गुरूवार, मे 1, 2025
Home Blog Page 488

चैत्यभूमीला राज्यपालांची भेट

मुंबई, दि. 1 : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज राज्यपाल पदाच्या कामकाजाच्या पहिल्या दिवशी चैत्यभूमी येथे जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले. यावेळी त्रिशरण बुद्ध वंदना म्हणण्यात आली.

यावेळी राज्यपालांनी डॉ. आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे देखील दर्शन घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण समितीचे महासचिव नागसेन कांबळे तसेच भंते डॉ. राहुल बोधी हे यावेळी उपस्थित होते.

००००

Governor visits Chaitya Bhoomi

 Mumbai 1 : Maharashtra Governor C.P. Radhakrishnan visited the Chaitya Bhoomi memorial and offered his floral tributes to the Architect of the Indian Constitution Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar on August 1.

Trisharan Buddha Vandana was recited on the occasion. The Governor also had the darshan of the mortal remains (Asthi Kalasha) of Dr Ambedkar on the occasion.

General Secretary of the Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Samiti Nagsen Kamble and Bhante Dr Rahul Bodhi were present on the occasion.

0000

मुख्यमंत्री :  माझी लाडकी बहीण सन्मान यात्रा

छत्रपती संभाजीनगर दि.१(जिमाका)- ‘आनंदाचा शिधा’ आणि बसगाडीत अर्ध्या तिकीटात प्रवास या योजनांचा माताभगीनींना थेट लाभ होत आहे. दोन्ही योजना यशस्वी झाल्या आहेत. आता मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत रक्षाबंधनाला पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या खात्यात मुख्यमंत्री भावाकडून रक्कम जमा होईल. ही योजना म्हणजे नारीशक्तिचा सन्मान आहे, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पैठण येथे केले.

‘मुख्यमंत्रीः माझी लाडकी बहिण सन्मान यात्रा’, या  कार्यक्रमाचे आयोजन आज पैठण शहरात करण्यात आले होते. त्या बोलत होत्या. माहेश्वरी धर्मशाळेच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमास पैठण तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या संचालक वर्षा भुमरे, पुष्पा गव्हाणे, वैशाली परदेशी, ज्योती वाघमारे व प्रतिभा जगताप आदी महिला उपस्थित होत्या.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, शासनाच्या वतीने महीलांसाठी तालुकास्तरावर आरोग्य शिबीरे आयोजित करण्यात येणार आहेत. पैठण तालुक्यात “महीला अस्मिता भवन” उभारण्याचे नियोजन करावे. या भवनात महीलांसाठी क्रीडा, मनोरंजन, वाचनालय व बचत गट बैठका यासाठी सुविधा निर्माण केल्या जातील. लाडकी बहीण योजनेसाठी ग्रामपंचायतस्तरावर नोंदणी सुरु असून महिलांनी आपल्या गावात असलेल्या नोंदणी सुविधेचा लाभ घ्यावा,असे आवाहनही त्यांनी केले.  या कार्यक्रमास तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संचालन ज्योती काकडे यांनी केले.

०००००

लोकशाहीर अण्णा भाऊंचे साहित्य लढणाऱ्या माणसांसाठी दीपस्तंभ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, ‍‍दि.१ : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य जगभर प्रसिद्ध असून त्यांचा वाटेगाव ते मॉस्को प्रवास आहे. तो उल्लेखनीय असून त्यांच्या साहित्यातून समाजात क्रांतिकारी परिवर्तन घडले आहे. त्यांचे साहित्य वीस पेक्षा अधिक भाषेत अनुवादित झाले असून त्यांचे साहित्य जगण्यासाठी लढणाऱ्या माणसांसाठी दीपस्तंभासारखे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) कार्यालयाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच वेबसाईट, पोर्टल व सहज शिक्षा अॅपचे उद्घाटन ही यावेळी करण्यात आले. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, आमदार अमित गोरखे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव विजय वाघमारे, सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, आर्टी चे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष सांगळे आदी उपस्थित आहेत.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने शिष्यवृत्ती किंवा कर्ज मिळणे ही आर्थिक जबाबदारी नसून ती सामजिक जबाबदारीची जाणीव आहे. हे भान युवकांनी ठेवले पाहिजे. बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या धर्तीवर आर्टी ही संस्था उत्तम काम करेल, युवकांना मार्गदर्शन करेल. असा मला विश्वास आहे.राज्यातील महिला, मुली, युवक व ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाने अनेक नवीन योजना आणल्या आहेत. ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेचे दोन हप्ते हे रक्षाबंधनच्या पूर्वीच महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत.अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन गॅस सिलिंडर मोफत देण्यात येणार आहेत. तसेच राज्यातील मुलींना उच्च शिक्षणामध्ये कोणतीही अडचण येऊ नये यासाठी फी सवलत देण्यात आली आहे. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत युवकांना अनुदान मिळणार आहे. यात बारावी, पदवी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुदान देणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य आहे. दिव्यांगासाठी स्वतंत्र विभाग आपण राज्यांमध्ये निर्माण केला असून दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण करणार महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी  सांगितले.

अण्णा भाऊ साठे यांचे व्यक्तिमत्व वैश्विक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपण आर्टीची सुरुवात करीत आहोत हा एक राज्यात एक सामाजिक चळवळीचा महत्त्वाचा टप्पा आहे. अण्णा भाऊ साठे यांचा रशियातील पुतळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी रशियात गेलो तेव्हा अण्णा भाऊ साठे यांचे विचार ऐकल्यानंतर अभिमान वाटला. ही आठवण त्यांनी यावेळी सांगितली.अण्णाभाऊ साठे यांनी  मराठी भाषा, मराठी साहित्य हे साता समुद्रा पार पोहोचवले असून त्यांचे व्यक्तिमत्व वैश्विक आहे.

मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी लहुजी वस्ताद साळवे आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी शासन सकारात्मक आहे. वस्ताद लहुजी साळवे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले आहे.या ठिकाणी आर्टीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह सुरू करण्यात येईल. आर्टी संस्थेच्या माध्यमातून उच्च शिक्षण, स्टार्ट अप,रोजगार यासाठी विविध प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या संस्थेच्या माध्यमातून मातंग समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थी आयएएस, आयपीएस अधिकारी होतील, असा विश्वास आहे. मानव संसाधन निर्मिती करणारा हा समाज असून या समाजाच्या विकासासाठी शासन नेहमीच पाठिशी आहे,असे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.

अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकासाठी पुरेसा निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार

अण्णा भाऊ साठे यांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी समाजाच्या उद्धारासाठी जे उत्तुंग कार्य केले आहे ते कधीही विसरता येणार नाही. घाटकोपरमधील चिरागनगर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे भव्य स्मारक लवकरच उभारण्यात येईल.या स्मारकासाठी तसेच समाजाच्या विकासासाठी  पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार  म्हणाले.

विविध विभागाची वसतीगृहे, आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे  परिपोषण अनुदानात भरीव वाढ केली आहे. अनुदानित संस्थामधील विद्यार्थ्यांच्या आहारावर पूर्वी प्रति विद्यार्थी 1500 रुपये महिना इतके होते ते आता 2200 रुपये प्रति महिना इतके असेल.याचा लाभ मागासवर्गीय, वंचित अशा 5 लाख विद्यार्थ्यांना होणार आहे. आर्टी संस्थेच्या माध्यमातून आपल्या समाजाचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी व्यक्त केला.

मंत्री श्री. देसाई म्हणाले, बार्टी  या संस्थेच्या धर्तीवर आर्टीची स्थापना करण्याची मातंग समाजाची मागणी आज शासनाने पूर्ण केली आहे. आर्टी कार्यालयाच्या उद्घाटनामुळे आता संस्थेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक न्याय विभागाचे सचिव विजय वाघमारे यांनी केले. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शैक्षणिक कर्ज व लाभार्थ्यांना विविध योजनेअंतर्गत कर्जाचे धनादेश वितरण करण्यात आले.

०००००

शैलजा पाटील/विसंअ

शाब्बास स्वप्नील… तुझ्या कांस्य पदकामुळे महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर पसरले हास्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार यांनी साधला पॅरिसमधील स्वप्नीलशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद

मुंबई, दि. १ : – शाब्बास स्वप्नील… तुझ्या कांस्य पदकामुळे महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर हास्य पसरले आहे. तुझी कामगिरी महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. तू आमचा अभिमान आहेस, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमबाज स्वप्नील कुसाळेचे अभिनंदन केले. तसेच या कामगिरीसाठी स्वप्नीलला एक कोटी रुपयांचे पारितोषिक दिले जाईल, असे जाहीर केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पॅरीसमध्ये असलेल्या ऑलिंपिकवीर स्वप्नीलशी तसेच त्याच्या प्रशिक्षक दिपाली देशपांडे, विश्वजीत शिंदे यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संपर्क साधला.

मुख्यंमत्री श्री. शिंदे म्हणाले, स्वप्नीलचे रौप्य पदक अवघ्या ०.१ गुणांनी हुकले आहे. तरीही त्याने कांस्य पदक पटकावल्याने महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. महाराष्ट्राला वैयक्तिक कामगिरीसाठी ७२ वर्षांनी पदक मिळाले आहे. या कामगिरीसाठी स्वप्नीलला एक कोटी रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. त्याचा आणि त्याचे प्रशिक्षक, आई-वडील यांचा यथोचित सत्कारही केला जाईल. याशिवाय स्वप्नीलला नेमबाजीतील पुढील तयारीसाठी आवश्यक, त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. स्वप्नीलने आपल्या कामगिरीने इतिहास रचला आहे. या यशासाठी कुसाळे कुटुंबियांसह, त्याला मार्गदर्शन करणारे, प्रशिक्षक आदींची मेहनत महत्वाची ठरली आहे.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून नेमबाजी स्वप्नीलचे हे यश आनंददायी आहे. स्वप्नीलचा महाराष्ट्राला रास्त अभिमान आहे. नेमबाजीतील या क्रीडा प्रकारात पदक पटकावणारा स्वप्नील एकमेव भारतीय खेळाडू ठरला आहे. आपण राज्यातील विविध क्रीडा प्रकारांसाठी खेळाडू, प्रशिक्षक यांच्यासाठी आवश्यक त्या सर्व सोयी, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहोत. राज्यातील क्रीडा संकुलांच्या सुविधांचाही विस्तार करत आहोत. ऑलिंपिकहून परतल्यानंतर स्वप्नीलचे महाराष्ट्रात स्वागत आणि यथोचित सत्कार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

ऑलिंपिकवीर स्वप्नील म्हणाला की, पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीमध्येच सराव करताना नेमबाजीचा चांगला पाया घातला गेला. माझ्या यशात कुटुंबियांसह, आईच्या मायेने प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षक श्रीमती देशपांडे, श्री. शिंदे यांचा मोला वाटा आहे.

या संवादात मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी स्वप्नील कुसाळेचे आई-वडील, प्रशिक्षक, मार्गदर्शक सर्वांचे अभिनंदन केले.

०००००

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेच्या कुटुंबियांचे अभिनंदन; कांबळवाडीतील कुटुंबियांशी साधला दूरध्वनीवरून संपर्क

मुंबई, दि. १ : – नेमबाज स्वप्नील कुसाळे आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आहे. स्वप्नीलच्या पुढील वाटचालीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलचे वडील सुरेश कुसाळे यांना सांगितले. पॅरीस ऑलिंपिक २०१४ मध्ये नेमबाजीत कांस्य पदकाचा वेध घेणाऱ्या स्वप्नीलच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून अभिनंदन केले.

कुसाळे कुटुंबियांच्या पाठिंब्यामुळेच स्वप्नील या यशापर्यंत पोहोचू शकला आहे. त्याच्या गेल्या १२ वर्षांच्या मेहनतीमुळे देशाला आणि राज्याला क्रीडा क्षेत्रातील महत्वपूर्ण असे यश मिळाले आहे. या यशासाठी कुसाळे कुटुंबियांसह, स्वप्नीलला शालेय जीवनापासून ते नेमबाजीत करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या गुरुजन, प्रशिक्षक, मार्गदर्शक अशा सर्वांचे योगदान निश्चितच महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

स्वप्नीलमुळे कुस्तीमध्ये भारतासाठी वैयक्तिक पहिले पदक पटकावणाऱ्या खाशाबा जाधव यांची आठवण झाली. स्वप्नीलच्या या कामागिरीने महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात उत्साह, आनंदाचे उत्साह निर्माण झाले आहे. कांबळवाडी ते पॅरीसमध्येली ऑलिंपिक पदाला गवसणी हा स्वप्नीलचा प्रवास क्रीडा क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या होतकरू खेळाडूंसाठी प्रेरणादायी असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. तसेच यापुढेही स्वप्नीलच्या वाटचालीसाठी आवश्यक असे सर्व ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.

०००००

युवांच्या हाताला काम देणारी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’

प्रत्येक युवक-युवतींना शिक्षणानुरूप रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी युवा युवती आणि  त्यांचे पालक जागरूक असतात. राज्य शासन देखील त्यांच्या रोजगार निर्मितीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असते. युवा वर्गाचे शिक्षण पूर्ण झाल्यांनतर वेळेत योग्य मार्गदर्शन आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी भांडवलाची उपलब्ध शासन विविध योजनांच्या माध्यमातून करून देत आहे. रोजगार इच्छुक युवक-युवती आणि रोजगार देणाऱ्या विविध आस्थापना  यांच्यामध्ये संवाद आणि समन्वय साधून उद्योग क्षेत्राला आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ आणि युवा वर्गाला रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ सुरू केली आहे. या योजनेत बारावी पास, आय.टी.आय., पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या युवकांना प्रशिक्षण अंती अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याबरोबरच त्यांना विद्यावेतन देखील मिळणार आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताला जगात अग्रेसर बनविण्यासाठी कौशल्य विकासाच्या  अनेक योजना सुरू केल्या आहेत. केंद्र शासनाने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पातही आगामी पाच वर्षात ४.१ कोटीहून अधिक युवकांना रोजगार आणि कौशल्यविकासाच्या संधी देशात निर्माण करण्यासाठी दोन लाख कोटी रूपयांची तरतूद केली गेली आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने प्रसिद्ध केलेल्या भारताच्या रोजगार २०२४ अहवालानुसार, भारत हा २०२६ पर्यंत सर्वाधिक तरुणांचा देश असेल. ग्रामीण व शहरी विकासातील दरी दूर करून प्रत्येकाला देण्यासाठी शासन तत्पर असून देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे.

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली,उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि ‘मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष’ यांच्यामार्फत संयुक्तपणे ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ राबवली जाणार आहे.रोजगार इच्छुक युवक-युवती आणि उद्योजक आणि रोजगार देणाऱ्या विविध आस्थापना यांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

         कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून अनेक निर्णय गेल्या दोन वर्षात घेण्यात आले आहेत. कायमस्वरूपी रोजगाराच्या संधी मिळून प्रत्येक हाताला काम देणारी व प्रत्येक कुटुंबाचा विकास हाच ध्यास पूर्णत्वास नेणारी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ ही महाराष्ट्र राज्याच्या विकासात योगदान देऊन आमुलाग्र बदल घडवेल आणि कुशल व रोजगारक्षम महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरेल, अशी मला आशा आहे

–  कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा

 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

या योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थीना १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ६ हजार रुपये, आयटीआय व पदविकाधारक विद्यार्थ्यांना ८ हजार तर पदवीधर, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना १० हजार रुपये विद्यावेतन दरमहा डीबीटी पद्धतीने येणार आहे.

या उपक्रमांर्तगत बारावी, आय.टी.आय.,पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवारांनी  व रोजगार देणा-या विविध आस्थापनांनी, उद्योजकांनीही कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.

योजनेचे निकष व पात्रता

योजनेकरिता उमेदवाराचे किमान वय १८ व कमाल ३५ वर्ष असावे.किमान शैक्षणिक पात्रता १२ वी पास, आयटीआय,पदविका,पदवी, पदव्युत्तर असावी. पुढील उच्च शिक्षण घेत असलेले उमेदवार या योजनेत पात्र असणार नाहीत. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे. उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा. योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थीना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे शासनामार्फत विद्यावेतन  दरमहा दिले जाईल. प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थीची दैनिक हजेरी संबंधित आस्थापना,उद्योग ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. या ऑनलाईन उपस्थितीच्या आधारे प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन प्रशिक्षणार्थीच्या थेट बँक (डीबीटी) ऑनलाईन पद्धतीने दरमहा अदा करण्यात येईल.

विद्यावेतनामध्ये सबंधित उद्योजकामार्फत जाहीर केलेली सुट्टी व अनुज्ञेय रजा याचा अंतर्भाव राहील. उद्योजक उमेदवारांना या विद्यावेतनाव्यतिरिक्त अधिकचे विद्यावेतन देऊ इच्छित असेल तर वाढीव रक्कम उमेदवारांना अतिरिक्त स्वरुपात देऊ शकेल. या योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून १० दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असला तर, सबंधित प्रशिक्षणार्थीस त्या महिन्याचे विद्यावेतन देण्यात येणार नाही. प्रशिक्षणार्थीने वरील अटींची पूर्तता केली असली परंतु सदर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणाच्या पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास असा प्रशिक्षणार्थी विद्यावेतनास पात्र राहणार नाही. या योजनेच्या दरम्यान प्रशिक्षणार्थीस कायम,नियमित स्वरूपाचा रोजगार अथवा स्वयंरोजगार प्राप्त झाल्यास अथवा प्रशिक्षण सोडून गेल्यास अथवा अनधिकृत गैरहजर राहिल्यास या योजनेंतर्गत प्रशिक्षण व त्या अनुषंगाने विद्यावेतन घेण्यासाठी पात्र राहणार नाही. या योजनेंतर्गत शिकाऊ उमेदवारी (NAPS /MAPS) पूर्ण केलेले व करीत असलेले उमेदवार पात्र राहणार नाहीत. एका उमेदवारास या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल.

राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० (NEP-२०२०) अंतर्गत नवीन अभ्यासक्रम आराखड्यांतर्गत एकूण ६ व्हर्टीकल्स पैकी ५ व्या आणि ६ व्या व्हर्टिकल्समध्ये कौशल्य आधारीत अभ्यासक्रम,ऑन जॉब ट्रेनिंग आणि ॲप्रेंटिसशिप या नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमाचाही समावेश करण्यात आला आहे. युवकांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण, सॉफ्टस्किल ट्रेनिंग, लाईफस्किल ट्रेनिंग, तांत्रिक प्रशिक्षण देऊन तरुणांची रोजगारक्षमता वाढविणे तसेच शिक्षण घेतांना कामाच्या ठिकाणी कामाशी संबंधित कार्यकौशल्य आत्मसात करणे या उद्देशाने ज्या अभ्यासक्रमात कमीत कमी ६ महिन्यांचा ऑन जॉब ट्रेनिंग किंवा ॲप्रेंटिसशिपचा समावेश आहे.अशा अभ्यासक्रमांतील विद्यार्थीदेखील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी पात्र ठरतील.

खाजगी व शासकीय आस्थापनांमध्ये रोजगाराच्या मिळणार संधी

लघु आणि मध्यम (SMEs) व मोठे उद्योग, स्टार्टअप्स, सहकारी संस्था, शासकीय, निमशासकीय आस्थापना,महामंडळ, सामाजिक संस्था (कंपनी कायदा, २०१३ मधील सेक्शन ८) आणि विविध आस्थापना इ. यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदवतील. किमान २० रोजगार देणाऱ्या आस्थापना या कार्य प्रशिक्षणासाठी सहभागी होण्यासाठी पात्र असतील. या आस्थापना व उद्योगामध्ये सध्याच्या मनुष्यबळावर आधारित सुमारे १० लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील.

विविध खाजगी व शासकीय आस्थापनासाठी निकष

आस्थापना व उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा.आस्थापना,उद्योगाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी. आस्थापना, उद्योगाची स्थापना किमान ३ वर्ष पूर्वीची असावी.कार्य प्रशिक्षणाचा कालावधी ६ महिने असून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र देण्यात येईल.या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार सबंधित उद्योग,आस्थापना यांना योग्य वाटल्यास व उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्यादृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील. योजनेंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना किमान वेतन कायदा,राज्य कामगार विमा कायदा,कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा,कामगार नुकसान भरपाई कायदा व औद्योगिक विवाद कायदा लागू राहणार नाही.या योजनेंतर्गत खाजगी क्षेत्रातील आस्थापना,उद्योजकाकडे एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या १० टक्के व सेवा क्षेत्रासाठी २० टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणसाठी घेता येतील. केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय,निमशासकीय या आस्थापना,उद्योग,महामंडळ यामध्ये मंजूर पदाच्या ५ टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील.

या योजनेसाठी ‘राज्यस्तरीय सनियंत्रण समिती’ व जिल्हास्तरावर ‘कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समिती’ या योजनेचा वेळोवेळी आढावा घेवून योजनेसबंधित स्थानिक स्तरावरील समस्यांचे निराकरण केले जाईल. जिल्हास्तरावर सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता हे या योजनेचे अंमलबजावणी अधिकारी असतील.

 

– निधी चौधरी,

आयुक्त, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग

0000

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना विधान भवनात आदरांजली

मुंबई, दि.1 : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र विधानमडळ सचिवालयाचे सचिव (1) (कार्यभार) जितेंद्र भोळे यांनी विधान भवनातील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.

यावेळी महाराष्ट्र विधानमंडळ सचिव (2) (कार्यभार) विलास आठवले, उपसचिव राजेश तारवी, अवर सचिव विजय कोमटवार, मोहन काकड व महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे मुख्य सुरक्षा अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही लोकमान्य टिळक यांच्या अर्धाकृती पुतळयास गुलाबपुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

००००

क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्याकडून नेमबाज स्वप्नील कुसाळेचे अभिनंदन

मुंबई, दि. १ :- पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील नेमबाज स्वप्नील कुसाळे यांनी अचूक वेध घेत कांस्य पदकाला गवसणी घातली आहे. त्याने ऑलिम्पिक स्पर्धेत मिळवलेल्या या उतुंग यशाबद्दल क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी त्याचे अभिनंदन केले आहे

मंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत इतिहास रचला आहे. त्याने या स्पर्धेत भारताला तिसरे पदक मिळवून दिले आहे. स्वप्नीलने ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात आज चमकदार कामगिरी करत कांस्यपदक मिळवलं आहे. भारतासाठी स्वप्नीलने 50 मीटर रायफल थ्री पोजिशन प्रकारात पदक जिंकणारा एकमेव खेळाडू हा बहुमान मिळवला आहे. राज्य शासनाने स्वप्नीलसह ऑलिम्पिक स्पर्धेसाठी राज्यातील सर्व खेळाडूंना सरावासाठी 50 लाख रूपये दिले होते.

000000

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची तांत्रिक पडताळणी सुरू; पात्र महिलांच्या बँक खात्यात एक रुपयाच जमा होईल अशा अफवांवर विश्वास ठेवू नये – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

          मुंबई, दि. १ : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला’ राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा लाभ देण्यासाठी तांत्रिक पडताळणी सुरू करण्यात आली आहे. या तांत्रिक पडताळणीसाठी काही  पात्र महिलेच्या बँक खात्यात एक रुपया जमा होईल. जमा होणारा हा एक रुपया लाभार्थ्यांचा सन्मान निधीचा लाभ नाही तर तांत्रिक पडताळणीचा एक भाग आहे असे सांगून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.

मंत्री तटकरे म्हणाल्या की, “या योजनेद्वारे अर्ज सादर केलेल्या निवडक पात्र महिला अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यात येत आहे. त्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक महिलांच्या  बँक खात्यात प्रत्येकी एक रुपया जमा करण्यात येत आहे.

ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी निश्चितपणे मदत होणार आहे. हा एक तांत्रिक प्रक्रियेचा भाग असून याबद्दल कुठलाही प्रक्रियेचा गैरसमज किंवा कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका “असेही मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

राज्यात १ कोटी ६५ लाख ७० हजार ४३७ पीकविमा अर्ज दाखल; लाखो शेतकऱ्यांनी एक रुपयात भरला आपला पीकविमा  – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई, दि. 1 : खरीप हंगाम 2024 साठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत पिकांचा विमा भरण्याची अंतिम मुदत बुधवार 31 जुलै रोजी संपुष्टात आली असून 31 जुलै अखेर राज्यातून 1 कोटी 65 लाख 70 हजार 437 पीक विमा अर्ज पीक विमा पोर्टलवर दाखल झाले आहेत. याद्वारे लाखो शेतकऱ्यांनी पीक 1 रुपया विमा हप्ता भरून पीक संरक्षित केले असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा पोर्टलच्या वतीने सुरुवातीला 15 जुलै ही अंतिम मुदत देण्यात आली होती, मात्र, श्री. मुंडे यांनी केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांना विनंती करून 31 जुलै पर्यंत मुदतवाढ करून घेतली होती. 15 जुलै नंतर अखेरपर्यंत 21 लाख 90 हजार अर्जांची त्यामुळे वाढ झाली आहे.

दरम्यान, राज्यात एकूण 97 टक्के पेरणी पूर्ण झाली असून पीकविमा योजनेच्या माध्यमातून एकूण 1 कोटी 10 लाख 55 हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले आहे. एकूण विमा संरक्षित रक्कम ही 53 हजार 886 कोटी इतकी आहे.

एकूण विमा हप्ता हा सुमारे 7959 कोटी इतका निश्चित असून, त्यापैकी शेतकरी हिस्सा एक रुपया प्रमाणे 1 कोटी 65 लाख, राज्य हिस्सा एकूण 4725 कोटी, त्यामध्ये राज्य शासनाचा स्वतःचा हिस्सा 3232 कोटी व शेतकऱ्यांच्या वतीने राज्य शासनाने भरावयाचा हिस्सा 1492 कोटी इतका निश्चित करण्यात आला असून केंद्र सरकारचा हिस्सा 3233 कोटी इतका निश्चित करण्यात आला आहे.

मागील वर्षीच्या खरीप हंगामामध्ये सुमारे 1 कोटी 71 लाख विमा अर्ज दाखल झाले होते तर संपूर्ण हंगामात वेगवेगळ्या प्रकारचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी आतापर्यंत 7280 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी 4271 कोटी पीक विम्याचे वाटप पूर्ण झाले असून आणखी 3009 कोटी रुपयांचे वितरण सध्या सुरू असून अंतिम पीक कापणी अहवालाचे काम 100 टक्के पूर्ण झाल्यानंतर या रकमेत आणखी वाढ होणार असल्याचेही मंत्री श्री. मुंडे यांनी म्हटले आहे.

00000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

ताज्या बातम्या

प्रगत, संपन्न महाराष्ट्र साकारण्यासाठी कटिबद्ध होऊया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ३० : - महाराष्ट्र देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असून, आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून, सहकार्यातून आणखी प्रगत, संपन्न महाराष्ट्र साकारण्यासाठी कटिबद्ध होऊया, असे...

एमएचटी-सीईटी २०२५ पीसीएम गटाच्या परीक्षेत तांत्रिक त्रुटी; ५ मे रोजी फेर परीक्षा 

0
मुंबई, दि. ३० : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून दि.२७ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी २०२५ (पीसीएम गट) सामाईक प्रवेश परीक्षेच्या सकाळच्या सत्रामध्ये...

जातनिहाय जनगणनेचा निर्णय क्रांतिकारी ठरेल – मंत्री अतुल सावे

0
मुंबई, ‍‍दि. ३० : केंद्र सरकारने घेतलेला जातनिहाय जनगणनेचा निर्णय हा ओबीसी व वंचित घटकांच्या दृष्टीने क्रांतिकारी ठरेल, असे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे...

अल्पसंख्यांक विभागांतर्गत योजनांच्या कामाचा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून आढावा 

0
मुंबई, दि. ३० : अल्पसंख्यांक विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या कामकाजाच्या अल्पसंख्यांक राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मंत्रालयात आढावा घेतला. राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, मौलाना...

भारताला जागतिक सर्जनशीलतेचे केंद्र बनवणारा ऐतिहासिक ‘वेव्हज्-२०२५’ महोत्सव

0
भारताची सांस्कृतिक शक्ती आणि तंत्रज्ञानाची जादू एकाच व्यासपीठावर WAVES 2025 मध्ये सामील व्हा आणि जागतिक क्रिएटिव्ह क्रांतीचे साक्षीदार व्हा... १९ जानेवारी २०१९ रोजी मुंबईतील नॅशनल म्युझियम ऑफ...