शनिवार, मे 3, 2025
Home Blog Page 56

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची मानवंदना

मुंबई, दि. १३ : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त उद्या सोमवार, दि. १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित एका माहितीपटासह, चित्रपटाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विविध समाजमाध्यमांवरून तसेच दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारण करण्यात येणार आहे. या दिनानिमित्ताने महासंचालनालयातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यावर्षी १३४ वी जयंती साजरी करण्यात येत आहे. या जयंती दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने उद्या सकाळी ११ वाजता ‘महापुरुष डॉ.आंबेडकर’ या माहितीपटाचे प्रसारण आणि दुपारी १ वाजता ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाचे प्रसारण करण्यात येणार आहे. तसेच दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाचे दुपारी १.३० वाजता प्रसारण करण्यात येणार आहे.

‘महापुरुष डॉ. आंबेडकर’, या माहितीपटाचे एक्स, फेसबुक, यूट्यूब आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे प्रसारण एक्स या समाजमाध्यमावर होणार आहे. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर हे कार्यक्रम पाहता येतील.

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

महापुरुष डॉ. आंबेडकर’ या माहितीपटाविषयी..

‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ या दुर्मिळ माहितीपटात डॉ. आंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचे काल्पनिक चित्रण तसेच, लाइव्ह फुटेजच्या चित्रीकरणाचा समावेश आहे. हा माहितीपट १७ मिनिटांचा आहे. डॉ. आंबेडकरांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा एक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तावेज जुलै १९६८ मध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने फिल्म्स डिव्हिजनच्या माध्यमातून तयार केला आहे.

या माहितीपटात डॉ. आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याचे दृश्य आणि त्यांची नेपाळ भेट तसेच मुंबईतील दादर चौपाटीवरील त्यांच्या अंत्ययात्रेचे क्लोजअप शॉट्स आहेत. मधुकर खामकर यांनी छायांकन केले आहे, तर जी.जी. पाटील यांनी त्याचे संकलन केले आहे. हा दुर्मिळ माहितीपट व्हटकर प्रॉडक्शनच्या बॅनरखाली दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक नामदेव व्हटकर यांनी दिग्दर्शित केला आहे, तर दत्ता डावजेकर हे संगीतकार आहेत. ज्येष्ठ चित्रपट कलाकार डेव्हिड अब्राहम या चित्रपटाचे निवेदक होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाविषयी…

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ या चित्रपटाची निर्मिती सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन यांनी संयुक्तरित्या केली आहे.

स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध क्षेत्रातील कार्य अतुलनीय आहे. प्रचंड बुद्धिमत्ता असणारे डॉ.बाबासाहेब यांनी समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा त्यांनी प्रामुख्याने विचार केला. शिक्षण व समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’, असा मंत्र दिला. अशा असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य या चित्रपटातून समजते.

या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. जब्बार पटेल यांनी केले आहे. या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रमुख भूमिका अभिनेता मामुट्टी यांनी, तर रमाबाई आंबेडकर यांची भूमिका सोनाली कुलकर्णी यांनी साकारली आहे. मोहन गोखले, मृणाल कुलकर्णी यांच्या देखील या चित्रपटात भूमिका आहेत. निर्मिती सहाय्य राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) यांनी केले असून पटकथा लेखन सोनी तारापोरवाला, अरूण साधू, दया पवार यांनी केले आहे. चित्रपटाचे संशोधन डॉ. य. दि. फडके यांनी केले आहे. या चित्रपटाचे सल्लागार श्याम बेनेगल आहेत, चित्रपटाची वेशभूषा भानु अथैय्या, संगीत अमर हल्दीपूर, फोटो दिग्दर्शन अशोक मेहता यांचे आहे.

०००

क्रीडा शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी प्रयत्नशील – प्रा.राम शिंदे

अहिल्यानगर, दि.१३ – केवळ पुस्तकांचा अभ्यास करून नव्हे, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम व्यक्ती घडवण्यामध्ये क्रीडा शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तरुण पिढीच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या क्रीडा शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.

शिर्डी येथील सप्तपदी मंगल कार्यालय येथे  शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी नामदेव शिरगावकर, डॉ.अरुण खोडसकर, विश्वनाथ पाटोळे, राजेंद्र कोतकर, संजय चव्हाण, शिवदत्त ढवळे, ज्ञानेश काळे, संजय पाटील, जालिंदर आवारी, डॉ. आनंद पवार,  क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे आदी उपस्थित होते.

प्रा. शिंदे म्हणाले, क्रीडा शिक्षक विद्यार्थ्यांना शिस्त, आत्मविश्वास, संघभावना आणि नेतृत्वगुण शिकवतात. मैदानावर शिकलेले धडे हे जीवनात मोठ्या अडचणींना सामोरे जाताना उपयोगी पडतात. नियमित व्यायाम, योग्य आहार, तंदुरुस्ती यांचे महत्त्व मुलांपर्यंत पोहोचवण्याचे काम हे क्रीडा शिक्षक करत असतात. क्रीडा शिक्षक विद्यार्थ्यांमधील कौशल्य ओळखून त्यांना योग्यदिशेने मार्गदर्शन करतात. अनेक खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाटा असतो. मैदानावर संघर्ष करताना हार मानू नये, प्रयत्न करत राहावे, हे शिकवणारे क्रीडा शिक्षकच खरे जीवनगुरु असल्याचे ते म्हणाले.

शाळांमध्ये क्रीडा शिक्षक केवळ खेळ शिकवणारे नसतात, तर ते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार असतात. त्यामुळे आजच्या तरुण पिढीला योग्य वळण लावण्यासाठी त्यांचे योगदान अतुलनीय  आहे. आजच्या धकाधकीच्या व संगणकीय युगात शरीराची हालचाल कमी झालेली आहे. खेळ व व्यायामामुळे जीवनात आनंद, उज्ज्वल भविष्य घडण्याबरोबरच आरोग्य सुदृढ राहते.  प्रत्येक नागरिक सुदृढ असेल तरच आपले राज्य व देश तरुण राहील.यासाठी प्रत्येकाने नियमित व्यायाम, योगाची सवय  अंगिकारण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या माध्यमातून विचारमंथन व्हावे. क्रीडा शिक्षकांनी संघटित होऊन त्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवाव्यात. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील, असेही प्रा.शिंदे यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वनाथ पाटोळे यांनी केले.

यावेळी राजेंद्र कोतकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी डॉ. जितेंद्र लिंबकर, पुरुषोत्तम उपवर्त, अमोल जोशी, राजेश जाधव,अप्पासाहेब शिंदे,सुनील जाधव उपस्थित होते.

0000

‘जय भीम पदयात्रा’ केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत संपन्न

मुंबई, दि. १३:  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल रोजी होणाऱ्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली म्हणून केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने दि. १३ एप्रिल रोजी ‘जय भीम पदयात्रा’ चे आयोजन करण्यात आले. प्रथमच देशभरातील सर्व प्रमुख राज्यांच्या राजधानी शहरांमध्ये एकाच वेळी झालेली ही ऐतिहासिक पदयात्रा ही राष्ट्रीय उत्सवाचा एक महत्त्वाचा टप्पा ठरली.मुंबईतील पदयात्रेचे नेतृत्व केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी केले. या पदयात्रेमध्ये २००० पेक्षा अधिक ‘मायभारत’च्या विविध स्वयंसेवकांनी भाग घेतला. ही पदयात्रा नरिमन पॉईंट येथून सुरू होऊन मंत्रालयाजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत झाली. ही पदयात्रा सामाजिक न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांचे प्रतीक ठरली.

यावेळी आयोजित कार्यक्रमात श्रीमती खडसे म्हणाल्या, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजच्या पिढीला माहिती होणे अत्यंत गरजेचे आहे. या थोर महापुरुषाने आपल्या देशाला दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांनी समाजाला नवदिशा दिली, याचा अभिमान आपल्याला आहे. त्यांची जयंती साजरी करणे हे आपले कर्तव्य आहे, त्यांच्या विचारांना आपल्या आयुष्यात उतरवणं आणि पुढे नेणं हे अधिक महत्त्वाचं आहे.

यावेळी राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते, आमदार आणि युवकांचा सत्कार करण्यात आला. पदयात्रेत डॉ. आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार मांडणारे ‘श्रद्धांजली कोपरे’, सामाजिक न्यायावर आधारित थेट रस्त्यांवरील सांस्कृतिक सादरीकरण, आणि ‘प्रतिज्ञा बिंदू’ यांसारख्या उपक्रमांनी वातावरण अधिक प्रेरणादायी केले. कार्यक्रमाचा समारोप मंत्रालयाजवळील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात सामूहिक स्वच्छतेने करण्यात आला. ही प्रतीकात्मक क्रिया देशभरात विविध शहरांमध्येही पार पडली.

जिल्हास्तरावर देखील स्वच्छता उपक्रम आणि पुष्पांजली  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.‘जय भीम पदयात्रा’ ही भारतीय राज्यघटनेच्या अमृत महोत्सवाचं औचित्य साधून सुरू झालेल्या 24 मासिक पदयात्रांपैकी नववी पदयात्रा होती. या पदयात्रा भारतीय युवांना  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूलभूत मूल्यांशी जोडण्याचे माध्यम ठरत आहेत.

मुंबईतील या पदयात्रेमध्ये  कौशल्य ,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी खासदार अमर साबळे, महाराष्ट्र व गोवा येथील एनवायकेसचे राज्य संचालक प्रकाशकुमार मनुरे, एएसएसचे महाराष्ट्र प्रादेशिक संचालक अजय शिंदे तसेच क्रीडा व युवक कल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाने देशभरातील तरुणांना या प्रेरणादायी चळवळीत सहभागी होण्यासाठी www.mybharat.gov.in या मायभारत पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन केले असून, लोकशाही, स्वाभिमान आणि ऐक्याच्या मार्गावर एकत्र चालण्याचे आवाहनही केले आहे.

0000

 

०००

घटनाकार आणि समतेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१८९१-१९५६) यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू कॅन्टोन्मेंट येथे झाला. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण महाराष्ट्रातील सातारा येथे पूर्ण केले आणि त्यांचे माध्यमिक शिक्षण मुंबईतील एल्फिन्स्टन हायस्कूलमधून पूर्ण केले. त्यांचे शिक्षण मोठ्या प्रमाणात भेदभाव सहन करून झाले, त्यांच्या आत्मचरित्रात्मक नोंद ‘वेटिंग फॉर अ व्हिसा’ मध्ये, त्यांनी त्यांच्या शाळेतील सामान्य पाण्याच्या नळातून पाणी पिण्याची परवानगी कशी नव्हती याची आठवण करून दिली, “नो शिपाई, नो वॉटर” असे लिहिले आहे.

डॉ. आंबेडकर यांनी १९१२ मध्ये मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयात बीए पदवी प्राप्त केली. महाविद्यालयीन जीवनात त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे १९१३ मध्ये त्यांना बडोदा राज्याचे तत्कालीन महाराजा (राजा) सयाजीराव गायकवाड यांनी अमेरिकेतील न्यू यॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठात एमए आणि पीएचडी करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली. १९१६ मध्ये त्यांचा पदव्युत्तर प्रबंध “द अॅडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी” या शीर्षकाचा होता. त्यांनी “द इव्होल्यूशन ऑफ प्रांतीय वित्त इन इंडिया: अ स्टडी इन द प्रांतीय विकेंद्रीकरण ऑफ इम्पीरियल फायनान्स” या विषयावर पीएचडी प्रबंध सादर केला.

कोलंबियानंतर, डॉ. आंबेडकर लंडनला गेले, जिथे त्यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स (LSE) मध्ये नोंदणी केली आणि कायद्याचा अभ्यास करण्यासाठी ग्रेज इन मध्ये प्रवेश घेतला. तथापि, निधीअभावी त्यांना १९१७ मध्ये भारतात परतावे लागले. १९१८ मध्ये ते मुंबई (पूर्वीचे मुंबई) येथील सिडेनहॅम कॉलेजमध्ये राजकीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक झाले. या काळात त्यांनी साउथबरो समितीला सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराची मागणी करणारे निवेदन सादर केले.

१९२० मध्ये, कोल्हापूरच्या छत्रपती शाहूजी महाराजांच्या आर्थिक मदतीमुळे, एका मित्राकडून घेतलेले वैयक्तिक कर्ज आणि भारतात असतानाच्या त्यांच्या बचतीमुळे, डॉ. आंबेडकर त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी लंडनला परतले. १९२२ मध्ये त्यांना बारमध्ये बोलावण्यात आले आणि ते बॅरिस्टर-अॅट-लॉ बनले. त्यांनी एलएससीमधून एमएससी आणि डीएससी देखील पूर्ण केले. त्यांचा डॉक्टरेट प्रबंध नंतर “द प्रॉब्लेम ऑफ द रुपी” या नावाने प्रकाशित झाला.

भारतात परतल्यानंतर, डॉ. आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभा (बहिष्कृतांच्या कल्याणासाठी समाज) स्थापन केली आणि भारतीय समाजातील ऐतिहासिकदृष्ट्या पीडित जातींना न्याय आणि सार्वजनिक संसाधनांमध्ये समान प्रवेश मिळावा यासाठी १९२७ मध्ये महाड सत्याग्रह सारख्या सामाजिक चळवळींचे नेतृत्व केले. त्याच वर्षी, त्यांनी मुंबई विधान परिषदेत नामांकित सदस्य म्हणून प्रवेश केला.

त्यानंतर, डॉ. आंबेडकरांनी १९२८ मध्ये भारतीय वैधानिक आयोगासमोर, ज्याला ‘सायमन कमिशन’ म्हणूनही ओळखले जाते, घटनात्मक सुधारणांवरील आपले निवेदन सादर केले. सायमन कमिशनच्या अहवालांमुळे १९३०-३२ दरम्यान तीन गोलमेज परिषदा झाल्या, जिथे डॉ. आंबेडकरांना त्यांचे निवेदन सादर करण्यासाठी आमंत्रित केले गेले.

१९३५ मध्ये, डॉ. आंबेडकर यांची मुंबईतील सरकारी कायदा महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली, जिथे ते १९२८ पासून प्राध्यापक म्हणून अध्यापन करत होते. त्यानंतर, त्यांना व्हाइसरॉयच्या कार्यकारी परिषदेत कामगार सदस्य (१९४२-४६) म्हणून नियुक्त करण्यात आले.

१९४६ मध्ये, ते भारताच्या संविधान सभेवर निवडून आले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी त्यांनी स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर, ते संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आणि त्यांनी भारताच्या संविधानाच्या मसुद्याच्या प्रक्रियेचे नेतृत्व केले. संविधान सभेचे सदस्य महावीर त्यागी यांनी डॉ. आंबेडकरांचे वर्णन “मुख्य कलाकार” असे केले ज्यांनी “स्वतःचा कुंचला बाजूला ठेवून जनतेला पाहण्यासाठी आणि त्यावर टिप्पणी करण्यासाठी चित्र अनावरण केले”. संविधान सभेचे अध्यक्ष आणि नंतर भारतीय प्रजासत्ताकाचे पहिले राष्ट्रपती बनलेले डॉ. राजेंद्र प्रसाद म्हणाले: “अध्यक्षपदावर बसून आणि दिवसेंदिवस कामकाज पाहताना, मला जाणवले की मसुदा समितीचे सदस्य आणि विशेषतः तिचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर यांनी त्यांच्या अस्वस्थ प्रकृती असूनही ज्या उत्साहाने आणि भक्तीने काम केले आहे, ते इतर कोणीही करू शकत नाही. जेव्हा आम्ही त्यांना मसुदा समितीवर ठेवले आणि त्यांचे अध्यक्ष केले तेव्हा आम्ही कधीही असा निर्णय घेऊ शकलो नाही जो इतका योग्य होता किंवा असू शकतो. त्यांनी केवळ त्यांच्या निवडीचे समर्थन केले नाही तर त्यांनी केलेल्या कामात चमक वाढवली आहे.”

१९५२ मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर ते राज्यसभेचे सदस्य झाले. त्याच वर्षी त्यांना कोलंबिया विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी देण्यात आली. १९५३ मध्ये, त्यांना हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाकडून आणखी एक मानद डॉक्टरेट पदवी देण्यात आली.

१९५५ मध्ये दीर्घ आजारामुळे डॉ. आंबेडकरांची प्रकृती खालावली. ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे झोपेतच त्यांचे निधन झाले.

0000

रणजितसिंह राजपूत,

जिल्हा माहिती अधिकारी, नंदुरबार

 

इरई नदी पुनरुज्जीवन अभियान लोकचळवळ व्हावी– पालकमंत्री डॉ. अशोक उईके

चंद्रपूर, दि. १२ एप्रिल :  इरई नदी ही चंद्रपूर शहराला 9 किलोमीटर समांतर वाहते. चंद्रपूर शहर ते वर्धा नदी संगमपर्यंतच्या 17 किमी नदीपात्रातील वाढलेली झाडे झुडपे आणि गाळ काढून नदीपात्राचे खोलीकरण व रुंदीकरण करणे तसेच इराई नदीपात्राची पूरवहन क्षमता वाढविणे यासाठी नदी पुनरुज्जीवन अभियान हाती घेण्यात आले आहे. हे अभियान लोकचळवळीच्या स्वरुपात यशस्वी करण्यासाठी सर्वांनी यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले.

इरई नदीच्या पुनरुज्जीवन अभियानसंदर्भत वन अकादमी येथे आयोजित बैठकीला आमदार सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील उपायुक्त मंगेश खवले व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या संकल्पनेतून इरई नदी पुनरुज्जीवन अभियान जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे. या अभियानाचा शुभारंभ 25 एप्रिल रोजी होणार आहे. इरई नदी खोलीकरण लोक चळवळ होण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी –कर्मचारी, जिल्ह्यातील सामाजिक संघटना व सामान्य नागरिकांनी यात हिरहिरीने भाग घेऊन आपले योगदान द्यावे. हे अभियान आपले आहे, असे प्रत्येकाला वाटले पाहिजे, त्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे.  नदी काठावरील जागेवर असलेल्या वस्त्यांमध्ये तसेच खाली भूखंडावर यापुढे कोणतीही बांधकाम होणार नाही, यासाठी प्रभावी धोरण आखून त्याची अंमलबजावणी करावी. तसेच सद्यस्थितीत नदीकाठावर असलेल्या अतिक्रमणबाबत योग्य उपाययोजना कराव्यात, अशा सूचना पालकमंत्री डॉ.अशोक उईके यांनी दिल्या.

आमदार मुनगंटीवार यांनी केल्या सूचना : डब्ल्यूसीएल ने या उपक्रमात उदार होऊन साहित्य व आर्थिक स्वरूपात मदत करावी. सीटीपीएस ने सुद्धा गाळ काढण्यासाठी सहकार्य करावे. यातून निघणारा गाळ हा शहरातील खोलगट भाग असलेल्या जागेवर टाकून मैदान तयार करता येईल का, याबाबत नियोजन करावे. नदी पात्रामधील अतिक्रमणाच्या विषयाचे योग्य नियोजन करावे. 17 किलोमीटर मध्ये झुडपे आणि गाळ काढण्याचे काम टप्प्याटप्प्याने करावे. तसेच इरई नदी निरंतर वाहण्यासाठी बंधारे बांधावे. नदी पुनरुज्जीवनासाठी पाच वर्षाचा कार्यक्रम ठरवावा.

यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, इराई नदी पुनरुज्जीवन अभियानांतर्गत पाच लक्ष ब्रास गाळ काढण्याचे नियोजन आहे. सदर काम 45 दिवसात पूर्ण करण्याचे ध्येय प्रशासनाने ठेवले आहे. नदीच्या पात्रातून निघणारा गाळ कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून दिला जाईल. तसेच यातून निघणारी वाळू ही घरकुल लाभार्थ्यांना देण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. डब्लूसीएल आणि औष्णिक विद्युत केंद्राने गाळ काढण्यासाठी साहित्य तसेच आर्थिक मदत करावी, सामाजिक संघटनांच्या माध्यमातून मशीन उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आले, असे त्यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन : इरई नदीचे पुनरुज्जीवन हा एक सामाजिक उपक्रम आहे. शहराला पडणारा पुराचा वेढा, यापासून मुक्ती मिळण्यासाठी सदर उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विविध स्तरावरून निधीचे नियोजन करण्याचा प्रशासनाचा मानस असून सर्वात प्रथम शासकीय अधिकारी व कर्मचा-यांनी या उपक्रमासाठी आपला एक दिवसाचा पगार द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

००००

१०० दिवस कृती आराखड्याचा पालकमंत्र्यांकडून आढावा

चंद्रपूर, दि. १२ एप्रिल : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्य शासनाने सर्व शासकीय विभागांसाठी १०० दिवसांचा कृती आराखडा तयार केला आहे. सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात उत्तम सेवा मिळावी, हा संकल्प कृती आराखड्यामागे असून आतापर्यंत विविध विभागामार्फत जिल्ह्यात झालेल्या अंमलबजावणीचा आढावा राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी घेतला.

वन अकादमी येथे आयोजित बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मीना साळुंखे, गिरीश धायगुडे पालिका प्रशासन अधिकारी विद्या गायकवाड, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, जिल्हा प्रशासनाने ई-ऑफिस ही संकल्पना प्रभावीपणे राबवली असून जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच तहसील कार्यालय ई -ऑफिसने जोडली आहे ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. कृती आराखड्यांतर्गत सर्व शासकीय विभागांनी आपापले संकेतस्थळ अद्यावत करून नागरिकांना उत्तम सेवा मिळेल, यासाठी गांभीर्याने काम करावे. सर्व शासकीय कार्यालयांमध्ये महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय असणे आवश्यक आहे. तसेच उत्तम पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अभ्यागतांसाठी प्रतिक्षालय सुध्दा असावे.

राज्य शासनाने दिलेल्या कृती आराखड्यानुसारच सर्व विभागांनी कार्यवाही करावी. जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व पंचायत समितीमध्ये नियमितपणे स्वच्छता, स्वतंत्र शौच्छालये असली पाहिजे. तसेच क्षेत्रीय कार्यालयांनी भेटीच्या नोंदी अद्ययावत ठेवाव्यात. जिल्हा परिषदेमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाचा प्रभावी उपयोग करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावे. आरोग्य संस्थेत आलेल्या गोरगरिबांना चांगली सेवा द्यावी. पोलिस विभागाने नागरिकांसोबत सुसंवाद वाढवावा, यासाठी विशेष मोहीम राबविणे गरजेचे आहे. गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी कायदेविषयक जनजागृती करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

सादरीकरण करताना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी, सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी राज्य शासनाच्या 100 दिवस कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना केल्या. यावेळी त्यांनी संकेतस्थळ अद्यावत करणे, केंद्र शासनासोबत सुसंवाद, स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निवारण, कार्यालयीन सोयी सुविधा, कामकाजातील सुधारणा, आर्थिक व औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन, नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत सुकर जीवनमान, ऑनलाईन शस्त्र परवाना, बळीराजा समृद्ध मार्ग, जिल्हा प्रशासनाचे व्हाट्सअप चॅटबोट, शासकीय कामकाजात अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण, सेवाविषयक न्यायालयीन बाबी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर, कार्यालयीन व्यवस्थापन सुधारणा, चंद्रपूर येथील फ्लाईंग क्लब आदींबाबत माहिती दिली. तसेच जिल्हास्तरावरील कार्यालयांनी पहिल्या टप्प्यात 15 एप्रिलपर्यंत तर त्यांच्या क्षेत्रीय कार्यालयांनी 30 एप्रिलपर्यंत 100 दिवस कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी दिले.

००००००

“संवाद मराठवाड्याशी” उपक्रमांतर्गत विभागीय आयुक्त दिलीप गावडे साधणार विभागातील गरजू शेतकऱ्यांशी ऑनलाइन वेबिनारद्वारे संवाद

आठही जिल्हयातील गरजू शेतकरी बांधवानी सहभागी होण्याचे आवाहन.

छत्रपती संभाजीनगर, दि.१२ एप्रिल, (विमाका) :- मराठवाडा विभागातील आठही जिल्हयातील गरजू नागरिक आपल्या शेतातील जाण्या-येण्याच्या रस्त्याबाबत अडचणी घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयात प्रशासकीय अधिकारी यांच्या भेटीसाठी, निवेदने देण्यासाठी येतात. मात्र विभागीय पातळीवरील अधिकारी अनेकदा कामानिमित्त दौऱ्यावर किंवा अन्य कामामुळे त्यांची भेट होत नाही, हीच बाब विचारात घेत विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी गरजू नागरिकांशी ऑनलाइन वेबिनारद्वारे थेट संवाद साधण्यासाठीचा उपक्रम हाती घेतला आहे. 16 एप्रिल 2025 रोजी दुपारी 4 वाजता होणार आहे. शिव रस्ते, पाणंद रस्ते याबाबत विभागीय आयुक्त संवाद साधणार आहेत.

जे रस्ते अस्तित्वात आहेत त्यांना क्रमांक देण्यात यावेत. शेतजमिनीमध्ये वहिवाट करण्यासाठी अस्तित्वात असलेले रस्ते काही ठिकाणी अरुंद आहेत. अशा ठिकाणी मोठी वाहने जाण्यास अडचण निर्माण होऊन तक्रारही होतात. राज्यातील सर्वच शिवपाणंद आणि शेतरस्त्यांची हद्द निश्चित करून त्यांची कामे दर्जेदाररीत्या पूर्ण करावी, शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर महसूल प्रशासनामार्फत योग्य ती कार्यवाही करावी, शेत वहिवाट रस्त्याची तक्रार सुनावणी तहसीलदार यांच्याकडे होते. अशी रस्त्यांबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे एका महिन्यात निकाली काढावीत. असे स्पष्ट आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे  यांनी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने गरजू शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेणे, त्यांचे निराकरण करण्यासाठी विभागातील सर्व निवासी उप जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या उपस्थितीत सर्व गरजू शेतकऱ्यांशी या वेबिनारच्या माध्यमातून चर्चा आणि अडचणीचे निराकरण करण्यात येणार आहे.

याबाबतचा क्युआर कोडही प्रसिदध करण्यात येत आहे. गरजू नागरिकांना आपल्या मोबाईलव्दारे या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. तरी विभागातील सर्व गरजू शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी केले आहे.

 

शिवरस्ते, पाणंद रस्ते याबाबत संवाद.

Wednesday April 16, 15:45 – 18:00

https://us06web.zoom.us/j/83997100847?pwd=v1dSQaZXJrLlq41F3Wgo6MAZNJxfNy.1

Meeting ID: 839 9710 0847

Passcode: 073227

 

 

साप्ताहिक चित्रलेखाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

वाचकांच्या हृदयावर राज्य करणारे चित्रलेखा मासिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.१२ : चित्रलेखाचे  सामाजिक आणि साहित्यिक योगदान महत्त्वपूर्ण आहे. चित्रलेखा हे केवळ एक साप्ताहिक नसून, साहित्य, समाजजीवन आणि प्रश्नांचे आरसा असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. तर वाचकांच्या  मनात चित्रलेखाने आपले स्थान निर्माण केले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विलेपार्ले येथील मुकेश पटेल सभागृहात साप्ताहिक चित्रलेखाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल, राज्याचे कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, पणन, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्यासह चित्रलेखाचे अध्यक्ष मौलिक कोटक, मेनन कोटक, अभिषेककुमार चौहान, अभिनेत्री सरिता जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

Oplus_131072

हरकिशन मेहता, तारक मेहता यांच्यापासून ते मनन कोटकपर्यंतच्या परंपरेचा उल्लेख करत, हे साप्ताहिक नफ्यापेक्षा मूल्याधारित हेतूनं चालवले जाते, असे स्पष्ट करुन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, आरक्षण आंदोलन, नर्मदा प्रकल्प, 26/11 दहशतवादी हल्ला यांसारख्या संवेदनशील विषयांवर चित्रलेखाने निर्भीडपणे लेखन केले आहे. ‘लिख दो मेरे रोम रोम में राम’ या विशेषांकाचा उल्लेख करत राम मंदिर विषयावरही साप्ताहिकाचे योगदान अधोरेखित केले. पद्मपुरस्कार विजेते लेखक, सामाजिक मदतीसाठी उभे राहणे आणि साहित्यिक मूल्य जपणे – हाच चित्रलेखाचा खरा वारसा असल्याचे त्यांनी नमूद केले. शेवटी त्यांनी चित्रलेखाच्या कार्याची प्रशंसा करत यशस्वी 100 वर्षांचा टप्पा गाठण्याच्या शुभेच्छा दिल्या.

Oplus_131072

वाचकांच्या हृदयावर राज्य करणारे चित्रलेखा मासिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

साप्ताहिक चित्रलेखाने ७५ वर्षे वाचकांच्या हृदयावर राज्य केले आहे. मराठी, गुजराती वाचकांच्या  मनात चित्रलेखाने आपले स्थान निर्माण केले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, कोरोना कालावधीनंतर आज मासिक चालवणे कठीण असतानाही चित्रलेखा हे मासिक वाचकांच्या प्रेमामुळेच सुरू आहे. चांगल्या साहित्याची गरज असलेल्या संवेदनशील समाजाला चित्रलेखाने योग्य दिशा दिली. चित्रलेखा मराठी प्रकाशन काही काळासाठी बंद झाले असले तरी किमान त्याचे इंटरनेट आवृत्ती पुन्हा सुरू करण्याचे आवाहनही त्यांनी कोटक कुटुंबीयांना केले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा उल्लेख करत चित्रलेखाने त्याचे मूळ रूप वाचकांपर्यंत पोहोचवले याचेही  कौतुक केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच चित्रलेखाच्या ७५ वर्षाचा प्रवासाची शॉर्टफिल्म दाखवण्यात आली.

 

००००

रायगड हे केवळ पर्यटनस्थळ न राहता ते प्रेरणास्थळ बनावे–केंद्रीय गृह मंत्री अमित शाह

रायगड (जिमाका) दि.१२ :- छत्रपती शिवजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण जगाचे प्रेरणास्थान आणि आदर्श आहेत. त्यामुळे छत्रपती शिवरायांची राजधानी असलेले रायगड  हे केवळ पर्यटनस्थळ न राहता ते प्रेरणास्थळ बनावे असे प्रतिपादन केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज किल्ले रायगडावर  अभिवादन केले. राजसदरेवर श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या स्थानिक उत्सव समिती महाड यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,  केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार,महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले, रोहयो मंत्री भरत गोगावले, खा.उदयनराजे भोसले, खा.धैर्यशिल पाटील, आमदार सर्वश्री प्रशांत ठाकूर, रविशेठ पाटील, महेश बालदी, प्रवीण दरेकर,  विक्रम पाटील, विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे, सुधीर थोरात, पांडुरंग बलकवडे आदि उपस्थित होते.

दरवर्षी स्मारक मंडळाच्या वतीने स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर होत असताना योगदान देणाऱ्या सरदार घराण्याचा सन्मान करण्यात येतो.  यंदा होळकर घराण्याचा सन्मान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते उदयसिंह होळकर यांचा सन्मान करण्यात आला. तसेच सैन्यदल अधिकारी ले.जन. संजय कुलकर्णी यांचा सन्मान करण्यात आला.  केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह  यांच्याहस्ते श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार दुर्ग अभ्यासक निलकंठ रामदास पाटील यांना प्रदान करण्यात आला. तसेच अशोक बांगर लिखित शिवरायमुद्रा’ स्मरणिका प्रकाशन करण्यात आले.

यावेळी उपस्थित शिवप्रेमींशी संवाद साधताना श्री.शाह म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं भाग्य लाभलं. सुरुवातीलाच मी राजमाता जिजाऊंना मनःपूर्वक प्रणाम करतो. मी शिवचरित्र वाचलंय, त्यांनी छत्रपतींना फक्त जन्मच दिला नाही, तर स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषेचा पुनरुद्धार करण्याची प्रेरणाही दिली. स्वतंत्र स्वराज्य निर्माण करण्याचा विचारही जिजाऊंनी बाल शिवाजींना दिला. हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड या ऐतिहासिक स्थळी शिवाजी महाराजांना प्रणाम करतांनाच्या माझ्या भावना वर्णन करू शकत नाही असेही ते म्हणाले.

दृढ इच्छाशक्ती, अगम्य साहस, अकल्पनीय रणनीत आणि समाजातील सर्व वर्गांना एकत्र करुन अपराजित सैन्याची स्थापना हे शिवरायांशिवाय कोणाला जमलं नाही. महाराजानंतर धर्मवीर संभाजी महाराज, महाराणी ताराबाई, धनाजी, संताजी यांनी औरंगजेब जिवंत असेपर्यंत त्याच्याशी लढा दिला.  स्वतःला आलमगीर म्हणणाऱ्या औरंगजेबाची  महाराष्ट्रात कबर बांधली गेली. भारतातील पुढच्या पिढीला हा इतिहास शिकवला गेला पाहिजे. सातवी ते बारावीचा प्रत्येक विद्यार्थी एकदा या पुण्यस्थळी यावा यासाठी धोरण बनवावं अस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चर्चे दरम्यान सांगितले असल्याचेही श्री.शाह यांनी यावेळी सांगितले. रायगड किल्ला इंग्रजांनी जाणूनबुजून तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी ठणकावून स्वराज्याचा जयघोष केला असही श्री.शाह म्हणाले. तसेच त्यांनी यावेळी बाबासाहेब पुरंदरेंचेही स्मरण केले. छत्रपती शिवरायांना महाराष्ट्रापुरते सीमित ठेवू नका, त्यातून देश आणि जगाला प्रेरणा घेऊ द्या असेही त्यांनी यावेळी सांगितले. न्यायासाठी शिवरायांचे सिद्धांत त्यांनीच प्रस्थापित केले. स्वराज्याची, स्वभाषेला अमर करण्याची लढाई थांबता कामा नये, हे शिवरायांचे अखेरचे शब्द होते. छत्रपती शिवारायांचे हे शब्द प्रमाण मानून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ही लढाई गौरवाने जगभरात सुरु आहे. भारताला विश्वभरात गौरवमय स्थानी प्रस्थापित करण्याचं काम मोदी सरकार करत आहे असेही त्यांनी  यावेळी सांगितले.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान घेऊन सरकार पुढे जात आहे. महाराजांच्या बारा किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश व्हावा, यासाठी युनेस्को कडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यासाठी युनेस्को परिषदेत सादरीकरण करण्यासाठी मी आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार जाणार आहोत.  छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमाण इतिहास तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारकाचे काम लवकर सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. पण लवकर त्यावर तोडगा निघेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी  यावेळी व्यक्त केला.

 शिवाजी महाराज हे व्यक्ती नाही विचारसरणी होती. गडकिल्ले हे स्वराज्याचे प्रतीक आहेत. गडकोट किल्ल्यांचे संरक्षण आणि अतिक्रमण मुक्त झाले पाहिजे यासाठी सरकार पुढाकार घेतय पण पुरातत्व विभागाने सहकार्य करावे अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेवून हे सरकार काम करत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

खासदार उदयन राजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच युगपुरुषांचा वारंवार होणारा अवमान थांबवण्यासाठी अजामीनपात्र कायदा तयार करण्याची मागणी यावेळी केली. तसेच महाराजांवरील पुस्तके आणि चित्रपटासाठी सिनेमॅटीक लिबर्टीच्या संदर्भातही एक सेन्सॉर बोर्ड अशी मागणी यावेळी केली. तसेच रामायण सर्किट, बौद्ध सर्किटच्या धर्तीवर शिवस्वराज्य सर्किट व्हावे, दिल्लीत महाराजांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, दावणगिरी जिल्ह्यातील शहाजी महाराजांच्या समाधीसाठी केंद्र व राज्य सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा. अरबी समुद्रातील स्मारकाचे भूमीपूजन झाले. त्यात काही अडचणी आल्या असतील तर राज्यपाल भवनात मुबलक जागा आहे हे स्मारक तिथे करण्यात यावे अशी सूचना वजा मागणी खा.उदयनराजे भोसले यांनी यावेळी केली.

या सर्व कार्यक्रमानंतर केंद्रीय गृहमंत्री श्री.शाह आणि उपस्थित सर्व मान्यवर यांनी जगदीश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच समाधी स्थळ येथे भेट देऊन अभिवादन केले. यावेळी समाधी स्थळावर हेलिकॉप्टर द्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच रायगड पोलीस दलाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना शासकीय मानवंदना देण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे यांनी केले तर सूत्र संचलन मोहन शेटे यांनी केले. या कार्यक्रमाला विविध विभागांचे शासकीय अधिकारी, कर्मचारी, पत्रकार तसेच शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००००

उमरेड एमआयडीसी मधील अपघातात मयत व्यक्तींच्या कुटुंबास ६० लाख रुपयांची मदत- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मृत्यू झालेल्या व जखमी झालेल्या कामगारांच्या परिवारातील एका व्यक्तीला कंपनीत नोकरी

 पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांची घटनास्थळी भेट देऊन पाहणी

 नागपूर,दि. १२ : उमरेड एमआयडीसीमधील एमएमपी कंपनीमध्ये दिनांक ११ एप्रिल रोजी भिषण स्फोटात मृत पावलेल्या कामगारांच्या कुटुंबास ६० लाख रुपयांची तर जखमी झालेल्या कामगारास ३० लाख रुपयांची मदत केली जात असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. या दुर्देवी अपघातात मृत व जखमी झालेल्या कामगारांच्या परिवारासोबत शासन खंबीरपणाने उभे आहे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची खबरदारी आम्ही घेत असून जे जखमी आहेत त्यांच्यावर शासनातर्फे मोफत उपचार केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

उमरेड येथील एमएमपी कंपनीमध्ये दिनांक ११ एप्रिल रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास भिषण स्फोट होऊन तीन कामगार जागीच मृत्यू पावले. तर आठ कामगार हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलविण्यात आले होते. यातील २ कामगारांचा उपचार सुरु असतांना मृत्यु झाला.

घटनेची माहिती कळताच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना निर्देश देवून जखमींवर उपचारांबाबत व आवश्यक ती मदत देण्यास सांगितले होते.

आज दिनांक १२ एप्रिल रोजी सकाळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी तातडीने उमरेड येथील घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. कामगारांच्या जिवावर बेतणारे अपघात यापुढे होऊ नये यासाठी औद्योगिक सुरक्षिततेच्यादृष्टीने जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. घटनास्थळाची पाहणी करताना त्यांच्या समवेत खासदार श्याम बर्वे, आमदार संजय मेश्राम, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, माजी आमदार राजू पारवे, सुधीर पारवे, राजेंद्र मुळक, कंपनीचे प्रमुख अरुण भंडारी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अपघातात मृत कामगारांच्या कुटुंबियांना कंपनीतर्फे ५५ लाख तर शासनातर्फे ५ लाख अशी आर्थिक मदत दिली जाईल. याचबरोबर जखमी कामगारांना कंपनीतर्फे ३० लाख रुपये आर्थिक मदत व शासनातर्फे मोफत उपचार करण्यात येत आहेत. याच बरोबर मृत्यू व जखमी झालेल्या परिवारातील एका व्यक्तीला कंपनीत नोकरी दिली जाणार आहे.

अपघातात मृत पावलेले कामगारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. पियुष दुर्गे – रा.पांजरेपार, ता.भिवापूर, जि. नागपूर, सचिन पुरुषोत्तम मसराम – रा.पांजरेपार, ता.भिवापूर, जि. नागपूर, निखिल शेंडे – रा. विरखंडी, ता.भिवापूर, जि.नागपूर, अभिलाष जंजाळ – रा.गावसूत, ता.उमरेड, व निखिल नेहारे – रा. चिखलढोकडा, ता. उमरेड, जि.नागपूर

अपघातात जखमीमध्ये मनीष वाघ – रा.पेंढराबोडी, ता.भिवापूर, जि.नागपूर, करण शेंडे – रा.पांजरेपार, ता.भिवापूर, जि. नागपूर, नवनीत कुमरे – रा.मांगली, ता.उमरेड, जि.नागपूर, पियुष टेकाम – रा.पांजरेपार, ता.भिवापूर, जि. नागपूर, करण बावणे – रा.पिंपळा, ता.उमरेड, जि.नागपूर, कमलेश ठाकरे – रा.गोंडबोरी, ता.भिवापूर, जि.नागपूर.

                                             ******

ताज्या बातम्या

अल्पसंख्याक समुहातील विद्यार्थ्यांना परदेश शिक्षणाची संधी

0
अल्पसंख्याक समुहाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना विविधतेत एकता असलेला भारत देश हा अनेक जाती समुहांचा एकसंध देश आहे. याची संस्कृती आणि एकता अबाधित राहण्यासाठी सर्व...

साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार २०२५ साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

0
नवी दिल्ली, दि. 3 : साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार वर्ष २०२५ साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख...

‘क्रिएट इन इंडिया’ स्पर्धेतील विजेत्यांचे उद्या सादरीकरण

0
मुंबई, दि. ०३ : जिओ वर्ल्ड सेंटर, बीकेसी येथे वेव्हज्‌ 2025 या आंतरराष्ट्रीय दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषदेत उद्या ४ मे रोजी ' क्रिएट इन...

स्थानिक विषयावरील आशयघन निर्मिती जागतिक स्तरावर प्रभावशाली ठरेल – डिबेरा रिचर्ड्स

0
मुंबई, दि. ०३ : मनोरंजनाच्या स्पर्धेत यशस्वी होत दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी कोणत्याही माध्यमातून व्यक्त होताना आशयघन मांडणी महत्त्वाची बाब आहे. त्यादृष्टीने स्थानिक विषयावरील सकस...

‘आयआयसीटी’ची स्थापना भारतासाठी महत्त्वाची – केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

0
मुंबई, दि. ०३: भारताच्या एव्हीजीसी-एक्सआर परिसंस्थेला सक्षम बनवण्याच्या दिशेने एक मोठी झेप घेत, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने, फिक्की आणि सीआयआयच्या सहकार्याने, केवळ एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्रासाठी...