बुधवार, एप्रिल 30, 2025
Home Blog Page 483

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी करण्याचे आवाहन

मुंबई, दि. २ : राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलिंडर पुनर्भरण मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे. या योजनेच्या सुलभ लाभ घेता यावा यासाठी लाभार्थींनी त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन ई- केवायसी करावे. तसेच लाभार्थ्यांचे बँक खाते आधार सलग्न करून घ्यावे, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.

गरीब कुटुंबातील महिलांना धूरमुक्त वातावरणात स्वयंपाक करता यावा, तसेच त्यांच्या आरोग्यमानात सुधारणा व्हावी यासाठी एलपीजी गॅसचा वापर सर्वात सुरक्षित आहे. परंतू गॅस जोडणीधारकांना बाजारदराने गॅस जोडण्यांचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यांना गॅस पुनर्भरण करणे शक्य होत नसल्यामुळे ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवतात. त्याअनुषंगाने राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील प्रधाममंत्री उज्ज्वला योजना आणि ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक ३ गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफत देण्यात येणार आहे.

00000

हेमंतकुमार चव्हाण /विसंअ/

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेचे मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि.२ : ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसाठी मराठीमध्ये अर्ज करण्यात आले आहेत. पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील. मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, अर्जाची प्रक्रिया करत असताना काही तांत्रिक अडचणीमुळे मराठी भाषेतील अर्जाचा विषय चर्चेला आला होता. परंतू ही तांत्रिक अडचण संबंधित बँकेने सोडविली आहे. त्यामुळे मराठीमध्ये केलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मराठीतील अर्ज नामंजूर किंवा अमान्य  होणार  नाहीत.

मराठीमधील अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करावे लागतील, अशा प्रकारचा अपप्रचार पसरविण्यात येत आहे. अशा कोणत्याही अपप्रचाराला पात्र महिला अर्जदारांनी बळी पडू नये, असे सांगून मराठीत केलेले अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करण्याची आवश्यकता नसल्याचेही मंत्री कु. तटकरे यांनी यावेळी सांगितले.

0000

काशिबाई थोरात/विसंअ/

महसूल पंधरवड्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची व्हावी प्रभावी अंमलबजावणी : पालकमंत्री दादाजी भुसे

नाशिक, दिनांक 1 ऑगस्ट, 2024 (जि.मा.का. वृत्तसेवा): महसूल पंधरवड्याच्या माध्यमातून महसूल पंधरवड्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी वकरण्यात यावी. यासोबतच शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांची प्रलंबित प्रकरणे मोहीमस्तरावर निकाली काढून पात्र लाभार्थ्यांना न्याय द्यावा, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील नियोजन भवन येथे महसूल दिन व महसूल पंधरवड्याच्या शुभारंभ प्रसंगी पालकमंत्री श्री. भुसे बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपविभागीय अधिकारी तथा महसूल पंधरवड्याच्या नोडल अधिकारी हेमांगी पाटील यांच्यासह महसूल यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, महसूल पंधरवड्याच्या कालावधीत शासनाच्या विविध जनकल्याण योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी मोहिमस्तरावर नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसाठी त्यांना जातीचे दाखले हे शाळा व महाविद्यालयांच्या पातळीवर देण्यात यावे. आदिवासी बांधव कागदपत्रांच्या अभावी शासनाच्या योजनांपासून वंचित राहणार नाहीत याबाबत महसूल यंत्रणेने योग्य ते नियोजन करावे. ज्या योजनांचे अनुदान उपलब्ध झाले आहे, त्या योजनांच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर अनुदान या कालावधीत वर्ग करण्यात यावेत. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ जास्तीत जास्त बहिणींना मिळेल, यासाठी देखील प्रयत्नपूर्वक कार्यवाही करण्याच्या सूचना ही पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या.

तलाठी हे महसूल यंत्रणेचा ग्रामीण भागात काम करणारा महत्वाचा व जबाबदार घटक आहे. त्यामुळे नवनियुक्त तलाठ्यांनी त्यांची जबाबदारी निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडावी, असे सांगून या कार्यक्रमात ज्या उमेदवारांना तलाठी पदाच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले त्यांना पालकमंत्री दादाजी भुसे यांनी शुभेच्छा दिल्या.

विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम म्हणाले, महसूल यंत्रणेच्या कामाच्या व्याप्तीसोबतच त्यातील आव्हाने देखील वाढत आहेत. या आव्हानांचा सामना करण्यासाठी व कामाचा निपटारा जलदगतीने होण्या करीता 7/12 संगणकीकरण, ई ऑफीस प्रणाली यासारख्या तंत्रज्ञानाचा उपयोग होतांना दिसत आहे. महसूल पंधरवड्याच्या निमित्ताने अधिकप्रमाणात शासनाच्या योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहचेल यादृष्टिने काम करावे, असे आवाहन देखील विभागीय आयुक्त श्री. गेडाम यांनी केले.

महसूल दिन व महसूल पंधरवड्याचा शुभारंभ कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी गेल्या वष्रभरात महसूल यंत्रणेकडून करण्यात आलेल्या कामांची थेाडक्यात माहिती दिली. तसेच निवडणूक कालावधीमध्ये तालुकास्तरावर करण्यात आलेल्या कामांची चित्रफीत देखील यावेळी दाखवण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला पालकमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर पंधरवड्याची सुरुवात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजने सुरुवात करण्यात येवून पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते पाच बहिणींना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच निवडणूक कालावधीत उत्कृष्ट काम केलेले नोडल अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, जिल्हा सूचना अधिकारी संजय गंजेवार व सुनिता जराड यांना प्रशस्तीपत्रक देवून त्यांचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला. यावेळी इगतपुरी तहसिलदार यांना चारचाकी वाहनाची चावी पालकमंत्री श्री. भुसे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

असा राबविण्यात येणार महसूल पंधरवाडा-2024…..

1 ऑगस्ट : “महसूल दिन साजरा करणे व महसूल पंधरवाडा शुभारंभ” ” मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना”
2 ऑगस्ट : “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना”
3 ऑगस्ट : “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ”
4 ऑगस्ट : “स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय ”
5 व 6 ऑगस्ट : “कृषी मार्गदर्शन कार्यक्रम” कृषी मार्गदर्शन कार्यक्रम”
7 ऑगस्ट : “युवा संवाद”
8 ऑगस्ट : “महसूल – जन संवाद”
9 ऑगस्ट : महसूल ई-प्रणाली ”
10 ऑगस्ट : ” सैनिक हो तुमच्यासाठी ”
11 ऑगस्ट : “आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन ”
12 ऑगस्ट : “एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा”
13 ऑगस्ट : ” महसूल अधिकारी/कर्मचारी” यांचे प्रशिक्षण
14 ऑगस्ट : “महसूल पंधरवाडा वार्तालाप ”
15 ऑगस्ट : “महसूल संवर्गातील कार्यरत / सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी / कर्मचारी पुरस्कार वितरण व महसूल पंधरवाडा सांगता समारंभ”
00000000

नाशिक-मुंबई महामार्गावरील रस्त्यांची कामे जलदगतीने पूर्ण करावीत : पालकमंत्री दादाजी भुसे

नाशिक, दिनांक 1 ऑगस्ट, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा):  नाशिक- मुंबई महामार्गावरील रस्त्यांच्या कामांसह इतर अनुषंगिक कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत राज्याचे उपमुख्यंमत्री अजित पवार यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यात येवून, येत्या दहा दिवसांच्या कालावधीत कामे पूर्ण करण्याच्या सुचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी बैठकीत दिल्या.
आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात नाशिक- मुंबई राष्ट्रीय महामार्गाबाबत शहरातील विविध संघटनांसमवेत झालेल्या बैठकीत पालकमंत्री श्री. भुसे बोलत होते. या बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, पावसामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून वाहनधारकांना प्रवास करतांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच यामुळे वाहतुकीची कोंडीही होत आहे. नाशिक ते मुंबई हा प्रवास करण्यासाठी नियमित वेळेपेक्षा दुप्पट वेळ लागत आहे. त्यामुळे या महामार्गाच्या दुरूस्तीची कामे येत्या दहा दिवसांत पूर्ण करण्यात यावे व या कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई होता कामा नये, असे निर्देश पालकमंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना या बैठकीत दिले.
विविध संघटनांच्या पदाधिकारी यांनी या बैठकीत नाशिक-मुंबई महामागा्रवरील खड्ड्यामुळे वाहतुकीस येणाऱ्या अडचणी सांगितल्या. तसेच रस्ता दुरूसत होईपर्यंत रस्त्याचा टोल घेवू नये, अशी मागणी देखील यावेळी त्यांनी पालकमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली.
00000000

छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले जाज्वल्य अभिमान देणारा ऐतिहासिक वारसा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 1: छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले गड किल्ले केवळ वास्तू नसून सर्वांना प्रेरणा आणि जाज्वल्य अभिमान देणारा  ऐतिहासिक वारसा आहे. या वारशाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी जे आवश्यक असेल ते सर्व प्रयत्न राज्य शासन निश्चितपणे  करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सर्वांच्या प्रयत्नाने स्वराज्य निर्मिंतीत मोलाचे योगदान देणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे हे 12 किल्ले नक्कीच जागतिक वारसा यादीत समाविष्ट होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या वतीने ‘भारतातील मराठा लष्करी भूप्रदेश’ जागतिक वारसा नामांकनाबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, कौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा, जागतिक वारसा समितीच्या 46 व्या अधिवेशनाचे अध्यक्ष आणि युनेस्को मधील भारताचे राजदूत व स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, भारतीय पुरातत्व विभागाचे अतिरिक्त महानिदेशक डॉ. जान्विज शर्मा, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या क्षेत्रीय संचालक डॉ. टी. श्रीलक्ष्मी, अधीक्षक शुभा मुजुमदार, सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव नंदा राऊत, राज्याचे पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक सुजितकुमार उगले आदींची यावेळी उपस्थिती होती.

            जागतिक वारसा स्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील लष्करी भूप्रदेश या वैशिष्ट्यपूर्ण वारशाचा समाविष्ट व्हावा यासाठी भारताकडून प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, खांदेरी, राजगड, प्रतापगड हे 11 आणि तमिळनाडू येथील जिंजी अशा 12 किल्ल्यांचा यामध्ये समावेश आहे. या नामांकन प्रक्रियेचे ठोस समर्थन व्हावे आणि याबाबत अधिक मार्गदर्शन होण्याच्या उद्देशाने जागतिक वारसा समितीच्या 46 व्या अधिवेशनाचे अध्यक्ष श्री. विशाल शर्मा यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे 12 गड किल्ले जागतिक वारसा नामांकन प्रक्रियेसाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भारतीय पुरातत्व विभाग यांचे विशेष धन्यवाद मानले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे असामान्य महापुरुष होते. स्वराज्याची निर्मिती करून त्यांनी एक जाज्वल्य असा इतिहास निर्माण केला. त्यांच्या काळात झालेल्या गड किल्ल्याची निर्मिती ही त्यांची दूरदृष्टी दाखवून देते. जलदुर्गाची निर्मिती करुन त्यांनी स्वराज्य संरक्षणासाठी किती जागरुकता हवी, हे त्याकाळी दाखवून दिले. शत्रुला नामोहरम करण्यासाठी त्यावेळचे तंत्रज्ञान, वास्तू शास्त्र  यांचा अप्रतिम आविष्कार त्यांनी दाखविला. शिवकालीन हे किल्ले पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. आजही हे किल्ले मजबूत स्थितीत आहेत. येथील कणाकणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणी आहेत. हा इतिहास आपल्या सर्वांना प्रेरणा देणारा आहे. तो आपण जपत आहोत. त्याला जागतिक पातळीवर नेण्याची संधी आपल्याला मिळाली आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नमूद केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्ध कौशल्य, नीती, गनिमी कावा सर्वांना अभिमानास्पद – मंत्री सुधीर मुनगंटीवार

            सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, महाराष्ट्राचा इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्ध कौशल्य, नीती, गनिमी कावा हे आजही अनेक पिढ्यांना प्रेरणादायी आहे. त्यांचा इतिहास हा केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे, तर देशासाठी अभिमानास्पद आहे. गेल्या दोन वर्षात राज्य शासनाने येथील गड किल्ल्यांच्या डागडुजी आणि सुधारणासाठी प्रयत्न केले. हा वारसा जपण्यासाठी अधिक निधी राज्य शासनाने उपलब्ध करुन दिला आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या साहाय्याने या गड किल्ल्यांना अधिक चांगले रुप देऊन सर्वांना प्रेरणा देणारा इतिहास प्रत्यक्ष जाऊन पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे.  सर्वांच्या सहकार्य आणि समन्वयातून निश्चितपणे जागतिक वारसा स्थळांमध्ये याचा समावेश होईल, असे त्यांनी नमूद केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गड किल्ल्यांचे पावित्र्य जपले जावे, यासाठी तेथे मद्यपान करणाऱ्यांना कडक शिक्षेची तरतूद असणारा कायदा राज्य शासन लवकरच आणणार असल्याची माहितीही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिली.

गड किल्ल्यांशी भावनिक ओढ हे येथील वेगळेपण- विशाल शर्मा

             जागतिक वारसा केंद्र समितीच्या 46 व्या अधिवेशनाचे अध्यक्ष श्री. शर्मा यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. जागतिक वारसा यादीत नोंद ही मोठी गोष्ट आहे. प्रत्येक देश हे जागतिक पातळीवर त्यांच्या देशातील वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींची  नोंद व्हावी, यासाठी प्रयत्न करत असतो. त्यामुळे अधिक सकारात्मक पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे हे किल्ले आणि तेथील इतिहास हा युनेस्कोच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचला पाहिजे. येथील गडकिल्ल्यांचे वैशिष्ट्य म्हणजे येथील नागरिकांची भावना ही त्याच्याशी जोडली गेली आहे. जगात इतरत्र कुठे असे पाहायला मिळत नाही. त्यामुळे ही बाब अतिशय सकारात्मक परिणाम करणारी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जागतिक वारसा केंद्र समितीचे अधिवेशन पहिल्यांदा भारतात झाल्याचे त्यांनी नमूद केले.

           येथील गड किल्ले, त्यांच्या संरक्षणासाठीचे प्रयत्न, तेथे सध्या कशा प्रकारे व्यवस्थापन केले जात आहे, स्थानिक नागरिकांचा सहभाग कसा आहे याबाबीही महत्वपूर्ण असल्याचे श्री. शर्मा यांनी सांगितले. ज्यावेळी या गडकिल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा केंद्राचे प्रतिनिधी भेट देतील, त्यावेळी ही बाब प्रकर्षाने पाहिली जाईल. त्यामुळे या गडकिल्ल्यांबाबत सर्वसामान्यांसह शाळा, महाविद्यालये, विदयापीठे यामध्ये अधिक व्यापक जनजागृती करावी. गेल्या 10 वर्षात देशातील 13 स्थळांची जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंद झाली. त्यामुळे कमी कालावधीत उत्कृष्ट काम करुन निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारे हे गड किल्ले जागतिक वारसा म्हणून ओळखले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

             यावेळी डॉ. शिखा जैन यांनी जागतिक वारसा नामांकनासाठी हे गडकिल्ले निवडण्यामागे त्यांचे वेगळेपण असल्याचे नमूद केले. तसेच, जागतिक वारसा नामांकनानंतर केंद्र शासनाचा पुरातत्व विभाग आणि राज्य शासन यांच्या मदतीने यासाठीचे सादरीकरण कशा प्रकारे करता येईल, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.डॉ. जान्विज शर्मा यांनी जागतिक वारसा यादीत या गड किल्ल्यांचा समावेश व्हावा, यासाठी काम सुरु केले असलल्याचे सांगितले.

            सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री. खारगे यांनी राज्यातील गड किल्ल्यांच्या विकासासाठी राज्य शासनाने यापूर्वीच कामाला सुरुवात केली असल्याचे सांगितले. राज्याने महावारसा समिती स्थापन करुन गड किल्ले विकासासाठी राज्य स्तर, जिल्हा स्तर आणि प्रत्यक्ष संबंधित गड किल्ले याठिकाणी अशा समिती स्थापन केल्या आहेत. त्यानुसार काम सुरु आहे. याशिवाय, आता जागतिक वारसा नामांकनानंतर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरावर समिती असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबविण्यात आले. जागतिक वारसा नामांकनाबाबत अधिक जनजागृती व्हावी, यासाठी विद्यार्थी, युवा यांच्यासाठी विविध उपक्रम राबवून सर्वांचा सहभाग निश्चितपणे वाढविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

000

दीपक चव्हाण/विसंअ

अन्न सुरक्षा व पोषण मापदंड प्रशिक्षणाचे महिला व बालविकास मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, दि. १ : अंगणवाडी केंद्रांच्या कर्मचाऱ्यांमध्ये व लाभार्थ्यांमध्ये पोषण आणि अन्न सुरक्षेच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल घडावा यासाठी अन्न सुरक्षा व पोषण मापदंड प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन  महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते (दूरदृष्यसंवाद प्रणालीद्वारे) करण्यात आले.

कोकण विभागांमध्ये महात्मा गांधी प्रशिक्षण संस्थेतर्फे मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका पोषण मापदंड प्रशिक्षणाचे उद्घाटन झाले. यावेळी आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे, महिला व बाल विकास  आयुक्त कैलाश पगारे ऐकात्मिक बाल विकास सेवा योजना  व विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उप आयुक्त महात्मा गांधी प्रशिक्षण संस्था पुणे या उपस्थित होत्या यावेळी महिला व बालविकास विभागाचे आयुक्त, बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

महात्मा गांधी प्रशिक्षण संस्था व एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांच्या मानकानुसार अन्न सुरक्षा व पोषण मापदंड प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील २५ हजार  अंगणवाडी केंद्रातील ५० हजार अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे यांच्या हस्ते ‘ यशस्विनी डिजिटल प्लॅटफॉर्म ‘ आणि ‘ स्त्रीशक्ती डिजिटल प्लॅटफॉर्म ‘ चे उद्घाटन करण्यात आले.

००००

काशीबाई थोरात/विसंअ

महसूल विभाग गतिमान प्रशासनाचा अग्रणी दूत – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

मुंबई, दि. १ : नैसर्गिक आपत्ती असो की निवडणूक प्रत्येक उपक्रमात महसूल विभागाचा सक्रिय सहभाग असतो. महसूल विभाग हा गतिमान प्रशासनाचा अग्रणी दूत आहे. महसूल विभाग अन्य विभागांचा मार्गदर्शक आहे, अशा शब्दात विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी महसूल विभागाचा गौरव केला.

महसूल पंधरवडा व महसूल दिनानिमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी आदी उपस्थित होते. विधानसभेचे अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांच्या हस्ते महसूल योजनांची माहिती असलेल्या डिजिटल पत्रिकेचे अनावरण करण्यात आले. यावेळी विविध दाखल्यांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. तसेच ॲड. नार्वेकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या कक्षाचे उदघाटन करण्यात आले.

ॲड. नार्वेकर म्हणाले की, महसूल विभागाचा सर्वसामान्य जनतेशी जवळचा संबंध आहे. या विभागाने नागरिकांच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने स्पर्श केला आहे. पोलिसपाटील यांच्यापासून ते जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत सर्वच अधिकारी व कर्मचारी नेहमीच परिश्रमपूर्वक कामकाज करतात. त्यामुळे शासनाच्या विविध योजना यशस्वी होत आहेत. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह अन्य योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले की, महसूल विभागाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचविल्या जात आहेत. याबाबत जनजागृतीसाठी आराखडा तयार करण्यात आला आहे.

वैभव पांगम यांनी सूत्रसंचालन केले. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. कारभारी यांनी आभार मानले. यावेळी महसूल विभागासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम निवडणूक आयोगातर्फे जाहीर

            मुंबई, दि. १ : महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राज्यातील मतदार याद्या अद्ययावतीकरणाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. भारत निवडणूक आयोगाने १ जुलै २०२४ रोजीच्या अर्हता दिनांकाच्या आधारे मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे (दुसरा) वेळापत्रक निश्चित केले होते. त्यात भारत निवडणूक आयोगाने बदल केला आहे. त्यानुसार सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

            18 व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका यशस्विरित्या पार पडल्यानंतर, भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.  त्यासाठी राज्यांमधील मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. भारत निवडणूक आयोगाने त्यांचे दि. 20 जून, 2024 रोजीच्या पत्रान्वये दि. 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकाच्या आधारावर राज्यात मतदारयाद्यांचा “विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा)” बाबतचे वेळापत्रक निश्चित केले होते.

            मात्र, भारत निवडणूक आयोगाने  दि. १ ऑगस्ट २०२४ रोजीच्या पत्रान्वये कार्यक्रमाच्या वेळापत्रकात बदल केला असून, सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे, तो असा : मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारा प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी, मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण, मतदार यादी/ मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे इ., आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे तसेच, अस्पष्ट/ अंधूक छायाचित्र बदलून त्याऐवजी संबंधित मतदाराकडून योग्य दर्जाचे छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे,  विभाग / भागांची आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करून मतदान केंद्राच्या सीमांची पुनर्रचना तयार करून मतदान केंद्राच्या यादीस मान्यता घेणे आणि तुलनात्मक फरक शोधून फरक दूर करण्यासाठी कालबध्द योजना आखणे,  कंट्रोल टेबल अद्ययावत करणे, नमुना १-८ तयार करणे, १ जुलै, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित पुरवणी व एकत्रीत प्रारूप यादी तयार करणे – २५ जून ते ५ ऑगस्ट २०२४. एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे- ६ ऑगस्ट २०२४. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी- ६ ते २० ऑगस्ट २०२४.

            विशेष मोहिमांचा कालावधी – शनिवार १०, रविवार ११, शनिवार १७, रविवार १८ ऑगस्ट २०२४. दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीत सर्व शनिवार व रविवार. दावे व हरकती निकालात काढणे, अंतिम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी मागणे,  डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई- २९ ऑगस्ट २०२४. मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे- ३० ऑगस्ट २०२४.

०००००

गोपाळ साळुंखे/स.सं

वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमतर्फे दुसरे जागतिक कृषी पारितोषक २०२४ महाराष्ट्राला जाहीर

  • एक लाख डॉलरचा वैश्विक पुरस्कार
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शासनाच्या दूरदर्शी कृषी आणि पर्यावरण धोरणांचा गौरव

मुंबई, दि.३१ :- युनोचे सरचिटणीस अँण्टिवो गुट्रेस यांनी शाश्वत विकास, हवामान बदलाशी लढा आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तातडीने पाऊले उचलण्याचे आवाहन केले होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र शासनाने या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. राज्यात पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून शाश्वत विकास धोरण राबविली जात आहेत. या सर्व प्रयत्नांची आणि पर्यावरण, कृषी क्षेत्राच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उचलेल्या पावलांची दखल घेत वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमचा २०२४ चा दुसरे जागतिक कृषी, पर्यावरण पारितोषिक महाराष्ट्राला जाहीर झाले आहे. फोरमच्या चेअरमन प्रा.रुडी रॅबिंग्ज यांनी पत्राद्वारे याबाबत माहिती दिली आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथे २६ ऑगस्ट रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहेत. एक लाख डॉलरची पुरस्कार रक्कम, चांदीची ट्रॉफी आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

या पुरस्कारांसाठी राज्यातील पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेतली असल्याची माहिती राज्याच्या कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली आहे.

बांबू मिशन राबविण्याचा निर्णय

मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने अनेक परिवर्तनकारी निर्णय घेतले आहेत. यात २१ लाख हेक्टर क्षेत्रावर देशातील सर्वात मोठे बांबू मिशन राबविण्याचा निर्णय आहे. नंदुरबार येथील धडगांव तालुक्यातील ७० गावच्या सरपंचांनी केंद्रीय फलोत्पादन सचिव प्रभातकुमार यांच्या समोरच आमचा प्रश्न बांबू लागवडीशिवाय सुटणार नाही, अशी मागणी केली. केंद्रानेही त्याला होकार दिला. या वर्षीच्या राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री श्री. पवार यांनी नंदुरबार जिल्ह्यातील एक लाख २० हजार एकर जमिनीवर केंद्र आणि राज्य मिळून हरित पट्टा निर्माण करण्याचे जाहीर केले आहे. या अभियानासाठी अर्थमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी अर्थसंकल्पातही तरतूद केली आहे. याशिवाय शासनाने १२३ प्रकल्पांना मार्गी लावून सुमारे १७ लाख हेक्टरची सिंचन क्षमता निर्माण करण्याचा चंग बांधला आहे.

परिवर्तनकारी निर्णय

भारतातील पहिले मायक्रो मिलेट क्लस्टर व बांबू क्लस्टर लातूर जिल्ह्यात लोदगा येथे सुरु करण्यास मागील अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मान्यता दिली होती.  तसा प्रस्तावही केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. पीएम किसान सन्मान निधी दुप्पट करण्याचा निर्णय घेणारे पहिले राज्य महाराष्ट्र ठरले आहे. याशिवाय लाखो शेतकऱ्यांना नॅनो-तंत्रज्ञान खतांचे वितरण करण्याची सुरवातही केली आहे. तृणधान्य अभियानात श्री अन्न म्हणून सावा, राळा-भुरका यांसह विविध तृणधान्यांना प्राधान्य देण्याचे धोरण तयार करण्यात आले आहे. त्यासाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद करणारे महाराष्ट्र हे अव्वल राज्य ठरले आहे.

बांबू लागवडीसाठी अनुदान

अलिकडेच औष्णिक वीज केंद्रांनी बायोमासमध्ये बाबुंचाही वापर करावा, असे निर्देश दिले गेले आहेत. त्याचप्रमाणे बांबूपासून दैनंदिन जीवनात उपयोगात येणाऱ्या टुथब्रश, शेव्हिंग कीट यासारख्या वस्तू तयार करण्याला प्रोत्साहन देण्यात येत आहे. यामुळे प्लास्टीकचा कचरा कमी होण्यास मदत मिळणार आहे. यासाठी बांबूची लागवड वाढणे आवश्यक असून त्याकरिता मिशन मोडवर काम होत आहे. बांबू लागवडीसाठी हेक्टरी सात लाख रुपयांचे अनुदान देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. शिर्डी आणि मुंबईसह शक्य त्या सर्वच विमानतळांच्या ठिकाणी कार्बन फुटप्रिंट कमी करण्याकरिता पोलाद आणि अन्य धातुंच्या ऐवजी बांबुचा वापर करण्यावर भर देण्याचेही राज्य सरकारने धोरण आखले आहे,असेही श्री. पटेल यांनी नमूद केले आहे.

वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमतर्फे २०१८ पासून हा पुरस्कार देण्यात येतो. कृषी शास्त्रज्ञ प्रा.स्वामीनाथन या पुरस्काराचे मानकरी ठरले. त्यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या पहिल्या पुरस्कारचे मानकरी ठरले आहेत. यापूर्वी १० जुलै रोजी दिल्ली येथील अग्रीकल्चर टूडे ग्रुपतर्फे महाराष्ट्राला पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. महाराष्ट्राने पर्यावरण रक्षण, शाश्वत विकासासाठी केलेल्य कामाची दिशा जगाला भावली म्हणूनच या पुरस्कारासाठी शिंदे यांची निवड करण्यात आली, अशी माहिती श्री. पटेल यांनी दिली.

00000

महसूल आणि पशुसंवर्धन पंधरवड्यामध्ये योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि.१ : यावर्षीपासून महसूल सप्ताह ऐवजी ‘महसूल पंधरवडा’  तसेच ‘पशुसंवर्धन पंधरवडा’ आयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या धर्तीवर शासनाच्या विविध योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत लाभ पोहोचवा. वयोश्री, लेक लाडकी, अन्नपूर्णा, ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ तसेच शेतकऱ्यांशी संबंधित विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शासनाची चांगली प्रतिमा निर्माण करावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

राज्यस्तरीय महसूल दिन तसेच महसूल व पशुसंवर्धन पंधरवडा-२०२४ चा आरंभ कार्यक्रम मंत्रालयातील परिषद सभागृह येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी   उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महसूल आणि पशुसंवर्धन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी आणि पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, महसूल व पशुसंवर्धन पंधरवडा दोन्हीसाठी नागरिकांना शुभेच्छा देताना आनंद होत आहे. नागरिक व ग्रामीण भागातील जनतेसाठी महसूल व पशुसंवर्धन अतिशय महत्त्वाचे विभाग आहेत. महसूल पंधरवड्यामध्ये शासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी महसूल विभागाने अग्रेसर राहून सर्व विभागांसह चांगले काम करावे.

श्री.शिंदे म्हणाले की, कृषी, आरोग्य, सिंचन, जलसंपदा, सहकार यासह अन्य सर्व विभागांना एकत्र घेऊन काम करावे. अधिकाऱ्यांनी अधिक गतीमान, परस्पर समन्वय साधून नागरिकांची कामे वेळेत करण्यासोबत शासनाच्या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून लोकाभिमुख काम करावे. जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय अधिकारी, कर्मचारी यांनी लोकांपर्यंत जावे.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, पंधरवड्यानिमित्त विविध योजना लोकांपर्यंत नेऊन शासनाची चांगली प्रतिमा निर्माण करावी. भेसळ करणाऱ्यांना जरब बसेल यासाठी कडक कारवाई करावी.

महसूल विभागाने अधिक लोकाभिमुख होऊन काम करावे – उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी व उपक्रमामध्ये महसूल विभागाचे चांगले योगदान आहे. समाजातील प्रत्येक घटक यामध्ये सहभागी होत आहे. महसूल विभागाने लोकाभिमुख होत अधिक गतिमान पद्धतीने काम करावे. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने महसूल पंधरवडा यशस्वी होईल.  पोलीस विभागाच्या धर्तीवर महसूल विभागास देखील जिल्हा नियोजन समितीतून वाहने खरेदीचा निर्णय घेण्यात येत आहे, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

संगणकीकरणामुळे शासकीय कार्यालयात येण्याची गरज कमी झाली आहे. ग्रामीण भागात महसूल व पशुसंवर्धन विभाग दोन्ही महत्त्वाचे आहेत. शेतकरी व दूध उत्पादक यासह सर्वसामान्यांची सेवा करण्याचे उद्दिष्ट ठेवून काम केले जावे असे उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

शासनाच्या योजना व धोरण पोहोचवावेत –महसूल मंत्री

महसूलमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले की, पंधरवड्याच्या उपक्रमामध्ये सर्व नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना व धोरण पोहोचवावेत. उपक्रम राबवताना  पालकमंत्री, आमदार , लोकप्रतिनिधी यांच्या सहभागाने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. विविध उपक्रमांच्या निमित्ताने सैनिकांचे कुटुंबीय, महाविद्यालयीन युवक, वयोवृद्ध नागरिक , महिला समाजातील विविध घटक यांना सामावून घेत महसूल पंधरवड्याचा हा उपक्रम यशस्वी करावा. पशुसंवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने राज्यातील दूध भेसळ विरोधात कारवाई केली जावी.

प्रास्ताविकात अपर मुख्य सचिव राजेशकुमार यांनी महसूल पंधरवड्याच्या आयोजनाचे महत्व सांगून या उपक्रमाचा तपशीलवार माहिती दिली.

०००००

ताज्या बातम्या

महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालांचे वाणिज्यदूतांसाठी चहापान

0
मुंबई, दि. २९  : दिनांक १ मे रोजी साजरा होत असलेल्या महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचे औचित्य साधून राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत...

नागरिकांना वेळेत सुविधा मिळण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

0
पुणे महापालिकेत महाप्रितच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांचा आढावा मुंबई, २८: पुणे महानगरपालिका आणि महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी महामंडळ (महाप्रित) यांच्या संयुक्त विद्यमाने...

खाडीत सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे मासेमारीवर होणाऱ्या परिणामासंदर्भात अभ्यास समिती स्थापन करावी – सभापती...

0
मुंबई दि. २९ :- राज्यातील मुंबई, ठाणे, बेलापूर, उलवे, तळोजा येथील खाड्यांमध्ये औद्योगिक क्षेत्रामधून सोडण्यात येणारे सांडपाणी आणि डंम्पिंग ग्राऊंडचा कचरा यामुळे प्रदूषण वाढत असून त्याचा फटका मासेमारी...

जिगाव प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबत आठ दिवसात नव्याने प्रस्ताव सादर करावा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई दि. २९ : बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांनी 40 टक्के वाढीव मोबदला मागितला आहे. त्यामुळे 8 हजार 782 दावे प्रलंबित असून ते निकालात...

सुरक्षा रक्षक मंडळाच्या नोंदणीकृत कर्मचाऱ्यांचा खाकी गणवेश; १ मे पासून अंमलबजावणी – कामगार मंत्री ॲड.आकाश...

0
मुंबई, दि. 29 : राज्यातील नोंदणीकृत सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी खाकी रंगाच्या गणवेशास शासनाने मान्यता दिली. यामध्ये टोपी निळ्या रंगाची असून, त्यावर सुरक्षा रक्षक मंडळाचा लोगो...