मुंबई, दि. 16 : महाराष्ट्र विविध क्षेत्रात आघाडीवर असून युरोपियन युनियन सोबत कोणत्या क्षेत्रात गुंतवणुकीची आणि व्यापाराची अधिक संधी आहे ते क्षेत्र निश्चित करण्यात यावे. यासाठी राजशिष्टाचार आणि पणन विभाग युरोपियन युनियनला मदत करेल, असे राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी युरोपियन युनियन चेंबर्सच्या प्रतिनिधींना सांगितले.
युरोपियन युनियन चेंबर्स (भारतीय हितधारक) यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित मंत्री श्री.रावल बोलत होते. बैठकीस पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, युरोपियन युनियन चेंबर्सचे उपाध्यक्ष रॉबिन बॅनर्जी, संचालक डॉ. रेणू शोमे यांच्यासह पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.
मंत्री जयकुमार रावल म्हणाले, महाराष्ट्रात कृषी क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. महाराष्ट्र आणि युरोपियन युनियनच्या परस्पर सहकार्याने व्यापाराची क्षेत्र निश्चित झाली की त्या विभागासोबत सविस्तर चर्चा करता येईल. यासाठी राज्य शासनामार्फत आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असेही मंत्री श्री. रावल यांनी सांगितले.
महाराष्ट्राची कृषी उत्पादनांची विविधता आणि गुणवत्ता युरोपियन बाजारासाठी आकर्षक आहे. महाराष्ट्रात हापूस आंबा, डाळिंब, द्राक्षे, कांदा, हळद, तांदूळ आणि गहू यांसारख्या विविध आणि उच्च दर्जाच्या कृषी उत्पादनांचे उत्पादन होते. ही विविधता युरोपियन संघ देशांतील विविध ग्राहकांच्या गरजांना पूर्ण करण्यास सक्षम आहे. विशेषतः कोकणातील हापूस आंबा आणि पुण्याची द्राक्षे युरोपियन बाजारात विशेष मागणी असलेल्या उत्पादनांमध्ये गणले जातात, असेही मंत्री श्री.रावल यांनी यावेळी नमूद केले.
00000
बी.सी.झंवर/विसंअ