गुरूवार, मे 1, 2025
Home Blog Page 489

राज्यात १ कोटी ६५ लाख ७० हजार ४३७ पीकविमा अर्ज दाखल; लाखो शेतकऱ्यांनी एक रुपयात भरला आपला पीकविमा  – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई, दि. 1 : खरीप हंगाम 2024 साठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत पिकांचा विमा भरण्याची अंतिम मुदत बुधवार 31 जुलै रोजी संपुष्टात आली असून 31 जुलै अखेर राज्यातून 1 कोटी 65 लाख 70 हजार 437 पीक विमा अर्ज पीक विमा पोर्टलवर दाखल झाले आहेत. याद्वारे लाखो शेतकऱ्यांनी पीक 1 रुपया विमा हप्ता भरून पीक संरक्षित केले असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा पोर्टलच्या वतीने सुरुवातीला 15 जुलै ही अंतिम मुदत देण्यात आली होती, मात्र, श्री. मुंडे यांनी केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांना विनंती करून 31 जुलै पर्यंत मुदतवाढ करून घेतली होती. 15 जुलै नंतर अखेरपर्यंत 21 लाख 90 हजार अर्जांची त्यामुळे वाढ झाली आहे.

दरम्यान, राज्यात एकूण 97 टक्के पेरणी पूर्ण झाली असून पीकविमा योजनेच्या माध्यमातून एकूण 1 कोटी 10 लाख 55 हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले आहे. एकूण विमा संरक्षित रक्कम ही 53 हजार 886 कोटी इतकी आहे.

एकूण विमा हप्ता हा सुमारे 7959 कोटी इतका निश्चित असून, त्यापैकी शेतकरी हिस्सा एक रुपया प्रमाणे 1 कोटी 65 लाख, राज्य हिस्सा एकूण 4725 कोटी, त्यामध्ये राज्य शासनाचा स्वतःचा हिस्सा 3232 कोटी व शेतकऱ्यांच्या वतीने राज्य शासनाने भरावयाचा हिस्सा 1492 कोटी इतका निश्चित करण्यात आला असून केंद्र सरकारचा हिस्सा 3233 कोटी इतका निश्चित करण्यात आला आहे.

मागील वर्षीच्या खरीप हंगामामध्ये सुमारे 1 कोटी 71 लाख विमा अर्ज दाखल झाले होते तर संपूर्ण हंगामात वेगवेगळ्या प्रकारचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी आतापर्यंत 7280 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी 4271 कोटी पीक विम्याचे वाटप पूर्ण झाले असून आणखी 3009 कोटी रुपयांचे वितरण सध्या सुरू असून अंतिम पीक कापणी अहवालाचे काम 100 टक्के पूर्ण झाल्यानंतर या रकमेत आणखी वाढ होणार असल्याचेही मंत्री श्री. मुंडे यांनी म्हटले आहे.

00000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविणाऱ्या महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळे याचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

मुंबई, दि. १ :- पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात देशाला कांस्यपदक जिंकून देणारा महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळे याचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. कोल्हापूरच्या मातीतल्या या सुपुत्राने महाराष्ट्राचा गौरव वाढवला असून राज्याच्या क्रीडाक्षेत्राला नवं चैतन्य, ऊर्जा दिली आहे, अशा शब्दात त्यांनी स्वप्नील कुसाळे याचे अभिनंदन केले आहे. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्यानंतर तब्बल ७२ वर्षांनी महाराष्ट्रीयन खेळाडूला मिळालेल्या वैयक्तिक पदकाचा आनंद अवर्णनीय आहे, असेही ते म्हणाले.

स्वप्नील कुसाळेचे अभिनंदन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत आज स्वप्नील कुसाळे या खेळाडूने एकण ४५१.४ गुण प्राप्त करत कांस्य पदक मिळवलं आहे. कोल्हापूरजवळच्या कांबळवाडी गावातील स्वप्नीलने भारताला पॅरिस ऑलिंपिकमध्ये आज तिसरं पदक मिळवून दिल्याचा महाराष्ट्रासह देशाला अभिमान वाटत आहे. इयत्ता सातवीत असताना त्याची क्रीडा प्रबोधिनीसाठी निवड झाली होती. भोसला मिलिटरी स्कूलमध्येही त्याने सराव सुरु ठेवला होता. प्रचंड इच्छाशक्ती, जिद्द, चिकाटी आणि क्रीडा प्रबोधिनीतील प्रशिक्षणाच्या जोरावर त्याने ऐतिहासिक कामगिरी करून आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा गौरव वाढविला आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये स्वप्नील कुसाळे याने वर्ष २०१२ पासून भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. सुमारे १२ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर त्याने ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करून उल्लेखनीय कामगिरी करून दाखविली आहे. आपल्या अतुलनीय कामगिरीने देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या स्वप्नीलबद्दल महाराष्ट्रवासियांना अभिमान आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचून नेत्रदीपक कामगिरी केलेल्या स्वप्नीलने यापूर्वी २०२२ मध्ये एशियन गेम्समध्ये सांघिक सुवर्णपदक मिळवले होते. आज त्याने ऐतिहासिक कामगिरी करून आपल्या आई-वडिलांसह समस्त कोल्हापूर आणि महाराष्ट्रीय नागरिकांची शान वाढविली आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले आहेत.

———-०००००——–

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नेमबाज स्वप्नील कुसाळेचे अभिनंदन

मुंबई, दि. १ : – पॅरीस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत कांस्यपदकाचा वेध घेणारा स्वप्नील कुसाळे महाराष्ट्राचा अभिमान आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलचे अभिनंदन केले आहे. कोल्हापुरच्या नेमबाज स्वप्नील कुसाळे याने नेमबाजीत ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्य पदक पटकावले आहे.

मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, स्वप्नीलमुळे कुस्तीमध्ये भारतासाठी वैयक्तिक असे पहिले पदक पटकावणाऱ्या खाशाबा जाधव यांचे स्मरण झाले. तब्बल ७२ वर्षांनी स्वप्नीलने महाराष्ट्रासाठी या पदकाचा वेध घेऊन, तशाच पद्धतीचा आनंद आणि उत्साह राज्यातील क्रीडा क्षेत्रासाठी निर्माण केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात नेमबाजीची एक मोठी परंपरा आहे. ही परंपरा स्वप्नीलने कायम राखली आहे. कांबळवाडी सारख्या ग्रामीण भागातून येऊन स्वप्नीलने आपले राज्य आणि देशाचे नाव आंतरराष्ट्रीयस्तरावर झळकवले आहे. देशासाठी वैयक्तिक पदकाची कमाई करताना, स्वप्नीलने महाराष्ट्राचा क्रीडा क्षेत्रातील गौरव वाढवला आहे. स्वप्नीलच्या या यशात त्यांचे कुटुंबिय, प्रशिक्षक, मार्गदर्शक यांचे मोलाचे योगदान आहे, या सर्वांचे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्यावतीने अभिनंदन, असे नमूद करून मुख्यमंत्र्यानी यापुढेही स्वप्नीलच्या वाटचालीसाठी आवश्यक असे सर्व ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली आहे. तसेच त्याला स्पर्धेतील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

०००००

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे विधानभवन येथे छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

मुंबई, दि. १ : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज विधानभवन येथे भेट देऊन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती असल्याने विधानभवनातील लोकमान्य टिळक यांच्या अर्धाकृती पुतळ्यास तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या  प्रतिमेस राज्यपाल यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सचिव (१) कार्यभार  जितेंद्र भोळे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

मुंबई, दि. १ : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चेंबूर येथील स्मारकास भेट देऊन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक कृती समितीचे पदाधिकारी, प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

हेमंत चव्हाण/विसंअ/

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई, दि. १ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक पुढील १० दिवसांत सुरळीत न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई, दि. १ :- मुंबई-नाशिक महामार्गावरील भुयारी मार्ग, उड्डाणपूल यांसारख्या कामांसह रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीच्या त्रासातून नागरिकांची मुक्तता करण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना युद्धपातळीवर राबवाव्यात. त्यासाठी लागणारी सर्व प्रकारची मदत राज्य शासनामार्फत करण्यात येईल. मात्र, पुढील १० दिवसांत या महामार्गावरील वाहतूक सुरळीत न झाल्यास जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिवांना आज दिले.

मुंबई-नाशिक महामार्गाच्या सुधारणेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठक घेण्यात आली. बैठकीस अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आमदार रईस शेख, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, सचिव (बांधकामे) संजय दशपुते, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रादेशिक अधिकारी अंशुमली श्रीवास्तव, ठाण्याच्या महामार्ग सुरक्षा विभागाचे पोलीस अधीक्षक मनोहर दहीकर आदी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, आमदार देवयानी फरांदे, दिलीप बनकर, हिरामन खोसकर यांच्यासह संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मुंबई-नाशिक महामार्ग हा उत्तर महाराष्ट्राला राज्याच्या राजधानीशी जोडणारा महत्त्वाचा व प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते. सध्या या महामार्गावर आसनगाव, वाशिंद यासह इतर काही ठिकाणी उड्डाणपुलांची कामे सुरु आहेत. त्यातच पावसामुळे महामार्गावर खड्डे पडले आहेत. त्याचा वाहनधारकांना प्रचंड त्रास होत असून नाशिक ते मुंबई दरम्यानच्या प्रवासाचा वेळही ८ ते १० तासांवर पोहोचला आहे. तीन तासांच्या अंतरासाठी प्रवाशांना दुप्पटीपेक्षा जास्त वेळ लागत आहे, तसेच त्यांना आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे, ही बाब अतिशय गंभीर असून या महामार्गाची दुरुस्ती युद्धपातळीवर करणे आवश्यक आहे. महामार्गावरील खड्डे वेळीच बुजविल्यास वाहनांचा वेग वाढून वेळेची बचत होऊ शकते. मात्र, या महामार्गाच्या कंत्राटदाराकडून त्यात कुचराई झाल्याचे पहायला मिळत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी संयुक्त पाहणी करून खड्ड्यांसह नादुरुस्त रस्त्यांचे ड्रोनद्वारे व्हिडिओ तयार करावेत. त्यानंतर जोपर्यंत खड्डे बुजवले जात नाहीत, महामार्गाची डागडुजी केली जात नाही, तोपर्यंत या महामार्गावरील टोल वसुली थांबविण्यासाठीचा प्रस्ताव देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, मागील काही वर्षांपासून मुंबई-नाशिक महामार्गावर दर्जोन्नती, रुंदीकरण, उड्डाणपूल, भुयारी मार्ग अशी विविध कामे सुरु आहेत. महामार्गावर पावसाळ्यात खड्डे पडत असून ते वेळीच बुजवले जात नाहीत. काम सुरु असणाऱ्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या बाह्यवळण रस्त्यांचा दर्जा, त्यावरील खड्डे, वाहतूक नियंत्रणातील त्रुटींवर तोडगा काढणे आवश्यक आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना राबविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे समन्वयाची जबाबदारी देण्यात येत आहे. त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलीस, भिवंडी, कल्याण व नाशिक महापालिका आयुक्त अशा संबंधित यंत्रणांचे समन्वयन करून पुढील १० दिवसांत उपाययोजना राबवाव्यात. संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींसोबत वाहतूक कोंडीच्या ठिकाणांची पाहणी करून एकात्मिक वाहतूक आराखडा तयार करावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

मुंबई-नाशिक महामार्गावर तातडीने करावयाच्या उपाययोजनांबाबत सूचना करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, बहुतांश वेळा वाहतूक कोंडीत वाहने खराब झाल्यामुळे पाठीमागच्या बाजूला वाहनांच्या रांगा लागतात. खराब झालेले वाहन तातडीने दूर करणे आवश्यक असते. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या ४० टनाच्या क्रेन्स वाहतूक पोलिसांनी उपलब्ध करून घ्याव्यात. त्यासाठी एनएचएआय आणि एमएसआरडीसीने वाहतूक पोलिसांना निधी उपलब्ध करून द्यावा. गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडीच्या ठिकाणी ड्रोनद्वारे नियंत्रण ठेवून आवश्यक उपाययोजना कराव्यात. कार्यक्षम वाहूतक व्यवस्थेसाठी या महामार्गावरील रहदारीची नियमितपणे ड्रोनद्वारे पाहणी करावी. वाहतूक नियंत्रणासाठी होमगार्डची मदत घेण्यात यावी. एमएसआरडीसीने वाहतूक पोलिसांना उपलब्ध करून दिलेल्या वॉर्डन यांना गणवेश द्यावा. त्यासाठी लागणारा निधी नियोजन समितीतून दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ज्याठिकाणी उड्डाणपूल, भुयारी मार्गाची कामे सुरु आहेत, त्याठिकाणची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळित होत असल्याचे पाहायला मिळते. यावर उपाययोजना करण्यासाठी यापुढे कामांच्या ठिकाणी काँक्रिटीकरण असलेला पर्यायी रस्ता उपलब्ध करुन दिल्याशिवाय नवीन कामांना परवानगी देण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे आधीच्या रस्त्याच्या उंचीच्या समप्रमाणात पर्यायी रस्ते तयार केले गेले पाहिजेत. अशा प्रकारच्या अटींची पूर्तता करणे बंधनकारक करूनच महामार्गावरील कामांना परवानगी द्यावी, अशा सूचनाही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास केल्या.

साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

RAJU DONGRE Mantralay Mumbai

मुंबई, दि. १ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  मंत्रालयात पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

RAJU DONGRE Mantralay Mumbai

सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव गोविंद पवार, कक्ष अधिकारी संभाजी जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे  सहायक कक्ष अधिकारी विजय शिंदे यांनीही अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

00000

प्रवीण  भुरके /विसंअ

राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) पदी प्रथमच महिला अधिकारी शोमिता विश्वास यांच्याकडे जबाबदारी सुपूर्द

मुंबई, दि. ३१: महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) या पदाचा अतिरीक्त कार्यभार आज (दिनांक ३१ जुलै २०२४) रोजी श्रीमती शोमीता विश्वास, भा.व. से. यांनी मावळते प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) शैलेश टेंभूर्णीकर यांचेकडून नागपूर येथे स्वीकारला. श्रीमती शोमीता बिश्वास (भावसे) या 1988 च्या बॅचच्या महाराष्ट्र राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या भारतीय वनसेवेतील वरिष्ठ अधिकारी आहेत. प्रधान मुख्य वनसंरक्षक पदी नियुक्ती होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. याबद्दल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी श्रीमती विश्वास यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्याच्या मुख्य सचिव, पोलिस महासंचालक या पदांपाठोपाठ आता वन विभागाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक पदी महिला अधिकारी यांची नियुक्ती झाली आहे, ही गौरवाची बाब असल्याचे ते म्हणाले.

प्रधान मुख्य वनसंरक्षक वनबल प्रमुख या पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी श्रीमती विश्वास यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महा कॅम्पा, महाराष्ट्र राज्य नागपूर या पदावर काम केले आहे. राज्य आणि केंद्राशी कार्यक्षमतेने समन्वय साधत त्यांनी कॅम्पा योजना राज्यात अत्यंत प्रभावीपणे राबविलेली आहे.

याशिवाय त्यांनी केंद्र सरकारमध्ये विविध वरिष्ठ पदावर अत्यंत महत्त्वाचे काम केलेले आहे. त्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष मंत्रालय दिल्ली, सहसचिव कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार, दिल्ली या महत्त्वाच्या पदांचा समावेश होतो. राज्य व केंद्रीय स्तरावरती अत्यंत महत्त्वाच्या विविध पदांवरती काम केल्याने श्रीमती शोमीता बिश्वास यांना प्रशासन सक्षमतेने चालवण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे.

प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) श्री. टेंभुर्णीकर आज सेवानिवृत्त झाले. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता,  प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थान) श्रीनिवास राव, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प नियोजन व विकास) कल्याणकुमार, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा केंद्रस्थ अधिकारी नरेश झुरमुरे यांच्यासह भारतीय वनसेवा व महाराष्ट्र वनसेवेचे सर्व वरिष्ठ वनअधिकारी व कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000

दीपक चव्हाण/विसंअ

ताज्या बातम्या

भारताच्या निरंतर विकासामध्ये महाराष्ट्राची सर्वात महत्त्वाची भूमिका – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा मुंबई, दि. ०१: महाराष्ट्राकडे भारतातील सर्वात पुरोगामी आणि प्रगतिशील राज्य म्हणून पाहिले जाते. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब...

प्रगत, संपन्न महाराष्ट्र साकारण्यासाठी कटिबद्ध होऊया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ३० : - महाराष्ट्र देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असून, आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून, सहकार्यातून आणखी प्रगत, संपन्न महाराष्ट्र साकारण्यासाठी कटिबद्ध होऊया, असे...

एमएचटी-सीईटी २०२५ पीसीएम गटाच्या परीक्षेत तांत्रिक त्रुटी; ५ मे रोजी फेर परीक्षा 

0
मुंबई, दि. ३० : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून दि.२७ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी २०२५ (पीसीएम गट) सामाईक प्रवेश परीक्षेच्या सकाळच्या सत्रामध्ये...

जातनिहाय जनगणनेचा निर्णय क्रांतिकारी ठरेल – मंत्री अतुल सावे

0
मुंबई, ‍‍दि. ३० : केंद्र सरकारने घेतलेला जातनिहाय जनगणनेचा निर्णय हा ओबीसी व वंचित घटकांच्या दृष्टीने क्रांतिकारी ठरेल, असे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे...

अल्पसंख्यांक विभागांतर्गत योजनांच्या कामाचा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून आढावा 

0
मुंबई, दि. ३० : अल्पसंख्यांक विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या कामकाजाच्या अल्पसंख्यांक राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मंत्रालयात आढावा घेतला. राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, मौलाना...