देण्याची प्रक्रिया पार पाडली जाते. यासंदर्भातले स्वतंत्र व विस्तृत लिखाण मी स्वतः केले आहे. याबाबतचे विपुल साहित्य माझ्याकडे उपलब्ध आहे. नागरिकांना ते दिले जाऊ शकते. मात्र या एका अभियानात अगदी शाळकरीवयापासून प्रबोधन होण्याची गरज वाटत असून आजच्या अवयवदान दिनाला याबाबतची वचनबद्धता मनामनात व्हावी हीच अपेक्षा.

00000

माधव अटकोरे

ज्येष्ठ पत्रकार, नांदेड

 

 

शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अनोखे अभियान राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये 1 जानेवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानास विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच माजी विद्यार्थी, पालक व शिक्षकप्रेमी नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या अभियानात जवळजवळ 95 टक्के शाळांमधील सुमारे 2 कोटी विद्यार्थी विविध उपक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरले. या अभियानातील काही उपक्रमांची नोंद ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्येही झाली आहे.

या अभियानात तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर यशस्वी ठरलेल्या शाळांना रोख रकमेच्या स्वरूपात पारितोषिके देण्यात आली व या रकमेचा विनियोग शाळांच्या गरजेनुसार करण्याची मुभा देखील शाळा व्यवस्थापनास देण्यात आली आहे. त्यामुळे या शाळांना तातडीच्या गरजा भागविण्याकरीता निधी उपलब्ध झाला आहे. अर्थात या भौतिक लाभापेक्षा विद्यार्थी तसेच शिक्षकांमध्ये एक प्रकारचे नवचैतन्य निर्माण होऊन अनेक सकारात्मक बदल निदर्शनास आले, ही बाब अधिक महत्वाची आहे. विविध प्रकारचे चाकोरीबाहेरील स्पर्धात्मकवृत्ती निर्माण होऊन त्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना मिळावी व त्यांना खऱ्या अर्थाने बाह्य जगाची ओळख व्हावी हा या अभियानाचा मूळ हेतू असून तो साध्य करता आला आहे. या सर्व बाबींचा विचार करून राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा’ हे स्पर्धात्मक अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

अभियानाची व्याप्ती: या अभियानात राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी सहभागी होणे अपेक्षित आहे. या अभियानासाठी शाळांची विभागणी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारीत करण्यात आली आहे. प्राथमिक स्तरापासून राज्यस्तरापर्यंत शासकीय व स्थानिक स्वराज संस्थांच्या शाळा उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळांची स्पर्धा करणार नसून प्रत्येक स्तरावरील विजेता या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येईल. हे अभियान बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र, वर्ग अ व वर्ग ब वर्गच्या महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र तसेच उर्वरित महाराष्ट्र अशा स्तरावर राबविण्यात येईल.

अभियानाची उद्दिष्टे : विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा आदी घटकांबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना देणे, शासनाच्या ध्येय धोरणाशी सुसंगत अशा शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना देणे, शालेय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक महत्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादणूक या घटकाच्या वृद्धीस प्रोत्साहन देणे ही या अभियानाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

अभियानाचे स्वरूप : अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना पायाभुत सुविधेसाठी 33 गुण, शासन ध्येय धोरण अंमलबजावणीसाठी 74 गुण तर शैक्षणिक संपादणुकीसाठी 43 गुण असणार आहेत. सहभागी शाळांचे बृहन्मुंबई महानगरपालिका, अ व ब वर्ग च्या महानगरपालिका, उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्राअंतर्गत तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावरील गठीत समित्या शाळांच्या कामगिरीच्या आधारे मुल्यांकन करतील. मुल्यांकन समित्या शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन मुल्यांकन करतील. प्रश्नावलीच्या स्वरूपात योग्य ती माहिती संबंधित शाळेकडून प्राप्त करून घेवून आवश्यकतेनुसार स्थानिक पातळीवरील महाविद्यालयीन विद्यार्थी विशेषत: डी.एड, बी.एड या महाविद्यालयांचे विद्यार्थी यांची या कामासाठी मदत घेता घेतील.

अभियानाचा कालावधी: अभियानाच्या पूर्व तयारीचा कालावधी 4 ऑगस्ट 2024 पर्यंत असून या विहीत कालावधीत अभियानाची माहिती राज्यातील सर्व शाळांमध्ये पोहोचेल याची दक्षता आयुक्त शिक्षण यांच्या मार्गदर्शनानुसार विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांनी घ्यावी. या अभियानाची सुरुवात 5 ऑगस्ट रोजी होणार असून शेवट 4 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे. मूल्यांकनाची प्रक्रिया 5 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या कालावधीत पार पाडण्यात येणार आहेत. सर्व शाळांनी या अभियानात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी. त्याकरीता सर्वतोपरी प्रयत्न करण्यात यावेत.

पारितोषिक बृहन्मुंबई महानगरपालिका व वर्ग ‘अ’ व वर्ग ‘ब’ च्या महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रातील शाळांना पहिले 21 लाख, दुसरे 15 लाख व तिसरे पारितोषिक 11 लाख रूपयांचे असेल. उर्वरित महाराष्ट्रात 358 तालुक्यात पहिले 3 लाख, दुसरे 2 लाख, तिसरे 1 लाख, राज्यातील 36 जिल्ह्यात पहिले 11 लाख, दुसरे 5 लाख, तिसरे 3 लाख तर 8 विभागीय स्तरावर पहिले 21 लाख, दुसरे 15 लाख, तिसरे 11 लाख रूपयांचे पारितोषिके देण्यात येणार आहे.

उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना तालुकास्तरावर पहिले 3 लाख, दुसरे 2 लाख, तिसरे 1 लाख, जिल्हास्तरीय पहिले 11 लाख, दुसरे 5 लाख, तिसरे 3 लाख, विभागस्तरीय पहिले 21 लाख, दुसरे 15 लाख, तिसरे 11 लाख तर राज्यस्तरिय शासकीय व स्थानिक स्वराज संस्थांच्या व उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना पहिले 51 लाख, दुसरे 31 लाख व तिसरे 21 लाख रूपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रथम क्रमांकाची शाळा, अ व ब वर्ग महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रथम क्रमांकाची शाळा तसेच उर्वरित महाराष्ट्रातील प्रत्येक विभागातील प्रथम क्रमांकाच्या शाळा या राज्यस्तरावर एकमेकांशी स्पर्धा करतील. या स्पर्धेतून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी निवडलेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी निवडलेल्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना अनुक्रमे 51 लाख, 31 लाख व 21 लाख रूपये इतक्या रकमेचे पारितोषिक अनुज्ञेय असेल. अशाच प्रकारचे पारितोषिक इतर व्यवस्थापनांच्या शाळांना अनुज्ञेय असेल. कोणत्याही स्तरावर जिंकलेल्या पारितोषिकाच्या रकमेचा विनियोग करण्याचा अधिकारी शाळांच्या गरजांचा प्राधान्यक्रम विचारात घेऊन संबंधित शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीस असेल.

‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान पहिला टप्पा : पुणे जिल्ह्याची कामगिरी’ मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या पहिल्या टप्प्यात 6 हजार 123 शाळांनी सहभाग घेतला होता . त्यापैकी राज्यस्तरीय 1, विभागीय स्तरावर 2, मनपा स्तरावर 4, जिल्हास्तरावर 6 व तालुका स्तरावर 78 अशा एकूण 91 शाळांना पारितोषिके मिळाली आहेत. पुणे जिल्ह्यात मागील अभियानात राज्यस्तरीय इतर आस्थापनांच्या शाळांमध्ये बारामती येथील शारदाबाई पवार विद्यानिकेतन शाळा, शारदानगर या शाळेला 31 लाख रुपयांचे द्वितीय पारितोषिक मिळाले आहे.

वर्ग ‘अ’ व ‘ब’ वर्गच्या महानगरपालिकांचे कार्यक्षेत्रात शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये डॉ. यशवंत गणपत शिंदे विद्यानिकेतन शाळा क्र. 19, धनकवडी या शाळेला 21 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक, क्रीडा प्रबोधनी विद्यालय, उद्यमनगर, पिंपरी कॉलनी, पिंपरी-चिंचवड या शाळेला 15 लाख रुपयांचे द्वितीय तर इतर आस्थापनांच्या शाळांमध्ये जन प्रबोधनी नवनगर विद्यालय, निगडी या शाळेला 21 लाख रुपयांचे प्रथम तर न्य इंग्लिश स्कुल, रमणबाग, पुणे या शाळेला 11 लाख रुपयांचे तृतीय पारितोषिक मिळाले.

जिल्हास्तरावरील मुल्यांकनामध्ये वेल्हे तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पाबे या शाळेस 21 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक, इतर आस्थापनांच्या वर्गवारीत जुन्नर तालुक्यातील गुरूवर्य आर. पी. सबनिस विद्यामंदीर नारायणगाव या शाळेला 11 लाख रूपयांचे तृतीय पारितोषिक मिळाले आहे.

पुणे जिल्ह्यातील सर्व स्तरावरील सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमांच्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2’या अभियानात 4 ऑगस्ट पर्यंत सहभागी होऊन शाळांना तालुका, जिल्हा, विभाग, राज्यस्तरावरील विविध प्रकारांमध्ये भरघोस पारितोषिके मिळविण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. यासाठी शाळांनी सरल प्रणालीतील स्कूल संकेतस्थळावर ‘एचएम लॉगिन’वरुन दिलेल्या टॅबद्वारे शाळेची https://education.maharashtra.gov.in/school/users/login/4 या संकेतस्थळावर माहिती भरुन पाठवावी. सर्व शाळांनी या अभियानात सहभागी होऊन पारितोषिकांची अधिकाधिक रक्कम जिंकून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी त्याचा उपयोग करुन घ्यावा.

सुरज मांढरे, शिक्षण आयुक्त, महाराष्ट राज्य: वेगवेगळ्या शाळांमध्ये वेगवेगळे उपक्रम सुरू असताना त्या सर्वांना एका धाग्यात बांधणारा व शिक्षण विभागांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा हा कार्यक्रम आहे. यामध्ये सर्व शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन विविध उपक्रम राबवून हेतू साध्य करण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला आहे. भौतिक गोष्टींमध्ये सुधारणा करीत असतानाच शाळेचे विद्यार्थी विषयक व गुणवत्ता विषयक कामकाजसुद्धा मोजमापाच्या परिघांमध्ये आणण्यात आले असल्याने विद्यार्थ्यांच्या विकासासाठी मोलाचे योगदान या अभियानातून दिले जात आहे. हे अभियान आता शिक्षण विभागाच्या वार्षिक कामकाजाचा नियमित भाग झालेले आहे.

0000

संकलन: जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

 

****

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची अकिवाट येथील दुर्घटनास्थळाला भेट

कोल्हापूर, दि. 2 (जिमाका) : शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथे महापुराच्या पाण्यात ट्रॅक्टर ट्रॉली उलटून सात जण वाहून गेल्याची दुर्दैवी दुर्घटना घडली. त्यापैकी एक जणाचा बुडून मृत्यू झाला, दोघेजण अद्यापही बेपत्ता आहेत.  चौघेजण पोहून बाहेर आले. या दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दुपारी दोनच्या सुमाराला  शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथे तातडीने भेट दिली. दत्तवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दुर्घटनेतील मृत सुहास पाटील यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. तसेच दुर्घटनेतून वाचलेल्या इतर जखमींची विचारपूस केली.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी मृत सुहास पाटील यांच्या कुटुंबीयांना तात्काळ चार लाख रुपयांची शासकीय मदत जाहीर केली. मृत सुहास पाटील यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत आणि सहकार्य करणार असल्याचेही ते म्हणाले.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी एनडीआरएफच्या जवानांकडून शोध व मदत कार्याची माहिती  घेतली. केंद्रीय एनडीआरएफ पथकासह महाराष्ट्राचे एसडीआरएफ व कर्नाटकच्या एसडीआरएफच्या सात बोटी शोध कार्यात सहभागी झाल्या आहेत.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्यासमवेत खासदार धैर्यशील माने,  जिल्हाधिकारी अमोल येडगे, जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील- यड्रावकर, गुरुदत्त शुगरचे अध्यक्ष माधवराव घाटगे, अशोकराव माने, विजय भोजे आदी तसेच अधिकारी उपस्थित  होते.

***

आग्रा येथे शिवजयंती साजरी करण्यासाठी कायमस्वरुपी परवानगी – सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांचा केंद्रापुढे प्रस्ताव

‘दिवाण-ए-खास’मधील आयोजनासाठी सकारात्मक प्रतिसाद
चंद्रपूर, दि.०२ – ज्याठिकाणी औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, त्या आग्रा येथील दिवाण-ए-खासमध्ये महाराजांचा शिवजयंती साजरी करण्यासाठी दरवर्षी परवानगी घेण्याची गरज पडू नये. केंद्रीय पुरातत्व विभागाने राज्य सरकारसोबत एक सामंजस्य करार करून कायमस्वरुपी परवानगी देण्याची सोय करावी, असा प्रस्ताव राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी ठेवला. त्यावर मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्याच्या प्रस्तावावर काल गुरूवारी सायंकाळी भारताचे संयुक्त राष्ट्र संघातील राजदूत आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे प्रमुख विशाल शर्मा यांच्यासोबत मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली. यावेळी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती होती. तसेच मंत्री मंगल प्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, भारतीय पुरातत्व खात्याचे अतिरिक्त महासंचालक जान्विज शर्मा, भारतीय पुरातत्व खात्याच्या क्षेत्रीय संचालक डॉ. टी. श्रीलक्ष्मी, अधिक्षक शुभी मुजुमदार, राज्याचे पुरातत्व संचालनालयाचे संचालक सुजीतकुमार उगले आणि इतर केंद्रीय व राज्य प्रशासनातील वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आग्रा येथील दिवाण-ए-खास येथे दरवर्षी शिवजयंती साजरी करणार असल्याचे सांगितले. परंतु, त्याचवेळी याठिकाणी उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी केंद्रीय पुरातत्व विभागाची परवानगीही घ्यावी लागते हा मुद्दा उपस्थित केला. केंद्र व राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाने एक सामंजस्य करार करून या उत्सवासाठी कायमस्वरुपी परवानगीचा निर्णय घेतल्यास ही समस्या सुटू शकते. दरवर्षी केंद्र व राज्य सरकार एकत्रीतपणे आग्रा येथील दिवाण-ए-खास येथे शिवजयंती उत्सव साजरा करेल, असेही त्यांनी म्हटले. ना. श्री. मुनगंटीवार यांच्या या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांसह केंद्र व राज्याच्या पुरातत्व विभागातील अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. लवकरच यासंदर्भात पुढील पाऊल उचलण्याचा येणार आहे.

या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ प्रमुख किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी युनेस्कोकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाची सद्यस्थिती व पुढील कार्यवाही यासंदर्भात विशाल शर्मा यांनी सविस्तर माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट होणे हा भारतीय संस्कृतीचा गौरव असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

सुधीरभाऊ सर्वांत सक्रीय मंत्री – मुख्यमंत्री

‘सुधीरभाऊ मुनगंटीवार राज्यातील सर्वांत सक्रीय मंत्र्यांपैकी एक आहेत. ते एखादे काम हाती घेतात तेव्हा चिकाटीने आणि जिद्दीने पूर्णत्वास नेतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास जगभरात पोहोचविण्यासाठी जे काम ते करीत आहेत, ते कौतुकास्पद आहे. मी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यासोबत कायम आहे आणि राहील,’ या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ना. श्री. मुनगंटीवार यांचे कौतुक केले. आग्रा येथील दिवाण-ए-खासमध्ये औरंगजेबाने महाराजांचा अपमान केला त्याठिकाणी सुधीरभाऊंनी राज्याभिषेक सोहळा साजरा केला, याचा अभिमान आहे. आता याचठिकाणी दरवर्षी शिवजयंती साजरी करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

 

000

आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले शहादा तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन

नंदुरबार, दिनांक 02 ऑगस्ट, 2024 (जिमाका वृत्त) : राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते आज शहादा तालुक्यातील सोनवद, कहाटूळ, लोंढरे, उजळोद, बोराळे, जयनगर, धांद्रे, कोंढावळ येथील विविध विकास कामांचे भूमीपूजन व उद्घाटन करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या सभापती हेमलता शितोळे, शहादा पंचायत समितीचे सभापती विरसिंग ठाकरे,

रमण्णाबाई पाटील, पानेश्वर पाटील, विनोद पाटील, भगवान पाटील, उद्धव पाटील, मनोज चौधरी, रोजेंद्र

वाघ, सुनिल पाटील, नाना निकम, विजय पाटील, रोहिदास चौधरी यांच्यासह सर्व गावांचे पदाधिकारी,

अधिकारी तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भुमीपजन व उद्घाटन यामध्ये रस्त्यांच्या सुधारणा, खडीकरण, डांबरीकरण, कॉंक्रीटीकरण, पुलांची

निर्मिती, संरक्षण भितींचे बांधकाम, पेव्हर ब्लॉक बसवणे, गटारांचे कॉंक्रीटीकरण, समाज मंदिरांचे

बांधकाम या सारख्या कामांचा त्यात समावेश आहे. त्यांचा गावनिहाय तपशील पुढीलप्रमाणे…

या कामांचे झाले भूमिपूजन व उद्धाटन..

सोनवद

  • कहाटुळ फाटा ते सोनवद गावाजवळ लहान पुलाचे बांधकाम करणे.
  • कवठळ कॅनल ते सोनवद शिव रस्ता पांढरी हनुमान मंदिर रस्ता सुधारणा करणे.
  • सोनवद वडछील रस्त्यावर दोन लहान पुलाचे बांधकाम करणे.
  • शहादा तालुक्यातील सोनवद येथे सिमेंट काँक्रीट रस्ता करणे.

कवठळ

  • कवठळ रस्त्याची ची सुधारणा करणे.
  • कवळठ त.श. ते शोभानगर रस्ता सुधारणा करणे.
  • कवठळ कॅनल रस्त्याची सुधारणा करणे.
  • कवठळ कॅनल रस्त्यावरील पुलाचे बांधकाम करणे.
  • कवठळ ते पुरुषोत्तम नगर रस्त्यावर लहान पुलाचे बांधकाम करणे.
  • कवठळ त.श. येथे आदिवासी वस्तीत महादेव मंदीराजवळ सामाजिक सभागृह बांधणे.

कहाटुळ

  • कहाटुळ ते धांद्रे रस्त्याची सुधारणा करणे.
  • कहाटळ ते मातकट रस्त्याची ची सुधारणा करणे.
  • कहाटुळ ते धांद्रे शिव रस्ता सुधारणा करणे.

कहाटुळ फाटा ते निभौरा रस्ता सुधारणा करणे.

  • कहाटूळ स्मशानभूमी ते उजळोद शिव रस्ता सुधारणा करणे.
  • वडछील सोनवद ते कहाटुळ सोनवद जोडणारा रस्ता वर पुलाचे बॉधकाम करणे.
  • कहाटुळ येथे आदिवासी वस्तीत वार्ड क्र.3 मध्ये कॉक्रीट रस्ता करणे.
  • कहाटुळ येथे आदिवासी वस्तीत वार्ड क्र. 1 मध्ये कॉक्रीट गटार करणे.

लोंढरे

  • लोंढरे रस्ता सुधारणा करणे.
  • चिरखान लोंढरे कहाटुळ ते सारंगखेडा लगत संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे.
  • लोंढरे ते वडछील रस्ता सुधारणा करणे.
  • लोंढरे ते कुकावल रस्त्याची सुधारणा करणे.
  • लोंढरे येथे आदिवासी वस्तीत पेव्हर ब्लॉक बसविणे.
  • उजळोद शिव ते धांद्रे शिव रस्ता सुधारणा करणे.
  • उजळोद शिव ते लोंढरे शिव रस्ता सुधारणा करणे.

उजळोद

  • उजळोद रस्त्यावर स्लॅबड्रेनजचे बांधकाम करणे.
  • उजळोद ते दुधखेडा रस्त्याची सुधारणा करणे.
  • उजळोद रस्ता सुधारणा करणे.
  • उजळोद चिरखान मानमोड्या रस्त्यावरील पुलाचे बांधकाम करणे.
  • उजळोद येथे आदिवासी वस्तीत रस्ता कॉक्रीटीकरण करणे.
  • उजळोद येथे आदिवासी वस्तीत रस्ता कॉक्रीटीकरण करणे.

बोराळे

  • असलोद जयनगर कुकावल सारंगखेडा रस्त्याची सुधारणा करणे.
  • ब्राम्हणपूरी असलोद जयनगर बोराळे सारंगखेडा रस्त्यावरील बोराळे गावात कॉक्रीटीकरण करणे.
  • बोराळे रस्त्याची सुधारणा करणे.
  • मातकट ते बोराळे रस्त्यावरील पुलाचे बांधकाम करणे.
  • बोराळे ते गावविहीर ते जयनगर फाटा ते कोंढावळ रस्ता सुधारणा करणे.
  • बोराळे ते निंभोरा रस्ता सुधारणा करणे.
  • बोराळे गावाजवळ संरक्षण भिंतींचे बांधकाम करणे.
  • आदिवासी वस्तीत पेव्हर ब्लॉक बसविणे.

जयनगर

  • जयनगर उभादगड मानमोड्या रस्त्याची ची सुधारणा करणे.
  • जयनगर कोंढावळ खापरखेडा काकर्दै ते अभणपुर रस्ता जयनगर गावात पुलाचे बांधकाम करणे.
  • जयनगर कोंढावळ अभणपुर रस्ता जयनगर गावात कॉक्रीट गटार व कॉक्रीट रस्त्याचे बांधकाम

करणे.

  • जयनगर उभादगड मानमोड्या रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे.
  • जयनगर येथे आदिवासी वस्तीत पेव्हर ब्लॉक बसविणे.
  • जयनगर येथे आदिवासी वस्तीत रस्ता कॉक्रीटीकरण करणे.
  • जयनगर येथे आदिवासी वस्तीत पारधी समाजासाठी समाज मंदीर बांधकाम करणे.

धांद्रे

  • उभादगड ते धांद्रे खु. धांद्रे बु. संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे.
  • उभादगड ते धांद्रे खु. धांद्रे बु. रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे.
  • धांद्रे निंभोरा शिव रस्ता सुधारणा करणे.
  • धांद्रे गावाजवळ संरक्षण भिंर्तीचे बांधकाम करणे.

कोंढावळ

  • कोंढावळ गावाजवळ संरक्षण भिर्तीचे बांधकाम करणे.
  • कोंढवळ किल्ला ते वडाळी खापरखेडा रस्त्याला जोडणारा रस्ता सधारणा करणे.
  • कोंढावळ ते उभादगड रस्त्याची सुधारणा करणे.
  • कोंढावळ ते हरणबडी रस्ता बांधकाम करणे.

0000000000

 

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, ‍‍दि.2 : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत अनुदान योजना, बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना आणि प्रशिक्षण योजना राबविण्यात येतात. या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे मुंबई शहर/उपनगरचे  जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय (PM-AJAY) योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध योजनेंतर्गत प्रति लाभार्थी/प्रति प्रकरण देण्यात येणारी अनुदान रक्कम 10 हजारवरुन 50 हजार  रुपये करण्यात आहे. या योजनेसाठी लाभार्थ्याकरिता उत्पन्न मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. मात्र ज्या लाभार्थ्यांचे  वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नाही, अशा लाभार्थ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे असे नमूद केलेले आहे.

महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या अनुदान योजना, बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना व एनएसएफडीसी या योजनेअंतर्गत अनुदानाची मर्यादा 10 हजारावरुन जास्तीत जास्त 50 हजारापर्यंत करण्यात आलेली आहे. या योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी महामंडळाचे  https://mpbcdc.maharashtra.gov.in/  या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी. अर्जदाराने ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर संकेतस्थळावर योजनानिहाय उपलब्ध अर्ज भरुन आवश्यक कागदपत्रांच्या मूळ प्रतीसह (तीन प्रती) आपले कर्जचे अर्ज महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या., गृहनिर्माण भवन, तळमजला रूम नं 35, कलानगर, बांद्रा (पूर्व), मुंबई-51 या ठिकाणी सादर करावेत.अर्ज स्वत:दाखल करणे आवश्यक आहे.त्रयस्थ तसेच मध्यस्थामार्फत अर्ज स्विकारले जाणार नाही, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

0000

शैलजा पाटील/विसंअ

मोटार वाहन विभागातील बदल्या ऑनलाईन पद्धतीने होणार

मुंबई, दि. ०२: मोटार वाहन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सर्वसाधारण बदल्या होणार आहेत. ही बदली प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने होईल.

ही बदली प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी सेवा पुरवठादार यांची निवड  करण्यात येणार आहे. त्याकरिता निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सदरची निविदा https://mahatenders.gov.in/ या संकेतस्थळावर १ ऑगस्ट २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी कळविले आहे.

0000

महसूल पंधरवडा अंतर्गत ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ उपक्रमात सहभागी होण्याचे मुंबई उपनगरातील माजी सैनिकांना आवाहन

मुंबई, दि 2 : महसुल पंधरवडानिमित्त मुंबई उपनगर सैनिक कल्याण कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांच्यासाठी ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ हा उपक्रम १० ऑगस्ट २०२४ रोजी राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांर्गत महसूल संबंधित समस्यांचे निराकरण करता येणार आहे. मुंबई उपनगरात वास्तव्यास असणाऱ्या सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांनी या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमात राष्ट्रीय सुरक्षिततेच्या कामी सीमावर्ती भागामध्ये व सुरक्षिततेच्या दृष्टीने अन्य संवेदनशील भागामध्ये तैनात असणारे संरक्षण दलातील अधिकारी, सैनिक यांना व त्यांच्या कुंटूंबिंयाना आवश्यक असणारे, महसूल कार्यालयाकडून निर्गमित होणारे विविध दाखले, प्रमाणपत्रे मिळणेबाबत प्राप्त अर्जावर सत्वर कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच संरक्षण दलात कार्यरत असताना शहीद झालेल्या कर्मचाऱ्यांना जमीन वाटप करण्याबाबत प्रलंबित असलेल्या अर्जावर कार्यवाही करण्यात येईल.

तसेच संरक्षण दलातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी – कर्मचारी यांना घरासाठी शेतीसाठी जमीन वाटपाबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात येतील. या अनुषंगाने मेजर प्रांजळ जाधव (नि) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई उपनगर यांनी सर्व माजी सैनिक /माजी सैनिक विधवा यांना संबधित महसूल कार्यालयात  10 ऑगस्ट 2024 रोजी उपस्थित राहून आपले महसूल संबधित प्रश्न सोडवून घ्यावेत, असे आवाहन सैनिक कल्यान कार्यालयाने केले आहे.

00000

किरण वाघ/विसंअ

ताज्या बातम्या

महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालांचे वाणिज्यदूतांसाठी चहापान

0
मुंबई, दि. २९  : दिनांक १ मे रोजी साजरा होत असलेल्या महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचे औचित्य साधून राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत...

नागरिकांना वेळेत सुविधा मिळण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

0
पुणे महापालिकेत महाप्रितच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांचा आढावा मुंबई, २८: पुणे महानगरपालिका आणि महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी महामंडळ (महाप्रित) यांच्या संयुक्त विद्यमाने...

खाडीत सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे मासेमारीवर होणाऱ्या परिणामासंदर्भात अभ्यास समिती स्थापन करावी – सभापती...

0
मुंबई दि. २९ :- राज्यातील मुंबई, ठाणे, बेलापूर, उलवे, तळोजा येथील खाड्यांमध्ये औद्योगिक क्षेत्रामधून सोडण्यात येणारे सांडपाणी आणि डंम्पिंग ग्राऊंडचा कचरा यामुळे प्रदूषण वाढत असून त्याचा फटका मासेमारी...

जिगाव प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबत आठ दिवसात नव्याने प्रस्ताव सादर करावा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई दि. २९ : बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांनी 40 टक्के वाढीव मोबदला मागितला आहे. त्यामुळे 8 हजार 782 दावे प्रलंबित असून ते निकालात...

सुरक्षा रक्षक मंडळाच्या नोंदणीकृत कर्मचाऱ्यांचा खाकी गणवेश; १ मे पासून अंमलबजावणी – कामगार मंत्री ॲड.आकाश...

0
मुंबई, दि. 29 : राज्यातील नोंदणीकृत सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी खाकी रंगाच्या गणवेशास शासनाने मान्यता दिली. यामध्ये टोपी निळ्या रंगाची असून, त्यावर सुरक्षा रक्षक मंडळाचा लोगो...