शनिवार, मे 3, 2025
Home Blog Page 55

राजधानी दिल्लीशी डॉ. बाबासाहेबांचे जिव्हाळ्याचे नातं…..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील बराच काळ दिल्लीत गेला.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि दिल्लीचे एक वेगळे नातेही निर्माण झाले.  ब्रिटिश सरकारच्या  म्हणजे प्रांतीय मंत्रिमंडळात ते कामगार मंत्री होते त्यामुळे दिल्लीत त्यांचे वास्तव्य असायचे. या काळात ते देशभर फिरत होते. जनतेच्या समस्या जाणून घेत होते आणि मंत्री म्हणून त्यावर निर्णय घेत होते. 

दिल्लीत असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाच्या उभारणीत मोठे योगदान दिले. याच काळात,  म्हणजे दिल्लीत असताना त्यांनी देशावर दीर्घकालीन परिणाम करणारे निर्णय घेतले.  मग ते कामगार कायदे असोत की महिलांच्या अधिकाराचे निर्णय असोत. याच काळात बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत करून  राज्यघटनेचा मसुदा तयार केला तसेच त्यानंतर हिंदू कोड बिल तयार केले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा दिल्लीत आलेत तेव्हा ते एकटे राहत असत. माता रमाईचे निधन झाल्यानंतर तसे बाबासाहेब खूप दुखावले होते. पण आपल्या प्रकृतीच्या तपासणीसाठी त्यांचे मुंबईला नियमितपणे वैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी जावे लागत असे. तिथेच डॉक्टर मालवणकर यांच्याकडे डॉ सविता कबीर यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट झाली आणि त्यांचे कोर्ट मॅरेज झाले.  याच काळात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनेक ग्रंथाचे लिखाण केले.  देशाच्या फाळणीवरील त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ त्यांनी दिल्लीतच पूर्ण केला.  त्यानंतर त्यांच्या आयुष्यातील शेवटचा जगप्रसिद्ध असलेला ग्रंथ  “बुद्ध आणि त्यांचा धम्म ” दिल्लीतच लिहीला. या काळात दिल्लीतील लोकांशी त्यांचे संबंध आले. हे नाते दृढ होत गेले.

उत्तर भारतीयांचा गोतावळा त्यांच्या भोवती असायचा. त्यांना बघायलाऐकायलाभेटायला लोक सतत येत असत. सुरूवातीला बाबासाहेब यांचे निवास 1 हाार्डिंग एवेन्यु (गुबंद कोठी)  येथे होते. सध्या याला टिळक मार्ग म्हणतात. त्यांचे शेवटचे दिवस सीव्हील लाईन्स येथील  26 अलीपुर रोड येथील कोठीत गेले. भारत सरकारने बाबासाहेब यांच्या स्मरणार्थ या ठीकाणी मोठे स्मारक बांधले आहे.

दिल्लीत असताना बरेच लोकांचा त्यांच्या परीच‍य झाला. हा ऋणाणुबंध वाढला. बाबासाहेबांना बरेच लोक आपले सुख दु:ख सांगत असत. बाबासाहेब यांच्या आऊट कार्टरमध्ये  त्यांचे निकटवर्ती सोहनलाल शास्त्रीजे विधी विभागात अधिकारी होतेते राहत असत. त्यांचा बाबासाहेबांशी जवळीकतेचा स्नेह होता. त्यांच्या जवळचे असलेले चौधरी देवीदास जी यांचे ही बाबासाहेब यांच्या दिल्लीतील घरी येणे जाणे होत असे.  चौधरी देवीदास यांचा मुलगा लाला हरीचंद आणि सुन भुरिया देवी यांना 2 ऑक्टोबर 1949 रोजी पुत्र रत्न झाले आणि या बालकाचे नाव गुलाब सिंग असे ठेवण्यात आले. ही आनंदाची बातमी बाबासाहेबांना दयायची होती. त्या दिवशी बाबासाहेब दिल्लीत नव्हते. ते दोन दिवसांसाठी काश्मीर दौऱ्यावर होते. बाबासाहेब काश्मीरहून परत आल्यावर कळाल्यावर चौधरी देवीदास  यांनी लाडुचा डबा घेऊन बाबासाहेबांचे घर गाठले. तेव्हा बाबासाहेब त्यांच्या मित्र  आणि आप्तांसोबत चर्चेत दंग होते. बाबासाहेबांनी चौधरी देवीदास यांना गेटमधून येताना बघ‍ून देवीदास यांचे अभिवादन स्वीकारले. देवीदास हे अंत्यत हर्षामध्ये बाबासाहेबांना सांगू लागले की त्यांना नातु झालेला आहे.  मिठाई त्याच्या आनंदात आणली आहे. बाबासाहेबांना मधुमेह असल्यामुळे त्यांनी ती खाल्ली नाही मात्रसोबत असणाऱ्यांमध्ये वाटून द‍िली. नातवाचे नाव गुलाब सिंग ठेवण्यात आले असल्याचे चौधरी नी बाबासाहेबांना सांगितले. त्यावर बाबासाहेब यांनी शुभेच्छा देत विचारलेआई आणि बाळ दोघेही बरे आहेत ना. यावर चौधरी  यांनी होकारार्थी उत्तर दिले.

बाबासाहेब म्हणालेगुलाब सिंग हे नाव काही बरे वाटत नाही. त्यांनी बाजुला ठेवलेले वर्तमान पत्र उचललेत्यात शांतीस्वरूप हे नाव वाचले आणि चौधरी यांना सांगितले की आता तुझ्या नातवाचे नाव गुलाब सिंग हे न ठेवता तु शांतीस्वरूप असे ठेव. त्याप्रमाणे चौधरी देवीदास यांनी कागदोपत्री नाव बदलून शांतीस्वरूप हे नाव ठेवले.

पुढे शांतीस्वरूप यांनी भारत सरकारच्या गृह खात्यात नोकरी केली. निवृत्त झाल्यानंतर त्यांनी  ‘सम्यक’ या नावाने प्रकाशन संस्था सुरू केली. उत्तर भारतातील नवोद‍ित लेखकांना त्यांनी संधी दिली. वर्ष 2020 मध्ये त्यांचे निधन दिल्ली येथे झाले. आताही त्यांची प्रकाशन संस्था आहे.  हयात असेपर्यंत ते सर्वाना मोठया अभिमानाने सांगतमाझे शांतीस्वरूप हे नाव  बाबासाहेबांनी ठेवले आहे. अशा अनेक आठवणी बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिल्लीतील आहेत.

 प्रज्ञा सूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वच स्तरातील लोकांमध्ये लोकप्रिय होते. आजही राजधानीत त्यांच्या आठवणी संसदेपासून ते दिल्लीतील लोकांमध्ये  जाग्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा !

अंजु निमसरकर-कांबळे माहिती अधिकारी

0000000

अंजु निमसरकर/ विशेष लेख /दि.11.04.2025

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दि.१४ व १५ एप्रिल २०२५ रोजी टूर सर्कीटचे आयोजन-पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

मुंबईदि.१२: राज्य शासनाच्या पर्यटन विभागाच्या पर्यटन संचालनालयामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीचे औचित्य साधूनत्यांच्या महान कार्याचे आणि जीवनाचे महत्त्व समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने मुंबईनाशिक आणि नागपूर येथे दि.१४ व १५ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट सहलीचे आयोजन करण्यात येत आहे. टूर सर्कीट अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित महत्त्वाच्या स्थळांचा समावेश असूनया सहली नागरिक,पर्यटकांसाठी विनाशुल्क आयोजित करण्यात येत आहेत अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबडेकर टूर सर्कीटमध्ये मुंबईतील दादरमधील चैत्यभूमीराजगृहप्रिटींग प्रेसपरळ येथील बि.आय.टी चाळवडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयफोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालय या स्थळांचा समावेश आहे. तर नाशिकमधील येवले मुक्तीभूमीत्रिरश्मी लेणी आणि काळाराम मंदिर या स्थळांचा समावेश आहे. तर नागपूर येथील दिक्षाभूमीडॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयकामठी येथील ड्रॅगन पॅलेस आणि नागलोक विहार या स्थळांचा समावेश आहे. सदर टूर सर्कीटच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी जीवनाचा आणि त्यांच्या सामाजिक समताशिक्षण आणि संविधान निर्मितीतील योगदानाचे महत्त्व सर्व सामान्य नागरिक व पर्यटकांपर्यंत पोहोचविण्याचा हा शासनाचा प्रयत्न आहे. सर्व नागरिक/ पर्यटकांना या सहलीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त पर्यटन संचालनालयाने आयोजित केलेले टूर सर्किट हे सामाजिक समता आणि ज्ञानप्रसाराचे प्रतीक आहे. बाबासाहेबांचे विचार आणि कार्य आजही लाखो लोकांना प्रेरणा देतात. या टूर सर्किटद्वारे त्यांच्या जीवनाशी  निगडीत स्थळांना भेट देऊन पर्यटकांना त्यांचा समृद्ध वारसा समजण्याची संधी मिळेल. महाराष्ट्रातील चैत्यभूमीदीक्षाभूमीमुक्ती भूमी यांसारख्या ठिकाणांचा समावेश या उपक्रमात आहेज्यामुळे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पर्यटनाला चालना मिळेल. हा उपक्रम बाबासाहेबांच्या सामाजिक क्रांतीच्या संदेशाला पुढे नेण्यासाठी महत्त्वाचा आहे. पर्यटन विभागाचा हा प्रयत्न स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देईल आणि बाबासाहेबांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवेल. या टूर सर्किटला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेलअसा विश्वास आहे. पर्यटन क्षेत्रातून सामाजिक जागरूकता वाढवण्याचा हा अनोखा प्रयत्न यशस्वी होईल.

 

समतेचा संदेश सर्वदूर पोहोचवण्यासाठी अभिनव उपक्रम : प्रधान सचिव अतुल पाटणे

प्रधान सचिव अतुल पाटणे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पर्यटन संचालनालयाने आयोजित टूर सर्किट हा एक अभिनव उपक्रम आहे. बाबासाहेबांचे विचारत्यांचे सामाजिक योगदान आणि भारतीय संविधान निर्मितीतील त्यांचे कर्तृत्व यांचा गौरव करणे हा या सर्किटचा उद्देश आहे. या टूर सर्किटद्वारे पर्यटकांना बाबासाहेबांच्या जीवनाशी निगडीत महत्त्वाच्या स्थळांचा अनुभव घेता येईलज्यामुळे त्यांचा इतिहास आणि तत्त्वज्ञान समजण्यास मदत होईल. चैत्यभूमीदीक्षाभूमी यांसारखी स्थळे केवळ धार्मिक नव्हेतर सामाजिक परिवर्तनाची प्रेरणास्थाने आहेत. हा उपक्रम पर्यटनाला प्रोत्साहन देतानाच स्थानिक समुदायांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करेल. डॉ. बाबासाहेबांचा समतेचा संदेश सर्वदूर पोहोचवण्यासाठी हा प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरेल. पर्यटन संचालनालयाने यासाठी सखोल नियोजन केले असूनपर्यटकांना सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

टूर सर्किटची वैशिष्ट्ये

आयोजनाची ठिकाणे : मुंबईनाशिक आणि नागपूर

कालावधी : दि. १४ व १५ एप्रिल२०२५

 सुविधा: प्रत्येक शहरात दररोज दोन बसेसद्वारे सहलटूर गाइडअल्पोपहारप्रथमोपचारपिण्याचे पाणी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित माहिती पुस्तिकेचे वितरण.

सहलीसाठी संपर्क :
मुंबई ९९६९९७६९६६
नाशिक ९६०७५२७७६३/ ९६५७०२१४५६
नागपूर ९७६४४८१९१३/ ७२१८७८३५१५

000

जनतेचा पैसा जनतेच्या विकासासाठी प्रामाणिकपणे खर्च करण्याला प्राधान्य – पालकमंत्री नितेश राणे

जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि.11 (जि.मा.का.) :-  जिल्ह्यातल्या प्रत्येक कुटुंबाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आणि त्यांचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. त्यामुळे जिल्हा नियेाजन समितीअंतर्गत देण्यात येणारा निधी अखर्चित राहता कामा नये. जनतेचा पैसा जनतेच्या विकासासाठी खर्च व्हावा याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांग‍ितले.

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील पहिली जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी खासदार नारायण राणे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उप वनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी २८२ कोटी रुपयांचा नियतव्यव शासनाने मंजुर केला आहे. हा निधी जिल्ह्याच्या विकासासाठी वापरण्यात येणार आहे. निधी खर्च करत असताना आर्थिक शिस्तीला प्राधान्य असणार आहे. हा निधी कुठे , किती आणि कशा प्रकारे खर्च केला जाईल यावर लक्ष असणार आहे. कामांच्या बाबतीत कोणाचीही तक्रार येता कामा नये. आपला जिल्ह्याचा दरडोई उत्पन्नात पहिल्या ५ जिल्ह्यांमध्ये समावेश करण्यासाठी प्रयत्नशील राहणार. जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. यावर्षी निधीचे योग्य नियेाजन करण्यात येईल. जलजीवनची निकृष्ट कामे केलेल्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे.  हत्ती आणि इतर वन्य प्राण्यांचा त्रास कमी करण्यासाठी माजिक संस्थांची मदत घेण्यात येईल. आजारी प्राण्यांना पकडून सुरक्षित ठिकाणी त्यांच्यावर उपचार होणे आवश्यक आहे. यासाठी वनतारा सारख्या संस्थेची मदत घेऊन काम करणार आहोत. वनमंत्री गणेश नाईक यांच्या सोबत बैठक झाली असून गुजरात वनविभाला पत्रव्यवहार केला जात आहे.  लवकरच हत्तीं आणि इतर वन्यप्राण्यांचा त्रास संपेल अशी माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.

पालकमंत्री म्हणाले, प्रशासनाच्या कामात आता कृत्रिम बुध्दीमत्ता म्हणजेच Artificial intelligence चा वापर करण्यात येणार आहे. यासंदर्भात संस्थेशी बोलणी सुरू असून जिल्ह्याच्या विकासात तंत्रज्ञानाची महत्वाची मदत होणार आहे असेही ते म्हणाले.

खासदार नारायण राणे यांनी जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढण्यासाठी शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्याबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गाय, म्हैस तसेच शेळी अशा दुभत्या जनावरांचे वाटप करा जेणेकरुन त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. आपला जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने राष्ट्रीय महामार्ग ते समुद्र किनारा यादरम्यानच्या रस्त्यांची रुंदी वाढवावी, यामध्ये विशेष करुन मालवण, वेंगुर्ला, देवगड तसेच आंबोली या रस्त्यांचा समावेश करावा. तसेच जिल्ह्यात लोकमान्य टिळकांचा भव्य दिव्य असा पुतळा उभारावा, जागतिक दर्जाचे उद्यान उभारावे असेही त्यांनी यावेळी सुचविले.

आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याबाबत विनंती केली.

आमदार निलेश राणे यांनी आपला जिल्हा ड्रग्जमुक्त करण्यासाठी पोलिस प्रशासनाने आणखी प्रयत्न करण्याच्या सुचना केल्या. ग्रामीण पाणी पुरवठा वर निधी खर्च होत नाही आणि त्याची तरतूद शून्य टक्के कशी  असा प्रश्न उपस्थित केला. आदिवासी बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा निधी अपुऱ्या प्रमाणात असून तो वाढविण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

झोपडपट्टीधारक, रस्ता रुंदीकरण बाधितांच्या तक्रारींवर कार्यवाही करावी; पाणीटंचाईची समस्या दूर करा – वनमंत्री गणेश नाईक यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित जनता दरबारास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ठाणे, दि. 11 (जिमाका): वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात जनता दरबार पार पडला. या जनता दरबारात नागरिकांनी विविध समस्यांवर आधारित 345 हून अधिक निवेदने सादर केली.
वनमंत्री नाईक यांनी शक्य असलेल्या निवेदनांवर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून अथवा प्रत्यक्ष सूचना देऊन दिले. उर्वरित निवेदनांवर निश्चित कालमर्यादेत कार्यवाही केली जाईल आणि त्याबाबत पुढील जनता दरबारात अर्जदारांना माहिती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.
या जनता दरबाराला माजी खासदार डॉ. संजीव नाईक, संजय वाघुले, आमदार निरंजन डावखरे, मनोहर डुंबरे, नारायण पवार यांच्यासह विविध शासकीय आणि निमशासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आजच्या जनता दरबारात नागरिकांनी विशेषतः पाणीटंचाई, रस्ता रुंदीकरणामुळे झालेले अन्याय आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमधील गैरव्यवहार यांसारख्या समस्यांवर भर दिला. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत मूळ झोपडीधारकांच्या नावाऐवजी इतरांची नावे समाविष्ट केल्याच्या तक्रारी झोपडीधारकांनी मांडल्या.
रस्ता रुंदीकरणामुळे बाधित झालेल्या अनेक नागरिकांना अद्याप घरे व दुकाने न मिळाल्याने त्यांनी आपल्या व्यथा व्यक्त केल्या. विविध भागांतील पाणीटंचाईमुळे त्रस्त नागरिकांनी सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी निवेदने सादर केली. या पार्श्वभूमीवर, वनमंत्री नाईक यांनी रस्ता रुंदीकरण बाधितांना लवकरात लवकर न्याय देण्याची सूचना महापालिका अधिकाऱ्यांना केली. तसेच, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. सर्वसामान्य नागरिकांच्या जमिनी बळकावल्याच्या प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. ज्या प्रवृत्तींनी सर्वसामान्यांच्या जीवनात दुःख निर्माण केले आहे, त्यांनी आपली चूक सुधारावी, असा स्पष्ट सल्लाही ना. नाईक यांनी दिला.
याप्रसंगी बोलताना वनमंत्री गणेश नाईक म्हणाले, “लोकांच्या समस्या अनेकदा स्थानिक पातळीवर सुटत नाहीत. अशा वेळी त्यांना दिलासा मिळावा आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण होऊन त्यांची निराशा दूर व्हावी, हाच जनता दरबार घेण्यामागचा उद्देश आहे. येथे आलेल्या प्रत्येक प्रकरणाला शंभर टक्के न्याय मिळवून देण्यासाठी आमचे निश्चित प्रयत्न राहतील. आतापर्यंत झालेल्या जनता दरबारातील तक्रारींपैकी जवळपास 60 टक्के तक्रारींचे निराकरण करण्यात आम्हाला यश आले आहे. नागरिक आनंदाने पुष्पगुच्छ किंवा शाल घेऊन येतात, पण मी इथे केवळ लोकसेवेच्या भावनेतून आलो आहे.”
ते पुढे म्हणाले, “निश्चितच, लोकांना दिलासा देण्यासाठी जनता दरबार हे एक उत्तम माध्यम आहे. महानगरपालिका क्षेत्रात पाणीटंचाई, कचरा व्यवस्थापन, वाहतूक आणि कंत्राटी सेवांसारखी अनेक आव्हाने आहेत. घनकचरा व्यवस्थापनात आयुक्तांना काही अडचण असल्यास निश्चितपणे मदत केली जाईल, कारण ठाणेकर जनता आपलीच आहे. एकेकाळी मी 15 वर्षे ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि आता संपर्कमंत्री म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील किंवा भारतातील कोणतीही जनता असो, ती आपलीच आहे. जनतेच्या समस्या व व्यथा ऐकून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणे हे आमचे कर्तव्य आहे.”
कांदळवनाबाबत बोलताना वनमंत्री नाईक म्हणाले, “सागरी किनाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विकास होत असल्याने कांदळवन तोडण्याचे प्रमाण वाढले आहे. जर कोणी कांदळवनात अतिक्रमण केले, तर त्याच्यावर तात्काळ कठोर कारवाई केली जाईल. गरज पडल्यास अनधिकृत बांधकामे पाडली जातील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणालाही बख्शले जाणार नाही. गरीब नागरिकांनी बांधलेल्या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन दुसऱ्या ठिकाणी केले जाईल. उदाहरणार्थ, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 1.5 लाखांची वस्ती आहे, ज्यात मूळच्या 42 आदिवासी वाड्या-पाड्यांमधील लोक राहतात. त्यांचे पुनर्वसन म्हाडाच्या माध्यमातून राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेर उत्तन आणि ठाणे येथे केले जाणार आहे. नियमांचे उल्लंघन होईल, असे कोणतेही काम केले जाणार नाही. सध्या वर्सोवा ते नालासोपारा येथे पूल आणि रस्त्यांची कामे सुरू आहेत.”
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोककल्याणासाठी 100 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम तयार केला आहे, असे सांगून ना. नाईक म्हणाले, “नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेला माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी, जसे की जल जीवन मिशन, शुद्ध पाणी, रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य आणि मनोरंजन या सुविधा देण्यावर भर दिला आहे. त्यामुळेच देशाची प्रगती होत आहे. जनसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा यासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री विविध स्तरांवर प्रयत्न करत आहेत. विशेषतः वनविभागाच्या अनेक अडचणी होत्या, परंतु दोन दिवसांपूर्वी नागपूरमध्ये झालेल्या बैठकीत वनविभागाच्या समस्या सोडवण्यासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ अशी घोषणा केली आहे.”
जनता दरबार कार्यक्रमाला पोहोचण्यापूर्वी वनमंत्री गणेश नाईक यांनी कोर्ट नाका येथील महात्मा ज्योतिबा फुले विचार कट्टा येथे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत ठाणे जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांचा कायापालट – केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आभार व्यक्त

ठाणे, दि.11(जिमाका):- भारतीय रेल्वेच्या “अमृत भारत स्टेशन” योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण 132 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेवेळी ही माहिती देण्यात आली. महाराष्ट्रातील रेल्वेच्या दर्जेदार पायाभूत सुविधेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री श्री. वैष्णव यांचे आभार मानले.

या योजनेत ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा, शहाड, दिवा आणि बेलापूर या महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे. यामुळे या भागातील प्रवाशांना आधुनिक सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

या योजनेमुळे स्थानकांवर प्रवाशांसाठी वेटिंग लाऊंज, फूड कोर्ट्स, स्वच्छतागृहे, लिफ्ट्स, एस्कलेटर्स आणि डिजिटल सुविधांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच, स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि शहराशी अधिक सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित केली जाणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील पुनर्विकासासाठी निवडलेल्या स्थानकांची नावे आणि त्यासाठीचा निधी पुढीलप्रमाणे आहे:
* टिटवाळा स्टेशन: 25 कोटी रुपये
* शहाड स्टेशन: 8.4 कोटी रुपये
* दिवा स्टेशन: 45 कोटी रुपये
* बेलापूर स्टेशन: 32 कोटी रुपये

याव्यतिरिक्त, कल्याण डोंबिवली परिसरातील डोंबिवली स्टेशनचा देखील या योजनेत समावेश आहे.

या योजनेमुळे ठाणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना निश्चितच चांगला अनुभव मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत अमरावती जिल्ह्यातील ३ रेल्वे स्थानकांचा कायापालट – रेल्वे मंत्री अश्व‍िनी वैष्णव यांची माहिती

अमरावती, दि. 11 : भारतीय रेल्वेच्या ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेंतर्गत राज्यातील एकूण 132 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. यात जिल्ह्यातील तीन रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यासोबतच बडनेरा रेल्वे स्थानकाला 36.3 कोटी आणि धामणगाव रेल्वे स्टेशनला 18 कोटी रुपयांचा निधी दर्जेदार सुविधा उपलब्ध करण्यासाठी देण्यात येणार आहे.

या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेवेळी ही माहिती देण्यात आली. महाराष्ट्रातील रेल्वेच्या दर्जेदार पायाभूत सुविधेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री श्री. वैष्णव यांचे आभार मानले.

या योजनेत समाविष्ट काही महत्त्वाची स्थानके म्हणजे अमरावती आणि ग्रामीण भागातील स्थानकांमध्ये बडनेरा आणि धामणगाव रेल्वे यांना स्थान देण्यात आले आहे.

या योजनेमुळे स्थानकांवर प्रवाशांसाठी वेटिंग लाऊंज, फूड कोर्ट्स, स्वच्छतागृहे, लिफ्ट्स, एस्कलेटर्स आणि डिजिटल सुविधांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच, स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि शहराशी अधिक सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित केली जाणार आहे.

या पुनर्विकासात स्थानकांची नावे आणि त्यासाठीचा निधी पुढीलप्रमाणे आहे. बडनेरा (36.3 कोटी), धामणगाव स्टेशन (18 कोटी) निधी देण्यात येणार आहे

शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत – शिक्षणमंत्री दादाजी भुसे

नंदुरबारदिनांक 11 एप्रिल, 2025 (जिमाका) : शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावा. आपल्या शाळेसाठीच नव्हे, तर संपूर्ण राज्यासाठी करण्याच्या भावनेने  कर्तव्य करावे, असे आवाहन शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले.

मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात शिक्षण विभागाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक झाली. त्यावेळी मंत्री श्री. भुसे बोलत होते. या बैठकीस साक्रीच्या आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांच्यासह शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रवीण अहिरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वंदना वळवी, शिक्षणाधिकारी (योजना) उर्मिला पारधे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डॉ. राजेंद्र महाजन, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) नीलेश लोहकरे, अधिव्याख्याता, डाएट बाबासाहेब बढे, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. युनूस पठाण, सर्व गटशिक्षणाधिकारी तसेच उपक्रमशील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत सिंगापूरला अभ्यास दौऱ्यावर गेलेल्या आणि जिल्ह्यातील गुणवंत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील गुणवत्ता वाढवण्यासाठी घेतलेल्या उपक्रमांची माहिती सादर केली.

मंत्री श्री.भुसे यांनी  अधोरेखित केलेले मुद्दे

  • हुशार विद्यार्थ्यांनीच इतर विद्यार्थ्यांना शिकवण्याचे उपक्रम घ्यावेत.
  • गावातील सुशिक्षित युवकांनीही लहान मुलांना शिकवण्यासाठी पुढे यावे.
  • घरातील आई-वडील, आजी-आजोबा यांनी रोज अर्धा तास मुलांशी संवाद साधावा व अभ्यासक्रम समजून घ्यावा.
  • संपूर्ण वर्षभरात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचे वार्षिक शालेय कॅलेंडर तयार करण्यात येत आहे.
  • एक आदर्श शाळा निवडून केंद्रस्तरावर विशेष योजना राबवली जाणार.
  • उर्दू शिक्षकांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाणार.
  • स्पेशालिस्ट शिक्षकांचा अनुभव व ज्ञान संपूर्ण जिल्ह्यासाठी वापरला जाईल.

प्राथमिक सुविधा आणि इन्फ्रास्ट्रक्चरबाबत मंत्री महोदयांनी दिलेले निर्देश :

  • प्रत्येक शाळेत स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी आणि उत्तम स्वच्छतागृह असावे.
  • केंद्रप्रमुखांनी शाळांना नियमित भेटी द्याव्यात व अडचणींचे त्वरित निराकरण करावे.
  • शिक्षकांनी मे महिन्यात पालकांशी संवाद साधावा आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करावा.
  • गणवेशासाठीची रक्कम शासनाकडून आगोदरच दिली जाईल, त्यामुळे गणवेश व भोजन हे दर्जेदार असले पाहिजे.

विद्यार्थ्यांसाठी नवीन योजना :

  • पुस्तकांबरोबरच इतर जीवनोपयोगी ज्ञान देण्याचा विचार.
  • विद्यार्थिनींसाठी ‘पिंक रूम’ उपलब्ध करून देण्यात येणार.
  • शालेय सायकल योजना सुरु करण्याचा विचार.
  • शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी घरी उत्पादित भाजीपाला शाळेत विक्रीसाठी आणावा, असे उपक्रम राबवावेत.
  • विद्यार्थ्यांची सहल विविध क्षेत्रात नेऊन त्यांना त्या क्षेत्राची माहिती दिली जावी.

शिक्षकांच्या सोयीसाठी उपाय :

  • अशैक्षणिक कामांचे ओझे कमी करून शिक्षणाशी संबंधित कामांना प्राधान्य.
  • गुणवंत शिक्षकांचे कार्य इतर शाळांनी देखील आत्मसात करावे.
  • खेळात प्राविण्य असल्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय स्पर्धांसाठी पाठिंबा.
  • शिक्षण हे पुण्याचे काम आहे आणि आपल्याला ही संधी मिळाली आहे, त्याचे सोनं करावे.

शेवटी मंत्री श्री. भुसे यांनी सर्व गुणवंत शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या.

मालाड येथे भव्य क्रिएटिव्ह स्पेसचा विकास होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ११ : मालाड येथील माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या (I&B) अखत्यारितील जवळपास २४० एकर जागेत भव्य क्रिएटिव्ह स्पेसचा विकास केला जाईल. या योजनेत केंद्र आणि राज्य शासन एकत्र येऊन को-क्रिएशन मॉडेलद्वारे काम करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

आज मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स येथील जिओ कन्व्हेंन्शन सेंटर येथील वेव्हज् २०२५ निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. यावेळी माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईला वर्ल्ड एंटरटेनमेंट कॅपिटल बनवण्याचं स्वप्न सत्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या या पुढाकारामुळे भारतातील नव्हे तर जागतिक पातळीवरील क्रिएटिव्ह इंडस्ट्रीसाठी मुंबई एक हब ठरणार आहे. पोस्ट प्रॉडक्शन, स्टुडिओज, फिल्म टेक्नोलॉजी, अ‍ॅनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्ससारख्या आधुनिक सेवा आणि अभ्यासाचे वर्ल्ड क्लास सेंटर इथे उभारले जाणार आहे. या प्रकल्पांमुळे मुंबईचं स्थान केवळ देशातच नव्हे, तर जगात एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतील प्रमुख केंद्र म्हणून बळकट होणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी व्यक्त केला.

0000

 

केंद्र शासनाच्या पुढाकाराने मुंबईत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

मुंबई, दि. ११ : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) मुंबईत गोरेगाव येथे उभारण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. मुंबई मनोरंजन उद्योगाचे मोठे केंद्र आहे. मात्र, या नव्या संस्थेमुळे भारताच्या सृजनशील उद्योगास जागतिक दर्जाचे व्यासपीठ मिळणार असल्याने मुख्यमंत्र्यांनी केंद्र शासनाचे आभार मानले आहेत.

आज मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स येथील जिओ कन्व्हेंन्शन सेंटर येथील वेव्हज् २०२५ निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या राजधानीत आणि देशाच्या आर्थिक राजधानीत ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ची (आयआयसीटी) स्थापना करण्यात येणार आहे. या संस्थेच्या माध्यमातून मुंबईला जागतिक क्रिएटिव्ह हब करण्याचा महत्त्वाकांक्षी उद्देश आहे. हा प्रकल्प केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता, त्याचा लौकिक जगभरात होणार आहे. आयआयसीटीमुळे क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी उद्योगाला नवी दिशा मिळणार आहे.

‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ ही संस्था केवळ चित्रपट निर्मितीपुरती मर्यादित न राहता, डिजिटल कंटेंट, व्हीएफएक्स, ॲनिमेशन, ऑडिओ-व्हिज्युअल स्टोरी टेलिंग, मीडिया इनोव्हेशन आणि वेब ३.० तंत्रज्ञान अशा क्षेत्रांतील संशोधन व प्रशिक्षणात कार्यरत असेल. यासाठी महाराष्ट्र शासनाने गोरेगाव येथील फिल्मसिटी येथे जागा निश्चित केली आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

0000

 

 

 

 

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६ : ६० फेलोंची निवड करण्यात येणार

मुंबई, दि. ११ :- राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा व त्या सोबतच त्यांच्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत व्हावी. तरुणांमधील कल्पकता व वेगळा विचार मांडण्याची क्षमता, उत्साह, तंत्रज्ञानाची आवड यांचा उपयोग प्रशासनास व्हावा आणि या माध्यमातून प्रशासकीय प्रक्रियांमध्ये गतिमानता यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील “मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम” २०२५-२६ जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार या कार्यक्रमात ६० फेलोंची निवड करण्यात येणार आहे. या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमासाठी १५ एप्रिल ते ५ मे २०२५ या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

फेलोंच्या निवडी संदर्भातील निकष, नियुक्ती संदर्भातील अटी व शर्ती तसेच शैक्षणिक संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमाची रूपरेषा व अंमलबजावणी बाबत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीत हा कार्यक्रम सुरू करण्यात येऊन यशस्वीपणे राबविण्यात आला. त्यानंतर २०२३-२४ या कालावधीतील  कार्यक्रम यशस्वीपणे राबविल्यानंतर आता २०२५-२६ साठी हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी नियोजन विभागाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालय यांच्यामार्फत करण्यात येत आहे.

फेलोंच्या निवडीचे निकष : अर्जदार भारताचा नागरिक असावा. शैक्षणिक अर्हता : कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान ६०% गुण आवश्यक) असावा.

अनुभव : किमान एक वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव आवश्यक राहील. तसेच, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्णवेळ इंटर्नशिप / अप्रेंटीसशिप /आर्टीकलशिपसह एक वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. पूर्णवेळ स्वयंरोजगार, स्वयंउद्योजकतेचा अनुभवही ग्राह्य धरण्यात येईल. अर्जदारास तसे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागेल.

भाषा व संगणक ज्ञान : मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक राहील. हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहील. तसेच, संगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान आवश्यक राहील.

वयोमर्यादा :- उमेदवाराचे वय अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास किमान २१ वर्षे व कमाल २६ वर्षे असावे. अर्थ व सांख्यिकी संचालनालयाद्वारे विहीत केलेल्या ऑनलाईनअॅप्लिकेशन प्रणालिद्वारे उमेदवाराने अर्ज करावयाचा आहे.

अर्जाकरिता शुल्कः- रुपये ५००/-

या कार्यक्रमात फेलोंची संख्या ६० इतकी निश्चित करण्यात आली असून, त्यापैकी महिला फेलोंची संख्या फेलोंच्या एकूण संख्येच्या १/३ राहील. १/३ महिला फेलो उपलब्ध न झाल्यास त्याऐवजी पुरुष फेलोंची निवड करण्यात येईल. फेलोंचा दर्जा हा शासकीय सेवेतील गट-अ अधिकाऱ्यांच्या समकक्ष असेल.

निवड प्रक्रिया :- फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन अर्ज करून ऑनलाईन परीक्षा शुल्क भरावे लागेल. तसेच ऑनलाईन अर्ज करताना आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. परीक्षा शुल्क भरणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षा (Online Objective Test) द्यावी लागेल.

ऑनलाईन परीक्षा देण्याची कार्यपद्धती संचालनालयाच्या mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल व त्यातील अटी व शर्तीचे उमेदवाराने पालन करणे आवश्यक राहील. यापूर्वी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमात काम केलेले फेलो पुनश्चः या कार्यक्रमांतर्गत फेलो निवडीसाठी पात्र असणार नाहीत. तसे फेलोंनी अर्जात नमूद करणे आवश्यक राहील.

वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या सुमारे २१० उमेदवारांना दिलेल्या विषयांपैकी एका विषयावरील निबंध विहित तारखेस व वेळेत ऑनलाईन पद्धतीने सादर करावा लागेल. वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या २१० उमेदवारांची मुलाखत मुंबई येथे घेण्यात येईल.

निवड झालेल्या फेलोंपैकी आवश्यकतेनुसार निवडक २० जिल्ह्यामध्ये प्रत्येकी दोन ते तीन फेलोंचा गट नियुक्त करण्यात येईल. या गटातील एक फेलो संबंधित जिल्हाधिकारी व एक ते दोन फेलो मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हापरिषद यांच्या अधिनस्त काम पाहतील.

फेलोंची नियुक्ती १२ महिने कालावधीसाठी असेल. यामध्ये वाढ करण्यात येणार नाही. तसेच फेलो रुजु झाल्याच्या दिनांकापासून १२ महिन्यांनी त्याची नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल.

या कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या फेलोंना दरमहा मानधन रुपये ५६,१००/- व प्रवासखर्च रुपये ५,४००/- असे एकत्रित रुपये ६१,५००/- छात्रवृत्तीच्या स्वरुपात देण्यात येतील.

शैक्षणिक कार्यक्रम हा फेलोशिपचा अविभाज्य भाग असेल. निवड झालेल्या फेलोंसाठी आयआयटी, मुंबई यांच्या सहकार्यातून स्वतंत्र सार्वजनिक धोरण या विषयातील पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित केला जाईल. या कार्यक्रमांतर्गत नियुक्त केलेल्या ठिकाणी काम करताना फेलोंना उपयोगी पडतील अशा विविध विषयांवर ऑफलाईन व ऑनलाईन व्याख्यानांचे आयोजन केले जाईल. ऑफलाईन व्याख्याने फेलोशिपच्या सुरुवातीस दोन आठवडे तसेच सहा महिन्यानंतर व शेवटी प्रत्येकी एक आठवडा, आयआयटी, मुंबई येथे आयोजित करण्यात येतील. याव्यतिरीक्त ऑनलाईन व्याख्याने वर्षभरात कार्यक्रमाच्या गरजेनुसार शनिवार, रविवार किंवा सार्वजनिक सुटीच्या दिवशी आयोजित करण्यात येतील. ऑफलाईन व ऑनलाईन सर्व व्याख्यानांना उपस्थित रहाणे फेलोंना अनिवार्य आहे. या कार्यक्रमाचा उद्देश फेलॉना सार्वजनिक हितासाठी काम करताना व धोरण निर्मिती करताना योग्यसाधने व शास्त्रीय पद्धतींचा वापर करण्यासाठी मदत करणे तसेच विकास कार्यक्रम राबविण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये व क्षमता वाढविणे हा असेल.

सदर पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर फेलोंना संबंधित संस्थेमार्फत स्वतंत्र प्रमाणपत्र दिले जाईल. शासनाकडून फेलोशिप कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नियुक्ती करण्यात आलेल्या संबंधित कार्यालय वा प्राधिकरणासोबत फेलोंनी करावयाचे काम (फील्ड वर्क) व शैक्षणिक कार्यक्रम हे दोन्ही फेलोशिपच्या कालावधीत यशस्वीपणे पूर्ण करणे फेलोंसाठी अनिवार्य राहील.

शैक्षणिक कार्यक्रमाव्यतिरिक्त परिचय सत्र, विविध सामाजिक संस्थांना भेटी, मान्यवर व्यक्तींशी संवाद, प्रमाणपत्र प्रदान या उद्देशाने वर्षभरात इतर काही कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल.

0000

 

ताज्या बातम्या

जागतिक माध्यम संवाद २०२५ : सदस्य राष्ट्रांद्वारे वेव्हज जाहीरनाम्याचा स्वीकार

0
‘एआय’च्या युगात सर्जनशीलतेला प्रोत्साहन देताना परंपरा आणि वारशाला अभिव्यक्ती देण्यासाठी दर्शवली सहमती पक्षपात कमी करत, सामग्रीचे लोकशाहीकरण करून आणि नीतिमत्तेला प्राधान्य देताना उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या जबाबदार...

नवी मुंबईतील ‘एज्युकेशन सिटी’मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांच्या माध्यमातून शिक्षण मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. २ - विकसित भारताच्या उभारणीसाठी आखण्यात आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताचे दरवाजे जगासाठी खुले झाले आहेत. नवी मुंबईत आकाराला येत असलेल्या ‘एज्यूकेशन...

अखिल भारतीय सिनेमा दंतकथा नाही; चित्रपट उद्योगातील दिग्गजांचा भारतीय चित्रपटातील एकतेवर भर

0
कोविडनंतर चित्रपट पाहण्यातील बदलते कल अनुपम खेर यांनी केले अधोरेखित ज्यावेळी आपली परस्पर सामायिक संस्कृती, गाणी, कथा, माती याचा आदर करता, त्यावेळी तो...

‘वेव्हज्’ने मांडली जागतिक स्ट्रीमिंग आणि चित्रपट अर्थव्यवस्थेत भारताची विकसित होणारी भूमिका

0
“आशयाने खऱ्या अर्थाने सीमा ओलांडून प्रवास करावा यासाठी भारताने स्टुडिओ संबंधित पायाभूत सुविधा, निर्मिती केंद्रे आणि तंत्रज्ञान-चालित प्रणालीमध्ये गुंतवणूक केली पाहिजे” - शिबाशिष सरकार सर्जनशीलतेत...

जगाचे आशय निर्मिती केंद्र बनण्याकरिता भारतासाठी उत्तम काळ  – अभिनेत्री श्रद्धा कपूर

0
भारत आशय निर्मितीत अभूतपूर्व वाढ अनुभवत आहे -  इंस्टाग्राम प्रमुख अॅडम मोसेरी वेव्हज्‌ २०२५ मध्ये अनौपचारिक संभाषणात कल आणि व्हायरल होणे यावर विचारमंथन मुंबई,...