Monday, December 23, 2024
Home Blog Page 5

पुरवणी मागण्यांवरील मुद्यांना मंत्र्यांच्या माध्यमातून लेखी उत्तर देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार 

मुंबई, दि. १९: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्ग प्रकल्पाकरीता राज्य रस्ते विकास महामंडळास भागभांडवल, राज्यातील रस्ते, पुल आदी पायाभूत सुविधांचा विकास, मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजना, प्रधानमंत्री पीकविमा योजना, लघु, मध्यम, उद्योग घटकांना, विशाल प्रकल्पांना प्रोत्साहन योजना, दुध अनुदान योजना, केंद्र सरकारचे अनुदान असलेल्या विकास योजना, प्रकल्पांसाठी राज्याचा हिस्सा आदी खर्चासाठी आवश्यक असलेल्या सार्वजनिक बांधकाम, कृषी व पदुम, उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या 2024-25 वर्षाच्या पुरवणी मागण्यांना आज विधानसभेत मंजूरी देण्यात आली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देतांना सांगितले की, संबंधित विभागांच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेत पन्नास सदस्यांनी सहभाग घेतला. या सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना संबंधित मंत्र्यांच्या माध्यमातून लेखी उत्तरे दिली जातील. सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांची शहानिशा करुन त्यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 7 हजार 490 कोटी 24 लाख रुपये, कृषी व पदुम विभागाच्या 2 हजार 147 कोटी 41 लाख रुपये, उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या 4 हजार 112 कोटी 79 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्यांना आज मंजूरी देण्यात आली.

०००

 

मुंबई उपनगर जिल्ह्यात २४ डिसेंबरपर्यंत सुशासन सप्ताह – जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर

मुंबई दि. १९: शासकीय कार्यालयात असलेल्या प्रलंबित तक्रारींचे निवारण युद्ध पातळीवर करण्यासाठी आजपासून (19) मुंबई उपनगर जिल्ह्यात सुशासन सप्ताहास प्रारंभ झाला झाला. दि.24 डिसेंबर 2024 सप्ताह राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर  यांनी दिली आहे. या अंतर्गत जिल्ह्यात ‘प्रशासन गाव की ओर’ हे अभियान राबविण्यात येणार आहे.

प्रशासनिक सुधार एवं लोक शिकायत विभाग कार्मिक, लोक शिकायत और पेंशन मंत्रालय  यांच्या निर्देशानुसार हा सप्ताह राबविण्यात येत आहे.

या अभियानात विविध शासकीय कार्यालयात प्रलंबित विविध तक्रारीचे निवारण युद्ध पातळीवर करण्यात येणार आहे. तसेच विविध सेवा पुरविणेबाबत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. अभियानात सहभागी होण्यासाठी नागरिकांना आपले सरकार पोर्टल, CPGRAMS इ. ठिकाणी तक्रारी नोंदविता येतील. या व्यतिरिक्त महाऑनलाईन पोर्टलवर विविध सेवासाठी अर्ज करता येईल. तसेच आयोजित विशेष शिबिरामध्ये अर्ज दाखल करता येतील.

या अभियानातंर्गत दाखल तक्रारी अथवा अर्ज यावर प्रथम प्राधान्याने कार्यवाही करण्यात येईल. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानात सहभाग नोंदवावा व आपली गाऱ्हाणी व विविध सेवासाठींचे अर्ज दाखल करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी केले आहे.

‘जीएसटी’ परिषदेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणार; कर संकलनात सुसूत्रता, पारदर्शकता आणणार – उप‍मुख्यमंत्री अजित पवार

नागपूर, दि. १९ : आपल्या देशाने ‘एक देश एक कर’ ही संकल्पना स्वीकारली आहे, त्याच माध्यमातून ‘जीएसटी’ करप्रणाली विकसित करण्यात आली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने अनेक सवलती, अनुदानाच्या योजना राबविण्यात येत आहेत. जीवनावश्यक वस्तूंसह कृषीक्षेत्राशी निगडीत खते, बी-बियाणे, औषधांवरील ‘जीएसटी’तून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘जीएसटी’ परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत ‘जीएसटी’च्या अनुषंगाने सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली. राज्यातल्या ‘जीएसटी’ कर संकलनात अधिक सुसूत्रता, पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, देशातल्या एकूण कर संकलनापैकी 16 टक्के करसंकलन एकट्या महाराष्ट्रातून होते. देशांतर्गत एकूण कर संकलनात महाराष्ट्राचा वाटा सर्वात मोठा आहे. यामुळे राज्यातल्या ‘जीएसटी’ करप्रणालीत अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील. राज्याच्या सीमेलगतच्या भागातून होणारी कर चुकवेगिरीचे प्रकार थांबविण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येईल.

महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम 2002 (सुधारणा) विधेयक, 2024’ मंजूर

‘महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम 2002 (सुधारणा) विधेयक, 2024’ आज विधानपरिषदेत मंजूर करण्यात आले. या विधेयकाच्या माध्यमातून राज्य शासनाचा महसूल वाढवण्यार भर देण्यात आला आहे. या विधेयकानुसार सध्याच्या महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम, 2002 मधील कलम 37 नुसार वसुलीबाबत राज्याचा प्रथम भार विशिष्ट शर्तीच्या अधीन राहून होता. या विधेयकांच्या सुधारणेनुसार महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम, 2002 अंतर्गत विनाशर्त प्रथम भार स्थापित झाल्यानंतर जलद गतीने वसुली करणे शक्य होणार आहे.

तेल कंपन्यांकडून पेट्रोल व डिझेल खरेदी करुन व्यापारी खोल समुद्रात उभ्या असलेल्या बोटींना बॅरेलद्वारे पुरवठा करतात. हा पुरवठा अन्य पेट्रोलपंपाद्वारे केल्या जाणाऱ्या पुरवठ्याप्रमाणे गृहीत धरुन कर भरणा करण्यापासून व्यापारी सूट घेतात. या सुधारणेमुळे किरकोळ विक्री केंद्राची व्याख्या आणि किरकोळ विक्रीचे स्पष्टीकरण कायद्यात समाविष्ट होऊन कर चुकवेगिरीला रोखणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर या कायद्यातल्या कलम 2 (24) (पाच) या कलमामध्ये सुयोग्य स्पष्टीकरणाचा समावेश केल्यामुळे, एखाद्या संस्थेने किंवा क्लबने स्वतःच्या सदस्यांना केलेल्या विक्रीवर कर आकारणी शक्य होणार आहे.

०००

 

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पुनर्नामकरणाचा विधानसभेत ठराव

नागपूर, दि. १९: पुणे येथील लोहगाव विमानतळाचे ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’, पुणे असे पुनर्नामकरण करण्याबाबत शासकीय ठराव विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडला.

महाराष्ट्र विधानसभा नियम 110 अनुसार लोहगाव विमानतळ, पुणे येथील विमानतळाचे ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’, पुणे असे पुनर्नामकरण करण्याची शिफारस केंद्र सरकारला करण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.

०००

कांद्यावरील २० टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करावे

मुंबई, दि. १९: केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले 20 टक्के शुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार व उद्योगमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून केली आहे.

श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयातशुल्क 20 टक्क्यांनी कमी करुन अधिकाधिक कांदा आयातीचे प्रयत्न सुरु केले असल्याने नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचा लाल कांदा श्रीलंकेसह परदेशांमध्ये निर्यात करता यावा, कांद्याला खर्चावर आधारीत चांगला दर मिळावा यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करणे आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केंद्रीय मंत्री श्री. गोयल यांना  लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

राज्यातील आमदार सर्वश्री नितीन पवार, दिलीपराव बनकर, हिरामण खोसकर, सरोज अहिरे आदी लोकप्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून याप्रश्नी लक्ष घालून तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली होती. या लोकप्रतिनिधींच्या मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केंद्रीय व्यापार मंत्री श्री. गोयल यांना पत्र लिहून कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे.

केंद्रीय मंत्री श्री. गोयल यांना लिहिलेल्या पत्रात उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणतात की, राज्यात विशेष करुन नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. या शेतकऱ्यांकडून परदेशात मोठ्या प्रमाणावर कांदा निर्यात केली जाते. आजमितीस उन्हाळी कांदा संपला असून नवीन लाल कांदा मोठ्या प्रमाणावर बाजारात विक्रीसाठी आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक संकटाशी लढत कांद्याचे उत्पादन घेतले आहे. अवेळी पाऊस व बदलत्या हवामानानुसार त्यांच्या कांद्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उर्वरीत चांगल्या कांद्यास खर्चावर आधारीत चांगला भाव मिळणे गरजेचे असतांना बाजारभावात दिवसेंदिवस घसरण होत आहे. सद्यस्थितीत राज्यातील लाल कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 2400 रुपये अत्यल्प दर मिळत आहे. लाल कांदा टिकाऊ नसल्याने शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना तात्काळ विक्री करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळण्यासाठी राज्यात उत्पादित लाल कांद्याची परदेशात जास्तीत जास्त निर्यात होणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र सरकारने 20 टक्के निर्यात शुल्क हटविणे गरजेचे आहे. जेणेकरून लांल कांद्याचे दर टिकून राहतील व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारीत चांगले दर मिळतील,  असे पत्रात स्पष्ट केले आहे.

०००

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पुनर्नामकरणाचा विधानपरिषदेत ठराव

नागपूर, दि. १९: पुणे येथील लोहगाव विमानतळाचे ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’, पुणे असे पुनर्नामकरण करण्याबाबत शासकीय ठराव विधानपरिषदेत मंत्री शंभूराज देसाई यांनी मांडला.

या ठरावाच्या माध्यमातून महाराष्ट्र विधान परिषद नियम 106 अनुसार लोहगाव विमानतळ, पुणे येथील विमानतळाचे ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’, पुणे असे पुनर्नामकरण करण्याची शिफारस केंद्र सरकारला करण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.

०००

सभागृहाच्या माध्यमातून लोककल्याणासाठी योगदान देण्याचा मानस -विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

नागपूर, दि. १९ : विधीमंडळाचे वरिष्ठ सभागृह म्हणून विधानपरिषदेला वेगळी परंपरा आहे. या वरिष्ठ सभागृहाच्या माध्यमातून लोककल्याणासाठी योगदान देण्याचा मानस आहे. सभागृह कामकाजाचा प्रत्येक क्षण आणि क्षण लोकहितासाठी खर्ची पडेल असे जबाबदारीपूर्ण वर्तन आपले राहिल, अशी काळजी घेऊया, अशा शब्दांत विधानपरिषदेचे नवनियुक्त सभापती प्रा. राम शिंदे यांनी भावना व्यक्त केल्या.

विधानपरिषद सदस्य प्रा. राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी एकमताने निवड झाल्यानंतर अभिनंदनपर प्रस्तावावर प्रा. शिंदे बोलत होते. यावेळी सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सभागृह नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मंत्री पंकजा मुंडे, सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकर, अशोक ऊर्फ भाई जगताप, शशिकांत शिंदे, ॲड. अनिल परब यांनी निवडीवर भावना व्यक्त केल्या.

सभापती प्रा. शिंदे म्हणाले की, जनतेच्या अपेक्षांना मूर्त स्वरूप देण्यासाठी सभागृह कामकाजाचा प्रत्येक क्षण आणि क्षण उपयोगात आणायचा आहे. सत्ताधारी आणि विरोधी ही संसदीय लोकशाहीच्या रथाची दोन चाके आहेत आणि त्या रथात जनताजनार्दनाची अभिव्यक्ती विराजमान आहे. या रथाला विकासाच्या दिशेने घेऊन जाऊ. सदस्यांचा सभागृह कामकाजातील सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. सभागृहात बसलेले असताना समाजाचा कुठला प्रश्न नेमक्या आयुधामार्फत मांडून आपण जनतेला न्याय देऊ शकू यादृष्टीने सतत तयारी केली पाहिजे. आपले सभागृह ज्येष्ठांचे सभागृह किंवा वरिष्ठ सभागृह म्हणून ओळखले जाते मात्र अलिकडच्या काळात तरूण सदस्यांची वाढती संख्या लक्षात घेता ते वयोमानपरत्वे तरूण  होत चालले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

विधीमंडळाचे कामकाज प्रभावी होण्यासाठी चतु:सूत्रीचा कार्यक्रम अंमलात आणणार आहे. यामध्ये प्रश्नोत्तराचा तास महत्त्वाचा असून हा तास विनाव्यत्यय पार पडावा. समित्यांचे गठन, समिती प्रमुखांना उचित मार्गदर्शन, सभागृहाला अहवाल सादर होणे ही कार्यपद्धती आणखी गतिमान आणि मजबूत करण्यात येईल. कायदा निर्मिती प्रक्रियेत सदस्यांचा सक्रिय सहभाग असावा. तसेच अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चा आणि मागण्यांवरील चर्चा यांना पुरेसा अवधी मिळणे, सदस्यांना आपल्या मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी मार्गदर्शन आणि निधी मिळणे यादृष्टीने आपण उत्तम कार्य करणे या चतु:सूत्रीचा अवलंब कामकाजात करणार आहे, असे प्रा. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

माजी सभापती ना.स.फरांदे यांच्या विचाराचा वारसा चालवतील  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नवनियुक्त सभापती प्रा. राम शिंदे हे शिक्षक आहेत. त्यामुळे ते सभागृहाचे कामकाज अतिशय शिस्तीने व संवेदनशीलपणे चालवतील. शिक्षक हा जन्मभर शिक्षक असतो. तो शिकतही असतो. त्यामुळे प्रा. शिंदे पदावर आल्यावर अनेक चांगले पायंडे पाडतील व पिठासीन अधिकारी म्हणून महत्त्वाची जबाबदारी पार पाडतील असा विश्वास आहे.

माजी सभापती प्रा. ना.स. फरांदे यांच्या विचारांचा वारसा त्यांच्याच अहिल्यानगर जिल्ह्याचे असलेले प्रा. शिंदे पुढे नेतील. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंती वर्षात त्यांचे वंशज असलेले प्रा. राम शिंदे हे विधीमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाच्या वरिष्ठ पदावर बसत आहेत, हे एक प्रकारे पुण्यश्लोक अहिल्याबाई यांना वाहिलेली सुमनांजली आहे. सरपंचपदापासून ते राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंतचा प्रा. शिंदे यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. प्राध्यापक म्हणून केलेल्या कामाच्या अनुभवाचा फायदा त्यांना सभागृह चालविताना नक्कीच उपयोगी येईल. ऐतिहासिक चौंडी गावच्या सरपंचपदी असताना त्यांनी केलेले काम राज्यात नावजले गेले. त्याचबरोबर अनेक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी चांगले काम केले आहे. त्यांच्यावर माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे यांचा प्रभाव आहे. दोन्ही सभागृहाच्या पिठासीन अधिकाऱ्यांमध्ये विधानपरिषदेच्या सभापती पदाचा मान मोठा आहे. अतिशय संवेदनशील व्यक्ती पदावर बसली आहे. एक उत्तम सभापती म्हणून सभागृहात त्यांचे नाव घेतले जाईल. यामाध्यमातून राज्याच्या 14 कोटी जनतेला न्याय मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा वारसा प्रा.शिंदे चालवतील – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र विधीमंडळाच्या वरिष्ठ सभागृह असलेल्या विधान परिषदेच्या शतक महोत्सवी वर्षात प्रा. राम शिंदे यांची सभापतीपदी निवड झाली ही आनंदाची गोष्ट आहे. त्यांच्या नावात राम आहे, त्यामुळेच ते रामासारखेच न्यायप्रिय असतील. सत्ताधारी किंवा विरोधक कुणावरही ते अन्याय होवू देणार नाहीत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी न्यायाचे राज्य कसे असावे, प्रजेचे कल्याण कसे करावे, याचा वस्तुपाठ घालून दिला. प्रा. शिंदे हे हेच संस्कार घेऊन समाजकारणात उतरले आहेत. त्यांची सभापतीपदी निवड ही सर्वार्थांने अचूक आहे. सभापती म्हणून त्यांच्यातील नेतृत्व, संयम, अभ्यासू वृत्ती आणि सभागृह चालविण्याची हातोटी हे गुण दिसतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रा. शिंदे यांनी राज्यमंत्री व नंतर कॅबिनेट मंत्री म्हणून प्रभावीपणे काम केले. शांत संयमी नेतृत्व म्हणून प्रा. शिंदे यांनी ओळख आहे. मात्र, ते जनतेच्या प्रश्नांवर कायम आक्रमक असतात, असेही श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

सभापतीपदाला न्याय देऊन गौरव वाढवतील – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सभापतीचे आसन अत्यंत मानाचे, सन्मानाचे व तितकेच जबाबदारीचे आहे. अनेक नेत्यांनी हे पद भूषविले आहे. प्रा. शिंदेही या पदाला योग्य न्याय देऊन पदाचा गौरव वाढवतील. पुण्यश्लोक अहिल्यादेवींची न्यायप्रियता, त्यांच्या लोककल्याणकारी कार्याचा, विचारांचा वारसा खऱ्या अर्थान पुढे नेण्याचा, राज्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या जीवनात चांगला बदल घडवून आणण्याचे कार्य या सभापतीपदाच्या माध्यमातून प्रा. शिंदे करतील असा विश्वास आहे.

शेती-मातीत, गाव-खेड्यात वाढलेला एका शेतकऱ्याचा, कष्टकऱ्याचा मुलगा आज विधीमंडळाच्या सर्वोच्च साभागृहाच्या प्रमुखपदी बसला आहे. हे खऱ्या अर्थान लोकशाहीचे मोठेपण आहे, सौंदर्य आहे. आपल्या देशाच्या संविधानाची महानता, सुंदरता आहे. प्रा. शिंदे यांच्या रुपानं विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहाचे सभापती तरुण आहेत. अनेक दिग्गजांनी महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभापतीपद सांभळले आहे. त्यामुळे प्रा. शिंदे यांची जबाबदारी आणखी वाढली आहे. प्रा. शिंदे हे त्यांच्या प्रगल्भ आणि संयमी नेतृत्वामुळे या सर्व जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडतील. प्रा. शिंदे यांनी सभापतीपदाचा उपयोग करून सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी विधान परिषदेच्या सभापतीपदाच्या त्यांच्या कार्यकाळाला नवा आयाम द्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

वरिष्ठ सभागृहाची परंपरा जपताना योग्य सहकार्य करू  अंबादास दानवे

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जन्मशताब्दी वर्षात प्रा. शिंदे यांना मिळालेला मान बहुमूल्य आहे. प्रा. शिंदे यांनी संघर्ष करत इथपर्यंतचा प्रवास केला आहे. मंत्री असताना जलयुक्त शिवारच्या माध्यमातून त्यांनी अत्यंत चांगले काम केले आहे. आताही ते चांगले काम करतील. वरिष्ठ सभागृहाची परंपरा जपत असताना त्यांना विरोधी पक्षाकडून योग्य सहकार्य मिळेल.

०००

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

आश्वासने पूर्ण होणार; योजना बंद होणार नाहीत…महाराष्ट्र आता थांबणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि. १९:  राज्यातील शेतकरी, युवा वर्ग, ज्येष्ठ नागरिक, वंचित घटकाला दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील. शासनाच्या सुरु असलेल्या योजना बंद होऊ देणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला दिला. राज्यातील लाडक्या बहिणींना त्यांचा देय हप्ता अधिवेशन संपल्यावर देण्यात येईल, अशी ग्वाही देत महाराष्ट्र कालही नंबर एक होता, आजही नंबर एक आहे आणि उद्याही नंबर एकच राहील, महाराष्ट्राशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात 1 जुलै 2022 पासून 3 लाख 48 हजार 70 कोटींची गुंतवणूक आली असून यामुळे 2 लाख 13 हजार 267 इतकी रोजगार निर्मिती होणार आहे. राज्यात 10 मोठ्या प्रकल्पांना मंजूरी दिली असून यामध्ये 2 लाख 39 हजार 117 कोटींची गुंतवणूक तर 79 हजार 720 इतकी रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. विदर्भातील 47 मोठ्या प्रकल्पात 1 लाख 23 हजार 931 कोटींची गुंतवणूक होऊन 61 हजार रोजगार निर्मिती, मराठवाड्यात 38 प्रकल्पात 74 हजार 646 कोटी गुंतवणूक व 41 हजार 325 रोजगार निर्मिती आणि उर्वरित महाराष्ट्रात 136 प्रकल्पात 1 लाख 49 हजार 493 कोटींची गुंतवणूक होऊन 1 लाख 10 हजार 588 रोजगार  निर्मिती होत आहे. यामुळे महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना या ठिकाणी देखील उद्योगाचे जाळे विकसित होत आहे.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा

मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. त्यानंतर केंद्रातील मोदी सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा संविधानानुसार दिला.  यामुळे मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी निधी मिळणार आहे. तसेच विद्वानांना दोन पुरस्कार मिळणार आहेत. प्राचीन ग्रंथांचा अनुवाद करण्यात येणार आहे. या सर्व प्रयत्नांसह आपण आपली भाषा रूजविणार आहोत. न्यायालयातील निवाडे मराठीत उपलब्ध करण्यास सुरूवात होणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.

महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, राज्यातील सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी गेल्या अडीच वर्षात 167 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून यामुळे 25.21 लक्ष हेक्टर जमिन सिंचनाखाली येणार आहे. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प केला असून नदीजोड प्रकल्प, जलयुक्त शिवार योजना आणि जलसिंचन प्रकल्प यासाठी उपयुक्त आहे. वैनगंगा-नळगंगा, नारपार-गिरणा, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी, दमणगंगा-एकदरे असे नदी जोडप्रकल्प मार्गी लावणार असल्याने विकासाला गती मिळणार आहे. राज्यातील शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यासाठी, शेतकऱ्यांच्या पिकाला मुबलक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी नदीजोड प्रकल्प महत्वाचे आहेत. यासाठी राज्य शासनाने जल आराखडा तयार केला  आहे. राज्यात बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यात येत असून यामुळे ही शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

मेट्रो प्रकल्प गतिमान

मुंबई, नागपूर, पुणे या शहरांमध्ये मेट्रोच्या कामाला अधिक गती देण्यात आली आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांचा प्रवास अधिक गतिमान होणार आहे. मुंबईत मेट्रो टप्पा 3 चे काम अंतिम टप्प्यात असून बीकेसी ते कुलाबा ही नवीन लाईफ लाईन होणार आहे. 17 लाख प्रवाशी प्रवास करणार आहेत. मे २०२५ पर्यंत ही लाईन खुली होईल.

शेतकऱ्यांकडून वीज बील घेणार नाही

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, राज्यात १६ हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प सुरू केले आहेत. आतापर्यंत ६६७ मेगावॅट वीज कार्यान्वित झाली. २०२६ पर्यंत १६ हजार मेगावॅट वीज कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांकडून विजेचे बिल घेणार नाही. ९ लाख कृषीपंप आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. मागेल त्याला सौरपंप आम्ही देणार असून ३ महिन्यात जोडणी देऊ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 2030 साली राज्यात 52 टक्के ऊर्जा अपारंपरिक स्रोतातील असेल असेही त्यांनी सांगितले.

वाढवण बंदर विकासाचे केंद्र

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पालघर येथे 76 हजार कोटी रुपये खर्च करून वाढवण बंदर उभारण्यात येत आहे. हे बंदर जेएनपीटीपेक्षा तीन पट मोठं असून या बंदरामुळे अनेक फायदे होणार आहेत.

नाशिक येथे आयटी पार्क

नाशिक येथे आयटी पार्क विकसित करण्यात येणार असून  या कामासाठी वास्तू विषारदाची  नेमणूक झाली आहे. लवकरच येथे अद्ययावत आयटी पार्क निर्माण केले जाईल.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी राज्याच्या विकासाची दिशा आणि दृष्टीकोन स्पष्ट करताना पुढील ओळीतून आपली भूमिका मांडली…

या ओळी पुढीलप्रमाणे…

महाराष्ट्र आता थांबणार नाही…

सोबत राहू एकदिलाने, घडवू महाराष्ट्र पुन्हा नव्याने, समृद्धीचा वेग कुणी रोखणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही…

उद्योग, गुंतवणूक येतेय जोमात, बेरोजगारांना देऊ रोजगाराची साथ, तरुणाईचं स्वप्न कधी भंगणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही…

रस्ते, पूल, रेल्वेचे धागे, सुखदायी प्रवासाचे स्वप्न होईल जागे, गतीला स्थगिती मिळणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही…

विकासाच्या स्वप्नांसोबत सेतू अटल, मुंबईच्या वेगासाठी आहे कोस्टल, मराठी माणसाचे स्वप्न भंगणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही…

जलयुक्त शिवार देईल नवजीवन, नदीजोड प्रकल्प फुलवतील नंदनवन, राज्यात दुष्काळ कुठे दिसणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही…

पाणंद रस्त्यांनी जोडू शेतशिवार, आनंदाचा शिधा देईल आधार, उपाशी पोटी कुणी झोपणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही…

लाडक्या बहिणींना मिळाला स्वाभिमान, ज्येष्ठांना मोफत प्रवासातून सन्मान, लाडक्या लेकी कधी दुःखी होणार नाही, अन् महाराष्ट्र आता थांबणार नाही…

असेल विरोधकांचे कमी संख्याबळ, सारे टिकवून ठेऊ लोकशाहीचे बळ, कोणत्याही आमदाराचा मानसन्मान घटणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही…

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आरोग्य सेवा सुलभ, सक्षम बनविण्याच्या दृष्टिकोनातून उपाय योजना करा

बुलढाणा, दि. १९ (जिमाका): गोरगरीब जनतेला केंद्रबिंदू मानून प्रत्येक व्यक्तीला उत्तमातील उत्तम आरोग्य सेवा मिळावी या दृष्टीकोनातून आरोग्य सेवा सुलभ आणि सक्षम बनविण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या.

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अर्थसंकल्पासंदर्भात 18 डिसेंबर रोजी दिल्ली येथील आरोग्य मंत्रालयाच्या दालनात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री श्री. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना केंद्रीय राज्यमंत्री श्री. जाधव पुढे म्हणाले की, देशातील प्रत्येक नागरिकांना उत्तमातील उत्तम आरोग्यसेवा देण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध आहे. त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या अर्थसंकल्पात आरोग्यसेवा अधिक सक्षम करून  नागरिकांना सहज आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टिकोनातून उपाय योजना करा, अशी सूचना केली. सोबत आरोग्य विषय विविध विषयावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला आरोग्य विभागाची वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

०००

 

 

 

तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

  • विकसित भारताला महाराष्ट्राची भक्कम जोड
  • एकत्रित मिशन समृध्द महाराष्ट्र

नागपूर, दि. १९ : महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकाचे राज्य करतानाच  विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची आहे. मागील अडीच वर्षात महाराष्ट्राच्या कायापालटाला सुरूवात झाली असून आता आमचं एकत्रित मिशन आहे समृध्द महाराष्ट्राचं. आता आम्ही तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ. महाराष्ट्र आता थांबणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. ते म्हणाले की, मागील अडीच वर्षात महायुतीने विकास आणि कल्याणकारी योजनांचं ऐतिहासिक काम केले.  मागील अडीच वर्षात विक्रमी कामे झाली. एकही दिवस सुटी न घेता आम्ही काम केलं. त्यामुळे या राज्याच्या निवडणूक निकालांत इतिहास घडला.

अधिक गतिमान आणि लोकाभिमुख कारभाराचे वचन

मागील अडीच वर्ष आम्ही एक टीम म्हणून काम केले. त्यामुळेच आमचे सरकार हे जनतेचे लाडकं सरकार झाले. जनतेच्या विश्वासामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. आता अधिक गतिमान आणि लोकाभिमुख कारभाराचं वचन आम्ही देतोय. मुख्यमंत्री म्हणून काम करताना माझे धोरण गतिमान विकास हेच होते तिथे पक्षभेद, द्वेषाला कधी थारा दिला नाही.

विकासकामांचा स्ट्राईक रेट वाढतच राहणार

मागील अडीच वर्षात महायुती सरकारच्या विकासकामांचा स्ट्राईक रेट देशात सर्वाधिक होता. यापुढे हा स्ट्राईक रेट वाढतच राहणार आहे. महाराष्ट्राला देशात क्रमांक एकचे राज्य बनविण्यासाठी आम्ही सगळे दिवस-रात्र चोवीस तास काम करत होतोच यापुढेही करू अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

विदर्भ विकासासाठी ठोस पावले

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, माझे विदर्भाशी माझे वेगळे नाते आहे ते इथल्या प्रेम करणाऱ्या जनतेमुळे. मुख्यमंत्री असतांना मलाही विदर्भासाठी काहीतरी भरीव करण्याची संधी मिळाली याचा निश्चितच आनंद आहे. मागील दोन्हीही अधिवेशनात आम्ही विदर्भाच्या विकासासाठी ठोस पाऊलं उचलली आहेत आणि त्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. समृध्दी महामार्ग आपण गोंदिया, भंडारा, गडचिरोलीपर्यंत पुढे नेत आहोत. विदर्भातल्या ५ लाख शेतकऱ्यांना धान उत्पादनासाठी हेक्टरी १५ हजार रुपये बोनसची घोषणा मुख्यमंत्री म्हणून पहिल्याच अधिवेशनात मी केली होती. या बोनसची रक्कम आम्ही २० हजार केली आहे. विदर्भ लॉजिस्टिक हब म्हणून विकसित करायचा आहे.

विदर्भ, मराठवाडामधील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी ७० हजार कोटींच्या प्रकल्पांना मान्यता दिली आहे. सुरजागड येथे दोन नवीन प्रकल्प माझ्या कार्यकाळात सुरू झाले. मागील अडीच वर्षात आम्ही ८६ कॅबिनेट बैठका घेतल्या आणि ८५० महत्त्वाचे निर्णय घेतले. छोटे मोठे निर्णय सांगायला बसले तर एक अधिवेशन कमी पडेल, असेही ते म्हणाले.

अग्रेसर महाराष्ट्र…

मागील अडीच वर्षात ज्या लोककल्याणकारी योजना राबवल्या. विक्रमी विकासकामे झाली. परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिला आहे, महिला सक्षमीकरणात महाराष्ट्र पहिला आहे, जीएसटीत पहिले आहोत, उद्योगांमध्ये पहिला क्रमांक, पाच लाखांचा आरोग्य विमा देणारे पहिले राज्य, शेतकऱ्यांना मोफत वीज देणारे पहिले राज्य, १० लाख तरुणांना स्टायपेंड देणारे पहिले राज्य, देशातला सर्वाधिक लांबीचा सागरीसेतू करणारे पहिले राज्य आणि सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क असलेले राज्य, अशी महाराष्ट्राची देशभरात ओळख झाल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात १० लाख कोटींची पायाभूत सुविधांची काम

महाराष्ट्रात १० लाख कोटींची पायाभूत सुविधांची कामं सुरु आहेत. महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. मुंबई, एमएमआर, पुणे, नाशिक आणि नागपूर शहरांत साडेचारशे किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्ग सुरु करणार आहोत. शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या नवीन ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्गाला मंजुरी दिली आहे. पुणे रिंग रोड, अलिबाग-विरार मल्टीमोडल कॉरिडोर ही कामे वेगाने सुरु आहेत. सात हजार किमी अॅक्सेस कंट्रोल रस्ते आपण तयार करत आहेत. राज्याच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी सात ते आठ तासांपेक्षा जास्त वेळ लागता कामा नये असे आमचे नियोजन असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

एकाही पात्र बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाही

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत २ कोटी ३४ लाख लाडक्या बहिणींना पाच हप्ते आम्ही दिले. यापुढेही ते मिळत राहतील. आत्ताच्या पुरवणी मागण्यात १४०० कोटींची तरतूदही केली आहे. माझ्या एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाही. हा त्यांच्या लाडक्या भावाचा शब्द आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरु केली. ८९ लाख कुटुंबांना वर्षातून तीन सिलेंडर मोफत देत आहोत.  मुख्यमंत्री लेक लाडकी योजनेत ३४ हजार जणांना लाभ दिला आहे. साडे तीन लाखापेक्षा जास्त मुलींनी मोफत व्यावसायिक शिक्षण योजनेचा लाभ घेतलाय. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ सव्वा लाख लाडक्या भावांना झालाय. ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली असून १२३ कोटींचे अनुदान वाटप केले त्याचा सव्वा चार लाख ज्येष्ठांना लाभ झाला आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु केली. आत्तापर्यंत विशेष रेल्वेने मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूरहून आणि इतर ९ शहरांतून तीर्थयात्रा सुरु झाली आहे. ६ हजारपेक्षा जास्त ज्येष्ठांनी त्याचा लाभ घेतला आहे. एसटीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आहे. खेड्यापाड्यातले लाखो लोक याचा फायदा घेत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला महासत्ता करण्याचा रोडमॅप आखलेला आहे. त्या दिशेनेच काम करून राज्याला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकावरचे राज्य करायचे आहे.  विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची आहे. प्रधानमंत्र्यांसह गृहमंत्री अमित शाह यांचे भक्कम पाठबळ आहे आणि यापुढेही राहिल याची मला खात्री आहे. आता आमचे एकत्रित मिशन आहे समृध्द महाराष्ट्राचे. आम्ही तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासमार्गावर नेऊ, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

०००

 

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या जनसंपर्क विभागाला सर्वोत्कृष्ट सोशल मीडिया अँड पीआर विशेष पुरस्कार

0
रायपूर, दि. 22 : पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिकांचे वितरण लोकसभेचे माजी सदस्य डॉ. नंदकुमार साय व छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय...

विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अध्ययनाचे काम करावे – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

0
मुंबई दि.22- मुंबईतील दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिरचा ७५ वा वर्धापन दिन सोहळा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाला. विद्यार्थ्यांनी आयुष्यात यशस्वी...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अहिल्यानगर येथे स्वागत

0
अहिल्यानगर : दि.२२- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या हेलिपॅड येथे आगमन झाले. त्यांच्या समवेत विधानपरिषद सभापती...

धोबीघाट परिसरात परीट समाजासाठी सुसज्ज सभागृह उभारणीकरीता आराखडा तयार करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
बारामती, दि. २२: परीट समाजातील नागरिकांसाठी अधिकाधिक सुविधा मिळण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना विश्वासात घेत धोबीघाट परिसरात सुसज्ज सभागृह उभारणीच्या अनुषंगाने आराखडा तयार करा, असे निर्देश...

राज्य मंत्रिमंडळ खातेवाटपाची अधिसूचना जाहीर

0
मुंबई, दि.२२ : - राज्य  मंत्रिमंडळाचे खातेवाटप २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र...