झोपडपट्टीधारक, रस्ता रुंदीकरण बाधितांच्या तक्रारींवर कार्यवाही करावी; पाणीटंचाईची समस्या दूर करा – वनमंत्री गणेश नाईक यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश
अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत ठाणे जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांचा कायापालट – केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आभार व्यक्त
ठाणे, दि.11(जिमाका):- भारतीय रेल्वेच्या “अमृत भारत स्टेशन” योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण 132 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेवेळी ही माहिती देण्यात आली. महाराष्ट्रातील रेल्वेच्या दर्जेदार पायाभूत सुविधेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री श्री. वैष्णव यांचे आभार मानले.
या योजनेत ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा, शहाड, दिवा आणि बेलापूर या महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे. यामुळे या भागातील प्रवाशांना आधुनिक सुविधांचा लाभ घेता येणार आहे.
या योजनेमुळे स्थानकांवर प्रवाशांसाठी वेटिंग लाऊंज, फूड कोर्ट्स, स्वच्छतागृहे, लिफ्ट्स, एस्कलेटर्स आणि डिजिटल सुविधांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच, स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि शहराशी अधिक सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित केली जाणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील पुनर्विकासासाठी निवडलेल्या स्थानकांची नावे आणि त्यासाठीचा निधी पुढीलप्रमाणे आहे:
* टिटवाळा स्टेशन: 25 कोटी रुपये
* शहाड स्टेशन: 8.4 कोटी रुपये
* दिवा स्टेशन: 45 कोटी रुपये
* बेलापूर स्टेशन: 32 कोटी रुपये
याव्यतिरिक्त, कल्याण डोंबिवली परिसरातील डोंबिवली स्टेशनचा देखील या योजनेत समावेश आहे.
या योजनेमुळे ठाणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना निश्चितच चांगला अनुभव मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत अमरावती जिल्ह्यातील ३ रेल्वे स्थानकांचा कायापालट – रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती
अमरावती, दि. 11 : भारतीय रेल्वेच्या ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेंतर्गत राज्यातील एकूण 132 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. यात जिल्ह्यातील तीन रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यासोबतच बडनेरा रेल्वे स्थानकाला 36.3 कोटी आणि धामणगाव रेल्वे स्टेशनला 18 कोटी रुपयांचा निधी दर्जेदार सुविधा उपलब्ध करण्यासाठी देण्यात येणार आहे.
या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेवेळी ही माहिती देण्यात आली. महाराष्ट्रातील रेल्वेच्या दर्जेदार पायाभूत सुविधेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री श्री. वैष्णव यांचे आभार मानले.
या योजनेत समाविष्ट काही महत्त्वाची स्थानके म्हणजे अमरावती आणि ग्रामीण भागातील स्थानकांमध्ये बडनेरा आणि धामणगाव रेल्वे यांना स्थान देण्यात आले आहे.
या योजनेमुळे स्थानकांवर प्रवाशांसाठी वेटिंग लाऊंज, फूड कोर्ट्स, स्वच्छतागृहे, लिफ्ट्स, एस्कलेटर्स आणि डिजिटल सुविधांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच, स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि शहराशी अधिक सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित केली जाणार आहे.
या पुनर्विकासात स्थानकांची नावे आणि त्यासाठीचा निधी पुढीलप्रमाणे आहे. बडनेरा (36.3 कोटी), धामणगाव स्टेशन (18 कोटी) निधी देण्यात येणार आहे
शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत – शिक्षणमंत्री दादाजी भुसे
नंदुरबार, दिनांक 11 एप्रिल, 2025 (जिमाका) : शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावा. आपल्या शाळेसाठीच नव्हे, तर संपूर्ण राज्यासाठी करण्याच्या भावनेने कर्तव्य करावे, असे आवाहन शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात शिक्षण विभागाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक झाली. त्यावेळी मंत्री श्री. भुसे बोलत होते. या बैठकीस साक्रीच्या आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांच्यासह शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रवीण अहिरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वंदना वळवी, शिक्षणाधिकारी (योजना) उर्मिला पारधे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डॉ. राजेंद्र महाजन, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) नीलेश लोहकरे, अधिव्याख्याता, डाएट बाबासाहेब बढे, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. युनूस पठाण, सर्व गटशिक्षणाधिकारी तसेच उपक्रमशील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत सिंगापूरला अभ्यास दौऱ्यावर गेलेल्या आणि जिल्ह्यातील गुणवंत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील गुणवत्ता वाढवण्यासाठी घेतलेल्या उपक्रमांची माहिती सादर केली.
मंत्री श्री.भुसे यांनी अधोरेखित केलेले मुद्दे
- हुशार विद्यार्थ्यांनीच इतर विद्यार्थ्यांना शिकवण्याचे उपक्रम घ्यावेत.
- गावातील सुशिक्षित युवकांनीही लहान मुलांना शिकवण्यासाठी पुढे यावे.
- घरातील आई-वडील, आजी-आजोबा यांनी रोज अर्धा तास मुलांशी संवाद साधावा व अभ्यासक्रम समजून घ्यावा.
- संपूर्ण वर्षभरात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचे वार्षिक शालेय कॅलेंडर तयार करण्यात येत आहे.
- एक आदर्श शाळा निवडून केंद्रस्तरावर विशेष योजना राबवली जाणार.
- उर्दू शिक्षकांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाणार.
- स्पेशालिस्ट शिक्षकांचा अनुभव व ज्ञान संपूर्ण जिल्ह्यासाठी वापरला जाईल.
प्राथमिक सुविधा आणि इन्फ्रास्ट्रक्चरबाबत मंत्री महोदयांनी दिलेले निर्देश :
- प्रत्येक शाळेत स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी आणि उत्तम स्वच्छतागृह असावे.
- केंद्रप्रमुखांनी शाळांना नियमित भेटी द्याव्यात व अडचणींचे त्वरित निराकरण करावे.
- शिक्षकांनी मे महिन्यात पालकांशी संवाद साधावा आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करावा.
- गणवेशासाठीची रक्कम शासनाकडून आगोदरच दिली जाईल, त्यामुळे गणवेश व भोजन हे दर्जेदार असले पाहिजे.
विद्यार्थ्यांसाठी नवीन योजना :
- पुस्तकांबरोबरच इतर जीवनोपयोगी ज्ञान देण्याचा विचार.
- विद्यार्थिनींसाठी ‘पिंक रूम’ उपलब्ध करून देण्यात येणार.
- शालेय सायकल योजना सुरु करण्याचा विचार.
- शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी घरी उत्पादित भाजीपाला शाळेत विक्रीसाठी आणावा, असे उपक्रम राबवावेत.
- विद्यार्थ्यांची सहल विविध क्षेत्रात नेऊन त्यांना त्या क्षेत्राची माहिती दिली जावी.
शिक्षकांच्या सोयीसाठी उपाय :
- अशैक्षणिक कामांचे ओझे कमी करून शिक्षणाशी संबंधित कामांना प्राधान्य.
- गुणवंत शिक्षकांचे कार्य इतर शाळांनी देखील आत्मसात करावे.
- खेळात प्राविण्य असल्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय स्पर्धांसाठी पाठिंबा.
- शिक्षण हे पुण्याचे काम आहे आणि आपल्याला ही संधी मिळाली आहे, त्याचे सोनं करावे.
शेवटी मंत्री श्री. भुसे यांनी सर्व गुणवंत शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या.
पालकमंत्री टास्क फोर्स आणि जनता दरबारातील तक्रारींचा पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी घेतला आढावा
परभणी, दि. 11 (जिमाका) : पालकमंत्री टास्क फोर्स आणि जनता दरबारातील नागरिकांनी केलेल्या तक्रारींच्या अर्जाचा आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, महानगरपालिका आयुक्त धैर्यशिल जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संगीता चव्हाण उपस्थित होते.
पालकमंत्री टास्क फोर्स माध्यमातून प्रत्येक अधिकाऱ्यांना “एक गाव दत्तक” या उपक्रमाच्या माध्यमातून 93 अधिकाऱ्यांना गावे दत्तक देण्यात आली आहेत. एका वर्षात ही 93 गावे आदर्श गाव करण्याचे आपले लक्ष असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या उपक्रमाअंतर्गत गावांना भेटी दिलेल्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. तसेच याअंतर्गत गावात येत असलेल्या अडचणीबाबत तालुकास्तरावर एक बैठक घेण्याचीही सूचना त्यांनी केली. अधिकाऱ्यांनी भेटी दिलेल्या गावातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या जनता दरबारामध्ये आलेल्या अर्जांच्या कार्यवाहीबाबत पालकमंत्री यांनी यावेळी आढावा घेतला. जनता दरबारामध्ये एकूण 887 अर्ज करण्यात आले होते. त्यापैकी 421 अर्ज निकाली काढण्यात आले असून, उर्वरित अर्जांवर कार्यवाही चालू असल्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी यावेळी सांगितले.
जनता दरबारातील उर्वरित अर्जावर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी यावेळी उपस्थित विभाग प्रमुखांना दिल्या. पुढील जनता दरबारापर्यंत एकही अर्ज प्रलंबित राहणार नाही, अशा सूचना त्यांनी यावेळी दिली. जनता दरबारातील अर्जांबाबत स्वत: अधिकारी यांनी लक्ष घालून अर्ज निकाली काढावा. जनता दरबारात जास्त अर्ज शेत रस्त्यांचे येत असून हे अर्ज या महिन्याअखेर निकाली काढण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
महावितरण मंडळ कार्यालयावरील ‘रुफ टॉप सोलार सौरऊर्जा’ प्रकल्पाचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन
परभणी शहरातील महावितरण मंडळ कार्यालयावर उभारण्यात आलेल्या 35 किलो व्हॅट रुफ टॉप सोलार सौरऊर्जा प्रकल्पाचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले.
यावेळी महावितरणचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, कार्यकारी संचालक (प्रकल्प) धनंजय औंढेकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, नांदेड महावितरण मुख्य अभियंता आर.बी.माने, अधीक्षक अभियंता आर.के.टेंभुर्णी, कार्यकारी अभियंता मंदार वग्यानी, जी.के.गाडेकर,यु.व्ही घोंगडे आदींसह महावितरणचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी सौरऊर्जा प्रकल्प वेळेच्या आधी उभारणारे कंत्राटदार कैलास कापसे, भागवत देशमुख, योगेश मुळी यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अत्याधुनिक नवीन अग्निशमन वाहनांचे पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन
जिल्ह्यात घडणाऱ्या आपत्कालीन घटने दरम्यान जलद प्रतिसाद देणे करिता आर्य पंप्स कंपनीने तयार करुन दिलेल्या मिनी रेक्यू टेंडर अग्निशमन वाहनाचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय मदत व पुनर्वसन विभाग यांचे मार्फत जिल्ह्यात घडणाऱ्या आपत्कालीन घटने दरम्यान जलद प्रतिसाद देणे करिता जिल्ह्यातील एकूण तीन नगरपालिका व एक महानगरपालिका, अग्निशमन विभागास, अत्याधुनिक सर्व साहित्य नियुक्त असलेले गुरखा वाहन फायर रेस्क्यू मिनी टेंडर शासन स्तरावरून प्राप्त झाले आहे. अग्निशमन वाहने अनुक्रमे नगरपरिषद गंगाखेड, सेलू, जिंतूर व अग्निशमन विभाग, परभणी शहर महानगरपालिका यांना उपलब्ध करून दिली आहेत.
यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर, शहर महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकर, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके, संबंधित नगरपरिषद विभागाचे अग्निशमन अधिकारी कर्मचारी इत्यादी उपस्थित होते.